Wednesday 18 June 2014

समृध्द गायकीचा असामान्य अविष्कार!!




लाल जर्द रुजाम्यावर मोत्यांचा सर ओघळावा त्याप्रमाणे, सभागृहात सारंगीचे स्वर उधळतात. पहिल्याच सुरात, राग यमनची छटा दिसून येते येते आणि अगदी हलकी फिरत घेऊन, सारंगी परत वळणाच्या टोकाशी येत असताना, गायकाचा घनगंभीर “निषाद” लागतो. तिथेच सुरावटीचे पहिले चित्र दिसायला लागते. लागलेला “नि” इतका खर्जात हळूहळू उतरतो की खरतर सारंगी त्या ध्वनीशी पूर्णपणे तादात्म्य पावत नाही!! मानवी गळ्याचे हेच तर खरे वैशिष्ट्य आहे.जिथे गळा पूर्ण ताकदीने स्वर लावतो, तिथे जगातील कुठलेच वाद्य त्या ताकदीच्या स्वराची प्रचीती देऊ शकत नाही. पहिल्या अप्रतिम “नि” नंतर शांतपणे त्याच खर्जात,गायक हळूहळू “बढत” करीत त्या आरोही स्वरांचे वर्तुळ पूर्ण करतो, ते अशा जागी की, तिथे तो रागच जणू आपले व्यक्तिमत्व उलगडून दाखवत आहे. वास्तविक गायक “गझल” सादर करीत असतो पण त्या गझलेची चाल आणि चालीतून निर्माण होणारी वळणे, यातून तो रागच आपले अस्तित्व दाखवत असतो. संपूर्ण सप्तक पूर्ण होत असताना, गायक गझलेच्या पहिल्या शेराला तोंड घालतो.”मुग्धम बात पहेली कैसे, बस वोही बुझे जिसको बुझाये” गायक इथे समेवर येतो कसा हे खरोखरच ऐकण्यासारखे आणि शिकण्यासारखे आहे. पहिली सरगम आपले सप्तक सारंगीच्या सहाय्याने पूर्ण करीत असताना, परत “नि” स्वराकडे वळताना, “मुग्धम” शब्दातील,”मु” या शब्दाबरोबर ती सम गठली जाते आणि ती कशी? एखाद्या नदीने ज्या शांतपणे स्वत:ला सागरात विसर्जित करावे, त्याप्रमाणे ती सरगम त्या समेवर येताना स्वत:ला संपवून टाकते. लिहायला फार सहज आहे पण प्रत्यक्ष ऐकताना, त्यातील सहजपणा किती अवघड आहे, हेच समजते. तबल देखील, त्या लयीतच स्वत:चे अस्तित्व हलकेच सामावून टाकत असतो. किंबहुना, संपूर्ण गझलेत, कुठेही तबला स्वत:चे असे खास वेगळे अस्तित्व दाखवत नाही.

