Monday 29 July 2019

विलया जग हे जाईल सारे

आपल्याकडे काही समज घट्ट रुजले आहेत आणि दुर्दैव असे, "रसिक" म्हणून त्यांना मान्यता मिळते. त्यातला एक समज म्हणजे केवळ आणि केवळ जुनी (च) गाणी सुरेख असतात. त्यालाच जोडून, नवीन गाण्यांवर बरेचवेळा यथेच्छ टीका करायची आणि जमले तर नाउमेद करायचे. जुनी गाणी सुंदर आहेतच पण म्हणून नवीन काही चांगले निर्माण होतच नाही, हा कोता विचार झाला. मुळात मराठी समाज हा नेहमीच इतिहासात रममाण होणारा आहे. गत:स्मृती मराठी समाजाला भुलवतात आणि त्यातूनच मग, "आमच्या काळातील गाणी खरी" असला विचार पसरतो. थोडा विचार केला तर, विशेषतः ललित संगीत हे अतिशय परिवर्तनशील असते, साधारणपणे, दर १२ ते १५ वर्षांनी नवनवीन प्रघात उदयाला येतात, त्यातून नवीन प्रयोग निर्मिती होते, काही प्रयोग फसतात तर काही प्रयोग युगप्रवर्तक ठरतात. बदल हे कविता, स्वररचना, वाद्यमेळ आणि गायन, या सगळ्या घटकांत होतच असतात. बरेचवेळा आपण तिकडे दुर्लक्ष करतो. गंमत म्हणजे लालची संगीतातील मूलभूत घटक कायम स्वरूपी असतात, फरक पडतो तो त्या घटकांच्या आविष्कारात आणि तिथेच आपली रसिकता काहीवेळा तोकडी पडते. याबाबत असेच म्हणावे लागेल, निदान जी काही नवनिर्मिती होत असते, ती समजून घेण्याचा प्रयत्न करा!! आपल्याला देखील काहीतरी नवीन गवसेल. याच भूमिकेतून आपण आजचे गाणे "विलय जग हे जाईल सारे " ऐकणार आहोत. 
कवियत्री शांता शेळके यांची कविता आहे. "आधी चाल मग शब्द" किंवा "आधी शब्द मग चाल" या दोन्ही पद्धतीने लिहिण्यात शांत शेळके वाकबगार होत्या. चालीचे "वजन" ध्यानात घेऊन, त्यांना लगोलग कविता स्फुरत असे. आपल्या दृष्टीने काहीच फरक पडत नाही. गाण्यातील शब्दकळा ही अर्थवाही असावी, सपकपणा प्रतिमांतील तोचतोचपणा टाळून कविता लिहिलेली असावी, इतपत प्राथमिक मागण्या जर कविता पूर्ण करत असेल तर उगीच एकाच पद्धतीला धरून धोशा लावण्याला काहीही अर्थ नाही. प्रणयी थाटाचे गीत आहे. रचनेत शब्दबंबाळता नसावी आणि तरीही आशयघन कविता असावी, ही मागणी ही कविता पूर्ण करते. मुळात कविता हे अल्पाक्षरी माध्यम आहे तेंव्हा मोजक्या शब्दातून आपले मांडणे अर्थपूर्ण करावे, इथे शांताबाईंची ही कविता महत्वाची ठरते. आपली शब्दरचना बांधीव व्हावी म्हणून शांताबाई काहीवेळा संस्कृत भाषेचा आधार घेतात. पहिल्या अंतऱ्यातील दुसऱ्या ओळीतील "व्योमी" शब्द हा व्योम-व्योमी असा बदलून घेतलेला आहे आणि अर्थ बघायला गेल्यास "अवकाश" हा अर्थ लावता येतो परंतु हाच संस्कृतप्रचुर शब्द शांताबाईंनी आपल्या कवितेत किती चपखल बसवला आहे. 
