Sunday 21 August 2022

जाने क्या ढुंढती रेहती है ये आँखे

"यही है आजमाना तो सताना किसको कहतें हैं, अदू के हो लिये जब तुम तो मेरा इम्तहां क्यों हो" (मिर्झा गालिब) मिर्झा गालिब हे उर्दू साहित्यातील अत्यंत प्रतिष्ठित नाव, जवळपास १५० वर्षे उलटून गेली तरीही आजही त्यांच्या रचनांचा अन्वयार्थ वेगवेगळ्या दृष्टिकोनातून लावला जातो. इतके भाग्य फार थोड्या कवींना लाभले आहे. म्हटले तर गालिब यांच्या रचना सरळसुत असतात परंतु मध्येच एखादा *अनवट* उर्दू शब्द येतो आणि मग ती रचना किंवा शेर एकदम अगम्य होऊन बसतो. ही शैली पुढे उर्दू शायरांमध्ये विस्तारत गेली. वरील द्विपदात *अदू* शब्द जरा अनवट आहे आणि त्याचा मराठी अर्थ *आले* अशा क्रियापदाच्या अनुषंगाने घेतला जातो आणि मग ही द्विपदी अगदी सोपी होऊन जाते. गंमत हीच असते, आपण जेंव्हा वाचायला घेतो तेंव्हा आपल्याला सगळे आयते ताटात वाढलेले, हवे असते पण स्वतःहुन वाढून घ्यायचे म्हटल्यावर त्रास होतो. कुठल्याही कविता किंवा उर्दू शायरीबाबत सर्वसाधारणपणे हाच अनुभव असतो. हीच द्विपदी आजच्या आपल्या गाण्यातील शायरीबाबत सन्मुख होते. या शायरीचे कर्ते आहेत, कैफी आझमी, दुसरे उर्दू शायरीमधील वजनदार नाव. कैफी म्हटले की लगेच त्यांची *डावी विचारसरणी* आणि तद्नुषंगाने केलेल्या कविता लक्षात घेतल्या जातात. अर्थात हे एकांगी आहे, जरी कैफी यांच्या रचनांमध्ये डावी विचारसरणी, अगदी प्रणयी थाटाच्या रचनांतून देखील वाचायला मिळते. कैफी प्रामुख्याने गाजले ते चित्रपटीय गाण्यांतून आणि चित्रपट म्हटला की तिथे अनेकविध प्रसंग असतात आणि त्यानुसार गाणी करणे क्रमप्राप्तच असते. चित्रपटात सातत्याने लिहून देखील सातत्याने ठराविक दर्जा कायम राखणारे शायर म्हणून कैफी यांचा सार्थ गौरव होतो. आता या गाण्यातील कवितेबाबत हेच मत आपले कायम राहील. गाणे अर्थात विरही प्रसंगावर आधारित आहे आणि ही भावना, मुखडा आणि पुढील तिन्ही अंतऱ्यात कायम राखली आहे. *राख के ढेर में शोला है ना चिंगारी है* ही ध्रुवपदातील दुसरी ओळ, सगळ्या कवितेचा आशय व्यक्त करते. वास्तविक राख म्हटल्यावर, न विझलेले निखारे डोळ्यासमोर येतात पण इथेच साहिर यांनी *शोला है ना चिंगारी* असे लिहून प्रणयातील व्याकुळता मांडली आहे . पहिल्या कडव्यातील आर्तता वाचण्यासारखी आहे. ध्रुवपदाचेच विस्तारित स्वरूप आहे परंतु जातिवंत शायर हा नेहमीच्या घिसापिट्या शब्दांचा वापर टाळून अर्थवाही शब्दांचा वापर केला आहे. *जिसकी तस्वीर निगाहो में लिये बैठी हो, मैं वो दिलदार नहीं उसकी हूं खामोश चिता*!! ओळी जरा शांतपणे वाचल्यावर ओळींच्या शेवटी आलेला *चिता* शब्द एकदम वेगळेच परिमाण देतो आणि असे अचानक वेगळे परिमाण देणे, ही उर्दू साहित्याची खासियत आहे. पुढे देखिलशाचं