Thursday 28 October 2021

संगीत - एक शास्त्र

वास्तविक हा विषय म्हटले तर अति किचकट आहे पण तरीही निदान मला तरी किती आकळलेला आहे, हे तपासण्यासाठी आणि थोडेफार *सुबोध* मराठी लिहिण्याचा प्रयत्न करीत आहे. एक नक्की, आधी वातावरणात ध्वनी होते आणि त्यांचे स्वरूप नक्की करून आपल्या प्रतिभावंत ऋषींनी त्याचे शास्त्र बनवले. अगदी मागोवा घ्यायचाच झाल्यास, सामवेदात संगीताची काही मुलतत्वे सापडतात परंतु आजचे जे आपले *सप्तक* आहे (सा रे ग म प ध नि) त्याची शास्त्रशुद्ध प्रतिस्थापना नारद मुनींनी केली (रामायणातील नारद मुनी वेगळे. त्यांचा इथे काहीही संबंध नाही). नारद मुनींनी *नाट्यशास्त्र* नावाचा श्लोकात्मक ग्रंथ लिहिला आणि त्यात संगीतावर १ प्रकरण लिहिले आणि त्यात आजच्या सप्तकाची मांडणी केली (त्यावेळेस म हा स्वर पहिला मानून सप्तक तयार केले. पुढे यथावकाश सा स्वर पहिला अशी मांडणी झाली) आता हा ग्रंथ इ.स.पूर्व २०० ते इ.स.८००, इतका प्राचीन काल मानला गेला आहे. अगदी इ.स.पूर्व २०० जरी धरले तरी आज त्या ग्रंथाला २,२०० वर्षे झाली!! लक्षात घ्या, त्याकाळी आजच्यासारखी आधुनिक उपकरणे नव्हती. केवळ कर्णगोचर अवस्थेत त्यांनी ध्वनीचे स्वरूप आकळून घेतले, जे आजच्या आधुनिक उपकरणांनी मान्य केले आहे. आता गमतीचा भाग असा आहे, यावेळेस पाश्चात्य संगीत कुठे होते? थोडा खोलवर जाऊन अभ्यास केला तर असे आढळते, त्यावेळी पाश्च्यात्यांकडे *ग्रीक संगीत* अस्तित्वात होते (पुढे त्यांनी याचा संपूर्ण त्याग केला केला) आणि त्या संगीतात देखील *सप्तक* होते (C D E F G A B) परंतु त्यांचा प्रॉब्लेम असा झाला, आपल्या सप्तकात काही *अंतर्गत सूर* मांडले गेले, ज्यांना *श्रुती* म्हणतात. (खरंतर स्वर म्हणजे श्रुती म्हणता येईल पण तो भाग फार जटील आहे) आपले स्वर हे नैसर्गिक ध्वनींवर आधारीत आहेत (म्हणूनच आपली वाद्ये नैसर्गिक तत्वावर तयार झाली आहेत) आणि पाश्च्यात्यांकडील वाद्ये संपूर्णपणे वेगळ्या धर्तीवर बांधलेली असतात. त्यामुळेच पाश्च्यात्यांना *टेम्पर्ड स्केल* स्वीकारावे लागले कारण नैसर्गिक स्वरतत्व त्यांच्या वाद्यांना खपणारे नव्हते. अर्थात हा भाग देखील समजायला अति अवघड आहे. आपल्याकडे नेहमी फार ढोबळ विधाने केली जातात जसे भारतीय संगीत आणि पाश्चात्य संगीत एकाच नाण्याच्या २ बाजू आहेत कारण दोन्ही संगीतात *सप्तक* वापरले जाते!! असे बोलताना, एक बाब नेहमी बाजूला सारली जाते आणि ती म्हणजे स्वरांतर्गत असलेल्या श्रुती व्यवस्था. आपले स्वर नैसर्गिक असल्याने, आपल्या संगीतात *मेलडी* असणे सहजसाध्य असते तर पाश्च्यात्यांना त्यांची वेगळी व्यवस्था म्हणून *हार्मनी* व्यवस्था स्वीकारणे भाग पडले. अर्थात पाश्चात्य संगीतात, अधून मधून मेलडी ऐकायला मिळते. जेंव्हा दोन्ही संगीतातील *साम्य* दर्शवायचे असते तेंव्हा हे मुद्दे महत्वाचे असतात पण तिकडे कुणीही फारसे लक्ष देत नाही आणि ढोबळ विधाने करून, वेळ मारून नेली जाते. ऐकणारे बरेचसे *Layman* असतात आणि त्यामुळे अधिक खोलात जाऊन फारसा विचार केला जात नाही. मुळात, *संगीतशास्त्र* म्हटल्यावर बरेचसे दचकतात आणि लांब रहातात. दुर्दैवाने ही वस्तुस्थिती आहे. त्यातून शास्त्राबद्दल *गम्य* असणारे