Saturday 20 February 2016

आईये मेहरबां



संध्याकाळची शांत, मंद, मदिर वेळ. नेहमीचे हॉटेल तसे ओकेबोके वाटत होते, अजूनही हॉटेलमध्ये येणाऱ्या गिऱ्हाइकांची वर्दळ नसल्याने एकूणच आसमंत काहीसा निर्जीव" भासत होता. हळूहळू एकेक करून माणसे येउन, टेबलावर बसायला लागली आणि ते हॉटेल "जिवंत" व्हायला लागले. संध्याकाळी, इथे दर दिवशी गाणी आणि नृत्याचा कार्यक्रम, हे खरे आकर्षण असल्याने बरेचसे "आंबटशौकीन" तसेच खलबते करणारी माणसे आजूबाजूला वावरायला लागली.
गाण्याचा कार्यक्रम असल्याने, स्टेजवर वादक आपली वाद्ये जुळवून, गायिकेच्या प्रतीक्षेत. अचानक, हॉटेलमध्ये गिटार,चेलो आणि clarinet वाद्ये झंकारायला लागली आणि ते वातावरण धुंद व्हायला लागले. नेहमीची माणसे यायला लागली आणि स्टेजवर गायिकेचे आगमन होते!! आगमन होतानाच, तिच्या गळ्यातून धुंद करणारा आलाप येतो आणि वातावरणात खऱ्याअर्थी "नजाकत" निर्माण होते. 
चित्रपट "हावरा ब्रिज" मधील, "आईये मेहरबां" हे अत्यंत लोकप्रिय गाणे आणि त्या गाण्याची ही पार्श्वभूमी. दिग्दर्शक शक्ती सामंता यांनी, हे गाणे चित्रित करताना, खूपच कल्पकता दाखवली आहे. अर्थात, संगीतकार ओ.पी. नैय्यर यांच्या रचनाकौशल्याचा सिंहाचा वाटा. गाण्यात , मधुबाला, अशोक कुमार आणि के.एन.सिंग असे तगडे अभिनेते आहेत. असे असून देखील पडद्यावर छाप पडते, ती मधुबालाचीच.  
"तोंच वाजल्या तुझ्या सपाता सळसळला घोळ 
आलीस मिरवित चालीमधुनी नागिणीचा डौल, 
करांतून तव खिदळत आले स्तनाकार पेले
जळता गंधक पाच उकळती यांही रंगलेले."
कविवर्य बा.भ.बोरकरांच्या अविस्मरणीय ओळींची ग्वाही देत, मधुबाला स्टेजवर येते ती अशाच एखाद्या नागिणीचा डौल घेऊन आणि त्याच्या साथीला आशा भोसल्यांचा अवर्णनीय मादक स्वर. पडद्यासारखी निर्जीव चीज देखील हे सौंदर्य बघून बावचळून जायची तिथे आपल्यासारख्या स्खलनशील मानवाचे काय वर्णावे!! स्टेजवर तिचा जो प्रवेश आहे, तो खास बघण्यासारखा आहे. आपण एका हॉटेलमधील प्रसिद्ध गायिका आहोत आणि आपले काम, हॉटेलमध्ये येणाऱ्या माणसांचे मन रिझवणे, हे आहे आणि या कामाची पूर्तता, तिच्या स्टेजवरील आगमनातून पुरेपूर दिसून येते. खरेतर पुढील सगळे गाणे म्हणजे गाण्यावर अभिनय कसा करावा याचा सुंदर वस्तुपाठ आहे. 
आता आपण गाण्याकडे वळूया. गाण्यातील शब्दकळा काही असामान्य अशी अजिबात नाही, अर्थात हॉटेलमधील नृत्यगीत आहे म्हणजे त्यात अलंकारिक भाषा,प्रतिमा, उपमा यांना फारशी जागा नसते. परंतु तरीही शब्द लिहिताना, चालीचा "मीटर" ध्यानात घेऊन, चित्रपटातील प्रसंग डोळ्यासमोर ठेऊन रचना करावी(च) लागते. चित्रपट गीतकारांना उठसूट नावे ठेवण्याची आपल्याकडे पद्धत आहे पण त्यांनी या बाजूकडे देखील लक्ष दिले तर असला "फिजूल" आरोप करण्याकडे ते वळणार नाहीत.  
