Wednesday 18 June 2014

ए. आर. रहमान -चरित्र




कुठल्याही कलावंताचे चरित्र आणि त्यातून चित्रपट क्षेत्राशी संबंधित कलाकाराचे चरित्र हे नेहमीच बहुतेक वाचकांच्या आकर्षणाचे विषय असतात. त्यातून, रहमान तर सध्या लोकप्रियतेच्या शिखरावर असल्याने,चरित्र वाचण्याची उत्सुकता अधिक वाढते. सर्वसाधारण विचार केला तर कुठल्याही लोकप्रिय व्यक्तीचे चरित्र हे ठराविक चाकोरीतून(च लिहिले जाते. म्हणजे, त्याचे बालपण, त्याच्यावरील संस्कार, त्याचा, पुढील वाटचालीवर पडलेला प्रभाव, आयुष्यातील महत्वाचे ठळक प्रसंग आणि त्याच्या कलेतील शिखर म्हणून गणलेल्या कलाकृतींचे उल्लेख इत्यादी गोष्टीतून बहुतेक चरित्र लेखन केले जाते.  त्यामुळे, प्रस्तुत ग्रंथ देखील याच वाटेने गेला आहे. प्रश्न असा नाही की हे उल्लेख कशाला आहेत? फरक पडतो, या उल्लेखातून, रहमान संगीतकार म्हणून कसा विकसित गेला, त्या विकासाचे टप्पे आणि त्याने चित्रपट सांगितला दिलेली वेगळी दिशा, याचे अभ्यासपूर्ण तपशील, याच फारसे कुठेच विवरण वाचायला मिळत नाही.
रहमानचे बालपण, गरिबीत आणि हालात गेले. त्याचे वडील, शेखर हे चित्रपट संगीताच्याच क्षेत्रात होते आणि त्याकाळी, इलायाराजा, सलिल चौधरी सारख्या व्यासंगी संगीतकारांकडे वादक म्हणून होते. सतत कामाच्या ताणाखाली  राहिल्याने,तब्येतीची अतोनात हेळसांड झाली आणि त्यातच त्यांचा मृत्यू झाला. याचा छोट्या रहमानच्या मनावर फार मोठा परिणाम झाला. त्याच्या  मानसिक जडणघडणीत याचा उल्लेख अवश्यमेव ठरतो. परंतु वडिलांच्या मृत्युनंतर त्याच्या आईने मुस्लिम धर्म का स्वीकारला, याचे यथायोग्य विवरण फारसे वाचायला मिळत नाही, फक्त त्यांनी आपल्या नातेवाईकांशी संबंध तोडले, याचाच उल्लेख वाचायला मिळतो!! वास्तविक धर्मांतर करणे, हि साधी बाब नव्हे पण त्याचे काहीच तपशील मिळत नाहीत. आईनेच त्याला संगीत क्षेत्रात जाण्यासाठी उद्युक्त केले, आणि त्यानुसार त्याने रीतसर प्राथमिक शिक्षण घेऊन, अनेक तमिळ संगीतकारांकडे उमेदवारी केली, अगदी इलायाराजाकडे देखील!! याचा उल्लेख मुद्दामून कारण पुढे, रहमानने जाणीवपूर्वक इलायाराजाने गाण्याची जी पद्धत निर्माण केली होती, रचनांचे नवीन साचे तयार केले होते, त्याच्या विरुद्ध जाऊन आपल्या संगीत रचना केल्या!!
त्याचे बालपण, हलाखीत गेले, हे तर सुरवातीलाच वाचायला मिळते परंतु त्या परिस्थितीचा पुढे इतक्या वेळा उल्लेख वाचायला मिळतो की, मनात काहीवेळा प्रश्न उभा राहतो, इथे रहमानच्या हलाखीची परिस्थिती glorify केली की काय?
चरित्र लेखनात साधारणपणे बौद्धिक विवेचन वाचायला मिळत नाही (मला तसे वाचायला बरेच आवडते, पण तो भाग वेगळा!!) कारण, वाचकांना कलाकाराच्या “उजेडाच्या” भागाविषयी वाचण्याची उत्सुकता असते. त्यातून कलाकाराच्या कलाकृतीचे मुलभूत निकषांनुसार लिखाण तसे वाचायला “बोजड” होण्याची देखील शक्यता असते. परंतु, ज्या रहमानने, चित्रपट संगीतात संपूर्ण वेगळी वाट चोखाळली, त्या वाटेचे सम्यक विवरण नक्कीच अपेक्षित असते. केवळ, रहमानने गाण्यात वेगवेगळे प्रयोग केले, इतकेच लिहून, आपल्या हाती फारसे काहीच लागत नाही. त्याने वेगवेगळे प्रयोग केले म्हणजे नक्की काय केले? त्यासाठी पूर्वसुरींच्या वाटेचे अवलोकन आवश्यक असते अन्यथा नवीन पायवाट कुठली, याचा पत्ताच लागणे अवघड!!
