Thursday 19 June 2014

हेमराज वाडी – माझे बालपण!! भाग १




खर तर, माझे बालपण, म्हणजे सगळाच Nostalgia आहे आणि त्यात कुणाला फारसा रस असेल असे मला वाटत नाही. त्यातील प्रमुख कारण म्हणजे, मी असा कुणी फार प्रचंड आवाक्याचा माणूस नव्हे की ज्याने आयुष्यात फार मोठी मर्दुमकी गाजवली आहे. पण, एकदा की पन्नाशी उलटली की मग पाठीलाच डोळे फुटतात आणि त्यात आपलीच अनेक प्रतिबिंबे लखलखायला लागतात आणि सर्वात महत्वाचे म्हणजे, आयुष्याच्या या काळात, आपण जरा समंजस झालेलो असतो आणि त्या दृष्टीकोनातून, आपल्याच गतायुष्यातील काही आठवणीना वेगळा अर्थ प्राप्त होतो का, याचा माग काढता येतो. त्यावेळी केलेली कृत्ये, माग ती धीसडघाईची असोत की विचारपूर्वक केलेली असोत, त्याबाबत तठस्थपणे विचार करू शकतो. निदान तसा माझा प्रयत्न राहणार आहे. आपण, आपल्याच आयुष्याकडे संपूर्णपणे त्रयस्थ नजरेतून बघणे, फार अवघड असते, कारण त्यात आपल्याच भावना गुंतलेल्या असतात आणि एकदा की भावना गुंतल्या की मग भावविवशता आपसूकच मागोमाग येते आणि अकारण हळवेपणा येतो. म्हणजे, हळवेपणा हा मुळात दोष नाही पण, तेव्हढे आपल्याला भान राहत नाही आणि त्या हळवेपणाची मर्यादा ओलांडली जाते. अर्थात, हाच विचार प्रमुख ठेउनच, मी या आठवणी लिहायचा प्रयत्न करणात आहे.
प्रत्येक माणसाच्या आयुष्यात, माझा जसा काळ आला आहे, तसा येताच असतो आणि त्यातून मग कधीकधी नवा विचार उदयास येतो. प्रत्येकाच्या वाटेला असे भाग्य येत नाही, किंबहुना अनेकवेळा विफलताच पदरी पडते. तरी देखील, मी असला(खूळचटपणा!!) करून बघत आहे. असो, नमनाला किती तेल जाळायचे!!
हेमराजवाडी, हीं तशी एक लांब,अरुंद अशी गल्ली वजा चाळ आहे, जी गिरगावमधील एक प्रमुख वाडी आहे. तसे, या वाडीत आजपर्यंत तरी कुणी आंतरराष्ट्रीय ख्यातीचे कुणी व्यक्तिमत्व जन्माला आलेले नाही आणि पुढे देखील तसे कुणी येण्याचा संभव देखील नाही. तशी हीं वाडी म्हणजे टिपीकल मध्यमवर्गीय लोकांच्या वस्तीचीच चाळ आहे आणि चाळसंस्कृतीचे सगळे गुण आणि अवगुण इथे बघायला मिळतात. आणि अशाच वाडीत माझे बालपण गेले. वास्तविक मी, शेजारच्या करेलवाडीत राहतो पण, माझे सगळे बालपण मात्र हेमराजवाडीतच गेले. एकतर, माझ्या वयाची आणि माझ्या शाळेतील मुले या वाडीत बरीच होती. “होती” म्हणायचे कारण, आता बहुतेकजण, वाडी सोडून दुसरीकडे राहायला गेलेत. आमची करेलवाडी तशी अति दुर्गुणांनी भरलेली,म्हणजे हेमराजवाडीत काही कमी दुर्गुणी माणसे नव्हती, पण “दगडापेक्षा वीट मऊ” या न्यायाने, हीच वाडी माझ्या संलग्न झाली. त्यातून, या वाडीत ब्राह्मण वस्ती आणि सोनार वस्ती अधिक!! त्याकाळी, आमच्या वाडीत पारशी कुटुंबे बरीच