गिटारच्या पहिल्या सुरांपासून गाण्याचे "घराणे" ध्यानात येते. आता हॉटेलमधील नृत्यगीत आणि ते हॉटेल देखील संपूर्णपणे पाश्चात्य धाटणीचे म्हटल्यावर गाण्याची चाल देखील त्याच धर्तीवर असणार, हे ओघानेच आले. गाण्याच्या सुरवातीच्या वाद्यमेळात गिटार, चेलो सारखी वाद्ये वाजत असतात आणि त्या वाद्यांनी गाण्याची अप्रतिम पार्श्वभूमी तयार झाली आहे. इथे आणखी एक बाब नजरेसमोर आणावीशी वाटते. आपल्याकडे संगीतकार किंवा रचनाकार म्हटले की त्याला रागदारी संगीताचे प्राथमिक ज्ञान आणि परिपूर्ण अभ्यास असणे गरजेचे आहे, असा प्रवाद प्रसिद्ध आहे. मला स्वत:ला तसे वाटत नाही. या गाण्याचे संगीतकार ओ.पी.नैय्यर यांनी असा कुठलाही अभ्यास केला नव्हता पण तरीही त्यांच्या कितीतरी रचना या रागदारी संगीतावर आधारित आहेत आणि त्या रचना करताना, कुठेही चाचपडलेपण आढळत नाही. चित्रपट गाणे हा एक स्वतंत्र आविष्कार असतो आणि त्यासाठी काव्याची जाणकारी तसेच वाद्यांची परिभाषा माहितीची असली तरी देखील खूप प्रमाणात पुरेसे ठरू शकते. 
"आईये मेहरबान, बैठीये जानेजां 
शौक से लिजिये, इष्क की इम्तेहान."
इथे आशाबाईंनी "आईये" शब्द कसा घेतला आहे, हे ऐकण्यासारखे आहे. स्वरांत जितका म्हणून "मादक"पणा आणता येईल (यात कुठेही उठवळ वृत्ती दिसत नाही आणि हे फार महत्वाचे) तितका आणला आहे गाताना किंचित "आ"कार लांबवला आहे आणि त्यातूनच गाण्याचा पुढील विस्तार कसा असेल, याचे मदभरे सूचन केले आहे. "आईये" शब्दाचा किंचित उच्चार करून त्यालाच जोडून "हुंकारात्मक" स्वरिक आवाहन आणि त्याच्या जोडीला मधुबालाची दिलखेचक हालचाल!! सगळा "माहौल" तयार!! हॉटेलमध्ये पाहुणे आले आहेत आणि त्यांच्यासाठी आजची संध्याकाळ अविस्मरणीय करायची, याच उद्देशाने ही रचना बांधली आहे आणि मग त्यासाठी "ला ला ला" असे निरर्थक शब्दोच्चार देखील अर्थपूर्ण ठरतात. ही किमया आशाबाईंच्या अलौकिक गायनाची. स्वरावली कागदावर असते परंतु गायकाच्या गळ्यातून खऱ्याअर्थाने, त्या स्वरावलीला पुनर्जन्म मिळतो आणि मग ती रचना चिरंजीव होते. 
गाण्याची धाटणी ही सरळ,सरळ पाश्चात्य "waltz" धर्तीवर आहे आणि त्याच थाटात, गाण्याचा नृत्याविष्कार आहे. तालासाठी जरी काही ठिकाणी "चायानील ब्लॉक" हे वाद्य वापरले असले तरी गाणे जेंव्हा सुरु होते तिथे संगीतकाराने, ज्या वाद्याच्या  आधारे सगळी कारकीर्द सजवली त्या ढोलक वाद्याचा आणि जोडीने पारंपारिक तालाचा वापर केला आहे. हॉटेल मधील पाश्चात्य धर्तीवर गाणे आणि तरीही तालाला ढोलक!! अर्थात याचे श्रेय पूर्णपणे संगीतकाराकडे जाते. तालाला ढोलक असूनही गाणे कुठेही "विशोभित" होत नाही!! 
गाणे जरी सर्वस्वी मधुबालाचे असले तरी अशोक कुमारचे अस्तित्व देखील खास आहे. तोंडात रुबाबात सिगारेट पेटवून, धूर काढत असताना, ओंठावर जे हास्य विलसत ठेवले आहे, ते बघत गाणे ऐकणे हा सुंदर अनुभव दार्शनिक अनुभव ठरतो. खरेतर या अभिनेत्याच्या प्रत्येक हालचालीत "ग्रेस" आहे, कुठेही "बेंगरूळ" होत नाही. मधुबाला आपल्यावर "फिदा" आहे, याचा अभिमान तसेच ती गाताना शेजारी(च) बसलेल्या के.एन. सिंगला सतत डिवचत असते (हे डिवचणे देखील अतिशय लाघवी आहे!!) त्यामुळे सुखावलेला अहंकार देखील बघण्यासारखा आहे. गाण्यात शेवटाला. मधुबाला त्याला, आपल्याबरोबर नृत्य करायचे आमंत्रण देते, त्यावेळचा आविर्भाव देखण्यालायक आहे. 
"कैसे हो तुम नौजवान, कितने हसीन मेहमान 
कैसे करू मैं बयां, दिल कि नहीं हैं जुबां."
