Thursday 19 June 2014

हेमराजवाडी – माझे बालपण – भाग ३




गेल्या दोन भागात, एकूणच खूळचटपणा आणि काही विरही आठवणी यांनी भरला गेला होता. खर तर, आमचे बालपण तसे फार साध्या पद्धतीने गेले. कुणाच्याच घरात तेंव्हा लक्ष्मी दोन्ही हातानी पाणी भरीत नव्हती!! सगळ्या कुटुंबांची सांपत्तिक स्थिती तशी साधारणपणे सारखीच होती. त्यामुळे, पैशाची गुर्मी, वगैरे विचार आमच्या कुणाच्याच डोक्यात कधीही आले नाहीत. माझी त्यातल्या त्यात, सुरेश, प्रदीप आणि नंतर उदय(हा आमच्या original ग्रुपमध्ये थोडा उशिरानेच आला!!) यांच्याशी नाळ अधिक जुळली. त्याचे कारण असे की, प्रशांत, बाबू हे तसे माझ्या पेक्षा चार वर्षांनी लहान होते. त्यामुळे, त्यांना इतर कामे सांगणे, याकडेच आमचा कल अधिक असे!! कुठलाही निर्णय, हा, मी, सुरेश आणि प्रदीप, यांच्याच संमतीने होत असे. एकदा, आम्ही जरा लहानच होतो, त्यावेळची एक अफलातून गोष्ट. आमच्या जवळच, सतीश अवचट म्हणून एक मुलगा राहत होता(आता तो या जगात नाही!!) एके सकाळी, त्याने प्रदीपकडे त्यावेळी, शंभर रुपये आणून दिले. त्यावेळचे १०० रुपये, म्हणजे, आता त्याची काहीच कल्पना करता येणार नाही. कुठून आणले, असे विचारता, त्याने प्रदीपला जे उत्तर दिले, त्याला कसलीच तोड नाही. त्यावेळी, महर्षी कर्वे रस्त्यावर, स.का. पाटील उद्यान मोठे दिमाखात उभे होते. आता त्याची दुर्दश झाली आहे, तेसोडा. पण त्या काळी, आमच्या कितीतरी संध्याकाळ या बागेत गेलेल्या आहेत. तिथे, मातीचे बरेच खेळ असत, उदाहरणार्थ, प्रचंड मातीच्या हत्तीच्या पोटातून घसरगुंडी, स्टीलचे डबल बार(व्यायामासाठी!!) वगैरे बरीच मनोरंजनाची साधने होती. तेंव्हा, त्या मातीच्या हत्तीच्या पायाशी म्हणे, सतीशला ते १०० रुपये मिळाले होते. तेंव्हा प्रश्न असा होता की, हे एव्हढी भारी रक्कम संपवायची कशी? त्यावेळी, आम्ही सगळेच अर्ध्या चड्डीतले!! आम्हाला ती रक्कम संपवायला, जवळपास एक महिना लागला!! त्यावेळी, आमचे खाणे म्हणजे, नाक्यावरील उत्तम भेळपुरीच्या दुकानावर choco bar icecream खायचे. नुसते महिनाभर आम्ही सगळ्यांनी कितीवेळा ते Ice Cream खाल्ले असेल, याची गणतीच नाही. तेंव्हा, आम्ही नुसतेच Ice Cream नव्हे तर, भेळपुरी,पाणीपुरी,रगडा पटीस असले प्रकार देखील खाल्ले. बरे, सगळा प्रकार गुपचूप!! त्यामुळे, घरी कुणाला संशय येऊ देता कामा नये, यासाठी, शक्यतोवर, संध्याकाळीच आमची हीं पार्टी व्हायची. रात्री परत घरातले जेवण जेवायला आम्ही मोकळे!! नंतर, जरा मोठे झाल्यावर, आम्ही कधी सतीशला या पैशाबद्दल काहीच विचारले नाही पण, “हत्तीचा पाय” हा विनोद मात्र कित्येक दिवस आम्हाला पुरला होता.
