Wednesday 18 June 2014

सर्वांगसुंदर गायकी




सुगम संगीत गाताना, साधारणपणे सुरेल गायकी हा आवश्यक निकष मानला जातो आणि तसा तो आवश्यक देखील आहे. मन्नाडे हे या कसोटीला सर्वार्थाने उतरतात. खुला आणि मर्दानी आवाज, प्रसंगी सहकंपन आणि गुंजन स्तरावर गाऊ शकणारा गळा, ही त्यांच्या गायकीचे काही मर्मस्थाने म्हणता येतील. शास्त्रीय संगीताचा पाया भक्कम असल्याने, संपूर्ण सप्तकात गळा लीलया फिरतो. तसेच गळ्यात हलकेपण असल्याने ( जे सुगम संगीतासाठी अत्यंत आवश्यक आहे!!) सर्व प्रकारच्या ताना सहजपणे गळ्यातून अवतरतात. आपल्या भारतीय शास्त्रीय संगीतात, स्वच्छ “आ” काराने गायन करण्यावर अधिक भर असतो आणि वरील काही वैशिष्टयामुळे त्यांच्या गायकीत “भावना” आणि स्वरांत “घनता” अधिक आढळते.
वास्तविक, मन्नाडे बहुतकरून हिंदी,बंगाली भाषेत अधिकतर गायले परंतु जरा बारकाईने बघितले तर भारतातील बहुतेक सगळ्या भाषांमध्ये त्यांनी गाणी गायली आहेत. आवाजाची जात, “शास्त्रोक्त” बैठकीवर असल्याने, त्यांना (उगीचच) रागदारी संगीतावर आधारित गाणारे गायक असे मानले गेले. इथे आणखी एका वैशिष्ट्याचा मुद्दामून उल्लेख करायला हवा. जे गायक बिगर मराठी भाषिक आहेत, त्यांच्या गायकीत त्यांच्या “मुळ” संस्काराचा परिणाम अनाहूतपणे दिसून येतो, विशेषत: शब्दोच्चार करताना तर हे प्रामुख्याने जाणवते, उदाहरणार्थ, मोहमद रफी, महेंद्र कपूर यांनी गायलेली मराठी गाणी मुद्दामून ऐकावीत. मन्नाडे याबाबतीत फारच दक्ष असल्याचे आढळते. प्रत्येक भाषेचे काही असे खास उच्चार असतात आणि जेंव्हा स्वरांचा आधार घेऊन, ते शब्द जेंव्हा गायले जातात, तेंव्हा जर का तसा भाषिक अभ्यास नसेल तर, तिथे ते उच्चार खटकतात.
मन्नाडे यांनी तशी फार काही मराठी गाणी गायली नाहीत. एकूण सगळी गाणी बघितली तर शंभर देखील गाणी आढळत नाहीत. अर्थात, इथे आपण काही गाण्यांचाच परामर्श घेऊया. त्यांचे सर्वाधिक गाजलेले गाणे – “घन घन माला नभी दाटल्या, कोसळती धारा”. हे गाणे सरळ, सरळ रागदारी संगीतावर आधारलेले आहे. सुरवातीचा आकारयुक्त आलाप, मुखडा कसा आहे, याची जाणीव करून देतो आणि लगेच गाण्याला सुरवात होते. मराठी भाषेत “घ”, “च” ह्या अक्षरांचे उच्चारण, शब्दाच्या स्वरूपानुसार बदलत असते आणि तेच तर सुगम गायकीचे महत्वाचे वैशिष्ट्य मानावे लागते. मन्नाडे गाताना, हा भाषिक विचार अगदी तंतोतंतपणे पालन करतात.
