Saturday 24 April 2021

*तनहा तनहा*

चित्रपट सांगीत आविष्कारांबाबत भारतात काही गोष्टी लगेच ध्यानात येतात आणि त्या आधारावरून एखादा आविष्कार सांगीत आहे की नाही याचा निर्णय घेतला जातो. हे निकष अगदी थोडक्यात मांडायचे झाल्यास, १) गती आणि लय काही वेळा तालापर्यंत पोचणारी असणे, २) तारतेतील बदल व स्वरधून (काही वेळा राग म्हणून ओळखणे), ३) शारीर हालचाली यांना कमीअधिक उपकारक असा नृत्यापर्यंतचा आकृतिबंध असणे,४) अपरिचित किंवा नवा स्वनरंग असणे,५) अर्थ आणि वाणीचा लगाव किंवा भाव, ६) गुणगुणता येईल अशी रचना. चित्रपट गीताचे स्वरूप, त्याची कार्यपद्धती आणि त्याचे मूल्यमापन नेटपणेकरायचे तर या ६ मुद्द्यांची जाण ठेवावी असे वाटते. या प्रकारे होणारे विवेचन आणि विश्लेषण सांगीत होईल परंतु संगीतशास्त्रीय नव्हे. हिंदी चित्रपटसंगीत विषयक लिखाणात हा विवेक फारसा नसतो. आजचे गाणे *तनहा तनहा* हे गाणे या पार्श्वभूमीवरून ऐकल्यास अधिक आनंद होईल, असा विश्वास वाटतो. *मेहबूब अलम कोतवाल* या शायराने कविता लिहीली आहे. एक शायर म्हणून फार वरच्या श्रेणीत बहुदा यांचे नाव येईलच अशी खात्री देता येत नाही परंतु प्रसंगानुरूप लिहिताना *घिसेपिटे* शब्द न वापरता काही वेगळेपण आणण्याचा प्रयत्न दिसतो.कारकिर्दीच्या सुरवातीला *इस्माईल दरबार* यांच्या सोबत आणि पुढे ए.आर.रेहमान यांच्या सोबत जोडी जमली परंतु एकूण कारकीर्द तशी त्रोटकच राहिली. आज २० वर्षांहून अधिक काळ या क्षेत्रात वावरल्यानंतर त्यांच्या नावावर केवळ २५, ३० चित्रपट असावेत!! अशावेळी एकूणच मूल्यमापन करताना चाचपडल्याची भावना येते. प्रस्तुत कविता वाचताना कुठेही नाविन्यपूर्ण रचना वाचत आहोत, असे वाटत नाही परंतु ललित संगीतासाठी, ठराविक शब्दसंख्या असणे, ठराविक जागी *खटके* असणे इत्यादी मुद्दे महत्वाचे ठरतात आणि तिथे ही कविता एका पातळीवर उतरते. दुसरा अंतरा संपवताना *तू दिल की बात कहे दे कहेने क्या है* या ओळीवर मात्र काही क्षण थबकावेसे वाटते आणि याचे कारण आधीच्या चार ओळी वाचल्यावर जो *वाचन संस्कार* होतो, त्याला तिरोभाव अशी ओळ वाचायला मिळते. खरी गंमत आहे ती या गाण्याच्या स्वररचनेची. रेहमान यांच्या बहुतांशी रचना या *आघाती* स्वरूपाच्या असतात आणि याचे महत्वाचे कारण असे संभवते आणि याचे कार्नाजूनही त्यांच्यावर जाहिरात - संगीताचा असलेला प्रभाव. श्रोत्यांमध्ये एक भावनाविद्ध अवस्थाच उत्पन्न करायचा मानस असेल तर जाहिरातसंगीततत्व उपयुक्त ठरते, हे खरे आहे. आजच्या गाण्याची सुरवात देखील सलग वाद्यमेळाने होत नसून आघाती वाद्यांकडून एकदम गाण्याच्या चालीकडे स्वररचना वळते. थोडे बारकाईने ऐकले तर गाण्याच्या मुखड्यात *भीमपलासी* रागाचे सूचना आढळते. रहमान यांचे पायाभूत शिक्षण हे कर्नाटकी संगीतात झाले असल्याने, त्यांच्या रचनांवर दाक्षिणात्य संगीताचा प्रभाव असणे, हा काही योगायोग म्हणता येणार नाही. अर्थात आधुनिक संगीताशी मेळ घालताना, पाश्चात्य संगीताशी संपर्क येणे साहजिक आहे. रेहमान यांच्या चाली पारंपरिक अर्थाने गायनाचे आणि गीताचे मूर्धस्थान नाकारून संयोगी अविष्कारावर भर देतात. असे वाटते, स्वरसंहती किंवा सुरावट म्हणजे काय आणि ती गीतापेक्षा श्रेष्ठ का आणि कशी? या विषयी त्यांच्या काही ठाम कल्पना आहेत. आणखी थोडे वेगळे मत मांडायचे झाल्यास, रेहमान यांच्या संगीतात ध्वनी आणि संगीतकाराची चल गती यांनाही समोर ठेवले जाते. आपल्या श्रवणसंबद्ध कल्पनाशक्तीचा एक अविभाज्य घटक म्हणून अवकाशाची भावनाही संगीतात असावी, असे जणू ते नेहमी सुचवू पाहतात. असे देखील