Thursday 26 December 2019

भारवाही लमाण

एखादे पुस्तक पहिल्याप्रथम वाचले की मनावर एखादी भावना उमटणे साहजिकच असते आणि त्यानुसार आपण त्या पुस्तकावर आवड/निवड ठरवत असतो. पुढे समजा तो लेखक/ती लेखिका निजधामास गेल्यावर काहीशा गहिऱ्या वातावरणात पुन्हा तेच पुस्तक वाचायला घेतल्यास, कदाचित वेगळा परिणाम घडू शकतो. कितीही तटस्थतेचा आव आणला तरी या प्रतिक्रियेची तर्कसंगत फोड करणे दुरापास्त होऊन बसते. डॉ. श्रीराम लागू लिखित "लमाण" पुस्तकाबाबत माझी बरीचशी विमनस्क प्रतिक्रिया झाली. 
वास्तविक ५ वर्षांपूर्वी मी हे पुस्तक वाचले होते आणि माझी प्रतिक्रिया तेंव्हाही निराशजनक अशीच होती आणि आता नुकतेच लागूनच निधन झाले म्हणून पुन्हा पुस्तक वाचून काढले तेंव्हा यावेळच्या प्रतिक्रियेत फारसा बदल घडला नाही. एखाद्या लोकप्रिय अभिनेत्याचे पुस्तक वाचायला घेताना आपल्यासमोर काही प्रमाणात पुस्तकाबाबत काही मते असतात (यात त्या अभिनेत्याच्या प्रतिमेचा भाग अधिक) आणि असे माझ्याबाबतीत आणखी एका पुस्तकाबाबत झाले आहे. विजया मेहता लिखित "झिम्मा" पुस्तकाने माझी अशीच निराशा केली आणि आजही त्या प्रतिक्रियेत सुतराम फरक पडलेला नाही. तसे बघितल्यास श्रीराम लागू आणि विजया मेहता यांचे कर्तृत्व निश्चितच उत्तुंग असे म्हणायला लागेल. मराठी रंगभूमीवर ज्या कलाकारांनी मन्वंतर घडवले त्यातील हे दोघे प्रमुख अभिनेते. आजही त्यांच्या शैलीविषयी गहिवरलेल्या आवाजात बोलले जाते (मला हे चुकीचे वाटते कारण कलाकाराबद्दल आत्मीयता असणे यात चूक नाही पण विश्लेषण करताना गहिवरलेपण कशासाठी?) आणि या दोन्ही कलाकारांच्या एकूण सम्यक योगदानाबद्दल त्यांना नेहमीच उजवे माप दिले जाते ( हे योग्य ) परंतु जेंव्हा कारकिर्दीचा अभ्यासक आढावा घ्यायची वेळ येते तेंव्हा वैय्यक्तिक भावना वगैरे बाजूला सारणे आवश्यकच असते. 
आता थेट पुस्तकाकडे वळतो. पुस्तकातील २ बाबी विशेष खटकल्या 
. पहिल्या बायकोचा आणि तसेच मुलाचा उल्लेख इतका त्रोटक आहे (जवळपास नगण्य स्वरूपात) आहे की थोडे आश्चर्य वाटते. आपल्या आयुष्यात अनेक व्यक्ती येतात आणि त्यातील कुणा व्यक्तीचा किती उल्लेख करावा याबाबत खरतर लेखकाचा विचार अंतिम असे म्हणावे लागेल परंतु या पुस्तकात, पहिल्या बायकोचा फोटो आहे (फोटोंत दोघेही आहेत) आणि "माझे पहिले प्रेम" असे वर्णन केले आहे. याचाच अर्थ, आयुष्यावर काहीतरी परिणाम घडला असणार (मी असे ऐकले आहे, पहिल्या बायकोचा मृत्यू संशयास्पद रीतीने झाला. कदाचित त्या आठवणींना पुन्हा उजाळा मिळू नये हा लेखकाचा विचार असावा) असे असताना, बायकोबद्दल इतका त्रोटक उल्लेख खटकतो. तसेच आपला मुलाचा उल्लेख. तसे बघितल्यास, मुलाचा मृत्यू ही घटना अतिशय व्याकुळ करणारी घटना होती आणि त्याबद्दल उल्लेख न करणे हा लेखकाच्या बुद्धीवादी स्वभावाचा खास विशेष म्हणायला लागेल. पण मग पुढे मुलाच्या नावाने पारितोषिक ठेवणे, ही घटना याच बुद्धीवादी विचाराशी कशी ताडून बघता येईल? पारितोषिक ठेवले म्हणजे मुलाबद्दल मनात कोवळीक तर असणारच तसेच मुलाची आठवण चिरंतन राहावी, हा विचार देखील असणारच आणि त्यात वस्तूत: काहीही चूक नाही. प्रश्न असा उद्भवतो जर का मुलाची स्मृती कायम राहावी असे वाटत असेल तर मग पुस्तकात मुलाचा ना फोटो ना कसला उल्लेख!! असे का केले असावे? हा प्रश्न मनात येतो. दुसऱ्या बायकोबद्दल बरेच उल्लेख आहेत ( याबाबत अशी मखलाशी करता येईल - दुसरी बायको नाट्यव्यवसायात असल्यामुळे उल्लेख झाले) 
सगळे आयुष्य नाट्यव्यवसायात काढले आणि ते काढताना, एक विशिष्ट विचारसरणी डोळ्यासमोर ठेऊन काढले. ही बाब सहज, सोपी नाही. आपला दृष्टिकोन कायमस्वरूपी बाळगताना मनात अनेक द्वंद्व उभी राहिली असणारच. प्रसंगी तडजोडी केल्या असणारच आणि त्यावेळी मनाची समजूत घालणे पराकोटीचे अवघड झाले असणार परंतु त्याबाबत फारसे काही वाचायला मिळत नाही. नाटकाचा व्यवसाय म्हणून स्वीकारल्यावर सदासर्वकाळ उत्तम भूमिका मिळणे कधीही शक्य नसते. तसे कुणालाही अशक्यच असते परंतु जेंव्हा मनाविरुद्ध एखादी भूमिका स्वीकारली जाते (ऐतिहासिक नाटकांतील भूमिकांबाबत त्यांनी भिन्न दृष्टिकोन ठेवला होता) तेंव्हा एकतर निव्वळ आर्थिक स्थैर्य हा मुद्दा प्रमुख असू शकतो किंवा सातत्याने रंगभूमीवर वावरणे, ही मानसिक गरज असू शकते. त्याबाबत फार खोलवर विचार केलेला आढळत नाही. किंबहुना "अभिनय कला" बाबत काही ठिकाणी काही परिच्छेद सुरेख लिहिले आहेत जे लेखकाच्या वैचारिक भूमिकेशी नाते सांगतात. 
परंतु विशेषतः "नटसम्राट" नाटक वाचायला घेतले त्यावेळची भारावलेली अवस्था त्यांनी छान मांडली आहे आणि एक माणूस म्हणून हे घडू शकते परंतु काही काळाने याच अभिनेत्याने "नटसम्राट" हे नाटक डागाळलेले नाटक आहे असे विधान केले होते. एखादी कलाकृती कालांतराने आवडेनाशी होणे, संययुक्तिक आहे पण मग त्यावेळच्या आपल्या प्रतिक्रियेबाबत आपली मते आणि विचारसरणी याबाबत काहीतरी विवेचन होणे अगत्याचे वाटते. नटसम्राट नाटकातील भूमिका आपल्याला कशी मिळाली या विषयावर भरपूर लिहिले आहे (नाटकाचे लेखक शिरवाडकरांशी वैय्यक्तिक स्नेह कसा झाला याचे देखील वर्णन आहे) पण एक बुद्धीवादी अभिनेता म्हणून त्या भूमिकेत नेमके काय भावले, आपण त्याची तयारी कशी केली याबाबत फारसे विश्लेषणात्मक काही वाचायला मिळत नाही. किंबहुना आपल्याला कालानुरूप कशा भूमिका मिळाल्या याची जंत्री वाचायला मिळते (विकिपीडियाच्या काळात ही माहिती कुणालाही कशीही मिळू शकते) "हिमालयाची सावली" ही लेखकाला मिळालेली आणखी एक गाजलेली भूमिका. महर्षी कर्व्यांच्या आयुष्यावर बेतलेली भूमिका. वास्तविक इतका प्रचंड आवाक्याचा माणूस साकारायला मिळणे, हे भाग्यच म्हणायला हवे परंतु या भूमिकेबाबत एक अभिनेता म्हणून विश्लेषक भूमिका घेतलेली नाही - हे सगळे मी लिहीत आहे कारण लागूंचा उल्लेख करताना त्यांच्या बुद्धीवादी दृष्टिकोनाचा नेहमी उल्लेख केला जातो आणि वस्तुनिष्ठ विचारसरणी आयुष्यभर कशी बाळगली, हे ऐकायला/वाचायला मिळते. जर हे उल्लेख अनिवार्य असतील तर मग आपल्याला मिळालेल्या भूमिकेबद्दल तितकाच खोलवर विचार वाचायला मिळणे, ही अपेक्षा चुकीची नाही आणि तिथे हे लेखन कमी पडते. 
पुढे मराठी सिनेमात प्रवेश केला. "पिंजरा","सामना", "सिंहासन" सारख्या वेगवेगळ्या भूमिका साकारल्या. वास्तविक सिनेमा आणि नाटक, दोन्ही संपूर्ण वेगळी माध्यमे आणि दोन्हीकडे तुम्हाला वेगळी अभिनय शैली अंगीकारावी लागते. हा मुद्दा तर सर्वश्रुत आहे परंतु आजही आपल्याकडे या विषयावर फारसे "बौद्धिक" लिहिलेले वाचायला मिळत नाही. विशेषतः "पिंजरा" चित्रपटातील भूमिका फार वेगळी होती. वाचायला मिळतो तो शांताराम बापूंचा ताठरपणा आणि त्यांनी अभिनेत्यावर दाखवलेला विश्वास!! परंतु एक विचारी अभिनेता म्हणून या भूमिकेत नेमके काय भावले? त्यासाठी काही वेगळे प्रयत्न केले का? या प्रश्नांची कुठेच उत्तरे मिळत नाहीत. हिंदी किंवा मराठी चित्रपटात असंख्य सामान्य/अतिसामान्य अभिनेते बघायला मिळतात आणि त्यांच्याकडून अशी अपेक्षाच नसते परंतु ज्या बुद्धिवादाची कास लागूंनी आयुष्यभर धरली त्यांच्याकडूनअशी  अपेक्षा बाळगणे निश्चितच चुकीचे नाही.  
आता आपण लागूंच्या अभिनयाबद्दल बोलूया. एकूणच सगळ्या भूमिकांचा साकल्याने विचार केल्यास काही गोष्टी ठामपणे जाणवतात. मराठी चित्रपटाचे नाव आठवत नाही पण एका प्रसंगात (प्रसंग चित्रपट गीताचा आहे) लागू ढोलकी वाजवताना दिसतात. किमान अपेक्षा अशी असते, तबला किंवा ढोलकी वादनाचे चित्रण चालू असेल तर निदान वादनाचा अचूक आभास पडद्यावर  दिसायला हवा परंतु पडद्यावर ढोलकी वादनाच्या वाजलेल्या मात्रा आणि लागूंच्या हात/बोटांच्या हालचाली याचा अजिबात  मेळ बसलेला नाही!! ढोलकी वादकाची भूमिका आणि मूलभूत तत्वे विसरली!! एक वेगळे उदाहरण - अर्थात तुलना नाही पण "कोहिनूर" या हिंदी चित्रपटातील "मधुबन में राधिका" या प्रसिद्ध गाण्यातील दिलीप कुमारने भासवलेले सतार वादन बघावे. तसेच अभिनयाबाबत एक बाब नेहमी सांगितली जाते, अभिनेत्याने भूमिकेत स्वत्व विसरून ती भूमिकाच वठवणे योग्य. पडद्यावर किंवा रंगभूमीवर अभिनेता न दिसता, ती भूमिकाच दिसली पाहिजे. आता या पार्श्वभूमीवर लागूंचा अभिनय कुठल्या पातळीवर येतो? पुस्तकात ठायीठायी हॉलिवूड तसेच ब्रिटिश दिग्गज अभिनेत्यांचा उल्लेख होतो आणि त्या अभिनेत्यांचा आपल्यावर पडलेला प्रभाव (त्यांच्या अभिनयशैलीबाबत काहीही वाचायला मिळत नाही तर  फक्त नामावळी  वाचायला मिळते)  याबाबत बरेच लिहिलेले वाचायला मिळते. मग प्रश्न असा  उभा राहतो. संस्कारक्षम वयात प्रभाव पडलेल्या अभिनेत्यांचे काय विशेष तुम्हाला जाणवले? आणि जे विशेष जाणवले त्याचा तुम्ही तुमच्या अभिनयासाठी काय उपयोग करून घेतला? लागूंचे वर्णन नेहमी बुद्धीप्रामाण्यवादी व्यक्ती म्हणून केले जाते मग ज्या कलेची व्यवसाय म्हणून जाणीवपूर्वक निवड केली, त्याबाबत सखोल विचार केलेला फारसा वाचायला मिळत नाही. किंबहुना काही भूमिका बघताना, आपण प्रथितयश अभिनेते डॉ. श्रीराम लागू (च) बघत आहोत असे वाटते. भूमिका वेगळी असली तरी संवादफेक, शारीर अभिनय आणि हालचाली यात काहीवेळा साचेबद्धता आढळते. एक विचारी अभिनेता म्हणून इकडे लक्ष गेले नाही की जाणूनबुजून दुर्लक्ष केले? 
सामाजिक कृतज्ञता निधी ही मराठी रंगभूमीवरील फार महत्वाची घटना आणि त्याबद्दल विस्ताराने सुरेख लिहिले आहे. "लमाण" पुस्तक ही आठवणींची जंत्री आहे, असे खुद्द लेखकानेच म्हटले आहे आणि विधानाला पुष्ट्यर्थ हे लेखन आहे. या अनुरोधाने आणखी एक मुद्दा मनात येतो."लग्नाची बेडी" नाटक करायचे ठरल्यावर जे अभिनेते/ अभिनेत्री नक्की केले जातात. त्याबाबत नक्की काय निकष ठेवले होते? याबाबत काहीही वाचायला मिळत नाही. 
पुस्तकांत, आपल्यावर खास प्रभाव पाडणाऱ्या कलाकारांची नावे लिहिली आहेत. १) बर्ट्रांड रसेल, २) मर्ढेकर आणि ३) कुमार गंधर्व. आता यांचे नेमके काय भावले?  प्रश्न अनुत्तरीतच राहतो. मर्ढेकरांच्या कवितांची अवतरणे वाचायला मिळतात, त्यावरून समृद्ध वाचनाची खात्री पटते परंतु आपल्याला का आवडले? हाच प्रकार रसेलच्या लिखाणाबत घडतो. संगीतात आपल्याला फारसे कळत नाही असे सुरवातीलाच सांगितले. अर्थात संगीत न कळता (शास्त्र न जाणता) आस्वादता येते. परंतु हे लेखनाबाबत असे म्हणता येणार नाही. अभिनेत्याचे आत्मचरित्र आहे तेंव्हा लेखनाची सखोल चर्चा अपेक्षित नाही परंतु आपली आवड, याबाबत थोडक्यात तर्कसुसंगत भूमिका मांडणे, ही अपेक्षा चुकीची ठरत नाही. त्यातून आयुष्याच्या उत्तर काळात लागूंनी कविता वाचनाचे जाहीर कार्यक्रम केले होते म्हणजे मराठी कवितेबाबतची साक्षेपी नजर स्पष्ट केली होती. 
वास्तविक आत्मचरित्रात्मक लेखन म्हणजे आपल्या आयुष्याकडे तटस्थपणे पाहण्याची एक दुर्लभ संधी असते. त्यानिमित्ताने आपल्या पूर्वायुष्याकडे त्रयस्थ नजरेतून बघून त्याचा ताळा मांडणे शक्य असते. भावनांना संपूर्णपणे बाजूला सारून, त्यावेळच्या प्रतिक्रिया कितपत योग्य होत्या, किती चुकीच्या होत्या, इत्यादी गोष्टी संगतवार तपासता येतात, निदान त्या दृष्टीने प्रयत्न असावा आणि तिथेच "लमाण" पुस्तक अपुरे ठरते. कधीतरी असे मनात येते, बुद्धीप्रामाण्यवाद हा लेखकाने आपल्यावर लादून घेतला की काय? तसे असेल तर हे सगळेच लेखन ही आत्मवंचना ठरेल. 

