Showing posts with label Chikitsak Group. Show all posts
Showing posts with label Chikitsak Group. Show all posts

Saturday, 5 June 2021

संध्या गोहित

*स्थळ* : - २०१५ सालची चिकित्सक गृपची पहिलीच लोणावळा त्यासाठी जमलेले सगळेजण एका बस मध्ये!! बसमध्ये माझ्या बाजूला (अत्यंत खवट असा) सुनील ओक बसला होता. बस नाना शंकरशेठ चौकातून दादरला निघाली. तिथे काही मित्र/मैत्रिणी चढणार होते. जवळपास ४० वर्षांनी एकत्र भेटणार याचे औत्सुक्य तर होतेच परंतु नेमके कोण कसे दिसत असतॉ? भेटल्यावर नक्की काय गप्पा मारायच्या? इत्यादी प्रश्न माझ्या डोळ्यात फिरत होते. इतक्या वर्षांनी विचारांची *नाळ* जुळेल का? हा देखील महत्वाचा प्रश्न होताच. अखेर दादर आले आणि The Great सतीश हर्डीकर, गीता संझगिरी यांच्यासह एक बॉब कट केली काहीशी सडपातळ, कृष्ण वर्णाकडे झुकणारी मुलगी बसमध्ये शिरली आणि तिने बसमध्ये हाय, हॅलो वगैरे सुरु केले. सुरवात तर दणक्यात केली पण नावाचा पत्ता नव्हता पण लगोलग पत्ता लागला आणि तोपर्यंत ती व्यक्ती ओक्याकडे आली आणि स्वतःहुन ओळख करून दिली. तोपर्यंत फक्त whatsapp वरून थोडाफार संपर्क होता. या ओक्याच्या अंगात काय संचारले कुणास ठाऊक, पण, *आपण काय करता? आपण कुठे राहता?* असले प्रश्न त्याच्या तोंडातून घरंगळले!! जसे त्या व्यक्तीने *आपण* हा शब्द ऐकला तशी ती व्यक्ती एकदम चवताळली. असे चवताळणे योग्यच होते म्हणा कारण शाळेतील एकाच वयाचा सगळा गट एकत्र असताना एकदम *बहुवचनार्थी* बोलणे, त्या व्यक्तीच्या पचनी पडणे निव्वळ अशक्य आणि तिथे लगेच ओक्याची *खरडपट्टी* काढली. ओक्याची खरडपट्टी होत आहे, हे बघून अस्मादिक एकदम खुशीत!! अर्थात या शाब्दिक झकाझकीत स्वभावाची *तोंडओळख* झाली. सतत बडबडने, हास्यविनोद करणे आणि वागण्यात बराचसा बेधडक वृत्ती दिसणे इत्यादी *गुण* जाणवले. बसमधील प्रवास जावपास २ तसंच होता पण या २ तासांत ही व्यक्ती जरा म्हणून स्वस्थ बसली नव्हती. एव्हाना निदान whatsapp वरून, माझी एक प्रतिमा तयार झाली होती आणि त्या प्रतिमेची संध्याकडून वारंवार खिल्ली उडवली जायची (इथे ओक्या खुश!!) अर्थात माझी तशी प्रतिमा करण्यामागे *महाराणी* आणि आताच नवीन नामकरण झालेल्या *दुर्गाभाई* याचा हात मोठा होता आणि आजही आहे. २ तासांनी मळवली आले आणि राहण्याची जागा बघून सगळे एकदम खुश - अर्थात भारती शंकरशेठ म्हटल्यावर या गोष्टी गृहीत धरलेल्या असतातच!! संध्याकाळी *ओळख परेड* झाली आणि तिथे गाणी सिस्टीमवर वाजायला लागली. इथे खऱ्याअर्थाने संध्या *फॉर्मात* आली. ही मैत्रीण इतकी चांगली नाचते, ही माहिती नवीनच होती (असाच धक्का गीताने त्यावेळेस दिला होता) संध्या नाचताना कधी एकटी नाचत नाही तर कुणाला तरी बरोबर घेऊन नाचते. ४० वर्षांनी आम्ही एकत्र भेटत आहोत, याचा लवलेश तिच्या वागण्यात नव्हता. नंतर मग अर्थात आमचे *पेयपान* सुरु झाले आणि संध्याने आपला *ग्लास* भरला आणि *चियर्स* असे ओरडून समारंभाला रंगात आणली. संध्या पार्टीत असली म्हणजे तिथे एकही क्षण *निवांत* नसतो. कधी अनिलचा बकरा बनाव तर कधी दिलीपची टर खेच. अर्थात दिलीप तिच्या शेजारीच रहात असल्याने दिलीपला *गिऱ्हाईक* बनवणे, यात फार विशेष नव्हते. नंतर यथावकाश जेवणे झाली आणि मग *सदाबहार* असा गाण्याच्या भेंड्यांचा खेळ सुरु झाला. संध्या माझ्याच बाजूला बसलेली होती आणि त्यावेळेपर्यंत अनिलला संगीतात बरीच गती आहे असा समज गृपमध्ये यथावकाश व्यवस्थित पसरलेला असल्याने (खरतर अनिलची संगीतातील *गती* आणि अगदी *अगतिक* करणारी नसली तरी *गतानुगतिकतेच्या* परिप्रेक्षात *अगतिक* अशीच आहे पण आपल्या मर्यादा खुबीने दडवण्यात अनिलला अजूनपर्यंत यश मिळाले आहे) त्या रात्री मी, विजय यांनी अगदी ठरवून रात्री फारसे कुणाला झोपू दिले नव्हते आणि याचा खरा आनंद सांध्याला झालेला, दिसत होता. पुढे पिकनिकला झालेल्या ओळखी चिरंतन व्हाव्यात, यासाठी संध्याने सतत पुढाकार घेतला. तिचे शिवाजीपार्क इथे चांदीच्या वस्तूंचे दुकान आहे, हे समजले. पुढे त्या दुकानात मी देखील ३,४ फेऱ्या टाकल्या होत्या. एका मुलीने स्वतःच्या हिमतीवर शिवाजीपार्क सारख्या ठिकाणी अशा प्रकारे दुकान वर्षानुवर्षे चालवावे, ही बाब सहज, सोपी नाही आणि इथे तिच्या मनाचा *पीळ* दिसून आला. मैत्री वेगळी आणि बिझिनेस वेगळा, हे तिचे प्रमुख तत्व. ती नृत्याचे शिक्षण घेते हे समजले आणि वयाची *साठी* गाठत असताना इतका शिकण्याचा उत्साह दाखवणे, हे स्तिमित होण्यासारखेच आहे. पुढे नंतर तिने मला, तिच्या नृत्याच्या कार्यक्रमाचे निमंत्रण दिले. मला नृत्यात खूप काही कळते हा तिचा समज आजमितीस गैरसमजात होऊ नये, याची काळजी अस्मादिकांनी सतत घेतली, हे खरे. वास्तविक या वयात रंगमंचावर नृत्य करणे, शारीरिक श्रमाची प्रचंड मागणी करणारे असते परंतु इथे संध्याचा उत्साह कामी येत होता. कधी कधी तिला आपला *गळा* काढायची अनावर हौस येते आणि इथेच गृपवर ती हौस पुरवून घेते. अर्थात अशा वेळी मात्र मी *मौनम सर्वार्थ साधनम* अशी वृत्ती ठेवतो आणि हे सांध्याच्या लक्षात आले आहे कारण आजमितीस तिने मला, अनिल तुझे मत दे, अशी चुकूनही विचारणा केलेली नाही!! अर्थात एकदा का मैत्री स्वीकारली की ती मैत्री, त्या व्यक्तीच्या गुणदोषांसह स्वीकारणे क्रमप्राप्तच ठरते. संध्याला फिरायची प्रचंड आवड आहे आणि ती जगभर फिरत असते. आतापर्यंत किती देशांना भेटी देऊन झाल्या आहेत, याची गणती केवळ तीच करू शकते. आयुष्य थोडे आहे आणि ते सर्वांगाने उपभोगावे, इतकीच तिची आयुष्याची व्याख्या आहे. माझ्या लेखनाची खिल्ली उडवणे, हा तिचा सर्वात आवडता खेळ आहे आणि माझी कातडी गेंड्याची असल्याने, मी देखील ते *ओळखून* आहे!! असे काहीही असले तरी एक मैत्रीण म्हणून ती अफलातून आहे. आयुष्यात विवंचना सगळ्यांना असतात परंतु त्या वंचनांची कुठेही जाहिरात न करता मिळालेले आयुष्य मनमुरादपणे उपभोगणे, हा संध्याचा खाक्या आहे आणि तोच मला फार विलोभनीय वाटतो.

