Thursday 24 October 2019

मन्ना डे

आपल्याकडे एक वाईट प्रथा आहे, एखाद्या कलाकाराचे एखाद्या विशिष्ट कलाप्रकारात नाव झाले की त्या कलाकाराची तीच ओळख कायम राहते, अगदी वज्रलेप म्हणावा अशी होते. त्यामुळे त्या कलाकाराची इतर वैविध्यपूर्ण अंगे दुर्लक्षित होतात. खरतर अशी प्रतिमा, कलाकार आणि कला या दोन्ही अंगाने दुर्दैवी म्हणायला लागेल. ख्यातनाम हिंदी चित्रपट गायक मन्ना डे, दुर्दैवाने याचे बळी झाले आहेत. आजही त्यांची ओळख ही "शास्त्रोक्त संगीतावर आधारित" गाणारा गायक अशीच रूढ झाली आहे. अशी एकांगी ओळख होणे चूकच आहे. ख्यातनाम गायक/संगीतकार के.सी. डे हे मन्ना डे यांचे काका. अर्थातच त्यामुळे प्रथम संगीतशिक्षण हे काकांकडे झाले. याचा फायदा असा झाला, हिंदुस्थानी संगीताच्या जवळजवळ सर्व मुख्य प्रकारांशी या गायकाचा परिचय झाला. 
पुढे न्यू थिएटर्स - मुंबई इथे आल्यावर लगोलग आपले का आणि संगीतकार एस.के. दास यांच्याकडेसहाय्यक म्हणून कामाला सुरवात केली. हे करत असताना, पार्श्वगायक म्हणून त्यांनी १९४३ मध्ये संगीतकार शंकरराव व्यासांकडे (चित्रपट - रामराज्य) प्रथम गायन केले. त्या चित्रपटातील दोन गाणी (अजब निधी का लेख + त्यागमयी तू गयी) ही गाणी गंभीर तत्वविचारांनी भरलेली आणि रागाधारीत होती. 
त्यांना गायक म्हणून पहिली ओळख मिळाली ती "उपर गगन विशाल (मशाल) या गाण्याने. तेंव्हापासून त्यांचा प्रवास सुरु झाला तो १९९१ मधील "हमारी मुठ्ठी में आकाश" (प्रहार - १९९१) पर्यंत अथकपणे सुरु होता. १९५० - ६० या दशकात त्यांनी जवळपास सगळ्याच अभिनेत्यांसाठी गायन केल्याचे आढळते. परंतु कुठल्याच अभिनेत्याशी त्यांचा आवाज निगडित झाला नाही आणि त्याची किंमत त्यांना मोजायला लागली. एक मात्र खरे, बंगाली चित्रपट सृष्टीत त्यांचा आवाज उत्तमकुमार या ख्यातनाम अभिनेत्याशी जुळला. 
जरा बारकाईने मन्ना डे यांची कारकीर्द न्याहाळली तर त्यांनी  अभिजात शास्त्रीय संगीत ते ट्विस्ट, या सर्व शैलीची गाणी गायली आहेत आणि नुसतीच गायली नसून त्या गाण्यांवर आपली अमीट छाप उमटवली आहे. त्यावरून त्यांच्या सादरीकरणाचा आवाका व विस्तार ध्यानात येईल. उदाहरणार्थ, "तू है मेरी प्रेमदेवता (राग ललित - ओ.पी. नैय्यर), "केतकी गुलाब जुही (बसंतबहार - शंकर/जयकिशन), ट्विस्ट शैलीतील "आओ ट्विस्ट करे", अगदी हलकेफुलके "एक चतुर नार (पडोसन - राहुल देव बर्मन), गांभीर्याने भावपूर्ण "ऐ मेरे प्यारे वतन" (काबुलीवाला - सलील चौधरी), घोष गायन " अब कहां जाये हम (उजाला - शंकर/जयकिशन) ही गाणी ऐकावीत. काही वेळा टवाळीने "क्लासिकल स्पेशालिस्ट"असा त्यांचा उल्लेख केला जातो आणि अशांनी वरील गाणी बारकाईने ऐकावीत. 
आपण आता मन्ना डे यांनी गायलेल्या गाण्याचे थोडे वर्गीकरण करून विश्लेषण करूया. 
पछाडलेली गीते : - "पूछो ना कैसे मैंने" ('तेरी सुरत मेरी आँखे) ही रचना अहिर भैरव रागावर आधारित आणि "अद्धा" या त्रितालाच्या उपभेदात रचलेली आहे. ही रचना एक चांगले गीत वाटते - छोटा ख्याल नव्हे. या विशेषांचा या गायकाने अतिशय सुरेख उपयोग करून घेतला आहे. शब्दांच्या भावच्छटांना धुंडाळणारा भावपूर्ण लगाव सर्वत्र ठेवला आहे - आपण रागविस्तार शोधात आहोत असा आव कुठेही डोकावत नाही (हल्ली बऱ्याच रचनांबाबत गायकांचा असा दृष्टिकोन असतो आणि स्वररचना डागाळतात) 
"कौन आय मेरे मन के द्वारे" (देख कबिरा रोया)  ही देखील अशीच आवाहकतेची आहे. मुळात बागेश्री/रागेश्री रागापासून सरकत सांगाल वेळ शब्दसंहितेकडे लक्ष वेधत राहते आणि आशय सघन होत जातो. 
त्यांच्या नव्या शैलीत रचलेली उन्मादी, आनंदी गाण्यांच्या गायनात अगदी वेगळ्या मागण्या करणारे घटक असतात . खूप मोठा वाद्यवृंदध्वनी, चमकदार अकोर्डीयनचे उत्साही वादन, आघातापूर्ण लयबंध पुरवणारे वेगवेगळे पटह आणि प्रथमतः हालचाल व मग समूहाला सहभागाचे आमंत्रण करणारा संगीत   जल्लोष - यांची रेलचेल नव्या शैलीत अपरिहार्यपणे असते. मन्ना डेंनी अशीही गीते दिली आहेत. "दिल का हाल सुने दिलवाला", " प्यार हुवा इकरार हुवा" (दोन्ही "श्री ४२०), "ए भाय जरा देख के चलो" (मेरा नाम जोकर), आओ ट्विस्ट करें (भूतबंगला), ये रात भिगी भिगी (चोरी चोरी) इत्यादी अनेक गीते या संदर्भात ऐकण्यासारखी आहेत. 
गंभीर व गुणवंत गीते : -  "तू प्यार का सागर है" ( सीमा ), "ऐ मालिक तेरे बंदे हम" ( दो आँखे बारा हाथ ), "ऐ मेरे प्यारे वतन" (काबुलीवाला),"अब कहां जाये हम" (उजाला) यांसारख्या रचनांचा एक उपवर्ग करता येऊ शकतो. गाणाऱ्या पात्रांच्या मनोवृत्तीमुळे अशी प्रार्थना गीते बनतात आणि गात्या आवाजास ही खास वृत्ती लगावांतून, उच्चांरातून प्रतितीस आणून द्यावे लागते. आपल्या स्थिर, स्वरेल आणि खुल्या आवाजाने मन्ना डे बरेच काही साधतात. मग आवाजाची फेक अशा नैसर्गिक गांभीर्याने केली जाते के आशयाचे गांभीर्य आपली सावली मागे ठेऊन जाते. उच्चारणांतून शब्दांकडे लक्ष गेल्याने शब्दसंहिता समोर येते आणि ऐकणाऱ्यास खरा अभिप्राय काय, याची नेमकी जाणीव होते. 
शास्त्रोक्त तसेच त्याची टिंगल देखील : -  शास्त्रोक्त संगीताचे वातावरण निर्माण करण्यासाठी हिंदी चित्रपटसंगीतात केल्या जाणाऱ्या प्रयत्नांचे प्रातिनिधिक रूप घेऊन समोर येणारी रचना म्हणून "सूर ना सजे" (बसंत बहार) हे गीत ऐकण्यासारखे आहे. प्रत्येक अंतऱ्यापाठोपाठ अनेक राग येतात. छोटा ख्याल वाटावा, अशी गीताची बांधणी आहे पसेच लोकशैलीतील अर्धाताल म्हणण्यासारखा लयबंध वापरला आहे ( याच रचनाकार जोडीने प्रस्तुत चित्रपटात पखवाज आणि त्यावर १० मात्रांचा झपताल लावला आहे) मन्ना दा गांभीर्याने, सफाईने आणि योग्य लगावाने गातात. दुसरे उदाहरण, अनिल बिस्वास यांनी बंदिश/ ठुमरीची बांधणी वापरलेली रचना "तोरे नैना रसिले" (हमदर्द) ही मन्नादा अधिक  यशस्वीपणे गातात. उलटपक्षी शास्त्रोक्त म्हणजे काय याची चुकीची धारणा मनात धरून केलेली रचना म्हणून "सप्त सूर तीन ग्राम" (संगीत सम्राट तानसेन) या रचनेचा उल्लेख करता येईल. बांधणीत धृपद आणि रागसागर हे मुख्य प्रकार वापरले आहेत. सात राग  आहेत (यमन कल्याण, भैरव, मालकंस, हिंडोल, श्री, दीपक आणि मेघमल्हार) आणले आहेत. जरा द्रुत लयीत पण ताल चौताल योजला आहे, दुगण, तिहाई, गुरुवंदनाचा श्लोक आणि त्याचे पठण कसेबसे बसवले आहे. अशी कृत्रिम गुंतागुंत  आणि मन्नादा यांचे चाचपडते गायन यामुळे सगळं खटाटोप फसवा झाला आहे. 
आता, शास्त्रोक्त शैलीचे काहीसे विडंबन. "लपक झपक तोरी" (बूटपॉलिश) ही रचना लक्षात घेऊया. अडाणा रागात आहे, त्रिताल, छोटा ख्याल हा संगीतप्रकर इथे जुंपला आहे. त्याशिवाय दुगण, तिहाई, लय वाढवीत जाणे, बोलताना यांना पण स्थान दिले आहे परंतु सादरीकरण एका चेष्टेखोर स्वरांत केले आहे. त्याचबरोबर ठुमरी शैलीतील २ रचना बघूया. "हटो काहे को" (मंझिल) ही रचना लक्षात घेऊ. यात शैलीबरीबर निगडित संयमित प्रेमभावनेने यथायोग्य सादरीकरण आहे. दुसरी रचना - "फुल गेंदवा ना मारो"(दुजे का चाँद). याच प्रकारची चेष्टा वा विडंबन करणारी आहे. लक्षणीय बाब अशी आहे, या दोन्ही रचनांचे इष्ट उद्दिष्ट आपल्या गायनातून मन्नादा कार्यक्षमतेने आणि सांगीत अनुभव देत साध्य करू शकतात. असाच सांगीत मजेदारपणा "अरे  किसने चिलमन से मारा" (बात एक रात की) या गाण्यात देखील जाणवते. मन्नादा हे सर्व अतिशय कुशलतेने  करतात. 
कव्वाली गायन : -  "ना तो कारवाँ की तलाश है" आणि "ये इष्क इष्क है" (बरसात की रात) या रचनांचे गायन खास उल्लेखनीय आहे. सर्वसाधारणपणे कव्वाली गायक हिंदुस्थानी संगीताशी जवळीक दाखवतात पण तरीही सादरीकरणाचा बाज वेगळा असतो. आवाजाचा लगाव, शब्दांचे उच्चारण, वापरलेले लयबंध आणि गायनाचे असलेले नाते या सगळ्यांत कव्वालीचे आवाहकत्व प्रत्ययास येते. 
याचाच वेगळा अर्थ,  केवळ शास्त्रोक्त संगीताचे गायक हा जो शिक्का बसला आणि त्यामुले मन्नादा बाजूला पडले, हे तितकेसे खरे नाही. एकूण विचार करता त्यांची गाणी काय दर्शवतात? 
आता थोडे विश्लेषण. मन्नादांचा आवाज खुला आणि मर्दानी आहे. त्यांचा पल्ला चांगला आहे व त्यात सर्वत्र खुलेपणा आहे आणि आवाजात ताकद राखणे जमते. त्यांचा आवाज थोडा हलका आहे, त्यामुळे सर्व प्रकारच्या ताना ते लीलया घेऊ शकतात. भारतीय शास्त्रीय संगीतात स्वच्छ "आ"काराने गायन करण्यावर भर असतो. आणि हे देखील मन्नादा व्यवस्थित करू शकतात. (अनेकदा व्यावसायिक म्हणवणाऱ्या शास्त्रोक्त गायकांना देखील जमत नाही, याचे भान ठेवावे)!! आकाराने शक्य होणारा विशेष गुण सहकंपन वा गुंजन हा परिणामतः त्यांच्या गायनात ओतप्रोत भरलेला आहे. बहुदा याचा कारणाने, त्यांच्यावर वर उल्लेखलेले लेबल चिकटवण्यात आले असावे. अन्यथा दुसरे कुठलेच कारण संभवत नाही. 
या व्यतिरिक्त मन्नादांचा एक विशेष असा की त्या त्या संगीतप्रकारानुसार जी एक ढोबळ भावस्थिती परंपरेत निश्चित झालेली असते ती सुचवणारा लगाव ते देऊ शकतात. चित्रपटगीतांस सांगीत बढत प्रदान करण्याची जरुरी नसते तर एक संबंधित भावस्थिती निर्माण करून बाकीची अनेक कार्ये साध्य करायची असतात. म्हणूनच सुरेलपणा, भरीवपणा आणि यथायोग्य उच्चार हे मुद्दे अत्यावश्यक ठरतात. मन्नादांमधील गायक या सगळ्या भूमिका सहज वठवू शकतात. आपल्या अष्टपैलूत्वाचा चित्रपटीय अवतार मन्नादा घडवू शकतात. 
सर्वात महत्वाचा भंबाग म्हणजे अशा भूमिका करताना मन्नादा कधीही "नाटकी" बनत नाहीत. भावनिक संतुलन करून, चित्रपट संगीत अधिक परिणाम करू शकते आणि हेच भावनिक संतुलित गायन त्यांना शास्त्रोक्त ढंग राखण्यात सहाय्य करते. 
इतरांपेक्षा मन्नादा वेगळे होतात, ते याच पार्श्वभूमीवर. 

