Wednesday 27 April 2022

साहित्यिक वास्तवता - एक मूल्य - भाग ५

साहित्यात सामाजिक प्रतिबिंब दिसते ही बाब एका निराळ्या प्रकाराने सुद्धा करण्याचा प्रयत्न होतो. कलाकृतीत कलावंताच्या अनुभवाचा आविष्कार होतो ही गोष्ट सहजपणे मान्य केली जाते. अर्थात त्याच जोडीने हे देखील मान्य केले जाते - कलाकृतीच्या मुळाशी माणसाचे व्यक्तिमत्व असते. वेगळ्या शब्दात मांडायचे झाल्यास, या व्यक्तिमत्वाची २ टोके असतात. १) सहजप्रेरणेचे आणि २) सामाजिक जाणिवेचे. सामाजिक जाणिवेचे टोक, यात त्या व्यक्तीची जी सामाजिक मूल्ये असतात किंवा वृत्ती असतात, जी वास्तवता विषयक - Concept of Reality, असते, ती अंतर्भूत असते. व्यक्तीला जी एक जीवनविषयक वस्तुनिष्ठता प्राप्त झालेली असेल, ती या टोकाला असते. दुसरे टोक सहजप्रेरणेचे!! हे टोकाच्या पहिल्या क्रियाप्रतिक्रियांना अनुसरून भावना उत्पन्न करते. परंतु दोन्ही टोकाच्या परस्परांवर क्रियाप्रतिक्रिया चाललेल्या असतात आणि यामध्ये भावनेला विशिष्ट स्वरूप देणारे पहिले सामाजिक जाणिवेचे टोक असते. म्हणूनच व्यक्तिमत्वाचा कुठलाही अनुभव हा एका टोकाला जो Concept of Reality असेल तिचाच आविष्कार ठरतो. वेगळ्या शब्दात मांडायचे झाल्यास, तो वैय्यक्तिक असूनही जेवढ्यापुरती, जितकी व्यापक, ज्या पातळीवर असते तेवढ्या जगाच्या वास्तवतेचा तो आविष्कार ठरतो. अर्थात यात काही प्रश्न अंतर्भूत होतात. व्यक्तिमत्वाची दोनच टोके आहेत असे मानायचे का? आणि ती देखील टोकेच आहेत का? हे सगळे Dialectics चा उपयोग करता यावा म्हणूनच ना!! सहजप्रेरणांचे सामाजिकीकरण झाले आहे, असे म्हटल्यावर सहजप्रेरणा आणि सामाजिक जाणीव, यांच्यात विरोध का कल्पायचा? सामाजिक जाणीव म्हणजे काय? इत्यादी प्रश्न उद्भवू शकतात. त्यादृष्टीने बोलायचे झाल्यास, मार्क्सवाद्यांचे विचार करायचे तंत्र आणि त्याच विचारातून काढायचे निष्कर्ष आधीच ठरून गेलेले असतात. आणि त्यासाठी ते कशी गळचेपी करतात, हे वरील विवेचनावरून समजून घेता येईल. असो, आपल्या दृष्टीने वरील विवेचनातून एकच मुद्दा महत्वाचा म्हणून समोर येतो. तो असा, मानवी व्यक्तिमत्वाच्या मुळाशी एक Concept of Reality असते. प्रत्येक माणसाच्या मनात मूर्त किंवा अमूर्त स्वरूपात वरील विधान नेहमीच अस्तित्वात असते. परंतु Concept of Reality याला व्यक्तिमत्वाचा पाया मानणे मानसशास्त्राला कितपत मान्य होईल? तसेच मघाशी जे विवरण केले,त्याचा वेगळा अर्थ लावायचा झाल्यास, काव्यात जे काही असते ते Concept च्या चौकटीत बसवता येते आणि त्यात एक Conceptual संगती असते. परंतु काव्यात व्यक्त होतात, त्या Concepts नसतात. काव्याचा मूलभूत घटक हा प्रतिमा (Image) असतो. आणि या प्रतिमेची संगती असते ती तार्किक नसून कलात्मक असते. तेंव्हा माणसाच्या मुळाशी एक Concept of Reality असते, हे मान्य केले तरी त्या Concept चा आणि काव्याच्या द्वारे व्यक्त होणाऱ्या अनुभवाचा काही एक संबंध असतो हे नव्याने सिद्ध करावे लागेल. परंतु अशा प्रकारचा काही निश्चित आणि अपरिहार्य संबंध असतो असे आढळून येत नाही. असे बरेच श्रेष्ठ कलावंत आहेत, की त्यांच्या कलाकृतीतून एक निश्चित अशी जीवित विषयी भूमिका शोधून काढता येत नाही. पुष्कळदा एकाच कलावंताच्या निरनिराळ्या कलाकृतीत निरनिराळ्या परस्पर वेगळ्या भूमिका दिसतात . आणि परिणामी, लेखकाची जीवित विषयक भूमिका आणि त्याच्या कलाकृतीचे वा उंची याचा मेळ बसवणे कठीण जाते. कलाकृतीतून वास्तवतेचे चित्रण होते असे जेंव्हा म्हटले जाते तेंव्हा असेही सूचित होते, वास्तवतेचे स्वरूप कळावे म्हणूनच आपण कलाकृती वाचत असतो. परंतु असे जर असेल तर भूतकाळातील कलाकृतीत आपले मन रमू नये, निदान आजच्या कलाकृतीत रमते,तितके रमू नये. त्या आजच्या कलाकृती इतक्या ताज्या अगर अर्थपूर्ण वाटू नयेत. पण तसे होत नाही. शेक्सपियरची नाटके आजही ताजी आणि अर्थपूर्ण वाटतात. ती तशी का वाटतात याचे स्पष्टीकरण वास्तवतेच्या पुरस्कर्त्यांनी करणे अत्यावश्यक ठरते.. *समाप्त*

Friday 22 April 2022

साहित्यिक वास्तवता - एक मूल्य - भाग ४

आता आपण थोडे वेगळे मांडून बघू. अगदी भिन्न प्रकारचे अनुभव आणि भिन्न प्रकारची लेखकांची व्यक्तिमत्वे कलाकृतीतून व्यक्त होत असतात. आणि आपण त्या सगळ्या कलाकृतीचा सारख्याच अनुभूतीने रसास्वाद घेऊ शकतो. त्यामागे नेमकी काय कारणे असू शकतात? याचे उत्तर शोधणे महत्वाचे ठरू शकेल. असे म्हणतात कलावंत जरी एखाद्या विशिष्ट घटनेचे चित्रण करत असेल तरी ती घटना प्रातिनिधिक स्वरूपाची असते; जीवनात नेहमी घडणारी असते. त्यामुळे चित्रण करताना तो वास्तव जीवनाविषयी सर्वसामान्य असे काहीतरी सांगतच असतो. अर्थात काही कलावंत अपवादात्मक असे विषय निवडीत असतात. या भूमिकेबाबत २ प्रकारच्या अडचणी उद्भवू शकतात. एक अशी की, सर्वानुमते श्रेष्ठ ठरलेल्या कलाकृतीचे विषय अपवादात्मक असू शकतात. उदाहरणार्थ *किंग लियर* हे नाटक किंवा *क्राईम अँड पनिशमेन्ट* ही कादंबरी तत्कालीन जीवनाचे प्रातिनिधिक चित्रण करणारी आहे, असे विधान करणे अवघड आहे आणि तरीही या दोन्ही कलाकृती श्रेष्ठ दर्जाच्या आहेत, असे मानले जाते. अशा रीतीने सर्वसंमत असे जे काही कलाकृतीच्या संदर्भात निर्णय आहेत त्या निर्णयाशी ही भूमिका सुसंगत नाही. शिवाय तर्कदृष्ट्या प्रतिनिधित्वाची कल्पना सदोष आहे. कुठलीही गोष्ट घेतली तरी ती इतर कुठल्याही गोष्टींचे पूर्णांशाने प्रतिनिधित्व करू शकत नाही. त्याचप्रमाणे अमुक एका वर्गाच्या चौकटीतल्या काही गोष्टी तिच्या एका सीमेजवळ असतात तर काही त्या चौकटीच्या मध्यभागी असतात. त्यामुळे अमका एक कामगार इतर सर्व कामगारांचा प्रतिनिधी आहे, असे फार मर्यादित अर्थाने म्हणता येईल. त्यामुळे साहित्यात जीवनाचे प्रातिनिधिक चित्रण असावे असे म्हटले तर अनेक अडचणी उपस्थित होतील. या शिवाय आणखी एक मुद्दा समोर येतो आणि तो म्हणजे, एखाद्या कथेतील व्यक्ती ज्या प्रमाणात सचेतन असते, त्या प्रमाणात ती कथा, कलाकृती ठरते. परंतु प्रातिनिधिक ही एक कल्पना (Concept) असते आणि म्हणूनच ती अचेतन असते. त्यामुळे ज्या प्रमाणात हे प्रतिनिधित्व एखाद्या कथेतील व्यक्तीच्या अंगी असेलत्या प्रमाणात ती ठोकळेबाज ठरणार. साहित्याचे व्यापक स्वरूपात प्रसरण सुरु झाले म्हणजे असा धोका उद्भवतो.