या अर्ध्या चड्डीवरून, असाच एक गमतीशीर प्रसंग आठवला. त्यावेळी, माझ्या आईने, मला “लाल” तर, माझ्या भावांना “निळा” आणि “हिरवा” अशा रंगाच्या चड्ड्या शिवल्या होत्या. मीदेखील दिवसातील बहुतेक वेळ हा हेमराजवाडीतील “E” ब्लॉकमध्येच घालवत असू. तिथे तिसऱ्या मजल्यावर,आमच्या शाळेतील, चित्रकलेचे, दाते मास्तर म्हणून एक शिक्षक राहत असत. मोठा विक्षिप्त माणूस होता. अंगाने जरा स्थुलच प्रकृती होती.आम्ही, बऱ्याच वेळा लपाछापीचा खेळ खेळत असू. एकदा असाच दुपारच्या वेळी, आमचा खेळ रंगात आला असताना, माझ्या डोक्यात एक “किडा” आला. त्यावेळी, असे “किडे” माझ्या डोळ्यात वारंवार येत असत. आमचे लपायचे अंगण म्हणजे, चौथा, तिसरा आणि दुसरा मजला. अगदी, सार्वजनिक संडासात देखील आम्ही लपत असू!! असह्च एका दुपारी, आमचा खेळ रंगात आला असताना, अचानक मी त्याच्या खोलीच्या जवळ आलो आणि एकदम, मोठ्याने ओरडलो,”काय दाते मास्तर झोपलात काय?” वास्तविक त्यांची विश्रांती घ्यायची वेळ पण, मला ते बघवले नाही आणि मी ओरडून पळालो, त्यादिवशी काय झाले,कुणास ठाऊक,पण माझ्या धाकट्या भावाने पण ,माझ्यासारखीच “लाल” चड्डी घातली होती आणि दाते मास्तरांनी, फक्त “लाल” चड्डी बघितली. झाले, लगेच दाते मास्तर वर आले, तेंव्हा खर तर, आम्ही हसत होतो. पण, दाते मास्तर आले तेच मुळी, डोळ्यात अंगार घेऊन आणि त्यांनी माझ्या भावाची “लाल” चड्डी पाहिली आणि एकदम, रागाने वरचा सूर लावला. आम्ही, लगेच गोरेमोरे झालो. पुढील क्षणात, त्यांनी माझ्या भावाच्यावर हात उगारला!! नशिबाने, त्यावेळेस, सुरेशचे शेजारी, टिल्लू अण्णा बाहेर होते, त्यांनी दाते मास्तरांना सावरले आणि समजूत काढली. प्रसंग खरतर, आमच्या अंगाशीच आला होता. नंतर, कसले खेळणे नि काय. मुकाटपणे, गच्चीत गेलो आणि, तोंडातल्या तोंडात हसत राहिलो. त्यावेळी, खर सांगायचे, तर आमची सगळ्यांचीच हवा गुल झाली होती. त्यातून दाते मास्तर, आमचे शाळेतील शिक्षक, त्यामुळे तर अधिकच तंतरली होती. सुदैवाने, प्रकरण अधिक वाढले नाही. नंतर, मी त्यांच्या वर्गात जाऊन सहजपणे बसत होतो. त्यांनी देखील नंतर, माझ्याकडे हा विषय काढला नाही.