Thursday 17 October 2019

नूरजहाँ

नूरजहाँच्या कारकिर्दीवर लिहायला सुरवात करायच्या आधी एक सनातन प्रश्न आजतागायत चघळला जातो, त्याचा उल्लेख करतो. १९४७ नंतर ही गायिका/अभिनेत्री पाकिस्तानमध्ये कायमची गेली आणि त्याच सुमारास नव्याने उदयाला येणाऱ्या लताबाईंच्या समोरील महत्वाचा प्रतिस्पर्धी बाजूला पडला!! प्रश्न आजही विचारात घेतला जातो, समजा नूरजहाँ भारतातच राहिली असती तर लताबाईंच्या सार्वभौमत्वाला आव्हान मिळाले असते का? माझ्यापुरते उत्तर, मी नंतर जरा सविस्तरपणे लिहीत आहे. एक बाब नक्की मानायलाच लागेल, नूरजहाँच्या अल्पकालीन भारतीय कारकिर्दीत, तिने गायिका/अभिनेत्री म्हणजे काय याचा आदिनमुना सिद्ध केला. तसे पाहता चित्रपटात कसे गावे याचाच आदर्श तिने समोर ठेवला. ती जेंव्हा गायन क्षेत्रात आली तेंव्हा इथे अमीरबाई कर्नाटकी, जोहराबाई, किंवा खुर्शीद चांगल्यापैकी स्थिरावल्या होत्या परंतु नूरजहाँला या स्त्री गायिकांना बाजूला सारणे  अजिबात अवघड गेले नाही. एक (प्रतीकात्मक आशयाची) कथा अशी मांडता येईल, पार्श्वगायनाच्या युगात सम्राज्ञी म्हणून आणि पर्यायाने गायिका/नायिकांना पदभ्रष्ट करणाऱ्या लताबाईंनी सुरवातीला आपल्या श्रवणकसोटीत पहिले गीत गायले ते नूरजहाँचे!! 
फाळणीनंतर नूरजहाँने पाकिस्तानमध्ये प्रयाण केले.  आधीच्या युगातील कलाकारांचे मूल्यमापन संबंधित विशिष्ट उदाहरणांच्या आधारानेच करावे लागते. त्यात या गायिकेने आदिनमुना सिद्ध केल्याने हा मार्ग अधिकच संय्युक्तिक ठरतो. एक उदाहरण बघूया. "बदनाम मुहोब्बत कौन करें" ( दोस्त - सज्जाद हुसेन ) ही रचना विचारार्थ घेऊ. रचना जेमतेम ३ मिनिटांपुरती (कदाचित आणखी छोटी देखील) आहे. इतक्या छोट्या कालावधीत, ही गायिका "रागेश्री/बागेश्री" रा गाची छाया निर्माण करते - रागाचा किंचितही विस्तार न करता. आणखी वैशिष्ट्य म्हणजे शब्दांती योजलेले द्रुतगती तसेच अनपेक्षित येणारे सांगीत वाक्यांशही सफाईने घेते. एकूणच गतिमान सादरीकरणात शब्दांचे, स्पष्टच नव्हे तर भावपूर्ण उच्चारण देखील तिला जमले. चालीचा स्वरपल्ला तसा मर्यादित असून सुद्धा नूरजहाँ सांगीत उत्कर्षबिंदू निर्माण करू शकते. परिणामतः: एक सुसंगत भावस्थिती तयार होते आणिआपल्यापर्यंत पोहोचते. 
आणखी एक उदाहरण घेऊ. "आ इंतजार तेरा" ( बडी माँ - के. दत्ता) हे गीत आपल्या डौलाने दादरा तालात तालात आहे. या गीतांत प्रत्येक अक्षरामागे एक स्वर आहे आणि भरीस भर म्हणून नक्की ( नाकातून) फेक आहे. ( ही या गायिकेची खासियत म्हणायला हवी) वेगळ्या अर्थाने त्या  मांडायचे झाल्यास, एकंदरीत तिच्या आवाजात सांगीत पारदर्शकता आढळते. 
या शिवाय एखाद्या लोकगीतगायनात असते त्याप्रमाणे नूरजहाँ केंव्हा भाषणशैलीत शिरून सादरीकरण सुरु करते ते आपल्या ध्यानात देखील येत नाही. अशा लगावाने एक प्रकारची जवळीक निर्माण होत असते. उदाहरणच घ्यायचे झाल्यास, वर उल्लेखिलेले "बदनाम मोहोब्बत कौन करें" या गीतातील "बदनाम" शब्दाचे उच्चारण ऐका. हां हां म्हणता ती एका न-स्वरी क्षेत्रात जाऊन त्या शब्दाची अशी फेक करते की काहीही खटकत नाही. ( चांगल्या अर्थाने दुसरे उदाहरण देता येईल. फार वर्षांनंतर संगीतकार सी. रामचंद्र यांनी "घरकुल" चित्रपटात "मल्मली तारुण्य माझे" ही गीत ऐकावे. "मल्मली" शब्दोच्चार याच धर्तीवर केलेला आढळतो. अर्थात ही माहिती खुद्द संगीतकाराने, मला एका भेटीत सांगितली होती) या शब्दास किंचित सुटे केल्याने त्याचे जणू काही सांगीत अधोरेखन तयार होते. 
नूरजहाँचा आवाज तसा ढाला म्हणता येणार नाही तरी खालच्या स्वरांवर गेल्यावर ती सखोल लगावातून आवाजाशी तात्पुरते अविष्कारक्षम ढालेपण देऊ शकते. या सांदरबीभात एक बाब लक्षात घेतली पाहिजे, ती अशी की, गायनाचा उत्कर्षबिंदू म्हणजे तारस्वरांवर जाणे होय, असा समजच नव्हे पार प्रघातही असता, या गायिकेची अनेक परिणामकारक गीते अवरोही अथवा अधोमुखी सुरावटीत रमलेली असतात. "बदनाम मोहोब्बत कौन करें" ( दोस्त - सज्जाद हुसेन), "'तेरी याद आयी ( लाल हवेली - मीर साहेब ), "तुम हमको भुला बैठे हो" (बडी माँ - के. दत्ता) "आँधीयां गम की यूं चली" ( झीनत - हाफिज खान ) ही सगळी गीते अवरोही सुरावटींनी सिद्ध होतात. स्वरांच्या लगावातुन आणि आवाजाच्या वैशिष्ट्यांतून नूरजहाँ इष्ट ते अचूक भावविश्व उभे करते.  
लय आणि लयबंध हे या गायिकेचे दुसरे अविष्कारी अंग. गानगती आणि भारतीय संगीताचे खास वैशिष्ट्य म्हणजे ताल, त्याचा यांत समावेश होतो. एकूणच व्यापक नजरेतून हिंदी चित्रपट संगीतालाआकळले तर एक बाब स्पष्ट ध्यानात येते, कालस्तरावरील लयीला फार कमी आव्हाने दिली आहेत. याचे प्रमुख कारण, सर्वांना - अगदी संगीत न जाणणाऱ्यांना - पेलणारे संगीत समोर ठेवणे हे या संगीताने प्रथम कर्तव्य मानले. म्हणूनच या संगीतात "केहरवा","दादरा सारखे सोपे ताल किंवा "दीपचंदी", "तीनताल" सारखे मोठे ताल मुख्यतः योजले गेले आहेत. परिणामतः रचनाकार आपल्या लयीच्या संदर्भातील कामगिरी आणि कारागिरी तसेच लयीच्या संबंधित भावभावनांचे बारकावे व्यक्त करण्यासाठी वेगवेगळे ठेके वापरून आपले कौशल्य श्रोत्यांच्या नजरेस आणतात. त्याचप्रमाणे ठेक्याने विणलेल्या लयबंधाच्या रेषा आणि गीताच्या छंदातून प्रतीत होणाऱ्या लयरेषा यांच्या खेळातून ते अभिव्यक्ती साधतात. या संदर्भातील एक उदाहरण बघायचे झाल्यास, "उड जा रे पंछी" ( खानदान - गुलाम हैदर ) या गीतामध्ये उठावदारपणे सिद्ध केले आहे. लयबंध आणि सुरावटी यांतून प्रस्तुत गीत पक्ष्याच्या भरारीचे वर्णन करीत आहे. गीताच्या चलनातील गुंतागुंत प्रतीत व्हावी म्हणून चलनात मध्ये मध्ये विराम पेरले गेलेत. इथेच नूरजहाँने आपले काम सफाईने निभावले आहे पण गायक सुरेंद्र मात्र चाचपडला आहे. तिच्या गायनात दोन अंगे स्पष्ट दिसतात. एक अंग, संगीतकार नौशाद यांनी तिच्यासाठी द्रुत लयीच्या वापराने दर्शविले तर दुसरे अंग, के.दत्ता, गुलाम हैदर, सज्जाद हुसेन, शामसुंदर इत्यादी संगीतकारांनी दर्शविले आहे. मजेचा आणि लक्षणीय भाग असा, नूरजहाँला गाताना कुठेही कसलीच अडचण झाली नाही. 
आणखी एक वैशिष्ट्य जाणवते आणि ते म्हणजे गायनात "ह" या व्यंजनाचे समावेश असलेले सगळे शब्द खास परिणामकारकतेने उच्चारले जातात. मुळात अशा व्यंजनांच्या उच्चारासाठी वजनदार श्वास गरजेचा असतो. काही गाणी या संदर्भासाठी बघू - "तू कौनसी बदली में मेरे चाँद ( खानदान - गुलाम हैदर ), "बैठी हूं करके याद ( व्हिलेज गर्ल - शामसुंदर ) किंवा "दिया जलाकर आप बुझाये (बडी माँ - के. दत्ता) ही गाणी उद्मेखूनपणे ऐकावीत. 
एका बाबीची नोंद करायला हवी - नूरजहाँच्या आवाजातील आवाहकता आणि त्याचा परिणाम आपल्या ध्यानात येऊ शकतात कारण तिच्या काळात संगीत देणाऱ्यांनी वाद्ये आणि वाद्यवृंद यांचा वापर आणि त्यांची भूमिका यावर सुजाण मर्यादा घातली होती. त्यांचे काम हे प्राय: दोन कडव्यांमधील जागेपुरते ठेवले होते. जेंव्हा नूरजहाँ गात असे तेंव्हा ही सगळी वाद्ये जवळजवळ शांत किंवा दबलेल्या आवाजात अस्तित्व दाखवत असत. जसजसा लोटला तशी सुरावटीचे म्हणजे एकामागोमाग, सुटेपणाने येणाऱ्या स्वरांचे केंद्रीय स्थान कमी होत  गेले. प्रमुख आवाज आणि वाद्ये, दोहोंचे समान महत्व राहायला लागले. नूरजहाँ आणि त्यावेळचे गायक कलाकार कदाचित या परिस्थिती चमकले नसते. सुरवातीला मी लताबाईंच्या समोर नूरजहाँ टिकली नसती, या विधानामागे आटा केलेले विधान देखील विचारात घ्यावे लागेल. अर्थात लताबाई त्यावेळी तरुण होत्या आणि त्यामुळे त्या शर्यतीत नूरजहाँ कितपत टिकली असती? हा प्रश्न होताच तसेच नूरजहाँ फक्त स्वतःपुरतीच गायन करायची तर लताबाईंनी पार्श्वगायनात मन्वंतर घडवून आणले, तिथे नूरजहाँ नक्कीच तोकडी पडली असती. नूरजहाँ पाकिस्तानात गेली आणि आपली इज्जत राखली, असेच म्हणावे लागेल.  
आणखी एक गंमत मांडावीशी वाटते. सैगल आणि नूरजहाँ जवळपास एकाच काळातील गायक कलाकार परंतु एकही चित्रपटात एकत्र आले नाही. असे असू शकेल, सैगल हे प्रामुख्या बंगाली संगीतकारांकडे गायले ( रायचंद बोराल,पंकज मलिक, के.सी.डे) तर नूरजहाँ ही प्रामुख्याने मुस्लिम संगीतकारांकडे (सज्जाद हुसेन,  गुलाम हैदर, फिरोझ निझामी) परंतु मनातल्या तुलना केली असता, दोन संपूर्ण वेगळ्या शैलीची गायकी एकत्रित कितपत पचनी पडली असती? शंका आहे. 

