Wednesday 18 June 2014

परंपरा आणि नवता!!




सर्वसाधारणपणे आपल्याला कै.विं.दा. करंदीकर हे असामान्य कवी म्हणून ज्ञात आहेत आणि ते तसे चुकीचे नाही. तरीही, गद्य लेखन देखील अतिशय समृद्ध आणि वैचारिक आहे, यात शंकाच नाही. “स्पर्शाची पालवी”,” आकाशाचा अर्थ” सारखे ललित निबंध, “राजा लियर”,”ऑरीस्टोटलचे काव्यशास्त्र” सारखे अनुवाद इत्यादी पुस्तके त्यांच्या व्यासंगाची व्यवस्थित साक्ष देणारी आहेत. याच रांगेत सहजपणे बसणारे पुस्तक म्हणजे, “परंपरा आणि नवता” हा समीक्षा ग्रंथ. या ग्रंथात लेखकाने, विषयाचा नेमका गाभा लक्षात घेऊन, अतिशय तर्कशुद्ध पद्धतीने विचार केल्याचे लगेच जाणवते. अर्थात, पुस्तकाच्या नावाप्रमाणेच, पुस्तकाची सुरवात केलेली आहे. यात काही भाषणे आहेत तर काहीठिकाणी तत्वचर्चा आहे. मुळात प्रत्येक विषयाचे निकष ध्यानात घेऊन, कुठेही कसलाच फापटपसारा न मांडता लेखन केल्याचे जाणवते. त्यामुळे, वाचन करताना, वाचक सहज त्या विषयात पूर्णपणे गुंतत जातो आणि त्या विषयाची आवड निर्माण होते.
पहिलाच लेख “परंपरा आणि नवता” हा आहे. नावातच विषयाची कल्पना येते. आपल्याकडे एक गंमत वारंवार पाहायला मिळते. लिखाण करणारा प्रत्येकजण, मी काही तरी नवीन, अद्भुत आणि क्रांतिकारी लिहिले आहे, अशा राणा भीमदेवी थाटात पुकारा करीत असतो आणि जुन्या चाली-रीती या जीर्ण-शीर्ण झाल्या आहेत, तेंव्हा फेकून द्याव्या, असा आव आणला जातो. खरतर, आपली परंपरा काय आहे, याची नेमकी माहिती लक्षात न घेता, नवीन काहीतरी घडवत आहोत, असा गदारोळ उडवला जातो. याच दृष्टीकोनातून, लेखकाने आपल्या साहित्यिक परंपरा काय आहेत आणि त्यात नवता आणायची म्हणजे नेमके काय करायचे, याबाबत सविस्तर विचारधारा मंडळी आहे. मुळात, परंपरा म्हणजे काय, याचे विवेचन करताना, इतिहास, संप्रदाय, आणि प्रघात या गोष्टींपासून परंपरा कशी वेगळी असते, हे अतिशय सुरेख पद्धतीने लिहिलेले आहे. याच दृष्टीने पाहिल्यावर नवता म्हणजे काय आणि ती नेमकी कशी ठरवावी, याचेही आपल्याला ज्ञान होते. वास्तविक हा विषय अति गहन आहे पण जर का विचारात सुसूत्रता असेल तर, कुठलाही विषय अर्थपूर्ण रीतीने मांडता येतो, हेच या लेखाबद्दल म्हणता येईल आणि दुसरा भाग म्हणजे, या विषयाला काळाचे कसलेच बंधन नाही. आजची नवता ही उद्याची परंपरा होते, हेच एक प्रमुख सूत्र याबाबत लिहिता येईल.