तरुण संगीतकार कौशल इनामदारने स्वररचना करताना नेमके याच बाबीचे भान राखले आहे. खरंतर बारकाईने कविता वाचल्यास, कवितेत "या जगातील सगळे शाश्वत आहे - फक्त आपले प्रेम हे अशाश्वत आहे" ही भावना दृग्गोचर होते. हे एकदा समजून घेतल्यावर मग चालीचे कुलशील जाणून घेता येते. कवितेतील ऋजू भावना लक्षात घेऊनच संगीतकाराने आपला वाद्यमेळ हात राखून ठेवला आहे आणि वाद्यांची लय देखील शक्यतो मध्य लयीतच ठेवली आहे. वास्तविक स्वररचना काही ठिकाणी तार सप्तकात जाऊ शकत होती त्याऐवजी संगीतकाराने अंतरे  बांधताना,मुखड्याची स्वररचना डोळ्यासमोर ठेऊन, त्यालाच जुळवून घेणारी स्वररचना केली आहे. अगदी स्पष्ट बोलायचे झाल्यास, गाण्याची चाल आणि वाद्यमेळ याचा बारकाईने विचार केल्यावर कुठेतरी हिंदीतील प्रख्यात संगीतकार रोशन यांच्या शैलीची आठवण होते. अर्थात ही तुलना नाही कारण दोघांचा पिंडधर्म वेगळा आहे परंतु स्वररचना मंद्र तसेच शुद्ध सप्तकात फिरवत ठेवायची, हाच मुद्दा समान दिसतो. मुळात आधुनिक संगीत हे बव्हंशी "आघाती" संगीत असते, या समजाला पूर्णपणे फाटा  देत, स्वरलयीलाच केंद्रीभूत ठेऊन, निर्मिती केली आहे. वाद्यमेळ हा व्हायोलिन, बासरी आणि सतार इतपतच सीमित ठेवला आहे  विशेषतः गायन चालू असताना, पार्श्वभागी व्हायोलिन किंवा बासरीच्या स्वरांचे परिमाण सुरेख रीतीने दिले आहे. 
गायक म्हणून "अजित परब - प्रतिभा दामले" यांचा वेगळा विचार करायलाच हवा. गाण्याची प्रकृती ध्यानात घेऊन, एकूणच गायन हे मंद्र सप्तकात ठेवले आहे. शब्दांचे उच्चार करताना देखील कुठेही अकारण "वजन" दिलेले नाही.आधुनिक काळातील बऱ्याच गाण्यांत हा दोष स्पष्टपणे ऐकायला मिळतो. ललित संगीतात गायन करायचे म्हणजे "गायकी" दाखवायची, हा मुद्दा देखील बरेचवेळा अकारण दिसतो. वास्तविक त्याची काहीही गरज नसते. चालीचा गुणधर्म लक्षात घेऊन, गायन करणे महत्वाचे आणि दुसरे म्हणजे साधे, सरळ परंतु अतिशय सुरेल गायन करणे,कधीही  सहज,सोपे नसते. कवितेतील आशय अधिकाधिक खोल  मांडायचा,ही भूमिका घेणे महत्वाचे आणि इथे हे दोन्ही गायक यशस्वी झाले,या असेच म्हणायला हवे. ललित संगीताची दीर्घ परंपरा लक्षात घेता, नवोदित गायकांवर पूर्वसूरींचा प्रभाव पडणे अशक्य नसते परंतु तो प्रभाव टाळून, आपली "गायकी" त्यांनी सिद्ध केली आहे. 
अर्थात या सगळ्याचा परिणाम म्हणजे आजचे हे गाणे होय. 