Tuesday, 7 July 2020

एक उमदं व्यक्तिमत्व

शाळेत मी कधीही "हुशार" म्हणून गणला गेलो नाही कारण अस्मादिकांचे कर्तृत्वच तसे होते. असो, अर्थातच त्यावेळी शाळेत "बुद्धीमंत" मुलांचा वेगळा वर्ग (C Division) असायचा आणि त्या वर्गातील मुले नेहमी मान उंच ठेऊन वागत असत. अर्थात काही अपवाद होते. त्यात अपवादात "हा" थोडासा बुटका, काळसर वर्णाचा आणि "तुडतुड्या" वृत्तीचा होता. माझ्या वाडीत तेंव्हा जयंत राहात होता. जयंत पहिल्यापासून अव्वल हुशार असल्याने, "अभ्यास" सोडून इतर विषयात आमच्या गप्पा व्हायच्या. त्याच वेळी हा बुटका आमच्यात यायला लागला. आमचा वाडीपासून तिसऱ्या वाडीत राहणारा असल्याने ओळख लगेच झाली. शाळेत बराच बडबड्या होता. आता "होता" हे क्रियापद लावले कारण पुढे हे बडबडेपण बरेच कमी झाले. जयंतच्याच तुकडीत असल्याने, जायंटकडे वारंवार भेटायचा. 
आमची खरी ओळख झाली, आम्ही शाळेच्या क्रिकेट संघात एकत्र आलो तेंव्हा. वास्तविक आपली शाळा कधीही खेळाला उत्तेजन देणारी म्हणून प्रसिद्ध नव्हती तरी देखील आंतर शालेय क्रिकेट स्पर्धेत भाग घ्यायला परवानगी द्यायची. क्रिकेट निमित्ताने धोबीतलाव इथल्या आझाद मैदानावर दीड, दोन महिन्याचे नेट लागले होते. जयंत खेळात कधीच पुढे नव्हता त्यामुळे हा बुटका आणि मी एकत्र आझाद मैदानावर जायला लागलो. तो खेळात, माझ्यापेक्षा अधिक "प्रवीण" होता आणि त्याची बॅटिंग, हा खास प्रांत होता. तेंव्हा मी त्याच्या घरी बरेचवेळा जात होतो. राजन तांबे, मी आणि हा बुटका असे एका त्रिकोणात राहात होतो आणि नेहमी भेटत होतो. 
पुढे मी, भाई जीवनजी गल्लीतील "मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालयाच्या" अभ्यास वाटिकेत जायला लागलो आणि हा देखील तिथे यायला लागला. तिथे अभ्यास कमी आणि इतरांच्या टोप्या उडवणे जास्त असेच चालायचे. शाळेतील दिवस असल्याने अंगात हुडपणा भरपूर भरलेला होता. अर्थात हा बुटका बुद्धीने तल्लख असल्याने नेहमी परीक्षेत चांगल्या मार्क्सने पास व्हायचा पण कधीही अव्वल नंबर शर्यतीत नव्हता. तिथे जयंत, विजय असली नामांकित नावे असायची. 
अर्थात पुढे शाळा सुटली आणि आम्ही वेगळे झालो. तो सायन्स तर मी कॉमर्स शाखेकडे वळलो आणि आमचे संबंध विरळ व्हायला लागले. अर्थात भेटीगाठी कमी झाल्या. तास रस्त्यात कधी भेटलो तर थोड्याफार गप्पा व्हायच्या पण त्याला फारसा अर्थ नव्हता. नंतर १९९२ मध्ये मीच परदेशी गेलो आणि माझा भारतातील संबंध संपल्यातच झाला होता आणि ते क्रमप्राप्तच होते. त्यातून मी जवळपास १६ वर्षे परदेशी राहिल्याने तर ओळखी या "स्मरणरंजन" अवस्थेत राहिल्या. पुढे २०११ साली मी पुन्हा भारतात कायमचा आलो आणि थोड्याफार ओळखी पुन्हा व्हायला लागल्या. २०११ साली मी थोडा उशिरा आलो कारण त्याच वर्षीच्या सुरवातीला विरार इथे आपल्या गृपने भव्य स्नेहसंमेलन भरवले होते आणि माझ्या हातून थोडक्यात निसटले. 
या बुटक्याची व्यायसायिक प्रगती कळत होती आणि मनात थोडा आदर वगैरे उत्पन्न झाला होता. परंतु मी नव्याने भारतात स्थिरावयाचा प्रयत्न करीत होतो, त्यामुळे शेजारी रहात असूनही गाठीभेटी या रस्त्यात भेटण्यापुरत्या झाल्या होत्या. संसारात पडले की हे प्राक्तन स्वीकारावेच लागते. तरी याची बायको माझ्या चांगल्या परिचयाची असूनही भेटी होत नव्हत्या हेच खरे. 
पुढे मागील वर्षी पुन्हा असेच स्नेहसंमेलन भरावयाचे ठरले आणि प्रवीण जुवाटकरने याच्या घरी भेटायचे नक्की केले. खूप वर्षांनी निवांत भेटायचे ठरले असल्याने, घरात भरपूर चेष्टामस्करी झाली. कार्यक्रम कसा करायचा याचे रूपरेखा आखली आणि आम्ही सगळे पांगलो आणि पुन्हा भेटलो, ते स्नेहसंमेलनाच्या दिवशी. अर्थात माझी चेष्टा करणे आणि मी ते स्वीकारणे, हा भाग त्या दिवशी अनुस्यूत होताच. बुटका ही संधी थोडीच सोडणार. त्यादिवशी अखेरीस पुन्हा भेटायचे ठरले आणि घराकडे सगळे वळले.  
परवा सकाळी जयंतचा फोन आला तोच मुले याच्या बद्दलच्या अशुभ बातमीने!! बातमी मला नक्की करायला सांगितले पण मी नुकताच बाहेरून आलो असल्याने (कोरोनाचे दिवस तेंव्हा बाहेरून घरात शिरल्यावर आंघोळ करायचीच) मी वाडीतील एकाला बातमीची खातरजमा करायला सांगितली. माझी आंघोळ पूर्ण होते तेव्हड्यात पुन्हा जयंतचा फोन आला "शिरीष गेला!!" आडाचं पाणी असे इतक्या लवकर वळचणीला जायला नको होते पण नियतीने ठरवल्यावर कुणाचीही प्राज्ञा तिथे चालत नाही हेच खरे. मनावर कायमचा एक ओरखडा उमटला!!

Saturday, 29 February 2020

अनंत बोरकर

अनंता शाळेत असल्यापासून सडपातळ असाच आहे. वयानुसार वजन थोडेफार वाढले असेल पण सत्कृतदर्शनी तरी आजही तो इयत्ता सातवी, आठवी मधील वर्गात खपून जाईल. काही व्यक्ती आपल्या आयुष्यात अशा येतात ज्या आपले अस्तित्व फारशा दाखवीत नाहीत, फारसे बोलत नाहीत आणि बोलले तरी हलक्या आवाजात बोलणार. कुठल्या विषयावर मत विचारले तर शक्यतो टाळणार परंतु जरा खोदून विचारले तर मोघम उत्तर देणार. त्यातून तुम्हाला काय अर्थ घ्यायचा हे तुम्ही ठरवायचे. अनंता काही जास्त बोलणार नाही. शरीराचा सडपातळपणा कसा एकाबाजूने काहीच ध्वनित करीत नाही पण तरीही शरीर म्हणून अस्तित्व दर्शवित असतात. शाळेत देखील त्याचे केस सरळ,सपाट होते.आता वयानुसार केसांनी रुपेरी रंग दाखवायला सुरवात केली आहे. शाळेत त्याने कधी संगामस्ती केली असेल का? असा प्रश्न पडावा इतके अस्तित्व होते. कधी आवाजी बोलणे नाही,  हसासणे देखील मुमूरकेशी!! अगदी मोठा विनोद असला तरच हसण्याचा आवाज येणार परंतु एकूणच शांत प्रवृत्ती. आपल्या गृपला अशाच व्यक्तीची "ऍडमिन" म्हणून गरज होती. एकत्र आपल्या गृपतर अनेकरंगी माणसे. कोण कधी तणतणेल याचा खुद्द ब्रह्मदेवाला देखील पत्ता लागणार नाही तरीही अशी मोट बांधून ठेवायला थंड डोक्याचाच माणूस हवा आणि तिथे अनंता एकदम योग्य. 
आपल्या गृपवर तशी शांतता असते पण कुणीतरी मध्येच फणा उभारते आणि तणातणी सुरु होते. प्रसंग तसे कमीच असतात कारण आपल्या गृपवर "व्यक्त" होणे हा कपिलाषष्ठीचा योग्य असतो. आता वयाची साठी झाली तरी वैय्यक्तिक हेवेदावे भरपूर आढळतात की जे मराठी माणसाचे व्यवच्छेदक लक्षण मानता येईल. अनंताला कशीही मत विचारले तर आधी शक्यतो विषय टाळायचा त्याचा प्रयत्न असतो. त्यातून जरा आग्रह झाला तर "नरो वा कुंजरो" वृत्तीने अत्यंत थोडक्यात तसेच नेमका अर्थ ध्वनित होईलच याची खात्री नसलेले उत्तर ऐकायला मिळणार. त्यातून पुन्हा विचारले तर उत्तर नाहीच मिळण्याची शक्यता!! असे असून देखील अनंता सगळ्यांच्यात असतो. गप्पा मारणे वगैरे त्याच्या स्वभावातच नाही. शांतपणे प्रत्येकाला निरखित बसायचे हा त्याचा आवडता छंद. त्याच्या इतक्या वर्षांच्या सडपातळ शरीरयष्टीचे आपल्या गृपवरील महानविभूती श्री. सतीश हर्डीकरांनी चपखल वर्णन केले आहे - "बारक्या". आता हेच त्याचे टोपण नाव म्हणून प्रसिद्ध झाले आहे आणि त्याने देखील समंजसपणे स्वीकारले आहे. अर्थात इथे टोपण नावाचा "अस्वीकार" संभवतच नाही म्हणा. 
या तणातणीवरून आठवण झाली, अधूनमधून वाद होतात (मला तर असे प्रसंग सणासारखे साजरे करावेसे वाटतात!! ते असो....) मग मला अनंताचा फोन येतो, "अरे अनिल बघ काय चालले आहे. काय बोलायचे?" मी देखील असे वादप्रसंग चवीने चघळत असतो. त्यावेळी माझे मत मी देतो. बरेचवेळा ते तथाकथित मत स्वीकारले जाते. खरेतर मतभेद व्यक्त झाले, वाद झाले तर काय बिघडले? अर्थात हे माझे मत पण आपल्या गृपवर हळव्या वृत्तीच्या व्यक्ती भरपूर आहेत आणि याची नेमकी जाण अनंताला आहे. शक्यतो कुणी गृप सोडून जाऊ नये म्हणून सतत प्रयत्नशील राहण्यासाठी जे प्रयत्न करतात त्यातील अनंता हे नाव अग्रभागाने येते. खरंतर इतका मितभाषी असून देखील सगळ्यांना सांभाळून घेतो याचे मला आश्चर्यच वाटते.हल्ली बऱ्याच महिन्यांत गृपची पिकनिक निघाली पण त्याबाबत अधूनमधून आठवण करून देणारा अनंताच. अर्थात पिकनिकची आठवण काढली की गृपवर "हालचाल" थोडीफार सुरु होते पण मराठी माणसाचे एक बाणा आहे - मोडेन पण वाकणार नाही त्याला काय करणार!! प्रत्येकाच्या काहींना काहीतरी अडचणी असतात आणि त्यामुळे मागील पिकनिक होऊन आता वर्ष उलटून गेले तरी काही ठरत नाही. खरतर आता एक मान्य केले पाहिजे, पहिल्या पिकनिकच्या वेळची उत्सुकता आता राहिली नाही. 
मग कधीतरी निदानपक्षी डिनरला भेटायचे ठरते. अर्थात असे प्रसंग सुद्धा विरळाच होत आहेत म्हणा. असे कार्यक्रम ठरवायला मात्र अनंता पुढे असतो. प्रत्यक्ष कार्यक्रमात त्याची बडबड कमीच असते. काहीवेळेस आम्ही काही मित्र एकत्र ड्रिंक्स कार्यक्रमासाठी जमलो असताना, (घसा "ओला" झाला म्हणून असेल!!) अनंता बऱ्यापैकी बोलतो पण स्वभाव मितभाषीच हे खरे. काहीसा हिंदुत्ववादी विचारांचा (इथे मला थोडे हसायला आले!!) असला तरी आपले विचार अति ताणायचे नाहीत जेणेकरून मैत्री नात्यांवर परिणाम होईल, इतपत बोलणे. कधीकधी तर तो इतकी सावधगिरी बाळगतो की मला आश्चर्य(च) वाटते. "अरे मित्रच जमले आहेत ना मग कशाला इतकी सावधगिरी बाळगायची?" पण माझी खात्री आहे, असे मी बोललो तरी अनंता तसाच वागणार. गृपवर कसे व्यक्त व्हावे आणि भाषा कशी वापरावी याचे त्याचे स्वतःचे आडाखे आहेत. त्याचाच परिणाम अनंता कधीही स्वतःची मते मांडत नाही (अपवाद पिकनिक किंवा डिनर कार्यक्रम हा विषय असला तर आणि तेंव्हा देखील "मला जमेल" किंवा "मला जमणार नाही"!! यापलीकडे एकही शब्द अधिक किंवा उणा नाही!! 
एका बाबतीत अनंताला मानले पाहिजे, रोजच्या रोज दर पहाटे गृपवर उर्दू मिश्रित हिंदी शायरी टाकतो. तो इतर अनेक गृपवर आहे (हे त्यानेच सांगितले आहे) आणि तिथून तो ही शायरी आपल्या गृपवर टाकतो, अगदी इमानेइतबारे टाकतो. आपले गृपवरील सगळे इतके नफ्फड आहेत की कधी कुणी त्यातील एखाद्या शायरीवर व्यक्त होत नाहीत!! जणू काही आपला संबंधच नाही असेच वागतात. मला शंका आहे कितीजण वाचत असतील. पण तरीही अनंता जराही नाउमेद होत नाही!! आता चिकाटी वृत्ती म्हणायची की निगरगट्टपणा!! प्रश्नच आहे. हीच चिकाटी मला लोभावते. माझ्यात हा गुण चुकूनही आढळणार नाही आणि म्हणूनच मला या मित्राचा मनापासून हेवा वाटतो. सर्वसाधारणपणे मी प्रत्येकाला त्याच्या स्वभावानुसार काहीतरी लेबल लावतो पण इथे मात्र सपशेल शरणागती!! 

