Wednesday 18 June 2014

कवितेचा आस्वाद – मंगेश पाडगावकर




आपल्याकडे कलावंत शक्यतोवर आपल्या निर्मितीच्या प्रक्रियेबद्दल फारसे लिहित नाहीत. वास्तविक निर्मित त्यांचीच, त्यांनाच त्याचा “साक्षात्कार” झालेला असतो परंतु बहुतेकवेळा “अबोध” मनातील जाणीवा आणि त्यांचा मागोवा घेण्याबाबत असलेला निरुत्साह, यामुळे सर्जनशिलतेबद्दल एकतर गोंधळ होतो किंवा ती प्रक्रिया शब्दबद्ध करताना किचकटपणा अधिक होतो. याचे मुख्य कारण, लेखक वगळता, इतर कलावतांकडे शब्दसामर्थ्य उणे असते. त्यामुळेच बहुदा कलाकृतीची नेमकी “ठाम” समीक्षा दुर्बोधतेकडे वळते!! एकतर, कलाकृती निर्माण होताना, बाह्यात्कारी वैचारिक प्रक्रिया स्पष्टपणे लक्षात ठेऊन शब्दबद्ध करणे शक्य असते परंतु काही गोष्टी आपल्या अंतर्मनातून अचानक उफाळून वर येतात, त्याची संगती लावणे दुरापास्त होते.
मंगेश पाडगावकरांनी याबाबत, फार सुंदर विवेचन केले आहे. नुकतेच त्यांचे “शोध कवितेचा” हे पुस्तक वाचले. पुस्तकात, प्रामुख्याने कविता, त्यामागील वैचारिकता, सर्जनशीलता इत्यादी गोष्टींचा उहापोह लेखांमधून, भाषणातून मांडलेला आहे. खरेतर, कविता आणि त्याची निर्मिती हे नेहमीच गूढ राहणार कारण प्रतिभेचा प्रवास रेखाटणे अति अवघड!! सर्वसाधारणपणे असे म्हटले जाते, कविता म्हणजे संस्कृतीचा अर्क!! एका दृष्टीने हा अर्थ योग्य आहे. अत्यंत मोजक्या शब्दात, प्रतिमांच्या आधारे, रचनांच्या प्रयोगाने अनुभव गोळीबंद करणे, ही खरेच प्रतिभाशाली निर्मिती.
याच पुस्तकात, पाडगावकरांनी “कवितेचा आस्वाद” हे प्रकरण लिहिले आहे. जवळपास ५० वर्षांहून अधिक, काव्यनिर्मिती केल्यावर, त्याच कलाकृतीचे “गारुड” उकळून दाखविण्याची उर्मी नक्कीच समर्थनीय ठरावी. सतत, नाविन्याचा शोध हे तर पाडगावकरांचे वैशिष्ट्य ठरावे, यात किती अप्रतिम आणि किती फसलेले, हा वेगळा विषय ठरेल. परंतु मुद्दामून मनात ध्यास घेऊन, वेगळी वाट चोखाळायची, त्यानिमित्ताने मिळालेले अपयश मान्य करायचे आणि प्राप्त झालेले यश निर्लेप मनाने स्वीकारायचे!!
प्रथमच, आपल्यावर कवितेचा प्रभाव कसा पडला, हे सांगून झाल्यावर, लगेच पाडगावकर, आस्वाद प्रक्रियेकडे वळतात. वास्तविक, आस्वादाचे स्वरूप प्रत्येक कवितेप्रमाणे बदलत असते, असे सांगून प्रत्येक कविता हा नित्य नवा शोध असतो, असे विधान करतात. हे तर खरेच आहे की कवीच्या जातकुळीनुसार कविता घडत असते आणि त्यानुसार आपल्याला आस्वादाची दिशा ठरवावी लागते. वेगळ्या शब्दात, गझल वृत्तीतली प्रणयी कविता, त्याचा आशय आणि सामाजिक विषयाची कविता, यात दोन्ही वेळी आपल्याला, वाचनाची दिशा एकच ठेऊन चालेल का? विषय भिन्नतेमुळे, आस्वादाची प्रक्रिया वेगळी व्हावी!!
