Wednesday 18 June 2014

नादमय – नादवेध!!



शास्त्रीय संगीत अफाट आहे, शास्त्रीय संगीत फार गुंतागुंतीचे आहे, अशी सर्वसाधारपणे ढोबळ मते व्यक्त होत असतात. वास्तविक कुठलेही संगीत हे कधीच सहज, सरळ आणि सोपे नसते, त्याचे शास्त्र तर त्याहून अधिक जटिल असते. मग ते, रागदारी संगीत असो, सुगम संगीत किंवा लावणी, गझल सारखे उपशास्त्रोक्त संगीत असो. तोच प्रकार पाश्चात्य संगीताबाबत आहे, अगदी ज्याला पॉप, रॉक संगीत म्हणतात, त्याची स्वत:ची अशी धाटणी, अंगभूत शास्त्र नक्कीच असते. फक्त बहुतेकवेळा आपण दुर्लक्ष करतो. संगीताचा मूळ हेतू हा रंजकता हाच असतो, हे जरी खरे असले तरी त्या रंजकतेमागे बराच विचार, शास्त्र असते. आपण तितकी विचक्षण वृती दाखवत नाही किंवा आपल्याला त्यात तितकासा रस नसतो. ऐकायला चांगले वाटते ना, मग ठीक आहे, असाच हेतू बहुतेकांचा असतो. वस्तुत: त्यात काही फारसे चूक नाही पण मग प्रश्न उद्भवतो, गाण्याच्या दर्जाबद्दल!! कुठल्याही कलेचे ठराविक निकष असतात आणि त्यामागे शास्त्राचा मोठा आधार असतो. शास्त्र समजायला अवघड तर नक्कीच असते परंतु जर का थोडा संयम आणि जागृतता दाखवली तर हेच शास्त्र आपण समजतो, तितके दुर्बोध अजिबात नसते. किंबहुना, जरा इंटरेस्ट दाखवला तर जी दुर्बोधता, प्रथम आपल्याला मानला ग्रासलेली असते, त्यामागील नेमका विचार उमगायला लागतो आणि त्यामुळे आपण, उगाच,” कुठलेही गाणे उत्तम आहे”, असा सरसकट शेरा मारायला धजावत नाही. शास्त्राच्या अति आहारी जाऊ नये, हा विचार योग्य आहे पण केवळ “शास्त्र” म्हणून नाके मुरडण्याचे काहीही कारण नाही. हाच विचार, “नादवेध” हे पुस्तक वाचताना, आपल्या मनात वारंवार येतो.
वस्तुत: संपूर्ण पुस्तक हे रागदारी संगीतावर आधारलेले आहे. भारतीय संगीतातील बहुतेक प्रमुख राग या पुस्तकात घेतलेले आहेत. अगदी, पहाटेचे राग ते  मध्यरात्र उलटल्यावर सादर केले जाणारे राग, ऋतूप्रधान राग अशी सर्वसाधारण वर्गवारी केलेली आहे. अर्थात, रागाचा समय, हे काही प्रमुख सूत्र नाही. परंतु खरी मजेची बाब अशी आहे की, त्या रागावर लिहिताना, मजकुरात रंजकता आणि सहजपणा कसा येईल, हा या लेखकद्वयीचा मूळ हेतू आहे. आता एक उदाहरण देतो. रागावरील पहिले प्रकरण आहे “समृध्द भैरवकुल”. हाच राग पहिला घेण्यामागे औचित्य आहे. हा राग साधारणपणे पहाटेच्या वेळी, सूर्योदय व्हायच्या आधीच्या काळात सादर केला जातो. प्रथम एखाद्या मैफिलीची आठवण , त्यानिमित्ताने त्या रागातील स्वरांचे “चलन”, वादी-संवादी स्वर अशी माहिती येते, त्यानंतर, काही प्रसिध्द कलाकारांनी रागाच्या सादरीकरणात केलेल्या बहारीची वर्णने, नंतर एखाद्या मराठी कवितेच्या ओळी येतात,ज्या या रागाचे स्वभाव वैशिष्ट्य नेमकेपणे उभे करतात. त्यानंतर, चित्रपट  गीते, भावगीते यातून हा राग कसा दिसतो, किंवा या रागावर ती गाणी कशी आधारलेली आहेत, याची माहिती मिळते. त्यात मग, गझल, चैती, होरी, कजरी आणि टप्पा सारखे उपशास्त्रीय प्रकार येतात. हे सगळे वाचताना, आपल्या समोर रागाचे स्वरूप उभे राहते. अर्थात, अशा प्रकारे संपूर्ण राग उभा राहणे शक्यच नाही पण तसा या लेखकांचा अजिबात दावा नाही. प्रस्तुत राग, त्याचे ललित रूप आणि तेच ललित रूप ललित गाण्यांमधून कसे सादर झाले आहे, हा मूळ उद्देश आहे. भारतीय संगीतात “राग” ही फार मोठी संगीत कृती आहे. त्याचे आत्तापर्यंत संपूर्ण असे आकलन, कुणाही वाग्गेयकाराला किंवा कलाकाराला झालेले नाही आणि पुढे कधी होईल, असे वाटत नाही. त्यामुळे, असला राणा भीमदेवी थाट लिखाणात कुठेच दिसत नाही. म्हणूनच कुठलाही कलाकार कितीही वर्षे शास्त्रोक्त संगीत शिकला तरी हेच म्हणतो,” अभी तो त्रीताले का अंदाजा आ  रहा हैं!!” यामागे हीच वृत्ती आणि सुचलेले शहाणपण आहे.