एकेठिकाणी लिहिले आहे, रहमानने ध्वनीसंयोजनात अधिक प्रयोग केले आणि त्यासाठी अर्थविहीन शब्दांची योजना केली. एक प्रयोग म्हणून ठीक आहे पण मग, पुढे “रहमान नेहमी शब्दांना फार महत्व देतो” या वाक्याला काय अर्थ उरतो? मी तर त्याच्या एका मुलाखतीत ऐकलेले आहे, “तू ही रे” या गाण्याच्या संदर्भात, त्याने स्पष्टपणे म्हटले होते, “या गाण्याच्या चालीत कुठलेही शब्द बसू शकतात!!” जर का हे मत गंभीरपणे घ्यायचे झाल्यास, त्याचा गाण्यातील शब्दांवर फार विश्वास  नसतो,ही बाब अधोरेखित होते. आता, हे योग्य कि अयोग्य हा वेगळा विषय झाला!!
पुस्तकात, काही कवींनी याबाबत नाराजी व्यक्त केल्याचे देखील वाचायला मिळते. रहमानला ध्वनीसंयोजनात अतोनात रस आहे, हे मान्य करायला प्रत्यवाय असू नये आणि त्यादृष्टीने त्याच्या संगीत रचनेत बरेचवेळा याचा पडताळा येतो. त्याने भारतीय शास्त्रीय संगीत आणि पाश्चात्य संगीत याचा मिलाफ साधला, ही बाब उल्लेखनीय म्हणायलाच हवी. त्याने आपल्या आयुष्याची सुरवात “जिंगल्स” बनवण्यापासून केली आणि तिथेच त्याचा इलेक्ट्रोनिक्स वाद्याकडे ओढा वाढला. त्याच्या रचनांवर “जाझ” संगीताचा बराच प्रभाव आहे आणि कर्नाटकी संगीत व जाझ संगीत, या दोन संपूर्ण वेगळ्या संगीतातून त्याने नवीन आविष्कार सादर केला, हा प्रयोग निश्चित स्पृहणीय आहे आणि यातूनच चित्रपट संगीताला वेगळे वळण मिळाले. परंतु या प्रयोगाबद्दल फारसे काहीही वाचायला मिळत नाही.
वाचायला मिळते ते, तो आणि त्याचे कुटुंबीय किती धार्मिक आहे, त्यांचा दानधर्म किती चालतो इत्यादी उल्लेख. चरित्रलेखनात हे उल्लेख योग्य आहेत पण त्याचे प्रमाण किती असावे? जवळपास ३६ पाने केवळ “श्रद्धा” आणि “दानधर्म” यावरच लिहिलेले आहे!! तसेच रहमान किती संकोची आहे, हे सांगण्यासाठी पानेच्या पाने खर्ची घातली आहेत. आज जगातील निवडक संगीतकारात याचे नाव येते, हे कुणालाही भूषणास्पद आहे आणि या लोकप्रियतेच्या लाटेवर आरूढ होऊन, समजा स्वभावात कोरडेपणा किंवा तुटकपणा आला तरी ते समजण्यासारखे आहे आणि या पार्श्वभूमीवर रहमानचा संकोची स्वभाव त्याच्या व्यक्तिमत्वाला वेगळे परिमाण देतो, हे देखील मान्य व्हावे पण तेच व्यवच्छेदक लक्षण व्हावे!! तसेच तो कामात किती गर्क असतो, यासाठी अशीच पानेच्या पाने वर्णने वाचायला मिळतात आणि हे सिद्ध करण्यासाठी, मणी रत्नम, सुभाष घई, आमिर खान इत्यादी प्रथितयश माणसे कशी “वाट” बघत असतात, यावर कितीतरी अनावश्यक उल्लेखांनी पाने भरली आहेत.
 लेखिकेने,सुरवातीलाच मान्य केले आहे, रहमान फार भिडस्त स्वभावाचा आहे आणि त्यामुळे त्याच्याकडून फारसे काही मिळत नाही. त्यामुळे, त्याचे मित्र आणि जिवलग व्यक्ती यांच्या आठवणींवर फार अवलंबून राहावे लागले. त्यामुळे पुस्तकात जे तपशील आहेत, त्यात फारसे नाविन्य राहात नाही कारण तशा प्रकारचा तपशील इतर कुणाही इच्छित व्यक्तीला गोळा करता येईल. वास्तविक चरित्र लेखनात, आपण एका वाटेवरून चालत  असताना,अचानक वेगळी पायवाट दिसते आणि तिथून आपला वेगळा मार्ग सुरु होतो आणि या वेगळ्या मार्गाचे विवरण अपेक्षित असते. त्यासाठी त्या व्यक्तीच्या जितक्या जवळ जाता येईल  तितके जाऊन, त्याच्यातील प्रयोगशीलतेचे दाखले वाचायला मिळणे जरुरीचे असते. एकदा का, चरित्रनायक टाळून, त्याच्या आजूबाजूच्या व्यक्तींच्या मतांवर अवलंबून राहिले की मग तपशीलात नेहमीच फरक आणि विसंगती निर्माण होते.  इथे  नेमके तेच झाले आहे.
पुस्तकात, त्याला पहिला चित्रपट कसा मिळाला, पुढे पारितोषिके किती मिळाली याचे भरपूर उल्लेख आहेत पण ही माहिती आता कुणालाही मिळू शकते. त्यासाठी चरित्र कशासाठी लिहायला हवे? त्यामुळे, जरी ए. आर.रहमान या नावाभोवती जागतिक कीर्तीचे वलय असले तरी त्याचे चरित्र मात्र फारच सामान्य होते.

No comments:

Post a Comment