Thursday 19 June 2014

हेमराजवाडी – माझे बालपण – भाग २!!




मागील भागात, आमच्या त्यावेळच्या सायकलिंगचा उल्लेख केला. आज, तेच लिहिताना मलाच हसायला येत होते. आता तर, मी सतत विमान प्रवास करीत असतो, अर्थात, नोकरीच्या निमित्ताने. त्यावेळेस जे आम्हा चौघांना जे थ्रील वाटले, त्याला कसलीच तुलना नाही. एकतर, सगळ्या मित्रांनी आमचे हसे केले होते, त्यामुळे, मनात सतत धाकधूक होती पण कुठल्या बळावर असले धाडस केले, कुणास ठाऊक. तशीच काही (अलौकिक!! आणि अत्यंत आचारात देखील!!) धाडसे यात लिहित आहे. १९६९ साली, माझ्या वडिलांनी, समोरच्या इमारतीत नवीन घर घेतले आणि आम्ही जुने घर, ज्यात नानांचा workshop होता, ते सोडून चौथ्या मजल्यावर राहायला गेलो. त्यामुळे, आता खालची जागा, ज्यात तेंव्हा चार खोल्या होत्या, त्या कायमच्या रिकाम्या झाल्या. एकदा, माझ्याच डोक्यात एक विलक्षण “किडा” आला. मी, प्रदीपला म्हटले, की खालच्या जागेत एक रात्र काढायची आणि अगदी जेवण, खाण वगैरे उद्योग करायचे. प्रदीपला असल्या गोष्टीचा माझ्यापेक्षा अधिक आनंद. नंतर, मग हीं गोष्ट मी इतर ग्रुपमधील मित्रांना सांगितली आणि मग प्रत्येकाच्या घरी!! अशी आमची जेवणे, तीन, चार तरी झाली असतील. त्या वेळी, आम्ही जेवणाच्या नावाने जे काही अफलातून प्रयोग केले, त्याला कुठेच तुलना सापडायची नाही. विशेषत:, पोळ्या कारणे, हा प्रकार तर भलताच अंगाशी येणारा आणि विनोदी ठरणारा झाला. भाज्या कशातरी जमायच्या, भात करणे फार अवघड गेले नाही, पोळ्यांसाठी, कणिक तींबणे, याने आमची पाठ मात्र चांगलीच तिंबून गेली होती! इथेच आम्ही सर्वांनी आमच्या आयुष्यात प्रथमच सिगरेटचा आस्वाद घेतला. त्यावेळेस, एक mint स्वादाची(नाव आता विसरलो!!) सिगारेट मिळायची आणि आम्ही ओढायला सुरवात केली कारण जर का घरी लगेच जायची पाळी आली तर सिगरेटचा वास न येता, गोळ्यांचा वास यावा!! त्यावेळचे सिगारेट पिणे, आम्हाला तर, एखादे युध्द जिंकल्यासारखेच वाटायचे!! त्यावेळी, “डोळ्यातून धूर काढणे” अशा गोष्टींचे एक fad होते, चाणाक्ष मुले, दुसऱ्याला, त्यांच्या डोळ्यात बघायला लावायचे. जसा दुसरा मुलगा ओढणाऱ्याच्या डोळ्यांत बघत असताना, ओढणारा लगेच त्याच्या मनगटाला किंवा हाताला जळती सिगारेट लावायचा. साहजिकच, चटका बसल्याने, तो मुलगा किंचाळायचा आणि त्या किंकाळीत, इतर बघे आपले हसू मिसळायचे. असला प्रकार तेंव्हा आम्ही देखील कितीतरी वेळा केला होता. वास्तविक, हा अघोरी प्रकार म्हणायला हवा, पण आम्हाला याची कसलीच क्षिती नसायची. वयाच्या त्यामानाने फार लवकरच आमचा ग्रुप सिगारेट ओढायला लागला होता.