प्रकारचे विवेचन वाचायला मिळते. *कैसे बाजार का दस्तूर तुम्हे समझाऊं, बिक गया जो वो खरीदार नहीं हो सकता*!! पहिल्या ओळीत *बाजार* शब्द आल्यावर पुढील ओळीत *खरीदार* शब्द लिहून आपल्या आशयाची पूर्तता केली आहे. मघाशी मी वर म्हटल्याप्रमाणे, डाव्या विचारसरणीचा शायर, त्याचे इथे देखील अंधुक का होईना प्रत्यंतर येते. कलाकाराचा मूळ स्वभाव, विचारधारा अशाप्रकारे त्याच्या निर्मितीत उतरत असतो, संगीतकार खय्याम हे उर्दू साहित्याचे जाणकार वाचक म्हणून ख्यात होते. त्यांच्या समग्र कारकीर्द लक्षात घेता, त्यांच्या गाण्यात *सक्षम कविता* ही दृश्यभान दाखवते. हे तर आहेच की स्वररचना करायला *कविता* मिळाली की संगीतकाराला देखील हुरूप येतो. खय्याम यांनी आपल्या कारकिर्दीत फार वेगवेगळ्या शैलीचे शायर निवडले/घेतले. जसे, साहिर, मजरुह, अली सरदार जाफरी,शहरयार सारखे, ज्यांना *नामचीन* शायर म्हणता येईल, असेच कवी घेतल्याचे दिसून येते. एकतर खय्याम यांच्या स्वररचना बुद्धीला *ताण* देणाऱ्या असतात आणि त्यातून मग अर्थवाही उर्दू शायरी असली की मग एकूणच सगळी रचना वेगळ्याच उंचीवर जाते आणि तिथे ती रचना रसिकांकडून बुद्धीचा प्रतिसाद मागते. अर्थात ज्यांना असा विचार करायचाच नसेल तर त्यांनी खय्याम यांच्या वाट्याला जाऊ नये. आता प्रस्तुत गाण्याकडे वळावे. गाण्याची चाल सरळ सरळ *पहाडी* रागावर आधारित आहे. खय्याम यांच्या बऱ्याच चालींत या रागाचे अंश सापडतात. असेही म्हणता येईल, खय्याम यांचा पहाडी राग अतिशय आवडीचा होता. असे असले तरी त्यांनी ज्या प्रकारे आपल्या रचनेंत वैविध्य दाखवले आहे, ते केवळ स्तिमित करण्यासारखे आहे. गाण्याची सुरवात अतिशय व्याकुळ करणाऱ्या सारंगीच्या सुरांने होते, आणि त्याच शांतपणे आपल्याला मोहम्मद रफींचा आवाज ऐकायला मिळतो. आता सुरवातीलाच पहाडी रागाचे जरी सूचन होत असले तरी एकूणच सगळे वळण शायरीच्या आशयाला धरून केलेले आहे. *जाने ! क्या ! ढुंढती ! रेहती ! है* * पप ! प.. ग ! ग गग रे ! रेरे ग (म) ग ! ग* ही सुरावट बारकाईने ऐकल्यावर प्रस्तुत रागाची अंधुकशी चुणूक आपल्याला मिळते. मी वर जे विधान केले होते, खय्याम यांच्या रचना ऐकताना, रसिकाकडे बुद्धीचा प्रतिसाद मागते, याचे इथे रोकडे प्रत्यंतर ऐकायला मिळते. जाणकारांना पहाडी रागाची जातकुळी नक्की माहीत असणार आणि त्या दृष्टीने बघायला गेल्यास, त्या रागात अशी *फ्रेज शोधून* काढणे, हाच खरा व्यासंग म्हणता येईल. धृवपदाच्या दुसऱ्या ओळीत देखील हेच ऐकायला मिळते. *राख के ढेर मे* *रे गग ! रेसा ! रेसा निध ! ध* *शोला है ना चिंगारी है* *रे सासा ! सा ! सा ! रे पगरे सा ! सा !