Sunday 17 February 2019

अजून त्या झुडुपांच्या मागे

मागील शतकात, आपल्या आयुष्यात दूरदर्शनचा प्रवेश होण्यापूर्वी रेडियोचे, मनोरंजन म्हणून स्थान बरेच वर्षे अबाधित होते - आजही बरेचजण सतत रेडिओ ऐकत असतात पण एकूण प्रमाण कमीच झाले आहे. माझा तेंव्हा देखील ऐकण्याचा भर म्हणजे मराठी गाणी. अशावेळी कधीतरी अचानक, "भावसरगम" कार्यक्रम ऐकला आणि तो कार्यक्रम ऐकायची सवयच लागली. "भावसरगम" कार्यक्रमाने मराठी ललित संगीतात प्रचंड भर टाकली. एक संपूर्ण पिढी घडवली, असे म्हणायला प्रत्यवाय नसावा, इतका प्रभाव रसिकांवर पडला होता. कितीतरी नवे संगीतकार, नव्या दमाचे कवी, गायक/गायिका यांना अतिशय विपुल प्रमाणात संधी मिळाली. याच पंक्तीत मानाचे स्थान मिळवणारे संगीतकार - दशरथ पुजारी!! संगीतकार म्हणून त्यांचे मूल्यमापन आपण नंतर करू पण त्याआधी गाण्याकडे वळूया. 
गाण्याची चाल स्पष्टपणे यमन कल्याण रागावर आधारित आहे. गाण्याच्या सुरवातीलाच सतारीच्या सुरांमधून या रागाचे सूचना मिळते. अर्थात, ललित संगीताच्या शिरस्त्याप्रमाणे चाल, रंगापासून काहीशी दूर जाते पण ते तर ललित संगीताचे प्रधान वैशिष्ट्य आहे. सतारीचे सूर किंचित्काळ ऐकायला मिळतात आणि लगोलग, गायक म्हणून खुद्द दशरथ पुजारी अवतरतात. गाण्याची चाल सुबोध आहे पण कविता म्हणून वाचायला गेल्यास, शब्दरचना देखील तशीच  साधी,सरळ आहे. संयत प्रणयाचाच काळ होता आणि त्यानुरुपच गाण्यातील प्रणयाची जी काही धिटाई असायची ती , निसर्गाच्या प्रतिमांतूनच आपल्या समोर यायची. पहिल्याच ओळीत, "सदाफुली" सारख्या सध्या फुलाचे प्रतीक घेतले असल्याने, पुढे त्याच प्रतिकाला धरूनच शब्दरचना येणार, याचा अंदाज घेता येतो. कवितेतील फुले म्हणून जी निवडली आहेत, ती बघितली तर वरील विधानाचा अर्थ समजून घेता येईल. "सदाफुली","शेवंती", "मोगरा" ही फुले तशी सामान्य जनांच्या जिव्हाळ्याची फुले आहेत आणि सहजपणे कुठेही दृष्टोत्पत्तीस पडतात, परिणामी सगळीच रचना ही सुबोध झाली आहे. कुठेही फार प्रयोग केलेले आढळत नाहीत म्हणजे नवीन वाद्ये, लयीचे वेगळे बंध किंवा लयच अति अवघड बांधणे इत्यादी. गाण्यात चालीच्या कुलशीलाला योग्य अशीच शब्दकळा आहे. चाल सहजपणे गुणगुणता येण्यासारखी असल्याने रसिकांच्या मनात बसली.  इथे एक बाब स्पष्ट करावीशी  वाटते,साधी चाल बांधणे हे कधीच साधे, सहजशक्य नसते. त्यासाठी संगीताचा व्यासंग तितकाच भरीव असावाच लागतो. 

अजून त्या झुडुपांच्या मागे 
सदाफुली दोघांना हसते 
अजून आपुल्या आठवणींनी 
शेवंती लजवंती होते 

गाण्यात साधा आणि ललित संगीतात प्रसिद्ध असलेला केरवा ताल वापरलेला आहे. आता यानिमित्ताने संगीतकार दशरथ पुजारीचे मूल्यमापन करायचे झाल्यास, खंत अव्यक्तपणे व्यक्त करणे, अंतर्मुखता आणि हळवी असहायता तसेच मुग्ध व संयत अभिव्यक्तता सिद्ध करणे होय. संगीतकाराचा कां बहुदा पारंपरिक वा रूढ संगीताचे वळण पसंत करतात असे म्हणता येईल - पण त्यातूनच गुणगुणण्यासारख्या चाली निर्माण करतात, ही बाब खास प्रशंसनीय म्हणावीच लागेल. एक बाब स्पष्टपणे जाणवते ,आपल्या श्रोत्यांचे लक्ष  वेधण्यासाठी या संगीतकाराने फारसे काही उलटे-पालटे  केले नाही. 

