Saturday 5 July 2014

कुमार गंधर्व - प्रयोगशील गायकी(??) - भाग २

मागील लेखात आपण, कुमार गंधर्वांच्या गायनातील, उपशास्त्रीय गायनातील काही प्रयोगांबद्दल बघितले आणि आता तोच धागा पुढे नेऊ या. 
त्रिवेणी :- कबीर, सूरदास आणि मीराबाई यांच्या रचना इथे ऐकायला मिळतात. सगळी भजने ऐकताना असेच वाटत राहिले, गायक रागाच्या बंदिशी सादर करीत आहेत. अर्थात, ही सवय भावगीत गायनात प्रकर्षाने दिसून आली पण त्याबद्दल थोडे नंतर. अर्थात गायनाची शैली बहुतांशी रागदारी थाटाची आहे परंतु अत्यंत अटकर स्वरूपात आहे. मला, १} उठी उठी सखी सब मंगल गाये, २] उधो अंखिया अति अनुरागी, ३] मै गाऊ पद गाऊ - या रचना ऐकायला मिळाल्या. स्वरविस्तार   तसा मर्यादित स्वरूपात आहे पण तरीही स्वरांवर "झडप" टाकायची वृत्ती इथेही प्रकर्षाने आढळते. पुढे प्रसिद्ध पावलेल्या निर्गुणी भजनाची मुलतत्वे या गायनात दिसून येतात. शब्दप्रधान गायकीत एक गोष्ट प्रकर्षाने पाळावी लागते आणि ती म्हणजे कवीचे जे शब्द आहेत, त्यांना नेमका न्याय देण्याचा. 
इथे असे झाले आहे, एकामागोमाग या रचना ऐकताना, त्यात गायकीचे नाविन्य तसे कमी आढळले. शब्दांना न्याय देणे म्हणजे त्यातील आशय अधिक दृग्गोचर करणे, हा एक भाग येतो तर शब्दोच्चार अधिक स्वच्छ, आणि निकोप होणे जरुरीचे असते. सुरांच्या सहाय्याने शब्दांना अधिक खुलवून मांडणे, इथे नेमके झाले पण बरेचवेळा " मूर्तीपेक्षा मखराला महत्व" असा काहीसा प्रकार झाला!! एकाहून अधिक कलांनी मिळून होणाऱ्या आविष्कारात, विशिष्ट स्वरसमूह = विशिष्ट अर्थ असे समीकरण सरसकट गृहीत धरणे धोक्याचेच आणि तसा धोका इथे जाणवतो. विशिष्ट शब्दारचनेस कोणती चाल, यात मतभिन्नता स्वाभाविक आहे पण सांगीत सुसंगतीच्या तत्वानुसार आधीच्या सुरावटीने नंतर येणारी सुरावट कोणती, हे निश्चित होत असल्याने, तिथे व्यक्तिगत पसंती - नापसंतीचा प्रश्नच उद्भवत नाही आणि इथे नेमके तेच घडले आहे. कबीराचा निर्गुण भक्तिभाव, मीरेची आर्तता आणि सुरदासाचा प्रौढ विरहावेग, या भावनांची प्रचीती येणे जरुरीचे होते पण तसे फारसे घडले नाही. 
