Showing posts with label Literature Critics. Show all posts
Showing posts with label Literature Critics. Show all posts

Friday, 18 August 2023

कलाकारांचे अध:पतन

इथे "कलाकार" म्हणजे केवळ कलाक्षेत्रातील कलावंत, इतकाच मर्यादित अर्थ नसून त्यात खेळ देखील अंतर्भूत केलेला आहे. कुठलाही लोकप्रिय कलावंत मुलत: सर्जनशील असतो. त्याशिवाय सशक्त निर्मिती होणे अशक्य. परंतु सर्जनशीलता ही काही कायम टिकणारी अवस्था नसते. तिचाही बहराचा आणि नंतर पतझडीचा काळ आलटूनपालटून येताच असतो. जेंचा बहराचा काळ असतो तेंव्हा अप्रतिम निर्मितीने तो रसिकांना आपल्या प्रतिभेचे आविष्कार सादर करून, आपल्या क्षमतेची प्रचिती तसेच रसिकांना भारावून टाकण्याची शक्ती दाखवत असतो. परिणामी कलेच्या अस्तित्वात असलेल्या परिघाची व्याप्ती अधिक रुंद करीत असतो. कलेची प्रगती ही अशीच होत असते. हा बहराचा काळ मात्र असतो अद्भुत आणि दिपवून टाकणारा. अर्थात यातून मिळणारी लोकप्रियता आणि तद्नुषंगाने मिळणारे आर्थिक फायदे, कलावंतांच्या अभ्युदयासाठी उपयोगी पडतात, आयुष्याची मार्गक्रमण सुखनैव होऊ शकते. कुणी कितीही नावे ठेवली तरी "सर्वे गुणा: कांचनमाश्रयंते" या उक्तीतच बरेच काही सामावलेले आहे. अर्थात याचा अतिरेक झाला की पतझड सुरु होते. कलावंत होणे ही काही सहज जमण्यासारखी प्रक्रिया नसते. शारीरिक तसेच बौद्धिक परिश्रमाची अथक मागणी सातत्याने होत असते. परंतु एकदा का तुमची कलावंत म्हणून प्रतिष्ठापना झाली की केलेल्या त्यागाचे साफल्य मिळायला लागते. हीच वेळ असते, कलावंताने "विवेकबुद्धी" आचरणात आणायची. मिळणाऱ्या लोकप्रियतेत स्वतःला झोकून दिले जाणे, सहज होते. त्यासाठी वेगळ्या परिश्रमाची आवश्यकता नसते. आपण काही लोकप्रिय उदाहरणे बघूया आणि वरील मुद्दे अधिक स्पष्ट करायचा प्रयत्न करूया. आपल्याकडील गायक/गायिका नेहमीच प्रकाशाच्या झोतात असतात. त्या झोताने, रसिक देखील भारावल्या अवस्थेत असतात. परिणामी सादर होणारी कलाकृती काय दर्जाची आहे? असले फडतूस प्रश्न अजिबात पडत नाही. कलावंताने काहीही गायले तरी त्याला "वाहवा" देणारा फार मोठा गट समाजात असतो आणि तो अशा अशक्त निर्मितीलाही भरभरून दाद देतो परिणामी कलेत भोंगळपणा शिरतो आणि अध:पतन सुरु होते. बरेचवेळा तर आपण नि:सत्व कडबा रसिकांसमोर सादर करीत आहोत, याचे भान देखील नसते. वास्तविक किशोरी आमोणकर हे नाव अतिशय तालेवार नाव आणि त्याला साजेशी अशीच त्यांची गायकी. मी स्वतः याचा पुरेपूर अनुभव घेतलेला आहे. काही वर्षांपूर्वीची घटना आहे, पार्ल्याला पहाटेची मैफिल होती, पहाटे ६ वाजता सुरु होणार होती. मी देखील गिरगावातून त्या मैफिलीला जायचे म्हणून ५ वाजताच पहाटेचे प्रातर्विधी आटोपून पार्ल्याला अक्षरश: धावत पळत पोहोचलो. मित्राने माझे तिकीट आधीच आरक्षित केले असल्याने, कुठे बसायचे,हा प्रश्नच नव्हता, गाणे सुरु होण्याआधी, मित्राला बोललो, "बाईंचे गाणे म्हणजे डर्बीचा घोडा आहे, जिंकला तर लाखो रुपये मिळतील पाण्यात पैसे पाण्यात"! मित्र हसला. त्यादिवशी असेच झाले, बाईंचे गाणे अजिबात रंगले नाही. बाई काहीशा चिडचिड्या देखील झाल्या. मध्यंतराला काहीसा निराश होऊन, चहा पिट असताना, मी थोडे टीकात्मक बोललो तर एक रसिक तावातावाने, "अरे आणि, बाई आता ८० पार झाल्यात, हे समजून घे"! हे ऐकल्यावर मी अवाक. जर का बाईंचे वय ८० पार आहे, तर वेळीच चंबूगबाळे आवरण्यात अधिक शान आहे. आज जसे बाई गायल्या, त्याने पूर्वीच्या असामान्य क्षणांवर काळिमा पसरणार. दुसरे असे, इथे रसिकांच्या मर्जीचा प्रश्नच उद्भवत नाही. मैफिलीच्या उत्तररंगात खुद्द बाईच बोलल्या, "असे गाणे तुम्हाला कोण ऐकवून दाखवेल!" ही म्हणजे अहंकाराची हद्द झाली. आपण रसिकांकडे पुरेपूर माप टाकले नाही तरी देखील आपल्या सादरीकरणाची मर्दुमकी गायची!! कलावंताचे अध:पतन हे असे स्पष्ट होते. काही वर्षांपूर्वीचा किस्सा आहे. एके ठिकाणी कुमार गंधर्वांचे गायन ठरले होते. त्यादिवशी मुंबईत जोरदार पाऊस असल्याने, कार्यक्रमस्थळी फारसे कुणी रसिकजन जमले नव्हते. परिणामी संयोजक काहीसे अवाक झाले होते. इतक्या जगन्मान्य कलाकाराच्या कार्यक्रमाला तुरळक गर्दी!! त्यांनी कुमार गंधर्वांना विचारले, "कुमारजी, कार्यक्रमाला कुणी आले नाही, तर कार्यक्रम पुढे ढकलूया का?" वास्तविक सुज्ञ प्रश्न होता पण कुमार गंधर्व उत्तरले, "अरे मी रसिकांसाठी थोडाच गातो, मी तर माझ्या समाधानासाठी गातो!" मग प्रश्न असा उद्भवतो, जर स्वतःच्या समाधानासाठी गायचे असते, तर मग जाहीर कार्यक्रम कशासाठी करायचे? देवासच्या घरात बसून, हवे तितके समाधान मिळवा. अर्थात या उत्तराला देखील रसिकांनी प्रचंड दाद दिली. आता हा प्रचंड अहंकार नव्हता का? आपणच आपली पूजा आरंभ करण्यासारखा हा प्रकार होता. हाच प्रकार पंडित जसराज यांच्या बाबतीत मी अनुभवला होता, वास्तविक हा गायक माझ्या खूप आवडीचा आणि यांच्या कितीतरी संस्मरणीय मैफिलींना हजार राहण्याचे भाग्य मला मिळाले होते परंतु वयाच्या ७५ नंतर निसर्गक्रमाने शरीर थकत चालले असताना, अत्यंत बेगुमानपणे गायला बसायचे . बरेचवेळा तर त्यांच्या शिष्यगण त्यांच्या सोबत असायचा आणि तेच गायला सुरवात करायचे आणि अधूनमधून पंडितजी सूर लावायचे!! मी पंडितजींचे गाणे ऐकायला आलो असताना, हे असले सरधोपट गाणे ऐकायला मिळाले. वास्तविक पंडितजींना कल्पना आली होती, आपला आता आवाज लागत नाही पण लोकप्रियता ही चीज अशी आहे, भल्याभल्या कलावंतांना भ्रांतचित्त करते. लोकं अजूनही आपल्याला नावावर, आपल्या मैफिलीला येतात, हा विचारच, त्यांना निवृत्त होण्यापासून परावृत्त करतो आणि ढासळलेल्या गळ्याकडे दुर्लक्ष करायला लावतो. ही खरे तर रसिकांची निव्वळ फसवणूक असते पण आपल्याकडील तथाकथित रसिक देखील, असल्या भोंगळ सादरीकरणाला दाद देतात, परिणामी कलाकार आणखी वाहवत जातो. अर्थात केवळ शास्त्रीय संगीतात(च) असे घडते असे नाही. सुगम संगीतात फार वेगळे घडत नसते. लता मंगेशकर ही नाव जगभर पसरलेले आणि भारतात तर पूजनीय ठरलेले. परंतु चित्रपट "वीर झारा" मधील गाण्यांतून बाईंचा खालावलेला आवाज स्पष्ट ऐकायला मिळतो. त्यावेळी बाईंवर टीका झाली. "बाईंच्या आवाजात १९७५ सालची गायकी दिसते नाही" असे बोलले गेले. बाईंनी तात्काळ उत्तर दिले, "Is it not absurd to compare my present voice with 1975 songs?" परंतु वेगळ्या शब्दात, बाईंना आपल्या खराब आवाजाची कल्पना आली होती तरीही गाणी गाण्याचा मोह आवरला नाही. वस्तुस्थिती अशी होती, १९७५ साली देखील, बाईंच्या आवाजातील कोवळीक, ताजगी लोप पावली होती आणि तरीही बाईंनीं पुढे ३० वर्षे आपली गायकी रसिकांच्या समोर रेटली!! यात आपण रसिकांना आपल्या दावणीला बांधून फरफटवत आहोत, याचा सुतराम विचार आढळत नाही. आणि रसिक देखील त्या आवाजावर आत्यंतिक आंधळे प्रेम करण्यात धन्यता मानतात. हाच प्रकार मोहमद रफींच्या बाबतीत घडलेला आहे.वास्तविक इथे मी लताबाई आणि रफी, ही २च नावे प्रातिनिधिक म्हणून घेणार आहे. एकतर या दोघांनी भारतीय मनावर कित्येक वर्षे राज्य केले आहे आणि आजही त्यात फारसा फरक पडलेला नाही. रफींचा मर्दानगी आवाज, ही त्यांची खासियत आणि पहिल्यापासून त्यांनी आपल्या या वैशिष्ट्याची जपणूक केलेली आहे. यातून त्यांच्या "अष्टपैलू" गायकीची प्रतिष्ठापना केली आणि रसिकांना भारावून टाकले. परंतु याच गायकीने त्यांच्या "नाट्यात्म" गायकीचा पाया घातला, हे कसे विसरता येईल. १९६० च्या सुमारास गाण्यांच्या स्वररचनेचा ढाचा बदलायला लागला आणि कदाचित स्पर्धेत टिकण्यासाठी असेल पण रफींनी आपल्या गायकीत "नाट्यात्म" शैली आणली. परिणामी गायकी अत्यंत "ढोबळ" झाली. परंतु या वस्तुस्थितीकडे सगळ्यांनीच दुर्लक्ष केले. "बाबूल की दुआयें लेती जा" सारखे अत्यंत ओबडधोबड गाणे रसिकांच्या माथी मारले आणि रसिकांनी त्याचे कमालीचे कौतुक केले. तसाच प्रकार, रफींनी गायलेल्या मराठी गाण्यांबाबत म्हणता येईल. मराठी भाषेचा लहेजा तसेच आशय लक्षात न घेता गाणी रसिकांच्या डोक्यावर आपटली. आजही या मराठी गाण्याचे वारेमाप कौतुक होते आणि त्यामागे निव्वळ रफी या नावाची पूजा, इतकाच अर्थ निघतो. इतकावेळ आपण संगीत कलेबद्दल लिहिले पण भारतात अमाप लोकप्रिय असणाऱ्या क्रिकेट खेळात देखील असाच प्रकार आढळतो. १९६०/७० हे दशक भारतीय स्पिनर्स लोकांचे दशक म्हणून ओळखले जाते. ज्यांना "दरारा"म्हणावा, असे बेदी, चंद्रशेखर, प्रसन्न आणि वेंकट अशी चौकडी होती आणि एकहाती सामना जिंकवून देण्याची ताकद होती. पुढे ऑस्ट्रेलिया आणि वेस्टइंडीज संघांची "वेगवान चौकडी" जशी प्रतिस्पर्धी संघावर दहशत ठेऊन असायची तसाच या चौकडीचा वावर होता. अगदी व्हिव रिचर्ड्स सारखा असामान्य फलंदाज शेवटपर्यत चंद्रशेखरच्या गोलंदाजी बद्दल अनभिज्ञ होता आणि त्याने ते प्रांजळपणे मान्य केले आहे. परंतु निसर्गक्रम कुणालाही चुकत नाही आणि हळूहळू वाढते वय, त्यांच्या जादूवर परिणाम करायला लागले होते. तरीही त्यांनी रेटून आपली गोलंदाजी सुरु ठेवली होती. अखेरीस १९७७ साली झालेल्या भारत/पाकिस्तान मालिकेत, त्यांच्या गोलंदाजीची पिसे निघाली आणि अत्यंत मानहानीकारक अवस्थेत त्यांनी खेळाचा निरोप घ्यावा लागला. असाच प्रकार अनेक फलंदाजांच्या बाबतीत घडलेला आहे. आपल्या शारीरिक हालचाली पूर्वीसारख्या होत नाहीत, ही जाणीव जर का त्या फलंदाजालाच होत नसेल तर आणखील कुणाला होणार? आपल्यासारखे बाहेरून बघणारे देखील म्हणतात, आता हा फलंदाज थकला आहे. असे असून देखील निवृत्ती लांबणीवर टाकतात, त्यामागे प्रचंड आर्थिक फायदा आणि लोकप्रियता न सोडण्याचा हव्यास, इतकेच कारण संभवते. अगदी सचिन पासून असंख्य खेळाडू या सापळ्यात अडकले आहेत. परिणामी निर्माण झालेली प्रतिमा भंग पावणे, हेच त्यांच्या नशिबात उरलेले असते. आता प्रश्न इतकाच उरतो, आपण लोकप्रियतेच्या आहारी न जात तटस्थपणे लोकप्रियता स्वीकारावी, हे अशक्य आहे का? अर्थात या प्रश्नाचे उत्तर सोपे नाही कारण या प्रश्नाला अनेक कंगोरे आहेत आणि मुख्य म्हणून नेमके कधी थांबायचे, याचे अचूक भान हवे. सुनील गावस्करसारखा एखादाच कलाकार असतो, त्याला याचे नेमके भान होते आणि म्हणून आजही त्याची निवृत्ती चटका लावते.

Monday, 10 July 2023

स्थलांतरित नागरिकत्व

दुसऱ्या देशात स्थलांतर करणे आता जवळपास सगळ्या देशात मान्य झाले आहे. स्थलांतरीत व्यक्ती या साधारणपणे, आर्थिक,भौतिक सुख डोळ्यासमोर ठेऊन इतर(मुख्यतः प्रगत देशात) देशात जात असतात. आता प्रगत देशाचे काही प्रश्न असतात. प्रगत देशात शक्यतो मजुरी करणारे फार महाग असतात कारण तिथले कडक कायदे. स्थलांतरित व्यक्ती या, आपल्या देशातील एकूणच परिस्थिती बघून, राहणीमान, वेतन इत्यादी बाबींत, त्यामानाने "स्वस्त"उपलब्ध होतात. स्थलांतरितांना नवीन देशात, स्थायिक व्हायचे असते आणि त्यासाठी त्यांची मेहनत करायची तयारी असते. याचाच फायदा स्थानिक लोकं घेतात आणि त्यांना स्वस्तात पडून घेतात. काही उदाहरणे देतो. मी बरीच वर्षे साऊथ आफ्रिकेत काढली असल्याने, तिथल्या स्थलांतरित लोकांचे प्रश्न किती गहाण आहेत, याची कल्पना आली. इतिहासात फार मागे जायचे झाल्यास, १८५० साली, भारतातून साऊथ आफ्रिकेत, तिथल्या उसाच्या शेतात काम करण्यासाठी, प्रामुख्याने उत्तर प्रदेश, राजस्थान, बिहार आणि आताचे तामिळनाडू, इथून असंख्य मजूर कामाला नेले आणि त्यांच्याकडून वेठबिगारी कामे करवून घेतली.त्यावेळी भारताची स्थिती ब्रिटिशांनी हलाखीची केली होती, विशेषतः वर निर्देशित राज्यांची परिस्थिती तेंव्हाही हलाखीची असल्याने, तिथले मजूर, ब्रिटिशांना खूपच स्वस्तात मिळाले. डर्बन, पीटरमेरित्झबर्ग सारख्या शहरातील भारतीय लोकवस्तीचे मूळ हे इथे आढळते. अर्थात त्यावेळी आणि आजही, भारतापेक्षा तिथे परिस्थिती केंव्हाही चांगलीच आहे. असाच प्रकार ब्रिटिशांनी ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड इथे देखील केला. यात एक मेख आहे. मुख्यतः आर्थिक बाब आहे. भारतीय माणसे, स्थानिक लोकांपेक्षा स्वस्तात काम करायला तयार असतात कारण आपण भारतीय, कुठेही गेलो तरी तिथल्या वातावरणाशी जुळवून घेण्याइतके लवचिक असतो. अगदी पांढरपेशे भारतीय घेतले तरी, आपली वागणूक तशीच राहते. वास्तविक ऑफिसमध्ये काम करणारे भारतीय उच्च शिक्षित तसेच प्रचंड मेहनत करणारे असतात , प्रसंगी ऑफिसवेळ संपली तरी ऑफिसमध्ये काम करायला तयार असतात पण साऊथ आफ्रिकेतील गोरे, त्याबाबत अतिशय ताठर असतात. घड्याळात संध्याकाळचे ४.३० किंवा ५.०० वाजले की लगेच ऑफिस सोडणार. आपण भारतीय प्रसंगी रात्री उशिरापर्यंत काम करीत बसणार!! त्यातून एकुणात वेतनाचा मुद्दा बघितला तर गोऱ्या माणसापेक्षा आपण भारतीय स्वस्तात नोकरी करायला तयार असतो. पुढे एकदा का "नागरिकत्व" मिळाले की मग हळूहळू आपण, आपली नखे बाहेर काढतो. परंतु तोपर्यंत कंपनीचा मालक देईल ते काम स्वीकारत असतो. प्रगत देशात कामगार कायदे अतिशय कडक असतात आणि सहसा कायद्याची पायमल्ली करायला फारसे कुणी धजावत नाही. याचा परिणाम असा झाला, साऊथ आफ्रिकेत, इतर गरीब आफ्रिकन देशातून प्रचंड प्रमाणात स्थलांतरित आले, विशेषतः नायजेरियन तर लाखोंच्या हिशेबात आले. नायजेरिया कायदा पालनाबाबतीत भयानक आहे. कायदा मोडणे, हे आपले "ब्रीद"असल्याप्रमाणे सगळे वागत असतात. अशा प्रवृत्तीची माणसे साऊथ आफ्रिकेत आली, बहुतांशी बेकायदेशीर स्थलांतरित आहे. बनावट कागदपत्रे सादर करून तर कधी काही आफ्रिकन देशातील माणसे "निर्वासित" म्हणून देशात प्रवेश करतात आणि इथल्या समाजात मिसळून जातात. याच नायजेरिन माणसांनी साऊथ आफ्रिका देश आतून पोखरला आहे, इतका की आता तर रस्त्यावर देखील "ड्रग्ज" मिळतात!! प्रसंगी हिंस्र होतात, मुडदेफराशी तर वारंवार घडणाऱ्या घटना आहेत. आता तर त्या देशाने "असुक्षितता" कायमची स्वीकारली आहे, इतकी पराकोटीची परिस्थिती झाली आहे. असेच चित्र आता बऱ्याच युरोपियन देशात दिसत आहे. स्थलांतर करताना, एक प्रश्न वारंवार भेडसावतो आणि तो म्हणजे तिथली संस्कृती किती प्रमाणात आणि कशी स्वीकारायची? अर्थात हा प्रश्न प्रामुख्याने पांढरपेशा समाजाला भेडसावतो. जे स्वीकारतात ते पुढे सुखाने राहतात पण अन्यथा फार त्रांगड अवस्था होते. हे जे इतर आफ्रिकन देशातून आले, त्यांच्या बाबतीत हा प्रश्न उद्भवत नाही कारण त्यांना लपूनछपून राहण्याची सवय असते आणि बेकायदेशीर राहात असल्याने, घर नावाची वस्तू कधीच स्थिर नसते, कुटुंबकबिला नसतो. भणंग अवस्थेत राहण्याची तयारी असते. त्यातुन मग, कधीतरी एखादी स्थानिक मुलगी गटवायची आणि तिच्या सोबत "Contract Marriage" करून, नागरिकत्व पदरी पाडून घ्यायचे. एकदा का तुम्ही "Legal Citizen" झालात की मग उजळ माथ्याने समाजात वावरायला मोकळे!! बहुतेक देशात असेच चालू असते आणि असे घडत असल्याने अशा लोकांचा धीर चेपला जातो आणि गुन्हेगारी करायला मोकाट सुटतात. आज फ्रांस सारख्या अत्यंत प्रगत देशात हेच झाले आहे. फ्रांस देश हा तास मवाळ, सहानुभूती दर्शवणारा म्हणून ख्यातकीर्त आहे. शक्यतो दुसऱ्याच्या आयुष्यात डोकावयाचे नाही की त्याच्या फंदात पडायचे नाही, अशी वृत्ती. अर्थात अशी वृत्ती बहुदा सर्वत्र आढळते आणि याचा फायदा बेकायदेशीर स्थलांतरित असतात, ते उठवतात. आज फ्रान्समध्ये प्रचंड जाळपोळ चालू आहे, कारणे असंख्य देता येतील, अगदी हिंसा करणारे आणि ती हिंसा भोगणारे. परंतु केवळ फ्रांस कशाला, बेल्जीयम मध्ये फार वेगळे चालू नाही. जर्मनीत मध्यंतरी सीरियामधील निर्वासितांनी असाच गोंधळ घातला होता. मागील वर्षी साऊथ आफ्रिकेत, डर्बन इथल्या प्रचंड मॉल मध्ये असाच धुडगूस घातला, कित्येकांचे प्राण गेले, भयानक नासधूस झाली.अगदी आगीचे लोळ उठले होते. पुढे चौकशी केली असता, बेकायदेशीर निर्वासितांचा हात होता, हे बाहेर आले. आता त्यांना शोधणे पण अतिशय जिकिरीचे असते. इतका अवाढव्य देश, किती आणि कुठले कानेकोपरे शोधायचे? त्यातून स्थानिक लोकांची देखील त्यांना साथ असते, अर्थात त्याशिवाय असा हिंसाचार अवघड म्हणा. आता हा प्रश्न जागतिक झाला आहे. त्यातून त्या देशाची घटना अशी असते, सरसकट अटकसत्र राबवता येत नाही कारण सुक्याबरोबर ओले जळण्याची भीती. ओले जळले की लगेच मीडिया कान टवकारून टीका करायला मोकळे! दिवसेंदिवस हा प्रश्न अतिशय जटील होत चाललेला आहे. आज शेजारचा देश जळत आहे म्हणून दुर्लक्ष करणे, परवडणारे नाही. उद्या आपल्या देशात अशी परिस्थिती उद्भवू शकते. मुळात, "Easy Money" चा हव्यास प्रत्येक पावलावर नडतो आणि त्यातून गुन्हेगारी बोकाळत जाते. प्रत्येक देशाची घटना स्वतंत्र असते आणि घटना बदल करायला, कुठलेच सरकार शक्यतो धजावत नाही कारण राजकारणात त्यांना देखील स्थिर व्हायचे असते. स्थलांतरितांच्या प्रश्नांचे असंख्य कंगोरे आहेत आणि प्रत्येक टप्प्यावर असंख्य अडथळे आहेत., हेच खरे.

