Saturday 29 February 2020

अनंत बोरकर

अनंता शाळेत असल्यापासून सडपातळ असाच आहे. वयानुसार वजन थोडेफार वाढले असेल पण सत्कृतदर्शनी तरी आजही तो इयत्ता सातवी, आठवी मधील वर्गात खपून जाईल. काही व्यक्ती आपल्या आयुष्यात अशा येतात ज्या आपले अस्तित्व फारशा दाखवीत नाहीत, फारसे बोलत नाहीत आणि बोलले तरी हलक्या आवाजात बोलणार. कुठल्या विषयावर मत विचारले तर शक्यतो टाळणार परंतु जरा खोदून विचारले तर मोघम उत्तर देणार. त्यातून तुम्हाला काय अर्थ घ्यायचा हे तुम्ही ठरवायचे. अनंता काही जास्त बोलणार नाही. शरीराचा सडपातळपणा कसा एकाबाजूने काहीच ध्वनित करीत नाही पण तरीही शरीर म्हणून अस्तित्व दर्शवित असतात. शाळेत देखील त्याचे केस सरळ,सपाट होते.आता वयानुसार केसांनी रुपेरी रंग दाखवायला सुरवात केली आहे. शाळेत त्याने कधी संगामस्ती केली असेल का? असा प्रश्न पडावा इतके अस्तित्व होते. कधी आवाजी बोलणे नाही,  हसासणे देखील मुमूरकेशी!! अगदी मोठा विनोद असला तरच हसण्याचा आवाज येणार परंतु एकूणच शांत प्रवृत्ती. आपल्या गृपला अशाच व्यक्तीची "ऍडमिन" म्हणून गरज होती. एकत्र आपल्या गृपतर अनेकरंगी माणसे. कोण कधी तणतणेल याचा खुद्द ब्रह्मदेवाला देखील पत्ता लागणार नाही तरीही अशी मोट बांधून ठेवायला थंड डोक्याचाच माणूस हवा आणि तिथे अनंता एकदम योग्य. 
आपल्या गृपवर तशी शांतता असते पण कुणीतरी मध्येच फणा उभारते आणि तणातणी सुरु होते. प्रसंग तसे कमीच असतात कारण आपल्या गृपवर "व्यक्त" होणे हा कपिलाषष्ठीचा योग्य असतो. आता वयाची साठी झाली तरी वैय्यक्तिक हेवेदावे भरपूर आढळतात की जे मराठी माणसाचे व्यवच्छेदक लक्षण मानता येईल. अनंताला कशीही मत विचारले तर आधी शक्यतो विषय टाळायचा त्याचा प्रयत्न असतो. त्यातून जरा आग्रह झाला तर "नरो वा कुंजरो" वृत्तीने अत्यंत थोडक्यात तसेच नेमका अर्थ ध्वनित होईलच याची खात्री नसलेले उत्तर ऐकायला मिळणार. त्यातून पुन्हा विचारले तर उत्तर नाहीच मिळण्याची शक्यता!! असे असून देखील अनंता सगळ्यांच्यात असतो. गप्पा मारणे वगैरे त्याच्या स्वभावातच नाही. शांतपणे प्रत्येकाला निरखित बसायचे हा त्याचा आवडता छंद. त्याच्या इतक्या वर्षांच्या सडपातळ शरीरयष्टीचे आपल्या गृपवरील महानविभूती श्री. सतीश हर्डीकरांनी चपखल वर्णन केले आहे - "बारक्या". आता हेच त्याचे टोपण नाव म्हणून प्रसिद्ध झाले आहे आणि त्याने देखील समंजसपणे स्वीकारले आहे. अर्थात इथे टोपण नावाचा "अस्वीकार" संभवतच नाही म्हणा. 
या तणातणीवरून आठवण झाली, अधूनमधून वाद होतात (मला तर असे प्रसंग सणासारखे साजरे करावेसे वाटतात!! ते असो....) मग मला अनंताचा फोन येतो, "अरे अनिल बघ काय चालले आहे. काय बोलायचे?" मी देखील असे वादप्रसंग चवीने चघळत असतो. त्यावेळी माझे मत मी देतो. बरेचवेळा ते तथाकथित मत स्वीकारले जाते. खरेतर मतभेद व्यक्त झाले, वाद झाले तर काय बिघडले? अर्थात हे माझे मत पण आपल्या गृपवर हळव्या वृत्तीच्या व्यक्ती भरपूर आहेत आणि याची नेमकी जाण अनंताला आहे. शक्यतो कुणी गृप सोडून जाऊ नये म्हणून सतत प्रयत्नशील राहण्यासाठी जे प्रयत्न करतात त्यातील अनंता हे नाव अग्रभागाने येते. खरंतर इतका मितभाषी असून देखील सगळ्यांना सांभाळून घेतो याचे मला आश्चर्यच वाटते.हल्ली बऱ्याच महिन्यांत गृपची पिकनिक निघाली पण त्याबाबत अधूनमधून आठवण करून देणारा अनंताच. अर्थात पिकनिकची आठवण काढली की गृपवर "हालचाल" थोडीफार सुरु होते पण मराठी माणसाचे एक बाणा आहे - मोडेन पण वाकणार नाही त्याला काय करणार!! प्रत्येकाच्या काहींना काहीतरी अडचणी असतात आणि त्यामुळे मागील पिकनिक होऊन आता वर्ष उलटून गेले तरी काही ठरत नाही. खरतर आता एक मान्य केले पाहिजे, पहिल्या पिकनिकच्या वेळची उत्सुकता आता राहिली नाही. 
मग कधीतरी निदानपक्षी डिनरला भेटायचे ठरते. अर्थात असे प्रसंग सुद्धा विरळाच होत आहेत म्हणा. असे कार्यक्रम ठरवायला मात्र अनंता पुढे असतो. प्रत्यक्ष कार्यक्रमात त्याची बडबड कमीच असते. काहीवेळेस आम्ही काही मित्र एकत्र ड्रिंक्स कार्यक्रमासाठी जमलो असताना, (घसा "ओला" झाला म्हणून असेल!!) अनंता बऱ्यापैकी बोलतो पण स्वभाव मितभाषीच हे खरे. काहीसा हिंदुत्ववादी विचारांचा (इथे मला थोडे हसायला आले!!) असला तरी आपले विचार अति ताणायचे नाहीत जेणेकरून मैत्री नात्यांवर परिणाम होईल, इतपत बोलणे. कधीकधी तर तो इतकी सावधगिरी बाळगतो की मला आश्चर्य(च) वाटते. "अरे मित्रच जमले आहेत ना मग कशाला इतकी सावधगिरी बाळगायची?" पण माझी खात्री आहे, असे मी बोललो तरी अनंता तसाच वागणार. गृपवर कसे व्यक्त व्हावे आणि भाषा कशी वापरावी याचे त्याचे स्वतःचे आडाखे आहेत. त्याचाच परिणाम अनंता कधीही स्वतःची मते मांडत नाही (अपवाद पिकनिक किंवा डिनर कार्यक्रम हा विषय असला तर आणि तेंव्हा देखील "मला जमेल" किंवा "मला जमणार नाही"!! यापलीकडे एकही शब्द अधिक किंवा उणा नाही!! 
एका बाबतीत अनंताला मानले पाहिजे, रोजच्या रोज दर पहाटे गृपवर उर्दू मिश्रित हिंदी शायरी टाकतो. तो इतर अनेक गृपवर आहे (हे त्यानेच सांगितले आहे) आणि तिथून तो ही शायरी आपल्या गृपवर टाकतो, अगदी इमानेइतबारे टाकतो. आपले गृपवरील सगळे इतके नफ्फड आहेत की कधी कुणी त्यातील एखाद्या शायरीवर व्यक्त होत नाहीत!! जणू काही आपला संबंधच नाही असेच वागतात. मला शंका आहे कितीजण वाचत असतील. पण तरीही अनंता जराही नाउमेद होत नाही!! आता चिकाटी वृत्ती म्हणायची की निगरगट्टपणा!! प्रश्नच आहे. हीच चिकाटी मला लोभावते. माझ्यात हा गुण चुकूनही आढळणार नाही आणि म्हणूनच मला या मित्राचा मनापासून हेवा वाटतो. सर्वसाधारणपणे मी प्रत्येकाला त्याच्या स्वभावानुसार काहीतरी लेबल लावतो पण इथे मात्र सपशेल शरणागती!! 

