Wednesday 18 June 2014

शब्दभोगी गायकी!!




तीन मिनिटांच्या गाण्यात, शब्दांचे महत्व वेगळे सांगण्याची गरज नाही. गाण्याच्या ३ मुलभूत घटकांपैकी १ अत्यंत महत्वाचा घटक. शब्दांच्या व्यतिरिक्त जी सांगीतिक रचना सादर होईल, तिला फारतर “धून” म्हणता येईल परंतु त्याला “गाणे” म्हणता येणार नाही. त्यामुळे, सुगम संगीतात, शब्दांचे उच्चार करणे, त्याला स्वरांची जोड देताना शब्दांचा मूळ आशय अधिक विस्तारित करणे इत्यादी क्रिया अंतर्भूत असतात.
माझ्या दृष्टीने, सुगम संगीतात, आशा भोसले आणि किशोर कुमार, यांना गाण्यातील शब्दोच्चार आणि ते करीत असताना, स्वर आणि लय, यांच्यासहित शब्दांचा आशय, अधिक अर्थपूर्ण करणे, या क्रिया अति सहजपणे करतात. इथे, मी फक्त आशा भोसले, यांच्या गायकीबाबत विवरण करण्याचा प्रयत्न करणार आहे.
कुणालाही हेवा वाटावा, असा आवाज, आशा भोसले यांना लाभलेला आहे. तो चैतन्यपूर्ण, कंपविहीन असूनही अत्यंत भावपूर्ण, गाताना कुठही न घसरता तिन्ही सप्तकात सहज फिरणारा आणि अतिशय भरीव असा आवाज आहे.
आवाजाचा पल्ला विस्तृत असून, तारता मर्यादा सहजपणे, वेगाने आणि गीताच्या प्रारंभी देखील घेणे, यात कुणाही गायिकेला सहज बरोबरी करणे शक्य नाही. याचा फायदा, काही गाणी सुरवातीलाच तीव्र स्वरांवर सुरु होतात आणि तिथे, आशा भोसले यांचा गळा अत्यंत सहजपणे गळ्यातून उमटतो.एकच उदाहरण देतो, “निगाहे मिलाने को जी चाहता है” या कव्वालीत, सुरवात जरी “खर्ज” स्वरात होत असली तरी क्षणार्धात चाल, वरच्या तीव्र स्वरांत जाते, अगदी आश्चर्य वाटावे, इतका टिपेचा सूर, गाण्याच्या सुरवातीला लागतो पण द्रुत लय असूनदेखील कुठेही आवाज “ओढून ताणून” लावला आहे, असे वाटत नाही!!
अर्थात, केवळ स्वरांचा फेकीचा पल्ला, हेच एकमेव “भूषण” नक्कीच नाही. काहीवेळा वाद्याचा स्वनगुण तंतोतंतपणे गळ्यातून काढून, ऐकणाऱ्याला चकित करण्याचे अवर्णनीय कौशल्य आहे. त्यामुळे प्रसंगी अत्यंत आवाहक, तर प्रसंगी कुजबुजता आवाज, त्या रचनेला नेहमी वेगळे परिमाण देण्यात यशस्वी होतो.
सुगम संगीतात, शब्द तर तुमच्या बरोबर नेहमीच असतात परंतु शब्दांच्या मधील कितीतरी सांगीतिक जागा असतात, ज्या वाद्यमेळांच्या सहाय्याने अधिक गहिऱ्या करता येतात. इथे काहीवेळा, आवाजात भावविवशता येउन, गाण्याचा विचका होऊ शकतो. उदाहरण द्यायचे झाल्यास, मोहमद रफी, विशेषत: नंतरच्या काळात,काही गाण्यात, अकारण भावविवश झाला आणि गाण्यात प्रतवारी अकारण उतरली, उदाहरणार्थ “बाबुल की दुआये लेती जा”!!
याउलट आशा भोसले गाताना, शब्दोच्चार असा करतात, की स्वरांतून शब्द बाहेर येताना, त्या शब्दाचा जणू “अर्क” आपल्याला ऐकायला येतो आणि ही सगळी सांगीतिक क्रिया अतिशय सहजपणे घडते!! मी, सुरवातीला “भोगवादी गायन” हा शब्द वापरला, तो याच अर्थाने!!
विविध गीतप्रकार सादर करताना, आवाजावरील नियंत्रण आणि ध्वनीवैशिष्ट्ये याचा अचूक वापर, यामुळे, ऐकणाऱ्याला एक संमृद्ध गायन ऐकल्याचा आनंद प्रतीत होतो, मग ती पाश्चिमात्य वळणाची किंवा नाईट क्लबमधील उत्तान गाणी असोत, मुजरा/नृत्यगीते असोत, किंवा नाजूक स्पर्शाची गाणी असोत, आशा भोसले आपल्या गळ्यावर लीलया पेलतात आणि हे गाण्यातील अष्टपैलुत्व केवळ थक्क करणारे आहे.
