Wednesday 18 June 2014

मर्ढेकर – किती दुर्बोध किती सुबोध!!




मराठी कवितेला संपूर्ण वेगळे वळण लावण्यात मर्ढेकरांचा बराच मोठा हातभार लागला असे म्हणायला प्रत्यवाय असू नये. त्यापूर्वीची कविता, ठराविक विषयांभोवती, ठराविक रूपबंध तसेच मात्रा, गण वगैरे अलंकारात साचलेली होती. हे साचलेपण, मर्ढेकरांनी आपल्या कवितेद्वारे वाहते केले. असे करताना, त्यांनी अनेकवेळा रचनेचा साचेबद्ध “घाट” मोडला, घेतलेल्या विचारांत खोलवर अर्थघनता आणली. मी, इथे या दृष्टीने काही लिहायचा प्रयत्न करणार आहे.
काव्यात विचारांना, विचार म्हणून तसे महत्व नसते. ते विचार ज्या अनुभवांत ग्रथित झालेले असतात, त्या अनुभवांचे महत्व अधोरेखित करतात. विचारांना महत्व असते, ते अपरिहार्यपणे अनुभवाचे भाग असतात म्हणून. त्यांच्यावर अनुभवाची समृद्धी अवलंबून असते म्हणून. या दृष्टीने जर मर्ढेकरांच्या कवितेकडे बघितले तर या विचाराने त्यांची कविता अनेक अंगाने समृद्ध असल्याचे दिसून येते. हे विचार, आपल्या आयुष्यातील काही मुलभूत समस्यांना हात घालताना दिसतात. माणसाचा एकाकीपणा, त्याच्या जीवनातील वासना आणि मुर्ताची अमुर्ताकडे चाललेली ओढ!! या ओढीतून जन्मलेला झगडा,
जीवन आणि मृत्यू याची सांगड, मानवाच्या विकासासाठी निर्माण झालेली तरीही त्याचा कोंडमारा करणारी समाजरचना, विज्ञान क्षेत्रातील प्रगति आणि त्याचबरोबर मानवी मनाचा संकुचितपणा यातला विरोध, जीवनाच्या रूंदावणाऱ्या कक्षा आणि मानवी मनाचा मुर्दाडपणा!! या सगळ्या मुलभूत समस्या आहेत आणि ह्या समस्यांतून निर्माण झालेले विचार अनुभवांची खोली वाढवायला उपकारक होणे, हे जरी अपरिहार्य नसले तरी साहजिक ठरते.
या शिवाय, हे जे विचार आहेत, ते नेहमीच जीवनाच्या विविध अंगाला स्पर्श करणारे आहेत. तसेच मर्ढेकरांच्या कवितेत विचार हे विचार म्हणून आलेले नसून, त्या अनुषंगाने येणाऱ्या ऐतिहासिक पार्श्वभूमीसह आलेले आहेत.
त्यामुळे, अनुभवांच्या घटकांची संख्या आणि विविधता यात वाढ झालेली दिसून येते. त्यामुळे त्या कवितेला निराळेच “पीळ” पडलेले आहेत.
मर्ढेकरांच्या कवितेत “अर्थशुन्यतेचा” जो अनुभव येतो, तो आपण एका कवितेच्या संदर्भात बघूया. एके ठिकाणी ते म्हणतात,
पृथ्वीची तिरडी
(एरव्ही परडी
फुलांनी भरली)
जळो देवा भली!!
इथे “तिरडी” आणि “फुले” यांचा प्रचलित अर्थ वगळून नवीन अर्थ आपल्या मिळतो. दुसऱ्या ठिकाणी, ते लिहितात,
पोटातील स्निग्ध भाव
नैसर्गिक ज्या न वाव
वितळतील विष्ठेमधी,
आपणा तमा न!!
माणसाच्या आयुष्यातील स्निग्ध भावनांचा इथला अर्थ काही वेगळाच प्रतीत होतो आणि आपण चकित होतो.
मठीत काजळ धरतो कंदील
आणिक कुबड्या एकांताला
अशा ओळी जेंव्हा वाचायला मिळतात, तेंव्हा मनाच्या कंदिलाकडे एकटक बघायला मन धजावत नाही!! अर्थात अनुभवांची तीव्रता, हेच काही मर्ढेकरांचे वैशिष्ट्य नाही कारण असे अनुभव कित्येकांचे असतात. अशा वेळेस जी तीव्रता दर्शविलेली असते, ती बटबटीत होऊ शकते. परंतु मर्ढेकर इथे वेगळे दिसतात. त्यांच्या कवितेत प्रयत्न जाणवतो, तो तीव्रतेशी इमान राखण्याचा!! तीव्रता अधिक दाखताना, त्यांच्यातील कलावंताचा संयम कधीही ढळत नाही.
“अहो शब्दराजे ऐका / लाज सेवकाची राखा /