विलया जग हे जाईल सारे 
अशीच राहील रात्र तरीही, असेच गगनी तारे!!

जवळ असा तू, आणि अशी मी 
पूर्णचंद्रही असाच व्योमी 
सुगंधशीतळ असेच असतील वाहत भवती वारे 

अशीच असतील मिटली नयने 
कंपित श्वसने : अस्फुट वचने 
अंगांगावर रोमांचाचे असतील मोरपिसारे 

ही स्पर्शाची अबोल भाषा 
नेईल तुज मज नवख्या देशा 
युगायुगांच्या अवकाशातुनि जुळतील दोन किनारे 




Sunday 21 July 2019

तुला पाहिले मी नदीच्या किनारी

सर्वसाधारणपणे एक समज सर्वत्र पसरलेला आहे, प्रतिभाशाली पित्याच्या छायेत वावरल्याने, अपत्याची वाढ खुंटते. पित्याचे अलौकिक यश त्या अपत्याला बोजड होते आणि बहुतेकवेळा अंगी गुण असून देखील मागे पडतात. समाज देखील नेहमी हातात तागडी घेऊन, तुलना करीत असतो. वास्तविक प्रत्येक व्यक्ती ही नेहमीच स्वतःचे गुणविशेष घेऊन जन्माला येत असते आणि त्यानुरुपच आयुष्याला एक आकार मिळत असतो परंतु समाजाला त्याची फारशी गरज वाटत नसते आणि या पार्श्वभूमीवर आपल्या आजच्या गाण्याच्या रचनाकाराचे - श्रीधर फडक्यांचे विशेष कौतुक करायलाच लागते. सुधीर फडक्यांच्या कुटुंबात जन्म घेतला परंतु स्वतःची वेगळी वाट चोखाळली आणि यशस्वीपणे पेलली. हे सहज वाटते तितके सोपे कधीच नसते. 
आजचे गाणे ही मुलत: एक सक्षम कविता आहे आणि कवितेला तितकीच समर्पक चाल लावणे हे नेहमीच आव्हानात्मक असते. त्यातून कवितेचा जनक ग्रेस असतील तर जबाबदारी अधिक वाढते. कवी ग्रेस म्हटले लगेच दुर्बोध हाच शब्द ओठाशी येतो परंतु असे करून आपण त्या कवींवर अन्याय करीत आहोत, हेच लक्षात घेत नाही. आपल्याकडे "सरसकटीकरण" नावाचा प्रचंड रोग पसरलेला आहे आणि त्यातूनच मग प्रत्येक कलाकाराला एखाद्या लेबलखाली जखडून ठेवायचे आणि त्याच नजरेतून त्याच्या निर्मितीबाबत आस्वाद घ्यायचा, अशी सरधोपट पद्धत आहे. ग्रेस यांच्या काही कविता, ज्याला "दुर्बोध" म्हणाव्या अशा जातीच्या आहेत पण म्हणून सगळ्याच कविता तशा नाहीत. मुळात "दुर्बोध" म्हणताना, आपण आपली रसिकता बरेचवेळा तोकडी करतो. कविता ही नेहमीच शब्द, शब्दांची घडण आणि त्यांची लावलेली जोड, या प्रक्रियेतून घडत असते आणि तिथेच नेहमी गोंधळ करतो. आपण शब्दांच्या अर्थाचे परिचित अन्वय ध्यानात घेतो परंतु कवीचा काय दृष्टिकोन आहे, याची आपल्याला गरज वाटत नाही. इथे देखील सुरवातीच्या ओळीतून एखाद्या प्रेयसीचे वर्णन असावे असा भास होतो परंतु जसे पुढे वाचायला घेतो तशी आपल्याला चकवा मिळतो. "आई" हा फ्रेश यांच्या कवितेचा अति आवडीचा विषय आणि त्याबाबत अतिशय हृद्य कविता त्यांनी लिहिलेल्या आहेत. ग्रेस यांच्या कवितेतील प्रतिमा रूढार्थाने समोर येत नाहीत तर वाचकाला विचार करायला लावतात आणि विचार करणे, आपल्याकडे सार्वजनिक पातळीवर अभावानेच आढळते. "धुक्याच्या महालात" या शब्दांशी "न माझी मला अन तुला सावली" या शब्दांशी लावल्याने आशय धुकाळल्यासारखा होतो. तसेच "तमांतुनी मंद ताऱ्याप्रमाणे,दिसें की तुझा बिल्वरांचा चुडा" ही ओळ अशीच संदिग्ध आहे. विशेषतः "बिल्वरांचा चुडा" हे शब्द तर आजच्या पिढीला समजणे अवघड आहे. असो.  
