Wednesday 18 June 2014

राम श्याम गुणगान!!




प्रस्तुत गाणी ऐकली. काही ठळक वैशिष्ट्ये – १] सगळी भजने गायकी अंगाने जाणारी आहेत. २] रचना सगळ्या पारंपारिक अंगाने गेलेल्या आहेत. ३] भजनातील काव्य तसे ठीक आहे पण भजनातून एक अमूर्त भाव जाणवणे आवश्यक असते – कवितेच्या दृष्टीने – तिथे तितकेसे भाव जाणवत नाहीत. ४] लताबाई श्रेष्ठ गायिका नक्कीच आहेत पण इथे त्यांचा आवाज थोडा “ओढलेला” वाटतो. अर्थात,वयाचा विचार केला तर ते नैसर्गिक आहे पण आपण बरेचवेळा हे ध्यानात घेत नाही. त्यांच्या आवाजातील “ताजगी” हे जे प्रमुख वैशिष्ट्य असायचे, त्याचा थोडा कमी “आढळ” आहे!!
एकूण ६ गाणी आहेत. गाणी सगळीच चालीच्या दृष्टीने “श्रवणीय” आहेत, यात शंकाच नाही.
“राम भजन कर मन” – या रचनेवर संगीतकाराच्या पूर्वीच्या रचनांची अस्पष्ट छाया आहे!! असे, एकच एक गाणे सांगणे कठीण आहे पण, ज्यांना या संगीतकाराच्या शैलीची माहिती आहे आणि एकूण थोडा अभ्यास असेल तर माझे म्हणणे पटावे. हे एकल गीत आहे, म्हणजे लताबाईंच्या आवाजात आहे पण या गाण्यात, मी वर म्हटले तसे, आवाजातील “गोडवा” कमी झालेला दिसतो!! अन्यथा, गायकीच्या दृष्टीने बघितल्यास, शब्दोच्चारानंतर हलकी हरकत घेणे, ओळ संपवताना, सुरांवर थोडे “वजन” देऊन संपविणे, ही वैशिष्ट्ये आढळतात.
“राम का गुन गान करिये” – कविता म्हणून काही मला यात खास आढळले नाही. ईश्वराचे वंदन वगैरे ठीक आहे पण, वंदन करताना शब्दातील समर्पण भाव, जो अपेक्षित असतो, तिथे कविता थोडी कमी पडते. या गाण्यात, “राम के गुण,गुण चिरंतन” या ओळीत, “राम” हा शब्द गाताना, “रा” वरील जो आलापीयुक्त आकार आणि त्याला लागून घेतलेली हरकत मुद्दामून ऐकावी!! संगीतकार म्हणून खळे साहेब आणि गायिका म्हणून लताबाई, काय वकुबाच्या आहेत, हे समजून घेत येईल. सरळ चाललेली तान एकदम ज्याप्रकारे गुंतागुंतीची हरकत घेऊन संपते, केवळ लताबाई!!
“श्रीराम जयराम” – सरळ, सरळ ईश्वराची आळवणी आहे आणि त्यानुसार चाल बांधली आहे. यापुढील “बाजे रे मुरलिया” च्या खालोखाल, मला ही रचना आवडली. यात लताबाईंचा आवाज अगदी मोकळा लागलेला आहे तसेच भीमसेन जोशींचा गंभीर स्वर अगदी योग्य प्रकारे लागला आहे. फारच सुंदर रचना आहे, शेवटाला भीमसेन जोशींनी वरच्या सुरांत जी आळवणी केली आहे, ती केवळ भीमसेन जोशीच घेऊ शकतात!! आणि त्याचा सुरांत मिसळून, लताबाईंची आलापी खूपच खुलून आली आहे.
“बाजे रे मुरलिया बाजे” ही रचना, सगळ्यात सुंदर रचना आहे. अगदी युगुलगीत जरी असले तरी, दोन्ही गायकीचा सुंदर उपयोग केलेला आहे, लताबाईंच्या नाजूक हरकती आणि भीमसेन जोशींच्या दमसासयुक्त हरकती, अगदी एकमेकांना पूरक आहेत. अर्थात, एकेठिकाणी, मला वाटते, दुसऱ्या अंतऱ्यानंतर, चाल थोडी “अभंग तुकयाचे” धाटणीची झाली आहे. क्षणमात्र हरकत आहे पण लगेच आठवण येते, हे नक्की. बाकी सगळे भजन मात्र फारच सुंदर आहे, वेगवेगळ्या लयीत गुंफलेले आहे पण मुळात दोन्ही तयारीचे आवाज असल्याने, या गाण्यातील कितीतरी अवघड हरकती, सहज सोप्या वाटतात!! इथे एक बाब स्पष्ट करायला हवी. भीमसेन जोशी, हे मुळातले शास्त्रीय संगीत गाणारे असल्याने, त्या गायकीचा प्रभाव अवश्य दिसून येतो.
“श्याम घन घनश्याम” हे लताबाईंचे एकल गीत आहे. लताबाई गाताना, शब्दोच्चाराबाबत किती “दक्ष” असतात, याचे उत्तम उदाहरण ठरावे. गाताना, शब्द किती “वजनाने” उच्चारावा, कुठे सोडावा याचा फारच सुंदर “विचार” गाण्यातून दिसतो. चाल तशी फार गुंतागुंतीची नाही (खळेसाहेबांची रचना सहसा अशी असत नाही!!) पण, तरीही काही, काही “जागा” खास लताबाईंच्याच!!
“नारायण वंदन” थोडी तिलक कामोद रागाची आठवण करून देणारी चाल आहे. अर्थात, एका, दोन ठिकाणी भीमसेन जोशींच्या हरकतीत, थोडा “कर्नाटकी” ढंगाचा भास होतो. गाण्याचा एकूण ढंग पारंपारिक रचनेकडे झुकलेला आहे पण अखेर रचनाकार श्रीनिवास खळे आहेत!! त्यामुळे, त्यात नाविन्य तर नक्कीच आहे. नाविन्य आहे, ते सादरीकरणात. पारंपारिक रचना साधारणपणे सरळसोट चालते पण खळे इथे त्यांचे contribution दाखवतात!!
इथे जर कुणी , “अभंग तुकयाचे” बरोबर तुलना केली तर थोडी निराशा होऊ शकते. एकतर त्यावेळेस, खुद्द संगीतकार आणि लताबाई, दोन्ही ऐन भरात, जोमात होते. आणि दुसरे असे, संगीतात अशी तुलनाच चुकीची आहे, पण आपल्याकडे लोकांना तुलना केल्याशिवाय चैन पडत नाही, हेच खरे. थोडक्यात, “राम श्याम गुणगान” मधील रचना सुंदर आहेत, जर तुलना केली नाही तर. आता, लोकांच्या स्मरणात ही गाणी फारशी नाहीत!! याचे मात्र निश्चित नवल आहे. लोकाभिरुची चंचल आणि अस्थिर असते, हेच खरे सत्य!!

No comments:

Post a Comment