Wednesday 26 February 2020

(खवट) सुनील ओक

शाळेपासूनच अंगाने भरलेला, काहीसा स्थूल, सरळ केस (पण वागणे तिरके पण ते असो....) शरीरयष्टी थोडी बुटकबैंगण, घारे आणि निळसर डोळे (जात कुठली ते सांगायलाच नको म्हणा) आवाज थोडा घोगरा (म्हणूनच गायनाचे अंग नाही पण हे आमचे सगळ्यांचे सुदैव म्हणायला हवे) आणि शाळेपासूनच नैसर्गिकरीत्या जपलेली तिरकस जीभ!! सुनील सरळ बोलला तर आजच्या काळातील Breaking News ठरेल. शाळेपासून वाकड्यात बोलण्याची सवय आणि त्यातून बुद्धीचे वरदान असल्याने बोलताना सुनील जरी सरळ वाक्य बोलला तरी आम्ही मित्र त्याचा तिरका(च) अर्थ घेतो आणि ही सवय त्यानेच आम्हा सगळ्यांना लावली आहे. 
त्याचे हसणे देखील प्रथमदर्शनी छद्मी वाटावे असे असते. सुनील मनापासून हसला आहे, हे दर्शन देवदुर्लभ असते. किंबहुना कुठे तिरकस विनोद झाला (बरेचवेळा त्यानेच केलेला असतो) की ओक्याला मनापासून आनंद होतो आणो आनंद त्याच्या सुप्रसिद्ध हास्यातुन जगाला समजतो. एकूणच ही व्यक्ती पहिल्यापासून काहीशी हूड अशी आहे आणि त्याला जोडून जहरी बोलणे आहे. त्यामुळे त्याच्या नाडी फारसे कुणी लागत नाही आणि बरोबरच आहे म्हणा, कोण उगीचच खवट टोमणा सहन करून घेईल. त्याच्या जिभेला खरी धार आली ती आपला हा गृप झाल्यापासून. तशी ही स्वारी शाळेच्या जवळच राहणारी - काही वर्षांपूर्वी त्याने खारघर इथे फ्लॅट घेतला आहे ( हे सुनीलच जगाला सांगत असतो. अर्थात खारघर सारख्या लांब जागा घेण्यात दुहेरी फायदा. कुणाला आमंत्रण दिले तरी येण्याची शक्यता कमीच. अर्थात सुनीलचे आमंत्रण म्हणजे भल्या पहाटे अचानक उंबराचे फुल दिसण्यासारखे आहे!!) त्यामुळे बरेचवेळा ही स्वारी जगप्रसिद्ध (हे सुनीलच जगाला ओरडून सांगतो) नावलकर बिल्डींग - खरेतर चाळ- या इमारतीच्या गॅलरीत (सुनीलच्या भाषेत "सौंध"!! सुनीलचे सगळेच जगावेगळे असते.) बसलेला दिसायचा. दुसऱ्या मजल्यावर त्याचे घर होते. अस्मादिकांना ३ वर्षांपूर्वी सुनीलच्या घरी जाण्याचे भाग्य लाभले होते. गणेशोत्सव होता आणि त्यानिमित्ताने त्याने घरी बोलावले होते. मी पण लगेच पडत्या फळाची आज्ञा स्विकारुन लगोलग घरी गेलो होतो. घरी स्वागत चांगले केले. चाळीत गणपती उत्सव असल्याने आनंदी वातावरण होते. मला त्याने चाळीतील गणपती दाखवला आणि त्या चाळीत किती प्रथितयश (हा शब्द सुनीलने मला त्यावेळी ऐकवला होता) व्यक्ती आल्या होत्या, त्यांचे फोटो वगैरे दाखवले आणि सुंदर प्रसाद दिला. अर्थात आमचा गणपती नवसाला पावतो आणि हो, जगप्रसिद्ध आहे वगैरे वाक्ये ऐकवली (मला या वाक्यांची सवय असल्याने लगोलग कानाबाहेर टाकली!!) 
सुनील खरा खुलतो तो आपल्या WhatsApp गृपवर. इथे त्याची तलवारबाजी चालते आणि विशेषतः मी काही लिहिले की लगेच सुनीलचे उत्तर आलेच आणि ते त्याच्या नेहमीच्या शैलीप्रमाणे (म्हणजे खवचट) असते. मला मानसिक दु:ख देण्यात त्याला तथाकथित आसुरी आनंद होतो पण मला आता त्याची सवय झाल्याने त्याचे टोमणे वाचतो आणि त्यालाही शालजोडीतले देण्याचा प्रयत्न करतो. वास्तविक त्याचा आणि माझ्या मतांत भरपूर विरोधाभास आहे. सुनी देवादिकांवर सढळहस्ते विश्वास ठेवणारा तर मी तिकडे शक्यतो दुर्लक्ष करणारा. आता इथे कुणीही म्हणेल असे असूनही मी त्याच्या चाळीच्या गणेशोत्सवाला का गेलो? प्रश्न नक्कीच वाजवी आहे पण दस्तुरखुद्द सुनील महाराजांचे (मनापासूनचे असावे!!) आमंत्रण मिळण्याचे भाग्य नाकारणार कसे. या आपल्या गृपवर असे भाग्य किती जणांचे असेल? या प्रश्नावर एका हाताची बोटे जास्त होतील म्हणजे बघा. सुनील पक्का हिंदुत्ववादी आणि मी तसा निरालंब. शक्यतो या विषयांवर बोलणे टाळणारा. मला संगीतात भरपूर रुची आणि सुनील अगदी औरंगझेब नसला तरी गाण्यांवर गप्पा मारण्यातला नव्हे. माझी संगीतातील रुची हा सुनीलला मी कायमस्वरूपी चेष्टा करायला दिलेला मसाला आहे आणि सुनील तो मसाला व्यवस्थित वापरतो, अगदी माझे डोळे झोंबेपर्यंत!! 
असे सगळे दैवीदत्त गुण असूनही त्याचा स्वभाव लोभस आहे. खवट बोलेल पण सगळे तात्कालिक असणार. गेल्या काही वर्षांपासून त्याला गुडघेदुखी झालेली आहे आणि सुनील त्या दुखण्याने त्रस्त  झालेला आहे पण तरीही त्याच्या बोलण्यात कधी रडगाणे नसते. आम्ही गृपमधील काहीजण पूर्वी रविवारी सकाळी Morning Walk साठी चौपाटीवर जमत असू. अर्थात सुनील गिरगावात असल्याने त्याला आमंत्रण जायचे. त्यावेळी तर त्याचे दुखणे जरा वाढले होते. आमही सगळे आरामात नरिमन पॉईंट पर्यंत चालत जात असू पण हे महाशय फारतर हिंदू जिमखान्यापर्यंत आमच्या बरोबर असायचे आणि नंतर तिथेच बसून राहायचे. सुनील सरळ बोलला असेल तो याच वेळी!! एकदा तर मलाच शंका आली होती, खरेच याचा गुढगा दुखत आहे की हा नाटके करीत आहे? परंतु लगोलग त्याच्या गुढग्यावर ऑपरेशन झाले आणि मनातील किल्मिष नष्ट झाले. प्रश्न असा आहे,मनात किल्मिष आलेच कसे? याला उत्तर सुनीलचे वागणे!! 
तसा ड्रिंक्स पार्टीला मात्र सुनील अफलातून कंपनी आहे. सतत बडबडत असे नाही नाही पण मध्येच एखादी फुसकुली सोडेल कि जी वर्मावर नेमके बोट ठेवणारी असेल. माझ्या घरी २,३ वेळा सुनील इतर २,३ मित्रांबरोबर आलेला आहे. पार्टीच्या वेळेस मात्र स्वान्तसुखाय पद्धतीने ड्रिंक्स घेणार, एखाद्या नावडता विषय मुद्दामून काढून काड्या टाकायचे काम इमानेइतबारे करणार आणि वाद वाढायला लागला कि लगेच नामानिराळे राहणार. हे त्याचे नामानिराळे राहण्याचे जे कौशल्य आहे, ते मात्र अद्वितीय आहे आणि याची आम्हा सगळ्यांना कल्पना असून देखील सुनील अचूकपणे टायमिंग साधतो. अथर त्याचे बोलणे हे सहसा निर्विष असते, कुणावरही शक्यतो वैय्यक्तिक शेरेबाजी करीत नाही त्यामुळे केलेले विनोद कुणालाही आनंदाने स्विकारता येतात. तशी फार मोठ्या आवाजात बोलायची सवय नाही. सुनील काय करतो, गप्पांचा वेग जरा कुठे थंडावला असे व्हायला लागले की स्वारी आग लावते. 
अशाच अप्रतिम गप्पांत काही तास निघून जातात. अर्थात असा मित्र सहजपणे प्राप्त होत नाही आणि सुदैवाने मला त्याची मैत्री प्राप्त झाली आहे. तसे आम्ही दोघे रोज काही फोनवर बोलत नाही पण कधी एकमेकांना फोन झाला की आमच्या जिभा तिरकस होतात. काही मिनिटे निश्चिन्तपणे  घालवली जातात, एकमेकांची टर मनसोक्तपणे उडवली जाते, आमचा बोलण्याचा कंडू शमवला  जातो आणि आम्ही फोन खाली ठेवतो. एक नक्की, उद्या मला जर काही मदत लागली तर माझे इथे हक्काचे असे काही थोडेफार मित्र आहेत जे रात्रीबेरात्री देखील मदतीला धावून येतील त्यात सुनीलचे नाव नक्की आहे कारण तितका विश्वास खुद्द त्यानेच मला दिलेला आहे. 