Wednesday, 26 February 2020

(खवट) सुनील ओक

शाळेपासूनच अंगाने भरलेला, काहीसा स्थूल, सरळ केस (पण वागणे तिरके पण ते असो....) शरीरयष्टी थोडी बुटकबैंगण, घारे आणि निळसर डोळे (जात कुठली ते सांगायलाच नको म्हणा) आवाज थोडा घोगरा (म्हणूनच गायनाचे अंग नाही पण हे आमचे सगळ्यांचे सुदैव म्हणायला हवे) आणि शाळेपासूनच नैसर्गिकरीत्या जपलेली तिरकस जीभ!! सुनील सरळ बोलला तर आजच्या काळातील Breaking News ठरेल. शाळेपासून वाकड्यात बोलण्याची सवय आणि त्यातून बुद्धीचे वरदान असल्याने बोलताना सुनील जरी सरळ वाक्य बोलला तरी आम्ही मित्र त्याचा तिरका(च) अर्थ घेतो आणि ही सवय त्यानेच आम्हा सगळ्यांना लावली आहे. 
त्याचे हसणे देखील प्रथमदर्शनी छद्मी वाटावे असे असते. सुनील मनापासून हसला आहे, हे दर्शन देवदुर्लभ असते. किंबहुना कुठे तिरकस विनोद झाला (बरेचवेळा त्यानेच केलेला असतो) की ओक्याला मनापासून आनंद होतो आणो आनंद त्याच्या सुप्रसिद्ध हास्यातुन जगाला समजतो. एकूणच ही व्यक्ती पहिल्यापासून काहीशी हूड अशी आहे आणि त्याला जोडून जहरी बोलणे आहे. त्यामुळे त्याच्या नाडी फारसे कुणी लागत नाही आणि बरोबरच आहे म्हणा, कोण उगीचच खवट टोमणा सहन करून घेईल. त्याच्या जिभेला खरी धार आली ती आपला हा गृप झाल्यापासून. तशी ही स्वारी शाळेच्या जवळच राहणारी - काही वर्षांपूर्वी त्याने खारघर इथे फ्लॅट घेतला आहे ( हे सुनीलच जगाला सांगत असतो. अर्थात खारघर सारख्या लांब जागा घेण्यात दुहेरी फायदा. कुणाला आमंत्रण दिले तरी येण्याची शक्यता कमीच. अर्थात सुनीलचे आमंत्रण म्हणजे भल्या पहाटे अचानक उंबराचे फुल दिसण्यासारखे आहे!!) त्यामुळे बरेचवेळा ही स्वारी जगप्रसिद्ध (हे सुनीलच जगाला ओरडून सांगतो) नावलकर बिल्डींग - खरेतर चाळ- या इमारतीच्या गॅलरीत (सुनीलच्या भाषेत "सौंध"!! सुनीलचे सगळेच जगावेगळे असते.) बसलेला दिसायचा. दुसऱ्या मजल्यावर त्याचे घर होते. अस्मादिकांना ३ वर्षांपूर्वी सुनीलच्या घरी जाण्याचे भाग्य लाभले होते. गणेशोत्सव होता आणि त्यानिमित्ताने त्याने घरी बोलावले होते. मी पण लगेच पडत्या फळाची आज्ञा स्विकारुन लगोलग घरी गेलो होतो. घरी स्वागत चांगले केले. चाळीत गणपती उत्सव असल्याने आनंदी वातावरण होते. मला त्याने चाळीतील गणपती दाखवला आणि त्या चाळीत किती प्रथितयश (हा शब्द सुनीलने मला त्यावेळी ऐकवला होता) व्यक्ती आल्या होत्या, त्यांचे फोटो वगैरे दाखवले आणि सुंदर प्रसाद दिला. अर्थात आमचा गणपती नवसाला पावतो आणि हो, जगप्रसिद्ध आहे वगैरे वाक्ये ऐकवली (मला या वाक्यांची सवय असल्याने लगोलग कानाबाहेर टाकली!!) 
सुनील खरा खुलतो तो आपल्या WhatsApp गृपवर. इथे त्याची तलवारबाजी चालते आणि विशेषतः मी काही लिहिले की लगेच सुनीलचे उत्तर आलेच आणि ते त्याच्या नेहमीच्या शैलीप्रमाणे (म्हणजे खवचट) असते. मला मानसिक दु:ख देण्यात त्याला तथाकथित आसुरी आनंद होतो पण मला आता त्याची सवय झाल्याने त्याचे टोमणे वाचतो आणि त्यालाही शालजोडीतले देण्याचा प्रयत्न करतो. वास्तविक त्याचा आणि माझ्या मतांत भरपूर विरोधाभास आहे. सुनी देवादिकांवर सढळहस्ते विश्वास ठेवणारा तर मी तिकडे शक्यतो दुर्लक्ष करणारा. आता इथे कुणीही म्हणेल असे असूनही मी त्याच्या चाळीच्या गणेशोत्सवाला का गेलो? प्रश्न नक्कीच वाजवी आहे पण दस्तुरखुद्द सुनील महाराजांचे (मनापासूनचे असावे!!) आमंत्रण मिळण्याचे भाग्य नाकारणार कसे. या आपल्या गृपवर असे भाग्य किती जणांचे असेल? या प्रश्नावर एका हाताची बोटे जास्त होतील म्हणजे बघा. सुनील पक्का हिंदुत्ववादी आणि मी तसा निरालंब. शक्यतो या विषयांवर बोलणे टाळणारा. मला संगीतात भरपूर रुची आणि सुनील अगदी औरंगझेब नसला तरी गाण्यांवर गप्पा मारण्यातला नव्हे. माझी संगीतातील रुची हा सुनीलला मी कायमस्वरूपी चेष्टा करायला दिलेला मसाला आहे आणि सुनील तो मसाला व्यवस्थित वापरतो, अगदी माझे डोळे झोंबेपर्यंत!! 
असे सगळे दैवीदत्त गुण असूनही त्याचा स्वभाव लोभस आहे. खवट बोलेल पण सगळे तात्कालिक असणार. गेल्या काही वर्षांपासून त्याला गुडघेदुखी झालेली आहे आणि सुनील त्या दुखण्याने त्रस्त  झालेला आहे पण तरीही त्याच्या बोलण्यात कधी रडगाणे नसते. आम्ही गृपमधील काहीजण पूर्वी रविवारी सकाळी Morning Walk साठी चौपाटीवर जमत असू. अर्थात सुनील गिरगावात असल्याने त्याला आमंत्रण जायचे. त्यावेळी तर त्याचे दुखणे जरा वाढले होते. आमही सगळे आरामात नरिमन पॉईंट पर्यंत चालत जात असू पण हे महाशय फारतर हिंदू जिमखान्यापर्यंत आमच्या बरोबर असायचे आणि नंतर तिथेच बसून राहायचे. सुनील सरळ बोलला असेल तो याच वेळी!! एकदा तर मलाच शंका आली होती, खरेच याचा गुढगा दुखत आहे की हा नाटके करीत आहे? परंतु लगोलग त्याच्या गुढग्यावर ऑपरेशन झाले आणि मनातील किल्मिष नष्ट झाले. प्रश्न असा आहे,मनात किल्मिष आलेच कसे? याला उत्तर सुनीलचे वागणे!! 
तसा ड्रिंक्स पार्टीला मात्र सुनील अफलातून कंपनी आहे. सतत बडबडत असे नाही नाही पण मध्येच एखादी फुसकुली सोडेल कि जी वर्मावर नेमके बोट ठेवणारी असेल. माझ्या घरी २,३ वेळा सुनील इतर २,३ मित्रांबरोबर आलेला आहे. पार्टीच्या वेळेस मात्र स्वान्तसुखाय पद्धतीने ड्रिंक्स घेणार, एखाद्या नावडता विषय मुद्दामून काढून काड्या टाकायचे काम इमानेइतबारे करणार आणि वाद वाढायला लागला कि लगेच नामानिराळे राहणार. हे त्याचे नामानिराळे राहण्याचे जे कौशल्य आहे, ते मात्र अद्वितीय आहे आणि याची आम्हा सगळ्यांना कल्पना असून देखील सुनील अचूकपणे टायमिंग साधतो. अथर त्याचे बोलणे हे सहसा निर्विष असते, कुणावरही शक्यतो वैय्यक्तिक शेरेबाजी करीत नाही त्यामुळे केलेले विनोद कुणालाही आनंदाने स्विकारता येतात. तशी फार मोठ्या आवाजात बोलायची सवय नाही. सुनील काय करतो, गप्पांचा वेग जरा कुठे थंडावला असे व्हायला लागले की स्वारी आग लावते. 
अशाच अप्रतिम गप्पांत काही तास निघून जातात. अर्थात असा मित्र सहजपणे प्राप्त होत नाही आणि सुदैवाने मला त्याची मैत्री प्राप्त झाली आहे. तसे आम्ही दोघे रोज काही फोनवर बोलत नाही पण कधी एकमेकांना फोन झाला की आमच्या जिभा तिरकस होतात. काही मिनिटे निश्चिन्तपणे  घालवली जातात, एकमेकांची टर मनसोक्तपणे उडवली जाते, आमचा बोलण्याचा कंडू शमवला  जातो आणि आम्ही फोन खाली ठेवतो. एक नक्की, उद्या मला जर काही मदत लागली तर माझे इथे हक्काचे असे काही थोडेफार मित्र आहेत जे रात्रीबेरात्री देखील मदतीला धावून येतील त्यात सुनीलचे नाव नक्की आहे कारण तितका विश्वास खुद्द त्यानेच मला दिलेला आहे. 

