Wednesday 18 June 2014

लता – एक संगीताभ्यास – भाग १




लता मंगेशकर!! खरतर काय आणि किती लिहायचे, हाच मोठा प्रश्न आहे. आत्तापर्यंत हिच्या विषयी भरपूर लिहिले गेले आहे आणि पुढेही लिहिले जाईल.मला तर असेच वाटते की लताची गायकी हा अथक शोधाचा विषय आहे.तिची काही गाणी तर इतकी वरच्या दर्जाची आहेत की त्यातील गाण्यांबद्दल प्रत्येकी स्वतंत्र निबंध लिहिला येईल. त्यामुळे जेंव्हा मी “लता – एक संगीताभ्यास” असा विषय घेतला तेंव्हा त्या विषयासंबंधी चार शब्द लिहिणे योग्य ठरेल. या लेखात, मी लताची सहा(च) गाणी घेणार आहे आणि ती गाणी वेगवेगळ्या काळातील आहेत, ज्यायोगे तिच्या आवाजातील फरक आणि गायकीतील स्थित्यंतर अजमावता येईल. एक तर कुणालाही मान्य होईल की, १९४५ मधील आवाज, १९६० मध्ये नव्हता आणि १९६० नंतर तिच्या गायकीने वेगळे वळण घेतले ते पुढे सलग १५ वर्षे तरी राहिले, १९७० नंतर त्या आवाजात आणखी वेगळे स्थित्यंतर आले. या दृष्टीकोनातून, १९४५ ते १९६० या कालखंडातील २ गाणी, पुढे १९६० ते १९७० मधील २ गाणी आणि १९७० ते १९८० मधील २ गाणी अभ्यासासाठी घेणार आहे. अर्थात, ही निवड शक्यतो प्रातिनिधिक ठेवणार आहे. अर्थात मतांतरे नक्कीच होणार आहेत, पण त्याला इलाज नाही. याचाच पुढचा भाग असा आहे की, या लेखात जास्तीत जास्त वस्तुनिष्ठ दृष्टीकोन ठेवण्याचा प्रयत्न करणार आहे आणि त्याचाच भाग म्हणून, गाण्याचा उल्लेख होताना, सुरवातीलाच गाण्याचा संगीतकार आणि कवी, यांची नावे घेतली जातील, अन्यथा शक्यतो उल्लेख नसेल. याचे मुख्य कारण, जरी कुठल्याही गाण्यात, कवी आणि संगीतकार यांचा तितकाच प्रमुख वाटा असला तरी इथे फक्त, लताची गायकी, इतकाच उद्देश ठेवलेला आहे. तदनुषंगाने गायकीच्या संदर्भात लिहिताना रागाचा उल्लेख हा, त्या गायकीच्या संदर्भातच येईल किंवा येणार देखील नाही. कारण, सुगम संगीत म्हणजे रागसंगीत नव्हे. अर्थात, एखादा हरकत किंवा दीर्घ तान, या बाबतीत थोडे शास्त्रीय विवेचन येईल पण ते देखील मर्यादित स्तरावर ठेवण्याचा प्रयत्न राहील. मग प्रश्न उरतो, म्हणजे, नेमके काय वाचायला मिळणार आहे? सुगम संगीताचे गायन, हा वेगळ्या अभ्यासाचा विषय आहे, हेच बहुतेकवेळा कुणी लक्षात घेत नाही, ते लक्षात यावे, यासाठी ह्या लेखाचा प्रपंच आहे.