मध्यंतरी किशोरी आमोणकरांनी असेच एक विधान केले होते. ” इतकी वर्षे रागदारी सादर करून देखील, अजूनही यमन, भूप, पूरिया सारख्या रागात संपूर्ण स्वामित्व गवसलेले नाही!!” आणि हे वाक्य, काहीतरी बोलायचे म्हणून केलेले नसून, हे राग आणि अशाच इतर रागांच्या दररोज भावणाऱ्या दर्शनाने जाणवलेले सत्य आहे. हेच विचार या ग्रंथातील लेख वाचताना आपल्या मनात वारंवार येतात. वास्तविक इतके सरळ आणि सोपे लिहिणे अजिबात शक्य नाही, कारण त्यामागे तुमचा ठाम अभ्यास, विचार आणि तर्कसंगती असल्याशिवाय असे लिहिणे जमणार नाही. वास्तविक, आत्तापर्यंत शास्त्रीय  संगीतावर बरेचसे ग्रंथरूप लिखाण झाले आहे, शास्त्र हाच दृष्टीकोन अंगीकारून केलेले आहे. त्यात काहीही चूक नाही, एकदा एखादी कला, कला म्हणून सिध्द व्हायची असेल तर  त्यामागे शास्त्राचे पाठबळ आवश्यकच असते, त्यामागे गणित असते, सूत्रबद्ध विचार असतो आणि तार्किकता असते. संगीतात या सगळ्या गोष्टी आहेत परंतु संगीत हे त्यापलीकडे जाते,याची अत्यंत वास्तविक जाणीव या पुस्तकातील लेखांत आहे. म्हणूनच यातील प्रत्येक लेख हा जरी स्वरांचे शास्त्र मांडीत असला तरी शेवटी, त्याच रागाचे मनोहारी रूप कसे मांडले जाईल, याकडे वाचक, प्रत्येक लेख वाचताना गुंतत जातो!!
मला या लेखात सर्वात अधिक भावलेली बाब म्हणजे, बहुतेक प्रत्येक रागावरील माहिती देताना, त्या रागाच्या प्रकृतीला अनुसरून दिलेल्या मराठी कवितेच्या ओळी!! “धीरगंभीर श्री” या “श्री” रागावरील लेखात, नारायण सुर्व्यांच्या काव्यपंक्ती उधृत केल्या आहेत.
“आपले जग जेंव्हा आपल्याशीच वैर
धरते
अशा वेळी हे हृदया
कोठे जावे ते सांग”!!
अशी मन तडफडणारी अवस्था म्हणजे राग “श्री”. अशा कितीतरी समर्पक कवितेच्या ओळी आपल्या वाचायला मिळतात आणि त्यायोगे त्या रागाचे वेगळेच पण अधिक जवळचे नाते आपल्या मनात निर्माण होते. यामागे, लेखकांचा साहित्याचा तितकाच मोठा अभ्यास दिसून येतो, त्याशिवाय अशी नेमकी उदाहरणे देता येणे शक्यच नाही. मला स्वत;ला मारवा रागावरील लेखात शांता शेळक्यांच्या ओळी अधिक आवडल्या.
“वेळ थोडा राहिल्लेला, सूर आता संपले;
या असिमाला तरीही पाहिजे ना मापले?
वाहत्या पाण्यातुनी गुंफीत जावे साखळी;
एक नाते मी तसे शोधीत आहे आपले”.