Sunday, 23 February 2020

(महान विचारवंत) मीनल सालये 

आपल्या शाळेच्या गृपमधील अत्यंत वेगळे व्यक्तिमत्व!! असे वेगळेपण राखले याला कारण तीच स्वतः. वास्तविक एकेकाळी माझ्या गल्लीच्या अगदी बाजूला राहणारी पण त्यावेळी एखादा शब्द तर दुरापास्त पण एखादे स्मित देखील अप्राप्य!! त्यातून शाळेतील प्रतिमा म्हणजे अत्यंत हुशार (आजही या प्रतिमेत लवमात्र फरक नाही!!)! तिथे तर अस्मादिकांची दांडी गुल. त्यावेळी कुणा मुलीशी बोलणे तर दूरच पण बघणे देखील धाडसाचे! मला अजूनही स्पष्ट आठवत आहे, ती आणि गीता, दोघीही मागील बेंचवर बसायच्या तरीही वर्गात प्रथम क्रमांकाने यायच्या. गीताने शाळा पुढे सोडली पण मीनल शेवटपर्यंत पहिल्या क्रमांकाच्या शर्यतीत असायची. पुढे तिला चष्मा लागला (त्यामुळे तर व्यक्तिमत्व अधिकच गूढ, बौद्धिक झाले.... ) 
आमची खरी ओळख आपला गृप झाला आणि झाली. मळवलीच्या पहिल्या पिकनिकमध्ये,  शनिवारी रात्री गाण्याच्या भेंड्या सुरु झाल्या आणि मीनल फार्मात आली. माझ्याच बाजूला बसली होती. आजही एक आठवण लख्ख आहे. *र* अक्षर आले होते. या अक्षरावरून पुढे पुढे फार गाणी आठवत नाहीत आणि एकदम मीनलने "रे तुझ्यावाचून काही येथले अडणार नाही" हे भावगीत सुरु केले आणि अनिल थक्क. वास्तविक इतके सुंदर भावगीत कसे काय विस्मरणात गेले कुणास ठाऊक. अनंता माझ्या कानात पुटपुटला - शाळेतही पहिला नंबर आणि आता इथेही..... खरंतर त्यावेळी प्राची माझ्या डाव्या बाजूला आणि मीनल माझ्या उजव्या बाजूला,  दोन मित्र पलीकडे!! अशा परिस्थितीत माझा गळा तर सुकलेलाच होता पण गाणी तरी कशी सुचणार!! कसेतरी अवसान आणून मी गाणी म्हणण्याचा प्रयत्न करीत होतो.
तर अशी ही मीनल. या पिकनिकनंतर आमची ओळख घट्ट व्हायला लागली. या गृपवर उद्मेखूनपणे माझ्याशी "पंगा" घेणाऱ्या दोनच. 1) औंधची महाराणी - प्राची आणि 2) महान विदुषी मीनल. या दोघींना या उपाध्या मीच लावल्या कारण त्या दोघीच कारणीभूत आहेत. या दोघींनीच मला असंख्य पदव्या बहाल केल्या की आता इथे मला "अनिल" म्हणून कुणीही हाक मारत नाही! अशा परिस्थितीत मला "जिवंत" राहण्यासाठी काहीतरी करणे भागच होते. म्हणूनच मी अशा उपाध्या लावल्या! या दोघी कधीही माझ्याशी सरळ बोलल्या नाहीत पण मला हेच मनापासून आवडते.
मीनल तर प्रसंगी - "पंडितजी, वाद घालता येत नसेल तर गप्प बसा" असे सहजपणे खडसावते. अर्थात गप्प बसणे अनिलच्या स्वभावातच नसल्याने मी देखील तिच्या वाक्यातील काहीतरी खुसपट काढतो.सुदैवाने तितकी तिरकी नजर थोडीफार मिळाली असल्याने माझे थोडेफार निभावते.यात महत्वाचा भाग म्हणजे मीनल मोकळेपणी खडसावते.मग त्यात खवचटपणा ओतप्रोत भरलेला असतो.मी बरेचवेळा बरेच ठिकाणी लिहीत असतो आणि त्यावरून माझी यथेच्च टर  उडवण्यात प्राची आणि मीनल नेहमी आघाडीवर पण मला हे सगळे मनापासून भावते. 
अर्थात हा झाला मीनलच्या स्वभावातील एक भाग. कधीकधी मला पण इथे काही लिहायचा कंटाळा येतो कारण मी काहीही लिहिले तरी कुणी व्यक्तच होत नाही!! माझ्या शैलीची इथेच मीनलकडून व्यवस्थित टिंगल उडवली जाते पण मी कधी  काही दिवस लिहिले नाही तर उद्मेखूनपणे मीनलचा फोन येणार.सर्वात आधी प्रकृतीची चौकशी करणार आणि ती ठीक आहे म्हटल्यावर जिभेचा सट्टा आणि पट्टा सुरु करणार. फोनवर अव्याहतपणे बोलत असते. मग मध्येच तिच्या लक्षात येते, अनिल काहीच बोलत नाही!! हे ध्यानात आल्यावर ती अधिक तिखट बोलते. हे सगळे अत्यंत निर्लेप मनाने चालते कारण एकमेकांत असलेला विश्वास. हा विश्वास मला फार मोलाचा वाटतो आणि त्याच जीवावर मी इथे उंडारत असतो. 
अशावेळी ती अतिशय हुशार आहे आणि अनिल "ढ" आहे, असले विचार देखील कुणाच्या मनात येत नाहीत. मीनल तल्लख तर आहेच पण तितकीच हळवी आहे. मध्यंतरी माझी तब्येत बरीच बिघडली होती (वास्तविक आजही तितकी ठीक नाही पण पूर्वीपेक्षा काबूत आली आहे) आणि अशा वेळेस हमखास मीनलचा फोन येणार. अशावेळी मात्र फोनवर गंभीर बोलणे चालणार.मी ठीक आहे याची पूर्ण खातरजमा करणार. त्यासाठी सलग अर्धा तास फोनवर चौकशी करणार. 
पूर्वी ती बँकेत नोकरी करीत होती. काहीवेळेस मी उगाचच तिला फोन करीत असे (बँकेत फारसे काम नसते असे मला फार पूर्वीपासून वाटत असे!! आता इथले बँकर चवताळणार....) पण काहीवेळा ती कामात असायची, म्हणजे तसे फोनवर तरी सांगायची!! गमतीचा भाग म्हणजे त्या संध्याकाळी मीनलचा फोन हमखास येणार.
आजही तिचा फोन अधूनमधून येतो - वास्तविक आता ती निवृत्त झाली आहे तरी अधूनमधून फोन....अशाच आमच्या गप्पा रंगतात. बोलताना कोण कुठे घसरतो याचीच वाट बघणार आणि जरा संधी मिळाली की लगेच वाक्ताडन सुरु करणार. मला हे सगळे फार आवडते कारण इथे आणि अशाच वेळेस माझे पाय जमिनीवर ठेवण्यात हिचा सहभाग असतो. मला "लेखक" असे चिडवण्यात मीनल नेहमी पुढे आणि ती पुढे असतें हे मी गृहीतच धरून इथे व्यक्त होतो. वास्तविक मी या आधीही काही मित्र/मैत्रिणींवर थोडेफार लिहिले आहे आणि ते मी माझ्या ब्लॉगवर टाकले आहे. लिहिताना मला असेच वाटते, मी नेमके लिहिले आहे पण आज वाचताना त्यातील अपूर्णता जाणवते. ती व्यक्ती मला अचूक शब्दात अजिबात मांडता आली नाही अशीच भावना झाली. मीनलबाबत असेच होणार आहे.
परंतु मैत्रीच्या नात्यात असा "जिव्हाळा" निर्माण होणे,  यासारखा आनंद नाही आणि या पेक्षा वेगळी अपेक्षा करणे देखील चूक आहे. माझ्या मनात अशी भावना निर्माण झाली कारण मीनलची निर्व्याज मैत्री. 




Wednesday, 3 July 2019

भारती (शंकर) शेठ

काहीवर्षांपूर्वी विनयचा मला फोन आला होता आणि त्याने शाळेचा गुप WhatsApp वर काढल्याचे सांगितले आणि त्यात माझी वर्णी लावल्याचे देखील सांगितले. त्याआधी मी तसा इतर WhatsApp गृपवर होतोच पण आता शाळेचा गृप म्हटल्यावर मनात थोडी जिज्ञासा निर्माण झाली. त्यावेळी विनय आणि भारती हे दोघे गृपचे Admin होते. भारती त्यावेळी तरी डोळ्यांसमोर येत नव्हती. संजीवला मी फोन केला तेंव्हा त्याने मला खूप समजावून सांगण्याचा प्रयत्न केला पण फारशी काही ओळख पटली  नव्हती. पुढे विनयने गिरगाव चौपाटीवर भेटण्याचा घाट घातला आणि तिथे खऱ्या अर्थाने भारतीची ओळख झाली आणि तद्नुषंगाने "शंकरशेठ" नावाची महती!! नावामुळे सुरवातीला तरी मी भारतीशी थोडे अंतर राखूनच बोलत होतो. मळवलीच्या पहिल्या पिकनिकने मात्र हे बंध खऱ्याअर्थी तुटले. अर्थात पिकनिक निमित्ताने तेंव्हा विनयच्या घरी संध्या, मी आणि भारती यांच्या गाठीभेटी झाल्या पण घरात भेट होणे आणि बाहेर भेटणे, यात नेहमीच फरक असतो आणि तसा तो होता देखील. 
मळवलीच्या बसमध्येच भारतीने आपले "रंग" दाखवायला सुरवात केली. अगदी सहजपणे ती गृपमध्ये सामावुन गेली. कुठेही कसलाही नखरा नाही, आढेवेढे नाहीत. किंबहुना जमल्यास एकमेकांना शाब्दिक चिमटे काढण्यात पुढाकार. 
हे बघितल्यावर अस्मादिक खुश. पुढे उत्तरोत्तर ओळख चांगलीच वाढत गेली दोन, तीन वेळा तिच्या घरी देखील जाणे झाले, एका भेटीत तिच्या नवऱ्याशी गप्पा मारून झाल्या. पुढे पुढे तर, आमच्या गाठीभेटी बाहेर व्हायच्या तेंव्हा, विशेषतः बारक्या, सतीश करंदीकर आणि मी, जवळपास हक्काने तिच्या गाडीत प्रवेश मिळवायला लागलो. आजचा आपला जो गृप आहे, तो जमवण्यात नि:संशयरीत्या भारतीचा सिंहाचा वाटा आहे. आजही तिला तोच मान आहे किंबहुना काही मुली तर "भारती येत आहे ना, मग मी येणार!!" असे बोलून भेटायला (मुलांवर हा अविश्वास म्हणायचं का?😀😀) येतात. यात महत्वाचा मुद्दा असा, भारतीने इतरांचा मिळवलेला विश्वास!! मी तर तिला कितीतरी वेळा उगाचच फोन करीत असतो, काहीही कारण नसते पण फोनवर आमच्या खूप गप्पा होतात. आता गृप म्हटल्यावर रुसवे-फुगवे होणारच, त्यातून आपला मराठी लोकांचा गृप!! आत्तापर्यंत असे बरेच प्रसंग आठवतात, त्यावेळी गृपमाधील काही सभासद, नको तितके ताणत बसतात,  स्वतःचा अहंकार गोंजारत बसतात पण त्यामुळे इतरांची मज्जी खपा होत असते आणि अशा वेळी भारतीने पुढाकार घेऊन, पुन्हा सगळे सोपस्कार ठीकठाक केले आहेत आणि  मी या सगळ्यांचा साक्षीदार आहे. अशावेळी तिची "समजूतदार" वृत्ती लक्षणीय असते. कितीही मानापमानाचे प्रसंग आले तरी गृप तोडायचा नाही, हा तिचा खाक्या असतो (असे असून देखील तिने आणि इतर मुलींनी त्यांचा असा "खास" गृप तयार केला आहे!! पण त्या मागील कारणे वेगळी आहेत). 
चाळीस, पन्नास लोकांचा गृप एकत्र सांभाळणे तसे कठीणच असते आणि आपल्याकडे तर सगळेच "बुद्धीप्रामाण्यवादी"!! प्रत्येकाला असेच वाटते, "मी म्हणतो तो अखेरचा शब्द!!" अशा चंबूगबाळ्यांना तिने एकत्र ठेवले आहे. गृपचा कुठलाही कार्यक्रम ठरवायचा झाल्यास, पहिली "हाकाटी" घातली जाते, ती भारतीच्याच नावाने!! कधीकधी अकारण आढेवेढे घेते पण अखेर निदान मुलींमध्ये तरी तिचा शब्द अखेरचा मानला जातो. त्यातून, तिचे संबंध अनेक ठिकाणी जोडलेले  असल्याने, कार्यक्रम करणे, त्याची जुळणी मांडणे आणि शेवटपर्यंत तडीस नेणे, यात भारती अग्रगण्य. 
तशी भारती फार बोलत नाही, विषय गंभीर व्हायला लागला की लगेच मिस्कील प्रतिक्रिया देऊन वातावरण हलके-फुलके ठेवते. माझ्यावर प्रतिक्रिया देणे, (माझ्या लेखांवर देत नाही, ते सोडून देतो कारण तो या गृपचा "स्वभाव" आहे!!) हा तिच्या नितळ आनंदाचा भाग. "अनिल अति गंभीर वृत्तीचा आहे", हे तिचे आवडते आणि ठाम मत मग मी कितीही मस्करी केली तरी!! अर्थात मला आता त्याची सवय झाली आहे म्हणा. भारती अत्यंत सधन आहे पण त्याचे "सावट" कधीही मैत्री नात्यावर पडत नाही, हा तिचा मोठेपणा. उच्च समाजात वावरून देखील आजही जमिनीवर पाय ठेऊन असते, याचेच बहुदा मला आणि इतरांना आश्चर्य वाटत असते आणि हीच भारतीची खरी ओळख आहे. 