बियर आमच्या आयुष्यात जरा नंतरच आली, अर्थात, जेंव्हा घेतली, तेंव्हा देखील आमचा ग्रुप वयाने फारच लहान होता. बियर प्यावी, असे सारखे मनात यायचे पण, कशी घ्यायची याची माहीत देखील फारशी नव्हती. काही इंग्रजी चित्रपट बघितल्याने, ड्रिंक्स तसेच बाटलीतून पितात, एव्हढेच अर्धवट ज्ञान(!!) झाले होते. एकदा, परत मी आणि प्रदीपने, टिटवाळा गणपतीची सहल, असा घाट घातला. घरून सहज परवानगी मिळाली, कारण देवस्थान भेट!!निघायच्या आदल्या रात्री, मी आणि प्रदीपने, बियरची एक(च!!) बाटली मिळवली आणि घरातच लपवून ठेवली. नंतर, दुसऱ्या दिवशी सहलीच्या सामानात ती बाटली – London Pilsner, घुसवली आणि रेल्वे पकडून निघालो. पोहोचल्यावर, प्रथम रीतसर, गणपतीचे दर्शन घेतले आणि तिथल्या उद्यानात, ती बाटली फोडली. अक्षरश: धडधड्त्या छातीनेच तो बाटली आम्हा सर्वजणांच्यात संपवली!!मी, माझे दोघे भाऊ, प्रदीप, प्रशांत, नंदू आणि बाबू(अरविंद) असे सगळे या पापात सहभागी होते!! नंतरच्या आयुष्यात, मी जगभरच्या बियरचा स्वाद घेतला, अत्यंत महागड्या वाईनचा स्वाद घेतला, पण त्या वेळच्या थ्रीलचे अप्रूप काही वेगळेच!! आजही ती आठवण माझ्या मनात तितकीच ताजी आहे.
नंतरची अशीच एक(अत्यंत खुळचट आणि बावळट!!) आठवण आहे. माझ्या नानांचा तसा आम्हा सर्वांनाच फार धाक होता. आम्ही भाऊ तर सोडाच पण, अगदी प्रदीप, प्रशांत, नंदू, बाबू, सुरेश सर्व जण नानांना वचकून असत. एकदा नानांनी, मला एक चांगल्या चपलेचा जोड विकत घेतला होता. काळ्या रंगाची चप्पल होती. त्यावेळेस मला त्याचे फारच अप्रूप वाटले होते. त्यावेळी, आम्ही कांदेवाडीत एका महाराजांच्या मठात नेहमी जात असू. तसेच, एका संध्याकाळी मी, प्रदीप आणि सुरेश गेलो होतो. बाहेर आलो तर, माझी चप्पल गायब!! अंगाला जो काही घाम फुटला आणि चक्क रडू कोसळले, काही बोलायची सोय नाही. आता, नानांना काय सांगायचे? चप्पल हरवली, असे सांगायचे म्हणजे प्रचंड ओरड्याला सामोरे जाणे. आम्ही तिघेही हैराण झालो. संपूर्ण देऊळ अनेकवेळा पालथे घातले पण चपलेचा काही पत्ता लागला नाही. नंतर, कांदेवाडीसमोरच एक, साउथ इंडियन माणसाचे हॉटेल असायचे. आम्हा ग्रुपवर त्याची काय माया जडली होती, कळत नाही, शामशेठ त्याचे नाव. मोठ्या भरघोस मिशा ठेवणारा, हा मालक, आम्ही कितीही वेळ बसलो तरी काही बोलायचं नाही. कितीतरी वर्षे, आम्ही त्याच्या हॉटेलमध्ये काढली, पण कधी फार खाल्ल्याचे फारसे आठवत नाही. जेंव्हा चप्पल हरवली, हे लक्ष्यात आल्यावर, आम्ही तिघे शामशेठच्या हॉटेलमध्ये आलो. काय करावे, हे सुचत नव्हते. नानांना आता कसे समजावयाचे, असा अत्यंत गहन प्रश्न पडला होता. शेवटी माझ्याच डोक्यात एक शक्कल आली (आज लिहिताना मी, खूप हसतोय, पण तेंव्हा जी काय माझी तंतरली होती, त्याचे योग्य शब्दात वर्णन कारणे, केवळ अशक्य!!) बाजारातून त्याच डिझाईनची स्वस्तातली चप्पल घायची आणि तिला काळा रंग द्यायचा!! प्रदीप आणि सुरेश तर माझ्याकडे बघून खो खो हसत होते!! शेवटी आम्ही तिघांनी तसेच केले!! रस्त्यावरील मार्केटमधून एक साधी मिळती जुळती चप्पल घेतली. आता प्रश्न पडला, रंगवायची कशी!! तो प्रश्न, माझ्या दुसऱ्या एका मित्राने, मोठ्या मिनतवारीने सोडविला. तेंव्हा, अरुण लपालीकर (आमचा एक त्यावेळचा वयस्कर – म्हणजे चार, पाच वर्षांनी मोठा!!) त्याच्या घराण्याचा घड्याळ्याचा बिझिनेस होता आणि सुदैवाने, आमच्या खालच्या रिकाम्या जागेत, तो आणि त्याचा मोठा भाऊ, अनिल असे व्यवसाय करीत असत. अरूणकडे, घड्याळ रंगवायचे स्प्रे पेंटिंगचे मशीन होते. त्याला, माझी चप्पल रंगवायला सांगितली!! पहिल्यांदा, माझी कल्पना ऐकल्यावर तर, तो इतका मोठ्याने हसत सुटला, की काही बोलायची सोय नाही. तरीही, मी मैत्रीची गळ घातली आणि त्याच्या कडून तो नवी चप्पल चक्क रंगवून घेतली आणि मी शांतपणे घरी गेलो!! आता, असल्या गाढवपणाला काय म्हणायचे!! पण, असले अवघड आणि जगावेगळे उद्योग आमचे नेहमीच चालत असत. शाळेत तर, मी इतके भन्नाट उद्योग केलेत, त्याला कसलीच तोड नाही. शाळेत तर, मला सगळे, President Nixon असेच म्हणत असत. आजही, काही जुने मित्र, मला त्याच नावाने ओळखतात. अर्थात, शाळेतील उद्योग लिहायचे झाल्यास, तो एक वेगळ्या निबंधाचा विषय ठरेल.
