Thursday 19 June 2014

हिंदी चित्रपटगीत – अशोक रानडे



माणसाला एखादा विषय जर का पक्का कळला असेल तर तो,त्याच विषयावर किती रसाळ आणि माहितीपूर्ण पुस्तक लिहू शकतो, याचे प्रस्तुत ग्रंथ हे उत्तम उदाहरण आहे. आजही, आपल्या समाजात, विशेषत: हिंदी चित्रपट गीते, हा थोडासा हेतालानीचा अथवा फारसा गंभीरपणे घेण्याजोगा विषय आहे, असे फारसे मानले जात नाही. पण, कुठलेही संगीत हे संगीत याच दृष्टीकोनातून ऐकून,नंतर त्याचे वेगेवेगळे गट करून त्याप्रमाणे निकष तयार करून, दर्जाची प्रतवारी लावणे, असा प्रकार आपल्याकडील चित्रपट संगीतात, जवळपास अजिबात अस्तित्वात नाही. शास्त्रीय संगीतावर, आजपावेतो भरपूर पुस्तके, लेख आणि वैचारिक ग्रंथ लिहिले गेले आहेत पण चित्रपट संगीतावर काहीही वैचारिक साहित्य प्रसिध्द झालेले नाही आणि ती उणीव, अशोक रानड्यांनी बऱ्याच प्रमाणात भरून काढलेली आहे.
वास्तविक, अशोक रानडे हे, शास्त्रीय संगीतातील फार थोर वाग्गेयकार मानले जातात आणि ते सर्वार्थाने सत्य आहे. यांच्या “शास्त्र” या विषयावर प्रचंड अभ्यास होता आणि त्यानुरूप त्यांनी आयुष्यभर साधना केली आणि ग्रंथ लिहिले. कुठल्याही कलाकाराच्या प्रेमात न पडता, केवळ तो सादर करीत असलेली कला आणि त्याचे स्वरूप व एकूण दर्जा, याबाबत त्यांचे ज्ञान आणि नजर अतिशय तीक्ष्ण होती आणि तीच नजर, प्रस्तुत पुस्तक वाचताना पानोपानी दिसते.
वास्तविक पाहता,  अशा प्रकारचा ग्रंथ पूर्वीच अस्तित्वात यायला हवा होता पण असो थोडा उशिरा आला तरी आला हे महत्वाचे. अर्थातच , लेखकाने आपली भूमिका ही “शास्त्र” याच दृष्टीने सतत ठेवलेली आहे. रानड्यांनी चक्क चित्रपट संगीताचे “व्याकरण” तयार केले आहे. सुरवातीलाच, चित्रपट गीत, ही एक शक्ती आहे, असे वर्णन करून, नंतर त्या शक्तीचा प्रभाव कसा,हळूहळू का होईना, जगभर पसरत चाललेला आहे. त्यामुळे, आपण कितीही नाके मुरडली तरी, या संगीताचे “अस्तित्व” नाकारणे अवघड आहे, अशाच प्रकारची मल्लीनाथी आहे. हे तर कुणीही मान्यच करील की, हिंदी चित्रपट गीतांनी, देशातला अगदी अतिसामान्य माणूसदेखील संगीतात रुची दाखवू लागला, तेंव्हा जरी काही शिष्टसंमत लोकांनी मान फिरवली असली तरी, या संगीताचा जनमानसावरील प्रभाव अतिशय खोल आणि विलक्षण आहे आणि हाच धागा धरून, लेखकाने पुस्तकाला सुरवात केलेली आहे.