नाही तरी वरती काखा / आहेत ह्या /
अर्थशुन्यतेचा हा अनुभव अर्थात विरोधाच्या तत्वावरच आधारलेला असतो. याचा अर्थ असा नव्हे, त्यांच्या अनुभवाची घडण केवळ विरोधाच्या तत्वावर झालेली असते. हा विरोध जुन्या मराठी कवितेत आढळून येणाऱ्या विरोधासारखा नाही.
मर्ढेकरांच्या कवितेतील अनुभवांचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे अर्थघनता!! त्यांच्या कवितेत इतक्या भिन्न प्रकारचे अनुभव एकत्र आणून सांधले गेले आहेत की, ते वाचतानाच आपले मन संस्कारित होते.
“कणा मोडला निश्चलतेचा
ह्या पालीच्या आवाजाने;
“धम्मम सरणं” कुणी बोलले
पाषाणातील बुद्ध-मिषाने /
सरणावरती सरण लागले,
जिवंत आशा पडे उताणी;
गयागोपी उतरे राजा,
‘सुटला’ — म्हणती सारे —’प्राणी’ /
ह्या कवितेत अर्थाचे अनेक पदर आहेत. एकतर मृत्यूचे वर्णन आहे, त्याचप्रमाणे एका शब्दावरून दुसरा शब्द कसा सुचत जातो, त्याच आलेख या कवितेत आहे, म्हणजे पालीनंतर धम्मम स्मरते, मग सरणावरती सरण लागते, पुढे गयागोपीचा राजा उतरतो आणि ‘सुटला’ असा उद्गार निघतो!! यामुळे मर्ढेकरांच्या कवितेला काव्यविषयक संकेतांच्या मर्यादा पडल्या नाहीत. इथे ‘शुभाशुभाचा किनारा’ फिटलेला आहे तर कुरूपता आणि घृणा, यांना मज्जाव नाही.
‘सरणावरती सरण लागले
जिवंत आशा पडे उताणी’
किंवा
‘पंक्चरलेल्या रबरी रात्री
गुरगुरवावी रबरी कुत्री!’
असल्या ओळी, माझ्या वरील विवेचनाला पूरक म्हणून दाखवता येतील. याचा अर्थ, सौंदर्यभावनेचे वावडे अजिबात नाही. “ह्या गंगेमधि गगन वितळले” किंवा “न्हालेल्या जणू गर्भवतीच्या” अशा कवितेत त्यांच्या सौंदर्यदृष्टीचा अनुभव घेत येतो. तसेच, मला अतिशय आवडणारी,
‘दवांत आलीस भल्या पहाटी’ ही कविता!! इथे साधेपणा आहे पण त्याचबरोबर तरलता देखील विस्मयचकित करणारी आहे.
मर्ढेकरांच्या कवितेतील कलात्मक संकर केवळ नव्या-जुन्याचा नसून, अनेक भिन्न गोष्टींचा आहे. इंग्रजी शब्द व कल्पना त्यांनी मराठी आणि संस्कृत कल्पनांच्या शेजारी बसवल्या आहेत.
‘देवाजीने करुणा केली
भाते पिकुनी पिवळी झाली’
या पारंपारिक रचनावर विश्वास ठेवताना पुढे ईश्वराचा विदारक उपहास वाचायला मिळतो,
‘डोळे हे फिल्मी गडे, खोकुनी मज पाहू नका’ अशी ओळ लिहिली आणि त्याचबरोबर,
‘फसफसून येतो सोड्यावरती गार’
ह्या गद्य ओळीनंतर
‘हा तुषारकेसर फेस-गेंद अलवार’
अशी नटवी ओळ वाचायला मिळते.
आता, त्यांच्या कवितेवर जो दुर्बोधतेचा आरोप केला जातो, त्याबाबत चार शब्द!! जेंव्हा हि कविता मराठीत आली, तेंव्हा त्या कवितांनी पारंपारिक कवितेला जबरदस्त हादरा दिला. कवितेचे विषय, ही संकल्पनाच बदलून टाकली. दुसरे असे, कवितेचे विषय सामान्य जीवनातून, सामान्य शब्दांचा आधार घेऊन, आणि रोजच्या जीवनातील काही आधारभूत शक्यता मिसळून कवितेत मांडल्या!! हे मराठी कवितेला नवीन होते. पुढे, ढसाळ, सुर्वे, ग्रेस यांनी जी वाटचाल केली, त्याची पूर्वतयारी या कवितेने केली!! वास्तविक कवितेत आज बघितले तर “दुर्बोध” म्हणावे असे फार काही आढळत नाही. फरक पडतो, तो शब्दांच्या रचनेचा आणि त्यातून प्रतीत होणाऱ्या लयीचा. प्रत्येक ओळीचा स्वतंत्र आस्वाद घेतला तर कवितेत “दुर्बोध” म्हणावे असे आजच्या काळात तरी म्हणवत नाही.

No comments:

Post a Comment