मला उमजलेले बालगंधर्व :- इथे एक विचार पहिल्यांदा मांडणे जरुरीचे आहे, जरी बालगंधर्वांची गाणी असली तरी कुमार गंधर्व, हे स्वतंत्र प्रज्ञेचे गायक असल्याने, बालगंधर्वांच्या गाण्याचे साचा किंवा आराखाडा तसाच ठेऊन, त्यात स्वत:चा विचार प्रस्थापित करून, स्वरविस्तार करायचा, हाच गायकाचा प्रधान हेतू होता आणि त्या हेतूंबद्दल शंका घेण्याचे काहीही कारण नाही. दुसरे असे, बालगंधर्वांचा आवाज आणि कुमार गंधर्वांचा आवाज, यात बराच फरक असल्याने, बालगंधर्वांच्या आवाजाची वैशिष्ट्ये - "आ"कार लावणे तसेच सगळ्या सप्तकात सहज हिंडणे, हे कुमार गंधर्वांच्या बाबतीत शक्यच नव्हते. कुमार गंधर्वांच्या गायनाच्या बाबतीत, नेहमी अल्पस्वरी तान आणि स्वराला निमुळतेपण असल्याने, दोन्ही गायन शैलीतील फरक स्पष्ट दिसतो - अर्थात हे न्यूनत्व नव्हे. परंतु फरक पडतो तो, शब्दोच्चारात!! बालगंधर्व नेहमी त्याबाबत सजग असल्याचे दिसून येते तर कुमार गंधर्व हे तिथे थोडे दुर्लक्ष्य करत आहेत, हे जाणवते. कुमार गंधर्वांच्या मते, बालगंधर्वांची गायन शैली आत्मसात केली की झाले, असा स्पष्ट विचार दिसतो!! 
मराठी नाट्यगीते :- वास्तविक कुमार गंधर्वांनी स्वतंत्र अशी तुरळकच नाट्यगीते गायली. १] ऋणानुबंधांच्या जिथून पडल्या गाठी, २] उठी उठी गोपाळा. ही दोन्हे गाणी प्रचंड लोकप्रिय आहेत. नाट्यगीतांचा असा स्वत:चे असा वेगळा "चेहरा" असतो, त्या गायनाचे देखील वेगळे निकष असतात. वरती, बालगंधर्वांच्या गायनाचा उल्लेख केला, त्याबाबतीत देखील हेच निकष योग्य आहेत. कितीही झाले तरी नाट्यगीत म्हणजे रागदारी संगीत नव्हे. त्यात रागदारी संगीताचे कुठले अलंकार घ्यावेत, कुठले टाळावेत तसेच गायकी कशी अनुसरावी आणि मुख्य म्हणजे आपण गातो, ते नाटकातील एक व्यक्तिरेखे साठी आहे, याचे भान ठेवणे आवश्यक असते. भावगीत गायनात, अशी कुठलीही व्यक्ती समोर नसल्याने, तशा मर्यादा पडत नाहीत. 
आता पहिल्या गाण्याचा विचार केला तर, गाण्याची चाल, वसंत देसायांनी अप्रतिम बांधली आहे, गाण्याचे शब्द तसे पारंपारिक धाटणीचे आहेत पण तरीही भावना पुरेशा व्यक्त करणारे आहेत. फरक पडतो, तो गायनात. दुसऱ्या कडव्याच्या शेवटी "हसण्यावरती, रुसण्यासाठी जन्म जन्मीच्या गाठी" मधील, "जन्म जन्मीच्या" हे शब्द फार खडबडीत ऐकायला येतात म्हणजे "जल्म जल्मिच्या गाठी" असे काहीतरी ऐकायला येतात तसेच तिसऱ्या कडव्यातील, "कधी गहिवरलो, कधी धुसफुसलो" मधील "धुसफुसलो" हा शब्द ऐकावा. शब्दावर नको तितका जोर दिला गेला आहे आणि त्यामुळी त्या शब्दातील भावनाच नष्ट झाली आहे!! अगदी वेगळ्या शब्दात मांडायचे झाल्यास, "धुसफुसलो" हा शब्द "फसफसत" अंगावर येतो!! याचे मुख्य कारण, गायकाची शब्दांकडे बघायची दृष्टी. 