Wednesday 20 April 2022

साहित्यिक वास्तवता - एक मूल्य - भाग ३

आता थोडे पुढे जायचे झाल्यास, कलावंत हा वास्तव जीवनाविषयी शास्त्रीय किंवा तांत्रिक स्वरूपाचे सत्य सांगत असतो हे जर मान्य केले तर काही अडचणी उभ्या राहू शकतात. शास्त्रीय सत्य शोधून काढायची पद्धत म्हणजे शास्त्रीय चिकित्सा होय. परंतु शास्त्रीय चिकित्सा कलाकृतीत असू शकत नाही. तेंव्हा कलावंताने सांगितलेले शे ते सत्य आहे की नाही, हे वाचकाला कलाकृती वाचून कळेलच असे नाही. तसेच कलावंतालाही जे सांगितले ते निव्वळ किंवा निखळ सत्यदर्शन केले आहे की नाही हे कलाकृतीद्वारे सांगणे अवघड आहे. म्हणजेच कलाकृतीतून रसग्रहण तसेच मूल्यमापन करताना बाह्य गोष्टींना महत्वाचे स्थान द्यावे लागेल. एखाद्या कलावंताने नवीन निर्मिती केली की नाही हे ठरवण्यासाठी त्याने काही शास्त्रीय किंवा तात्विक सत्य सांगितले आहे की नाही, हे बघावे लागेल. तेंव्हा ही भूमिका मे केली की शेक्सपियरने अथवा बहुतेक इतर श्रेष्ठ कलावंतांनी काहीच नवीन निर्मिती केली नाही असा निष्कर्ष काढावा लागेल. परंतु असला निष्कर्ष काढायला कुणी धजावेल असे वाटत नाही. या शिवाय कुठल्याही रसिक वाचकाचा अनुभव असा असतो की कलाकृतीपासून आपल्याला जे काही मिळते ते तार्किक स्वरूपाच्या विधानात अंतर्भूत होऊ शकत नाही. परंतु काही कलाकृती विशेषतः कविता अशा असतात की त्यांतील आशय तार्किक स्वरूपाच्या विधानांच्या मार्गाने मांडणे अशक्यच असते. उदाहरणार्थ बालकवींच्या काही कविता अशा आहेत, मग अशा वेळी कवीने काव्यातून कुठला आशय सांगितलं आहे असे समजायचे? की त्यात आशयच नसतो असे समजायचे? कलाकृतीत केवळ जीवनविषयीचे सत्य नसते, तर ते कलात्मकरीत्या व्यक्त झालेले असते. कलावंत त्याची आपल्याला प्रतीती आणून देत असतो, असे विधान बरेचवेळा वास्तववादी पुरस्कर्ते म्हणत असतात. या भूमिकेच्या मुळाशी अशी कल्पना आहे की कलावंताची जी अभिव्यक्तीची पद्धती आहे तिच्या द्वारे तार्किक स्वरूपाचे सत्य व्यक्त होऊ शकते. हे विधान तपासून बघणे महत्वाचे ठरेल. साहित्यात वास्तवतेचे चित्रण व्हायचे आणि तिचा अर्थ लावायचा म्हणजे २ गोष्टी आवश्यक असतात. १) लेखकाची भूमिका वस्तुनिष्ठ हवी आणि २) त्याने कलाकृतीतून एका विशिष्ट घटनेचे चित्रण न करता सर्वसामान्य स्वरूपाची विधाने करायला हवीत. पण कलावंत यापैकी एकही गोष्ट करीत नसतो. तो एखाद्या परिस्थितीचे चित्रण करीत नसतो तर त्या परिस्थितीच्या आपल्याला आलेल्या अनुवास्तवतेचे वस्तुनिष्ठ चित्रण होणे अशक्य असते. तेंव्हा कलावंत कलात्मक पद्धतीने लिहीत असतो असं म्हटले म्हणजे तो वास्तवतेचे चित्रण करीत असतो. परिस्थिती हे त्या अनुभवाचे निमित्त असते. त्या अनुभवाचे स्वरूप बऱ्याचवेळा लेखकाच्या व्यक्तिमत्वावरून ठरते. त्याचप्रमाणे साहित्यिक सर्वसामान्य स्वरूपाची विधाने करीत नसतो. बहुदा तो एका व्यक्तीविषयी किंवा विशिष्ट घटनेविषयी लिहीत असतो. अधिक परखडपणे बोलायचे झाल्यास, तो एक विशिष्ट अनुभव व्यक्त करीत असतो. ह्यामुळे कलावंताची जी अभिव्यक्तीची पद्धती आहे तिच्या द्वारे वास्तवतेचे वस्तुनिष्ठ चित्रण होणे अशक्य असते. कलावंत हा शास्त्रज्ञाप्रमाणे Statement करीत नसतो तर Psudo Statement करीत असतो. त्यामुळे एका कलावंताने निराशेचे चित्रण केले आणि दुसऱ्याने आशेचे चित्रण केले तर या दोन्हीपैकी एक कुणीतरी बरोबर आहे, असा निष्कर्ष वाचकाला काढावा लागत नाही. दोघांचे म्हणणे एकाचवेळी खरे असू शकते. अगदी भिन्न स्वरूपाचे अनुभव आणि भिन्न प्रकारचिलेखकाची व्यक्तिमत्वे कलाकृतीतून व्यक्त होत असतात आणि आपण त्यासगळ्या कलाकृतींचा सारख्याच आनंदाने रसास्वाद घेऊ शकतो. आणि हे आपल्याला नित्य अनुभवायला मिळते. *क्रमश:*

