Thursday 19 June 2014

सुगम संगीत-एक तौलनिक विचार – भाग ११



मागील लेखात जरी मी काही शास्त्रीय गायकांचा उल्लेख केला असला आणि जरी तो कुणाला खटकण्यासारखा असला तरी देखील एक बाब अवश्यमेव दिसून येते, ती म्हणजे, सुगम संगीत गाण्यासाठी त्या गायकाला शास्त्रीय संगीताचा अभय जरुरीचा असतो. त्यामुळे, हमखास सुरात गळा लागणे, वेगळ्या वळणाच्या चाली त्याच्या अंगभूत लवचिकतेने गळ्यातून काढणे इत्यादी गोष्टी सहजसाध्य होतात. कितीही अवघड लय असली तरी तो गायक तितक्याच सहजतेने गाऊ शकतो. फक्त, शास्त्रीय संगीताचा किती रियाझ करायचा, हे त्या गायकालाच ठरविणे योग्य. याचे सुंदर उदाहरण हल्लीच्या काळातील हरिहरन या गायकाचे देता येईल. दाक्षिणात्य संगीत आणि उत्तर भारतीय संगीत शिकून आणि पचवून, त्याने स्वत:ची अशी वेगळी शैली तयार केली. अर्थात, हे एक प्रातिनिधिक उदाहरण दिले. या लेखाच्या अनुषंगाने इतर अनेक गायक/गायिका यांचा उल्लेख येईलच. मी, मागे म्हटल्याप्रमाणे, सुगम संगीत गाताना, सर्वात प्रथम कवीने, आपल्या कवितेत कुठला आशय मांडला आहे, हे गायकाने ध्यानात ठेवणे महत्वाचे ठरते. काही वेळा असे होते की, केवळ सदोष शब्दोच्चाराने गाण्याचा रसभंग होतो.इथे एक उदाहरण देतो. वास्तविक मोहमद रफीच्या तोडीचे गायक भारतात फारसे  आढळत नाहीत, तेंव्हा त्याच्याबद्दल पूर्ण आदर व्यक्त करून, मी हे उदाहरण देत आहे. “नीलकमल” चित्रपटातील “बाबुल की दुआए लेती जा” हे गाणे ऐकावे.आपल्या मुलीला सासरी पाठविण्याचा हृद्य प्रसंग!! पण, गाण्याच्या शेवटी, रफीने अकारण शब्दात हुंदके मिसळले, भावना व्यक्त करताना, शब्दोच्चार गळ्यातून काढताना अकारण गदगदून काढले!! वास्तविक गाण्याची मूळ चालच सुंदर असताना, रफीला अशा “गिमिक्स”ची गरजच नव्हती. याच जोडीने आपण, मराठीतील दुसरे गाणे, याच प्रसंगावर आधारलेले बघूया. “सुवासिनी” चित्रपटातील “चालली शकुंतला, लाडकी शकुंतला” हे सुधीर फडक्यांनी गायलेले गाणे तपासून बघावे. या गाण्यात, सुधीर फडके यांनी कुठेही हुंदके वा स्वरात गदगदलेपण आणलेले नाही, तरीही ते गाणे अतिशय सुंदर झाले आहे. वास्तविक, केवळ गळ्याचाच विचार केला तर, रफी, एक गायक म्हणून कितीतरी श्रेष्ठ दर्जाचा आहे पण, स्वत:च्या गळ्याची करामत दाखविण्याच्या हव्यासापायी, एक चांगली चाल थोडी बिघडवून टाकली. बरे, रफीला काव्याचा आशय समजला नसेल, हे संभवत नाही. या कवितेपेक्षा कितीतरी(आशयाच्या दृष्टीने!!) अप्रतिम कविता त्याने, आपल्या गळ्याने अजरामर केल्या आहेत.