ऐकण्यात आले आहे, रेहमान आपली स्वररचना नेहमी सिंथेसायझरवर तयार करतात, बहुदा त्यामुळे मी वर जो चौथा मुद्दा मांडला - *अपरिचित किंवा नवा स्वनरंग असणे* याची पूर्ती होत असणार. आता या गाण्याची एकूणच जडण घडण बघताना, मी वर जे काही मुद्दे मांडले आहेत त्यातील दुसरा मुद्दा या संदर्भात विशेष म्हणून घेता येईल. *तारतेतील बदल व स्वरधून (काही वेळा राग म्हणून ओळखणे* हा मुद्दा लक्षात घेता या गाण्यातील *भीमपलास* रागाचे एकूण स्वरूप ठरवता येईल. *तनहा तनहा यहां पे जीना ये कोई बात है, कोई साथी नहीं तेरा यहां तो ये कोई बात है* इथे रागसदृश स्वररचना दिसते परंतु पुढे मात्र चाल स्वतंत्र होते. एकूण गाण्यातील *उच्चार* बघता, कर्नाटकी संगीताचा प्रभाव जाणवतो. अर्थात कर्नाटकी संगीताचा, हिंदी चित्रपट संगीतात फार पूर्वीपासून होत आलेला आहे परंतु रेहमान यांनी अतिशय जोरकसपणे त्याची प्रतिष्ठापना केली. अंतरे वेगळ्या *अंदाजाने* बांधणे, ही एक सर्जनशीलता नक्कीच म्हणता येईल आणि इथे संगीतकाराने त्याच मार्गाचा अवलंब केलेला आहे. स्वररचना द्रुत आहे, उडत्या अंगाने विस्तारत जाते त्यामुळे रसिकाचे लक्ष सतत गाण्याकडेच केंद्रीभूत होते. *वाणीचा लगाव* देखील म्हणूनच महत्वाचा ठरतो. गायिका आशा भोसले यांनी सर्वस्वी नवीन स्वररचनांशी कसे सहजतेने जुळवून घेतले, ते बघता थोडा विस्मय दाटतो. आशाबाईंच्या आवाजात एक आश्चर्य वाटावे असा गुण आढळतो आणि तो म्हणजे स्वरांच्या फेकीचा पल्ला होय. अर्थात हाच एकमेव गुण लक्षात घेण्यासारखा नसून, रचनाकारांना हवासा वाटेल असा स्वन (tone) घेऊन त्याला सांगीत गुण बऱ्याच प्रमाणात बहाल करण्याकरिता आवश्यक ते कौशल्य आणि लागणारी कल्पनाशक्ती त्यांच्याकडे भरपूर आहे. आता हेच विधान या गाण्याच्या बाबतीत कसे लागू पडते हे बघता येईल. मुखड्याची पहिलीच ओळ - *तनहा तनहा यहां पे जीना ये कोई बात है* ऐकताना स्वरांची फेक आणि त्याला दिलेला स्वनरंग केवळ असामान्य आहे. विशेषतः: *कोई बात है* हे मुद्दामून ऐकण्यासारखे आहे.गाताना शब्दांवर आवश्यक ते *वजन* दिले आहे पण त्यात ढोबळ ठाशीवपणा नसून लयकारीचा अतिशय सूक्ष्म विचार आहे. पुढे, अंतरा घेताना - *किसीका तो सपना हो आँखो में तेरी* ही ओळ अचानक वरच्या सुरांत जाते ( एक बाब अंतऱ्याआधीच्या वाद्यमेळात, अंतरा वरच्या सुरांत जाणार आहे, असे कसलेही सूचन नाही!!) परंतु तसे गाताना कुठंही *प्रयास* केलेला आढळत नाही. संगीतकार रेहमान यांनी रागाची चौकट बाजूला सारली आहे पण तसे कुठेही निर्देशित केलेले नाही आणि हेच वैशिष्ट्य आशाबाईंनी गाताना सहजतेने गळ्यावर पेलले आहे. वास्तविक या गाण्याच्या वेळी रेहमान यांची शैली प्रस्थापित झाली होती आणि त्यानुसार हिंदी चित्रपट संगीताने एक वेगळे, अधिक वैश्विक असे वळण घेतले होते. आशाबाई या तसे पाहिले तर मागील पिढीतील गायिका. इथेच आपल्या अतुलनीय आवाज-लगावाच्या कौशल्यामुळे या बाबतीत आशाबाई मानाचे स्थान मिळवून बसल्या, हा काही योगायोग नव्हे आणि याबाबतीत त्यांना आव्हान देणे अवघड आहे. एव्हाना जागतिकीकरण झालेल्या संगीतात सुखाने वावरणाऱ्या एका मोकळ्या गात्या आवाजाचा त्यांनी आदिनमुना पेश केला, असे आपल्याला म्हणता येईल. तनहा तनहा यहां पे जीना ये कोई बात है कोई साथी नहीं तेरा यहां तो ये कोई बात है किसी को प्यार दे दे इस सारे जमाने में यही प्यारी बात है किसीका तो सपना हो आँखो में तेरी कोई घर करता हो बाहो में तेरी कोई तो बने हमसफर राहों में तेरी ये जिंदगी तो वैसे ही एक सजा है साथ किसीका हो तो और ये मजा है जमीन आसमा से तो कुछ कहे रही है लहरें भी साहील से कुछ कहे रही है चांदनी भी चांद से कुछ कहे रही है किसी ना किसी से कोई कुछ कहे रहा है तू दिल की बात कहे दे कहेने क्या है (3) Tanha Tanha Yahan Pe Jeena | Urmila Matondkar | Jackie Shroff | Asha Bhosle | Rangeela | 90's Songs - YouTube

