Thursday 19 June 2014

सुगम संगीत – एक तौलनिक विचार – भाग ७



गाण्याची चाल, हाच विषय आणखी थोड्या वेगळ्या प्रकारे बघूया. मागे आपण, गाण्याची चाल “गुणगुणता’ यावी, असा विचार बराच मान्यताप्राप्त आहे, याबद्दल चार शब्द मांडले होते. एक तर गोष्ट मान्यच करायला हवी आणि ती म्हणजे, “चाल” ही प्रथमक्षणी मनात भरणे, आवश्यक असते. कधी कधी, गाण्याचा पहिलाच सूर, अतिशय उच्चरवात येतो आणि ऐकणारा थोडासा चकितच होतो पण तरीही खूपवेळा असे दिसून येते की सुरवातीचा “चकित” होण्याचा भर ओसरला की पुढे ती चाल थोडी सपक होते. म्हणजे, त्या सुराला अनुलक्षून पुढचा प्रवास घडत नाही. कधी कधी असेही बघायला मिळते की शब्द काय आहेत याचा फारसा विचार न करता, काहीतरी वेगळे करायचे, या ध्यासातून “वरच्या” सुरात चाल बांधली जाते. एक उदाहरण इथे बघूया. लताचे, “जब रात नाही कटती” हे गाणे ऐकावे. संगीतकार हंसराज बहेलचे संगीत आहे. गाणे पहिल्यापासून अति तार सुरात सुरु होते, पहिल्या अंतऱ्यानंतर, ठाय लयीतच गाणे शांत सुराकडे वळते पण परत समेवर येताना, वरची “पट्टी” गाठली जाते. वास्तविक, गाणे विरही व्यथेचे आहे आणि चित्रपटात नायिकेचा प्रेमभंग होतो आणि त्यात ती व्याकूळ होऊन प्रस्तुत गाणे म्हणत असते. इथे, नेहमी मनात प्रश्न येतो, तो असा की, इथे हाताशी लताचा असामान्य गळा आहे, म्हणूनच की काय अशी तार स्वरातली चाल बांधली गेली? लताचा गळा, हा वेगळा प्रकार आहे, तिथे अगदी पाचव्या पट्टीत देखील तार स्वरातला “सा” अप्रतिम गळ्यातून येतो. पण, म्हणून खरच अशा चालीची गरज होती का? असा प्रश्न मनात येतो. त्यामुळे, सुरवातीचा चकित होण्याचा भाग संपला की लगेच आपल्याला त्या स्वरांची सवय होते आणि नंतर चाल कशी वळणे घेत समेवर येणार आहे, हे समजून घेता येते. म्हणजे, चाल अवघड होत आहे, असे वाटत असताना, त्यातील सोपेपणा लक्षात येतो.
काही संगीतकाराचा पिंडच असा असतो की, ते नेहमीचा सरधोपट मार्ग न स्वीकारता, नेहमी काहीतरी स्वत:चा विचार, contribution असणे जरुरीची आहे, अशा विचाराने चाली निर्माण करतात. इथे ‘सरधोपट” म्हणजे “बेचव” चाल नव्हे. पण,बहुतेकवेळा, एक शैली प्रस्थापित झाली की, त्याच शैलीत गाणी बांधली जातात. कधीतरी आपल्या नेहमीच्या आराखाड्याच्या बाहेर जाऊन विचार करीत नाहीत.बहुदा, त्यांनी जी शैली निर्माण केलेली असते, त्याला “लोकमान्यता” मिळालेली असते आणि त्याच यशात गुंतून, मग ते संगीतकार लाधीच त्या चक्रातून बाहेर पडत नाहीत. त्यामुळेच, मागे मी म्हटले तसे, चालींमध्ये “तोचतोच” पणा डोकावायला लागतो आणि ती गाणी अत्यंत “मिळमिळीत” वाटायला लागतात. अर्थात, मघाचा मुद्दा पुढे आणून बोलायचे झाल्यास, काही संगीतकार, आपल्या पिंडाला मानवतील अशाच प्रकारे चाली बांधत असतात, मग भले लौकिक यश कधीही प्राप्त झाले नाही, तरी त्यांना परवडते!! काही नावे, या संदर्भात घ्यायची झाल्यास, हिंदीत “अनिल बिस्वास”,”जयदेव”,”सलील चौधरी” अशी नावे आठवतात तर मराठीत, “श्रीनिवास खळे”,”हृदयनाथ मंगेशकर” ही नावे उद्मेखूनपणे घेता येतील. अर्थात, वरील यादीत आणखी बरीच नावे घालता येतील. इथे आपल्याला केवळ संदर्भ, या दृष्टीने बघायचे असल्याने, ही प्रातिनिधिक नावे घेतली.