* इथे मी मुखड्याच्या दोन्ही ओळींचे मुद्दामून २ वेगळे खंड केले जेणेकरून प्रत्येक शब्द आणि त्यातील अक्षर, यांचा संगीतकाराने केलेला अभ्यास आपणा सर्वांच्या ध्यानात यावा. आता पुन्हा पहाडी रागाचे चलन गुणगुणून बघितल्यावर संगीतकाराची व्यामिश्र बुद्धिमत्ता लगेच ध्यानात येऊ शकते. गाण्यात ३ अंतरे आहेत पण बहुतांशी सारखेच आहेत. अंतऱ्यांसाठी वेगवेगळ्या स्वररचना करणे हे बुद्धीगामी नक्कीच असते परंतु जर का मुखड्याची चाल तितकीच सक्षम असेल तर आवश्यकता नसते. असेही म्हणता येईल, मुखड्याच्या चालीत थोडे सूक्ष्म बदल करून, कवितेतील आशय अधिक वृद्धिंगत करता येतो. शेवटच्या अंतऱ्यातील ओळी मात्र चढ्या सुरांत घेतल्या आहेत कारण, पुन्हा त्या कवितेच्या अर्थाकडे वळून बघितल्यावर उत्तर सापडते. गंमत अशी आहे, या ओळी संपल्यावर क्षणभर शांतता आहे. प्रेमाचा बाजार आणि त्याचा खरेदीदार म्हटल्यावर, अर्थच सगळा भिन्न होतो आणि त्यामुळेच संगीतकाराने तिथे *शांतता* ठेवलेली आहे आणि मग पुन्हा मुखडा गायला जातो. परिणामी गाणे अधिक अंतर्मुख होऊन, आपल्या मनात जाऊन बसते. मोहम्मद रफींनी गाताना, आपली परिचित गायन शैली बाजूला ठेवली आहे.अर्थात याचे श्रेय जितके गायकाचे तितकेच संगीतकाराचे म्हणायला हवे. आपली स्वररचना कशाप्रकारे रसिकांपर्यंत पोहोचवायची, याचे प्रत्येक संगीतकाराचे आडाखे असतात आणि त्यानुरूप तो गायकांकडून गायनाची मागणी करतो. इथे हाच प्रकार घडला आहे. हे गाणे जेंव्हा बांधले गेले तेंव्हा रफी,एक प्रतिष्ठित नाव झाले होते आणि त्यांची काहीशी *नाट्यात्म* शैली लोकप्रिय झाली होती. संगीतकार खय्याम याबाबत एक दावा नेहमी करायचे, त्यांनी रफीसाहेबांना वेगळ्या आणि मूळ शैलीत गायला लावले आणि त्यांच्या आवाजातील भावविवशता काढून टाकली. हे किती पूर्णांशाने सत्य आहे,हे सिद्ध करणे अवघड आहे कारण जवळपास याच काळात संगीतकार रोशन यांनी देखील रफींना मध्य तसेच ठाय लयीत गायला लावले होते. एक नक्की, खय्याम यांच्या गाण्यांत रफींचा आवाज फार मृदू असतो आणि शक्यतो कवीच्या शब्दांना गोंजारणारा असतो. अगदी विरहाची भावना असली तरी त्यात संयत भाव आणून, अनक्रोशी दु:ख प्रगट करायचे. विरही भावना ही शेवटी अति वैय्यक्तिक असते आणि अत्यंत खाजगी असते. आपले खाजगीपण कुणी टाहो फोडून व्यक्त करेल का? हा विचार, त्यामागे असतो. अगदी मुखडा गाताना देखील, विरहाची संयत भावनाच ऐकायला मिळते तसेच कवितेत बरेच उर्दू शब्द आहेत आणि जसे प्रत्येक भाषेचा एक स्वतंत्र *लहेजा* असतो आणि तो सांभाळूनच भाषेचे प्रगट होणे, अधिक न्यायी असते. रफींनी आपल्या गायनात हे औचित्य पूर्णांशाने संभाळल्याचे प्रतीत होते. मला खरेच विस्मय वाटतो, इतके सर्वांगसुंदर गाणे आपल्या समोर आले तरी हे गाणे विस्मरणात का गेले? मोहम्मद रफींच्या निधनानंतर जी गाणी बाहेर आली , त्यात या गाण्याचा समावेश निदान मला तरी दिसला