Sunday 23 February 2020

(महान विचारवंत) मीनल सालये 

आपल्या शाळेच्या गृपमधील अत्यंत वेगळे व्यक्तिमत्व!! असे वेगळेपण राखले याला कारण तीच स्वतः. वास्तविक एकेकाळी माझ्या गल्लीच्या अगदी बाजूला राहणारी पण त्यावेळी एखादा शब्द तर दुरापास्त पण एखादे स्मित देखील अप्राप्य!! त्यातून शाळेतील प्रतिमा म्हणजे अत्यंत हुशार (आजही या प्रतिमेत लवमात्र फरक नाही!!)! तिथे तर अस्मादिकांची दांडी गुल. त्यावेळी कुणा मुलीशी बोलणे तर दूरच पण बघणे देखील धाडसाचे! मला अजूनही स्पष्ट आठवत आहे, ती आणि गीता, दोघीही मागील बेंचवर बसायच्या तरीही वर्गात प्रथम क्रमांकाने यायच्या. गीताने शाळा पुढे सोडली पण मीनल शेवटपर्यंत पहिल्या क्रमांकाच्या शर्यतीत असायची. पुढे तिला चष्मा लागला (त्यामुळे तर व्यक्तिमत्व अधिकच गूढ, बौद्धिक झाले.... ) 
आमची खरी ओळख आपला गृप झाला आणि झाली. मळवलीच्या पहिल्या पिकनिकमध्ये,  शनिवारी रात्री गाण्याच्या भेंड्या सुरु झाल्या आणि मीनल फार्मात आली. माझ्याच बाजूला बसली होती. आजही एक आठवण लख्ख आहे. *र* अक्षर आले होते. या अक्षरावरून पुढे पुढे फार गाणी आठवत नाहीत आणि एकदम मीनलने "रे तुझ्यावाचून काही येथले अडणार नाही" हे भावगीत सुरु केले आणि अनिल थक्क. वास्तविक इतके सुंदर भावगीत कसे काय विस्मरणात गेले कुणास ठाऊक. अनंता माझ्या कानात पुटपुटला - शाळेतही पहिला नंबर आणि आता इथेही..... खरंतर त्यावेळी प्राची माझ्या डाव्या बाजूला आणि मीनल माझ्या उजव्या बाजूला,  दोन मित्र पलीकडे!! अशा परिस्थितीत माझा गळा तर सुकलेलाच होता पण गाणी तरी कशी सुचणार!! कसेतरी अवसान आणून मी गाणी म्हणण्याचा प्रयत्न करीत होतो.
तर अशी ही मीनल. या पिकनिकनंतर आमची ओळख घट्ट व्हायला लागली. या गृपवर उद्मेखूनपणे माझ्याशी "पंगा" घेणाऱ्या दोनच. 1) औंधची महाराणी - प्राची आणि 2) महान विदुषी मीनल. या दोघींना या उपाध्या मीच लावल्या कारण त्या दोघीच कारणीभूत आहेत. या दोघींनीच मला असंख्य पदव्या बहाल केल्या की आता इथे मला "अनिल" म्हणून कुणीही हाक मारत नाही! अशा परिस्थितीत मला "जिवंत" राहण्यासाठी काहीतरी करणे भागच होते. म्हणूनच मी अशा उपाध्या लावल्या! या दोघी कधीही माझ्याशी सरळ बोलल्या नाहीत पण मला हेच मनापासून आवडते.
मीनल तर प्रसंगी - "पंडितजी, वाद घालता येत नसेल तर गप्प बसा" असे सहजपणे खडसावते. अर्थात गप्प बसणे अनिलच्या स्वभावातच नसल्याने मी देखील तिच्या वाक्यातील काहीतरी खुसपट काढतो.सुदैवाने तितकी तिरकी नजर थोडीफार मिळाली असल्याने माझे थोडेफार निभावते.यात महत्वाचा भाग म्हणजे मीनल मोकळेपणी खडसावते.मग त्यात खवचटपणा ओतप्रोत भरलेला असतो.मी बरेचवेळा बरेच ठिकाणी लिहीत असतो आणि त्यावरून माझी यथेच्च टर  उडवण्यात प्राची आणि मीनल नेहमी आघाडीवर पण मला हे सगळे मनापासून भावते. 
अर्थात हा झाला मीनलच्या स्वभावातील एक भाग. कधीकधी मला पण इथे काही लिहायचा कंटाळा येतो कारण मी काहीही लिहिले तरी कुणी व्यक्तच होत नाही!! माझ्या शैलीची इथेच मीनलकडून व्यवस्थित टिंगल उडवली जाते पण मी कधी  काही दिवस लिहिले नाही तर उद्मेखूनपणे मीनलचा फोन येणार.सर्वात आधी प्रकृतीची चौकशी करणार आणि ती ठीक आहे म्हटल्यावर जिभेचा सट्टा आणि पट्टा सुरु करणार. फोनवर अव्याहतपणे बोलत असते. मग मध्येच तिच्या लक्षात येते, अनिल काहीच बोलत नाही!! हे ध्यानात आल्यावर ती अधिक तिखट बोलते. हे सगळे अत्यंत निर्लेप मनाने चालते कारण एकमेकांत असलेला विश्वास. हा विश्वास मला फार मोलाचा वाटतो आणि त्याच जीवावर मी इथे उंडारत असतो. 
अशावेळी ती अतिशय हुशार आहे आणि अनिल "ढ" आहे, असले विचार देखील कुणाच्या मनात येत नाहीत. मीनल तल्लख तर आहेच पण तितकीच हळवी आहे. मध्यंतरी माझी तब्येत बरीच बिघडली होती (वास्तविक आजही तितकी ठीक नाही पण पूर्वीपेक्षा काबूत आली आहे) आणि अशा वेळेस हमखास मीनलचा फोन येणार. अशावेळी मात्र फोनवर गंभीर बोलणे चालणार.मी ठीक आहे याची पूर्ण खातरजमा करणार. त्यासाठी सलग अर्धा तास फोनवर चौकशी करणार. 
पूर्वी ती बँकेत नोकरी करीत होती. काहीवेळेस मी उगाचच तिला फोन करीत असे (बँकेत फारसे काम नसते असे मला फार पूर्वीपासून वाटत असे!! आता इथले बँकर चवताळणार....) पण काहीवेळा ती कामात असायची, म्हणजे तसे फोनवर तरी सांगायची!! गमतीचा भाग म्हणजे त्या संध्याकाळी मीनलचा फोन हमखास येणार.
आजही तिचा फोन अधूनमधून येतो - वास्तविक आता ती निवृत्त झाली आहे तरी अधूनमधून फोन....अशाच आमच्या गप्पा रंगतात. बोलताना कोण कुठे घसरतो याचीच वाट बघणार आणि जरा संधी मिळाली की लगेच वाक्ताडन सुरु करणार. मला हे सगळे फार आवडते कारण इथे आणि अशाच वेळेस माझे पाय जमिनीवर ठेवण्यात हिचा सहभाग असतो. मला "लेखक" असे चिडवण्यात मीनल नेहमी पुढे आणि ती पुढे असतें हे मी गृहीतच धरून इथे व्यक्त होतो. वास्तविक मी या आधीही काही मित्र/मैत्रिणींवर थोडेफार लिहिले आहे आणि ते मी माझ्या ब्लॉगवर टाकले आहे. लिहिताना मला असेच वाटते, मी नेमके लिहिले आहे पण आज वाचताना त्यातील अपूर्णता जाणवते. ती व्यक्ती मला अचूक शब्दात अजिबात मांडता आली नाही अशीच भावना झाली. मीनलबाबत असेच होणार आहे.
परंतु मैत्रीच्या नात्यात असा "जिव्हाळा" निर्माण होणे,  यासारखा आनंद नाही आणि या पेक्षा वेगळी अपेक्षा करणे देखील चूक आहे. माझ्या मनात अशी भावना निर्माण झाली कारण मीनलची निर्व्याज मैत्री. 




