Tuesday 28 April 2020

मन रे तू काहे ना धीर धरे

भारतात मौर्यकालीन राज्यव्यवस्था होती आणि त्यावेळी जरी देशात कपोलकल्पित सोन्याचा धूर वगैरे रम्य कल्पना प्रसूत होत असल्यातरी एकूणच देशात समृद्धता नक्कीच होती.मोगलपूर्व काळी खरेतर भारत स्वप्ननगरी होती. ठिकठिकाणी स्वतंत्र राज्ये होती,संस्थानिक आपले साम्राज्य सांभाळून होते. अगदी १८व्या शतकापर्यन्त भारतात "राजगायक" आणि "राजनर्तिका" अशी राजदरबारी सन्माननीय पदे अस्तित्वात होती आणि त्यांना समाजात सन्मान होता. अशाच मौर्यकालीन संस्थानातील प्रेमकहाणीवर आधारित "चित्रलेखा" या चित्रपटातील हे गाणे, आजचा लेख विषय आहे. राजपुत्र झाला तरी त्याला मानवी भावना वश असतातच आणि त्यातूनच प्रणयी भावना उदयाला येते आणि त्यात फार काही नावीन्य नाही. 
"मोकळें मोकळें चालतानाच,पुढचें वळण व्याकुळ करतें 
पहाडांतून सरकत सरक, सांवळा मेघ आडवा येतो
क्षणभर वेधून भान घेऊन, आला तसाच सरकून जातो. 
मनांत अमृत टाकून जातो, पावलांत झुळझुळ गारवा भरतो ."
सुप्रसिद्ध कवियत्री इंदिरा संत यांच्या "गर्भरेशीम" कवितासंग्रहातील एका कवितेतील या ओळी. "मन रे तू काहे ना धीर धरे" या गाण्यातील संत्रस्त व्याकुळता आहे ती "मोकळें मोकळें चालतानाच,पुढचें वळण व्याकुळ करतें" या ओळीच्या आशयाशी कुठेतरी आंतरिक नाते सांगते. एक निरीक्षण - या चित्रपटातील मौर्यकालीन वातावरण बघून सुप्रसिद्ध कवी साहिर लुधियान्वी यांनी आपल्या सगळ्या कवितेत फक्त आणि फक्त हिंदी शब्दांचाच वापर केला आहे आणि साहिर यांचा उर्दू भाषेचा व्यासंग बघता ही बाब निश्चितच प्रशंसनीय ठरते. साहिर प्रज्ञावंत कवी तर निश्चितच होते पण चित्रपटाची पार्श्वभूमी लक्षात घेऊन केवळ भाषाच नव्हे तर आशय, घाट आणि रचना कौशल्य या दृष्टीने त्यांनी फार मोठी मजल मारली हे ध्यानात येऊ शकते. गाण्याची पार्श्वभूमी ही नायक अतिशय संत्रस्त आणि विमनस्क मनस्थिती आहे आणि त्या व्याकुळ परिस्थितीत उमटलेल्या भावना आहेत. अखेर राजपुत्र असल्याने त्याची मानसिक जडण-घडण ही राजस पद्धतीने झालेली असणार. अगदी शोक करायचा झाला तरी त्याला संयत आविष्काराची जोड लाभणारचआणि शोक हा अधोमुखीच रहाणार. या दृष्टीने कविता वाचावी. मनाचे सगळे खेळ कवितेत मांडले आहेत. आहे ते सगळे नश्वर आहे, त्याला कुठंतरी अंत आहे. त्यामुळे नश्वर गोष्टींबाबत आपण किती शोक करून घ्यायचा? या काहीशा तत्वज्ञानात्मक विचाराची कविता आहे. संपत्ती, सौंदर्य,नाती,उपभोग हे सगळे तात्पुरते आहे आणि याला सगळ्यांना काळाचे बंधन निश्चितच आहे. तेंव्हा या गोष्टीसाठी आपण त्यात किती गुंतून राहायचे? आणि असे गुंतून राहणे एका राजाला आवश्यक आहे का? असे अनेक प्रश्न ही कविता आपल्यासमोर उभे करते. सुंदर कवितेचे काही निकष असतात त्यातील एक, पुन्हा पुन्हा प्रश्न उभे करून आधी सापडलेल्या उत्तरांतील वैय्यर्थ्य जाणवून देणे हे होय. 
संगीतकार रोशन यांनी या गाण्याची चाल "यमन कल्याण" रागात बांधण्यात मोठे औचित्य दाखवले आहे. यमन कल्याण रागात एकतर सगळे स्वर लागतात आणि सगळे स्वर शुद्ध स्वरूपात लागतात (आरोही सप्तकात "पंचम" स्वर वर्ज्य असतो). एक निरीक्षण असे आहे - संध्याकाळचे राग हे बव्हंशी "तीव्र मध्यम" या स्वराला धरून भरणा करीत असतात आणि या पार्श्वभूमीवर यमन कल्याण रागाचे वेगळेपण मनात ठसते. रोशन यांच्या चालींचे खास वैशिष्ट्य म्हणजे स्वररचना ही बहुतांशी खालच्या सप्तकात किंवा शुद्ध सप्तकात असते - कारकिर्दीच्या अखेरीस त्यांनी यात बदल केला. गाण्याची चाल जरी तार सुरांत जायची शक्यता निर्माण झाली तरी तिथेच स्वरांचे अवगाहन रोधून ठेवणे हे असते. हाच नियम वाद्यमेळाच्या बाबतीत दिसतो. संथ लय त्यांच्या प्रकृतीला मानवणारी होती. त्याचा परिणाम शब्दांना योग्य न्याय देणे होय. त्यांची गाणी जरा बारकाईने ऐकली तर असे ध्यानात येते, गाण्यातील कविता नेहमीच सक्षम असते. त्यांना उर्दू धाटणीचे बरेच चित्रपट मिळाले, हे एक कारण शकते. रागदारी संगीताचा  पायाभूत अभ्यास आणि दिलरुबा वाद्यावर प्रभुत्व, याचा परिणाम असा झाला या चालीत कुठेही विरही वेदनेची दवंडी पिटलेली नाही. सारा परिणाम, ढाल्या स्वरांतून तरंगत राहणाऱ्या सुरावटी व आवाज यांतून सिद्ध केला आहे. त्यामुळे त्यांच्या गाण्यांत तंतुवाद्यांचा आढळ भरपूर आढळतो. याचा परिणाम असा झाला, लयबंधांचे उठावदार प्रक्षेपण करणाऱ्या वाद्यांपेक्षा सुरावट धुंडाळणाऱ्या वाद्यांचे आकर्षण अधिक होते. याचा आणखी एक परिणाम असा झाला, लयबंधांचे उठावदार प्रक्षेपण करणाऱ्या वाद्यांपेक्षा सुरावट धुंडाळणाऱ्या वाद्यांचे आकर्षण अधिक होते. प्रस्तुत गाण्यातील सतार सारख्या तंतुवाद्याचे प्रक्षेपण ऐकण्यासारखे आहे. आणखी काही खास वैशिष्ट्ये बघायची झाल्यास, त्यांची बहुतेक गाणी स्वरविस्तार योग्य आहेत, स्वरविस्तार करण्यास भरपूर वाव असतो, अर्थात गायकी अंगाच्या रचनेचे हेच महत्वाचे वैशिष्ट्य म्हणावे लागते. म्हणजे गाताना, तुम्हाला इथे या गाण्यात देखील स्वरविस्ताराला भरपूर वाव आहे परंतु प्रत्येक ठिकाणी त्यांनी स्वरविस्तार रोधून ठेवला आहे. 
गायक म्हणून रफी यांची गायकी इथे संपूर्णपणे खुलली आहे. गाताना कुठेही "नाट्यात्म"लगाव ऐकायला मिळत नाही. वास्तविक या गाण्याच्या वेळेस, त्यांची "गायकी" प्रस्थापित झाली होती परंतु संगीतकार रोशन यांनी त्यांच्याकडून अत्यंत संयत गायकी काढून घेतली परिणामी हे गायन मनात चिरस्थायी होऊन बसते. रफींच्या कारकिर्दीत अशी फार तुरळक गाणी गायल्याचे आढळते परंतु बहुदा म्हणूनच अशी गायकी चालीला फार समृद्ध करून जाते आणि हे गाणे हिंदी चित्रपट संगीताच्या वाटचालीत अढळ स्थान प्राप्त करून घेते. 

