Thursday 19 June 2014

भारतीय संगीत आणि संगीतशास्त्​र – बा.गं,आचरे​कर



मुळात कुठल्याही विषयावरील शास्त्र हे नेहमीच समजायला अवघड असते. त्यातून कलाविषयक शास्त्र तर अधिकच कठीण होते, याचे प्रमुख कारण म्हणजे कलाविषयात प्रचलित असलेली “प्रतीके” आणि त्याला अनुरोधून निर्माण झालेल्या “परंपरा”. संगीत कला या गोष्टीना अजिबात अपवाद नाही. संगीतात तर, इतक्या प्रतिमा अवतरलेल्या आहेत की, त्या प्रतिमांचा नेमका अर्थ बऱ्याचवेळा गोंधळात टाकतात. त्यातून मग निर्माण झालेल्या परंपरा अधिक जटिल आणि गुंतागुंतीच्या होतात. इथे एक गोष्ट प्रथमच मान्य करायला हवी आणि ती म्हणजे, भारतीय संगीत जरी हल्ली चिन्हांच्या सहाय्याने लिहिले जात असले तरी देखील त्याचा संपूर्ण आवाका ध्यानात येत नाही. बहुतेकवेळा स्वरांची कल्पना ध्यानात घेऊन आणि स्वर संवादाची गती ध्यानात घेऊनच, रचना अनुभवावी लागते. याच दृष्टीने हा प्रस्तुत ग्रंथ वाचवा लागेल.
पहिलेच प्रकरण,हे “भारतीय संगीताचे प्राचीन ते प्रचलित ग्रंथकार,शास्त्रकार” असे आहे. अर्थात, नावावरूनच कल्पना येते, की इथे भारतीय संगीताचा इतिहास आणि त्यातून निर्माण झालेले प्रचलित स्वर शास्त्र, हाच या प्रकरणाचा प्रमुख पाया आहे. “गांधर्ववेद”,”नाट्यशास्त्र” या ग्रंथांचा थोडक्यात परिचय करून दिला जातो. “नाट्यशास्त्र” हाच ग्रंथ अजूनही आपल्या संगीतशास्त्रात आधारभूत ग्रंथ मनाला जातो, जो भरत मुनींनी लिहिलेला आहे आणि याचा काल हा इसवीसन पूर्व ३०० किंवा नंतर ३० वर्षे इतका प्राचीन मानला जातो. याच ग्रंथात, आपल्या संगीतातील स्वरांचे वर्गीकरण,षड्ज, मध्यम ग्राम मिळून झालेल्या २२ श्रुती, स्वरमंडल आणि मुख्यत: मूर्च्छना या अलंकारांचा उहापोह केलेला आहे. वैदिक काळात, प्रचलित असलेले “मार्गी” संगीत आणि “देशी” संगीत,त्याला अनुसरून आचरलेले श्रुती-स्वर सप्तक, त्यातील साम्यता व तंतोतंत कशी सप्रयोग बरोबर आहे, याचे विवेचन येते. हा ग्रंथ अर्थात, संस्कृत भाषेत असल्याने, मुळात आपल्याला जर का ग्रंथ वाचायचा झाल्यास, संस्कृत भाषेचा अभ्यास अवश्यमेव ठरतो. याच ग्रंथात(म्हणजे भरतांच्या) नारदी वीणेवर मिळणारे स्वरशास्त्र याचा खोलवर विचार केलेला आढळतो. हल्ली एक विचार प्रचलित आहे आणि तो म्हणजे, “वाद्यसंगीत”ही अलीकडची निर्मिती आहे. पण, जर का या ग्रंथाचे परिशीलन केले तर हा दावा किती पोकळ आहे, हेच ध्यानात येईल. आपले जे स्वर सप्तक आहे, त्यातील प्रत्येक स्वराची उपपत्ती कशी झाली आणि त्याचे कोण निर्माते आहेत, याचा अचूक दाखला वाचायला मिळतो. यात सर्वात गंमतीचा भाग असा आहे की, आज आपण स्वरांचे योग्य शास्त्र आधुनिक पद्धतीने मांडू शकतो पण तेच शास्त्र आपल्या पूर्वीच्या मुनींनी केवळ “कर्णगोचरावस्थेत” मांडलेले आहे ते आजच्या संशोधनाशी तंतोतंतपणे जुळते. पुढे वाचताना असे ध्यानात येते की, पूर्वी सप्तक हे “मध्यम” स्वराने सुरु होत असे की जे आता,”षड्ज” स्वराने आरंभ होते. प्रश्न असा नाही की, पूर्वीचा “म” स्वर हा आता “सा” कसा झाला. याचे उत्तर असे की, जर का पूर्वीच्या “म” स्वराची आंदोलने बघितली तर ती सध्याच्या “सा” स्वराशी नेमकी मिळती जुळती आहे!! इथेच आपल्या मुनींच्या अचूक प्रतिभेचा प्रत्यय येतो.