वर मी म्हटल्याप्रमाणे संगीतकार श्रीधर फडके यांनी स्वररचना करताना, कुठेही आपल्या पित्याची त्या रचनेवर सावली पडू नये अशी दक्षता घेतली की काय? इतपत वेगळेपण राखले आहे. तसे बघितले तर श्रीधर फडके हे दोन्ही प्रकारे चाली बांधत असतात म्हणजे "आधी शब्द मग चाल" किंवा "आधी चाल मग शब्द". अर्थात कुठल्याही पद्धतीने स्वररचना तयार करताना, कवीच्या शब्दांना नेहमी प्राधान्य दिलेले आढळते. कमीतकमी वाद्यवृंद, आशयाला सर्वाधिक महत्व, लयीला काहीशी अवघड चाल अशी काही वैशिष्ट्ये सांगता येतील.  अत्यंत हळुवार स्वरांत मुखड्याला सुरवात होते आणि तीच लय संपूर्ण रचनेत कायम ठेवली आहे. कवितेत  एका दृष्टीने मूक संवाद चाललेला आहे आणि त्या संवादाशी समांतर अशीच चाल लावलेली आहे. 
श्रीधर फडक्यांचा सगळा भर हा सक्षम मुखडा तयार करण्यावर असतो आणि त्यामानाने अंतरे वेगळे बांधले गेले नाहीत. अंतऱ्यासाठी संपूर्ण वेगळी चाल लावणे, हे एक सर्जनशीलतेचे खास अंग मानले जाते. अर्थात "मनावेगळी लाट व्यापी मनाला" ही दुसऱ्या अंतऱ्याची सुरवात काहीशा वरच्या पट्टीत केली आहे पण तरीही मुखडा लक्षात घेता फार नावीन्य आढळत नाही. 
गायक म्हणून सुरेश वाडकरांचा मुद्दामून उल्लेख करायला हवा. आवाजाची जात शुद्ध किंवा मंद्र सप्तकात अधिक खुलते परंतु एक दोष बरेचवेळा गायनात आढळतो. शब्दोच्चार करताना अकारण स्वरांत "लाडिकपणा" अवतरतो आणि त्यामुळे काहीवेळा गायन नाटकीपणाकडे झुकते. वास्तविक, गळा अतिशय सुरेल आहे छोट्या हरकती, खटके इत्यादी सौंदर्यस्थळे गायनात प्रकर्षाने दिसतात तेंव्हा अशा लाडिक उच्चारांची खरंच आवश्यकता आहे का? हा प्रश्न मनात उद्भवतो आणि सुदैवाने या गीताच्या गायनात कुठेही असला "नाट्यात्म" अंश ऐकायला मिळत नाही. मुळात संगीतकारानेच निर्मिलेली स्वररचना अतिशय गोड, रसवाही आहे तेंव्हा त्याला अनुलक्षून गायन करणे, हेच रचनेच्या सौंदर्यात भर टाकणारे ठरते. 
या गीताने एक बाब अधोरेखित केली, गाण्यात "काव्य" असले तरी रचनेत कसलाही उणेपणा येत नाही, किंबहुना सार्थवाही कविता, हे देखील उत्तम गीताचे महत्वाचे अंग असू  शकते,हे सिद्ध झाले. मागील पिढीत हृदयनाथ मंगेशकरांनी मराठीतील अशाच कविता हुडकून काढल्या आणि ललित संगीत श्रीमंत केले. पुढील पिढीत श्रीधर फडक्यांनी तोच मार्ग स्वीकारला आणि मराठी भावगीताचे विश्व अधिक विस्तारले. 