बरेच वेळा, गझलेच्या मैफिलीत असे दिसून येते की, एखादा अंतरा आला, की लगेच तबलेवाला आपल्या बाह्या सरसावून, अक्षरश: रियाज करावा, त्या थाटात, तबल्यातील बोलाव्यतिरिक्त, कायदा दाखवायला सुरवात करतो. खूपवेळा प्रश्न असा पडतो की इथे गझल सादर होत आहे की स्वतंत्र तबला वादन!! तबला हा नेहमीच, त्या गायकाच्या गायकी अंगाने वाजणे आवश्यक असते, हे आता बहुदा नव्याने सांगायची वेळ आली आहे. सतत “खुरमंडी” घालून बहुतेकवेळा युद्ध करत असल्याच्या थाटात, वादन होत असते. खरेतर, रागदारी गायनात देखील तबला वादन हे नेहमीच “साथ” करण्यासाठी असते. तबल्यातील कौशल्य दाखवायचे झाल्यास, स्वतंत्र “एकल” वादन, वादकाला नेहमीच कौशल्य दाखवण्याची संधी देत असते. एक गोष्ट तर ध्यानात ठेवणे आवश्यक आहे, कितीही असामान्य तबला वादक असला तरीही, तबला हे वाद्य मुलत: साथीचे वाद्य आहे.
या गायनात एक गोष्ट लगेच ध्यानात येते आणि ती म्हणजे, गाण्यात वेगळे अस्तित्व अजिबात जाणवू न देणारी लय!! लय ही अशीच असावी लागते.वेगळ्या शब्दात लिहायचे झाल्यास, जेंव्हा सतारीवर मुख्य सरगम चालू असते, तेंव्हा तिच्या मागील पडद्यावर इतर स्वरांची “झमझम” चालू असते आणि ती स्वरावली, मुख्य स्वरांना एक वेगळेच परिमाण देत असते, फक्त “पडद्यामागे” राहून!! लय अशी स्पष्ट शब्दात सांगता येणे फार अवघड असते, ती अनुभवणे, हाच मार्ग आपल्याला उपलब्ध असतो. फार तर असे म्हणता येईल की, स्वरांतर्गत असलेल्या गमकातून जे “मिंडकाम” चालू असते, त्याला “लय” म्हणणे योग्य ठरावे, तरीही हे लिहिताना त्यातील अपुरेपण मलाच जाणवत आहे!! पण, ही फार शास्त्रीय भाषा झाली. दुसऱ्या शब्दात मांडायचे झाल्यास, एक स्वराहून दुसऱ्या स्वराकडे होत असणारा प्रवास, त्यातील सूक्ष्मातीसूक्ष्म श्रुतींमधून ध्वनीची गती अजमावणे, म्हणजे “लय” असे म्हणता येईल, तरीही यात नेमकेपणा येत नाही!! यात अनेक जटिल गोष्टी अंतर्भूत आहेत, म्हणजे श्रुती आणि त्यांचे अस्तित्व, वगैरे,वगैरे….
असो,परत त्या गझलेकडे वळूया. ही गझल उर्दू,संस्कृत आणि हिंदी, अशा तिन्ही भाषा एकत्रित करून लिहिलेली आहे.प्रसिध्द शायर आरझू लखनवी यांची गझल आहे.यात आणखी एक गोष्ट प्रकाशात येते, गझल म्हणजे केवळ उर्दू शब्दांची आतषबाजी नसून हिंदी व संस्कृत भाषेचा देखील समर्पक वापर करून, गझल लिहिता येते. अर्थात, गझलेत जसे, “रदीफ” आणि “काफिया” या दोन्ही गोष्टींचे जसे तंत्र सांभाळले जाते तसे इथे नेमके सांभाळले आहे. पहिल्या अंतऱ्यात, गायकाने आपल्या उर्दू व्यासंगाची प्रचीती दिली आहे. “जिसको अकेले में आ आकर, जाने तेरा हैं किसका” या ओळीचा आस्वाद खास घेण्यासारखा आहे. इथे ओळीच्या, पहिल्या भागात, “जिसको अकेले आ आकर” म्हणताना, त्याने “आ” आणि “आकर” या दोन्ही शब्दांचे उच्चार, इतके वेगळे केले आहेत की त्या चालीतून, त्या भाषेचा उठावदारपणाच नेमका ऐकायला मिळतो. गझलसारख्या उपशास्त्रीय संगीतात, हा दोष खूपवेळा ऐकायला मिळतो. स्वरांच्या लयीतील बिकटपणा सांभाळण्याच्या नादात, शब्दांची मोडतोड ऐकायला मिळते. कितीही झाले तरी, गझल म्हणजे रागदारी नव्हे, याचे भान राखणे आवश्यक असते.
हल्ली खूपवेळा याचे भान राखले जात नाही. गझल गायन म्हणजे केवळ स्वरविस्तार असाच विचार दिसून येतो आणि त्या अनुषंगाने मग, अतिरेकी सरगम, तानांचा वर्षाव, मध्येच मध्य सप्तकातून वरच्या सप्तकात गायला सुरवात करायची आणि ऐकणाऱ्याला चकित करून टाकायचे, असले “गिमिक्स” फार चालतात. यात, त्या शायरने जो आशय मांडला आहे तिथे संपूर्ण दुर्लक्ष होते आणि आपल्याच गळ्याचे “वजन” दाखवण्याचा समारंभ होतो.त्यामुळे, आपण “उपशास्त्रीय” गाणे गात आहोत, याचे भानच राखले जात नाही. इथे मात्र, गायकी तर दिसतेच पण, ती गायकी शब्दांना गोंजारून येते. कुठेही शब्दांची ओढाताण नाही की शब्द “मोडलेला” नाही. त्यामुळे, शायर काय म्हणत आहे, ते तर नेमकेपणे समजते. सुरवातीला थोडी सरगम येते पण नंतर अजिबात नाही, या उलट लयीच्या अंगाने वेगवेगळ्या हरकती, गायकाच्या गळ्याचे “वजन” दाखवून देते.
यमन रागाचे लक्षण तर सुरवातीपासून जाणवतेच पण रागाचे दर्शन हा हेतू नसून, शायरीचे अलौकिक दर्शन हाच स्वच्छ हेतू दिसतो. नि रे ग म ही सरगम आणि नंतर घेतलेला अति खर्जातील “सा” हे द्वैत इतके विलक्षण आहे की कशाकशाला दाद द्यायची याचाच संभ्रम पडावा!! जिथे शब्दांवर जोर हवा तिथे(च) आणि तितकाच, याचे अतिशय सुंदर उदाहरण आहे.
दुसऱ्या अंतऱ्यात येताना, मध्येच अतिशय अप्रतिम अशी सारंगीची सुरावट आहे, ती देखील अशी आहे की, शब्दच उपरे वाटावेत पण मुखड्याला धरून आहे. खर तर, प्रत्येक अंतरा वेगळ्याच सुरावर सुरु होतो पण, तरीही परत समेवर येताना, अशा चलाखीने सूर वळवले जातात की स्वरांची गंमत, या गुळगुळीत झालेल्या शब्दांचा नव्याने अर्थ जाणवावा. मुळात सारंगीचे स्वर हे अतिशय आर्त असतात, त्यातून गझल सारख्या अति मनस्वी गायकीत तर अधिक खुलून येतात. इथे गायकाची आणखी एक गंमत म्हणजे, गायकी दाखवताना, शब्दांतील आशय तर अधिक गहिरा व्हावा पण त्याचबरोबर आशयाची व्याप्ती अधिक खोलवर जाणवावी. हे “शिवधनुष्य” वाटते तितके सहजसाध्य अजिबात नसून, त्यामागे वर्षानुवर्षाचा व्यासंग आहे.
आणखी काय आणि किती लिहू. ज्याने “रंजिश ही सही” सारखी गझल लोकप्रिय केली, अशा मेहदी हसनबद्दल कुठलेच शब्द नेमकेपणा दाखवणार नाहीत. “रंजिश ही सही” ज्या रागात बांधली त्याच रागाचा आणखी अनोखा अविष्कार, त्याने गझलेतून केला. फक्त एकाच चूक मला आढळली. सीडीच्या कव्हरवर ही गझल “यमन कल्याण” रागावर आहे, असा उल्लेख आहे. इतकी अक्षम्य चूक कशी झाली? वास्तविक, मेहदी हसन, पहिल्या सुरातुनच यमन रागाचा आराखडा मांडतो तेंव्हा हे कसे?

No comments:

Post a Comment