Tuesday, 16 May 2023

(विस्कळीत) झिम्मा - विजया मेहता

मुळात केवळ मराठी भाषेतच नव्हे तर इतर भाषेत देखील, कलावंतांनी लिहिलेली आत्मचरित्रे तशी विरळाच वाचायला मिळतात (इथे लेखक/कवी यांना वगळले आहे कारण त्यांचा लेखन हाच धर्म असतो!!) त्यामुळे, एकंदर कलेबाबत आणि त्या कलेच्या सादरीकरणाबाबत जे मुळातले अस्पर्शी गोंधळी समज असतात, ते आणखी दृढावत जातात, उदाहरणार्थ सी. रामचंद्र यांचे "माझ्या जीवनाची सरगम" अत्यंत टुकार लेखन!! या पार्श्वभूमीवर विजय मेहता यांचे आत्मचरित्र वाचायला घेतले आणि वाचन संपल्यावर मनात अनेक प्रश्न उभे राहिले. वास्तविक, मराठी नाट्यसृष्टीत विजयाबाईंचे नाव प्रतिष्ठीत, पुढे चित्रपट क्षेत्र जरी गाजवले नाही तरी कामगिरी उल्लेखनीय, मराठी नाटक परदेशी नेण्यात - विशेषत: पूर्व जर्मनी इथे नेण्यात त्यांचा मोठा हातभार, रंगायन सारखी अभिनव चळवळ आणि त्यातील प्रयोग, मराठी साहित्यावर आधारित नाट्यप्रयोग (यात जयवंत दळवींचा देखील तितकाच सहभाग!!) एक अजोड अभिनेत्री आणि सर्वात महत्वाचे म्हणजे पारंपारिक अभिनय शैली मोडून नवीन शैली निर्माण करणे इत्यादी अनेक गोष्टी त्यांच्या नावावर मांडता येतात. अशा समृध्द पार्श्वभूमीवर "झिम्मा" वाचायला घेतले. आयुष्याचा आवाका प्रचंड असल्याने, लिखाण देखील तितकेच समृद्ध असणार, आपण वाचायला घेतो. आपण, आत्मचरित्र का लिहितो? तितकी आपली योग्यता असते का? तसे पहिले तर समाजातील प्रत्येक व्यक्ती आत्मचरित्राचा विषय ठरू शकते पण तरीही, तसे कुणी फारसे धाडस करीत नाही. याचे प्रमुख कारण असे दिसते, सामान्य माणूस मुळात बुजरा असतो आणि आत्मचरित्र लिहायचे म्हणजे हातून तशी काहीतरी कामगिरी होणे आवश्यक!! दुसरा भाग असा, जे कुणी असामान्य कामगिरी करतात, त्यांच्या आयुष्याबद्दल सामान्यांना बरेच कुतूहल वाटत असते आणि त्या कुतुहलाचे उत्तर, ते आत्मचरित्रातून शोधण्याचा प्रयत्न करतात. या दृष्टीने बघायला गेल्यास विजयाबाईंचे बहुतेक सगळे आयुष्य चकचकाटी प्रकाशात गेले!! सामान्य लोकांना झगझगाट लगेच मोहून टाकतो. या आत्मचरित्रात, प्रमुख दोष आढळतो, सगळ्या पुस्तकभर घटनांची जंत्री मांडलेली आहे. आता, आयुष्याचा पट शब्दबद्ध करायचा म्हणजे घटना येणारच परंतु बऱ्याचवेळा घटनांचा फक्त उल्लेख वाचायला मिळतो. उदाहरणार्थ, रंगायन हि मराठी रंगभूमीवरील अभिनव चळवळ होती. रंगायनने अनेक, नव्या गोष्टी/प्रघात मराठी रंगभूमीवर आणले. नव्या जाणीवा, नवे सादरीकरण, विषयात वैविध्य, समाजात घडत असणाऱ्या प्रवृत्तींचे थेट रंगावृत्ती दर्शन इत्यादी. या चळवळीचे म्होरकेपण विजया बाईंनी घेतले पण पुढे त्यात मतभेद झाले आणि रंगायनचे तारू फुटले, हा इतिहास झाला. आता, या इतिहासाचे विश्लेषण कुठेच वाचायला मिळत नाही!! केवळ काही परिच्छेदात आणि ते देखील, काही प्रमाणात अरविंद देशपांडे, विजय तेंडूलकर यांच्यावर दोषारोप करून प्रकरण संपविले आहे!! जणू काही त्यात स्वत:चा काहीही दोष नव्हता!! असे समजून चालू, त्यांचा काहीच दोष नव्हता, पण जर का इतरांचा संपूर्ण दोष होता, तर त्याचे व्यवस्थित विवरण नको का? इथेच आत्मचरित्र हे आत्मसमर्थनाच्या अंगाने जायला लागते. पुस्तकात, पुढे अनेक ठिकाणी रंगायनचा उल्लेख आणि त्याचे योगदान,याबद्दल विवेचन आहे. म्हणजे रंगायन चळवळीचा प्रभाव पुढील आयुष्यावर देखील पडला होता, हे अप्रत्यक्षरीत्या मान्य केले आहे. असे असताना, ही चळवळ का अस्तंगत झाली? या प्रश्नाचे कुठेच समाधानकारक उत्तर मिळत नाही. त्याआधी, त्यांनी अल्काझी आणि मर्झबान यांच्याकडे अभिनयाचे आणि दिग्दर्शनाचे धडे घेतले, पण नक्की कशाप्रकारचे प्रशिक्षण घेतले, याचा संगतवार धांडोळा घेतलेला नाही. केवळ, हे माझे गुरु, असेच उल्लेख वाचायला मिळतात!! वास्तविक पाहता, अल्काझींचे योगदान केवळ विजयाबाई(च) नव्हे तर पुढील अनेक पिढ्या मोकळेपणाने मान्य करतात. असे असताना, तुम्ही तर कारकिर्दीच्या प्राथमिक काळात अल्काझी यांच्याकडे गेला असताना, त्यांचे कुठले संस्कार तुमच्यावर घडले, याबाबत काहीही वाचायला मिळत नाही. ते सविस्तर येण्याची गरज होती कारण त्या संस्कारांना धरूनच, विजयाबाईंनी पुढील उभारणी केली. आत्मचरित्र लिहिताना, सगळा व्यापार हा पाठीला डोळे लावून अवलोकायचा प्रकार असतो आणि आपण आज जिथे आहोत, तिथपर्यंतचा प्रवास कसा झाला, याचा मागोवा घेण्याचा असतो, मग तिथे चिकित्सक वृत्ती, अभ्यासू मनोवृत्ती आणि वस्तुनिष्ठता आवश्यक असते. बऱ्याच ठिकाणी वस्तुनिष्ठतेचा "आव"आणला आहे परंतु अखेर निराशाच हाती येते. वास्तविक पहाता, आत्मचरित्र हे नेहमीच मागील आयुष्याकडे त्रयस्थ नजरेतून बघून, केवळ कौतुक नव्हे तर दोषांचा उहापोह करण्याची सुंदर संधी असते. बरे असे नाव्हे, आज बाईंनी काही चुका कबूल केल्या तर त्यांच्यावर काही लांच्छन येईल!! मुळात बाईंचे कर्तृत्व इतके व्यापक आहे की काही चुका दर्शविल्या तर त्यांच्या आयुष्यात काही कमतरता येऊ शकते. हे केवळ रंगायन बाबत आहे, अशातला भाग नाही. पुढे व्यावसायिक झाल्यावर, त्यांनी दिग्दर्शित केलेल्या प्रत्येक नाटकांचे उल्लेख आणि प्रसंगी विस्तारपूर्वक प्रकरणे आहेत. म्हणजे, "जास्वंदी", "महासागर", "पुरुष","संध्याछाया" इत्यादी सगळ्या नाटकांबद्दल माहिती मिळते, पण ती सगळी जंत्रीच्या स्वरुपात!! कुठेही, दिग्दर्शक म्हणून नेमके काय फेरफार केले, त्यामागे कुठली वैचारिक भूमिका होती, याबद्दल फारसे काही वाचायला मिळत नाही. वास्तविक नाटकाचा दिग्दर्शक म्हणजे कलाकृतीचा कप्तान!! जे लेखकाने लिहिले आहे, त्यातील नेमके नाट्य जाणून, त्याची रंगावृत्ती तयार करणे, हा प्रचंड व्यामिश्रतेचा भाग आहे, त्यामागे कितीतरी वैचारिक संघटन असते, आणि तेच नेमके वाचायला मिळत नाही. वाचायला मिळते ती, त्या नाटकानिमित्ताने झालेल्या घटनाची जंत्री!! इथे एक किस्सा आठवला. जयवंत दळवींनी, एका पुस्तकात विजयाबाईंवर लेख लिहिला आहे. त्यात लिहिताना, विजयबाईनी "संध्याछाया" नाटक बसवताना, त्यातील "बयो" व्यक्तिरेखा बसवताना, त्यांची (विजयाबाईंची) आजी कशी मिसळली, हे दळवींना सांगितल्याचे, विस्तारपूर्वक लिहिले आहे. खरंतर हे आणि असे किस्से, आत्मचरित्रात येणे गरजेचे होते. आता तर घटनांच्या जंत्री, कुणालाही गुगलवरून प्राप्त होऊ शकतात, अशी परिस्थिती असताना, त्याच घटना सलग मांडून नक्की काय साधले? दोन तीन ठिकाणी, दिग्दर्शक म्हणून लेखकाकडून आवश्यक ते बदल करवून घेतले, असे उल्लेख!! पण ते बदल का करून घेतले, त्याची काय आवश्यकता होती, त्याने सादरीकरणात काय आणि किती फरक पडला, हे प्रश्न तसेच मनात राहतात!! पुढे, पाश्चात्य लोकांशी गाठीभेटी झाल्या, त्या निमित्ताने सांस्कृतिक आदानप्रदान झाले, या सगळ्या घटनांचे विस्तारपूर्वक उल्लेख आहेत. एक इतिहास म्हणून योग्यच आहे पण मग पुढे प्रश्न असा उद्भवतो, या गाठीभेटीतून नेमका काय फायदा झाला तसेच विशेषत: जर्मनी, नंतर अमेरिका देखील, यांच्या जाणीवा, सादरीकरण आणि आपल्या संकल्पना यात नेमका काय फरक? याचे उत्तर मिळत नाही. इथे विजयाबाईंना एक संधी होती, पाश्चत्य रंगभूमी आणि भारतीय रंगभूमी याचा तुलनात्मक अभ्यास करण्याची. तसा त्यांनी अभ्यास नक्कीच केला असणार पण मग त्या अभ्यासाचे प्रतिबिंब आत्मचरित्रात पडत नाही. सगळे उल्लेख जंत्रीवजा येतात. आता विजयाबाई जर्मनी, अमेरिका इथे गेल्या होत्या, ही घटना जगजाहीर आहे. असे धरून चालू, त्यांच्या तुलनेत भारतीय रंगभूमी मागासलेली आहे किंवा कमअस्सल आहे. असे असेल तर मग सुधारणा करण्याची कितीतरी मोठी संधी प्राप्त झाली होती. असेही असू शकेल, त्यांना सुधारणा करण्याची संधी मिळाली नसेल. कारणे अनेक असू शकतात, जसे आर्थिक पाठिंब्याचा अभाव असणे, तुलनेने कम सक्षम अभिनेते असणे, इत्यादी. त्यांचा उल्लेख करायला काय हरकत होती. बाईंचा रंगभूमीवर इतका दबदबा आहे की त्यांनी मराठी रंगभूमीवरील त्रुटींचा उल्लेख केला तर त्याचा फार मोठा नकारार्थी गवगवा होईलच असे नाही आणि समजा झाला तर रंगभूमीच्या प्रगतीच्या दृष्टीने चांगलाच झाला असता. बाईंनी इथे फार मोठी संधी गमावली, असे वाटते. तसेच, पूर्वीच्या अभिनेत्यांबरोबर काम करताना, (म्हणजे नानासाहेब फाटक, मास्टर दत्ताराम, केशवराव दाते इत्यादी!!) आपल्याला कसे जुळवून घ्यावे लागले, किंवा त्यांच्या अभिनयातील बारकावे, कच्चे दुवे याबद्दल अवाक्षर देखील नाही!! खरे पाहता, अल्काझी आणि मर्झबान यांच्याकडून आधुनिक तंत्र शिकून, मराठी रंगभूमीवर पाऊल टाकले. तेंव्हा अभिनय शैलीत फरक असणारच, तसा पुढे थोडाफार उल्लेख देखील आहे पण तितकाच. त्यावर वैचारिक काहीही नाही!! पूर्वीच्या नटांना कुचेष्टेने "आवाजी" अभिनेते म्हणून खिजवले जाते पण त्यात किती अर्थ आहे? एक अभ्यासू अभिनेत्री म्हणून काही स्पष्ट विश्लेषण यायला काही हरकत नव्हती. बरे आता मागील पिढीतील कुणीही जिवंत नाहीत तेंव्हा त्यांच्याकडून वादग्रस्त टीका होण्याचा अजिबात संभव नव्हता. नंतर, NCPA प्रकरण!! त्यामागची टाटांची मनोभूमिका, त्यानुसार झालेले बांधकाम आणि मुळात त्या निर्मितामागील विचार, याचे सुसंगत वर्णन वाचायला मिळते. त्यांच्याआधी तिथे पु.ल. देशपांडे अध्यक्ष होते, त्याआधी भाभा!! परंतु त्यांच्या कार्याबद्दल फारसे काहीही वाचायला मिळत नाही. एकेठिकाणी पु.ल. देशपांडे यांनी केलेल्या कार्यक्रमांची थोडक्यात माहिती दिली आहे पण पुढे तसे कार्यक्रम खंडित झालें, हे पूर्णसत्य आहे. का खंडित झाले? आपली मनोभूमिका वेगळी होती म्हणून तसे कार्यक्रम खंडित झाले तर तसे स्पष्टपणे लिहायला हवे होते. त्यात काहीही वावगे नाही. पुढे NCPA संस्थेचे अध्यक्ष म्हणून काम करताना, स्वतःचे म्हणून काही निर्माण करताना, काय विचार केला होता? निर्मिती ही नेहमीच विचारांची मागणी करते आणि बाई तर सतत विचारांच्या कोंडाळ्यात वावरणाऱ्या!! असे असताना, आपला वैचारिक प्रवास कसा झाला? या प्रश्नाचे उत्तर कुठेही मिळत नाही. हे आणि असे अनेक प्रश्न वाचताना मनात येतात आणि शेवटी, पुस्तक वाचून मनात असमाधानच येते. हे सगळे सविस्तर लिहावेसे वाटले कारण, बाईंचे कर्तृत्व तितक्या तोलामोलाचे आहे म्हणून. सगळ्याच कलाकारांबाबत अशी अपेक्षा ठेवता येत नाही. इतिहास म्हणून पुस्तक चांगले आहे परंतु आत्मचरित्र म्हणून निराशा करणारे आहे.