इथे मला आणखी एक प्रश्न उपस्थित करायचा आहे. रागदारी संगीतात ज्याप्रमाणे, कलाकार आपली सर्जनशीलता नेहमी दाखवू शकतो-म्हणजे थोडक्यात, आज ज्या पद्धतीने यमन सादर केला त्यापेक्षा वेगळ्या धाटणीने, तोच यमन उद्या सादर करू शकतो. अशा प्रकारची सर्जनशीलता सुगम संगीतात कितपत शक्य आहे? वेगळ्या शब्दात मी, माझे म्हणणे मांडतो. सुगम संगीतात, शब्द कवीचे असतात, चाल संगीतकार निर्माण करीत असतो. गायक/गायिका फक्त ती रचना दिलेल्या आराखड्यानुसार रसिकांसमोर मांडत असतो.तिथे, वैय्यक्तिक विचाराला किंवा कौशल्याला कितपत स्थान आहे? एक मर्यादित तत्वाने विचार केला तर, गायकाला आपली गायकी दाखविण्याला फारसा वाव नसतो, हे मान्य, पण तरीदेखील, कवितेतील शब्दोच्चार नेमक्या अर्थाने, आशय अधिक अंतर्मुख करणे, गायकाला सहज शक्य असते.किंबहुना, गायकाचे तेच खरे कौशल्य असते. अर्थात, अचूक शब्दोच्चार, हा एक अतिशय महत्वाचा गुण मानावाच लागेल. साधारणपणे आपण, कविता वाचताना, त्यातील शाब्दिक रचनेच्या लयीशी संबंधित कविता वाचीत असतो आणि त्यात दडलेल्या Associations द्वारे आस्वाद घेत असतो.परंतु, जेंव्हा संगीतकार त्याच शब्दांना चाल लावत असतो, तेंव्हा तो त्या शब्दापलीकडील जो अमूर्त अर्थ असतो, तो मूर्त स्वरुपात पकडण्याचा प्रयत्न करीत असतो. तेंव्हा, हा जो सगळा खटाटोप असतो, त्याला नेमके गहिरे परिमाण हे गायकाच्याच गळ्यातून आपल्याला जाणवत असते आणि तिथेच गायकाची सर्जनशीलता दिसून येते. हे काम, आपल्याला वाटते तितके सहज आणि सोपे अजिबात नसते. त्यातून लतासारखी असामान्य गायिका, दिलेल्या चालीच्या अनुरोधानेच थोड्या वेगळ्या हरकती घेऊन, त्या कवितेचा आणि चालीचा ढंग अधिक गहिरा करून दाखविते. गायन सुरात होणे, ही तर प्राथमिक अट झाली पण, सुरात गाताना, अतिशय बारीक आणि अर्ध्या ताना घेऊन, तीच लय वेगळ्या स्तरावर नेता येऊ शकते, हे लता आणि इतर काही गायकांनी दाखवून दिले आहे आणि मला जो,”सर्जनशीलता” या शब्दाचा अर्थ अपेक्षित आहे,तो अशा प्रकारे दिसून येतो. एखादी ओंळ गाताना किंवा गाऊन संपविताना, तीच सुरावट थोड्या वेगळ्या गतीने किंवा आणखी थोडा वेगळ्या पट्टीतील सूर वापरून, अनपेक्षित असा वेगळाच रंग निर्माण करणे, हे साधेसुधे काम नाही आणि इथेच तुमचा, शास्त्रीय संगीताचा कितपत व्यापक व्यासंग आहे, हे दिसून येते. त्यातून, सुगम संगीतात, रागाचे व्याकरण तंतोतंतपणे वापरले पाहिजे, असा काही नियम नसल्याने,गायक तेव्हढी मोकळीक स्वत:ला देऊ शकतो. ज्याप्रमाणे संगीतकार चाल करताना, वेगवेगळ्या रागांचा वापर, एकाच गीतात आणि तोदेखील जरुरीपुरताच करू शकतो. तसेच