Tuesday 19 April 2022

५०० लेख लिहून झाल्याचे निमित्त

वास्तविक हा आकडा गाठून २,३ आठवडे उलटले परंतु त्यावेळी डोक्यात अनेक विचार घोळत होते आणि त्याचा योग्य तो निचरा करण्यापायी, हे टिपण लिहायला उशीर झाला. मनात नेहमीच बऱ्याच गोष्टी येतात, अनेक विषय घोळत असतात. काही विषय वाचनातून सुचतात तर काही विषय अनुभवातून मनात गठित होतात. वयाच्या १०व्या वर्षांपासून हळूहळू वाचनाची सवय लागली परंतु त्याला वेग आला, तो परदेशात राहायला सुरु झाली तेंव्हापासून. परदेशात *समाज न्याहाळणे* आणि *समजून* घेणे नित्य चालतच होते परंतु एकटाच रहात असल्याने, हाताशी बराच वेळ मिळत असे आणि मग आहे तो वेळ *सत्कारणी* का लावू नये? या प्रश्नातून आधी वाचन आणि मग नंतर लिहायला सुरवात झाली. लिहीण्याचे स्वप्न तसे फार नंतर पडायला लागले. मुळात लिहायचे काय? हाच मुद्दा महत्वाचा होता. परंतु मराठी कविता वाचायला सुरवात झाली आणि मनात बरेच विचार घोळायला लागले!! त्यातूनच २००९ च्या सुमारास आधी फेसबुक आणि नंतर ब्लॉग सुरु झाला. तेंव्हा देखील मी इथे इतका रमून जाईन याची सुतराम शक्यता नव्हती. तसे बघितल्यास,  घरी आणि काही ठराविक मित्रांना पत्रे लिहिणे हा मुख्य आनंदाचा भाग होता, अगदी नंतर इ मेल सुरु झाले आणि त्या द्वाराने दणदणीत लांबीची पत्रे जात होती. सगळेच फार सहनशील होते. तरीही *वाचन* हा छंद खरा आणि सुदैवाने आजही त्यात खंड पडलेला नाही. अर्थात विषय आणि आवड, वयानुरूप बदलत गेली. परिणामी मन *वठले* नाही. आज जेंव्हा मी किंचित मागे वळून बघतो तेंव्हा सुरवातीची शैली आणि आजची शैली यात महदंतर पडल्याचे स्पष्ट जाणवते आणि ते योग्यच झाले अन्यथा माझा रस निघून गेला असता. आज जेंव्हा पूर्वीचे वाचतो तेंव्हा तर परखडपणे त्यातील *अधिरी* वृत्ती, विषयाचे *अपुरे आकलन* इत्यादी कमतरता स्पष्टपणे दिसून येते. अगदी संगीत विषयक लिहिलेल्या लेखांत देखील आणि असे असून देखील काही मित्रांनी दिलेले उत्तेजन मला आजही महत्वाचे वाटते. एक उदाहरण देतो, ८,९ वर्षांपूर्वी काश्मीर इथे झुबीन मेहतांचा सिम्फनी कार्यक्रम झाला होता. अतिशय सुंदर आणि त्यांच्या लौकिकाला साजेसा असा झाला होता. अर्थातच मी लगोलग (हे लगोलग लिहिणे, हा अधिरेपणा) आधी फेसबुकवर आणि नंतर काही जाणकार मित्रांना पाठवला. आज जेंव्हा मी पुन्हा वाचतो तेंव्हा त्यातील असंख्य त्रुटी दिसतात. असे असून देखील *आनंद मोडक* सारख्या जाणकार व्यक्तीने माझे कौतुक करून, माझा हुरूप वाढवला होता. त्यावेळी असे उत्तेजन बऱ्याच जणांनी वेळोवेळी दिले होते, आजही देतात. आज मी जेंव्हा माझ्याच  रागरंग* या पुस्तकातील लेख वाचतो तेंव्हा असेच मनात येते, काही लेखांच्या बाबतीत थोडी घाई केली. थोडा विचार केला असता तर हेच लेख आणखी छान आणि वैचारिक झाले असते. आपले लेखन *वैचारिक* व्हावे ही माझी मनापासूनची इच्छा आणि त्यातूनच मग इतरांना *अगम्य* असे लिहिले जाते पण मला तसे अजिबात वाटत नाही. या उलट असेच वाटते, प्रत्येकवेळेस, लेखकाने (इथे मी स्वतःला *लेखक* म्हणवून घेत आहे पण सगळेच मित्र असल्याने समजून घेतील....) वाचकाला काय आवडेल? याचा विचार करून का लिहावे? तसे केल्याने, जे लिहिले जाईल, ती त्याची खरी *अभिव्यक्ती* असेल का? आणि दुसरा महत्वाचा मुद्दा, कधीतरी वाचकांनी वरची पायरी चढावी की!! प्रत्येकवेळी लेखकानेच खालची पायरी का उतरावी? हे अहंकारी आहे, हे मान्यच  आहे. माझे लिखाण *अवघड* भाषेत असते, हा आता सर्वमान्य आक्षेप आहे आणि मी तर माझी शैली बदलणे अवघड आहे - वास्तविक विषयानुरुप शैली बदलते, उदाहरणार्थ माझे साऊथ आफ्रिकेतील अनुभव. याचा वेगळा अर्थ, जसा विषय असेल तसे लेखन होणार. मी काहीवेळा समीक्षापर लेखन करतो. आता असा विषय जेंव्हा घेतो तेंव्हा तिथे तशीच भाषा येणे अनिवार्य नव्हे का? कवितेसारखा अति लवचिक साहित्य प्रकार हाताळताना, त्याचे *सौंदर्य* मांडताना, भाषा सांकेतिक होणारच. काही तांत्रिक शब्द येणारच. तसेच संगीताविषयी लिहिताना घडते. आता *संगीत* या विषयावर सरळ, साधे आणि सोपे, निदान मराठीत बरेच सापडते आणि जर मी तीच वाट धरली तर माझी *ओळख* ती कुठली? मळलेल्या वाटेने जाण्यात काय हशील आहे आणि मग या विचाराने, लेखाची शैली ठरली जाते. बरे, लेखन करून भरपूर पैसा मिळवावा, अशी माझी कधीच महत्वाकांक्षा नाही  मग जर का पैसा नाही तर मग निदान मानसिक समाधान तरी मिळवावे!! यात काय चूक. आता जवळपास १२ वर्षे मी अथकपणे लिहीत आहे पण इतक्या वर्षांत मी कधीही *वाचक* डोळ्यासमोर ठेऊन, एक अक्षर देखील लिहिले नाही, मला ते जमणारच नाही. माझा तसा *पिंड* नाही. माझी इथे *अतोनात चेष्टा* केली जाते आणि याची मला याची पूर्ण कल्पना आहे. सगळे मित्रच आहेत तेंव्हा मित्राची चेष्टा होणे, क्रमप्राप्तच आहे. असे असून देखील, आजमितीस एकही लेख असा लिहून झाला नाही जिथे मला १००% समाधान मिळाले!! लेखन हा छंदच असा आहे, इथे *संपूर्ण समाधान* हे फक्त कागदावर(च) असते, प्रत्येक्षात कधीही मिळणारे नसते, जे दिसते ते कायमस्वरूपी *मृगजळ* असते आणि हेच मृगजळ तुम्हाला प्रत्येकवेळी लिहायला प्रवृत्त करते. 

Saturday 16 April 2022

श्रवण साधना योग ........