Monday 16 December 2019

भारतीय लोकशाही

भारतात लोकशाही पद्धत १९४७ पासून अस्तित्वात आली असे म्हणता येईल. कित्येक शतके राजेशाही, सरंजामशाही पुढे परकीय राज्य इत्यादी अनेक कारणांनी इथे लोकशाही नाममात्र होती किंवा अजिबात नव्हती, असे म्हणता येईल. त्याचा परिणाम असा झाला, भारतीय लोकांना "लोकशाही" या शब्दाचा खरा अर्थ कळलंच नाही आणि आजही दुर्दैवाने तशीच परिस्थिती आहे. "लोकांनी चालवलेले, लोकांसाठी चालवलेले" वगैरे घोषणा भरपूर झाल्या आणि तशाच हवेत विरल्या. अर्थात घोषणा या हवेतच करायच्या असतात, याचे धडे भारतीयांना देश स्वतंत्र झाला आणि लगोलग प्रचिती यायला लागली. इथल्या राजकारणी नेत्यांना, सामान्य जनतेला कसे फसवायचे याचे मूलभूत धडे फार पूर्वीपासूनच मिळाले. आज फक्त त्याची री ओढली जात आहे. 
"नेहरूंनंतर कोण?" हा प्रश्न जेंव्हा उपस्थित केला त्या दिवशीच राजकारणातील व्यक्तिपूजेची प्रतिष्ठापना झाली. पुढे, Indira is India या घोषणेने त्या वृत्तीला खतपाणी मिळाले. आज जेंव्हा व्यक्तिकेंद्रित शासनव्यवस्था हाच भारतीय राजकारणाचा पाय बनला आहे. त्याबद्दल नकारात्मक सूर काढला जातो तेंव्हा आपण इतिहासाकडे जाणूनबुजून काणाडोळा करत असतो. आज जेंव्हा भाजपविरुद्ध टीका केली जाते तेंव्हा जर का इतिहासात डोकावले तर काँग्रेसने जे ७० वर्षांत केले, तेच भाजप आज करीत आहे, हे स्पष्टपणे दिसते. आज फरक इतकाच पडला आहे, कालापरत्वे संपर्कसाधने आधुनिक झाली आणि टीका सर्वव्यापी होत गेली. 
आपल्याकडे लोकशाही कधीही रुजली नाही किंबहुना लोकशाही रुजावी अशी व्यवस्थाच कधी निर्माण केली नाही. तशी होऊ शकणार नाही, याची फार पूर्वीपासून काळजी घेण्यात आली. ज्या इंग्लंडच्या लोकशाहीचे आपण गुणगान करतो आणि त्याच धर्तीवर भारतीय लोकशाहीचा डोलारा उभारला आहे तिथे विरोधक आणि सत्ताधारी जरी वेगळे असले तरी व्यक्तिकेंद्रित मत असते. चर्चिलने तर आपल्या आत्मचरित्रात, "मी बरेचवेळा विरोधी पक्षात असून सुद्धा सरकारच्या बाजूने मत दिले आहे कित्येक वेळा सरकारात सामील असतात विरोधात मत दिले आहे आणि मला याबाबत कधीही खेद वाटला नाही". असे चित्र दुर्दैवाने भारतात कधीही दिसले नाही. विरोधक म्हणजे देशबुडवे अशीच संस्कृती, विशेषतः इंदिरा गांधींपासून जन्माला आली आणि पुढे त्या संस्कृतीत भर पडत राहिली. अशा परिस्थितीत भारतात लोकशाहीचा पाया मजबूत होणारच नाही आणि यापुढे ती शक्यता फार अंधुक झाली आहे. त्यातूनच मागचे ते मूर्ख आणि फक्त मीच शहाणा, हा विचार बळावत गेला. अर्थात हा विचार व्यक्तिपूजेचाच एक भाग आहे म्हणा. ७० वर्षे काँग्रेसचा एकछत्री अंमल होता त्यामुळे त्या पक्षाला हे वाक्य बोलायची सुविधा नव्हती परंतु एकूणच, विरोधक म्हटल्यावर त्याने फक्त विरोध करणे अपेक्षित असते आणि सत्ताधारी म्हटल्यावर त्याने सतत भलावण करायची आणि हीच खरी लोकशाही म्हणून आरडाओरडा करायचा. यातून फक्त गोंधळ निर्माण होतो. टीव्हीवरील चर्चा याच संस्कृतीचे फलित आहे. शांतपणा आपल्याला भावतच नाही कारण मृत्यू हीच शांततेची एकमेव कसोटी असे आपले मत आहे. मृत्यूनंतर शांतता भंग करता येत नाही, हे भारतीयांचे भाग्यच म्हणायला हवे. 
एका बाबतीत आपण जगासमोर अग्रेसर आहोत. सदैव घोषणा करून सामान्य माणसाला विचार करायची संधीच मिळवून द्यायची नाही. त्याच्या डोक्यात सतत चिखल भरून ठेवायचा आणि भ्रमिष्ट करून टाकायचे. एकप्रकारची ही स्टालिनशाही (च) म्हणायची. गुलामगिरी आपल्या रक्तातच भिनली आहे. त्यातूनच निष्ठा एकाच व्यक्तीपाशी केंद्रित करण्याची प्रवृत्ती वाढायला लागली. स्वतंत्र विचारशक्तीच गमावून बसलो आहोत. दर ५ वर्षांनी मतदानाचा भोंगळ उत्सव आणि निवडणुकीचे गुऱ्हाळ घालून, लोकशाहीचे सुंदर थडगे बांधले जाते. खरतर भारतीय समाजाला लोकशाही म्हणजे काय, याचेच धडे देण्याची गरज आहे. नुसत्या संसद इमारती बांधून काहीच साधले जात नाही. आपण फक्त लोकशाहीचा वृथा आणि अत्यंत खोटा अभिमान बाळगत आहोत. आपण सगळेच खोटारडे आहोत आणि आता असे म्हटल्यावर "मी सत्याचा पुजारी आहे" सारखी भ्रामक  उत्तरे वाचायला मिळतील सुद्धा. 
लोकांना गृहीतच धरायचे नाही, सामान्य जनतेच्या डोक्यावरून वरवंटा फिरवायचा. याच कृतीने आपण लोकशाही सिद्ध करीत आहोत. अजूनही स्वातंत्र्य लढ्याची वर्णने चवीने वाचली जातात, त्या लढ्याच्या भोगातून असंख्य आर्थिक फायदे उपटले जातात. आपली बुद्धी अजूनही ७० वर्षे मागासलेलीच आहे. आजही "मी इतके महिने/वर्षे तुरुंगात राहून देशसेवा केली" असली उबवलेली वाक्ये म्हणण्यातच धन्यता मानीत आहोत आणि गमतीचा भाग असा आहे, सर्वसामान्य जनता याच वाक्यांना फशी पडत आहे.  आणखी एक बाब, आपण घृणास्पदरीत्या बुद्धीचा टेम्भा मिरवीत असतो. 
गेली ७० वर्षे हेच चालले आहे. या गोष्टी मात्र भारतीय जनता सहन करण्यायोग्य झाली आहे, हेच निर्विवाद सत्य होय. यालाच "भारतीय लोकशाही" म्हणतात जी जगाच्या इतिहासात अद्वितीय आणि अजोड आहे. 