Wednesday 14 April 2021

पीटरमेरिट्झबर्ग - स्मरण

वास्तविक या शहराबद्दल मी आधीच लेख लिहिले आहेत तरी आत्ता *आतून* काहीतरी सुचले. साऊथ आफ्रिकेतील १५ वर्षांच्या वास्तव्यात पहिली ३ वर्षे मी या शहरात घालवली. म्हणून असेल पण आजही माझ्या मनात या शहराबद्दल, मनात कुठेतरी ममत्व आहे. याच शहराने मला, या देशात कसे राहायचे, कसे वागायचे, याचे प्राथमिक धडे दिले. तसेच इथे आम्हा मित्रांचा जसा गृप जमला तसा मला इतर शहरांत वावरताना जमवता  नाही. एखाद्या गावाबद्दल तुमच्या मनात का ममत्व वाटते, याचे संयुक्तिक कारण सांगणे काही वेळा तर्कशास्त्राच्या पलीकडचे असते, हेच खरे. तसे गाव टुमदार आहे, जवळपास ७,८ टेकड्यांवर वसलेले आहे, गावात भारतीय वंशाची बरीच मोठी वस्ती आहे आणि तिथे हिंडताना, मला, माझ्या मुंबईचे कधीही विस्मरण झाले नाही. दुसरे असे या गावाने मला त्यांच्या ज्या सहजतेने सामावून घेतले तसे इतर शहरांच्या बाबतीत विरळा घडले. या देशातील माझा पहिलाच अनुभव असेल पण हे शहर मला आजही आपल्या पुण्यासारखे वाटते. इथे Raisethorpe नावाचे उपनगर आहे. तेंव्हा मी तिथल्या Mountain Rise या उपनगरात राहात होतो आणि Raisethorpe हा भाग अगदी जवळपास चिकटून होता आणि इथेच भारतीय वंशाचे लोक भरपूर राहतात. या भागात मी सुरवातीला कितीतरी वीकेंड्स मनमुरादपणे घालवले. इथेच मी नाईट क्लब म्हणजे काय, याचा अनुभव घेतला. या गावाने मला बऱ्याच गोष्टी शिकवल्या, मुळ्या या देशातील चालीरीतींचा रोकडा अनुभव दिला जो पुढे मला भरपूर उपयोगी पडला. जून,जुलै मधील हाडे गारठवणारी थंडी दाखवली आणि तितकीच डिसेंबर, जानेवारीमधील उहाची काहिली सहन करायला लावली. वास्तविक मी राहात होतो, तो भाग प्रामुख्याने गोऱ्या वस्तीचा होता आणि अर्थातच *गोरी* संस्कृती नव्याने शिकता आली. १९९४ मध्ये कायदा व्यवस्था तितकी मोडकळीस आली नव्हती आणि म्हणून मी बरेचवेळा एकटाच पायी हिंडत असे. पायी हिंडले की मग हळूहळू गावाचा स्वभाव तुम्हाला कळायला लागतो, त्या स्वभावाशी जुळवून घेता येते. अशा  कितीतरी रविवार संध्याकाळ मी, माझ्याशीच हितगुज करत, त्या गावाचे रस्ते पायी हिंडून, पिंजून काढले. रविवार संध्याकाळ कधीकधी अंगावर यायची आणि *एकटेपणा* भोवंडायला लागायचा. अशाच वेळी, एकट्याने बाहेर हिंडायला सुरवात केली म्हणजे मग मनावर साचलेले मळभ दूर व्हायला मदत व्हायची. त्यातून हवेत गारवा असेल तर बघायलाच नको. अंगात साधे जॅकेट घालायचे आणि नि:संकोच हिंडायला बाहेर पडायचे, असाच माझा रिवाज होता. वास्तविक या देशात *पायी हिंडणे* फारसे प्रचलित नाही पण तरीही आपण बिनदिक्कतपणे हिंडण्यात वेगळीच मौज असते. कुठ्लाही हेतू न बाळगता हिंडले म्हणजे फार मजा यायची, हे खरे. रस्त्यावर फारशी वर्दळ नाही, ओळखीचे भेटण्याची शक्यता कमीच अशा वेळी, स्वतःचा स्वतःशी मूक संवाद स्वतःला स्वतःची वेगळीच ओळख करून द्यायची. याच हिंडण्यात, माझे पाय *जमिनीवर* ठेऊन वागण्याची सवय जडली आणि ती आजतागायत टिकलेली आहे. सुरवातीच्या वेळी मी walkman कानाला लावून हिंडत असे पण नंतर लक्षात आले, आपला संवाद या हिंडण्यात होत नसून, गाणी ऐकण्यातच वेळ जात आहे!! मग Walkman घरात ठेऊन हिंडणे सुरु झाले. मी कोण आहे? मी इथे कशाला आलो आहे? हे