गाण्यातील आशय ध्यानात ठेऊन, चित्रीकरण केले असल्याने गाणे ऐकण्याबरोबर बघायला देखील मनोरंजक आहे. वरील ओळीतील "नौजवान" शब्दावर Camera अशोक कुमारच्या चेहऱ्यावर क्षणमात्र स्थिर ठेवला असून, या ओळीच्या वेळेस, दोघांनाही असेच वाटत असते मधुबाला "आपलीच" आहे!! गाण्याची चाल तशी प्रत्येक टप्प्यात सारखीच आहे म्हणजे पहिला अंतरा वेगळा, दुसरा वेगळा असले प्रयोग नाहीत पण गाणे इतके वेगात पुढे सरकत असते की त्याची जाणीव देखील आपल्याला होत नाही. दोन्ही अंतऱ्याच्या मध्ये Waltz च्या तालावर twist नृत्याची जोड दिली आहे आणि त्याने गाण्यात वेगळीच खुमारी येते. वास्तविक पाश्चात्य नृत्य म्हणजे म्हणजे दोन शरीरांची भेट, इतपत तोकडा अर्थ नसतो तर शारीरिक हालचालीतून किंवा अंगप्रत्ययांतून तालाचे देखणे सौंदर्य दाखविले जाते फक्त ते ओळखण्याची "नजर" हवी!! 
"देखा मचल के जिधर, बिजली गिरा दी उधर 
किस का जला आशियां, बिजली को ये क्या खबर."
चाल तशीच आहे पण सादरीकरण बहारीचे आहे. या ओळींच्या वेळेस, मधुबाला, के.एन.सिंग यांच्या जवळ जाते पण त्यांना हुलकावणी देत, अशोक कुमारकडे वळते. दोन्ही वेलची देहबोली तर खास आहे. छचोरपणा नक्कीच आहे पण उठवळपणा नाही त्यामुळे ते "झुलवणे" देखील आल्हाददायक होते. 
गाण्याच्या सांगीतिक रचनेबद्दल थोडे दोन शब्द. मोहिनी घालणारे, भुलविणारे संगीत:अशारीर प्रेम किंवा रूढीमान्य, शिष्टसंमत प्रेमाविरुद्ध बंड पुकारणारे भाव, परकीय वाटणाऱ्या आणि चमकदार वाद्यध्वनींचा कौशल्यपूर्ण वापर आणि सर्वसाधारणत: मान्य भाषिक आणि उच्चार संकेतांना तिलांजली अशी यादी करावी लागेल. स्पष्ट बोलायचे झाल्यास, या प्रकारच्या गीतांना सूक्ष्म सुरेलपणापासून दूर सरकायचे असते. संबंधित गायक वा वादक यांना सुरावट दाखवता, दाखवता नियंत्रित पद्धतीने बेसूर होता यावे यासाठी चालीत हेतुपूर्वक काही जागा निर्माण केलेल्या असतात. नैतिक कक्षेच्या बाहेर जाण्याच्या आशयास चालीतही जणू काही समांतर बांधणी असते. या सगळ्या आणि इतर अनेक वैशिष्ट्यांसाठी संगीतकार ओ.पी.नैय्यर निश्चित प्रशंसेस पात्र आहेत. 
हिंदी चित्रपट संगीतात, सी. रामचंद्र यांनी जो पाश्चात्य संगीताचा पायंडा पाडला त्या मार्गाला आणखी वेगळे वळण देण्याचे काम या गाण्याने केले आणि या मार्गावर आणखी अनेक विस्तार सुचविण्याच्या शक्यता भरपूर निर्माण केल्या. त्या दृष्टीने, हे गाणे निश्चितच एक "मैलाचा" दगड म्हणून गणले गेले. 

Saturday 13 February 2016

नाचे मन मोरा मगन

संध्याकाळची वेळ, रंगमंचावर नृत्य गीताचा अपूर्व कार्यक्रमाची आखणी झालेली असते. रंगमंचाच्या आतल्या बाजूला, काहीशा अंधाऱ्या प्रकाशात गायक आणि साजिंदे  तयारीत असतात आणि अचानक रंगमंचावर प्रकाश उजळतो आणि तरुणी आपल्या नृत्याच्या वेषात, कार्यक्रम सुरु होण्याची वाट बघत असते. वेशभुषेवरून आणि एकूणच नृत्यांगनेच्या आविर्भावावरून कथ्थक नृत्याला सुरवात होणार, याची आपली खातरजमा होते. 
सगळा प्रेक्षकगण काहीशा अधिरतेने कार्यक्रम कधी सुरु होणार याची वाट पहात असतात आणि रंगमंचाच्या आतल्या बाजूने, मर्दानी आवाजात भैरवी रागावर आधारित अशी दीर्घ आलापी येते आणि पाठोपाठ, तबल्याचे खणखणीत बोल ऐकायला येतात. तबल्याचे एक सुंदर वर्तुळ पूर्ण होते आणि पाठोपाठ संतूरचे मधुर सूर आणि तबल्याचे बोल, याची अप्रतिम रचना ऐकायला मिळते. रंगमंचावर पार्श्वभागी काहीशा अंधाऱ्या जागेत, नृत्यांगनेच्या अस्तित्वाची सावली, तबल्याच्या बोलांवर आधारित नृत्याचे तुकडे सादर करायचे निर्देश देत असते. 