कुठलेही गाणे, अत्यंत प्राथमिक स्तरावर रंजक असावे, हे कुणीही मान्य करेल. ऐकताना, लगेच ती चाल, मनाची पकड घेणारी हवी, हे मत सहजपणे कुणीही मान्य करेल. तरीही, ते गायन, ही नेहमीच गळ्याची परीक्षा बघणारे असते, अगदी सोपी चाल असली तरी!! कवीच्या शब्दांतील आशय, सुरांतून व्यक्त होताना, औचित्य सांभाळून गायन करणे, ही तारेवरची कसरत आहे. तेंव्हा, गाण्याचा विचार करताना, कवितेचा उल्लेख किमान पातळीवर होईल, हे नक्की. पण, तो उल्लेख गायकीतून, शब्दातले औचित्य किती सांभाळले गेले आहे किंवा किती अधिक वृद्धींगत झाले आहे, हेच दर्शविण्यासाठी. तेंव्हाआधी आपण लताच्या कुठल्या गाण्यांची निवड केली आहे, हे मांडून, त्याचे सविस्तर विवरण करण्याच्या प्रयत्नाला सुरवात करूया.
१] रूठ के तुम तो चल दिये( संगीतकार अनिल बिस्वास), २] वो तो चले गये ऐ दिल( संगीतकार सज्जाद हुसेन), ३] सुनो सजना पपिहेरे (संगीतकार लक्ष्मीकांत/प्यारेलाल), ४] मै आज पवन बन जाऊ (संगीतकार जयदेव), ५] रैना बीती जाये( संगीतकार राहुल देव बर्मन), ६] बैय्या ना धरो( संगीतकार मदन मोहन). मला पूर्ण कल्पना आहे की, या यादीवरून बरेच मतभेद होतील. खुद्द मीच पूर्ण समाधानी नाही पण, ही गाणी निवडण्यामागील दृष्टीकोन स्पष्ट करतो. पाहिली दोन गाणी, जेंव्हा लता प्रकाशात नुकतीच आली होती, त्यावेळची आहेत, नंतरच्या काळात, तिचा आवाज अधिक प्रगल्भ झाला, त्या काळातील दोन गाणी आहेत तर शेवटची गाणी जरी शास्त्रीय ढंगातील असली तरी सत्तरीनंतर तिच्या आवाजात जो बदल घडत गेला, त्यादृष्टीने विचारात घेतलेली आहेत.या यादीत, सी.रामचंद्र, एस.डी.बर्मन, सलील चौधरी, शंकर-जयकिशन, रोशन असे अनेक संगीतकार किंवा, श्यामसुंदर, विनोद किंवा हंसराज बहेल, जगमोहन सारखे तितकेच तुल्यबळ संगीतकार नाहीत आणि ते यायलाच हवे होते पण मग लेखाचा पसारा अति वाढेल!! किंबहुना, ज्या संगीतकारांची गाणी विचारार्थ घेतली आहेत, त्यांना तरी कुठे संपूर्ण न्याय दिला गेला आहे!! त्यांची अशीच कितीतरी असामान्य गाणी लताने गायली आहेत. तेंव्हा, या सगळ्या मर्यादांचा विचार घेऊनच, या लेखाचा प्रपंच मांडायचा आहे.
१] रूठ के तुम तो चल दिये:- साधारणपणे, कुठल्याही गाण्याची सुरवात वाद्याने होते, ज्या योगे चालीची लय तयार होते आणि गायकाला त्या लयीचा अदमास घेता येतो.परंतु, या गाण्यात, सरळ लताचाच सूर “रूठ” या शब्द उच्चारण्यातून होतो आणि स्वराची पट्टी वरच्या स्वरात लागते!! हा प्रकार वाटतो तसा सहज आणि सरळ तर अजिबात नाही. कारण याच चलनातून पुढे चालीचा ढाचा तयार होतो आणि पुढे स्वरविस्तार होत राहतो. पहिलाच “सा” जिथे उच्च स्वरी लागल्यावर, आपल्याला देखील थोडासा अंदाज येतो की, पुढील रचना कशी वळणे घेणार आहे. खरी गंमत अशी आहे की, सुरवात जरी वरच्या स्वरात झाली तरी पुढे काही क्षण वगळता, सगळी चाल याच “मीटर”मध्ये