त्यामुळे, हेमराजवाडी हे माझ्या जीवनातले काही साधेसुधे स्थान नव्हते. तिथे, मी खऱ्याअर्थाने रंगून गेलो होतो. त्या वाडीतील गच्ची, हीं माझ्या दृष्टीने फक्त गच्ची नव्हती तर, तिला एक जिवंत व्यक्तिमत्व होते. इथेच, आमच्या वाडीतील दत्ता देवरुखकर, त्याची देशी दारू गाळत असे किंवा ड्रम्स भरीत असे. याच गच्चीत, पुढे वय वाढल्यावर, अनेक वडीलधारी मंडळीबरोबर कोजावरीच्या पौर्णिमा जागविल्या आहेत. याच काळात, एक अशीच चांगली आठवण आहे. प्रदीपची बहिण, ज्योतीचे लग्न झाल्यावर, पहिल्या मंगळागौरीची रात्र, मी आणि माझ्या याच मित्रांनी, प्रदिपच्याच घरात, गाण्यांच्या भेन्ड्यानी संपूर्ण रात्र जागवल्याची अतिशय सुगंधी आठवण, एखाद्या अत्तराची कुपी साठवावी त्याप्रमाणे जपली आहे. याच वाडीत, मी अति अवघड क्षण देखील अनुभवले आहेत. त्यातील एक क्षण म्हणजे, सुरेशच्या अण्णांचे अकल्पित निधन!! तेंव्हा आम्ही सगळेच कोवळ्या वयाचे होतो. अण्णा आजारी होते, याची कल्पना होती पण, असे अचानक निर्वाण होईल, याची कुणालाही सुतराम कल्पना नव्हती. जेंव्हा, आमच्या कानावर हीं बातमी आली, तेंव्हा प्रथमच आयुष्यात, “अवाक” होणे, हीं भावना आणि मृत्युच्या अतर्क्य झेपेचे दर्शन घेतले. तसेच, उदयच्या आईचे जाणे!! उदयची आई तर, एका भयानक अपघातात, उत्तर भारताच्या ट्रीपवर गेली असता, बस दरीत कोसळून, संपली. त्यावेळी, सगळी हेमराजवाडी अक्षरश: विकल झाली होती. आजही, माझ्या मनावर हे व्रण आहेत. अर्थात, मृत्यूचे असे भेसूर दर्शन, उत्तर आयुष्यात मला वारंवार घ्यावे लागले. विशेषत: मी, नायजेरियात असताना, अचानकपणे, माझ्या अंगावर, बातमी आली, – “माझी आई, हृदयविकाराच्या झटक्याने गेली!!” त्यावेळी, जरी मी पस्तिशीत होतो तरी तो धक्का पचविणे, आजही मला अवघड जाते. आज, आई जाऊन, अठरा वर्षे झाली, तरी देखील प्रत्येक आनंदाच्या क्षणी, माझे मान तसे उदासलेलेच असते. मनात हाच विचार येतो, “जेंव्हा माझ्या कुटुंबाला माझी गरज होती तेंव्हा मी परदेशात होतो आणि आईचे शेवटचे दर्शनदेखील मला घेता आले नाही, तेंव्हा आता या आनंदाचा काय उपयोग!!” खरतर, हीं एक neurotic भावना आहे आणि मी त्यावर मात करण्याचा नेहमी प्रयत्न(असफल!!) करतो, पण, ती जाणीव मनाच्या मुळाशी अगदी घट्ट बसून आहे!!
अजूनही आनंदाचे आणि फजितीचे बरेच क्षण लिहिता येण्यासारखे आहेत. ते आता पुढील भागात!!

No comments:

Post a Comment