तुला पाहिले मी नदीच्या किनारी 
तुझे केस पाठीवरी मोकळे 
इथे दाट छायांतुनी रंग गळतात 
या वृक्षमाळेतले सांवळे!!

तुझी पावले गे धुक्याच्या महालात 
ना वाजली ना कधी नादली 
निळागर्द भासे नभाचा किनारा 
न माझी मला अन तुला सावली 

मनावेगळी लाट व्यापी मनाला 
जसा डोंगरी चंद्र हा मावळे 
पुढे का उभी तू, तुझे दु:ख झरते ?
जसे संचिताचे ऋतू कोवळे 

अशी ओल जाता तुझ्या स्पंदनातून 
आकांत माझ्या उरी केवढा!
तमांतुनी मंद ताऱ्याप्रमाणे 
दिसें की तुझा बिल्वरांचा चुडा 


Monday 15 July 2019

रूपास भाळलो मी

काही गाणीच अशी असतात, ऐकता क्षणीच प्रेमात पडावे. चाल  तशी साधी, लोभस असते. स्वररचना कवितेच्या आशयाशी सुसंगत असते आणि स्वरांतून कवितेतील आशय अधिक खोलवर 
मांडलेला असतो. अशी स्वररचना अभावानेच ऐकायला मिळते. आपला एक ठाम ग्रह असतो, स्वररचना गुंतागुंतीची झाली म्हणजे ती चाल बुद्धीवादी असते आणि चोखंदळ रसिक अशाच स्वररचनेच्या शोधात असतात आणि तशी सापडली की भुलतात. चाल गुंतागुंतीची असणे, हे संगीतकाराच्या प्रतिभेचे दर्शन होय पण तो एकमेव निकष नव्हे. साधी, सोपी, गोड चाल निर्माण करणे तितकेच अतिशय अवघड असते.  विशेषतः प्रणय गीत असेल तर कवितेतील ऋजुता स्वररचनेतून मांडणे हे एक आव्हान असते. मराठी भावगीत किंवा चित्रपट गीतांचा धांडोळा घेतला तर असे आढळेल, अशा प्रकारची गाणी अपवादात्मकच आढळतात जिथे शब्द, सूर आणि गायन यांना एकत्रितरीत्या सुविहितपणे बांधलेले आहे. यातील "सुविहितपणे" हा शब्द महत्वाचा. "अवघाची संसार" या चित्रपटातील "रूपास भाळलो मी" हे गाणे या पठडीत येते. स्वररचना अगदी सरळ, साधी आहे, कुठेही अनावश्यक गुंतागुंत नाही. मुखडा ज्या लयीत बांधला आहे, तीच लय कायम ठेवली आहे आणि तोच लडिवाळपणा सगळ्या रचनेत भरलेला आहे. 
शब्दरचना जरी "वसंत अवसरे" या नावाने लिहिलेली असली तरी मूळ नाव हे "शांता शेळके" यांचे आहे. त्यावेळी शांताबाई सरकारी कमिटीवर होत्या आणि त्या सरकारी कमिटीचा नियम होता, कुठेही व्यावसायिक संबंध ठेवायचे नाहीत. तेंव्हा शांताबाईंनी "टोपण नाव" घेऊन चित्रपट गीत आणि काही भावगीते लिहिली आणि गीतांना समृद्धता मिळवून दिली. शांताबाई या मुळातल्या कवियत्री परंतु आर्थिक अडचणी सोडविणे आणि काहीतरी नवीन आव्हान स्वीकारणे, या उमेदीने त्यांनी कविता लिहिल्या. अर्थात कितीही व्यावसायिक संबंध आले तरी मुळातली भाववृत्ती काही लपत नाही. आता कविता म्हटले की प्रतिमा, उपमा इत्यादी घटक अवतरणारच. शांताबाई याच कवितेत "हे गोड रूप ऐसे, निरखीन मी दुरून, पाण्या अशीच ठेवी, छाया उरी धरून" अशी सुरेख काव्यमय ओळ लिहून जातात. चित्रपट गीते लिहिताना, एक बंधन वारंवार पाळावेच