Saturday 7 December 2019

जिंदगी भर नहीं भूलेगी वो बरसात की रात

मध्यरात्री घनघोर पावसांच्या धारांत भिजत असलेली आणि त्यामुळे अवघडून गेलेली तरुणी, एखादा सुरक्षित आडोसा शोधत उभी असते. आजूबाजूला विजेचा कडकडात चालू असतो आणि त्या नादात पावसाचा जोर वाढलेला असतो. त्यामुळे ती तरुणी "ओलेती" झालेली. अचानक एक तरुण तिथे येतो आणि त्या ओलेत्या सौंदर्यावर लोभावून जातो. तरुणीला, हा तरुण आपल्याला "हेरत" आहे याची जाणीव होते आणि काहीशी सलज्ज होते. 
१९६० साली आलेल्या "बरसात कि रात" या चित्रपटातील "जिंदगी भर नहीं भूलेगी" या प्रसिद्ध गाण्याची वरील प्रमाणे पार्श्वभूमी आहे. चित्रपट सरधोपट आहे आणि अभिनयाच्या क्षेत्रात "मधुबाला" वगळता, सगळाच आनंद आहे!! मला तर बरेचवेळा असेच वाटते, समोर भारत भूषण सारखा नाठाळ अभिनेता असल्याने, मधुबालाचा अभिनय अधिक खुलून येतो!! तिच्या सौंदर्याबद्दल तर कुठलेच दुमत नसावे. रोशन यांनी संगीतबद्ध केलेली गाणी, हाच या चित्रपटाचा प्राण आहे!! 

"पाठमोरी मूर्ती तुझी पाहिली मी कौतुकें 
वाटले स्वत्कुंतली गे गुंतली सारी सुखे 

भार त्यांचा गाढ काळा मेघ आषाढांतला 
का फुलांच्या मार्दवे मानेवरी भारावला? 

सुप्रसिद्ध कवी बा.भ. बोरकरांच्या या ओळी म्हणजे मोहक, सलज्ज तरुणीच्या संयत सौंदर्याचा आविष्कार आहे. या मतितार्थाशी संलग्न अशा ओळी, प्रसिद्ध शायर साहिर यांनी प्रस्तुत गाण्यात लिहिल्या आहेत. खरतर, या गाण्यातील ओळी अप्रतिम आहेत आणि अशा वेळी, या ओळी असामान्य आहेत की पडद्यावर दिसणारे मधुबालाचे सौंदर्य अलौकिक आहे, असा संभ्रम पडतो. सुंदर गाण्यात शब्द असे असावेत, जिथे स्वरलय संपते तिथेच अक्षर संपावे, जेणेकरून शाब्दिक "यतिभंग" होऊ नये. हे सगळे एकाच वेळी जुळून येणे फार अवघड असते. चित्रपट गीतांवर जेंव्हा सरसकट टीका केली जाते तेंव्हा हा मुद्दा फारसा ध्यानात घेतला जात नाही. 
संगीतकार रोशन यांच्या बहुतांशी रचना या अतिशय संयत, अनाक्रोशी आणि विशेष करून मुग्ध स्वरूपाच्या आहेत. गाण्यातील वाद्यमेळ बांधताना, कुठलेही वाद्य अति तार सप्तकात शक्यतो जाणार नाही आणि त्यायोगे गायन देखील त्याच पातळीवर वावरेल, याची काळजी घेतलेली आढळते. बरेचवेळा रचनेत, लय वरच्या सुरांत जाण्याची शक्यता दिसत असताना, लय खंडित करून खालच्या स्वरांवर वळवून घेण्याकडे त्यांच्या बराचसा कल दिसतो. गाणे अधिककरून मंद्र सप्तकात कसे बांधले जाईल, हाच दृष्टीकोन बाळगलेला आढळतो. त्यामुळे रचनेत, फारच कमीवेळा "यतिभंग" झाला आहे किंवा शब्दांची अनावश्यक मोडतोड झाली आहे, असे ऐकायला मिळत नाही. शब्दांच्या आशयानुरूप लयीला "वळण" द्यायला त्यांनी कधीही मागेपुढे बघितले नाही, त्या दृष्टीने, त्यांची गाणी ही अधिक करून "गीतधर्मी" असतात.
सुरवातीच्या हुंकारातून, गाण्याची सुरवात होते. या हुंकारातच आपल्या यमन रागाची खूण पटते. मोहमद रफी, हा गायक म्हणून विचार करताना, सरळ सरळ दोन भाग दिसतात. १] या अशा गाण्यातून गायकीचे अतिशय संयमित रूप ऐकायला मिळते तर इतर अशी काही गाणी आहेत, तिथे आवाजात अकारण "नाटकी" भाव फार डोकावतो. गायन करताना, शब्दांची जाण ठेऊन गायन करणे, हा फार ढोबळ विचार झाला परंतु शब्दांतील आशय अधिक खोलवर दाखवण्याच्या नादात वाहवत जाण्याचा धोका फार असतो आणि दुर्दैवाने, मोहमद रफी काही गाण्यात तसे वाहवत गेले आहेत.
 
जिंदगी भर नहीं भूलेगी वो बरसात की रात  
एक अंजान हसीना से मुलाकात की रात 

या ओळीतील भाव जाणून घेतला तर लगेच ध्यानात येईल, "त्या" अनुपमेय रात्रीच्या सुगंधी आठवणींची मांडणी आहे. मघाशी मी संगीतकार रोशन यांच्या बाबतीतील वैशिष्ट्य सांगताना, शब्दातील "ऋजुता" चालीत मांडताना, मुग्धता अधिक खोलवर कशी दाखवता येईल, याचाच प्रत्यय येतो. खरतर त्या रात्री त्या तरुणीशी "मुलाकात" म्हणावी तर केवळ दृष्टीभेट इतपतच मर्यादित परंतु त्या नजरभेटीतून अवतरलेले भावनांचे "बोलके" भाव केवळ शब्दातून(च) नव्हे तर सुरांतून देखील विभ्रमासहित आपल्याला ऐकायला मिळतात. गाण्याचा "मुखडा" असावा तर असा!! गेयताबद्ध शब्दकळा आणि त्याला संलग्न अशी स्वररचना आणि त्याचे आविष्कृत स्वरूप गायनातून तितक्याच प्रत्ययकारी दिसणे. सगळेच मधुबालाच्या सौंदर्याप्रमाणे विलोभनीय!! 
इथे पहिला अंतरा येण्याआधीचा वाद्यमेळ ऐकण्यासारखा आहे, "मुलाकात की रात"
या ल शेवटचा "त" या अक्षराचा सूर ध्यानात ठेऊन, सतारीच्या स्वरांची बांधणी केली आहे आणि त्यात पुढे सारंगी आणि जलतरंग या वाद्यांना जोडून घेतले आहे. मनाची घालमेल ही, जलतरंग वाद्यातून किती सुरेख उमटली आहे आणि हे भाव दाखवताना कुठेही लय कठीण किंवा वरच्या सुरांत गेली आहे, असे दिसत नाही. रोशन यांच्या रचनेतील "संयत" भाव दिसतो, तो असा. 