प्रश्न तर नित्याचेच सोबतीला असायचे पण अशाच वेळी मनातली दडून बसलेली मुंबई बाहेर यायची आणि मुंबईत आता काय वातावरण असेल? मग पर्यायाने घराची आठवण यायची. सुरवातीला फार अवघड मनस्थिती व्हायची, कातर अवस्था व्हायची आणि एक, दोनदाच असे झाले असेल, परत मुंबईला यावे अशी प्रबळ इच्छा मनात आली होती. इथे माझे कोण आहे? जे सोबतीला आहेत, ते किती काळ माझ्या सोबत राहणार आहेत? असे विचार मनात घर करायला लागायचे. याचाच परिपाक असा व्हायचा, मन घट्ट व्हायचे आणि इथे जे काही करायचे ते स्वतःच्याच जीवावर करायचे, हाच विचार मनात ठाण मांडून बसायला लागला. कधीकधी वाटायचे आपण अधिक *कोषात* गुरफटत आहोत का? या विचाराने मात्र मनाचा तोल सावरायला मदत व्हायची. कधीकधी मात्र असल्या मनोव्यापाराने हतबुद्ध व्हायचे पण एक वाटायचे, हे जे विचार मनात येत आहेत, हे जरुरीचे आहेत कारण यातूनच आपल्या पुढील वाटचाल करायची आहे आणि तशी माझी झाली देखील. अशा काहीशा *एकांतिक* विचाराने, मी कुठेही गुरफटून घेतले नाही. कितीही मैत्री झाली तरी मनात हेच असायचे, ही जमलेली नाती सगळी तात्कालिक आहेत आणि या नात्यांचा याच दृष्टीने उपभोग घ्यायचा. आता मी परत येऊन आता १० वर्षे झाली आणि आता मनात साऊथ आफ्रिका फारशी राहिलेली नाही. तिथले संबंध काही अपवाद वगळता कुठलेच उरलेले नाहीत हे जरी सत्य असले तरी त्या परखड सत्यामागे जमलेल्या नात्यांनी विणलेला कोष त्यावेळी मला सांभाळून घेत होता हे नक्की. कधीकधी अशाच रिकाम्या संध्याकाळी, अचानक काळोखी दाटून यायची आणि मग बऱ्याच इंग्रजी चित्रपटातील कधी इंग्लंड तर कधी इतर कुठला देश, असे वातावरण आजूबाजूला तयार व्हायचे. एक आठवण तर आजही मनात लख्ख आहे. असाच संध्याकाळी बाहेर पडलो आणि अचानक काळोख अंगावर आला पण तेंव्हा असा अचानक होणारा वातावरण बदल काहीसा अंगवळणी पडला होता. आता असा अचानक काळोख दाटला आणि  मनात *शेरलॉक होम्स* आले. त्यांची आठवण आली आणि थोडे हसायलाच आले कारण त्या आधीच्या क्षणापुर्वी याची आठवण यावी, असे काही वाचले देखील नव्हते की प्रसंग घडला नव्हता. वातावरणात थोडे धुके देखील पसरले होते आणि त्याचा परिणाम बहुदा झाला असणार आणि मग ती संध्याकाळ शेरलॉक होम्सच्या स्मरणात चिरंतन झाली. या शहराने मला खूप काही दिले. काहीही न मागता दिले. टेकड्यांवर गाव वसलेले असल्याने रस्ता कधीच सपाटीवर नसायचा. त्यामुळे चालताना बरेच वेळा दमछाक व्हायची. मग कुठंतरी एखादा पेट्रोल पंप लागायचा आणि मग अनिल निमूटपणे तिथें एक कोक किंवा फॅन्टाचा टिन विकत घ्यायचा. त्या मनोहर गारव्यात हळूहळू कोकचे घुटके घेत रस्त्यावरून चालणे, हा अनिर्वचनीय अनुभव होता. नि:शब्द राहण्यात देखील मुट शाब्दिक सुसंवाद व्हायचा. आता नक्की काय संवाद चालायचा ते तितकेसे आठवत नाही.कधीकधी मनात  *मर्ढेकर* वस्तीला यायचे आणि *शिशिर ऋतूच्या पुनरागमें* सारखी ओळ ती संध्याकाळ सुगंधित करून टाकायची. कधीकधी तर - आता मन *निर्विचारी* ठेऊन हिंडायचे मनात यायचे आणि आपलेच तोकडेपण आपल्या समोर उभे राहायचे आणि हसायला यायचे. अशा वेळी मात्र मी *एकटा* हिंडत आहे, हेच बरे वाटायचे. आपण आपल्याला ओळखावे, यासाठी या संध्याकाळ मला अतिशय उपयोगी पडल्या आणि आपले पाय कायम जमिनीवर ठेवायला मदत झाली. खरंतर काही संध्याकाळी अवचित पडलेल्या वळवाच्या पावसाप्रमाणे चकित करून टाकायच्या आणि आपण कोण आहोत? हा प्रश्न अधिक अगम्य आणि गूढ करून टाकत. कधीकधी मनात येते, अशा प्रत्येक *संध्याकाळ* वर विस्ताराने लिहायला हवे पण आळशीपणा नांदतो आणि अनिल तिथेच हतबुद्ध होतो. 