फिरत आहे. या गाण्यापर्यंत, लता बरीचशी नूरजहानच्या प्रभावाखाली गात होती, म्हणजे या गाण्याने तिच्या गायकीची खरी ओळख झाली असे नव्हे पण याच सुमारास, ती, नूरजहानच्या प्रभावातून वेगळी झाली. अगदी, तिचे अतिशय प्रसिध्द गाणे,”,आयेगा, आयेगा” जरी घेतले तरी त्यात लतावरील नूरजहानचा प्रभाव काही स्वरांत दिसतो. नंतर तिने जी स्वत:ची गायकी किंवा बलस्थाने प्रस्थापित केली, त्याची सुंदर झलक या गाण्यात दिसते. शब्द उच्चारताना, त्या मागील भावना लक्षात घेऊन, शब्दांना स्वरांचे कोंदण द्यायचे,ही जी तिच्या आवाजाची खासियत पुढे स्पष्ट झाली, त्याची झलक या गाण्यात दिसून येते. तसेच शब्द उच्चारताना, हलकेच छोटीशी हरकत घ्यायची की त्यातून स्वत:ची गायकी आणि ती अशी व इतपत(च) की आपण हरकत घेतली आहे , ही जाणवू न देता!! हे खरे तिचे शिवधनुष्य!! लताची बरीचशी गाणी ऐकायला सहज वाटतात पण प्रत्यक्ष गायला अवघड जातात, ती इथे. याच गाण्यात, पुढील ओळ, “अब मै दुआ से क्या करू” या ओळीत, “दुआ” या शब्दावर स्वरांचे वजन देताना, एक हलकी फिरत आहे, ज्या योगे या शब्दाचा अर्थ तर समजतो पण त्या मागील दुखरी भावना लगेच विस्तारित होते. नंतर पहिल्या कडव्याच्या शेवटी,”दर्द ही बन गया दवा, अब मै दवाको क्या करू” या ओळीत “अब मै दवाको क्या करू” इथे आशयातील दु:खाची विखारी जाणीव, दाखवताना, परत हलक्या वजनाने “दवाको” हा शब्द स्वरांकित केलेला आहे, तो केवळ लाजवाब आणि फारसा कुणाच्या लक्षात न येणारा आहे. इथे लताची, कवितेची जाणकारी दिसून येते.म्हणजे बघा, पहिल्या अंतऱ्यातील पहिली ओळ, जरा खर्जातील स्वरात सुरु होते, पण दुसरी ओळ हळूहळू अवरोही स्वरांत सुरु होत सप्तक पूर्ण करते, जिथे गाण्याची पहिली ओळ सुरु होते. अर्थात, हे कौशल्य संगीतकार म्हणून अनिल बिस्वासकडे जितके जाते तितकेच गायिका म्हणून लताकडे जाते. जेमेतेम २.५० मिनिटांचे हे गाणे आहे तरीही इतक्या थोड्या अवधीत स्वरांच्या अशा “जाती” दाखवायच्या, हे काम केवळ असामान्यच म्हणावे लागेल. चाल तर अतिशय अनवट आहे, तसेच ताल देखील!! पण, अशा वेगळ्या “चालीतून” स्वत;ची वेगळी “चाल” दाखवणे, ही गायकीची खरी ओळख आहे.वास्तविक या गाण्याचे स्वतंत्र असे विश्लेषण करता येणे शक्य आहे, म्हणजे कविता, चाल, चालीला अनुरूप वाद्यमेळ, आणि गायकी अशा अंगाने हे गाणे विचारात घ्यावे, अशा योग्यतेचे नक्कीच आहे. आणखी एक वैशिष्ट्य या गाण्याबाबत सांगता येईल. गाण्यात बरेच उर्दू शब्द आहेत. प्राथमिक उर्दू कसे बोलावे, याचा लताचे उच्चार हा आगळा असा आदर्श म्हणावा लागेल. वास्तविक, लता मराठी पण तरीही तिचे उर्दू उच्चार इतके बिनचूक असतात की, खुद्द उर्दू मौलवींनी दाद द्यावी. वास्तविक व्यावसायिक गायिका म्हटल्यावर, या सगळ्या गोष्टी त्यात अंतर्भूत असतातच पण, लता या वास्तवाची वास्तविक जाणीव गायनातून करून देते!!