नाही. प्रत्येक गाणे हे आपले नशीब घेऊन येतो, हेच खरे. जसे खय्याम हळूहळू विस्मरणात गेले (कभी कभी किंवा उमराव जान, काहीप्रमाणात काही लोकांच्या स्मरणात आहेत) त्याच चालीत असे म्हणावेसे वाटते,इतके नितांतसुंदर गाणे विस्मरणात गेले!! जाने क्या ढुंढती रेहती है ये आँखे मुझमें राख के ढेर में शोला है ना चिंगारी है अब ना वो प्यार उस प्यार की यादें बाकी आग वो दिल में लगी कुछ ना रहा, कुछ ना बचा जिसकी तस्वीर निगाहो में लिये बैठी हो मैं वो दिलदार नहीं उसकी हूं खामोश चिता ज़िन्दगी हंस के गुजरती थी बहुत अच्छा था खैर हंस के ना सही रो के गुजर जायेगी राख बरबाद मोहोब्बत की बचा रखी है बार बार इसको जो छेडा तो बिखर जायेगी आरजू जुर्म, वफा जुर्म, तमन्ना है गुनाह ये वो दुनिया है यहाँ प्यार नहीं हो सकता कैसे बाजार का दस्तूर तुम्हे समझाऊं बिक गया जो वो खरीदार नहीं हो सकता Jaane Kya Dhoondhti Rahti Hai - Mohammed Rafi - Dharmendra, Sulochana - YouTube

Friday 19 August 2022

करेलवाडीतील पारशी

माझे सगळे बालपण रूढार्थाने जरी मराठी लोकांच्यात गेले असले तरी बालपणाची माझी वाडी ही प्रामुख्याने पारशी आणि मराठी लोकांच्या वस्तीची होती. जवळपास अर्धी वाडी तरी पारशी लोकांची नक्कीच होती. माझे शेजारी तसेच आमच्या जुन्या घराच्या इमारतीत राहणारे (आमच्या व्यतिरिक्त) सगळे पारशीच होते. माझी शाळा चिकित्सक समूह, परिणामी शाळेतील सगळेच मित्र मराठी बोलणारे होते आणि ते क्रमप्राप्तच होते. त्यावेळचे माझे मित्र सुदैवाने आजही संपर्कात आहेत. मात्र शेजारी रहाणारे पारशी मात्र आता कुठे गेले? काहीच पत्ता नाही. मजेचा भाग म्हणजे आम्ही ज्या घरात रहात होतो, तिथे एका खोलीत पारशी लोकांची विहीर होती. अर्थात ती विहीर बुजवून टाकली होती आणि तिथे मोठे चौथरा बांधला होता. त्यामुळे, ती खोली फक्त कपाटे ठेवण्यासाठीच उपयोगी होती. माझ्या वडिलांचा छोटा कारखाना बाहेरच्या लांब, अरुंद खोलीत होता आणि आम्ही सगळे आतल्या ३ छोट्या खोलीत रहात होतो. त्या ३ खोल्या म्हणजे आमची १BHK स्वरूपाची जागा होती. अर्थात आम्ही तेंव्हा शाळकरी वयाचे होतो त्यामुळे कसलीच अडचण व्हायची नाही. माझ्या मते १९५६ किंवा १९५७ मध्ये या जागेत माझे आई,नाना रहायला आले. पुढे १९६९ साली नानांनी समोरच्या इमारतीत थोडी प्रशस्त जागा चौथ्या मजल्यावर घेतली आणि आम्ही तिकडे रहायला गेलो. म्हणजे वयाच्या सुरवातीची १० वर्षे तरी मी या जागेत काढली. अर्थात इतकी वर्षे या जागेत काढल्यावर आजूबाजूचे काही पारशी माझ्या चांगल्या ओळखीचे झाले होते. माझ्या शेजारी एक वयस्कर वयाची आजी रहात होती. इतकी प्रेमळ आजी, आजही माझ्या डोळ्यासमोर आहे. सतत गाउन वेशात असायची. तिचा नवरा, मला वाटतं, मी थोडा जाणता