Tuesday 13 April 2021

अजून नाही जागी राधा

मराठी भावगीत हे तसे भाग्यवान म्हणायला हवे कारण अनेक प्रतिभाशाली कवींच्या कविता अनेक तितक्याच व्यासंगी संगीतकारांनी स्वरबद्ध केल्या आणि रसिकांना त्या कवितेची ओढ लावली. भावगीत संगीताच्या प्रारंभापासून स्वररचना करताना, सक्षम कविता असणे, ही पायाभूत गरज राहिली. कधी कधी वाटते, जर का या संगीतकारांनी अशा कविता निवडल्या नसत्या तर त्या कविता, आज आहेत तितक्या लोकप्रिय झाल्या असत्या का? एक तर मुद्दा ठळकपणे मांडता येतो, कविता वाचन हा छंद तसा दुर्मिळ छंद आहे म्हणूनच कविता संग्रह फारसे खपत नाहीत. हे परखड वास्तव आहे आणि ते मान्य केलेले बरे. आजचे आपले गाणे - *अजून नाही जागी राधा* ही मुळातील अतिशय सक्षम आणि सुंदर आशय असलेली कविता आहे आणि पुढे संगीतकार दशरथ पुजारींच्या वाचनात आल्यावर ती कविता गाण्यात रुपांतरीत झाली. प्रस्तुत कविता प्रसिद्ध कवियत्री इंदिरा संत यांची आहे. कविता वाचताना सुरवातीला, राधा-कृष्ण या पारंपरिक विषयाने होते पण तिथेच खरी फसगत होते. संपूर्ण कविता वाचल्यावर कवितेची नायिका *कुब्जा* असल्याचे ध्यानात येते. वास्तविक, "कुब्जा" हे व्यक्तिमत्व पुराणकाळातील, काहीसे दुर्लक्षित झालेले, किंबहुना दोन, चार प्रसंग वगळता फारसे महत्व नसलेली व्यक्तिरेखा. असे असून देखील तिचा प्रभाव महाभारताच्या संपूर्ण कथेत जाणवतो. अर्थात ही किमया महाभारतकारांची!! ही कविता वाचताना, आपल्याला एक गोष्ट स्पष्टपणे जाणवते, कवितेत वापरलेल्या प्रतिमा आणि त्या प्रतिमांमधून साधली गेलेली कविता.सरत्या रात्रीची वेळ आणि त्यावेळी भणाणणारा वारा!! या वातावरणाच्या भोवती दिसणारा केशरी चंद्र, कवितेतील वातावरण निर्मिती, हा वेगळा शाब्दिक खेळ असतो. प्रतिमा मोजक्या शब्दात मांडावी आणि मांडताना त्यातील आशय अधिक विस्तारित व्हावा!! हेच इथे नेमकेपणा आपल्याला वाचायला मिळते.संवेदनानुभवातील उत्कटता हे त्या स्थायीभावातील अंगीभूत ताणांचे आणखी एक लक्षण. अनुभव संवेदनांतून जाणवल्याखेरीज तो अनुभव म्हणून प्रतीत होत नाही. पण त्यातही संवेदनाविश्व एका विशिष्ट उत्कटतेच्या पातळीवर गेल्याशिवाय ते संवेदनाविश्वही जाणवत नाही. पुराणकथेचा आधार घेतला तर कुब्जेने विषाचा प्याला घेऊन जीवन संपविले होते. या कृतीचे वर्णन करताना, " विश्वच अवघे ओठा लावून कुब्जा प्याली तों मुरलीरव;" किती समर्पक शब्दयोजना आहे. कृष्णाचे नाव देखील कुठे घेतलेले नाही पण "मुरलीरव" या प्रतिमेतून कृष्ण तर उभा राहिलाच पण त्याच बरोबर, "विश्वच अवघे ओठा लावून" या कृतीने आपले अव्यक्त प्रेम व्यक्त केले आहे. बरे, तिची कृती "प्याला पिण्या" इतपत नसून, विष पिताना देखील डोळ्यातून सुख सांडत आहे आणि नुसते सांडत नसून ती भावना केवळ माझीच आहे, हे अधिक महत्वाचे आहे.इथे सगळी कविता कुब्जेची होते आणि सुरवातीची राधा पूर्णपणे लुप्त होते. शेवटच्या कडव्यात जो ताण आहे, तिचा प्रत्यय म्हणजेच भाववृत्तीची जाणीव. अशी अप्रतिम कविता स्वरबद्ध करायला घेताना संगीतकार दशरथ पुजारींनी *झिंझोटी* राग निवडला आहे. असे म्हणता येईल. चालीचे स्वरलेखन या रागात सापडते. इथे मी मुद्दामून *सापडते* हा शब्द वापरला आणि त्याचे मुख्य कारण, या संगीतकाराच्या स्वरलेखनाच्या बांधणीत सापडते. आता इथेच बघा, *शाडव-संपूर्ण* या जातीचा राग आणि आरोहात *निषाद* स्वर वर्ज्य. गाण्याची सुरवात जरी *ध सा रे म ग* या परिचित