Monday, 20 March 2023

साहिर - अवलिया कवी

ख़ुदा-ए-बऱतर तेरी जमी पर जमीं के खातिर ये जंग क्यूँ हैं हर एक फ़तह-ओ-जफ़र के दामन पे खून-ए-इन्सान का रंग क्यूँ हैं जमीं भी तेरी,है हम भी तेरे ये मिल्कियत का सवाल क्या हैं ये क़त्ल-ओ-ख़ून का रिवाज क्यूँ हैं ये रस्म-ए-जंग-ओ-जदाल क्या हैं जिन्हें तलब है जहान भर की उन्ही का दिल इतना तंग क्यूँ है गरीब माओ शरीफ़ बेहनों को अम्न-ओ-इज्जत की जिंदगी दे जिन्हे अता के है तूने ताक़त इन्हे हिदायत की रोशनी दे सरों में किब्र-ओ-गरूर क्यूँ है दिलो के शीशे पे जंग क्यूँ है खजा के रस्ते पे जानेवालो को बच के आने की राह देना दिलों के गुलशन उजड़ ना जाये मुहब्बतों को पनाह देना जहाँ में जश्न-ए-वफ़ा के बदले ये जश्न-ए-तिर-ओ-तफ़ंग क्यूँ हैं साहिरच्या काही सुंदर कवितांपैकी चित्रपटात गेलेली ही कविता. असे म्हणता येईल मानवतावादी दृष्टिकोनातून कविता लिहिली आहे तरी देखील कवितेतील डावी विचारसरणी लपत नाही आणि खरंतर साहिरने अंगिकारलेली ही विचारसरणी, चित्रपटातील गाणी लिहिताना देखील लपवली नाही. खरतर मानवी आयुष्यातून युद्ध ही कल्पना कायमची बाजूला सारता येईल का? आज तर नक्कीच नाही परंतु आशावाद कायम असतो आणि त्या आशावादातूनच अशी कविता जन्माला येते. प्रस्तुत कवितेत बरेच उर्दू भाषिक शब्द आहेत जे मराठी भाषिक वाचकांना अगम्य वाटू शकतात परंतु इथे एक बाब ध्यानात घेण्यासारखी आहे, साहिर हा हाडाचा उर्दू भाषिक कवी होता आणि आजही उर्दू साहित्यात त्याला मान आहे. किंबहुना असे देखील म्हणता येईल, चित्रपटातील गाण्यात साहिरने कविता मिसळली आणि गाण्याचा दर्जा उंचावला. अर्थात टीका करणारे उलट बाजूने टीका करतच असतात. चित्रपटातील गाण्यात काव्य मिसळायला हवे का? एक काळ असा होता, चित्रपट क्षेत्रात उर्दू भाषिक कवींचे प्राबल्य होते आणि बहुतेक गीते उर्दू भाषेत लिहिली जायची. गमतीचा भाग म्हणजे, त्याच काळातील जान निसार अख्तर, शकील बदायुनी इन्वा कैफी आझमी, हे सगळेच डाव्या विचारसरणीचे कवी होते आणि कम्युनिझम विचारसरणीचा प्रचंड पगडा त्यांच्यावर होता. तेंव्हा साहिर यांच्यावरील कम्युनिझम पगडा काही जगावेगळा नक्कीच नव्हता. साहिरची पार्श्वभूमी बघितल्यावर, या विचारसरणीचे महत्व पटते. १९४७ सालचा नृशंस नरसंहार, पुढे आई वडिलांचे विभक्त होणे, या सगळ्याचा साहिरवर परिणाम घडणे अटळ होते. आई वडिलांचे विभक्त होते, याचा त्याच्या मनावर कायमचा चरा पडल्याचे, त्याच्या सुरवातीच्या काही कविता वाचताना दिसून येते. मेरे सरकश तराने सुनके दुनिया ये समझती है, की शायद मेरे दिल को इश्क़ के नग्मों से नफ़रत है मुझे हंगामा-ए-जंगो-जदल में कैफ़ मिलता है मेरी फ़ितरत को खूरेंजी के अफ़सानों से रग़बत है मेरी दुनिया में कुछ वक़अत नहीं है रक़्सो-नग़्मे की मेरा महबूब नग़्मा शोरे-आहंगे-बग़ावत है याओळीतून सहज दिसणारी वैफल्याची भावना, पुढे सरसकट वेगवेगळ्या कवितांमधून अधिक दृढ होत गेली. साहिरच्या कवितेत निखळ आनंद फारसा वाचायला मिळत नाही. अगदी प्रणयी थाटाची कविता असली तरी कुठेतरी निराशेचा सूर घुमत असतो. मेरा जुनूने - वफ़ा है ज़वाल - आमादा, शिकस्त हो गया तेरा फ़ुसने-जेबाई! उन आरजुओं पी छाई है गर्दे - मायूसी, जिन्होंने तेरे तबस्सुम में परवरिश पाई! प्रेमाचा उन्माद असताना, तो कमी होत आहे, श्रृंगार मनात असताना देखील मनात निराशा दाटलेली आहे. त्यामुळे त्याच्या कविता वाचताना, आपल्या मनात देखील बराच काळ काळोखी दाटते आणि कवितेचा निखळ आस्वाद घेणे अवघड होते. सतत कवितेत "मायूसी" सारखे विरही शब्द वाचायला मिळतात. कलाकाराचा त्याच्या वैयक्तिक आयुष्याशी संबंध जोडू नये, हे खरेच आहे पण साहिरचे आयुष्य पहिले की असेच वाटते, याच्या वाट्याला निखळ आनंद कधी आलाच नसावा. संस्कारक्षम वयातील देशाची फाळणी, पुढे वडिलांचे ऐय्याशी जीवन आणि आईची झालेली फरफट, पुढे अमृता प्रीतमशी तुटलेले नाते, या सगळ्यांचा परिपाक त्याच्या कवितेतून वारंवार दिसून येतो. साहिर डाव्या विचारसरणीकडे का वळला, याचा तर्क आपल्याला लढवता येऊ शकतो. विचार करणे ही मनुष्याची प्रकृती आहे आणि म्हणूनच त्याच्या अनुभवत विचारांचा अंश अपरिहार्यपणे असतो. ललित साहित्यातून आणि विशेषकरून कविता लेखनातून व्यक्त होणाऱ्या अनुभवांच्या बाबतीत तर हे विशेषत्वाने खरे आहे. कारण भाषा हे ललित साहित्याचे माध्यम आहे. भाषेचाच द्वारे त्यात व्यक्त होणारा हा अनुभव होतो, म्हणजेच त्याला अर्थ प्राप्त होतो. आणि भाषेचं घडणच अशी आहे की, तिच्या द्वारे घेतलेल्या अनुभवत विचार अपरिहार्यपणे यावा लागतो. आपण ललित साहित्याची एकंदर घडण बघितली तर एक गोष्ट नेहमी स्पष्ट होते. प्रतिमा,पत्रे आणि घटक हे ललित साहित्याचे महत्वाचे घटक असतात. आणि या तिन्ही घटकांचा एक समान गुणधर्म असा की ते संवेदना,भावना आणि विचार यांना एकत्र बांधून ठेवतात. वेगळ्या शब्दात प्रतिमा जे कार्य मूलभूत स्तरावर करते, तेच कार्य घटना आणि पात्रे अधिक विस्तारित स्वरूपावर करतात. आणि म्हणूनच कदाचित ललित साहित्यात विश्वात्मकता असू शकते. साहिरच्या कवितांचा विचार करताना, वरील विचार फार महत्वाचा ठरतो. याचे महत्वाचे कारण, त्याच्यावरील संस्कार आणि त्याचा कार्यकारणभाव, हेच त्याच्या कवितांचे मुलतत्व कायम राहिले. आपल्याला आलेले अनुभव, हा त्याच्या कवितांचा कच्चा माल आहे आणि ही जाणीव कायम त्याच्या सोबत आहे.अगदी चित्रपटातील गीतांचा स्वतंत्र विचार केला तरी हेच दिसून येते. तुम मुझे भूल ही जाओ तो ये हक़ है तुमको मेरी बात और है मैंने तो मोहब्बत की है याच कवितेत पुढे साहिर स्पष्टपणे लिहितो, ज़िन्दगी सिर्फ मोहब्बत नहीं कुछ और भी है जुल्फ़ - ओ - रुख़सार की जन्नत नहीं कुछ और भी है भूख और प्यास की मारी हुई इस दुनियामें इश्क़ ही एक हक़ीक़त नहीं कुछ और भी है इथे साहिरवरील डाव्या विचारसरणीचा पगडा स्पष्ट दिसतो. खरे तर चित्रपटातील साधे प्रणयी थाटाचे गाणे आहे परंतु साहिर तसा विचार करत नाही. प्रेमात कितीही आकंठ बुडायचे म्हटले तरी सामाजिक वास्तव आणि त्याची जळजळीत विखारी जाणीव त्याच्या केंद्रस्थानी येते. मी वरती संस्कार आणि त्याचा कार्यकारणभाव संबंधी विधान केले, त्याला या ओळी पूरक ठरतील. पुढे त्यांने अगदी भांडवलशाही वातावरणात गीते लिहिली तरी त्याच्यातील मूळ धागा कधीच लोपला नाही आणि ती वेगवेगळ्या स्तरावर दृग्गोचर होत राहिला. इथे एक मुद्दा सुचला. कलाकारांच्या बाबतीत असे म्हणता येईल, निरनिराळ्या व्यक्तींच्या प्रकृती भिन्न असतात. कुणी आवेगाने अनुभव घेतो तर कुणी संयमाने अनुभव घेतो; दुसरा अलिप्तपणे अनुभव घेतो आणि आणखी कुणी तिरक्या नजरेतून अनुभव घेत असतो. परिणामी होणारी अभिव्यक्ती ही नेहमीच वेगवेगळी असते. आता साहिरच्या कवितेत बरेचवेळा उत्कटता हा भाव दिसतो. परंतु साहित्यात जी उत्कटता असावी लागते ती आता उत्कटता म्हणजे काय?उत्कटता अनुभवाची नसून अभिव्यक्तीची असते. ललितकृतीतून व्यक्त होणार अनुभव जर जिवंत नसेल तर तो वाचकांपर्यंत नेमका पोहोचणे अवघड असते. तेंव्हा हा जिवंतपणा म्हणजे उत्कटता कलाकृतीत असलीच पाहिजे. अर्थात निव्वळ उत्कटता असणे कलाकृतीच्या जिवंततेला आशय प्रदान देते का? उत्कट अभिव्यक्ती ही पूर्णपणे कलात्मक पातळीवर गेलेली असते. साहिरच्या पुढील ओळीत ही उत्कटता अभिव्यक्तीच्या पातळीवर गेली आहे, हे बघता येते. मेरे जहाँ में समनजार ढूंढ़ने वाले, यहाँ बहार नहीं आतशी बगूले हैं धनुक के रंग नहीं, सुरमई फ़िज़ाओं में उफ़क़ से ता-ब-उफ़क़ फांसियों के झूलें हैं माझ्या आयुष्यात उपवन शोधणाऱ्यांनो, इथे फक्त अग्निलोळ मिळेल. मी फक्त पहिल्या २ ओळींचा मतितार्थ लिहिला आहे. परंतु उत्कटता अभिव्यक्तीच्या पातळीवर कशी जाते, हे आपल्याला समजून घेता येते. कविता बरीच मोठी आहे आणि आपण इथे आस्वादाच्या पातळीवरून साहिर यांचे काव्य बघत आहोत. आता थोडे मूल्यमापन करायचे झाल्यास, काही मुद्दे विचारात घ्यावे लागतील. जीवनाचे सत्य स्वरूप दाखवणे आणि जीवनविषयक ऊच्च आदर्श वाचकांपुढे मांडणे,ह्या दोन्ही गोष्टी साहित्यिक करत असतो. वास्तविक या दोन्ही गोष्टी भिन्न आहेत. जीवनाचे सत्य स्वरूप दाखवले की त्यातून आपोआप जीवनाचे आदर्श सूचित होतात अशी बरेचवेळा एक भूमिका असते. काही वेळा तर सत्य, शिव आणि सौंदर्य ही सारी एकच आहेत, अशी भूमिका अद्वैतवादी घेतात. पुढे जाऊन असे देखील मांडले जाते, सौंदर्य हे केवळ घाटात नसून आशयात देखील असू शकते. एकंदरीत आपण भूमिकेवर आलो की तर्कशास्त्र दूर जाते. त्या दृष्टीने नीतिमूल्ये बदलत असतात, तेंव्हा त्यानुसार साहित्याच्या प्रतवारीत देखील फरक पडतो परंतु मूलभूत नीतिमूल्ये शाश्वत असतात, बदलतात ती आनुषंगिक आणि तात्कालिक मूल्ये. साहित्याचा संबंध मूलभूत मूल्यांशी असतो तेंव्हा तात्कालिक मूल्ये बदलली तरी फारसा फरक पडत नाही. कुठलाही साहित्यिक हा भाषेचं उपयोग प्रत्यक्षाचे किंवा सामाजिक परिस्थितीचे चित्रण करण्याकरता करतो, असे मार्क्सवादी ठामपणे मांडतात आणि इथे साहिरच्या कवितेची कुंडली जुळते. साहिरचे सामाजिक भान कधीही विरळ होत नाही, अगदी निसर्गचित्र मांडताना देखील हा दृष्टिकोन प्रकर्षाने दिसून येतो. साहिरची अतिशय लोकप्रिय कविता ध्यानात घेतल्यास, हा मुद्दा थोड्या वेगळ्या पद्धतीने स्पष्ट करता येईल. ताज़ तेरे लिए इक मज़ार - ए - उल्फत ही सही तुझको इस वादी - इ - रंगीन से अक़ीदात ही सही मेरी महबूब कहीं और मिला कर मुझ से बज़्म - ए - शाही में गरीबों का गुज़र क्या मानी सब्त जिस राह में हों सतवत - ए - शाही के निशाँ उस पे उल्फत भरी रूहों का सफर क्या मानी आता मान्य करायला हवे, एकेकाळी या कवितेने मला वेड लावले होते पण पुढे एकूणच ही सगळीच कविता बटबटीत वाटायला लागली. वास्तविक ताजमहाल सारखी अलौकिक सुंदर वास्तू आणि ती बघून साहिरला, ती बांधतानाची झालेली पिळवणूक आठवते. सगळे चित्रण याच पार्श्वभूमीवर आहे. एका दृष्टीने हा स्वतंत्र दृष्टिकोन म्हणता येईल पण तो दृष्टिकोन मांडताना, कुठेतरी साहिरची सौंदर्यदृष्टी एकांगी झाली, असे आज वाटते. अर्थात इथे एक मुद्दा आणखी मांडता येईल. कुठल्याही कलाकाराच्या सगळ्याच साहित्यकृती या असामान्य दर्जावर ठेवता येत नसतात, त्यात डावे - उजवे हे नेहमीच असते. आपण आपली दृष्टी किती सम्यक पातळीवर ठेवतो, त्याप्रमाणे मूल्यमापन होऊ शकते. दुर्दैवाने मूल्यमापनाचे ठाम आणि ठराविक असे निकष अजुन तरी उपलब्ध नाहीत. अर्थात साहिरने निसर्गचित्रे लिहीलीच नाहीत का? उत्तर सोपे आहे. नक्कीच लिहिली आहेत परंतु दुर्दैवाने त्याची जी प्रतिमा निर्माण झाली, त्याच्यापुढे झाकोळून गेली. तसव्वुरात की परछाइयाँ उभरती हैं कभी गुमान की सूरत कभी यकीं की तरह वो पेड़ जिनके तले हम पनाह लेते थे खड़े है आज भी साकित किसी अमी की तरह आता या ओळी वाचताना, त्याची ठराविक ओळख "खड़े है आज भी साकित किसी अमी की तरह" या ओळीतून प्रकट होते "साकित" म्हणजे "चुपचाप"! निसर्गचित्र निर्माण करताना देखील त्याचा व्याकुळ स्वर लपत नाही. साहिरच्या बहुतांशी कवितेत निराशा कायमची ठाण मांडून बसलेली असते आणि त्याचे मूळ, मी वर निर्देश केलेल्या संस्कारात दडलेले आहे. खरेतर सौंदर्यवाद्यांची भूमिका अशी असते की, साहित्याचा एकमेव विशेष आणि निकष हा सौंदर्य असतो. साहित्यकृती ही तिच्या घटकांची लयबद्ध रचना करून घडवलेली असते आणि म्हणून ती सुंदर असते. साहित्यकृतींचे सौंदर्य अशा रीतीने तिच्या रचनेत अथवा घाटात साठवलेले असते. परंतु ह्या गोष्टी काहीशा आनुषंगिक असतात. अर्थातच साहित्य श्रेष्ठ की कनिष्ठ हे तिच्या ठिकाणी असलेल्या सौंदर्यावरून ठरवायचे असते. सौंदर्य हाच साहित्याचा महत्वाचा निकष असू शकतो आणि हाच दृष्टिकोन महत्वाचा ठरवला तर साहिर यांच्या कविता एकूणच भाषेच्या दृष्टीने फारच समृद्ध ठरतात.

Saturday, 18 February 2023

ललित संगीताचा आस्वाद- सांस्कृतिक सोहळा

इथे सुरवातीलाच काही बाबी स्पष्ट करतो. प्रस्तुत लेखात, ललित संगीत आणि त्याचा आस्वाद,इतकेच कार्यक्षेत्र आहे.ललित संगीताची निर्मितीआणि त्याचा प्रवास, हा उद्देश अजिबात नाही कारण तिथे प्रत्यक्ष संगीतकार, हा घटक अवतरतो आणि महत्वाचा ठरतो. त्याच्या निर्मितीबाबत कुठलेही विधान करणे, अति धाडसाचे आणि म्हणून अति बाष्कळ ठरते. आपण गाणे ऐकतो, सहज ऐकतो आणि निदान पहिल्या श्रवणात तरी, गायक/गायिकेच्या कौशल्याचा परिणाम आपल्या कानावर होत असतो. वास्तविक पाहता, ललित संगीतात, गायक हा घटक सर्वात शेवटी येतो. *आधी चाल, मग शब्द* ही पद्धत असो किंवा *आधी शब्द मग चाल* अशी पद्धत असो, गायनक्रीडा शेवटच्या पातळीवर येते. आपले श्रवण हे बहुतांशी याच पातळीवर वावरते. अर्थात गायनक्रियेचा परिणाम साहजिकच प्रगाढ होतो. एकतर सगळाच सांगीत आविष्कार हा ३,४ मिनिटांचा असतो. त्यामुळे इतक्या अल्प काळात, अविष्कारातील कुठल्या सौंदर्याकडे लक्ष द्यायचे? हा विचार करण्यापेक्षा जे आपल्या कानावर पडत आहे, तेच श्रेयस्कर मानण्याकडे सर्वसाधारण कल असतो. त्यातून गळ्यातून येणारा सूर, हे नेहमीच अत्यंत प्रभावी माध्यम असल्याने,तिकडे आपले वेधले जाणे, यात प्राथमिक दृष्टीने काहीच चूक नाही. आता बघा, आपण शास्त्रीय संगीताच्या मैफिलीला जातो, तिथे तर सर्वकाळ सुरांचेच राज्य असते आणि तिथे सुरांच्या राज्यात आपण भान हरपून बसतो. याचे महत्वाचे कारण म्हणजे तिथे *सूर* याच घटकाला संपूर्णपणे महत्व असते. एक बाब नक्की, सुरांच्या राज्यात शब्द माध्यम हे नेहमीच परके राहते!! शब्द माध्यम, त्याची अभिव्यक्ती आणि केवळ कैवल्यात्मक पातळीवर वावरणारे असे सूर हे माध्यम सगळ्यात लवचिक आणि म्हणून मनावर गाढ परिणाम करणारे असते. ललित संगीतात प्राय: ३ घटक असतात आणि हे आता सर्वमान्य आहे. प्रत्येक घटकाला सम प्रमाणात महत्व मिळावे, अशी अपेक्षा असते. प्रत्यक्षात काय घडते? गाण्याच्या श्रवण क्रियेत *गायन* या घटकाला अतोनात महत्व मिळते कारण मी वर म्हटल्याप्रमाणे आपल्याला गायनाचा पहिला प्रत्यय येतो. त्यानंतर संगीतकाराची विचारणा होते आणि मग ऐकणारा जर का अधिक चिकित्सक असेल तर कवीने काय लिहिले आहे, याचा विचार करायला घेतला जातो. संगीतकाराच्या स्वररचनेचा आणि कवीच्या कवितेचा साधक बाधक विचार, ही वैचारिक पायरी फारच थोड्या वेळी ओलांडली जाते. याचे मुख्य कारण असे संभवते, कवीची कविता समजून घेण्यासाठी, मनाची तशीच तयारी आणि आवड होण्याची गरज असते. कविता समजून घ्यायची असेल तर मुळात शब्द माध्यमाबद्दल मनात आवड व्हावी लागते. त्यातूनच पुढे मग स्वरांनी घातलेले गारुड बाजूला सारून, शब्दरचनेचा स्वतंत्रपणे विचार करणे, गरजेचे असते आणि तिथे बौद्धिक व्यायाम आवश्यक असतो. कोण इतका मेंदूला त्रास देणार? कविता समजून घेण्याची गरजच काय? असले प्रश्न सर्वसामान्यपणे सगळ्यांना पडतात. स्वतःच्या मेंदूला कमीत कमी तोशिस देऊन, जे गाणे ऐकायला मिळते, तोच खरा आस्वाद,हीच आस्वादाची रूढ पद्धत. शब्द ओळखणे, समजून घेणे, काहीसे अवघड असते, हे कुणीही मान्य करेल परंतु आस्वादाच्या प्रक्रियेत त्याला फार मोठे स्थान आहे. मुळात ललित संगीत ही बौद्धिक विचाराची मागणी आहे, हेच फारसे कुणाला पटत नाही. जाता जाता सिगारेट शिलगावी आणि आनंद मिळवावा, तद्वत विचार ललित संगीताच्या आस्वादात अंतर्भूत असतो. गाण्यातील कविता, हे स्वतंत्र आस्वादाचे क्षेत्र आहे आणि त्यासाठी मन एकाग्र करून, कवितेचा विचार करायचा असतो,हेच फारसे पटत नाही. खरतर जरा गंभीरपणे विचार केला तर कविता संग्रह आणि गीत संग्रह, यात तत्वतः काहीही फरक नसतो पण आपल्या समाजात याबाबत गीतसंग्रहाला नेहमीच खालचे स्थान दिले जाते. कविता संग्रह निघतात परंतु गीतसंग्रह अपवाद स्वरूपात निघतात!! जितक्या प्रमाणात भुक्कड कविता प्रसवल्या जातात तितकेच प्रमाण गीत लेखनात असू शकते. यात एका अडचण फार महत्वाची असते, कवितेचा आस्वाद घेताना, कानातून सुरांचे गारुड बाजूला ठेवणे गरजेचे असते आणि तिथेच खरी अडचण उद्भवते. आपण गीतातून सुरांना वेगळे करू शकत नाहीआणि सुरांना साथीला घेऊनच कविता वाचायला घेतो ही पद्धत निखालस चुकीची आहे. गीतातील कविता ही इतर कवितेप्रमाणे वाचायला घ्यावी लागते. तर आणि तरच तुम्ही गीतातील कविता आस्वादू शकता. त्यासाठीच मनाची एकाग्रता आवश्यक असते. तसेच संगीतकाराच्या स्वररचनेबाबत म्हणावे लागेल. प्रत्येकवेळेस स्वरलेखन करून, चालीचे संदर्भ जाणून घ्यायची अजिबात गरज नसते. आपले कान त्यासाठीच्या विश्लेषणासाठी तयार करावे लागतात. मी वर म्हटल्याप्रमाणे, स्वररचनेच्या जन्माची कहाणी शोधायची गरज नसते. ऐकायला मिळत असलेली चाल - इथे शब्द बाजूला ठेवणे गरजेचे असते. नुसती चाल मनात घोळवायची आणि त्याचा स्वतंत्र आनंद घ्यायचा. इतके केले तरी गाण्यातील स्वररचनेचा गाभा जाणून घेता येतो. ऐकायला मिळालेली चाल किती कठीण, किती सोपी आहे, याचा अदमास घेता येतो. सतत ललित संगीत ऐकणे, हाच एकमेव उपाय आहे आणी त्यामुळे आपली विचार करायची पद्धत नक्की होते. आपण रागदारी संगीत सातत्याने ऐकतो आणि मगच त्यातील आनंद घ्यायला लागतो. हे आपले सहजपणे घडत असते. असे आहे, तर मग ललित संगीताबाबत दुजाभाव कशासाठी? वास्तविक ३ मिनिटांच्या आविष्कारात सौंदर्याच्या असंख्य परी दडलेल्या असतात, इथे एकही क्षण वाया दवडला जात नसतो. किंबहुना प्रत्येक क्षणाची स्वतंत्र अनुभूती असते. इथे वाद्ये, वाद्यमेळ, त्यांचा शब्दाशी जोडला गेलेला भावार्थ आणि ते सगळं जाणून,गायनाची अनुभूती घ्यायची!! ही कलाकृती सांघिक असते आणि परिणामी यशाचे भागीदार देखील सम प्रमाणात असतात. मी लेखाचे शीर्षक लिहिताना -सांस्कृतिक सोहळा असे जे लिहिले, ते सगळे या सगळ्या विवेचनाच्या संदर्भात आहे. इथे प्रत्येक घटक हा संस्कृतीला आधाराला घेऊनच जिवंत होत असतो. आपली संस्कृती आकाराला येत असते,ती अशाच पायऱ्यांच्या आधाराने. इतका जर का बारकाईने विचार करायला सुरवात केल्यास, आपले आपल्यालाच कळेल, आपण आपले व्यक्तित्व किती प्रगल्भ करीत आहोत. हे प्रगल्भ होण्याची प्रक्रिया, आपल्या नकळत होत असते आणिअचानक एका विविक्षित क्षणी आपले विचार समृद्ध झाल्याची जाणीव होते आणि आपण आयुष्य उपभोगायच्या प्रक्रियेत ४ पावले पुढे आलोआहोत. कलेची फलश्रुती यापेक्षा वेगळी असण्याची काहीही गरज नसते.