साधारणपणे, कुठल्याही रचनेची बांधणी बघितले तर आपल्याला असे दिसून येईल की, ही रचना दोन स्तरावर वावरत असते. वेगळ्या शब्दात मांडायचे झाल्यास, प्रत्येक रचनेत, १] Organic आणि २] Inorganic अशी रचना असते. आता, पहिला भाग – Organic रचना म्हणजे जी रचना आपण ऐकत असतो, त्यात शब्द, चाल आणि गायन हे तिन्ही घटक प्रत्यक्ष अस्तित्वात असतात, ती रचना. दुसर भाग – Inorganic रचना. इथे खऱ्याअर्थी “भाव” अनुभवता येतो.भावसंगीत, या शब्दाचा नेमका अर्थ इथे अनुस्यूत असतो, जो नेमक्या शब्दात मांडणे फार अवघड असते. शब्दाचा आशय, प्रमुख वाद्यमेळामागील अंतर्गत स्तरावर वाजत असलेला दुसरा वाद्यमेळ आणि गायनातील भाव अशा गोष्टी, Inorganic रचना, या शब्दात सामावलेल्या आहेत.
संगीतकाराची खरी कसोटी ही, या दोन्ही भागात लागत असते. खर तर, कुठल्याही गाण्याचा “मुखडा” हे खरे यश असते, असे थोडक्यात म्हणता येईल. आता, “मुखडा” म्हणजे, गाण्याची “अस्ताई”. सुरवातीची चाल, असे साध्या शब्दात म्हणता येईल. तो मुखडा सुचणे, इथेच गाण्याचे अर्ध्याहून अधिक यश सामावलेले आहे. आता, हेच वाक्य जरा विस्ताराने बघूया. कवीचे शब्द हातात आहेत, संगीतकार त्याला कशा प्रकारे सुरात बांधायचे, या विचारात असताना, सुरवातीच्या ओळीला जे सूर लाभतात, त्याला सर्वसाधारणपणे “मुखडा” असे म्हणता येईल.अर्थात, जिथे “चाल” आधी तयार असते, तिथे “मुखडा” आधीच तयार असतो, फक्त योग्य शब्दांची जोड आवश्यक असते, ज्याला “धृवपद” असे म्हणता येईल.एकदा की मुखडा तयार झाला की मग पुढची बांधणी खूपशी सुरळीत होऊ शकते. वेगळ्या शब्दात, मुखडा म्हणजे रचनेचा “पाया” ज्यावर गाण्याचा पुढील विस्तार अवलंबून असतो.नंतरचा भाग म्हणजे त्या मुखड्याची सजावट करून, ती इमारत देखणी करणे.