रहायची. त्यामुळे, माझा ओढा हेमराजवाडीकडे अधिक. त्यावेळची मध्यम वर्गाची परिस्थिती बघता, आमचा एकमेकांच्या कुटुंबियांशी घरेलू संबंध अधिक होता. याच न्यायाने, आमचा तिथे एक चांगला ग्रुप जमला. या वाडीत, E ब्लॉकमध्ये माझे जास्त मित्र होते. सुरेश मोघे, प्रदीप मुळावकर, नंदू पिटकर, अरविंद पिटकर आणि माझे लहान बंधू, असा आमचा त्यावेळचा ग्रुप होता. त्यातून, सुरेश, नंदू आणि मी, एकच वयाचे, फारतर एखाद, दोन महिने इकडे, तिकडे!! सुरेशचा मोठा भाऊ, रमेश नंतर आमच्यात सामील झाला, तसेच तळमजल्यावरील श्याम प्रभू आमच्यात आला. या ब्लॉकला वरच्या मजल्यावर एक लांबलचक गच्ची आहे आणि  त्या गच्चीचा आम्ही जितका फायदा उठवला, तितका त्यावेळी देखील आणि नंतरसुद्धा कुणीही उठवला नाही. खर सांगायचं झाल्यास, आमचे सगळ्यांचे अवघे बालपण या गच्चीत व्यतीत झाले. त्याकाळी, आजच्यासारखे टीव्ही सारखे मनोरंजनाचे साधन नव्हते. किंबहुना, साठ, सत्तरीच्या काळात, रेडियो आणि फार तर, टेपरेकॉर्डर हीच प्रमुख विरंगुळ्याची साधने उपलब्ध होती. मला आजही आठवतेय, १९७३ साली, मुंबईत नवीनच टीव्ही सुरु झाला होता. त्यावेळी, मुंबईतील भारत आणि इंग्लंड यातील सामन्याचे थेट प्रक्षेपण दाखवायचे ठरले होते आणि लोकांत प्रचंड उत्सुकता निर्माण झाली होती. माझ्या बाबांनी तेंव्हा नुकताच टीव्ही घेतला होता, त्यामुळे माझे घर, हे जवळपास गिरगावात आकर्षण झाले होते, इतके की, प्रत्यक्ष सामन्याच्या दिवसात, आमचे घर म्हणजे आम्हालाच जागा नाही, अशी परिस्थिती झाली होती. असो, तरीदेखील टीव्हीने आमचे आयुष्य तसे व्यापले नव्हते.
अशा वेळी, आमचा प्रमुख खेळ म्हणजे, गोट्या, आणि क्रिकेट!! आणि या खेळासाठी, गच्चीशिवाय कुठली चांगली जागा!! मला आजही स्पष्टपणे आठवतेय, ते आमचे भान हरपून, खेळ खेळण्याचे दिवस!! दिवस नाही, संध्याकाळ देखील नाही, आम्ही उन्हाची कसलीच पर्वा न करता, खेळत असू. आज, मला याचे फार नवल वाटते आणि असे नवल वाटावे, इतके आमचे आयुष्य नंतर फार झपाट्याने बदलत गेले. त्यावेळी, आमची दैवते म्हणजे, पतौडी, बोर्डे, वाडेकर, सरदेसाई अशी होती. आमचा आठ, दहा जणांचा ग्रुप जमला की आम्ही दोन गट पडत असू आणि, त्याची नावे घेऊन, अहर्निशपणे, अगदी हमरीतुमरीवर येऊन भांडणे करीत असू. प्रसंगी, सोबर्स, कन्हाय, हॉल, ग्रिफिथ तसेच, ऑस्ट्रेलियातील, रेडपाथ, लोंरी, हार्वे अशी नावे घेऊन खेळत असू. कितीतरी वेळा, आमच्यात कमालीच्या त्वेषाने भांडणे देखील होत असत.