मन रे तू काहे ना धीर धरे 
वो निर्मोही मोह ना जाने, जिनका मोह करे 

इस जीवन की चलती ढलती धूप को किसने बांधा 
रंग पे किसने पहरे डाले, रूप को किसने बांधा 
काहे ये जतन करे, मन रे.... 

उतना ही उपकार समझ कोई जितना साथ निभाये 
जनम-मरण का मेल है सपना, ये सपना बिसरा दे 
कोई न संग मरे, मन रे.... 


Tuesday 21 April 2020

हमारे बाद अब मेहफिल में

काजळभरले अशांत डोळे कुठे लागले?
आणि कपोलांवरी असे कां अश्रू उतरले?
"टिपू नका ते". लालूच म्हणालीस, "कारण - कारण 
तृणपात्यावर पडतें दव हो काय सकारण?"
सुप्रसिद्ध कवी आरतीप्रभू यांच्या "नक्षत्रांचे देणे" या कवितासंग्रहात एका कवितेच्या या ओळी आहेत. एकूणच हिंदी सिनेमांत काही प्रसंग हे कायम बघायला मिळतात आणि त्यातलाच एक प्रसंग म्हणजे प्रेमातील विरह. याबाबतीत आपल्या संगीतकारांनी आणि अर्थातच कवींनी आपली अनन्यसाधारण प्रतिभा सिद्ध केली आणि तेच प्रसंग शिळपट न वाटता  चिरस्मरणीय करून ठेवले आहेत. किंबहुना या गाण्याचे चित्रीकरण बरेचवेळा अत्यंत ढोबळ आणि ठोकळेबाज असून देखील त्या गाण्यांनी ते प्रसंग अजरामर केले आहेत. चित्रपटातील गाणे ही एक संय्युक्तिक प्रक्रिया असते. गाण्याची चाल लावायच्या २ पद्धती आहेत - १) आधी शब्द मग  चाल, २) आधी चाल मग शब्द. विशेषतः हिंदी चित्रपट संगीतात २) हा मार्ग बरेचवेळा स्वीकारला जातो. असा एक आरोप  केला जातो, अर्थात एक रसिक म्हणून आपल्याला  त्याच्याशी देणेघेणे नसते. 
आज आपण अशाच एका समृद्ध गाण्याची ओळख करून घेणार आहोत ज्या गाण्याची चाल आधी शब्द मग चाल या पद्धतीने निर्माण झालेली आहे. "हमारे बाद अब मेहफिल में अफसाने बयाँ होंगे". गाणे तसे दुर्मिळ आहे आणि चित्रपट देखील आला कधी आणि गेला कधी हे कुणालाच फारसे कळले नाही. संगीतकार मदन मोहन यांची कारकीर्द जरा बारकाईने न्याहाळली तर त्यांनी संगीत दिलेले चित्रपट बहुतांशी अपयशी झालेले आढळतात आणि अपयशाला जगात फारशी किंमत दिली जात नाही. आज मदन मोहन हे नाव बरेच नवीन संगीतकार आदराने घेतात परंतु असा आदर आणि वाजवी किंमत त्यांना आयुष्यभर मिळाली नव्हती. 
गाण्याची शब्दकळा ही प्रसिद्ध शायर मजरुह सुलतानपुरी यांची आहे. चित्रपटांच्या इतिहासात जे थोडे सकस,आशयसंपन्न आणि सातत्याने दर्जेदार शायर आहेत त्यांच्यात मजरुह याचे अग्रभागी लिहावे लागेल. गझलच्या वजनात लिहिलेली कविता आहे. कविता अतिशय छोटेखानी आहे. कवितेत फक्त दोन अंतरे आहेत परिणामी मुखड्याच्या ओळी घोळून आणि पुनरावृत्त पद्धतीने घेतलेल्या आहेत. अगदी बारकाईने वाचले तर कवितेत फार असामान्य काहीही आढळत नाही आणि भावसंगीताला जशी रचना आवश्यक असते त्या धर्तीवर लिहिली आहे. या गाण्याची  खरी खुमारी आहे ती स्वररचनेत आणि गायनात. 
प्रस्तुत गाणे हे मदन मोहन यांच्या कारकिर्दीच्या सुरवातीच्या काळातील आहे तरीही काही "जागा" नीटसपणे ऐकल्या तर पुढे प्रस्थापित झालेल्या शैलीशी नाते सांगणाऱ्या आढळतात. गाणे बारकाईने ऐकले तर पहाडी रागाशी नाते सांगणारी चाल आहे परंतु मदन मोहन यांनी आयुष्यात नेहमी रागाचे नाते बाजूला सारून चाल स्वतःची वेगळी ओळख दर्शवते. एक रचनाकार म्हणून हा गुण निश्चितच कौतुकास पात्र ठरतो. मदन मोहन यांना एकूणच हिंदुस्थानी उपशास्त्रीय म्हटल्या जाणाऱ्या रागरागिण्यांचे आणि त्यांच्याबरोबर संलग्न असलेल्या काव्यात्मतेतून भावनेला आवाहन करू पाहणाऱ्या प्रकारांचे विलक्षण आकर्षण  म्हणता येईल. अर्थात यातून त्यांना  होते असे अजिबात सुचवायचे नाही. पण त्यांचा प्रचलित रंगांकडे पाहण्याचा दृष्टिकोन मूलतः आवाहक सुरवातीच्या शोधात असणाऱ्या रचनाकाराचा होता. रागांचे विस्तार वा त्याची मांडणी करण्यात त्यांना रस नव्हता आणि याच दृष्टिकोनातून आजच्या गाण्यातील पहाडी रागाचे सूर शोधावेत. 
याचाच पुढील विशेष म्हणजे मदन मोहन यांची प्रतिभा गीतधर्मी होती. अर्थाव्यतिरिक्त पण त्याच्या आधारे आशयाचे  करण्याची ज्यामध्ये अंगभूत ताकद असते अशा काव्याला प्रतिसाद म्हणून रचनाकार जेंव्हा एखादी भावपूर्ण सुरावट उभी करतो तेंव्हा गीत संभवते. कारकिर्दीच्या पूढे जेंव्हा मदन मोहन ठुमरीकडे न वळता गझलकडे  का वळले ही यावरून स्पष्ट व्हावे. गीतधर्मी संगीतकार नेहमी लयबंधापेक्षा सुरावटींकडे आणि प्रवाही चलनांकडे झुकतात. या गाण्याच्या संदर्भात हे विवेचन महत्वाचे ठरते. त्यांच्या रचनांचे मुखडे नेहमी गुणगुणावेसे वाटतात. इथे या गाण्यात त्यांनी हाच प्रयोग केला आहे. दोन्ही अंतऱ्यांची चाल वेगळी बांधली आहे आणि आपल्या सर्जनशीलतेचा पुरावा कारकिर्दीच्या सुरवातीलाच दिला आहे. या रचनाकाराने कधीही भरमसाट वाद्ये वापरली नाहीत. इथे तर स्पष्टपणे व्हायोलिन वाद्य ऐकायला मिळते आणि त्या वाद्यावरच लयीला खेळवत ठेवले आहे. गाण्याचा दुसरा अंतरा वरच्या पट्टीत घेतलेला आहे पण त्याआधीचे व्हायोलिनवरील स्वरांचे "वळण" ऐकले तर चाल कशी बदलत  आहे याचे सूचन मिळते. अर्थात लताबाईंची गायन हा सर्वार्थाने अविभाज्य घटक आहे. पुढे लताबाई आणि मदन मोहन ही जोडी समीक्षकांकडून बरीच नावाजली गेली आणि तशी होणे योग्य होते. 
लताबाईंची गायन हा घटक मदन मोहन यांच्या संगीतातील अविभाज्य घटक तर होताच परंतु त्यांची गायकी अधिक खुलली असे म्हणायला प्रत्यवाय नसावा. गाणे काहीसे ढाल्या आणि मंद्र सप्तकात सुरु होते आणि त्यावरून गाण्याच्या स्वररचनेची तितकीशी कल्पना येत नाही. "अफसाने" सारखा शब्द लताबाईंनी कसा उच्चारला आहे हे ऐकण्यासारखे आहे. चाल अतिशय संथ आणि व्याकुळ करणारी आहे त्यामुळे अकारण खटका घेणे किंवा हरकतींचे प्रदर्शन करणे असल्या अलंकारांची इथे अजिबात जरुरी नाही. चालीतील अश्रुत गोडवा अधिक अंतर्मुख करणे इतपतच आवश्यकता आहे आणि लताबाईंनी नेमके तेच केले आहे. संपूर्ण गायन हे मुखड्याच्या चालीशी समांतर ठेवले आहे. हा साधेपणाच या गाण्याचे खरे वैशिष्ट्य आहे.  