पुढे तिने पाकिस्तानात अनेक उर्दू चित्रपटात गायन केले, चित्रपट बाह्य गीते देखील गायली. उद्मेखूणपणे लिहायचे झाल्यास, "मुझसे पहिली से मुहोब्बत मेरे महेबूब ना मांग" ही फैझ-अहमद-फैझ यांची शब्दरचना गाताना, पूर्वीच्या गायकीचा फारच थोडा अंश ऐकायला मिळतो. गायनावर पठाणी-पंजाबी ढंग स्पष्ट दिसतो. असे असले तरी सैगलच्या जोडीने पार्श्वगायनात अनेक नवीन पायंडे पाडणारी अलौकिक गायक कलाकार म्हणून नूरजहाँचे नाव कायमच घ्यावे लागणार.  

Tuesday 15 October 2019

राजस यमन

चालायला सुरवात करताना, साथीला ३ ४ झाडांची साथ असताना, हळूहळू, नजरेसमोर हिरव्या गर्द वृक्षांची दाटी होऊन, त्यातच आपले मन गुंतून जावे त्याप्रमाणे यमन रागाचे काहीसे वर्णन करता येईल. तसे बघितले तर, सगळ्याच रागांच्या बाबतीत कमी अधिक प्रमाणात असलाच अनुभव येतो म्हणा. यमन राग हा बहुदा एकमेव राग असावा, ज्या रागाची सुरवात "सा" स्वराने न होता, "नि" स्वराने होते म्हणजे "नि" स्वर,या रागाचा "सा"!! आपल्या रागसंगीतात "सा" स्वराला अपरिमित महत्व आहे. 
या दृष्टीने "नि" स्वराचे इथले महत्व समजून घेता येईल. यमन राग हा खरोखरच अफाट आहे, असे मी म्हटले म्हणजे किती? अजूनपर्यंत थांग लागलेला नाही. दरवर्षी या रागावर आधारित नवनवीन गाणी तयार होतात आणि या रागाचे नवीन रूप आपल्या कानावर येते. मला तर असेच वाटते, निदान भारतात तरी, अजूनपर्यंत एकही संगीतकार झाला नसेल, त्याने आयुष्यात कधी ना कधीतरी या रागावर आधारित गाणे बनविले नाही!! एकतर या रागात सगळे स्वर लागतात आणि "म" स्वराचा अपवाद करता, सगळे स्वर शुद्ध स्वरूपात लागतात. त्यामुळे या रागाचा विस्तार, कलाकार करेल तितका थोडा, अशी परिस्थिती आहे.  आत्तापर्यंत इतकी अगणित गाणी तयार झाली आहेत की, केवळ यमन रागातील गाणी, या विषयावर एखादे छोटेखानी पुस्तक तयार होईल!! 

शास्त्रानुरूप, या रागाचा समय जरी संध्याकाळचा असला तरी या स्वरांची गोडी आणि विविधता इतकी आहे की, दिवस/रात्री कधीही हा राग सादर झाला तरी काहीही फरक पडत नाही.याच्या स्वरांची मोहिनी विलक्षण आहे. अगदी, ज्यांना स्वरज्ञान नसते (ते बहुतेकांना  नसते म्हणा) त्यांना देखील हा राग सर्वसाधारणपणे आवडून जातो."ग" आणि "नि"  या रागाचे प्रमुख स्वर. असे असले तरी बरेच कलाकार, तीव्र "म" स्वरावर अधिक भर देतात. अर्थात, प्रत्येक रागात अशी वैशिष्ट्ये असतात. रागातील स्वरस्थाने ही, सुंदर रुपवतीच्या चेहऱ्यासारखी असतात!! चेहऱ्यावरील "नाक", "कान","डोळे","ओठ" यांमुळे त्या चेहऱ्याला सौंदर्य प्राप्त होते पण तरीदेखील, प्रत्येक अवयव "सुटा' बघितला तर ते सौंदर्य जाणवेलच असे नाही. 
"त्या दाट लांब केसांचा, वाऱ्यावर उडतो साज;
दु:खात अंबरे झुलती, की अंग झाकते लाज…. 
तरि हळू हळू येते ही, संध्येची चाहूल देवा;
लांबली उदासीन क्षितिजे, पाण्यांत थांबल्या नावा….
कविवर्य ग्रेस यांच्या "उर्मिला" या कवितेतील या ओळी. एकाच वेळी शृंगाराची चाहूल तर दुसऱ्या वेळी "उदासीन क्षितिजे" या शब्दांतून आर्त जाणीव. यमन रागाच्या ज्या अनंत छटा आहेत, त्यातली ही काही शब्दरूपे.  
"इटवाह" घराण्यातील सुप्रसिद्ध सतारीये उस्ताद शाहिद परवेझ यांनी वाजवलेला यमन राग केवळ अपूर्व असा आहे. देशी, परदेशी असंख्य दौरे करून, आपल्या वादनाची प्रचीती त्यांनी दिली आहे. थोडे खोलवर निरीक्षण केले तर उस्ताद विलायत खान आणि पंडित रविशंकर, या दोन्ही वादन पद्धतीचा संकर यांच्या वादनात ऐकायला मिळतो तरीही उस्ताद विलायत खान साहेबांची पद्धत अंगीकारलेली आढळते, विशेषत: वादनात जेंव्हा "गायकी" अंग मिसळले जाते तेंव्हा तर प्रभाव उठून दिसतो. असे असले तरी वादनाचा आविष्कार स्वतंत्र आहे. 