जसा रंगमंच प्रकाशाने  उजळून निघतो तशी रंगमंचावर खऱ्याअर्थाने नृत्याला सुरवात होते. गाण्याची लय हळूहळू द्रुत लयीत येते, नृत्यांगनेची पावले तबल्याच्या बोलांवर थिरकत असतात आणि गायकाचा आवाज देखील त्याच्या तोडीस तोड ताना, हरकती घेत असतो. सगळेच वातावरण, मद्याच्या ग्लासात केशरी किरण पडून काच उजळून निघावी त्याप्रमाणे रंगमंच उजळलेला असतो. या सगळ्यात एक गंमत असते. ज्या रंगमंचावर गायकाच्या आवाजाची मोहिनी पडलेली असते, तो गायक मात्र आपले अस्तित्व अंधारात लपवून ठेवत असतो. अर्थात, यात रंगमंचावरील नृत्यांगनेला मात्र गायकाच्या अस्तित्वाची जाणीव असते. 
गाण्याच्या शेवटाला, ती नृत्यांगना अचानक आतल्या बाजूचे दिवे लावते आणि सगळ्यांना त्या गायकाचे दर्शन घडते. तो गायक मात्र पूर्ण भांबावून जातो आणि कसेबसे गाणे पूर्ण करतो. आपल्याला दिसतो, तो गायकाच्या विद्रूप, किळसवाणा चेहरा आणि  चकित होतो. हीच सगळी कहाणी आहे, "नाचे मन मोरा मगन तिक-धा-धीगी धीगी" या सुप्रसिद्ध गाण्याची. अभिनेत्री आशा पारेख यांच्या आयुष्यातील सगळ्यात अप्रतिम भूमिका आणि मुख्य म्हणजे या गाण्यात, तिच्यातील नृत्यकौशल्याचा जितका सुरेख वापर करून घेतला आहे, तितका तिच्या पुढील  विरळा किंवा जवळपास अजिबात करून घेतल्याचे आढळत नाही. तोच प्रकार, अशोक कुमार या अत्यंत देखण्या, रुबाबदार अभिनेत्याबाबत म्हणता येईल.
दिग्दर्शक "आर.के. राखन" यांच्या "मेरी सुरत तेरी आंखे" या चित्रपटातील एका अजरामर गाण्याला सुरवात होते. जन्मापासून विद्रूप म्हणून त्याच्या आई-वडिलांनी एका मुसलमानाला देऊन टाकलेला!! त्यामुळे आयुष्यभर मनात, "आपण जगाला नको आहोत" अशा नकारात्मक भावनेने पछाडलेला नायक, दत्तक बापाने दिलेल्या संगीताच्या शिकवणुकीच्या आधाराने, आयुष्यात उभारी घेण्याचा सतत प्रयत्न पण तरीही जगापासून आपले अस्तित्व लपविल्याने, मनात साचलेली खंत!! अशोक कुमार यांनी आयुष्यात बऱ्याच अजरामर भूमिका केल्या पण अशा प्रकारची भूमिका एकमेव!!
या गाण्याची चाल, "साडे नाल" या पंजाबी टप्प्यावर आधारित चाल बांधलेली आहे. संगीतकार एस.डी.बर्मन यांनी, या गाण्याच्या द्वारे, या मूळ चालीचे अक्षरश: सोने केले आहे. खरतर, "टप्पा" हा शास्त्रीय संगीतातील एक अनोखा आविष्कार आहे. सर्वसाधारणपणे "टप्पा" गायन हे मध्य लयीत सुरु होते आणि हळूहळू रचनेची बढत, द्रुत लयीत होते. हे गाणे देखील याच धर्तीवर बांधलेले आहे. अर्थात, गाण्याला नृत्याचे अंग असल्याने, गाण्यात तबला वादनाला अपरिमित महत्व आलेले आहे. पंडित किशन महाराज यांनी, या गाण्यात आपल्या वादनाची असामान्य चुणूक दाखवली आहे.  हे सगळे झाले तरी, या गाण्याचा खरा नायक आहे - गायक मोहमद रफी. आवाजाचा पल्ला, भरीवपणा, समान ताकदीची फेक, मर्दानी जोमदारपणा, अत्यंत सुरेल आणि लहान स्वरांशाचे सफाईदार द्रुतगती गायन या गुणांचा त्यांच्या आवाजात नेहमी आढळ दिसतो. 
गाण्याच्या सुरवातीला जो आलाप आहे, त्यातून गायकाच्या मर्दानी आवाजाची आपल्याला कल्पना येते आणि खरे म्हणजे त्यातूनच गाण्याच्या पुढील रचनेचे सूचन होते. कविता म्हणून या रचनेत काही फार विशेष हाताला लागत नाही परंतु बंदिशप्रचुर  तेंव्हा उपमा, प्रतिमा या अलंकारांना इथे स्थान नाही जाण ठेऊन शैलेंद्र यांनी गीतरचना केली आहे, मुळात, शैलेंद्र यांच्या बह्य्तेक रचना या गीतसदृश असतत. तिथे गुढार्थ किंवा विचारांना फारसे स्थान नसते आणि जो विचार असतो, तो शक्यतो साध्या सोप्या शब्दातून मांडलेला दिसतो.नायकाची मानसिक तडफड आणि त्याचे गायनातून होणारे सादरीकरण, इतपत मर्यादित हेतूने गाण्याची शब्दकळा बांधली आहे पण तरीही, गाण्यात गेयता असणे तसेच चालीचे बंधन पाळून शब्दरचना करणे, यातूनच आराखडा तयार केलेला आहे. 