हमारे बाद अब मेहफिल में अफसाने बयाँ होंगे 
बहारें हमको ढुंढेंगी न जाने हम कहां होंगे 

इसी अंदाज से झुमेगा मौसम, गायेगी दुनिया 
मोहब्बत फिर हंसी होगी, नजारे फिर जवां होंगे 

न हम होंगे, न तुम होंगे, न दिल होगा मगर फिर भी 
हज़ारो मंझिले होंगी, हज़ारो कारवां होंगे 


Monday 20 April 2020

इस मोड से जाते है

मी फार पूर्वी, प्रसिद्ध कवी सुधीर मोघ्यांचा "पक्षांचे ठसे "हा कविता संग्रह वाचत होतो, बहुदा हा संग्रह देखील, या कवीचा पहिलाच संग्रह असावा. कवीचा पहिलाच संग्रह असल्याने, काही ठराविक भावभावनांचे चित्रण वाचायला मिळत होते, काही नवीन प्रतिमा, काही वेगळे घाट तर कुठे रचनांबाबत नावीन्य वाचायला मिळत होते. असेच वाचत असताना,

"स्वच्छंद साथ देणारी वाट कधी भेटते
कधी दिलासा मागते तर कधी दिलासा देते
आकांक्षांना चैतन्याचा तिथे फुलोरा मिळतो
रक्तावाचूनच्या नात्याचा तिथेच अर्थ कळतो
    पण अतूट वाटणारे तेही बंध नकळत सैल होतात
    विस्मृतीच्या धुक्यामध्ये हरवतात, अंधुक होतात"

या ओळी वाचल्या आणि अचानक थबकल्यासारखे झाले. कुठेतरी या ओळींचे नाते कुठेतरी पूर्वी वाचल्याचे जाणवायला लागले. कवितांच्या अशाओळी वाचताना,  आपल्या बाबतीत असेच फार वेळा होते आणि आपले विचार अनंताच्या प्रवासाला निघतात आणि धुकाळ वातावरणातील वाट हुडकाव्यात त्याप्रमाणे संगती लावायचा प्रयत्न करतात. कधी प्रयत्न चुकतो, हताश होतो तर कधी आशयांशी नाते जोडणाऱ्या ओळीची आठवण मनात येते.
हिंदी चित्रपट "आंधी" मधील "इस मोड से जाते है" हे गाणे, कविता म्हणून वाचताना, माझ्या मनात सुधीर मोघ्यांच्या वरील ओळींशी "नाळ" जुळली. तसे बघितले तर दोन्ही कविता स्वतंत्र आहेत परंतु कवितेतील "रस्ते" या शब्दांवर केलेल्या प्रगट चिंतनाशी कुठेतरी वैचारिक नाते मात्र जुळले, हे नक्की. आता प्रत्यक्ष कविताच इथे मांडतो.


" इस मोड से जाते हो.
कुछ सुस्त कदम रस्ते, कुछ तेज कदम राहें
पत्थरकी की हवेली को शीशे के घरोंदे में
तिनको के नशेमन तक इस मोड से जाते है,

आंधी की तरह उडकर, इक राह गुजरती हैं
शरमाती हुई कोई, कदमो से उतरती हैं
इन रेशमी राहों में, एक राहू तो वो होगी
तुम तक जो पहुंचती हैं, इस मोड से जाती हैं
इस मोड से जाते है

एक दूर से आती हैं, पास आके पलटती हैं
एक राह अकेली सी, रुकती हैं ना चलती हैं
ये सोचके मैं बैठी हूं, एक राह तो वो होगी
तुम तक जो पहुंचती हैं, इस मोड से जाते है"