इतकी अवघड भाषा वापरतात की ज्या कुणाला रस निर्माण होण्याची शक्यता असेल, ती व्यक्ती दूर जाते आणि *शास्त्र* विषयाबाबत दुराग्रह करून बसतात. आता शास्त्र म्हटल्यावर काही संकल्पना, काही तांत्रिक शब्द हे येणारच. त्याला इलाज नाही पण त्याची थोडी सवय करून घेतली तर त्यात, आपल्याला जितके अवघड वाटते, तितके ते अवघड नाही, याचा प्रत्यय येऊ शकतो. आपल्याकडे एक विचार प्रचंड प्रसिद्ध आहे. *गाणे कानाला गोड वाटले ना, मग ठीक आहे*!! गाणे कानाला गोड वाटायलाच हवे, ती तर प्राथमिक कसोटी आहे पण तिथेच थांबणे योग्य नव्हे. सादर होणारी प्रत्येक कलाकृती *शास्त्राधारित तपासणे* शक्य नसते. तिथेच मग त्या कलाकृतीचे *निकष* उपयोगी पडतात. प्रत्येक सांगीतिक कलाकृतीचे काही ठराविक निकष अस्तित्वात आहेत पण ते आहेत, याचीच जाणीव ठेवली जात नाही आणि आस्वाद घेतला जातो. त्यामुळे, *मला गाणे आवडले* हे वाक्य नको तितके प्रसिद्ध होते. एकदा शास्त्र म्हटल्यावर *व्यक्ती* पुसली जाते आणि निखळ कलाकृती समोर येते. *व्यक्ति पुसली जाणे* हेच मान्य करायला अवघडजाते, इतके सगळे स्वकेंद्रित असतात आणि आस्वादाच्या कक्षा विस्तारायच्या ऐवजी संकुचित करून टाकतात.

Thursday 21 October 2021

शाम शेठ!!

वास्तविक शाम शेठ हा काही हेमराज वाडीत रहाणारा नव्हता. मोहन बिल्डिंग मध्ये रहात होता. बरे त्याचे वय आमचे वय, यात महदंतर होते. वास्तविक पाहता माझी, त्याच्याशी ओळख त्यामानाने उशिरा झाली. माझ्या अंदाजाने प्रदीपची ओळख आधीची आणि नंतर मग, मी,सुरेश, उदय इत्यादींची ओळख झाली पण ओळख झाली ती मात्र अतिशय घट्ट. त्याकाळात रोजच्या रोज आमच्या त्याच्याशी भेटीगाठी व्हायच्या. अंगाने गलेलठ्ठ, वर्णाने काळा, डोळ्यांवर जाड काचांचा चष्मा उंची साधारणपणे साडे पाच फुटाच्या आसपास!! आम्ही तरी त्याला, त्याच्या हॉटेलच्या गल्ल्यावरच बसलेला बघितला, इतका की तो कुठल्या रंगाची पॅन्ट घालायचा, हे देखिल बघितले नाही. आवाज बराचसा खर्जातला होता पण आमच्याशी बोलताना मात्र अत्यंत खट्याळ असायचा. वास्तविक ती केरळीय हिंदू - मातृभाषा अर्थात मल्याळम परंतु सगळे आयुष्य मुंबईत गेल्याने (त्यातून मोहन बिल्डिंग सारख्या मध्यम वर्गीय लोकांच्यात गेल्याने) मराठी भाषा चांगलीच अवगत होती, विशेषतः "जहाल" मराठी शब्द इतके अस्खलित बोलायचं की आमची हसून पुरेवाट व्हायची. वास्तविक त्याचे उडपी हॉटेल होते पण त्या हॉटेलमध्ये आमचा ग्रुप तासंतास गप्पा मारीत बसायचा - क्वचित काही खायला मागवले तर, अन्यथा आम्ही निव्वळ चकाट्या पिटीत बसत असू. तेंव्हा आम्ही सगळे विशीच्या आसपास होतो त्यामुळे अंगावर फारशा जबाबदाऱ्या नव्हत्या. संध्याकाळी, तेंव्हा आम्ही सगळे खाडिलकर रोडवरील एका मठात जात असू. तेंव्हा मी थोडासा आस्तिक होतो, असे म्हणता येईल. आता त्या मठात कुणी जाते का? काही कल्पना नाही. एका महाराजांचा मठ आहे (आता तर मला त्या महाराजांचे नाव देखील आठवत नाही, इतका मी परका झालो) मठात जाऊन दर्शन घ्यायचे आणि शामशेठच्या हॉटेलात ठिय्या मांडायचा. अर्थातच, सुरवातीचे बोलणे, साधारणपणे दिवसभराचा ताळा मांडणे असाच असायचा. पुढे गप्पांची गाडी वर्गातील मुलींवर यायची किंवा नुकत्याच बघितलेल्या