वादन ऐकताना, सुरवातीची आलापी ऐकताना "गायकी अंग" ऐकायला मिळते. इथेच "नि रे ग म" ही सुरावट ऐकायला मिळते. पुढे ठाय लयीत गत सुरु होते आणि सगळा यमन राग आपल्या समोर उभा राहतो. तारेवर ठेवलेला "दाब" आणि त्यातून निर्माण केलेली "खेंच", हे वादनाचे विलोभनीय रूप आहे. 
हिंदी चित्रपटात असंख्य प्रणयगीते बांधली गेली आहेत. त्यातील खास संदर्भ घ्यायचा झाला तर '"हम दोनो" चित्रपटातील "अभी ना जाओ छोडकर" हे युगुलगीत यमन रागाची चेष्टेखोर प्रणयाची छटा दाखवणारे गाणे आहे. "अभी ना जाओ छोडकर"  ही ओळ जेंव्हा रफीच्या गळ्यातून निघते, त्या लडिवाळ सुरांतच यमन राग दडलेला आहे. अर्थात गाण्यात पुढे दोन्ही "मध्यम" ऐकायला मिळतात, तिथे चाल यमन रागापासून वेगळी होते पण हे "स्वातंत्र्य" प्रत्येक रचनाकार घेतच असतो. अखेर गाण्यात शब्दातील भावना महत्वाची. 

 
"अभी ना जाओ छोडकर, के दिल अभी भरा नही. 
अभी अभी तो आयी हो, बहार बन छाई हो;
हवा जरा महक तो ले, नजर जर बहक तो ले;
ये शाम ढल तो ले जरा, ये दिल संभल तो ले जरा;
मैं थोडी देर जी तो लू, नशे के घूंट पी तो लू;
अभी तो कुछ कहा नहीं, अभी तो कुछ सुना तो नहीं".    
साहिरने गाणे लिहिले देखील प्रणयाच्या मस्तीत!! अगदी अबोध, किंवा ज्याला Platonic म्हणतात, अशा पातळीवरील जरी प्रणय नसला तरी प्रेमातील संयत गोडवा आणि चालीतील अवगुंठीत सुश्राव्यता, या गुणांमुळे हे गाणे लोकप्रिय झाले. गाण्यातील हरकती देखील, शब्दांतील भाव कुठेही दुखावला जाणार नाही, या बेतानेच घेतलेल्या आहेत."नशे के घूंट पी तो लू" ही ओळ म्हणताना, रफी किंचित "नाटकी" वाटतो पण ते देखील गाण्याच्या प्रकृतीत व्यवस्थित सामावले जाते. संध्याकाळची रमणीय वेळ, गाणे ऐकताना मात्र सुगंधित होऊन जाते.   
केवळ हिंदीच नव्हे तर एकूणच भारतीय चित्रपटात, ज्या गाण्यांना खऱ्याअर्थी "पवित्र" असे म्हणता येईल अशी असामान्य रचना, "ममता" चित्रपटात, "छुपा लो युं दिल मे प्यार मेरा" या हन्यातून अनुभवायला मिळते. निखळ यमन राग!! मुळात संगीतकार रोशन यांच्या चाली या नेहमीच शांत स्वभावाच्या असतात, अगदी प्रणयी भाव व्यक्त करायचा झाला तरी त्यात, संगीतकाराची "संस्कृती" दिसून येते. इथे तर, विरहाची आस आणि तडफड आहे. यमन रागात किती असंख्य भावभावना मांडता येतात, यासाठीचे हे मनोरम उदाहरण. 


"छुपा लो युं दिल मे प्यार मेरा
के जैसे मंदिर में लौ दिए की,
तुम अपने चरणो में रख लो मुझको 
तुम्हारे चरणो का फुल हुं मैं,
मैं सर झूकाए खडी हुं प्रीतम 
के जैसे मंदिर में लौ दिए की". 
शायर मजरुह यांची कविता देखील तितकीच असामान्य आहे. प्रेमाला मंदिरातील ज्योतीची उपमा देणे आणि त्या भावनेला पार उंची गाठून देणे, केवळ सक्षम शायर(च) करू शकतो. कवितेतील प्रत्येक ओळ ही इतकी अपरिहार्य आहे की तिथे दुसरा कुठलाच शब्द आपल्या अभिप्रेत करता येत नाही. गाणे हळूहळू टिपेच्या स्वरांना साद घालते आणि त्या उच्च स्वरांनी गाण्यातील आशय आपल्या मनात कायमचा उतरतो. उत्तम भावकविता कशी असू शकते, याचे सुंदर उदाहरण. सगळे गाणे यमन राग व्यापून उरला आहे पण तरीही अखेर रागाच्या बाराखडी पलीकडे आपल्याला नेउन ठेवणारे हे गाणे आहे. किंबहुना रागाची आकृती अधिक जिवंत आणि विस्तारित करणारी ही कलाकृती आहे. 
मिर्झा गालिब यांची एक अतिशय प्रसिद्ध गझल,"हर एक बात पे कहेतो हो तुम की तू क्या है" लताबाईंच्या आवाजात ऐकणे, हा अनुभव केवळ अवर्णनीय आहे. संगीतकार फैय्याज शौकत यांनी यांनी या रचनेची तर्ज बांधली आहे. गाण्यातील पहिलाच आलाप इतका अवघड आहे की तो आलाप घेणे, हीच एक परीक्षा ठरते. खरतर शायरी म्हणून गालिब यांच्या काही रचना फार अवघड आहेत. एकतर तुम्हाला उर्दू भाषेचा गाढा अभ्यास लागतो अन्यथा शायरीचा गंध समजून घेणे अशक्य. याचा रचनेत एक "मतला" आहे. 
"रही ना ताकत-ए-गुफ्तार और अगर हो भी,
तो किस उम्मीद पे कहिये के आरजू क्या है" . 
आता या ओळींतील, " ताकत-ए-गुफ्तार" याचा जर अर्थ(च) कळला नाही तर मग कवितेची मजा घेता येणे कठीण. "संवाद किंवा बोलण्याची ताकद" हे एकदा समजून घेतले म्हणजे सगळ्या शेराचा अर्थ ध्यानात येतो आणि गालिब किती "श्रीमंत" आहे, याची कल्पना येते.  


"हर एक बात पे कहेतो हो तुम की तू क्या है,
तूम्ही कहो के ये अंदाज-ऐ-गुफ्तगू क्या है". 
यमन रागात भरपूर गझला सापडतात. या रागाची खासियत अशी आहे, इथल्या प्रत्येक हरकतीला, विस्ताराची जोड देता येते आणि मग तो विस्तार, आपापल्या मगदुराप्रमाणे विस्तारता येतो. एकतर रागात सगळे सूर लागतात आणि प्रत्येक सुराची स्वत:ची अशी "किंमत" आहे. त्यामुळे या रचनेसारखी रचना घेतली तर समेवर उतरताना, आधीच्या कुठल्यातरी रचनेशी साम्य सापडेलच याची खात्री देत येत नाही. परिणाम, रागाची व्याप्ती अपरिमित होते. 
आताच वरती आपण, एका गझलेचा आस्वाद घेतला तर आता, असेच अप्रतिम गोडवा लाभलेले भजन बघुया. ""किनु संग खेलू होली" - मीराबाईचे भजन. काव्य वाचले तर लगेच राजस्थानी मातीचा गंध अनुभवायला मिळतो. गाण्याची चाल, संगीतकार हृदयनाथ मंगेशकर यांनी दिली आहे. खरेतर मंगेशकरांची चाल म्हटल्यावर, काही ठराविक वळणाच्या हरकती ऐकायला मिळणे क्रमप्राप्त(च) ठरते परंतु त्याबाबतीत ही रचना फार वेगळी आहे. शब्दातील आर्त भाव तसेच काहीशी रुखरुख, चालीत सुंदररीत्या उतरली आहे.

 
"किनु संग खेलू होली
पिया तज गये हैं अकेली"
रचनेच्या सुरवातीलाच सतारीचे टोकदार सूर ऐकायला येतात आणि त्या ध्वनिसोबत आपल्या कानात यमन राग रुंजी घालायला लागतो. काव्यात रुखरुख स्पष्ट वाचता येते पण ती देखील किती मार्दवतेने चालीत मांडली आहे. गायनात कुठेही शब्द ओढलेला नाही की शब्द्फोड केलेली नाही. चाल सलगपणे आपला मार्ग आक्रमित असते आणि आपल्या मनावर गारुड घालीत असते. लताबाईंची गायकी कसली अप्रतिमपणे खुलून आली आहे. भजनात एकाबाजूने आळवणी असते तर दुसऱ्या बाजूने मागणे असते. या दोन्ही मागण्या इथे केवळ काव्यातून(च) नव्हे तर संगीतातून व्यक्त होतात. 
१९७५ च्या सुमारास आलेल्या "आंधी" या चित्रपटात - "इस मोड से जाते है" हे गाणे यमन रागाची अनोखी ओळख करून देते. वास्तविक प्रणयी थाटाचे गाणे पण गाण्याची चाल सरळ, सोपी तो राहुल देव बर्मन कसला!! खरतर ही गुलजार यांची असमान्य भावकविता आहे. केवळ कविता म्हणून स्वतंत्र आस्वाद घेणे तितकेच आनंददायी आहे. गुलजार यांच्या बहुतेक कवितेंत, नेहमीचे शब्द नेहमी वेगळच आशय दर्शवतात आणि वाचताना वाचकाला चकित करून टाकतात. प्रसंगी उर्दू शब्दांची देखील पखरण केली जाते. शब्दांशी खेळण्याचे, या कवीचे कसब वाखाणण्यासारखे आहे. 


