Wednesday 18 June 2014

संगीताचे (विलक्षण) सौंदर्य + शास्त्र – भाग ३



सप्तक आणि त्यातील सुरांची संगती आपण, मागील लेखात बघितली. याचाच पुढील भाग म्हणजे “राग”. इथे एक गोष्ट ध्यानात ठेवली पाहिजे, “संहती” हि “संदर्भचौकट ” आहे, त्यामुळे तिचे स्वरूप हेच त्या आकृतीला आवाहनात्मक असते.त्यामुळे, “सप्तक” ही विकसित संदर्भचौकट असल्याने, हाताशी असलेल्या आकृतीशी, ती तादात्म्य पावते.
आता सप्तक आणि त्यातील स्वरमर्यादा म्हणजे संदर्भचौकट याचा एकाच अविष्कारात उपयोग करणे इष्ट नाही. इथेच, संगीताविष्कारात एखादी संहती किंवा आरोह-अवरोह इत्यादी गोष्टी लक्षात घेतल्या तर आविष्काराच्या शक्यता वाढतात.याचाच अर्थ असा घेत येईल, प्रथम साप्तकाला मर्यादित करायचे आणि मग त्यातून वाढीच्या शक्यता धुंडाळायच्या!! यातच आपल्या प्रचलित रागाची मुलभूत चौकट आढळेल. सप्तकाची व्याप्ती कमी ठेऊन, उपलब्ध घटकांवर लक्ष ठेऊन, त्यांच्या शक्यतांमधून सांगीतिक प्रयत्न त्यांच्याचपुरते मर्यादित ठेवायचे म्हणजे राग होय, अशी लेखकाने व्याख्या केली आहे. अर्थात, यातून प्रचलित रागसंगीताचे स्वरूप मर्यादित स्तरावर आढळते. थोडक्यात, हाताशी असलेल्या सप्तकातून, काही स्वरांची निवड करून, जो सांगीतिक आविष्कार केला जातो, त्या आविष्काराला राग म्हणावे. अर्थात, या आविष्कारात पुढे अनेक अलंकार अंतर्भूत आहेत, ज्यामुळे रागसंगीत हे पायाभूत संगीत म्हणून गणले गेले. अर्थात, या सांगीतिक आकृतीत, स्वरांची आकुंचन-प्रसरण प्रवृत्ती ध्यानात घेणे आवश्यक आहे.
कुठल्याही रागाच्या प्रकृतीत, याच दृष्टीने वर्गीकरण केले जाते. यालाच आपण “वादी-संवादी-अनुवादी-विवादी” या स्वरुपात बघतो.जो स्वर प्रमुख तो “वादी”, ज्याच्याशी संवाद चालू असतो, तो “संवादी” स्वर. वेगळ्या शब्दात, वादी-संवादी स्वर म्हणजे जीवाभावाचे मित्र असे म्हणता येईल. या दोन स्वरांच्या व्यतिरिक्त, त्या स्वरांशी जवळचे नाते दर्शविणारे स्वर म्हणजे “अनुवादी” स्वर. रागात उपयोगी न ठरणारे स्वर म्हणजे “विवादी”. अशी स्वरांची विभागणी आहे. अर्थात, शास्त्रात अशीही उपपत्ती दिली आहे की, “विवादी” स्वर वापरायचाच नाही, असे नसून, प्रसंगी किंवा कलाकाराच्या प्रतिभेनुसार “मोजका” वापर करणे इष्ट आहे. इथे तारतम्य उपयोगी पडते. उदाहरणार्थ “मारवा” रागात “सा” वापरायचा नाही,असा दंडक आहे परंतु तरीही काहीवेळा, “सा” स्वराचा अत्यल्प उपयोग करून, आविष्काराच्या मर्यादा आणखी खुलविता येतात, हे आपण बघतोच. त्यामुळे रागाची चौकट अजिबात बदलता येत नाही,असे नव्हे. शास्त्रकारांनी तशी “सवलत” दिलेली आहे. मूळ चौकटीला धक्का न लावता, उपयोजित स्वरांव्यतिरिक्त इतर स्वरांचा अंतर्भाव करून,सौंदर्यात भर पडते, याचे नेमके भान शास्त्रकारांनी ठेवलेले दिसून येते.