लागते, किंबहुना ललित संगीतात हे बंधन पाळावेच लागते. संगीतकाराने चाल बांधताना, त्याच्या स्वरिक लयीचा एक ठराविक "मीटर" आखलेला असतो आणि त्यानुरुपच शब्दांची मांडणी करायची असते. काहीवेळा संगीतकार त्या मीटरला मुरड घालतात पण ते अपवादात्मक. मुखडा लिहिताना हे बंधन स्वीकारावे लागते. त्यामुळेच गीते लिहिताना त्यात किती "गूढार्थ" आणायचा, यावर मर्यादा पडते. हे चित्रपट गीत, युगुलगीत आहे तेंव्हा शांताबाईंनी प्रत्येक अंतरा वेगळ्या अंदाजाने लिहिला आहे. अर्थात त्यानुरुपच प्रतिमा लिहिल्या आहेत. "हा लाजरा शहारा, पाहील काय कोणी? करतील का चहाडी, हे लाल गाल दोन्ही ?" या ओळी वाचल्यावरच अंदाज करता येतो. इथे बघा, वाचताना कुठेही आशय आकळायला त्रास होत नाही परंतु नेमका आशय रसिकांसमोर आणला जातो आणि रचनेत कुठेही सपकपणा, सरधोपटपणा येत नाही. प्रणयाचीच भावना तरीही काहीतरी "नवीन" वाचल्याचे प्रत्यंतर येते. असे काही वाचल्यावर मनात येते, शांताबाईंनी आणखी चित्रपट गीते (जितकी लिहिली ते प्रमाण अत्यल्प आहे) लिहायला हवी होती. 
वसंत पवारांची संगीत रचना आहे. गाण्याची सुरवात तिलक कामोद रागाच्या साहाय्याने समोर येते पण त्यात देस रागाचा रंग अद्भुतपणे मिसळला आहे. सुरवातीला क्षणभर व्हायोलिनचे सूर ऐकायला येतात पण त्यातच सतारीचे सूर जोडले जातात आणि डोळ्यासमोर राग तिलक कामोद येतो. पुढील आलाप त्याचा सुरावटीचा विस्तार दर्शवतात. मुखडा देखील किती हलक्या सुरांनी आपल्यासमोर येतो ते ऐकण्यासारखे आहे. शांताबाईंनी शब्दांतून ऋजुता मांडली आहे,  त्याचे औचित्य कुठेही ढळलेले नाही. पुढील अंतरे हे देस/ तिलक कामोद रागाच्या सुरांशी पाठशिवणीचा खेळ खेळत आपल्या समोर येतात. रागधारीत चाल आहे पण त्यातील गोडवा नेमका टिपला आहे. हीच तर संगीतकाराची वैशिष्ट्ये म्हणता येतील. निव्वळ राग समोर न ठेवता, त्यातील "ललित" फ्रेजीस निवडून, कवीच्या शब्दांना त्यात गुंफायचे. इथेच संगीतकाराचा अभ्यास दिसून येतो. 
समृद्ध गायन, हा या गाण्याचा स्वतंत्र अभ्यासाचा विषय आहे. सुधीर फडके/आशा भोसले यांनी आपला आवाज पुरवला आहे. संगीतकाराच्या मनातील स्वराकृती आपल्या गळ्यातून मांडताना, निव्वळ आराखडाच न  मांडता,त्यात आपले गायन कौशल्य कसे मिसळायचे, याचा हे गायन हा सुरेख आदिनमुना आहे. गाण्यातील दुसरा अंतरा आशाबाईंनी गायला आहे. सुरवातीची ओळ "चाहूल मंद झाली" या शब्दांनी संपते. त्यातील "चाहूल" लागणे आणि त्यातील "मंद" असा हलकेपण असणे. स्वरांतून किती यथार्थपणे दाखवले आहे. खरतर या गाण्यातील प्रत्येक ओळ ही स्वतंत्रपणे आस्वादावी, या प्रतीची आहे. बहुदा याच आणि अशा आणखी अनेक गुणांमुळेच हे गाणे चिरस्मरणीय असे झाले आहे.   