Tuesday, 4 June 2019

सतीश हर्डीकर

सतीशची आणि माझी ओळख आहे यापेक्षा अधिक, तो माझ्या आई-वडिलांच्या संपर्कात जास्त होता. विशेषतः माझे वडील ट्रेकिंग वगैरे कार्यक्रमाला जात असत आणि त्यानिमित्ताने सतीश आणि इतर मित्रांनी स्थापन केलेला "यंग झिंगारो" या ट्रेकिंग क्लब मध्ये माझ्या वडिलांची ये-जा असायची. म्हणूनच सतीश मला नेहमी म्हणतो - अनिल तू अशा आई-वडिलांच्या पोटी जन्माला आलास हे तुझे भाग्यच आहे. अर्थात असेच मत सुनीलचे पण आहे. फार मागे, एकेठिकाणी माझ्या आईबद्दल एकेठिकाणी बरेच काही छापून आले होते आणि सुनीलने ते कात्रण मला साऊथ आफ्रिकेत मेल केले होते आणि त्या कात्रणाखाली खाली,  सतीश जे म्हणतो, तसेच लिहिले होते. सतीश तेंव्हापासून माझ्या घरी येत असे. एका स्पष्ट आठवण - एकदा असाच रात्री गप्पा मारायला आला असताना, त्याने एका मांजरीच्या मृत्यूबाबतची कविता सादर केली होती. कवितेचे शब्द आठवत नाहीत पण मांजरीचा मृत्यू होणे, हा कवितेचा विषय होऊ शकतो, हे त्याने दाखवून दिले होते. 
तसा सतीश मृदुभाषी आहे, फार उंच स्वरांत बोलत आहे, घसा तारवटला आहे, डोळे गरागरा फिरवत आहे, असले दृश्य सतीशबाबत स्वप्नात देखील येत नाही. माझ्याशी बोलताना, "अरे अनिल...." अशी सुरवात करणार आणि अशा सुरांत की ऐकताना २ अन्वयार्थ निघू शकतात - १) "अरे अनिल बाळा, या संसाराचा भवसागर तू कसा बरे तरुन जाणार!!" (इथे अनिल "बाळा" हेच योग्य!!) २) त्याचा मूळ स्वभावच अशा सुरांत बोलण्याचा आहे, हे गृहीत धरून ऐकायचे. मी माझ्या फायद्याची बाजू घेतो!! एक नक्की, सतीशला अनेक मराठी कविता मुखोद्गत आहेत. आपल्या पहिल्या पिकनिकला, मी त्याला एका बाजूला घेतले आणि त्याच्याकडून पु.शि. रेग्यांच्या काही कविता म्हणवून घेतल्या. पु.शि. रेगे, जी.ए.कुलकर्णी, आरतीप्रभू हे लेखक आम्हा दोघांच्या अति आवडीचे. त्याने मला एकदा, जी.ए. वर बोलायला सुचवले होते पण बोलण्याची जागा चुकीची होती म्हणून मी ब्र देखील काढला नाही. 
या गृपमध्ये गंभीर विषयावर बोलायला अघोषित बंदी आहे. याचे मुख्य कारण हा गृप एकत्र भेटणार, जेंव्हा पिकनिक असते तेंव्हा किंवा कुठे कधीतरी Get-Together असेल तेंव्हाच. निव्वळ साहित्यिक गप्पा किंवा सांगीतिक गप्पा देखील मारायच्या असतात, हे या ठिकाणी मुद्दामून सांगायला हवे. सतीशचे मराठी साहित्याचे वाचन आणि त्याचे परिशीलन भरपूर आहे. वाचलेल्या पुस्तकाचा अचूक अन्वयार्थ काढण्याची त्याच्याकडे क्षमता आहे. मला नाही पण इतर मित्रांना लिहिलेल्या पत्रातून त्याने आपली ही आवड मांडलेली आहे, असे मला त्या मित्रांकडून समजलेले आहे. त्याचा मित्रसंग्रह अफाट आहे आणि त्याला मित्र, खास करून मैत्रिणी जोडण्याचे व्यसनच आहे. एखादा देखणा चेहरा दिसला की लगेच सतीशचा "नाथा कामत" होतो !! ( हे मत विजयचे आहे आणि बहुदा याच सवयीमुळे विजयने त्याचे "झग्या" असे नामकरण केले आहे !!) अर्थात नवनवीन मैत्रिणी शोधणे, हा सतीशचा आवडता छंद आहे!! त्यातून सतीश चर्चगेट इथल्या K.C.college मध्ये होता, जे मुळातले सिंध्यांचे कॉलेज म्हणजे भरपूर सिंधी मुली!! एक गोष्ट मान्यच करायला हवी, मुलींशी बोलण्यात सतीश विलक्षण रमतो. आम्ही मित्र जे विषय काढायला सर्वसाधारणपणे कचरतो, ते विषय देखील मनोज्ञपणे मुलींसमोर मांडतो. एखाद्या मुलीशी सतीश बोलत आहे, हे दृश्य कुठल्याही कॅमेऱ्यात बंद करून ठेवण्यासारखे सुरेख असते. अर्थात तिथे देखील बोलताना, समजावून सांगण्याचा आव असतो. सतीश खरे तर शिक्षकच व्हायचा, चुकून बँकेत नोकरीला लागला !! दुसऱ्याला समजावणे, लोकांसमोर बोलणे, हे त्याला फार आवडते. माझ्या कानावर त्याचे दुसरे "निक नेम" - "पिळ्या" असे देखील आले आहे. 
माझ्याच वडिलांनी मला सांगितलेली  बाब, ट्रेकिंगला गेल्यावर, त्या रात्री शेकोटीचा कार्यक्रम आवश्यक असतो आणि तिथे बोलगाणी गायनात सतीश सगळ्यांच्या पुढे. त्याला असंख्य बोलगाणी पाठ आहेत. माझ्या  मते,आतापर्यंत महाराष्ट्रातील सगळे गड, किल्ले सर करून झाले  असून,हिमालयातील देखील काही टोके गाठली आहेत. या बाबतीत देखील त्याला बँकेची नोकरी दणक्यात लाभली.  
सुदैवाने त्याला बँकेच्या नोकरीत अपरिमित यश मिळाले आणि त्यानिमित्ताने तो बरेचवर्षे परदेशी देखील राहून आला आहे. परदेशी राहण्यावरून, मला एक सुचले. माणसाने जर का व्यामिश्र अनुभव घ्यायचे ठरवले आणि आत्मविकास करायचे ठरवले तर परदेशी काही काळ वास्तव्य करणे अत्यावश्यक आहे. 
सतीश रूढार्थाने बोलघेवडा नाही आणि याचा आम्ही मित्र पुरेपूर फायदा उठवतो. पहिल्या पिकनिकला रात्री, मी आणि विजयने अगदी ठरवून सतीशला "गिऱ्हाईक" करायचे ठरवले आणि सगळी रात्र तरंगत ठेवली होती. रात्रभर त्याच्या नावाने आहे/नाही ते किस्से रंगवले होते आणि कुणालाही झोपायला दिले नव्हते.  आत्ता लिहिताना एक किस्सा आठवला. पहिली किंवा दुसरी पिकनिक असावी ( हा तपशील महत्वाचा नाही)  बसमध्ये एकमेकांच्या टोप्या उडवणे चालू होते. नेत्रा आमच्यात येऊन बसली होती. कशावरून तरी मुलींबद्दल गप्पा सुरु झाल्या. एकदम नेत्रा सतीशला एका मुलीबद्दल तिरकस बोलली (तिरकस बोलणे हा नेत्राचा स्वभावच आहे!!) आणि महाशय लगेच नेत्राकडे बघून अतिशय संथपणे आणि थंडपणे उद्गारले - "नेत्रा तुला काय माहिती, आम्ही  मुले,तुम्हा मुलींच्यात काय बघतो ते !!" नेत्रा थक्क तर झालीच पण बस हास्यकल्लोळात बुडाली. सर्वसाधारणपणे असे कुणी बोलले असते का? पण सतीश बोलला!! 
सतीशच्या मोठेपणा असा, त्याने सगळी चेष्टा चेष्टेवारीच घेतली. आजही तो गृपच्या कुठल्याही कार्यक्रमात भेटला की विजय सुटतो!! सतीशला बायको पण अशीच मितभाषी मिळाली आहे. उमा आता माझ्या चांगली ओळखीची झाली आहे. उमा माझ्या अनेक नातेवाईकांना प्रत्यक्ष ओळखते. मध्यंतरी मी सतीशच्या गोरेगाव इथल्या घरी गेलो होतो, सतीश घरी नव्हता पण उमा आणि मी जवळपास तासभर गप्पा मारत होतो. अनेक जुन्या आठवणी निघाल्या. मला अजूनही असे ठामपणे वाटते, सतीशने आपल्या परदेशातील आठवणी संगतवार लिहाव्यात. मी त्याला तसे एक, दोनदा सुचवले होते पण अनिलला गंभीरपणे घ्यायचेच नसते,हा इथे बऱ्याच जणांचा समज असल्याने, सतीशने ते मनावर घेतलेले नाही. वास्तविक युरपमध्ये ४,५ वर्षे सलग काढणे, हाच अनिर्वचनीय अनुभव आहे आणि तो सलग अनुभव त्याच्या गाठीशी आहे. तसेच इतक्या मराठी कविता मुखोद्गत असताना, त्या कवितांबद्दल थोडे वैचारिक, विश्लेषणात्मक लिहावे. निदान प्रयत्न करायला काय हरकत आहे. फार तर लोकं म्हणतील - काय फडतूस लिहिले आहे ( ही शक्यता फारच कमी आहे तरी देखील....) वगैरे. खरतर लिहिताना लोकांचा कधी फारसा विचार करू नये हे माझे आवडते मत अन्यथा आजवर मी जे काही लिहिले आहे, त्याच्या १०% देखील लिहून झाले नसते. आणि जर का अनिल लिहू शकतो तर सतीशला लिहिणे म्हणजे डाव्या हाताचा खेळ आहे, हे मला प्रांजळपणे वाटते. 
असो, सतीशसारखा सुसंकृत मित्र माझ्या यादीत आहे, याचा मला म्हणूनच अभिमान वाटतो. 

