Sunday 21 April 2024

हमें तुम से प्यार कितना

आपल्याकडे एक सवय फार जुन्या काळापासून चालत आली आहे आणि ती म्हणजे, कुठल्याही कलाकृतीचे मूल्यमापन हे भावनिक पातळीवर आणि वैय्यक्तिक दृष्टीकोनातून करायचे, त्यातून वेगळा पंथ हा अति क्लिष्ट भाषेत लिहिण्याचा झाला. त्यामुळे, सामान्य रसिक,कुठलीही कलाकृती कधीही फार खोलात न जाता, आस्वादू लागली. कलाकृती ही मनोरंजक असली तरी चालेल, कशाला उगाच अधिक खोलात जाऊन, चिकित्सा वगैरे जडजम्बाल गोष्टीत लक्ष घाला आणि याच वृत्तीने बऱ्याच वेळा खऱ्या उत्तम कलाकृतीकडे एकतर संपूर्ण दुर्लक्ष झाले किंवा अकारण सामान्य दर्जाच्या कलाकृती अति लोकप्रियतेच्या लाटेवर राहिल्या. कलाकृती प्राथमिक स्तरावर मनोरंजक असणे आवश्यक असावेच पण तोच केवळ प्राथमिक निकष नसावा. त्यातूनच अकारण, परंपरेचे ओझे गाठीशी बांधून घ्यावे, असा विचार आंधळेपणाने स्वीकारला जातो. पण, यात एक बाब नेहमीच अंधारात ठेवली गेली आणि ती म्हणजे, कुठल्याही कलेला शास्त्राधार नसेल तर तिचे योग्य मूल्यमापन जमणे कठीण असते. हीच बाब, आपले आत्ताचे गाणे या विवेचचनाशी जवळचे नाते सांगणारे आहे. गाणे तसे अति लोकप्रिय नाही परंतु विश्लेषण करणे आवश्यक वाटावे, असे नक्की. गाणे रंजन पातळीवर निश्चितच अतिशय सुंदर आहे. गाण्याची चाल, सगळे गाणे ऐकल्यावर मनात कुठेतरी रुंजी घालत असते आणि एकूणच गाणे म्हणून आपल्या श्रवण क्रियेला चालना देणारे आहे. मजरुह सुलतानपुरी यांची शब्दकळा आहे. या कवींबाबत एक बाब अवश्यमेव मानावीच लागेल. सतत चित्रपटांसाठी गीतलेखन करून देखील त्यांनी आपला दर्जा एका विविक्षित पातळीखाली घसरू दिला नाही. उदाहरण बघायचे झाल्यास,समकालीन आनंद बक्षी यांच्या रचना तुलनेसाठी बघाव्यात. सतत गीते लिहिण्यामुळे दर्जा घसरणे किंवा नेहमीच दर्जेदार निर्मिती करणे नेहमीच अवघड असते कुणीच कवी यातून सुटलेला नाही. त्यातून चित्रपटासाठी गीते लिहिणे, बरेचवेळा घाऊक उत्पादन करण्यासारखे असते. एकदा घाऊक उत्पादन म्हटले की मग टाकाऊ शब्दरचना हातून लिहिली जाणे क्रमप्राप्त होते आणि या मुद्द्यावर ही शब्दकळा बघितल्यास, कविता काहीही नवीन आशय देत नाही परंतु संगीतकार आणि चित्रपटाची गरज पूर्ण करते. खरंतर या गाण्याची स्वररचना आणि गायन, हीच स्पष्ट बलस्थाने आहेत. *तुम्हें और कोई देखे तो जलता हैं दिल,बड़ी मुश्किल से फिर भी संभलता हैं दिल* आता या ओळी,कविता म्हणून बघायला गेल्यास, अगदीच सपक म्हणाव्या लागतील पण हेच शब्द संगीतकारासाठी योग्य आहेत, असे म्हणता येईल. तेंव्हा याबाबत एकच एक ठाम विधान करणे अवघड आहे. चित्रपट माध्यम हे नेहमीच आर्थिक बाजूने बघितले जाते आणि निर्मितीतील प्रतिभा, हे शब्द बरेच वेळा दुर्लक्षिले जातात. वास्तविक मजरुह यांनी पूर्वी आणि नंतर देखील आपला आवाका सिद्ध करून दाखवला आहे पण इथे मात्र निराशा पदरी पडते. वर म्हटल्याप्रमाणे, हे गाणे पूर्णतः संगीतकाराचे आणि गायकाचे आहे. संगीतकार राहुल देव बर्मन यांनी *भैरवी* रागिणीचा