Wednesday 18 June 2014

Zubin Mehta – Kashmir Concert!!




राजकीय धुळवडीत सापडलेला हा कार्यक्रम काल अखेर झाला!! आपल्याकडे कुठल्या विषयावरून राजकारण केले जाईल, हे ब्रह्मदेवाला देखील आगाऊ वर्तवणे कठीण आहे. असो, इथे मला राजकारणाची चर्चा अजिबात करायची नाही.
झुबीन मेहता, हे जागतिक कीर्तीचे ख्यातनाम नाव आहे. एक गोष्ट इथे मान्यच करायला हवी, विशेषत: आपल्या समाजात अजूनही पाश्चात्य संगीत म्हटले की लगेच Rock, Pop, Reggie हेच संगीत प्रामुख्याने ऐकले जाते. अर्थात, तसे पाहिले तर भारतीय शास्त्रीय संगीताबाबत हीच परिस्थिती आहे. रागदारी संगीताचे रसिक तसे मोजके(च) असतात, तेंव्हा इथे तर पाश्चात्य शास्त्रीय संगीत!! तेंव्हा रसिक मंडळीत बरेचसे “उच्चभ्रू” समाजातील लोक आहेत आणि ही वस्तुस्थिती आहे. पुरावा म्हणून दाखवायचे झाल्यास, मुंबईत NCPA मध्ये काहीवेळा सिम्फनी कार्यक्रम होत असतात पण किती रसिक, त्या कार्यक्रमाला हजेरी लावतात? मध्यंतरी, मी एका कार्यक्रमाला गेलो होतो, तेंव्हा याची रोकडी प्रचीती आली!!
थोडक्यात सिम्फनी संगीत म्हणजे पाश्चात्य शास्त्रीय संगीत असे थोडक्यात म्हणता येईल. काल एकूण ९० मिनिटांचा कार्यक्रम होता पण प्रत्येक क्षण संगीताने भारलेला होता. वास्तविक, असे कार्यक्रम बंदिस्त सभागृहात करतात ( मी परदेशी असताना, प्रिटोरिया आणि डर्बन इथे असे २ कार्यक्रम, बंदिस्त सभागृहात बघितले होते) बंदिस्त सभागृहात कार्यक्रम केल्याचा एक फायदा मिळतो, वाद्यातून निघालेला प्रत्येक सूर, त्याच स्वरुपात तुम्हाला ऐकायला मिळतो.
कार्यक्रमाची सुरवात काश्मिरी लोकसंगीत आणि पाश्चात्य सूर यांची सांगड घातलेली सुंदर धूनेने झाली, अर्थात त्यामुळे आलेल्या काश्मिरी लोकांना त्याचे अप्रूप वाटले. गंमतीचा भाग म्हणजे काश्मिरी परिसरातील वाद्ये आणि पाश्चात्य वाद्ये याचा सुरेख मेळ घातला होता. काहीवेळेस तर मला हंगेरियन लोकसंगीताचा थोडा भास झाला!! सुरवात ठाय लयीत झाली, पण लगेच लय दुगणी झाली आणि तालवाद्ये त्याला अनुरूप साथ द्यायला लागली. लोकसंगीतात एका मर्यादेपर्यंत तुम्ही Improvisation करू शकता त्यामुळे स्वरविस्ताराला फारसा वाव मिळत नाही. धुनेच्या शेवटाला, आपल्या संगीतात ज्याला “झाला” म्हणतात, त्या गतीत शिरली आणि समाप्त झाली.