Sunday, 12 February 2023

कविता - एक समृद्ध जगणे

एकूणच साहित्य, साहित्य व्यवहार, याकडे जरा डोळसपणे बघितले तर एक बाब लगेच ध्यानात येऊ शकते. साहित्य आपल्या आयुष्यावर बरावाईट परिणाम कळत. नकळत परिणाम घडवत असते आणि परिणामी, व्यक्तित्वावर प्रभाव टाकत असते. अर्थात हा प्रभाव नकारात्मक असू शकतो किंवा सकारात्मक असू शकतो. त्यातून आपल्यावर झालेल्या संस्कारावर देखील साहित्याचा घडणारा परिणाम घडू शकतो. खरंतर थोड्या त्रयस्थपणे विचार केल्यास, साहित्य म्हणजे तरी काय? कुणालातरी कुठलातरी अनुभव येतो, त्याच्या मनावर त्याचा संस्कार होतो आणि त्यातून जाणवणाऱ्या अनुभूतीचा शाब्दिक आविष्कार, हा साहित्याच्या रूपाने वाचकांसमोर येतो. अर्थात जो अनुभव लेखकाला आलेला असतो, त्याचे अचूक शब्दांकन एका मर्यादेपर्यंत नेमके करता येते. अनुभवाचा संपृक्त परिणाम कितीही मनावर ठसला असला तरी शब्दरूपात मांडताना, कुठे ना कुठेतरी कळत/नकळत तडजोडीच्या स्वरूपात लिहिला जात असतो. लिहिणारा बरेचवेळा आव आणतो, अनुभवाचे नेमके शब्दरूप लिहिले गेले आहे पण ते १००% खरे नसते. बरेचवेळा अनुभव शब्दात मांडताना, मनात इतर असंख्य विचार तरळत असतात आणि लिहिताना खूप वेळा असे घडते, मनाशी योजलेले शब्द मनातच विरले जातात आणि लेखक एका धुंदीत आपले लेखन पूर्ण करतो. यात कुठेही फसवाफसवी नसते तर मानवी लेखन कौशल्याच्या मर्यादेची लखलखीत जाणीव असते. बरेच वेळा जेंव्हा लिहिण्याचा मजकूर पूर्ण होतो तेंव्हा त्यातील त्रुटी लक्षात येतात आणि तोपर्यंत वेळ निघून गेलेली असते. अशा वेळी "अल्पाक्षरी" लेखन हे अनुभवाची अनुभूती देण्याच्या प्रक्रियेला मदत ठरू शकते. अल्पाक्षरी हे गद्य लेखन असू शकत, जसे की आलेला अनुभव अत्यंत थोडक्यात, कुठलाही शाब्दिक फापटपसारा न मांडता,गोळीबंद स्वरूपात लिहिल्यावर बऱ्यापैकी समाधान देऊन जाते. असे असले तरी गाड्या लेखनाला बऱ्याच मर्यादा पडतात आणि हे कुठलाही सुजाण माणूस नाकारणे कठीण. त्यामुळेच बहुदा अल्पाक्षरी माध्यमातील "कविता", गद्य लेखनापेक्षा अधिक सृजनक्षम, अधिक क्रियाशील आणि अनुभवाची दाहकता किंवा एकूणच सगळाच अनुभव ग्रथित करण्याच्या प्रक्रियेत अधिक अंतर्मुख होते. कविता कशी असावी? खरंतर कविता संपूर्णपणे आकळून घेण्याचा आग्रह अनाकलनीय आहे. बरेचवेळा गद्य लेखन देखील या पातळीवर वावरते परंतु गद्य लेखनात पसरटपणा येण्याचा संभव अधिक. कवितेच्या बाबतीत हा धोका टाळता येण्याची शक्यता बरीच असते. एकतर कविता ही, कुठलाही अनुभव थोडक्यात मांडत असते, त्यामुळे शब्दांचा भरमार नसतो. जे काही मांडायचे आहे, ते अत्यंत मोजक्या शब्दात आणि प्रभावीपणे, मांडणे, अत्यावश्यक असते. काही ओळींतच अनुभवाची संगती लावायची असते.अर्थात अल्पाक्षरी लिहिताना, अचूकता येणे गरजेचे असते परंतु अनुभवाची सांगता करताना, प्रतिमा, उत्प्रेक्षा वगैरे शाब्दिक अलंकाराची जरुरी भासते आणि बहुदा इथेच कविता या माध्यमाचे स्वरूप वेगळे होते. याचा अर्थ असा नव्हे, हेच अलंकार गद्य लेखनात उपयोगी नसतात. आत्ममग्नता जितकी कवितेतून व्यक्त होते, तशी गद्य लेखनातून अपवाद स्वरूपात शक्य होते. अर्थात हे विधान तसे ढोबळ म्हणायला हवे कारण प्रत्येक कविता आत्ममग्न असते, असे म्हणणे म्हणजे स्वतःची फसवणूक करणे होय. परंतु अनुभूतीची तरलता,दाहकता जितकी कवितेद्वारे प्रकट होऊन शकते, तितकी गद्य लेखनातून फार क्वचित अनुभवायला मिळते. मी सुरवातीला जे विधान केले, त्याचेच फलस्वरूप इथे पुन्हा मांडता येईल. साहित्याचा व्यक्तित्वावर घडणारा अमीट ठसा हा कवितेद्वारे घडण्याची शक्यता अधिक असते. मुळात. कविता कशी असावी याबाबत काही ठोस नियम नाहीत. प्रत्येक कालखंडात कवितेचे स्वरूप बदलत असते आणि आपल्या संस्कृतीवर गाढा परिणाम घडवत असते. आता इथे एक प्रश्न उद्भवू शकतो. कवितेमुळे संस्कृती घडते की बदलती संस्कृती कवितेला वेगळा आकार प्राप्त करून देते? कविता हा संस्कृतीचा अविभाज्य भाग आहे, हे तर खरेच आहे. कविता समजून घेणे, यात साहित्यिक आणि सुजाण असा आनंद आहे, हे लक्षात ठेवणे जरुरीचे आहे. अन्यथा कविता वाचून कोरडे राहणारे वाचक जागोजागी भेटत असतात. आपण जे साहित्य वाचतो, त्याचा परिणाम आपल्या मनावर होतच असतो आणि हे नाकारणे अशक्य. गद्य लेखन समजून घ्यायला तसे फारसे अवघड नसते परंतु कवितेबाबत वाचकाला, थोडेफार समृद्ध असणे आवश्यक असते. अन्यथा कवितेतील आशय, त्यातील रचना कौशल्याची गंमत आणि एकूणच अखेरचे जे संचित मांडलेले असते, त्याचा आनंद घेणे अवघड जाणार. बरेचवेळा, केवळ आपल्याकडेच नव्हे तर इतरत्र देखील, कवितेचा घाट, याला प्रमाणाबाहेर महत्व दिले जाते. कविता कशी असावी? कवीच्या मगदुरावर हे अवलंबून असते. आपल्या मराठी कवितेचा विचार केल्यास, मराठी कवितेला शेकडो वर्षांची परंपरा आहे आणि कालानुरूप त्यात भरपूर मन्वंतर घडले आहे. परिणामी कालची कविता आज तितकीच प्रभावी वाटले का? आपली आवड शिळी होऊ शकते परंतु कविता ही कविताच असते आणि हे जर पक्केपणाने ध्यानात ठेवले पाहिजे. आपल्याकडे एकूणच एक फॅशन झाली आहे, कवितेचे काळानुरूप वर्गीकरण करून, त्या दृष्टीने आवड निर्माण करायची. परिणामी आपण जुन्या कवितांवर अन्याय करीत असतो. आपल्या वयानुसार आपली आवड बदलत असते परंतु संस्कारक्षम वयात वाचलेल्या कवितांचे परिणाम दीर्घकाळ टिकणारे असतात. दुसरा मुद्दा असा येतो, कवितेची आवड विषयानुसार ठरवणे होय. काही विषय कालातीत असतात तर काहींना क्षणभंगुरत्वाचा शाप असतो. कालातीत विषय हे नेहमीच आपल्याला प्रत्येकवेळी वेगवेगळी अनुभूती देतात. आता ही अनुभूती स्वीकारण्याची शक्ती व्यक्तिपरत्वे वेगवेगळी असणारच परंतु मांडलेला अनुभव आपल्या मनात किती खोलवर रुतून बसतो, त्यानुसार आपली आवड ठरवणे योग्य नव्हे का? त्यादृष्टीने विशेषतः मराठी कवितेत " सामाजिक बांधिलकी" या शब्दांनी नको तितका घोळ निर्माण करून ठेवला. कविता आत्मनिष्ठ असते आणि लिहिणारा कवी हा, याच समाजातून आलेला असतो. तेंव्हा समाजातील सुखदुःखाचा तो साक्षीदार असतो आणि त्यातूनच तो अनुभव कवितेत मांडत असतो. तेंव्हा त्यासाठी सामाजिक बांधिलकीचे बंधन कशासाठी? एक नक्की, कविता समजून घेण्यासाठी, सातत्याने वाचन करीत, स्वतःला समृद्ध करायला हवे. कवितेतील प्रत्येक प्रतिमेचं अर्थ आपल्याला लागेलच हा आग्रह वृथा आहे पण जरी आशय तात्काळ ध्यानात आला नाही ती कविता आपल्यावर गाढा परिणाम घडवत असतेच असते. ज्याप्रमाणे सततचे वाचन आपले आयुष्य समृद्ध करत असते, त्याप्रमाणेच उत्तम कविता आपल्या विचारांवर आणि तद्नुषंगाने वागण्यावर परिणाम करीत असते आणि एकूणच आपले जगणे समृद्ध करीत असते. अर्थात आपल्याला आयुष्य समृद्ध करायलाच हवे का? या प्रश्नावर मात्र सगळेच विचार गोठले जातात.

Tuesday, 24 January 2023

डायलिसिस - एक अनुभव

आज नेहमीप्रमाणे बॉंबे हॉस्पिटलमध्ये पहाटे ५.३० वाजता डायलिसिस करायला गेलो. गेले काही महिने मी पहाटेच जातो.त्यात मोठा फायदा, दोन्ही वेळेस घरचे जेवण मिळायला लागले. दुसरा फायदा, सगळं दिवस तुम्ही सजगपणे घालवू शकता. तिसरा महत्वाचा फायदा म्हणजे, डायलिसिसची सायकल (४ तासाची सायकल असते) संपली की तुम्हाला मशीनपासून वेगे केले जाते आणि हाताच्या शिरांवर घुसलेल्या (अर्थ शब्दाश: घ्यावा) सुया बाहेर काढून तिथे गॉज कॉटनचे बँडेज बांधले जाते. हे बँडेज अंगावर कमीतकमी ४ तास बाळगावे लागते. पूर्वी सुरवातीला मी दुपारच्या ३ वाजताच्या बॅचमध्ये जात होतो. आता दुपारी ३ वाजता सुरु होणार म्हणजे संपायला संध्याकाळचे ७ व्हायचे. त्यापुढे हातावर भलेमोठे बँडेज बाळगायचे!! परिणामी रात्रीची झोप कमी झाली आणि मानसिक त्रास व्हायचा तो वेगळाच. आता मी या सगळ्या उपचारांना सरावलो आहे. मला सुरवातीचे दिवस आठवले कारण आज माझ्या हातात रक्ताची मोठी गुठळी झाली. डायलिसिस चालू असताना, असे काही होणे, भयंकर त्रासदायक असते. वास्तविक वेदना होत नाहीत पण हातातून रक्ताची धार लागली आहे, हे दृश्य काही सुखावह नव्हतेच. मी झोपलेला बेड रक्ताने भिजायला लागला आणि मी परिचारिकेला हाक मारली आणि रक्त गालात असल्याचे दाखवले. तिने लगोलग डॉक्टरला बोलावले आणि ४,५ मिनिटे मशीन बंद करून, तो क्लॉट काढून जागा स्वच्छ केली आणि पुनश्च डायलिसिस सुरु झाले. वास्तविक डायलिसिस उपचार घेणाऱ्या रुग्णाला अनुभवाला अधूनमधून सामोरे जावे लागत असते. फक माझी मानसिक तयारी नव्हती. आज घरी आलो आणि गेले ९ महिने डोळ्यांसमोर आले. १ मे २०२२ रोजी माझी डायलिसिस ट्रीटमेंट सुरु झाली. सुरवातीला माझा समाज असा होता, फार तर ५,६ सायकल्स संपल्या की मी पूर्ववत आयुष्य जगायला सुरु करिन पण प्रत्यक्षात, आत आयुष्यभर करायला लागणार, ही वस्तुस्थिती लवकरच ध्यानात आली. म्हटले तर हा मानसिक धक्काच होता पण मीच मला समजावले. सुरवातीला माझे शरीर तितकेसे तयार नव्हते, हे आता लक्षात आले कारण सुरवातीच्या २,३ सायकल्स पूर्ण करून घरी आलॊ आणि जेवणानंतर थाळी धुवायला खुर्चीवरून उठलो आणि माझा तोल जाऊन, मी जमिनीवर बसकण मारली. हा अनुभव मलाच अवाक करणारा होता, हे असे होईल, अशी पहिल्या अनुभवापर्यंत तरी कल्पना केली नव्हती. पुढील २ महिन्यानंतरच्या सायकलच्या वेळी तर, मी पहाटेच्या बॅचला जायला लागलो. अशाच एका प्रसंगी, जेवण झाले आणि पुन्हा खुर्चीत बसायला पाऊल टाकले आणि माझा तोल गेला!! नशिबाने घरात त्यावेळी धुणी,भांडी करणारा गडी काम करीत होता आणि त्याला मोठा आवाज ऐकायला मिळाला. त्याने, मी जमिनीवर पडल्याचे बघताच, मला आधार देऊन, पलंगावर झोपवले आणि अंगावर चादर टाकली. मी लगोलग झोपेच्या आधीन झालो. असे अनुभव फार नाही पण ४ वेळा आले पण पुढे मलाच कळले, अशा वेळेस स्वतःला कसे सावरून घ्यायचे. यात एक गोम अशी आहे, डायलिसिस पूर्ण होते तेंव्हा तुमचे कमीतकमी १.५० ते २ किलो वजन कमी होते आणि हे शरीराला झेपणे अवघड जाते. पुढे मनाची सवय करून घेतली. आज तर मी डायलिसिस करून आलो आहे आणि हा लेख लिहायला बसलो आहे!! गेल्या १० महिन्यात माझे ७४ किलो वजन, आज ६२ किलो इतके उतरले आहे. याचा परिणाम शरीरावर होणारच होता, फक्त मी अनभिज्ञ होतो, इतकेच. आता हा सगळं खेळ माझ्या आकलनात आला आहे आणि आता यातून सुटका सहजासहजी होणार नाही, हे समजले आहे. एक तर डायलिसिस हा उपचार नसून,बिघडलेल्या किडनी फंक्शन्स सुरळीत केली जातात. किडनी बिघडली म्हणजे एकाच उपाय हाती असतो, शरीरात नवीन किडनी बसवणे. अर्थात खर्चाचा भाग बाजूला ठेवला तरी शरीरात नवीन किडनी बसवणे आणि आपल्या शरीराने मेनी करणे, ही प्रक्रिया अतोनात किचकट आहे आणि यश मिळेलच याचीखात्री कुणीही देत नाही, कारण आपल्या शरीरातील चलनवलन अचूकपणे आजही शास्त्राला यश मिळालेले नाही. आज बॉंबे हॉस्पिटलमध्ये १३ आणि १४वा मजला फक्त डायलिसिस साठी राखून ठेवलेला आहे. थोडक्यात सकाळी ७ वाजता पहिली बॅच सुरु होते, पुढील बॅच ११ वाजताची आणि शेवटची बॅच दुपारी ३ वाजता असते आणि कुठल्याही बॅचमध्ये एखादा पलंग रिकामा आहे, असे अजिबात घडत नाही!! त्यामुळे समजा तुम्ही, तुमची वेळ चुकवली तर हॉस्पिटल घरी फोन करतात आणि का आला नाहीत, याची चौकशी करतात आणि त्या रुग्णाला दुसऱ्या वेळी सामावून घेणे फार जिकिरीचे असते, एकदा मला हा अनुभव आला होता. खरंतर इथे येणाऱ्या प्रत्येक रुग्णाला एक बाब ठामपणे माहीत असते आणि ती म्हणजे हळूहळू आपण मृत्यूच्या दरवाजात जात आहोत!! हे लिहू/बोलू नये पण हे परखड वास्तव आहे. मला इथे २,३ रुग्ण भेटले होते आणि त्यांनी माझ्याशी बोलून दाखवले होते. इथे सगळे मनातल्या मनात झुरत असतात. अगदी मी देखील, जरी मी वरकरणी दाखवत नसलो तरी. जसे वय वाढत जाते, तशी डायलिसिसची उपयुक्तता कमी होते आणि अटळ परिणामांना सामोरे जावेच लागते. दुसरा तरुणोपाय नसतो. इथे काही रुग्णांच्या समवेत त्यांचे नातेवाईक येतात आणि त्यांचे चेहरे निरखणे, हा आणखी भोग असतो. वरकरणी सगळे हसत असतात आणि चेंडूला पाण्यात दाबून ठेवण्यासारखा असफल खेळ असतो. कुणीही काहीही बोलत नसते कारण प्रत्येकाला याचा शेवटकाय आहे, याची पूर्ण कल्पना असते. इथेच मला काही रुग्ण गेली १८ वर्षे डायलिसिस घेत असल्याचे समजले. ऐकले आणि मी थक्क झालो. त्याचे वय माझ्याच आसपास आहे म्हणजे अर्धे आयुष्य हॉस्पिटलच्या बेडवर गेले. कुठली दुर्दम्य इच्छाशक्ती, त्यांनी आजमितीस धरून ठेवली आहे? प्रश्नच आहे. दुसरा मुद्दा म्हणजे येणाऱ्या रुग्णात बव्हंशी स्त्रिया आहेत!! खरंतर आपली किडनी कशी बिघडते, हा संशोधनाचाच विषय आहे. त्यामानाने मी सुदैवी नव्हे का? आयुष्याचे जरी सगळे उपभोग भोगले नसले तरी आयुष्याकडे त्रयस्थपणे बघण्याची संधी मला मिळाली. माझे डायलिसिस मागील वर्षी सुरु झाले म्हणजे साठी होऊन गेल्यावर. तोपर्यंतचे आयुष्य मला उपभोगायला मिळाले, हा नियतीने दिलेला प्रसाद म्हणायचं का? डायलिसिस अटळ आहे, हे ठरल्यावर मी माझा दिनक्रम बदलला.त्यातून मला पहाटेची बॅच मिळाल्यावर, आपला दिवसाचा कार्यक्रम कसा आखायचा? हे ठरवून टाकले. अर्थात बाहेर पडायची सोय नाही. त्यामुळे घरातल्याघरात काय करता येईल, याचा विचार केला. मध्यंतरी वाचन फारच कमी झाले होते, विशेषतः कविता वाचन पूर्णपणे थंडावले होते. त्या पुस्तकांकडे नजर वळवली. शरीरात फारशी ताकद नाही त्यामुळे कवितासंग्रह हातात घेऊन वाचणे, सहज शक्य होते. ४ तास डायलिसिस म्हटल्यावर एक ठरवून टाकले. घरून निघताना, मोबाईल पूर्ण चार्ज करून घ्यायचा. एकदा ती उपाचार पद्धती सुरु झाली की तुम्ही पलंगाला जखडलेले असतात. जरा हालचाल करायला वाव नसतो. मग, मी मोबाईलवर गाणी लावायला सुरवात केली. सुदैवाने माझ्या फोनमध्ये, सर्व प्रकारचे संगीत आहे, अगदी पाश्चात्य कलाकार देखील!! परिणामी, सलग ४ तास संगीत ऐकायला सुरवात झाली आणि वेळ कधी संपायला लागला, हेच फारसे लक्षात येत नाही. किंबहुना, लताबाई, आशाबाई किंवा व्हिटने ह्यूस्टन तसेच सेलीन डियॉन, यांची गायकी मला अधिक चांगली समजायला लागली. आजूबाजूचे रुग्ण देखील खुश!! हॉस्पिटलमध्ये बहुदा गाणी लावणारा, मीच एकमेव रुग्ण असावा. अर्थात आवाजाची मर्यादा पाळणे गरजेचे असते. सगळेच रुग्ण काही तुमच्या प्रकृतीसारखे नसतात. अर्थात सगळेच काही व्यवस्थित झाले नाही. मध्यंतरी डायलिसिस चालू असताना, अचानक दोन्ही तळपायातून पेटगे यायला लागले. अनिल अत्यवस्थ!! कला तर अशा जोरदार यायच्या की डोळ्यांतून पाणी यायचे. साठी पार केली म्हणजे काही फार मोठे दिवे लावले नाहीत, हे दाखवून देणारे हे क्षण. परिचारिकेला बोलावण्याइतकी ताकद नसायची. मग उजव्या हाताच्या बोटांच्या खुणा सुरु केल्या आणि त्यांना कसेबसे सांगितले. लगेच डॉक्टरला बोलावले आणि डायलिसिस चक्क थांबवले!! संपूर्ण विभाग एयर कंडिशन्ड होता तरी अंगातील टी शर्ट घामाने ओला झाला. शेवटी नेफ्रोलॉजिस्टची भेट घेतली आणि काही दिवस इंजेक्शन घ्यायला लागले. मनावर फारच दडपण यायला लागले होते. चार लोकांच्या समोर आपले दुखणे उघडे पडणे, यासारखी शरमेची गोष्ट नाही. एकदा तर युरीनची कळ लागली, बरे पलंगावरून उठणे अशक्य!! मग तिथल्या मामाला बोलावणे पाठवले आणि त्याने प्लास्टिकचे भांडे आणले आणि कळ कमी केली. तेंव्हा पासून एक काळजी घ्यायला लागलो, पहाटे घरातून बाहेर पडण्याआधी, सकाळचे सगळे विधी व्यवस्थित पार केल्यानंतरच घर सोडायचे. डायलिसिस करताना, रुग्णांना नाश्ता मिळतो (दुपारच्या रुग्णांना जेवण मिळते) परंतु नाश्ता झाल्यावर पाणी मिळत नाही. याची सवय करून घ्यायला थोडा त्रास पडतो कारण, डायलिसिस करताना, रक्त आणि पाणी वेगळे केले जाते आणि तसे चालू असताना, शरीरात पाणी भरणे, चुकीचे!! मध्यंतरी माझ्या छातीत दुखायला लागले, इतके की रात्री झोप यायची बंद झाली. जरा पलंगावर आडवे झाली छातीत कळा सुरु, पहाटे कधीतरी ग्लानी यायची आणि आपसूक डोळे मिटायचे. याचा, ज्या दिवशी डायलिसिस असेल तेंव्हा फारच त्रास व्हायला लागले. शेवटी डॉक्टर गाठला. सगळ्या प्रकारच्या चाचण्या केल्या आणि छातीत २ ब्लॉक आहेत, हे निदान झाले. अँजिओप्लास्टी हाच उपाय असल्याचे निदान झाले. अर्थात पुण्याहून आदित्यआणि नेहा, तडक घरी आले. वास्तविक अँजिओप्लास्टी फार वेदनादायक नसते (या शरीराने आतापर्यंत इतक्या वेदना सहन केल्या आहेत की आता साधे इंजेक्शन घ्यायचे तर काहीच वाटत नाही) पण २ दिवस "आयसीयू" मध्ये राहावे लागते. आता आयसीयू म्हणजे बाहेरच्या जगाशी संपर्क शून्य!! तरीही ते सगळे पचवले. वास्तविक मला उपचार सुरु करून फक्त ९(च) महिने झालेत, अजून बराच पल्ला गाठायचा आहे, इच्छा आज नेहमीप्रमाणे बॉंबे हॉस्पिटलमध्ये पहाटे ५.३० वाजता डायलिसिस करायला गेलो. गेले काही महिने मी पहाटेच जातो.त्यात मोठा फायदा, दोन्ही वेळेस घरचे जेवण मिळायला लागले. दुसरा फायदा, सगळं दिवस तुम्ही सजगपणे घालवू शकता. तिसरा महत्वाचा फायदा म्हणजे, डायलिसिसची सायकल (४ तासाची सायकल असते) संपली की तुम्हाला मशीनपासून वेगे केले जाते आणि हाताच्या शिरांवर घुसलेल्या (अर्थ शब्दाश: घ्यावा) सुया बाहेर काढून तिथे गॉज कॉटनचे बँडेज बांधले जाते. हे बँडेज अंगावर कमीतकमी ४ तास बाळगावे लागते. पूर्वी सुरवातीला मी दुपारच्या ३ वाजताच्या बॅचमध्ये जात होतो. आता दुपारी ३ वाजता सुरु होणार म्हणजे संपायला संध्याकाळचे ७ व्हायचे. त्यापुढे हातावर भलेमोठे बँडेज बाळगायचे!! परिणामी रात्रीची झोप कमी झाली आणि मानसिक त्रास व्हायचा तो वेगळाच. आता मी या सगळ्या उपचारांना सरावलो आहे. मला सुरवातीचे दिवस आठवले कारण आज माझ्या हातात रक्ताची मोठी गुठळी झाली. डायलिसिस चालू असताना, असे काही होणे, भयंकर त्रासदायक असते. वास्तविक वेदना होत नाहीत पण हातातून रक्ताची धार लागली आहे, हे दृश्य काही सुखावह नव्हतेच. मी झोपलेला बेड रक्ताने भिजायला लागला आणि मी परिचारिकेला हाक मारली आणि रक्त गालात असल्याचे दाखवले. तिने लगोलग डॉक्टरला बोलावले आणि ४,५ मिनिटे मशीन बंद करून, तो क्लॉट काढून जागा स्वच्छ केली आणि पुनश्च डायलिसिस सुरु झाले. वास्तविक डायलिसिस उपचार घेणाऱ्या रुग्णाला अनुभवाला अधूनमधून सामोरे जावे लागत असते. फक माझी मानसिक तयारी नव्हती. आज घरी आलो आणि गेले ९ महिने डोळ्यांसमोर आले. १ मे २०२२ रोजी माझी डायलिसिस ट्रीटमेंट सुरु झाली. सुरवातीला माझा समाज असा होता, फार तर ५,६ सायकल्स संपल्या की मी पूर्ववत आयुष्य जगायला सुरु करिन पण प्रत्यक्षात, आत आयुष्यभर करायला लागणार, ही वस्तुस्थिती लवकरच ध्यानात आली. म्हटले तर हा मानसिक धक्काच होता पण मीच मला समजावले. सुरवातीला माझे शरीर तितकेसे तयार नव्हते, हे आता लक्षात आले कारण सुरवातीच्या २,३ सायकल्स पूर्ण करून घरी आलॊ आणि जेवणानंतर थाळी धुवायला खुर्चीवरून उठलो आणि माझा तोल जाऊन, मी जमिनीवर बसकण मारली. हा अनुभव मलाच अवाक करणारा होता, हे असे होईल, अशी पहिल्या अनुभवापर्यंत तरी कल्पना केली नव्हती. पुढील २ महिन्यानंतरच्या सायकलच्या वेळी तर, मी पहाटेच्या बॅचला जायला लागलो. अशाच एका प्रसंगी, जेवण झाले आणि पुन्हा खुर्चीत बसायला पाऊल टाकले आणि माझा तोल गेला!! नशिबाने घरात त्यावेळी धुणी,भांडी करणारा गडी काम करीत होता आणि त्याला मोठा आवाज ऐकायला मिळाला. त्याने, मी जमिनीवर पडल्याचे बघताच, मला आधार देऊन, पलंगावर झोपवले आणि अंगावर चादर टाकली. मी लगोलग झोपेच्या आधीन झालो. असे अनुभव फार नाही पण ४ वेळा आले पण पुढे मलाच कळले, अशा वेळेस स्वतःला कसे सावरून घ्यायचे. यात एक गोम अशी आहे, डायलिसिस पूर्ण होते तेंव्हा तुमचे कमीतकमी १.५० ते २ किलो वजन कमी होते आणि हे शरीराला झेपणे अवघड जाते. पुढे मनाची सवय करून घेतली. आज तर मी डायलिसिस करून आलो आहे आणि हा लेख लिहायला बसलो आहे!! गेल्या १० महिन्यात माझे ७४ किलो वजन, आज ६२ किलो इतके उतरले आहे. याचा परिणाम शरीरावर होणारच होता, फक्त मी अनभिज्ञ होतो, इतकेच. आता हा सगळं खेळ माझ्या आकलनात आला आहे आणि आता यातून सुटका सहजासहजी होणार नाही, हे समजले आहे. एक तर डायलिसिस हा उपचार नसून,बिघडलेल्या किडनी फंक्शन्स सुरळीत केली जातात. किडनी बिघडली म्हणजे एकाच उपाय हाती असतो, शरीरात नवीन किडनी बसवणे. अर्थात खर्चाचा भाग बाजूला ठेवला तरी शरीरात नवीन किडनी बसवणे आणि आपल्या शरीराने मेनी करणे, ही प्रक्रिया अतोनात किचकट आहे आणि यश मिळेलच याचीखात्री कुणीही देत नाही, कारण आपल्या शरीरातील चलनवलन अचूकपणे आजही शास्त्राला यश मिळालेले नाही. आज बॉंबे हॉस्पिटलमध्ये १३ आणि १४वा मजला फक्त डायलिसिस साठी राखून ठेवलेला आहे. थोडक्यात सकाळी ७ वाजता पहिली बॅच सुरु होते, पुढील बॅच ११ वाजताची आणि शेवटची बॅच दुपारी ३ वाजता असते आणि कुठल्याही बॅचमध्ये एखादा पलंग रिकामा आहे, असे अजिबात घडत नाही!! त्यामुळे समजा तुम्ही, तुमची वेळ चुकवली तर हॉस्पिटल घरी फोन करतात आणि का आला नाहीत, याची चौकशी करतात आणि त्या रुग्णाला दुसऱ्या वेळी सामावून घेणे फार जिकिरीचे असते, एकदा मला हा अनुभव आला होता. खरंतर इथे येणाऱ्या प्रत्येक रुग्णाला एक बाब ठामपणे माहीत असते आणि ती म्हणजे हळूहळू आपण मृत्यूच्या दरवाजात जात आहोत!! हे लिहू/बोलू नये पण हे परखड वास्तव आहे. मला इथे २,३ रुग्ण भेटले होते आणि त्यांनी माझ्याशी बोलून दाखवले होते. इथे सगळे मनातल्या मनात झुरत असतात. अगदी मी देखील, जरी मी वरकरणी दाखवत नसलो तरी. जसे वय वाढत जाते, तशी डायलिसिसची उपयुक्तता कमी होते आणि अटळ परिणामांना सामोरे जावेच लागते. दुसरा तरुणोपाय नसतो. इथे काही रुग्णांच्या समवेत त्यांचे नातेवाईक येतात आणि त्यांचे चेहरे निरखणे, हा आणखी भोग असतो. वरकरणी सगळे हसत असतात आणि चेंडूला पाण्यात दाबून ठेवण्यासारखा असफल खेळ असतो. कुणीही काहीही बोलत नसते कारण प्रत्येकाला याचा शेवटकाय आहे, याची पूर्ण कल्पना असते. इथेच मला काही रुग्ण गेली १८ वर्षे डायलिसिस घेत असल्याचे समजले. ऐकले आणि मी थक्क झालो. त्याचे वय माझ्याच आसपास आहे म्हणजे अर्धे आयुष्य हॉस्पिटलच्या बेडवर गेले. कुठली दुर्दम्य इच्छाशक्ती, त्यांनी आजमितीस धरून ठेवली आहे? प्रश्नच आहे. दुसरा मुद्दा म्हणजे येणाऱ्या रुग्णात बव्हंशी स्त्रिया आहेत!! खरंतर आपली किडनी कशी बिघडते, हा संशोधनाचाच विषय आहे. त्यामानाने मी सुदैवी नव्हे का? आयुष्याचे जरी सगळे उपभोग भोगले नसले तरी आयुष्याकडे त्रयस्थपणे बघण्याची संधी मला मिळाली. माझे डायलिसिस मागील वर्षी सुरु झाले म्हणजे साठी होऊन गेल्यावर. तोपर्यंतचे आयुष्य मला उपभोगायला मिळाले, हा नियतीने दिलेला प्रसाद म्हणायचं का? डायलिसिस अटळ आहे, हे ठरल्यावर मी माझा दिनक्रम बदलला.त्यातून मला पहाटेची बॅच मिळाल्यावर, आपला दिवसाचा कार्यक्रम कसा आखायचा? हे ठरवून टाकले. अर्थात बाहेर पडायची सोय नाही. त्यामुळे घरातल्याघरात काय करता येईल, याचा विचार केला. मध्यंतरी वाचन फारच कमी झाले होते, विशेषतः कविता वाचन पूर्णपणे थंडावले होते. त्या पुस्तकांकडे नजर वळवली. शरीरात फारशी ताकद नाही त्यामुळे कवितासंग्रह हातात घेऊन वाचणे, सहज शक्य होते. ४ तास डायलिसिस म्हटल्यावर एक ठरवून टाकले. घरून निघताना, मोबाईल पूर्ण चार्ज करून घ्यायचा. एकदा ती उपाचार पद्धती सुरु झाली की तुम्ही पलंगाला जखडलेले असतात. जरा हालचाल करायला वाव नसतो. मग, मी मोबाईलवर गाणी लावायला सुरवात केली. सुदैवाने माझ्या फोनमध्ये, सर्व प्रकारचे संगीत आहे, अगदी पाश्चात्य कलाकार देखील!! परिणामी, सलग ४ तास संगीत ऐकायला सुरवात झाली आणि वेळ कधी संपायला लागला, हेच फारसे लक्षात येत नाही. किंबहुना, लताबाई, आशाबाई किंवा व्हिटने ह्यूस्टन तसेच सेलीन डियॉन, यांची गायकी मला अधिक चांगली समजायला लागली. आजूबाजूचे रुग्ण देखील खुश!! हॉस्पिटलमध्ये बहुदा गाणी लावणारा, मीच एकमेव रुग्ण असावा. अर्थात आवाजाची मर्यादा पाळणे गरजेचे असते. सगळेच रुग्ण काही तुमच्या प्रकृतीसारखे नसतात. अर्थात सगळेच काही व्यवस्थित झाले नाही. मध्यंतरी डायलिसिस चालू असताना, अचानक दोन्ही तळपायातून पेटगे यायला लागले. अनिल अत्यवस्थ!! कला तर अशा जोरदार यायच्या की डोळ्यांतून पाणी यायचे. साठी पार केली म्हणजे काही फार मोठे दिवे लावले नाहीत, हे दाखवून देणारे हे क्षण. परिचारिकेला बोलावण्याइतकी ताकद नसायची. मग उजव्या हाताच्या बोटांच्या खुणा सुरु केल्या आणि त्यांना कसेबसे सांगितले. लगेच डॉक्टरला बोलावले आणि डायलिसिस चक्क थांबवले!! संपूर्ण विभाग एयर कंडिशन्ड होता तरी अंगातील टी शर्ट घामाने ओला झाला. शेवटी नेफ्रोलॉजिस्टची भेट घेतली आणि काही दिवस इंजेक्शन घ्यायला लागले. मनावर फारच दडपण यायला लागले होते. चार लोकांच्या समोर आपले दुखणे उघडे पडणे, यासारखी शरमेची गोष्ट नाही. एकदा तर युरीनची कळ लागली, बरे पलंगावरून उठणे अशक्य!! मग तिथल्या मामाला बोलावणे पाठवले आणि त्याने प्लास्टिकचे भांडे आणले आणि कळ कमी केली. तेंव्हा पासून एक काळजी घ्यायला लागलो, पहाटे घरातून बाहेर पडण्याआधी, सकाळचे सगळे विधी व्यवस्थित पार केल्यानंतरच घर सोडायचे. डायलिसिस करताना, रुग्णांना नाश्ता मिळतो (दुपारच्या रुग्णांना जेवण मिळते) परंतु नाश्ता झाल्यावर पाणी मिळत नाही. याची सवय करून घ्यायला थोडा त्रास पडतो कारण, डायलिसिस करताना, रक्त आणि पाणी वेगळे केले जाते आणि तसे चालू असताना, शरीरात पाणी भरणे, चुकीचे!! मध्यंतरी माझ्या छातीत दुखायला लागले, इतके की रात्री झोप यायची बंद झाली. जरा पलंगावर आडवे झाली छातीत कळा सुरु, पहाटे कधीतरी ग्लानी यायची आणि आपसूक डोळे मिटायचे. याचा, ज्या दिवशी डायलिसिस असेल तेंव्हा फारच त्रास व्हायला लागले. शेवटी डॉक्टर गाठला. सगळ्या प्रकारच्या चाचण्या केल्या आणि छातीत २ ब्लॉक आहेत, हे निदान झाले. अँजिओप्लास्टी हाच उपाय असल्याचे निदान झाले. अर्थात पुण्याहून आदित्यआणि नेहा, तडक घरी आले. वास्तविक अँजिओप्लास्टी फार वेदनादायक नसते (या शरीराने आतापर्यंत इतक्या वेदना सहन केल्या आहेत की आता साधे इंजेक्शन घ्यायचे तर काहीच वाटत नाही) पण २ दिवस "आयसीयू" मध्ये राहावे लागते. आता आयसीयू म्हणजे बाहेरच्या जगाशी संपर्क शून्य!! तरीही ते सगळे पचवले. वास्तविक मला उपचार सुरु करून फक्त ९(च) महिने झालेत, अजून बराच पल्ला गाठायचा आहे, इच्छा एकच आणखी काही बरेवाईट होऊ नये.