"नाचे मन मोरा मगन तिक-धा-धीगी धीगी
बदरा घिर आये, रुत है भिगी भिगी
नाचे मन मोरा मगन तिक-धा-धीगी धीगी. 
या ओळींतच तबल्याचे बोल मिसळून, गाण्याचा विस्तार काय धर्तीवर असेल याचे सूचन मिळते. गाणे पहिल्यापासून द्रुत लयीतच चालते आणि त्याला नृत्याची अप्रतिम जोड आहे. काह्रेतर, गायन, तबला आणि नृत्य या त्रयीवर सगळे गाणे आधारलेले आहे. गाण्याच्या सुरवातीला केरवा ताल आहे. आठ मात्रांच्या या तालातील शेवटचे बोल, विशेषत: "धिन, ना" हे बोल डग्ग्यावर घेऊन गाण्यात खुमारी आणली आहे आणि  त्या बोलांची जोड नृत्याच्या पदन्यासाशी जुळवून घेतल्याने, गाणे अधिक रंगतदार होते. आशा पारेख प्रशिक्षित नर्तिका आहे, हे तिच्या हाताच्या किंवा बोटांच्या हालचालीतून नेमकेपणी जाणवते. 
गाणे पहिल्यापासून द्रुत गतीत आणि नृत्याच्या हालचालीने बांधलेले असल्याने, पडद्यावरील सादरीकरण देखील तितकेच विलोभनीय झालेले आहे. आशा पारेख यांची प्रत्येक हालचाल, ही तालाशी निगडीत आहे आणि त्यामुळे अर्थात तबल्याच्या बोलांना विलक्षण उठाव मिळतो. त्यामुळे, ध्रुवपदानंतरचा वाद्यमेळ हा पारंपारिक भारतीय वाद्यांवर आधारित आहे जसे पहिला अंतर सुरु व्हायच्या आधीचा जो स्वरिक वाक्यांश आहे, त्या वाद्यमेळात, प्रथम बासुरी आणि त्याला जोडून सतारीचे सूर घेतले आहेत पण या वाद्यांची "गत" बांधताना, विशेषत: सतारीच्या प्रत्येक सुराशी तबल्याच्या बोलाचे नाते जोडले आहे आणि त्याच्याच आविष्कार नृत्याच्या पदन्यासातून आपल्याला सुरेख अनुभवता येतो. हे जे सगळे "बोल" आहेत, तेच या गाण्याचे वेगळे सौंदर्य म्हणून सांगता येईल. 
कुहु के कोयलिया, कुहु के कोयलिया कही दूर पपीहा बुलाये 
टुटे ना ये सपना, टुटे ना ये सपना, कोई अब मुझे ना जगाये 
घिर आये, बदरा घिर आये, रुत है भिगी भिगी
नाचे मन मोरा मगन तिक-धा-धीगी धीगी. 
वास्तविक, कडव्याच्या चालीत तसे फार फेरफार नाहीत,शक्यतो स्वररचना तशीच ठेवलेली आहे पण गाताना, रफीने ज्या प्रकारे स्वरांची "उठावण" घेतलेली आहे, त्यावरून गायकाच्या अभ्यासाचा अंदाज घेता येतो. इथे घिर आये, बदरा घिर आये, रुत है भिगी भिगी" ही ओळ घेताना लय "दुगणीत" जाते आणि गाणे विलक्षण वेगात सुरु होते. खरेतर हे सगळे रागदारी संगीतात अनुभवता येते परंतु संगीतकाराचे चातुर्य असे की, हे सगळे अलंकार त्याने मोठ्या खुबीने या गाण्यात घेतले आहेत. हे गाणे ऐकताना, तुम्ही क्षणभर देखील उसंत घेऊ शकत नाही!!
यही रुक जाये, यही रुक जाये, ये शाम आज ढलने ना पाए 
टुटे ना ये सपना, टुटे ना ये सपना, कोई अब मुझे ना जगाए 
घिर आये, बदरा घिर आये, रुत है भिगी भिगी
नाचे मन मोरा मगन तिक-धा-धीगी धीगी. 
हे कडवे सुरु होण्याआधीचा वाद्यमेळ आणि आधीच्या कडव्यातील वाद्यमेळ ऐकण्यासारखा आहे. अशा प्रकारच्या  रचनेत,शक्यतो वाद्यमेळ संगीतात फारसे बदल अपेक्षित नसतात कारण तीन मिनिटांच्या गाण्यात तितका अवकाश प्राप्त नसतो. असे असून देखील या गाण्यातील दुसरा अंतरा सुरु होण्याआधीचा वाद्यमेळाची स्वररचना संपूर्ण भिन्न आहे आणि तरीही परत लयीच्या त्याच अंगाने, गाणे समेवर येते. 