Sunday, 2 June 2019

विजय वैद्य

प्रचंड, अस्ताव्यस्त पठारावरून उन्हाच्या रखरखाटात काहिली सहन करत चालत असताना, लांबून कुठूनतरी पाण्याचा आवाज यावा आणि अचानक आपण अति विशाल प्रपातासमोर उभे राहावे त्याप्रमाणे मला विजय नेहमी भासतो. हा पोरगा कधी स्वस्थ बसला आहे, असे होतंच नाही. सतत काहींना काहीतरी बडबड चाललेली असते, कधी एखादा किस्सा (काहीवेळा फालतू विनोद देखील असतो पण नेहमीच दर्जेदार विनोद कुठून आणायचे?) कधी एखादा प्रसंग किंवा शाळेतील गमतीजमती सांगत असतो पण सतत बोलत असतो!! 
लहानखोर शरीरयष्टी, गोरा चेहरा यामुळे प्रथमक्षणी विजय साधा, भोळा वाटतो पण तोंड उघडले की खरा विजय दिसायला लागतो. मैफिल रंगवावी तर विजयनेच आणि याची प्रत्यय इथल्या सगळ्या मित्रांना नेहमी आलेला आहे. एखादाच किस्सा सांगेल पण त्यात थोडी स्वतःची भर टाकणार, चेहऱ्यावरचे भाव तसे ठेवणार (हा नाटकी विजय!!) पण छोटासाच किस्सा रंगवून सांगणार आणि उपस्थितांची मनापासूनची दाद मिळवणार. इतकी वर्षे त्याने हेच केले असावे बहुदा - यात कधी वेळ मिळाला की घरातला पारंपरिक बिझिनेस बघणार!! 
विजय गिरगावात, अगदी नेमके सांगायचे झाल्यास, वामन हरी पेठेच्या बाजूच्या इमारतीत राहत होता तेंव्हा पासूनची माझी ओळख. मला वाटत, आम्ही कधीतरी एकाच तुकडीत देखील होतो. मी काय किंवा विजय काय, नेहमीच back bencher!! चिकित्सक शाळेने आमहाला पहिल्या बेंचवर बसायची संधीच दिली नाही आणि आम्ही कधी गंभीरपणे घेतली देखील नाही. कधीतरी अभ्यास करायचा असतो, याची आठवण व्हायची आमचा शाळेच्या पुस्तकांना हात लागायचा. गणित (विषयाइतकेच "गणित") सायन्स हे विषय आम्ही कायम हुशार विद्यार्थ्यांना पुढे येण्यासाठी त्यांच्या पुढे ठेवत असू. किंबहुना वर्गात मागे बसून टिंगल टवाळ्या करणे यासाठीच शाळेत यायचे असते, यावर आमची ठाम समजूत!! त्यातून पिरियड्स "बंक" करणे, हा आमचा "जन्मसिद्ध" हक्क!! वास्तविक चिकित्सक शाळा ही मुलांची/मुलींची  कारकीर्द घडवणारी शाळा म्हणून अखिल मुंबईत प्रसिद्ध पण ही प्रसिद्धी आमच्या गावी देखील नव्हती.
विजय तसा श्रीमंत म्हणावा अशा कुटुंबात जन्माला आला आणि अर्थात पुढे त्याने ती श्रीमंती अधिक वाढवली. माझे घर त्याच्या घराच्या जवळच असल्याने, मी त्याच्या घरी बरेचवेळा जात असे. शाळेत सुद्धा एकत्र जात असू. शाळेत जाताना पण यांच्या टिवल्या बावल्या चालायच्या. त्यातून शाळेच्या वाटेवर एखादा देखणा चेहरा दिसला की साहेब एकदम फॉर्मात यायचे. शिटी वाजवणे ही त्याला जन्मजात देणगी मिळालेली आहे. मला त्याचा एक गुण फार आवडतो, कितीही चेष्टा केली तरी त्या चेष्टेचे स्वरूप तात्कालिक असायचे, आजही तसेच असते आणि चेष्टा करताना समोरचा कधीही दुखावला जाणार नाही, याची तो योग्य ती काळजी घेतो. 
पुढे मात्र संबंध कमी झाले कारण तो सिद्धार्थ कॉलेजला गेला आणि मी हिंदुजा मध्ये. मला वाटते, चित्रा त्याला सिद्धार्थ कॉलेजमध्येच भेटली असणार. त्यानंतर काही वर्षांनी आमचा एक सामायिक मित्र, अरुण अगरवाल सोबत विजय भेटायचा. अरुण, मी आणि काही मित्र त्याकाळी क्रिकेट खेळत असू आणि हा अरुणबरोबर प्रेक्षक म्हणून यायचा. अरुणकडून पुढे कळले, विजय लग्न करून पार्ल्याला स्थिरावला. विजय हनुमान रोड वर राहतो - या एकाच गोष्टीने त्याची रसिक दृष्टी सिद्ध व्हावी आणि जे पार्ल्यातील हनुमान रोड ओळखत असतील त्यांनाच यातली खोच कळेल. अर्थात लग्न झाल्यावर प्रत्येकजण आपापल्या संसारात रमतो. किंबहुना, या मधल्या काळात, विजयचा मोठा भाऊ, प्रकाश माझ्या चांगला ओळखीचा झाला - अजूनही आहे. 
मध्ये बरीच वर्षे आमचा कसलाच संपर्क राहिला नव्हता कारण मी परदेशी राहात होतो. नंतर गृपची पहिली पिकनिक निघाली आणि विजय पुन्हा संपर्कात आला. पिकनिकला जाण्यासाठी आम्ही सगळे गायवाडीच्या नाक्यावर जमत होतो आणि एकदम ही स्वारी उगवली आणि माझ्या पाठीमागून मिठी घातली - मधली सगळी वर्षे गळून गेली!! साथीला आला तरी विजय जवळपास तसाच दिसतो. जवळपास अशासाठी कारण वय केस कमी झाले, काही ठिकाणी रुपेरी झाले अन्यथा बाह्यात्कारी दर्शनात विजयमध्ये कसलाही फरक पडलेला नव्हता. त्या रात्री तोच विजय, त्याच ढंगात आपल्यासमोर पेश झाला. वय वाढल्याच्या तशा कसल्याच खुणा दिसत नव्हत्या किंबहुना त्याच षोडशा उत्साहात नाचत होता, हे विशेष. अगदी बसमध्ये देखील तोच बडबड्या स्वभाव दिसत होता, तशाच शिट्या वाजवत होता. सुदैवाने त्याची बायको जरी मला अजून प्रत्यक्ष भेटली नसली तरी आम्ही फेसबुकवर नेहमी संपर्कात असतो. विजय चित्रे रंगवत नाही, हे चित्राचे भाग्यच म्हणायला हवे!! 
एक नक्की, विजय सतत हसतमुख असतो म्हणजे त्याला कसलेच प्रश्न नसतील असे नव्हे पण तसल्या प्रश्नांना कानामागे टाकून मित्रांना सामोरे जाण्याचे कौशल्य निव्वळ वादातीत आहे आणि अशी देणगी फारच विरळ आढळते आणि अशा विरळ देणगीदारात माझा हा मित्र येतो, हे माझे भाग्य म्हणायला हवे. 

सुनील जोशी

मी जेंव्हा इथल्या मित्रांवर लेखमाला लिहायचे ठरवले तेंव्हा अग्रभागी नाव सुनीलचेच होते. एकतर आमची अर्ध्या चड्डीत असल्यापासूनची ओळख असल्याने, कुठल्या आठवणी निवडायच्या हाच प्रश्न होता आणि दुसरा भाग म्हणजे मलाच असे वाटले, पहिल्याच लेखात सगळी एनर्जी संपली तर पुढील लेखांत उसनेपण उघड होणार त्यापेक्षा इतरांवर लिहायला सुरवात करावी, कसे वाटत आहे हे बघावे आणि सुनीलवर लिहायला घ्यावे. सुनील आणि माझा प्रवास अगदी समांतर रेषेत सुरु झाला, तसे बघितले तर वयाने मी त्याच्यापेक्षा आठवडाभर मोठा आहे!! एकाच शाळेत असल्याने रोजच्या रोज भेटणे व्हायचे, घरोब्याचे संबंध असल्याने एकमेकांच्या घरी वारंवार जाणे असायचे. सुनील "मेहेंदळे बिल्डिंग" मध्ये राहायचा - त्या बिल्डिंगला मोठी गच्ची होती (आता टॉवर झाला आहे) आणि त्या गच्चीत मी कितीतरी वेळा झोपायला गेल्याचे स्पष्टपणे आठवत आहे अर्थात सुनील देखील माझ्या घरी झोपायला आल्याचे आठवत आहे. सुनीलचा "मेहेंदळे बिल्डिंग" - "कुलूपवाडी (बोरिवली पूर्व)" आणि आता बोरिवली स्टेशन जवळील आलिशान फ्लॅट हा सगळा प्रवास मी व्यवस्थितपणे पाहिलेला आहे. आज सुनील अतिशय हुशार म्हणून गणला जातो आणि तसा तो आहेच, पण केवळ हुशार म्हणणे अर्धवट आहे. अथक प्रयत्न, असामान्य जिद्द आणि never say die वृत्ती याचा परिपाक म्हणजे सुनीलचे academic यश आहे आणि या प्रवासाचा मी एक डोळस मित्र आहे. सतत अभ्यास करणे, आणि त्यासाठी अथक मेहनत घेणे, हे त्याच्या यशाचे खरे गमक आहे. मला त्याच्या सतत अभ्यास करण्याचे वृत्तीचे नेहमीच कौतुक वाटत आले आहे. 
सुनीलने जेंव्हा चार्टर्ड अकाउंटन्सी करायचे ठरवले तेंव्हा माझ्या मावशीच्या नवऱ्याच्या ऑफिसमध्ये आर्टिकल्स करायला सुरवात केली. तिथे माझा तसा संबंध नसताना देखील, ६ जणांचा गृप झाला जो आजतागायत एकत्र आहे. आज या गृपला ४० वर्षे होऊन गेली, तसे आम्ही काही सतत एकमेकांना भेटत नाही, फोन देखील सटीसामासी होत नाही तरीही एकमेकांना धरून आहोत. 
अर्थात इतका दीर्घ संबंध असल्यावर आठवणींना अजिबात तोटा नाही तरी काही ठराविक टप्पे इथे लिहिणार आहे. सुनीलचा एक दोष म्हणजे तो घडाघडा बोलत नाही, त्याच्या हसण्याला अजिबात आवाज नाही किंवा चेष्टा करायची झाली एका मर्यादित स्तरावर करणार. सतत वरिष्ठ स्तरावर काम करीत असल्याने त्याच्याकडे अनेक किस्से आहेत. लग्न व्हायच्या आधी आमचा गृप सातत्याने भेटत असे आणि तेंव्हा सुनीलकडून अनेक अफलातून किस्से ऐकायला मिळायचे पण सांगायची पद्धत अल्पाक्षरी आणि अत्यंत थंड वृत्तीने सांगायची जणू काही त्यात त्याचा काही सहभाग नाही!! 
सुनील जरी थोडा अबोल असला तरी माझा अनुभव असा आहे जिथे गरज आहे तिथे सुनील हमखास उभा राहणार. २००१ मध्ये मी बराच आजारी पडलो होतो, हॉस्पिटलमध्ये काही महिने काढावे लागले होते. जेंव्हा माझ्यावर ट्रीटमेंट सुरु व्हायची होती तेंव्हा अचानक सुनील, एका रविवारी सकाळी बोरिवलीवरून गिरगावात फक्त मला भेटायला आला होता आणि आम्ही दोघे आमच्या टेरेसमध्ये झोपाळ्यावर बसून तास भर बोलत होतो. गमतीचा आणि महत्वाचा भाग म्हणजे त्या संभाषणात माझ्या आजारपणाचा साधा उल्लेख देखील नव्हता. इतर अनेक विषय काढून त्याने मला गुंगवले होते आणि हे मला, तो त्याच्या घरी परतल्यावर ध्यानात आले. वास्तविक मी फार विमनस्क परिस्थितीत होतो आणि सुनीलने माझी मनस्थिती ओळखली होती. पुढे मला ऑपरेशन करायची गरज पडली. ऑपरेशन करायच्या आदल्या संध्याकाळी सुनील मला हॉस्पिटलमध्ये भेटायला आला होता. वास्तविक हॉस्पिटल कितीही सुसज्ज असले तरी ती काही मनमोकळ्या गप्पा मारायची जागा नसते. त्यातून माझ्यावरील शस्त्रक्रिया जवळपास ८ तास चालणार होती. हे लक्षात  ठेऊन,सुनील माझ्या जवळ बसला होता, काहीच बोलत नव्हता पण धीर देत होता. मला वाटतं, त्याला देखील धक्का बसलेला असणार. आम्ही या भेटीचा उल्लेख कधीही केला नाही, त्याची गरजच पडली नाही. आज हा लेख लिहिताना या आठवणी वर आल्या, इतकेच. सुनील काहीसा अबोल आहे पण तरीही वेगळा आहे, तो असा. 
आमची लग्ने जवळपास एकाच वेळी झाली. कल्पनाला मी आता चांगला ओळखतो अर्थात मला देखील कल्पना आहे, तिने माझे "पाणी" जोखले असणार. मी परदेशी असताना सुनीलला पूर्वी बरीच पत्रे लिहिली (त्याने ती वाचली, हा त्याच्या सहनशीलतेचा नमुना) पण त्याने कधीही एक ओळ लिहिल्याचे आठवत नाही. इथे मला सगळे "पंडितजी" म्हणतात - खरे तर हा मला टोमणा आहे पण सुनील खरा "पंडित" आहे. हे मी पूर्ण विचारांती लिहीत आहे. आज सुनील आयुष्यात चांगला स्थिरस्थावर झालेला आहे. त्याचा मुलगा - निखिल तर बाप से बेटा सवाई आहे. निखिल जेंव्हा चार्टर्ड अकाउंटंट परीक्षा पहिल्या फटक्यात पास झाला तेंव्हा सुनीलचा मला फोन आला. आवाजात मुलाचा अभिमान डोकावत होता आणि का डोकावु नये. ही परीक्षा म्हणजे  China Wall आहे. 
 असो,आणखी किती लिहायचे - म्हणजे लिहायचे झाल्यास दीर्घ निबंध होईल आणि त्याला आत्मचरित्राचा वास येईल आणि मी तसे कधीच करणार नाही. त्यापेक्षा अबोलपणे मिळणारी साथ मला अधिक महत्वाची आणि उबदार वाटते. 