Friday, 13 January 2023

पाहिले न पाहिले

जे मत्त फुलांच्या कोषातून पाझरले, निळ्या लाघवी दंवात उलगडले, जे मोरपिसांवर सावरले, ते-त्याहूनही-आज कुठेसे पुन्हा एकदा तशाच एका लजवंतीच्या डोळ्यांमध्ये-डोळ्यांपाशी - झनन-झांजरे मी पहिले..... पाहिले न पाहिले..... ते प्राजक्ताच्या पाकळीवर उतरले, मदिरेवरच्या निळ्या गुलाबी फेसावर महिरपले, जे जललहरीवर थरथरले, ते-त्याहून-आज कुठेसे पुन्हा एकदा तशाच एका लजवंतीच्या ओठांवरती-ओठांपाशी- ठिबक-ठाकडे मी पाहिले पाहिले न पाहिले. जे कलहंसाच्या पंखांवर भुरभुरले सोनेरी निळसर मळ्या-मळ्यांतून शहारले, जे पुनवेच्या चांदण्यात भिजले,भिजले. ते-त्याहूनही-आज कुठेसे पुन्हा एकदा तशाच एका लजवंतीच्या मानेखाली-किंचितवक्षी- बहर-बावरे-मी पाहिले.... पाहिले न पाहिले सर्वसाधारणपणे पु.शि. रेग्यांची कविता म्हटल्यावर मनात काही ठोकताळे तयार होतात. जरी प्रणयी कविता लिहिणारे, असा जरी समज असला तरी त्यातील विविध छटा, नेहमी थक्क करणाऱ्या असतात. स्त्री ही त्यांच्या बहुतांश कवितेचे मध्यवर्ती कल्पना असते आणि त्या कल्पनेभोवती, वेगवेगळ्या प्रतिमा खेळवत, कवितेला फुलवत मांडणी करायची, अशी त्यांची पद्धत. चराचरांच्या,निसर्गाच्या रस-गंध-रंग-नाद-स्पर्शमयी रूपांतून रसरणारे स्त्रीचे दर्शन त्यांच्या कवीमनाला भुलवत असतेच परंतु रेग्यांना या सृजनशक्तीच्या मार्दवाचा आणि सौष्ठवाचा, गूढतेचा आणि ऐश्वर्याचा खरा अनुभव मिळतो तो स्त्रीच्या मृदू,मादक शरीरलावण्यात आणि मुग्ध भावविभोर छटांमध्ये. स्त्रीच्या सौंदर्यातील संवेदनशीलतेला तेच नेहमी बहुदा बोलावत असावेत. ही सृजनशक्ती, ही जीवनोत्सुकता म्हणजेच स्त्रीचे खरे रूप. ही जाणीव त्यांच्या कवितेतून सातत्याने अनुभवायला मिळते. या अनुभवण्याच्या प्रक्रियेतून मग शांत,संतृप्त,पूर्ण, आनंदमयी अशा छटा त्यांना दिसतात. मग ती स्त्री कुठल्याही स्वरूपातील असो, तिचे सौंदर्य, हा कवी पूर्णतेने उपभोगतो की काय? असा गोड प्रश्न पडतो. मात्र स्त्री सौंदर्य उपभोगताना, त्यातील रसरशीतपणा, त्यांच्या प्रतिमांमधून अतिशय रेखीवपणे उमटतो.खरे म्हणजे सगळी कविता हाच एक अद्वितीय अनुबभव असतो, त्यात असोशी असते, शृंगार असतो, शारीरलावण्य असते. वास्तविक मराठी मनाला आजही स्त्रीच्या सौंदर्याच्या ठराविक, सांकेतिक प्रतिमांची ओढ आहे परंतु त्या पलीकडील सौंदर्य बघायला मराठी मन बुजते. जिथे मन असे बुजते, तिथे रेग्यांची कविता पुढे येते. रेगे आपल्या कवितेत बऱ्याचवेळा शब्दांची मोडतोड करतात किंवा संपूर्णपणे नव्याने घडवतात. प्रसंगी निरर्थक शब्दांतून अतिशय रेखीव असा आशय व्यक्त करतात. प्रस्तुत कवितेतील "झनन-झांजरे" किंवा " ठिबक-ठाकडे" या शब्दांना तसा रूढार्थाने काही अर्थ नाही परंतु या शब्दांची जोड रेग्यांनी अशा प्रकारे केली आहे की त्या निरर्थक वाटणाऱ्या शब्दांतून अनेक अर्थाच्या छटा दर्शविल्या जातात. ही रेग्यांची खासियत. वास्तविक पहाता, ही कविता फक्त ३ कडव्यांची आहे पण प्रत्येक कडव्यातून त्यांनी स्त्री सौंदर्याचे निरनिराळे रूप व्यक्त केले आहे आणि तसे करताना, त्यांनी शारीर सौंदर्याकचा उपयोग केला आहे. कवितेची धाटणी थोडी संस्कृत साहित्याच्या वळणाची वाटते तरीही ती वेगळी आहे. रेगे स्त्री सौंदर्य उपभोगताना, त्यातील अंत:प्रेरणांकडे आपले लक्ष वेधून घेतात. कुठल्याही कवितेत शब्दांची अपरिहार्यता जितकी जमते, तितकी ती कविता अधिक व्यापक होते. आता इथे सुरवातीलाच "जे मत्त फुलांच्या कोषातून पाझरले," या ओळीत "मत्त शब्द आहे, तो "उन्मत्त" लिहून जमला नसता. इथे हाच शब्द अत्यावश्यक. "जे कलहंसाच्या पंखांवर भुरभुरले" इथे "कलहंस" हाच पक्षी हवा आणि हाच शब्द शोभतो. कवितेची धाटणी लक्षात घेता, या शब्दाने जी पूर्णता येते ती कुठल्याच शब्दाने अशक्य वाटते. "भुरभुरले" या क्रियापदाने त्या ओळीला एक भरीवपणा आला आहे. वास्तविक असे शब्द एकेकट्याने अर्थशून्य वाटू शकतात परंतु कवीची खासियत अशी की त्याच शब्दांची घडण नव्याने करताना, त्यांना पूर्ण अर्थ प्राप्त व्हावा. "जे मत्त फुलांच्या कोषातून पाझरले, निळ्या लाघवी दंवात उलगडले, जे मोरपिसांवर सावरले," पहिल्याच ओळींतून कवितेचे "घराणे" आणि "संस्कृती" स्पष्ट होते. स्त्री सौंदर्याची अशी घडण मराठी कवितेत फार तुरळकपणे वाचायला मिळते. "डोळ्यांमध्ये-डोळ्यांपाशी -" इथे डोळे शब्द साधा आहे परंतु त्या शब्दांच्या मागे-पुढे जे वर्णन आहे, त्यामुळे या शब्दांना वेगळीच झिलई प्राप्त होते. "झनन-झांजरे" या मुळातल्या शब्दांना एक "नाद" मिळतो आणि सगळीच कविता नादमय होते. "लजवंती" हे रेग्यांनी घडवलेले विशेष नाम आहे. इथेच कविता इतरांपेक्षा वेगळी होते. पुढे मग "प्राजक्त" अवतरतो पण तो पाकळीवर अवतरतो, पूर्ण फुल इथे अभिप्रेत नाही. पाकळीमध्ये जो नाजूकपणा आहे तो पूर्ण फुलामध्ये येईलच असे नाही. रेगे अशाच प्रतिमांनी कविता फुलवतात. रेग्यांच्या कवितेत व्यक्त होणारा स्त्रीचा आदिबंध हा सांस्कृतिक भावविश्वातील आदिशक्तीशी नवे नाते जोडतो. त्यांचा प्रतिमाव्यापार हा नाविन्यपूर्ण तर आहेच पण जरीही सांकेतिक नाही. तिथे पारमार्थिक काहीही नसून जे आहे ते "मानवी" आहे, "मानसिक" आहे. एक प्रकारच्या ताज्या, रसरशीत जीवनाचा आणि सोनेरीशुभ्र पार्थिव सौंदर्याचा रसिकतेने आणि मनमोकळेपणाने घेतलेला अनुभव आणि आस्वाद, असे खरे स्वरूप आहे. अनुभव घेताना रतिक्रियेच्या पलीकडील अनुभव शब्दातीत करणे, हे त्यांच्या कवितेचे मुख्य अंग मानता येईल. त्याच अनुषंगाने मग विचार करायचा झाल्यास, "जे कलहंसाच्या पंखांवर भुरभुरले सोनेरी निळसर मळ्या-मळ्यांतून शहारले, जे पुनवेच्या चांदण्यात भिजले,भिजले." "मळ्या-मळ्यांतून शहारले" या शब्दांच्यापुढे वेगळी अभिव्यक्तीच संभवत नाही.सोनेरी निळसर मळे आणि त्याच्याआधी येणारे कलहंसाचे भुरभुरणे, हे सगळेच अतिशय काव्यात्म आहे आणि मुख्य म्हणजे या कवितेच्या संदर्भात अपरिहार्य आहे आणि हे तसे वाटणे,इथे भावकविता सिद्ध होते. मी वरती जो "मानसिक" शब्द वापरला तो याचा ओळींच्या संदर्भात. खरं म्हणजे कविता हाच एक सर्वांगसुंदर अनुभव असतो. हा अनुभव शब्दस्वरूप परंतु कल्पकतापूर्ण असतो. कवितेत कवीची संवेदनशीलता अभिप्रेत विषयाचा अनुभव नेहमीच कल्पकतेने घेत असतो. इथे हाच अनुभव आपल्याला अशाच प्रकारे घेता येतो. इथे प्रत्येक शब्दाला महत्व आहे आणि प्रत्येक ओळीतून अप्रतिम अशी अनुभूती वाचकाला मिळते. This is par excellence of romantic ritual.