मराठी भावगीते:- कुमार गंधर्वांची सर्वात गाजलेली भावगीते ही कवी अनिल, यांच्या कविता आहेत. १] आज अचानक गाठ पडे, २] अजुनी रुसुनी आहे. जर कविता म्हणून विचार करायला गेलो तर नि:संशय शब्दकळा अप्रतिम आहे आणि या दोन्ही भावकविता आहेत, आशयाच्या कितीतरी छटा सापडू शकतात. प्रत्यक्षात, गायनात याचे काहीही प्रतिबिंब पडत नाही. गायनात दिसून येते,ती गायकाची स्वरांवरील पक्कड तसेच कविता, ही बंदिशीच्या अंगाने गायली गेली आहे. भावगीत म्हणजे शास्त्रोक्त बंदिश नव्हे, हाच विचार या गायनात लुप्त झालेला दिसतो. "आज अचानक गाठ पडे" या कवितेत "अचानक" गाठ पडणे, या कृतीला महत्व आहे आणि त्यातून येणाऱ्या प्रणयी भावनेला महत्व आहे. या भावनांचा प्रत्यय, गायनातून अजिबात येत नाही, हे अत्यंत गडद अपयश म्हणावे लागते. 
मुळात, इथे भावगीताच्या मूळ हेतूलाच हरताळ फासला आहे, असे वाटते. आपण, वरती जे सांगीतिक आविष्कार बघितले ते सगळे बव्हंशी उपशास्त्रीय संगीताचे आविष्कार होते आणि तिथे सुरांची आळवणी, काही प्रमाणात चालून जाते परंतु भावगीत गायनात असला प्रकार खपत नाही आणि याचे मुख्य कारण, भाषा आणि स्वर, ही दोन्ही वेगवेगळी माध्यमे आहेत अभेत या दोन्ही माध्यमांचा नेमका विचार सुगम संगीतात अभिप्रेत असतो. 
हे असे का घडले तर इथेच गायकाची विचार करण्याची पद्धत बघावी लागते. वरील सगळ्या आविष्कारात, शब्दांचा आढळ, अनिवार्य आहे आणि त्याला बरोबर घेऊनच संगीताची बांधणी करावी लागते. ती करताना, अर्थात, शब्द माध्यमाची योग्य ती काळजी घेणे क्रमप्राप्तच ठरते आणि याच जाणिवांचा इथे नेमका विसर पडलेला दिसतो आणि आपल्याला ऐकायला मिळतो, तो केवळ संगीताचा प्रादुर्भाव. शब्द बिचारे कोपऱ्यात सारले जातात. 
कुमार गंधर्वांनी या सगळ्यांकडे आपल्या सांगीतिक कल्पनाच्या आविष्काराची गरज म्हणून बघितले आणि हा या दृष्टीचा फरक आहे आणि त्यामुळे ही गाणी कितीही श्रवणीय (ऐकायला चांगली) वाटली तरी वस्तुस्थिती कल्पनेपेक्षा फार दूर आहे आणि हेच कुमार गंधर्वांच्या गायनाचे अपयश म्हणावे लागेल.

कुमार गंधर्व - प्रयोगशील गायकी(??) - भाग १

कुमार गंधर्वांचे रागदारी संगीतातील श्रेष्ठत्व कुणीही जाणकार किंवा सामान्य रसिक, सहज मान्य करील आणि त्याबाबत फारसा विरोध असू नये. माळव्यातील लोकसंगीताचा अत्यंत बारकाईने आणि अभ्यासपूर्ण नजरेने व्यासंग करून, नवीन राग निर्मिती करणे, हे खरच अचाट म्हणावे, असे काम. लोकसंगीतातून, "मधुसुरजा","अहिमोहीनी","लगनगांधार","मालवती","संजारी" सारख्या अनवट रागांची निर्मिती, ही नेहमीच अविश्वसनीय वाटावी, अशीच राहील. तसेच, त्यावेळेस, भारतीय रागसंगीतात "थोडे साचलेपण" तयार झाले होते, म्हणजे, रागाचे सादरीकरण साचेबंद झाले होते, त्यातून कुमार गंधर्वांनी मोकळेपणा आणला.  