रूपास भाळलो मी, भुललो तुझ्या गुणाला 
मज वेड लाविले, तू सांगू नको कुणाला 

एकांत पाहुनिया, जे तू मला म्हणाला 
ऐकून लाजले मी, सांगू नको कुणाला 

चंद्रा ढगांतुनी, तू हसलास का उगा रे 
वाकून खालती अन, का ऐकलेस सारे 
जे ऐकले तुवा, ते सांगू नको कुणाला 

वाऱ्या तुझी कशाने, चाहूल मंद झाली 
फुलत्या फुला कशाला, तू हासलास गाली 
जे पाहिले तुवा, ते सांगू नको कुणाला 

हे गोड रूप ऐसे, निरखीन मी दुरून 
पाण्या अशीच ठेवी, छाया उरी धरून 
धरलेस जे उरी, ते सांगू नको कुणाला 

हा लाजरा शहारा, पाहील काय कोणी ? 
करतील का चहाडी, हे लाल गाल दोन्ही ? 
गालांत रंगले जे, सांगू नको कुणाला 



Thursday 11 July 2019

विसरशील खास मला

प्रत्येक संगीतकाराचा स्वतः:चा असा एक दृष्टिकोन असतो आणि त्यानुसार त्यांच्या बहुतांशी स्वररचना, निर्मिती स्वरूपात आपल्या समोर येतात. किंबहुना, हातात आलेली कविता वाचताना, कुठल्या शब्दावर "सम" घ्यायची, कुठल्या शब्दावर "वजन" घ्यायचे जेणेकरून आपली रचना अधिक सुंदर, अर्थवाही आणि लोकप्रिय होईल. त्यानुसार त्यांचे ठराविक आडाखे देखील असतात. अर्थात यातूनच त्या संगीतकाराची "शैली" तयार होते. शैलीच्या जोखडातून आजपावेतो कुठलाही संगीतकार सुटलेला नाही. अर्थात शैली हे जोखड मानावे की ओळख ठसवावी, हा आणखी वेगळं विचार समोर येतो. थोडे बारकाईने ऐकले तर असाही लक्षात येते, प्रत्येक संगीतकाराची गाणे बांधायची देखील स्वतंत्र अशी शैली असते आणि त्यातूनच मग लयीचे आवडते "वळण" ही सुद्धा त्या संगीतकाराची ओळख होऊन बसते. विशेषतः सतत गाणी बनवायची झाली म्हणजे मग हळूहळू त्याची शैली अधिक ठळकपणे आपल्या समोर येते. आजचे आपले गाणे "विसरशील खास मला" या संदर्भात विचारात घेताना हेच मुद्दे लक्षात घ्यायचे आहेत. 
आज हे गाणे तयार होऊन जवळपास ५० वर्षे तरी उलटली असतील पण जागृत रसिकांच्या नजरेत कायमचे स्थान मिळवून बसलेली रचना आहे. कवी ज.के.उपाध्ये हे नाव तर आता पूर्णपणे विस्मरणात गेलेले आहे खरतर ही अवस्था बऱ्याच मराठी भावगीतांबाबत म्हणता येईल. 
त्या कवींची ओळख ही त्या ठराविक गाण्यातूनच झाली तर होते. बरेचवेळा तर गाणे आवडते पण त्या गाण्याचा कवी कोण? हे विचारायची तोशीस देखील घेतली जात नाही. सूर्यकांत खांडेकर हे असेच चटकन आठवलेले नाव. त्यांनी लिहिलेली भावगीते अमाप लोकप्रिय झालेली आहेत पण बहुतांशी श्रेय हे गायक आणि संगीतकाराकडे जाते. आपल्याकडे आजही गाण्यातील कविता, हा दृष्टिकोन फारसा गंभीरपणे घेतला जात नाही. कवितेशिवाय ललित संगीत संभवत नाही परंतु कवितेकडे अक्षम्य दुर्लक्ष करायचे असेच बहुतांशी आढळते आणि यात काही चूक आहे, अशी साधी जाणीव देखील दाखवली जात नाही. सूर हे मनावर लगेच गारुड घालतात हे जरी पूर्णांशाने  मान्य केले तरी शब्द देखील तितकेच महत्वाचे असतात त्याशिवाय ललित संगीताची अभिव्यक्ती संभवतच नाही. 