नंतर माझ्या आवडत्या बेथोवनची Overture No. 3 ही रचना सुरु केली. बेथोवन हा १९ व्या शतकातला संगीतकार, आज त्याला २०० वर्षे झाली पण आजही त्याच्या रचना प्रत्येक कलाकाराला आव्हान देतात. त्याच्या बहुतेक रचना,पारंपारिक C (आपला षड्ज) या स्वराने सुरु न होता, D, E या स्वराने सुरु होतात. संगीत नेहमीच नेमक्या शब्दात मांडणे कसे अवघड असते, याचा रोकडा अनुभव ही रचना ऐकताना येतो!! व्हायलीनच्या धीरगंभीर सुरांनी रचनेला सुरवात झाली, काही क्षणात, Trumpet,Chello, Saxophone या वाद्यांची साथ मिळाली. विशेष भाग म्हणजे, कार्यक्रम खुल्या मंचावर होता तरीही वाद्यातून निघालेला प्रत्येक सूर, स्वच्छपणे ऐकायला येत होता. हळूहळू रचनेची लय थोडी द्रुत म्हणजे मध्य लयीत शिरली. पाश्चात्य संगीताचे हे खास वैशिष्ट्य म्हणावे लागेल, अनेक वाद्ये जरी असली तरी जिथे पहिल्या वाद्याने सूर सोडला आहे, त्या सुराचे विस्तारीकरण त्या वाद्याला येउन मिळणारे वाद्य करते आणि ती रचना पुढे फुलत जाते. मध्येच खर्जातला सूर तर पुढच्या क्षणाला तीव्र सप्तकातला सूर, ही सुरांची कसरत खरोखरच अतिशय कठीण असते. या रचनेची आणखी गंमत अशी आहे, व्हायलीनचे सूर जेंव्हा प्रामुख्याने वाजत असतात, तेंव्हा त्याच्या पाठीमागे Flute, Trumpet या वाद्यांचे सूर त्या व्हायलीनच्या सुरांना असे काही परिमाण देत असतात की त्यामुळे ती रचना अधिक Complex आणि अधिक बंदिस्त होते. म्हणजे, व्हायलीनवर D major, E sharp अशी सुरांची वळणे चालू असतात तर त्याच्या पाठी ही दुसरी वाद्ये हीच वळणे अधिक “घाटदार” ( हा सांगीतिक शब्द नाही तरी!!) करीत असतात. मोझार्ट काय, बेथोवन काय किंवा नंतरच्या काळातील, ब्राहम, बाख हे संगीतकार घेतले तर हेच वैशिष्ट्य कायम दिसते. व्हायलीन वादक तर खरोखर कमाल करीत होते.
नंतर Trumpet वादनाच्या २ एकल रचना वाजविल्या. वास्तविक पाश्चात्य संगीतात शक्यतोवर एकल वादन फारसे प्रचलित नाही तरीही अशा कार्यक्रमातून, असे वाद्य केंद्रस्थानी ठेऊन,रचना वाजवली जाते, म्हणजे जसे इथे, Trumpet वादकाने रचनेला सुरवात करायची आणि काही मिनिटांनी त्याच्या सुरांना इतर वाद्यांनी भरीवपणा द्यायचा, असा सादरीकरणाचा प्रकार असतो, अर्थात इतर वाद्ये ही अशा रचनेत नेहमीच पूरक वाद्ये म्हणूनच वावरत असतात. युरोपियन लोकसंगीताची धून (नेमकी कुठल्या देशाची समजले नाही, तरीही!!) Trumpet वर सुरु झाली. हळूहळू रचनेने गती घेतली आणि त्यात, Flute,Chello, व्हायलीन, ही वाद्ये मिसळली. मी, आतापर्यंत बरेच असे कार्यक्रम ऐकले आहेत आणि प्रत्येकवेळेस, मला व्हायलीन वादन चकित करते!! सुरांच्या इतक्या विविध “जाती” या वाद्यावर ऐकायला मिळतात की ऐकताना मन थक्क होते. मला तर अजूनही ठामपणे वाटते, आपण हे वाद्य अजूनही संपूर्णपणे आत्मसात केलेले नाही ( आपल्याकडील सगळ्या असामान्य वादकांना विनम्रपणे स्मरून हे विधान केलेले आहे) ह्या रचनेत जरी Trumpet प्रमुख वाद्य असले तरी रचनेच्या मध्यावर व्हायलीन वादनाची कमाल आहे, ज्या गतीने सूर ऐकायला मिळतात, खरच धन्य वाटले.
