Thursday 19 June 2014

विदुषक – एक गद्य काव्य!!



जी.ए.कुलकर्ण्यांनी आयुष्यात बऱ्याच,ज्याला अजरामर म्हणाव्यात अशा अनेक कथा लिहिल्या. या प्रस्तुत कथेविषयी लिहिताना, इतर तितक्याच आणि त्याच तोलामोलाच्या कथा बाजूला टाकल्या, ही थोडी खंत आहेच. अगदी, उदाहरणेच द्यायची झाल्यास,”प्रवासी”,”ओर्फियस”,
“स्वामी”,”दूत”,”रत्न” अशा कितीतरी कथा दाखवता येतील, की त्या,या कथेइतक्याच अप्रतिम आहेत. तरीही, एकूण संपूर्ण विचार करता, मला तरी हीच त्यांची सर्वोत्तम कथा वाटते.
वास्तविक, कुठल्याही कलेचे परीक्षण करताना, वैय्यक्तिक मते, आवड ही नेहमीच खड्यासारखी बाजूला टाकणे, अवश्यमेव ठरते. कलेत वैय्यक्तिक आवड आली की, सगळाच लेखन प्रपंच डागाळतो!! कलेच्या उच्चनिचतेमध्ये वैय्यक्तिकतेला स्थान नाही असे असून देखील, केवळ मीच लिहित असल्याने, माझ्या आवडीची दखल घेत आहे. इतर कथा, कथा या दृष्टीने खरोखरच असामान्य आहेत. असो.
आधी आपण, सुरवातीला, जी.ए.च्या कथेवरील काही आक्षेपापासून सुरवात करूया. सर्वात मोठा आक्षेप असा आहे की, जी.ए.च्या कथेतील पात्रे ही स्वत:ची मते, विचार न मांडता, लेखक स्वत:चेच विचार लिहित असतो. हा आक्षेप बऱ्याचप्रमाणात योग्य आहे. विशेषत: जेंव्हा ग्रामीण भागातील कथा विषय आणि पात्रे असताना तर हा आक्षेप खटकणाराच वाटतो. अत्यंत, सामान्य वकूबाची माणसे, सतत गरिबीत झिजत आयुष्याशी खेळ करणारी माणसे, अशा व्यक्ती अत्यंत तल्लख विचार आणि गुंतागुंतीचे मनोव्यापार करणे अशक्यप्राय वाटते. जिथे रोजच्या आयुष्याशी भ्रांत असताना, मनात, ज्याला “तत्वज्ञान” म्हणता येईल असा विचार कसा करू शकतील? तसेच, त्यांच्या कथेत, प्रमाणाच्या बाहेर प्रतिमांचा खच पडलेला असतो. त्यामुळे, खूपवेळा कथा बाजूला राहून, त्या प्रतिमाच वाचताना लक्षात राहतात. वास्तविक, कुठलीही प्रतिमा ही ती कथा पुढे जाण्यासाठी किंवा तो प्रसंग अधिक अधोरेखित करण्यासाठी वापरल्या जातात. पण, काही कथांत, प्रतिमांचा अति विक्षेप होतो, हे मात्र मान्य करावेच लागेल. काही वेळा असे देखील घडले आहे की, कथा मूळ गाभा हा अगदी छोटा असूनदेखील कथा प्रमाणाच्या बाहेर विस्तारलेली आहे आणि त्यामुळे, कथेला जी सखोलता आवश्यक असते, तिथे कथा रेंगाळत राहते, उदाहरणार्थ, “चंद्रावळ” ही कथा.
अर्थात,”विदुषक” या कथेच्या संदर्भात वरील सगळे आक्षेप खोडून काढता येतात. खर तर, ही कथा म्हणजे एका अद्भुततेच्या साम्राज्यातील विहार असेच म्हणता येईल. या कथेतील सगळी पात्रे ही, विद्याविभूषित तरी किंवा उच्चविद्याविभूषित आहेत. कुठलेही पात्र हे बेंगरूळ किंवा लोचट असे नाही. त्यामुळे, कथेतील विचार आणि आशय हा नेहमीच अत्यंत जटिल आणि सघन झालेला आहे. वास्तविक, सगळी कथा म्हणजे, पूर्वापार चालत असलेल्या राजसत्तेच्या अभिलाषेचीच आणि त्यानुरूप चालणाऱ्या ओंगळ राजकारणाचीच कथा आहे. सुरवातीलाच, नव्या राज्याभिषेकापासून कथेचा आरंभ होतो. आता, नवीन राजा निवडायचा, तेंव्हा प्रथेनुसार दोन्ही उमेदवारांना काही कसोट्या पार पाडणे आवश्यक ठरते. तिथेच राजकारणाच्या हालचालींना सुरवात होते. राजसंपादन हा नेहमीच बुद्धीचा आणि अत्यंत अश्लाघ्य कूटनीतीचा खेळ ठरलेला आहे. त्यानुरुपच कथेची बांधणी सुरु होते. इथे प्रत्येक उमेदवाराला आपल्याबरोबर, एखादा सल्लागार घ्यायला परवानगी असते आणि इथेच विजयराजे हे राज्यात प्रसिध्द असणाऱ्या विदुषकाला सल्लागार म्हणून घेतात. सुरवातीपासूनच विदुषक हे पात्र विनोदाशी थोडेसे संलग्न असल्याचे दाखवलेले आहे. तरीही, त्याच्या बोलण्यातून, त्याच्या बुद्धीची चमक अधूनमधून दिसत असते पण ती नेहमीप्रमाणे दुर्लक्षित केली जाते.
