Friday 30 October 2015

डर्बन भाग १

मुंबई वगळल्यास, डर्बन असे शहर आहे, जिथे मी जवळपास ४ वर्षे राहिलो. भारतात, अनेक शहरांना भेटी दिल्या, काही दिवस राहिलो पण, शहराची "ओळख" काही झाली नाही. अगदी आजही, पुण्याबाबत माझे हेच म्हणणे आहे. पुण्याला आजमितीस भरपूर भेटी झाल्या, पण अजूनही पुणे शहर "ओळखले" असे म्हणवत नाही!! ही बाब पुण्याबाबत, मग दिल्ली, चंडीगड, बंगलोर, चेन्नई बाबत तर काही बोलायलाच नको. 
मी डर्बन शहरात नोकरीसाठी आलो, त्या आधी, इथे ९० कि.मी. दूर असलेल्या, पीटरमेरीत्झबर्ग शहरात, सलग ३ वर्षे काढली. अर्थात,पीटरमेरीत्झबर्ग ही जरी "नाताळ" राज्याची राजधानी असली तरी शहर म्हणून तितकेसे विकसित झालेले नाही. अर्थात, त्याला भौगोलिक कारणे देखील आहेत,  पीटरमेरीत्झबर्ग शहर, हे ५,६ डोंगरावर वसलेले शहर, त्यामुळे औद्योगिक विकासाला, नैसर्गिक मर्यादा पडतात. डर्बन हे, अरेबियन समुद्राच्या किनाऱ्यावर वसलेले शहर. त्यामुळे, इथे व्यापार, उद्योग, इत्यादींना भरपूर वाव. अर्थात, केवळ डोंगरावर शहर आहे, म्हणून मर्यादा, याला तसा फार अर्थ नाही कारण, जोहान्सबर्ग शहर देखील समुद्रसपाटी पासून जवळपास ६००० फुट उंचावर आणि असेच डोंगराळ भागात वसलेले आहे आणि साऊथ आफ्रिकेतील जवळपास ५०% औद्योगिक वाढ ही, हे शहर आणि आजूबाजूचा परिसर, इथेच झाली आहे. 
साऊथ आफ्रिकेतील, एक अतिशय महत्वाचे, औद्योगिकदृष्ट्या गजबलेले तसेच "Tourist Attraction" म्हणून जागतिक स्तरावर मान्यता पावलेले शहर. आपल्या सारख्या भारतीयांच्या दृष्टीने तर या शहराला फार महत्व आहे. २०११ साली, इथे एक फार मोठा समारंभ झाला होता. भारतातून, इथे निर्यात केलेले मजूर, या घटनेला १५० वर्षे झाली म्हणून मोठ्या प्रमाणावर सोहळा साजरा केला होता. त्यावेळी आणि आजही, भारताच्या दृष्टीने, साऊथ आफ्रिकेचे "प्रवेशद्वार" म्हणजे डर्बन!! एकतर मुंबईहून इथे जहाजाने यायचे झाल्यास, डर्बन बंदर हेच सर्वात जवळचे. याचा परिणाम असा झाला, या शहरात आणि बाजूच्या  पीटरमेरीत्झबर्ग शहरात, आपल्याला लाखोंच्या संख्येने, भारतीय वंशाची लोकवस्ती आढळते. पूर्वी, इथल्या गोऱ्या लोकांना, इथे उसाची लागवड आणि एकूणच शेतीची अवजड कामे करायला, कुणीतरी "मजूर" म्हणून हवेच होते आणि त्यादृष्टीने "भारत" आणि तिथली लोकसंख्या, त्यांना फारच सोयीचे पडले आणि तेंव्हापासून, भारतातून, इथे मनुष्यबळ आयात करण्याची प्रक्रिया सुरु झाली. 
आता, इथे भारतीय वंश चांगलाच स्थिरावला आहे. आताची पिढी म्हणजे कमीत कमी पाचवी, सहावी पिढी आहे. त्यामुळे, इथले भारतीय वंशाचे लोक म्हणजे केवळ नावाने भारतीय, इतकेच म्हणायला हवे. या लोकांना भारताविषयी आकर्षण आहे, आपले जुने गाव कुठले, हे बघण्याची उत्सुकता आहे पण, ती उत्सुकता तात्पुरती.परत भारतात येउन, नव्याने आयुष्य काढायची अजिबात तयारी नाही आणि थोडा विचार केला तर त्यांनी तरी असे का करावे? त्यांना ज्या प्रकारे इथे सुख-सोयी मिळतात, त्याच्या ५०% देखील सोयी भारतात मिळू शकणार नाहीत आणि हे निखळ वास्तव आहे. 
भारतीयांना, डर्बन अधिक पसंत पडले याचे दुसरे महत्वाचे कारण म्हणजे या शहराचे हवामान आणि भारतातील हवामान, यात सत्कृतदर्शनी फारसा फरक नाही. इथे हाडे गोठवणारी थंडी अजिबात नसते. तशी हवा कोरडी आणि थंड असते पण आपल्या भारतीय लोकांनी आल्हाददायक म्हणावी, अशीच असते. आजही, साऊथ आफ्रिकेतील Import Business, जवळपास ७०% व्यापार, याच बंदरातून होतो. त्यामुळे, इथे आंतरराष्ट्रीय कंपन्यांची ऑफिसेस भरपूर आहेत. अजूनही, साऊथ आफ्रिकन चलनाला, जागतिक स्तरावर महत्वपूर्ण मान्यता आहे. मी ज्या कंपनीत काम करीत होतो (१९९८ ते २००१) त्या कंपनीचा बराचसा व्यापार हा सिंगापूर देशाशी असल्याने, आम्हाला तर डर्बन फारच सोयीचे पडत होते. 
भारतीयांच्या दृष्टीने बघायला गेल्यास आणि अचंबा करण्यासारखी बाब म्हणजे इथले समुद्र किनारे. अरेबियन महासागराच्या किनाऱ्यावर वसलेले शहर तेंव्हा या शहराला प्रचंड लांबीचे समुद्र किनारे लाभले आहेत. मी तिथे रहात असताना, एखादा आठवडा देखील असा गेला नसे, मी समुद्रावर गेलो नाही. आधुनिकता म्हणावी तर उत्तर डर्बन भागातले किनारे खरोखरच अप्रतिम आहेत. पाण्यावर किती प्रकारचे खेळ खेळता येऊ शकतात, याचे इथे प्रात्यक्षिक बघता येईल. केवळ खेळापुरते नसून, ज्या प्रकारच्या सोयी पुरवल्या जातात, ज्या प्रकारे स्वच्छता राखली जाते, आपण भारतीयांनी धडे घेण्यासारखे आहे. शनिवार/रविवारी तर हजारोंच्या संख्येने इथे माणसे जमतात, पण कुठेही गडबड, गोंधळ नसतो. शिस्त तर वाखाणण्यासारखी असते. अर्थात, याला "काळी" बाजू देखील आहे. रात्रीच्या वेळी, एकटे, दुकट्याने हिंडणे, भयानक धोक्याचे ठरत आहे. जीवाला धोका उद्भवू शकतो. काही वर्षांपूर्वी, इथल्या "मरीन परेड " - सेन्ट्रल डर्बन भागातील समुद्र किनारी, लंडन वरून एक जोडपे, रात्रीच्या सुमारास गप्पा मारीत बसले होते आणि कुठूनतरी काही कृष्ण वर्णीय लोक आले आणि त्यांच्याकडे बहुदा पैशाची मागणी केली असावी. त्यातून बाचाबाची झाली असणार पण, त्याचे पर्यवसान, त्या जोडप्याचा खून होण्यात झाले. प्रकरण फार वरच्या स्तरावर पोहोचले होते आणि तेंव्हा पासून, इथे गस्तीचे प्रमाण फार वाढले आहे. अर्थात, समुद्रावर येउन, शांतपणे बसणे, यासारखा आनंदाचा भाग नाही आणि हे मी कितीतरी वेळा प्रत्यक्ष अनुभवले आहे. मी आणि माझे काही मित्र, बरेच वेळा इथे येउन बसायचो, किनाऱ्यावरील एखाद्या उघड्या हॉटेलमध्ये, हातात बियरचा ग्लास घेऊन, अगदी ब्रम्हानंदी टाळी लावलेली आहे!! 
इथेच, अगदी समुद्र किनाऱ्यावर, एका रविवारी सकाळी/दुपारी, fashion show बघितला होता!! सगळ्या तरुण सुंदरी, अगदी तोकड्या कपड्यात येउन, आपल्या कपड्यांची जाहिरात करीत होत्या!! आता, असा सोहळा अनिल कसा सोडणार!! मजेचा भाग म्हणजे, सगळा कार्यक्रम, ज्या प्रकारे, बंद सभागृहात चालतो, त्याच प्रकारे इथे चालत होता. कार्यक्रम उघड्यावर होता, म्हणून आजूबाजूची माणसे चेकाळली होती, शिट्या मारीत होती, असे अश्लाघ्य प्रकार अजिबात घडत नव्हते. जवळपास तीन तास कार्यक्रम चालला होता. अर्थात त्या दिवशीची बियरची चव वेगळी लागली, हा भाग वेगळा!! 
केवळ इथेच नव्हे पुढे मी साऊथ आफ्रिकेत अनेक शहरात राहिलो, अगदी गावसदृश ठिकाणी राहिलो पण, "हा देश आपला आहे आणि याची स्वच्छता आपण राखली पाहिजे" असा एकही फलक, बोर्ड पहिला नाही आणि तरीही गाव देखील अतिशय स्वच्छ असायचे. मला वाटते, हा त्या समाजावरील संस्काराचा भाग आहे. "आपला देश" असे न सांगता, त्याबद्दल ममत्व वाटणे, ही मानसिक गरज निर्माण होणे महत्वाचे!! घाण होतच नाही, हे म्हणणे खोटे आहे पण, झालेला कचरा त्वरित साफ करून परत जागा स्वच्छ ठेवणे, या वृत्तीचे मला कौतुक वाटले. 
नाताळ राज्य आणि इतर राज्यात आणखी एक फरक जाणवण्यासारखा आहे. नाताळ राज्यात आणि विशेषत: डर्बन शहरात, जितकी घनदाट झाडी, हिरवीगार हिरवळ दिसते तितकी इतर भागात दिसत नाही, अगदी केप टाऊन सारखे निसर्ग रमणीय शहर घेतले तरी!! डर्बन इथे वृक्षांची सोबत कधीच सुटत नाही त्यामुळे, डिसेंबर/जानेवारीतील कडक उन्हाळा देखील खूप प्रमाणार सुसह्य होतो. जागोजाग अप्रतिम रस्ते आहेत, महामार्ग आहेत पण कुठेही झाडांची सोबत सतत तुमच्यावर सावली धरून असते. शहरातील आडमार्ग तर भरभक्कम वृक्षांच्या साथीने नटलेले आहेत. अगदी, जून/जुलै मधील हिंवाळा (वर म्हटल्या प्रमाणे कडाक्याचा हिंवाळा इथे नसतो तरीदेखील) घेतला तरी थोडीफार पानगळ होते पण, जसे जोहान्सबर्ग/प्रिटोरिया शहरात, वृक्ष उघडे/बोडके होतात, तसे इथे फार क्वचित आढळते. 
मी इथे "मॉर्निंगसाईड" भागात रहात होतो, जो एकेकाळचा गौरवर्णीय भाग. अर्थात, इथे नीटनेटकेपणा, शिस्तशीर वृत्ती अंगी बाणवावीच लागते. मनात येईल तिथे थुंकणे, हातातील कोक किंवा बियरचा टीन, संपल्यावर रस्त्यावर(च) फेकून देणे, सिगारेटचे थोटूक पायाखाली चिरडणे, असले प्रकार मनात आले तरी करायला शक्यतो मन तयार होत नाही. आजूबाजूची माणसे ज्या शिस्तीने वावरत असतात, ते बघून, आपण देखील तसेच वागायला सुरवात करतो. मी इतकी वर्षे या देशात काढली पण, इतक्या वर्षांत (काही अपवाद वगळता) रस्त्यात, कुणीही लघवी करीत आहे, असे चुकूनही आढळले नाही आणि जे आढळले, ते सगळे कृष्णवर्णीय लोकांच्या भागात. तिथे मात्र उकिरडा!! 
याच शहरात, पुढे २०१० मध्ये, आंद्रे रुई, या जगप्रसिद्ध कलावंताचा सिंफनी ऑर्केस्ट्रा बघितला. खरे सांगायचे झाल्यास, इथेच मला पाश्चात्य संगीताची आवड असणारे काही गोरे मित्र भेटले आणि त्यांनी, मला खूपच आनंदाने, त्यांच्या घरी नेले आणि त्यांच्याकडील संगीताचा संग्रह दाखवला आणि अगदी रात्रभर, मला थांबवून, तो संग्रह ऐकवला. इथेच, मला एका आणखी गोऱ्या मित्राने, माझा क्रिकेटमधील रस बघून, १९६०/७० च्या दशकातील, असामान्य साऊथ आफ्रिकन खेळाडूंच्या DVD दाखवल्या. तसे बघितले तर डर्बन शहर शांत स्वभावाचे आहे. जोहान्सबर्ग शहरात जसे, सगळे घड्याळाला जुंपून, धावत असतात, तसा प्रकार इथे फारसा आढळत नाही. सकाळी ८ वाजता(च) ऑफिसेस उघडता आणि संध्याकाळी ५ वाजता बंद होतात, संध्याकाळी सहा वाजता, रस्त्यावर (ऑफिस भागातील रस्त्यावर) चिटपाखरू देखील नसते. 
आधुनिक शहरांप्रमाणे, या शहरात देखील प्रचंड मॉल्स आहेत आणि इथे देखील "मॉल" संस्कृती वाढलेली आहे. भारताच्या जवळ असलेले शहर असल्याने, इथे आपले भारतीय कलाकार आणि त्यांचे "शूटिंग" हा आता नेहमीचा कार्यक्रम होत आहे. अर्थात केप टाऊन इथे त्याचे प्रमाण अधिक!! अर्थात, इथे असलेली प्रचंड भारतीय वंशाची लोकवस्ती असल्याने, इथे नवीन येणाऱ्याला तसे हायसे वाटते आणि इथल्या भारतीयांना देखील, भारतातून आलेल्या "पाहुण्यांचे" आगत-स्वागत करायला फार आवडते. तदनुषंगाने बघायला गेल्यास, इथे नवरात्र अगदी पारंपारिक पद्धतीने चालते. फरक इतकाच, इथे एक मोठे सभागृह भाड्याने घेतले जाते आणि त्या सभागृहापुरताच सगळा सोहळा मर्यादित असतो आणि त्याला जोडून आवाजाची मर्यादा!! इथेच मी, आवाजाचे प्रदूषण म्हणजे काय असते, याचा जबरदस्त अनुभव घेतला होता. 
नुकताच डर्बन इथे आलो होतो, दोनच दिवस झाले होते, घर व्यवस्थित लावले आणि नेहमीच्या इच्छेप्रमाणे, घरात गाणे ऐकायचे म्हणून सिस्टीम सुरु केली. सुरु करून, १५,२० मिनिटे झाली असतील तोच घराचा दरवाजा ठोठवला गेला. दारात चक्क पोलिस उभा!! नाही म्हटले तरी तंतरलीच. पोलिसाने, लगेच सिस्टीमचा आवाज कमी करण्याची विनंती केली आणि माझ्या शेजाऱ्याने, पोलिस ठाण्यावर तक्रार केली म्हणून मला यावे लागले, अशी तंबी दिली. मला नवल वाटले, शेजारी राहणारा, मला लगेच सांगू शकला असता पण नाही!! त्याने पोलिसाकडे तक्रार केली!! इथे एकूणच Pollution बाबत फार कडक कायदे आहेत आणि मुख्य म्हणजे लोकांच्यात जागरुकता आहे.