तसेच पहिल्या अंतर जिथे संपतो तिथे खंडित स्वरुपात “आकार” घेतला आहे. ध्रुवपदाचा आशय लक्षात घेता, हा संगीत वाक्यांश केवळ लाजवाब आहे आणि गळ्यावर किती ताबा आहे, हे दाखवून देणारा आहे. पुढल्या कडव्यात, “कालिंदीच्या तटी श्रीहरी, कशास घुमवी धुंद बासरी” ही ओळ येते. या ओळीतील, प्रत्येक शब्दाला मराठी भाषेचे “खास” लेणे आहे आणि मन्नाडे त्या सगळ्यांचा अविष्कार अतिशय समृध्दपणे दाखवतात. मघाशी मी, “च”, “घ” या अक्षरांचा उल्लेख केला, तो या पार्श्वभूमीवर बघावा, म्हणजे मन्नाडे गायकी समजून घेता येईल
आपण आता, दुसरे गाणे बघूया. “नंबर सिक्स्टी फोर” हे घरकुल चित्रपटातील गाणे, सरळ सरळ पाश्चात्य धुनेवर आधारित आहे. मी, इथे हे गाणे मुद्दामून घेतले. एकतर बंगाली गायक, त्याच्यावर केवळ रागदारी संगीताचीच गाणी गाऊ शकणारा, असा उगाचच आरोप लादलेला, असे असून देखील, संपूर्ण वेगळ्या धाटणीचे गाणे, किती समृद्धपणे गाऊ शकतो, याचे हे समर्पक उदाहरण. वास्तविक चालीवर पाश्चात्य सुरांचा ठसा स्पष्ट आहे तसेच सुरवातीचे शब्द इंग्रजी!! मन्नाडे यांच्या गायकीचे जे वैशिष्ट्य मघाशी मी दर्शविण्याचा प्रयत्न केला, तो परत इथे अधोरेखित करतो. जो मुद्दा मराठी भाषेचा, तोच मुद्दा इंग्रजी भाषेबद्दल मांडता येईल. गाणे उडत्या चालीचे, आनंदी वृत्तीचे आहे. त्यामुळे गाताना, शब्दांवर जरा जोर देऊन गायले गेले आहे, तसेच गाण्याची लय थोडी द्रुतगती आहे. असा एक समज आहे, जलद लयीतले गाणे गाताना, शब्दोच्चाराची फारशी क्षिती बाळगण्याची जरुरी नसते कारण सुरांचा आणि त्यासोबतीला असणाऱ्या वाद्यांचा प्रभाव अधिक असतो!! पण, तो निखालस चुकीचा आहे. कुठल्याही धाटणीचे/भाषेचे गाणे असले तरी शब्दोच्चार हे नेहमीच अचूक असावे लागतात. वास्तविक हे गाणे थोडे उच्च स्वरीय गाणे आहे, त्यामुळे, शब्दोच्चार चुकण्याकडे कल जाऊ शकतो परंतु त्याची वाजवी दक्षता गायकाने नेमकी घेतलेली आहे.
सुगम संगीतात सांगीत बढत कधीच करायची नसते. तर शब्दकळेनुसार स्वरांची बढत करून तसा एकत्रित “मूड” तयार करायचा असतो. म्हणूनच “सुरेलपणा”, “भरीवपणा” आणि “यथायोग्य उच्चार” या बाबी अत्यावश्यक ठरतात. मन्नाडे मधील गायक अशा भूमिका करतो. सगळ्यात महत्वाचे म्हणजे आशयानुरूप गाताना, मन्नाडे कधीही “नाटकी” बनत नाहीत. बरेचसे गायक, गाताना, हा दोष स्पष्टपणे दाखवून देतात. सुगम संगीत गाताना, शब्दांना सुरांमधून वेढून सादर करायचे असते पण त्यासाठी भावनांचा परिपोष संतुलित असणे, फार जरुरीचे असते आणि ही जाणीव आजही फारशी दिसत नाही!! शब्द, भावनेने उच्चारणे, हे योग्य तत्व आहे पण, भावनांचा अतिरेक होणे देखील हानिकारक असते, ही जाणीव आपल्या गायकीतून दाखवायची असते. मन्नाडे यांचे इथे अष्टपैलुत्व प्रकर्षाने दिसून येते.

No comments:

Post a Comment