Thursday 19 June 2014

सुगम संगीत – एक तौलनिक विचार – भाग ६



पाचव्या भागात आपण, रिमिक्स आणि फ्युजन संगीतावर थोडा विचार केला. वास्तविक फ्युजन संगीताचा “मूळ” विचार स्तुत्य आहे, ज्यायोगे सामान्य रसिकांना रागदारी संगीताची गोडी निर्माण व्हावी.पण, जसे आपण आधी पहिले की, माध्यमाचा अर्धवट विचार आणि उद्दिष्ट विसरून केवळ झटपट प्रसिद्धी डोळ्यासमोर ठेउनच बहुतेकवेळा फ्युजन तयार केले जाते आणि कल्पनेचा विपर्यास होतो. असो, आता आपण हा विषय जरा पुढे नेऊया.आपण, पूर्वी जसे एक मत मांडले की, संगीतकार हा या सगळ्या रचनेचा प्रमुख असतो, त्याच बाजूने विस्तार करायचा झाल्यास, खूपवेळा आणखी एक विचार लोकांत प्रसिध्द आहे आणि तो म्हणजे, सुगम संगीत हे मुलत: सामान्य रसिकांसाठी असल्याने, त्याची “चाल” ही सहज गुणगुणता येण्यासारखी असावी.गाणे कानावर पडले की लगेच मनावर ठसले पाहिजे, “धून” ही catchy हवी, असा आग्रह दिसतो. एकतर खरेच आहे की गाणे “ऐकायला” सहज हवे. चाल ही लगेच मनात भरायला हवी. पण, खूपवेळा या विचाराचा अतिरेक दिसून येतो. चाल सहज आणि साधी हवी, या नादापायी, शब्द काय आहेत, विशेषत: चित्रपट गीत ध्यानात घेता, प्रसंग काय आहे, कुठे चित्रित केला जाणार आहे, प्रसंगाची व्याप्ती किती खोल आहे, असले प्राथमिक विचार देखील लक्षात न घेता, चाल बनवली जाते, आणि बरेच वेळा (अकारण) ताल वाद्यांचा अति भडीमार करून, लोकांच्या डोक्यावर “आदळले” जाते!! त्यातूनच, मग अशा निकृष्ट गाण्यांचे अत्यंत उत्कृष्ट मार्केटिंग केले जाते आणि भरपूर प्रसिद्धी मिळवली जाते. जर का नृत्याचे गाणे असेल तर, ताल वाद्यांचा उपयोग समजू शकतो पण, सरसकट सगळ्या गाण्यांच्या बाबतीत वाद्ये हाच प्रमुख आधार घेऊन गाणी तयार केली गेली की मग, सुगम संगीताचा मूळ उद्देश विस्मरणात ढकलला जातो. हॉटेलमधील पाश्चात्य धर्तीचे गाणे, किंवा शास्त्रोक्त नृत्य तसेच लावणी वा तत्सम धर्तीवरील गाण्यात ताल वाद्ये,हाच एक प्रमुख घटक रचनेत सामावणे, हे समजण्यासारखे आहे. वास्तविक, त्यातही अत्यंत संयमित वाद्ये वापरून आवश्यक तो परिणाम साधता येतो, विशेषत: आर.डी.बर्मन यांची काही गाणी वानगीदाखल बघता येतील. पण, काही वेळा उगाचच ताल वाद्यांचा भडीमार ,तुमच्या रचनेला हानिकारक असतो, हे ध्यानातच ठेवले जात नाही. जरा खोलात विचार केला तर असेच दिसून येते की, मूळात तयार केलेली चाल(च) अतिशय निकृष्ट असते, मग अशा फडतूस चालीला वर उचलण्यासाठी ताल वाद्यांचा अकारण वापर करून, त्या तालावरच गाणे बाजारात प्रसिध्द करायचे!!