पाहिले प्रकरण आहे,”दृश्यासाठी श्रव्य. या प्रकरणात सिनेमाची मुलतत्वे आणि त्या मुलातत्वांचा शारीर आणि मानसिक प्रभाव, यावर अतिशय सुंदर विचार मांडला आहे. मुळात, कुठल्याही कलेचे एकदा “शास्त्र” विकसित करायचे ठरविल्यावर, त्यासाठी ठराविक परिभाषा तयार करावी लागणे क्रमप्राप्तच ठरते. त्यानुरूप, रानड्यांनी आपली भाषा तयार केली आहे, काही नवीन शब्द तयार केले आहेत,उदाहरणार्थ,”संगीत वाक्यांश”. इथे एक गोष्ट ध्यानात ठेवणे अतिशय आवश्यक ठरते आणि ते म्हणजे, एकदा शास्त्र तयार करायचे म्हणजे मग त्यात थोडी भाषिक क्लिष्टता येणारचआणि शास्त्र म्हणून समजून घ्यायचे झाल्यास, त्या भाषिक क्लिष्टतेचा अंगीकार केल्यावाचून तरणोपाय नाही. मुळात, जर का ग्रंथ समजावून घ्यायचा झाल्यास, काही सांगितिक अलंकार, परिभाषा माहिती असणे आवश्यक आहे, उदाहरणार्थ, “तारिमा”,”गरिमा” असे शब्द. तसेच राग संगीताची निदान प्राथमिक ओळख असणे आवश्यक आहे. तरच, या पुस्तकातील विवेचनाचा नेमका अर्थ ध्यानात येईल. आता याच प्रकरणात, एक वाक्य असे आहे,”हालचाल,हातवारे,हावभाव आणि हेल यांच्या योजनेतून भाषिक-निर्भाषीकांचा एकसमयव्यवहार गुणवत्ता पावतो”. आता, इथे थोडे थांबून, या वाक्याचा नेमका अर्थ ध्यानात घेतला तरच सिनेमाची पुढील परिभाषा ध्यानात येणे सोपे जाईल. आता, दृश्य आणि त्यासोबत ऐकायला येणार आवाज, यातूनच चित्रपटाची निर्मिती झाली. तेंव्हा याच अनुषंगाने, लेखक, चित्रपट कला कशी विकसित होत गेली आणि त्यानुरूप संगीताचा या कलेत कसा शिरकाव झाला, याचे यथार्थ प्रतिपादन करतात. याच दिशेने, नाटकाचा हळूहळू चित्रपटाकडे कसा प्रवास झाला, याचेही नेमके निर्देशन वाचायला मिळते.
हाच संदर्भ पुढे वाढवून त्यांनी चित्रपट संगीत म्हणजे “जनसंगीत” असा नेमका शब्द वापरला आहे. असह संगीताचे आकलन होण्यासाठी त्यांनी एकूण ६ कोटी तयार केल्या आहेत.अर्थात, जनासंगीत ही त्यापैकी एक प्रमुख मानून, नंतर, आदिम, लोक,धर्म, कला आणि संगम आशा इतर आहेत.आता, या सगळ्या कोत्या त्यांनी एकाच शब्दात – संगीतकोटी असा वापरून त्यांना एका छत्राखाली आणले. अव्स्ताविक संगीत्कोती म्हणजे विशाष्ट समाजस्तराबरोबर सहचर्य असलेले संगीत, वा विशिष्ट समाजस्तरात जन्म घेतलेल्या वा त्याच्याशी संबंधित व्यक्तीने निर्माण केलेले संगीत. याच पुढे मग विवेचन “भारतीय संगीतकोटी” असे होऊन, त्याचा परामर्श घेतलेला आहे. या कोटीचे कार्य कसे चालते, त्यावर मौखिक परंपरेचे वर्चस्व कसे असते, विविध प्रांतानुसार संगीत वर्तनाचे गतिशास्त्र कसे बदलते आणि त्यानुसार संस्कृतीचा आढळ होतो, याबाबर अतिशय वेचक भाषेत वर्णन केले आहे. माझ्या मते, पुस्तकातील हाच भाग, जरा समजायला जड जाईल पण जरा शांत वृत्ती आणि चिकाटी दाखवली तर, सगळ्याचा अर्थ नेमका ध्यानात येऊ शकतो. याच विवेचनात पुढे, “ध्वनी” हा शब्द अवतरतो आणि त्याचे शब्दाच्या संदर्भात “स्वन” वा “ध्वनिवैशिष्ट्याची विपुल, जाणीवपूर्वक वापरलेली न आश्चर्यकारकतेने नातावलेली विविधता हे जनसंगीताचे कसे गर्व्स्थान होते, याबाबत थोडक्यात पण नेमकी माहिती वाचायला मिळते. त्यातून मह निरनिराळ्या प्रथा जन्माला येतात आणि त्याचा संगीतावर लिटी गहिरा परिणाम घडत असतो, हे समजून घेता येते. याच्बाबत पुढे ते लिहितात, मुलत: सांगीत ज्ञानावर आधारलेले अनेक सांगीत निर्णय घेत घेतच माहितीची वहन साधले जात असते.उदाहरणार्थ,सुरावट,लयबंध,शब्दसंहितेशी त्यांचे नाते,वाद्ययोजना,स्वनरंगाची निवड व योजना इत्यादी बाबीबद्दल विचारपूर्वक निर्णय घेऊनच संबंधित संगीताची सिद्धी होते” आता, प्रथमदर्शनी हे वाक्य वाचायला अवघड वाटते आणि तसे ते आहेच पण, जर का शांतपणे, या वाक्याचे लहान लहान खंड पाडून सुट्या पद्धतीने अर्थ लावला तर, एकूणच सगळा मतितार्थ ध्यानात येतो.
