Wednesday 18 June 2014

संगीताचे (विलक्षण) सौंदर्य + शास्त्र – भाग ४




ग्रंथाच्या सुरवातीला लेखकाने जे ३ घटक मांडले होते, त्यातील दुसऱ्या घटकाची ओळख “लय” या प्रकरणात केली आहे. वास्तविक “लय” आणि “लयतत्व” हे, संगीताप्रमाणे इतर कलांमध्ये देखील अंतर्भूत असते, जसे, साहित्य, चित्र, शिल्प इत्यादी.असे झाले तरी,साहित्य वगळता, इतर कलांत त्याचे अस्तित्व संदिग्ध असते.या संदर्भात असे म्हणता येईल कि, इतर सर्व कलांत अवतरणाच्या तत्वाचे स्वरूप त्या, त्या कलेच्या वैशिष्ट्यानुसार बदलते आणि त्यानुसारच त्या कलेतील “लय” याचे महत्व अधोरेखित होते.प्रत्येक कलेच्या ग्रहणात किंवा आस्वादात अनेक पातळ्या असू शकतात आणि त्यानुसार संकल्पना किंवा विशिष्ट तत्व याचे स्वरूप बदलते राहते. त्यामुळे, आपली विचारक्रिया अथवा व्यापार कोणत्या पातळीवरून चाललेला आहे, याचे भान न ठेवता,संकल्पनांचा उपयोग केल्यास, सगळाच गोंधळ उडू शकतो.
कोणतीही संकल्पना जरी अनेक कलांत राबवली असली तरी त्या संकल्पनेचा उद्भव त्या कलेच्या विशिष्ट स्वरूपामुळे शक्य असतो.वेगळ्या शब्दात मांडायचे झाल्यास, जरी “लय” हि अनेक कलेत वावरत असली तरी विशिष्ट कलेशी तिचे अधिक जवळचे नाते असते. त्यामुळे, इतर कलांच्या संदर्भात लयीचा विचार होणे म्हणजे त्या संकल्पनेची “निर्यात” होणे असा लावता येईल. जसजशा विविध कला अधिकाधिक समृध्द होत जातात, त्या प्रमाणात,त्या आपापल्या स्वरूपाच्या निश्चितीसाठी स्वेतर कलांवर अवलंबून असतात.या दृष्टीने, लयतत्व हे संगीत आणि नृत्य, या कलांना अधिक जवळचे आहे. आपल्या अंगभूत वैशिष्ट्यातून, स्वरुपगत लक्षणातून लय-तत्वाशी या कला रक्ताचे नाते जोडीत असतात.मुर्तामुर्त पातळ्यांवर संगीत-नृत्यात लयतत्व जसे मुक्तपणे आणि मुल स्वरुपात वावरत असते, तसे इतर कलांतून वावरत नाही. गतीगुण हा मूलधर्म असलेल्या लयतत्वाचे संगीत-नृत्येतर कलांशी नाते आहे.
दुसरे असे, कालास्वदाच्या सगळ्या पातळ्या लक्षात घेऊन,त्यापैकी कुठल्याही पातळीवर विशिष्ट संकल्पना वावरते, याचे अवधान राखणे जरुरीचे होते.पातळीबदलानुसार संकल्पनेच्या स्वरुपात बदल होतो.त्याशिवाय, एखादी संकल्पना दुसऱ्या कलेत निर्यात झाली की  तिची पातळी आणि नवीन उपयोजन यातील फरकामुळे बदल घडतो. इथे लेखकाने थोडा तपशीलवार विचार केला आहे. परीक्षण, कलाटीका आणि सौंदर्यशास्त्रीय आकलन, या तीन पातळ्या ध्यानात घेतल्या आहेत. परीक्षण म्हणजे आविष्कार किंवा कलाकृती यांचे त्यांच्याच संदर्भात मूल्यमापन.
कलाटीकेच्या म्हणजे दुसऱ्या पातळीवर कलाविष्काराच्या मूल्यमापनासाठी उपयोगात आणलेला संदर्भ, त्या समग्र कलेचा असतो.म्हणजे, एखादा राग गाताना, समज गायक, आवाजात, पाश्चात्य संगीताप्रमाणे “कंप” द्यायला लागला तर एकंदर भारतीय संगीतात त्या “कंपा”ला स्थान आहे का,याचा विचार अनिवार्य ठरेल. कलाटीकेत आपण, कलाविष्कार केवळ यशस्वी-अयशस्वी आहे का नाही, याच्या पलीकडे जात असतो. यात कलास्वाद येत असला तरी, त्यची व्याप्ती, आवाका यात फरक पडतो.
यापुढे तिसरा घटक, कलास्वादाची सौंदर्यशास्त्रीय पातळी. या पातळीवर कलास्वादास सर्व कलांच्या विचारात आढळणाऱ्या तत्वांचा, संकल्पनांचा संदर्भ प्राप्त होतो. लय-संकल्पना हि या प्रकारची संकल्पना आहे. सर्व कलाविचारात तिचा आढळ होतो, इतकेच नव्हे तर, केवळ सौंदर्यशास्त्रीय पातळीवरच संचार मर्यादित न राहता, परीक्षण इत्यादी पातळीवर तो होत असतो.
इथे चौथी पातळी देखील लेखकाने कल्पिली आहे. ती म्हणजे “अति सौंदर्यशास्त्रीय” पातळी. या पातळीचा कलास्वादाशी काहीसा दुरचा संबंध राहील. आता, विचार असा, या सगळ्या संकल्पनांचा एकमेकांशी काय संबंध आहे आणि समग्र व्यवहाराच्या संदर्भात त्यांचे स्थान कोणते?
