Wednesday 18 June 2014

संगीताचे (विलक्षण) सौंदर्य + शास्त्र – भाग १




वास्तविक, कुठल्याही कलेची सांगता ही तिच्या वस्तुनिष्ठ शास्त्राने सिध्द झाली की ती कला अधिक बांधीव,घट्ट विणीची होते.संगीत कला देखील याला अजिबात अपवाद नाही. संगीत म्हणजे निसर्गातील ध्वनींचे केवलस्वरूप असे मानले जाते. प्रस्तुत ग्रंथात, अशा संगीतकलेचा, शास्त्र म्हणून विचार न करता, त्याचे “मूळ”सौंदर्य जाणून घेऊन, या शास्त्राच्या मुलभूत घटकांना सिध्द करीत,सौंदर्याची बौद्धिक मांडणी,कै.अशोक रानड्यांनी केलेली आहे. त्यामुळे, या ग्रंथात, मुलभूत घटकांची चिकित्सा आहे परंतु ती चिकित्सा,सौंदर्याच्या दृष्टीकोनातून करून, मूळ शास्त्राची व्याप्ती अधिक खोल केलेली आहे. आपल्याकडे, एकूणच “सौंदर्य” हा शब्द बरेचवेळा ढोबळ स्वरुपात वापरला जातो. मग, ते सौंदर्य कुठल्याही स्वरूपाचे असो. जे डोळ्यांना, मनाला,नाकाला भावते,ते सौंदर्य, अशी सरसकट भावना दिसते. वस्तुत: त्यात फारसे चूक नाही,परंतु जे आपल्याला भावते, ते का भावते,किंवा त्यामागील नेमका विचार तर्कस्वरुपात कुणीही बघत नाही किंवा सहसा तसे करायला धजत नाही,असे म्हणूया. त्यातून,संगीत हे फार संकल्पनेच्या पातळीवर म्हणजेच तिथे भावनेला प्राधान्य मिळून आस्वादाचे रूप घेते, त्यामुळे वैचारिक तर्क हा एका मर्यादेपर्यंत(च) शक्य होतो, जरी अत्यंत काटेकोरपणे गणिती पद्धतीने शास्त्र सिद्ध होत असले तरी!! त्यामुळे,आधी “शास्त्र” आणि नंतर त्यातील “सौंदर्य” या दोन्ही विचारात वैचारिक मांडणी ही बरेचवेळा आकलनाच्या पातळीवर किंवा समजून घेण्याच्या मनोवृत्तीवर आधारलेली असते. इथेच, या विषयातील नेमका “बौद्धिक” अर्क जाणून घेऊन,लेखकाने या ग्रंथात, आपला विचार मांडला आहे.
आपण नेहमीच म्हणतो, भारतीय संगीत महान आहे, वगैरे,वगैरे परंतु त्याची “महानता” नेमकी कशात आहे आणि इतर अविष्कारापेक्षा किती वेगळी आणि श्रेष्ठ आहे, याचा वैचारिक अदमास घेत नाही. असा विचार थोडा अवघड, डोक्याला किचकट वाटावा, असा गुंतागुंतीचा नक्कीच आहे पण, एकदा का त्यात रुची आढळली की मग, त्या कलेचे नेमके “इंगित” समजून घेणे अजिबात कठीण नाही. त्या दृष्टीने, लेखकाने, संगीतातील ३ घटक, मुलभूत घटक म्हणून विचारार्थ घेतले आहेत. १] स्वर, २] लय आणि ३] बंदिश. आता, याच ३ कल्पना मुलभूत का? या प्रश्नाने विवेचनाला सुरवात आहे. इथे, या ग्रंथाचे वाचन करताना, संगीतातील काही संकल्पनांची “तोंडओळख” असणे गरजेचे आहे, अन्यथा काही विचारांचा नेमका “गाभा” समजून घेणे अवघड होऊ शकते. पहिले कारण, ज्याला सांगीतिक कलाव्यापार म्हणतात तिथे या तिन्ही संकल्पना लागू पडतात.