हाय वो रेशमी झुल्फो से बरसता पानी
फुल से गालों पे रुकने को तरसता पानी 
दिल में तुफान उठाते हुये, जजबात की रात 

इथे देखील रोशन यांची शब्दांप्रती दिसणारी जाणीव दिसते. "हाय वो रेशमी झुल्फो से बरसता पानी" ही ओळ दोनदा घेतली आहे आणि पहिल्यांदा घेतल्यानंतर काही सेकंद, सतार आणि जलतरंग यांचा स्वरमेळ ऐकायला मिळतो. पडद्यावर मधुबालेचा सलज्ज चेहरा आणि पार्श्वभागी जलतरंग वाद्याचे सूर!! "दिल में तुफान" इथे रचना किंचित वरच्या सुरांत जाते ती केवळ "तुफान" या शब्दाचे सूचन करण्यासाठी परंतु पुढल्या क्षणी चाल परत मूळ स्वरलयीशी जुळवून घेते. रचना परत, पहिल्या ओळीशी - "जिंदगी भर नहीं भूलेगी वो बरसात की रात"  येते पण ही ओळ घेताना, मोहमद रफी "बरसात" हा शब्द कसा घेतो हे खास ऐकण्यासारखे आहे. आवाजात किंचित थरथर आहे पण कुठेही नाटकीपणा नाही. आता, पडद्यावरील भारत भूषणच्या चेहऱ्यावरील रेषा देखील हलत नाही, हा या गाण्याचा भीषण विपर्यास आहे, तो भाग वेगळा!!

डर के बिजली से अचानक वो लिपटना उसका 
और फिर शर्म से बलखा के सिमटना उसका 
कभी देखी न सुनी ऐसी तिलिस्मात की रात 

या ओळी गाताना, लय जरा खालच्या पट्टीत गेली आहे आणि या ओळी वाचल्या की लगेच याचे उत्तर आपल्याला मिळेल. या गाण्यात, प्रत्येक कडव्याची पहिली ओळ संपल्यावर. रोशन यांनी जलतरंग वाद्याच्या सुरांनी अप्रतिम जोडकाम केले आहे जेणेकरून, ओळीचा अर्थ आपल्याला अधिक सुंदररीत्या लक्षात यावा. वाद्यमेळ अक्षरश: एखाद, दोन सेकंदाचा आहे पण अर्थपूर्ण आहे. हे शब्द देखील काय अप्रतिम आहेत. "लिपटना" च्या जोडीला "सिमटना" घेऊन, प्रणयाचा रंग भलताच सुरेख रंगवला आहे. मी सुरवातीला म्हटले आहे, "संयत" हा रोशन यांच्या संगीताचा स्थायीभाव आहे आणि तो इथे नेमका आढळतो. कडव्याची शेवटची ओळ पुन्हा वरच्या सुरांत सुरु होते पण पुढल्या क्षणी चाल खालच्या सुरांत येते. "शर्म से बलखा" हे शब्द कसे गायले गेलेत हे मुद्दामून ऐकण्यासारखे आहे. 

सुर्ख आंचल को दबा कर निचोडा उसने 
दिल पे जलता हुआ एक तीर सा छोडा उसने 
आग पानी मे लगाते हुये हालात की रात 

सगळे गाणे हे केवळ काही मिनिटांच्या दृष्टीक्षेपावर आधारित आहे, जिथे एकही शब्दाचा संवाद नाही, अशा अनोख्या भेटीवर हे गाणे बेतलेले आहे. त्यामुळे, चित्रपटाचा नायक कवी प्रकृतीचा असल्याने, मनात उमटणाऱ्या निरनिराळ्या प्रतिमांचे आवर्तन, साहीरच्या कवितेतून वाचायला मिळते. अचानक नजरेसमोर तरुण येतो आणि त्यामुळे मनाची झालेली घालमेल "सुर्ख आंचल को दबा कर निचोडा उसने" या ओळीतून व्यक्त होते आणि त्या सलज्ज असहायतेतून झालेली दृष्टीभेट, नायकाच्या मनात कल्लोळ उठवते. 

मेरे नग्मो में बसती है वो तसवीर थी वो 
नौजवानी के हसीन ख्वाब की ताबीर थी वो 
आसमानो से उतर आई थी जो रात की रात 

चित्रपटातील नायक, कवी असल्याने, गाण्याचा शेवट देखील, "मेरे नग्मो में बसती है" याच शब्दांनी होणे उचित ठरते. साहीर कवी म्हणून काय दर्जाचा होता, हे बघण्यासारखे आहे. "नौजवानी के हसीन ख्वाब की ताबीर थी वो " इथे, "हसीन ख्वाब" च्या जोडीला "ताबीर" हाच शब्द यायला हवा. तिथे दुसरा कुठलाही शब्द उपरा ठरेल आणि अशी अपरिहार्यता जेंव्हा कवितेत येते, तिथे ती कविता "काव्य" म्हणून श्रेष्ठ ठरते. एक उदाहरण, पु.शि. रेग्यांच्या "त्रिधा राधा" कवितेत, "क्षेत्र साळीचे" असे शब्द येतात, तेंव्हा "क्षेत्र" हे "साळी"चेच असायला हवे, असे होते. तिथे दुसरा पर्याय नाही. 
सगळेच गाणे एका सुंदर लयीत बांधलेले आहे, कुठेही कुठलेच वाद्य "बेसूर" तर नाहीच पण, एखादा स्वर वाढवला तर, असला विचार देखील मनाला शिवत नाही. गाण्याची घट्ट बांधणी अशीच असावी लागते. या कडव्यानंतर गाणे परत ध्रुवपदावर येते आणि आपल्या मनात केवळ मधुबाला रहात नसून स्वर आणि शब्दांच्या आकृतीने निर्माण केलेला  नितांतरमणीय आविष्कार  आपल्या मनात उतरत जातो. कुठल्याही गाण्याची सांगता यापेक्षा वेगळी होणे उचित नाही. 


तू चंदा मैं चांदनी

मराठी कवितांमध्ये, इंदिरा संतांच्या "कुब्जा" कवितेचे अनन्यसाधारण स्थान आहे. पुराण काळातील एखादे व्यक्तिमत्व घ्यायचे आणि कवितेत, त्याच्या रूढ प्रतिमेला बाजूला सारून, त्या प्रतिमेची, शब्दमाध्यमातून नव्याने जडण घडण करून, आशयाच्या अभिवृद्धीत भर टाकत, कवितेलाच  अधिक श्रीमंत केली.

"अजून नाही जागी राधा,
     अजून नाही जागें गोकुळ;
अशा अवेळी पैलतिरावर 
     आज घुमे कां पावा मंजुळ. 
मावळतीवर चंद्र केशरी;
     पहाटवारा भवती भणभण;
अर्ध्या पाण्यामध्ये उभी ती 
     तिथेच टाकून अपुले तनमन." 

ही कविता वाचतानाच आपल्या डोळ्यांसमोर, ते रात्रीचे वाळवंट, नुकताच उगवलेला चंद्र आणि त्या थंडगार वातावरणात उभी असलेली राधा!! अगदी असेच वातावरण आणि त्या वातावरणाच्या पार्श्वभूमीवर सादर झालेले गाणे - तू चंदा मैं चांदनी.

हिंदी चित्रपट गीतांत फारच कमी गाणी अशी सापडतात, जी खऱ्या अर्थी असामान्य असतात परंतु त्यांना लोकाश्रय लाभत नाही आणि हळूहळू विस्मरणात जातात. तसे बघितले तर ज्या गाण्यांना, लोकसंगीताचा आधार लाभला आहे, ती गीते देखील वर्षानुवर्षे लोकांच्या स्मरणात रहातात. थोडक्यात, असे अनुमान आपल्याला सहज काढता येईल, कुठल्याही गाण्याची "कुंडली" मांडणे, जवळपास अशक्य कोटीतली बाब आहे. 
गाण्याची चाल, रसिकांच्या मनाची "नाळ" जोडणारी हवी, असा एक मतप्रवाह अनेक वर्षे प्रचलित आहे, विशेषत: गाण्याचा "मुखडा" जितका आकर्षक असेल तितके ते गाणे, रसिकांच्या पसंतीला उतरते. गाण्याचा "मुखडा" आकर्षक असणे, आवश्यक आहे पण त्याच बरोबर त्याच्या नंतरची "बांधणी" देखील तितकीच आकर्षक असणे, अत्यावश्यक असते अन्यथा, सुरवातीला मनावर घडलेला असर, हळूहळू पिछाडीला पडतो आणि गाणे निरस होण्याची शक्यता बळावते. 
काही गाण्यांच्या बाबतीत असे घडते, गाण्याची चाल पहिल्या प्रयत्नात, लक्षात(च) येत नाही आणि ते गाणे आवडीच्या बाबतीत, मागे पडते. गाण्याची चाल "अनवट" असणे, हा विचार देखील बरेचवेळा पुढे येतो. "अनवट" म्हणजे काय? चाल अवघड असणे, म्हणजे अनवट, असा एक मतप्रवाह आढळतो, त्यात थोडेफार तथ्य आहे पण पूर्णांशाने सत्य नाही. या सगळ्या मतांतून, आपल्याला एक गोष्ट ठरवावीच लागेल. गाण्याची चाल कशी असावी, याबाबत कुठेही ठाम अशी "थियरी" नाही आणि गाण्याचे आयुष्य किती आहे, याचा अंदाज करणे तर केवळ अशक्यप्राय. प्रत्येक संगीतकार, आपापल्या कुवतीनुसार उत्तरे शोधीत असतो पण काही काळाने, त्या उत्तरातील वैय्यर्थ्य जाणवायला लागते. 
"तू चंदा मै चांदनी" या गाण्याबाबत काही ठाम विषाने करताना, माझी थोड्याफार प्रमाणात द्विधावस्था होते. गाण्याची चाल सुंदर आहे, त्यात अनेक लयीचे बंध आहेत, इत्यादी सौंदर्यस्थळे शोधता येतात पण, या गाण्यात असे काय आहे, ज्यामुळे हे गाणे, माझ्या मनात ठाण मांडून आहे? या प्रश्नाचाच शोध, या निमित्ताने घेण्याचा माझा प्रयत्न राहणार आहे. 
आपण, या गाण्याचा आस्वाद घेताना, कवितेचा आस्वाद घेणे देखील, मला अत्यावश्यक वाटते कारण, गाण्यात शब्द आहेत म्हणून ते "गाणे" आहे!! तेंव्हा, गाण्याचा आस्वादाला सुरवात करण्याआधी, आपण, हे गाणे, "कविता" म्हणून काय दर्जाचे आहे? या प्रश्नाचा पडताळा घेऊया. 
कवी बालकवी बैरागी यांची शब्दरचना आहे. इथे हे ध्यानात ठेवावे लागेल, हा कवी, कधीही चित्रपटासाठी गाणी लिहिणारा कवी नव्हता आणि ही रचना देखील, कविता म्हणून प्रसिद्ध झाली होती. 
" तू चंदा मै चांदनी, तू तरुवर मै शाख रे,
तू बादल मै बिजुरी, तू पंछी मै पात रे. 