Wednesday, 11 January 2023

मीच बुडविलें

ऐकून घेणारा...... तूं, समजून घेणारा.....तूं, तुझ्याचपाशी म्हणून वागलें, म्हणून बोललें....उगाच काहीं खुळेभाबडें, भानमोकळे.... अर्थशून्यही. मुरडून थोडे नाक बुद्धीचे, हासून थोडे उपहासाचे, म्हणालास तू.... "सांगशील का मोजून मजला या उथळपणाची खोली?" गळ्यांत आला एक अवंढा __डोहच काळा उथळपणाचा__ भिडले काळें पाणी येऊन काजळावरी.... आणि तुला मी, मीच बुडविलें त्या डोहामधीं उंच तुझ्या त्या हिमशिखरांसह. "मृगजळ" या कवितासंग्रहातील ही छोटेखानी परंतु आशयगर्भ कविता, परंतु कवियत्री इंदिरा संत यांच्या शैलीची चुणूक दाखवणारी कविता. या कवितेत इंदिरा संतांच्या कवितेची सगळी वैशिष्ट्ये वाचायला मिळतात. ही कविता "भावकविता" म्हणून निश्चितच गणली जाते. आता त्या दृष्टीने विचार करता, कुठलीही कविता ही नेहमीच्या शब्दांतून आपल्याला वेगा आशय प्रतीत करून देणारी असावी. आपल्या नेहमीच्या जाणिवांना पाहिलं खोलवर दिशा दर्शवणारी असावी. बाकी गोष्टी या नंतर अवतरतात आणि त्या सगळ्या शब्दनिष्ठ असतात. आपण जगताना असंख्य अनुभव पदरात घेत असतो पण त्या अनुभवांना नेमक्या शब्दांची जोड मिळतेच असे नसते पण काही अनुभव हे कायम स्मृतीत टिकून राहतात आणि मग अवचितपणे त्या अनुभवांना शब्दरूप मिळते. अर्थात, भूतकाळातील अनुभवांना जेंव्हा वर्तमानात शब्दरूप देण्याची वेळ येते तेंव्हा त्यावेळच्या जाणिवा आणि आजच्या जाणिवा यात अंतर पडू शकते आणि आशयाची व्याप्ती बदलू शकते. अर्थात वर्तमानात जाणीव अधिक टोकदार आणि लखलखीत होऊ शकते आणि तो अनुभव पुन्हा नव्याने झळाळून उठतो. भूतकाळाच्या संवेदना त्याच जाणिवेने पुन्हा मांडणे, इथे इंदिरा संत यांची कविता यशस्वी होते. पूर्वीची झालेली जाणीव त्याच जाणिवेने प्रतीत करण्यात बाईंची कविता खरंच श्रेष्ठ ठरते. आता या कवितेच्या संदर्भात बोलायचे झाल्यास, कविता स्पष्टपणे आत्मगत स्वरूपाची आहे आणि हे तर बाईंच्या कवितेचे नेहमीचे गमक म्हणता येईल. इंदिरा संतांच्या बहुतेक कविता याच पातळीवर वावरत असतात. परंतु त्यात एकासाचीपणा न येत, जाणिवांच्या निरनिराळ्या दिशा आपल्याला बघायला मिळतात. वास्तविक कविता हा शाब्दिक खेळच असतो परंतु त्या खेळाची व्याप्ती, तुम्ही मगदुराप्रमाणे वाढवू शकता. निरनिराळ्या प्रतिमांना वेगवेगळ्या प्रकारे खेळवत, आशय अधिकाधिक विस्तारित न्यायचा, ही त्यांनी मांडलेल्या खेळाची दुसरी बाजू, सुरवातीलाच " ऐकून घेणारा...... तूं" या ओळीतून एक अवघडलेपण दिसते आणि ते कायम संपूर्ण कवितेचे व्यवच्छेदक लक्षण म्हणून आपल्याला वाचायला मिळते. हेच अवघडलेपण पुढे "तुझ्याचपाशी म्हणून वागलें, म्हणून बोललें....उगाच काहीं खुळेभाबडें," या ओळींतून स्पष्ट दिसते. "बोललें...." नंतर जे चार ठिपके आहेत, ते काही चूष म्हणून मांडलेले नसून, पुढील "उगाच" या शब्दाचा अर्थ वाढवणारे आहेत. बोलायचे तर आहे पण कसे बोलायचे, हे अवघडलेपण मनात असल्याने, काहीशा तुटक, चाचरत भावनेतून उमटलेल्या संवेदना आहेत. म्हणूनच "खुळेभाबडे" सारखा शब्द वाचायला मिळतो. याच शब्दाने त्या ओळीचा शेवट होणे, हे अपरिहार्य असते. तिथे दुसरी अभिव्यक्ती असूच शकत नाही. नात्यातील ताणेबाणे हे असे दर्शवले आहेत. अत्यंत मोजक्या शब्दात भावना दुसऱ्याला पोहोचवायची ही इंदिराबाईंची खासियत फार वेगळी ठरते.एकमेकांच्या जवळ आहोत पण तरीही मनातले बोलायची धिटाई होत नाही. "भानमोकळे.... अर्थशून्यही." असे शब्द मोडून, दीर्घ लांबवून तीच भावना अधिक खोलपणे व्यक्त होते मन मोकळे करताना, काहीसा inferiority complex येऊन, मग " अर्थशून्य" असे वाटून, काहीशी अपराधी भावना मनात आली का? असा प्रश्न उभा राहतो. कारण समोरच्या व्यक्तीला आपली भावना नेमकेपणाने कळेल का? या प्रश्नातून आलेली ही भावना आहे. ठिपके मांडून ही भावना अधिक खोलपणे व्यक्त होते. इथेच मनातील चाचरणे दिसून येते. एव्हाना जे सांगायचे ते सांगून झाल्यावर, प्रतिक्रिया म्हणून समोरच्या व्यक्तीचे काहीसे उपहासात्मक बोलणे ऐकायला मिळते. पुरूषच तो, तेंव्हा आपला ताठा दाखवणारच!! आपली बुद्धी तसेच पुरुष असल्याचा वृथा अभिमान डोकावत असताना, "मुरडून थोडे नाक बुद्धीचे, हासून थोडे उपहासाचे, म्हणालास तू.... "सांगशील का मोजून मजला या उथळपणाची खोली?" या ओळींतून तेच तिच्या ध्यानात येते. आपल्याला हा पुरुष समजून घेईल का? आणि कानावर लगोलग "सांगशील का मोजून मजला,या उथळपणाची खोली?" असली पृच्छा येते. मनात जी अनामिक भीती दडलेली आहे, त्याचेच प्रत्यक्ष स्वरूप उभे राहते आणि एकदम मन बावचळते. कविता वाचता,वाचता एकदम वेगळे प्रतीत व्हावे असा हा अनुभव आहे. येणार अनुभव एकदम समोर उभा ठाकला की जी मनाची ओढगस्त अवस्था होते, तेच इथे वाचायला मिळते आणि संवेदन विश्व वेगळेच निर्माण होते. वास्तविक बाईंच्या कवितेत नेहमी निसर्ग असतो पण इथपर्यंत तरी त्याचा मागमूस दिसत नाही. "गळ्यांत आला एक अवंढा __डोहच काळा उथळपणाचा__ भिडले काळें पाणी येऊन काजळावरी...." इथे मात्र एक सुंदर प्रतिमा येते. "__डोहच काळा उथळपणाचा__" . नको असलेले समोर आल्यावर,आहे ते तसेच्या तसे स्वीकारण्याची तयारी नसते आणि स्वभावगत भावना डोळ्यांतून उमटते. इथे पहिल्याप्रमाणे ठिपके नसून डोहाच्या खोलीची व्याप्ती दर्शवली आहे. निसर्गप्रतिमा इथे ठसठशीतपणे पुढे येते.आता "डोह" म्हटल्यावर त्यातील "काळे पाणी" ही सहज प्रतिक्रिया होणे, स्वाभाविक होते. खरंतर सगळीच कविता ही एका स्वाभाविक मनोवस्थेची अलौकिक जाण आहे. काळे पाणी काजळावर येणे, ही या भाववृत्तीची अखेर म्हणता येईल. आता पर्यंत जे अनुभवविश्व साकारले आहे, त्याची ही अटळ अशी अखेर म्हणायची का? हा विदग्ध अनुभव खरंतर बहुतेकांच्या आयुष्यात अनेकवेळा, अनेक प्रकारे येत असतो परंतु त्याला असे शब्दरूप देणे कितीजणांना शक्य असते? काजळावर काळे पाणी साचणे, ही अभिव्यक्तीच फार मोठी आहे. संपूर्ण अनुभव वेगळ्याच स्तरावर जातो. आणि तुला मी, मीच बुडविलें त्या डोहामधीं उंच तुझ्या त्या हिमशिखरांसह. आता कवितेच्या शेवटाकडे. आलेला अनुभव तसाच्या तास पचविणे अशक्य मग हाती काय राहते? एकदा "डोह" ही प्रतिमा स्थिर केल्यावर त्या शब्दाच्या अनुरोधाने पुढील अनुभव मांडणे, अपरिहार्य ठरते, पण तो अनुभव कशाप्रकारे "रिचवला" जातो, ते बघण्यासारखे आहे. त्या व्यक्तीला, त्याच्या विचारांना स्मृतीतून नाहीसे करणे, आवश्यक वाटते तेंव्हा जो डोह आपण निर्माण केला आहे, त्या डोहातच त्या स्मृतींना गाडून टाकणे, अधिक श्रेयस्कर. अर्थात तसे करताना, पुरुषी बाणा दर्शवून गाडले आहे - "हिमशिखरांसह"! तुझा ताठा, कर्मठपणा यातून जो "थंडगार" अनुभव जाणवतो, तोच या शब्दात मांडून त्याला त्या डोहात गाडणे, हेच अखेरचे प्राक्तन असू शकते. अतिशय साधा, नेहमीच अनुभव परंतु त्याला वेगवेगळ्या प्रतिमांतून खेळवत आपल्यासमोर इंदिरा संतांनी मांडला आणि हेच त्यांच्या काव्याची खरी शैली म्हणता येईल.

Saturday, 19 November 2022

समीक्षा - एक अवघड शब्द

मुळात समीक्षा का हवी? त्याच्यामुळे नक्की कसली स्थित्यंतरे होतात आणि त्यामुळे कलेच्या आकलनाविषयी स्वच्छ प्रतिमा तयार होतात का? समीक्षा ही कशी असावी? या प्रश्नापेक्षा समीक्षा म्हणजे नक्की काय? आणि त्यामुळे नक्की काय साध्य होते? या प्रश्नांचा उहापोह करणे महत्वाचे आहे. समीक्षा नेहमीच जटील असते कारण मुळात कला आणि कलास्वरूप Normative नाही. हे मान्य करायला हवे. वेगळ्या शब्दात मांडायचे झाल्यास "सुंदर" हा शब्द घेतला तर सुंदर म्हणजे नक्की काय? हे आधी ठरवावे लागेल. आता ढोबळपणे असे म्हणता येते, जे रसिक ठरवतात, ते सुंदर!! मग प्रश्न असा येतो, "रसिक" कुणाला ठरवावे? रसिक गृहीत धरल्याशिवाय सुंदरता कशी सिद्ध करता येईल? तेंव्हा हे असे गुंतागुंतीचे चक्र आहे, हे नक्की. जो आस्वाद घेतो, तो रसिक, असे म्हणणे फार ढोबळ होते. कारण आस्वाद या शब्दाची वैशिष्ट्ये नक्की करावी लागतील. परंतु रसिक आणि कला अस्तित्वात आल्याखेरीज आस्वाद ही कृती अस्तित्वात येणार नाही. याचाच वेगळा अर्थ, रसिक आणि आस्वाद हे परस्पराश्रयी आहेत, हे मान्य करावे लागेल.अशा अवस्थेत कुठल्या अनुभवाला आस्वाद म्हणायचे? याचा विचार करता, आपण लहानपणापासून विचार करीत असतो आणि त्यातून आपण आपली स्वतःची दृष्टी विकसित करत जातो. ती दृष्टी विकसित करताना, आपल्यावर असंख्य संस्कार होत असतात, अनेक अनुभवातून आपण जात असतो. अनुभव घेताना, त्यात आपला संदर्भ असतोच असे नसून निव्वळ उपस्थिती असल्याने, अनुभवाचे साक्षीदार होत असतो. या सगळ्या घालमेलीतून, आपला पिंड तयार होत असतो. हा पिंड तयार होतानाच, आपली आवड तयार होत जाते. म्हणजे मग पिंड या शब्दाशी आस्वाद हा शब्द जोडता येतो. इथेच मी वर म्हटलेल्या "सुंदर" या शब्दाची नेमकी व्याख्या करणे अवघड जाते कारण इथे व्यक्ती अवतरते आणि पुढे व्यक्तिनुरूप त्यांचे पिंड आणि विचार येतात आणि सुंदर शब्दाची ढोबळ व्याख्या देखील अवघड होऊन बसते. तद्नुषंगाने, कला आणिआस्वाद, याबाबत ठाम विधाने करणे आणखी किचकट होऊन बसते. सौंदर्य हे काही ठराविक नीतीप्रमाणे मांडता येत नाही. कलेच्या संदर्भात तर ते फार धूसर होऊन बसते. कलेच्या संदर्भात आपण सुंदर शब्द वापरतो त्यावेळी त्याला फक्त व्यक्तिगत संदर्भ असतो. कलेच्या बाबतीत सौंदर्य हा शब्द निव्वळ एक प्रत्यय असतो आणि तो सिद्ध करणे, हेच अवघड होऊन बसते. कलेच्या शास्त्रात सुंदर हा एक पारिभाषिक शब्द आहे. कलाकृतींचा रसिकांना जो प्रत्यय येतो, त्या प्रत्ययाला लावले गेलेले हे एक विशेषण आहे. कलास्वरूप शास्त्राचा कलेकडे बघण्याचा दृष्टिकोन स्वतंत्र असतो. रसिकाचे मन हे नेहमीच निरनिराळ्या कप्प्यांनी बनलेले असते. एका कलेचा विचार करताना, दुसऱ्या कलेचा विचार त्याच मनात येणे सहजशक्य असते. हाच विचार पुढे मांडायचा झाल्यास, कलाकृतीच्या रसग्रहणात कलात्मक दृष्टिकोनाला अप्रस्तुत असणारे मुद्दे सतत जाणवत राहतात. आणि त्याचा परिणाम थोडाफार तरी प्रत्ययावर होत असतो. आता उदाहरण बघायचे झाल्यास, एखादे चित्र बघताना, त्या चित्राच्या अनुषंगाने, त्या चित्राची पार्श्वभूमी, चित्रकाराचे नाव आणि तद्नुषंगाने आठवला जाणारा इतिहास, याबद्दल मनात आदर निर्माण होतोच. रसिकाच्या मनात हे असे अवांतर ज्ञान उत्पन्न होत असते. याच बाबींवर त्याचे रसिकत्व सिद्ध होत असते. सामान्य माणूस ते रसिक, हा प्रवास असाच सुरु होत असतो. फक्त या इतर माहितीमुळे त्याची आस्वादाची कक्षा वाकलेली असू नये. अर्थात हे जे अवांतर ज्ञान असते,ते त्या विषयाच्या संदर्भातच असावे लागते अन्यथा गोंधळ नक्की. समीक्षा करणे म्हणजे हेच ज्ञान, जे कलाकृतीच्या संदर्भात मूळ आणि अवांतर ज्ञान देते, त्याची संघटित रचना करून, त्याचे शाब्दिक स्वरूप इतरांसमोर मांडणे. यात एक बाब महत्वाची आहे, समीक्षा ही समीक्षाच असावी, तिथे नीतिशास्त्र, मानसशास्त्र किंवा सौंदर्यशास्त्र अशी वर्गवारी असू नये. कारण ही वर्गवारी म्हणजे समीक्षेला आधारभूत असणाऱ्या ज्ञानाची वर्गवारी आहे. आपल्याकडे बरेचवेळा हाच घोळ घातला जातो.