Thursday 29 October 2015

हुरहुरणारा किरवाणी

"झाकळुनी जळ गोड काळिमा पसरी लाटांवर
पाय टाकुनी जळात बसला असला औदुंबर".
मराठीतील काही अजरामर कवितांमधील ही एक कविता!! आज जवळपास शतक उलटून गेले तरी देखील या ओळीचा मोह, वाचकांना अनेकवेळा होतो आणि त्यानिमित्ताने अर्थाचे अनेक पदर विशद केले जातात. उत्तम कवितेचे हे एक लक्षण मानावेच लागेल. राग "किरवाणी" ऐकताना, मला बरेचवेळा या ओळी आठवतात. रागाचा समय, प्राचीन ग्रंथांनुसार मध्यरात्र दिलेला आहे. या रागात, "गंधार" आणि "धैवत" स्वर कोमल लागतात आणि त्या कोमल स्वरांचे प्राबल्य अधिक जाणवते. त्यातून, रागाचे सादरीकरण "पिलू" रागाच्या अंगाने जात असल्याने, रागाच्या ठेवणीतच लालित्य अमुर्तपणे सापडते.एकूण स्वररचना आणि त्याची मांडणी बघितली तर मध्यरात्रीच्या घनगर्द अंधारात, तळ्याकाठाची आत्ममग्न शांतता आणि त्याची अनुभूती घेताना, कवितेतील "गोड काळिमा" आणि तळ्यातील झाकोळलेले कृष्ण वर्णीय जल, याचे कुठेतरी आंतरिक नाते जाणवते आणि आपण, रागाचे स्वर ऐकताना, त्या अजरामर वृक्षाच्या संगतीत वावरत असतो.

काहीकाही वाद्ये ही त्या कलाकाराच्या नावाशी इतकी निगडीत असतात की ती वाद्येच जणू, त्या व्यक्तित्वाचा अभेद्य अंश बनून जातात. उस्ताद अली अकबर खान साहेब आणि सरोद, यांचे नाते असेच मांडता येईल. वडिलांकडून खडतर तालीम घेऊन, या वाद्यावर जे अभूतपूर्व प्रभुत्व मिळवले आहे, त्याला तोड नाही. साधारणपणे, तंतू वाद्य म्हटले की त्यातून स्वरांची "सलगता" निर्माण करणे, नेहमीच अवघड बाब असते कारण, स्वर नेहमीच तुटक स्वरूपात सादर होतात. असे असून देखील, वाद्यातून "गायकी" अंग अति तलमपणे मांडून दाखवणे, याला वेगळेच कौशल्य लागते.

https://www.youtube.com/watch?v=om3qC-T3a3U

प्रस्तुत रचनेत, सुरवातीची जी आलापी आहे, त्यातून रागाची जी "मूर्ती" उभी केली आहे, ती खास ऐकण्यासारखी आहे. प्रत्येक स्वर नितळ, स्वच्छ आणि सुरेल लावलेला आहे. एका स्वराहून दुसऱ्या स्वरावर जो "प्रवास" घडतो, तो देखील जीवघेणा आहे. खरेतर श्रुती तत्वानुसार याचे समग्र विवरण करता येणे शक्य आहे पण तरीही स्वरांचा म्हणून एक स्वभाव आणि त्या स्वभावानुसार निर्माण केलेले भावविश्व केवळ अपूर्व असे आहे. रचना, द्रुत लयीत जाताना देखील, स्वर कुठेही विस्कळीत होत नाही, किंबहुना द्रुत लयीत निर्माण केलेली "मिंड" ऐकणे, हा तर रागाच्या सौंदर्याचा विलोभनीय भाग आहे.

हिंदी चित्रपट गीतांना जर कुणी आधुनिक पेहराव दिला असेल तर तो राहुल देव बर्मन, या संगीतकाराने!! तालाच्या बाबतीत तर या संगीतकाराने इतके प्रयोग केले आहेत की ते प्रयोग ऐकताना, केवळ चकित होणे, इतकेच आपल्या हाती राहते. "अनामिका" चित्रपटातील "मेरी भिगी भिगी सी" हे किशोर कुमारने गायलेले गाणे, आपल्याला किरवाणी रागाची सुंदर झलक दाखवते. गाण्यात केरवा ताल आहे पण इथे संगीतकाराने मजा केली आहे. ८ मात्रांचा हा ताल आहे आणि याची पहिली मात्रा "धा" या बोलाने सुरु होते आणि इथे संगीतकाराने, ही मात्रा गिटारवर घेतली आहे!! सर्वसाधारण प्रघात असा, मात्रा या आघाती वाद्यांवर घेतल्या जातात पण, इथे पारंपारिक पद्धतीला बगल देऊन, गिटार वाद्याचा सूर, हीच समेची मात्रा ठेवली आहे आणि पुढील मात्रा Actopad वाद्यावर घेतल्या आहेत. परिणाम, गाण्याला संपूर्ण आधुनिक पेहराव!! याचा अर्थ, तालाचे नियम पाळले आहेत पण सादरीकरणात वैविध्य आणले आहे. सुगम संगीतात प्रयोग कसे करता येतात, याचे हे उत्तम उदाहरण मानता येईल. तालासाठी या संगीतकाराने अनेक वैश्विक वाद्यांचा उपयोग केला आहे, जसे "मादल","क्लेव्ज",'ब्लासको" किंवा प्रसंगी ज्याला "न-स्वरी" वाद्ये म्हणता येतील, उदाहरणार्थ झांजेसारखी घन वाद्ये, झायालोफोन, केस्टानेट, खुळखुळे सारख्या वाद्यांचा परिणामकारक उपयोग, हे प्रयोगात्वाचे निर्देशक म्हणता येईल.मुळात, परिणाम साधणे, हे प्राथमिक उद्दिष्ट.

https://www.youtube.com/watch?v=K0THyu8oNlw

स्वरसंहतीतत्वावर आधारलेल्या भारतीय संगीतासारख्या पद्धतीत एका वेळेस एक स्वर आणि पुढे दुसरा, असे पायाभूत वळण असते. या लक्षणालाच बाजूला सारण्याची धमक दाखवली. आवाजांचे लगाव, तुटक गायन फेक, घसीट किंवा खालच्या स्वरावरून वरच्या स्वरावर जाताना दबाव निर्माण करणे, छोटेखानी ध्वनी विलक्षण चमकदारपणे योजणे, यामुळे संबंधित सांगीत घटना गुंतागुंतीची होते. यातून आपण ठामपणे एक निष्कर्ष सहज काढू शकतो. याचे संगीत, रचनाकाराच्या संभवनीय सर्जनशीलतेच्या दर्जाविषयी खात्री पटविणारे संगीत आहे. त्याने संगीत आकारले ते चित्रपटीय सादरीकरणासाठी. परस्परविरोध, विरोधाभास आणि विसर्जित न केलेले सांगीत तणाव यांचे आकर्षण म्हणजे आधुनिक सांगीत संवेदनशीलता. या संगीतकाराकडे, विशिष्ट रागापासून दूर सरकून देखील रागाचे एकसंधपण आपल्या चाळीस देण्याची प्रशंसनीय क्षमता होती. हे गाणे वास्राविक काहीसे अंतर्मुख करणारे गीत आहे पण ती अंतर्मुखता मांडताना, संयमित भावनावेग आविष्कृत शास्त्रोक्त बाज, किंचित पातळ करून, अतिशय चांगल्या कामी लावला आहे, असे आपल्याला सहज म्हणता येईल. वाद्यांच्या वापरातून आणि रूढ सुरावटीच्या सूचनेतून, ही रचना आपले स्वतंत्र स्वरूपच व्यक्त करीत आहे.तसे बघितले सुरावट सरळ जात आहे पण लयबंध तिरकस जातो आणि आपल्याला ही रचना काहीशी अस्वस्थ करते. गाण्यातील कवितेच्या भावाशयाशी नाते राखून केलेली ही रचना, आपण सहज गुणगुणू शकतो.
आधुनिक गझल गायनात आमुलाग्र बदल करून आणि त्याचा प्रभाव पुढील पिढ्यांवर अव्याहतपणे रुजवण्याचे अलौकिक काम, उस्ताद मेहदी हसन यांच्या गायनाने केले आहे. "शोला था जल बुझाने" ही रचना ऐकताना या वाक्याचे पुरेपूर प्रत्यंतर आपल्याला येते. "किरवाणी" रागावर ही रचना निश्चित आधारलेली आहे. सुगम संगीतात, अत्यंत विपुलपणे जे ताल वापरले जातात, त्यातील "दादरा" तालात ही रचना बांधलेली आहे. शक्यतो अति ठाय लय, खर्जातील स्वरांनी सुरवात करायची आणि मंद्र सप्तक ते शुद्ध स्वरी सप्तक, इतपतच गायनाचा बराचसा आवाका ठेवायचा, अशी काही खास वैशिष्ट्ये सांगता येतील.   अर्थ असा नव्हे, तार सप्तकात गायचेच नाही पण, गाताना, आपण ज्या शायरची रचना गात आहोत, त्याच्या शब्दांवर आणि पर्यायाने आशयाच्या अभिव्यक्तीवर परिणाम होऊ द्यायचा नाही, अशी जणू प्रतिज्ञा केल्याप्रमाणे, गायन केले असल्याने, तार सप्तकात फार काळ गायन होत नाही.

https://www.youtube.com/watch?v=cDqTxSPuylk

या रचनेत, मेहदी हसन नेहमीप्रमाणे, रागाच्या शुद्धतेचे नियम पाळतात पण, तसे करताना, राग संगीतातील अलंकाराचे तंतोतंतपणे सादरीकरण करत नाहीत. वेगळ्या शब्दात, ताना घेताना, शक्यतो पूर्ण सप्तकाचा धांडोळा न घेता, ३,४ स्वरांच्या हरकती घेणे आणि घेताना, हातात असलेल्या शायरीचे सौंदर्य वाढविणे, हा उद्देश अगदी स्पष्ट दिसतो. बरेचवेळा, काही शब्द लयीच्या "मीटर" मध्ये बसणे अवघड जाते, तेंव्हा चालीला मुरड घालायला, त्यांनी कधी मागेपुढे पाहिले नाही आणि हे वैशिष्ट्य जाणीवपूर्वक, त्यांनी आयुष्यभर जपल्याचे दिसून येते.

हिंदी चित्रपट गीतांत "रवींद्र" संगीताचा वापर, ही पूर्वापार चालत आलेली घटना आहे. एकूणच, हिंदी चित्रपट गीतांत, ज्या बंगाली संगीतकारांनी बहुमोल भर टाकली, त्यात संगीतकार हेमंत कुमार, यांचे नाव अग्रक्रमाने घ्यावे लागेल. मुळातले गायक पण पुढे अनेक रचना करून, व्यामिश्र रचनाकार म्हणून मान्यताप्राप्त झाले. वास्तविक पहाता, त्यांनी शास्त्रीय संगीताचे पायाभूत शिक्षण घेतले नव्हते तरीदेखील, अतिशय मधुर, स्वरेल आणि मन:स्पर्शी गायन, ते सहज करीत असत. त्यांचे तर नेहमी असेच म्हणणे असायचे, कुठलाही रचनाकार, "रवींद्र" संगीत टाळून, रचना करणे शक्य नाही. यातील थोडा अहंकारी भाव सोडला तरी तथ्य काही प्रमाणात आहे आणि ते त्यांनी, आपल्या कारकिर्दीत दाखवून दिले. "नागीन" चित्रपटातील गाण्यांनी, त्यांची, रचनाकार म्हणून ओळख मुंबईला आणि पर्यायाने देशाला झाली. याच चित्रपटातील, "मेरा दिल ये पुकारे आजा" हे गाणे, किरवाणी रागाची दाट छाया दाखवते. केरवा तालात बांधलेल्या या रचनेत, एक अश्रूत गोडवा आहे. चाल तशी साधी, सरळ आहे पण सहज गुणगुणता येत असल्याने, ही रचना कमालीची लोकप्रिय झाली.

https://www.youtube.com/watch?v=mr_n9R3E_w4

एकूणच त्यांच्या कारकिर्दीकडे जरा बारकाईने बघितले तर काही वैशिष्ट्ये लगेच आपल्या ध्यानात येतील. हेमंतकुमारांना पाश्चात्य संगीत किंवा आगळे वेगळे स्वनरंग, यांचे फार आकर्षण दिसत नाही. त्याचप्रमाणे, अतिद्रुत आणि हिसकेबाज हालचालीस पूरक असे नृत्यासंगीत देखील फारसे आवडत नव्हते. नागीन मधील नृत्यगीते, याला प्रमाण म्हणून दाखवता येतील. तरी देखील, गाण्यात "हुंकार" इत्यादी ध्वनीद्रव्यांचा वापर करण्याची आवड, अनेक रचनांमधून आपल्याला दिसून येईल. "नागीन" चित्रपटाचे संगीत इतके गाजले की ती लोकप्रियता, त्यांना चक्क अडचणीची वाटावी, अशी परिस्थिती निर्माण झाली.  एक प्रकारचा हळवेपणा आणि अ-दृश्याची ओढ, हे भाव, त्यांच्यातील रचनाकाराला नेहमी आव्हानात्मक वाटावेत, इतक्या मुबलक प्रमाणावर त्यांनी रचना केल्या आहेत. अर्थात, अशा रचनांवर देखील कुठेतरी "रवींद्र" संगीताची पडछाया दिसून येते. 'रवींद्र" संगीत(च) नव्हे तर बंगाली लोकसंगीतातील "बाउल""कीर्तन" या शैलींचा देखील अतिशय परिणामकारक वापर केलेला आढळतो. मघाशी मी ज्या "अ-दृश्य" गीतांचा उल्लेख केला, त्यात परत, लयहीन अंतलक्षी कुजबुज, मग्न पठण, यांचा मुख्य हेतू म्हणून हळूहळू गायनापर्यंत पोहोचणारी संगीतस्पंदने, यातून गीत उभे करण्याचे त्यांचे कौशल्य खास वाखाणण्यासारखेच होते. अशी गाणी जणू, आपल्याला ते संगीतमय धुक्यात गुरफटून टाकण्याची अलौकिक किमया करतात. जरी पाश्चात्य संगीताकडे ओढा नसला तरी देखील, काही रचनेतून, त्याचा अंधुकसा प्रत्यय नक्कीच येतो.

आता आपण, "किरवाणी" रागावरील काही गाण्यांचा आस्वाद घेण्यासाठी, खालील रचनांच्या लिंक्स ऐकुया.
सूरसुखखनी तू विमला - वसंतराव देशपांडे
https://www.youtube.com/watch?v=Nug2yKgi0iw

आंखो से जो उतरी है दिल मे - ओ.पी.नैय्यर
https://www.youtube.com/watch?v=qitBaM3Ly8s

Wednesday 28 October 2015

हिंदी चित्रपट गीत - एक व्यापक दृष्टीकोन!!

