Thursday 19 June 2014

Beethovan-​Class of Symphony!!



साधारणपणे पाश्चात्य संगीताचा विचार आणि आवड दर्शविली जाते ती, अधिककरून, POP, ROCK अशाच संगीतात. फार तर, JAZZ पर्यंत मजल जाते पण सिम्फनी संगीत, ज्याला पाश्चात्य शास्त्रीय संगीत म्हटले जाते, तिथे फारशी जात नाही. अर्थात, भारतात तरी काय वेगळी परिस्थिती आहे म्हणा!! अजूनही बहुतेक समाज हा सुगम संगीत किंवा चित्रपट संगीत इथेच आकर्षिला गेलेला आहे. असे, नेहमीच, पूर्वीपासून चालत आलेले आहे. अर्थात, माझ्या अनुभवाने बोलायचे झाल्यास, पाश्चात्य समाजातसुद्धा एकूणच, सिम्फनी संगीताचे रसिक हे ठराविक  गटाचेच असतात आणि तिथेदेखील सिंफनी संगीताबद्दल फारसे उत्साहाने बोलणारे भेटत नाहीत. मी, साउथ आफ्रिका या देशात उणीपुरी १५ वर्षे काढली, त्यानिमित्ताने, तिथल्या समाजात चांगल्यापैकी मिसळलो होतो. वास्तविक, साउथ आफ्रिका हा देश म्हणजे आफ्रिका खंडाचे युरोप किंवा अमेरिका असे सहजपणे म्हणता येईल, इतका पुढारलेला देश आहे. ठायीठायी, तिथे युरोपियन वंशाचे लोक भेटत असतात. त्यामुळे, ती संस्कृती, तिथे मुरली आहे, असे म्हणायला प्रत्यवाय नाही. तिथेच, मी प्रिटोरिया शहरात आणि डर्बन शहरात असे दोन सिम्फनी संगीताचे कार्यक्रम पहिले होते. मला तेंव्हा थोडासा धक्का बसला होता. धक्का अशासाठी की, कार्यक्रमात बहुतेक रसिक हे मध्यम वयीन किंवा उतार वयाचे असतील अशी अपेक्षा ठेवली होती पण वास्तवात अर्धे सभागृह तरुण रसिकांनी भरले होते. अर्थात, पुढे जेंव्हा मी, माझ्या ओळखीच्या मित्रांशी सिंफनी संगीताचा विषय काढीत असे, तेंव्हा अपवाद वगळता, नेहमीच निराशा पदरी पडली.
असो, खरे सांगायचे झाल्यास, जसे आपले रागदारी संगीत. जोपर्यंत स्वरांची ओढ लागत तोपर्यंत तरी, रागदारी संगीत हे परकेच वाटते!! तोच अनुभव सिंफनी संगीताबद्दल येतो. पियानो, व्हायोलीन सारखी अत्यंत थोडी वाद्येच या संगीतात वापरली जातात. आपल्या रागदारी संगीतात जसे, आधी ठाय लय, नंतर रागाची बढत असा स्वरविस्तार असतो, तसाच प्रकार सिम्फनी संगीतात असतो. स्वर तेच असतात फक्त स्वर लावण्याची पद्धत वेगळी असते आणि मुळात तिथे सिम्फनी संगीत हे वाद्यसंगीत असल्याने, मानवी गळा अप्राप्य असतो आणि आपल्याला थोडे बिचकायला होते. पण, एकदा का त्या स्वरांची ओळख, विस्तार ध्यानात यायला लागला की मात्र आपली “सुटका” नाही!! पियानोवरील नृत्यमग्न बोटे, आपल्या मनाचा कब्जा कधी घेतात, हे कळतच नाही!! अर्थात, दोन्ही संगीतात फरक फार महत्वाचा आहे.सिंफनी संगीत एकदा तयार झाले की त्यात सुधारणा शक्यच नसते. एखादे चिरेबंदी स्थापत्य असावे त्याप्रमाणे, सिंफनीची घट्ट विणीची बांधणी असते. त्यात तुम्ही कधीही बदल घडवू शकत नाही, निदानपक्षी अजूनपर्यंततरी कुणी असा प्रयोग केलेला नाही. त्यामुळे, तुम्ही त्या संगीताचे संपूर्ण “नोटेशन” काढू शकता. रागदारी संगीतात, व्यक्तिगणिक बदल नेहमीच घडत असल्याने, आपले संगीत संपूर्णपणे “नोटेशन” पद्धतीत बसविणे अवघड होते. प्राथमिक स्वररचना मांडता येते पण तीच स्वररचना, त्या रागाची एकमेव ओळख असे म्हणता येत नाही. असे असले तरी सिम्फनी संगीताची बांधणी मात्र केवळ अपूर्व, अशीच म्हणावी लागते. स्वरांचे इतके विविध प्रकार ऐकायला मिळतात, की ऐकताना आपण “थक्क” होणे, इतकेच आपल्या हाती राहते.