“मेरा नाम है शबनम” हे गाणे हॉटेल मधील अपारंपरिक नृत्य गीत आहे,ज्यात, गाण्याच्या मध्ये चक्क गद्य वाक्ये आहेत, लयबद्ध नि:श्वास आहेत, संभाषण आहे!! असे असून देखील आशा भोसले, सगळे कसे अत्यंत उद्दीपित स्वरांतून तरीही लयीला नेमके पकडून करते. हे लिहायला सहज, साधे आहे परंतु प्रत्यक्ष गायला खरोखर अतिशय अवघड आहे. तसेच “नजर लागी राजा” या मुजरा गीतात असेच अविस्मरणीय कौशल्य दिसते. या गाण्यात, “नजर” , “मटक” इत्यादी काही शब्दांचे उच्चार ऐकावेत म्हणजे मी, ज्याला “भोगवादी गायन” म्हणतो, त्याचा पडताळा येईल.
काहीकाही गाण्यात, सुरवातीला “सूर” साथीला अजिबात नसतो पण तरीही गाण्याची सुरवात अत्यंत भरीव होते. उदाहरणार्थ “काली घटा छाये” किंवा “जिवलग राहिले दूर घर माझे”. पहिल्या गाण्यात, नवयुवतीची प्रणयी थरथर आहे तर दुसऱ्या गाण्यात आर्त व्याकूळ करणारे दु:ख्ख आहे. दोन्ही पार वेगळ्या भावना परंतु अंतिम परिणाम मात्र अत्यंत अचूक गाठलेला आहे. दुसरे गाणे तर, जवळपास, ५ मिनिटे सलग, कुठेही न थांबता केलेले गायन आहे परंतु श्वासावरील नियंत्रण थक्क करणारे आहे.
साधारणपणे सुगम संगीताची वाटचाल बघितली तर, दर १० किंवा १२ वर्षांनी गाण्याच्या रचनेच्या शैली बदलत असतात. कधी वाद्यवृंदाची रचना, कधी चालींचा ढाचा तर कधी गायकी देखील बदललेली आढळून येते. असे बदल, सर्वसाधारण गायकाला पचविणे अतिशय कठीण असते आणि याला कारण, त्या कलाकाराची मनोभूमी त्या बदलांना तयार नसते. आशा भोसले यांच्या कारकिर्दीचे हे नेहमी खास वैशिष्ट्य म्हणायला लागेल, कुठल्याही दशकात झालेले बदल, त्यांनी सहजपणे आत्मसात केले, इतके की काहीवेळा ते बदल, त्याच्या गळ्याचे खास वैशिष्ट्य मानावे लागतील. आपल्या अतुलनीय आवाज-लागावाच्या कौशल्यामुळे या बाबतीत, आशा भोसले मनाचे स्थान पटकावून बसल्या आहेत आणि तिथे त्यांना आव्हान देणे देखील अवघड आहे!!
“सबा से ये कह दो” हे मदन मोहन यांच्या अनघड चालीचे गीत ऐकावे. भावूक न होता भाव सूचन करण्याची क्षमता आणि शब्दांच्या अर्थापलीकडे त्यांच्या आशयापर्यंत नेऊ शकणारा लगाव केवळ असामान्य आहे. या गाण्याचे आणखी वैशिष्ट्य म्हणजे ,, समेची मात्रा थोडी बदलून, वेगळ्या स्वरांवर आणल्याने, लयीला, गाणे कठीण झाले आहे परंतु अशी कठीण लय, अतिशय सुंदररीत्या गळ्यावर पेलून, ते गाणे सादर केले आहे. मराठीतिक, असेच लयीला अवघड गाणे आहे, “सहज सख्या एकदाच येई सांजवेळी” या श्रीनिवास खळ्यांच्या गाण्यात असाच लयीचा सुंदर खेळ मांडलेला आहे आणि त्यामुळे गायन फार कठीण झाले आहे.
संवेदना, विचार, भाव-भावना, इत्यादी सर्वांचे स्वरूप असे असावे की त्यात वास्तवाचे विरोधात्मक (आत्मविरोधी नव्हे!!) चित्रण असावे, ही आधुनिक नाट्याविष्काराची व विचाराची प्रमुख मागणी आहे. त्यामुळे आविष्कारांत प्रतिबिंब पडते ते अनाकलनीय वेगाने बदलत जाणाऱ्या मानसिक अवस्थांचे. “सपना मेरा टूट गया” या गाण्यात आशा भोसले यांनी हे वैशिष्ट्य समर्पकरीत्या दाखवलेले आहे. सध्या सुरावटीने आरंभ करून एकदम एक पाय संगीतात ठेवलेल्या अतिनाट्य संवादाच्या फेकीत गर्क होते. या गाण्यात, अचानक तारस्वरांवर जाणे किंवा खालच्या स्वरमर्यादांत सूर लावणे इत्यादी बाबी घडतात. परंतु हे सगळे संगीतनाट्य कमालीच्या सहजतेने चालते.
आता त्यांच्या आवाजाचे मूल्यमापन कसे करता येईल? एक तर मान्यच करायला हवे, काही गीतप्रकारांच्या सीमा विस्तारल्या. कंठसंगीतातील ध्वनीपरिणामांच्या शब्दावलींत भर टाकून, सांगीत शक्यतांची नवी परिमाणे सादर केली. जागतिकीकरण झालेल्या संगीतात सुखाने वावरणाऱ्या एका मोकळ्या गात्या आवाजाचा त्यांनी आदिनमुना पेश केला आहे.
पार्श्वगायनात जितके म्हणून सर्जनशील बनता येईल, तितके त्यांनी विनासायास करून दाखवले आहे.

No comments:

Post a Comment