Wednesday 18 June 2014

रूपवेध – सौंदर्यदिशा!!




आपल्याला एखादी गोष्ट आवडली की लगेच आपण त्या गोष्टीचा बहुतेकवेळा फारसा विचार न करता, त्या गोष्टीला आपलेसे करून टाकतो. वस्तुत: यात फारसे चूक काहीच नसते परंतु तो गोष्ट आपल्याला का आवडली आहे, याचा आपण फारसा विचार करीत नाही, मग मोहक सुवास असो, अलौकिक स्वर असो, एखादे अप्रतिम चित्र किंवा शिल्प असो किंवा माणसातील सौंदर्य असो. प्रथमक्षणी आपल्या मनावर जे चित्र उमटते, त्यानुसार आपण आपली आवड ठरवीत असतो. प्रथम भास जर का फारच आवडला असेल तर त्याचा परिणाम बराच काळ मनावर ठसवला जातो. पण, मनावर उमटलेले चित्र, वस्तुत: काय आहे, त्यातील कुठला भाग खास आहे, आणि मुळात ते “सौंदर्य” म्हणून कितपत असामान्य आहे, याचा शास्त्राबर विचार फारसा करीत नाही. शास्त्र म्हटले की, आपली मने थोडी दचकतातच!! कुठल्याही कलेचे, विचाराचे शास्त्र हे असतेच आणि ते शास्त्र जरी आपल्याला अवगत नसले तरी आपण त्याचा अनाहूतपणे का होईना आस्वाद घेत असतो. मग, ते फुल असेल, फळ असेल,रंग असेल, सुस्वरूप तरुणी-तरुण असेल किंवा अप्रतिम विचार देखील असू शकतो. प्रत्येक गोष्टीत एक मुलभूत गोष्ट नक्कीच असते आणि म्हणजे “सौंदर्य”!! मराठीत, “सौंदर्यशास्त्र” हे त्यामानाने मागील शतकातच विकसित व्हायला लागले आहे आणि त्याचे प्रणेते,हे कै. मर्ढेकर आहेत. मुळात ही संकल्पना पाश्चात्य संस्कृतीत विकसित झाली आणि नंतर त्या वाचनातून, आपल्याकडे मर्ढेकरांनी मराठीत आणली. त्यामुळे, आपल्याकडील बहुतेक विचारवंतांवर पाश्चात्य विचारसरणीचा प्रभाव स्पष्टपणे जाणवतो. “रूपवेध” या पुस्तकातील पहिलेच प्रकरण हे “मर्ढेकर : कलामीमांसा” हे आहे.
खरतर हे प्रकरण इतके आकाराने लहान नाही तर, दीर्घ निबंध आहे आणि अर्थात, नावाप्रमाणेच समजायला अतिशय कठीण आहे. त्यावेळेसही त्यांच्यावर टीका झाली, आजही होत आहे, पण हे असेच होत राहणार कारण काळानुरूप संकल्पना, विचार बदलत असतात आणि त्यानुरूप शास्त्र अधिक विकसित होत असते. जिथे संगीतासारख्या कैवल्यात्मक आनंदाचे शास्त्र अजूनही संपूर्णपणे सिध्द झालेले नाही, आजही भरताने मांडलेल्या संकल्पना नव्या दृष्टीकोनातून तपासल्या जातात, नवीन शास्त्रोक्त उपकरणांद्वारे स्वरांचे “विच्छेदन” केले जाते आणि त्यातून नावे सिद्धांत तयार होत असतात. स्वर जरी नैसर्गिक घटना असली तरी त्याचे काही मुलभूत नियम हे आहेतच आणि ते शास्त्राद्वारे सिध्द होतात. “सौंदर्य” ही संकल्पना एकतर अति भासमान असते आणि फार वैय्यक्तिक पातळीवर हाताळली जाते, त्यामुळे त्याच्या निर्दोष व्याख्येत बरेच दोष निर्माण होत जातात आणि त्यानुरूप शास्त्र कठीण होत जाते. पाश्चात्य विचारवंत मूर, रसेल व्हाईटहेड अशा काही लोकांनी “सौंदर्य” विषयी काही मुलभूत स्वरूपाचे लेख लिहिले, ग्रंथात छाननी केली आणि त्याच्या परिशीलनाने, मर्ढेकरांनी मराठीत स्वत:च्या मतांनुसार नवी मांडणी केली. त्यात, नवे मानसशास्त्र, आधुनिक तत्वज्ञान व तर्कशास्त्र यांचा उहापोह केला गेला. या लेखात, नरहर कुरुंदकरांनी, मर्ढेकरांनी जी नवी विचारसरणी मराठीत आणली, त्याची समीक्षा केलेली आहे. एक तर खरे, मर्ढेकरांपुर्वी मराठीत अशा प्रकारचे मुलभूत विचार मांडले गेले नव्हते आणि त्यामुळे मराठी सौंदर्यशास्त्रावर त्यांच्या विचारसरणीचा प्रभाव पडणे क्रमप्राप्तच होते.