आणखी काही वैशिष्ट्ये लिहायची झाल्यास, गायनाची मांडणी तसेच पद्धत, यात बरेच नाविन्य आणले. लहानपणीच भोगलेल्या आजारातून निर्माण झालेल्या शारीरिक दौर्बल्यावर मात करून, आपली स्वत:ची संपूर्ण वेगळी शैली निर्माण केली. शास्त्रीय संगीतातील, "मुर्घ्नी स्वर,"गमक", तार सप्तक" इत्यादी जे खास अलंकार आहेत, त्या सर्वांना स्वत:चा असा नवीन आयाम दिला. ताण घेताना, संपूर्ण सप्तक एकवटून न घेता, खंडित तान घेऊन तरीही लयीचा बिकट बोजा अत्यंत सुविहित आणि सौंदर्यपूर्ण रीतीने घेत असत.  
दुसरे वैशिष्ट्य सांगायचे झाल्यास, गायकी जयपुर अंगाने तालातील सूक्ष्म लयखंडाशी नाते ठेऊन, पुढे जातात. तसेच किराणा घराण्याच्या प्रभावामुळे (ओंकारानाथांचा प्रभाव लक्षणीय जाणवतो) आवाहकता सांभाळून गायन होते पण किराणा घराण्यातील स्वच्छ-स्पष्ट "आ"कार टाळून स्वारांस टोकदार पण गुंजनयुक्त करण्यावर जोर देते. याचा परिणाम, गायनात "ये" किंवा "या" कार भरपूर मिळतात. तार सप्तकातील स्वर किंवा मंद्र सप्तकातील गायनात "आ"कार ऐकायला मिळत नाही, त्यामागे हे इंगित आहे. 
ख्याल गायनाचा थोडा आणखी विचार केला तर,ख्यालावर "टप्पा" गायनाचा अधिक प्रभाव दिसतो. "टप्पा" चमकदार असतो, क्रमाक्रमाने, सावकाश पुढे जाणे यापेक्षा मधले स्वरपुंज अल्प विस्तारासाठी घेऊन पुन्हा चपलगतीने पुढे झेपावणे, ख्याल गायनात वारंवार आढळते. ख्याल गायनात एक एक स्वर फुलवला जातो तर टप्पा गायनात स्वरगुच्छांची खुलावट असते. यात थोडाफार कृत्रिमपणा जरूर असतो पण, चमत्कृती व आकर्षकता देखील भरपूर असते. अर्थात, हे झाले, कुमार गंधर्वांच्या रागदारी गायनाबद्दल. इथे मी फार थोडक्यात आढावा घेतला आहे, याची खेदयुक्त जाणीव आहे. इथे मला, कुमार गंधर्वांच्या उपशास्त्रीय आणि सुगम संगीताच्या गायनाबद्दल लिहायचे आहे आणि त्यासाठी मी, त्यांचे काही कार्यक्रम विचारात घेतले आहेत. 
१] गीतवर्षा, २] त्रिवेणी,३] मला उमजलेले बालगंधर्व, ४] गीत हेमंत,५] मराठी भावगीते, ६] मराठी नाट्यगीते. प्रत्येक कार्यक्रमाचा थोडक्यात पण तरीही सगळ्या बाजूने परामर्श घेण्याचा प्रयत्न करणार आहे. 
पहिलीच बाब अशी आहे की, हे सगळे कार्यक्रम हे रागदारी संगीताचा आधार घेऊन तरीही शब्दाच्या आशयाशी संबंधित आहेत आणि या दृष्टीनेच माझा प्रयत्न राहणार आहे. अर्थात हे सगळे कार्यक्रम मी प्रत्यक्ष ऐकलेले नसून त्यांचे रेकॉर्डिंग ऐकून मदमास घेतलेला आहे. 