आपण गाणं ऐकतो. ती एक सहजस्फूर्त घटना असते आणि त्यासाठी आपल्याला फार काही सायास करायला लागत नाहीत आणि याचे मूळ कारण आपल्यावरील झालेले संस्कार तसेच एक भारतीय म्हणून आपल्यातील जो रक्तगुण असतो, त्याची प्रतिक्षिप्त क्रिया म्हणजे आपली *श्रावण साधना* असे थोडक्यात मांडता येईल. फार पूर्वीपासून अनेकविध माध्यमांनी गाणे आपल्यापर्यंत पोहोचवण्याची सोय करून ठेवली असल्याने, गाणे ऐकणे, या क्रियेसाठी आपल्याला फार प्रयास पडले नाहीत. अर्थात अर्वाचीन काळाची गोष्ट वेगळी कारण तेंव्हा तंत्रज्ञान उपलब्ध नसल्याने, गाणे ऐकण्याची वानवा असायची परंतु जसेजसे तंत्रज्ञान प्रगत होत गेले तसतशी श्रवण क्रिया सुलभ व्हायला लागली. याचा माणसाला अमाप फायदा झाला, हे मान्यच करायला हवे. जरा खोलात गेलो तर असा विचार करू शकतो, आपण *गाणे* का ऐकतो? ते सहज आपल्या कानावर पडते म्हणून त्याची प्रतिक्षिप्त क्रिया आपल्याकडून घडते का? इथे गाणे म्हणजे सगळ्या प्रकारचे संगीत - म्हणजे रागदारी संगीत, उपशास्त्रीय संगीत तसेच ललित संगीत अभिप्रेत आहे. ही अत्यंत ढोबळ वर्गवारी आहे आणि त्यात अनेक सांगीतिक आविष्कार अंतर्भूत आहेत परंतु आपल्या इथे त्याबद्दल काहीच बोलायचे नसल्याने, मी ढोबळ वर्गवारी स्वीकारली आहे. अगदी मागील शतकाचा विचार केला तर मागील शतकाच्या सुरवातीला रागदारी आणि आणि उपशास्त्रीय संगीत, या २ प्रकारांचा प्रभाव आल्या तेंव्हा समाजावर गाढा हता आणि त्याविषयी दुमत होऊ नये.पुढे मग हेच संगीत अधिकाधिक जटील व्हायला लागले कारण बदलती जीवनप्रणाली!! पुढे वेगवान होत जाणाऱ्या जीवनशैलीपुढे तासंतास चालणारे रागसंगीत मागे पडायची शक्यता निर्माण झाली आणि मराठी रंगभूमीवर रागसंगीताचाच उपयोग करून, चटपटीत स्वररचनांचा प्रादुर्भाव वाढला आणि रंगभूमीवर *नाट्यगीत* हा आविष्कार समाजमान्य झाला. पुढे याचा विपर्यास झाला ती बाब वेगळी आणि मग त्यातूनच *सुगम संगीत* अवतरले आणि एकूणच संगीताचा ढाचाच बदलला. सुगम संगीत नुसते अवतरले नसून त्याने कालानुरूप *कात* टाकायला सुरवात केली आणि एकूणच समाजमनावर प्रचंड पगडा बसवला, हे मान्यच करावे लागेल. हे मन्वंतर झाले कारण ललित संगीत हे सुगम आहे, थोडक्यात संगीताशय आंनदाण्याची कुवत आहे तसेच सामान्य माणसाला देखील भुरळ घालणारे आहे. परिणामी ललित संगीत आपले स्वतंत्र आणि वेगळे वर्चस्व गाजवू लागले. आता मुद्दा असा पुढे येतो , या सगळ्या संगीतात, *श्रवण क्रिया* या घटनेला अतोनात महत्व आले मग तिथे कुठलाही संगीताविष्कार असू दे. मुळात ऐकणारे नसतील तर कुठलेही संगीत हे निष्प्रभ होणारे, हे ओघाने आलेच. यातूनच पुढे *प्रेक्षकशरणता* अतोनात वाढली. जिथे अतिरेक होतो तिथे मग त्याच्या मर्यादा स्पष्ट होतात. ऐकायला रसिक हवेत, ही जाणीव झाली आणि मग रसिकांना आपल्याकडे ओढण्याची जणू स्पर्धा निर्माण झाली, परिणामी सांगीतिक दर्जा खालावणे, क्रमप्राप्त झाले. यातूनच मग रसिकांची फुटकळ *वर्गवारी* झाली - ज्याची आजही काहीही जरुरी नाही परंतु रागदारी संगीत ऐकणारे अधिक *आढ्यताखोर* होणे आणि इतर संगीतप्रकारांकडे काहीशा तुच्छतेने बघणे, इत्यादी प्रकार बोकाळायला लागले. त्यामाने उपशास्त्रीय संगीताचे रसिक बरेच उदारमतवादी निघाले. काही उदाहरणे देतो. *तुच्छतावाद* तर आपल्याकडे पाचवीला पुजलेला आहे. मध्यंतरी लताबाईंचे निधन झाले आणि लगोलग नको तितका भावनिक पूर पसरला. लताबाईंचे वैश्विक स्थान बघता, अशा प्रतिक्रिया अपेक्षित होत्या परंतु काही ठिकाणी *तुच्छतावाद* प्रखरपणे दिसून आला. अगदी माझे त्याबाबत स्वानुभव आहेत. लताबाई झाल्या तरी त्या काही *अजेय* नव्हेत. त्यांची गायनाची एक अजोड शैली होती. अर्थात त्यांची जशी एक शैली होती ताशा इतर गायिकांच्या वेगळ्या प्रकारच्या शैली अस्तित्वात होत्या, हे कुणीही मान्य करेल. आता, जशी लताबाई गेल्याची बातमी आली तशी त्यांच्या गायनशैलीवर टीका व्हायला लागली. टीका झाली म्हणून फारसे बिघडत नाही कारण लताबाई म्हणजे कुणी *देवता* नव्हेत. त्या देखील मानवी योनीतुन जन्माला आलेल्या होत्या आणि तदनुषंगाने त्यांच्यात *माणूस* आणि *कलाकार* म्हणून काहीतरी *कमतरता ही असणारच परंतु टीका करताना इतकी खालची पातळी गाठली गेली की एकदा असेच मनात आले, लताबाईंपेक्षा बहुदा रेल्वे डब्यातील गाणारी भिकारीण देखील उत्तम गायिका म्हणावी लागेल का? टीका करावी पण टीका करायची म्हणून खालच्या पातळीवर उतरायची गरज नसते. परंतू दुर्दैवाने, तितके सजग भान दाखवले गेले नाही. संगीत हा विषयच इतका *व्यापक* आहे की इथे कुणीही *Champion* नाही. सगळे कलाकार देखील आयुष्यभर *विद्यार्थी* असतात तेंव्हा