त्यानंतरचे प्रकरण आहे.”चित्रपट संगीत”. या शब्दाची लेखकाने अतिशय सुंदर “फोड” केली आहे आणि त्यानुरुपच या कलेच्या विस्ताराची पाहिली जाणीव आपल्याला होते. चित्र + पट + संगीत अशी ती फोड आहे. मानवी
जीवनाच्या विविध क्षेत्रांना संगीत स्पर्श करते. म्हणूनच संगीत कळवायचे असेल तर, अनेक शास्त्रे आणि कला समजून घेणे आवश्यक ठरते असा इशारा देऊन, हे प्रकरण सुरु होते. म्हणूनच, चित्रपट संगीताचा अभ्यासाकी वेध घ्यायचा झाल्यास, अर्थातच आवडी निवडींच्या पलीकडे जावे लागते. त्यासाठीच अभिरुचीमुलक, मूल्यविषयक विधाने आवश्यक ठरतात. मुलभूत संकल्पनांना केंद्रवर्ती स्थान मिळते. पण त्याच बरोबर हे जनसंगीत आहे, हे ध्यानात घेऊन, तात्विक, अमूर्त चर्चा आणि त्याबरोबर येणारा आकलन अघटपणा टाळणे जरुरीचे ठरते. याच संदर्भात विचार करता, मुलभूत विचार मांडायचे झाल्यास, इंद्रियांद्वारे श्रवण-दृक संवेदन, त्याचीरचना,क्षमता परिणाम भान्न असतात आणि याची बाबी लक्षात ठेउनच सगळे विवेचन करायचे नेमके भान लेखक जागोजाग ठेवतो. यापुढे, वार निर्देशलेली शब्द फोड संगतीला घेऊन, त्या शब्दांचा आवश्यक तितका विस्तार आणि उहापोह केलाला आहे. याच प्रकरणात, चित्रपट संगीताचे नेमके “व्याकरण” मांडलेले आहे आणि तेच समजून घेणे अत्यावश्यक ठरते.खर तर, या प्रकरणावर वेगळा निबंध लिहिणे आवश्यक ठरावे, इतका या प्रकरणाचा विस्तार आहे.
यापुढील प्रकरणात, हिंदी चित्रपट संगीताची घडण कशी होत गेली, पाश्चात्य चित्रपटाचा इथे सुरवातीपासून कसा प्रभाव पडलेला होता, याबद्दल अप्रतिम विवेचन येते. अगदी, दादासाहेब फाळके यांच्यापासून संगीताची सुरवात आणि पुढे ही कला कशी विकास पावत राहिली, याचे अतिशय मनोज्ञ वर्णन आहे. यात, एक विशेष असा हे, की, सगळ्याच पुस्तकात, इतरांनी काय म्हटले आहे, त्या अधिकारी व्यक्तींचे उतारे या गोष्टीना फारच कमी आणि अल्प स्थान मिळाले आहे. जे काही लिहिले आहे, तो सगळा लेखकाच्या विचार संहितेचा परिपोष आहे आणि हे मला फार मोठे वैशिठ्य वाटते. १९३१ पासून आलमआरा पासून सिनेमा दृक-श्रव्य झाला आणि संगीताचे महत्व वाढत गेले. त्याच संदर्भात घडलेल्या इतिहासाचे नेमके टप्पे आणि विकास निर्देशित केलेला आहे.