झिंझोटी रागाच्या सुरांनी होत असली तरी आपण भावगीत बांधत आहोत आणि याच उद्दिष्टाने स्वरोच्चार या गाण्यात येतात. अर्थात गाण्याचा तोंडवळा या रागाचे सूर घेऊन दर्शवत असला तरी पुढे चाल स्वतंत्र होते. हेच तर ललित संगीताचे प्रमुख वैशिष्ट्य म्हणायला हवे. *मावळतीवर चंद्र केशरी* या पहिल्या अंतऱ्याच्या बांधणीत रागाला पूर्ण फाटा दिला आहे. वाद्यमेळ बराचसा बासरी या वाद्यावर आधारलेला आहे. एकूणच या संगीतकाराने आपल्या सांगीतिक कारकिर्दीत नेहमीच वाद्यमेळ रचताना, अत्यंत काटकसर केल्याचे आढळते. बहुदा आर्थिक प्रश्न निगडित असावेत. एकूणच मराठी भावगीतांचा धांडोळा घेतला तर हेच व्यवच्छेदक लक्षण आढळते. त्यामुळेच जशी कविता अनाक्रोशी आहे तशीच स्वररचना देखील अतिशय संयत, शांत आहे. *आज घुमे का पावा मंजुळ* ही ओळच एकुणात स्वररचनेचा स्वभाव मांडणारी आहे. आता संगीत रचनाकार म्हटलं की त्याचा सर्वात पायाभूत गुण असतो तो गुणगुणण्यासारखी चाल बांधता येणे. या विधानावर जर का या संगीतकाराच्या स्वररचना पाहिल्यास, बहुतेक सगळी गाणी याच धर्तीवर बांधलेली आहेत. श्रोत्यांच्या मनात-कानात गीत रुजवण्यासाठी वापरायचे आणखी एक वैशिष्ट्य मांडायचे झाल्यास, गीताचा पहिला चरण सप्तक मर्यादेत मधल्या स्वरावर म्हणजे *मध्यम* स्वरावर आणि दुसरी ओळ खाली आणून आधारस्वरावर म्हणजे *षड्ज* स्वरावर ठेवणे होय. अनेक सामाजिक-सांस्कृतिक कारणांनी सुरावट *सा* स्वरावर संपली की एक प्रकारची पूर्णतेची आणि स्थैर्याची भावना दृढमूल होते. हाच विचार ध्यानात ठेवल्यास, या संगीतकाराची गाणी आपल्या कानात अजूनही का रुंजी घालतात? या प्रश्नाचे उत्तर सहजगत्या मिळते. गायिका सुमन कल्याणपूर यांच्या कारकिर्दीवर थोडा दृष्टिक्षेप टाकल्यास, या गायिकेने, संगीतकार दशरथ पुजारींकडे भरपूर गाणी गायली आहेत. या गायिकेच्या गळ्याची बलस्थाने आणि जातकुळी बघता, या संगीतकाराकडे बहुसंख्य गाणी गाणे, हा काही योगायोग म्हणता येणार नाही. सुमन कल्याणपूर यांचा आवाज सुरेल, पारदर्शक आणि पल्लेदार नक्कीच होता परंतु प्रसंगी आवाजाला निमूळतेपण देण्याची क्षमता होती. परिणामी, शब्दांतील दडलेला आशय अधिक खोलवर मांडण्याचे कौशल्य निर्विवादपणे होते. इथे या गाण्यात, सुरवातीला मंद्र सप्तकात स्वर लागतात आणि तिथेच चालीची प्रकृती ध्यानात येते. *अजून नाही जागी राधा* ही ओळ या संदर्भात ऐकण्यासारखी आहे आणि पुढे अंतरा सुरु होताना *मावळतीवर चंद्र केशरी* ही ओळ गाताना, मघाशी म्हटल्याप्रमाणे *निमूळतेपण* सहज आणि विनासायास येते. तसेच गाणे संपताना *हें माझ्यास्तव.. हें माझ्यास्तव..* गाताना स्वरांत येणारी विन्मुखता विशेष करून ऐकण्यासारखी आहे. इथे एक बाब लक्षात ठेवण्यासारखी आहे, स्वररचनेत कुठेही *आडवळणी* चलन नाही की लय अवघड झालेली नाही पण तरीही रचना कुठेही *सपाट* आणि *बाळबोध* होत नाही. गायकीला आव्हान असे कुठेही नाही तरीही गायनाचा आपल्या मनावर एक गाढा परिणाम होतो आणि ही फलश्रुती गायिका म्हणून सुमन कल्याणपूर यांची म्हणावीच मागेल. अजून नाही जागी राधा, अजून नाही जागे गोकुळ; अशा अवेळी पैलतीरावर आज घुमे का पावा मंजुळ. मावळतीवर चंद्र केशरी, पहाटवारा भवती भणभण; अर्ध्या पाण्यामध्ये उभी ती तिथेंच टाकून अपुले तनमन. विश्वच अवघें ओठा लावून, कुब्जा प्याली तो मुरलीरव; डोळ्यांमधले थेंब सुखाचे: "हें माझ्यास्तव.. हें माझ्यास्तव.." (5) Ajun Nahi Jagi Radha - YouTube