कधीकधी, सजावट(च) इतकी देखणी असते की मग पाया भुसभुशीत असला तरी चालू शकते!! पण, हा, या संगीताचा विपर्यास आहे. या सुरात वेगळा विचार इथे मांडता येईल. “चाल” कठीण आहे किंवा अवघड आहे, असा एक विचार सुगम संगीतात नेहमी ऐकायला येतो. आता, चाल अवघड आहे, म्हणजे काय? जी चाल गुणगुणायला त्रासदायक ठरते, ती चाल कठीण, असा सर्वमान्य समज आहे. पण, यात दुसरा भाग अंतर्भूत आहे आणि तो म्हणजे, जी चाल कठीण आहे, तीच चाल दुसरा गायक सहजतेने गाऊ शकतो!! म्हणजे, जे सामान्य रसिक आहेत, त्यांच्या दृष्टीने ती चाल कठीण असते. आता इथे आपण उदाहरण बघूया. मागील प्रकरणात, मी एका गाण्याचा वेगळ्या संदर्भात उल्लेख केला होता. श्रीनिवास खळे यांचे,”या चिमण्यानो परत फिरा” हे गाणे बघूया. पुरिया धनाश्री रागावर सुरवातीचा मुखडा बांधलेला आहे. पहिल्या ओळीचा शेवट “रे” या शब्दाने होतो, म्हणजे ती ओळ अशी आहे,”या चिमण्यानो परत फिरा रे”, इथे “रे” या शब्दावर कोमल निषाद असा काही अप्रतिमरीत्या स्थिरावलेला आहे, की ती चाल एकदम वेगळेच वळण घेते, कशी घेते, तर पुढील ओळ ही मारवा रागात शिरते!! तिथे मग परत, मारवा रागाचे वैशिष्ट्य असलेले, कोमल निषाद आणि कोमल रिषभ आहेतच पण ते अतिशय वेगळ्या अंगाने अवतरतात.चालच पूर्ण वेगळी होते.अर्थात माडगूळकरांचे प्रत्ययकारी शब्दांचे नेमके “वजन” त्या चालीतून अवतीर्ण होते. इथे वर वर्णिलेले कोमल निषाद जसे स्वत:च्या अंगभूत सामर्थ्याने येतात, त्या येण्यानेच त्या चालीचे पुढील वळण,वेगळे होते. संगीतकाराचे वैशिष्ट्य असे की, या स्वरांच्या करामतीत लय कुठेही बदलत नाही की आशयाला कुठेही “धक्का” पोहोचत नाही. फार, फार सुंदर रचना जी प्रत्येक सुगम संगीताच्या अभ्यासकाला आव्हानात्मक अशी झाली आहे.
आपण दुसरे उदाहरण बघूया. लताच्या आवाजातील, जयदेव या संगीतकाराने तयार केलेली “मै आज पवन बन जाऊ” हे गाणे बघूया. चाल सुरवातीला राजस्थानी पिलू रागावर जाते. वास्तविक हा पिलू(च) राग फक्त राजस्थानचे लोकसंगीत मिसळून आलेला, त्यामुळे सुरावटीतच त्या मातीचा “खुमार” मिसळलेला. मुखड्यातच, चाल वरच्या पट्टीत शिरते आणि तिथेच गिरकी घ्यायला लागते आणि ती रचना अवघड बनून जाते. त्यातून, लताने आपल्या गायनाने आणखी कठीण करून ठेवलेली आहे. इथे देखील, अस्ताईची रचना आणि नंतर पहिल्या अंतऱ्यानंतर सुरु होणारी सुरावट इतकी भिन्न होते की गाणे समेवर कसे येईल, याचा संभ्रम पडावा.
आता, या दोन्ही गाण्यांचा विचार केला तर असे दिसून येईल की, ऐकायला ही गाणी अतिशय “सुश्राव्य” वाटतात पण प्रत्यक्ष ऐकताना, त्या रचनेतील अनेक “छुपी” वळणे, हरकती, बारीक मुरक्या या अलंकारांनी संगीत रचना अवघड बनून जाते. अशी गाणी फार “फसवी” असतात म्हणजे ही गाणी सोपी वाटतात पण गाताना अवघड होतात आणि हा या संगीतकारांच्या व्यामिश्रतेचा “विजय” म्हणावा लागेल. अशी गाणी तशी लगेच प्रसिध्द होत नाहीत, याचे मुख्य कारण, लोकांना प्रथमक्षणी पचनी पडत नाहीत. तेंव्हा, मुद्दा असा आहे की, “चाल” कठीण आहे म्हणून गाणे दुर्लक्षित करणे योग्य नाही. हा, या आणि अशा काही संगीतकारांच्या “पिंडाचा” भाग आहे.
अर्थात, याचा अर्थ असाही नव्हे की, कठीण गाणी, हाच गाण्याचा एकमेव मानदंड ठरावा. अत्यंत सरळ तसेच अति अवीट गोड चलनाची गाणी देखील फार अवघड असतात. त्या गाण्यांची काही उदाहरणे आपण, पुढील भागात बघूया.

No comments:

Post a Comment