मानवी ज्ञान संदिग्ध, विसंगत आणि आवश्यकतेपेक्षा अधिक निश्चितार्थ शब्दात मांडलेले असते.परंतु त्यात किती गुंतागुंत आहे, आणि पूर्वी जे साधे, सरळ वाटत होते ते तितकेसे सहज नाही, ह्याची प्रथम जाणीव मर्ढेकरांनी दिली. कलामीमांसेतील प्रश्नांची तर्तिक क्रमवारी मराठीत सर्वप्रथम मर्ढेकरांनी लावली, परंतु संदिग्ध, आणि नादमधुर भाषेची आपल्या मनावर पकडच इतकी दृढ आहे की तर्कशुद्ध  व सुस्पष्ट असे विवेचन आपल्याला पटतच नाही. मर्ढेकरांच्यावर क्लिष्टतेचा नेहमी आरोप केला जातो पण वस्तुस्थिती अशी आहे की, त्यांच्याइतका सुस्पष्ट व सरळ तर्कशुद्ध विवेचन करणारा विचारवंत विरळाच. अर्थात, मुळात ही जी संकल्पना आहे, ती पाश्चात्यांकडून आपल्याकडे आलेली असल्याने, त्या विचारसरणीवर त्यांचा प्रभाव असणे, हे उघड आहे. या दृष्टीने मर्ढेकरांच्या लिखाणाचे स्थूलपणे दोन भाग होतात. पहिला भाग सौंदर्यमीमांसा आहे. अस्तित्व, प्रत्यय आणि फलश्रुती या ३ टप्प्यांनी त्यांचा सौंदर्यविचार प्रकट होतो. दुसरा भाग, याच क्षेत्रातील अनेक उपप्रश्नांवरील त्यांच्या विवरणाचा आहे. मर्ढेकरांनी उपप्रश्नांना जी उत्तरे दिली आहेत, त्याविषयी बरीच साशंकता उपस्थित होते. बरेचवेळा त्यांची जी परिभाषा आहे, त्याच्या नेमकेपणाविषयी गोंधळ निर्माण होतो. वेगळ्या शब्दात लिहायचे झाल्यास, कलावंत जे अनुभव घेतो, त्या अनुभवांशी पूर्णपणे प्रामाणिक राहात नाही, असे ते म्हणतात. जसे, “घोडा” पाहून तो सरळ जसाच्या जसा साहित्यात आणावा, असे मर्ढेकर मानत नाहीत. तर कलावंताने आपल्या कल्पनात्मक प्रतिक्रियांशी प्रामाणिक होण्याचा प्रयत्न करावा, त्या अनुभवाचे सर्व सार्थपदर समजून घ्यावेत, या अनुभवात जी अंतर्गत व्यापकता आणता येणे शक्य आहे, ती आणावी. दुसऱ्या उदाहरणाने बघायचे झाल्यास, एखादे उत्तम गाणे ऐकताना आपण केवळ कान झालेले असतो ढोबळ अर्थाने कलेचा आस्वाद आपण एखाद्या इंद्रीयामार्फत घेत असलो तरी वास्तविकरीत्या तो आस्वाद कमीअधिक प्रमाणात आपल्या सर्व शक्ती एकवटून घेत असतो.तेंव्हा कलेची शुद्धता ही कलाकृतीच्या श्रेष्ठतेचे एक नाव आहे. कोणत्याही कलाकृतीची श्रेष्ठता तिचा किती ज्ञानेन्द्रीयांशी संबंध येतो, यावरून न ठरविता कलाकृतीतील अंतर्गत संघटनेवरून मूल्यमापन झाले पाहिजे, असे मर्ढेकरांचे मत आहे. कलाप्रकारांची अशी प्रतवारी लावणे जरी ढोबळ असले तरी आपल्या मुलभूत भूमिकेशी सुसंगत राहताना अपरिहार्यपणे घडणारी आहे.म्हणजेच संगीत ही श्रेष्ठ कला म्हटल्यावर चिल्लर गायक, श्रेष्ठ कलाप्रकारांतील गौण कलावंत असे मानण्याची आपत्ती येते. यापुढील पायरीवर, श्रेष्ठातील गौण असणे बरे की गौणातील श्रेष्ठ असणे बरे, हा प्रश्न उपस्थित होतो. त्यातून सुसंगती म्हणजे सौंदर्य अशी भूमिका घेतली की, कलाप्रकारांतील शुद्धतेचा मुद्दा गाळता येणार नाही. यातच दुसरा मुद्दा असा आहे की, मर्ढेकरांनी कल्पनाशक्तीला विवेचनात स्थान दिलेले नाही.