हिंदी चित्रपट संगीत हे सर्वसामान्य लोकांना इतकी वर्षे आकर्षित करीत आहे, यात शंकाच नाही आणि दिवसेगणिक त्याची लोकप्रियता वाढत आहे. कालानुरूप प्रतवारी बदलत असते आणि गाण्याचा कार्यकारणभाव तसेच निर्मिती देखील बदल स्वीकारत असते. याचा परिणाम असा झाला, चित्रपट संगीताच्या लोकप्रियतेत कधीही खंड पडला नाही. हे संगीत साधे आहे, सर्वसमावेशक आहे, त्यात फार गुंतागुंत नाही (रागदारी संगीताच्या संदर्भात) ही आणि अशी आणखी अनेक कारणे, लोकप्रियतेची निदर्शक म्हणून मांडता येतील. परंतु, याचाच दुसरा भाग असा झाला, चित्रपट संगीताचा कधीही अभ्यासपूर्ण व्यासंग झाला नाही आणि ही एकूणच भारतीय संगीताच्या वाटचालीच्या मार्गातील उल्लेखनीय कमकुवत दुवा ठरू शकतो. आपल्याकडे पहिल्या पासून, हिंदी चित्रपट संगीता विषयी विलक्षण उदासीनता आढळते आणि ती अशी की, हे संगीत अजिबात अभ्यास करण्याच्या लायकीचे नाही किंवा तोंडात सुपारी चघळत ठेवावी इतपतच, या संगीताचा आस्वाद. त्यामुळे, या संगीताकडे कधीही गंभीरपणे लक्ष दिले गेले नाही. वास्तविक, ज्या संगीताने अखंड भारत बांधला गेला आहे, ते संगीत इतके दुर्लक्षित करण्याच्या लायकीचे आहे का? आणि लोकप्रियता हा फक्त "उथळ" निकष आहे, असे मानणे कितपत संय्युक्तिक ठरते? संगीताच्या ज्या ६ महत्वाच्या कोटी मानल्या जातात, त्यापैकी जनसंगीत ही कोटी नेहमीच दुर्लक्षित केली गेली आहे. कलेला जनाधार आवश्यक असतो आणि जिथे व्यापक प्रमाणावर जनाधार आहे, तिथेच अभ्यासाची वानवा आहे!! यात काही विसंगती आहे असे वाटत नाही का? या इथे, या संदर्भात दोन प्रश्न उपस्थित करणे आवश्यक ठरते. हिंदी चित्रपट संगीताचे स्वरूप काय? आणि कशा तऱ्हेचा अभ्यास फलदायी ठरेल? पहिल्या प्रश्नाचे उत्तर सरळ आहे. जे संगीत हिंदी चित्रपटासाठी रचले जाते, ते हिंदी चित्रपट संगीत!! आता, आपली अधिकृत भाषा हिंदी असल्याने आणि या भाषेला बऱ्यापैकी दीर्घ इतिहास असल्याने, या भाषेला अनेक उपभाषांनी समृद्ध केले आहे. उदाहरणार्थ, "मगधी","अवधी","ब्रज","राजस्थानी","पंजाबी","पहाडी" इत्यादी अनेक प्रादेशिक भाषांनी, या हिंदी भाषेत लक्षणीय भर टाकली आहे. त्यामुळे, हिंदी चित्रपट संगीत, देशाच्या अंतर्गत भागात देखील व्यापक प्रमाणावर पोहोचले आणि लोकप्रियतेला हातभार लागला. आता, हिंदी चित्रपट संगीताकडे गांभीर्याने बघणे अभ्यासकांना जमले नाही किंवा त्यांनी उत्साह दाखवला नाही याचे आणखी एक कारण बघणे योग्य ठरेल. इथे आणखी एक मुद्दा विचारार्थ घ्यावा लागेल. हिंदी चित्रपट संगीताच्या स्वरूपातील काही अंगभूत गुणधर्मामुळे त्यास बाजूला ठेवले जात आहे का? विविधता, लोकप्रियता इत्यादी कारणांखेरीज हिंदी चित्रपट संगीताचा विचार इतक्या कसोशीने करण्याचे महत्वाचे कारण म्हणजे सांगीत कल्पनांच्या अभिसरणातील त्यांची भूमिका. इथे दोन विचार गृहीत धरावे लागतील. या संगीतामुळे पसंत वा मान्य ध्वनी, आवाज, सादरीकरणाच्या लयी तसेच संगीताची योजना करण्याचे प्रसंग यांविषयी सार्वत्रिक प्रथा रूढ होऊ लागल्या आहेत. अर्थात हा भाग दोषी नाही पण याला दुसरी बाजू अशी आहे, अत्यंत बहुविध आणि पुष्कळ बाबतींत विचक्षण नसलेल्या श्रोते-प्रेक्षकांमुळे हिंदी चित्रपट संगीताचे स्वरूप ठरत असल्याने काही समान सांगीत बाबींचे व त्याच्या प्रभावांचे सर्वत्र वितरण होणे हा खरे निकृष्टाचा प्रसार अभावितपणे होतो. हा मुद्दा देखील विचारात घेणे जरुरीचे आहे. खरे म्हणजे भारतीय संगीत,, भारतीय जनसंगीत आणि चित्रपट संगीत, या तिघांनी पुरवलेल्या परिप्रेक्षांमधून हिंदी चित्रपट संगीताचा अर्थ लावला पाहिजे. म्हणजेच भारतीय संगीत -- भारतीय जनसंगीत -- भारतीय चित्रपटसंगीत -- हिंदी चित्रपटसंगीत -- हिंदी चित्रपटगीत अशी ती साखळी आहे. चित्रपटगीत - संगीताची तपासणी अधिक सहेतुक करणे जरुरीचे आहे आणि त्यासाठी आणखी काही पायाभूत आणि सांकल्पनिक कारणे आहेत. आपल्याला से आढळून येईल, विवश कारणामुळे चित्रपटीय संज्ञापन भाषिक संज्ञापनाप्रमाणेच राहणे अपरिहार्य आहे आणि हा विचार निश्चितपणे विचार करण्यायोग्य आहे. एक बाब इथे ध्यानात घ्यावीच लागेल. अनेकदा हिंदी चित्रातगीत आपली चित्रपट बाह्य मार्गक्रमणा इतक्या जोमदारपणे करतात की, चित्रपटाचे आवाहन म्हणजे चरित्ररेखांबरोबरचे प्रेक्षकांचे तादात्म्य वगैरे उपपट्टी खूप ताणून धरल्या तरच गीताच्या आकर्षणाचे काही प्रमणात स्पष्टीकरण देऊ शकतील. अजूनही चित्रपटसंगीताचे कार्य वेळ/जागा भरून काढण्याचे म्हणजे काहीसे दुय्यम स्वरूपाचे आहे असे मानण्याचा मोह अनेकांना होतो. दृश्य अवधान नॆहमी खंडित असते आणि म्हणून संगीत हवे असे प्रतिपादन केले जाते. पण त्याचबरोबर श्रव्य अवधानाची कालमर्यादा किती, हा प्रश्न विचारणे अनुचित ठरेल का? अवधानमर्यादा म्हणून ज्या २२ सेकंदाचा उल्लेख केला जातो तेवढ्या मर्यादेत किती श्रव्य अनुभूती आणि संगीत घेता येते" याला नेमके उत्तर काय? चित्रपटीय सांगीत आविष्कारात, भारतात काही महत्वाचे मुद्दे लक्षात घेणे जरुरीचे आहे. [१] गाण्याची चाल ही काही तालांच्या मात्रांपर्यंत जवळीक साधणारी असते. सबब ठराविक ताल जसे, दादरा,केरवा किंवा तीनताल सारखे ताल विपुल प्रमाणात उपयोगात आणले जातात. [२] गाण्याची चाल बांधताना अचानक नवीनच ध्वनी उपयोगात आणून गाण्याची खुमारी वाढवण्याची कलात्मकता ऐकण्यासारखी असते. काहीवेळा ज्याला "न-स्वरी" म्हणता येतील, अशा ध्वनीचा वापर करून चमत्कृती साधलेली दिसते. [३] गाण्यातील शब्दांचे अर्थ, आशयाला केंद्रित मानून मांडले जातात आणि त्यानुसार स्वररचनेचा भाव आणि पोत बदलला जातो. [४] चित्रपट गीत हे प्रामुख्याने सामान्य माणसांसाठी रचलेले असते आणि हा मुद्दा लक्षात ठेऊन, बऱ्याच वेळा स्वररचना ही सगळ्यांना गुणगुणता येईल अशी सहज, साधी बांधलेली असते, जेणेकरून पायाभूत प्रशिक्षण न घेणारे देखील गाणी मनातल्या मनात गुणगुणू शकतात आणि स्वरानंद घेऊ शकतात. [५] बऱ्याच वेळा चित्रपटात नृत्यगीतांचा समावेश असतो. अर्थात नृत्य म्हटले की त्याचे शास्त्र अवगत असणे क्रमप्राप्तच ठरते परंतु चित्रपट माध्य हे सर्वसामान्य लोकांसाठी देखील उपलब्ध असते, हे ध्यानात घेऊन, चित्रपटातील नृत्यगीते ही साधी असतात. त्यासाठी खास शिक्षण घ्यायची गरज नसते आणि अशा स्वररचना प्रामुख्याने तालाला केंद्रीभूत ठेऊन गीतांची बांधणी केली जाते. [६] चित्रपट गीते प्रामुख्याने मनोरंजनात्मक असतात जेणेकरून दैनंदिन विवंचनांपासून दूर जाता येईल. त्याचबरोबर, इथे बौद्धिक परिश्रम घेण्याची गरज भासू शकते. म्हणजेच चित्रपट गीत हे सर्वसामावेशक असते. ज्यांना ज्या प्रकारचे मनोरंजन हवे, त्याप्रकारे संगीताविष्कार मिळू शकतो. चित्रपट संगीताचे स्वरूप, कार्यपद्धती आणि मूल्यमापन नीटपणे करायचे झाल्यास, या ६ मुद्द्यांची जाण आवश्यक. हिंदी चित्रपटसंगीत विषयक आजच्या लिखाणात हा विवेक फारसा नसतो!! ही आजच्या काळाची गरज आहे कारण मूल्यमापन केल्याशिवाय, निर्मितीचा दर्जा ठरवणे अशक्य आणि मग सरधोपट वृत्ती बोकाळते. हिंदी चित्रपटसंगीत अशा वेगवेगळ्या पातळींवर उलगडून समजून घेणे आवश्यक आहे. वास्तविक बघता, चित्रपट कलेला "अभ्यासशाखा" म्हणून मान्यता मिळाली पण तरीदेखील ज्या चित्रपटात संगीत हा घटक अत्यावश्यक असतो, तो घटक "अभ्यासशाखा" म्हणून होत नाही, हे दुर्दैव म्हणायला लागेल.

Friday 23 October 2015

लोभस मधुवंती

मंगेश पाडगांवकरांच्या एका कवितेत,
"निकट असूनही श्वासापुरते दूर असावे 
जवळपणातही पंखांना आकाश दिसावे 
हवे वेगळेपण काहीतरी मीलनातही सखी अपुल्यातून 
इतुके आलो जवळ जवळ की जवळपणाचे झाले बंधन". 
आत्ममग्न तळ्याकाठी आत्मरत व्हावे, तसे होत असताना मिलनाची जाणीव संदिग्ध मनाच्या आंतरिक ओढीतून व्यक्त व्हावी, साथीला काठावरील वृक्षांच्या सळसळीची मंद साथ असावी आणि पाण्याच्या संथ लाटांमधून "कोमल गंधार" प्रतीत व्हावा!! तो इतका नाजूक असावा की त्याचे निरपेक्ष अस्तित्व देखील, जडशीळ भासावे. शांततेला श्वासांचा देखील अडसर वाटावा, इतकी हळुवार शांतता पसरलेली असावी. 
मधुवंती रागाची कल्पना वरील वाक्यांवरून थोडीफार यावी. "औडव-संपूर्ण" जातीच्या या रागात, आरोही स्वरांमध्ये, "रिषभ" आणि "धैवत" वर्ज्य असून, "कोमल गंधार" आणि "तीव्र मध्यम" स्वरांनी सगळा अवकाश भारून टाकण्याची असामान्य ताकद दिसते. प्राचीन ग्रंथांतून रागाचा समय, दिवसाचा चौथा प्रहर असा दिला आहे. वास्तविक, या रागाचा विस्तार तसा फार प्रचंड नाही पण, तरीही मन भरून टाकण्याची असामान्य ताकद या स्वरांमध्ये आहे. फार वक्र गतीच्या ताना नाहीत पण, हरकती, मुरकतींच्या वळणांनी रागाला प्रसन्न व्यक्तिमत्व दिले आहे. "नि सा म","म ग(कोमल) रे सा","ध प म ग(कोमल) म ग(कोमल) या स्वरसंहती या रागांत फार वेळा आढळतात. 

"रामपूर साहसवान" घराण्याचे सध्याचे आघाडीचे गायक म्हणून उस्ताद रशीद खान यांचे नाव घ्यावे लागेल.  वास्तविक, हे घराणे, "ग्वाल्हेर" घराण्याशी फार जवळचा संबंध राखून आहे पण तरीही, "बोल-आलाप" किंवा "बोल-ताना" किंवा ज्याला "बेहलावा" म्हणता येईल, अशा प्रकारच्या गायकीत ग्वाल्हेर घराणे अधिक प्रभावी आहे. रशीद खान यांच्या गायकीबद्दल असे ठामपणे म्हणता येईल, स्वरोच्चारात जितका म्हणून मृदुपणा आणता येईल, तितका आणला जातो. इथे त्यांच्या गायकीवर, उस्ताद अमीर खान साहेबांचा प्रभाव जाणवतो. याचा परिणाम असा होतो, गायकी भावगर्भतेकडे अधिक झुकते. असे देखील म्हणता येईल, रागदारी संगीतातील भावगीत गायन म्हणजे रशीद खान यांची गायकी!! शक्यतो मंद्र सप्तकात किंवा शुद्ध स्वरी सप्तकात गायन करण्याकडे जास्त प्रवृत्ती.   

या रचनेत देखील, वर मांडलेल्या गुणांचाच आढळ आपल्याला आढळेल. रचना शक्यतो ठाय लयीत मांडायची आणि तसे करताना, "बोल-आलाप" किंवा "बोल-ताना" या अलंकारांचा सढळ वापर करायचा. सरगम घेताना देखील, स्वरांना मृदुत्व प्रदान करण्याची सवय प्रभावी ठरते. मध्य सप्तकातून, मंद्र सप्तकातील सुरांवर उतरताना देखील आणि समेवर स्थिरावताना देखील, गायक शक्यतो "आघाती" सूर न घेता, एखाद्या रेखीव,कोरीव आणि नाजूक शिल्पाप्रमाणे समेवर स्थिरावणे असते. कुठेही लय सांभाळण्यासाठी "आड बिकट" वळण घेण्याची गरजच पडत नाही. एकूणच गायकीत "जोरकस" वृत्ती न आढळता, स्वरांचा शांत प्रवाह, संतत धारेनुसार प्रवाहित ठेवणे, अशीच वृत्ती दिसते. खर्जात स्वर लावताना देखील, कुठे कुठे "मुर्घ्नी" स्वर लावलेला ऐकायला मिळतो पण त्यासाठी कुठेही "आटापिटा" केल्याचे दिसत नाही.    