भारतीय संगीतातील राग्कल्पना ही एक असामान्य गोष्ट आहे. स्वरसप्तकाच्या दिशेने चालत असता, शेवटचे मुक्कामाचे ठिकाण म्हणजे राग. आपण जे आधी सगळे घटक,त्या घटकांच्या अनुरोधाने त्यांच्या उपयोगीतेचे फलस्वरूप,इत्यादी गोष्टी बघितल्या, त्या सगळ्यांचे “विसर्जन” राग, या संकल्पनेत होते. अशा या रागकल्पनेचा, आपल्या शास्त्रकारांनी अनेक बाजूने,अनेक संदर्भात तपशीलवार विचार केल्याचे दिसून येते. रागांची वर्गीकरणे,हे याच संगीतविचाराचे पुढील पाऊल म्हणता येईल. रागकल्पनेकडे,किती वेगवेगळ्या दृष्टीकोनातून बघत येईल, याचे प्रत्यंतर इथे दिसून येते.
याचाच पुढला भाग म्हणजे, “जातीराग”, “ग्रामराग”,”पूर्वांगराग”,”उत्तरांगराग”"शुध्द व मिश्र राग”,”जन्यजनक राग”, “थाट आणि उपथाट” इत्यादी अनेक वर्गीकरणे भारतीय संगीतशास्त्रात विचारात घेतलेली आढळतात. अर्थात,  हा भाग शास्त्राच्या आधारे तपासाला जातो, त्यामुळे इथे आपल्याला विचारात न  सौंदर्याच्या दृष्टीने बघायचा आहे. तेंव्हा वर्गीकरण रागाच्या वेळेनुसार असो, त्यात आलेल्या स्वरसंख्येवर आधारलेले असो, त्यामागचे सौंदयशास्त्र एकच आहे. ते म्हणजे रागाचे व्यक्तीभूतीकरण!! प्रत्येक राग इतरांपेक्षा वेगळा कसा पडतो, त्याचे स्वत:चे असे खास वैशिष्ट्य, हे विचार या सगळ्या खटाटोपामागे आहे.रागाच्या अंतर्गत रचनेकडे तपशीलवार लक्ष दिल्यास,व्यक्तीभूतीकरणाचा परिपाक आढळतो.सर्व संगीताविष्कार हा एक अखंड प्रवाह मानला तर प्रत्येक रागाच्या गतिमान  अवतारातही स्थायी रूप निश्चित करणे, त्याच्या बाह्यरेषा स्पष्ट करणे,यामुळे त्याच्या स्वतंत्र, स्वयंपूर्ण अस्तित्वास बैठक तयार करून देणे, हा त्याचा अन्वयार्थ आहे.