Saturday 15 February 2020

परकीय नागरिक प्रश्न

खरे पहाता परकीय नागरिक हा जागतिक प्रश्न झाला आहे आणि कुठलाच देश या प्रश्नापासून दूर राहिलेला नाही. परकीय नागरिक स्वीकारावेत असे म्हणताना मानवी दृष्टिकोन स्वीकारावा असे म्हणणे वारंवार मांडले जाते  परंतु मानवी दृष्टिकोन कुठल्या देशाने स्वीकारला आहे? या प्रश्नाचे उत्तर मिळत नाही. ज्या अमेरिकेने परकीय नागरिक ही संकल्पना घटनेद्वारे स्वीकारली त्या देशाला आता पश्चात्ताप करायची पाळी आली आहे आणि ही वस्तुस्थिती आहे. आज बाहेरून नागरिक येऊन स्वीकारणे हा प्रचंड मोठ्या व्याप्तीचा प्रश्न झाला आहे. अमेरिका, ऑस्ट्रेलिया,न्यूझीलंड,कॅनडा इत्यादी देशात अजूनतरी परकीय नागरिक स्वीकारण्याचे धोरण चालू आहे परंतु त्यांनीही आपले कायदे बरेच कडक केले आहेत आणि त्याची तितक्याच गंभीरपणे अंमलबजावणी चालू आहे. याचे महत्वाचे कारण असे दिसते, या धोरणाचा शेजारील राष्ट्रांनी किंवा गरीब राष्ट्रांनी अतोनात फायदा उठवला,कायद्यातील असंख्या पळवाटा शोधल्या, अनेक गैर मार्ग अवलंबले. विशेषतः आशिया आणि आफ्रिका खंडातील नागरिकांनी याचा भरपूर फायदा उपटला. 
आता काही स्वानुभव लिहितो. मी दक्षिण आफ्रिकेत जवळपास १७ वर्षे राहिलो आणि नोकरीच्या निमित्ताने Cape province वगळता बहुतेक सगळ्या राज्यांत नोकरी केली. जसे भारतात मुंबई शहराचे स्थान आहे तसेच दक्षिण अफरिकेत जोहान्सबर्ग शहराचे स्थान आहे. It is financial capital of South Africa. त्यामुळे नोकऱ्यांचे प्रमाण तसेच लोकसंख्या भरपूर. पगाराचे प्रमाण देखील बरेच वाढीव असते - अर्थात राहणीमान महाग असणे तद्नुषंगाने येते. स्थानिक लोकं देखील याच शहरात राहणे पसंत करतात. वास्तविक दक्षिण आफ्रिकेत बाहेरून माणसे बोलावणे ही रूढ पद्धत नाही, जसे इतर आफ्रिकन देशांत आहे. एकतर १९९४ पर्यंत हा देश वाळीत टाकलेला त्यामुळे विशेषतः भारतीय लोकांना या देशात सरळ मार्गे प्रवेश निषिद्धच होता. हळूहळू यात बदल होत गेला. २००० नंतर बऱ्याच भारतीय कंपन्यांनी तिथे आपली कार्यालये थाटली आणि त्यानिमित्ताने अनेक भारतीय दक्षिण आफ्रिकेत यायला लागले. अर्थात याच सुमारास तिथल्या सरकारने Black Empowerment कायदा पास केला आणि नोकऱ्यांत कृष्णवर्णीयांसाठी खास कोटा राखायला सुरवात झाली. याचा परिणाम असा झाला, दुसऱ्या देशांतून माणसे कशाला आणायची? हा प्रश्न चव्हाट्यावर आला आणि त्यावर अनेक बंधने आली. 
याचा परिणाम होणारच होता कारण दक्षिण आफ्रिका म्हणजे आफ्रिका खंडातील युरोप!! जवळपास वर्षभर थंड हवामान, पायाभूत सुविधांचे अप्रतिम जाळे देशभर पसरलेले आणि देशाची आर्थिक परिस्थिती इतर आफ्रिकन देशांपेक्षा निश्चितच उंचावलेली. जशी बंधने वाढली आणि जाचक व्हायला लागली तशी निरनिराळ्या वाटा शोधायला सुरवात झाली. जोहान्सबर्ग शहरातील "लोडियम" किंवा "अलेक्झांडर" ही उपनगरे या मुद्द्यातील फार लक्षणीय गावे आहेत. "अलेक्झांडर" गाव तर वेश्यागृहे, ड्रग्स इत्यादी गोष्टींसाठी प्रसिद्ध आहे आणि तिथे बव्हंशी लोकसंख्या ही "नायजेरियन" आहेत. शिक्षणाचं नावाखाली येतात आणि असले धंदे सुरु करतात. आज दक्षिण आफ्रिका देशाला ड्रग्सने विळखा घातला आहे. या देशातील नागरिकांनी इथे अवैध प्रवेश मिळवला आणि या देशाला भ्रष्टाचार शिकवला. याचा अर्थ पूर्वी भ्रष्टाचार नव्हता असे नव्हे परंतु त्याचे प्रमाण बरेच कमी होते. जोहान्सबर्ग शहर आता ड्रग्स, वेश्या व्यवसाय आणि प्रचंड असुरक्षितता यासाठीच प्रसिद्ध झाले आहे - पूर्वी असे नक्कीच नव्हते. 
"लोडियम" उपनगर तर संपूर्णपणे भारतीय/पाकिस्तानी नागरिकांनी व्यापलेले आहे. माझा इथे बराच संबंध आला. एकतर याच भागात मोठी Indian Stores आहेत त्यामुळे आठवड्याच्या खरेदीसाठी इथे येणे भाग पडायचे. त्यानिमित्ताने माझी बऱ्याच भारतीय लोकांशी ओळख झाली जे लोडियम  राहात होते. दोन ,तीन वेळा त्यांच्या घरी देखील गेलो. घर म्हणजे मुंबईच्या भाषेत 1BHK अशी छोटेखानी घरे. तेव्हड्या जागेत ५,६ जण राहायचे. बहुतेक सगळे विना परवाना या देशात घुसलेले!! बोट्स्वाना मधून दक्षिण आफ्रिकेत बरेच घुसखोर आले आहेत आणि यात निव्वळ भारतीय नसून पाकिस्तानी,नायजेरियन इत्यादी देशांतून आलेले आहेत. भारतीय आणि पाकिस्तानी लोकं Asylum basis वर प्रवेश मिळवतात आणि तसेच वर्षानुवर्षे राहात असतात. लोकल पोलिसांना याची संपूर्ण माहिती असते. दर रविवारी हे पोलीस या वस्तीवर धाड टाकतात आणि आठवड्याचे पैसे घेऊन जातात!! 
असे राहणारे बरेचसे अर्धशिक्षित असतात त्यामुळे कायदेशीर परवाना मिळाले जवळपास अशक्य असते. इथली माणसे मग किराणा मालाच्या दुकानात किंवा तिथल्या भारतीय/पाकिस्तानी हॉटेलमध्ये कामे मिळवतात - अगदी कपडे, भांडी धुणे असली कामे करतात. माझ्या माहितीत काही जण तर ७,८ वर्षे अशीच भणंगावस्थेत रहात आहेत. भारतात यायचे दोर कापलेले असतात त्यामुळे परत येणे अशक्य होऊन बसले असते. परत यायचे म्हणजे पासपोर्टवर deportation stamp बसणार!! काही भारतीय/पाकिस्तानी मुले तर वेश्यागृहात कामे करीत आहेत. 
आता प्रश्न असा पडतो, यांना असले अगतिक जिणे का जगावेसे वाटते? अर्थात यात एक मेख अशी आहे, समजा त्यांनी एखाद्या दक्षिण आफ्रिकन मुलीशी (बहुदा काळया मुलीशी ) विवाह केला तर त्यांना कायद्यान्वये रहाता येते पण असले लग्न कमीतकमी ३ वर्षे तरी टिकवावे लागते!! पण प्रत्येकाला असे "भाग्य" कसे लाभणार? आता परिस्थिती फार गंभीर आणि म्हणून खडतर झाली आहे. सरकारला याची जाणीव झाली आहे. परिणामी deportation चे प्रमाण वाढले आहे. "वसुधैव कुटुंबकम" वगैरे सुविचार पुस्तकातच साजिरे असतात. प्रत्यक्षात कुणालाही हा विचार मान्य नसतो.दक्षिण आफ्रिका देश म्हणजे आफ्रिका खंडातील युरोप!! त्यामुळे या देशाचे आकर्षण इतर देशातील नागरिकांना अतोनात आहे. इथले हवामान. इथल्या सुविधा, infrastructure, राहणीमान इत्यादी गोष्टीचे मोठे आकर्षण आहे. त्यातून युरोपपेक्षा इथे स्वस्ताई आहे. १९९४ पर्यंत हा देश भारताने वाळीत टाकलेला परंतु पुढे स्वीकृती मिळाल्यावर अवैध प्रवेश मिळवण्याकडे भर वाढला. वास्तविक दक्षिण आफ्रिकन पासपोर्टवर लंडनच्या हीथ्रो किंवा कुठल्याही विमानतळावर visa on arrival ( ६ महिन्यांपुरता ) मिळत असे परंतु पुढे इंग्लंडला समजले, इथे "बनावट" पासपोर्टवर बरेचजणांनी ब्रिटनमध्ये प्रवेश मिळवला आणि कधीच परतले नाहीत. आता ब्रिटनने ती सवलत बंद केली.  
आता तर दक्षिण आफ्रिकन सरकारने Work Permit Law अतिशय अवघड आणि किचकट करून टाकला आहे. एक उदाहरण देतो, मी तिथे एका भारतीय कंपनीत काम करीत होतो. त्यांचे मुख्य ऑफिस मुंबईमध्ये आणि त्यानुसार एकजण Inter Company Transfer तत्वावर या कंपनीत आला. इथे येताना तो Business Visa घेऊन आला परंतु शेवटपर्यंत त्याला Work Permit मिळाले नाही आणि अखेरीस ती व्यक्ती मुंबईत परतली!! 
परकीय नागरिकांचा प्रश्न आता जागतिक होऊन बसला आहे आणि आता तर प्रत्येक देश स्वतःपुरता विचार करीत आहे आणि तत्वतः त्यात काहीच चूक नाही. 