अर्थात, असा आरोप करण्यात तसा फारसा अर्थ नाही, कारण त्यांनीच कलामीमांसेत संवेदना आणि त्याच्या रचनेची सौंदर्यतत्वे याला पूर्ण स्थान दिले आहे. वास्तविक कुठलेही शास्त्र आपल्या कक्षेत येणाऱ्या घटनांच्या बाबतीत सुसंगत विचार करीत असते. या घटना वास्तविक असतात किंवा मानसिक असतात.याबाबत विचार करायचा झाल्यास, विधानांच्या आधारे विचार करावा लागतो आणि सुसंगत विचार करायचा झाल्यास तर्कशास्त्राचे नियम पाळावे लागतात. या दृष्टीने विचार केल्यास, संवेदनावर्गीय विधानांचे ५ प्रमुख गट आहेत.१] दृक्संवेदनाधिष्ठित,२] श्रुतीसंवेदनाधिष्ठित,३] त्वक-संवेदनाधिष्ठित, ४] गंध – संवेदनाधिष्ठित, ५] स्वाद -  संवेदनाधिष्ठित. कोणत्याही गटातील संवेदना दुसऱ्या गटातील संवेदना अस्पष्ट करीत असतात. म्हणजेच कुठलाही माणूस एकाचवेळी पाहण्यात आणि ऐकण्यात तल्लीन होऊ शकत नाही. म्हणून वस्तुनिष्ठ सौंदर्यवाचक विधानापर्यंत जाण्यासाठी जी अहंकेंद्रीय सौंदर्यवाचक विधाने घ्यायची असतात, ती एकाच वर्गातील संवेदनांवर आधारलेली असली पाहिजेत. तद्वत, सौंदर्य अगोदर, प्रत्यय नंतर हे मान्य करणे जरुरीचे होते. सौंदर्याचे अस्तित्व म्हणजे जर वस्तूतील घटकांची लयबद्ध रचना असेल तर मग लयबद्धता हेच सौंदर्याचे व्यवच्छेदक लक्षण मानावे लागेल. पण मग प्रत्यय ज्या भावनेद्वारे होतो, ती भावना असामान्य, विविक्षित अशी स्वतंत्र भावना आहे का? तसे होत नाही. आप्तांच्या निधनाने येणारे अश्रू आणि साहित्याच्या वाचनाने येणारे अश्रू, याची प्रतीती एकाच कशी मानता येईल? त्यामुळे सौंदर्यानुभव हा भावनांचा अनुभव आहे, ही रिचर्डस यांची भूमिका पटत नाही. मर्ढेकरांचा दुसरा मुद्दा जरा विवादास्पद होतो.ज्या कृतीत भावना विसर्जित होते, ती कलाकृती. तत्वत: भावनेची ओढ कृतीकडे नसते. कृती हा इच्छाशक्तीचा धर्म असतो. भावना फक्त कृतीसाठी उर्जा पुरवते!! नर्व्हज उर्जेला शीण येत नसल्याने भावनांचे विसर्जन शक्यच नाही. या विवेचनातच पुढे “सुंदर” या शब्दाची फोड, अर्थ आणि इतर रचनेत असलेले महत्व, याचे विश्लेषण केलेले आहे. तसेच “व्याख्या” म्हणजे काय आणि ती कशी असावी, याबाबत रसेलचे वाक्य उधृत केलेले आहे.”A definition is a declaration that a certain newly introduced symbol or combinations of symbols is to mean the same as a certain other combination of symbols of which the meaning is already known”. याच धर्तीवर, हे विवेचन वेगवेगळ्या अंगाने विस्तारात पुढे जात राहते. सगळे प्रकरण एकाच बैठकीत समजणे निरतिशय कठीण आहे. काही संकल्पनांचा नेमका अर्थ ध्यानात येत नाही, विशेषत: संस्कृत भाषेतील काही शब्दांच्या अनुरोधात, नेमका अर्थ समजणे कठीण होते. प, मी वरती म्हटले तसे, कुठलेही शास्त्र हे नेहमीच जटिल स्वरुपाचेच असते. आपल्याला, आपल्या सगळ्या इंद्रियांना एकवटून सगळी उर्जा साठवूनच शास्त्राचे मना करावे लागते. अर्थात या मार्गात कुठेही “सुलभीकरण” करण्याचा प्रयत्न झाल्यास, सगळाच भाग नामशेष होईल. ८३ पानांचा अति दीर्घ निबंध आहे पण तो इतक्या लांबीचा असणेच योग्य आहे. अन्यथा विषय समजणे अवघड आहे.