चित्रपटातील अभिनेत्रीवर यायची. गिरगावकर म्हटल्यावर भाषा रासवट असणे क्रमप्राप्तच होते. त्यातून कुणातरी जरा एखाद्या मुलीबद्दल सलगीने बोलायला लागला कि लगेच त्याची मनसोक्त टर नेहमीच व्हायचे. अर्थात सलगी दाखवायची म्हणजे त्या मुलीच्या शारीर सौंदर्याबद्दल शाब्दिक उधळण व्हायची!! अभिनेत्री असेल तर भाषा अधिक चेकाळली जात असे. शामशेठ शांतपणे ऐकत बसलेला असे. कधी कधी आमच्यात भांडणे व्हायची,अगदी आय, माय काढली जायची!! परंतु सगळी पेल्यातील वादळे असायची. शामशेठ हसत असे आणि त्याची मजा घेत असे. अर्थात काहीतरी टवाळी अति वाह्यात व्हायला लागली (तशी वाह्यात भाषा रोजच्यारोज आमच्या तोंडून बाहेर पडायची. गिरगावकर म्हटल्यावर अशी भाषा अध्याहृतच असते म्हणा) की मग शामशेठ त्याच भाषेत आमच्याशी संवाद साधायचा परंतु जरा हलक्या आवाजात कारण काही झाले तरी तो, त्याच्या धंद्याच्या गल्ल्यावर बसलेला असायचा आणि त्या हॉटेल मध्ये इतर बरेचजण खायला येत असत. त्याला तशा शिवराळ भाषेत बोलायला कसलाच किंतु वाटत नसे आणि याचे आम्हा सगळ्यांना कौतुक होते. वास्तविक शामशेठ तेंव्हाच पन्नाशीच्या आसपास होता पण आमच्यातील एक मित्र, असाच वागायचा. त्याने, त्याच्या हॉटेलमध्ये स्पष्ट सांगितले होते, ही मुले हॉटेल मध्ये की एखादे रिकामे टेबल त्यांना द्यायचे आणि तिथे कुणीही "ऑर्डर" घ्यायला जायचे नाही. शामशेठ खरंतर प्रदीपच्या अधिक जवळ असायचा. अक्षरश: कित्येक दिवस, कितीतरी तास आमच्या गृपने त्या हॉटेलात आणि तद्नुषंगाने, शामशेठ बरोबर घालवले. आमची ती मानसिक गरज झाली होती. पुढे मी हळूहळू नास्तिक झालो आणि मठात जाणे बंद झाले तरी देखील मी दर संध्याकाळी इथेच आमच्या गृपला भेटायला येत असे. मला आज नवल वाटते कारण व्यावहारिक दृष्टीने बघितल्यास, आम्ही काही त्याच्या हॉटेलचे रोजचे गिऱ्हाईक नव्हतो तेंव्हा आमच्याकडून त्याला कपर्दिक फायदा होण्याची शक्यता नव्हती तरीही त्याला आमच्या गृपचा लळा लागला होता. कधीकधी कुणीतरी काही दिवस त्या "अड्ड्यावर" यायचा नाही पण जेंव्हा तो परतायचा, तेंव्हा शामशेठ न चुकता त्याची चौकशी करायचा!! असा हा आमचा अत्यंत लोभस मित्र होता. आम्ही तिथे त्या हॉटेलात फार तर चहा मागवायचो कारण आम्हाला सिगारेट फुंकायची असायची. माझ्या आठवणीत, ३,४ वेळाच आम्ही तिथे "वडा सांबार" मागवल्याचे अंधुकसे आठवत आहे. अर्थात प्रत्येकाची आपले पंख पसरून आकाशात झेप घ्यायची वेळ येणारच असते आणि तशी वेळ आली. माझे संबंध हळूहळू दुरावले. एकदा अचानक प्रदीपचा फोन आला - शामशेठ अत्यवस्थ आहे. मी आणि सुरेश त्याला हॉस्पिटलमध्ये भेटायला जात आहे. करणे देण्यात आता काहीच अर्थ नाही पण मी जाऊ शकलो नाही आणि काही दिवसातच शामशेठ गेल्याची बातमी, प्रदीपनेच मला दिली. तारुण्याचा एक तुकडा घेऊन शामशेठ पुढे निघून गेला. पुढे आम्ही सगळेच आपापल्या आयुष्यात इतके रममाण झालो की त्याची आठवण विस्मृतीत गेली. मध्यंतरी, फोनवर बोलताना सुरेशने एकदम आठवण काढली आणि सगळ्या आठवणी रांगोळीप्रमाणे स्वच्छ दिसायला लागल्या. मन कुठेतरी कातर झाले. शामशेटच्या अखेरच्या दिवसात, त्याला भेटायला हवे होते, ही रुखरुख मनात जागी झाली आणि त्यातूनच असा लेख लिहावा, मनात आले.

