Wednesday 27 December 2017

दो घडी वो जो पास आ बैठे

"निकट असूनही श्वासापुरते दूर असावें
       जवळपणांतही पंखांना आकाश दिसावें
 हवे वेगळेपण कांहीतरी मिलनातही सखी आपल्यातून 
इतुके आलो जवळ, जवळ की जवळपणाचे झाले बंधन"

आपल्या सूक्ष्मकोमल भावनानुभवांचे सौंदर्य न्याहाळण्याची आणि अभिव्यक्त करण्याची शक्ती मंगेश पाडगांवकरांच्या कवितेतून वारंवार आढळते. विविध भाववृत्तीची चित्रे त्यांच्या कवितेंमधून प्रकट होताना दिसतात. मग टी कधी उत्फुल्ल असेल तर कधी उदास, खिन्न देखील असेल!! परंतु ह्या भाव-वृत्तीचे दर्शन ते ज्या प्रतिमांच्या द्वारे घडवितात, त्या प्रतिमा मात्र निसर्ग-दृश्यांच्याच असतात. प्रस्तुत कविता त्यांच्या "जिप्सी" या काव्यसंग्रहातून घेतली आहे. अर्थात, आजचे जे गाणे आहे, त्यातील कवितेच्या संदर्भात विचार करता, काहीसा दुजाभाव दिसतो पण तरीही कुठेतरी, या ओळीचे नाते आपल्याला सांगता येते, कुठे दिसते? या प्रश्नाचे उत्तर आपण जेंव्हा या गाण्याचा विवेचनाद्वारे आस्वाद घेऊ, तेंव्हा मी दर्शवीन. 
वास्तविक, हिंदी चित्रपट गीतांत प्रणयी भावनांची गीते म्हणजे स्थायीभाव ठरावा, इतक्या प्रचंड प्रमाणात आढळतात!! प्रत्येक वेळी कवींनी देखील हीच भावना कुठल्या शब्दांत आर्ततेने दर्शवायची? असा प्रश्न पडू शकतो पण तरीही हिंदी/उर्दू कवींनी ज्या प्रमाणात विविधता दाखवली आहे, तिला तोड नाही. अर्थात हा प्रश्न स्वररचना करताना, संगीतकाराच्या समोर उभा ठाकू शकतो. खरतर इथेच संगीतकाराच्या प्रातिभ शक्तीचा अदमास घेता येतो. आपल्या भारतीय संगीतात रागसांगीताचे प्राबल्य भरपूर आहे आणि त्या अनुषंगाने राग-रागिण्या भरपूर आढळतात. याचाच परिणाम असा होतो, गाण्याची स्वररचना करताना, एकाच रंगाच्या अनंत भावविभोर छटा बघायला मिळतात आणि आपले रागसंगीत किती श्रीमंत  आहे, याची चुणूक जाणवते. 
सतारीच्या नाजूक सुरावटीवर या गाण्याची सुरवात होते. खरतर हे गाणे म्हणजे दोन प्रेमी जीवांचा संवाद आहे परंतु संवादाला गेयतेची जोड लाभल्याने त्या भाषेलाच लय लाभली आहे. ही किमया, कवी राजेंद्र कृष्ण यांची. या गाण्याची अस्ताई बघितली तर लगेच स्वररचनेची खुमारी ध्यानात येईल. 

दो घडी वो जो पास आ बैठे
हम जमाने से दूर जा बैठे

इथे सुरवातीचे सतारीचे सूर, चालीचे किंचित्काल "वळण" दाखवतात - म्हणजे बघा. 