१] गीतवर्षा:- नावावरून ध्यानात येते की कार्यक्रम ऋतूप्रधान रचनांवर आहे. आपल्या हिंदू कालगणनेनुसार ६ ऋतू आणि त्यासंबंधीच्या रचना, असे स्वरूप आहे. रचना बंदिश स्वरुपाच्या आहेत. वसुंधरा कोमकली आणि मीरा राव असे स्त्री आवाज तर कुमार गंधर्वांचा पुरुषी आवाज अशी आखणी. अर्थात, त्यांच्या मैफिली गायनाचा प्रभाव सर्वत्र जाणवत असतो. अर्थात, रागविस्ताराप्रमाणे इथे स्वरविस्तार शक्य नसल्याने, गायन, थोडेसे "संपादित" स्वरूपाचे आहे. निश्चित केलेला ताल, व स्वरबिंदू यापासून न ढळता, बंदिशी गायन झाल्याने, जरी उपशास्त्रीय गायन असले तरी बरेचवेळा "मल्हार","मारवा" ऐकायला येत आहे का? असा भास होत होता. राग आणि वेळ, ही गोष्ट भारतीय संगीतात नवीन नाही आणि त्यानुरूप चीजांच्या रचना असतात. परंतु राग,ऋतू व शब्द यांचा तपशीलवार, योजनाबद्ध विस्तारित  विचारपूर्वक सांगड घालणे, या कल्पनेतील नवीनता मान्य करावी लागते. इथे एक प्रश्न उद्भवतो. स्वर आणि शब्द एकेमेकांचे प्रतिनिधित्व करू शकतात का? दुसरा प्रश्न, भिन्न माध्यमांतर्गत रचनाबंधांतून प्रतीत होणाऱ्या अनुभवाचे स्वरूप एकच असू शकते का?याच बाबीचा पुढील भाग असा, राग आणि ऋतू व इतर भौतिक घडामोडी यांचा खरोखरच अतूट, निश्चित आणि अतूट संबंध आहे का? इथे मात्र या कार्यक्रमाचे यश काहीसे दुरावलेले दिसून येते. कार्यक्रम उपशास्त्रीय संगीताचा असून देखील बरेचवेळा रागविस्ताराला महत्व मिळाल्याचे ऐकायला मिळाले. 
२] गीत हेमंत :- तसे पाहिले तर "गीतवर्षा" या कार्यक्रमाचे वेगळे स्वरूप असे म्हणावे लागते. विशिष्ट ऋतूंमधील घटना आणि विशिष्ट संगीत, यांत कल्पनासहचर्य साधने, हाच मूळ उद्देश.बागेश्री, दुर्गा सारख्या परिचित रागात, तर धनबसंती, शिवभटियार सारख्या काहीशा अनवट रागात रचना बांधलेल्या आहेत. प्रश्न असा उद्भवतो, असा रचनांचा संग्रह सादर करून कोणत्याही पातळीवर सांगीत आणि आशयबद्ध - एकसंध असा अंतिम परिणाम साधणे, भारतीय संगीताच्या पार्श्वभूमीवर शक्य आहे का? पाश्चात्य संगीतात "प्रोग्रॅम म्युझिक" सारख्या आविष्कारांसारखे आहे. त्यानुसार विचार करायचा झाल्यास, "प्रोग्रॅम म्युझिक" मध्ये, विशिष्ट घटना आणि त्यांचा क्रम यांची संगीताविष्कारांशी सांगड घालणे, हा विचार अनुस्यूत असतो. यात घटना कथासुत्राच्या साखळीतील असतील किंवा एकाच प्रसंगाच्या स्वरूपाच्यादेखील असतील. 
या सगळ्याचे अंतिम फलित, प्रसंगवर्णन करणाऱ्या शान्दांचा त्यांनी आधार घेतला पण या शब्दांना शास्त्रीय, उपशास्त्रीय संगीताच्या संस्कारांनी अधिक सांगीत व गायनयोग्य बनविणे, त्यांना भाग पडले आणि त्यामुळे, भौतिक पातळीवरील घटनांचे वा प्रसंगांचे सूचन आणि संभाव्य नाद्सृष्टी यांचे समानांतर अनुभव  -अशा दोन्ही गोष्टींतील अपयश अधिक गडद झाले. 

पुढील भागात, "त्रिवेणी" "मला उमजलेले बालगंधर्व" " मराठी नाट्यगीते" आणि "मराठी भावगीते" या संबंधी अशाच प्रकारे विचार मांडायचा प्रयत्न करणार आहे.