ना सरवर ना बावडी, ना कोई ठंडी छांव,
ना कोयल ना पपीहरा, ऐसा मेरा गांव रे,
कहा बुझे तन की तपन, ओ सैय्या सिरमोर,
चंद्रकिरण तो छोड कर, जाये कहा चकोर, 
जाग उठी है सांवरे, मेरी कुंवारी प्यास रे,
अंगारे भी लगने लगे पिया अंगारे भी लगने लगे,
आज मुझे मधुमास रे 

तुझे आंचल मे रखुंगी ओ सावरे 
काळी अलको से बांधुंगी ये पांव रे
गल बैय्या वो डालू की छुटे नही 
मेरा सपना सजन अब टुटे नही 
मेहंदी रची हथेलिया, मेरे काजलवारे नैन रे,
पल पल तुझे पुकारते पिया पल पल तुझे पुकारते
हो हो कर बेचैन रे 

ओ मेरे सावन सजन, ओ मेरे सिंदूर,
साजन संग सजनी बनी मौसम संग मयुर,
चार पहर की चांदनी मोहे लाल चुनर ओढा,
केसरिया धरती लगे, अंबर लालम-लाल रे,
अंग लगाकर सायबा अंग लगाकर सायबा,
कर दे मुझे निहाल रे" 

ही कविता म्हणून वाचताना आपल्या सहज ध्यानात येऊ शकते, राजस्थानच्या वाळवंटाच्या पार्श्वभूमीवरील प्रणयकथा आहे.  "बिजुरी","बावडी","केसरिया" हे खास राजस्थानच्या संस्कृतीतले शब्द. खरे तर या कवितेचा घाट बघितला तर, चित्रपट गीताच्या पारंपारिक रचनेत अजिबात बसणारा नाही. किंबहुना, गाण्याचा "मीटर" ठरवण्याच्या प्रक्रियेत तर ही शब्दकळा फार अवघड आहे. असे असून देखील संगीतकार जयदेव, यांनी गाणे करताना, ज्या कुशलतेने, रचनेला वेगवेगळी वळणे दिली आहेत, तोच खरा अभ्यासाचा भाग आहे.   
 मी सुरवातीला जे म्हटले त्याप्रमाणे विचार करता, गाण्याचा "मुखडा" हा काही इतका आकर्षक नाही. किंबहुना, गाण्याच्या आधी, जवळपास, १ मिनिट फक्त वाद्यमेळ आहे. संतूरच्या सुरांनी या गाण्याची पार्श्वभूमी तयार होते आणि ते सूर जिथे थांबतात, तिथे लताबाईंचा टिपेचा सूर लागतो - तू चंदा मै चांदनी, तू तरुवर मै शाख रे!! गाण्याच्या सुरवातीला तार स्वर लावणे आणि त्याच सुरांत गाण्याचा विस्तार करायला घेणे, हीच खरे म्हणजे गळ्याची असामान्य परीक्षा आहे. गाण्याची चाल "मांड" रागावर आहे पण हा "मांड" राग, तसाच्या तसा वापरलेला नसून, त्यात, राजस्थानी लोकसंगीताची फोडणी दिलेली आहे. वास्तविक पहाता पारंपारिक मांड रागात, सगळे स्वर शुद्ध स्वरूपात लागतात पण, तसे इथे घडत नाही. इथे "कोमल गंधार" आणि "कोमल धैवत" तसेच "तीव्र मध्यम" स्वरांचा उपयोग केलेला आहे आणि हे लोकसंगीताचे contribution!! अर्थात, असे म्हटले जाते, मांड रागाची उपपत्ती ही राजस्थानी लोकसंगीतातून झालेली आहे आणि एकूणच सगळी स्वरावली बघता, या म्हणण्यात बरेच तथ्य आढळते. 
पुढे "तू बादल मै बिजुरी" हे शब्द कसे घेतले आहेत, ते खास ऐकण्यासारखे आहे. "बिजुरी" शब्दावरील जी हरकत आहे, ती इतके अवघड आहे की, केवळ लताबाई(च) अशी हरकत घेऊ शकतात!! जयदेव, गाण्याच्या पार्श्वभागी जो वाद्यमेळ वापरतात, तिथे अत्यंत मोजकी वाद्ये पण प्रत्येक वाद्याचा "कस" लागेल, अशी योजना करतात. मग,  वापरताना,५ ६ वाद्येच असली तरी, त्यांचे काम भागते, किंबहुना त्यामुळे इतर वाद्यांची गरजच भासत नाही. इथे बघा, संतूर, स्वरमंडळ, बासुरी, सारंगी, तार सनई अशीच मोजकी वाद्ये संपूर्ण गाण्यात आहेत पण, प्रत्येक वाद्याचे "जिवंत" अस्तित्व आहे. राजस्थानच्या वाळवंटाच्या पार्श्वभूमीवर, ज्याप्रकारे सारंगी वाजली आहे, ती फार बारकाईने ऐकायला हवी. सगळे वाळवंट आपल्या समोर उभे रहाते. संगीतकार म्हणून जयदेव, इथे इतरांपेक्षा वेगळा ठरतो. गाणे ऐकताना, पार्श्वसंगीत आणि गाण्यातील शब्द, याचे बांधलेले नाते देखील वेगळेपणी ऐकावे लागेल. 
ना सरवर ना बावडी, ना कोई ठंडी छांव,
ना कोयल ना पपीहरा, ऐसा मेरा गांव रे,
कहा बुझे तन की तपन, ओ सैय्या सिरमोर,
या ओळी ऐकताना, आपल्याला "गायकी"चा आनंद तर मिळतोच पण त्याच बरोबर शब्दातून उभे केलेले वातावरण देखील अनुभवता येते. ओळीची सुरवात, मंद्र सप्तकात होते पण क्षणात वरच्या सुरांत चाल जाते आणि लय अवघड होते. हा सांगीत वाक्यांश अति गुंतागुंतीचा तर नक्कीच आहे पण त्याच बरोबर, कवितेच्या आशयाचा आनंद देखील, घेणे जरुरीचे भासते. 
लताबाईंच्या गायनातील आणखी वैशिष्ट्य इथे आपल्याला जाणवते आणि ते म्हणजे, गाण्याची चाल, राजस्थानी मांड रागावर आहे तेंव्हा शब्दोच्चार देखील त्याच धर्तीवर केले आहेत. हा आणखी कठीण भाग. गाण्यात हरकत घेताना, शब्दातील दडलेला आशय तर स्वरांनी अधिक अंतर्मुख करायचा पण, कुठेही शब्दांना दुखवायचे नाही!! ही कसरत, संगीतकार म्हणून जयदेव आणि गायिका म्हणून लताबाई ज्या प्रकारे करता, ते केवळ अतुलनीय आहे. गाण्यात, हिंदी चित्रपट गाण्यात वारंवार वापरलेला "दादरा" ताल आहे पण, तालाच्या प्रत्येक मात्रेचे "वजन" ध्यानात घेऊन, तिथे केवळ शब्द(च) नव्हे तर अक्षराचा शेवट करण्याइतकी तल्लख बुद्धीमत्ता, जयदेव यांनी, या गाण्यात दाखवली आहे. आपण, एका सक्षम कवितेला चाल लावत आहोत, याचे भान, जयदेव यांनी, या रचनेत कायम राखले आहे. 
गाण्यात तीन अंतरे आहेत आणि प्रत्येक अंतरा सुरु करताना, पार्श्वसंगीत जवळपास अजिबात नाही, म्हणजे संपूर्ण स्तब्धता राखून, केवळ लताबाईंच्या सुरात अंतरा सुरु करायचा आणि मग त्या सुरांचा मागोवा घेत, वाद्यांनी आपली मार्गक्रमणा करायची, अशी या गाण्याची बांधणी आहे. 
ओ मेरे सावन सजन, ओ मेरे सिंदूर,
साजन संग सजनी बनी मौसम संग मयुर,
चार पहर की चांदनी मोहे लाल चुनर ओढा,
केसरिया धरती लगे, अंबर लालम-लाल रे,

या ओळी गाताना, "चार पहर की चांदनी" इथे "चार" शब्द उच्चारताना, स्वरांत जो काही "हेलकावा" दिला आहे, त्यातून वाळवंटातील रात्रीच्या थंडीचा "शहारा" जणू व्यक्त केला आहे!! अशी सांगीतिक सौंदर्यस्थळे, या गाण्यात भरपूर आढळतात. तसेच पुढे "केसरिया" म्हणताना, "टिपिकल" राजस्थानी ढंग, स्वरांत आणला आहे. जयदेव काय ताकदीचे संगीतकार होते, याचे हे उत्तम उदाहरण ठरेल. 
गाणी सगळेच संगीतकार बांधत असतात पण, अशा प्रकारे लोकसंगीताची डूब देऊन, गाण्यात अनेक लयींना अवघड पद्धतीने खेळवत गाण्याची रचना  बांधायची,हे तल्लख आणि व्यासंगी बुद्धीमत्तेचे(च) काम आहे. जवळपास ९ मिनिटांची रचना आहे पण गाण्यातील प्रत्येक सेकंद, हा अतिशय अर्थपूर्ण रीतीने भरून काढला आहे. 
संगीतकार म्हणून जयदेव यांना, अतिशय चांगल्या अर्थाने असामान्य "कारागीर" म्हणायला हवे. गीताला रागाधार हवा पण स्वररचना रागाशी फटकून ठेवायची, या पंथाचे जयदेव हे संगीतकार आहेत. याचा परिणाम असा  होतो,गाण्याची चाल "गायकी" अंगाने विस्तारात जाते. याचाच वेगळा अर्थ असा होतो, गाण्याच्या स्वररचनेत स्वरविस्ताराच्या अनेक शक्यता निर्माण होतात.
 जयदेवची स्वत:ची अशी शैली होती.आयुष्यभर बहुशत्यांनी भारतीयवाद्ये आणि ती देखील अत्यंत आवश्य असतील तितकीचत्यांनीआपल्या रचनेत वापरलीउगाच ५० ते १०० वादन्काचा ताफा पदरीबाळगण्याचा अविचारी हव्यास कधीही ठेवला नाहीएखादी बासरीचीलकेरसंतूरचा नाजूक तुकडायातूनच त्यांच्या रचनेचे स्वरूप स्पष्टहोईत्यांचा हाच विचार असायचा किजर का , व्हायोलीन वादकपुरेसे असतील उगाचच ५० वादकांचा ताफा वापरण्याची  काहीचगरज नाही आणि त्यामार्गेफुटकळ लोकप्रियता मिळविण्याची गरजनाहीअसलाअव्यवहारी विचारांचा संगीतकार होता.
जयदेवचे कुठलेही गाणे घ्याशब् हा घटक त्यात आवर्जूनपणेठळकरित्या जाणवतोअर्थातजयदेवने हुतेकवेळा साहिरची साथघेतली होती आणि साहीर तर मुळातला सक्षम कवीनंतर गीतकार!! खरतरहा देखील एक अत्यंत निष्फळ वाद आहेकि गीतकार हा कवीअसतो कि नाहीजेंव्हा आपणसाहीरशकील यांच्यासारखेकिंवामराठीतील.दीमाडगुळकर घेतले तरहेच आपल्या लक्षात येईलकिहे "गीतकारमुळात प्रतिभावंत कवी आहेत कि ज्यांच्या कवितामुलतअतिशय गेयबद्ध आहेतशब्दच जर गेयतापूर् असतील तरसंगीतकाराला एक वेगळाच हुरूप येतोहे एक निखालस सत्य आहेजयदेव यांच्या रचनेतया विचाराचे नेहमीच भान असल्याचे दिसून येतेअर्थातया संदर्भात, खूप काही लिहिता येईल पण खर तर हा एकावेगळ्या निबंधाचा विषय हे.
जयदेव, यांनी आपल्या कारकिर्दीत अनेक असामान्य गाणी दिली आहेत तरी, या गाण्यासारखी रचना, खुद्द त्यांना देखील अपवादानेच करता आली. This is the creation of par excellence.