छुप छुप ऐसे मे, छुप छुप ऐसे में, कोई मधुए गीत गाए 
गीतो के बहाने, गीतो के बहाने,छुपी बात होटो पे आए 
घिर आये, बदरा घिर आये, रुत है भिगी भिगी
नाचे मन मोरा मगन तिक-धा-धीगी धीगी. 
इथे परत एकदा संगीतकार एस.डी.बर्मन यांनी अशीच एक मजेशीर रचना बांधली आहे.कडव्याच्या चालीत तोच आकृतिबंध कायम ठेऊन, वाद्यमेळाची रचना काहीशी संथ ठेवली आहे पण लय मात्र तशीच वेगवान आहे. थोड्या वेगळ्या उदाहरणाने हे अधिक स्पष्ट व्हावे. उस्ताद विलायत खांसाहेब, नेहमीच गत द्रुत लयीत चालू असताना, तबल्याच्या एखाद्या मात्रेवर स्वररचना मंद्र सप्तकात ठेवतात आणि रागाचे अपूर्व स्वरूप आपल्याला घडवतात. हा प्रकार निरतिशय कठीण आहे आणि या गाण्यात, त्याच प्रकारची स्वररचना, वाद्यमेळातून ऐकायला मिळते. संगीतकार "दिसतो" तो अशा ठिकाणी. 
गाण्याचा शेवट मात्र नक्कीच अविस्मरणीय होणे क्रमप्राप्तच ठरते. गाण्याची कडवी संपतात आणि गाण्याचा ताल बदलतो. रचना त्रितालात सुरु होते आणि गाण्याची लय विलक्षण द्रुत होत जाते. रफीची आलापी देखील दीर्घ आणि वरच्या स्वरात होते. तबला विलक्षण अवघड लयीत सुरु होतो आणि त्याचबरोबर नृत्याची गती देखील. ही तर अप्रतिम जुगलबंदी आहे आणि पण तरीदेखील त्यात विलक्षण लालित्य आहे, लडिवाळ स्वरावली आहे. केवळ मात्रांचा आणि नृत्याचा गणिती हिशेब नसून त्याला सुरेख भावनिक जोड दिलेली आहे. गाणे चित्रपटातील आहे, याची वाजवी जाणीव संगीतकाराकडे असल्याचे हे लक्षण आणि म्हणूनच, गाणे कुठेही क्षणभर देखील रेंगाळत तर नाहीच पण आपली उत्सुकता ताणली जाते. चित्रपट गीताचे आणखी वेगळे कुठले वैशिष्ट्य सांगायचे? 

Attachments 

Saturday 6 February 2016

कैसे दिन बीते



फार पूर्वी, प्रसिद्ध गझल गायिका बेगम अख्तर यांना एक प्रश्न विचारला होता. "आयुष्यात खरे गाणे कधी गायलात?" या प्रश्नावर त्यांनी बरेच विस्तारपूर्वक उत्तर दिले होते पण त्याचा गोषवारा घ्यायचा झाल्यास, "मी खूप वर्षांनी प्रथमच लखनौ रेडियो स्टेशनवर गायला गेले असता, त्यावेळी खऱ्याअर्थी पोटभर गायले". त्यामागील पार्श्वभूमी अशी होती, लग्नानंतर बेगम साहिबांनी गायन बंद केले होते परंतु आतल्या आत सुरांची तडफड त्यांना स्वस्थ बसू देत नव्हती.
याच पार्श्वभूमीवर, "अनुराधा" चित्रपटातील "कैसे दिन बीते, कैसी बीती रतियां" या गाण्याचा विचार करता येईल. चित्रपटातील नायिका, मुळातली प्रतिभाशाली गायिका परंतु लग्नानंतर तिच्या पतीने, तिच्या या छंदाकडे संपूर्ण दुर्लक्ष केल्याने, स्वत:चे गाणे बंद करून टाकले आणि आतल्या आत झुरत राहिली. नवरा डॉक्टर असल्याने आणि संपूर्ण वेळ हाच व्यवसाय करीत राहिल्याने, पत्नीकडे दुर्लक्ष झाले आणि पत्नीने देखील हे वास्तव निमुटपणे स्वीकारले असल्याने, मनातल्या मनात गायन करणे, इतपतच सगळी संगीत साधना राहिली. 
एके दिवशी, एक पेशंट यांच्या घरी येतो आणि नायिकेला बघून चमकतो. नायिकेच्या गायनाच्या जुन्या आठवणी निघतात आणि त्यातून, गायनाचा आग्रह होतो. मनात कोडून ठेवलेले आणि भळभळत असलेले सूर गळ्यातून येताना वेदनेचा अप्रतिम आकार घेऊन येतात आणि हे गाणे सादर होते. 