Wednesday 7 April 2021

आज सोचा तो आंसू भर आये

अनुभव निर्मिती करू शकणाऱ्या वस्तू-विश्वातील अनेक वस्तू आणि *शब्द* ही दोन्ही एकाच "जातीची" आहेत. शब्द देखील वस्तुविश्वातल्या वस्तूंच्या समान आहेत. प्रत्येक शब्द संवादाचे साधन या अर्थाने संस्कृतीच्या कुठल्या तरी जगाशी कुठल्या तरी नात्याने निगडित झालेला असतो. तसेच त्या नात्यात तो त्या *अंगाचे* वाहन असतो. त्याचप्रमाणं निर्मितीतील एक द्रव्य (material) या नात्यानं प्रत्येक उच्चारित आणि अनुच्चारित अशा शब्द या नावघटकाची स्वतःची अशी गुणवत्ता असते. जेंव्हा असे शब्द काही एका स्वरांशी निगडित होतात तिथे मग शब्द आणि सूर यांचे अतिशय निराळे अर्थ जाणवायला लागतात. सूर देखील संस्कृतीच्या अगणित घटकांशी आपले नाते जोडत असतो. अशाच प्रकारच्या अत्यंत निरंतर तरीही निर्वात पोकळी भरून टाकणाऱ्या गाण्याचा आज आपण परिचय करून घेणार आहोत - *आज सोचा तो आंसू भर आये*. शब्दाची लय आणि स्वरांची लय यांची एकात्मता अतिशय तरलपणे आणि तितक्याच अलौकिक समन्वयाने भारले गेलेले गाणे!! वास्तविक ही एक कविता - भावकाव्य आहे. भावकाव्य हे स्वभावतःच वैयक्तिक अनुभवांची विशिष्टता शोधत जाणारे काव्य असते. या वैयक्तिक अनुभवांची रसिकाला अत्यंत निकटची अशी प्रचिती देऊ शकते. अर्थात या प्रयत्नात हल्ली अलीकडच्या काव्यात जाणवणाऱ्या दुर्बोधता या काव्यात आढळत नाही. एखादा अनुभव काव्यरूप घेतो, त्यावेळी तो कवीच्या जाणिवेपासून मुक्त झाल्याखेरीज स्वतःचे रुप घेऊन, स्वत्वाने उभा राहू शकत नाही. वास्तविक ही रचना एकचित्रपट गीत आहे परंतु पारंपरिक ढाचाच्या पलीकडील अनुभव देणारी रचना आहे. उर्दूमढीक प्रथितयश शायर कैफी आझमी यांची ही शायरी आहे. ही शायरी जरा बारकाईने वाचली तर काव्यातील शब्दसंख्य प्रत्येक ओळीगणिक विषम आहे. अशी रचना स्वरबद्ध करणे हे नेहमीच आव्हानात्मक असते कारण चालीचा मीटर ठरवणे अवघड असते. जरी २,२ ओळींचे अंतरे असले तरी तिला गझल वृत्तातील कविता असे म्हणता येणे कठीणआहे आणि याचे कारण विषम शब्दसंख्या!! असे असून देखील शायरीतील भावार्थ अतिशय गहिरा आहे. प्रत्येक शब्दाला *वजन* आहे. आता मुखड्यात *आसू भर आये* लिहिताना त्याची जोड *मुद्दते हो गयी मुस्कुराते* या ओळीशी करून, या कवीने अतिशय तरल परिमाण दिले आहे. मी पहिल्या परिच्छेदात लिहिताना "अनुभव निर्मितीच्या वस्तू विश्वातील अनेक वस्तू" हे शब्दाचे महत्व दर्शवणारे वाक्य इथे पूर्ण होते. गाणे अर्थातच अनेक चित्रपटात घासून पुसून गुळगुळीत झालेल्या विरही प्रसंगाच्या पार्श्वभूमीवर आहे परंतु जातिवंत कवी, त्यातही आपली प्रतिभा दाखवून देतो. *दिल की नाजूक रगे टुटती हैं, याद इतना भी कोई ना आये* अशा काहीशा विरोधाभासी भावनेशी येते आणि या ओळींशी ही कविता संपते. संगीतकार मदन मोहन यांची स्वररचना आहे. मुखड्याची पहिली ओळ ऐकल्यास आपल्याला लगेच *जौनपुरी* रागाचीआठवण येते. इथे बरीच गंमत आहे. मुखडा जौनपुरी रागात सुरु होतो पण अंतऱ्यातील ओळी *काफी-सिंधुरा* या रागाच्या सुरांशी नाते जोडताना दिसते. आता थोडे तांत्रिक भाषेत लिहायचे झाल्यास, *मंद्र सप्तकातील शुद्ध निषादापासून ते दोन्ही धैवत* असा प्रवास आढळतो. वास्तविक जौनपुरी रागात *धैवत कोमल*असतो परंतु इथे आपल्याला शुद्ध आणि कोमल धैवत ऐकायला मिळतात. पहिलीच ओळ * रे म ग(को) रे सा सा रे नि सा ग(को) रे* या सुरांच्या अंगाने जाताना दिसते. अर्थात मुखड्याच्या