"इस मोड से जाते है
कुछ सुस्त कदम रस्ते, कुछ तेज कदम राहें;
पत्थर की हवेली को, शीशे के घरोन्दो में,
तिनके के नशेमन तक, इस मोड पे जाते है". 
या गाण्याची सुरवात देखील दीर्घ आलापीने होते. वरती आपण, "हर एक बात पे" मधील आलाप ऐकल्यास आणि आता या गाण्यातील आलाप ऐकल्यास, त्यात सत्कृत्दर्शनी काहीही साम्य ऐकायला मिळत नाही पण, जशी रचना पुढे सरकते, तशी लगेच दोन्ही गाण्यातील आलापीत साम्य आढळून येते. हे कसब संगीतकाराचे. गाण्याचा मुखडा "दिलखेचक" असेल तर त्या गाण्याची पुढील बांधणी मनोरम होण्यास मदत होते. अर्थात, अशा अफलातून रचनेत देखील संगीतकाराने, आपल्या हातखंडा तालाचा प्रयोग केला आहे. इथे "मोड" शब्दावर जी हरकत घेतली आहे, ती जितकी लताबाईंची तितकीच या संगीतकाराची, असे सहज म्हणता येईल. मात्रा मोजून बघितल्या तर केरवा ताल आपल्याला मिळतो पण त्याचे सादरीकरण ऐकले आणि त्याचा मागोवा घेतला तर संगीतकाराचे कौशल्य अनुभवायला मिळते. 
काही वर्षांपूर्वी आलेल्या "रेफ्युजी" सिनेमात - "मेरे हमसफर, मेरे हमसफर;मेरे पास आ,  मेरे पास आ" हे गाणे ऐकायला मिळाले आणि परत एकदा या यमन रागाच्या दर्शनाने नव्याने दिड:मूढ व्हायला झाले. संगीतकार अन्नू मलिक यांची चाल असून, शायरी जावेद अख्तर यांची आहे. गायन प्रामुख्याने अलका याज्ञिक यांचे असून गाण्याच्या शेवटी सोनू निगमचा स्वर ऐकायला मिळतो. गाण्यात, एरव्ही फारसा ऐकायला मिळत नसलेला "रूपक" ताल ऐकायला मिळतो. गाणे अतिशय सुश्राव्य आहे आणि मनाची लगेच पकड घेणारे आहे. 


"मेरे हमसफर, मेरे हमसफर,
मेरे पास आ,  मेरे पास आ,
हमे साथ चलना है उम्रभर,
मेरे पास आ,  मेरे पास आ". 
गाण्याची चाल जरी यमन रागावर असली त्याला राजस्थानी लोकसंगीताची फोडणी आहे. गाण्यातला रूपक ताल तर केवळ खास असा आहे. 
अर्थात यमन रागावर मी इथे काही गाण्यांची ओळख करून दिली परंतु केवळ हिंदी गाण्यांचाच विचार केला तरी एक पुस्तक तयार करता येईल, इतका प्रचंड पसरलेला आहे. कधी कधी वाटते, या यमन रागाला कुठे "अंत" आहे का? अजूनतरी या रागाचा "किनारा" दृष्टीक्षेपात नाही आणि म्हणूनच राग आपल्याला सतत चकवा देत असतो, आपल्या आजूबाजूला आनंदाची पखरण करीत!!  

Monday 14 October 2019

मोहक गारा



"अनोळख्याने ओळख कैशी 
गतजन्मींची द्यावी सांग;
कोमल ओल्या आठवणींची 
एथल्याच जर बुजली रांग!!"

कविवर्य मर्ढेकरांच्या या ओळी म्हणजे "गारा" रागाची ओळख आहे असे वाटते. खरे म्हणजे मर्ढेकरांची ओळख म्हणजे "सामाजिक बांधलकी" जपणारे आणि मराठी कवितेत मन्वंतर घडवणारे कवी. परंतु असे "लेबल" किती एकांगी आहे, याची यथार्थ जाणीव करून देणारी ही कविता!! 
वास्तविक हा राग तसा फारसा मैफिलीत गायला जात नाही पण वादकांनी मात्र या रागावर अपरिमित प्रेम केले आहे तसेच उपशास्त्रीय आणि सुगम संगीतात तर, या रागाला मानाचे स्थान आहे. सुरवातीला थोडे अनोळखी वाटणारे सूर, एकदम हळव्या आठवणींची सोबत घेऊन येतात. या रागाच्या समयाबद्दल मात्र दोन संपूर्ण वेगळे विचार आढळतात. काहींच्या मते, या रागाचा समय उत्तर सकाळची वेळ आहे तर काहींच्या मते, उत्तर संध्याकाळ योग्य असल्याचे, ऐकायला/वाचायला मिळते. "षाडव/औडव" जातीचा हा राग, आरोही सप्तकांत "रिषभ" स्वराला अजिबात जागा देत नाही  तर अवरोही सप्तकांत मात्र सगळे सूर लागतात. या रागाची आणखी नेमकी करून घ्यायची झाल्यास, "गंधार" आणि "निषाद" स्वर हे "कोमल' आणि "शुद्ध" लागतात तर बाकीचे स्वर शुद्ध लागतात. काफी थाटातला हा राग, सादर करताना, "खमाज" रागाच्या अंगाने सादर केला जातो. याचा अर्थ इतकाच, या रागावर "खमाज" रागाची किंचित छाया आहे. जरा बारकाईने ऐकले म्हणजे हा फरक लगेच कळून घेता येतो. या रागाचे वादी/संवादी स्वर आहेत - गंधार आणि निषाद. अर्थात एकूण स्वरसंहती बघितल्यास, या दोन स्वरांचे प्राबल्य जाणून घेता येते. या रागातील प्रमुख स्वरसंहतीकडे लक्ष दिल्यास, खालील स्वरसमूह वारंवार ऐकायला मिळतात. "सा ग म प ग म ग","रे ग रे सा","नि रे सा नि ध". 

सतार वादनात दोन "ढंग" नेहमी आढळतात. एक "तंतकारी" वादन तर दुसरे "गायकी" अंगाचे वादन. अर्थात, कुठल्याही प्रकारे राग सादर केला तरी त्यातून आनंद निर्मिती त्याच अननुभूत आनंदाने प्रतीत होते.फरक पडतो तो, स्वर आणि त्यातून निर्माण होणाऱ्या सांगीतिक अलंकाराचे दर्शन यामध्ये. दोन्ही प्रकारच्या धाटणी भिन्न आहेत परंतु व्यापक सांगीतिक अवकाश निर्माण करण्यात कुठेही कमी पडत नाहीत. उस्ताद विलायत खान साहेब, यांनी, सतार वादनात गायकी अंग पेश केले आणि सतार वादनाच्या विस्ताराला नवीन परिमाण दिले. तसे बघितले तर सतार हे तंतुवाद्य आणि तंतुवाद्यातून, सलग "मिंड" काढणे आणि "गायकी" अंग पेश करणे ही निरातिशय कठीण बाब. तरीदेखील, वाद्याच्या तारेची "खेच" आणि त्यावर असलेला बोटांचा "दाब", यातून गायकी अंग उभे करायचे, ही बाब केवळ अभूतपूर्व म्हणायलाच लागेल.   


या रचनेत, याच गुणांचा आढळ झालेला आपल्याला ऐकायला मिळेल. मला नेहमीच असे वाटते, रागाची खरी मजा, जेंव्हा राग आलापीमध्ये सादर केला जातो तेंव्हाच. या रचनेतील आलापी खरच ऐकण्यासारखी आहे. तारेवरील खेच आणि त्यातून काढलेली मिंड, केवळ अप्रतिम आहे, असेच म्हणावे लागेल. पुढे द्रुत लयीत तर आणखी मजा आहे. लय द्रुत लयीत चालत आहे आणि एका विविक्षित क्षणी, इथे आलापी सुरु होते!! हे केवळ उस्ताद विलायत खान (च) करू शकतात!! 

संगीतकाराच्या हाती अप्रतिम शब्दकळा आली की तो संगीतकार, त्यातून किती असामान्य रचना निर्माण करू शकतो, याचे अप्रतिम उदाहरण म्हणजे, "हम दोनो" चित्रपटातील "कभी खुद पे कधी हालात पे" हे गाणे. साहिर हा, गाण्यात काव्य कसे मिसळावे, याबाबत खरोखरच आदर्श होता. आता, चित्रपट गीतांत "कविता" असावी की नसावी, हा वाद सनातन आहे पण जर का संगीतकाराची, शब्दांची समज तितकीच खोल असेल तर अगदी "गूढ" कवितेतून देखील "भावगीत" निर्माण होऊ शकते आणि अशी बरीच उदाहरणे देता येतील. या गाण्यातील रफीचे गायन देखील ऐकण्यासारखे आहे. शब्दातील भाव ओळखून, शब्दांवर किती जोर द्यायचा, ज्यायोगे शब्दातील दडलेला आशय अधिक "खोल" व्यक्त करता येतो. गाण्याची चाल तशी अजिबात सरळ, सोपी नाही. किंबहुना चालीत विस्ताराच्या भरपूर शक्यता असलेली गायकी ढंगाची चाल आहे. ताल देखील, चित्रपट गीतांत वारंवार वापरलेला "दादरा" आहे पण, जयदेवने तालाची रचना देखील अशा प्रकारे केली आहे की, या तालाच्या मात्रा सरळ, आपल्या समोर येत नाहीत तर आपल्याला मागोवा घ्यायला लागतो. बुद्धीनिष्ठ गाणे असते, ते असे.  


अतिशय चांगल्या अर्थाने, जयदेव हे चांगले "कारागीर" होते, असे म्हणता येईल. रागाचा निव्वळ आधार घ्यायचा पण रागाला लगेच दूर सारून, गाण्याच्या चालीचे स्वतंत्र अस्तित्व निर्माण करायचे, या कारागीरीत, जयदेव यांचे योगदान केवळ अतुलनीय असेच म्हणावे लागेल. असे करताना, गाण्यात, स्वत:चे काहीतरी असावे, या विचाराने, चालीत गुंतागुंतीच्या रचना अंतर्भूत करणे आणि तसे करत असताना, लयीला वेगवेगळ्या बंधांनी खेळवणे, हा या संगीतकाराचा खास आवडीचा खेळ!! याचा परिणाम असा होतो, शब्दातील भावनेचा उत्कर्ष आणि तिचे चांगले स्फटिकीभवन होते!! पण तसे होताना आपण सुरावटीची पुनरावृत्ती ऐकतो आहोत असे न वाटता एका भारून टाकणाऱ्या स्वरबंधाची पुन: प्रतीती येते. गाण्यातील वाद्यमेळ योजताना देखील अशाच विचाराचा प्रभाव जाणवतो. वाद्यमेळातील वाद्यांतून सुचकतेवर भर देणाऱ्या स्वनरंगांचे या संगीतकाराला आकर्षण होते. आणखी एक वैशिष्ट्य सांगायचे झाल्यास, आपली रचना निर्माण करताना, स्वररचना, कधीही शब्दांवर कुरघोडी करत आहेत, असे कुठेही वाटत नाही. इथे शब्द वावरतो तो भाषिक तसेच सांगीत ध्वनींचा समूह म्हणून. अर्थानुसार जरूर पडल्यास, तालाच्या आवर्तनास ओलांडूनही चरण वावरताना दिसतो!!  