हिंदी चित्रपट गीतांत "काव्य" नसते, चटपटीतपणा फार असतो अशी टीका अनेकवेळा केली जाते. जरी त्यात थोडा फार तथ्यांश असला तरी, ज्या कवींनी त्याबाबत नि:संशायरीत्या आपले योगदान दिले आहे, त्यात गुलजार यांचे नाव घ्यावेच लागेल. किंबहुना, गुलजार यांनी ज्या रचना गाणी म्हणून लिहिली त्यातील बहुतांश रचना या "कविता" म्हणून स्वतंत्रपणे वाचणे अवश्य ठरेल.  थोडे पुढं जाऊन असं देखील म्हटले, त्यांच्या कविता या अधिकतर भावकविता असतात, तर ते अजिबात धाडसाचे ठरू नये.
गुलजार यांची कविता वाचताना, पहिला परिणाम होतो तो, अत्यंत अनुरूप अशा शब्दांचा, शब्दांच्या योजनेचा, अभिव्यक्तीत घडणीचा, आणि बांधणीचा.  गुलजार यांची कविता शब्दांचाच आधाराने अस्तित्व घेते, वाढते आणि शेवटचा ठसा उमटवते, तो देखील शब्दांचाच!! चांगल्या अभिव्यक्तीचा एक सांगितलं  जातो,तिचं स्वतंत्र अस्तित्व भासूच नये. तिने आशयांत पूर्णपणे विलीन व्हावे. गुलजार यांची कविता वाचताना, जसा तिथे शब्दरूपाचा शोध असतो त्याचबरोबर भाषेशी चाललेला खेळ देखील तितकाच महत्वाचा असतो. कवितेतील, स्थूलाकडून सूक्ष्माकडे जाणारा भावनाशय आणि त्याची यांत्रिक, तर्कात्म, मानसशास्त्रीय या तत्त्वांपासून सौंदर्यात्मक तत्वांवरील बंदिश, असा प्रवाह अवलोकन करणे, केवळ मनोज्ञ आणि अंतर्मुख करणारेअसते.त्यातून आणखी एक वैशिष्ट्य कायम जाणवत आलेले आहे, भाषेच्या सामान्य व्यवहारातील उपयोगामुळे शब्दांभोवती पडलेले अर्थांचे पापुद्रे/कडे मोडून तेच शब्द काव्यात्म पातळीवर निराळ्या अर्थाने अर्थवाही करण्याचे प्रयत्न फारच लक्षवेधी ठरतात. 
मुळात, "आंधी" चित्रपट म्हणजे पडद्यावरील अप्रतिम भावकाव्य आहे. त्यामुळे, या चित्रपटातील गाणी, ही "कविता" म्हणून नेहमीच असामान्य ठरली आहेत आणि अशी सक्षम कविता राहूल देव बर्मनच्या हाती आल्यावर, त्याने मिळालेल्या संधीचा सुरेख उपयोग करून घेतला.
गाण्याची सुरवात एका दीर्घ आलापीने होते. पर्वत शिखरांच्या पार्श्वभूमीवरील हा दीर्घ आलाप, आपल्याला पहिल्या सुरांतच, स्वररचना यमन रागावर आधारलेली आहे, याचे सूचना करून देते आणि आणि हा आलापच रसिकांचे लक्ष वेधून घेतो. हा आलाप तसा सरळसोट नाही. सुरांच्या भाषेत लिहायचे झाल्यास, "सा........ नीधपग... ग रे म(तीव्र)  ध प ", असा आहे. इथे मी मुद्दामून अशी भाषा वापरली, जेणेकरून या आलापाची तीव्रता ध्यानात यावी. "नीधपग" हीच सुरावट यमन रागाची आठवण करून देते.  यमन रागावर आधारित आतापर्यंत असंख्य गाणी झाली आहेत आणि यापुढे देखील खंड पडेल असे वाटत नाही. या आलापला धरूनच आपल्या कानावर शब्द येतात, "इस मोड से जाते है". ही ओळ गाताना, "मोड" या शब्दाला किंचित स्वरिक हेलकावा दिला आहे आणि या ओळीतील, या शब्दाचे महत्व दर्शवून दिले आहे.
गाण्यातील शब्द आणि त्यामागील आशय जाणून घेतला की मग हाताशी असलेली स्वररचना आणि त्यातील लपलेले सौंदर्य, याचा मनोरम खेळ सुरु होतो.  एव्हड्याच साठी मी सुरवातीला सगळी कविता मांडली जेणेकरून, स्वरांच्या प्रवासाचा मागोवा घेताना, शब्दागणिक स्वरांच्या साहाय्याने जे अर्थांचे पदर उलगडले गेले आहेत, त्याचा नेमका अर्थ ध्वनित होईल. "कुछ सुस्त कदम रस्ते, कुछ तेज कदम राहें", ओळीच्या पहिल्या भागातील "सुस्त" शब्द गाताना, स्वर किंचित खालच्या पातळीवर ठेवला आहे तर "तेज" शब्द गाताना, स्वर थोडा वरच्या पट्टीत गेला आहे. अर्थात याचे श्रेय जितके लताबाईंची तितकेच संगीतकाराचे देखील. ललित संगीताच्या आस्वादात या गोष्टी फार महत्वाच्या असतात आणि पण बरेच वेळा अशा सौंदर्यस्थळांकडे अक्षम्य असे दुर्लक्ष करतो. परत हीच ओळ ओळ गाताना " मोड" शब्द गाताना घेतलेली अशीच लक्षणीय आहे. पायाखालची वाट आहे पण वाटेवर वळणे आहेत, हे जसे शब्दांतून मांडले आहे तसेच स्वरांतून देखील त्याच ताकदीने दर्शविले आहे. 
जेंव्हा कुठलाही संगीतकार गाण्याची चाल बांधत असतो तेंव्हा त्या चालीबरोबर, पार्श्वभागी वाजणारा वाद्यमेळ देखील तितकाच सर्जनशील असतो, याची नेमकी जाणीव ठेवत असतो. इथे पहिला अंतरा सुरु व्हायच्या आधी, प्रथम बासुरीचे स्वर, त्याला जोडून सतार आणि सरोद वाद्यांचे स्वर कसे ध्रुवपदाच्या स्वरावलींशी अचूक नाते राखून आले आहेत.  खरतर इथं परत एकदा स्वररचना मांडायचा मोह होत आहे पण तो मोह टाळून पुढे वळतो. या तिन्ही वाद्यांच्या एकत्रीकरणाने नेहमीच्या प्रणयी भावनेला एकदम उत्फुल्ल बनविले आहे आणि सगळेच गाणे फार वरच्या पातळीवर जाऊन बसते.  त्यातहे एक गंमत - वाद्यमेळाची सुरवात बासरीच्या ज्या सुरांनने होते आणि पुढे सतार आणि सरोद मधून तीच स्वररचना विस्तारित जाते पण जेंव्हा पहिल्या अंतऱ्याची वेळ येते तेंव्हा परत रचना सुरवातीच्या बासरीच्याच स्वरांशी येऊन विसर्जित होते. हा स्वरिक खेळ परत, परत ऐकण्यासारखा आहे. संगीतकाराच्या, लयीवरील प्रभुत्वाची नेमकी साक्ष देणारी आहे.
पहिला अंतरा रागाची कास सोडून स्वतंत्र होतो. प्रतिभावंत संगीतकाराचे हे एक वैशिष्ट्य नेहमीच मानता येईल, चालीला रागाधार असावा पण चाल पुढे स्वतंत्र असावी. सर्जनशीलतेची एक प्रभावी लक्षण मानता येईल.  पहिला अंतरा सुरु होतो तोच मुळी, "प प प म(तीव्र) ध प म(तीव्र)" अशा स्वरांवर!! यमन रागाच्या आरोही सप्तकात पंचमाला स्थान नसून इथे राहुल देव बर्मनने हा स्वर कोंदणात बसवला आहे .  या संगीतकारावर असंख्य आरोप झाले आणि त्यातील काही खरे असले तरी या माणसाच्या भारतीय संगीताच्या व्यासंगाबद्दल शंका घेण्याचे काहीच कारण नाही. हा संगीतकार प्रचलित भारतीय संगीतापासून जरी कितीही दूर गेला असला तरी परत, परत याची नजर भारतीय संगीताकडे वळत होती आणि हे निखालस सत्य आहे.
"एक दूर से आती हैं, पास आके पलटती हैं". किशोरकुमारांचा अत्यंत निकोप, अनक्रोशी आणि स्वच्छ आवाज.  ललित संगीतात - भारतीय ललित संगीतात असे दोनच आवाज झाले आहेत ज्यांच्या गायकीलाआपण "शब्दभोगी" गायकी असे सार्थपणे म्हणू शकतो. १) आशा भोसले, २) किशोर कुमार. अतिशय  शांत, रसाळ चाल हाताशी आल्यावर, किशोर कुमार आपल्या गायनातून कसे निखळ व्यक्त होतात, याचा ही ओळ ऐकून समृद्ध अनुभव घेता येतो. वास्तविक गाण्यातील प्रत्येक अंतरा वेगळ्या अशा चालीने बांधलेला नाही (तसे अंतरे  बांधणे,हे देखील सर्जनशीलतेचा एक निकष म्हणून मानता येऊ  शकते) परंतु या गाण्याचा  मुखडाच इतका वेधक बांधलेला आहे की पुढे कसल्याच कलाकुसरीची गरज पडत नाही.
संगीतकार म्हणून राहुल देव बर्मन, गाण्याच्या तालात नेहमीच काहीतरी नावीन्य आणीत असतो. इथे देखील केरवा ताल वापरला आहे पण प्रचलित तालाचे चलन आणि गाण्यातील मात्रांचे वजन, यात सत्कृतदर्शनी काहीही साम्य आढळत नाही पण मात्रांचा मागोवा घेत, हिशेब ठेवला म्हणजे आपल्याला केरवा तालाची ओळख पटते. 
एकंदरीत विचार करता, यांचे संगीत, रचनाकाराच्या संभवनीय सर्जनशीलतेविषयी दर्जा आणि खात्री पटविणारे असे संगीत आहे. त्यांनी जे संगीत आकारले ते केवळ चित्रपटीय सादरीकरणासाठी. परस्परविरोध, विरोधाभास, आणि विसर्जित न केलेले सांगीत तणाव यांचे आकर्षण म्हणजे आधुनिक सांगीत संवेदनशीलता.  या दृष्टीने संगीतकार राहुल देव बर्मन यांनी हिंदी चित्रपट संगीताला नवीन आयाम दिले हे आपल्याला नक्कीच मान्य करावे लागेल.