त्यानंतरच्या प्रकरणात, २ भाग केले आहेत, पहिल्या भागात, १९४७ पर्यंतचे संगीतकार आणि दुसऱ्या प्रकरणात, अगदी ए.आर. रेहमान पर्यंतच्या संगीतकारांच्या कर्तृत्वाचा आलेख आहे. अर्थात, सगळ्याच संगीतकराची छाननी केलेली नाही आणि तसे करणे, हा या पुस्तकाचा उद्देश देखील नाही. प्रत्येक टप्प्यावर चित्रपट संगीताने कशी वेगळी वळणे घेतली, कुणी त्यात लक्षणीय भर टाकली, याचा सगळा उहापोह आहे. त्यात, मग सज्जाद, अनिल बिस्वास, सी.रामचंद्र,रोशन, गुलाम हैदर असे जुने तर, नंतरच्या काळातील, ओ.पी.नैय्यर, शंकर/जयकिशन,एस. डी.बर्मन,जयदेव असा करत, आर,डी,बर्मन,लक्ष्मीकांत/प्यारेलाल ते ए.आर.रेहमान पर्यंत अत्यंत वेधक आणि विश्लेषणात्मक आढावा घेतलेला आहे आणि लेखकाची “नीरक्षीर विवेकेतू” वृत्ती दिसून येते. कुठलाही संगीतकार, एकेकाळी आणि आजही अतिशय प्रसिद्ध आहे, याचा कसलाच मुलाहिजा न ठेवता, विश्लेषण आहे. एकेकाळी ‘नौशाद” हा फार मोठे मनाचा संगीतकार होता पण, तो भाग नजरेआड करून, त्याच्या रचनेतील नेमका “कमीपणा” नेमका दाखवून दिला आहे, तसेच मदन मोहन, सज्जाद आणि अशा काही संगीतकारांच्या रचनेतील गुंतागुंत अतिशय नेमकी मांडली आहे.
इथे मला एक मुद्दा फार महत्वाचा वाटला. कुठलेही गाणे,हे “गाणे” याच दृष्टीकोनातून कसे ऐकावे, याचा अतिशय सुंदर धडा दिलेला आहे. गाणे जरी एखाद्या रागावर आधारलेले असले तरी, रचना ही रागाच्या पलीकडले भाव दर्शविणारी हवी, हा त्यातील सगळ्यात महत्वाचा मुद्दा ठामपणे मांडलेला आहे. यासाठी त्यांनी, सी.रामचंद्र, अनिल बिस्वास आणि जयदेव या आणि अशाच काही संगीतकारांची गाणी घेऊन, आपल्याला दाखवून दिलेले आहे. इथे मात्र, लेखकाची भाषा अतिशय साधी,जरी रागाचे नेमके संदर्भ येत असली तरी, आणि अनलंकृत आहे. इथे लेखकाच्या अभ्यासाचा नेमका प्रत्यय दिसतो. तसेच, नंतरच्या प्रकरणात, गायक/गायिका याच्या आवाजांचे विश्लेषण केलेले आहे. अगदी, सैगलच्या आधीपासून ते, रफी,किशोर,आशा आणि लता असा फार मोठा पट व्यापलेला आहे. प्रत्येक गायकाची वैशिष्ट्ये आणि कमतरता याचे नेमके निर्देशन आलेले आहे.अगदी लता झाली तरीही, तिच्या आवाजातील कमतरता, इथे स्पष्टपणे वाचायला मिळते.
असा हा अत्यंत निस्पृह वृत्तीने लिहिलेला ग्रंथ, सगळ्यांनी आवर्जून वाचण्यासारखा आहे. या पुस्तकाच्या निमित्ताने, लेखकाने, काही विशेष मुद्दे मांडलेले आहेत आणि त्या मुद्द्यांवर आणखी अभ्यास करून, हा विषय परिपूर्णतेच्या मार्गावर आणावा, अशी देखील विनंती केली आहे.

No comments:

Post a Comment