सुबह का इंतजार कौन करें

"कळ्या फुलतात येथे,पानें गर्द वाजतात,
फुलें घळतात येथे तरी पानें वाजतात,
पानें झडतात येथे तरी वारे वाजतात,
वारा पडला तरीही दूर घंटा वाजतात."

आरतीप्रभूंच्या या ओळी एका एकांतिक, मनस्वी मानसिकतेची अस्वस्थता दर्शवतात. आरतीप्रभूंच्या कवितेची बांधणी मनोज्ञ असते. बरेचवेळा  मला असेच  वाटते,इतकी रेखीव, बांधेसूद कविता माझ्या वाचनात नाही. काही नादाकृतींच्या, शब्दांच्या, शब्दसमूहांच्या विशिष्ट रचनेच्या द्वारे, बाह्यतः:घट्ट अशी वीण करता करतानाच तिच्यात थोडे फरक करीत तीच वीण किंचित सैल,गतिशील करून कवितेचा असामान्य पोत घडवला जातो. काही ओळी, काही शब्दसमूह, काही शब्द अंतराअंतरावर घट्ट बांधलेले असतात, त्याच आधाराने इतर शब्दांतून आशयाचे प्रसरण होत असतानाच संबंध राचनाच त्या आशयाला अंत:केंद्रित करीत असते, या दोहोंतून जो सचेतन-तोल मिळतो, त्यातूनच टी कविता स-रूप होते.
आरतीप्रभूंच्या कवितेबद्दल मी इथे चार शब्द लिहिले  कारण,एकच. प्रस्तुत रचना ही एखाद्या भावगीतासाठी रचलेली रचना नसून, कवीने स्वान्तसुखाय मनःस्थितीत लिहिलेली आहे (कदाचित तसे नसेल देखील!! म्हणजे लिहिताना अशीच भावस्थिती असेल असे म्हणवत नाही) परंतु मुद्दा असा आहे, जेंव्हा चित्रपटासाठी गाणी लिहिली जातात तेंव्हा त्याच्याकडे काहीशा नकारात्मक नजरेने पाहिले जाते आणि "गीतकार" अशा काहीशा तुच्छतापूर्ण शब्दात संभावना केली जाते.
चित्रपट गीत म्हणजे फावल्या वेळेचा लिहिण्याचा उद्योग असेच बरेचवेळा मानले जाते आणि या मताला चांगलीच सामाजिक प्रतिष्ठा मिळाली आहे!! त्यामुळे काही गुणवंत कवींवर अन्याय झालेला आढळतो, यातील प्रमुख नाव "साहिर लुधियान्वी"!! डाव्या विचारसरणीचा कडवा प्रचारक असून देखील, प्रसंगी विचारसरणीला संपूर्णपणे बाजूला सारून, या कवीने अतिशय सक्षम ,अंतर्मुख आणि घाटदार कविता केल्या परंतु केवळ चित्रपटात वापरल्या गेल्यामुळे, त्यातील "कवित्वें"वर काहीसा अन्याय झाला!! चित्रपटात प्रसंगानुरूप शब्दकळा बांधावी लागते, हे जरी निखालस सत्य असले तरी ओशट वाटणाऱ्या प्रसंगाला देखील अप्रतिम शब्दकळा लिहिणाऱ्या कवींबद्दल निश्चित वेगळा विचार आवश्यक वाटतो.

"ले भी लो हम को अपनी बाहों में,
रुह बेचैन है निगाहो में,
हाये इल्तेजा बार बार कौन करें
सुबह का इंतजार कौन करें"

साहिरच्या कवितेचे एक वैशिष्ट्य नक्की सांगता येते. मुखडा किंवा पुढील कडव्याची पहिली ओळ अगदी सहज समजेल अशा भाषेत लिहितो परंतु पुढील ओळीत मात्र नेहमीच भाषेची श्रीमंती दर्शवेल, अशी शब्दकळा वापरतो, जेणेकरून त्याच्यातील "कवी" लोकांच्या समोर येईल. वरील ओळीत याचे नेमके प्रत्यंतर येईल. संगीतकार जयदेव यांनी साहिरच्या या "कवित्वाचा"" असामान्य गुण ओळखला होता आणि आपली कारकिर्दीच्या सुरवातीच्या काळात, त्यांनी साहिरच्या शब्दकळेचा आधार घेतला आणि काही असामान्य स्वररचना तयार केल्या.

काही गाणी पटकन एकाच बैठकीत मोहित करत नाहीत, किंबहुना परकीच  वाटतात!! त्याची चाल लगेच मनाची पकड घेत नाही!! एखादी हरकत चकित करते किंवा मधलाच एखादा संगीताचा वाक्यांश लक्षात येतो. मुळात, जर का त्या संगीतकाराचे नाव झालेले नसेल तर ऐकतानाच मनात नाखुशी असल्याने गाण्याकडे थोडेसे दुर्लक्ष होते. हिंदी चित्रपट गीतांच्या बाबतीत "नाममहात्म" फारच महत्वाचे ठरते. लताबाईंच्या अनेक गाण्याविषयी असे  म्हणता येईल. १] प्यार की ये तलखिया, २] तारे वोही है, ३] सपना बन साजन आये, ही सहज सुचलेली गाणी उदाहरण म्हणून दाखवता येतील. या गाण्यांचे संगीतकार आता फारशा कुणाच्या लक्षात नाहीत,ही वस्तुस्थिती आहे आणि त्याचबरोबर या गाण्यांच्या बाबतीत लोकप्रियतेची झुळूक देखील वाटेला आली नाही!! प्रस्तुत  गाणे,याच पठडीतले म्हणता येईल. जयदेव, हल्ली किती लोकांच्या स्मरणात आहे,मला शंका आहे (फार तर "अल्ला तेरो नाम" किंवा "अभी ना जाओ छोडकर" ही गाणी लक्षात असतील!!) तसा हा संगीतकार कधीच लोकप्रिय नव्हता किंवा त्याने लोकांच्या पुढे येण्यासाठी कधीही क्लुप्त्या लढविल्या नाहीत!! सत्तरीच्या दशकात जेंव्हा पाश्चात्य वाद्यमेळ भरात होता, तेंव्हा देखील अस्सल भारतीय पठडीत रचना करण्याचा अट्टाहास, जयदेव यांना चित्रपट सृष्टीच्या बाहेर ठेवत होता!! यात, नुकसान आपल्यासारख्या रसिकांचेच झाले!! 
साहिर लुधीयान्वी कवी म्हणून नेहमीच असामान्य होता. इथेच बघा, "सुरमई रात" हे शब्दच किती अप्रतिम आहेत, तिथे दुसरे कुठलेच शब्द योजता येणार नाही, रात्र ही "सुरमई" असण्यात जी लज्जत किंवा विखारी जाणीव आहे, त्याला तोड नाही. अशीच गंमत "महक" आणि "गेसू" या दोन शब्दात आहे. उर्दू भाषेचे असे खास वैशिष्ट्यपूर्ण शब्द!! या गाण्याची सुरवात फक्त लताबाईंच्या आवाजाने होते, "सुरमई रात है, सितारे है; आज दोनो जहां, हमारे है", इथे "रात" शब्द सुरांतून काढताना, स्वराला जी "वेलांटी" दिली आहे ( अर्थात लताबाई) ती अतिशय अनुपम आहे, त्या वेलांटीत मृदू आर्जव आहे. हल्ली अशी भाषा नेहमी ऐकायला येते, "गाताना, शब्दांना expression देणे आवश्यक आहे आणि ते आम्ही करतो" याचा अर्थ, पूर्वी कुणी लक्ष देत नव्हते का? त्यानंतरच्या वाक्यावर "सुबह का इंतजार कौन करे" गाण्याचा ठेका सुरु होतो. म्हणजे, पहिल्या दोन ओळींतून रचनेचे सूचन आणि नंतर त्याचे वजन आपल्याला ऐकायला मिळते. "सुबह का इंतजार कौन करे" ही ओळ दोनदा गायली गेली आहे, याचे मुख्य कारण, तोच त्या कवितेच्या आशयाचा प्रमुख विशेष आहे. कवितेत ही ओळ एकदाच लिहिली गेली आहे!! 