ती  गच्ची मोठी विलक्षण आहे. आयताकृती गच्ची असून, एका भागात थोडी अरुंद  होत गेलेली आहे. जमिनीवर, सतत, डांबराचे पट्टे ओढलेले असत. त्यामुळे आमचे “पीच” हे नेहमीच uneven असायचे. उन्हाळा नाही, पावसाळा नाही, कुठलाही सिझन आम्हाला खेळासाठी वर्ज्य नव्हता. जिथे, रुंद भिंत आहे, तिथे सरपटी किंवा अनेक टप्पी बॉल फटकारला गेला की दोन धावा, विना टप्पा गेला की चार धावा, तसेच जिथे गच्ची अरुंद होत गेली, तिथे सरपटी किंवा अनेक टप्पी फटका गेला की चार धावा आणि जर का सरळ फटका गेला तर सहा धावा, असे आमचे धावांचे कोष्टक होते. समजा, फटका मारताना, बॉल गच्चीची भिंत ओलांडून पलीकडे किंवा खाली गेला तर मात्र तो खेळाडू बाद!! अर्थात, क्रिकेटचे बाकीचे बाद होण्याचे नियम तेच असायचे, म्हणजे पायचीत, झेलबाद वगैरे, धावा धावून काढण्याइतकी गच्ची मोठी नसल्याने, आम्ही असे नियम बसविले होते. मला, आज कितीतरी असे सामने आठवत आहेत, की आमचा दिवस कधी मावळायचा, तेच समजायचे नाही. प्रत्येक सामन्यात, भांडण हा प्रमुख प्रसंग!! अक्षरश: जीव तोडून, आम्ही क्रिकेट खेळत असू. त्यावेळेपुरते, आम्ही, पतौडी, वाडेकर यांचीच रूपे घेऊन खेळत होतो. आमच्यात, सुरेश हा अति संयमित पद्धतीने खेळायचा. आजही, त्याचा स्वभाव तसाच आहे. तर, मी, प्रदीप, प्रशांत असे जरा अति आक्रमक आणि आक्रस्ताळेपणे खेळत असायचो. सुरेश, जेंव्हा खेळायला यायचा, तेंव्हा तर आम्ही त्याला बाद करण्यासाठी एक ट्रिक योजली होती. पिचवर, जिथे डांबराचे पट्टे आहेत, तिथे बॉल जोराने टाकायचे, त्यामुळे बॉल अचानक उसळायचा आणि मग, त्या उसळण्याने, सुरेशची तिरपिट उडायची आणि त्यातच त्याच्या हाताला बॉल लागून, तो खाली जायचा. सुरेश बाद!! अन्यथा, त्याला बाद करणे, आमच्या दृष्टीने महा कठीण काम!! सुरेशचा मोठा भाऊ, रमेश तर, प्रत्येकवेळेस, काहीतरी नवीन प्रकार घेऊन यायचा, की ज्यायोगे, बॉल वेगळ्याच धरण्याच्या पद्धतीने, वेगळ्या प्रकारे वळवायचा!!
सामन्यात, तीस, चाळीस धावा म्हणजे, भरपूर!! अशीच परिस्थिती असायची कारण, बॉल टाकणारा, नेहमीच डांबराच्या पट्ट्यांचा आधाराने टाकणार, ज्यायोगे, बॉलची उसळी नेहमीच अनाकलनीय!! सामन्यात आरडाओरडा किती आणि शिव्यांची देवाण घेवाण किती, याला अंतच नसायचा. खरतर, गिरगावात राहणाऱ्याला शिव्या शिकवाव्या लागत नाहीत, तो त्याच संस्कृतीत वाढत असतो!! प्रसंगी, प्रत्यक्ष हाणामारी देखील झालेली होती. अर्थात, वळवाचा पाऊस जसा, दोन, तीन दिवसांनी ओसरतो त्याप्रमाणे, आमच्या भांडणाचे दिवस रहात असत. गोट्या खेळणे, हा आमचा दुसरा खेळ आणि यात मात्र माझी गती, मलाच अगतिक करणारी असायची. मला कधीही गोट्या खेळणे,धडपणे जमलेच नाही तसेच पतंग उडवणे!! त्यामुळे, या खेळातील शिक्षेचा भार मी बऱ्याच वेळा उचलेला आहे.!! अशा खेळात, प्रदीप महा वस्ताद, काहीतरी खुसपट काढून चिडवण्यात त्याचा आजही हात कुणी धरू शकणार नाही.