हिंदी चित्रपटसंगीताला आधुनिक "तोंडवळा" देण्यात, ज्या संगीतकारांचा महत्वाचा हात आहे, त्या यादीत, "शंकर/जयकिशन" या जोडगोळीचे नाव अग्रक्रमाने घ्यावेच लागेल. चित्रपटगीतांसाठी शंभर वादकांचा ताफा पदरी बाळगण्याची "ऐश" या संगीतकार जोडींनी केली आणि "वाद्यमेळ" ही संकल्पना पुढच्या पायरीवर आणून ठेवली. विशेषत: रागदारी संगीतात, पाश्चात्य संगीताचे मिश्रण बेमालूमपणे करण्याचा प्रयोग, यांनी यशस्वी केला, असे म्हणता येईल. जरा बारकाईने रचना तपासल्या तर, एक ठळक वैशिष्ट्य आपल्याला सहज जाणवते. या जोडीने, "भैरवी" रागाचे केलेला उपयोग. आपण जी रचना ऐकणार आहोत, ती जरी "मधुवंती" रागावर असली तरी, चालीत काही ठिकाणी "भैरवी" डोकावते. "अज हुं ना आये बालमा" हे "सांज और सवेरा" चित्रपटातील गाणे, मोहम्मद रफी आणि सुमन कल्याणपूर यांनी गायलेले, आता आपण ऐकुया. तसे बघितले तर या संगीतकार जोडीने, गाण्यात "तालाचे" फार प्रयोग केले नाहीत पण, लयीच्या वेगवेगळ्या बंधांनी, गाणे सजविणे आणि आपण, चित्रपटातील गाणे करीत आहोत, याची जाणीव कायम ठेवली. प्रसंगी, चित्रपटातील प्रसंगानुरूप, चालीत बदल करण्याची देखील त्यांची तयारी असायची. "केरवा" तालातील गाणे, ऐकायला अतिशय श्रवणीय आहे. रागाचा आधार घेतला आहे पण गाण्याची कुठेही "बंदिश" होणार नाही, याची योग्य ती काळजी घेतली आहे.  


या संगीतकाराच्या यशाचे मूल्यमापन करायचे झाल्यास, यांना द्रुत लयीचे आकर्षण अधिक आढळते. बहुतेकवेळा भारतीय ताल वापरताना, त्यातील नियंत्रित आणि सुट्या लयस्पंदातून कलागती दाखवणाऱ्या पाश्चात्य पद्धतीचे सांगीत लयबंध समोर ठेवतात. या शिवाय, भरघोस वाद्यवृंद, एकमेकांस छेद देणाऱ्या स्वरधुनी आणि समूहघोषगायनाचा मुबलक वापर हे देखील खास विशेष सांगता येईल. आणखी एक बाब सांगण्यासारखी आहे, लय द्रुत ठेऊनही चरणाचे गायन, मात्र तिच्या निम्म्या गतीने वगैरे ठेवण्याची लकब खासच म्हणावी लागेल. अशी बरीच उदाहरणे सापडतील आणि या संदर्भात आणखी एक विधान करता येईल. रागाचा आधार घेताना, रागापासून दूर जाउन, त्यांनी सांगीत संवेदनशीलतेचे आणि सर्जनशीलतेचे अप्रतिम आदिनमुने पेश केले आहेत. अर्थात, प्रसंगी, रागाच्या ठाशीव मांडणीप्रमाणे देखील रचना निर्माण केल्या आहेत. 

संगीतकार मदन मोहन हे नाव, असेच हिंदी चित्रपट गीतांतील एक प्रथितयश नाव. वास्तविक, शास्त्रीय संगीताचे पद्धतशीर शिक्षण न घेता देखील, आजन्म भारतीय संगीतावर आधारित रचना सादर करून, सगळ्यांना चकित करून टाकले. अर्थात, याचा परिणाम असा झाला, सुगम संगीतासाठी (रचनेसाठी तसेच गायनासाठी) शास्त्रीय संगीत शिकण्याची अजिबात गरज नाही, हा समज पसरण्यात झाला. एकूणच सगळ्या रचनांचा आढावा घेतल्यास, या संगीतकाराचा ओढा, हा उपशास्त्रीय संगीताकडे अधिक होता आणि त्यातूनही, "बरकत अली" आणि "बेगम अख्तर" यांचा प्रभाव असल्याचे जाणवते आणि त्या दृष्टीने असे देखील विधान करता येईल, मदन मोहन यांनी, हिंदी चित्रपट गीतांत "लखनौ" घराणे निर्माण केले. इथे आता आपण, "रस्मे उल्फत को निभाये" ही अतिशय अप्रतिम रचना ऐकायला घेऊया. "दिल की राहे" चित्रपटातील गाणे, केरवा तालावर आधारित, बांधलेले आहे. इतर प्रतिभावंत संगीतकारांप्रमाणे या संगीतकाराने देखील, बरेचवेळा रागाची चौकट मोडून, वेगवेगळ्या लयींच्या आधारे गाण्यात भरपूर प्रयोग केले आणि अर्थात, आणखी एक बाब मांडवी लागेल, रचना कितीही अवघड बांधली तरी गाण्यातील शब्दकळेचा दर्जा नेहमीचा अभिनंदनीय राखला. सुगम संगीतात, हा धोका अनेक वेळा घडतो आणि चालीच्या सोयीसाठी, शब्दांची मोडतोड केली जाते. मदन मोहन यांनी त्याबाबत, शब्दांना बहुतेकवेळा योग्य तो सन्मान दिला. 


मदन मोहन यांची प्रतिभा गीतधर्मी होती. अशा प्रकारचे संगीतकार, लयबंधापेक्षा सुरावटीकडे आणि प्रवाही चलनांकडे झुकलेले असतात. स्वनरंगातील सूक्ष्म भेद दाखवून, अनुभवास येणारी गतिमानता ते पसंत करतात. त्यांच्या रचनांचे मुखडे गुणगुणत राहावे असे असतात. तसेच मुखड्यानंतर येणारी कडवी अशी असतात की त्यांचा उद्भव साखळीतील दुव्यांप्रमाणे कार्यरत असलेल्या वाद्यवृंदाशिवाय सहज, नैसर्गिकपणे शक्य असतो. द्रुतगती, गुंतागुंतीच्या पण उस्फुर्त वाटणाऱ्या सांगीत वाक्यांशासाठी चालीत मुबलक जागा सोडलेल्या असतात. विशेषत: गझल ऐकताना, एक सूचकता भावप्रतिमांचे तरंग उमटविते.  या संगीतकाराला वेदनेचे फार आकर्षण असल्याचे प्रतीत होते. याचा परिणाम असा होतो, त्यांच्या रचना चैतन्यमय चलनांत फारशा रहात नाहीत. काहीतरी गमावल्याची धुसर हळहळ, या भावस्थितीच्याच वेगवेगळ्या छटा शोधीत राहणे, आपल्या सांगीत कार्याचे त्यांनी जणू ध्येय मानल्यासारखे बरेचवेळा जाणवते. ऐकणाऱ्यांना दिपवणे वा ध्वनिकल्लोळात बुडवून टाकणे, त्यांना अभिप्रेत नाही. सैलसर बांधणीने भावनिक तरंगाच्या लीलेस अनुकूल रचना उभारणे, हेच त्यांच्या संगीताचे खरे रूप होते, असे ठामपणे मांडता येते. त्यासाठी, सांगीत आणि साहित्यिक स्पंद एकमेकांत गुंतलेल्या वेलींप्रमाणे यायला हवेत, याचा त्यांना ध्यास होता. 
या रागाची आणखी सुंदर ओळख आपण, खालील गाण्यांच्या लिंक्स मधून घेऊया. 

बहरला पारिजात दारी - माणिक वर्मा 

को बिरहा को दुख जाने - लता मंगेशकर 

Wednesday 21 October 2015

स्वगत

संध्याकाळपासून हवा किंचित थंड झालेली असल्याने, मन:स्थिती शांत होती. सध्या संगीतावर लिखाण करण्याचा ओघ बराच वाढला आहे, त्यातून वर्तमानपत्री लिखाण म्हणजे काळाशी जुळवून, हमखास लिखाण अभिप्रेत असल्याने, कधी कधी मनात शंका येत आहे, लिखाणातील "उस्फूर्तता" कमी होत चालली आहे की काय? अर्थात, तशी उस्फूर्तता कमी होणे, परवडण्यासारखे नाही. एक फायदा नक्की झाला, केवळ मूड वर अवलंबून लिखाण करायचे दिवस संपले आणि लिखाणाला थोडी शिस्त लागली. खरतर, मला वाचनाचा भरपूर छंद आहे, घरात कितीतरी पुस्तके वाचायची, म्हणून कपाटात पडून आहेत. काही वर्षापूर्वी परदेशातून कायमचे मुंबईला राहायचे ठरवल्यावर, सुरवातीच्या काळात, हाताशी काहीच उद्योग नसल्याने, भरपूर वाचन झाले. त्यातून, त्या पुस्तकांवर अभिप्रायात्मक बरेच लिहून झाले. त्या निमित्ताने, माझ्या ब्लॉगवर देखील त्यातले काही लेख ठेवले गेले. परदेशात असताना, वेळ घालवायचे साधन म्हणून, ब्लॉग उघडला आणि त्याच्या वर हळूहळू लेख टाकायला लागलो. आजमितीस जवळपास, १७० लेख झाले. वास्तविक, याचा आनंद वाटायला हवा पण, आत्तातरी असेच वाटते, आपण, लिहिण्याच्या बाबतीत थोडा अधिरेपणा दाखवला. पुस्तकांचा विषय रक्तात मुरु द्यायला हवा होता, त्यावर थोडाफार साधक-बाधक विचार करून, मगच लिहायला हवे होते, आवेगावर थोडे नियंत्रण ठेवायला हवे होते. सध्या तर वाचन फारच मंदावले आहे. 
आज संध्याकाळी, मात्र ठरवून वाचायला घेतले आणि मनात सारखे यायला लागले, आपण - संगीत सोडून वेगळे काहीतरी लिहायला हवे पण नक्की काय लिहायचे, याबाबत थोडी संभ्रमावस्था आहे. पण विचार केला, सुरवात तर करू, काहीतरी सुचत जाईल. संगीत हा माझ्या अति जिव्हाळ्याचा विषय खरे पण तोच एकमेव आहे का? मराठी कवितांबाबत आपण, तितके सजग नाही का? आणि क्रिकेट? एकेकाळी, क्रिकेट म्हणजे जिवाभावाचा मित्र होता पण पुढे, नाद सुटला!! वास्तविक साऊथ आफ्रिकेत क्रिकेटला पोषक असे भरपूर वातावरण आजूबाजूला होते पण, तेंव्हा वय आड आले आणि केवळ मैदानाच्या बाहेर राहून, सामन्यांची मजा घेणे, इतकेच आपण केले. 
कितीतरी मराठी कविता अजूनही, जिभेवर आहेत आणि त्या तशा आहेत, याचा आपल्याला किंचित अभिमान देखील जाणवत आहे. अजूनही, मला असेच वाटते, कविता हे साहित्यातील सर्वात लवचिक, उस्फुर्त आणि गोळीबंद अनुभव देणारे माध्यम आहे आणि अजूनही आपला रस टिकून आहे. मला कधीही, कवितेत, कालानुरूप पंक्तिप्रपंच करावासा वाटला नाही आणि तसे वाटणे, हे किती भाग्याचे!! त्यामुळे अभिरुची तर टवटवीत राहते पण त्याच बरोबर, शब्दांतील गूढ आशय, आपल्या अनुभवांच्या कक्षा रुंदावत नेतो, हे जाणवायला लागते. एक व्यक्ती म्हणून घडण्याच्या "प्रोसेस" साठी, मला हे  वाटते. पण कधी कधी मनात प्रश्न येतो, केवळ मला या गोष्टी आवडतात म्हणूनच त्या योग्य आहेत, असे म्हणणे, हा "अहंकार" तर होत नाही ना? या विषयांच्या पलीकडील विषय देखील, आपले व्यक्तिमत्व समृद्ध करू शकत असतील, फक्त आपण तिकडे बारकाईने लक्ष देत नाही, इतकेच असेल!! 
त्याचबरोबर, आत्ता आणखी एक विचार मनात आला. माणसाला, एखाद्या विषयात तरी, "संपूर्ण" ज्ञान प्राप्त होऊ शकते का? जर नसेल तर इतर विषयांबाबत, मनात ध्यास धरणे कितपत योग्य आहे? का ही माझी मीच केलेली फसवणूक आहे? आज मितीस, मी संगीत सजगतेने ऐकायला सुरवात करून, जवळपास ३५ वर्षे नक्की झाली पण या ३५ वर्षांत, "संगीत" या विषयाचा कितपत अंदाज आलेला आहे? अधिकारवाणीने, मी ठाम काही मांडू शकतो का? तसेच कवितेबाबत मी म्हणू शकतो का? क्रिकेट खेळाचे सगळे प्राथमिक नियम पाठ आहेत, त्यातील सौंदर्य अनुभवण्याची ताकद आहे पण म्हणून, मला हा खेळ संपूर्णपणे अवगत झाला आहे का? 
कलेच्या क्षेत्रात असे कसलेच नियम नसतात, असे म्हणणे, ही धूळफेक तर नव्हे? कला अनंत असते, जितके तुम्ही समजून घ्याल, तितका धुसर प्रदेश अधिक खोलवर जाणवायला लागतो, वगैरे वाक्ये फसवी आहेत का? खरतर, "ज्ञान" या शब्दाला(च) काही अर्थ आहे का? ज्याला आपण "ज्ञान" म्हणतो, ते तर केवळ मृगजळ स्वरूपात वावरत असलेले अस्तित्व आहे का? खरे म्हणजे, "ज्ञान" असे काही नसतेच!! सगळा प्रकार म्हणजे माहिती गोळा करण्याची प्रक्रिया असते!! नियतीने फेकलेल्या फासात अडकवून घेण्याची हताश धडपड, असेच काहीसे अर्धवट विधान करता येईल का? 
अगदी साधे उदाहरण मनात आले. लताची गाणी ऐकणे, हा आपल्या विश्रब्ध मनाचा आवडता खेळ आहे आणि मी जिवंत असे पर्यंत, कायम मला सोबत करणारा खेळ आहे. इतके आपण त्यात गुंतलो असताना देखील, आजही, लताची काही गाणी, आपल्या मनावर अर्धुकलेले गारुड कसे पसरते? याचा विश्लेषण करण्याचा अनन्वित प्रयत्न करून देखील हाती काहीच लागले नाही!! पारा चिमटीत पकडण्याचा अयशस्वी प्रयत्न, आपल्याकडून प्रत्येक वेळी होत असतो. गाणे ऐकून झाल्यावर, आज काहीतरी नवीन हाती लागले, असे वाटत असताना, ती गायकी, मनातून निसटून जाते आणि परत मी, आहे त्याच ठिकाणी उभा असल्याचे दिसते!!  मनाची एकाग्रता एकवटली जात नाही का? बहुदा तसेच काहीतरी कारण असावे!! असे तर नाही, मीच माझ्या मनाची समजूत घालत आहे किंवा फसवत आहे? एक काहीतरी नक्की. 
कवितेबाबत देखील असेच प्रत्येकवेळी घडते. कवितेचा "मुखडा" समजून घेई पर्यंत, पुढील ओळींचे गारुड मनावर पसरते आणि आधीच्या ओळींतील आशय धुसरावस्थेत जातो. मनाची चरफड होते पण, केवळ हताशता, हाती लागते. मनात एकाच वेळी अनेक विचारांचे आवर्तन चालू असल्याचा हा परिणाम असतो का? शक्य आहे. अजूनही मनात, कविता आणि भावकविता, याबाबत नेमकेपणा मांडायचा आपण प्रयत्न करीत असतो आणि मांडताना बरेचवेळा लेखनात भावविवशता अधिक येते आणि सगळेच विस्कळीत होऊन बसते!! असे तर नव्हे, कवितेच्या ओळी वाचताना, ओळींमधील, लयीचा प्रभाव अधिक पडते आणि त्या लयीच्या अंगाने वाचताना, आशयाची लय कुठेतरी हरवते!! संगीताचा प्रभाव, मनावर अधिक असल्याचा हा परिणाम म्हणायचा का? तसे असेल तर मग, आपले कवितेवरील प्रेम "बेगडी" म्हणायला हवे पण तसे म्हणायला, आपले मन धजावत नाही - हा अहंकार? कविता करणे, मला कधीच जमले नाही आणि यापुढे कधी जमणार नाही!! अशी मनाची खात्री नेमकी कधी झाली? आयुष्यात कधीही दोन लयबद्ध ओळी लिहायचा प्रयत्नच केला नाही, म्हणून आज अशी काहीशी विफलतेची भावना मनात रुजत आहे का? कविता लिहिणे जमत नाही म्हणून आपण कवितेच्या आस्वादाच्या मार्गाला लागलो का? आणि आस्वाद तरी कितपत जमला आहे? एखादी कविता आवडते म्हणजे आपल्या मनातील काही अनुभवांशी त्या कवितेची तार जुळते, असे भासते. असेच असते का? असे असताना देखील काही कवितांच्या बाबतीत, प्रत्येक वाचनात, मनात अर्थाचे वेगवेगळे धुमारे का फुटतात? की तीच कवितेची अंगीभूत शक्ती आहे? तसे असेल तर, कुठलीही सक्षम भावकविता आपल्या कवेत, संपूर्णपणे कधीच येऊ शकणार नाही का? 
सध्या एकूणच मनोवस्था बरीचशी द्विधा झाली आहे, हे तर खरेच आहे. सुरवातीला लिहिले, आज मन:स्थिती शांत आहे. शांत आहे तर मग हे जे काही लिहिले आहे, हे त्याचेच प्रतिक म्हणायचे का?  गेल्या काही दिवसांत काही जवळच्या व्यक्तींचे मृत्यू सहन करावे लागले, काहींच्या प्रकृती नको तितक्या गंभीर झाल्या. मध्यंतरी माझी प्रकृती देखील अशीच हेलकावे घेत होती. या सगळ्याचा परिणाम आपल्या विचारांवर होत आहे/झाला आहे का? असू शकेल कारण असे असे परिणाम आपल्याला दृश्य स्वरूपात मांडता येत नसतात. 
मला नेहमी असेच वाटत असते, आपल्या आवडत्या विषयाचा शक्यतो सांगोपांग व्यासंग करायचा, जेणेकरून आपल्याला अधिकाधिक माहिती समजत जाईल आणि त्यायोगे मनावरील जुन्या विचारांची जळमटे काढून टाकता येतील. आयुष्यात, एखादा विषय जरी बऱ्यापैकी समजून घेता आला, तरी ते यश रग्गड मानावे, हा आपला आवडता विचार. संपूर्ण यश किंवा माहिती, ही तर केवळ स्वप्नावस्था!! प्रत्यक्षात कधीही अस्तित्वात न येणारी!! असे असताना, मी बरेचवेळा अतिरेक करतो का? भासमान स्वप्नसृष्टीला वास्तवतेची झालर लावण्याचा असफल प्रयत्न तर करत नाही ना? 
फार पूर्वीपासून, मी एक खेळ खेळत आलो आहे. सकाळची आन्हिके संपवत असताना, आरशासमोर उभे राहायचे आणि स्वत:च्या चेहऱ्याकडे टक लावून बसायचे. अजूनपर्यंत, मी एक मिनिट देखील, स्वत:च्या चेहऱ्याकडे शांतपणे बघू शकलो नाही!! बघत असताना, आदल्या दिवशी केलेला खोटेपणा सगळा मनात साचायला लागतो आणि दृष्टी खाली वळते. याचाच वेगळा अर्थ, मी अजूनही खोटेपणा करत असतो आणि असे असताना देखील, संगीत किंवा कवितेसारख्या अत्यंत लवचिक कलेतील मर्म शोधण्याचा ध्यास घेतो!! किती मोठा हा विरोधाभास आहे!! 
भर्तृहरीच्या शब्दात लिहायचे झाल्यास, " सर्वं यस्य वशादगात्स्मृतीपथम कालाय तस्मै नम:" हेच खरे वास्तव म्हणायचे का? हाच प्रश्न पडला आहे.    