मराठी भाषेवर मर्ढेकरांच्या समीक्षेचा फार मोठा प्रभाव पडलेला आहे, याचे मुख्य कारण मराठीत, “सौंदर्यशास्त्र आणि त्याची मुलतत्वे” या विषयावर पूर्वी कुणीच काहीही लिहिलेले नव्हते. त्यामुळे, अजूनही त्यांची समीक्षा हा सगळ्या समीक्षकांचा आधार आहे. त्यात मतभेद जरूर आहेत आणि ते असणे संय्युक्तिक आहे पण, त्यांना अग्रमान देणे देखील आवश्यक ठरते.मुळात ललित साहित्याची निर्मिती, स्वरूप आणि मूल्यमापन याबाबत काही ठाम स्वरूपाचे निकष आणि विचार, मराठीत मर्ढेकरांनी मांडले, हे तर कुणीही मान्यच करील. मर्ढेकरांनी निर्मितीच्या स्वरूपाविषयी लिहिताना, “सौंदर्यनिष्ठ रहस्य” हा  शब्द वापरलेला आहे आणि तो वापरण्यामागील त्यांचे प्रयोजन आणि त्यातील कमतरता याचे यथोचित दर्शन, करंदीकर, मर्ढेकर ही व्यक्ती पूर्णपणे बाजूला सारून करून देतात. याच दृष्टीने “मार्क्सवाद”,”वर्गकलह” आणि साम्यवाद: या तत्वांचे परिशीलन होते, ते खरोखरच वाचण्यासारखे आहे. साहित्यांतर्गत भावानुभावाचे व्यापक आणि सखोल चित्रण साधणे, हे लेखकाच्या व्यासंगाप्रमाणे त्याच्या प्रत्यक्ष जीवनानुभवावरही अवलंबून असते, ह्या विचारसरणीची नेमकी वैचारिक फोड करून दिली आहे. त्याच्याच जोडीने येणारी नैतिकता आणि आचारतत्व यांचे साहित्यावर कसे परिणाम होतात, हे अभ्यासण्यासारखे आहे. अर्थात हा लेख प्रदीर्घ आहे आणि तो तसाच असायला हवा, अन्यथा विषयाच्या सगळ्या अंगाचा परिचय होणे अवघडच होईल. विषय अत्यंत जटिल आहे, हे तर खरेच पण  म्हणून नजरेआड करणे योग्य नव्हे.
आपण साधारणपणे ललित साहित्य आवडीने वाचतो, पण या साहित्याची सांस्कृतिक फलश्रुती काय असते, याबाबत फारशी जाण ठेवत नाही. त्यासाठी मुळात, ललित साहित्य म्हणजे काय, त्याचे कसले निकष असायला हवेत, आणि आपण जी संस्कृती असे जे म्हणतो, त्याच्यावर साहित्याचा कसा आणि किती व्यापक परिणाम होतो, हेच ह्या लेखात वाचायला मिळते. प्रत्येक कालखंडात बरे, वाईट साहित्य नेहमीच जन्माला येत असते आणि त्या साहित्याचा बरा-वाईट असा परिणाम समाजावर नेहमीच घडत असतो. समाजाची संस्कृती ही अशाच काही घटकांवर बेतलेली असते. या विषयात अनेक मतभेद अस्तित्वात आहेत.म्हणजे, शास्त्रीय साहित्य आणि त्यातून उद्भवणारा विकासशिळ विचार, धार्मिक, नैतिक आणि राजकीय हेतूने लिहिलेले साहित्य, ललित साहित्याचे सृजन, आणि सर्वात महत्वाची अडचण म्हणजे ललित साहित्याचे स्वरूप व फलश्रुती याचे नेमका अर्थ ठरविताना होणारे गैरसमज!! त्यासाठीच प्रथम स्वरूप आणि फलश्रुती या पदांचा नेमका अर्थ शोधण्याकडे लेखकाचा कल आहे, हे जाणवते. त्यामागोमाग येणारे, “हेतुगार्भ ललित साहित्य”, “जीवन्दर्शी ललित साहित्य”, “विशुद्ध ललित साहित्य” असे पोटविभाग करंदीकरांनी मानून, त्यानुसार ललित साहित्याच्या निर्मितीचा विशेष मांडला आहे आणि त्यानुरुपच पुढे लिहिताना, ललित साहित्यात्चे तोकडेपण दर्शवून दिले आहे. या वरती निर्देश केलेल्या घटकांमुळे, ललित साहित्यात जीवनदर्शन नार्याडीत स्वरूपातच येते, हीच ती ललित साहित्याची तोकडेपणाची नेमकी विचक्षण जाणीव दाखवून दिली आहे.