सुरेशच्या शेजारी राहणारे टिल्लू कुटुंब, हे एक असेच लक्ष्यात राहणारे कुटुंब!! नवरा, बायको, मुलगा देवेंद्र, मुलाचे आई आणि वडील असे सगळे त्या दोन खोलीत राहत असत.नवऱ्याला,आम्ही सगळे “मन्या” या नावानेच ओळखत असू. सगळे कुटुंब अगदी पक्के घाऱ्या डोळ्यांचे!! मन्या तर, अति उग्र चेहऱ्याचा होता. त्याच्याशी डोळे वर करून, आम्ही कधी बोलूच शकलो नाही. तो एका बोटीवर कामाला होता त्यामुळे, त्याची कामाची वेळ हीं नेहमी अडनिडिच असायची. कधी, कधी तर, आठवड्याच्या आठवडे तो घरात नसायचा. मात्र, त्याची बायको मात्र अतिशय प्रेमळ आणि हसतमुख असायची. आमच्याशी ती कितीतरी वेळा गप्पा मारीत बसायची. आमची वये, हीं त्या वेळेस जवळपास, अकरा, बारा इतकीच होती. देवेंद्र तर, आमच्यातच रमायचा. त्या सगळ्या कुटुंबाला, आम्ही “मन्या” याच्याच संदर्भाने ओळखत असू, म्हणजे, मन्याची बायको किंवा मन्याची आई वा मन्याचे बाबा या प्रमाणे. मन्याला एक बहिण देखील होती, मला वाटते, शरयू तिचे नाव होते. त्यावेळेस, म्हणजे ते कुटुंब जेंव्हा हेमराजवाडीत राहत होते, तो पर्यंततरी, तिचे लग्न झाले नव्हते पण ती तशी आमच्यात कधी फारशी मिसळली नाही. कदाचित वयातील फरक ध्यानात घेता, पण तसे पहिले तर, तेंव्हा सुरेशची मोठी बहिण, तिला आम्ही अजूनही “ताई” असेच म्हणतो, ती मात्र आमच्याशी खूप बोलत असायची. तसे आमचे आयुष्य अशा फालतू धाडसाच्या गोष्टी सोडल्या तर, सरळसूत असेच होते. एकूणच, त्यावेळचे गिरगाव हे सरळ साधे असेच होते. लोकांना, एकमेकांना भेटण्यास आनंद होत होता, मुद्दामून भेटण्यासाठी वेळ बाजूला काढला जायचा. आनंदाची साधने तशी थोडीच होती. सगळे सण अगदी, परंपरेनुसार साजरे व्हायचे, म्हणजे, गुढी पाडवा हा गुढी उभारून आणि कडू पाने खाऊनच साजरा व्हायचा. गिरगावातील गणपतीदेखील अधिक सोज्वळतेनेच साजरा होत असे. मी, सुरेश आणि नंदू, असे कितीतरी वर्षे, हेमराजवाडीतील गणपतीच्या उत्सवात “सहस्रावर्तन” कार्यक्रमात सहभागी होत होतो. नंतर, प्रदिपदेखील आमच्यात सामील झाला होता. अगदी, मनापासून हीं आवर्तने चालायची. त्यावेळी, दुसऱ्या मजल्यावरील पाध्ये, हे आमचे प्रमुख!! बहुतेक आवर्तने तेच म्हणायचे!! आम्ही आपले, जवळपास नावापुरते तीन,चार वेळा, कधी आठ, दहा वेळा आवर्तने करीत असू.
गिरगावातील गणपती मात्र, खऱ्या अर्थाने, आम्ही धमाल करीत पार पाडीत असू. ते दहा दिवस आणि विशेषत: रात्री, वेगवेगळ्या वाडीत जाऊन, मुकाटपणे चित्रपट पाहणे, याचे आम्हाला वेडच लागले होते. त्यावेळी, जादुगार, रघुवीर, जादुगार इंद्रजीत, यांचे खेळ हीं आमची खास आकर्षणे होती. एका वर्षी, हेमराजवाडीत देखील जादुगार इंद्रजीत आला होता. त्यावेळचे आम्हाला वाटलेले आश्चर्य आजही माझ्या मनात ताजे आहे. त्यावेळी, आमच्या ग्रुपने, कितीतरी वाड्या पालथ्या घालून किती चित्रपट पहिले, याची गणती करणेच कठीण आहे. एके वर्षी, बाजूच्याच कामत चाळीत, पंडित भीमसेन जोशींचे गाणे झाले होते. माझे वडील अगदी आग्रहाने गेले होते, मला देखील चल असे म्हणाल्याचे आता स्मरत आहे. त्यावेळी, आमची संगीताची आवड हीं चित्रपट गाण्यांपुरतीच होती. त्यावेळी, भुलेश्वर किंवा भेंडीबाजारमध्ये जाणे, हे देखील आम्हाला मर्दुमकी गाजवल्यासारखे वाटायचे. ते दिवस मात्र मंतरल्यासारखे आमच्या आयुष्यात आले होते.

No comments:

Post a Comment