Monday 13 April 2020

तुम क्या जानो तुम्हारी याद में

खूप वर्षांपूर्वी मी मराठीतील सुप्रसिद्ध कवी "आरतीप्रभू" यांचा "नक्षत्रांचे देणे" हा कविता संग्रह वाचत होतो. बहुतेक सगळ्याच कविता भावत होत्या. हा कवी असाच आहे. कविता वाचताना कळत-नकळत आपण जाणत्याच्या बाजूने बघत राहतो आणि अचानक उमजलेले खरोखर बरोबर आहे का? या प्रश्नाचे अगम्य कोडे टाकतो. बरेचवेळा भ्रांतचित्त होते तरीही मनाला लागलेली असोशी या कवितांकडे ओढते. अशाच अवस्थेत असताना काही ओळी एकदम मनाच्या गाभ्यात उतरतात. 
"हारजीतीच्या दुव्यांची मी फुले रे वेचितें ,
हारजीतीच्या दुव्यांचे हार मी ही गुंफिते. 
ऊन अन पाऊस यांचे कांठ पांढरा जोडुनी 
वादीसंवादी सुरांच्या मी किनारी धांवतें."

प्रणय भावना आणि त्यातील अपयश इत्यादी विषयांवर हिंदी चित्रपटाचा डोलारा उभारलेला आहे  तर  ठरू नये. परिणामी आशयात तोचतोचपणा, शिळपट अभिव्यक्ती यांची उतरंड रचलेली आढळून येते. अर्थात अपवाद म्हणून काही सांगता येतील. आता या गाण्याच्या संदर्भात विचार केल्यास, कवी प्यारेलाल संतोषी कधीही साहिर, मजरुह यांच्या तोडीची शायरी करू शकले नाहीत कारण तितका त्यांचा वकूब नव्हता. असे  असून देखील हा कवी हिंदी चित्रपट सृष्टीत आपले बस्तान मांडून बसला होता आणि याची काही कारणे अशी - १) हुकूमबर संगीतकाराच्या हातात कविता देणे किंवा संगीतकाराने दिलेल्या चालीनुसार काव्य रचणे. २) चित्रपट गीतांत अभिव्यक्ती ही फार नसली तरी चालते परंतु कवितेत गेयता असणे महत्वाचे आणि चालीचे अंतरंग ओळखून त्यात फारशी अवघड (समजायला अवघड) शब्दरचना न करता प्रसंग धकून नेण्याची हातोटी. आता प्रस्तुत गीत आशयाच्या अंगाने बघितले तर प्रेमात अपयशी ठरल्यानंतरची पार्श्वभूमी आहे. तेंव्हा रात्र तळमळत काढणे, किंवा मानसिक विकलावस्थेला कोमेजल्या कळ्यांची उपमा देणे तसेच सगळे तारुण्य शुष्क झाले इत्यादी उपमा वापरल्या आहेत. आता यात काय नावीन्य आहे? जेंव्हा अशा सामान्य भावनांचे शाब्दिक चित्रण करायचे तर मग कुठंतरी काव्य म्हणून आपली अभिव्यक्ती सकस असणे आवश्यक असते जे वर निर्देशित केलेल्या साहिर,मजरुह ( या यादीत आणखी शायर अंतर्भूत होऊ शकतात) यांनी सातत्याने आपल्या कवितांमधून दाखवले. परंतु गाणे म्हणून वाचताना शाब्दिक लयीला कुठेही अडथळा येत नाही आणि अशी शब्दरचना संगीतकाराच्या दृष्टीने आवश्यक ठरते. कविता म्हणून वाचताना कुठेही कुठलाही शब्द अडखळल्यासारखा बोचत नाही. सहजपणे लय बांधली जाते. 
संगीतकार म्हणून सी.रामचंद्र यांच्या कारकिर्दीतील एक असामान्य स्वररचना म्हणून मान्यता पावली गेली आहे. आशयातील व्याकुळता तितक्याच तरलतेने त्यांनी आपल्या चालीत मांडली  आहे.अगदी गाण्याच्या सुरुवातीपासूनचा वाद्यमेळ लक्षात घेतला तरी सारंगीचे आर्त सूर आणि धीम्या मात्रांचा तबला यांनी गाण्याची पार्श्वभूमी तयार केली आहे. रागाच्या दृष्टीने बघितल्या बागेश्री रागाची आठवण येते. परंतु या गाण्याचे स्वर "जंगला" या अनवट रागावर आधारित आहेत. मला ही माहिती खरे तर नव्हती पण माझे औरंगाबादचे स्नेही संगीत वाग्गेयकार विश्वनाथ ओक यांनी दिली होती. पुढे मी युट्युबवर या रागाच्या काही क्लिप्स ऐकल्या आणि "गारा" राग आणि "बागेश्री" राग यांचे एकत्रित मिश्रण केल्याचे समजले. अर्थात एक बाब नक्की, संगीतकार सी.रामचंद्र यांनी काही अपवाद वगळता रागाचा वापर करताना त्यात स्वतःचे काहीतरी नवीन अंतर्भूत करायचे आणि वेळ पडली तर रागालाच बाजूला सारायचे अशी भूमिका घेतलेली आढळते. आपण चित्रपट गीत सादर करीत आहोत आणि ही भूमिका त्यांची अतिशय स्वच्छ होती. याच भूमिकेचा परिपाक पुढे शंकर/जयकिशन,एस.डी. आणि राहुल देव बर्मन इथपर्यंत पोहोचला. 
गाण्याच्या सुरवातीचे सारंगीचे स्वर इतके हलके आणि व्याकुळ करणारे की तिथे खरतर तालवाद्य नसते तरी फार बिनसले नसते. लताबाईंचा तारता पल्ला विस्तृत असल्याने बहुतेकवेळा त्यांना वरच्या सुरांत बऱ्याच संगीतकारांनी लावले आहे परंतु इथे मात्र संगीतकाराने पहिल्यापासून खर्ज स्वर हा आधार स्वर घेतल्याने स्वररचना ही त्याच परिघात रुंजी घालते. या संगीतकाराला नेहमी उडत्या आणि आनंदी, खेळकर चालीचा निर्माता म्हणून अगणित प्रसिद्धी मिळाली पण ती किती एकांगी आहे, हे गाण्यावरून दिसून येते. या स्वररचनेचा बंध हा हळूहळू संयत वेदनेने आतल्याआत झिजणारा आहे. या चालीत कुठेही आक्रोश नाही. मला तर बरेचवेळा हे गाणे ऐकताना महाभारतातील अश्वत्थाम्याची कायमची भळभळणारी जखम आठवते. सी.रामचंद्रांच्या चालीचे आणखी एक वैशिष्ट्य असे असते. मुखडा ज्या चालीत बांधला आहे त्यापासून वेगळी चाल हा संगीतकार अंतऱ्यांना प्रदान करतो. वेगवेगळे अंतरे बांधणे हे निश्चितच सर्जनशीलतेचे महत्वाचे अंग मानावेच लागेल. 
वर म्हटल्याप्रमाणे इथे लताबाईंनी आपला आवाज जितका म्हणून खर्ज स्वरांत आणता येईल तितका आणला आहे. वास्तविक स्त्री स्वर आणि त्यातूनही लताबाईंचा स्वर हा वरच्या पट्टीत आणि अधिक निमुळता होता जाणारा आहे परंतु आपले नेहमीचे वैशिष्ट्य बाजूला सारून इथे  ठाय लयीतील स्वररचना तितक्याच समर्थपणे गाऊन लताबाईंनी आपल्या गायकीचे वेगळे आणि तितकेच लोभसवाणे अंग दाखवले आहे. हे गायन ऐकताना कुठेही अकारण खटका घेतलेला नाही की हरकत लांबवलेली नाही. त्याची गरजच नव्हती. 
चालीतील अंगभूत सौंदर्य इतके अप्रतिम आहे की त्यासाठी वेगळ्या सांगीतिक अलंकारांची अजिबात गरज नाही. एका अजरामर परंतु काहीशा दुर्लक्षिलेल्या गाण्याकडे लक्ष वेधून घ्यावे इतकाच या लेखाचा मूळ हेतू आहे. 