दुसरे कारण, विशिष्ट कलाव्यापार सांगीतिक म्हणून गणला जाण्यास, या ३ संकल्पना तत्वभूत ठरतात. वास्तविक वरील दोन्ही कारणे, एकाच नाण्याच्या दोन बाजू वाटू शकतील,परंतु या दोन कारणात मुलभूतत्वाच्या वेगवेगळ्या बाजू अधोरेखील झाल्या आहेत. पहिल्या कारणात, कशाचा तरी आढळ होणे, यावर भर आहे. वर उल्लेखिलेल्या संकल्पना कुठल्याही संगीतास लागू पडतील आणि तिथे काहीही अपवाद नाही. फरक पडेल तो त्याच्या वापराबद्दल!! दुसरे असे, याच संकल्पनेतून आपल्याला “स्वरेलपणा”, “लयदारपणा” आणि “बंदिशपूर्णता” हे ३ निकष मिळतात. हे ३ निकष लावूनच, आपण, कला-संगीत आणि अ-कलासंगीत असा फरक करू शकतो. या संकल्पना मुलभूत मानायचे तिसरे कारण, संगीताच्या स्वरूपाचे स्पष्टीकरण देण्यास, त्या पुरेशा आहेत. या संकल्पांनी रेखलेल्या क्षेत्राबाहेर संगीत आढळत नाही. आणखी एक विचार इथे येतो, या संकल्पनेद्वारे आपण, कलासंगीत आणि कलादृष्ट्या निकृष्ट संगीत असा भेद करण्यास निकष मिळतात. अर्थात, यावर असा आक्षेप लेखकाने घेतला आहे, जर या मुलभूत संकल्पना खरोखरच तशा असतील,तर त्यांना न जुमानणारी कुठलीही ध्वनीसंबद्ध घटना, ही संगीतपातळीवर पोहोचणे अवघड आहे!! म्हणजेच ध्वनीसंबद्ध घटना, एकतर संगीत असते किंवा अजिबात नसते, असेच मानावे लागेल. याचाच पुधिक विचार असा होतो, जे संगीत नाही, ते कलासंगीत किंवा अ-कलासंगीत ठरण्याचा प्रश्नच उद्भवत नाही.म्हणजे मग, कलासंगीत हि संज्ञा अनावश्यक ठरते का? तसे नक्कीच नाही, कारण, कलासंगीत अशी संज्ञा वापरल्याने, बरेचसे “व्याजसंगीत” आज संगीत म्हणून वापरले जाते,याची आठवण करून दिली जाते. हा सगळा, संकल्पनेच्या पातळीवर सर्वव्यापी गोंधळ आहे, हे लक्षात यावे. शब्दामागे संकल्पना असेल तर शब्द जिवंत राहतो, हे भाषेचे वैशिष्ट्य लक्षात घेतले तर इथे हि स्वतंत्र संकल्पना आहे, पण तिचा दर्शक “बोधकारक” असा नाही, हे लक्षात यावे. तसेच अ-कलासंगीत म्हटल्यावर, संगीतातून हद्दपार केलेला अविष्कार, असा विचार मनात येऊ शकतो.परंतु इथे अशी ढोबळ वर्गवारी नाही. या दोन्ही संगीतशास्त्रातील “कोटी” आहेत.एकमेकांत प्रत्यक्ष संबंध आहेत. या पार्श्वभूमीवर, घटक १ – स्व र, याचा विचार केल्यास, त्याच्या ४ मुलभूत पायऱ्या  आहेत. अ] गोंगाट,ब] ध्वनी,क] नाद आणि ड] स्वर. आता, अ] गोंगाट म्हणजे आवाजाचा समूह, ब] ध्वनी म्हणजे ओळखता येणारा आणि ज्या आवाजाचे पुनरुत्पादन शक्य आहे, असा आवाज. क] नाद म्हणजे सांगीतिक शक्यता असलेला ध्वनी, तर ड] स्वर म्हणजे स्वर-संहतीस आवश्यक घटक असलेला नाद.
आता ध्वनीसंबद्ध घटना हा ज्याचा कच्चा माल असतो, असा कलाव्यापार म्हणजे संगीत. अर्थात, ध्वनी हा काही, आहे त्या स्वरुपात संगीतात येत नाही, हे उघड आहे. त्यावर प्रक्रिया होऊन, पातळीवर पोहोचतो.संस्कारित स्वरुपात कलाव्यापारात अंतर्भूत होऊ शकतो. त्यादृष्टीने बघता, गोंगाट ते स्वर या अवस्था म्हणजे संस्करणाच्या चार अवस्था आहेत. तेंव्हा या चार अवस्था म्हणजे ध्वनीसंबद्ध सुखदायक घटना ते कलापदवी अशी वाटचाल आहे. कानावर येउन आदळणाऱ्या असंख्य आवाजातून आदिमानवाने काही ध्वनींची निवड केली.