Tuesday 13 October 2015

अमीट कलावती



"जें मत्त फुलांच्या कोषातुन पाझरले,
निळ्या लाघवी दंवांत उलगडले,
जें मोरपिसांवर सांवरले,
      तें --त्याहुनही --आज कुठेंसे 
      पुन्हा एकदां 
      तशाच एका लजवंतीच्या 
      डोळ्यांमध्ये -- डोळ्यांपाशी --
      झनन -झांझरे मी पाहिले… 
      पाहिलें न पाहिलें." 

पु.शि. रेग्यांच्या या ओळी वाचताना, आणि पुढील सगळी कविता वाचताना,मला नेहमी "झनन -झांझरे किंवा "ठिबक-ठाकडे" असे शब्द वाचायला मिळतात. वास्तविक, हे शब्द म्हणजे नादवाचक शब्द आहेत पण कवितेच्या आशयात अगदी नेमके बसले आहेत, इतके की त्यातून फार मोठा गहिरा आशय व्यक्त होतो. भावकवितेची बंदिश बांधताना, असे शब्द फारच चपखल बसतात. कलावती रागाचा विचार करताना, या ओळी माझ्या मनात बरेचवेळा येतात. 
संस्कृत ग्रंथांच्या आधाराने लिहायचे झाल्यास, या रागाचा समय "मध्यरात्र" दिलेला आहे आणि एका दृष्टीने बोलायचे झाल्यास, सगळीकडे शांतता पसरल्यावर, काळ्या अंगवस्त्रानिशी,प्रियकराला भेटण्यासाठी, गुपचूप निघालेली अभिसारिका आणि त्यांचे मिलन संकेत स्थान, याची आठवण होते. 
"रिषभ","मध्यम" वर्ज्य असलेल्या या रागात, कोमल निषाद वगळता, सगळे सूर शुद्ध स्वरूपात लागतात. "औडव-औडव" जातीचा हा राग "खमाज" थाटात याचे वर्गीकरण केले आहे. रागातील प्रमुख स्वरसंहती बघायला गेल्यास, "सा ग प ध","प ध नि(कोमल)ध","ग प ध सा नि(कोमल)" या संगती ऐकायला मिळतात. या बाबत आणखी सांगता येईल, या रागातील "कोमल" निषाद" स्वराचे स्थान आणि त्या स्वरावरील ठेहराव, हा नेहमीच अवलोकनाचा आनंददायी भाग आहे. 

उस्ताद अमीर खान साहेबांनी सादर केलेला कलावती राग आपण इथे ऐकुया. "इंदोर" घराण्याचे अध्वर्यू म्हणून, यांच्या गायनाचे वर्णन करता येईल. अत्यंत ठाय लय, शक्यतो मंद्र सप्तकात गायचे, अशी काही वैशिष्ट्ये, गायनाबाबत सांगता येतील.बरेचवेळा गायनातील लय इतकी धीमी असायची की, साथीला तबला असायची जरुरी आहे का? असाच प्रश्न पडायचा!! "धृपद" गायकीचा थोडा प्रभाव पडलेला जाणवतो, विशेषत: "तराणा" सादर करताना, बरेचवेळा "नोम-तोंम" पद्धतीचा अवलंब केलेला आढळतो. तसे बघायला गेले तर, यांच्या गायकीचा असर, भीमसेन जोशींपासून ते हल्लीच्या रशीद खान पर्यंत, बहुतेक गायकांवर पडलेला दिसून येतो. "ख्याल" गायकी कशी सादर करायची, याचा एक असामान्य मानदंड निर्माण केला. गायनात "अति विलंबित" लय तसेच "बोल-आलाप" आणि या आलापीतून सरगमचे सादरीकरण, यातून, त्यांनी आपली गायकी सजवली आणि रागदारी संगीताला संपूर्ण वेगळे वळण दिले,  


जरी तिन्ही सप्तकात गायन करण्याचा आवाका असला तरी देखील मंद्र सप्तक आणि शुद्ध स्वरी सप्तकाकडे ओढा अधिक. राग सादर करताना, त्याची "बढत" कशी करायची, टप्प्याटप्प्याने लय वाढवीत जायची आणि त्यातून आपल्या गायकीचा "खयाल" प्रदर्शित करायचा, हे त्यांच्या "ख्याल" गायनाचे आणखी एक वैशिष्ट्य सांगता येते. प्रस्तुत रचनेत, बंदिश सादर करताना, प्रत्येक स्वर आपल्याला अक्षरश: "अवलोकिता" येतो. मघाशी, मी म्हटल्याप्रमाणे, इथे लय किती "विलंबित" आहे, याचा प्रत्यय घेता येतो. विशेषत: खर्जातील स्वर ऐकताना, तर अधिकच. समेवर येण्यासाठी कुठेही आटापिटा नाही. एखाद्या केशर सांजसमयी, विक्लांत पक्ष्याने निरवपणे फांदीवर यावे त्याप्रमाणे, इथे समेवर लय "विसर्जित" होते!!  रागाचा "राग" म्हणून आणि त्याच्या "मूळ" प्रकृतीनुसार रागाचे सादरीकरण करायचे, हा विचार त्यांच्या गायनात प्रामुख्याने दिसून येतो. 

असे ऐकायला मिळाले आहे की, रोशन यांना, "दिलरुबा" वाद्य अतिशय प्रिय होते आणि त्या वाद्यावर, त्यांनी प्राविण्य मिळवले होते. त्यांच्या अनेक रचनांत, त्यांनी या वाद्याचा सढळ हस्ते उपयोग केल्याचे दिसून येते. एकूणच भारतीय वाद्यांवर त्यांचे नितांत प्रेम होते, असे निश्चित विधान करता येईल. वाद्यांच्या वापराबाबत, दोन सर्वसाधारण विधाने करता येतील. एक तर रचनाकारांचा एकंदर कल बघता, तो बाजूला सारून, टिकाऊ आणि मधुर भावरंग पैदा व्हावा यासाठी त्यांनी, खालचे किंवा मध्यसप्तकातील स्वर व संबंधित स्वर-मर्यादा यांतच वावर ठेवण्यात कसलीच कसूर केली नाही. सुरावटी आणि सुरावटींचे खास स्त्रोत म्हणजे विशिष्ट वाद्ये, यांच्याकडे रोशन यांचा जाणवण्याइतका ओढा असला तरी लयबंधाचा सर्जक उपयोग, कधीही दुर्लक्षित केला नाही. किंबहुना एका गीतांत एकाधिक ताल किंवा लयबंध वापरणे, हे त्यांच्या प्रयोगशीलतेचे उदाहरण म्हणता येईल. संगीतशास्त्रानुसार ताल आणि ठेका या दोन वेगळ्या पण संबंधित संकल्पना असून त्याचे मूर्त स्वरूप वाद्यावर निर्माण केल्या जाणाऱ्या ध्वनींच्या द्वारे ठेक्यातून सिद्ध होतात. रोशन यांच्या रचनांच्या बाबतीत हा विशेष, विशेषत्वाने जाणवतो.   


"काहे तरसाये जियरा" हे "चित्रलेखा" चित्रपटातील, आशा भोसले आणि उषा मंगेशकर, या जोडीने गायलेले गाणे इथे ऐकुया. ज्यांना या गाण्यात, रागाची "मुळावृत्ती" पडताळायची असेल तर हे उदाहरण, तसे गोंधळाचे ठरू शकते. गाण्याची सुरवात, रागाधारित आहे पण, पुढे राग बाजूला सारला जातो आणि चाल "स्वतंत्र" होते. पण अशा प्रकारचे स्वातंत्र्य, बहुतेक रचनाकार, नेहमीच घेत असतात. चित्रपट गीतात बरेचवेळा वापरला जाणारा त्रिताल आणि केरवा ताल इथे वापरलेला दिसेल. द्रुत गतीत चालणारे गाणे असल्याने, गाण्यातील हरकती इतक्या विलोभनीय आहेत की आपण या गाण्यात कधी गुंगून जातो, तेच समजत नाही. 
आता आपण, रोशन यांचीच एक अजरामर कव्वाली ऐकायला घेऊ. कव्वाली, या गायनाला, चित्रपट संगीतात, खऱ्याअर्थाने, प्रतिष्ठा मिळवून दिली असेल तर ती, रोशन यांनी, असे म्हटले तर वावगे ठरू नये. इथे आणखी एक विशेष नोंदवावासा वाटतो. रोशन यांना एकूणच द्वंद्वगीते किंवा युगुलगीते, याचे अतिशय आकर्षण असल्याचे, सहज ध्यानात येऊ शकते. सांगीतदृष्ट्या बघायला गेल्यास, दोन्ही किंवा अधिक कलाकारांच्या वाट्याला त्यांच्या आवाजानुसार गायन करायला देणे, किंवा तसा नेमका वाव देणे, हे एक रचनाकार म्हणून नेहमीच आव्हानात्मक ठरते. आणखी एक विशेष मांडायचा झाल्यास, रोशन यांना, ज्याला "आम" राग म्हणतात, अशाच रागांमध्ये रचना करायला आवडत होते, असे दिसते. आणखी एक बाब निर्देशनास आणावीशी वाटते. त्यांच्या रचनेत, काव्याला फार महत्व दिल्याचे जाणवते. "ना तो कारवां की तलाश" या दीर्घ कव्वाली रचनेत, या विचारांचे प्रतिबिंब पडल्याचे, आपल्याला समजून घेत येईल. एका बाजूला हार्मोनियम, ढोलक, तबला आणि टाळ्या, यांची कुशल उपाययोजना आणि दुसरीकडे, कवीच्या शब्दातील नेमके भाव जाणवून देण्यासाठी, केलेले गायन!!  