गाण्याची चाल बांधताना, रागाचा उपयोग करायचा आणि तसा उपयोग करताना, चालीत शक्यतो रागाचे "शुद्धत्व" पाळायचे, असा संगीतकार नौशाद यांचा आग्रह होता की काय? असा समज मात्र, त्यांच्या बहुतांशी रचना ऐकताना होतो. आता, चाल बांधताना, राग आहे त्या स्वरुपात वापरायचा की त्यात स्वत:च्या विचारांची भर टाकून, रागाला बाजूला सारायचे? हा प्रश्न सनातन आहे आणि याचे उत्तर तसे सोपे नाही. अर्थात, बहुतेक रचनाकार, रागाचा आधार घेऊन, रचना तयार करतात असे आढळते पण, रागाचे शुद्धत्व राखले तर काय बिघडले? या प्रश्नाला तसे उत्तर मिळणे कठीण. चित्रपट "मुघल ए आझम" मधील "मोहे पनघट पे नंदलाल छेड गयो रे" हे गाणे "गारा" रागावर आधारित आहे आणि त्या दृष्टीने ऐकायला गेल्यास, "गारा" रागाचे लक्षणगीत म्हणून, हे गाणे संबोधता येईल. गाण्यात, दोन ताल वापरले आहेत, त्रिताल आणि दादरा आणि तालाच्या मात्रा इतक्या स्पष्ट आहेत की त्यासाठी वेगळे प्रयास करण्याची अजिबात गरज नाही. ऐकायला अतिशय श्रवणीय, सरळ, सोप्या वळणाचे नृत्यगीत आहे आणि चालीचे खंड पाडून, त्यानुरूप ताल योजलेले आहेत.    


इथे एक बारकावा नोंदणे जरुरीचे वाटते. चित्रपटांतील गाणे या क्रियेपेक्षा चित्रपटगीत हे जात्या व गुणवत्तेने निराळे असते आणि असावे, ही संकल्पना पक्केपणाने रुजविण्यात, नौशाद आपल्या कसोशीच्या प्रयत्नाने यशस्वी झाले. चित्रपटगीताच्या बांधणीची एक निश्चित पण काहीशी आधीच अंदाज करता येईल अशी कल्पना वा चौकट, त्यांनी चांगली रुजवली. थोडक्यात, गाण्याच्या सुरवातीचे सांगीत प्रास्ताविक, मुखडा, मधले संगीत, सुमारे तीन कडवी आणि कधीकधी ललकारीपूर्ण शेवट, अशी रचना केली म्हणजे चित्रपटगीत उभे राहते, असे जणू "सूत्र" नौशाद यांनी तयार केले, असे ठामपणे म्हणता येईल. हाच विचार पुढे आणायचा झाल्यास,  गाण्यात, "मुखडा","स्थायी","अंतरा" अशी विभागणी, त्यांच्या रागाधारित बहुतेक रचनांमधून ऐकायला/बघायला मिळते आणि त्या दृष्टीने प्राथमिक स्वरूपाचे आलाप म्हणजे रागविस्तार करणाऱ्या सुरावटी आढळतात. हे सगळे असेच घडते कारण, संगीतकाराचा, रागाचे शुद्धत्व कायम राखण्याचा पिंड!! 

आता आपण "गारा" रागावरील आणखी काही गाण्याच्या लिंक्स खालील प्रमाणे बहु आणि या रागाची ओळख आणखी स्पष्टपणे मनात रुजवून घेऊ. 

"ऐसे तो ना देखो" - तीन देवीया - एस. डी. बर्मन - रफी 

"जीवन मे पिया साथ रहे" - गुंज उठी शहनाई - वसंत देसाई - लता/रफी

उनके खयाल आये तो आते चले - लाल पत्थर - शंकर/जयकिशन - रफी 

समईच्या शुभ्र कळ्या

"घुसमटे खोल कळ किटेल्या शून्यांत,
फुटायचा आहे कोंभ आसूंच्या थेंबात. 
प्रसिद्ध कवी आरतीप्रभू यांच्या "जोगवा" कवितासंग्रहातील एका कवितेच्या या ओळी आहेत. आरतीप्रभूंना बरेचवेळा "भावगीतकार" असे लेबल लावले जाते. कशासाठी? केवळ त्यांच्या काही कविता संगीतबद्ध झाल्या म्हणून!! कलाकाराबाबत हा कुठला निकष जन्माला आला? आरतीप्रभू हे जातिवंत कवी(च) होते आणि त्यांना अशा लेबलांची काहीही गरज नव्हती. आज या ओळींनी मी लेखाची सुरवात केली कारण आजचे गाणे - समईच्या शुभ्र कळ्या, ही सर्वप्रथम अप्रतिम भावकविता आहे. हा कवी एकच भावना किती वेगवेगळ्या प्रकारे मांडू शकतो याची एक छोटीशी झलक म्हणून उद्धृत केल्या आहेत. ललित संगीतात भावकविता आणली तर कलाकृतीचा दर्जा किती उंचावला जातो, याचे हे गाणे एक समृद्ध उदाहरण आहे. ललित संगीतात "काव्य" आले म्हणून काही टीकाकार नेहमी तिरकस टीका करतात कारण गाण्यात कविता आली म्हणजे सुरांवरील लक्ष उडण्याची शक्यता वर्तवली जाते. दुसऱ्या बाजूने गाण्यातील शब्दकळा सपक असली की लगेच फडतूस कविता म्हणून हेच टीकाकार आपली लेखणी चालवतात. आता "सपक" आणि "उत्कृष्ट" याबाबत सावळा गोंधळ चालूच असतो. 
प्रस्तुत गाणे ही एक कविता म्हणून वाचायला गेल्यास, काही निरीक्षणे मांडावीशी वाटतात. नीट वाचले तर ही कविता म्हणजे सुंदर भावकविता आहे. मनाच्या संत्रस्थ अवस्थेचे चित्रण आहे. भावकवितेचे एक लक्षण म्हणून असे सांगता येईल, कवितेत मांडलेला विचार आणि त्याची अभिव्यक्ती, यासाठी कविताच असणे अपरिहार्य व्हावे. तिला दुसरे कुठलेही स्वरूप अशक्यच आहे, असाच प्रत्यय येतो. आरतीप्रभूंची कविता वाचताना, मनावर नेहमी परिणाम होतो तो अत्यंत अनुरूप अशा शब्दांचा, शब्दांच्या योजनेचा, अभिव्यक्तीत घडणीचा, बांधणीचा, कविता नेहमी शब्दांच्याच आधाराने वाढते, किंबहुना तेच कवितेचे अस्तित्व असते. चांगल्या अभिव्यक्तीचा एक गुण नेहमी सांगितला जातो - तिचं स्वतंत्र अस्तित्व भासू नये, त्याने आशयांत पूर्ण विलीन व्हावे. ही कविता वाचताना, याचा प्रत्येक ओळीत आपल्याला असा अनुभव येतो.
संगीतकार म्हणून हृदयनाथ मंगेशकरांनी ही कविता निवडली, इथेच त्यांची उच्च अभिरुची ध्यानात येते. "समईच्या शुभ्र कळ्या" हे  शब्दच इतके काव्यमय आहेत की कुणाही सुजाण कलाकाराला मोह व्हावा. फार मागे, याच संगीतकाराने या गाण्याच्या संदर्भात सांगताना, हेच शब्द मनाला भिडले आणि त्यांना चाल बांधावीशी वाटली, असे सांगितले होते. चाल म्हणून स्वतंत्र विचार करताना, कवितेतील आशय अधिक खोल व्यक्त व्हावा, अशीच दृष्टी ठेवल्याचे लक्षात येते. "रागेश्री" रागावर आधारित तर्ज आहे. मंगेशकरांच्या रचनांत, बहुतांशी रचनांत वाद्यमेळ अत्यंत त्रोटक असतो. जी थोडीफार वाद्ये असतात, ती मात्र आपले अस्तित्व स्पष्टपणे दाखवून देतात जसे या रचनेत बासरी. मुळात अवघड लय, त्यातून बासरी देखील तशीच अवघड लय पेलतात. या गाण्यात वाद्यमेळ हा फक्त बासरी आणि ताल वाद्य म्हणून तबला इतकाच आहे. याचाच वेगळा अर्थ गायनाला अपरिमित महत्व. हृदयनाथ मंगेशकरांच्या चाली या "गायकी" अंगाच्या असतात, याचे नेमके उत्तर या रचनेत आढळते. दुसऱ्या शब्दात मांडायचे झाल्यास मंगेशकरांच्या चाली या अतिशय "आवेगी" असतात, स्थिर चित्ताने ऐकणे घडत नाही, प्रसंगी अस्वस्थ करतात. कलाकृतीने अस्वस्थ करणे, हा कलाकृतीच्या दर्जाबाबत आवश्यक मुद्दा असू शकतो. खरतर मूळ कविता ७ कडव्यांची आहे पण ललित संगीताच्या आकृतिबंधात सगळी कविता सामावणे निव्वळ अशक्य. तेंव्हा कवितेतील कुठली कडवी  घ्यावी,याचा अंतिम निर्णय संगीतकाराचा.  अर्थात,हृदयनाथ मंगेशकरांनी जी कडवी संगीतबद्ध करायला घेतली आहेत, त्यातून त्यांची विचक्षण दृष्टी स्पष्टपणे दिसून येते. 
आशाबाईंचे गायन हे नेहमीच "अर्थपूर्ण" असते. गाताना, कुठलीही हरकत, छोटी तान ही स्वच्छपणे ऐकायला येते. ऐकताना तिथे कसलाही अटकाव नसतो. या रचनेतील पहिलीच ओळ - समईच्या शुभ्र कळ्या, उमलवून नव्हते; मुद्दामून ऐकण्यासारखी आहे. स्वर हळूहळू वरच्या सुरांत जातात पण तो स्वरांचा प्रवास, किती नजाकतीने आणि स्वच्छपणे केलेला आहे. समईची ज्योत ही नेहमीच शांत, अल्प प्रकाशी असते. तोच भाव गायनात ठेवलेला आहे पण ही शांतता व्याकुळ करणारी आहे. व्याकुळता देखील आनंददायी असू शकते, याचे नेमके भान ठेवले आहे. "हासशील हास मला,  मला हासूही सोसवेना; अश्रू झाला आहे खोल.चंद्र होणार का दुणा." या ओळी मुद्दामून ऐकाव्यात. मुळात, शब्दच इतके अर्थवाही आहेत की ऐकताना तिथेच आपण अडकतो. शब्दातून व्यक्त होणारी हताशता, स्वरांच्या साहाय्याने कशी मांडायची, याचे हे सुंदर उदाहरण आहे. 