आधार घेतला आहे. या रागिणीत असंख्य स्वररचना झाल्या आहेत तरीही स्वतःचे वेगळेपण इथे संगीतकाराने दाखवून दिले आहे. राग म्हणून बघता, *सा म प* हे स्वर वगळता सगळे स्वर *कोमल* लागतात. *संपूर्ण* जाती असल्याने स्वरविस्ताराला भरपूर जागा प्राप्त होते. आता गाण्याच्या स्वररचनेकडे लक्ष दिल्यास, अस्थाईमध्ये *शुद्ध रे* स्वराचा वापर केलेला आढळतो आणि ललित संगीतात संगीतकार असेच स्वातंत्र्य घेतात. पहिल्याच ओळीत दोन्ही माध्यम लागतात तर लगोलग कोमल धैवत स्वराचे प्राबल्य ऐकायला मिळते एकूणच रागातील जे कोमल स्वर आहेत, तसेच वापरले गेलेत. सा रे् सा रे् रे् ग् प ध् नि् अशा स्वरावलीत अस्ताईतील पहिल्या ओळीचे स्वरांकन करता येते. पुढे अर्थातच संगीतकाराने स्वतःचे वैशिष्ट्य टिकवताना, त्याची *खासियत* सिद्ध केली आहे. गाण्यात सर्वत्र दरवळणारा *केहरवा* ताल वापरला आहे. गंमत अशी आहे, जरी पारंपरिक ताल असला तरी त्यातील मात्रांचे *वजन* जरा खालच्या अंदाजात ठेवले आहे. वाद्यमेळात पाश्चात्य प्रचलित *कॉर्डस* पद्धत अनुसरली आहे. संगीतकार राहुल देव बर्मन नेहमीच परंपरेच्या विरुद्ध जाण्याचा प्रयत्न करीत असला तरी अखेरीस परंपरेपासून फटकून रहात नाही. गायक किशोर कुमारने इथे खऱ्याअर्थी बाजी मारल्याचे ऐकायला मिळते. अत्यंत मोकळा आवाज, दैवगत मिळालेल्या दीड सप्तकाचा अतिशय कुशलतेने केलेला वापर इथे आढळतो. कवितेतील प्रत्येक शब्द, आशयाच्या अंगाने *भोगून* गायन करतो. हे जे या गायकाचे *भोगी गायन* असते, तेच इतरांना अवघड जाते आणि त्यामुळे गाण्याला समृद्धता मिळते. अगदी साधा *हुंकार* असला 'तरी त्यामागे किंचितसा *जोर* लावलेला दिसतो. परिणामी गाणे एकदम वेगळ्याच उंचीवर पोहोचते. अशा गोष्टी समजून घ्यायला, गाणे तितक्याच एकाग्रतेने ऐकणे जरुरीचे असते. अगदी बारकाईने ऐकायला गेल्यास, सुरवातीचा *हमें* हा शब्द गाताना, *ह* अक्षराचा उच्चार आणि पुढील *में* या अक्षराचे उच्चार, बारकाईने ऐकल्यावर, दुसरे अक्षर पहिल्या अक्षराच्या *वजनाला* किंचित स्पर्श करून जातो. बाब तशी छोटी आहे पण तिथूनच आपल्या गायकीचे वेगळेपण रसिकांच्या मनात घर करून बसते. आणि एकदा का सुरवातीलाच स्वररचनेवर पकड ठेवली की पुढील मार्ग सुरळीत होतो. किशोरकुमार यांनी हे तंत्र फार बेहतरीन पद्धतीने आत्मसात केले होते. अशा अनेक वैशिष्ट्यांनी हे गाणे *सजवले* गेले आहे आणि परिणामी आजही लोकांच्या स्मरणात राहिलेले आहे. हमें तुम से प्यार कितना ये हम नहीं जानते मगर जी नहीं सकते तुम्हारे बिना सुना गम जुदाई का उठातें है लोग जाने जिंदगी कैसे बिताते है लोग दिन भी यहाँ तो लगे बरस के समान हमें इंतजार कितना ये हम नहीं जानते तुम्हें और कोई देखे तो जलता हैं दिल बड़ी मुश्किल से फिर भी संभलता हैं दिल क्या क्या जतन करते हैं तुम्हे क्या पता ये दिल बेक़रार कितना ये हम नहीं जानते हमें तुमसे प्यार कितना | Humein Tumse Pyar with lyrics | Kudrat | Rajesh Khanna | Hema Malini (youtube.com)