एक तर ही रचना कालमापनाच्या दृष्टीने अतिशय दीर्घकाळ चालणारी आहे, त्यामुळे त्यात, अनेक गायक आहेत, जसे रफी, मन्नाडे, आशा भोसले, सुधा मल्होत्रा इत्यादी. आता इतके गाते आवाज एकत्र आणायचे म्हणजे रचना विस्तारित असणार, हे ओघानेच आले. कव्वालीची सुरवात अगदी नेमक्या कलावती रागानेच होते पण नंतर हळूहळू, कलावती रागात नसलेले सूर देखील इथे आणले गेले आहेत, जसे "शुद्ध निषाद" ऐकायला मिळतो तर काही ठिकाणी चक्क "खमाज" राग देखील जाणवतो. तरी देखील, गाण्यावर दाट छाया आहे ती, कलावती रागाचीच असे म्हणता येईल. जवळपास १० मिनिटांची रचना आहे आणि इतके गायक आहेत, पण प्रत्येक आवाजाला, आपले अस्तित्व ठळकपणे दाखवता येईल, अशा प्रकारे रचना बांधली आहे. सुरवातीच्या ठाय लयीतून, हळूहळू, द्रुत लयीत जो प्रवास होतो, तो खास करून ऐकण्यासारखा आहे. नेहमीप्रमाणे, या गाण्यात देखील सतार, सारंगी या वाद्यांचा अतिशय सुरेख वापर केलेला आढळेल. 

आता आपण या रागावरील आणखी गाण्याच्या लिंक्स खालीलप्रमाणे ऐकुया 
ये तारा वो तारा 

प्रथम तुज पाहताना 

प्रिया आज माझी नसे साथ द्याया 

विनय!!!!!

विनय गेला!!
वास्तविक ग्रहणाचे वेध शुक्रवार संध्याकाळ पासून लागले होते. शुक्रवारी, संध्याकाळी आठच्या सुमारास सतीशचा फोन आला आणि त्याने अतिशय भावाकुल स्वरांत," अनिल, विनय डीप कोमात गेला आहे. संध्याकाळी परत स्ट्रोक झाला आणि विनयला Ventilator वर ठेवले आहे." हे ऐकल्यावर' कितीही तटस्थतेचा आव आणला तरी भयावह भविष्याची जाणीव नक्की झाली. तसेच झाले, शुक्रवारी रात्री, काळाच्या भयाण संकुलात विनय शिरला, तो कधीही न परतण्यासाठी. काल, "विनय गेला" म्हणजे फक्त शरीर थांबले इतकाच अर्थ. नियतीला असा अनाकलनीय खेळ खेळण्याची खोड कशी लागली, हेच कळत नाही. आसभास नसताना, चकवा देणे, हा तर नियतीचा नेहमीचा खेळ. आपल्या हाती, फक्त कायमस्वरुपी हताशता देऊन, नियती आपला पुढील "डाव" खेळायला मार्गस्थ झाली!!   
वास्तविक, विनय आपल्या शाळेतला मित्र. शाळा संपली, आणि नेहमी जे घडते, त्याप्रमाणे सगळे आपापल्या आयुष्यात इतके गर्क झाले की शाळेतल्या मित्रांची आठवण धुसर व्हावी, इतपत विस्मरण झाले. तसा सटी सामासी गिरगावात उडत,उडत भेटायचा. पण, त्याला "भेट" म्हणणे चुकीचे ठरेल. पुढे, विनयचा आतेभाऊ, मिलिंद माझा अतिशय जवळचा मित्र झाला आणि त्याच्याकडून, अधून मधून, विनयचा उल्लेख ऐकायला मिळायचा. या परिस्थितीत आमची लग्ने झाली आणि संसारात आम्ही रममाण व्हायला लागलो. विनय केवळ स्मरणरंजनापुरता शिल्लक राहिला. तशात १९९२ पासून, मी परदेशाची वाट धरली आणि माझे भारतातील मैत्रीसंबंध विरळ व्हायला लागले. मिलिंदशी संबंध तसेच राहिले पण त्यात कुठेही विनय नसायचा!! एकतर, मी वर्षातून, महिनाभर सुटीवर येणार, त्यात हयात मैत्री देखील राखणे अवघड व्हायला लागले तिथे शाळेतील संबंध कुठे टिकणार?
आठवणींना ताण दिल्यावर, एक भेट आठवते. मी नुकताच, परदेशातून कायमचा भारतात राहायला आलो होतो आणि घरातील काही कामानिमित्ताने, गिरगावात फिरत होतो आणि त्यावेळी, अचानक विनयने हाक मारली. शाळेत जितकी उंची होती, त्यात कदाचित एक,दोन इंचाचा फरक, केस अर्थात थोडे विरळ झालेले, तसेच चमकदार डोळे आणि मान किंचित वाकडी करून बोलायची सवय अजूनही कायम होती. महत्वाचे म्हणजे, आवाजात कसलाही बदल झालेला नव्हता. गायवाडीच्या नाक्यावर आम्ही भेटलो. त्यावेळी, त्याने बँक सोडली होती आणि मला तेंव्हा थोडे नवलच वाटले होते. अर्थात, त्यावेळी संबंध तितके "समृद्ध" झाले नसल्याने, तसे जुजबी बोलणे झाले. काही मित्रांच्या आठवणी निघाल्या आणि आम्ही परत, आमच्या दिशेला लागलो. 
मला वाटते, आपला Whats App ग्रुप व्हायच्या सुरवातीच्या काळात, असाच मी, त्याला रस्त्यावर भेटलो आणि त्याने मला, या ग्रुपबद्दल सांगितले आणि लगेच सामील करून घेतले. इथे, विनय आणि माझ्या गाठीभेटी वाढायचा महूर्त सापडला.
तसे बघितले मी techno savvy अजिबात नाही पण, आता, शाळेतल्या मित्रांचा इथे गृप झाला आहे आणि आता त्यांच्यात regular chatting सुरु झाले, हे बघितल्यावर, मी, मुलाकडून याचे तंत्र शिकून घेतले.  विनय आणि भारती, हे एकत्र आले आणि त्यांनी या गृपला एकत्र आणले. मला तर फारच मजा वाटायला लागली आणि इथून, माझ्या, विनय बरोबर भेटी वाढायला लागल्या. एकदा, विनयने गिरगाव चौपाटीवर एकत्र भेटण्याचा घाट घातला आणि मला वाटते, तेंव्हापासून, या गृपला, एक आकार आला. त्या संध्याकाळी, सुरेश मोघे सोडल्यास, सगळ्यांना, जवळपास ४० वर्षानंतर भेटत होतो. मनात औत्सुक्य तर नक्कीच होते. त्यातूनच मळवली इथल्या पिकनिकची कल्पना  निघाली आणि सगळ्यांच्या अंगात उत्साह संचारला. अर्थात, मळवली पिकनिक ही नंतरची. त्याआधीच, विनय बरोबर बोलणे, भेटणे, हा माझ्या आयुष्याचा नित्यक्रम झाला. सतिशला संगीताची आवड आहे, हे मला मिहीत होते पण, विनयला आवड आहे म्हटल्यावर, अस्मादिक खुश. त्यातून, मला वाटते, मिलिंदने विनयला माझ्या "ब्लॉग" बद्दल सांगितले असावे. 
माझा ब्लॉग म्हणजे काहीकाही जगावेगळे लिखाण नव्हते आणि आजही नाही, पण त्याने ब्लॉगवरील काही लेख वाचल्यावर, मला एका दुपारी, ऑफिसला फोन लावला आणि माझे कौतुक करायला सुरवात केली. अस्मादिक हवेत!! अर्थात, मला एक माहित होते, लेखनात substance किती, हा भाग जरी वेगळा असला तरी, "आपला एक मित्र काहीतरी लिहित आहे" याचा विनयला  खरा आनंद झाला होता आणि त्याने, पुढे सतीशला त्याबद्दल सांगितले!! त्याच सुमारास, माझ्या ब्लॉग बद्दल लोकसत्तेत एक लेख आला होता आणि तो वाचल्यावर, त्याने मला कायमचे "लेखक" बनवून टाकले!! पुढे, मी, सतीश आणि विनय, दोन, तीन वेळा संगीताच्या मैफिलीला गेलो आणि ओळख पक्की झाली. अर्थात, यात एकमेकांची यथेच्छ टिंगल  उडविणे,हा भाग तर अवर्णनीय असाच!! निव्वळ शुद्ध मैत्री. फोनवर तर, आम्ही एकमेकांची इतकी टिंगल उडवली आहे की, दुसरा कुही असता तर संबंध तोडले असते. याचा परिणाम असा झाला, विनयला माझ्या बाबत वाटणारा विश्वास. 
आता जिथे चार मराठी डोकी एकत्र आली तिथे दोन गृप होतात, अशी ख्याती असलेल्या मराठी माणसांची जवळपास १०० डोकी एकत्र आणण्याचे काम, विनय आणि भारती यांनी केले. आता, इथे इतके "विचारवंत" एकत्र आल्यावर मतभेदाला काय तोटा!! ग्रुपवर मतभेद, वाद आणि भांडणे तर पाचवीला पुजलेली!! मग, रुसवे, फुगवे असले प्रकार येतातच. त्या दृष्टीने, मला वाटते, आपला गृप अजूनही "षोडशा" वर्षात आहे!! जरा मत वेगळे निघाले की लगेच "मी गृप सोडणे" अशी घोषणा जगजाहीर!! अशा वेळेस, विनयचा मला फोन यायचा. त्या वाटायचे, अनिलशी बोलले म्हणजे काहीतरी मार्ग निघेल!! अज्ञानात सुख असते, ते असे!! मी देखील, त्यानिमित्ताने फोनवर बराचवेळ त्याच्याशी बोलत असे. अर्थात, अळवाच्या पानावरील थेंबाप्रमाणे हे मतभेद घरंगळून जायचे. पुढे मळवली पिकनिक आली आणि विनयच्या घरातील माझ्या भेटी वाढायला लागल्या. पिकनिक यशस्वी होण्याचे खरे श्रेय हे, परत एकदा विनय आणि भारतीचे. माझ्यासारखे मित्र खरे म्हणजे स्वयंसेवक!! 
पिकनिक जवळ आली तशी मी विनयला बोललो होतो, "विन्या, पिकनिकच्या रात्री मी कुणालाही झोपायला देणार नाही"!! विन्या खुश!! आता, आपली पिकनिक कशी झाली, ते आपण इथे सगळेच जाणता. वास्तविक, विनयला सारखी शंका यायची, "पिकनिक झाल्यावर, गृप किती टिकेल?" सुदैवाने, आता पिकनिक संपून जवळपास वर्ष उलटायला आले पण ग्रुप अजूनही सुंदर टिकला आहे. पिकनिक झाल्यानंतर, दोन एक दिवसांनी, विनायचा मला फोन आला होता, "अन्या (मला गृपमध्ये 'अन्या' म्हणणारे तीन,चारच मित्र आहेत!!) अरे, आपला गृप आता टिकणार!!" 
असेच दिवस मजेत जात होते. अचानक माझ्या किडनीच्या दुखण्याने डोके वर काढले!! अचानक विनयची आठवण आली. खरेतर विनय डॉक्टर आहे, ही बातमी देखील मला अशीच अचानक कळलेली. तेंव्हा मी फेसबुकवर रोजच्या रोज राबत असायचो आणि अशा वेळेस, विनयची friend request आली - डॉक्टर विनय पाटणकर!! आयला, अनिल क्लीन बोल्ड!! विन्या आणि डॉक्टर!! मी लगेच त्याला फोन लावला. फेसबुकवर खोटे प्रोफाईल लोड करून कितीतरी मित्र(??) वावरत असतात आणि याच जाणीवेने, मी विनयला फोन केला होता. त्यावेळी, विनयने सगळी माहिती दिली आणि मला खरेच त्याचे कौतुक वाटले. या परिस्थितीत, मी विनयला फोन करून सगळी "केस" सांगितली. त्या दिवशी दुपारी, डॉक्टर विनय पाटणकर, माझ्या ऑफिसमध्ये, औषधे घेऊन!! मी त्याला बाहेर घेऊन गेलो आणि बाजूच्या "कयानी" हॉटेलमध्ये बसलो. तिथे, विनयने सगळी औषधे कशी घ्यावीत, आणि पथ्ये पाळायला हवीत, याबाबत सगळी माहिती दिली. मी देखील अतिशय गंभीरपणे, औषधे घ्यायला सुरवात केली आणि दर दोन दिवसाआड त्याला फोन करून, प्रकृतीत होणाऱ्या बदलाबाबत माहिती द्यायला लागलो. 
विनय देखील खुश झाला. त्याने सुचवलेल्या औषधाचा मला खरच फायदा झाला. जसा तब्येतीत बदल व्हायला लागला तशी त्याने हळूहळू औषधे कमी करायला लावली आणि आता, मी पूर्ववत झालो!! वास्तविक, त्याच्या आणि माझ्या मतांमध्ये बराच फरक होता, माझ्या आणि त्याच्या आवडींमध्ये फरक होता तरीदेखील मनात कुठेतरी "आपुलकीचा" धागा होता, त्यात आपलेपणा होता आणि निव्वळ मैत्री होती. 
आता, हा विनय कसा होता? तसा कधीही भेटला तर सतत आनंदी असायचा. तसे बघितले तर, प्रत्येकाच्या आयुष्यात काहीना काही प्रश्न सतत असतात पण, विनयने त्याची कुणालाच कसलीही जाणीव करून दिली नाही. कधीही भेटला तरी ओठांवरील हास्य कधीच मावळले नव्हते!! मावळले ते, शेवटच्या प्रवासाला गेला तेंव्हाच!! विनय आजारी आहे, हे तर समजले होते पण मनात कुठेतरी अंधुकशी आशा, निदान सुरवातीच्या काही दिवसांत नक्कीच होती. पुढे काय घडले ते आता सगळ्यांनाच माहित आहे. 
आज विद्याला भेटायला गेलो होतो. जोडीने सतीश बरोबर होता, माझे, एकट्याने भेटायला जायचे धाडस नव्हते. काय बोलायचे आणि कसे बोलायचे? सगळेच प्रश्न!! विद्यानेच माझ्याशी बोलायला सुरवात केली आणि नको विषयाला हात घालून!! विनयच्या शेवटच्या दिवसांबद्दल!! वास्तविक, मला, गेल्या चार दिवसांची खडा न खडा माहित आहे पण, इथे मान हलवण्याशिवाय गत्यंतर नव्हते. अतिशय थंडपणे बोलत होती, निदान भासवत होती. कालच नवरा गेलेला, सगळे दु:ख्ख मनात ठेऊन, चेहऱ्यावर थंडपणा ठेऊन, बोलत होती. खरेतर, रबरी चेंडू पाण्यात दाबण्यासारखा अयशस्वी प्रयत्न होता, हे मला कळत होते तरी तिच्या जिद्दीला, मनोमन सलाम केला आणि तिथून निघालो!! 
खाली येउन सतीशबरोबर बराचवेळ गप्पा मारीत होतो. अर्थात, गप्पा सगळ्या विनयबद्दल चालू होत्या. सतीशकडील आठवणी म्हणजे त्याच्याच आयुष्याचा पट उलगडून मांडण्यासारखे!! अर्थात, वेळच अशी होती, काय बोलावे, हेच कळत नव्हते. एरव्ही मी बोलणारा पण इथे जीभ घशात गच्च अडकलेली!! 
"घुमावयाचे गगन खोलवर, तिथे चिमुटभर घुमते गाणे;
तुटते चिंधी जखमेवरची, आणिक उरते संथ चिघळणे". हेच अखेर आपले प्राक्तन!!