Saturday, 1 June 2019

संजीव तांबे

संजीवची आणि माझी भेट होण्याआधी, त्याचे वडील माझ्या घरी आले होते. त्याचे वडील राम तांबे आणि माझी आई, एकाच कॉलेजमध्ये - सिद्धार्थ कॉलेजमध्ये शिकायला होते. त्यांची ओळख ही इतकी जुनी. त्यातून राम तांब्याचे भाऊ आमच्या घराला लागून असलेल्या हेमराज वाडीत राहायचे. कधीतरी भावाकडे तेंव्हा आले असणार आणि मग आलोच आहोत इथे तर मग आमच्याकडे जाऊया, या उद्देशाने आले. तसे पाहिले तर संजीव आणि मी, शाळेत पहिलीपासून एकत्र होतो. शाळेत आमची तशी बऱ्यापैकी ओळख होती. तेंव्हा संजीव झावबा वाडीत राहायचा पण लवकरच नाना चौकातील शास्त्री हॉल इथे सगळे कुटुंब गेले. अर्थात संपर्क तसा कमी झाला. पुढे माझा धाकटा भाऊ राजू आणि संजीवचा धाकटा भाऊ सुनील यांची बरेच वर्षे घनिष्ट मैत्री झाली होती आणि सुनील मात्र आमच्या घरी वारंवार येत असे. संजीव तेंव्हा अरुण चितळे आणि बावडेकर यांच्या सोबत बराच काळ एकत्रित होता. तसा संजीव, हेमराजवाडीत त्याच्या चुलत भावाकडे - मंदारकडे यायचा. तेंव्हा आम्ही सगळेच एकत्र खेळत असू आणि आमच्यात संजीव खेळायला यायचा.
शाळेतील एक अंधूक आठवण. शाळेच्या शेवटच्या मजल्यावरील गच्चीत, नार्वेकर बाईंनी दिग्दर्शन केलेल्या एकांकिकेच्या रिहर्सल आठवत आहेत. एकांकिका बहुदा ऐतिहासिक असावी कारण त्यात गीता महाराणी आणि संजीव राजसेवक भूमिकेत होते. 
अशीच एका एकांकिकेची धुसर आठवण आली. पाडगांवकर बाईंनी दिग्दर्शन केलेल्या एकांकिकेत रविंद्र गायतोंडे आणि डायमा (हा पुढे कुठे गेला?) यांनी प्रमुख भूमिका केल्या होत्या.गमतीचा भाग म्हणजे, दोघांच्या भूमिका त्यांच्या पिंडाच्या पूर्ण विरूद्ध होत्या!! 
काळाच्या भरधाव वेगात देखील काही क्षण स्मृतीत राहिले ज्यांना अक्षय चिरंजीवित्व लाभले अन्यथा जिथे दिवसांची फोलपटे होतात तिथे क्षणांचा काय पाड लागणार?
पुढे मला वाटतं , राम तांबे नगर पालिकेच्या निवडणुकीला आमच्या भागातून उभे राहिले होते. तेंव्हा माझा खऱ्याअर्थी तांबे कुटुंबाच्या समाजवादी विचारसरणीशी थोडाफार परिचय झाला. खरतर सगळे तांबे कुटुंबीय हे समाजवादी पक्षाशी बांधलेले आहेत. त्याचे इतर चुलत भाऊ म्हणजे विजय, राजीव इत्यादी याच विचारसरशी बांधील आहेत. त्यावेळेस, मी थोड्या प्रमाणात शिवसेनेशी जवळीक राखून होतो कारण आमचा शेजारी विलास अवचट. पुढे मात्र राजकारणाबाबत माझा बराच भ्रमनिरास झाला आणि मी राजकारण या विषयाला कायमची तिलांजली दिली. संजीव शास्त्री हॉल इथे राहायला गेल्यावर मात्र संबंध विरळ झाले. त्यानंतर एक घनिष्ट आठवण अशी आठवते, संजीवचे लग्न झाले तेंव्हा सुनीलच्या आग्रहाने आम्ही सगळे त्याच्या लग्नाला गेल्याचे आठवत आहे. पण लग्नातली भेट ही काही  स्मरणात राहणारी नव्हे. पुढे आमचा संबंध जवळपास तुटल्यासारखाच झाला. 
एकतर हे कुटुंब कट्टर समाजवादी आणि मी राजकारणापासून चार हात दूर. अर्थात जरी राजकीय मते न पटणारी असली तरी मित्र म्हणून संजीव नक्कीच जीवाभावाचा आहे. त्याला कवितेची सुंदर जाण आहे. संगीताचा शौक आहे. सर्वात मुख्य म्हणजे समंजस आहे. एक, दोन प्रसंग आहेत जेंव्हा त्याची चेष्टा करण्याच्या भरात मी मैत्रीची पातळी ओलांडली!! फार जास्त नाही पण जीभ घसरायला नको होती. बहुदा संजीवच्या देखील लक्षात आले असावे. मला तर लगेच लक्षात आले. अशाचवेळी संजीवने पूर्ण दुर्लक्ष केले. किंबहुना पुढे अनेकवेळा फोनवर बोलताना किंचीत देखील उल्लेख केला नाही. मला याचे फार अप्रूप वाटते. नात्याची वीण उसवत असताना पुन्हा घट्ट बसविणे, हीच मैत्रीची एक कसोटी असू शकते. 
अनेक मतभेदांच्या पलिकडे गेलेली ही मैत्री, याचेच मला खरे कौतूक वाटते.

Friday, 31 May 2019

नीला लाड

नीलाची आणि माझी ओळख म्हटले तर शाळेपासून आहे. माझा धाकटा भाऊ, राजू शाळेच्या नाटकांतून नेहमी कामे करीत असे आणि त्या गृपमध्ये नीला होती. नीलाचे नाटकातील काम मात्र आता आठवत नाही (तिला तरी आठवत असेल काय?) त्यानिमित्ताने नीला घरी यायला लागली. खरतर नीला आमच्यापेक्षा माझ्या आई-वडिलांशीच जास्त गप्पा मारायची. मी त्यावेळी "बाळू" होतो. मुलींशी बोलायचे!! बापरे!! या पार्श्वभूमीवर मी घरी आलेल्या नीलाबरोबर जेव्हड्यास तेव्हडे बोलत असे किंबहुना घरात ज्या गप्पा चालत, त्यात माझा सहभाग नाममात्र असे. त्यावेळी तिच्या भावाशी - सतीशबरोबर माझे मैत्री जमली होती (आजही आहे ). त्यातून शाळेपासून नीलाचा थोडा वचक असायचा. N.C.C.मधून दिल्ली च्या २६ जानेवारीच्या परेडसाठी झालेली निवड आणि त्यामुळे तिचा शाळेत तसा  दबदबा होता - हे इथले सगळे मान्य करतील.आमच्या घरी मात्र नीला फार वेगळी आणि मोकळी असायची ( हे मी आज लिहीत आहे, हे ध्यानात घ्यावे!!) त्यानिमित्ताने आम्ही दोन्ही कुटुंबे त्यावेळी जवळ आलो होतो. नीलाच्या आईबरोबर मात्र मी खूप बोलत असे. तिच्या आंबेवाडीतील घरी मी असंख्यवेळा गेलो असेन. 
पुढे नीला विल्सन कॉलेजमध्ये गेली आणि एकदा सतीशने बातमी आणली - आज विल्सन जिमखान्यावर नीलाची क्रिकेट मॅच आहे!! नीला क्रिकेट देखील खेळते, ही मला "बातमीच" होती. लक्षात घ्या, त्यावेळी Ladies Cricket आजच्यासारखे प्रकाशात आलेले नव्हते. सामन्याचा तपशील आता आठवत नाही. त्यामुळे एकूणच माझ्या मनातील प्रतिमा एकदम वेगळीच झाली. N.C.C. मधील पराक्रम, नाटकात कामे आणि आता क्रिकेट!! ही बया आयुष्यात काय, काय करते याचाच अचंबा होत होता. याच सुमारास तिचे, आताच्या भाषेत लिहायचे झाल्यास  अनिलबरोबर "डेटिंग" सुरु झाले होते ("अनिल" नावाची माणसे किती सहिष्णू, सर्वसमावेशक आणि शांत प्रवृत्तीची असतात, हे इथे काही जणांना नक्कीच मान्य व्हावे!!)  आणि मला वाटतं ग्रॅज्युएट होण्याआधीच नीला बोहल्यावर चढली!! तिच्या लग्नाला गेल्याचे आठवत आहे. पुढे नीला वाशीला राहायला गेली आणि माझ्या भेटी तुरळक झाल्या. कधीतरी गिरगावात येणार तेंव्हा तिच्या घरी पहिल्यांदा जाणे, क्रमप्राप्तच होते. 
नंतर मी देखील परदेशी गेलो आणि जरी ओळख असली तरी भेटी संपल्यातच जमा होत्या. सुटीत जेंव्हा मी घरी यायचो तेंव्हा कशीतरी चर्चगेट स्टेशनसमोरील तिच्या ऑफिसमध्ये भेटायला जात असे. तेंव्हा नीला आजच्यासारखी "वजनदार" झालेली नव्हती. सहज भेट मिळत असे!! मला वाटते, २००३/४ पर्यंत ती या ऑफिसमध्ये होती. अर्थात मी चुकत असेन कारण मी तिला भेटणार ते मी सुटीवर येणार तेंव्हा. पुढे समजले, नोकरीनिमित्ताने ती सिंगापूरला गेली. पुढील वाटचालीतील ही एक महत्वाची पाऊलखुण होती, हे आता समजते. आता ती देखील परदेशी म्हटल्यावर भेट तर दूरच राहिली, निदानपक्षी फोनवरचे बोलणे देखील दुरापास्त झाले. पुढे सतीशबरोबर बोलताना कळले, नीला आता दिल्लीला फार वरच्या पोस्टवर आलेली आहे. तेंव्हा मात्र एकाबाजूने अभिमान तर दुसऱ्या बाजूने खऱ्या अर्थी दबदबा जाणवला. आपली एक  मैत्रीण,सरकारी खात्यात  पदावर कार्यरत आहे, ही निश्चितच अभिमानास्पद बाब होती/आहे. त्यातून दिल्ली तो  बहोत दूर है, हे मनावर बिंबलेले!! पुढे शाळेचा गृप झाला आणि तिचा फोन नंबर मिळाला. अर्थात एकमेकांच्या कुटुंबांची चौकशी झाली. तिचे नेहमी म्हणणे असायचे ( आता मुंबईत बदली झाली म्हणून "असायचे" हा  शब्द) मी दिल्लीला यावे. इथे मला मुंबई बाहेर पडणे जमत नव्हते तिथे दिल्ली काय जमणार!! 
नीलाचे एका बाबतीत कौतुक करावेसे वाटते, इतक्या वरच्या पदावर काम करीत असताना देखील नीलाचे पाय जमिनीवरच राहिले. मी तर तिला कितीवेळा अडनिड्या वेळी फोन करीत असतो तरी ती फोन उचलते आणि "अनिल, मी मीटिंगमध्ये आहे, काही काम आहे का? नसल्यास नंतर फोन करते" इतपत बोलते आणि खरतर आश्चर्य वाटू नये पण वाटते, पण त्याच दिवशी संध्याकाळी माझा फोन खणखणतो!! मोबाईलवर "नीला लाड" हे नाव झळकते!! बोलायला ती अजूनही तशीच आहे, माझी चेष्टा स्वीकारण्याइतपत समंजस आहे आणि जेंव्हा संधी मिळेल तेंव्हा माझे पाय खेचण्याची तयारी देखील दाखवते. इथे आता गृपवर माझे "पंडितजी" हे नाव मला बहुदा कायमचे चिकटलेले आहे. खरतर माझे बारसे झाले तेंव्हा माझ्या आई-वडिलांनी माझे नाव "अनिल" ठेवले आहे , हे आता नव्याने सांगायची वेळ आली आहे. असो, मला तसे कुणी गंभीरपणे स्वीकारतच नाही त्याला कोण काय करणार आणि अशी पाळी आणण्यामध्ये नीलाची भूमिका मध्यवर्ती आहे!! एका बाजूने नीलाचा अभिमान वाटतो आणि तरीही फोनवर बोलताना,  " काय ग नीले" असे बोलण्याचा आनंद घेता येतो. आणखी एक विशेष सांगायचं  राहिला,फोनवर बोलताना नीला आपला मानमरातब सहजपणे बाजूला ठेवते आणि मोठ्या आवाजात हसते. हे जरा नवलच आहे म्हणा पण म्हणूनच ती "नीला लाड" आहे. फक्त गृपतर्फे एकच इच्छा, दिल्लीला होती तेंव्हा गृपमधील कार्यक्रमांना हजर राहणे अशक्य होते पण आता "माहेरी" आली आहेस तर कधीतरी एखाद्या कार्यक्रमाला "दर्शन" द्यावे!!