करंदीकर हे मुलत: कवी असल्याने, “काव्य आणि सामाजिक जाणीव” हा लेख येणे क्रमप्राप्तच आहे. मध्यंतरी आपल्याकडे आणि अजूनही त्यात फारसा बदल नाही, असा एक प्रघात पडला होता की, काव्यात जर का सामाजिक जाणीव नसेल तर ते काव्य हिणकस ठरते. याच विचाराचा, इथे करंदीकरांनी प्रतिवाद केला आहे. त्यांच्या मते, “व्यक्ती आणि समाज यांतील संबंधाची काव्यामध्ये व्यक्त होणारी प्रकट किंवा सुप्त जाणीवच अभिप्रेत असते” याचाच वेगळा अर्थ असा की, काव्य आणि सामाजिक जाणीव असे वेगळे फारसे करता येत नाही. आपल्या मुलभूत जाणीवेतच सामाजिक भानाचे प्रत्यंतर येत असते. अर्थात, प्रत्येक कविता ही केवळ सामाजिक तत्वांवर तपासणे अयोग्य आहे. यासाठी, त्यांनी ज्ञानेश्वरांचे पसायदान, रामदासांनी घडवलेले समाजमन पासून केशवसुत ते मर्ढेकर इतका दीर्घ पल्ल्याचा प्रवास थोडक्यात घेतलेला आहे. सामाजिक जाणीव असणे हा एकमेव निकष असणे जसे चुकीचे आहे तसेच केवळ तशी जाणीव काव्यात दिसत असेल तर नाकारणे देखील चुकीचे आहे, हे आग्रहाने प्रतिपादन केले आहे. याच संदर्भात पुढे लिहिताना, काव्यातील प्रतिमा,त्याची प्रतवारी, वास्तवाशी सहकंप होण्याची शक्ती, इत्यादी घटकांचा सविस्तर विचार वाचायला मिळतो. याच संदर्भात त्यांनी, मुक्तिबोध आणि मर्ढेकर यांच्या काव्यातील प्रतिमासृष्टी, त्याचा घाट आणि कलात्मक सामर्थ्य या बाबींचा सुरेख उहापोह केलेला आढळतो.
 सामाजिक जाणीवेतून पुढे अवतरलेली काव्यातील दुर्बोधता, हा विषय असाच सुंदरपणे मांडलेला आहे. मुळात, दुर्बोधता ही नेहमीच वाचक आणि अपेक्षा यातील विसंवादातून निर्माण होते. “कोणतीही पूर्वकल्पना मनाशी न धरता सृजन कारणे आणि मनाशी काहीही न धरता त्याच सृजनाला सामोरे जाणे, ही कवी आणि वाचक यातील आदर्श अवस्था म्हणता येईल” असे सूत्र मांडून, निरपेक्षवृत्तीने कवितेचे ग्रहण करणे आवश्यक असते. मराठी काव्यक्षेत्रात दुर्बोधतेचा प्रश्न जरी अर्वाचीन असला तरीही काव्यात दुर्बोधता ही प्राचीन आहे, हे दाखवून, त्या संदर्भात केशवसुत, मर्ढेकर आणि अरुण कोलटकर यांच्या कवितेमधून दाखवून दिले आहे. कवितेतील प्रतिमांचे भावनासापेक्ष किंवा विचारसापेक्ष असे विश्लेषण शक्य नसल्याने सगळे शब्द कळून देखील अर्थाने कविता दुर्बोध होते, हाच त्यामागील नेमका विचार आहे. खरतर वाचक आणि कविता यात दुर्बोधता असणे, हे योग्य नव्हे आणि ते खरेतर समीक्षकांनी करायला हवे.
“माझ्या काव्याची भूमिका” आणि “माझ्या कवितेची वाटचाल” या दोन्ही लेखात, करंदीकरांनी, स्वत:च्याच कवितेविषयी विवरण केलेले आहे. करंदीकरांची कविता ही प्रत्येक दशकात वेगवेगळी वळणे घेत गेली. त्यांचे विषय, त्यातील प्रतिमा, कवितेच्या रचनेचा घाट आणि नंतर सरळ सरळ मुक्तछंदाचा केलेला वापर, ह्या सगळ्या गोष्टींकडे ते किती सजगदृष्टीने बघतात, याची जाणीव आपल्याला नेमकेपणाने होते.
त्यापुढे, मंगेश पाडगावकरांनी त्यांची घेतलेली मुलाखत आहे आणि ती प्रामुख्याने, काव्यातील प्रतिमासृष्टी या विषयावर आहे. मुळात, प्रतिमा आणि त्यांचे कवितेतील संयोजन, हा विषय नेमकेपणाने जाणून घेणे नेहमीच व्यामिश्र होत असते. कवीला अभिप्रेत असलेला भाव, ज्यासाठी प्रतिमा प्रामुख्याने वापरल्या जातात, आणि वाचकाला आकळलेला भाव यात नेहमीच अंतर पडते. ही मुलाखत वाचणे, हे आपल्या वैचारिकतेला अप्रतिम खाद्य आहे.