अशा परिस्थितीत तथाकथित रसिक देखील अपवाद कसे असतील? आपल्याकडे *गाणे* कसे ऐकावे, हेच बऱ्याच जणांना ठाऊक नसते. हा प्रकार शास्त्रीय संगीताच्या मैफिलींबाबत वारंवार अनुभवायला मिळतो. कुणीही कलाकार राग सादर करायला लागला की लगोलग *कुजबुज* सुरु होते, कुठला राग सादर होत आहे? आणि ही कुजबुज इतरत्र ऐकायला येईल, इतपत मोठ्या आवाजात ऐकायला मिळत असते. खरंतर सादरीकरणातील *राग* ओळखता येणे, ही रसिकत्वाची अत्युच्च पातळी नव्हे. परंतु आपणं कुणीतरी *वेगळे* आणि *व्यासंगी* आहोत हे इतरांना दर्शवायची अतोनात वाईट खोड वारंवार बघायला मिळते. त्यातून दुसरी खोडसाळ सवय. मैफिल संपल्यावर दुसऱ्या दिवशी मित्रांच्या समवेत काळाच्या मैफिलीचे नको तितके रसभरीत वर्णन करायचे. समोरचा ऐकणारा समजा रागदारी संगीताविषयी *अनभिज्ञ* असेल तर सांगणाऱ्याच्या *अंगात* येतेआणि लगोलग *यमन*, *दरबारी* अशा रागांच्या नावाच्या *पुड्या* सोडायला सुरवात होते. ऐकणारा एकदम गार पडतो कारण त्याला तर हे सगळेच *अगम्य!* असे रसिक भयंकर तापदायक असतात. तसेच आणखी डोक्यात तिडीक जाणारा अनुभव असतो. कार्यक्रमाची वेळ माहीत असते तरीही मैफिलसुरु होऊन अर्धा, पाऊण तासांनी सभागृहात यायचे आणि इतर रसिकांची तंद्री भंग करायची!! हा तर प्रचंड *उद्दामपणा* म्हणायला हवा. तुम्हाला साधे Time Management सांभाळता येत नाही!! तसाच प्रकार चाललेली मैफिल ऐन रंगात आल्यावर मैफिल सोडून जाण्याची घाई करायची!! तुम्ही रागदारी संगीताची मैफिल ऐकायला आला आहात आणि ती किती वेळ चालणार आहे, याचे तुमच्या मनाशी आडाखे पक्के असतात. तेंव्हा असे असून देखील, पहिल्या किंवा दुसऱ्या रांगेतील रसिक (ती बरेचवेळा जोडगोळी असते!!) संपूर्ण सभागृह ओलांडून बाहेर जाते. आता टॉयलेटला गेले तर समजण्यासारखे आहे पण काही नैमित्तिक कामे आठवतात आणि मग मैफिल सोडून जातात!! यात आपण कलाकाराचा *अपमान* करिताहोत याची किंचितही जाणीव नसते. याचाच पुढील भाग म्हणजे, दुसऱ्या दिवशी इतरांशी (जे मैफिलीला गेले नसतात त्यांच्या समोर) बोलताना, *काल भीमसेन ऐकला* किंवा *काल कुमार काय अफलातून गायला आहे!* अशा भाषेत *पुड्या* सोडायच्या!! जणू काही हे कलाकार यांचे कायमचे *शेजारी* आहेत किंवा, *माझ्या त्यांच्याशी किती जवळीक आहे* हे दर्शविण्याचा उद्दामपणा दिसून येतो. यात फक्त एक छोटीशी पण अत्यंत महत्वाची बाब विसरली जाते - कालच्या मैफिलीतून तुम्ही नेमके काय शिकलात? कारण तुम्हाला काही *शिकायचे* नसते. तुम्ही *सर्वज्ञ* असता!! चित्रपट संगीताबाबत बघायला मिळते. आता तशी वेळ येत नाही कारण आता YouTube वर बव्हंशी बरीचशी गाणी उपलब्ध असतात पण एकेकाळी, विशेषतः लताबाईंची *दुर्मिळ गाणी* आपल्या संग्रही असणे, हा पराकोटीच्या अभिमानाचा विषय असायचा. एकेकाळीमी देखील याला *बळी* पडलो होतो. माझ्याकडे, इतरांकडे नसतील अशा दुर्मिळ गाण्यांचा संग्रह आहे, अशी वाक्ये अत्यंत ताठ्यात इतरांसमोर बोलायची फॅशन होती. त्यावेळी मला देखील त्यांचा *हेवा* वाटायचा. पुढे जसा माझा अभ्यास वाढायला लागला तेंव्हा ध्यानात यायला लागले जी गाणी *दुर्मिळ* आहेत, त्यातील काही गाणी खरोखरच *विस्मृतीत* जावी, अशा लायकीची होती!! सगळीच दुर्मिळ गाणी *अनमोल* नाहीत!! मुळात गाणे कसे ऐकावे, याचा पायाभूत शास्त्रशुद्ध अभ्यासक्रम तयार करण्याची फार गरज आहे. आपण जे ऐकतो, त्यातील आपल्याला काय आणि किती समजले आहे? हा प्रश्नच आपल्याला विचारत नाही. आपण आपल्याला कधीही प्रश्न विचारत नाही त्यामुळे गाण्यातील *सत्व* काय आणि *फोलफट* काय, हे समजून घेण्याचा मुद्दाच उपस्थित होत नाही. प्रत्येकवेळी *शास्त्राचा* आधार घ्यायला पाहिजे असे नाही पण ऐकताना, *सजग* वृत्ती दाखवणे जरुरीचे आहे, हेच कुणाला पटत नाही. हल्ली रागदारी संगीतात एक प्रकार नाले तितका बोकाळला आहे, रचना *द्रुत लयीत* आली की सतार/सरोद किंवा बांसरी वादक आणि साथीला असलेला तबला वादक यांच्या *तुंबळ* युद्ध सुरु होते आणि समोर बसलेले तथाकथित रसिक *अवाक* होऊन ऐकत बसतात!! यात एक बाब विसरली जाते, सतारीवरील सूर हे कधीही तबल्यावर आणता येत नसतात, होतो तो निव्वळ *आभास* असतो मग तबला वाजवणारा झाकीर हुसेन असला तरी आणि हे मी अत्यंत गंभीरपणे विधान करीत आहे. परंतु लोकं याचीच *वाट* बघत असतात आणि नको तितकी अविश्वसनीय दाद देतात!! किती मूर्खपणा आहे. तसेच *संपूर्ण सप्तकी तान* घेणे, हे असेच रसिकांना *अवाक करून जाते. ही *संगीत* नव्हे, दुर्घट तान हा एक सांगीतिक अलंकार आहे, संपूर्ण गायन नव्हे. मग, खुद्द कलाकार अशा *गिमिक्सच्या* आहारी जातात आणि हाती फक्त संगीताचे *कलेवर* उरते!