प्रत्येक पातळीवर स्वत:च्या अशा काही संकल्पना असतात, म्हणूनच संकल्पनांची निर्यात होत असताना आणि त्यांचे उपयोजन करण्यापूर्वी, त्यांना “संस्कारित” न करता राबविणे, चुकीचे ठरते. उदाहरणार्थ राग ही संकल्पना घेऊया. भारतीय संगीतकलेच्या विशिष्ट भेदातील विशिष्ट संगीतातही हि संकल्पना अधिकाधिक संय्युक्तिक ठरत असल्याने, अनेकदा ती परीक्षणाच्या पातळीवरच वावरते. कलाटीकेच्या पातळीवर तसेच्या तसे नेणे चुकीचे ठरेल.कारण मग, पाश्चात्य संगीतात राग-संकल्पना आहे, हे दाखवावे लागेल. याच संदर्भात सुगम संगीतात, रागाची कल्पना लावताना, ती किती प्रमाणात लवचिक आणि व्यापक करावी लागेल, याची कल्पना करावी लागते. या उलट, स्वर-संहतीची (मेलडीची) संकल्पना सगळ्या भारतीय संगीतात संय्युक्तिक ठरते. हीच संकल्पना स्वर-संवादाच्या (हार्मनीच्या) तत्वाशी कुठले नाते राखते, हा प्रश्नदेखील विचारात घेत येईल. संवादतत्व इतर कलांनाही कसे लागू पडते, हे देखील विचारात घ्यावे लागेल. तसा घेऊ लागलो की स्वरसंवादाच्या संकल्पनेचे स्वरूप आपण बदलतो. तिला अधिक व्यापक आणि अमूर्त करतो. संवाद आणि रचना, याचा एकत्रित संबंध काय, याचे उत्तर आपल्या चौथ्या अति-सौंदर्यशास्त्रीय पातळीवर मिळते.
लयसंकल्पनेकडे दोन दृष्टीने बघणे जरुरीचे आहे. लयसंकल्पना ही एक सौंदर्यशास्त्रीय म्हणजेच सगळ्या कलांना लागू होणारी संकल्पना आहे. तेंव्हा सौंदर्यशास्त्रीय विचार हा पहिला भाग. नंतर, हि संकल्पना संगीताच्या संदर्भात कलाटीकेच्या पातळीवर पहायची आहे. हा लयविचाराचा दुसरा भाग. एक सौंदर्यशास्त्रीय तत्व म्हणून लयतत्वाच्या अनेक व्याख्या आहेत. त्यापैकी दोनच व्याख्यांचा लेखकाने उहापोह केलेला आहे. १] उत्कंठा-विसर्जन म्हणजे लय. २] लय म्हणजे स्थितीबदल. पहिल्या व्याख्येनुसार, “नवीन उत्कंठनांची उभारणी आणि पूर्वीच्या उत्कंठनाचे विसर्जन म्हणजे लय” अर्थात, एक विचारवंत म्हणून, लेखकाने त्यावर २ आक्षेप घेतलेले आहेत.
पहिला आक्षेप, स्थिती-बदल म्हणजे काय किंवा उत्कंठन-विसर्जन म्हणजे काय? दोन्ही घटना म्हणजे कोणत्याही हालचालीत अनुस्यूत असणाऱ्या, अंगभूत असणाऱ्या गतिमानतेचे केवळ परिणाम!! गतिमानतेच्या अस्तित्वाबरोबर या घटनाही अनिवार्यपणे अस्तित्वात येतात.”आरंभ, हेतुपुर्वकता व पूर्ती” यांचा जिथे आढळ होतो व ज्यात आधीच्या अवस्थेने पुढील हालचालीची अपेक्षा होते, अशा शरीर हालचाली म्हणजे लयाविष्कार, असे मांडले जाते.परंतु, हि केवळ हालचाल झाली, कला नव्हे!! सगळ्या कलांना उत्कंठा विसर्जन हे तत्व लावले जाते, मग ते हालचालीला कितपत योग्य आहे?  म्हणजे, उत्कंठन-विसर्जन हे सौंदर्यशास्त्रीय तत्व म्हणून स्वीकारता येत नाही.
याच संदर्भात स्थिती-बदलाची संकल्पनादेखील स्वीकारता येणे अवघड ठरते. कारण गतिमानतेच्या संकल्पनेत बदल अनुस्यूत आहे आणि बदल घडविण्यास काहीतरी आधार लागतो तेंव्हा, इथेही, हालचाल आणि घडामोड यांतला भेद स्पष्ट होत नाही. पर्यायाने लयतत्वाचा हा अर्थ मान्य केल्यास, लयतत्व हे सौंदर्यशास्त्रीय तत्व म्हणून उभे राहू शकत नाही.
दुसरा आक्षेप, दोन्ही व्याख्येंवर असा घेता येतो की. चांगल्या दर्जाच्या आणि साधारण दर्जाच्या कलाविष्कारात भेद करता येत नाही. कुठलीही कलाकृती, ती कलाकृती आहे की नाही तसेच समोर असलेल्या कलाकृतीची प्रतवारी लावणे हे दोन्ही साध्य होणे अत्यावश्यक आहे. इथे हे दोन्ही सिद्धांत अपुरे पडतात.

No comments:

Post a Comment