अभिनेत्री लीला नायडू यांनी हिंदी चित्रपटात काही फार भूमिका केल्याचे आठवत नाही पण ही भूमिका मात्र केवळ अप्रतिमरीत्या वठवली आहे.वास्तविक, त्यांची भूमिका अतिशय वाखाणलेली गेली होती पण तरीही त्यांचा, हिंदी चित्रपट सृष्टीत जम बसला नाही, हे निखळ सत्य. बलराज सहानींचा तर प्रश्नच नाही. या माणसाने, आजमितीस "वाईट" अभिनय केला आहे, असे निदान माझ्या तरी पाहण्यात नाही. यालाच जोडून, आणखी म्हणता येईल, या चित्रपटाचे संगीतकार प्रसिद्ध सतारवादक पंडित रविशंकर आहेत आणि त्यांनी देखील, ४,५ हिंदी चित्रपट वगळता, आणखी काही चित्रपटांना संगीत दिल्याचे आठवत नाही. 
हे गाणे मी जेंव्हा ऐकतो तेंव्हा प्रत्येकवेळी माझ्या मनात कवी ग्रेस यांच्या "पाउस" कवितेची आठवण येते. 
"पाउस कधीचा पडतो, वाऱ्याने हलती पाने:
हलकेच जाग मज आली, दु:खाच्या मंद सुरांने". 
हे गाणे असेच आहे. मनाला झालेली जखम एखाद्या संतत चिघळत असलेल्या वेदनेप्रमाणे झुळझुळत असते. या वेदनेला "आक्रोश" नसतो तर केवळ चिरदाह सहन करावा लागतो. चित्रपटातील नायिकेची मनोवस्था नेमकी अशीच आहे आणि तो भाव नेमकेपणाने जाणून घेऊन, या गाण्याची रचना केली आहे. 
गाण्याचे चित्रीकरण देखील तसेच आहे. घरातली घरगुती बाई जसे सहज, उस्फुर्त पण तरीही गायकी ढंगाचे गाणे गाईल, तसेच केले आहे. सगळे चित्रीकरण एका खोलीत केले आहे पण तसे करताना, प्रत्येक व्यक्तीरेखेचा "स्वभाव" नेमकेपणाने टिपलेला आहे.पंडित रविशंकर यांनी "माज खमाज" या काहीशा अनवट रागावर आधारित तर्ज बांधली आहे. गाण्याच्या सुरवातीलाच लताबाईंनी "हाये" शब्द जसा उच्चारला आहे, त्या स्वराला दुसरी तोड नाही. मी, वरती ग्रेस यांच्या कवितेच्या काही ओळी उधृत केल्या आहेत, त्यातील "दु:खाच्या मंद सुरांने" या शब्दांतील जाणीव नेमकी "हाये" शब्दाच्या सुरांत एकवटली आहे. मनातली सगळी वेदना त्या शब्दात, लताबाईंनी आणली आहे.चित्रपट गायकीची ही असामान्य करामत आहे.
पुढे लगेच गाण्याला सुरवात होते. "कैसे दिन बीते, कैसी बीती रतियां, पिया जाने ना" या ओळीतील "पिया" शब्द देखील किती सुरेख घेतला आहे. "दिन बीत गये, रांते भी उड गयी लेकिन "पिया" को कोई पता नाही" ही विखारी आणि व्याकूळ करणारी जाणीव "पिया" या शब्दात सामावली गेली आहे. कवितेतील कुठल्या शब्दाला किती महत्व द्यायचे, हे संगीतकाराचे काम आणि त्याचबरोबर त्या शब्दातून, कवितेचा आशय कसा वृद्धिंगत करायचा, हे गायकाचे काम. गाताना शब्दावर किती "आघात" द्यायचा जेणेकरून भावनांचे प्रकटीकरण रसिकांसमोर सादर होईल. पहिल्यांदा घेतलेला "हाये" आणि इथला "पिया" हे शब्दातून या गाण्याची संस्कृती आपल्या ध्यानात येते आणि गाणे कुठली वळणे घेऊन, विस्तार करणार आहे, याचा अदमास घेता येतो. गाण्याची अचूक बांधणी ही अशाच स्वररचनांमधून सिद्ध होत असते.   
गाण्यावर बंगाली ठसा जाड आहे पण बंगाली भाषेतील "गोलाई" येत नसून स्वरांना टोक येते. गाणे चालू असताना, नायिकेच्या चेहऱ्यावरील निराशा आणि नायकाची दुर्लक्षित वृत्ती देखील बघण्यासारखी आहे. 
"नेहा लगा के मैं पछताई 
सारी सारी रैना निंदिया ना आयी 
जान के देखो, मेरे जी की बतियां 
पिया जाने ना"
इथे रचना किंचित द्रुत लयीत जाते पण इतकीही नव्हे की रचनेचा तोल बिघडेल. "जान के देखो, मेरे जी की बतियां" या ओळीचे, रचनेच्या दृष्टीने दोन खंड पाडले आहेत."जान के देखो" ही ओळ पहिल्या ओळींच्या लयीतच घेतली आहे पण लगेच "मेरे जी की बतियां" इथे "उतरी" स्वर घेऊन, मूळ स्वररचनेला जोड दिली आहे. असामान्य स्वरिक कलाकुसर आहे. लय सगळी बदलते पण आशयाला कुठेही धक्का पोहोचत नाही. या ओळी पडद्यावर सादर होत असताना, नायकाचे वाचनात गर्क होणे आणि घरी आलेल्या पाहुण्याला त्याचे वैषम्य वाटणे, सगळे कसे गाण्यातील भावना भरीव करणारे आहे. 