पुढील परत एकल वादन, प्रसिध्द वादक Julian चे होते. मुळात पाश्चात्य संगीतात, व्हायलीन वाद्याचा सढळ वापर असतो, इथेतर याला पूर्ण मुक्तता मिळालेली!! सुरवातीला नेहमीप्रमाणे इतर व्हायलीन वादक आणि Flute वादनाने सुरवात झाली. ते सूर संपले आणि याचे वादन सुरु झाले. Julian का जगप्रसिद्ध आहे, याला हे वादन म्हणजे पुरावा आहे!! ही धून ऐकताना मला प्रश्न पडला, कुठल्या सुराचा “मझा” घ्यायचा!! व्हायलीनवर याची बोटे “नृत्य” करतात!! ऐकताना विस्मय याचा वाटतो, हा माणूस उभा आहे, लय बेफाट वर-खाली फिरत आहे, हा माणूस कशी काय आपली बोटे कंट्रोल करतो? एक हरकत सरळ नाही की सूर सरळ व्यक्त होत नाहीत!! कुठेही तारांची “किचकिच” किंवा “बो” कुठल्या सुरांवर प्रमाणाबाहेर वाद्यावर दबला गेला आहे!! आणि त्याहून महत्वाचे, वादन किती सहज!! आपण, ३  सप्तकांवरील Performance असामान्य मानतो पण इथे मला ५ सप्तके ऐकायला मिळाली!!
शेवटाला परत एकदा बेथोवनची 6th सिम्फनी!! सुरवातीलाच वाद्यमेळ, वरच्या टिपेच्या सुरांत सुरु होतो, म्हणजे आपल्या भाषेत तीव्र सप्तकात!! ही बेथोवनची खासियत आणि असामान्यता!! वादळ आल्याप्रमाणे सूर अंगावर आणायचे आणि क्षणात पाणी ओसरल्याचा भास निर्माण करायचा!! हार्मनी हेच तर खरे वैशिष्ट्य. एकाचवेळी अनेक सुरांची अनुभूती द्यायची आणि चकित करून टाकायचे!! बेथोवन हा सिम्फनी संगीताचा “बादशहा” आहे!! सुरांच्या कल्लोळातून एकाकीपणा असा काही दाखवतो की ऐकताना, शब्द किती दुबळे आहेत,याची प्रचीती यावी!! ज्यांना सुरांचे शास्त्र माहीत नाही, अशा रसिकांना देखील अवाक करणारा!!
मला नेहमीच या संगीतकारांचे नवल वाटते,इतकी वर्षे झाली तरी यांच्या रचनेतील एक सूर देखील बदलावा, असे कुणाला वाटले नाही!! इतकी सुदृढ आणि सकस बांधणी. अर्थात, हे आपल्या संगीतात देखील आहे म्हणा. यमन, पुरिया, दरबारी सारखे राग शतकानुशतके चालू आहेत आणि प्रत्येक “जाणता” कलाकार त्यातून, नित्यनुतन निर्मिती करीत आहे. ही संगीताची दुनियाच अशी अजब आहे, इथे जितके खोल जाऊ, तितके हाताशी गुरफटलेपण येते!!
खरतर यातील प्रत्येक रचनेवर निबंध लिहावा, या योग्यतेच्या रचना आहेत. आता, झुबीन मेहता!! पाश्चात्य संगीतात Conductor या व्यक्तीला अपरिमित महत्व असते, म्हणजे ती व्यक्ती ज्याप्रमाणे रचना Interprete करते, त्या नजरेने सगळा वाद्यवृंद वादन सादर करीत असतो. मला तर झुबीन मेहता म्हणजे जिवंत वाद्यच वाटते!! त्याच्या हातातील तो Baton, त्याची आणि त्याचबरोबर दुसऱ्या हाताची हालचाल, हा कमनीय नृत्याचा अविष्कार असतो. वादन चालू असताना, त्याचा चेहरा बघणे, हा एक अनुभव आहे, प्रत्येक सुराचे चलन, त्याच्या चेहऱ्यावर आधी उमटते आणि त्याचे सादरीकरण, इतर वादक करतात!!
खरोखर सगळ्यांनी हा कार्यक्रम बघायलाच हवा!! पाश्चात्य संगीत म्हणजे काय, हे समजून घ्यायचे असेल तर हा कार्यक्रम बघणे आवश्यक!! सुदैवाने Youtube वरहा कार्यक्रम बघता येतो.
मी तर download करून घेतला आहे, माझी, मी सोय बघितली आहे!!

No comments:

Post a Comment