हल्ली, एक विचार प्रचलित आहे आणि तो म्हणजे, आपले स्वरशास्त्र हे १२ स्वरांनी बनलेले आहे. मग, असाच प्रश्न डोक्यात येतो की, पूर्वी जे २२ स्वरांचे शास्त्र अस्तित्वात होते, ते चुकीचे होते का? त्यादृष्टीने, या ग्रंथातील २२ श्रुतींचा तक्ता बघणे आवश्यक ठरेल. त्या तक्त्यात, “क्षोभिणी’ पासून परं खालच्या “क्षोभिणी” पर्यंत सगळा स्वरांचा प्रवास दिलेला आहे. जर का आता फक्त १२(च) स्वर अस्तित्वात असतील तर मग बाकीच्या स्वरांचे निर्देश “गैर” आहेत असे म्हणायला हवे. पण वास्तवात असे घडत नाही, निसर्ग कलाकारांना त्याचे नियम अनाहूतपणे पाळायला लावत असतो.फक्त आपण ते दुर्लक्षित करतो. म्हणजे शास्त्र चुकीचे नसून, कलाकारांचा अहंभाव अधिक महत्वाचा होतो!! आता, याच संदर्भात, पुढील स्वर व्यवस्था बघणे मनोरंजक ठरेल.
नी ४ सा ३ रे २ ग ४ म ४ प ३ ध २ नी = षड्जग्राम
नी ४ सा ३ रे ३ ग ४ म ४ प ३ ध २ नी = मध्यमग्राम
आता, “मध्यमग्राम” हा प्राचीन स्वर सप्तकाचा पुरावा तर आताचे स्वर सप्तक हे “षड्जग्राम” हे प्रचलित सप्तक.यात बघितले तर, काय फरक आहे? याचाच पुढे अधिक सुंदर पुरावा लेखकाने, संगीत रत्नाकर या ग्रंथातील श्लोक सादर केलेला आहे.
“चतुश्चतुश्चश्चैव षड्जमध्यमपंचमा: ,
द्वैद्वै निशाद्गान्धारौ त्रिस्त्री ऋषभधैवतौ”
हा श्लोक तरी काय सांगतो म्हणा. यानंतर पुढे आपल्या संगीतातील “सारणा पद्धत”,”श्रुती-स्वर संवाद”, “मूर्च्छना पद्धत” या गोष्टीचा “गांधर्व संगीत” या विषयाच्या अनुरोधाने सुंदर मांडले आहे. आपल्याच ग्रंथकारांच्या अनुषंगाने लेखकाने, पाश्चात्य ग्रंथकारांच्या लेखनाचा अतिशय रसाळ परिचय करून दिलेला आहे. अर्थात, या सगळ्यात संगीताची जी मुलभूत तत्वे आहेत, त्याच्यात फरक नसून केवळ तपशीलात फरक आहे आणि इथेच आपले स्वर संगीत किती “श्रीमंत” आहे, हे जाणवते. इथेच आपली सध्याची प्रचलित रागदारी पद्धत, त्याचे वेगवेगळे “थाट” आणि त्याला अनुलक्षून केलेली वर्गीकरणे, याचा संपूर्ण तपशील वाचायला मिळतो.