“समीक्षा : प्राथमिक ओळख” हे तसे छोटेखानी प्रकरण आहे. चित्र, शिल्प, वस्तू, संगीत, काव्य,नृत्य आणि नाट्य अशा ७ ललित कला ध्यानात घेऊन, त्याप्रमाणे समीक्षेचे स्वरूप ठरवायचे, हाच प्राथमिक  विचार आहे.आता यासाठी कलास्वरूप ध्यानात घ्यावे लागेल. म्हणजे मग, सुंदर या धातूचे स्वरूप निश्चित करावे लागेल.   म्हणजे सर्वात आधी “सुंदर” कशाला म्हणायचे, हे कोण ठरविणार, या प्रश्नातच “रसिक” अस्तित्वात येतो. रसिक जो, ज्याला कलाकृती, कलाकृती म्हणून जाणवते तो! म्हणजे रसिक गृहीत धरल्याशिवाय रसिक या पदाची व्याख्या देता येत नाही. म्हणजे कलाकृतीची व्याख्या सुंदर या पदाच्या संदर्भातच देता येते. असे हे एकूण चक्र आहे. या चक्राची सोडवणूक, “ओस्बोर्न” या विचारवंताने करण्याचा प्रयत्न केला आहे आणि त्यासाठी “आस्वाद” या प्रक्रियेची मदत घेतली आहे. परंतु, मुळातच “आस्वादाची” प्रक्रिया निश्चित करण्याआधी, “रसिक” आणि “कलाकृती” ही पदे निश्चित करणे जरुरीचे होते. या गोष्टीची कारणे साधारणपणे ३ प्रकारची आहेत. १]ऐतिहासिक, आणि २] मानसिक. ऐतिहासिक कारण हे मानवजातीच्या प्रारंभीच्या काळात डोकावले असता, पारलौकिक गरजा पूर्ण करणारे साहित्य, सत्यसंशोधन करणारे साहित्य, आणि ललित साहित्य असे पूर्वी अस्तित्वात नव्हते. अर्थात, या संस्कृतीतील काही गोष्टी आजही कलाकृती म्हणून मानल्या जातात, उदाहरणार्थ महाभारत!! याचा परिणाम असा होतो की यांची व्याख्या कारणे अवघड होते. लहानपणापासून आपण बाहेरचे जग बघत, अनुभवात आणि अर्थ लावीत असतो. त्यातूनच माणूस विकसित होत असतो. क्रमाने अशा अवस्थेतून कलाकृतीचा कलात्मक आस्वाद घेण्यापर्यंत विकास होत जातो. हे सगळे साहित्याच्या आधारे होते. त्याचेही परिणाम घडत जातात. हा प्रवाह लक्षात घेता, कलात्मक व्यवहाराचे स्पष्टीकरण खूपच कठीण होऊन बसते. व्यक्तीचा विकास होत असताना, त्याच्या आवडी-निवडी अनेक कारणांनी मर्यादित होतात. हे सगळे गृहीत धरले तरीही सौंदर्य हे स्वतंत्र तत्व असण्यास प्रत्यवाय का असावा? एक तर सौंदर्य या नावाचे कोणते तरी अमूर्त तत्व असून ते सर्व वस्तूंच्या ठिकाणी प्रकट होते, याला काहीही आधार नाही. आता, “चोरी करणे पाप आहे” या विधानातच ” तू चोरी करू नकोस” असे विधान अभिप्रेत आहे. परंतु, अशी कर्तव्याची भाषा कलाकृतींच्या संदर्भात मांडली, तर रसिकांची स्वायत्तता संपून जाईल. कलास्वरुपशास्त्र ज्यावेळी आपण कलाकृतींच्या संदर्भात सुंदर हा शब्द वापरतो, त्यावेळचा नेमका अर्थ काय अभिप्रेत असतो, हे सांगण्याचे काम करीत असतो. अर्थात, यात आणखी एक गोंधळ होऊ शकतो. असे सामायिक तत्व वापरणे योग्य नाही. पुस्तक महाग आहे आणि भाजी महाग आहे, या विधानातील खरेपणा हा “महाग” या शब्दाशी निगडीत आहे असे मानण्यासारखे झाले!! तेंव्हा कलास्वरुपशास्त्रात सुंदर हा एक पारिभाषिक शब्द आहे. या शास्त्राचा कलेकडे बघण्याचा दृष्टीकोन स्वतंत्र असतो. यामुळे साहित्याकडे बघताना सदोष भूमिका स्वीकारली जाते. साहित्यिक टीका, असा शब्द आपण प्रत्यही वापरतो. तेंव्हा खरा प्रश्न या अभ्यासाच्या संभवाचा नसून साहित्यसमिक्षा स्वीकारण्याचा आहे. साहित्य समीक्षा ही साहित्याकडे साहित्य कलाकृती म्हणून पाहू शकते, हे या लेखातील प्रमुख विचार आहे आणि याच दृष्टीने या विचाराचा या लेखात विस्तार केलेला आहे.