Wednesday, 16 November 2022

कारागिरी आणि कला

शिर्षकावरून विषयाबद्दल कल्पना यावी. आपल्याकडे आजही या दोन्ही शब्दांबद्दल घोळ घातला जातो आणि याचे कारण या दोहोंतील सर्जनशीलतेबद्दल असलेली संदिग्धता. मुळात दोन्ही कृतीत "निर्मिती" हा घटक प्रामुख्याने अस्तित्वात असतो, हे मान्य व्हावे. काहीतरी तयार होणे आणि त्याला कलात्मक रूप मिळणे, या प्रक्रियेत कुठेतरी निर्मितीची बीजे अंकुरलेली असतात. अर्थात या प्रक्रियेची प्रक्रिया कशी तयार होते, याचा शोध हा जवळपास अशक्य असतो कारण अबोध मनाच्या तळाशी कुठेतरी याची प्रक्रिया चाललेली असते. त्यामुळेच बहुदा आपण मनाशी काय ठरवत असतो आणि प्रत्यक्षात काय बघायला मिळते, यात नेहमीच तफावत निर्माण होते. जरी आपणच निर्मिती करत असलो तरी हाती येणारे फळ हे नेहमीच अतर्क्य जरी नसले तरी पूर्णतः समाधान देणारे नसते आणि ही वस्तुस्थिती आहे. या हताशतेचा शोध नेहमीच अपूर्ण असतो. यामुळेच निर्मितीचे गणित मांडता येत नाही. वास्तविक पहाता प्लेटोने Maths आणि Music, यांना फार वरचे स्थान दिले आहे परंतु एका विविक्षित मर्यादेपुढे यातील साम्यस्थळं शोधण्याची प्रक्रिया अत्यंत धूसर होत जाते. मुळात निर्मिती म्हटली की त्यात कुठेतरी बरा,वाईट प्रतिभेचा अंश सापडतो. त्याशिवाय निर्मिती अशक्य. इथेच खरा गोंधळ होऊ शकतो कारण प्रतिभा म्हणजे नक्की काय? गणिताप्रमाणे त्याचे ठराविक उत्तर मिळत नाही. जिथे प्रमेय निर्माण करता येत नाही तिथे उत्तर कुठून शोधणार!! त्यामुळे प्रतिभावंत या शब्दाला खूप मर्यादा पडतात. याचाच दूरगामी परिणाम निर्मिती आणि त्या निर्मितीचा दर्जा ठरवण्यावर होतो. निर्मिती अवतरली की लगेच तिथे आपण सगळेच तिचा मूलभूत शोध आणि त्याची प्रतवारी शोधण्याच्या मागे लागतो. यात बरेचवेळा एक गोंधळ होतो, निर्मितीचा आस्वाद मागे पडतो. हाताशी आलेली निर्मिती काय दर्जाची आहे, हे ठरवण्याआधी त्या निर्मितीचा आनंद घ्यावा, ही प्रक्रिया बरेचवेळा मागे पडते आणि निर्मितीचा खल करण्याची प्रवृत्ती पुढे येते. काहीवेळा, निर्मितीच्या आनंदावर विरजण पडते!! परंतु जरा विचार केल्यास, निर्मितीचा आनंद घ्यायचा म्हणजे नक्की काय करायचे? एकतर जो निर्मिक असतो, त्याला बाजूला सारायचे आणि एक रसिक म्हणून आपणच ती निर्मिती अंतर्बाह्य न्याहाळायची. हे न्याहाळणे म्हणजे एक प्रकारे प्रतवारी लावण्याची प्रक्रिया करणे होय. आपण जेंव्हा निर्मितीकडे सजग दृष्टीने बघायला लागतो तेंव्हा आपल्याच नकळत आपण ती निर्मिती तपासत असतो. अशा वेळी आपण रसिक कधीही "प्रतिभा" वगैरे विचार करत नसतो तर समोर असलेली कलाकृती आपल्याला कितपत भावली आहे, कितपत आपण समजून घेतली आहे? या दृष्टीने बघत/ऐकत असतो. कलाकृतीचा मूलभूत आस्वाद घेणे म्हणजे सुरवातीला तरी आनंद घेणे, इतपतच मर्यादित असतो. प्रत्येक रसिक हा काही "बुद्धीवादी" किंवा "वैचारिक" नसतो. तितकी त्याला संवाद देखील नसते. प्राथमिक अवस्थेत आनंद घेणे, इतपतच उद्दिष्ट असते. त्यामुळेच जेंव्हा कलाकृती आवडली का? याचे उत्तर सर्वसाधारणपणे "मला आवडली" किंवा "मला नावडली" या दोन शब्दांपुरते सीमित असते. अर्थात या उत्तरावर आक्षेप घेण्याचे काही कारण नसते. अतिशय खोलात उतरून, निर्मितीची छाननी करणे, त्या रसिकांच्या रसिकत्वाच्या कक्षेच्या बाहेर असते. आता प्रश्न पुढे येतो तो, अशी "छाननी" किंवा "विश्लेषण" करणे आवश्यक असते का? त्यातून नेमके काय साध्य करायचे असते? आणि तसे ते साध्य होते का? इथे कलेचे शास्त्र समोर येते. प्रत्येक कला ही शास्त्राधिष्ठित असते. प्रत्यक्षात कितपत शास्त्र पाळले जाते? हे प्रत्येक निर्मिकाच्या वकुबावर अवलंबून असते परंतु बरेचवेळा असे आढळते, कलाकारांकडून नकळत शास्त्र पाळले जाते, हे निश्चित. आता पहिल्या प्रश्नाकडे.निर्मितीचे विश्लेषण करायला हवे का? खरंतर शास्त्र कितीजणांना अवगत झाले असते? याचा विचार केल्यास, फारच तुरळक व्यक्ती होकारार्थी देऊ शकतील. शास्त्र हे नेहमीच जटील असते आणि त्यासाठी प्रचंड प्रमाणात चिकाटी लागते. बहुतेक कलांचे शास्त्र हे संस्कृत भाषेत (भारतीय कलांच्या बाबतीत हा विचार आहे) असल्याने, त्याचे सर्वंकष आकलन अवघड होते. भारतात, काही रसिक तितकी चिकाटी दाखवतात आणि त्या संस्कृत ग्रंथांचे आपापल्या भाषेत भाषांतर करतात. आता शास्त्र हा मुद्दा पुढे आणल्यास, बहुतेक रसिक एक मुद्दा जोरात मांडतात - जर का शास्त्र अवगत नसेल तर उगाच त्या शास्त्राचा आधार घेऊन काथ्याकूट कशासाठी करायची? मुद्दा बिनतोड आहे, यात वादच नाही परंतु जर का अवगत शास्त्राचा आधार घेतला तर कलेबाबत भोंगळ दृष्टिकोन उत्पन्न होण्याची शक्यता मावळते. "माझी आवड" सारखे भोंगळ विधान पुन्हा, पुन्हा ऐकावे लागण्याची शक्यता कमी होते. शास्त्राचा आधार घेतला तर निर्मितीतील हिणकस किती आणि उत्तम किती, याचा शोध घेता येतो आणि जेंव्हा माझी आवड असे विधान केले जाते, तेंव्हा त्यातील अहंकारी भाव आणि हिणकस, हे सप्रमाण दाखवून देता येते. अर्थात त्यासाठी प्रचंड चिकाटी लागते, हे नक्की. आणि याच विधानातून पुढे "कारागिरी आणि कला" याचा नेमका शोध घेता येतो. एक बाब नक्की मांडता येते, कलेच्या क्षेत्रात कुणीही "स्वतंत्र" हा दावा करून शकत नाही कारण कुठलीही निर्मिती ही कुठल्याना कुठल्यातरी स्त्रोतावर आधारित असते. आपण त्याचा वेध घेण्यात कमी पडतो. आता स्त्रोत म्हटल्यावर मग तुलनात्मकता आली. तुलना आली म्हणजे मग विश्लेषण आले. सर्वसाधारणपणे विश्लेषण या शब्दालाच बहुतेकजण जवळ करत नाहीत. कशासाठी विश्लेषण? हाच पहिला प्रश्न असतो परंतु या शब्दातील जटीलपणा बाजूला ठेवला तर त्यातून जो बौद्धिक आनंद मिळतो, त्याला दुसरी तोड नसते. पुन्हा "बौद्धिक" शब्दाला बहुतेकजण दचकतात. आपल्याला आस्वाद हा सहज, साधा आणि सोप्या पद्धतीने हवा असतो. आपण कलेचा आनंद घेत आहोत तेंव्हा तिथे निखळ आनंद का अप्राप्य करायचा? परंतु निखळ आनंद घेणे म्हणजे भोंगळ वृत्ती दाखवणे नव्हे. निखळ आनंद हा जोतक्या सजग वृत्तीने घेता येईल तितका मिळणार आनंद अधिक सुंदर असेल. आपण त्यासाठी थोडा विचार करायला घाबरतो. प्रत्येक आस्वाद शास्त्राधिष्ठित असावा, हे विधान जरी हेकेखोर झाले तरी सजग आस्वादात आपण नकळत शास्त्राचा अवलंब करीत असतो, फक्त आपल्याला त्याची जाणीव नसते. वर मी ए विधान केले होते, त्याचाच थोडा विचार इथे करूया. वर मी म्हटले - कुठलीही निर्मिती ही कधीही स्वतंत्र अशी नसते, तिच्यावर पूर्वजांच्या विचाराचा काही प्रमाणात असर हा असतोच. बरेचवेळा असतो तो पुनरावतार! अर्थात त्या निर्मितीला देखील व्यासंगाचा, कलेचा खोलवर व्यासंग जरुरीचा असतो. इथेच मोठा प्रश्न उभा राहतो. जर का स्वतंत्र निर्मिती हा व्यदतोव्याघात मानला तर मग कारागिरी बद्दल टीका का आणि कशासाठी? कलेच्या निर्मितीवर पूर्वीच्या कलाकृतींचा प्रभाव पडणे, अनिवार्य असेल तर मग नवीन होणारी कलाकृती ही थोड्याफार प्रमाणात कारागिरी असणे क्रमप्राप्तच ठरते. मुद्दा मग किती प्रमाणात सरमिसळ केली आहे? इतकाच. कवितेबाबत तर अगदी स्पष्टपणे म्हटले जाते - झारी कविता नेहमी कवीच्या मनातच असते!! कागदावर उतरते ते बऱ्याचप्रमाणात Crafting असते!! एक नक्की या बाबतीत म्हणावेसे वाटते, विशेषतः लेखन कलेबाबत असे म्हणता येते, लेखकाच्या मनात जे असते, ते जसेच्या तसे मनाबाहेर काढणे, हे जवळपास अशक्य असते आणि म्हणूनच कुठलेही लेखन हे "परिपूर्ण" तसेच "मनाजोगते" होत नाही. हाच मुद्दा पुढे संगीत कलेबाबत मांडता येतो. अगदी रागदारी संगीत घेतले तरी पूर्वसूरींचा प्रभाव पूर्णपणे टाळणे अशक्य असते आणि जी काही "नवनिर्मिती" म्हणून सादर होते, त्यात पूर्वीचे म्हणून थोडेफार मिसळलेले असते. अर्थात संगीतकलेचा विस्तार अशाच प्रकारे होत असतो. ललित संगीतात तर काही बोलायलाच नको. "स्वतंत्र" स्वररचना असे काहीच नसते. जे काही तयार केले जाते ते मागील पिढींनी केलेले असते, त्याच्यावर नवेपणाचे "लेपन" करून लोकांच्या समोर आणले जाते. मग कला विशुद्ध स्वरूपात अवतरणे अवघड आहे का? याचे उत्तर सोपे नाही. तुम्ही कुठल्या नजरेतून कलेकडे बघता, त्याच्यावर बरेचसे अवलंबून राहते. मग प्रश्न असा, शास्त्र या शब्दाचे इतके अवडंबर माजवण्याचे काहीच कारण नाही. संपूर्ण शास्त्र समजून घेणे किचकट होते आणि मग जी कलाकृती समोर येते, त्याच्यावर विशुद्ध असे लेबल लावणे कठीण होऊन बसते. शास्त्र टाळता तर येत नाही पण अवलंब करून निश्चितार्थ स्वरूपाची विधाने करता येत नाहीत. तेंव्हा कारागिरी असणे, हे अटळ आहे, असेच म्हणावे लागते.

Wednesday, 9 November 2022

आपली आवड

आपण एखादे गाणे ऐकतो किंवा एखादा रंगभूमीवर सादर होणारा कार्यक्रम बघतो तेंव्हा आपल्या मनावर त्याचा बरावाईट परिणाम नेहमीच होत असतो. कुठलीही जाहीररीत्या सादर होणारी कलाकृती ही मानवी मनावर परिणाम ही घडवितच असते , मग तो परिणाम कशाही प्रकारचा असू शकतो. आपल्याला त्याचा प्रभाव लगोलग जाणवतो, असे नसते. काही परिणाम दीर्घ काळाने आपले अस्तित्व दाखवतात तर काही तात्काळ दाखवतात. त्यानुरूप आपण आपली आवड नक्की करीत असतो. बहुतेकवेळा आपली आवड ही साधकबाधक विचार करून ठरतेच असे नाही कारण "माझी आवड" हाच विचार आपली ठरवायला प्रभाव टाकणारा असतो. परंतु "आपली आवड" हा निकष म्हणून योग्य आहे का? यातून अहंकार प्रकट होत नाही का? बरेचवेळा इतपत विचार करण्याचे तारतम्य दाखवले जात नाही. याचे मुख्य कारण, पुन्हा "माझी आवड" इथेच गाडी येऊन थांबते. आपण आपल्यामध्ये इतके गुंतलेले असतो की त्यापलीकडील जग न्याहाळायची गरज वाटत नाही. त्यामुळे मग "दर्जा"ठरवणे, या कृतीला काहीच अर्थ उरत नाही. हाच मुद्दा पुढे आणायचा झाल्यास, जेंव्हा आपण इतरांच्या कलाकृती बघतो/ऐकतो, तेंव्हा डोळ्यावरील पट्टी काढून आस्वाद घेणे, हे घडतच नाही. आपल्याला याची साधी जाणीव देखील होत नाही. जेंव्हा एखादा कलाकार दुस-याची कलाकृती सादर करतो तेंव्हा त्याच्याकडे २ पर्याय असतात. १)मूळ कलाकृती जशी आहे, तशीच्या तशी सादर करणे किंवा २) त्या कलाकृतीत स्वत:ची भर टाकून, त्या कलाकृतीची सौंदर्यवृद्धी करणे. आता हे दोन्ही मुद्दे तौलनिकदृष्ट्या बघितले तर सादर करायला अती अवघड असतात. स्वत:ची स्वतंत्र भर टाकायची म्हणजे मूळ कलाकृतीचे संपूर्ण आकलन होणे गरजेचे असते. त्या कलाकृतीतील अचूक सौंदर्याचे भान असायला हवे आणि मुख्य म्हणजे आपण जी भर टाकत आहोत, त्याची वाजवी जाणीव असणे गरजेचे असते. मुळ कलाकृती तशीच्या तशी सादर करायची झाल्यास, पुन्हा तोच मुद्दा मांडायचा झाल्यास, मूळ कलाकृती पचवता आली पाहिजे. एकूण काय, सादर करायच्या कलेचे समग्र भान अत्यावश्यक. बहुतेक वेळा, इथेच फसगत होते. आकलन होण्याआधीच सादर करायची घाई होते आणि सगळेच विसविशीत होऊन बसते. मजेदार भाग म्हणजे सादरीकरण घिसडघाईने केले आहे, याचे भान देखील होत नसते. तरीही लोकांच्या समोर यायची प्रचंड इच्छा असते आणि बरेचवेळा आपलेच हसू करून घ्यायचे असते. कुठलेही सादरीकरण हे नेहमीच गंभीरपणे सादर करायचे असते आणि हीच जाणीव नसते.

Monday, 7 November 2022

कविता आणि समीक्षा

कविता आणि वाचक यांच्यामध्ये दुर्बोधता हाच एकमेव अडथळा असतो, हे तितकेसे नेमके विधान म्हणता येणार नाही. परंतु यामुळेच निर्माण होणारे अंतर जमेल तितके कमी करणे, समीक्षकाच्या हाती असू शकते. विशेषतः कवितेच्या वेगवेगळ्या सर्जनशीलतेच्या शक्यता निर्माण होत असताना आणि त्यायोगे वाचकाच्या अभिरुचीच्या बदलाचा वेध घेत असताना,जेंव्हा तफावत जाणवते, तिथे समीक्षक मदतीला येऊ शकतो. असे म्हणता येईल, कवितेच्या सर्जनाच्या प्रगतीत प्रतिभेला अनन्यसाधारण महत्व मिळते तर अभिरुची घडताना, वाचकाच्या दृष्टीने सामाजिक संस्कृती आपले महत्व दाखवून देत असते. अर्थात ही संस्कृती घडण्यात, कलेबाहेरील असंख्य घटक कारणीभूत असतात. बरेचवेळा हेच घटक संस्कृती घडणे किंवा संस्कृतीवर परिणाम घडवणे, या कृतीला कारणीभूत ठरतात. वेगळ्या अर्थाने ही विधाने बघायची झाल्यास, या सगळ्या घटकांचा घडणारा आणि वाढणारा परिणाम बघता, कवितेच्या सर्जनशीलतेवरील परिणाम अनिवार्य होऊ शकतो. आणखी वेगळा मूड बघायचा झाल्यास, साहित्यातील सर्जनशीलता आणि त्याचा विकास आणि जोडीने अभिरुची, यातील अंतर कमी होणे, हे शक्य आहे का? कवितेतील सर्जनता ही वाचकाच्या अभिरुचीशी ताडून बघता, नेहमीच गतिशील आणि म्हणून अतर्क्य राहणार. त्यामुळे दोन्ही बाबतीत काही अंतर जरी अनिवार्य असले तरी संवाद अशक्य होईल, अशी परिस्थिती उद्भवू नये, ही काळजी समीक्षकांनी घ्यायला पाहिजे. याचाच पुढील भाग म्हणजे कवितेतील अतर्क्यता किंवा दुर्बोधता, समीक्षकाने वाचकांना समजावून सांगण्याची जबाबदारी घ्यायला जाऊ नये. तो एकप्रकाराने आत्मघात ठरू शकतो. काव्यात्म दुर्बोधता खरी असेल तर ती कशा प्रकारची आहे, हे वाचकाला नुसती जाणवते असे नसून, ती प्रत्यक्ष कवीला देखील जाणवते. प्रतिभेच्या अनाकलनीय शक्तीने सृजन करणारा कवी आणि आसपासच्या सामाजिक संदर्भात सामील असलेला कवी, जो काहीवेळा अभिरुचीच्या सामाजिक पातळीवर उभा राहून आपल्याच कवितेकडे न्याहाळणारा कवी, हे एक नव्हेत. असे देखील बरेचवेळा घडते, तो खुद्द कवीच आपल्या कवितेकडे पुन्हा बघतो तेंव्हा अधिक भांबावलेला असतो. जाणीवलक्षी कवितावाचनाने दुर्बोध कविता कमी प्रमाणात अगम्य होऊ शकते. पण तादात्म्य पावून, जाणीवलक्षी कवितावाचन करणे, प्रत्येक कवीला शक्य असतेच असे नाही. यात आणखी एक मुद्दा महत्वाचा येतो, असामान्य प्रतिभेचा कवी देखील आपलीच कविता वाचताना, आपल्या कवितेच्या अंगाने रसिकाला नेण्याऐवजी, रसिकांचा कल बघून आपल्या कवितेला त्या अंगाने नेऊ शकतो. रसिकाला काय आवडते, ती आवड नेमकेपणाने लक्षात ठेऊन मग आपली कविता मांडणे, हेच प्रधान ध्येय ठेऊ शकतो. अर्थात यामुळे कविता आकळली नाही तरीही रसिक ती कविता उपभोगू शकतो!! अशा वेळी, कवीला नेमके काय म्हणायचे आहे/होते, याला पूर्णपणे गौणत्व प्राप्त होते. कविता बाजारू यशाला चटावली जाऊ शकते. अशावेळेस कवीने "भाष्यकार" बनणे कितपत योग्य ठरेल? काहि वेळा खुद्द कवी हाच चांगला टीकाकार होऊ शकतो पण असेलच ही शक्यता योगायोगाची ठरू शकते. कवीच्या सृजनप्रक्रियेत अंतर्भूत असलेली अटळ आणि अप्रकट आत्मटीका कितपत प्रस्तुत मानवी? हा प्रश्न देखील इथे उद्भवू शकतो. याशिवाय कवीची टीका ही पुष्कळदा एकांगी तसेच समर्थनपर होऊ शकते. कवीने स्वतःबाबत कितीही त्रयस्थ भूमिका घेतली तरी स्वतःचीच कलाकृती म्हटल्यावर त्रयस्थ वृत्ती कितपत त्रयस्थ राहू शकेल? त्यामुळे कविता लिहिणे, हीच आपली जबाबदारी असावी. कवितेतील अगम्यतेचे स्वरूप स्पष्ट करण्याची जबाबदारी, अखेरीस टीकाकार किंवा समीक्षकांची असावी. अशा कवितांमध्ये जे अनिर्वचनीय असेल ते स्पष्ट करण्याचा मोह टाळणे इष्ट.

Saturday, 22 October 2022

आधुनिकता की परंपरा - एक जोखड!!

आता दिवाळी सुरु झाली आहे आणि अर्थात बऱ्याच ठिकाणी *दिवाळी पहाट* या नावाखाली संगीताचे कार्यक्रम सुरु झाले आहेत. आपल्या मराठमोळ्या संस्कृतीत बहुदा अशा प्रकारचे कार्यक्रम होत असावेत. अर्थात असे कार्यक्रम व्हायला विरोध असायचे काहीही कारण नाही कारण या निमित्ताने संगीताची आवड समाजात दृढ होते. पूर्वी रेडियोवर दिवाळीनिमित्ताने *संगीत नाटके* सादर होत असत. आता कालानुरूप संगीताचे कार्यक्रम होत आहेत. आता गंमत अशी आहे, जरा बारकाईने बघितल्यास, जिथे *भावसंगीताचे* कार्यक्रम होत आहेत तिथे आजही *प्रभातकालीन* गाण्यांनी उजागर केला जात आहे!! आजही *लखलख चंदेरी* या आणि अशाच काळातील गाण्यांनी सुरवात होते. हा देखील एक स्तुत्य उपक्रम म्हणायला हवा कारण त्यानिमित्ताने, आपल्या संस्कृतीची आठवण नव्या पिढीला दिली जाते. थोडा विचार केल्यास, आज ही गाणी जवळपास, ५० वर्षे पूर्वीची गाणी आहेत. अर्थात एक सांस्कृतिक ठेवा म्हणून या गाण्यांकडे बघितले जाण्यात, कसलाही प्रत्यवाय असू नये. पण गंमत अशी आहे, आपले जे *मराठी मन* आहे, ते आजही *पारंपरिक* संस्कृतीशी जखडलेले आहे. ही आणि अशा काळातील गाणी सुरु झाली की अनाहूतपणे, आपण *गहिवरले* जातो!! आपसूकच मनात तुलना सुरु होते आणि *रम्य त्या आठवणी* मध्ये गुंगून जातो. आता प्रश्न असा आहे, ५० वर्षानंतर काहीच घडले नाही का? आजही *शुक्रतारा* गायले गेल्याशिवाय कार्यक्रम पूर्ण होत नाही. इतके आपण परंपरेला बांधून घेतले आहे. एकूणच आपले मराठी मन नको तितके *भावुक* असते. अर्थात यात कलाकार देखील तितकेच कारणीभूत आहेत. आपले तथाकथित कलाकार, *जुन्या गाण्यांत* इतकी भावुकता दाखवतात की ऐकणारे गहिवरले पाहिजेत!! अधिक आपले *श्रद्धाळू* मन, अधिक श्रद्धावान होते आणि कलाकार एकूणच, प्रेक्षकांकडून *टाळी* वसूल करून घेतात. एका बाजूने आपण *तथाकथित परंपरा* जतन करण्याचा *आविर्भाव* निर्माण करत असतो आणि दुसऱ्या बाजूने, *जुन्या* गाण्यांची *अक्षम्य* अशी मोडतोड करून, *भयाण* आधुनिकता निर्माण करीत असतो. आपण काय केले पाहिजे, याची मनाशी काहीही वैचारिक मांडणी न करता, *also run* मध्ये कलाकार हात धुऊन घेतात आणि आपली पोळी भाजून घेतात. खर म्हणजे, एकूणच मराठी मन हे कात्रीत सापडलेले आहे, म्हणजे एका बाजूने परंपरेबद्दल आकर्षण ठेवायचे परंतु दुसरीकडे आधुनिकता निर्माण करण्याचा प्रयत्न करायचा (आधुनिकता म्हणजे काय? याची ठळक कल्पना मनाशी बांधली जात नाही). मराठी मन जात्याच इतिहाबद्दल अत्यंत तकलादू कल्पना आणि भोळसट वृत्ती बाळगून असते. यात ना धड इतिहासाबद्दलची *वाजवी* जाणीव असते आणि त्या इतिहासाची *नाळ* तोडायचा प्रयत्न करताना, नक्की काय करायचे? याबाबत कायम संभ्रम निर्माण करीत वाटचाल करायची. नवीन काहीतरी निर्माण करायचे, असे ठरवले जाते पण परंपरेचे नक्की भान नसल्याने, मनाची कुतरओढ करून, मग *धेडगुजरी* करीत बसायचे आणि प्रेक्षकांसमोर निव्वळ *भास* निर्माण करून, टाळ्या मिळवायच्या!! यात मध्ये, आपण फक्त *चिंध्या बांधून ठिगळ लावलेली गोधडी* तयार करतो. यात ना नवनिर्मिती असते ना परंपरेचे भान असते. आपण कलाकार आहोत, याचे वृथा भान मात्र दिसून येत असते आणि इकडे रसिक म्हणून आपले संपूर्ण दुर्लक्ष होत असते. आपल्या समोर काय सादर होत आहे, याकडे *सम्यक* दृष्टीने बघितलेच जात नाही कारण आपण रसिकांच्या मनात, फक्त *स्मृती* तरळत असतात.