मी वरती जे २२ श्रुतींचे वर्गीकरण सांगितले, त्याच्या बाबतीत प्रचलित वीणेवर कसे नेमके प्रत्यंतर मिळते, हे वीणेच्या “मेरू” वरून खालील “घाडी” पर्यान्य कसे उतरत जाते आणि तसे सप्तक कसे सिध्द होत जाते, हे मुळातून वाचणे हेच योग्य ठरावे. याच पूर्वीच्या नारदी विनेतून, आताची प्रचलित सतार कशी निर्माण झाली,याचा इतिहास सुंदर लिहिलेला आहे. याच सतारीच्या अनुषंगाने, लेखाने काही गैरसमज खोडून काढलेले आहेत, जसे सतारीची निर्मिती आणि सध्याची रागदारी निर्मिती ही, अमीर खुसरोच्या नावावर मांडली जाते आणि तेच किती चुकीचे आहे, हे लेखकाने सप्रमाण दाखवून दिले आहे. त्याचबरोबर आपला प्राचीन मध्यमग्राम आणि प्रचलित पाश्चात्य टेम्पर्ड कॉर्ड यातील साम्य दाखवून, आपल्या पूर्वीच्या ऋषी/मुनींनी जे स्वरशास्त्र मांडले आहे, त्याचा योग्य असा गौरव केलेला आहे. विशेषत:, पूर्वी पाश्चात्य संगीतात ग्रीक संगीत पद्धत अस्तित्वात होती पण ती त्यांच्याच “पियानो” “व्हायोलीन” या वाद्यांना कशी परवडणारी नव्हती, याचे सप्रमाण दाखले दिले आहेत. आणि त्याच अनुषंगाने, आपले स्वरशास्त्र हे जगात सर्वात प्रथम निर्माण झाले आहे आणि त्या संशोधनांचा ग्रीकांना अजिबात पत्ता नव्हता, हा मुद्दा अतिशय ठामपणे मांडलेला आहे.
तसे पहिले तर, इथे बरेच तक्ते मांडून माझे म्हणणे पटविता येईल पण मग सगळा लेखच जडजम्बाल होईल. म्हणूनच मी टाळले आहे. मुळात या ग्रंथाचा अतिशय थोडक्यात परिचय करून देणे, हाच माझा उद्देश आहे. यातील, वर उल्लेखलेल्या प्रत्येक विषयावर अतिशय दीर्घ विवेचन आणि अधिक खोल माहिती देता येणे शक्य आहे.
शेवटी एकच. मी हा ग्रंथ १९८१ साली घेतला, पण एकाच बैठकीत वाचन संपविणे माझ्या कुवतीच्या बाहेरचे आहे, हे पहिल्याच वरवरच्या वाचनातून लक्षात आले. आजही, मी अधूनमधून हा ग्रंथ मी वाचत असतो आणि माझ्या काही शंकांचे निरसन करून घेण्याचा प्रयत्न करतो. अजूनही, मला या ग्रंथातील काही गोष्टींबद्दल पूर्ण कल्पना आलेली नाही, हे मान्यच करणे भाग आहे. तरी देखील जेंव्हा आपण म्हणतो की, आपले भारतीय संगीत हे खऱ्याअर्थी जागतिक स्तरावरील एकमेवाद्वितीयम आहे, असे म्हणतो, तेंव्हा त्यामागे नेमके काय विचार आहेत, यासाठी तरी या ग्रंथाचे वाचन आवश्यक आहे. आता, शेवटची एक गंमत!! हा ग्रंथ मी वाचला पण तरीही यातील विचारांची खरी कल्पना आणि मूर्त स्वरूप हे मला नेहमीच मैफिलीतील गाणे/वादन ऐकताना मिळत गेले. अखेर संगीत ही कला ही ऐकण्याची आणि त्यातून अनुभूती घेण्याचीच कला आहे, हेच मला खरे वाटते.

No comments:

Post a Comment