तसे पहाया तुला मला  ग 
अजून दवबिंदू थरथरतो 
अर्ध्यामुर्ध्या कानगुजास्तव 
अजून ताठर चंपक झुरतो 

हाच अंतरा ऐकायला घेतल्यास, वरील विधान आपल्याला पटू शकेल. अस्ताईची चाल तशी कायम ठेवली आहे आणि संथपणे, चालीतील मूळ गोडवा कायम ठेऊन, तशीच चालू ठेवली आहे आणि मुळातल्या गोडव्यावर सगळी भिस्त ठेवली आहे. म्हटले तर यात काहीच नावीन्य नाही परंतु त्याचबरोबर चालीत गोडवा निर्माण करणे, हे सृजनाचे लक्षण मानावेच लागेल. त्याचजोडीने आपण कवितेकडे लक्ष वेधले असल्यास, शब्दकळा देखील अतिशय साधी, मुग्ध प्रणयालाच साजेशी आहे. कवी वसंत बापटांची कविता आहे. "दवबिंदू थरथरतो" किंवा "ताठर चंपक झुरतो" यातून आशयाची भावव्यक्तीच समोर येते. सुरवातीलाच मी एक विधान केले  होते,निसर्गातील फुलांचा प्रतिमात्मक वापर करताना, उदाहरण म्हणून नेहमीच्याच वापरातील फुलांचा वापर केला आहे. त्यामुळे असेल पण संगीतकाराने चाल निर्मिती करताना, हाच दृष्टिकोन समोर ठेवला असावा. 

अजून गुंगीमध्ये मोगरा 
त्या तसल्या केसांच्या वासे 
अजून त्या पात्यांत लव्हाळी 
होतच असते अपुले हांसे 

गायक म्हणून दशरथ पुजारी यांचे विश्लेषण करताना, काहीसा सपाट विनावक्र असा गळा म्हणता येईल. गाण्यावर शास्त्रोक्त संगीताचे संस्कार झाल्याचे जाणवत नाही (खरे तर हा मुद्दा विवादास्पद म्हणायला हवा!!) त्यामुळे गाताना एखादीच छोटीशी हरकत घेऊन, मूळ चालीतील काहीसे "वेगळे अंग" दाखवले जाते. कवितेची प्रकृती ध्यानात घेता आणि चालीचे शील लक्षात घेता, गायनात अवघड हरकती घेण्याची काहीच गरज भासत नाही. तांत्रिक बाजूने लिहायचे झाल्यास, आवाजाचा पल्ला फारसा विस्तृत नाही आणि त्याची परिणामकारकता मध्य सप्तकापुरतीच मर्यादित आहे. परंतु आवाजात काहीशी आश्वासकता किंवा सांत्वन करण्याचा धर्म आहे. "अजून गुंगीमध्ये मोगरा" ही ओळ गायल्यावर लगोलग छोटासा आलाप घेतला आहे आणि हा आलापच त्यांच्या गायकीचे व्यवच्छेदक लक्षण म्हणून मानता येईल. 

अजुनी फिक्कट चंद्राखाली 
माझी आशा तरळत आहे 
गीतांमधले गरळ झोकुनी 
अजून वारा बरळत आहे 

संगीतकार म्हणून आणखी काही विधाने करायची  झाल्यास, त्यांनी आपल्या कारकिर्दीत नेहमीच साध्या, सामान्य श्रोत्यांसाठी रचना करण्यात समाधान मानले. भारतीय व्यापक संगीत परंपरेत वाढलेला साधा श्रोता देखील संतुलित श्रोता असतो. ललित संगीत पारंपरिक की नवीन, याची फारशी चर्चा न करता त्यांची सांगीतिक गरज भागू शकते आणि असा वर्ग आपल्या समाजात फार मोठ्या प्रमाणावर असतो. तेंव्हा या गाण्याचे खरे यश अशा संगीत रचनेत दडलेले आहे, हे मान्यच करायला लागते. 