गाणे, प्रेम विरहाचे आहे, हे तर लगेच ध्यानात येते. प्रेमी जीवांची ताटातूट आणि तडफड, हे हिंदी चित्रपट गाण्यांचा खास आवडीचा विषय तरीही त्यात वेगळ्या प्रतिमा मांडून आशय अधिक पक्व करण्यात ज्या थोड्या कवींचा सहभाग आहे, त्यात साहिर अग्रभागी!! "सुबह का इंतजार कौन करे" अशी विफलता जाणवण्यासाठी "सुरमई रात" हे शब्द योग्य!! मेंडोलीन, व्हायोलीन याच वाद्यांचा प्रमुख उपयोग करून, पहिला अंतरा सजवला आहे. जयदेव यांची ही नेहमीच खासियत राहिली आहे, कमीत कमी वाद्ये वापरून गाणे सजविणे, जेणेकरून कवीच्या शब्दांना कुठेही धक्का बसणे शक्यच नाही!! वास्तविक, ५०,५० व्हायोलीन वादकांचा ताफा बाळगणे तेंव्हापासून भूषणास्पद ठरत होते ( काही अपवादात्मक गाणी वगळता इतका प्रचंड ताफा बाळगणे गरजेचे होते/आहे का? पण हा प्रश्न कधीच कुणी विचारात नाही!!) 
पुढील ओळीत शेवटाला "वक्त का ऐतबार, कौन करे" यातील, "कौन" शब्द जरा बारकाईने ऐकावा. ""कौ' आणि "न" यातील, "कौ" नंतर स्वरांत बारीकशी थरथर आहे, सहज ऐकताना, ध्यानात येणार नाही अशी हरकत आहे पण ती केवळ लाजवाब आहे. वास्तविक, कडव्याची सुरवात वरच्या सप्तकात सुरु होते, अगदी ध्रुवपदाच्या चालीपासून पूर्ण फारकत घेणारी स्वररचना सुरु होते, (जयदेव यांच्या बहुतेक गाण्यांत हे वैशिष्ट्य आढळते ) आणि हळूहळू स्वर मंद्र सप्तकात येतात, जणू शांतपणे झऱ्याचे पाणी, डोंगरउतारावरून खाली यावे!!  उच्चाराचेच आणखी एक उदाहरण. या कडव्यात, दुसरी ओळ " आरजू का चमन खिले ना खिले" ही आहे आणि यातील "खिले"हा शब्द असाच उद्मेखून ऐकावा असा आहे. उर्दू भाषेतील "ख" हा मराठी भाषेतील "ख" सारखा "खणखणीत" उच्चारत नसून, "क" अक्षराला "ह"चा निसटता स्पर्श दिला जातो. लताबाई गायिका म्हणून कुठे श्रेष्ठ ठरतात, ते इथे दिसते. बरे, असा अस्पष्ट "खिले" स्वरातून काढताना, लयीचा बिकट बोजा, कुठेही विसविशीत होत नाही, किंबहुना, समेच्या मात्रेशी होणारी जोड, ही जोड न वाटता, एकाच भागाची दोन दर्शने वाटतात. जयदेव आणि लताबाई यांचे हे कर्तृत्व!! 
चित्रपट गीतात तुम्हाला प्रयोग करायला तशा फारच थोड्या संधी प्राप्त असतात परंतु जाणकार संगीतकार, त्या नेमकेपणाने हुडकून काढतो आणि तिथे स्वरविस्ताराला जागा निर्माण करतो. पुढील कडव्यात हेच आपल्याला दिसून येते. शब्दोच्चार आणि त्याबरोबर पार्श्वभागी वाजणारी वाद्ये, याचा एकत्रित संकर  घडविणे,ही संगीतकाराची खरी मर्दुमकी!! बासरीचे सूर (बासरीचे सूर किती वेगळ्या पद्धतीने वाजविले आहेत, ते खास ऐकण्यासारखे आहे) जिथे संपतात, तिथे परत मेंडोलीन सुरु होते ( वास्तविक हे शब्द अधिक मोठे होतील, इतकेच ४ सूर आहेत) आणि तो सांगीतिक वाक्यांश भरीव होतो. दुसऱ्या कडव्याच्या शेवटच्या ओळीत , साहीरने "इल्तेजा बारबार कौन करे" असे लिहिले आहे. वास्तविक "इंतजार" आणि "इल्तेजा" एका दृष्टीने सारख्याच अर्थाचे शब्द आहेत पण तरीही "इल्तेजा" हा शब्द फारसा इतर गाण्यांत वापरलेला दिसत नाही आणि पर्यायाने फारसा कुणाच्या लक्षात येत नाही. खरा कवी दिसतो. तो इथे. माझ्या  अंदाजाने, "इल्तेजा" शब्द मुळचा फारसी!! प्रश्न कुठल्या भाषेतला नसून, जुना शब्द परंतु अमूर्त आशयासाठी योजणे, ही साहीरची खासियत. 
या गाण्यात, "सुबह का इंतजार कौन करे" ही  ओळ बरेचवेळा येते आणि याचे मुख्य कारण असे दिसते, कवितेचा मूळ आशय याच वाक्याभोवती आहे, "सकाळची वाट बघण्याची काहीही गरज नाही, कारण आता सगळी नाती तुटलेली आहेत!!" जयदेव यांची दृष्टी इथे दिसते, हे वाक्य जरी प्रत्येक कडव्याच्या शेवटी येते तरी ज्या सुरांवर हि ओळ फिरते, ती सुरवात मात्र वेगळी असते आणि तरीही भारतीय संगीताच्या नियमानुसार "समेचा' सूर मात्र नेमका पकडून ठेवते. वास्तविक, या गाण्यात, "अल्ला तेरो नाम" प्रमाणे चालीत वरखाली होण्याइतकी स्पष्टता नाही किंवा, "ये दिल और उनकी निगाहो के साये" प्रमाणे अवर्णनीय संतूरचे सूर आणि वरच्या सप्तकातील चाल, असे कान दिपवणारे काहीही नाही. ऐकताना, एका सरळ रेषेत गाणे चालले आहे, असेच वाटते पण प्रत्यक्षात तसे अजिबात नाही. अतिशय फसवी चाल आहे परंतु प्रथमदर्शनी काहीच दिपवणारे नसल्याने, गाणे थोडे विस्मृतीत गेले आणि पर्यायाने जयदेव देखील तसाच विस्मृतीत गेला!! वास्तविक ही कविता आणखी दोन कडव्यांची आहे पण बहुदा चित्रपट गीताची लांबी वाढली असती, म्हणून बहुदा रचनेत घेतली गेली नसावी.  


साथी रे भूल ना जाना मेरा प्यार!!

काही गाणी का लोकप्रिय होतात याचे जसे "गणित" कळत नाही त्याचप्रमाणे, काही गाणी का विस्मृतीत जातात, त्याचे देखील आकलन होत नाही. बरेचवेळा, गाणी गाजवली जातात - मार्केटिंग तंत्राने खपवली जातात पण अशा गाण्यांचे "आयुष्य" देखील अल्प असते. गाण्याची चाल सुंदर असणे, गाण्यातील कविता गेयतापूर्ण आणि आशयबद्ध असणे आणि गायन, आपल्या जाणीवा समृद्ध करणारे असावे, असे भाग्य फार थोड्या गाण्यांना लाभते. त्यातून, चाल गायकी ढंगाची असणे, हे म्हणजे दुग्धशर्करा योग!! आपल्याकडे अजूनही, गाण्याची चाल "बाळबोध" असणे, भूषण मानले जाते आणि याचे मुख्य कारण, अजूनही सुगम संगीत हे प्रतिष्ठित झालेले नाही. याचा अर्थ असा नव्हे, "बाळबोध" चाल, सांगीतिक दृष्टीने कमअस्सल असते. सोपी चाल तयार करण्यासाठी देखील संगीताचा गाढा अभ्यास जरुरीचा असतो. पण, या विचाराचा इतका प्रभाव, आपल्या समाजावर पडलेला आहे की, जरा कठीण चाल आली की लगेच दुर्लक्ष करण्याची प्रवृत्ती असते!! गाण्याची चाल, हे देखील सर्जनशील काम आहे, हेच लोकांना फारसे पटलेले नसते आणि हा दुर्दैवी भाग आहे. यामुळेच काही असमान्य ताकदीचे संगीतकार मागे पडले आणि विस्मृतीच्या गर्तेत नाहीसे झाले!! हातात आलेले शब्द आणि त्या शब्दांचा अन्वयार्थ लावून, शब्दांना नेमक्या सुरांत गुंफणे, हे अजिबात सोपे नाही. मुळात, शब्दांत दडलेला आशय जाणवून घेण्यासाठी, तुम्हाला शब्दांबद्दल प्रेम असणे आवश्यक असते. शब्द माध्यम हे नेहमीच अति अवघड माध्यम असते आणि अशा माध्यमाशी जवळीक साधून, मगच त्यात "दडलेली"चाल शोधून काढून, त्या कवितेला अर्पण करायची!! असा सगळा प्रवास असतो.

"सौख्ये जाति झराझरा झिरपुनी : त्यांचे चरे राहिले;
कांही खोल जिव्हाळीही उतरले;  त्यांच्या कळा दु:सह;
दावू का विचकून ते ? सहत ना ती कल्पनाही मना;
 जातें झोंबून आरपार हृदया : तें शक्य नाही मला."

सुप्रसिद्ध कवियत्री इंदिरा संत यांच्या "शेला" या काव्यसंग्रहातील या ओळी. इंदिरा संत यांच्या कविता या एका बाजूने आत्ममग्न तर दुसऱ्या बाजूने वैश्विक जाणीव प्रगट करणाऱ्या. इंदिराबाईंना निसर्ग जवळचा वाटतो, तो त्यातीलकालचक्राच्या गतीच्या जाणिवेने. ज्या वेळी त्या निसर्गाचे रूप प्रतिमा म्हणून वापरतात त्यावेळीही त्यांचा प्रयत्न त्या निसर्गरूपातून जाणवणाऱ्या कालचक्राच्या गतीचा एक क्षण पकडण्याचा असतो. या गतीची जाणीव त्या आपल्या प्रतिमांतून देतात; त्या गतीशी भाववृत्तीच्या लयाचे नातें जोडतात. तिथेच संवेदनाविश्व आणि  भाववृत्ती एकात्म होतात आणि  त्यांची खरी कविता साकार होतें. म्हणूनचत्यांच्या कवितेतील विश्व हे सतत गतिमान असते. 
"साथी रे भूल ना जाना मेरा प्यार" ही रचना काव्य म्हणून वाचायला घेताना, वरील विवेचनाचा तंतोतंत प्रत्यय येतो!! संगीतकार रवींद्र जैन यांनी बहुतेकवेळा स्वतः:च लिहिलेली गाणी स्वरबद्ध केली. याचा परिणाम असा   झाला, स्वररचना करताना "यतिभंग" होण्याचे फार प्रसंग आले आले नाहीत. पेळूतून सहज सूत निघावे त्याप्रमाणे सुरांतून शब्दांच्या आशय मोकळा होत गेला.
 