आईये मेहरबां

संध्याकाळची शांत, मंद, मदिर वेळ. नेहमीचे हॉटेल तसे ओकेबोके वाटत होते, अजूनही हॉटेलमध्ये येणाऱ्या गिऱ्हाइकांची वर्दळ नसल्याने एकूणच आसमंत काहीसा निर्जीव" भासत होता. हळूहळू एकेक करून माणसे येउन, टेबलावर बसायला लागली आणि ते हॉटेल "जिवंत" व्हायला लागले. संध्याकाळी, इथे दर दिवशी गाणी आणि नृत्याचा कार्यक्रम, हे खरे आकर्षण असल्याने बरेचसे "आंबटशौकीन" तसेच खलबते करणारी माणसे आजूबाजूला वावरायला लागली. 
गाण्याचा कार्यक्रम असल्याने, स्टेजवर वादक आपली वाद्ये जुळवून, गायिकेच्या प्रतीक्षेत. अचानक, हॉटेलमध्ये गिटार,चेलो आणि clarinet वाद्ये झंकारायला लागली आणि ते वातावरण धुंद व्हायला लागले. नेहमीची माणसे यायला लागली आणि स्टेजवर गायिकेचे आगमन होते!! आगमन होतानाच, तिच्या गळ्यातून धुंद करणारा आलाप येतो आणि वातावरणात खऱ्याअर्थी "नजाकत" निर्माण होते. 
चित्रपट "हावरा ब्रिज" मधील, "आईये मेहरबां" हे अत्यंत लोकप्रिय गाणे आणि त्या गाण्याची ही पार्श्वभूमी. दिग्दर्शक शक्ती सामंता यांनी, हे गाणे चित्रित करताना, खूपच कल्पकता दाखवली आहे. अर्थात, संगीतकार ओ.पी. नैय्यर यांच्या रचनाकौशल्याचा सिंहाचा वाटा. गाण्यात , मधुबाला, अशोक कुमार आणि के.एन.सिंग असे तगडे अभिनेते आहेत. असे असून देखील पडद्यावर छाप पडते, ती मधुबालाचीच.  
"तोंच वाजल्या तुझ्या सपाता सळसळला घोळ 
आलीस मिरवित चालीमधुनी नागिणीचा डौल, 
करांतून तव खिदळत आले स्तनाकार पेले
जळता गंधक पाच उकळती यांही रंगलेले."
कविवर्य बा.भ.बोरकरांच्या अविस्मरणीय ओळींची ग्वाही देत, मधुबाला स्टेजवर येते ती अशाच एखाद्या नागिणीचा डौल घेऊन आणि त्याच्या साथीला आशा भोसल्यांचा अवर्णनीय मादक स्वर. पडद्यासारखी निर्जीव चीज देखील हे सौंदर्य बघून बावचळून जायची तिथे आपल्यासारख्या स्खलनशील मानवाचे काय वर्णावे!! स्टेजवर तिचा जो प्रवेश आहे, तो खास बघण्यासारखा आहे. आपण एका हॉटेलमधील प्रसिद्ध गायिका आहोत आणि आपले काम, हॉटेलमध्ये येणाऱ्या माणसांचे मन रिझवणे, हे आहे आणि या कामाची पूर्तता, तिच्या स्टेजवरील आगमनातून पुरेपूर दिसून येते. खरेतर पुढील सगळे गाणे म्हणजे गाण्यावर अभिनय कसा करावा याचा सुंदर वस्तुपाठ आहे. 
आता आपण गाण्याकडे वळूया. गाण्यातील शब्दकळा काही असामान्य अशी अजिबात नाही, अर्थात हॉटेलमधील नृत्यगीत आहे म्हणजे त्यात अलंकारिक भाषा,प्रतिमा, उपमा यांना फारशी जागा नसते. परंतु तरीही शब्द लिहिताना, चालीचा "मीटर" ध्यानात घेऊन, चित्रपटातील प्रसंग डोळ्यासमोर ठेऊन रचना करावी(च) लागते. चित्रपट गीतकारांना उठसूट नावे ठेवण्याची आपल्याकडे पद्धत आहे पण त्यांनी या बाजूकडे देखील लक्ष दिले तर असला "फिजूल" आरोप करण्याकडे ते वळणार नाहीत.  चित्रपट गीत लिहिण्याचे एक तंत्र असते. पडद्यावरील पात्राचा स्वभावविशेष ध्यानी घेऊन, त्याच्या अंतरंगाचा विशेष गीताद्वारे प्रगट करणे, इतपतच चित्रपट गीत लिहिताना ध्यानात ठेवावे लागते. अर्थातच तारेवरची कसरत सांभाळताना, जर का गाण्यातील शब्दात गूढ प्रतिमा, अनघड शब्द
आले तर, साहजिकच संगीतकाराला स्वररचना करताना बंधनांना सामोरे जावे लागते. परिणामी गाण्याची परिणामकारकता दुर्बळ होऊ शकते. प्रत्येकवेळेस शब्दरचना "चटपटीत" असायलाच हवी, हा अत्यंत ढोबळ निकष झाला. अर्थात, प्रस्तुत गाण्याची गरज ध्यानात घेता इथे "अंतर्मुख", "खोलवर आशय" इत्यादी मुद्द्यांची अजिबात गरज नाही. पडद्यावरील पात्राची व्यक्तिरेखा नेमक्या शब्दांनी अधोरेखित करणे, इतपतच गाण्यातील शब्दांचे महत्व आणि ती "मागणी" यथास्थितपणे पुरवली जाते. अर्थात, चित्रपट गीताचा हाच एकमेव निकष, असे म्हणणे दिशाभूल करणारे ठरेल. चित्रपट गीतांत देखील शब्दरचनेचे वेगवेगळे "घाट" स्विकारता येतात.
गिटारच्या पहिल्या सुरांपासून गाण्याचे "घराणे" ध्यानात येते. आता हॉटेलमधील नृत्यगीत आणि ते हॉटेल देखील संपूर्णपणे पाश्चात्य धाटणीचे म्हटल्यावर गाण्याची चाल देखील त्याच धर्तीवर असणार, हे ओघानेच आले. गाण्याच्या सुरवातीच्या वाद्यमेळात गिटार, चेलो सारखी वाद्ये वाजत असतात आणि त्या वाद्यांनी गाण्याची अप्रतिम पार्श्वभूमी तयार झाली आहे. इथे आणखी एक बाब नजरेसमोर आणावीशी वाटते. आपल्याकडे संगीतकार किंवा रचनाकार म्हटले की त्याला रागदारी संगीताचे प्राथमिक ज्ञान आणि परिपूर्ण अभ्यास असणे गरजेचे आहे, असा प्रवाद प्रसिद्ध आहे. मला स्वत:ला तसे वाटत नाही. या गाण्याचे संगीतकार ओ.पी.नैय्यर यांनी असा कुठलाही अभ्यास केला नव्हता पण तरीही त्यांच्या कितीतरी रचना या रागदारी संगीतावर आधारित आहेत आणि त्या रचना करताना, कुठेही चाचपडलेपण आढळत नाही. चित्रपट गाणे हा एक स्वतंत्र आविष्कार असतो आणि त्यासाठी काव्याची जाणकारी तसेच वाद्यांची परिभाषा माहितीची असली तरी देखील खूप प्रमाणात पुरेसे ठरू शकते. 
"आईये मेहरबान, बैठीये जानेजां 
शौक से लिजिये, इष्क की इम्तेहान."