दो घडी वो
सा रेss सा अशी गत, या शब्दांच्या आधी वाजते आणि त्याच हिंदोळ्यावर शब्द कानावर येतात. सतारीच्या सुरावटीवर जी लय निर्माण केली आहे, ती संपल्याक्षणी "दो घडी" शब्द ऐकायला येतात आणि पार्श्वभागी तबल्याचे छोटेसे आवर्तन घेऊन, समेची मात्रा "वो" शब्दावर घेऊन, कवितेच्या ओळीतील आशय स्वरांच्या साहाय्याने सुबद्ध केला आहे. कवितेच्या कुठल्या शब्दावर "सम" घ्यायची ज्यायोगे कवितेतील अमूर्त आशय मूर्त होईल, इथेच संगीतकाराचा कवितेचा व्यासंग जाणून घेता येतो. आता बघा, "दो घडी वो जो पास आ बैठे" या ओळीतील "दो" शब्दावर जोर देऊन, वेगळा अर्थ अभिप्रेत करता येतो तर "पास" या शब्दावर देखील समेची मात्रा घेऊन,हीच चाल आणि हीच लय कायम ठेवता येते. संगीतकाराची "नजर" इथेच ओळखता येते. बहुतेक रचनाकार, मुखड्याला का सर्वाधिक महत्व देतात, हे आपल्याला अशा प्रकारे समजून घेता येईल. किंबहुना "मुखडा" बांधला म्हणजे मग पुढील "बांधकाम" सहजशक्य असते,असे म्हणणे  काहींचे असते, यात तथ्य आढळते. 
आता गाण्याची बांधणी बघायला गेल्यास, संगीतकाराने युगुलगीत स्वरूपाची रचना केली आहे आणि तसे करताना, मुग्ध प्रणयाची खुमारी राखून संवाद तत्वाने बांधणी केली आहे. अर्थात सुरांच्यात, शब्दातील सोज्वळता, काहीसा खट्याळपणा आणि लोभस वृत्ती कायम ठेवली आहे. 
गाण्याची मांडणी ही शक्यतोवर मध्य सप्तकातच ठेवली आहे आणि याचे प्रमुख कारण,कवितेच्या शब्दकळेत दडलेले आहे. नायक, अत्यंत आर्जवी स्वरांत नायिकेला जवळ बसण्याचे विनवणी करीत आहे तेंव्हा ही विनवणी "अनवट" स्वरांत कशी बांधता येईल? तसेच "आघाती" मात्रा आणि स्वर देखील उपयोगाचे नाहीत. संगीतकार मदन मोहन इथेच आपले वेगळेपण दाखवून देतात. मुळात, या संगीतकाराच्या बहुतेक स्वररचना या अतिशय मार्दवी, आर्जवी तसेच सर्वस्व अर्पण करणाऱ्या असते. अर्थात रसिकांकडून देखील तशीच मागणी असते. मदन मोहन यांच्या रचना आत्मसात करायच्या झाल्यास, त्या रचनेला संपूर्णपणे शरण जाऊन, एकात्म भावनेने मन समर्पण केले तरच रचनेचा "गाभा" आकळू शकतो. शब्दांमधील आशयाला कुठेही "धक्का"  न लावता, आपला संगीताशय रसिकांपर्यंत पोहोचविणे,हेच जणू ध्येय असल्या प्रमाणे मांडणी केलेली असते. 
अस्ताई संपल्यावर नेहमीच्या पद्धतीने अंतऱ्याच्या आधीचे संगीत सुरु होते. मदन मोहन यांचे संगीत हे नेहमी "गीतधर्मी" तत्वावर असते म्हणजेच गाणे बांधताना, त्यात "गायन"देखील अंतर्भूत असते जेणेकरून गायकाला गायला वाव मिळू शकतो पण गीताला कुठेही बाधा न आणता!! हीच संगीतकाराची खरी "नजर"!! इथे बासरीचे सूर अवतरतात पण जरा बारकाईने ऐकले तर सुरवातीच्या सतारीच्या सुरांशी साद्ध्यर्म राखून बासरीचे स्वर येतात. इथे दोन प्रकारचे रचनाकार संभवतात. काही रचनाकार, अंतऱ्याची "उठावण" संपूर्ण वेगळ्या स्तरावर करून रसिकांना आपल्या बुद्धिकौशल्याची जाणीव करून देतात - खुद्द मदन मोहन यांच्या काही गझला याच पद्धतीने बांधल्या आहेत पण इथे रमणीय भावगीत असल्याने, अस्ताईने साधलेला परिणाम अधिक गहिरा करण्याचा कल दिसतो. यात आणखी एक विचार संभवतो - जर का मुळातली स्वररचना अतिशय गोड असेल तर मुद्दामून प्रयोग करायचे कशाला? आहे  तीच स्वररचना रसिकांच्या मनावर "गारुड" घालू शकतो, हा आत्मविश्वास इथे दिसतो. बासरी वाजत असताना, पार्श्वभागी गिटारचे अतिशय मंद सूर वाजत आहेत, जे लयीला पूरक अशी तालाची साथ देत आहेत. बासरीच्या सुरांचे संपूर्ण आवर्तन संपवून, चाल पहिल्या अंतऱ्याकडे वळते. 