कविता म्हणून ही शब्दरचना विचारात घेतली तर ललित संगीतात सरधोपटपणे आढळणारा आशय आहे. घाट देखील सर्वमान्य असाच आहे किंवा रचना कौशल्य, प्रतिमा या सहज, सोप्या अशाच आहेत. खरतर एक विचार नेहमीच मांडला जातो, ललित संगीतात "खरी भावकविता" कितपत गरजेची असते? इथेच कवी आणि संगीतकार यांचा पिंडधर्म ओळखता येतो. ललित संगीतातील कविता ही स्वरिक लयीच्या अंगाने जाणारी हवी आणि त्यानुसारच शब्दरचनेतील रचना आणि खटके असावेत. फार मोठ्या लांबीची शब्दरचना, स्वररचेनच्या दृष्टीने अवघडच असते अर्थात अपवाद म्हणून काही रचना दाखवता येतील. तेंव्हा ललित संगीताच्या दृष्टीने प्रस्तुत कविता ललित संगीताच्या सगळ्या "गरजा" भागवते, असे म्हणता येईल. 
संगीतकार यशवंत देव हे नेहमीच अर्थपूर्ण रचना करणारे म्हणून प्रसिद्ध होते. कविमनाच्या या संगीतकाराने असंख्य अर्थपूर्ण स्वररचना सादर करून, विशेषतः मराठी मनात अढळ स्थान मिळवले आहे. हाती आलेल्या कवितेतील आशय नेमकेपणाने जाणून घेऊन, त्यातील कुठल्या शब्दावर जोर द्यायचा, जेणेकरून कवितेतील आशय अधिक निखरून येईल हा त्यांचा विशेष निश्चितच भावणारा होता. आता याच कवितेतील पहिल्या ओळीतील "विसरशील खास मला, दृष्टीआड होता" या ओळीतील "खास" शब्दाचे "खास" महत्व त्यांनी ओळखले आणि स्वररचना करताना त्या शब्दावर "आघात" घेतला आहे. वास्तविक, "विसरशील" किंवा "दृष्टीआड" हे शब्द देखील तितकेच महत्वाचे आहेत पण तरीही देवांना "खास" शब्द महत्वाचा वाटला. संगीतकाराची दृष्टी ही अशा प्रकारे पारखून घेता येते. संगीताच्या दृष्टीने पहिली ओळ "मालकंस" तर "वचनें ही गोड गोड देशी जरी आता" ही ओळ "चंद्रकंस" रागाशी नाते सांगणारी आहे. खरेतर गाणे सुरु व्हायच्या आधीचे सतारीचे सूर हे "मालकंस" रागच दर्शवतात. गमतीचा भाग असा आहे, पुढील अंतरे बांधताना संगीतकाराने "जोगकंस" रागाचे सूर हाताशी घेतले आहेत. खरतर ललित संगीतात रागाची ओळख खोलवर घेण्याच्या फंदात पडू नये हेच खरे. 
गायिका म्हणून आशा भोसल्यांच्या केवळ या गायनासाठी म्हणून स्वतंत्र लेख लिहावा लागेल, इतके अर्थपूर्ण गायन झाले आहे. "अंतरीची आग तुला जाणवू कशाने"  या ओळीतील मानसिक तडफड आणि होरपळ ज्या प्रकारे आशाबाईंनी दाखवली आहे, ते विशेष लक्षणीय ठरेल. संगीतकार चालीचा नकाशा गायिकेला देत असतो पण त्या नकाशातील मार्गक्रमणा ही गायक/गायिकेनेच करायची असते आणि इथे आशाबाई निव्वळ अजोड गातात. अशीच ओळ "वशही वशीकरण तुला सहज जादुगारा"  गाताना त्यांनी आपले गायन कौशल्य दाखवले आहे. "वश"ही  आणि लगेच "वशी"करण, गाताना दोन्ही शब्दांचा अर्थपूर्ण उच्चार असाच अप्रतिम, असेच म्हणायला लागेल. तेंव्हा असे गाणे जर लोकांच्या मनात इतकी वर्षे ठाण मांडून बसले असेल तर नवल ते काय!!

विसरशील खास मला, दृष्टीआड होता 
वचनें ही गोड गोड देशी जरी आता 

दृष्टीआड झाल्यावर सृष्टीही निराळी 
व्यवसायही विविध, विविध विषय भोवताली 
गुंतता तयात कुठे वाचन आठविता 

स्वैर तू विहंग अंबरात विहरणारा
वशही वशीकरण तुला सहज जादुगारा
लाभशील माझा मज केवि जसा होता

अंतरीची आग तुला जाणवू कशाने
बोलवे न वेदनाच वचन दु:ख नेणे
याकरता दृष्टीआड होऊ नको नाथा