व्हायच्या आधीच गेला असावा. तिची एक मुलगी तिथे रहात असल्याचे आठवत आहे पण माझी ओळख झाली, त्याच सुमारास तिचे लग्न झाले आणि त्या घरी ती आजी एकटी रहायची. एका व्यक्तीसाठी ते घर खूपच मोठे होते. तिने घराच्या प्रवेश दरवाज्यात लाकडाची रुंद अशी फळी टाकली होती आणि त्या फळीवर. ती रोज संध्याकाळी बसून असायची. दिवसभर ती काय करायची? हा प्रश्न पडण्याइतका मी नक्कीच मोठा नव्हतो. मात्र तिच्या घराच्या बाजूला, पारशांची विहीर होती. अर्थात ती विहीर सिमेंटच्या चौथऱ्याने लिंपून टाकली होती. रोज संध्याकाळी ती त्या विहिरीची मनोभावे पूजा करायची. खरंतर आमच्या घरातील विहिरींची देखील अधून मधून पूजा करायला, इमारतीमधील दुसऱ्या मजल्यावर राहणारे पारशी यायचे. यायच्या आधी २,३ दिवस, ते नानांची परवानगी घ्यायचे. त्यामुळे हा पारशी सोहळा मला आजही लख्खपणे आठवत आहे. संबंध विहीर पाण्याने पुसून काढायची, नंतर मग विहिरीला भला मोठा हार घालायचा. हार घालताना, ते ओठातल्या ओठात काहीतरी मंत्र पुटपुटायचे.मात्र ते कधीच धडपणे ऐकायला मिळाले नाहीत. हार घालायच्या आधी, आपल्याप्रमाणे गंध वगैरे लावायचे. हार घालून झाला की मग काचेच्या ग्लासात तेल आणि वात असायची. तसे ४,५ ग्लासेस विहिरीवर ठेवायचे आणि वात पेटवायची. वात पेटवली की आपल्यासारखा डोळे मिटून मनोभावे नमस्कार (नमस्कार देखील आपल्यासारखाच, जराही फरक नाही) करायचा. ती विहीर म्हणजे त्यांचा "देव"! आमच्या वाडीलाच जोडून हेमराज वाडी आणि तिथे तर माझे शाळेतील सगळे मित्र. या दोन वाड्यांच्या मध्ये एक भिंत आहे आणि ती भिंत चढून हेमराज वाडीत जायचा माझा परिपाठ!! त्या भिंतीवर चढण्याचे २ मार्ग होते. एक म्हणजे भिंतीलगत गटार आहे, त्या गटाराच्या पाइपवरून गटाराच्या छोट्या भिंतीवर चढायचे आणि हेमराजवाडीत उडी मारायची किंवा त्या विहिरीवरून उडी मारायची. माझ्यासारखे बरेचजण विहिरीच्या आधाराने एकमेकांच्या वाडीत जात असत. आता विहिरीच्या बाजूची भिंत पडून जायला रस्ता केला आहे पण फार नंतर झाले. सुरवातीला सगळेच बिनदिक्कतपणे विहीरीवर पाय ठेऊन जात होते. काही दिवसांनी ही आजी भडकली. आज तिचे भडकणे न्याय्य वाटते तेंव्हा इतकी अक्कल होतो कुठे?विशेषतः दुपारच्या वेळेस, ती झोपलेली असताना, आम्ही सगळेच त्या विहिरीचा असा उपयोग करीत होतो. तेंव्हा अंगात मस्ती होती. साधी विहीर आणि तिचे इतके लाड? हाच प्रश्न मनात असायचा. तिचा डोळा चुकवून विहिरीवरून हेमराज वाडीत जायचे किंवा आमच्या वाडीत यायचे, यात सगळ्यांना आनंद वाटायचा. असो, एकूणच पारशी शेजारी असणे भाग्याचेच, पण आजची भावना आहे. कधीही कुणाच्याही आयुष्यात ढवळाढवळ नाही. त्यांचा एकूणच सगळा आब वेगळाच असायचा. इस्त्रीचे कपडे, गोरेपान चेहरेपट्टी, काहीशी संथ हालचाल, गुजराती सदृश भाषा याचे थोडे मनात आकर्षण होते. जेंव्हा जवळून जायचे तेंव्हा अंगावर शिंपडलेला परफ्युम, आमच्या नाकात दरवळायचा. त्या काळात परफ्युम लावणे, कल्पनेत देखील बसले नव्हते. त्यातून बहुतेक प्रत्येक पारशाकडे बजाजची स्कुटर असायची. पारशांचे एक वैशिष्ट्य तेंव्हाही नवलाचे वाटायचे. सकाळ सकाळी ६,६.