Friday 1 February 2019

केळीचे सुकले बाग

मराठी भावगीतात स्वररचना करण्यासाठी, अनेक संगीतकारांनी, बरेचवेळा, ज्यांना रूढार्थाने "गीतकार" म्हणता येणार नाही अशा कवींच्या कवितांना स्वरबद्ध करून, भावगीत हा अविष्कार खऱ्याअर्थाने श्रीमंत केला. ही परंपरा फार जुनी आहे पण त्यामुळे रसिकांना अनेक उत्कृष्ट कवितांचा आस्वाद घेणे सहजशक्य झाले, हे मात्र निर्विवाद. निव्वळ कवितेचा आस्वाद घेणे, हे बऱ्याच रसिकांना जमत नाही, अवघड जाते किंवा त्या बाजूला वळतच नाहीत. खरंतर कविता वाचन हा अतिशय तलम, मुलायम आणि अनिर्वचनीय असा वाचनानुभव असतो पण त्यासाठी मनाची एक ठराविक पातळी तयार करणे आवश्यक असते आणि तिथेच बहुतेकजण मागे फिरतात. अशावेळी, अशीच एखादी समृद्ध कविता, स्वरबद्ध होऊन आपल्यासमोर आली तर लगेच त्या कवितेबद्दल मनात आवड निर्माण होण्याची शक्यता असते. इथे आणखी एक मुद्दा मांडता येईल. जे सजग वाचक असतात, त्यांच्या दृष्टीने, संगीतकाराने लावलेला अन्वयार्थ नव्याने आकळून घेण्याची नवीन संधी असू शकते, असते देखील. अखेरीस, संगीतकार हा देखील एक सजग वाचक असतोच. 
कवी अनिल हे मराठीतील एक प्रतिथयश नाव. मराठीत मुक्त छंद रूढ करण्यामागे कवी अनिल यांचे फार मोठे योगदान आहे. एकूणच कवितेबाबत काही लिहायचे झाल्यास, कविता वाचताना, मनावर नेहमी परिणाम होतो तो अत्यंत अनुरूप अशा शब्दांचा, शब्दांच्या योजनेचा, अभिव्यक्तीत घडणीचा, बांधणीचा, कविता नेहमी शब्दांच्याच आधाराने वाढते, किंबहुना तेच कवितेचे अस्तित्व असते. चांगल्या अभिव्यक्तीचा एक गुण नेहमी सांगितला जातो - तिचं स्वतंत्र अस्तित्व भासू नये, त्याने आशयांत पूर्ण विलीन व्हावे. ही कविता वाचताना, याचा प्रत्येक ओळीत आपल्याला असा अनुभव येतो. चांगल्या भावकवितेतील भावनाशयासंबंधी काहीं लिहिणे मुळातच फार कठीण असते कारण तिच्यातून जाणवणारा एखाद्या भाववृत्तीचा अनुभव हा संमिश्र असूनही संश्लेषणात्मक, तरल आणि विशिष्ट स्वरूपाचा असतो. आणि त्यामुळे गद्यात तो अनुभव नेमक्या शब्दांत मांडणे फारच अवघड होऊन बसते. 
कविता म्हणून पहिल्याच ओळीतील "केळीचे बाग" हे प्रतीक घेऊन आणि त्यालाच केंद्रस्थानी ठेऊन, एका अंतस्थ आणि विमनस्क मनोवस्थेचे चित्रण आढळते. भावकवितेबाबत तर ही बाब फारच महत्वाची ठरते. अशा कवितेला स्वरबद्ध करायला घेण्याची उर्मी मनात येणे, इथेच संगीतकार यशवंत देवांनी आपल्या निवडकौशल्याचा मासलेवाईक नमुना पेश केला आहे. यशवंत देव हे जरी हाडाचे संगीतकार असले तरी त्यांनी अनेक कविता लिहिल्या आहेत आणि त्यामुळे कविता निवडीबाबत त्यांची स्वतः:ची अशी खास नजर तयार झाली आहे. यशवंत देवांची कुठलीही रचना ऐकायला घेतली काही बाबी ठळकपणे दिसून येतात. शब्दरचनेतील प्रासादिकता, गेयता तसेच कवितेतील आशय (इथे फक्त देवांचाच विचार!!) ध्यानात घेऊन निर्मिलेली स्वररचना. स्वररचना करताना शब्दांना शक्यतो कुठंही ओरबाडायचे नसून, त्यातील ऋजू भाव नेमकेपणाने स्वरांतून मांडायचे, हा प्रधान विचार दिसतो.  