“ललित कलाकृतीतील निवेदन” आणि “सौंदर्य काय नाही” ही दोन्ही प्रकरणे, म्हणजे, पहिल्या प्रकरणाचा – म्हणजे मर्ढेकर सौंदर्य समीक्षा, या विषयाचा पुढील भाग आहे. म्हणजे, ललित कृती आपल्याला नेमके काय सांगत असते, त्यातील निवेदनाची पद्धत कशी असते, आणि त्यातील सौंदर्य तत्व कसे ओळखायचे, हा भाग ”ललित कलाकृतीतील निवेदन” या प्रकरणात समाविष्ट आहे. “सौंदर्य काय नाही” या प्रकरणात, प्रा. बारलींगे यांच्या “सौंदर्याचे व्याकरण” या पुस्तकावर आधारित आहे. अर्थात कलामीमांसा हा तर या प्रकरणाचा गाभा आहे. सगळीच मते आपल्याला पटतात असे नाही पण निदान वाचनाने आपल्या मनात अनेक प्रश्नांचे मोहोळ उठते आणि पुढील विचारांना कार्यप्रवृत्त करते, हे तर नेहमीच लक्षणीय मानावे लागेल.
“साहित्यकृती – चांगली आणि श्रेष्ठ” हे प्रकरण तसे मराठी समीक्षा क्षेत्रात बरेच गाजलेले आहे. मुळात साहित्यकृती म्हणजे काय, त्याचा आस्वाद घेण्याची पद्धत, आणि परत रसिक कुणाला म्हणावे, या सगळ्या गोष्टींचा उहापोह केलेला आहे. गंगाधर गाडगीळांनी या संदर्भात फारच मौलिक विचार केलेला आहे. अर्थात, कुरुंदकरांनी त्याबाबतीत मतभेद नोंदविला आहे पण, तरीही कुठलीही साहित्यकृती चांगली आणि श्रेष्ठ ठरविताना, कुठेल्या प्रकारचे निकष पाळणे जरुरीचे असते, याबाबत मार्गदर्शन होण्यास, आपल्याला बरीच मदत होते. प्रत्येक साहित्यकृती एकाच वेळी आपली कलात्मक भूक भागवीत असते आणि त्याच क्षणी ती अधिक विचक्षण व संस्कारित करीत असते. त्यामुळेच “परिपूर्ण” साहित्यकृतीचे उदाहरण सापडणे अवघड होत जाते. वा.ल.कुलकर्णी यांनी “काळाचा” आधार घेउन्कालाकृतीची तुलना संभवते असे म्हटले आहे. काळाच्या संदर्भात काही कलाकृतींना मानाचे स्थान मिळते पण अशी क्रिया खरोखरच घडत असते का? कालप्रवाहात जे टिकते ते टिकण्याच्या लायकीचे असते, असा एक मतप्रवाह आहे. पण या विधानाला कितपत अर्थ आहे? जे चांगले आहे ते टिकेलच असे म्हणवत नाही. आज एक कलाकृती निर्माण होते, ती चांगली की वाईट, हे सांगण्यासाठी शंभर वर्षे थांबण्यापेक्षा माझे खरे-खोटे उत्तर आजच देणे अधिक श्रेयस्कर नाही का? “मुल्यांची अभिव्यक्ती अगर आविष्कार साहित्याच्या द्वारे होऊच शकत नाही. साहित्यातून व्यक्त होतात ते एक अनुभव” अशी एक मीमांसा गंगाधर गाडगीळांची आहे. म्हणजे वा.ल.कुलकर्णी यांची काळाची कसोटी गैरलागू ठरते का? यामध्ये ३ कारणे उद्भवतात.