मारवा रागाचे इतके अप्रतिम वर्णन करायला दुसऱ्या कुठल्या ओळी सापडतील असे वाटत नाही. अशा ओळी देण्यामागे, किती अभ्यास दडलेला आहे, हे कुणाच्याही सहज लक्षात यावे. तसेच या ओळी देण्यामागे, प्रथम रागाचे “अंग” समजून घेणे, हे तर आलेच पण त्याशिवाय त्या स्वरांच्या अनुभूतीतून नेमका भावार्थ ध्यानात घेऊन, त्याला शोभतील अशा कविता शोधणे, हा त्या व्यासंगाचा दुसरा भाग!!
त्याशिवाय, रागाचा प्राथमिक परिचय देताना, त्या रागात उपलब्ध असलेल्या टेप्स, रेकॉर्ड्स यांची देखील तितकीच वेधक माहिती मिळते. त्याचबरोबर ते राग सादर करताना, त्या कलाकाराने काय वैशिष्ट्य राखले आहे, कुठे त्या सादरीकरणाची बलस्थाने आहेत, ह्या सगळ्यांचे विवेचक विवेचन वाचायला मिळते. या सगळ्या माहितीमुळे, वाचकाला त्या रागाची प्राथमिक माहिती तर समजते पण आता तो राग ऐकायला हवा आणि ऐकताना या लेखाची अनुभूती घ्यावी, याची उत्कंठा लागते.
लेखकाने सुरवातीच्या परिचय पत्रात त्याची भूमिका स्पष्ट केली आहे आणि ती मांडताना, जो दृष्टीकोन मांडला आहे, तिथे माझा थोडा मतभेद आहे. लेखकाला संगीत क्षेत्रातील “ऐकणारे” अधिक भावतात, तेंव्हा त्या रसिकांमध्ये दोन भेद केले आहेत. १] सरळ, सहज ऐकणारे आणि आस्वाद घेणारे, २] संगीत ऐकताना त्याचे “जार्गन” मांडणारे!! पहिला दृष्टीकोन सहज पटणारा आहे, की जो रसिक मनात कसलाही विचार न आणता, जे समोर ऐकायला मिळेल, त्याचा आस्वाद घेणारा. दुसरी वर्गवारी जी आहे, त्यात दुर्दैवाने “जार्गन” मांडणारे कधीमधी भेटतात, पण असा सरसकट शेरा कितपत योग्य आहे? आणि एकदा की शास्त्रीय संगीत मान्य केले म्हणजे मग त्यामागून येणारे शास्त्र कितीही म्हटले तरी टाळता येणे शक्यच नाही. ज्यांना, शास्त्र अवगत आहे आणि त्या(च) दृष्टीने जर का ते संगीत ऐकत असतील तर त्या वृत्तीला कशासाठी “नाव” ठेवावे? त्यातून, सहज, समजणारे, सोपे या वृत्तीचा इतका सूळसुळाट झाला की, अगदी शास्त्रीय संगीत ऐकताना देखील एखादा कलाकार अधिक मंद्र सप्तकात आलापी करायला लागला की लगेच नाके मुरडायला लागतात, अगदी उस्ताद अमीर खान साहेबांच्या गाण्याविषयी मला अशी मते मांडणारी काही मंडळी भेटली आहेत. पण गमतीचा भाग असा आहे की, जे रसिक, शास्त्रीय संगीत “शास्त्र” म्हणून ऐकतात, त्याची ते जाहीरपणे “बढाई” मारायला सुरवात करतात. हे मात्र चुकीचेच आहे. मुळात संगीतात “बढाई” कसली मारायची? कुणी, कितीही मोठा कलाकार असला तरी, शेवटी शास्त्र हे कधीही “वरचढ” असणारच!!
तर असा हा रसाळ माहितीने भरलेला ग्रंथ आहे. भाषा जरी साधी, अनलंकृत असली तरी त्यामागे फार मोठे अभ्यास आहे, विषयाची खोलवर जाणीव आहे, काही लेखांत ज्या संस्कृत ग्रंथांचा उल्लेख आहे त्यावरून व्यासंगाची कल्पना येते. लेखकाने जरी कितीही म्हटले की, त्या फक्त ऐकण्याची आवड आहे, शास्त्र वगैरे तो फारसे जाणत नाही तरी शास्त्र लक्षात घेतल्याशिवाय अशा प्रकारचे लिखाण सर्वथैव अशक्य आहे, हे नक्की. ज्या कुणाला शास्त्रीय संगीतात रुची वाढवायची आहे, रागदारी संगीत म्हणजे काय, याची प्राथमिक माहिती करून घ्यायची असेल तर या ग्रंथाशिवाय तरणोपाय नाही.

No comments:

Post a Comment