इथे आशाबाईंनी "आईये" शब्द कसा घेतला आहे, हे ऐकण्यासारखे आहे. स्वरांत जितका म्हणून "मादक"पणा आणता येईल (यात कुठेही उठवळ वृत्ती दिसत नाही आणि हे फार महत्वाचे) तितका आणला आहे गाताना किंचित "आ"कार लांबवला आहे आणि त्यातूनच गाण्याचा पुढील विस्तार कसा असेल, याचे मदभरे सूचन केले आहे. "आईये" शब्दाचा किंचित उच्चार करून त्यालाच जोडून "हुंकारात्मक" स्वरिक आवाहन आणि त्याच्या जोडीला मधुबालाची दिलखेचक हालचाल!! सगळा "माहौल" तयार!! हॉटेलमध्ये पाहुणे आले आहेत आणि त्यांच्यासाठी आजची संध्याकाळ अविस्मरणीय करायची, याच उद्देशाने ही रचना बांधली आहे आणि मग त्यासाठी "ला ला ला" असे निरर्थक शब्दोच्चार देखील अर्थपूर्ण ठरतात. ही किमया आशाबाईंच्या अलौकिक गायनाची. स्वरावली कागदावर असते परंतु गायकाच्या गळ्यातून खऱ्याअर्थाने, त्या स्वरावलीला पुनर्जन्म मिळतो आणि मग ती रचना चिरंजीव होते. 
गाण्याची धाटणी ही सरळ,सरळ पाश्चात्य "waltz" धर्तीवर आहे आणि त्याच थाटात, गाण्याचा नृत्याविष्कार आहे.वास्तविक "Waltz" हा सरळ, सरळ पाश्चात्य संगीताविष्कार आहे आणि इथे त्याच आकृतिबंधाचा सढळ उपयोग केलेला दिसतो. "Waltz" हा एक प्रभावी नृत्यप्रकार आहे. जोडप्यांनी एकत्र येऊन केलेले नृत्य, यात "Ballet" या प्रकाराचा देखील समावेश होतो. या संगीताचे स्वतःचे असे शास्त्र आहे आणि त्याचे खास नियम देखील आहेत. आता या गाण्याच्या संदर्भात विचार करायचा झाल्यास, गाण्याच्या सुरवातीची जी स्वररचना आहे, त्या रचनेतून "Waltz" चा बंध स्पष्टपणे मिळतो आणि त्यामुळे गाण्याची पार्श्वभूमी गडदपणे आपल्या समोर येते.
तालासाठी जरी काही ठिकाणी "चायानीज ब्लॉक" हे वाद्य वापरले असले तरी गाणे जेंव्हा सुरु होते तिथे संगीतकाराने, ज्या वाद्याच्या  आधारे सगळी कारकीर्द सजवली त्या ढोलक वाद्याचा आणि जोडीने पारंपारिक तालाचा वापर केला आहे. हॉटेल मधील पाश्चात्य धर्तीवर गाणे आणि तरीही तालाला ढोलक!! अर्थात याचे श्रेय पूर्णपणे संगीतकाराकडे जाते. तालाला ढोलक असूनही गाणे कुठेही "विशोभित" होत नाही!! 
गाणे जरी सर्वस्वी मधुबालाचे असले तरी अशोक कुमारचे अस्तित्व देखील खास आहे. तोंडात रुबाबात सिगारेट पेटवून, धूर काढत असताना, ओंठावर जे हास्य विलसत ठेवले आहे, ते बघत गाणे ऐकणे हा सुंदर अनुभव दार्शनिक अनुभव ठरतो. खरेतर या अभिनेत्याच्या प्रत्येक हालचालीत "ग्रेस" आहे, कुठेही "बेंगरूळ" होत नाही. मधुबाला आपल्यावर "फिदा" आहे, याचा अभिमान तसेच ती गाताना शेजारी(च) बसलेल्या के.एन. सिंगला सतत डिवचत असते (हे डिवचणे देखील अतिशय लाघवी आहे!!) त्यामुळे सुखावलेला अहंकार देखील बघण्यासारखा आहे. गाण्यात शेवटाला. मधुबाला त्याला, आपल्याबरोबर नृत्य करायचे आमंत्रण देते, त्यावेळचा आविर्भाव देखण्यालायक आहे. 
"कैसे हो तुम नौजवान, कितने हसीन मेहमान 
कैसे करू मैं बयां, दिल कि नहीं हैं जुबां."
गाण्यातील आशय ध्यानात ठेऊन, चित्रीकरण केले असल्याने गाणे ऐकण्याबरोबर बघायला देखील मनोरंजक आहे. वरील ओळीतील "नौजवान" शब्दावर Camera अशोक कुमारच्या चेहऱ्यावर क्षणमात्र स्थिर ठेवला असून, या ओळीच्या वेळेस, दोघांनाही असेच वाटत असते मधुबाला "आपलीच" आहे!! गाण्याची चाल तशी प्रत्येक टप्प्यात सारखीच आहे म्हणजे पहिला अंतरा वेगळा, दुसरा वेगळा असले प्रयोग नाहीत पण गाणे इतके वेगात पुढे सरकत असते की त्याची जाणीव देखील आपल्याला होत नाही. दोन्ही अंतऱ्याच्या मध्ये Waltz च्या तालावर twist नृत्याची जोड दिली आहे आणि त्याने गाण्यात वेगळीच खुमारी येते. वास्तविक पाश्चात्य नृत्य म्हणजे म्हणजे दोन शरीरांची भेट, इतपत तोकडा अर्थ नसतो तर शारीरिक हालचालीतून किंवा अंगप्रत्ययांतून तालाचे देखणे सौंदर्य दाखविले जाते फक्त ते ओळखण्याची "नजर" हवी!! 
"देखा मचल के जिधर, बिजली गिरा दी उधर 
किस का जला आशियां, बिजली को ये क्या खबर."
चाल तशीच आहे पण सादरीकरण बहारीचे आहे. या ओळींच्या वेळेस, मधुबाला, के.एन.सिंग यांच्या जवळ जाते पण त्यांना हुलकावणी देत, अशोक कुमारकडे वळते. दोन्ही वेळची देहबोली तर खास आहे. छचोरपणा नक्कीच आहे पण उठवळपणा नाही त्यामुळे ते "झुलवणे" देखील आल्हाददायक होते. 
गाण्याच्या सांगीतिक रचनेबद्दल थोडे दोन शब्द. मोहिनी घालणारे, भुलविणारे संगीत तसेच अशारीर प्रेम किंवा रूढीमान्य, शिष्टसंमत प्रेमाविरुद्ध बंड पुकारणारे भाव, परकीय वाटणाऱ्या आणि चमकदार वाद्यध्वनींचा कौशल्यपूर्ण वापर आणि सर्वसाधारणत: मान्य भाषिक आणि उच्चार संकेतांना तिलांजली अशी यादी करावी लागेल. स्पष्ट बोलायचे झाल्यास, या प्रकारच्या गीतांना सूक्ष्म सुरेलपणापासून दूर सरकायचे असते. संबंधित गायक वा वादक यांना सुरावट दाखवता, दाखवता नियंत्रित पद्धतीने बेसूर होता यावे यासाठी चालीत हेतुपूर्वक काही जागा निर्माण केलेल्या असतात. नैतिक कक्षेच्या बाहेर जाण्याच्या आशयास चालीतही जणू काही समांतर बांधणी असते. या सगळ्या आणि इतर अनेक वैशिष्ट्यांसाठी संगीतकार ओ.पी.नैय्यर निश्चित प्रशंसेस पात्र आहेत. 
हिंदी चित्रपट संगीतात, सी. रामचंद्र यांनी जो पाश्चात्य संगीताचा पायंडा पाडला त्या मार्गाला आणखी वेगळे वळण देण्याचे काम या गाण्याने केले आणि या मार्गावर आणखी अनेक विस्तार सुचविण्याच्या शक्यता भरपूर निर्माण केल्या. त्या दृष्टीने, हे गाणे निश्चितच एक "मैलाचा" दगड म्हणून गणले गेले. 