Monday 12 October 2015

सन सिटी - रस्टनबर्ग

२००४ साली, मला अचानक रस्टनबर्ग इथे नोकरी चालून आली. वास्तविक, पीटरमेरीत्झबर्ग इथे तसा स्थिरावलो होतो पण नवीन नोकरी आणि नवीन शहर, याचे आकर्षण वाटले. खरे तर २००३ मध्ये इथे माझा इंटरव्ह्यू देखील झाला होता पण, तेंव्हा काही जमले नाही. मनातून, या गावाचा विचार काढून टाकला होता पण, एके संध्याकाळी, त्यांचा फोन आला आणि दोन दिवसांत सगळे नक्की झाले. सन सिटी, या गावाच्या जवळ आहे, हे माहित होते, अर्थात, मी याआधी देखील सन सिटी इथे एकदा जाउन आलो होतो पण ती भेट तशी उडत, उडत झाली होती. एका रणरणत्या दुपारी, मी इथे पोहोचलो. प्रथम दर्शनी गाव तसे लहानखोर वाटले आणि पुढे जवळपास वर्षभर राहिल्यावर, हे मत पक्के झाले. माझे घर भारतीय कम्युनिटीमध्ये होते. इथे तसा विचार केला तर या गावात जवळपास २००० भारतीय वंशाची लोकवस्ती आहे, यात, मुस्लिम देखील आले. एक गमतीचा भाग मला वारंवार अनुभवायला मिळाला. परदेशात रहाताना, भारतीय, पाकिस्तानी लोकांच्यात अजिबात वैमनस्य नसते. देशाचा अभिमान असणे, यात काहीही गैर नाही परंतु जेंव्हा अडचण येते, तेंव्हा कुणीही असला विचार करीत नाही. 
वास्तविक, या गावात, आपल्याकडे जसे वाणी असतात, त्याप्रमाणे पण जरा मोठ्या प्रमाणावर काही दुकाने आहेत आणि ती बहुतांशी पाकिस्तानी लोकांनी चालवलेली आहेत परंतु तिथे खरेदी करणारे, प्रामुख्याने भारतीय वंशाचे लोक आहेत. इतकेच नसून, एकमेकांच्या घरी सातत्याने येणे,जाणे चालू असते. धर्माबाबत कडवा अभिमान, तिथेही आहे पण, मैत्रीच्या आड या गोष्टी येत नाहीत. इतकेच कशाला, एखाद्या शनिवारी रात्री, काही पाकिस्तानी, माझ्या मांडीला मांडी लावून, ड्रिंक्स घ्यायला बसले आहेत. एक अलिखित नियम तिथे नेहमी पाळला जातो, देश आणि राजकारण, याला गप्पांत कधीही स्थान नसते. तसेच धर्माबद्दल कधीही कुठलाही विषय निघत नाही. 
इथेच मला, एकदा एका पाकिस्तानी मित्राने, मेहदी हसनच्या एका खासगी मैफिलीची सीडी ऐकवली होती. संगीताच्या बाबतीत, साउथ आफ्रिकेने मला अनंत हस्ते मदत केली आणि जाणीवा विस्तारित केल्या, हे नक्की. पुढे जेंव्हा मी, रस्टनबर्ग सोडून, दुसरीकडे नोकरीसाठी निघालो, तेंव्हा याच पाकिस्तानी मित्रांनी, माझ्या साठी रात्रभर चालणारी अशी मेजवानी दिली होती. एक नक्की होते, आता आमच्या गाठी भेटी होणे जवळपास अशक्य आहेत, म्हणून असेल पण, त्यांनी मला इथे या नव्या गावात स्थिरावण्यासाठी निरपेक्ष मदत केली होती. 
भारतीय वंशाचे लोक तसे फार नाहीत आणि कारण असे, इथे फार मोठ्या इंडस्ट्रीज नाहीत, आजूबाजूला प्रचंड खाणी आहेत पण तिथे बहुतांशी गौर वर्णीय किंवा कृष्ण वर्णीय!! घर तसे दुमजली मिळाले होते. ऑफिसमध्ये, मजुरीची कामे बहुतांशी कृष्ण वर्णीय लोकं करीत असत पार त्यांच्या वर देखरेख ठेवायचे काम, भारतीय लोकं करीत असत. कंपनीच्या व्याप फार मोठा होता. प्रचंड सुपर मार्केट आणि त्याला जोडून, होलसेल मार्केट असल्याने, तिथे गर्दी ही कायमची!! या कंपनीत, आम्ही ४ जण, सडाफटिग होतो. मी वगळल्यास, बाकीचे गुजराती, त्यातून माझ्या आणि त्यांच्या वयात बराच फरक. त्यामुळे,त्यांनी मला "अनिलभाय" म्हणायचे ठरले. आम्ही एकत्रच जेवणाचा कार्यक्रम करत असू, म्हणजे कधी माझ्या घरी जेवण तर कधी त्यांच्या घरी जेवण, असला प्रकार चालायचा. अर्थात, मला कधी मांसाहार खायची लहर आली तर मात्र मी वेगळा!! 
इतर शहरांत जो प्रकार आढळतो, तसाच प्रकार या शहरात देखील आहे, गौर वर्णीय लोकांची वस्ती वेगळी आणि अर्थात अधिक आटोपशीर, देखणी तसेच वैभवशाली!! या भागात गेल्यावर, लगेच तुम्हाला फरक जाणवतो. वास्तविक या गावात तशी हिरवी झाडी फारशी नाही पण या भागात गेल्यावर, हिरव्या रंगाचे अस्तित्व डोळ्यांत भरणारे असते.नशिबाने, घरात जाण्याचा प्रसंग आला तर स्वच्छता आणि टापटीपपणा डोळ्यांत भरणारी असतो. अर्थात, इथे एक बाब अनाकलनीय आढळते आणि केवळ इथेच नाही साउथ आफ्रिकेत सर्वत्र आढळते. सार्वजनिक स्वच्छतेला इतके प्रचंड महत्व देणारे, वैय्यक्तिक स्वच्छतेबाबत फार गलथान असतात. एकतर, याची आंघोळीचे वेळ ही संध्याकाळची असते!! युरप/अमेरिकेत हे चालून जाते कारण तिथे बारमाही गारठा असतो पण या देशात तसे नसते. ऑफिसमध्ये, सकाळी आपण जेंव्हा शिरतो तेंव्हा नाकाशी परफ्युमचा सगंध दरवळत असतो पण कधी जवळ जायची वेळ येते, तेंव्हा घामाचा उग्र वास येतो. केवळ युरप/अमेरिकेचे अंधानुकरण, इतपतच याचा अर्थ पण, हे लोण केवळ गौर वा कृष्ण वर्णीय लोकांत आहे, असे नसून, इथे सगळ्या समाजात, हीच पद्धत आहे!! त्यामुळे, इथे लोकांना भेटावे तर ऑफिस सुटल्यावर!! 
मी जवळपास, १७ वर्षे या देशात काढली पण आपली आंघोळीची पद्धत कधीही मोडावीशी वाटली नाही, अगदी पुढे जोहान्सबर्गच्या हाडे गारठवणारया थंडीत राहताना देखील, सकाळची आंघोळ चुकली नाही. जरी हे लहानखोर गाव असले तरी, गावातील रस्ते तसेच दृष्ट लागणारे!! इथूनच पुढे ४० कि.मी.वर जगप्रसिद्ध सन सिटी आहे. साउथ आफ्रिकेचा सगळा ऐय्याशी आणि विलासी राहणीचा अत्युच्च बिंदू म्हणजे सन सिटी. वास्तविक, सन सिटी आणि लॉस्ट सिटी, असे एकाला जोडून, दोन भाग आहेत. सन सिटी म्हणजे casino चे आगर. इथले जग(च) वेगळे आणि कधीही शांत न होणारे!! सगळ्या आफ्रिका खंडात इतका मोठा casino बहुदा नसावा आणि अर्थातच आर्थिक उलाढाल देखील तितकीच अवाढव्य. शुक्रवार संध्याकाळ पासून ते सोमवार सकाळ पर्यंत, इथे अक्षरश: जत्रा असते. तसे सन सिटी आड मार्गाला आहे, त्यामुळे तिथे जायचे म्हणजे तिथे हॉटेल बुक करूनच जायला हवे अन्यथा जवळ असलेल्या रस्टनबर्ग मध्ये रहायची सोय करायला हवी. इथे लोकं जाबडल्यासारखी यंत्राला चिकटून असतात सन सिटी मधील हॉटेल्स त्यामानाने स्वस्त आहेत परंतु लॉस्ट सिटी म्हणजे सगळा जगावेगळा कारभार!! अगदी मिलियन डॉलर्सची बक्षिसे असतात. मी स्वत:, एका भाग्यवंताला २.५ मिलियन डॉलर्सची लॉटरी लागल्याचे बघितले आहे आणि त्या रात्री, त्याने सगळ्यांना दिलेली पार्टी देखील!! "इस रात को सुबह नही" याची अचूक प्रचीती इथे बघायला मिळते. 
लॉस्ट सिटी, हे हॉटेल आहे पण, तुमच्या ऐय्याशीच्या कल्पनांना सुरुंग लावणारी आलीशानता इथे आहे.इथे राहायचे म्हणजे केवळ पैसे उधळायला यायचे. सन सिटीत तुमचे बुकिंग असेल तर इथे तुम्हाला फिरायला परवानगी मिळते. हॉटेलच्या बाहेरूनच, आपल्याला त्याच्या स्वरुपाची झलक मिळते. 
आता, इतका प्रचंड खर्च करून प्रवासी येणार म्हणजे त्यांच्यासाठी वेगवेगळ्या मनोरंजनाची साधने निर्माण करणे, ओघाने आलेच. आजूबाजूचा भाग तसा सगळा रखरखीत असल्याने, इथे विज्ञानाला हाताशी धरून, अनेक मनोरंजनाची साधने निर्माण केली आहेत. इथे पाण्याचा कृत्रिम जलाशय तयार केला आहे आणि विज्ञानाच्या सहाय्याने, प्रचंड आकाराच्या लाटा निर्माण केल्या जातात आणि तदनुषंगाने इतर पाण्यावरचे खेळ खेळले जातात. वास्तविक, एक प्रचंड डोंगर फोडून हे गाव वसवले आहे, तेंव्हा त्या डोंगराच्या खडकांत, निरनिराळे प्राणी तयार केले आहेत आणि अगदी "जिवंत" वाटावेत, इतके अप्रतिम केले आहेत आणि जसे तुम्ही जवळ जाल, तशी त्या प्राण्यांच्या भयप्रद आवाजाची डरकाळी, पूर्वसूचना न देता ऐकवतात!! तसेच एके ठकाणी, कृत्रिम भूकंप केला जातो. अक्षरश: पायाखालची "जमीन" हादरते आणि सरकते देखील!! मध्यरात्री, हा प्रकार फार भयप्रद वाटतो. इथे पाण्यासारखा पैसा खर्च होतो. रात्री सगळा डोंगर वेगवेगळ्या रंगांच्या दिव्यांनी मढवला जातो आणि दर शनिवारी रात्री इथे, केवळ धनवान व्यक्तीच भाग घेऊ शकतील, अशा आलिशान पार्ट्या रंगतात. 
मी तिथे रहात असताना, सन सिटीमध्ये, आपल्या बॉलीवूडच्या कलाकारांचा ताफा आला होता. हा देश वर्णद्वेषाच्या जोखडातून मुक्त झाल्यानंतर, इथे भारतीय कलाकार नित्यनेमाने येतात. त्या वर्षी, शाहरुख, सैफ, राणी, प्रीती, मलायका असे कलाकार आले होते. अर्थात, अस्मादिक तिथे गेले होते - पास मिळवला होता. कार्यक्रमाला, भारतीय वंशाच्या लोकांनी तुडूंब गर्दी केली होती, अगदी जोहान्सबर्ग वरून लोकांचे जत्थे आले होते. जोहान्सबर्ग इथून १५० कि.मी. दूर असून देखील तिथल्या लोकांनी प्रचंड गर्दी केली होती. त्या कार्यक्रमात, इथे शाहरुख किती लोकप्रिय आहे, याची झलक बघायला मिळाली. तसे बघितले तर इथल्या लोकांचे हिंदी म्हणजे सगळाच आनंद आहे पण, भारतीय कलाकारांबद्दल इथे प्रचंड आकर्षण आहे. पुढे डर्बन इथे हरिप्रसाद चौरसियांचा कार्यक्रम असाच तुफान गर्दीत झाला. 
रस्टनबर्ग, गाव तसे लहान आहे, फार तर तालुका म्हणता येईल. इथे मोठ्या शहरांप्रमाणे आलिशान व्यवस्था नाहीत, घरे देखील बुटकी, टुमदार अशी आहेत. त्यामुळे असेल, पण, गावांत एकोपा आहे. भारतीय सण, जमतील तशा प्रकारे साजरा करतात. बहुतेक सण, गावातील, हिंदू देवळांत होतात, अगदी गणपती,दसरा, दिवाळी आणि नवरात्र. वर्षातून एक वीक एंड सामुदायिक पिकनिक निघते आणि तेंव्हा मोजून सगळ्या धर्मातील माणसे एकत्र जमतात!! इथे सगळे धर्मीय राहतात, पण प्रत्येकजण आपला धर्म पाळतो आणि त्यात कुणीही "नाक"खुपसत नाही!! अर्थात, इथे सगळा "गोडीगुलाबी" किंवा "भाबडेपणा" नक्कीच नाही पण आपापल्या मर्यादा जाणून घेऊन, सगळे व्यवहार चालतात.  
इथेच मला, "तान्या" नावाची, पहिली गौर वर्णीय मैत्रीण भेटली. माझ्याच सोबतीने काम करत होती. मुळची "डच" संस्कृतीत मुरलेली पण, आता या देशातली सातवी पिढी!! गोऱ्या समाजाची प्रातिनिधिक प्रतिनिधी, असे म्हणता येईल. वागायला अतिशय मोकळी, सतत स्मोकिंग करणारी, प्रसंगी ड्रिंक्स घेणारी आणि वयाच्या १७ व्या वर्षी घरापासून वेगळे राहण्याचा आपणहून निर्णय घेतलेली, निळ्या डोळ्यांची ही मैत्रीण, मला गोऱ्या समाजाची जवळून ओळख करून देणारी. तोंडाने अति फटकळ पण कामात मात्र वाघ!! ओळख झाल्यावर, साधारणपणे, एका महिन्यात, तिने माझ्यासमोर, तिच्या आयुष्याचा "पंचनामा" स्वच्छ डोळ्याने मांडला. सध्याचा Boyfriend हा, तिचा तिसरा असून, पहिल्या दोघांशी नाते का तोडले, हे तिने मला अगदी सहज, बिनदिक्कतपणे सांगितले. सांगताना, स्वर अतिशय थंड, कुठलाही अभिनिवेश न घेतलेला!! खरेतर, सगळा गोरा समाज,हा याच प्रवृत्तीचा, निदान मला तरी इथे आढळला. तसेच, माझ्या CEO ची गोरी सेक्रेटरी, "बार्बरा" अशीच माझ्या चांगल्या परिचयाची झाली. तिची देखील अशीच कथा म्हणजे, पहिले लग्न मोडलेले पण सध्या Live-in-relation मध्ये रहात होती. पदरी चार वर्षाचा मुलगा असून, या नात्यात, त्याची जबाबदारी मात्र बार्बराची!! 
 या दोघींनी, मला वारंवार त्यांच्या घरी बोलावले.त्यानिमित्ताने, गोरा समाज कसा आहे, त्याची विचारसरणी कशी असते, स्वभाव कसा असतो, याचा अंदाज आला. पुढील काळात मी आणखी नोकऱ्या केल्या आणि प्रत्येक ठिकाणी अशाच गोऱ्या मुली संपर्कात आल्या आणि त्यावेळी, माझा "बुजरेपणा" मात्र लोपलेला होता. या दोघींच्या, मित्रांशी माझी चांगली ओळख झाली आणि त्यांच्या स्वतंत्र गाठीभेटी होण्याइतपत जवळीक साधली. अर्थात, त्यावेळी मनाशी बांधलेले "ठोकताळे" तेच प्रत्येकवेळी कायम अनुभवास आले, असे नाही पण, तरी देखील, प्रमाणाबाहेर अंदाज चुकले नाहीत, हे नक्की!! 
इथल्या लोकांची एक बाब मात्र शेवटपर्यंत "अगम्य" राहिली. इथे वैय्यक्तिक व्यवहार, शक्यतो "क्रेडीट कार्ड" वर चालतात, अगदी Underwear सारख्या गोष्टी विकत घ्यायचे झाले तरी, "पेमेंट" मात्र क्रेडीट कार्डाने करायचे!! शक्यतो Cash व्यवहार चालत नाहीत. याचा परिणाम असा होतो, महिन्याचा पगार झाला की पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यात, बहुतेक सगळे "कफल्लक"!! मग, पगार कितीही मोठा असो. जितका पगार अधिक, तितका क्रेडीट कार्डचा वापर अधिक!! किंबहुना, जितके उत्पन्न अधिक, तितकी क्रेडीट कार्ड्सची संख्या अधिक!! एक अनुभव सांगतो. पुढे मी प्रिटोरिया मध्ये नोकरी करताना, तिथला आमचा IT Manager, जेम्स माझ्या चांगल्या ओळखीचा झाला. तिथून, जेंव्हा डर्बन इथे जायची वेळ आली तेंव्हा, मी घरातील काही सामान विकायला काढले, त्यातील, "प्लास्टिक मोल्डेड" फर्निचर तसे फार स्वस्त म्हणून घेतलेले होते, ते विकायला काढले. घराच्या बाहेरच्या व्हरांड्यात बसण्यासाठी, मी चार खुर्च्या आणि एक टेबल घेतले होते. तशी काही फार महागडी नव्हती पण, त्याने विकत घेतले आणि त्याचे पेमेंट, तो Cash देऊ शकत होता पण, त्याने क्रेडीट कार्ड वापरले!! मला नवलच वाटले पण इथे अशीच पद्धत आहे. 
या शहरात, मी जवळपास एक वर्ष काढले. एखादा दुसरा मित्र सोडला तर आता कुणाशीच संबंध राहिलेले नाहीत. अर्थात, एका वर्षात "घनिष्ट" म्हणावी अशी मैत्री होऊ शकते, या वर माझाच विश्वास नाही. तेंव्हा या शहराने मला काय दिले? गोऱ्या लोकांशी कसे वागावे, हा समाज कसा आहे, या सगळ्याची ढोबळ ओळख करून दिली. पुढील वाटचालीसाठी, हे निश्चितच उपकारक ठरले. 