१] साहित्यकृती म्हटल्यावर परंपरेने चालत आलेली रंजकतेची आणि रसांची कसोटी आहे. २] कलासमीक्षा आपल्या सर्व विवेचनात सहृदय रसिकाची  जाणीव ठेवण्यास बांधलेली आहे, हा सहृदय रसिक आणि सामान्य वाचक यात प्रत्यक्ष भेद कारणे फार कठीण आहे.३] आपण सगळेचजण जीवन जगात असतो.त्यामुळे आपली मने जीवनाच्या संदर्भात conditioned म्हणजे प्रतिक्षिप्त झालेली असतात. त्यामुळे जीवनात जे श्रेष्ठ मानले गेले, त्याचा साहित्यात आढळ झाला की आपण नतमस्तक होतो. पण त्याचबरोबर “अभिरुची” याची नेमकी व्याख्या कशी करायची, हा मुलभूत प्रश्न इथे उपस्थित होतो. रिचर्डसने अभिरुचीची नेमकी व्याख्या पुन्हा मुल्यांच्याच आधारे केली आहे. सजीवांच्या जीवनक्रमाचा व्यवहारच असंघटीताकडून संघटीताकडे, गोंधळातून व्यवस्थापनाकडे आणि सुसंगतीकडे चाललेला असतो.हे चालू असताना काय चांगले आणि काय वाईट याची खात्री देता येत नाही. अभिरुचीचा प्रश्न इथे निगडीत आहे. अर्थात, हे विवेचन बरेचसे संद्ज्ग्ध आहे पण आजमितीस यापेक्षा अधिक खोलवर काही विधान करता येईल असे वाटत नाही.
शेवटचे प्रकरण आहे “भरतमुनी आणि रस”. नावावरूनच कल्पना येते की संस्कृत रसव्यवस्थेवर आधारित हा लेख आहे. या रस व्यवस्थेबद्दल पूर्वी गंगाधर गाडगीळ यांनी,”संस्कृत भाषेतील रसव्यवस्था आजच्या काळात पूर्णपणे निरुपयोगी आहे” असे विधान करून निकालात काढलेली होती. याच संदर्भात, ह्या प्रकरणात, जे नवरस आहेत, त्याचा शास्त्रोक्त पद्धतीने धांडोळा घेण्यात आला आहे. आपल्या साहित्यातील रस व्यवस्था ही कळशी कितपत सुसंगत आहे, त्यातील नेमके बलस्थान काय आहे, आणि कुठे त्या व्यवस्थेला गौणत्व येते, याचे अतिशय विस्ताराने विवरण केलेले आहे. हे वाचल्यावर, आपल्या मनात असा विचार नक्कीच येतो की,गाडगीळांनी  जे टाकाऊ म्हणून बाजूला ढकलले आहे, ते कितपत योग्य आहे? म्हणजे गाडगीळांची बाजू कमकुवत आहे, असे नसून त्या विषयाला अनेक फाटे फुटतात आणि आपल्याच मनात विचारांचे मोहोळ उठते आणि हे अशाच दीर्घ लेखाचे खरे यश आहे, असे वाटते.
तर असा हा लेख संग्रह. विषय अति जटिल तर आहेतच पण वाचताना जरा अधिक चिकाटी दाखवली तर, आपल्या विचारांत बरेच मन्वंतर घडू शकते. प्रत्येक लेख, तुमच्या मन:शांतीची कसोटी बघतो, बरेच वेळा आपण काय वाचत आहोत, याबाबत गोंधळाची परिस्थिती उद्भवते पण तरीही मुळातच जटिलता ध्यानात घेतली तर, बराचसा गोंधळ निस्तरता येऊ शकतो. अर्थात, परत एकदा, या विषयाबाबत कुठेही ज्याला “अंतिम” असे उत्तर मिळत नाही, याचे मुख्य कारण, मराठीत अजूनही सौंदर्यशास्त्र हा विषय बाजूला टाकला गेलेला आहे.

No comments:

Post a Comment