पुढील ओळी सादर होताना, एक सुंदर दिग्दर्शकीय नमुना दिग्दर्शक हृषीकेश मुखर्जींनी पेश केला आहे. गाण्यातील वाद्यमेळाचे सूर चालू असताना, घरातील पाहुण्याचे लक्ष घरातील एका तसबिरीकडे जाते. तिथे नायिकेचा जुना फोटो आहे आणि त्याच बाजूला आताची नायिका गात आहे, असे त्याला भासायला लागते. क्षणभराची अनुभूती आहे पण यथार्थ आहे. 
कडव्यांची बांधणी तशी समान आहे म्हणजे पहिल्या कडव्याची चाल आणि दुसरे कडवे, यात सत्कृत्दर्शनी काहीही फरक नाही आणि त्याच, पूर्वीच्या तालात आणि लयीत गाणे पुढे सरकते.      
"रुत मतवाली आके चली जाए 
मन में ही मेरे मन की रही जाए 
खिलने को तरसे, नन्ही नन्ही कलियां 
पिया जाने ना" 
इथे देखील शब्दांची वाजवी जाणीव ठेवलेली आहे. "आके चली जाए" मधील "जाए" शब्दातून, कवी शैलेंद्र यांनी जी निराशा व्यक्त केली आहे त्याचे निराशेशी गाण्याची चाल तद्रूप होते. "जाए" मधील "जा" अक्षरानंतर किंचित स्वरांत हेलकावा दिला आहे आणि कसे सगळे विरून गेले, याचीच जाणीव करून दिली आहे. सगळे गाणे हे अत्यंत हताश आणि काहीतरी जवळचे पण महत्वाचे संपून गेल्याची आठवण करून देणारे आहे." खिलने को तरसे, नन्ही नन्ही कलियां" या ओळीतून आपल्याला हेच वाचायला मिळते. आयुष्यातील अतिशय छोटे आनंद देखील कसे करपून जातात आणि तरीही आयुष्य तसेच पुढे चालत असते!! 
हे कडवे संपत असताना, नायक गाण्याकडे संपूर्ण दुर्लक्ष करून, खोलीचा दरवाजा उघडून आतल्या खोलीत जायला निघतो. पडद्यावर नायकाची पात दिसते आणि ती पाठ बघून, नायिकेची विषण्णता अधिक गहिरी होते, हा अभिनय बघणे, खरोखरच मनोज्ञ आहे. आपल्या नवऱ्याने, इतकी वर्षे जे केले तेच आता देखील, गाणे चालू असताना केले, हे बघून, मनातली काजळी चेहऱ्यावर उमटली आहे. गाण्यातील वाद्यमेळ देखील त्याच वृत्तीचा आपल्यावर गडद परिणाम होईल, असाच योजलेला आहे.  
"कजरा ना सोहे, गजरा ना सोहे 
बरखा ना भाए, बदरा ना सोहे 
क्या कहू जो पुछे, मोसे मेरी सखियां 
पिया जाने ना"
कवी शैलेंद्र यांनी देखील ही भावना मांडताना, "सोहे" सारखे लोकसंगीतातील शब्द घेतले आहेत तसेच त्याचबरोबर वेदना अधिक मुखरित करण्यासाठी, "कजरा","बरखा" सारख्या शब्दांचा उपमेप्रमाणे उपयोग करून, आशय अधिक अंतर्मुख केला आहे. नवऱ्याने पाठ फिरवली असल्याने, असलेली जाणीव अधिक खोल झाल्याची भावना, या कडव्याची सुरवात करताना किंचित वरच्या सुरांनी व्यक्त केली आहे आणि हे देखील एकूण गाण्याच्या भावनेशी अत्यंत सुसंगत आहे. "बरखा" येउन देखील आपल्या मनावर त्याचा काहीही परिणाम होऊ शकला नाही आणि आयुष्य उजाड झाले. 
गाण्याचा शेवट पूर्णपणे वाद्यमेळ थांबवून, केवळ लताबाईंच्याच सुरात करणे, हे एका दृष्टीने अपरिहार्य होते, एकटेपणाची जळजळीत जाणीव परत आपल्या मनातच दाबून ठेवायची ही खूण!!  एका दृष्टीने एका असामान्य कुवतीच्या कलाकाराची मानसिक परवड कशी होते, याचे अप्रतिम चित्रण केवळ चित्रिकरणातून नसून, सुरांच्या सहाय्याने गाण्यातून कसे व्यक्त करायचे, याचा हे गाणे गाणे म्हणजे समृद्ध अनुभव आहे.