पुढे त्यांनी फार सुरेख विचार मांडला आहे. “कवितेतून व्यक्त होणारा आशय आणि भाषा, या दोन्ही अंगाने कवी शोध घेत असतो”. हा विचार आणखी वेगळ्या अंगाने मांडता येईल,”आशय” आणि “भाषा” हीच दोन कवितेबाबत प्रधान अंगे मानावी का? तसे झाले तर, रचना, घाट याबद्दल काय म्हणावे लागेल? किंवा असे आहे का, “आशय” आणि “भाषा” हि दोन प्रधान अंगे आहेत, रचना,घाट या गोष्टी नंतर अवतरतात!!
या लेखात एक सुरेख विचार वाचायला मिळतो. कविता आस्वादाआधी कविता निर्मितीची प्रक्रिया मांडलेली आहे. म्हणजे आधी शब्द, नंतर येणारी ओळ, नंतर जाणवणारी सर्जनशीलता याचे विवेचन मुळातून वाचण्याइतके मनोरंजक आहे. साधारणपणे, आपण पुढ्यात असलेली कविता, मनात कसलाही विचार न आणता वाचतो वाचता,वाचता, त्या शब्दांचा अन्वयार्थ मनात आणीत असतो आणि त्यानुरूप कविता किती आवडली (आकळली किती हा नंतरचा भाग!!) याचा अंदाज घेतो, परंतु जर का कविता निर्मितीमागील नेमका प्रवास लक्षात घेतला म्हणजे आस्वादाची दिशा कदाचित वेगळे वळण, घेऊ शकेल!!
यातूनच पुढे “कविता वाचन” आणि त्याचा श्रोत्यांवरील प्रभाव, याबद्दल वाचायला मिळते. आता कवितेचे सार्वजनिक वाचन कितपत योग्य आहे, अयोग्य आहे, हा विवादास्पद  विषय ठरतो परंतु त्यानिमित्ताने रसिकांत जिज्ञासा निर्माण होते, हे कुणी नाकारू शकेल, असे वाटते. वास्तविक कविता हि बहुश: एकांतात जितकी समजते तितकी गर्दीत नाही आणि हे तत्व म्हणून कुठल्याही कलेच्या संदर्भात मांडता येईल पण एकांतात आस्वाद घ्यावा, अशी इच्छा मनात येणे,यासाठी सार्वजनिक अविष्कार अधिक मदत करतो, हे मान्य व्हायला प्रत्यवाय नसावा!!
या संदर्भात पाडगावकरांनी बोरकर,करंदीकर यांच्या कविता उदाहरणादाखल घेतलेल्या आहेत, खरेतर, या कवितेच्या अनुषंगाने पाडगाकारांनी जे विवेचन केले आहे, त्या दृष्टीने त्या कवितांचा वेगळ्या अंगाने आस्वाद घेता येईल आणि तो एका दीर्घ निबंधातून व्यक्त होऊ शकेल, अशा बहुआयामी वळणाचा विचार आहे. मला हा निबंध याच कारणाने भावला, कारण मुळात, आपण निर्माण करीत असलेली कला, आणि त्याबद्दल अभ्यासपूर्वक घेतलेला मागोवा, हे मराठीत तसे दुर्मिळ!! आपल्याकडे बहुतांशी कलानिर्मिती होते आणि कलाकार नामानिराळे राहतात. आस्वादक किंवा रसिक हे नेहमीच बहुतेकवेळा नदीच्या काठावर बसून, पाण्याची खोली अजमावत असतात आणि त्यातून काहीवेळा नाहक शब्दच्छल खेरीज काही काहीही हाती लागत नाही. अशा वेळेस,  पाडगावकरांसारखा प्रथितयश कवी, कवितेबद्दल वैचारिक मागोवा घेण्यास उद्युक्त होतो. हेच मला अधिक आवडले.


No comments:

Post a Comment