तुम क्या जानो तुम्हारी याद में , हम कितना रोये 
रैन गुजारी तारे गिन गिन, चैन से जब तुम सोये 

कितनी कलियां खिली चमन में, खिलके फिर मुरझा गयी 
बिरहन के एक भोले मन को, बार बार समझा गयी 
रोके जवानी काटी जिसने प्रीत के बिजे बोये 

कितने बादल घिरे गगन में, घिर के फिर ना बरसे 
प्यास दबा कर दिल ही दिल में,कितना तडपे तरसे 
दर्द हमारा दिल जाने या, नैना खोये खोये 


Friday 10 April 2020

गगन सदन तेजोमय

चित्रपटातील गाणे म्हटले की साधारणपणे गाण्यात भरपूर वाद्यमेळ असणे तसेच अप्रतिम लोकेशन्स असणे इत्यादी बाबी येतात. अर्थात पूर्वीचे मराठी चित्रपट बहुतांशी अपवाद म्हणता येतील. साधारणपणे १९८० च्या सुमारास मराठी चित्रपट बदलायला सुरवात झाली अर्थात आजचा मराठी चित्रपट आणि आता ४० वर्षांपूर्वीचा मराठी चित्रपट यात तफावत ही राहणारच. परंतु आशयघन चित्रपटाला हळूहळू सुरवात झाली आणि विशेषतः तमाशाप्रधान चित्रपट मागे पडायला लागले होते. परिणामस्वरूप गाणी आणि त्यांचे सादरीकरण यात फरक पडणे क्रमप्राप्तच होते. याच सुमारास "उंबरठा" चित्रपट आला. एकूण कथावस्तू बघता चित्रपट ठीक होता परंतु चित्रपटातील गाणी मात्र खूप गाजली. आजचे गाणे ही एक सुंदर अशी प्रार्थना आहे . आता प्रार्थना म्हटल्यावर त्यात एक ठराविक विशेष असतो म्हणजे देव किंवा देवता असते. त्यांचे गुणवर्णन असते. या गाण्यात सूर्याचे वर्णन केले आहे. मराठीत सूर्याला काही वेळा "मित्र" असे संबोधले आहे. अर्थात कविता म्हणून वाचताना पहाट उलटून गेल्यावर परंतु उन्हाची तलखी सुरु होण्याआधीच थोडा काळ असतो, त्यावेळेची प्रार्थना आहे. 
ही कविता प्रसिद्ध कवी वसंत बापट यांनी लिहिलेली आहे. एकूणच कविताच घाट बघता पारंपरिक प्रतिमा वापरलेल्या आढळतात. असे असून देखील रचना कौशल्य असे आहे की  त्यात अंगभूत लय मिसळली आहे. आता प्रार्थना हेच कवितेचे स्वरूप ठरल्यावर आणि त्यातून "सूर्य" हीच मध्यवर्ती कल्पना नक्की झाल्यावर मग एकूणच कवितेचा ढाचा लक्षात यायला वेळ लागत नाही. "तिमिर हरून करुणाकर" किंवा "छाया तव माया तव" अशा ओळीतून सूर्यसुक्त समोर येते. खरतर पहिलीच ओळ "गगन सदन तेजोमय" वाचताना निसर्गाच्या विराटतेचा भाव मनात येतो. वास्तविक प्रार्थनेची वेळ ही तशी ठराविक असते. दिवस संपूर्णपणे सुरु व्हायचा असतो तसेच जगाची जगरहाटी सुरु व्हायला थोडा वेळ असतो. हा वेळ तास मर्यादित असतो परंतु याच वेळी काही मंगलकारक विचार आणणे आणि दिवसाची सुरवात करणे ही हिंदू संस्कृती आहे. मघाशी मी सूर्याला "मित्र" म्हटले ते याच विचारातून. 
संगीतकार हृदयनाथ मंगेशकरांना चाल लावण्यासाठी नेहमी एखादी सक्षम आणि आशयपूर्ण अशी कविता लागते आणि त्यासाठी त्यांचा शोध सारखा चालू असतो. अगदी चित्रपटासारखे सर्वत्र पसरणारे माध्यम घेतले तरी त्यांचा हाच आग्रह असतो. या गाण्याची चाल थोड्या बारकाईने ऐकली तर ध्यानात येईल, गाण्याची चाल ही त्याचन्ह्याचं वडिलांच्या - दीनानाथ मंगेशकरांच्या "वितरी प्रखर तेजोबल" या "संगीत रणधुंदुभी  या नाटकातील पदावर आधारित आहे. जवळपास तशीच चाल परंतु चित्रपट गायन आहे, हे ध्यानात ठेऊन काहीशी पातळ केली आहे. रंगभूमीवरील गायन म्हणजे ख्यालाचा छोटा आविष्कार असतो आणि तसा आविष्कार चित्रपटासाठी कधीही पूरक नसतो. त्यामुळे पंडित वझेबुवांची चाल वापरताना हृदयनाथ मंगेशकरांनी "गीतधर्मी" आकृतिबंध स्वीकारला आहे. तिलक कामोद रागावर आधारित स्वररचना आहे. चालीचा आकृतिबंध हाताशी असल्यावर, संगीतकार म्हणून काही ठराविक बाबीच सर्जनशीलतेसाठी उरतात. वाद्यमेळासाठी प्रामुख्याने व्हायोलिन वाद्याचा अधिकतर उपयोग केला आहे. तसे बघितले हृदयनाथ मंगेशकर शक्यतो मोजकीच वाद्ये वापरतात परंतु त्या वाद्याचा भाव पूर्णांशाने ओळखून त्याचा उपयोग केला जातो. गाण्याच्या सुरवातीला व्हायोलिनचे सूर तिलक कामोद रागाची ओळख करून देतात. अर्थात गाण्यावर "मंगेशकरी" ठसा उमटलेला आहे. मंगेशकरांच्या रचनेत कधीही "हरकत" हा अलंकार सुबोधपणे ऐकायला मिळत नाही. गायनातील हरकती या शक्यतो साध्या गळ्याला अवघड वाटाव्यात अशाच असतात. उदाहरणार्थ गाण्याचा शेवट करतानाची  तान आहे टी खरोखरच अतिशय कठीण आहे त्यातून ती तान, चाल मध्यसप्तकात सुरु असताना अचानक तार स्वरांत जाते. असे जे अचानक "वळण" असते, ते या संगीतकाराला अधिक प्रिय असावे. त्यांच्या इतर रचना ऐकताना हेच वैशिष्ट्य वारंवार ऐकायला मिळते.  
अशी लयीला अवघड असलेली चाल गायची म्हणजे अर्थात लताबाई असणे क्रमप्राप्त ठरते. मुळात अशा पवित्र, स्वच्छ आकाराच्या चाली या लताबाईंच्या गळ्याला नेहमीच शोभून दिसतात. तिलक कामोद रागात सगळे स्वर लागतात परंतु तरीही शुद्ध मध्यमाबरोबर तीव्र  मध्यम आवर्जून लागतो. पहिला अंतरा सुरवातीपासून तार सप्तकात सुरु होतो आणि पहिली संपूर्ण ओळ अशीच वरच्या सुरांत गायली जाते. हे अवघड आहे अशासाठी कारण गाण्याचा मुखडा खालच्या सुरांत चाललेला आहे. दुसरा अंतरा मात्र मुखड्याशी जुळवून घेतलेला आहे पण शेवटचा अंतरा परत पहिल्या अंतऱ्याशी जोडलेला आहे. त्यामुळे गाणे सतत हिंदकळत राहते. ऐकताना आपण अवाक होतो. ही गायन सामान्य गळ्यासाठी नाही ही खूणगाठ मनाशी बांधली जाते तरीही चाळीच्या अंगभूत गोडव्यामुळे हे गाणे अतिशय श्रवणीय होते. लताबाईंचे गायनाचा असे आहे, चालीतील वक्रता त्यांनी आपल्या गळ्याच्या गोडव्यातून खुबीने लपवल्या आहेत. हे गाणे इतके प्रसिद्ध होण्यामागे हा मुद्दा निश्चितच महत्वाचा आहे. 