तसा, सिंफनी संगीताचा इतिहास हा काही शतकांपूर्वीचाच आहे. त्या आधी, पाश्चिमात्य संगीत हे प्रामुख्याने “ग्रीक” संगीत पद्धत अवलंबत होती जी बऱ्याच प्रमाणात अजूनही चालू आहे. पण, नंतरच्या काळात, इटालियन पद्धत अस्तित्वात आली आणि संगीत लेखन पद्धत बदलली. त्या दृष्टीने, व्हिएन्नाचा संगीतकार, मोझार्ट हे नाव प्रामुख्याने घ्यावे लागेल. याने निर्माण केलेला सिम्फनी संगीत वारसा, पुढे बीथोवनने अधिक विस्तारला असे, ढोबळपणे म्हणता येईल.
बीथोवनच्या रचना या अतिशय गुंतागुंतीच्या असतात. बहुश: पियानो हेच वाद्य डोळ्यासमोर ठेऊन निर्माण केल्या आहेत, असे वाटते. आपल्याकडे जसे, वादी-संवादी स्वर हे त्या रागाची मुलभूत ओळख दर्शवितात, तसाच प्रकार, सिंफनी संगीतात,  C मेजर, E  मायनर अशी स्वरांची ओळख असते. परंतु, बीथोवनच्या रचना, त्याहीपलीकडे जातात म्हणजे, त्याच्या रचनेची सुरवात हे बरेच वेळा E मेजर किंवा, F मायनर अशा सप्तकातील नंतरच्या सुरांवरून होते आणि तिथे, ज्या काही स्वरांच्या जाती दर्शविल्या जाता, ते सगळे केवळ अपूर्व असते. जसे आपण, रागदारी संगीत, आपले मन संपूर्ण एकाग्र करतो, तसेच करून ऐकले तर सिंफनी संगीतातील अपूर्वता जाणता येईल. फक्त, आपल्या संगीतात गमकांच्या सहायाने मिंड काढली जाते, तसे सिंफनी संगीतात जमत नाही आणि याचे मुख्य कारण, त्यांच्याकडे असलेली वाद्ये, हेच आहे. ऑर्गन किंवा पियानो, या वाद्यात स्वर लांबविण्याची अजिबात सोय नसल्याने, स्वरांच्या तुटकपणात स्वरांची संगती साधायची असते, जशी आपण सतार वादनात साधतो. तरीही वाद्यांमधील फरक जाणवतोच. तरीही, जर का इटलीमधील सेंट पीटर्सबर्ग येथील चर्चमधील ऑर्गन वादन ऐकली, या वाद्याची  घनगंभीरता लगेच लक्षात येईल. केवळ इटलीमधीलच नव्हे तर इतर प्रसिध्द चर्चमधील ऑर्गन असाच अनुभव देतात. एकाच वाद्यावर पाच सप्तकांपेक्षा अधिक स्वरांचा अनुभव देण्याची ताकद या वाद्यात आहे. चर्चचे अवाढव्य सभागृह ऑर्गनमधील स्वरांनी तुडूंब भरून जाते आणि हा अनुभव केवळ अनिवर्चनीय असतो. मी, साउथ आफ्रिकेत हा अनुभव खूप वेळा घेतलेला आहे.