पावसाळ्यात “लगोरी” नावाचा खेळ सुरु असे. पाच, सहा छोट्या दगडांचा ठार रचून, तो कापडी बॉलने पडायचा, मग बॉल कुठेतरी भरकट जायचा, आणि मग तो हातात येईपर्यंत, परत तो दगडांचा थर लावायचा. समजा, तो थर लावायच्या आधीच, त्या पार्टीने थर फोडला आहे, त्या परतीच्या एखाद्या खेळाडूच्या अंगावर समजा विरुद्ध पार्टीतील खेळाडूने बॉल मारला तर, तो संघ बाद!! इथे, बॉल जोराने मारणे, यात बरीच धमाल यायची. कित्येकदा अंग चांगलेच शेकून निघायचे. कापडी बॉल तसा अति चिवटपणे आणि घट्टपणे कापडाच्या चिंध्यांनी बांधलेला असायचा, त्यामुळे अंगावर बसता क्षणीच “आई” आठवायची!! विशेषत: पावसाळ्यात, तो कापडी बॉल, भिजून चांगलाच टणक व्हायचा आणि मग बॉल जोरात फेकून, शेकवण्यात एक वेगळाच आनंद मिळायचा. अर्थात, यातही, भांडणे हीं असायचीच. खरतर, कुठल्याही खेळात, भांडणे हा त्याचा एक अंगभूत भाग असायचा. संध्याकाळी, मग गच्चीच्या जिन्यावर सगळ्यांनी बसायचे आणि मग झालेल्या खेळाची आपापल्या पद्धतीने चिरफाड करायची, हा सर्वात आनंदाचा भाग. तिथे, मग पाण्याचे घुटके घेत, परत वादावादी घालायची आणि मगच घरी परतायचे, तेदेखील आईने हाक मारल्यावरच!! याच गच्चीत, आम्ही कितीतरीवेळा अनेक भविष्याचे प्लान्स रचले होते, जे प्रत्यक्षात कधीच अवतरले नाहीत, काय होते, ते आता अजिबात आठवत नाही.आमच्यात , सर्वात महा खवट म्हणता येईल, असा प्रदीप होता आणि आजही त्याच्यात काडीमात्र बदल झालेला नाही. काहीवेळेस, भांडणे अति गंभीर देखील व्हायची आणि मग, रुसवा/फुगवा असे प्रकार घडायचे.
कधीकधी तर, भांडणे, काही दिवस, आठवडे चालायची. एक प्रसंग आठवतोय. एकदा, आम्ही शाळेत असताना, आमच्यापैकी कुणी हा विषय काढला ते आता आठवत नाही, पण असे ठरले की, सायकल भाड्याने घेऊन, पनवेलला जायचे. तिथे तेंव्हा उदयचे एक हॉटेल होते, तिथे एक दिवस राहायचे आणि दुसऱ्या दिवशी परत निघायचे. या प्लानवर, कितीतरी चेष्टा झाली होती, शेवटी, मी, माझा भाऊ, सुरेश आणि प्रदीप, यांनी, हे आव्हान स्वीकारले आणि घरी तसे सांगून टाकले. तेंव्हा सायकली भाड्याने घ्यायची पद्धत बरीच प्रसिद्ध होती आणि तशा मिळत देखील असत. आम्ही, एके दिवशी, सुटीचे दिवस बघून, ४ सायकली भाड्याने घेतल्या. निघायच्या दिवसापर्यंत, इतरांच्या टवाळीचा विषय होता, अगदी, अन्या(म्हणजे मी!!) पद्या(प्रदीप), सुल्या (सुरेश) असे, ठाण्याच्या क्रीक ब्रिजवर पहाटे सायकलिंग सहन न होऊन, पडलेले असणार, मग पोलीस येणार वगैरे, वगैरे. पण, मग आम्ही देखील मनाचा चंग बांधला आणि अति पहाटे निघालो. सतत, एकमेकांच्या संपर्कात राहायचे, अशाच वेगाने सायकली हाणीत चाललो आणि जवळपास, तीन एक तासांनी, आम्ही अखेर पनवेल गाठले, आम्हाला, तर एखादे शिखर जिंकल्याचाच आनंद झाला आणि सर्वात महत्वाचे म्हणजे, कुठेही कसलाही त्रास न होता, आम्ही प्रवास सुखरूप पार पडला आणि आमच्या इतर मित्रांची चांगली जिरवली, याचा आनंद तर खासच!! दुपारी, उदय तिथे आला,आणि मग कोंबडीचे यथेछ जेवण झोडले. त्यावेळेस, बियर वगैरे गोष्टींपासून आम्ही दूरच होत. अगदी, सिगारेटपासून देखील लांब होतो. सिगारेट आमच्या आयुष्यात नंतर आली.
आणखी बऱ्याच गोष्टी आहेत, पण त्या पुढील भागात.

No comments:

Post a Comment