Friday 8 October 2021

एक स्तब्ध गोठलेला क्षण!!

मी १९९२मध्ये प्रथमच घर सोडले आणि नायजेरिया (लागोस) इथे नोकरीला गेलो. नव्हाळीचे ४ दिवस या न्यायाने सुरवातीचे दिवस मजेत गेले. लवकरच आजूबाजूचे बरेच मराठी लोकं ओळखीचे झाले आणि प्रत्येक शनिवार/रविवार आनंदात जायला लागले. वास्तविक लागोस हा माझा पहिलाच परदेश प्रवास तरीही मी आजमितीस काहीही लिहिले नाही.अर्थात त्याला काही कारणे आहेत, फार वैय्यक्तिक असल्याने  त्यांचे उल्लेख टाळतो. नायजेरिया म्हणजे काळ्या लोकांचा देश. अपवादस्वरूप आशियाई किंवा गोरे लोकं दिसणार. परिणामी सुरक्षा व्यवस्था टांगणीला लागलेली. संध्याकाळ झाली की घरकोंबडा व्हायचे!! कुठे कुणाकडे भेटायला गेल्यास, शक्यतो रात्री त्यांच्याच कडे राहायचे आणि सकाळी उठून आपल्या घरी परतायचे, हाच बहुतांशी शिरस्ता!! माझ्या आजूबाजूला अनेक केरळीय कुटुंबे राहत होती. काही जण तर जवळपास १५,१६ वर्षे सलग राहत होती. परदेशी राहताना, हा एक गुण नेहमी दिसतो. *आपण भारतीय* इतकी माहितीओळख वाढवायलाआणि मैत्री करायला पुरेसा असतो. याच न्यायाने, माझी अनेक केरळीय लोकांशी हळूहळू ओळख झाली. त्यातील एक केरळीय कुटुंब माझ्याच घराच्या शेजारी राहात होते.त्यावेळी ते वयाने पन्नाशीच्या आसपास होते.फक्त नवरा,बायको होते. मी एकटाच असल्याने, बरेचवेळा शनिवार किंवा रविवार,मला त्यांच्याकडे जेवणाचे आमंत्रण असायचे.अर्थात केरळीय ब्राह्मण,या नात्याने जेवणात *शुद्ध शाकाहारी* पदार्थ असायचे. मी एकटाच नसायचो तर एक २५ वयाचा पद्मनाभन म्हणून केरळीय माझ्या सोबतीला असायचा. अर्थात शुद्ध शाकाहारी असले तरी बियर,व्हिस्की वगैरे सरंजाम व्यवस्थित असायचा!! त्यामुळे, मी तर त्यांच्याकडे घरचा असल्यासारखा वावरत असे. हळूहळू कौटुंबिक माहितीची देवाणघेवाण होणे, क्रमप्राप्तच होते आणि त्यातून समजेल,त्यांची २ मुले मुंबईत शिक्षणासाठी राहात असतात. चेंबूर भागात, भाड्याच्या घरात रहात असतात. वास्तविक त्याचे स्वतःचे असे घर त्रिवेंद्रम इथे होते आणि ते त्यावेळी त्यांनी ते घर भाड्याने दिले होते. पत्नी फक्त घरीच असायची. दोघांचा वर्ण सावळा म्हणता येईल असा होता. त्या दोघांमधील पुरुष बोलका होता पण बाई मात्र मितभाषी होती. त्यांच्या बोलण्यावरून तरी दोन्ही मुले अत्यंत हुशार आणि तल्लख होती आणि याचा त्यांना सार्थ अभिमान होता. एकूण असे म्हणता येईल,सुखवस्तू,सुखी कुटुंब होते. आणि डिसेंबर १९९२ महिना अवतरला!! दुपारच्या सुमारास, पद्मनाभनचा मला ऑफिसमध्ये फोन आला. त्याने जे काही सांगितले ते ऐकून, मी तर अवाक झालो!! *नायर* (हे त्या