गायक देखील, त्या रागातील स्वरांव्यतिरिक्त वेगळे सूर गाऊन, त्याच कवितेचा आशय अधिक व्यापक करू शकतो. इतकेच कशाला, जेंव्हा गीता दत्त किंवा आशा भोसले यांनी गायलेली हॉटेलमधील गाणी, जी बहुश: पाश्चात्य संगीतावर आधारित आहेत, ती गाणी गाताना देखील कितीतरी वेगळ्या प्रकारे ताना घेऊन, तीच गाणी अतिशय परिणामकारक गायली आहेत. तेंव्हा, केवळ भारतीय  सुगम रागदारी संगीतावर आधारित गाण्यांवर सर्जनशीलता दाखविता येते, हा समज कोत्या मनोवृत्तीचा आहे, हे दाखवून दिले आहे. किंबहुना, थोडे पुढे जाऊन मी असे म्हणेन की, सुगम संगीतात, जिथे शब्द याच गोष्टीला प्राधान्य असते, तिथे शब्द (चांगल्या अर्थाने!!) भोगून गाणारे, असे दोनच गायक मला आढळले आहेत.१] आशा भोसले आणि २] किशोर कुमार. अगदी, लता आणि रफी यांच्यापेक्षाही वर!! इथे मी फक्त शब्द उच्चारणे याच गुणाचा संदर्भ घेतलेला आहे. गायकी, लयकारी,voice culture  हे वेगळे अलंकार आहेत. कित्येकवेळा तर अतिशय सामान्य दर्जाची कविता आणि तशीच चाल असते पण, गायक केवळ त्याच्या असामान्य गायकीवर तेच गाणे फार वरच्या पातळीवर नेतो. आपण, काही उदाहरणे बघूया.लताचे “बिंदिया चमकेगी” किंवा रफी-आशाने गायलेले “दिवाना हुवा बादल” सारखी गाणी जर का नीट लक्ष देऊन ऐकली तर माझे म्हणणे ध्यानात यावे. या प्रस्तुत गाण्याची शब्दकळा काही असामान्य नाही की गाण्याची चाल तितकी अवघड नाही. सहज आणि सरळ चाल आहे पण, प्रस्तुत गायकांनी, तेच गाणे अतिशय सुश्राव्य केलेले आहे. आता, ही करामत सर्जनशिलतेत येऊ शकणार नाही का? जरी, तुमची कला ही इतर घटकांवर अवलंबून असली तरीदेखील!! जर का, सुगम संगीताच्या माध्यमाचेच हे तोकडेपण असेल तर, त्या कलेच्या बाबतीत कोण काय करणार!! याउलट आपण असा विचार करूया की, हे तोकडेपण ध्यानात घेऊनही, कलाकार संगीताचा असामान्य आविष्कार घडवू शकतात, ही कामगिरी निश्चितच कौतुकास्पद ठरावी. त्यातून, मी मागे म्हटले त्याप्रमाणे, गाताना पूर्ण सप्तकात गळा फिरवणे, मूर्च्छना घेणे इत्यादी गोष्टींची अजिबात गरज नसते. इथे, दोन, तीन स्वरांची हलकी पण अतिशय परिणामकारक तान उपयोगाची ठरते. तसेच वर म्हटल्याप्रमाणे, एकाच ओळीत वेगवेगळे स्वर घेऊन, चकित करता येते. उदाहरणार्थ, समजा, गाणे मारवा रागात असेल तर, त्या रागात अल्पसा आढळणारा “षड्ज” आणि अजिबात नसलेला “पंचम” याचा अनोखा उपयोग केला तरी फारसे काही बिघडत नाही!! त्या सुरांद्वारे जर का कवितेचे आणि चालीचे अंगभूत सौंदर्य वाढत असेल तर, कुणाही गायकाने कुठल्याही रागाचे स्वर कुठेही वापरले तरी प्रत्यवाय असू नये.

No comments:

Post a Comment