Friday 15 April 2022

साहित्यिक वास्तवता - एक मूल्य - भाग २

मुळात आपण *वास्तवता* हा शब्दच अकारण गहन करून ठेवला आहे आणि त्यातून मुळातच संकल्पना गोंधळाची केल्यामुळे पुढे सगळेच फार विसविशीत होऊन बसले. तसे बघायला गेल्यास, कुठल्याही प्रसंगाचे आणि व्यक्तीचे चित्रण केले किंवा सकाळपासून रात्रीपर्यंत मुंबईत काय घडले याचे वर्णन केले तर त्या वर्णनाला *कलाकृती* म्हणता येईल का? अगदी ,त्या वर्णनाची भाषा अगर पद्धती जरी कथा-कादंबऱ्यांत जशी आढळते तरी त्यामुळे ती कलाकृती ठरणार नाही. परंतु ललित साहित्य हा वास्तव जीवनाचा आरसा आहे ही भूमिका शब्दश: मान्य केली तर त्या वर्णनाला कलाकृती म्हणता येईल. वास्तवतेचे पुरस्कर्ते देखील कुठल्याही प्रसंगाच्या किंवा प्रसंगमालिकेच्या वर्णनास कलाकृती म्हणणार नाहीत. प्रत्यक्षात जे पाहायला मिळते त्याचेच केवळ कलाकृतीद्वारे आपल्याला दर्शन घडते असेही ते म्हणतील का? याचाच वेगळा अर्थ, वास्तवतेच्या वर्णनाहून अधिक काहीतरी कलाकृतीत असावे लागते, हे त्यांना मान्य आहे. हे *अधिक काहीतरी* काय असते? कलाकृतीत नुसत्या वास्तवतेचे चित्रण नसते तर त्या वास्तवतेच्या कलावंताने काही तरी संगती निर्माण केलेली असते, तिथे त्याने वास्तवतेचा अर्थ लावलेला असतो. असेच उत्तर या प्रश्नाला वास्तवतेचे पुरस्कर्ते देतील. त्यांची भूमिका अशी असू शकते, कलावंत हा जीवनाचा अर्थ लावीत असतो (जीवनाचा संपूर्ण अर्थ साहित्याद्वारे लावणे निव्वळ अशक्य आहे). *शेवटी सत्याचा जय होतो* किंवा दलित वर्गाचाच वर्गकलहात अखेर विजय होणार असतो* अशा प्रकारचे सत्य तो सांगत असतो. पण या बाबतीत २ अडचणी उद्भवतात. एक अशी की, मोठमोठ्या कलाकृतीतून सांगितलेली सत्ये जर आपण तपासून बघितली तर ती सामान्य स्वरूपाची असतात. ती कुठल्याही शहाण्या माणसास माहीत असतात. आणि जर का त्याचेच ज्ञान करून घेण्यासाठी जर साहित्य वाचायचे असेल तर बहुतेक माणसे साहित्याच्या वाटेला जाणार नाहीत. त्या शिवाय, कलाकृतीतून जे सांगितलेले असते त्यापेक्षा अधिक गुंतागुंतीचे, अवघड आणि जीवनावर प्रकाश पडणारे सत्य शास्त्रीय किंवा तत्त्वज्ञानाच्या ग्रंथांतून सांगितलेले असते. मग साहित्य वाचण्यात वेळ व्यर्थ करण्यापेक्षा हेच ग्रंथ का वाचू नयेत? हा प्रश्न पुढे उभा राहतो. या प्रश्नावर २ प्रकारची उत्तरे देता येतील. पहिले असे, सर्वसामान्य माणसाच्या अंगी शास्त्रीय किंवा तत्वज्ञानावरील ग्रंथ वाचायला लागणारी बुद्धिमत्ता किंवा चिकाटी नसते. म्हणून त्यांना शास्त्रीय स्वरूपाची सत्ये कलावंत सोप्या आणि आकर्षक स्वरूपात सांगत असतो. याच भूमिकेवरून बहुतेक धर्मात कथा,काव्ये, पुराणे यांना महत्व दिलेले असते. महाराष्ट्रात विद्वान म्हणून गाजलेली अनेक माणसे याच भूमिकेवरून ललित साहित्याकडे बघत असतात. आता यालाच *विद्वत्ता* म्हणावी का? हा दुसरा उपप्रश्न इथे उद्भवतो. काही लोकांची भूमिका वेगळी असते. त्यांच्या मते, शास्त्रीय स्वरूपाचे सत्य कलावंत देखील सांगत असतो पण तो तेच सत्य कलात्मकपणे सांगत असतो!! त्याची तो वाचकाला *प्रतीती* देत असतो. ज्ञानमार्गाने सत्य आकळता येते परंतु त्याचा कलात्मक आविष्कार झाल्याशिवाय ते प्रतीत होऊ शकत नाही. अर्थात इथे कलावंताला थोडा अधिक मान मिळू शकतो. शास्त्रज्ञाहून इथे काहीतरी वेगळे असे कलावंत करीत असतो. पण कलावंत आणि शास्त्रज्ञ एकच भूमिका मांडत असतात, हे मान्य करता येऊ शकते. *क्रमश:*

Thursday 14 April 2022

साहित्यिक वास्तवता - एक मूल्य - भाग १

ललित साहित्यात वास्तवता असावी, असा विचार अधिक करून पाश्चात्य विचारवंतांनी मांडला आणि हळूहळू आपल्याकडे देखील वास्तवात हे एक महत्वाचे कलामूल्य आहे ही भूमिका मांडली गेली आणि गेल्या काही वर्षात त्याला बरीच प्रतिष्ठा मिळाली. काही जणांचे मत असे आहे, ललित साहित्य हा जीवनाचा आरसा आहे. त्यामुळे वास्तवतेचे चित्रण साहित्यात करणे, याच हेतूने साहित्याची निर्मिती होते, हा विचार देखील बराच बळावला गेला. "वास्तवता" हे एक साहित्यिक मूल्य म्हणून स्वीकारल्यानंतर त्या अनुषंगाने इतर विचार व्यक्त व्हायला लागले. त्यातूनच पुढे हरिभाऊ आपटे हे "सदाशिव पेठी" म्हणजेच समाजाच्या अत्यल्प वर्गाचे चित्रण करणारे म्हणून टीकेस पात्र झाले. समाजातील बहुसंख्य माणसे ज्या प्रकारचे जीवन जगतात त्यांचे चित्रण करणारे साहित्य, हेच श्रेष्ठ साहित्य अशा प्रकारचा विचार पुढे आला. त्याचप्रमाणे भूतकाळातील चित्रण करण्यापेक्षा वर्तमानकाळ साहित्यातू रेखाटणे अधिक चांगले, असे सुचवले जाऊ लागले. याच सुमारास, मराठीत मार्क्सवादाची धुळवड सुरु झाली आणि साहित्यिक मूल्याला एक नवीन परिमाण मिळाले. वेगळ्या शब्दात मांडायचे झाल्यास, श्रीमंत आणि गरीब यांच्यातील वर्गकलह हाच वास्तव जीवनाचा अत्यंत महत्वाचा निकष म्हणून स्वीकारला गेला. मार्क्सवादी विचारवंत पुढे जाऊन म्हणायला लागले, वर्गकलहात शेवटी दलितांचा विजय होऊन समाजवादाची स्थापना होणे अनिवार्य ठरले. हीच भविष्यकालीन वास्तवता आहे. याचीच पुढील पायरी म्हणजे मार्क्सवाद्यांप्रमाणे गांधीवादी, समाजवादी, राष्ट्रवादी वगैरे विचारवंतांच्या सामाजिक वास्तवतेविषयी स्वतःच्या अशा ठाम कल्पना होत्या आणि आहेत. सामाजिक जीवनातील अमके प्रवाह महत्वाचे असे प्रत्येक पक्षाचे मत आहे आणि याच प्रवाहाचे चित्रण ज्या साहित्यात होते तेच अधिक खरे वास्तव, असे प्रत्येक पक्ष प्रतिपादन करीत असतो. अर्थात याधे निव्वळ वास्तवात हेच एकमेव साहित्यमूल्य मानणारे लोकं फारच थोडे, वास्तव जीवनाचे चित्रण करून सामाजिक प्रश्नांना वाचा फोडणे, समाजाची जागृती करणे आणि सामाजिक प्रश्न सोडवायला उपयुक्त असा ध्येयवाद जनतेपुढे ठेवणे हेदेखील साहित्याचे कार्य आहे, अशी विचारधारा पुढे आली. मार्क्सवादी लोकं तर साहित्याला क्रांतीचे साधन म्हणतात. मुळात, साहित्य की एक कला आहे आणि कलाकृतीचे म्हणून काही गुणधर्म असतात.या मुद्द्याकडे बरेचवेळा तथाकथित वास्तववादाचे पुरस्कर्ते दुर्लक्ष करताना दिसतात. त्यामुळेच साहित्यात वास्तव जीवनाचे चित्रण असते जे कलात्मकरीत्या केलेले असते, अशी एक विचारधारा पुढे येते. ह्याचाच वेगळा अर्थ कलेची म्हणून वेगळी मूल्ये असतात आणि त्या मूल्यांच्या आधारे एखादी कृती ही कलाकृती आहे की नाही, याचा निवाडा करतात. काही टीकाकारांच्या मते, कोठल्याही कलाकृतीचे मूल्यमापन हे कलेच्या(च) पातळीवर आणि कलामूल्यांच्या आधारे व्हायला हवे. कलाकृतीत वास्तवतेचे कसे आणि किती प्रमाणात चित्रण आहे, या गोष्टीला ते महत्व देत नाहीत. त्यांचे म्हणणे असे, कलाकृतीने अखेर वाचकांच्या मनाचा ठाव घेतला पाहिजे. (It must carry Conviction) वाचकाला ती खरी आहे, असे वाटले पाहिजे. या साठीच त्या कलाकृतीत चित्रित झालेल्या घटना वास्तव पाहिजेत. अर्थात इथे "वास्तव" या शब्दाचा अर्थ जरा वेगळा आहे. वास्तव म्हणजे जे प्रत्यक्ष घडते आगर जे सर्वसाधारणपणे घडते, ते नव्हे तर वास्तव म्हणजे शक्यतेच्या कोटीतले. वास्तवात हे साहित्यिक मूल्य आहे ही कल्पना अशा रीतीने निरनिराळ्या कारणाने दृढमूल झाली आहे. परंतु या कल्पनेचा आणि ती ज्या आधारावर आधारली आहे, त्या विधानांचा जर का अभ्यासपूर्ण परामर्श घेतला तर ती अत्यंत सदोष असल्याचे दिसून येईल. *क्रमश:*