Thursday, 30 May 2019

अलका देसाई

आपला गृप स्थिरस्थावर होण्याच्या काळात, सुरवातीला बरीचशी नावे अनोळखी होती. बरे, फोटो बघून ओळखणे फारच दुरापास्त होते. मी ज्यांना प्रत्यक्ष ओळखत होतो, त्यांचे चेहरे देखील बरेच बदललेले होते तिथे अनोळखी चेहऱ्यांबद्दल काय बोलायचे. अशा वेळेस, मी संजीव तांबेला फोन केला होता आणि त्याच्याकडून काही ओळखी निघतात का? अशी पृच्छा केली. त्यावेळी माझ्या कानावर अलकाचे नाव आले आणि सर्वात गमतीचा भाग म्हणजे इयत्ता पहिलीपासून, संजीव, मी, अलका, नेत्रा अशी काही नावे चिकित्सक शाळेत एकत्र होतो. अनिल थक्क!! इतकी जुनी ओळख असून चेहरा अजिबात परिचित वाटत नव्हता, किंबहुना कसलीच ओळखीची खूण डोळ्यासमोर येत नव्हती. नेत्रामध्ये केसाचा भाग सोडला तर फारसा फरक पडला नव्हता आणि नेत्रा तेंव्हा शाळेतील  खेळांमध्ये नेहमीच सहभागी असायची म्हणून ओळख होती. अर्थात पुढे पिकनिकमध्ये प्रत्यक्ष भेट झाली पण त्याआधी फोनवर बोलाचाली सुरु झाल्या होत्या. 
एक इथे मान्यच करायला हवे, सुरवातीला मी अलकाशी थोडा जपूनच बोलत होतो आणि ती देखील जशास तसे बोलत असायची. बरेचवेळा तिची खिल्ली उडवावी,असे मनात यायचे पण "प्रथमाग्रासे मक्षिकापात:" नको म्हणून तोंड आवरायचो. असे बरेच दिवस चालू होते आणि आमची संवादाची गाडी जेमतेम उपचारापुरतीच चालायची. एकदा मी प्राचीशी फोनवर बोलताना अलकाचा विषय काढला आणि तिच्याशी बोलताना, औपचारिकपणा फार आड येतो असे बोललो. हे ऐकल्यावर "जाऊबाई" लगेच तिची बाजू घेऊन, बोलायला लागल्या!! अलका फार मजेशीर बोलते, हसरी आहे वगैरे मुक्ताफळे बोलताना उधळली. आता एक पुणेकर दुसऱ्या पुणेकराची बाजू घेणारच - हा सांस्कृतिक प्रभाव आहे म्हणा!! खरतर पिकनिकमध्ये देखील मी अलकाशी फार बोलल्याचे आठवत नाही त्यामुळे या पार्श्वभूमीवर पुढे असाच कधीतरी फोन केल्यावर मी थोडा खवचटपणा केला आणि पलीकडून सणसणीत उत्तर आले!! अनिलचा श्वास हलका झाला. मनात आले, पक्की "पुणेकरीण" दिसत आहे. एकीचा अनुभव घेतच होतो आणि तिच्या जोडीला दुसरी खमकी पुणेकरीण आली. 
एक मात्र नक्की, आजही अलका माझ्याबरोबर पहिली पासून चिकित्सकमध्ये होती, हे चित्र काही पुरेसे स्पष्ट झालेले नाही. मला नेहमी जशास तसे, ही प्रवृत्ती भावते आणि मी ते सुख उपभोगतो. उगीच मी बरा, तू बरा, असले शिळोप्याच्या शिळे बोलणे फारसे पचनी पडत नाही. दोन ठोश्याना निदान एक तरी ठोसा द्यावा, ही माझी वृत्ती. हळूहळू "मूळा-मुठेचे" पाणी जाणवायला लागले. अर्थात गेली जवळपास ३०, ३५ वर्षे पुण्याला राहिल्यावर वाण नाही तरी गुण लागणारच म्हणा. त्यातून कुणी खमक्या पुणेकर भेटला की मला मनापासून आनंद होतो. इथे तर दोन दोन पुणेकर!! पुणेकरांचे तिरकस बोलणे अलकाच्या बोलण्यात नेहमी येते कदाचित मी देखील तसाच बोलतो म्हणून अलका बोलत असेल. तशी ती खळखळून हसणाऱ्यातली नाही. फोनवर हसली तर कान  देऊन ऐकायला लागते!! 
मला तिचा काही बाबतीत फार हेवा वाटतो. अलकाला कधीही फोन करा, एकतर तिच्या घरी कुणीतरी जेवायला आलेले असते किंवा ती तरी कुणाकडे जेवायला जात असते!! सतत दुसऱ्याला जेवायला घालण्यात तिला विलक्षण आनंद मिळतो अर्थात अस्मादिकांचा यात अजून नंबर लागलेला नाही कारण जेंव्हा केंव्हा मी पुण्याला जातो तेंव्हा ही कुठेतरी जेवणाच्या कार्यक्रमात गुंतलेली असते किंवा घरात पाहुणे आलेले असतात. गेले वर्षभर माझ्या पुण्याच्या फेऱ्या जरा जास्तच वाढल्या आहेत पण प्रत्येक फेरीत, फोन केल्यावर बाईसाहेबांच्या घरी कुणी आलेले नाही, असे झालेच नाही!! एकदा मी तिला फोनवर बोललो देखील, "पुणेकरआगत स्वागत करताना हात राखून ठेवतात का?" माझा स्वभाव बघता तिने सावध व्हायला पाहिजे पण गफलतीने बाईसाहेब बोलून गेल्या - मी कधी रे हात राखून वागते? मला हेच उत्तर अपेक्षित होते आणि  "मग,एका खमक्या मुंबईकराला अजूनही आमंत्रण मिळत नाही, याचा नेमका कसा अर्थ घ्यायचा?" इथे बाईसाहेब थोड्या वरमल्या. खरे तर हा मला आश्चर्याचा धक्काच होता. अस्सल पुणेकर आणि इतक्या लगेच गप्प!! मग लक्षात आले, अलका पुणेकर असली तरी जन्मस्थान मुंबई!! मातीचा म्हणून काही गुण असतोच की. वास्तविक ती स्वतःला पुणेकरच म्हणवून घेते - म्हणवून घेणारच, सासर पुण्याचे म्हटल्यावर कुठेतरी लळा लागणारच!! एक नक्की, पुणेकर आणि मुंबईकर अशी तुलना करणे आणि एकमेकांना टोमणे मारणे, हा आमच्या संभाषणातील निखळ आनंद आहे. इतक्या लोकांचे स्वागत करणारी अलका, तिच्या घरी मात्र मी एकदाच गेलो होतो पण जेवायला नाही!! 
आज साठीला आलेली असताना देखील अलकाची फिरायला जाण्याची इच्छा मात्र जबरदस्त आहे. सारखे कुठेतरी फिरायला जात असते. तशा आमच्या साध्या विषयांवर देखील गप्पा होतात पण हे उद्मेखूनपणे सांगावे लागते कारण गप्पांची अखेर कुठल्यातरी टोमण्यानेच होते. चैनच पडत नाही. आमचा तसा एकमेकांना दर आठवड्याला फोन होतो मुख्य म्हणजे पुणेकर असून ती मला फोन करते!! बाब थोडी अविश्वसनीय आहे पण विश्वास ठेवावा अशी आहे - जन्मस्थान मुंबई असल्याचा हा पुरावा म्हणायचा का? वरती मी उल्लेख केला तसे तिला पण मी शाळेतला अनिल असा आठवत नाही ( हे मात्र फार छान !!) आणखी एक बाब, मी लिहिलेल्या बहुतेक लेखांवर ती प्रतिक्रिया देत असते!! हा मैत्रीचा खरा गैरफायदा आहे पण ती उत्तर पाठवते. इतर पुणेकरांनी काहीतरी शिकण्यासारखे आहे अर्थात मुंबईकरांना देखील हेच वाक्य लागू होते म्हणा. अलका गात नाही (हे भाग्य म्हणायचे का?) पण तिला बरीच गाणी पाठ आहेत आणि ती जेंव्हा मला उत्तर पाठवते त्यावरून ध्यानात येते. 
 असो, आजही समजा माझा फोन झाला नाही तर "का फोन केला नाहीस?' असा फोन देखील तिचा येतो. कधी माझी तब्येत बिघडली असेल तर तिच्या बोलण्यात काळजी उमटते. 
मैत्रीच्या नात्यात या पेक्षा अधिक काही अपेक्षा ठेवू नये.