प्रश्न असा, हेच ध्वनी का? याचे कारण, त्यांची निवड करणे शक्य होते, त्यातून विशिष्ट घटनांचे स्वरूप तो जाणू शकला, इतकेच नव्हे तर त्यातून पुनरावृत्ती व पुनरुत्पादन त्याला शक्य झाले.( पुढे येणाऱ्या, उपज,गमक, तान या अलंकारांचे हे मूळ समजावे!!) याचाच वेगळा अर्थ, निसर्गातील सगळ्याच ध्वनींचा, “स्वर” म्हणून वापर करणे शक्य नव्हते. लेखकाने इथे “प्रत्यभिज्ञानक्षमता” हा शब्द वापरला आहे. तेंव्हा या शब्दाच्या अनुरोधाने, ज्या घटना गोंगाटातून बाजूला काढल्या त्यांना “ध्वनी”, हे नाव दिले. असे ध्वनी एकापेक्षा वेगळे आणि अनेक आढळणे स्वाभाविक होते.तिथेच “निवड” आणि त्यासाठीचे “निकष” या संज्ञा उद्भवतात.गोंगाटाची पायरी ओलांडून हाती लागलेले सगळेच ध्वनी, स्वर म्हणून मानणे शक्य नव्हते. तेंव्हा इथे नवीन निकष हाती आला, कर्णसुभगतेचा!! कर्णसुभगता आणि तिचे कमीअधिक प्रमाण याची जाणीव ही संगीतशास्त्रीय आकलनाची पहिली जाणीव म्हणता येईल. कुठल्याही कलाप्रकारात निव्वळ घटनेपासून कलापदवीपर्यंत जे प्रदीर्घ अंतर तोडावे लागते, त्यातला हा महत्वाचा टप्पा म्हणावा लागेल.ही जाणीव म्हणजेच स्वरसंहतीच्या दिशेने टाकलेले पहिले पाऊल!! या दृष्टीने कर्णसुभग ध्वनी म्हणजे “नाद” असे म्हणता येईल.
कर्णसुभगता किंवा श्रुतीमाधुर्य किंवा कानाला  गोड लागणे, ही सर्वसामान्य प्रतिक्रिया घेतली तरी अर्थ, ज्या विशिष्ट ध्वनिबाबत, एखाद्या विशिष्ट क्षणी, गोडपणाचे विधान केले गेले,त्या ध्वनीला त्यानंतर भवितव्य होते. जो ध्वनी गोड लागत नाही, त्याबाबत दृष्टीकोन स्वागतशील रहात नाही.याचे कारण, अशा ध्वनीच्या गर्भित सांगीतिक जाणीव, ध्वनीच्या पातळीवर होणे शक्य आहे.अशी शक्यता असलेला ध्वनी,पुढे नादाच्या पातळीवर जातो. एखादी घटना आवडली की त्याचे पुनरावर्तन स्वाभाविक आहे.याचाच अर्थ,ध्वनी नादाच्या टप्प्यापर्यंत पाहोचला की पुन्हा अवतरणे अपरिहार्य होते.यात सुखानुभवात भर पडावी असा असतो.स्वरसंहती निर्माण होण्याच्या दृष्टीने हे ध्वनी, नाद म्हणून अवतरतात. याचाच पुढील भाग म्हणजे, एका नादापासून अधिक नाद मिळवणे.दोन नादांनी स्वतंत्रपणे मंजुळ असलेले,अलगपणे अवतरूनदेखील एकाच परिणाम घडवणे, हे सुखानुभवातील वाढीचे मूळ आहे. असे दोन नाद एकामागोमाग येउन त्यांनी एकत्रित सुखानुभावास जन्म दिला, तिथेच स्वरसंहतीचा जन्म झाला.अशा संदर्भचौकटीचे घटक असणारे नाद, हे “स्वर” या पदवीस पोहोचतात.या संदर्भचौकटीस नादांना स्वरत्व प्राप्त होते.याचाच अर्थ, नाद सुटा आढळू शकतो पण स्वराबाबत ते शक्य नसते आणि तिथेच “स्वरचौकट” उद्भवते.त्याला नादासारखे निरपेक्ष अस्तित्व नसते. स्वरांचे अस्तित्व हे सापेक्ष असते आणि दुसऱ्या घटकनादाच्या आधारे तो अवतरतो.