कुटुंबाचे आडनाव) त्यांची मुले डिसेंबर/जानेवारी महिन्याच्या सुटीत  आपल्या आई/वडिलांकडे येणार होते आणि त्यासाठी पासपोर्ट ऑफिसमध्ये आपले पासपोर्ट घ्यायला आले होते आणि तेंव्हाच तिथे *बॉम्बस्फोट* झाला आणि त्यात ही दोन्ही मुले दगावली!! पद्मनाभनकडे फॅक्स आला होता आणि त्याला ही बातमी नायर कुटुंबाला सांगायची होती!! सांगायला लागणारच होती पण पद्मनाभनचा धीर होत  नव्हता म्हणून त्याने मला, त्याच्याबरोबर यायची विनंती केली होती. ऐकताना, मलाच कळत नव्हते, आम्ही त्यांना कसे सांगायचे? मी त्याला इतकेच सांगितले, बाईला आधी सांगायचे नाही. त्याला बाजूला घ्यायचे आणि पद्मनाभनने मल्याळी भाषेत, अतिशय थोडक्यात सांगायचे आणि लगोलग तिथून बाहेर पडायचे. वास्तविक वीकएंड नसून देखील आम्ही त्यांच्या घरी आल्याचे, त्यांना नवल वाटले होते. मी पद्मनाभनला खूण केली आणि अक्षरश: तोतऱ्या, चाचरत्या आवाजात त्याने बातमी सांगितली. नायर ऐकूनच थिजले. त्यांनी बायकोला बाहेर बोलावले आणि त्याच मल्याळी भाषेत, बायकोला सांगितले!! पुढल्या क्षणी त्या बाईंची दातखीळ बसली!! स्वतः नायर यांची अवस्था फार वेगळी नव्हती पण अखेरीस *पुरुष* म्हटल्यावर आणि बायकोची अशी अवस्था झाल्यावर, लगोलग डॉक्टर गाठला आणि नशिबाने १० मिनिटांत दातखीळ सुटली!! *हाच तो स्तब्ध गोठलेला क्षण* जिथे शब्द पूर्णपणे  व्यर्थ होते!! रात्री डॉक्टर कडून आम्ही चौघे, त्यांच्या घरी आलो.  बोलण्यासारखे आणि धीर देण्यासारखे काहीच सुचत नव्हते. वास्तविक मीच त्यावेळी माझ्याच कौटुंबिक धक्क्यातून थोडाफार सावरत होतो. त्या क्षणापासून ती बाई *मुकी* झाली. तिने बोलणेच टाकले. लगोलग, श्री.नायर यांनी भारतात परतायचा निर्णय घेतला.आता कशासाठी पैसे मिळवायचे? आयुष्याचा उद्देश(च) संपला. त्यांचे म्हणणे योग्यच होते. त्यांनी लागोस, फेब्रुवारीमध्ये सोडले आणि सरळ त्रिवेंद्रम गाठले. पुढील वर्षभर माझा त्यांच्याशी संपर्क होता आणि  त्यातून समजले, त्या बाईला थोडे वेड लागले होते!! पुढे मी देखील लागोस सोडले आणि साऊथ आफ्रिकेला जायचा निर्णय घेतला. निघायच्या काही दिवस आधी मी त्यांना कळवण्यासाठी फोन केला तेंव्हा, आदल्या दिवशीच त्यांच्या पत्नीचे निधन झाल्याचे कळले!! बातमी ऐकल्यावर, का कुणास ठाऊक पण मलाच थोडे हायसे वाटले. ही भावना चुकीची असू शकते पण उरलेले आयुष्य वेडसर व्यक्तीशी संसार करीत काढणं,या जीवघेण्या वेदना होत्या आणि त्या वेदनांमधून श्री. नायर यांची सुटका झाली. आता मात्र माझा त्यांच्याशी काहीही संपर्क नाही. किंबहुना ते जिवंत असण्याची शक्यता देखील कमीच वाटते!!