राजकारणात, कुणीही कुणावरही पूर्णपणे विश्वासून रहात नाही आणि तसे परवडत देखील नाही आणि हाच नेमका अनुभव या कथेत वारंवार वाचायला मिळतो. अखेर, दोन्ही उमेदवार स्वत:वरील फाजील अतिआत्मविश्वासापायी प्राण गमावतात आणि इथे परत एकदा सगळ्यांचा एकाच गलका सुरु होतो, की कुणामुळे प्राण गमवावे लागले आणि कुणी कुणाचे ऐकले नाही. त्यातून बरीच वादावादी होते अखेर यात, विदुषकाचा देखील बळी जातो.अर्थात, हे सगळे अति थोडक्यात कथानक सांगितले आहे. इथे कथानक लिहिण्यात तसे काहीच औचित्य नाही.
इथे खरी गंमत आहे ती, कथाविषय आणि त्यातील जटीलतेची!! अगदी प्रथमपासून, कथेची भाषा ही संस्कृत वातावरणात सुरु होते, ती अखेर पर्यंत!! इथले राज्यवैभव, इथले रीतीरिवाज, लोकांची राहणी, संस्कृती आणि समाजजीवन याचे यथार्थ दर्शन कथेच्यावाचनात दिसून येते. आता, राजकारण म्हटल्यावर, बुद्धीचा खेळ हा आलाच!! त्यामुळे, इथे लेखकाची भाषा अतिशय तालेवार, लखलखीत आणि प्रतिमांनी समृध्द झाली आहे. खरतर, कथाविषय, आशय, भाषा समृद्धता आणि प्रतिमांचा वापर, या गुणांनीच ही कथा फार वेगळी आणि असामान्य होते. इथली प्रत्येक व्यक्ती ही स्वत:चे भावविश्व घेऊन तर येतेच पण त्याबरोबर अत्यंत झगझगीत विचार घेऊन येते. या कथेतील प्रत्येक विचार हा वाचकाला अंतर्मुख करत राहतो. या कथेत, “चंचला” आणि “धृवशीला” अशा दोन तरुणींचा उल्लेख आहे. मी तो अशासाठी केला की, सुरवातीला वाचताना, या तरुणी उठवळ आणि उत्च्रुंखल वाटतात पण जशी कथा पुढे सरकते, तशी त्या तरुणी सौंदर्यलोलुप बा वाटत, एका ठराविक विचाराने आपल्याला प्रभावित करतात. हीच या कथेची खरी शक्ती आहे. या कथेत कुठलेच पात्र, उगाच आणले आहे असे वाटतच नाही. प्रत्येक पात्राला स्वत:चा एक स्वभाव विशेष आहे, स्वत:चे विचार आहेत. अगदी, कथेत अधूनमधून वावरणारा आणि अखेरीस अनपेक्षित धक्का देणारा, “डोंब” देखील स्तिमित करणारे व्यक्तिमत्व बनून जाते.
जी.ए.कुलकर्णी यांच्या कथा वाचताना डोक्याला फार त्रास देतात, हे वाक्य फार सैल आणि हलकेपणे वापरले जाते. तसेच त्याच्या कथा ह्या नेहमीच दु:खाच्या सावलीत वावरत असतात. अर्थात, दोन्हीही टीका या चुकीच्या आहेत. जर का या लेखकाच्या कथा सतत दु:खाच्या सावलीत वावरत असतील तर, मग, “गंगाधर गाडगीळ”,”व्यंकटेश माडगुळकर”,”चिं.त्र्य.खानोलकर” यांच्या कथा काय वेगळे दर्शवतात? माडगुळकर आणि खानोलकर यांच्या कथेवरील समीक्षा वाचताना, मी असे वाचले आहे की, “या लेखकांच्या कथा वाचताना, नेहमी असेच वाटत राहते की, ही माणसे जणू सुखासाठी कधीच जन्माला आलेली नाहीत!!” आता, हे वाक्य आणखी वेगळे काय दर्शवते? जी.ए.कुलकर्णी यांच्या कथा वाचताना, आपले चित्त थाऱ्यावर रहात नाही, हे कबूल पण म्हणून तो काही दोष ठरत नाही. असे वाचक हे नेहमी, नाजूक-साजूक कथेच्या वाटेला जातात!! तशा कथेची सवय झाल्याने, या वाचकांना या लेखकाच्या कथा पचनी पडत नसतील तर नवल ते काय!!
कलाधीष्ठित कथावस्तू, घटनाबहुलता, आणि रहस्यप्रधानता ही या लेखकाची खरी बलस्थाने आहेत आणि त्यामुळे जरी कथा अति दीर्घ झाली तरी, वाचताना कधीही कंटाळा येत नाही, उलट, वाचक अधिकाधिक गुंतत जातो. विदुषक ही कथा या सर्व वैशिष्ठ्यानी भरलेली आहे. इथले तत्वज्ञान हे राजकारणधिस्थित आहे, एकमेकांवर सतत कुरघोडी करण्याचा प्रयत्न चाललेला आहे, प्रत्येकवेळी मीच कसा विचारी, हुशार आणि सर्वगुणसंपन्न आहे, हेच दुसऱ्याच्या मनावर ठसवण्याचा प्रयत्न चाललेला आहे आणि या खेळात नकोतेव्हढा गुंतत गेल्याने, प्रत्येकाची कशी फसगत होत गेली आहे, याचे अत्यंत मनोज्ञ चित्रण वाचायला मिळते. यामुळेच, ही कथा मला अतिशय आवडते.

No comments:

Post a Comment