गगन सदन तेजोमय 
तिमिर हरून करुणाकर, दे प्रकाश देई अभय 

छाया तव माया तव, हेच परम पुण्यधाम 
वाऱ्यातून ताऱ्यांतून वाचले तुझेच नाम 
जग जीवन जनन मरण 
हे तुझेच रूप सदय 

वासंतिक कुसुमातून तूच मधुर हासतोस 
मेघांच्या धारातून प्रेमरूप भासतोस 
कधी येशील चपलचरण 
वाहिले तुलाच हृदय 

भवमोचन हे लोचन तुजसाठी दोन दिवे 
कंठातील स्वर मंजुळ भावमधुर गीत नवे 
सकलशरण मनमोहन 
सृजन तूच,तूच विलय 


मैं सोया अंखिया मीचे

हिंदी चित्रपट संगीताचा इतिहास जरा बारकाईने बघितला तर बहुतांशी चित्रपटात संगीताचा सहभाग अतिशय महत्वाचा आहे. पर्यायाने संगीतकाराची भूमिका फार महत्वाची ठरते. त्यातून हिंदी चित्रपट हे पारंपरिक दृष्टिकोन बाळगण्यात अग्रगण्य आहेत. परिणाम स्वरूप भारतीय संगीताचा सहभाग महत्वाचा ठरतो. सुदैवाने हिंदी चित्रपट अतिशय सुदैवी आहेत असे म्हणता येईल. सुरवातीच्या काळापासून हिंदी चित्रपटांना बरेचसे संगीतकार असे मिळाले ज्यांचा पायाभूत संगीताचा अभ्यास प्रशंसनीय होता आणि आजही त्या परंपरेत फारसा खंड पडलेला नाही. याचा परिणाम असा झाला, संगीतकार आणि गायक यांचा शास्त्रीय संगीताचा अभ्यास असणे हा एक निकष बनून गेला. वास्तविक पहाता शास्त्रीय संगीत आणि चित्रपट संगीत, हे दोन्ही पूर्णपणे वेगळे आविष्कार आहेत. चित्रपट संगीतकाराला रागदारी संगीताचा व्यासंग असलाच पाहिजे याची जरुरी नाही आणि हे ठळकपणे समोर आणण्यात संगीतकार ओ.पी.नैय्यर यांचे नाव अग्रभागी राहील. 
आजचे गाणे म्हटले तर प्रणय थाटाचे गाणे म्हणता येईल किंवा लोरी म्हणता येईल. हिंदी चित्रपटाने जे गायन विशेष खास करून प्राधान्यपुर्वक रुजवले त्यात लोरी गाणी विशेष म्हणता येतील. मराठी संस्कृतीत तर अंगाई गीते प्रचंड लोकप्रिय आहेत तद्नुषंगाने इतर भाषिक संस्कृतीत देखील ही गाणी रुजली आहेत. 
"वाऱ्यावरून की यावी, आर्त चांदण्याची शीळ;
भारणाऱ्या गाण्यांतली, यावी काळजाची ओळ. 
संपलेल्या आयुष्याची,अशी एक सय व्हावी;
तापलेंल्या जिवाभावां, धून नादवून जावी."
सुप्रसिद्ध कवियत्री इंदिरा संतांच्या "गर्भ रेशीम" या कवितासंग्रहात ओळी. प्रणयी भावनेच्या सुंदर आशयाला शब्दरूप देणाऱ्या ओळी. 
या गाण्यातील काव्य वाचायला घेतले तर काही असामान्य आढळत नाही. ज्या काही प्रतिमा योजना केले आहे त्यात पारंपरिक आशयाचा प्रभाव अधिक आहे. "तारों को पसीना आया" किंवा "ये मेरे नयन के तारे" किंवा "हिरनी की आँखें लेकर" या ओळी वाचताना काहीच हाताशी लागत नाही.तरुणीच्या डोळ्यांना हरणाच्या डोळ्यांची उपमा देणे हे तर तसे जुनाट आहे. अर्थात एक चित्रपट गीत म्हणून विचार केला तर कवितेत योग्य जागी खटके आहेत तसेच ओळींतील शब्दसंख्या बऱ्याच प्रमाणात सम आहेत. याचा परिणाम चाल बांधायला तसेच गायन करायला सुलभता प्राप्त होते. 
गाण्याची खरी खुमारी ही त्याच्या स्वररचनेत आहे. संगीतकार म्हणून ओ.पी.नैय्यर यांनी आपली नेहमीची शैली संपूर्णपणे नाकारून चाल बांधली आहे. थोडा विचार केल्यास असे आढळेल, गाण्यात तालवाद्य नाममात्र आहे. संगीतकाराच्या इतर गाण्यांकडे बघितल्यास या गाण्याचे वैशिष्ट्य लगेच जाणून घेता येते. पिलू रागावर आधारित चाल आहे. अत्यंत लडिवाळ आणि लोभस चाल आहे. मुळात पिलू राग हा लोकसंगीतातून भारतीय संगीतात अवतरलेला आहे. त्याचाच परिणाम असा झाला पिलू रागात असंख्य रचना या ठुमरी,दादरा,होरी,चैती अशा उत्तर भारतीय संगीत प्रकारांचा प्रचंड आढळ सापडतो. सुरवातीला गिटारचे काहीसे तुटक स्वर ऐकायला येतात आणि लगोलग बासरीवर निखळ पिलू रागाचे स्वर आपल्या कानावर रुंजी घालायला लागतात. वाद्यमेळाची लय आणि ध्वनी इतका संयमित ठेवला आहे की मेलडीचा आस्वाद घेता येऊ शकतो. स्वर संपतात आणि तिथेच रफींनी "मैं सोया अंखिया मीचे, तेरी जुल्फो के नीचे" अतिशय हलक्या आवाजात आणि नजाकतीने गायले आहे. मुखडा दोन वेळा गायला गेला आहे आणि लगोलग आशाबाईंचा अविस्मरणीय आलाप ऐकायला मिळतो. आलापाची बांधणी मुखड्याच्या बांधणीशी तद्रूप होते. गाण्याची बैठक पक्की होते. 