बीथोवनच्या रचना अतिशय संथ लयीत सुरु होतात, एक विविक्षित क्षणी संथ लय कधी द्रुत लयीत परावर्तीत होते, हे सुरवातीला तरी समजतच नाही. सिम्फनी संगीत म्हणजे, एका स्वरावरून अनेक स्वरांचा “गुच्छ” असे स्वरूप असते आणि इथे बीथोवन केवळ असामान्य आहे. त्याच्या रचनेतील पियानोच नव्हे तर व्हायोलीनदेखील इतके स्वरबंध दाखवीत असतात की आपल्यालाच प्रश्न पडतो की एकाच वेळी किती स्वर सौंदर्य ऐकायचे आणि अवलोकायचे!! खरतर, बीथोवनच्या प्रत्येक रचनेचे हे व्यवच्छेदक लक्षण मानावे लागेल. रचना कधीही सरळसोटपणे आपल्या समोर येत नाही, सुरवातीचा स्वर पियानोवर वाजला की लगेच पुढील स्वर हे लाटालाटानी जणू अंगावर कोसळायला लागतात. हे स्वर इतके एकमेकात गुंतलेले असतात की, प्रत्येक स्वर सुटेपणी ऐकायला, आपले अवधान फार एकाग्र असावे लागते, नव्हे बीथोवनच्या रचनेची ही पहिली मागणी असते!! इथे, तुम्हाला बीथोवन जरादेखील उसंत देत नाही!! एकामागून एक स्वर तुमच्या कानावर येत असतात आणि त्यातून लय तयार होत जाते आणि त्या लयीचा मागोवा घेणे, कधीकधी अशक्य होऊन जाते. त्याची, Symphony No.9, The Fifth Symphony, Fur Elise या रचना मुद्दामून ऐकण्यासारख्या आहेत. Piano Concert No.5 in E Flat major, ही रचना तर केवळ असामान्य अशीच आहे. थोडक्यात, या रचनेची सुरावट  E खर्ज तरीही प्रमुख(वादी) स्वर कल्पून केलेली रचना. आपल्या भाषेत लिहायचे झाल्यास, खर्जातील “गंधार” हा आधार स्वर मानून, केलेली स्वररचना!! रचना ही “गंधार” हाच “षड्ज” मानून स्वरविस्तार केलेला!! किती अवघड काम!! गंमत म्हणजे, नंतर, हीच रचना, Piano Concert No.5 “Emperor” या रचनेत पूर्ण वेगळे स्वरूप घेऊन येते. इथे, आपल्याला हातात केवळ अवाक होणे, इतकेच राहते. पियानोवरील, याच्या रचना तर केवळ असामन्य याच शब्दात मांडता येतील. अर्थात सगळ्याच रचना काही E, F या स्वरांनी सुरु होत नाहीत. उदाहरणार्थ, Piano Concert No.3 Opera 37 ही रचना C Minor या स्वराने सुरु होते, म्हणजे आपला “सा” परंतु त्याचे स्वरूप अपवादानेच या रचनेत येते!! जणू काही आपला राग मारवा!! अशा कितीतरी रचना या संदर्भात सांगता येतील. मला तर कधीकधी असेच वाटते की, कलावंताचे मोठेपण, कधीही त्याच्या संख्येवर ठरवू नये. म्हणजे, सातत्य आवश्यक आहे पण एकमेव निकष मानू नये. लताचे कौतुक, तिने काही हजारो गाणी गायली म्हणून न करता, “रूठ के तुम तो चल दिये” सारखी अफलातून रचना गायली, या मुद्द्यावर करावे. त्यातून कुणीही कलाकार कधीही सातत्याने एकच दर्जा कधीही राखू शकत नाही. हा निसर्गनियम आहे. फक्त, त्याने आपल्या कारकिर्दीत किती वेळा परमोच्च शिखर गाठले किंवा तसा प्रयत्न केला, यावर दर्जा ठरवावा!! आणि त्या शिखरस्थळाचे विश्लेषण करावे. बाकीचा सगळा कचरा दुर्लक्षित करावा.
बीथोवन हा असा अलौकिक कलाकार होता की, हळूहळू तो चक्क “बहिरा” होत गेला!! तरीही, त्याने आपली संगीत रचना करण्याचे अजिबात थांबविले नाही. अर्थात, या शारीरिक व्यंगाने त्याच्या रचनेतील स्वरस्थानांच्या व्यामिश्रतेत थोडा बदल गेला आणि तो तसा घडणे, क्रमप्राप्तच होते. खरे कौशल्य हे की, जसजसे त्याचे बहिरेपण वाढत गेले, तशी हा माणूस, जमिनीला कान लावून, त्यातून जाणविणाऱ्या कंपनांमधून पुढील स्वररचना करीत असे!! संगीतकलेवर किती प्रेम करावे, याचे हे उत्कृष्ट उदाहरण ठरावे!! अर्थात, बहिरेपण वाढत गेले तशी त्याच्या रचना थोड्या खर्जात होऊ लागल्या पण हा अवगुण कसा म्हणता येईल? तसा प्रयत्न काही समीक्षकांनी केल्याचे वाचनात येते. कदाचित असे देखील असू शकेल की, शारीरिक व्यंग वाढीस लागल्याने, त्याची जिद्द वाढीस लागली, असे असेल तर, आपण केवळ त्याला “कुर्निसात” करणे, हेच योग्य ठरते.

No comments:

Post a Comment