Tuesday 11 February 2020

जिथे सागरा धरणी मिळते

चित्रपट गीत आणि खाजगी भावगीत यात नेमका काय फरक आहे? चित्रपटातील गीत हे दृश्यभान जागवणारे असते, हे तर आहेच परंतु एक आविष्कार म्हणून विचार केला तर वस्तुतः त्यात काही फरक नसतो. चित्रपट असल्याने तिथे आर्थिक प्रश्न फारसा नसतो आणि त्यामुळे मोठा वाद्यमेळ वापरण्याची संधी प्राप्त होत असते. हे देखील अविष्कार म्हणून थोडे नगण्य कारण ठरते. कारण मोठा वाद्यमेळ हा नेहमीच स्वररचनेला पूरक असतो किंवा सर्जनशीलतेला नवे विस्तार परिमाण देणारा असतो. मूलभूत घटक तर तेच असतात, सादरीकरण तसेच असते म्हणजे मुखडा - पहिला अंतरा - दुसरा अंतरा अशीच मांडणी असते. पण तरीही आपल्याकडे दोन्ही आविष्कार भिन्न  असल्याचे अकारण मानले जाते. तेंव्हा आज आपण जे गाणे आस्वादणार आहोत ते या दोन्ही प्रकारांत सहज बसू शकेल असे आहे. "जिथे सागरा धरणी मिळते" हे गाणे प्रथमक्षणी ऐकले तर चित्रपटाला वाटतच नाही. अर्थात त्यामागे कारणे अनेक आहेत आणि त्या दृष्टीनेच आपण गाणे ऐकणार आहोत. 
पी.सावळाराम या लोकप्रिय कवीची शब्दरचना आहे. मराठी भावगीतात अग्रस्थानी असलेले नाव. या गाण्याचे संगीतकार वसंत प्रभू आणि पी.सावळाराम यांनी एक काळ प्रचंड गाजवला होता. असंख्य मराठी भावगीते लोकप्रयिय झाली होती. आता कवी म्हणून विचार करायला गेलो तर या कवितेत किंवा इतर बहुतांश कवितेत आशयदृष्ट्या फार काही नवीन मिळत नाही परंतु भावसंगीताची एक अट असते, हाताशी येणारी कविता गेयबद्ध असणे. या कवीच्या रचना जर का वाचायला घेतल्या तर त्यातील गेयता आणि लयबद्धता आपल्याला आकर्षून घेते. आता शब्दरचनेत सुद्धा फार काही हाताला मिळत नाही. प्रतिमा सगळ्या बहुतांशी ढोबळ अशाच आहेत, किंबहुन काहीशा बाळबोध अशाच प्रतिमा आहेत. उदाहरणार्थ "बघुनी नभीची चंद्रकोर ती, सागर हृदयी उर्मी उठती" या ओळींमधून खरतर काही वेगळा आशय मिळत नाही परंतु भावसंगीताची स्वतःची अशी मागणी असते, गाण्याच्या चालीच्या "मीटर"मध्ये शब्दरचना हवी जेणेकरून गाताना कुठेही फारसे अवघडलेपण येऊ नये आणि ती गरज ही शब्दकळा पूर्ण करते. कवितेतील दुसरा अंतरा वाचायला गेल्यास, दुसरी ओळ - "रम्य बाल्य ते जिथे खेळले" या  ओळीत "रम्य" आणि "बाल्य" अशी दोन जोडाक्षरे एकापाठोपाठ आहेत. गायन करताना अशा शब्दांचे गायन करणे कठीण होऊन बसते आणि त्यामुळे पुढे "तिथे" या शब्दावर अकारण जोर येतो कारण लयीचे बंधन पडते. परंतु एकूणच साधी, सरळ, सोपी अशी शब्दरचना आहे आणि मुख्य म्हणजे चित्रपटाला साजेशी आहे. 
गाण्याची चाल यमन रागावर आहे. गाण्याच्या सुरवातीला "हमिंग"आहे ते यमन रंगाची ओळख करून देते. "नि रे ग" हे स्वर म्हणजे ठळक यमन राग. आपली प्रत्येक चाल ही फक्त आणि फक्त मेलडीवरच आधारलेली असायला हवी, इतकी ठाम धारणा या संगीतकाराच्या स्वररचनेतून ऐकायला येते. भारतीय कलासंगीताचा असा वापर करणारे जे थोडेफार संगीतकार मराठीत होऊन गेले त्यात हे नाव नि:संशय वरच्या श्रेणीत यावे. चाली सोप्या असता पण बाळबोध नाही. सरळ सोपी वाटणारी लय एकदम कठीण होते. सगळे अंतरे मुखड्याशी समांतर बांधले आहेत.मुळात चालीचा गोडवा इतका विलक्षण आहे की ऐकणारे सुरवातीपासून गुंगून जातो. चालीचा एकंदरीत विचार केल्यास, स्निग्धता आणि प्रेमभावना याचे मिश्रण आढळते. तसेच सुरावट आणि लयबंध यांची थोडी गतिपुर्ण अशी चलने आहेत. वाद्यमेळात व्हायोलिन सारखे वाद्य प्रमुख आहे पण तरीही मेंडोलिन, गिटार इत्यादी वाद्यांचा अतिशय संयमित वापर आहे. खरतर वाद्यमेळ तसेच गायन,  दोहोंत नेहमीच संयमित सादरीकरण हेच या संगीतकाराचे व्यवच्छेदक लक्षण म्हणता येईल. थोडक्यात भारतीय वाद्यांवर काहीसा अंतर्मुख ठेका चाललेला आहे पण याच वेळी पाश्चात्य वाद्यांवर बहिर्मुख लयबंध चाललेला आहे. या सूक्ष्म लयसंकरामुळे गीताच्या भावाशयास आवश्यक अशी स्थिरता प्राप्त होते. 
गायिका सुमन कल्याणपूर यांनी आपल्या गायकीचे संयत दर्शन घडवले आहे. आवाजाचा पल्ला विस्तृत आहे. प्रत्येक अंतऱ्याची शेवटची ओळ वरच्या सप्तकात घेतली आहे परंतु तिथे गायन विनासायास होते. दुसरा विशेष म्हणजे पारदर्शी आवाज. अत्यंत स्वच्छ, निकोप गळा आहे. त्यामुळे सूर बाहेर पडताना त्यात कुठेही कातरता आढळत नाही की अडखळणे आढळत नाही. त्यामुळे गायनातून विस्तीर्ण भावपट धुंडाळता येतो. या गाण्यात प्रणयाची कबुली दिली आहे पण देताना स्वर कुठेही उत्तेजित किंवा अकारण लज्जित होत नाही. त्यामुळे सगळे गाणे भावस्पर्शी होते. 

जिथे सागरा धरणी मिळते 
तिथे तुझी मी वाट पहाते 

डोंगर दरीचे  सोडून घर ते  
पल्लव - पाचूचे तोडून नाते 
हर्षाचा जल्लोष करूनी जेथे प्रीत नदीची एकरूपते 

वेचीत वाळूत शंख शिंपले 
रम्य बाल्य ते जिथे खेळले 
खेळाचा उल्हास रंगात येउनी धुंदीत यौवन जिथे डोलते 

बघुनी नभीची चंद्रकोर ती 
सागर हृदयी उर्मी उठती 
सुखदु:खाची जेथे सारखी प्रीतजीवना ओढ लागते 