Tuesday 12 April 2022

साहित्यातील (सत्य) - भाग ३

हा या मालिकेतील शेवटचा लेख परंतु सुरवात करण्याआधी एक स्पष्टीकरण. इथे *निर्मिती* जेंव्हा म्हटले तेंव्हा त्यात सगळ्या कृती अंतर्भूत आहेत. *नवनिर्मिती* ही फक्त कलांच्या संदर्भात असते, हे म्हणणे चुकीचे ठरेल कारण लेखक जे लिहीत असतो, ती देखील *निर्मिती* असते आणि ती इतर कलांप्रमाणे सृजनाच्या वाटा धुंडाळत असते. अगदी एखादा *खेळ* देखील *सर्जनशील* असतो आणि त्यात काहीही वावगे नसते. कलेचे प्रांगण हे असे विस्तीर्ण असते. केवळ संगीत, चित्र ,शिल्प किंवा अभिनय, ही माध्यमे म्हणजेच नवनिर्मिती नव्हे. मुळात लेखक जे एका प्रकारचे सत्य सांगत असतो त्याची पातळी आणि हे प्रश्न ज्या पातळीवरून विचारले जातात ती पातळी नेहमीच सर्वस्वी भिन्न असते. त्याचप्रमाणे एखाद्या माणसाच्या काही किंवा सगळ्या लेखनातून वावरणारी माणसे अगतिक किंवा हीन मानाची असलीबसतील, असे अजिबात नव्हे आणि तसे त्यांना बसवू पाहणे हे अप्रस्तुत आहे. तरी त्यावरून तो, जंतुवादाचा पुरस्कार करतो असे म्हणणे म्हणजे साहित्याच्य्या स्वरूपाविषयी अज्ञान दाखवण्यासारखे होय. अगतिकतेचा अनुभव किंवा माणसाच्या हीनतेचा अनुभव सगळ्यांना केंव्हा ना केंव्हातरी येतच असतो. असे असता, हा अनुभव साहित्यात व्यक्त झाला तर तो जंतुवादी आहे, असा निष्कर्ष काढणे तर्कशास्त्राच्या कुठल्या नियमांना धरून आहे? मनुष्य अमुक एक अनुभव अनुभव आपल्या कलाकृतीतून का व्यक्त करतो? हे त्याच्या सुसंगत अशा जीवितविषयक तत्वज्ञानावरून ठरत नसते. ते बरेचवेळा मानसिक घडामोडीमुळे ठरते आणि परिस्थितीमुळेही ठरते. उदाहरणार्थ, लेखकाने आपल्या कलाकृतीत गुंफलेले अनुभव हे अनुभव घेण्याच्या घेण्याच्या एखाद्या लकबीच्या चौकटीत बसतीलच असे नाही आणि त्यांना तसे बसवू पाहणे हे अप्रस्तुत आहे. अर्थात याचा अर्थ असा नव्हे, नीती आणि अनीती, बरेपणा आणि वाईटपणा, माणसाचे विचार आगर त्याचा आशावाद ही साहित्यात येऊच शकत नाहीत. ह्या गोष्टी ज्या अर्थी जीवनात असतात त्या अर्थी साहित्यात येणारच परंतु एखादी गोष्ट साहित्याचा विषय असणे वेगळे आणि साहित्याचा आशय असणे वेगळे, हे ध्यानात ठेवणे जरुरीचे आहे. साहित्याच्या स्वरूपाविषयीच्या अज्ञानामुळे आपल्यालादे साहित्यिकांकडून अतिरेकी अपेक्षा केल्या जातात. समाजसुधारक, क्रांतिकारक,तत्वज्ञ आणि शास्त्रज्ञ, या सर्वांचे कार्य त्याने केले पाहिजे असा केला जातो. तास वारंवार आग्रह धरला जातो. वास्तविक शास्त्रज्ञांवर असा कुणी *जुलूम* करीत नाही. तत्त्वज्ञाने तलवार घेऊन साम्राज्य स्थापन केली नाहीत तर तो तत्वज्ञच नव्हे* असे सुदैवाने कुणी म्हटल्याचे ऐकिवात नाही. पण *साहित्यिकाने समाजसुधारणेचे कंकण बांधले तरच तो खरा साहित्यिक* असे आपल्याकडे वारंवार म्हटले जाते आणि त्यातूनच *समाजप्रबोधन* सारखा अत्यंत भोंगळ शब्द जन्माला आला आणि अजूनही दुर्दैवाने *निकष* म्हणून प्रस्थापित झाला!! असे म्हणण्याने आपण कलेचा अपमान करीत आहोत, हे त्यांच्या गावी देखील नसते. एखादी सुधारणा योग्य कि अयोग्य, हे तर्काने सिद्ध होऊ शकते. कलाकृती हे स्वभावतः शुद्ध करू शकत नाही. तेंव्हा या सगळ्या घडामोडीत साहित्यिकाची भूमिका दुय्यम स्वरूपाची असते हे ध्यानात घेतले पाहिजे. आणि जर का असे असेल तर कुठलाही मनुष्य साहित्यिक होण्यापेक्षा विचारवंत अधिक होणेच पसंत करील. शास्त्रज्ञ, क्रांतिकारक, समाजसुधारक वगैरे लोकं जे करतात, त्याहून काही वेगळे पण तितकेच मूल्यवान असे काहीतरी कलावंत करीत असतात आणि याच मुद्द्यावर कलेचे मोठेपण सामावलेले आहे. तिला समाजसुधारणेची *बटीक* करून मोठेपणा मिळवून द्यायची अजिबात गरज नाही. *अर्थात हा विषय अतिशय मोठा आहे आणि असा २,३ लेखांत संपण्यासारखा नाही. इथे माझ्या मर्यादा अधिक स्पष्ट होतात. हे वाचून तुम्हाला आणखी काही वेगळे सुचू शकते. कदाचित मी हे सगळे चुकीचे लिहिले, असे देखील मांडता येऊ शकते. असे जर घडले तर मला त्याचा आनंद अधिक होईल, हे नक्की.* *समाप्त*