Saturday, 1 October 2022

सतीश आळेकर मुलाखती निमित्ताने

आत्ताच थोड्यावेळापूर्वी टीव्हीवर प्रख्यात लेखक,नाटककार सतीश आळेकरांची मुलाखत बघितली/ऐकली. अर्थात मला त्यांच्या सगळ्या मुलाखतीबाबत बोलण्याइतका अभ्यासू नक्कीच नाही कारण, प्रामुख्याने मुलाखत ही, त्यांच्या नाट्य कारकिर्दीवर आधारलेली होती परंतु बोलण्याच्या ओघात त्यांनी सध्या जे *बॉयकॉट* चळवळीबद्दल ४ शब्द व्यक्त केले, त्याबाबत माझ्या मनात काही विचार आले, इतकेच. एक नक्की, सध्या आपल्या समाजात *एकांतिक* विचारांचे नको तितके प्राबल्य वाढले आहे. देशात, *सेन्सॉर मंडळ* ही पद्धती अस्तित्वात आहे ना!! मग ती संस्था कशासाठी आहे? आपण एखादी संस्था स्थापन करतो तेंव्हा *आपल्याच* समाजातील काही वैशिष्ट्यपूर्ण व्यक्तीचा त्या संस्थेत समावेश करतो. त्यांच्याकडे *निर्णयक्षमता* असते, हे मान्य असते. दुसरे असे, आपल्याकडे एक गोष्ट अत्यंत दुर्दैवी अशी घडत आहे, समाजातील काही लोकांना असे वाटते, *आपण सर्वज्ञ आहोत आणि आपल्यालाच समाजाचे हित कळते*!! या वृत्तीनुसार ते आपल्या हातात *धारवाडी तराजू* घेतात आणि सगळ्या प्रकरणांची शहानिशा करतात. अरे, कमाल झाली!! तुम्हाला असा अधिकार कुणी दिला आहे? या लोकांचा सतत *धर्म* बुडत चालला आहे, असा घोष चालू असतो. धर्म आणि तद्नुषंगाने मराठी भाषा बुडत चालली आहे, हा घोष गेली कित्येक वर्षे/कित्येक दशके चाललेला आहे. तरीही त्यात फारसा फरक पडलेला नाही. जर का आपली भाषा मरत चालली असेल तर एकदाची, त्या भाषेची *तिरडी* बांधा आणि स्मशानभूमीत शेवटचे *अंत्यसंस्कार* करून टाका!! धर्म आणि भाषा, या गोष्टी *चिरंजीवी* असतात. त्यामागे शतकानुशतकांची परंपरा असते. कुणीतरी उठते आणि आवई उठवते, त्यामागे निव्वळ वैय्यक्तिक स्वार्थ असतो. हिंदू धर्म बुडत आहे, हे तर ज्ञानेश्वरांच्या काळात देखील चालूच होते आणि त्यामुळेच ज्ञानेश्वरांना समाजातून पूर्णपणे *बहिष्कृत* केले होते. आज या घटनेला ६०० वर्षे उलटून गेली. त्याकाळचा धर्म आज नाही हे मान्य पण परिवर्तनशीलता ही सततची चालणारी प्रक्रिया असते आणि धर्माचे स्वरूप त्यानुसार बदलत असते. परंतु हा विचार कितीतरी व्यक्तींना *अपमानास्पद* वाटतो आणि *धर्म बुडाला* सारखी निष्फळ आवई उठवली जाते. एक गंमत आठवली. हॉलिवूड मधील चित्रपट होता, चित्रपटाचे नाव आठवत नाही पण *सीझर* च्या भूमिकेत *पीटर सेलर्स* नावाचा अभिनेता होता. तो दरबारात सिंहासनावर बसलेला असताना, *खालून ढुसकी* सोडतो!! प्रत्यक्ष सीझर असे करतो पण तिथे त्या प्रसंगातील *मानवी भाग* लोकांनी लक्षात घेतला आणि विनोदाला दाद दिली. विचार करा, शिवाजी किंवा संभाजी बाबत असा प्रसंग आपल्याकडे चित्रित होईल का? समाजाची जडणघडण सतत बदलत असते, आपलेच विचार वठलेले राहतात. एकेकाळी विजय तेंडुलकरांना *घाशीराम कोतवाल* आणि *सखाराम बाईंडर* या नाटकांवरून किती अपमानास्पद व्हावे लागले. गमतीचा भाग म्हणजे, ज्या घाशीराम नाटकावरून, तथाकथित ब्राह्मणांची छीथू झाल्याचा कांगावा करण्यात आला, त्या नाटकात, *मोहन आगाशे*,*चंद्रकांत काळे* यांच्यासारखे *चित्पावन ब्राह्मण* आपल्या भूमिका रंगवत होते!! मला व्यक्तीश: ही *बॉयकॉट* चळवळ म्हणून अतिशय घातक वाटते. केवळ स्वतःचा अहंकार शमवून घेण्याची अश्लाघ्य पद्धत वाटते. तुम्हाला चित्रपट आवडणार नाही ना, मग बघायला जाऊ नका. तुम्हाला *आमंत्रण* दिले आहे का? आपण जेंव्हा तरुण होतो, तेंव्हा मराठी रंगभूमीवर तथाकथीन *हिट अँड हॉट* नाटकांची लाट आली होती. मी देखील एक नाटक बघायला, साहित्य संघ मंदिरात गेलो होतो आणि निराश होऊन बाहेर पडलो कारण हे नाटक बघण्याच्या माझ्या अपेक्षा वेगळ्या होत्या आणि त्याची *पूर्ती* त्या नाटकात झाली नव्हती!! आता विचार करा, कुठे गेली ती लाट?आता त्याप्रकारची नाटके अस्तित्वात देखील नाहीत. आजच्या काळात अशी नाटके आली असती तर किती *गदारोळ* झाला असता, याचा विचार करा. मागे एकदा, विवेकानंदांना समाजातील वेश्याबाबत प्रश्न विचारला असताना, त्यांनी निर्भीडपणे सांगितले, आपल्या समाजात वेश्या आहेत म्हणून तुमच्या आया,बहिणी रस्त्यावरून सुखरूप हिंडत आहेत!! किती नेमका आणि समर्पक विचार आहे. समाजात अनेक प्रवृत्तींची माणसे रहात असतात आणि प्रत्येकाची आवडनिवड ही नेहमीच वेगळी आणि स्वतंत्र असणार. तुम्हाला एखादी गोष्ट आवडत नाही म्हणून समूळ नष्ट करण्याचा *घाट* घालायचा, हा कुठला विचार? दुर्दैवाने आपल्या समाजावर *रामायण* कथेचा नको तितका प्रभाव आहे. गंमत म्हणजे त्यात रावणाला सीतेबद्दल *अभिलाषा* निर्माण झाली आणि पुढील *रामायण* घडले!! याचा अर्थ असा, तेंव्हा देखील समाजात *विघातक* घटना घडत होत्या. महाभारतात तर *चोरून पळवणे* वगैरे गोष्टींची बरीच रेलचेल आहे. हे आपल्यापैकी कुणीही लक्षात घेत नाही अंडी आपण इथे *रामराज्य* निर्माण करण्याची अभिलाषा ठेवतो. अशी अभिलाषा निर्माण करणे, हेच आपल्या विचारांचे खरे तोकडेपण आहे.

Tuesday, 14 June 2022

याला काय म्हणायचे?

*गाय हा निव्वळ पशु आहे* किंवा *२ दगड. एकात शिल्पकर्त्याला मूर्तीस्वरूप आढळले आणि त्याने छिन्नी चालवली. दुसरा फक्त दगडच राहिला*. हे आणि असे अनेक विचार सावरकरांचे आहेत जे त्यांच्या हयातीत आणि नंतर देखील स्वीकारले गेले नाहीत. *मृत झाल्यावर विद्युतदाहिनी मघ्ये शव जाळून टाकावे* म्हणणारे सावरकर, त्यांच्या हयातीतच नाकारले गेले आणि आजही मृत शव हे *पिंडदान*, *तेरावा विधी* आणि *वर्षश्राद्ध* अशा विधीत गर्क आहेत. याचे मुख्य कारण, शास्त्रोक्त विचार करणारे सावरकर कुणालाच पचणारे नाहीत आणि हे विचार नाकारणारे देखील स्वतःला *सावरकरभक्त* म्हणवून घेतात. अर्थात इथे फक्त *सावरकरच* नव्हेत तर *गांधी*, *आंबेडकर* आणि *नेहरू* देखील अपवाद नाहीत आणि याचे मुख्य कारण आपण आपल्याला जे सोयीचे वाटते, तितकेच स्वीकारले आणि प्रचंड *उदो उदो * केला आणि आजही तसाच केला जातो. सावरकरांनी आपल्या मुलाची *मुंज* केली नाही आणि कधीही *मुहूर्त* वगैरे विषयावर विश्वास ठेवला नाही आणि त्यांचे भक्त फक्त तेच आचरतात!! असे करण्यात आपण काही चुकीचे करत आहोत, याची जाणीव देखील कुणाला होत नाही कारण असे सगळे करण्यामागे त्यांच्या *भक्तिभाव* प्रचंड आहे. वास्तविक हे सगळे नेते आधी *माणूस* आहेत आणि त्यांच्या हातून देखील *प्रचंड चुका* झाल्या आहेत पण ते मान्य करण्यात, या भक्तांचा अहंकार दडलेला असतो. दुसरे असे, हे सगळे विचार मानण्यासाठी वेगळाच *बुद्धीवाद* आवश्यक असतो आणि तिथे *बौद्धिक प्राज्ञा* गरजेची असते. त्यासाठी वेगळा विचार करण्याची गरज असते. हे सगळे कोण करणार? त्यापेक्षा, आपल्या गरजेनुसार आपल्या आवडत्या नेत्याची *पूजा* केली की सगळे पुरेसे होते आणि मुख्य म्हणजे *मेंदूला ताण* देण्याची आवश्यकता भासत नाही.

Wednesday, 27 April 2022

साहित्यिक वास्तवता - एक मूल्य - भाग ५

साहित्यात सामाजिक प्रतिबिंब दिसते ही बाब एका निराळ्या प्रकाराने सुद्धा करण्याचा प्रयत्न होतो. कलाकृतीत कलावंताच्या अनुभवाचा आविष्कार होतो ही गोष्ट सहजपणे मान्य केली जाते. अर्थात त्याच जोडीने हे देखील मान्य केले जाते - कलाकृतीच्या मुळाशी माणसाचे व्यक्तिमत्व असते. वेगळ्या शब्दात मांडायचे झाल्यास, या व्यक्तिमत्वाची २ टोके असतात. १) सहजप्रेरणेचे आणि २) सामाजिक जाणिवेचे. सामाजिक जाणिवेचे टोक, यात त्या व्यक्तीची जी सामाजिक मूल्ये असतात किंवा वृत्ती असतात, जी वास्तवता विषयक - Concept of Reality, असते, ती अंतर्भूत असते. व्यक्तीला जी एक जीवनविषयक वस्तुनिष्ठता प्राप्त झालेली असेल, ती या टोकाला असते. दुसरे टोक सहजप्रेरणेचे!! हे टोकाच्या पहिल्या क्रियाप्रतिक्रियांना अनुसरून भावना उत्पन्न करते. परंतु दोन्ही टोकाच्या परस्परांवर क्रियाप्रतिक्रिया चाललेल्या असतात आणि यामध्ये भावनेला विशिष्ट स्वरूप देणारे पहिले सामाजिक जाणिवेचे टोक असते. म्हणूनच व्यक्तिमत्वाचा कुठलाही अनुभव हा एका टोकाला जो Concept of Reality असेल तिचाच आविष्कार ठरतो. वेगळ्या शब्दात मांडायचे झाल्यास, तो वैय्यक्तिक असूनही जेवढ्यापुरती, जितकी व्यापक, ज्या पातळीवर असते तेवढ्या जगाच्या वास्तवतेचा तो आविष्कार ठरतो. अर्थात यात काही प्रश्न अंतर्भूत होतात. व्यक्तिमत्वाची दोनच टोके आहेत असे मानायचे का? आणि ती देखील टोकेच आहेत का? हे सगळे Dialectics चा उपयोग करता यावा म्हणूनच ना!! सहजप्रेरणांचे सामाजिकीकरण झाले आहे, असे म्हटल्यावर सहजप्रेरणा आणि सामाजिक जाणीव, यांच्यात विरोध का कल्पायचा? सामाजिक जाणीव म्हणजे काय? इत्यादी प्रश्न उद्भवू शकतात. त्यादृष्टीने बोलायचे झाल्यास, मार्क्सवाद्यांचे विचार करायचे तंत्र आणि त्याच विचारातून काढायचे निष्कर्ष आधीच ठरून गेलेले असतात. आणि त्यासाठी ते कशी गळचेपी करतात, हे वरील विवेचनावरून समजून घेता येईल. असो, आपल्या दृष्टीने वरील विवेचनातून एकच मुद्दा महत्वाचा म्हणून समोर येतो. तो असा, मानवी व्यक्तिमत्वाच्या मुळाशी एक Concept of Reality असते. प्रत्येक माणसाच्या मनात मूर्त किंवा अमूर्त स्वरूपात वरील विधान नेहमीच अस्तित्वात असते. परंतु Concept of Reality याला व्यक्तिमत्वाचा पाया मानणे मानसशास्त्राला कितपत मान्य होईल? तसेच मघाशी जे विवरण केले,त्याचा वेगळा अर्थ लावायचा झाल्यास, काव्यात जे काही असते ते Concept च्या चौकटीत बसवता येते आणि त्यात एक Conceptual संगती असते. परंतु काव्यात व्यक्त होतात, त्या Concepts नसतात. काव्याचा मूलभूत घटक हा प्रतिमा (Image) असतो. आणि या प्रतिमेची संगती असते ती तार्किक नसून कलात्मक असते. तेंव्हा माणसाच्या मुळाशी एक Concept of Reality असते, हे मान्य केले तरी त्या Concept चा आणि काव्याच्या द्वारे व्यक्त होणाऱ्या अनुभवाचा काही एक संबंध असतो हे नव्याने सिद्ध करावे लागेल. परंतु अशा प्रकारचा काही निश्चित आणि अपरिहार्य संबंध असतो असे आढळून येत नाही. असे बरेच श्रेष्ठ कलावंत आहेत, की त्यांच्या कलाकृतीतून एक निश्चित अशी जीवित विषयी भूमिका शोधून काढता येत नाही. पुष्कळदा एकाच कलावंताच्या निरनिराळ्या कलाकृतीत निरनिराळ्या परस्पर वेगळ्या भूमिका दिसतात . आणि परिणामी, लेखकाची जीवित विषयक भूमिका आणि त्याच्या कलाकृतीचे वा उंची याचा मेळ बसवणे कठीण जाते. कलाकृतीतून वास्तवतेचे चित्रण होते असे जेंव्हा म्हटले जाते तेंव्हा असेही सूचित होते, वास्तवतेचे स्वरूप कळावे म्हणूनच आपण कलाकृती वाचत असतो. परंतु असे जर असेल तर भूतकाळातील कलाकृतीत आपले मन रमू नये, निदान आजच्या कलाकृतीत रमते,तितके रमू नये. त्या आजच्या कलाकृती इतक्या ताज्या अगर अर्थपूर्ण वाटू नयेत. पण तसे होत नाही. शेक्सपियरची नाटके आजही ताजी आणि अर्थपूर्ण वाटतात. ती तशी का वाटतात याचे स्पष्टीकरण वास्तवतेच्या पुरस्कर्त्यांनी करणे अत्यावश्यक ठरते.. *समाप्त*

Friday, 22 April 2022

साहित्यिक वास्तवता - एक मूल्य - भाग ४

आता आपण थोडे वेगळे मांडून बघू. अगदी भिन्न प्रकारचे अनुभव आणि भिन्न प्रकारची लेखकांची व्यक्तिमत्वे कलाकृतीतून व्यक्त होत असतात. आणि आपण त्या सगळ्या कलाकृतीचा सारख्याच अनुभूतीने रसास्वाद घेऊ शकतो. त्यामागे नेमकी काय कारणे असू शकतात? याचे उत्तर शोधणे महत्वाचे ठरू शकेल. असे म्हणतात कलावंत जरी एखाद्या विशिष्ट घटनेचे चित्रण करत असेल तरी ती घटना प्रातिनिधिक स्वरूपाची असते; जीवनात नेहमी घडणारी असते. त्यामुळे चित्रण करताना तो वास्तव जीवनाविषयी सर्वसामान्य असे काहीतरी सांगतच असतो. अर्थात काही कलावंत अपवादात्मक असे विषय निवडीत असतात. या भूमिकेबाबत २ प्रकारच्या अडचणी उद्भवू शकतात. एक अशी की, सर्वानुमते श्रेष्ठ ठरलेल्या कलाकृतीचे विषय अपवादात्मक असू शकतात. उदाहरणार्थ *किंग लियर* हे नाटक किंवा *क्राईम अँड पनिशमेन्ट* ही कादंबरी तत्कालीन जीवनाचे प्रातिनिधिक चित्रण करणारी आहे, असे विधान करणे अवघड आहे आणि तरीही या दोन्ही कलाकृती श्रेष्ठ दर्जाच्या आहेत, असे मानले जाते. अशा रीतीने सर्वसंमत असे जे काही कलाकृतीच्या संदर्भात निर्णय आहेत त्या निर्णयाशी ही भूमिका सुसंगत नाही. शिवाय तर्कदृष्ट्या प्रतिनिधित्वाची कल्पना सदोष आहे. कुठलीही गोष्ट घेतली तरी ती इतर कुठल्याही गोष्टींचे पूर्णांशाने प्रतिनिधित्व करू शकत नाही. त्याचप्रमाणे अमुक एका वर्गाच्या चौकटीतल्या काही गोष्टी तिच्या एका सीमेजवळ असतात तर काही त्या चौकटीच्या मध्यभागी असतात. त्यामुळे अमका एक कामगार इतर सर्व कामगारांचा प्रतिनिधी आहे, असे फार मर्यादित अर्थाने म्हणता येईल. त्यामुळे साहित्यात जीवनाचे प्रातिनिधिक चित्रण असावे असे म्हटले तर अनेक अडचणी उपस्थित होतील. या शिवाय आणखी एक मुद्दा समोर येतो आणि तो म्हणजे, एखाद्या कथेतील व्यक्ती ज्या प्रमाणात सचेतन असते, त्या प्रमाणात ती कथा, कलाकृती ठरते. परंतु प्रातिनिधिक ही एक कल्पना (Concept) असते आणि म्हणूनच ती अचेतन असते. त्यामुळे ज्या प्रमाणात हे प्रतिनिधित्व एखाद्या कथेतील व्यक्तीच्या अंगी असेलत्या प्रमाणात ती ठोकळेबाज ठरणार. साहित्याचे व्यापक स्वरूपात प्रसरण सुरु झाले म्हणजे असा धोका उद्भवतो.

Wednesday, 20 April 2022

साहित्यिक वास्तवता - एक मूल्य - भाग ३

आता थोडे पुढे जायचे झाल्यास, कलावंत हा वास्तव जीवनाविषयी शास्त्रीय किंवा तांत्रिक स्वरूपाचे सत्य सांगत असतो हे जर मान्य केले तर काही अडचणी उभ्या राहू शकतात. शास्त्रीय सत्य शोधून काढायची पद्धत म्हणजे शास्त्रीय चिकित्सा होय. परंतु शास्त्रीय चिकित्सा कलाकृतीत असू शकत नाही. तेंव्हा कलावंताने सांगितलेले शे ते सत्य आहे की नाही, हे वाचकाला कलाकृती वाचून कळेलच असे नाही. तसेच कलावंतालाही जे सांगितले ते निव्वळ किंवा निखळ सत्यदर्शन केले आहे की नाही हे कलाकृतीद्वारे सांगणे अवघड आहे. म्हणजेच कलाकृतीतून रसग्रहण तसेच मूल्यमापन करताना बाह्य गोष्टींना महत्वाचे स्थान द्यावे लागेल. एखाद्या कलावंताने नवीन निर्मिती केली की नाही हे ठरवण्यासाठी त्याने काही शास्त्रीय किंवा तात्विक सत्य सांगितले आहे की नाही, हे बघावे लागेल. तेंव्हा ही भूमिका मे केली की शेक्सपियरने अथवा बहुतेक इतर श्रेष्ठ कलावंतांनी काहीच नवीन निर्मिती केली नाही असा निष्कर्ष काढावा लागेल. परंतु असला निष्कर्ष काढायला कुणी धजावेल असे वाटत नाही. या शिवाय कुठल्याही रसिक वाचकाचा अनुभव असा असतो की कलाकृतीपासून आपल्याला जे काही मिळते ते तार्किक स्वरूपाच्या विधानात अंतर्भूत होऊ शकत नाही. परंतु काही कलाकृती विशेषतः कविता अशा असतात की त्यांतील आशय तार्किक स्वरूपाच्या विधानांच्या मार्गाने मांडणे अशक्यच असते. उदाहरणार्थ बालकवींच्या काही कविता अशा आहेत, मग अशा वेळी कवीने काव्यातून कुठला आशय सांगितलं आहे असे समजायचे? की त्यात आशयच नसतो असे समजायचे? कलाकृतीत केवळ जीवनविषयीचे सत्य नसते, तर ते कलात्मकरीत्या व्यक्त झालेले असते. कलावंत त्याची आपल्याला प्रतीती आणून देत असतो, असे विधान बरेचवेळा वास्तववादी पुरस्कर्ते म्हणत असतात. या भूमिकेच्या मुळाशी अशी कल्पना आहे की कलावंताची जी अभिव्यक्तीची पद्धती आहे तिच्या द्वारे तार्किक स्वरूपाचे सत्य व्यक्त होऊ शकते. हे विधान तपासून बघणे महत्वाचे ठरेल. साहित्यात वास्तवतेचे चित्रण व्हायचे आणि तिचा अर्थ लावायचा म्हणजे २ गोष्टी आवश्यक असतात. १) लेखकाची भूमिका वस्तुनिष्ठ हवी आणि २) त्याने कलाकृतीतून एका विशिष्ट घटनेचे चित्रण न करता सर्वसामान्य स्वरूपाची विधाने करायला हवीत. पण कलावंत यापैकी एकही गोष्ट करीत नसतो. तो एखाद्या परिस्थितीचे चित्रण करीत नसतो तर त्या परिस्थितीच्या आपल्याला आलेल्या अनुवास्तवतेचे वस्तुनिष्ठ चित्रण होणे अशक्य असते. तेंव्हा कलावंत कलात्मक पद्धतीने लिहीत असतो असं म्हटले म्हणजे तो वास्तवतेचे चित्रण करीत असतो. परिस्थिती हे त्या अनुभवाचे निमित्त असते. त्या अनुभवाचे स्वरूप बऱ्याचवेळा लेखकाच्या व्यक्तिमत्वावरून ठरते. त्याचप्रमाणे साहित्यिक सर्वसामान्य स्वरूपाची विधाने करीत नसतो. बहुदा तो एका व्यक्तीविषयी किंवा विशिष्ट घटनेविषयी लिहीत असतो. अधिक परखडपणे बोलायचे झाल्यास, तो एक विशिष्ट अनुभव व्यक्त करीत असतो. ह्यामुळे कलावंताची जी अभिव्यक्तीची पद्धती आहे तिच्या द्वारे वास्तवतेचे वस्तुनिष्ठ चित्रण होणे अशक्य असते. कलावंत हा शास्त्रज्ञाप्रमाणे Statement करीत नसतो तर Psudo Statement करीत असतो. त्यामुळे एका कलावंताने निराशेचे चित्रण केले आणि दुसऱ्याने आशेचे चित्रण केले तर या दोन्हीपैकी एक कुणीतरी बरोबर आहे, असा निष्कर्ष वाचकाला काढावा लागत नाही. दोघांचे म्हणणे एकाचवेळी खरे असू शकते. अगदी भिन्न स्वरूपाचे अनुभव आणि भिन्न प्रकारचिलेखकाची व्यक्तिमत्वे कलाकृतीतून व्यक्त होत असतात आणि आपण त्यासगळ्या कलाकृतींचा सारख्याच आनंदाने रसास्वाद घेऊ शकतो. आणि हे आपल्याला नित्य अनुभवायला मिळते. *क्रमश:*