एखादा आवाज हा सुखदायक, कर्णमधुर का वाटतो, याची कारणमीमांसा ध्वनीशास्त्र शास्त्रीयदृष्ट्या करू शकते.आवाजाची निर्मिती,वहन, आणि ग्रहण, या तिन्ही अवस्थांत तसे पाहिले तर विज्ञानाचे नियम लागू पडतात आणि संगीताचे अस्तित्व स्वरूपत: नादमयच असल्यामुळे विज्ञानाचे नियम संगीताविष्काराच्या सुरवातीपासून ते त्याच्या समाप्तीपर्यंत सतत वावरत असतात.इथे कर्णमधुरता प्रथम आणि नंतर वैज्ञानिक स्पष्टीकरण असा क्रम दिसतो. म्हणजे, अनुभव येणे, त्याची संगती लावणे, आणि त्याचवेळी संकल्पना स्फटिकभूत होणे,आणि अशा अनेक संकल्पनेतून शास्त्राची उभारणी होणे,असा सगळा क्रम आहे. विज्ञानाचा आणि संगीताचा असा प्रत्यक्ष संबंध येत असल्याने, संगीताच्या सौंदर्यशास्त्रीय विचारात विज्ञानाचे महत्व वाजवीपेक्षा जादा समजले जाते, असा एक भाबडा समज पसरलेला दिसतो.परंतु ध्वनीशास्त्राच्या अभ्यासाने संगीत म्हणजे काय, याचे उत्तर अवघड आहे.त्यासाठी संकल्पनेच्या पातळीवरच वावरावे लागेल. (सुगम संगीतात बरेचवेळा रागसंगीताचा विचार केला जातो, त्याला हे स्पष्टीकरण, उत्तर म्हणून योग्य आहे!!) थोडे काटेकोरपणे मांडायचे झाल्यास, ध्वनिशास्त्राधारे संगीताविषयी स्पष्टीकरण हे संगीताविषयी, संगीतानुभवाविषयी असूच शकत नाही, हे इथे स्पष्ट व्हावे. वेगळ्या भाषेत, “सा” स्वर २५६ कंपनाचा आहे, हे झाले शास्त्र परंतु, एखादी तार वाजवणारा हात + २५६ कंपने म्हणजे “सा” असे समीकरण मांडता येणार नाही. यातूनच पुढे, स्वरसंवाद तसेच दोन वेगळ्या रागातील एकाच स्वराचे वेगळे स्वरूप, याविषयी अंदाज करता येईल.
यातूनच पुढे स्वरसंहती आणि या दोन स्वरसंहतीमधून  अधिक स्वर मिळवण्याच्या ओढीतून,”सप्तक” जन्माला आले!!
नादापासून स्वरापर्यंत येताना, वापरलेल्या सांगीतिक शक्यतेचा निकष अधिक सूक्ष्मतर होता.स्वरावस्थेपासून सप्तकाकडे जाताना,वापरलेला निकष यापेक्षा सूक्ष्म होता आणि तो  म्हणजे स्वरसंयोग-स्वरविरोधाचा!! स्वरसंयोग म्हणजे सापेक्ष सुखदता आणि स्वरविरोध  म्हणजे सापेक्ष कर्णकटुत्व!! ध्वनी ते नाद, यात, सुखदतेचा निकष वापरला आणि नादापासून स्वरापर्यंत येताना, वर्णन संदर्भचौकटीचे घतकत्व लाभू शकणारा नाद असे आहे. जेंव्हा एखादी तार छेडली जाते,तेंव्हा ती कंपन पावते आणि त्यातून नादनिर्मिती होते. परंतु अशावेळेस संपूर्ण तारेबरोबर  तारेचे पोटविभाग देखील वेगळ्या कंपनसंख्येने कंप पावत असतात.हे नादही संपूर्ण तारेच्या नादात मिळत असतात.त्यातून निर्माण होणाऱ्या नादांना “उच्च स्वयंभू स्वरांश” असे म्हणतात. हा स्वरसंयोग कमी-जास्त प्रमाणात असू शकतो.एखादा स्वर जेंव्हा दुसऱ्या स्वराचा उच्च स्वयंभू स्वरांश असतो,तेंव्हा स्वरसंयोग असतो.परंतु काही स्वरसंबंध असे देखील असू शकतात जिथे दोन्ही स्वर तिसऱ्याशी संयोग साधतील. हा संयोग ”उत्तम” म्हणावा पण “संपूर्ण” नव्हे.स्वरसंयोगाच्या निकषाबाबतीत, दोन अंतर्गत स्वरांतील एकात्मता आणि परस्परसंबंधित वेगळेपणा याची जाणीव होताच, हाती असलेल्या स्वरांची तपासणी अधिक बारकाईने  लागली.तिथे कमी-अधिक प्रमाणाची जाणीव होताच,त्यांच्या  नात्यातील स्वरांची तपासणी होऊ लागली आणि हळूहळू प्रचलित साप्तकाकडे वाटचाल सुरु झाली.इथे “सप्तक”च का, असा प्रश्न उद्भवू शकतो.सांगीतिक समानशीलांचा शोध चालू असता, एक वेळ अशी आली की त्यावेळी हाती असलेला नाद्बिंदू म्हणजे आरंभस्वराशी संपूर्ण संयोग करणारा स्वर होता.अशाच प्रवासात, अंतराअंतरात संपूर्णसंयोगी स्वर हाती लागत जातात.फरक, त्यांच्या आरंभस्वरांच्या अपेक्षेने अधिकाधिक दूर होत गेले.
याच वाटचालीत आजच्या सप्तकाचा शोध लागला.

No comments:

Post a Comment