३० वाजता, पारशी कुटुंब प्रमुख लेंगा आणि बनियन (त्यांची बनियन देखील विशिष्ट प्रकारचीच असायची) घालून, हातात पाण्याने भरलेली बादली घेऊन, स्कुटर धुवायला सुरवात करीत. स्कुटर ते इतक्या आत्मीयतेने साफ करीत की आपल्या बायकोवर इतकी आत्मीयता दाखवत असतील का? साधारणपणे अर्धा, पाऊण तास हा स्वच्छतेचा चालू असायचा. पुढे साऊथ आफ्रिकेत रहाताना, जेंव्हा मी गाडी घेतली आणि जेंव्हा गॅरेज मध्ये धुवायला नेत असे, तेंव्हा हटकून या पारशांचे दृश्य डोळ्यांसमोर तरळायचे. पारशांचे एकूण आयुष्य अतिशय आखीव रेखीव असायचे. आमच्यात ते कधीही खेळायला आल्याचे आठवत नाही . काही मुलांशी ओळख, मैत्री झाली झाली परंतु त्यांचे आयुष्य आणि आमचे आयुष्य यात सतत एक अदृश्य पडदा असायचा. मी तर त्यांच्याशी बहुतेकवेळा इंग्रजीत बोलत असे. त्यांना ते फार सोयीस्कर पडायचे. आमच्या शेजारच्या इमारतीतील दुसऱ्या मजल्यावर "केटी" नावाची बाई राहायची. अतिशय सुडौल बांधा, केसाचा अप्रतिम बॉब केलेला!! वास्तविक ती दुसऱ्या कुणाची तरी "बायको" होती तरीही केवळ आम्हा मित्रांचाच नव्हे तर सगळ्या वाडीचा Crush होती. एकतर मिडी-मॅक्सि मध्ये वावरायची. उंच टाचांची पादत्राणे घालायची. गोरापान रंग आणि त्यावर लाल चुटुक लिपस्टिक!! आम्ही तर तिच्याकडे बघतच बसायचो. तिच्याशी बोलायचे धाडस केवळ स्वप्नात!! वाडीत चालताना, कधीकधी ती केस उडवून सारखे करायची. तसे केल्यावर, त्यावेळी फार कळले नाही पण हृदयाची धडकन, वगैरे वाढायची!! पुढे काही कामानिमित्त मी तिच्या घरी गेलो होतो पण जाताना मीच अधिक नर्व्हस होतो!! खरे तर हे सगळे त्या पौगंडावस्थेतील चाळे होते कारण नंतरच्या आयुष्यात तिची फार आठवण मनात राहिली नाही. अर्थात त्यांच्या घरातील समारंभांना मात्र जरूर आमंत्रण मिळायचे. काही पारशी लग्नांना गेल्याचे आठवत आहे. इंग्रजी चित्रपटातील विवाह सोहळे बघितलेले असायचे आणि त्या सोहळ्यात आणि पारशांच्या लग्न सोहळ्यात काहीतरी साम्य आढळायचे. त्यांचा "पटेटी" हा सण मात्र खूप लक्षात राहिला. त्या निमित्ताने तूप, दुधात साखरेसह मिसळलेल्या शेवया आणि वरती चारोळ्यांची पखरण, असा "साज" आमच्या घरी यायचा. एक, दोनदा "धनसाक" खाल्याचे तुरळक आठवत आहे. अर्थात दिवाळीत माझी आई देखील फराळाचे ताट पाठवीत असे. माझी विशेषतः "येझदी" नावाच्या मुलाशी बऱ्यापैकी मैत्री होती. आम्ही बरेचवेळा वाडीतच गप्पा मारीत बसायचो. त्यांची