Saturday 1 February 2020

वक्त ने किया, क्या हंसी सितम

दोन कलासक्त जीव. एका औपचारिक प्रसंगातून ओळख होते, हळूहळू गाठ भेटी होतात, मने अनुरक्त होतात आणि मानसिक गुंतवणूक होते. कलेच्या माध्यमातून जवळीक निर्माण होते. पुरुष आधीच लग्नबंधात अडकलेला असल्याने, एका मर्यादेच्या पलीकडे स्नेहबंध वाढू शकत नाहीत. एव्हाना, स्त्री तिच्या कलाविश्वात यशाची नवीन शिखरे गाठत राहते आणि पुरुष मात्र अपयशाचा धनी!! त्यातून निर्माण होते ती अटळ मानसिक तडफड आणि दुरावा. 
अशाच एका विरक्त संध्यासमयी, या दोघांची अचानक गाठभेट होते. पूर्वीच्या आठवणी मनात येतात पण आता आपण कधीही जवळ येऊ शकणार नाही, ही जळजळीत जाणीव आतून पोखरत असते. आज, स्त्री यशाच्या शिखरावर असते तर पुरुष अपयशाच्या भोवऱ्यात भिरभिरत असतो. 
"कुठे दूर झाल्या तुझ्या पायवाटा
जळे उंबऱ्याशी दिवा रात रात 
धुक्याच्या दिशेला खिळे शुन्य दृष्टी 
किती उर ठेवू व्यथा गात गात". 
आरतीप्रभूंच्या या कवितेतील ओळी, वरील प्रसंग अधिक खोलवर सांगून जातो. "वक्त ने किया, क्या हंसी सितम' या गाण्याच्या संदर्भात तर या ओळी फारच चपखल बसतात. हिंदी चित्रपटातील एक अजरामर गाणे. सर्वसाधारणपणे हिंदी चित्रपटात, गाण्याचे चित्रण बरेचवेळा सरधोपट वृत्तीने केले जाते. चित्रपटात गाण्याचे अपरिमित असून देखील त्याचे चित्रीकरण "बाळबोध" करायचे, हा विरोधाभास असतो!! याला सणसणीत अपवाद म्हणजे "कागज के फुल' चा दिग्दर्शक गुरुदत्त. गुरुदत्तने कुठल्याही गाण्याचे चित्रीकरण कधीही मळलेल्या वाटेने केले नाही. 
कथा, सादरीकरण, अभिनय, Camera Work, काव्य, संगीत सगळ्याच दृष्टीकोनातून "कागज के फुल" हा चित्रपट अप्रतिम असून देखील, त्या काळी हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर सपशेल अपयशी ठरला!! हे कधीही न सुटणारे कोडे आहे. प्रस्तुत गाण्याचे चित्रीकरण तर खास अभ्यासाचा भाग ठरवा, इतके अप्रतिम आहे. संगीतकार सचिन देव बर्मन, यांच्या संगीताची खासियत सांगायची झाल्यास, चित्रपट बघून त्याप्रमाणे, आपल्या गाण्यांची रचना करण्याचे कौशल्य केवळ "बेमिसाल" असेच म्हणावे लागेल. प्रसंगी, काव्यानुरूप रचना बदलण्यासाठी त्यांनी कधीही मागे पुढे बघितले नाही. 
संपूर्ण गाणे, हे पार्श्वगीत आहे, सगळा आशय केवळ चेहऱ्यावर वाचता येईल, इतका अमूर्त अभिनय बघायला मिळतो. गाण्याची सुरवातच मुळी. संथ लयीतील पियानो आणि व्हायोलीन वाद्यांच्या सुरांतून होते. हा स्वरमेळ खास ऐकण्यासारखा आहे, व्हायलीनचे स्वर हे पार्श्वभागी वाजत असतात तर पियानोचे स्वर प्रमुख आहेत. पुढे त्यात, पुढे त्यात बासरीचे स्वर मिसळताना, पडद्यावर विस्तीर्ण अशा स्टुडियोचा अवकाश दिसतो आणि सुरवातीला एकमेकांच्या समीप असलेले दोघे, दूरस्थ होत जातात. या हालचालींना, ज्या प्रकारे वाद्यमेळाचे सूर साथ देतात, हा असामान्य स्वरिक अनुभव आहे आणि पुढे ऐकायला मिळणाऱ्या रचनेची "नांदी" आहे!! वाद्यमेळ इतक्या संथ आणि खालच्या सुरांत वाजत असतो की त्यातून व्यक्त होणारी अव्यक्त भावना अटळपणे आपल्या मनात झिरपते. संगीतकार म्हणून सचिन देव बर्मन किती श्रेष्ठ आहेत, याचा हा आदीनमुना!! 
"वक्त ने किया क्या हंसी सितम 
तुम रहे ना तुम, हम रहे ना हम". 
गायिका गीता दत्त इथे अवतरते, तिचा आवाज देखील ठाय लयीत आणि मंद्र सुरांत लागलेला आहे. अति व्याकूळ स्वर आहेत आणि सुरवातीच्या वाद्यमेळाच्या सुरांची संगत धरून ठेवणारे आहेत. ऐकणाऱ्याच्या मनावर गडद परिणाम घडवून आणणारे आहेत. खरतर सगळे गाणे हे विरही भावनांचे अव्यक्त स्वरूप व्यक्त करणारे आहे. गायिका गायला सुरवात करते तेंव्हा साथीला पार्श्वभागी बेस गिटार आणि पियानोचे स्वर आहेत पण त्या स्वरांचे अस्तित्व तसे नाममात्र आहेत. गीता दत्त, आपल्या गूढ, आर्त सुरांनी  असते. किंचित बंगाली गोलाई असलेला स्वर पण प्रसंगी आवाजाला टोक देण्याची क्षमता असल्याने, गायन अतिशय भावनापूर्ण होते. 
पहिला अंतरा यायच्या आधी, व्हायोलीन वाद्यांचे स्वर कसे बांधले आहेत, ते मुद्दामून ऐकण्यासारखे आहे. "ऑर्केस्ट्रा" पद्धतीचा सुरेख वापर केलेला आहे. वाद्यमेळाची रचना करताना, व्हायोलीन वादकांचे दोन भाग केले आहेत आणि त्यानुरूप रचना सजवली आहे. एक भाग मंद्र सप्तकात वाजत आहे तर दुसरा भाग तार सप्तकात वाजत आहे. तार सप्तकात जे व्हायोलीनचे सूर आहेत, त्यातून रिकाम्या,ओसाड स्टुडियोची प्रचीती येते तर खालच्या सुरांत वाजत असलेल्या सुरावटीने, पडद्यावरील अभिनेत्यांच्या तरल अभिव्यक्ती निर्देशित होतात.   
"बेकरार दिल इस तरह मिले 
जिस तरह कभी, हम जुदा ना थे 
तुम भी खो गये, हम भी खो गये 
एक राह पर चल के दो कदम". 
"इस तरह मिले" हे शब्द गाताना, "तरह" हा शब्द, आवाजात किंचित थरथर आणून गायला गेला आहे, परिणाम काव्यातील आशय खोल व्यक्त होणे. संगीतकाराला काव्याची नेमकी जाण असेल तर तो स्वररचनेतून किती प्रकारची अनुभूती रसिकांना देऊ शकतो, हे ऐकण्यासारखे(च) आहे. या गाण्याचा वाद्यमेळ ऐकताना, प्रत्येक शब्दानंतर व्हायोलीन वाद्याचे स्वर ऐकायलाच हवेत. व्याकुळता केवळ गायकीतून स्पष्ट न करता, वाद्यमेळातून देखील तितक्याच परिणामकारकरीत्या अधोरेखित केली जाते. हे फार, फार कठीण आहे. गाणे सजवणे म्हणजे काय, याचा हा रोकडा अनुभव आहे. 
" एक राह पर चल के दो कदम' ही ओळ जेंव्हा पडद्यावर येते, त्यावेळी, वरून प्रकाशाचा झगझगीत झोत येतो आणि त्या झोतात, पडद्यावरील अभिनेत्यांच्या "प्रतिकृती" सामावल्या जातात. हा प्रकार केवळ अप्रतिम आहे. दिग्दर्शक म्हणून गुरुदत्त काय ताकदीचा होता, हे दर्शवून देणारे हे गाणे आहे. प्रकाशाच्या झोतात, व्यक्तीच्या प्रतिमा मिसळणे, ही कल्पनाच अनोखी आणि काव्यमय आहे. गमतीचा भाग पुढे आहे. ही ओळ संपते आणि आपल्याला लगेच गाण्याच्या सुरवातीची ओळ "वक्त ने किया, क्या हंसी सितम" हे ऐकायला मिळते. या दोन्ही ओळींतील विरोधाभास ज्या प्रकारे चित्रिकरणा मधून तसेच सांगीतिक वाक्यांशातून दर्शवला गेला आहे, असे भाग्य निदान हिंदी चित्रपट गीतांच्या बाबतीत फारच तुरळक आढळते. सगळे गाणे म्हणजे छायाप्रकाशाचा मनोरम खेळ आहे. 
गायिका म्हणून गीता दत्तच्या आवाजाला मर्यादा आहेत. शक्यतो गुंतागुंतीच्या हरकती, तिच्या गळ्याला शोभत नाहीत परंतु मुळातले नैसर्गिक हळवेपण तसेच भावपूर्ण आवाज, यामुळे तिचे गायन अतिशय अर्थपूर्ण होते. आवाजात किंचित कंप आहे आणि तो कंप तिला, विविध प्रकारची गाणी गाण्यासाठी उपयोगी पडला. संगीतकार म्हणून सचिन देव बर्मन यांची कामगिरी मात्र अतुलनीय अशीच म्हणायला हवी. हिंदी चित्रपट गाण्यांत जेंव्हा रागदारी संगीताचा प्रभाव होता (अर्थात काही संगीतकार याला अपवाद होते) तेंव्हा लोकसंगीताचा आधार घेऊन, चित्रपट गीतांना नवीन पेहराव दिला. 
"जायेंगे कहां, सुझता नहीं 
चल पडे मगर रास्ता नहीं
क्या तलाश है, कुछ पता नहीं
बुन रहे है दिन ख्वाब दम-ब-दम"
इथे कैफी आझमी, कवी म्हणून फार वरची पातळी गाठतात. वरील ओळींमधील शेवटच्या दोन ओळी म्हणजे या गाण्याचा "अर्क" आहे. सगळी हताशता, मानसिक तडफड तसेच आतडे तुटण्याचा क्षण, सगळ्या भावना या दोन ओळींत सामावलेल्या आहेत. आत्ता या क्षणी आपण एकत्र आहोत, जवळ आहोत पण हे सगळे तात्पुरते आहे आणि एकदा हा क्षण विझला की परत आपण, आपल्या वाटांवर मार्गस्थ होणार आहोत. गाण्याच्या शेवटी आपल्याला पडद्यावर हेच दिसते. प्रश्न असा, हेच जर अटळ आहे, तर आपण आज एकत्र तरी का आलो? जी.ए. कुलकर्ण्यांच्या "प्रवासी" कथेत एक सुंदर वाक्य आहे. "इतरांचे प्रवास संपतात पण रस्ता मात्र अविरतपणे तसाच राहतो. आपला मात्र रस्ता संपला आहे पण प्रवास तसाच चालूच राहणार आहे!" इथे या दोन व्यक्तींचे असेच झाले आहे, जवळ येण्याचे सौख्य नाही पण आयुष्य मात्र निरसपणे चालूच रहाणार आहे. या चक्रव्यूहातून आता या दोघांपैकी कुणाचीही सुटका नाही आणि या अंतस्थ तडफडीचे जळजळीत वास्तव समजून घेणे, हेच या गाण्याचे खरे सौंदर्य.