जर का, त्या गाण्याची चाल, शब्दविरहित ऐकली की लगेच चालीचे “वजन” ध्यानात येऊ शकते. त्यातून एक प्रकार अतिशय राजमान्य आहे. तेच गाणे सतत लोकांना ऐकवत राहायचे म्हणजे, त्याचा इष्ट परिणाम घडून, तेच गाणे रसिकप्रिय होते. असे गाणे, पूर्वी रेडियोवरून आणि आता टी.व्ही. वरून लकांच्या नजरेसमोर ठेवायचे आणि ज्याला Hammering म्हणतात, तसे करायचे!! अशा प्रकारे, गाणी प्रसिध्द करायची!! अशा गाण्यांना कधीच फारसे आयुष्य लाभत नाही, हे तर उघडच आहे. त्यामुळे, गेले अनेक वर्षे, सुगम संगीतासारखा सृजनात्मक प्रकार Business म्हणावा अशा प्रकारे राबवलेला दिसून येतो. त्यातून, एक बाब तर कुणीच ध्यानात घेत नाही. सुगम संगीत हे जरी सामान्य रसिकांसाठी असते(हा खरेतर खुळचट विचार आहे!! तरीदेखील!!) त्यात कितीतरी वेळा रागाच्या पलीकडील भावना दाखविण्याइतके कौशल्य दिसू शकते. याचा अर्थ असा नव्हे की चाल जर “रागदारी” संगीतावर(च) आधारलेली असेल तर(च) ते गाणे उत्तम!! तसे पहिले गेल्यास, निदान बहुतेक भारतीय सुगम संगीत हे रागाधिष्टीत(च) असते. गाण्याची पाळेमुळे ही कुठेतरी कुठल्यातरी रागाशी साद्धर्म्य दाखवणारी असतात. याउलट कितीतरी गाणी एखाद्या रागावर आहेत असे भासवले जाते पण तरीही एक गाणे म्हणून तितकेसे परिणामकारक नसते. उदाहरणच द्यायचे झाल्यास, रफीचे हमीर रागातील, “मधुबन में राधिका नाचे रे” हे गाणे बघूया. या गाण्यात, शास्त्रोक्त दृष्टीने, आलापी, हरकती, वक्र ताना आणि शेवटी तराणा असे सगळे प्रकार अंतर्भूत केले आहेत, ज्यायोगे हमीर राग सगळ्यांच्या लक्षात यावा. पण, इथे मूळ उद्देशच विसरला गेला आहे. सुगम संगीत हे काही रागदारी संगीत नव्हे, जर का रागदारी संगीत ऐकायचे असेल तर, हाच हमीर राग कितीतरी गवयांनी/वादकांनी अजरामर केलेला आहे, तो ऐकावा!!प्रस्तुत गाणे एका नृत्याला जोड किंवा जुगलबंदी या स्वरुपात जरी असले तरी, रागाची प्रकृती दाखवायची, याच आग्रहाने हे गाणे तयार केले आहे. त्यामुळे, गाणे कितीही “सुश्राव्य” असले तरी, मूळ विचाराला हरताळ फासल्यासारखे वाटते!! तसाच प्रकार, लताच्या “मनमोहना बडे झुठे” या गाण्याबाबतीत बोलता येईल. मूळ रागातील चीजेवर फक्त शब्द डकवले आहेत, म्हणजे मग यात संगीतकाराचे काय कौशल्य? रागावरील बंदिश तुमच्या हातात तयार असते, फक्त कौशल्य असते ते कवीचे, जो त्या आराखड्यावर योग्य स्गाब्द बसवून देतो. प्रस्तुत गाणी बरीच प्रसिध्द आहेत आणि ऐकायला सुश्राव्य आहेत, हे कबूल पण एकूण साकल्याने विचार करता, संगीतकाराची प्रतिभा म्हणून काहीच जाणवत नाही. सुगम संगीतात काय किंवा मराठी नाट्यसंगीतात काय, अशा readymade रचना बऱ्याच आढळतात, त्या ऐकायला चांगल्या वाटतात, खूप प्रसिध्द आहेत पण एक विविक्षित क्षणी डागाळलेल्या वाटतात. नाट्यसंगीतात प्रसिध्द असलेले, “सुजन कसा मन चोरी” हे अत्यंत प्रसिध्द गाणे घेतले तर असेच दिसून येईल की, हे गाणे, भूप रागातील,”फुलवन की सेज” या प्रसिध्द बंदिशीवर संपूर्णपणे आधारलेले आहे. पाहिजे तर, बंदिश आधाराला घ्यावी पण सुगम संगीताची रचना करताना, त्यात संगीतकाराचे स्वत:चे contribution कुठेतरी दिसायला हवेच हवे. हिंदी चित्रपट संगीतात अशी असंख्य उदाहरणे देता येतील की जी त्या रागाचा “आभास” निर्माण करतात पण रचना म्हणून संगीतकाराची स्वत:ची नाममुद्रा उमटलेली असते. हेच तर संगीतकाराचे कौशल्य!!
