Thursday 19 June 2014

साउथ आफ्रिका – जोहानसबर्ग २



जेंव्हा मी या शहराचा विचार करतो तेंव्हा, काही गोष्टी लगेच ठळकपणे ध्यानात येतात. पहिला विचार – या शहराचा विस्तार!! मुंबई जेंव्हा डोळ्यासमोर येते तेंव्हा त्याच्या समोर, हे शहर प्रचंड मोठे आणि विस्तारलेले आहे. दुसरे म्हणजे, मुंबईची लोकसंख्या आणि त्यामुळे झालेली परवड. तसा प्रकार या शहरात झालेला नाही. शहर अत्यंत योजनाबद्ध पद्धतीने वाढलेले आणि वाढवलेले आहे. इथे, वाहतुकीचा खोळंबा होतो पण तो बहुतेकवेळा सकाळी ऑफिसच्या वेळी किंवा संध्याकाळी ऑफीस सुटताना!! अन्यथा इथे वाहतूक आत्यानी सुरळीत चाललेली असते. वाहतुकीचे नियम हे पाळण्यासाठी असतात, हे इथल्या लोकांच्या मनावर ठामपणे बिम्बलेले आहे. कुठे वाहतूक अडकली असेल तर, लगेच Road Petrol Guards तिथे पोहोचून, अडकलेली वाहने आणि रहदारी मार्गी लावून देतात. इथली लोकसंख्या लाखांच्या घरात आहे आणि गाड्या देखील त्याचप्रमाणात रस्त्यावर धावत असतात पण, कुठेही(अपवाद वगळता!!) गडबड, गोंधळ नसतो. गाडीचा हॉर्न कितीतरी वेळा वाजवण्याची गरजच भासत नाही. गाड्या सिग्नलपाशी थांबतात, सिग्नल सुरु झाला की आपापल्या मार्गाने निघून जातात. हॉर्न वाजवायचा कशासाठी?? इथे गाड्यांचे अपघात होतात, याचे प्रमुख कारण म्हणजे बेपर्वाई!! आणि दुसरे कारण, अति ड्रिंक्स घेऊन गाडी चालविणे!! अर्थात, बेपर्वाईने गाडी चालविणाऱ्यात काळे ड्रायवर प्रमुख!! इथे, सर्वात धास्ती कशाची वाटत असेल तर, Taxi चालविणारे!! हे अधिकतर काळेच असतात आणि ते मात्र वाहतुकीचे नियम धाब्यावर बसवून गाड्या हाकीत असतात. अति ड्रिंक्स घेऊन गाडी चालविणारे मात्र अति धीकादायक!! इथे अशा अपघातांची संख्या जास्त आहे, विशेषत: ख्रिस्तमसच्या वेळी तर, प्रकार अधिक घडतात. इथल्या पोलिसांनी, एक उपकरण शोधले आहे आणि त्याद्वारे, ते, तुम्हाला श्वास घ्यायला लावून, तुम्ही किती ड्रिंक्स घेतले आहे, याची तपासणी करू शकतात. तरी देखील अपघात होतातच. या वर्षी, इथे फक्त जोहानसबर्ग शहरातच जवळपास १२०० लोक ड्रिंक्स पिऊन गाडी चालविल्याने प्राणास मुकले!! अन्यथा, इथे अपघात होण्याचे काहीच कारण नाही. गाड्या अतिशय दणकट आणि सुंदर व रस्ते त्यालाच सोयीस्कर असल्याने, इथे ड्रायविंग कारणे, हा एक आनंदाचा भाग असतो.
आर्थिक व्यवहाराचे केंद्रबिंदू असलेले हे शहर, एकूणच अति व्यावहारिक आहे. इथे रस्त्यात गाडी बिघडली तर, तुम्हाला, इंश्युरंस कंपनीला फोन करावा लागतो. कुणी तरी आपली गाडी थांबवून आपल्याला मदत करील, हीं आशा, इथे फोल आहे. अर्थात, यात लोकांना दोष देणे चुकीचे आहे. समजा, मी गाडी थांबवून मदतीचा हात पुढे केला, आणि जर का तो गुन्हेगार निघाला तर, आपले प्राण संकटात!! असे प्रकार इथे बरेच वेळा घडले असल्याने, कुणी तसे धाडस करीत नाही. इथे अर्थातच “पैसा” भरपूर आहे आणि याचे कारण, इथे जगातील बहुसंख्य मोठ्या कंपन्यांची ऑफिसेस आहेत. इतर शहराच्या