केळीचे सुकले बाग असुनिया पाणी 
कोमेजली कवळी पानं असुनी निगराणी 

गाण्याची सुरवात ही लगेच होते म्हणजे मुखड्याआधीचे पार्श्वसंगीत वाजते, असा प्रकार नसून सरळ गायिकेचाच सूर आपल्या कानावर पडतो. गायिका म्हणून हे एका अर्थाने अवघडच असते पण तरीही गाण्याच्या पहिल्या क्षणापासून रसिकांना कवितेची ठाम ओळख पटवून द्यायची, हा देखील विचार समजून घेता येतो. मुखडा बांधताना, संगीतकाराने "केळीचे सुकले बाग" हेच शब्द वारंवार घेतले आहेत - अर्थ एकच, केळीच्या बागांचे जे प्रतीक कवीने मध्यवर्ती ठेवले आहे , त्याचीच सुरांतून रास्त जाणीव करून देणे होय. पार्श्वभागी वाजत असलेल्या सतारीच्या सुरांतून ही जाणीव अधिक गडद करून दिली आहे. नीट ऐकल्यावर कळू  शकेल,हेच शब्द परत घेताना, त्याला वेगवेगळ्या हरकतींची जोड दिली आहे. "शब्दप्रधान गायकी" ही अशी असते. "असुनी निगराणी" हे शब्द सुद्धा दोन वेळा घेतले आहेत. कवितेचा आशय ध्यानात घेतला तर या पुनरावृत्तीचा नेमका अर्थ लक्षात घेता येतो. 

अशी कुठे लागली आग जळती जसे वारे 
कुठे तरी पेटला वणवा, भडके बन सारे 

पहिला अंतरा सुरु होण्याआधी सतार आणि बासरी (अर्थात साथीला तबला आहेच) या दोनच वाद्यांनी निर्मिलेला स्वरावकाश ऐकण्यासारखा हे, ज्यातून एकतर पुढील चालीचे सूचन तर मिळतेच पण शब्दातील भावाशयाचे दर्शन घडू शकते. पहिल्या अंतऱ्याच्या ओळीतून, ध्रुवपदाच्या ओळींतील भावना अधिक तीव्र, विखारी होते तेंव्हा अशा शब्दांना त्याच प्रत्ययी सुरांची जोड देताना, तशाच भाववृत्तीची सांगड घातली गेली आहे. यशवंत देव कवितेकडे कशा नजरेने बघतात, याचा हा एक नमुना!! 

किती दूरची लागे झळ आंतल्या जीवा 
गाभ्यातील जीवनरस, सुकत ओलावा 

हा दुसरा अंतरा मात्र अगदी वेगळ्या "उठावणीने" घेतलेला आहे. त्यातही "दूरची" गाताना किंचित लांबवलेला सूर, माझ्या वरील विवेचनाला सिद्ध करतो. पुढील शब्द "झळ" याची हताशता अचूक सुरांतून मांडली आहे. ऐकण्यासारखे आहे - आधीचे शब्द "किती दूरची लागे" + "झळ"!! एकाच भावनेचे प्रकटीकरण परंतु सुरांतून दाखवताना, तीच भावना अधिक तीव्र कशी  होईल,याकडे वेधलेले आपले लक्ष. या अंतऱ्यातील दुसरी ओळ घेताना, "सुकत ओलावा" मधील "शुष्कपणा" तितकाच सुंदर!! 

किती जरी घातले पाणी, सावली केली 
केळीचे सुकले प्राण बघुनी भवताली 

गायिका म्हणून उषा मंगेशकरांनी वेगळी ओळख देण्याचे काहीच कारण नाही. गायिका म्हणून मूल्यमापन करायचे झाल्यास, गळ्याचा पल्ला फार मोठा नाही तसेच दीर्घ, अवघड हरकती घेताना काहीसे चाचपडलेपण जाणवते तरीही शब्दांची अचूक जाण, चालीतील मध्यवर्ती असलेला गोडवा टिपण्याची शक्ती, आणि शक्यतो मध्य सप्तकात अतिशय सुरेलपणे गायन करणे!! ही चाल तर उघडपणे "गायकी" अंगाने वावरणारी आहे तरीही चालीचे "वजन" अचूकपणे गळ्यावर पेलल्याचे समजून घेता येते. अर्थात घरातील दोन बहिणींच्या सावलीतच त्यांनी वावरणे पसंत केले. त्यापेक्षा अधिक काही करता येणे या गायिकेला अशक्यच होते.