शाळा, त्यांचे रीतिरिवाज वगैरे मला त्याच्याकडूनच समजले. वास्तविक, आमच्या इमारतीत "बर्जेस" नावाचा गोरापान मुलगा, माझ्या वयाच्या जवळपास होता पण त्याच्याशी कधी २ शब्द बोलल्याचे आठवत नाही. एकूणच पारशी तसे एकलकोंडे वृत्तीचे. माझ्या आई,नानांशी काही पारशी लोकांशी ओळख होती पण त्या ओळखीचे मैत्रीत कधी रूपांतर झाले नाही. माझ्या इमारतीत आमचे कुटुंब वगळता चारी मजल्यावर पारशी रहायचे. अर्थात कधी कधी वादावादी व्हायची. गिरगावात आजही पाण्याची बोंब असते, पहाटेला तास, दीड तास पाणी येणार आणि त्यावेळातच घरातले पाणी भरून घ्यायचे. आम्ही तळमजल्याला रहात होतो, परिणामी आमच्याकडे पाण्याचा "फोर्स" जास्त! बरेचवेळा असे व्हायचे, आम्हाला कधीतरी जास्तीचे पाणी लागायचे आणि मग पाण्याचा नळ आमचा चालू असायचा. जरा विलंब झाला की मात्र वरील पारशी ओरडायला लागायचे - _ए तल माला पानी बंद करो! काही वेळ आरडाओरडा चालायचा. आम्ही भाऊ सगळेच अर्ध्या चड्डीतले, काय बोलणार? कधी कधी वरच्या मजल्यावरून मासे धुतलेले पाणी खाली गटारात फेकले जायचे! मग आईचा वितंडवाद सुरु व्हायचा. क्वचित बाचाबाची झाल्याचे आठवत आहे पण असे काही तुरळक प्रसंग वगळता, एकूणच कधीही त्रास झाला नाही. आणखी एक आठवण मनात रुंजी घालत आहे. जवळपास रोज, संध्याकाळी दिवेलागण झाल्यावर प्रत्येक पारशाच्या घरातून मंद असा धुपाचा वास यायचा आणि सगळ्या वाडीभर दरवळत असायचा. अर्थात माझ्या घराच्या आजूबाजूला सगळेच पारशी असल्याने, माझ्या घरात तर तो वास कोंदलेला असायचा. प्रत्येक पारशाच्या घरात धातूचे भांडे (आपल्या वाटीपेक्षा मोठे) असायचे आणि त्यात पेटलेले कोळसे आणि त्याच्यावर चंदनाच्या तुकड्यांची पावडर आणि तुकडे टाकले जायचे आणि ते भांडे, संपूर्ण घरात फिरवले जायचे. बरेच वर्षे हा सुगंध नाकात आणि मनात भरून राहिलेला होता. या पारशांनीच सकाळी भेटल्यावर "Good Morning" करायचे शिकवले. तेंव्हा आम्हा सगळ्या मुलांना याचे नवलच वाटायचे. आम्ही मित्र सकाळी शाळेत जायला एकत्र निघत असू पण कधी असले आमच्या तोंडून चुकूनही आले नाही!! एक नक्की, हे पारशी सगळे आर्थिक दृष्ट्या बऱ्यापैकी सधन होते. माझ्या इमारतीतील पहिल्या मजल्यावरील मुलगी South African Airways मध्ये नोकरीला होती. ती तिथे नोकरीला आहे, याचा मला पत्ताच नव्हता. पुढे, मी एकदा तिथे तिकिटासाठी गेलो असता, तिनेच मला ओळख दाखवली. अनिल अवाक!! पण बहुतेक पारशी हे, गोदरेज,टाटा किंवा वाडिया सारख्या प्रचंड मोठ्या कंपन्यांमध्ये नोकरीला होते. काहींची मुले परदेशात गेली आणि स्थिरावली, असेही पुढे समजले. हळूहळू पारशी आमची वाडी सोडून दुसरीकडे रहायला गेले आणि वाडीतील शांतता भंगली. आता तर वाडीत ५०% पेक्षा जास्त मारवाडी आहेत आणि त्यांचा कलकलाट आहे.