मानाने, इथे महागाई आहे, घरे देखील महाग आहेत, गाड्या देखील त्याच मार्गावर आहेत. तरीदेखील, इथे नोकरीसाठी भरपूर संधी उपलब्ध आहेत. “पैसा” भरपूर असल्याने, त्या पाठोपाठ गुन्हेगारी आलीच!! इथे, लोकल काळे तर सोडूनच द्या, पण नायाजेरीयावरून आलेल्या काळ्यांनी आपले बस्तान गुन्हेगारी जगात ठामपणे बसविले आहे. अगदी, ड्रग्स, स्मगलिंग आणि वेश्या व्यवसाय, यात नायजेरियन लोकांचा हात बराच आहे. पण, थोडा विचार केला तर, हे धंदे कुठल्या शहरात नाहीत!! फक्त, इथे सुरक्षा हा मात्र अधिक चिंतेचा विषय आहे.अर्थात, फक्त काळ्यांना का दोष द्यावा, कधीतरी भारतीय वंशाचे लोक, गोरे लोक आणि कलर्ड लोक देखील या गुन्हेगारी जगात आढळतात.
इथे वेश्या व्यवसाय मात्र बराच आहे. प्रत्येक उपनगरात त्यांची वस्ती आढळते. इथे, अगदी रोजच्या वर्तमानपत्रात देखील त्यांच्या जाहिराती येतात!! इथे सेक्स हा एक मूलमंत्र आहे, असे म्हणायला प्रत्यवाय नसावा. याचा प्रत्यय, कितीतरी हॉटेल्समध्ये येतो. इथे बरेच ठिकाणी, अगदी NUDE Clubs देखील आहेत!! एव्हढे कमी आहे की काय, म्हणून, मागील वर्षापर्यंत, चक्क E Net(इथे SABC 1,2,3 आणि E Net हीं Channels आपल्या दूरदर्शनप्रमाणे सर्वत्र उपलब्ध असतात!!) या channel वर, दर शनिवारी रात्री बारानंतर, पुढील चार तास, सतत Porn Movies दाखवीत असत!! फक्त, असे चित्रपट दाखवायच्या आधी एक ठळक सूचना येत असे, बस!! आताच, काही महिन्यांपासून असे चित्रपट बंद झाले. आता, याला काय म्हणायचे!! अशा परिस्थितीत इथे एड्सचा प्रादुर्भाव होणार नाही तर काय!! त्यामुळे, इथे नेहमीच्या जाहिराती, विक्री अशा दैनंदिन गोष्टींवर, याच सेक्सचा परिणाम झाल्याचे दिसून येते. काळ बदलाल असे आपण नेहमी म्हणतो, पण हा काळ कुणी बदलला, याचे उत्तर मात्र शोधायच्या भानगडीत पडत नाही. आणि प्रत्येक वेळेस, “आमच्या वेळी हे असे नव्हते” असले रडगाणे लावायचे. प्रत्येक पिढी हीं पुढील पिढीला नावे ठेवीत असते आणि हे युगानुयुगे चालू आहे, पण जी नवीन पिढी बिघडलेली आहे, तिला बिघडवण्याचे काम मात्र मागील पिढीच करीत असते, हे सोयीस्कररित्या विसरले जाते. हल्ली, मुलींचा मोकळेपणा अधिक वाढलेला आहे, असा एक सर्रास आरोप केला जातो, पण यात काही तथ्य नाही. अगदी, उदाहरणच द्यायचे झाल्यास, कालिदासाच्या काळात, राजा दुष्यंताने शकुंतलेच्या बाबतीत काय वेगळे केले? अगदी, रामाच्या काळातदेखील सगळ्या स्त्रिया काही सीता नव्हत्या. मुली आणि त्यांना फसविणे आणि त्याचा बाजार अस्तित्वात असणे, या गोष्टी फार प्राचीन काळापासून चालत आलेल्या आहेत. तेंव्हा, आताच काळ बिघडलेला आहे, अशी हाकाटी मारण्यात काही अर्थ नाही. काळानुरूप, बिघडण्याचे स्वरूप बदलत जाते, इतकेच. तेंव्हा, जोहानसबर्ग शहरात, शीलाचा व्यापार बराच अस्तित्वात आहे, म्हणून नावे ठेवण्यात काहीच अर्थ नाही. असो, आता पुढील भागात, आपण डर्बन शहराबद्दल वाचूया.

No comments:

Post a Comment