विज्ञानाने ध्वनीलहरी आणि प्रकाशलहरी यातील संबंध प्रस्थापित केले तर “संगीत व रंग” आणि पर्यायाने, “राग आणि रंग” याविषयी नेमकी विधाने करता येतील. अर्थात, इथे लेखकाने २ आक्षेप नोंदवले आहेत.विशिष्ट राग आणि विशिष्ट रंग यांचा संबंध मान्य होताच, विशिष्ट राग गाताना विशिष्ट रंगाचे कपडे परिधान करावेत किंवा जिथे तो राग सादर केला जात असेल, ती जागा, इत्यादी गोष्टींना वाट मोकळी मिळते. वास्तविक या सगळ्या संगीतबाह्य गोष्टी परंतु संगीताची परिणामकारकता वाढविण्याकडे त्यांचा सगळा कल असतो.वास्तविक, प्रत्येक कलेला स्वत;चे असे स्वतंत्र सौंदर्यशास्त्र असते. एककेंद्रीकरण, विस्तार यातून, ध्वनीसंवेदनांना आकार देत, कलापदवीस पोहोचणे,हे संगीताचे ध्येय असते. अशा वेळेस, जर का संगीतेतर कलांचा प्रवेश होऊ दिला तर, सगळ्या संगीतव्यापारात, खुद्द संगीताचेच स्थान दुय्यम होईल!! तसेच जर का विशिष्ट रंगाबरोबर विशिष्ट संगीताचा संबंध असतो, हे मान्य केले तर, विशिष्ट गंधाचा का असू शकत नाही? हा प्रश्न त्यापाठोपाठ उद्भवतो!!शेवटी, याच घटकांना अधिक महत्व प्राप्त होईल आणि संगीत कलाव्यापाराचा पायाच उखडला जाईल!! इथे लेखकाने, एक जर्मन विचाराचे सूत्र ध्यानात घेतले आहे.”प्रत्येकाचा प्रत्येकाशी संबंध असल्याने प्रत्येक गोष्ट म्हणजे प्रत्येक दुसरी गोष्ट होईल!!” अप्रत्यक्षपणे तसा संबंध असेलही,म्हणून सगळ्याचा सारखा उपयोग, हा तर्क विसंगत ठरू शकतो.
यापुढे लेखकाने अशाच एका विवादास्पद विषयाला हात घातला आहे. राग आणि विशिष्ट काल.अमक्या वेळेस अमका राग सादर केला पाहिजे, यामागे प्रयोगाची परिणामकारकता वाढविणे, हाच उद्देश दिसून येतो, मूळ कलाविष्काराची सिद्धी वाढविण्यासाठी नव्हे!! उदाहरणार्थ, सकाळ आणि ललत राग याची सांगड घातली की त्या रागाबरोबर सूर्यप्रकाश,पक्षांची किलबिल इत्यादी रूढीमान्य काय?  चित्रे आपल्या मनात उभी राहतात.याचा नेमका उपयोग काय? बहुदा असे होते, या वर्णनाने आपल्या ग्रहणक्षमतेला एक चाकोरी, निश्चित वळण मिळते.अर्थात, हे धोक्याचे!! एक वृक्ष म्हणजे जंगल नव्हे!! शास्त्रात रागकल्पनेच्या जन्मापासून राग-कालसंबंध दाखवलेला नाही. तसेच पहिले तर कर्नाटक संगीतात राग-काल-संबंध मानलेला नाही.लेखकाच्या मते, हे सर्व तपशील आणि त्यावरून झालेले वाद, यापेक्षा या सर्वांचे मुलकारण असणारी प्रवृत्ती आणि तिचे सौंदर्यशास्त्रीय प्रयोजन, या गोष्टी अधिक महत्वाच्या आहेत. रागांचे वर्गीकरण, राग आणि रंग, राग आणि काल यांचे संबंध आणि त्यासंबंधीचे नियम काय,त्यामागे एक कार्यकारी प्रवृत्ती आहे, ती रागाच्या व्यक्तीभूतीकरणाची. अमका राग अमक्या रागापासून वेगळा आहे, यासाठी उपयोगात आणल्या गेलेल्या या सगळ्या क्लुप्त्या आहेत. राग आणि काल, यात तसे काहीही नाते नाही,त्याला शास्त्रात कुठेही आधार नाही, केवळ सौंदर्य वाढविणे परंतु सौंदर्यशास्त्रापासून फारकत घेणारे उपयोजन आहे.
इथपर्यंत लेखकाने “स्वर” या मुलभूत घटकाचा विस्ताराने परिचय करून दिलेला आहे. पुढील प्रकरण हे, “लय” या घटकाने सुरु झाले आहे. त्याचा परिचय, आपण, पुढील लेखात घेऊया.

No comments:

Post a Comment