दुसऱ्या ओळीत *दोन्ही धैवत* ऐकायला मिळतात. अर्थात हा थोडा जटील असा भाग आहे!! आता आपण सरळ गाण्याकडे वळूया. स्वररचना अतिशय अवघड आहे, हे लगेच समजून घेता येते. इथे स्वरविस्ताराला वाव आहे परंतु एक संगीतकार म्हणून मदन मोहन यांनी प्रत्येक *जागा* अतिशय कौशल्याने बंदिस्त केली आहे . एक उदाहरण देतो. मुखडा सुरु झाल्यावर, दुसऱ्या ओळीत *मुद्दते हो गयी* म्हणताना चाल वरच्या सुरांत प्रवेश करते आणि तसे करताना एखादी हरकत घेणे शक्य होते परंतु मदन मोहन यांनी तिथेच लय वळवून घेतली आणि *मुस्कुराये* शब्दावर अचूक सम आणून ठेवली. मघाशी मी जो उल्लेख केला, तो इथे वेगळ्या संदर्भात करता येईल. मुखड्याची दुसरी ओळ केवळ ४ शब्दांची आहे तर पहिली ओळ ६शब्दांची आहे परंतु कवितेचा आशय बघता, हीच शब्दरचना योग्य वाटते आणि अशा वेळेस, संगीतकाराने शायरीचा योग्य तो मान राखून स्वरिक लय त्याला अनुसरून बांधली. कवीच्या शब्दांना किती महत्व देता येते, याचे हे एक सुरेख उदाहरण म्हणता येईल. वाद्यमेळ तर अतिशय मोजका आहे परंतु *गिटार* तसेच *सतार* या वाद्यांचा अतिशय वेधक उपयोग करून घेतला आहे. एकूणच स्वररचना ठाय लयीत बांधलेली असल्याने (ठाय लयीत गाणी बांधणे हे संगीतकार मदन मोहन यांचे खास वैशिष्ट्य सांगता येईल) ताल आणि त्यांचे आघात अगदी नाममात्र आहेत. नीट ऐकल्यास आपल्याला *रूपक* ताल मिळू शकतो परंतु मात्रांचे आघात अतिशय मृदू आणि संथ लयीत आहेत. अशी काहीशी *अमूर्त* वाटणारी स्वररचना आणि ती बांधणारा संगीतकार मदन मोहन, म्हणजे गायन लताबाईंचे असणार, हे ओघाने येते!! गाण्याची सुरवात सरळ लताबाईंच्याच आवाजात होते. सर्वसाधारणपणे, कुठलेही गीत हे, सुरवातीला चालीचे *वजन* दर्शविणाऱ्या वाद्यमेळाने होते पण इथे तसे काही घडत नाही. इथेच गायिकेच्या गायनाची परीक्षा सिद्ध होते. चाल ऐकायला फार गोड आहे पण प्रत्यक्षात चालीतअसंख्य *खाचखळगे* आहेत. किंबहुना चाल कुठेही एका सरळ रेषेत जात नाही. असंख्य *कंगोरे* असल्याने गायन करताना सतत दक्षता घेणे आवश्यक. *हर कदम पर उधर मूड के देखा, उनकी महफिल से हम उठ तो आये* हा पहिलाच अंतरा या संदर्भात बघता येईल. एकतर या अंतऱ्याची *उठावण* संपूर्णपणे मुखड्याच्या चलनापेक्षा वेगळी आहे तसेच इथे *जौनपुरी* राग बाजूला सरतो आणि *काफी* रागाचे सूर समोर येतात. चाल एकदम वरच्या सुरांत जाते. मजेचा भाग म्हणजे अंतरा सुरु होण्याआधी जो वाद्यमेळ आहे त्यातून अशा प्रकारचे *सूचन* चुकूनही मिळत नाही परंतु अशी गुंतागुंतीची रचना लताबाईंनी कमालीच्या सहजतेने आपल्या गायनातून दर्शवली आहे. रागाच्या मूळ चौकटीपासून निघून या गाण्याची रचना उभी राहते आणि तसे करताना कुठलाही आक्रस्ताळेपणा (गायन वरच्या सुरांत गेलेले आहे, ही बाब लक्षात घेता ....) न करता, संयत भावनाविष्कार साधून संगीत कसे असू शकते त्याचा हा नमुना नि:संशय श्रवणीय आहे. मदन मोहन यांच्या संगीतास वेदनेचे प्रचंड आकर्षण आहे. त्यामुळे त्यांच्या चाली चैतन्यमय चलनांतून उशी घेत उडणाऱ्या चेंडूसारख्या वाटत नाहीत आणि हे निरीक्षण ठाम करण्यासाठी प्रस्तुत गीताचे उदाहरण लक्षणीय ठरेल. आज सोचा तो आंसू भर आये मुद्दते हो गयी मुस्कुराये हर कदम पर उधर मूड के देखा उनकी महफिल से हम उठ तो आये रह गयी जिंदगी दर्द बन के दर्द दिल में छुपाये छुपाये दिल की नाजूक रगे टुटती हैं याद इतना भी कोई ना आये (4) AAJ SOCHA TO AANSOO BHAR AAYE H@RRI 720P - YouTube