इथेच तुमचा शास्त्रीय संगीताचा किती व्यासंग आहे, याची प्रचीती घेता येते. तसाच प्रकार, विशेषत: चित्रपट गीत तयार करताना दिसून येतो. कधीकधी, पाश्चात्य धुनेची मदत घेऊन गाणी तयार केली जातात. तिथेही तोच नियम लागू पडतो. अगदी, बीथोवन, मोझार्ट किंवा बाख यांच्या अजरामर धून वापरू शकता पण त्यात तुमचे काहीतरी कौशल्य दिसणे अनिवार्य ठरते. अगदी या बाबतीत, सलील चौधरी यांच्या “इतना ना तू माझासे तू प्यार बढा” या गाण्याबाबतीत म्हणता येईल. गाण्याची सुरवात सरळ, सरळ मोझार्टच्या एका धुनेने सुरु होते पण, नंतर गाणे निराळ्या वळणाने संपते. पहिला अंतर आला की लगेच रचना वेगळे स्वरूप दाखवते आणि इथेच संगीतकाराचे वैशिष्ट्य दिसून येते. तसेच आणखी एक उदाहरण बघूया. अनिल बिस्वास यांनी, “जीवन हैं मधुबन” हे गाणे बनविताना, प्रसिध्द पाश्चात्य गाणे,”के सरा, सरा” या गाण्याची मदत घेतली आहे पण, ही मदत, ती रचना जरा खोलात जाऊन ऐकली की ध्यानात येते. सत्कृतदर्शनी इंग्रजी गाण्याचा भास देखील होत नाही!!इथे अकारण आपल्या संगीताची आत्मप्रौढी असला कोता विचार करण्याची अजिबात जरुरी नाही. गाणे आपल्या मुशीतून तयार करणे, हेच त्या देशाच्या संस्कृतीचे वैशिष्ट्य नाही का? सरळ, सरळ पाश्चात्य संगीतावर डल्ला मारायचा आणि नवीन रचना तयार केली, असला (पोकळ) पुकारा करायचा, याला काहीही अर्थ नाही. त्यापेक्षा मग, आपल्याच रागातील बंदिशींवर डल्ला मारणे, केंव्हाही योग्य!!
आता याबाबतीत दुसरे उदाहरण देता येईल. सुधीर फडके यांच्या बहुतेक रचना या “यमन” रागावर आधारित आहेत किंवा शंकर-जयकिशन यांनी बरीचशी गाणी “भैरवी” रागावर बांधलेली आहेत. पण, जर का बहुतेक गाण्यांचा स्वतंत्र विचार केला तर असेच आपल्या ध्यानात येईल की, प्रत्येक चालीची मुले ही जरी त्या रागावर असली तरी देखील पहिल्या अंतऱ्यानंतर रचनेची वळणे सुटी होतात!! हेच तर खरे संगीतकाराचे वैविध्य. त्यातून, एक धोका उद्भवतो आणि तो म्हणजे सतत गाणी बांधत राहिल्याने, कुठेतरी तोचतोच पणा जाणवत राहतो पण ते तर “अटळ” असते.त्यातून कुठलाच संगीतकार सुटलेला नाही. त्यालाच आपण, “शैली” असे नाव देतो.

No comments:

Post a Comment