"साथी रे भूल ना जाना मेरा प्यार" हे "कोतवाल साब" या हिंदी चित्रपटातील गाणे, हे गाणे आज कुणाच्या खिजगणतीत तरी असेल का? मला शंका आहे. गाण्याच्या बाबतीत, असे बरेचवेळा होते, गाणे लक्षात राहते पण चित्रपटाचे नाव विसरले जाते!! शक्य आहे, इथे देखील असेच झाले असणार परंतु इतके विलोभनीय, गायकी ढंगाचे गाणे देखील, काळाच्या पडद्याआड जावे, ही खेदाची बाब आहे. आता सरळ गाण्याकडे वळतो. 
मला तर नेहमी असेच वाटते, एखादे गाणे तयार होणे म्हणजे, प्रसूतीवेदनेतून नवे बाळ  जन्माला येण्यासारखे असते. खरे तर हातात केवळ शब्दांचा "सांगाडा" असतो पण त्याला एकप्रकारची लय असते, ज्याला(च) गेयता म्हणतात. त्या लयीतून, चालीच्या निर्मितीची कहाणी सुरु होते. अर्थात, काहीवेळा, चालीचा आराखडा असतो आणि त्या लयीला समजून घेऊन, कविता मांडली जाते.प्रश्न त्याचा नाही तर प्रत्येकाच्या कुवतीचा आहे. इथे सुरवातीला, व्हायोलीन वाद्याचे सूर ऐकायला येतात आणि ते सूर क्षणात टिपेचा सूर गाठतात, हे जे "वर" जाण्याचे वळण आहे, तेच ध्यानात घ्यावे लागेल कारण, हे सूर(च) या गाण्याची कर्मभूमी आहे!! 
किती वेगवेगळी वळणे घेऊन, एका "बिंदूवर" व्हायोलिन्स स्थिरावतात आणि त्याच क्षणी गिटारचे सूर आणि व्हायोलिन्स, यांचा मेळ सुरु होतो. खरे तर, गाण्याचा ताल देखील, इथेच सिद्ध होतो आणि जोडीने, गाण्याचा "मुखडा"!! उत्तम गाण्याच्या बाबतीत एक बाब अवश्यमेव मानावीच लागते. गाण्याचा मुखडा हा, अतिशय सुबक, रंजक असावा लागते, जेणेकरून, रसिकाचे लक्ष, गाण्याकडे "खेचले" जावे. गाण्याचे अर्धे यश हे, तुम्ही गाण्याचा मुखडा कसा बांधता, यावर अवलंबून असते. पुढेतर सगळे "बांधकाम" असते!! इथे देखील हाच प्रकार आढळतो. 
हा वाद्यमेळ चालू असतो, तेंव्हा त्याच्या पाठीमागे हलक्या आवाजात, बोंगो या वाद्याच्या मात्रा चालू आहेत, पण त्याचे अस्तित्व फार नगण्य आहे. हा संगीतकाराचा विचार!! इथे, अति धीम्या आणि संथ सुरांत आशाबाईंच्या आवाजात, "साथी रे भूल ना जाना मेरा प्यार"  ही ओळ ऐकायला येते. ही ओळ जर का अति बारकाईने ऐकली तर आपल्याला सहज कळेल, आधी जे वाद्यांचे सूर आहेत, त्याच्याशीच तादात्म्य राखणारी ही गायकी आहे. अतिशय "ठाय" लयीत आणि मंद्र सप्तकात गाणे सुरु होते. 
या ओळीचे गायन देखी फार वैशिष्ट्यपूर्ण आहे. शब्दांतील आशय ओळखून, तो आशय सुरांतून कसा खोलवर व्यक्त करायचा, याचे इथे अप्रतिम उदाहरण आपल्याला ऐकायला मिळते. "साथी रेभूल ना जाना, मेरा प्यार" गाताना, "रे" अक्षरावरील "एकार" आणि नंतर परत ही ओळ गाताना, "साथी" मधील "थी" अक्षरावरील "इकार" खास ऐकण्यासारखा आहे. हाण्याची लय जर समजून घेतली तर, या लयीला, अशा "एकारा"तून किंवा "इकारा" मधून, जे वेगळे "वळण" मिळते आणि आशय वृद्धिंगत होतो, ही गायकी फार कमालीची अवघड आहे. "थी" अक्षर किंचित "उचलून" म्हटले आहे. फार, फार कठीण आहे. 
"मेरी वफा का, ऐ मेरे हमदम; कर लेना ऐतबार, साथी रे भूल ना जाना मेरा प्यार" ही ओळ तर केवळ असामान्य आहे, "ऐतबार" वरील हरकत आणि परत "साथी" शब्दाचा उच्चार!! पहिल्यावेळी केलेला उच्चार आणि आताचा उच्चार, यात जमीन-अस्मानाचे अंतर आणि फरक आहे. इथे एक ध्यानात घेतले पाहिजे, गाण्याची लय तीच आहे पण, स्वर आणि त्याचे application, इथेच गाणे थोडे बुद्धीगम्य होते. केवळ काही सुरांचाच फरक आहे पण केवळ अर्थपूर्ण आहे. यालाच गायकीची "नजर" म्हणतात आणि इथे ही गायिका, आपला दर्जा दाखवून देते. हे ओळखणे सोपे नाही आणि ओळखून, तसेच आपल्या गळ्यातून तंतोतंतपणे प्रत्यंतर देणे तर त्याहून अवघड आहे. 
या पुढे पहिला अंतरा येतो आणि परत व्हायोलिन्स सुरु होतात. वाद्यांचे जणू नर्तन चालावे त्याप्रमाणे, त्यातून सुरांची अतिशय गुंतागुंतीची रचना सूर होते, जी आशाबाईच्या गळ्यातून आलेल्या सुरांशी तादात्म्य राखते. वाद्यमेळ काहीसा "अरेबिक" स्वरावलींच्या धाटणीवर आहे. 
"दूर कही कर लेजा मजबुरी, वो दुरी तो होगी नजर की दुरी;
तेरी दुआए गर साथ रही, आयेगी फिर से बार; 
साथी रे भूल ना जाना मेरा प्यार …."
वास्तविक या ओळीत तशी सुरांची फार अकल्पित करामत नाही परंतु तरी देखील "मजबुरी" मधील "री" अक्षर तसेच "दुरी" मधील "री" हे अक्षर, इथल्या हरकती खास आहेत. अतिशय बारकाईने ऐकले तरच त्यातले सौंदर्य घ्यानात येईल आणि परत उच्चारलेला "साथी" हा शब्द!! पहिल्या, ध्रुवपदात घेतलेली "जागा" आणि इथे उचललेली "जागा" यात विलक्षण फरक आहे. तसेच, इथे "थी" अक्षरावर किंचित लांबवलेली हरकत, गायनाची परीक्षा किती अवघड आहे, हेच दर्शवून देते. खर तर अशी सौंदर्यनिर्मिती, हेच सुगम संगीताचे खरे "अलंकार" आहेत आणि या अलंकारानीच, गाणे सजवले जाते. हे अलंकार घेणे अजिबात सोपे नाहीत. इथे प्रत्येक क्षण आणि त्यापलीकडील "निमिष" महत्वाचे असते.याच सुरांचा नेमका "कण, गळ्यातून काढणे, यालाच गायकी म्हणतात.
संगीतकार म्हणून मूल्यमापन करताना थोडीशी अडचण संभवते. एकतर कारकीर्द म्हणून जरी लांब असली तरी चित्रपट फार (संख्येने)  तपासायला मिळत नाहीत. सुरवातीला गुजराती लोकसंगीताचा प्रभाव जाणवतो पण पुढे "चित्तचोर" सारख्या चित्रपट गीतांनी त्यांची ओळख नव्याने करून घ्यायला लागते. सर्वसाधारणपणे बहुतेक रचना सहज, रसाळ आणि साध्या सुरावटींच्याघ्यायला वाव आहेत. मुखडे देखील फार लक्षात राहतील, असे नाहीत. कदाचित हाताशी त्यामानाने तोकड्या आवाजाच्या गायक/गायिका आल्याने, स्वररचना तयार करण्यावर मर्यादा पडल्या असाव्यात, अशी शंका घ्यायला वाव आहे, या गाण्याच्या संदर्भात विचार करताना, हाताशी आशा भोसल्यांसारखा दर्जेदार आवाज मिळाल्यावर, अतिशय महत्वाकांक्षी म्हणावी अशी रचना इथे सादर केली.

दुसरा अंतरा अवतरत असताना, परत व्हायोलिन्स वाद्यातून येणारी अवघड वळणे आणि त्याला मिळालेल्या बासरीच्या सुरांची साथ, हा सांगीतिक वाक्यांश, हे संगीतकाराच्या प्रतिभेचे उत्तम उदाहरण म्हणता येईल. वास्तविक, सुगम संगीतात, वाद्यमेळाची रचना म्हणजे एका प्रकारे अप्रतिम Crafting असते, चालीच्या सुरांशी "गणित" मांडून, याची रचना तयार केली जात असते. पण, त्यात जरादेखील "कृत्रिमता" आणू न देता, सुरांचा खेळ खेळायचा असतो. 
"काश कभी ये रैना ना बिते, प्रीत का ये पैमाना कभी ना रिते;
डर है कही आनेवाली सहर, ले लेना दिल का करार,
साथी रे भूल ना जाना मेरा प्यार…." 
या ओळीत, "पैमाना कभी ना रिते" वरील गायकी बघावी. "पैमाना कभी" हे शब्द पार वरच्या सुरांत घेतले आहेत आणि लय तशीच कायम ठेऊन, "ना रिते" हे शब्द खर्जात घेतले आहेत!! शब्दातील अव्यक्त भाव कसा सुरांच्या सहाय्याने व्यक्त झाला आहे.
अर्थात इतकेच इथे संपलेले नाही. लाल गालिच्यावर पाणीदार मोती ओघळत, उतारावर यावेत त्याप्रमाणे, इथे सूर खाली आला आहे. ही सुरांची प्रक्रिया केवळ अनुभवण्यासाठीच "जन्माला" आली आहे. अशी गायकी ऐकताना, आपल्या हाती एकच उरते.हातातील पेन खाली ठेवावे आणि डोळे बंद करून सगळे सूर पापणीच्या आड साठवून ठेवावेत. मी तरी आणखी वेगळे काय केले!!