समईच्या शुभ्र कळ्या, उमलवून नव्हते;
केसांतच फुललेली, जाई पायाशी पडते. 

भिवयांच्या फडफडी, दिठीच्याही मागेपुढे;
मागे मागे राहिलेले, माझे माहेर बापुडे. 

साचणाऱ्या आसवांना, पेंग येते चांदणीची;
आजकाल झाले आहे, विसराळू मुलखाची. 

थोडी फुलें माळू नये, डोळां पाणी लावू नये;
पदराच्या किनारीला, शिवू शिवू ऊन ग ये. 

हासशील हास मला,  मला हासूही सोसवेना; 
अश्रू झाला आहे खोल, चंद्र होणार का दुणा. 


Sunday 13 October 2019

कुंदनलाल सैगल

कुंदनलाल सैगल सैगल यांची कारकीर्द जेंव्हा बहरात होती, त्यावेळचा किस्सा. रवींद्रनाथ टागोर शक्यतो बंगाली भाषिक नसणाऱ्यांना रवींद्र संगीत गायला परवानगी देत नसत, अपवाद सैगल!! याचे मुख्य कारण, त्यांचे भावपूर्ण गायन, गीताला आणि संगीताला न्याय देऊ शकते, असा रवींद्रनाथांचा अभिप्राय होता. मी सुरवातीलाच हे उदाहरण दिले कारण या उदाहरणाने, सैगल यांचे महत्व नेमकेपणी अधोरेखित करता येते. आज सैगल जाऊन, जवळपास ७५ वर्षे झाली म्हणजे आजची पिढी ही कमीतकमी सातवी पिढी आहे. त्यानंतर चित्रपट संगीताने असंख्य वळणे घेतली, स्वररचना बदलल्या, गायन शैली बदलल्या, वाद्यमेळाने तर अभूतपूर्व बदल केले. असे असूनही, निव्वळ गायन या दृष्टीने आजही सैगल यांची आठवण येत असते, यावरून त्यांचे महत्व ध्यानात यावे. वास्तविक सैगल यांनी पद्धतशीरपणे शास्त्रोक्त संगीताची तालीम घेतली नव्हती पण त्यांनी रागदारी संगीताचा अत्यंत डोळस अभ्यास केला होता आणि त्यांच्या गायनातून याचा पुरावा मिळतो. त्यांच्या बाबत एक आठवण अशी सांगण्यात येते, उस्ताद इम्तियाझ अहमद (खांसाहेब अब्दुल करीम खान यांचे शिष्य) यांनी एके सकाळी मुरादाबाद स्टेशनपाशी एक युवक गाताना ऐकला. आदल्या दिवशीच "झिंझोटी" रागातील मान्यता पावलेली ठुमरी - पियाबीन नाही आवत चैन, केवळ बिनचूक नव्हे तर अतिशय तन्मयतेने गाताना ऐकले. त्यांनी या युवकाबद्दल चौकशी केली आणि या युवकाने रीतसर तालीम घेतलेली नाही ऐकून चकित झाले. आता असे वाटते, अशिक्षित प्रभुत्व आणि अनावर आवेग हीच सैगल यांच्या गायनाची महत्वाची खूण असावी. दुसरी घटना मुद्दामून उल्लेख करण्यासारखी आहे. "प्रयाग संगीत समिती"ने आयोजित केलेली सुप्रसिद्ध आणि दर्जेदार "ऑल इंडिया म्युझिक कॉन्फरन्स" चालू असताना, एका युवकाने तिथल्या सगळ्यांना मंत्रमुग्ध केले!! त्या युवकाचे नाव - कुंदनलाल सैगल. पुढे सैगल यांनी देशभर आपले नाव गाजवले आणि तीन वर्षांनंतर याच महोत्सवात सैगल, श्रोत्यांत बसले असताना आणि उस्ताद फैयाज खान, पंडित ओंकारनाथ ठाकूर, पंडित नारायणराव व्यास सारखे कलाकार हजर असताना, आयोजकांना सैगल यांचे गायन ठेवावे लागले!! याचे उल्लेख मी अशासाठी केले, रागदारी संगीताची तालीम न घेता, सैगल आपली छाप उमटवत असत. १९३१ मध्ये त्यांनी ३ उर्दू चित्रपटात भूमिका करून, आपली कारकिर्दीची त्यांनी पूर्वतयारी केली असे म्हणता येईल. गमतीचा भाग म्हणजे या चित्रपटात एकही गाणे नव्हते!! पुढे "न्यू थिएटर्स" मध्ये भरती झाले आणि १० वर्षे तिथे टिकले. इथेच त्यांना रायचंद बोराल, पंकज मलिक, के.सी.डे सारखे रचनाकार लाभले. गायक-अभिनेता म्हणून १९३३ आलेल्या "पूरण भक्त" या चित्रपटाने पदार्पण झाले. १९४१ साली सैगल मुंबईत आले आणि रणजित तसेच कारदार स्टुडिओसाठी काम करताना त्यांनी बोलपटात कामे केली. त्यामुळे त्यांची कीर्ती आणि प्रसिद्धी वाढत राहिली आणि याच सुमारास त्यांना "स्क्लेरोसिही" हा न बरा होणारा रोग देखील जडला. वास्तविक पाहता, त्यांच्या गाण्यांची संख्या विपुल अशी नव्हती परंतु गुणवत्तेने बाजी मारली. त्यांचे नाव निव्वळ चित्रपटसंगीता पुरते नव्हते, हा विशेष नोंदला पाहिजे. "परवाना" हा १९४८ साली आलेला शेवटचा चित्रपट जो मरणोत्तर पडद्यावर लागला आणि त्यावेळी त्यांचे वय होते फक्त ४२!! खरे पाहता, इतक्या छोट्या कारकिर्दीविषयी फार सखोल मूल्यमापन करणे अवघड असते (मास्टर दीनानाथ यांच्या विषयी असेच म्हणता येईल) तरीही हिंदी चित्रपट संगीतावर त्यांचा प्रभाव अतिशय दाट असा होता, हे निर्विवादपणे मान्यच करावे लागेल. यमन रागावर आधारित, संगीतकार रायचंद बोराल रचित "राधे रानी दे डारो ना बांसुरी मेरी" हे गीत अतिशय लोकप्रिय झाले. "चंडिदास", "देवदास" "प्रेसिडेंट" हे चित्रपट गाजले आणि सैगल यांचे नाव भारतभर पसरले. रागाधारित असे खात्रीने वर्णन करता येईल अशी त्यांची गीते मनात गुंजन करायला लागली. उदाहरणार्थ "दुखके अब दिन बीतत नाही" (राग देस), "बालम आये बसो मेरे मन में" (राग सिंधुरा), "" पियाबीन नाही आवत चैन" (राग झिंझोटी) ही गीते आपली गुणवत्ता राखून आहेत. तसेच "इक बंगला बने न्यारा" सारखे काहीसे नाट्यपूर्ण गीतही मनाची पकड घेऊन गाणाऱ्याचे आवाहन एकपदरी नाही, हे सिद्ध करून राहिले. "बाबूल मोरा" सारखी भैरवी तर "कल्ट सॉंग" बनून राहिले. "जिंदगी" चित्रपटातील "मैं क्या जानू क्या जादू हैं" (राग यमन) सारखे गीत आपण परिणामकारण उत्साहपूर्णतेनेही गाऊ शकतो, हे सिद्ध केले. हे गीत द्रुतगती आणि सफाईदार तानांनी भरलेले आहे. सूक्ष्मध्वनीग्राहकाशी नीट जुळवून घेणारा व गाणारा हा पहिला गायक, असे त्यांचे सार्थ वर्णन करण्यात येते. बंगालच्या "बाउल" संगीत परंपरेशी जवळून संबंध आला म्हणून असेल पण गायनात पंजाबी ढंग जाणवत नाही. आता मूल्यमापनाचा प्रयत्न : वर म्हटल्याप्रमाणे सैगल, मास्टर दीनानाथ इत्यादींच्या गायनकलेचे मूल्यमापन करताना एक चाचपडल्याची भावना उत्पन्न होते आणि याचे महत्वाचे कारण यांची तेजस्वी कारकीर्द आणि एकूण आयुष्यमान अतिशय अल्प होते. आज उपलब्ध असलेल्या संगीतातही अधिक विकासाचा संभव स्पष्ट जाणवतो!! त्यामुळे आहे त्याच्या अनुरोधानेच मूल्यमापन शक्य आहे. १) बोलक्या चित्रपटांच्या युगातील पहिला प्रमुख गायक-नायक, असे सैगल याचे स्थान असल्याने, ते नंतरच्या गायक-नायकांसाठी आदिनमुना ठरले. आपली स्वतःची, वेगळी व गुणवंत शैली आहे, असे सिद्ध करेपर्यंत, मुकेश तसेच किशोर कुमार इत्यादी गायकांना "सैगलसारखे गा" अशी शिफारस करण्यात येत होती. "जो नौकरी दिला दे"( करोडपती) किंवा "दिलरुबा कहां तक" (करोडपती - पहाडी संन्याल सह) या गीतांत आवाजात आणि गायनात एक उसळी घेणारा उत्साह आणि द्रुत गायनगती आढळते. गायनाचा पल्ला आणि आवाजाचा लगाव दोहोंतही खुला बाज आहे. २) एक वेधक विशेष असा आढळतो, सुप्रतिष्ठित झालेल्या संगीतप्रकारांपैकी ठुमरी, भजन आणि गझल यांत सैगल रमले होते, असे ठाम विधान करता येते. या प्रकारच्या सादरीकरणात सैगल विलक्षण कार्यक्षमतेने गातात असे दिसते. या गायन प्रकारांत, भिस्त असते ती, शब्दांच्या उच्चारण्यावर तसेच सुरावटीची बढत करण्यावर. "नुक्ताचीन" (यहुदी की लडकी), "दिलसे 'तेरी निगाह (कारवाँ इ हयात),"दिल से" (सूरदास) या ठुमरी सदृश रचनांचे गायन आपल्या आवाहकतेने गुंग करते. ३) सैगल यांच्या गायनात सर्वात सार्वत्रिक म्हणण्यासारखा गुण आहे - एक प्रकारची आविष्कारक्षम अंतर्मुखता. "दुख के दिन" ( देवदास), "किसने ये सब" ( धरतीमाता ), "बाबुल मोरा" (स्ट्रीट सिंगर) ही उदाहरणे ख्यातनाम आहेत. यामधील अंतर्मुखता कशामुळे प्रतीत होते? संथ गती, कमी तारतांचा वापर करणारी सुरावट, काहीसे आळसावलेले गायन व लगाव. या साऱ्यांमुळे स्वरांची सावली मागे रेंगाळते. ४) सैगल यांनी शास्त्रोक्त संगीताची यथायोग्य तालीम घेतली नव्हती, हे तर सर्वज्ञात आहे. अशी तालीम घेतलेल्यांची एक खुबी असते ती, त्यांच्या तत्कालस्फूर्ततेत. तत्कालस्फुर्तता म्हणजे सुरावट किंवा लयबंध यांत ऐनवेळी बदल करून पूर्वी रचून ठेवलेल्या संगीतापासून दूर जाण्याची क्षमता. हा गुण असल्यास, सादरकर्त्याला कलाकार म्हणावे अन्यथा कारागीर. सैगल काही गाण्यांत या क्षमतेचे अस्तित्व दाखवून देतात. "जगत में प्रेम ही" (करोडपती), "औसर बिता जाय" (पूरण भगत) या रचना ऐकाव्यात. ५) सैगल यांची काही गीते अगदी साधी पण मधुर आहेत. कुठलीही सांगीत महत्वाकांक्षा न ठेवता सांगीत परिणाम साधतात. "एक बंगला बने न्यारा" ( प्रेसिडेंट), "सो जा राजकुमारी" (जिंदगी) या रचना ही काही ठळक उदाहरणे म्हणता येतील. ६) भजन हा संगीतप्रकार देखील फार आवाहकतेने गात असत - "भजू मैं" किंवा "राधे रानी" (दोन्ही पूरण भगत ). या रचना सुरेल, साध्य, अनलंकृत पण परीणामकारक आहेत. ७) अखेर काहीशा वादविषय होणाऱ्या रचनांचा वर्ग विचारार्थ समोर येतो. "जीवन बीन मधुर" (स्ट्रीट सिंगर), "जीवन आशा है" (जिंदगी), "सप्त सूर" ( तानसेन) ही या प्रकारची प्रमुख उदाहरणे ठरतात. या गीतांच्या गायनात नेहमीची उस्फूर्तता नाही. ती निव्वळ कर्तव्यभावनेने गायलेली वाटतात. या सगळ्या विवेचनावरून एक नेमका निष्कर्ष काढता येतो - हिंदी चित्रपट गीतांत सैगल यांनी कायमस्वरूपी ठसा उमटवला आहे आणि ही सिद्धी निश्चितच असामान्य आहे.