Thursday 8 October 2015

निरलस पटदीप

मंगेश पाडगांवकरांची एक सुंदर कविता आहे. 
"तू कितीही लपविले तरीही 
    मजला नकळत कळते, कळते;
पांकळ्यांत दडविले तरीही 
     गंधातून गूढ उकलते!!"

कुठल्याही कवितेचा नेमका आशय लगेच आकळणे, तसे सहज नसते. मनातल्या मनात, अर्थ शोधण्याचा प्रयत्न करावा(च) लागतो आणि तसाच प्रकार रागसंगीताबाबत घडत असतो. स्वरांच्या मधल्या पोकळीतील स्वर ओळखणे आणि त्यातून अर्थ शोधणे, हेच आनंदाचे खरे निधान म्हणता येईल. मनांतल्या गुहांत चाचपडण्यात तसा अर्थ नसतो. दिवा लावावा आणि स्वच्छ पारदर्शक उजेड पाडावा. निरर्थकतेच चुळकाभर द्रव घ्यावे आणि दिव्यावर तापत ठेवावे. थोड्यावेळाने शब्दांचे स्फटिक चमकू लागतात. मग, अर्थ लागायला कितीसा उशीर? पण तरीही अर्थ तसा सहज आकळत नाही.  
"पटदीप" रागाची बऱ्यापैकी ओळख अशा कवितेतून आपल्या ध्यानात यावी. खरतर "भीमपलास" रागाशी फार जवळचे नाते सांगता येईल पण तरीही, केवळ अवरोहात "निषाद" प्रवेश करतो आणि रागाची स्वतंत्र ओळख निर्माण होते. वेशभूषेत रंगलेल्या तरुणीने साजशृंगार करताना, कपाळावर छोटीशी "टिकली" लावावी आणि अवघ्या चेहऱ्याचे सौंदर्य, अधिक विलोभनीय व्हावे, असा हा "निषाद" या रागात अवतरतो!!  भारतीय रागदारी संगीताचे वैशिष्ट्य आणि सौंदर्य, यातूनच आपल्याला कळून घेता येईल. "औडव-संपूर्ण" जातीच्या या रागात, "रिषभ" आणि "धैवत" स्वर वर्ज्य आहेत तर "गंधार" कोमल लागतो. बाकी सगळे स्वर शुद्ध लागतात. याचा परिणाम असेल कदाचित पण हा राग, तसा सरळ जातो, फारशा "वक्रोक्ती" आढळत नाही की फार नखरा देखील दिसत नाही. वादी-संवादी स्वर "पंचम-षडज" आहेत आणि जरा बारकाईने ऐकल्यास, " "ग म प नि सा ध प", "मग मप नि नि नि सा", "ध प म ग म प" हे स्वरसमुह, या रागावर अधिराज्य गाजवताना दिसतात. तसे बघितले तर हा राग, मैफिलीत फारसा सादर केला जात नाही पण तरी देखील, सुगम संगीतात मात्र या रागाचा वापर भरपूर झाल्याचे आढळते. 

पंडित भीमसेन जोशी, हे नाव रागसंगीतातील दिग्गज नाव!! किराणा घराण्याला मानसन्मान तसेच रसिकाभिमुख करण्यात, या गायकाचा महत्वाचा वाटा!! आता किराणा घराणे म्हटल्यावर, आवाजाचा लगाव, रागाची मांडणी इत्यादी बाबी लगेच ध्यानात येतात आणि या रचनेत, ही सगळी वैशिष्ट्ये उद्मेखूनपणे ऐकायला मिळतात. किराणा घराण्यात, पायरीपायरीने रागविस्तार करणे, आणि त्याबाजूने, "स्वर" या अंगावर अधिक भर देणे. याचा दुसरा परिणाम असा होतो, शब्द म्हणजे स्वरांचे वाहक, इतपतच शक्यतो अर्थ प्राप्त होतो. किराणा तंत्र असे की, संपूर्ण शब्दालाच जरा गोलाकार उच्चारात लपेटून घ्यायचे आणि तसेच गायचे. त्यामुळे सांगीत स्वरांवर दीर्घकाळ रुंजी घालता येते. किराण्याचा गानोच्चार आणि शब्दोच्चार, दोन्ही एकाच प्रकारच्या गुंजनासाठी वापरले जातात. त्यामुळे, घुमारायुक्त अखंडता अशी अनुभूती, सादरीकरणातून येत राहते. 

सचिन देव बर्मन, हे नाव, हिंदी चित्रपट संगीतातील अत्यंत प्रतिष्ठित नाव म्हणून घेतले जाते. ते येईपर्यंत, हिंदी चित्रपटातील गाण्यांचा एक ठराविक साचा किंवा ढाचा तयार झाला होता, त्याचा आवक  वाढविण्यात ज्या संगीतकारांनी प्रमुळ हातभार लावला, त्यात या संगीतकाराचे नाव  लागेल. बंगाली लोकसंगीताचे प्रचंड आकर्षण असून देखील, रचना करताना, लोकगीतापासून थोडे दूर सरकायचे  इतरत्र फोफावणाऱ्या गीतांप्रमाणे, रचना शहरी होऊ द्यायची नाही. दुसरा भाग असा, सांगीत परिणामावर लक्ष केंद्रित करण्यासाठी आवश्यक तो सुसंस्कृत संयम दाखवला. त्यांनी सांगीतिक प्रयोग केले. अभारतीय संगीताचे स्वागत करणारे, पण तरीही भारतीय राहणारे संगीत रचण्यात त्यांनी विलक्षण यश मिळवले. गुणगुणण्यासारखे, लक्षात राहणारे संगीत वाद्यवृंदाने रचावे, परंतु भारून टाकणारे नव्हे, असेच त्यांचे ध्येय असावे, असे वाटते. याचा परिणाम असा झाला, रसिकांबरोबर त्यांच्या रचनांची "नाळ" जुळली होती. इतर प्रतिभावंत रचनाकार, ज्याप्रमाणे रागाचा केवळ आधार घेऊन, रचना बांधायची आणि पुढे त्याचा विस्तार करायचा, हाच विचार या संगीतकाराच्या गाण्यांमधून बहुतेकवेळा आढळतो. वास्तविक शास्त्रोक्त संगीताचा पायाभूत अभ्यास करून देखील, त्यांच्या रचनेतून, लोकसंगीताचा प्रभाव वेगळा काढणे केवळ अशक्य, इतका दाट प्रभाव जाणवत असतो. 


प्रस्तुत रचनेची सुरवात, पाश्चात्य संगीताच्या धाटणीने सुरु होत असली तरी, एका क्षणी, सतार आणि सारंगीच्या सुरांनी "पटदीप" रागाची ओळख पटते. अगदी साधा रूपक ताल आहे पण, तरीही रचना, दोन्ही पद्धतीच्या अंगाने पुढे सरकत जाते आणि विशेष म्हणजे, एकूणच सगळा वाद्यमेळ, अशा प्रकारे रचला आहे, की कुठेही वाद्यमेळ खटकत नाही. एक रचनाकार म्हणून, सचिन देव बर्मन यांच्या कर्तृत्वाला मान्यता द्यावीच लागेल. आपण चित्रपट गीत बांधत आहोत, याचा या संगीतकाराला कधीही विसर पडला नाही आणि प्रसंगी वैश्विक संगीताला आपलेसे करताना, अजिबात मागे-पुढे बघितले नाही. अखेर, हे चित्रपट गीत आहे, याचा कधी विसर पडू दिला नाही. 

हिंदी चित्रपट गीतांत, रागसंगीताचा अत्यंत सुजाण वापर, उस्ताद अमीर खान, पलुस्कर बुवा आणि उस्ताद बडे गुलाम अली खान सारख्या युगप्रवर्तक गायकांना, चित्रपटासाठी गायन करायला लावणारा संगीतकार, जवळपास, शंभर एक वादकांचा ताफा पदरी बाळगण्याची चैन बाळगणारा, जेंव्हा पाश्चिमात्य संगीताचा आढळ व्हायला लागला तरी देखील उद्मेखुनपणे भारतीय संगीताचाच आग्रह (प्रसंगी अत्याग्रह) धरणारा संगीतकार, तरी देखील पुढे पुढे पाश्चात्य संगीताची कास धरणारा, अशा अनेक विशेषांनी वर्णन करता येणे शक्य असलेला संगीतकार म्हणजे नौशाद!! त्यांची एकूण कारकीर्द बघितली तर, त्या काळातील बहुतेक सगळे गाणारे गळे, त्यांनी आपल्या रचनांसाठी वापरले, किंबहुना त्याच्या गळ्याची "ठेवण" ध्यानात घेऊन त्यांनी रचना बांधल्या!! एक बाब इथे ध्यानात घ्यायला हवी, चित्रपटांत गाणे, या क्रियेपेक्षा चित्रपट गीत हे गुणवत्तेने निराळे असते आणि संकल्पना पक्केपणाने रुजविण्यात, नौशाद यांचा हात मोठा होता. सांगीत प्रास्ताविक, मुखडा, मधले संगीत, सुमारे ३ कडवी आणि कधीकधी ललकारीपूर्ण शेवट अशी रचना केली की चित्रपट गीत उभे राहते. नौशाद यांचे आणखी वैशिष्ट्य सांगायचे झाल्यास, मुखड्याच्या संगीताची पूर्णत: किंवा अंशत: पुनरावृत्ती झाल्याने चाल आणि शब्द, दोहींचाही ठसा अधिक गडद होतो. लागोपाठ येणारी कडवी (अंतरा) फार क्वचित निराळ्या चालीत असतात. याचा परिणाम, चाल घट्ट विणीची, बांधलेली होते. नौशाद यांच्या रचना, सहज समजतात, कारण त्या जाणीवपूर्वक चाल बांधत जाण्याच्या पद्धतीनुसार रचलेल्या असतात.   


"साझ हो तुम, आवाज हुं मै" या गाण्यात, ही सगळी वैशिष्ट्ये नेमकेपणी ऐकायला मिळतात. त्रितालात बांधलेली रचना, तशी सहज, साधी आहे, रागाचे स्वरूप नेमके मांडणारी आहे. नौशाद, याबाबतीत फारसे प्रयोग करताना आढळत नाहीत. रागाधारीत रचना बांधताना, शक्यतो, त्या रागाचे जे नियम आहेत, त्यांचे कसोशीने पालन, करण्याकडे त्यांचा ओढ अधिक दिसतो. याचे महत्वाचे कारण, त्यांच्या विचारांत दिसते. चित्रपट गीतांत रागाचे स्वरूप, तसेच ठेवावे, या आग्रहाचा सगळा परिणाम आहे. वस्तुत: याची जरुरी नसते पण, आपली विचारधारा, यावरच आधारलेली असेल तर त्यातून सुटका करून घेणे अवघड जाते. या गाण्याच्या बाबतीत, हाच आग्रह प्रकर्षाने आढळतो. अर्थात, हे योग्य की बरोबर, याचे उत्तर तितके सोपे नाही. यातूनच पुढे असे म्हणावेसे वाटते, चित्रपट संगीताच्या आधारे, रागसंगीताचा प्रसार करणे, हा विचार कितपत योग्य आहे? नौशाद यांनी, आयुष्यभर या विचाराचा आग्रह धरला पण, मुळात, हा विचार कितपत संय्युक्तिक आहे, याचा देखील वेगळा विचार होणे गरजेचे आहे. 

आता आपण, "पटदीप" रागावर आधारित अशा काही गाण्याच्या लिंक्स बघूया, ज्यायोगे, या रागाची ओळख अधिक सार्थपणे व्हावी.  

कळा ज्या लागल्या जीवा 

मर्म बंधातली ठेव ही