२] वो तो चले गये ऐ दिल:-   काही गाणीच अशी असतात की ती त्याच्या अत्यंत वेधक चालीमुळे कायमची लक्षात राहतात. वास्तविक या गाण्याचा संगीतकार सज्जाद हुसेन हा विक्षिप्त म्हणून अधिक गाजला गेला आणि त्याच्या प्रतिभेवर अन्याय झाला. ह्या गाण्यात, लय इतकी गुंतागुंतीची आहे की ऐकताना आपण स्वस्थ बसणे अवघड होते. प्रत्येक अंतर वेगळ्या स्वरावर सुरु होतो आणि त्यामुळे गायन अधिक अवघड होऊन बसते. गाण्याचा ताल स्पष्ट असा नाही, ज्याला अर्धाताल म्हणता येईल असा आहे पण त्यामुळे, लय अधिक अवघड होते.इथेच लताची खरी खासियत दिसते. वर म्हटल्याप्रमाणे, उर्दू शब्दांचा बिनचूक उच्चार इथे लगेच ऐकायला मिळतो. आता जर का लयीच्या दृष्टीने विचार केला तर असे दिसते की, पहिल्या “सा” वर ओळ सुरु होते पण नंतर, अतिशय सूक्ष्म अशा हरकतींमुळे रचन आणि गायन कठीण होत जाते.पाहिलींच ओळ बघा,”वो तो चले ऐ  दिल, याद तेरी भी प्यार कर” यातील प्रथम “याद” हा शब्द आणि नंतर “प्यार” हा शब्द नीट ऐकावा. शब्दांबरोबर नाजूक हरकत तर आहेच पण त्याच बरोबर, एक विविक्षित सुरावर गाण्याची सुरवात होते आणि आपण त्या सुरांच्या सहाय्याने लयीचा अदमास घेतो पण इथे या शब्दांवर जी “लांबण” घेतलेली आहे, ती फार अवघड आहे, म्हणजे संपूर्ण स्वर गळ्यातून न येता, नुसते त्या सुराचे सूचन होते आणि लगेच पुढील स्वरावर चाल स्थिर होते. हा प्रकार लिहायला सहज आणि साधा आहे पण गाण्यातून अशा स्वरांची “जात” दाखवणे, हे कौशल्याचेच लक्षण आहे. हे लताचे कर्तृत्व आणि असाधारण गायकी!! “तुझको खुशिकी क्या गरज, गम हैं तेरे नसीब मे” ही पहिल्या अंतऱ्याची ओळ अगदी वेगळ्या सुरावर सुरु होते आणि परत पुढील ओळीवर पाहिली सम गठली जाते आणि तशी की, जणू अंतरा त्याच सुरात गायला गेला आहे!! आता या ओळीबद्दल लिहायचे झाल्यास, “गरज” या शब्दाला एक हेलकावा आहे आणि लगेच “तेरे” या शब्दावरील हेलकावा इतका वेगळा आहे, एक क्षणी लय कुठे जात आहे, याचा पत्ता लागत नाही!! वास्तविक हा स्वरांच्या स्थानाचा खेळ आहे. परिचित वळणांच्या पलीकडे जरा एखादी श्रुती लागली की ऐकणारा चमकतो परंतु त्या श्रुतीचे पुढील श्रुतीशी नाते दर्शविले की सगळा खेळ ध्यानात येतो. याचे श्रेय नि:संशयरीत्या सज्जाद आणि लताकडे जाते. असा खेळ मांडणे आणि त्या खेळाची नेमकी प्रचीती देणे, सगळेच विलोभनीय!! “भूलेगा दिन बहार के, देख ना ख्वाब प्यार के” या दुसऱ्या अंतऱ्यातील परत एकदा “प्यार” हा शब्द नीट ऐका. ध्रुव पदातील “प्यार” शब्द आणि या ओळीतील “प्यार” शब्द जरी एकच असले तरी त्याला लागलेले स्वर वेगळे आहेत आणि त्याचा उच्चार प्रथमक्षणी सारखा वाटला तरी त्यात बराच फरक आहे. ही लताची गायकीची जाण, जी इतर गायक/गायिकेत अपवादाने दिसते.