पहिला अंतरा किंचित वरच्या सुरांत सुरु केला आहे पण कुठेही विजोड वाटत नाही. हे गाणे जवळपास सलग आहे म्हणजे पहिला अंतरा मग वाद्यमेळ मग दुसरा अंतरा अशी पारंपरिक रचना  मिळत नाही. परिणाम चालीचा गाढा परिणाम रसिकांवर होतो. 
मधुर सुरावटी किंवा चलने या बाबतीत हा संगीतकार खात्रीने सर्जनशील होता. कुठलाही रचनाकार रचनाप्रक्रियेत एकांगी असूच शकत नाही. एक अति महत्वाचा मुद्दा. भारतीय सं गीतरचनाकारांना त्यांच्या शास्त्रोक्त संगीताच्या झुकवानुसार जोखणे योग्य नाही आणि गरजेचे देखील नाही. परंतु दुर्दैवाने भारतीय रागसंगीताचे पायाभूत किंवा तत्संबंधीची सर्वसाधारण माहिती असणे याला नको तितकी प्रतिष्ठा लाभलेली आहे. आणि त्यालाच एकमेव निकष म्हणून मान्यता मिळालेली आहे!! या दृष्टीने बघता, नैय्यर यांना भारतीय रागसंगीताचे तीव्र असे आकर्षण होते, असे वाटत नाही. या गाण्यात देखील या विधानांची प्रचिती आपल्याला घेता येते. या दृष्टीने बघता, नैय्यर यांना भारतीय रागसंगीताचे तीव्र असे आकर्षण होते, असे वाटत नाही. अशा प्रकारच्या रचनाकारांचा दृष्टिकोन दोन प्रकारे असतो. एक तर ते सरळ, सरळ आहे तशी सुरावट वापरतात कारण विशिष्ट गीतप्रकार हाच मुळी एखाद्या रागात किंवा त्याच्या सावलीत मुरलेला असतो. दुसरी काही उदाहरणे अशी आहेत, की त्यांनी एखादी रागचौकट जाणूनबुजून धुंडाळलेली असते. नैय्यर यांच्या संगीतामुळे काही वेधक प्रश्न उभे राहतात. मध्ये मध्ये बराच काळ ते बाजूला पडले नसते तर त्यांनी अधिक चांगले संगीत दिले असते का? की खंडित स्फूर्ती येणाऱ्या व्यक्तींमध्ये त्यांची गणना करावी का? आणखी एक निरीक्षण, स्त्री आवाजांसाठी केलेल्या स्वररचना त्यांच्या पुरुष स्वरचनांपेक्षा अधिक उठावदार आहेत का? हे आणि आणखी काही प्रश्न वर उपस्थित केले आहेत, त्याचा जरूर विचार केला जावा. 
रफींच्या गायनाबाबत वरती उल्लेख केलाच आहे. इथे रफी आपली नेहमीची गायन शैली त्यागतात. अतिशय मुलायम आणि प्रणयी ढंग स्वीकारलेला आहे आणि आपण अशा प्रकारची गाणी सहज गाऊ शकतो हे सिद्ध केले आहे. गाताना कुठंही कुठल्याही शब्दावर अकारण जोर दिलेला नाही किंवा कुठेही "गायकी" दाखवण्याचा प्रयत्न केलेला नाही. 
हाच प्रकार आशाबाईंच्या गायनाबाबत आढळतो. भावूक न होता भाव सूचन करण्याची क्षमता आणि शब्दांच्या अर्थापलीकडे त्यांच्या आशयापर्यंत नेऊ शकणारा लगाव केवळ असामान्य आहे. आवाजाचा पल्ला विस्तृत असून, तारता मर्यादा सहजपणे, वेगाने आणि गीताच्या प्रारंभी देखील घेणे, यात कुणाही गायिकेला सहज बरोबरी करणे शक्य नाही. तो चैतन्यपूर्ण, कंपविहीन असूनही अत्यंत भावपूर्ण, गाताना कुठही न घसरता तिन्ही सप्तकात सहज फिरणारा आणि अतिशय भरीव असा आवाज आहे. इथे गाण्याचा शेवट करताना एकदा दीर्घ आलाप तर नंतर खंडित आलाप घेतले आहेत. हे बारकाईने ऐकल्यावर आपल्या गळ्यावर या गायिकेचा किती ताबा याचं अचूक अंदाज घेता येतो. 
असे भरीव आणि समृद्ध गायन झाल्यावर या गाण्याची गोडी वाढणारच. 

मैं सोया अंखिया मीचे, तेरी जुल्फो के नीचे 
दुनिया को भूल दिवानी, अब रहा जमाना पीछे 

ये कौन हसीन शरमाया, तारों को पसीना आया 
हिरनी की आँखें लेकर, दिल कौन चुराने आया 

मैं सोया अंखिया मीचे,तेरी बाहों के नीचे 
अब चाहे कहीं ले जा, तू आगे और मैं पीछे 

ये मेरे नयन के तारे, तेरी अंखिया देख के हारे 
ओ जनम-जनम के साथी, मेरी मांग में भर ले तारे