Thursday 3 October 2019

अनाम वीरा जिथे जाहला

मराठी ललित संगीतात, प्रसिद्ध कवीच्या कवितासंग्रहातील वेचक कवितेला स्वरबद्ध करणे पूर्वीपासून चालू आहे. खरतर कविता आकळायला अशा स्वरबद्ध रचना बऱ्याच अंशी कारणीभूत ठरतात. एरव्ही मुद्दामून कवितासंग्रह विकत घेणे आणि आवडीच्या कवितांचे रसग्रहण करणे, हे सर्वसामान्यपणे घडत नाही. रसग्रहण तर दूर राहिले, साधी आस्वादक वृत्ती देखील दाखवली जात नाही. अशा वेळेस, प्रसिद्ध कवी "कुसुमाग्रज" यांची कविता स्वरबद्ध केली जाते आणि विशेष म्हणजे लोकप्रिय देखील होते. आजचे गाणे ही मुळातली कुसूमाग्रजांच्या "विशाखा" या लोकप्रिय कवितासंग्रहात कविता आहे. कुसुमाग्रज हे कधीही भावसंगीताच्या वाटेला फारसे गेल्याचे आढळत  नाही. तसा त्यांचा हुकमी पिंड नव्हता असे म्हणता येईल. कुसुमाग्रजांना एकूणच क्रांतिवीर, युद्ध या विषयाबाबत खास रस होता असे म्हणायला जागा आहे. "विशाखा" कवितासंग्रहात,  या माझ्या विधानाला पूरक अशा कविता आढळतील. पुढे अर्थात दृष्टी बदलली, दृष्टी अधिक खोल, अंतर्मुख झाली, आयुष्याच्या निरनिराळ्या अंगांचा वेध घ्यायला लागली पण अशी प्रगती प्रत्येक सृजनशील कलाकाराची होतच असते. कलात्मक वाढीचा प्रवास असाच होत  असतो. जवळपास अशाच आशयाच्या ओळी, कुसुमाग्रजांच्या अतिशय लोकप्रिय कवितेतील एका अंतऱ्यात आढळतात. 
"मध्यरात्री नभघुमटाखाली 
शांती शिरीं तम चवऱ्या ढाळी 
त्यक्त बहिष्कृत मी त्या काळी 
एकांती डोळे भरती" 
वरील ओळीतून देखील अशाच आशयाची प्रचिती येते. असे तर बरेचवेळा होते, युद्धभूमीवर बलिदान दिल्यावर विस्मृतीत जाणे. समाजमन हे नेहमीच विसरभोळे असते आणि त्यामुळे अशा बलिदानाची सार्थ आठवण फारशी, लोकांच्या मनात रहात नसते आणि याचीच खंत कुसुमाग्रजांनी या कवितेत मांडली आहे. कविता वाचताना थोडे व्याकुळ व्हायला होते. खरतर अशा बलिदानाची अशा प्रकारे इतिश्री होणे, हे कमकुवत समाजाचे लक्षण मानायला हवे आणि याचीच विदारक जाणीव या कवितेतून होते. सगळी कविता ही निराशेच्या भावनेतून लिहिली गेली आहे. 
कवितेचा असा उघडा आशय लक्षात घेता स्वरभाव देखील त्याप्रकारेच व्यक्त होणार!! संगीतकार वसंत प्रभूंची स्वररचना आहे. मराठी भावसंगीतात, जी.एन.जोशींनी प्रथितयश कवींच्या निवडक कवितांना स्वरबद्ध करायला सुरवात केली आणि भावसंगीत विशेष बहराला आले. याच वाटेवर संगीतकार वसंत प्रभूंनी आपल्या कारकिर्दीत अशा अनेक लोकप्रिय कवींच्या कवितांना स्वरबद्ध केले आणि भावसंगीत श्रीमंत केले. वसंत प्रभूंच्या चाली नेहमीच साध्या आहेत. परंतु त्यात एक अवीट,अश्रुत असा गोडवा आहे. मुखडा ऐकतानाच चाल मनात शिरते. इथे देखील हाच अनुभव येतो. 
अशा स्वररचनेत वाद्यसंगीताला फारसा वाव नसतोच म्हणा. व्हायोलिन, बासरी आणि तालासाठी संथ तबला आहे. अर्थात अशा वेळी कविता पठण होण्याचा धोका असतो परंतु इथेच संगीतकार अवतरतो. रचनेत मुखडा धरून ५ अंतरे आहेत आणि रचना तर फक्त ३ मिनिटांतच संपवायची. त्यामुळे वाद्यमेळ सजवणे, या प्रक्रियेला फारसा वाव नाही. प्रत्येक ओळ गाताना, शेवट करताना शेवटचे अक्षर हे एकतर "आ"कार तरी आहे किंवा "अ"कार आहे. चालीचे वळण ध्यानात घेतले तर लय किंचित लांबलेली आहे आणि त्यामुळे ओळीचा शेवट "आकारांत" किंवा "अकारान्त" अशा छोट्या आलापीने केला आहे. बरेचवेळा इथे "गायकी" दाखवायचा मोह होऊ शकतो परंतु अशा स्वरिक कसरतींची अजिबात गरज नाही. संगीतकार म्हणून वसंत प्रभूंचे हे वैशिष्ट्य लक्षात येते. परंतु एक "निरागस" अशीच स्वररचना आहे. 
गायिका लताबाईंनी, गाताना कवितेतील आशयाला संपूर्ण न्याय दिला आहे. कुठंही स्वरविस्ताराला वाव दिलेला नाही. अत्यंत बांधेसूदपणे गायन केले आहे. संयत गायन हे देखील वैशिष्ट्य म्हणता येईल. अतिशय हळुवार स्वरांनी शब्दांना गोंजारले आहे. मध्य लयीतच रचना चालते. अर्थात चालीची जातकुळी ओळखून गायकी सादर करणे, हे कधीही कमअस्सल नसते. प्रत्येकवेळेस दाणेदार तान, मुर्घ्नी स्वर घेऊन स्वरचना सजविण्याची काहीही गरज नसते. स्वररचना "अळुमाळू" आहे. 
अगदी स्पष्ट लिहायचे झाल्यास,गाणे संपले तरी आपल्या मनात कवितेच्याच ओळी रुंजी घालत असतात. हे जितके कवी म्हणून कुसुमाग्रजांचे श्रेय असले तरी संगीतकार म्हणून वसंत प्रभू आणि गायिका म्हणून लताबाई यांचे श्रेय देखील तितकेच महत्वाचे आहे. म्हणूनच आजही या गाण्याची लोकप्रियता  कमी झालेली नाही. 

अनाम वीरा, जिथे जाहला तुझा जीवनान्त 
स्तंभ इथे ना कुणी बांधला, पेटली ना वात !

धगधगता समराच्या ज्वाला या देशाकाशी 
जळावयास्तव संसारातून उठोनिया जाशी 

मूकपणाने तमी लोपती संध्येच्या रेषा
मरणामध्ये विलीन होसी, ना भय ना आशा

जनभक्तीचे तुझ्यावरी नच उधाणले भाव
रियासतीवर नसे नोंदले कुणी तुझे नाव!

जरी न गातील भाट डफावर तुझे यशोगान!
सफल जाहले तुझेच हे रे, तुझेच बलिदान!

काळोखातुनी विजयाचा ये पहाटचा तारा
प्रणाम माझा पहिला तुजला म्रुत्युंजय वीरा!