Monday 11 April 2022

साहित्यातील (सत्य) - भाग २

पहिल्या लेखातून एक प्रश्न उद्भवतो. कलावंत जर कुठल्याही विशिष्ट अनुभवाविषयी लिहीत असेल तर मग कलेतल्या आशयाची विश्वात्मकता (Universality) कशामुळे निर्माण होते? एखादी लघुकथा किंवा एखादी हकीगत ह्यात मग अंतर काय राहिले? या प्रश्नाला उत्तर असे देता येईल, लेखक नुसती हकीगत सांगत नसतो तर अनुभवाची काही एक संगती तसेच आकृती निर्माण करीत असतो. ही जी आकृती तो निर्माण करतो तशीच हुबेहूब आकृती दुसऱ्याच्या अनुभवातून किंवा त्याच्याच इतर अनुभवातून निर्माण होणे अवघड असते. परंतु ती आकृती स्वयंपूर्ण असते. आकृती म्हणून इतरांना प्रतीत होऊ शकते आणि अशाच आकृतीचे अस्तित्व सूचित करण्याचे कलाकृतीचे सामर्थ्य हीच तिच्या आशयाची विश्वात्मकता होय. कलावंताच्या व्यक्तिमत्वाचा म्हणजेच अनुभव घेण्याच्या पद्धतीचा स्पर्श झाला म्हणजे हकीगतीची लघुकथा होते. तेंव्हा कलाकृतीच्या निर्मितीला सर्वात महत्वाचा घटक म्हणजे लेखकाचे व्यक्तिमत्व, त्याची अनुभव घेण्याची पद्धत!! प्रत्येक कलाकृतीच्या मागे असलेल्या या अनुभव घेण्याच्या पद्धतीमुळे कलाकृतीला व्यापक अर्थ प्राप्त होतो. लेखकाच्या व्यक्तिमत्वाच्या किंवा अनुभव घेण्याच्या पद्धतीच्या संस्कारातून अनुभवांची संगती जुळते, तिचे तार्किक स्वरूप नसते तर ते कलात्मक असते. आता एक उदाहरण बघू. *एकच प्याला* हे नाटक वाचून दारू पिणे वाईट, हे निष्कर्ष काढणे चुकीचे ठरेल. परंतु एका विशिष्ट परिस्थितीत एका विशिष्ट प्रकृतीचा माणूस, दारू प्यायला लागला, तेंव्हा त्याचा आणि त्याच्या कुटुंबाचा सर्वनाश झाला इतकेच सार (अर्थात असा निष्कर्ष काढायचा हट्टच असेल तर...) हता नाटकातून काढता येईल. ही घटनांची साखळी दारूबंदीचे पुरस्कर्ते आणि विरोधक, ह्या दोघांना पटण्यासारखी आहे आणि म्हणूनच दोघेही या कलाकृतीचा आस्वाद घेऊ शकतील. परंतु आपल्या नैतिक भूमिकेचे समर्थन जर विरोधक आणि पुरस्कर्ते, ह्या आणि अशा अन्य कलाकृतींच्या आधारे करू पाहतील तर ती समूळ निराशा ठरेल. साहित्याविषयी बोलताना आपल्याकडे *ध्येयवाद*, *आशावाद*, *मांगल्य* किंवा अगदी *जंतूवाद* तसेच *सामाजिक भान* वगैरे शब्दांचा बोभाटा ऐकायला मिळतो. मुळात कुठलीही कलाकृती ही ध्येयवाद हा श्रेष्ठ आहे अगर माणसाने आशावादी असावे, असा संदेश देऊ शकत नाही. मनुष्याने ध्येयवादी असावे की असू नये? हा एक नैतिक प्रश्न आहे. आणि कुठलीही कलाकृती स्वभावतः या प्रश्नाचे *अस्तिपक्षी* किंवा *नास्तिपक्षी* उत्तर देण्यास असमर्थ आहे. *क्रमश:*

Monday 4 April 2022

साहित्यातील (सत्य)

शास्त्रज्ञ आणि कलावंत, हे दोघेही आपापल्या परीने सत्यदर्शन करण्याचा प्रयत्न करीत असतात. मध्यंतरी एक काळ असा आला होता, जे शास्त्रज्ञांना दिसेल तेच एकमेव सत्य मानले जात होते. निव्वळ शास्त्रीय मार्गानेच सत्य दर्शन शक्य आहे असा प्रवाद होता. परंतु पुढे सर जेम्स जीन वगैरे शास्त्रज्ञांनी शास्त्राचा तोकडेपणा मान्य केला आणि ज्याला *अंतिम सत्य* म्हणता येईल त्याचे स्वरूप फक्त शास्त्रीय मार्गाने समजू शकत नाही, हे माय केले आणि एका मोठ्या भ्रमाचा भोपळा फुटला!! शास्त्रज्ञ स्वतःच्या सोयीसाठी काही चिन्हे (Symbols) निर्माण करतात आणि त्यांच्या मदतीने अंतिम सत्याशी संलग्न अशा काही तात्विक आकृती (Theoretical Structure) निर्माण करतात. त्या तात्विक आकृत्या जरी सत्याशी संलग्न असल्या तरी त्या म्हणजे *अंतिम सत्य* नव्हे. त्याचप्रमाणे सत्याच्या अनेक पातळी असू शकतात. कलावंत हा निरनिराळ्या पातळीवरून सत्यदर्शनच करीत असतो. शास्त्रज्ञ जेंव्हा *चंद्र हा पृथ्वीसारखाच मातीचा गोळा आहे* असे सांगतो, तेंव्हा ते जसे सत्य असते, त्याचबरोबर कलावंत * चंद्र मेघांच्या गर्दीत बावरला आहे* असे जे म्हणतो तेदेखील सत्यच असते. ही सत्याची २ परस्पर विरोधी दर्शने नाहीत कारण ती निरनिराळ्या पातळीवरून केलेली आहेत. वर दिलेल्या उदाहरणातील पहिल्या सत्याला जर आपण *शास्त्रीय सत्य* म्हटले तर दुसऱ्या सत्याला *कलात्मक सत्य* म्हणायला प्रत्यवाय होऊ नये. शास्त्रीय सत्य आणि कलात्मक सत्य हातांमधील मूलभूत फरक ध्यानात ठेवणे आवश्यक आहे. *झाडांना मुळे असतात* असे ज शास्त्रीय सर्वमान्य सत्य गृहीत धरले तर मग एखादा बालकवी *औदुंबर डोहात पाय  आहे* असे म्हणतो, तेंव्हा तो एका विशिष्ट झाडाबाबत बोलत असतो  *Life is a tale told by an idiot, signifying nathing* हे जे शेक्सपियरचे जगप्रसिद्ध विधान आहे, हे विधान काही जीवित विषयक केलेले विधान नाही. तसे असते तर ते मॅकबेथला एका विशिष्ट परिस्थितीत जीवनाविषयी आलेल्या अनुभवाबद्दल आहे. कवी आणि शास्त्रज्ञ हातांच्या भूमिकेतील हा भेद ज्या प्रकारे भाषेचा उपयोग करतात त्यावरूनही स्पष्ट होतो. शास्त्रद्न्य जेंव्हा *झाड* हा शब्द वापतारो तेंव्हा ठराविक कुठले झाड अभिप्रेत नसते तर त्या वस्तूचा सगळं वर्ग त्याच्या नजरेसमोर असतो. त्यामुळे त्यांची विधाने (abstract) असतात. त्यांच्या दृष्टीने भाषेचा हा तोकडेपणा असतो आणि म्हणून तो शब्दांची व्याख्या करीत असतो!! आणि पुष्कळ वेळी शब्दांचा वापर टाळून चिन्हांची मदत घेतो. ह्याच्या नेमके उलट कवींबाबत घडत असते. ज्या एका विशिष्ट झाडाबाबत विधान करायचे असते, ते करण्यासाठी मग त्याला *भाषा* हा घटक उपयोगी पडतो आणि म्हणूनच तो भाषेला वळवत अन वाकवत असतो. अशा रीतीने कवी आणि शास्त्रज्ञ, दोघेही भाषेचा एक *साधन* म्हणून वापर करीत असतात.  *क्रमश:*