हेमिंग्वे – एक लेखक, हा लेख करंदीकर साहित्याकडे कशा नजरेतून बघतात, याचा वस्तुपाठ आहे. इंग्रजीतील एक असामान्य लेखक म्हणून हेमिंग्वे ओळखला आजतो आणि ती ओळख अत्यंत रास्त आहे. खरतर त्याच्या प्रत्येक साहित्यकृतीवर दीर्घ निबंध भाव, या योग्यतेचा हा लेखक आहे. असे असले तरी, करंदीकरांनी, अगदी थोडक्यात, त्याच्या अति महत्वाच्या पुस्तकांची ओळख आणि त्यातील नेमके मोठेपण कशात आहे, याची नेमकी जाणीव दाखवून दिली आहे. करंदीकरांचे वैशिष्ट्य असे की, इथे त्यांनी हेमिंग्वे – एक लेखक म्हणूनच समीक्षा केलेली आहे. त्याच्या व्यक्तिगत आयुष्यात ते अजिबात डोकावलेले नाहीत. मला स्वत:ला ही पद्धत मनापासून आवडते. कुठलाही कलाकार हा त्याच्या कलेतून बघावा आणि त्याचे विश्लेषण करावे. त्याचे आयुष्य, ही त्याची खासगी बाब आहे आणि त्याचा, त्याने निर्मिलेल्या कलेशी कसलाच संबंध जोडू नये.
मराठी कविता, संत काव्याच्या प्रभावातून केशवसुतांनी प्रथम बाहेर काढली. त्यांनी, प्रतिमांचे वेगळेच जग निर्माण केले. त्यादृष्टीने, त्यांचे कर्तृत्व हे असाधारण असेच म्हणायला हवे. या दृष्टीने, करंदीकरांनी, पुढील लेखात केशवसुत आणि त्यांची कविता, याचा अतिशय दीर्घ आणि साक्षेपी अभ्यास केलेला आहे. तसेच पुढील लेखात, त्यांनी मर्ढेकरांची कविता घेतलेली आहे. खरेतर, मराठी कवितेतील हे दोन कवी म्हणजे दोन टप्पे आहेत, ह्यांनी, मराठी कवितेला वेगळे वळण दिले. हे दोन्ही लेख दीर्घ आहेत पण ते तशा लांबीचे असणे आवश्यकच आहे. त्याशिवाय त्यांच्या कवितेंचा अभ्यास अशक्य आहे. अर्थात, कितीही झाले तरी, जसे कुणीही कलाकार नेहमीच अत्यात्तम दर्जाची कलाकृती सतत सादर करू शकत नाही आणि या न्यायाने, त्यांच्यात काही अप्रतिम तर काही फसलेले, असा प्रकार नेहमीच आढळतो. करंदीकरांचे मोठेपण यातच आहे की, त्यांनी आपली विवेकदृष्टी कायम ठेऊन, यांच्या कवितेंचे रसग्रहण केलेले आहे. “सतारीचे बोल” ही केशवसुतांची कविता,कविता म्हणून कशी असामान्य आहे हे तर दाखवून दिलेच आहे पण मर्ढेकरांचे प्रतिमा संयोजन कसे वेगळे होते, हे त्यांच्याच कवितेतील ओळी दाखवून, आपला मुद्दा ठामपणे पटवून दिला आहे.
एखादा विषय अभ्यासाला घेतला की त्याचा किती वेगवेगळ्या अंगाने अभ्यास करता येतो, तसेच एकाच विचाराच्या अनुषंगाने इतर किती विचार त्यात अनुस्यूत असतात, याचे नेमके दर्शन आपल्याला या पुस्तकात जागोजागी वाचायला मिळते आणि वाचताना आपल्याला देखील, आपल्या नेहमीच्याच साहित्यिक जाणीवा अधिक विस्तारल्या आहेत, हेच सारखे जाणवत असते आणि हेच या पुस्तकाचे खरे यश म्हणावे लागेल.

No comments:

Post a Comment