मै आज पवन बन जाऊ :-  हे गाणे साठीच्या उत्तरार्धातील आहे, या वेळेस लताच्या गायकीने वेगळे वळण घेतले, म्हणजे आवाज अधिक परिपक्व आणि धारदार झाला. गाणे राजस्थानचे लोकसंगीत आणि मिश्र मांड या संयोगातून तयार झालेले आहे. जयदेव हा असाच अफलातून प्रतिभाचा संगीतकार पण आता पण विस्मरणात गेलेला. इथे देखील लयीचे इतके वेगवेगळे बंध दिसतात की, आपण त्या लयीतच गुरफटून जातो. सुरवातीला “एक मिठीसी चुभन, एक थंडीसी अगन” हे शब्द येतात आणि लयीचा आराखडा समोर येतो. यातील “चुभन”  आणि “थंडीसी अगन” हे शब्द बारकाईने ऐका. “चुभन” मागील टोचल्याची आणि “थंडीसी” बरोबर येणारी हुरहुर कशी एकाच स्वरांच्या अवगाहनात येतात. किती कठीण आहे. दोन्ही संपूर्ण वेगळ्या भावना आणि लगोलग कवितेत येतात आणि तरीही लता त्यांचे दर्शन आपल्या समर्थ स्वरांतून घडवते!! लगेच स्वर तार स्वरात जातो, आणि गाणे तालात सुरु होते. संतूर आणि बासरीच्या आवाजात लताचा आवाज असा मिसळतो, की कशाकशाला दाद द्यायची!! रचना तर कधीच एक सरळ रेषेत फिरत नाही तर सतत नागमोडी वळणे घेते आणि त्यासोबत लताची गायकी. दुसऱ्या अंतऱ्यात, ” ऐ मेरे भगवान इतना कर अहेसान, ये रसवंती हवा कही ना, बन जाये तुफान, प्यार मेरा नादान, मन भी हैं अनजान” या ओळी येतात. यातील “भगवान” या शब्दावरील असामान्य स्वरांची रांगोळी केवळ लताच काढू शकते!! त्यापुढे हकुहळू, लयीचे वळण वेगळ्या स्वरांवर “ठेहराव” घेताना,तसेच पुढे  “प्यार मेरा नादान” म्हणताना, “नादान” शब्द वरच्या पट्टीत जातो आणि लय संपूर्ण वेगळी होते. इथे जयदेव दिसतो आणि लताच्या असामान्यत्वाचे खरे दर्शन होते. लय तशीच “पवन” या शब्दाला अनुषंगून हेलकावे घेत असते आणि त्याचबरोबर लताचा स्वर हिंदकळत असतो. आता आपल्या ध्यानात येईल की, गाणे सुरु होते ते चलन आणि आता जे चलन ऐकायला मिळते, त्याचे परस्परांशी तदनुषंगिक काहीही साम्य नाही!! पण तेच “अंतर” मिटल्याचे, शेवटच्या चरणाशी गाणे पोहोचते, तिथे जाणवायला लागते. हा लयीचा भूलभुलय्या केवळ अविस्मरणीय आहे. गळ्यावर इतकी लगोलग बदलणारी वळणे चढवून, परत समेशी परतायचे, याला फार मोठी “नजर” आणि व्यासंग लागतो आणि हे सगळे फक्त रियाझाने मिळवता येत नाही.
पुढील भागात इतर ३ गाण्यांवर लिहीन आणि शेवटी, लताची “सर्जनशीलता” यावर चार शब्द लिहून हे भाग संपवेन.

No comments:

Post a Comment