भूल की उनका हमनशीं हो के
ऱोयेंगे दिल को उम्रभर खो के
हाए क्या चीज थी लुटा बैठे

मघाशी मी जे विधान केले त्याप्रमाणे, ध्रुवपदाची चाल तशी कायम ठेऊन, गाण्याचा विस्तार इथे बघायला मिळतो. कवितेचे बोल लयीच्या अंगाने वळवत असताना, बरेचवेळा शब्द फोड केली जाते - इथेच मी म्हणतो तसे ललित संगीताचे काहीसे अपुरेपण दिसते - अर्थात रागसंगीताच्या अनुरोधाने मी हे विधान केले आहे. चालत असलेली लय तर कायम ठेवावीच लागते तेंव्हा मग ती जागा तशीच कायम ठेवताना, शब्दांची ओढाताण क्रमप्राप्तच ठरते - फक्त प्रश्न असतो, संगीतकार किती खुबीने अशा "जागा" स्वररचनेत मिसळून घेतो. "हमनशीं" गाताना किंचित हलकासा खटका घेतला आहे पण अशा प्रकारे घेतला की लयीत तर सुरेखपणे बसवला आहे त्याचबरोबर आशय देखील कुठेही "विजोड" होत नाही आणि ही "जोड" स्वरांच्या माध्यमातून साधणे - इथे संगीतकार दिसतो!! अर्थात गायक म्हणून मोहम्मद रफींचे कौशल्य मानायलाच हवे.   

दिल को एक दिन जरूर जाना था
वही पहुंचा जहां ठिकाना था
दिल वोही दिल जो दिलमे जा बैठे

आता इथे कवितेबाबत थोडा विचार करायचा झाल्यास, प्रस्तुत कविता पहिल्या प्रथम गझल वृत्तात लिहिल्याचे जाणवते आणि याचे प्रमुख कारण, कवितेत पाळलेले, "रदीफ","काफिया"या आणि "जमीन" यांचे नियम पण तरीही ही पारंपारिक गझल नसून "नज्म" आहे!! याचे प्रमुख कारण, गझलेत प्रत्येक शेर, ही स्वतंत्र, सार्वभौम कविता असते. चित्रपट गीतांत, विशेषतः प्रणय गीतांत, असे "स्वातंत्र्य" घेणे परवडणारे नसते. पडद्यावरील प्रसंगाचा उद्भव गाण्याच्या माध्यमातून मुखरीत करणे, हेच मुख्य असते. अर्थात कवी राजेंद्र कृष्ण यांच्या बहुतांशी कविता या "गेयताबद्ध" असतात. याचा परिणाम, संगीतकाराला कविता स्वरबद्ध करणे आव्हानात्मक ठरते. वरील अंतरा मात्र वेगळ्या सुरावटीत सुरु होतो. गमतीचा भाग असा आहे, वाद्यमेळ त्याच सुरांत बांधलेला आहे पण अंतऱ्याची "उठावण" वेगळ्या सुरांवर आहे, व्यामिश्र बुद्धिमत्तेचा सुंदर नमुना!! अर्थात अंतरा संपवताना मात्र परत मूळ चालीशी नाते निर्माण केले आहे. 

एक दिल ही था गमगूसार अपना
मेहरबां, खास राजदार अपना
गैर को क्यूँ उसे बना बैठे ?

गायक म्हणून विचार करताना, मोहम्मद रफींच्या गायकीचा उल्लेख आवर्जूनपणे करायलाच लागेल. रफी काही संगीतकारांकडे गाताना, ज्याला आपण "नाटकी" म्हणतो, तशा पद्धतीचा आवाज लावलेला आढळतो इथे मात्र त्यांचा मुळचा संयमित, सौम्य आवाज लावलेला आहे. मला तर नेहमी वाटते, तार स्वरांत गायन करणे, ही गायनाची अत्यावश्यक कसोटी अजिबात नसावी. तार स्वरांत गळा लावणे कौशल्याचेच काम आहे पण बरेचवेळा रसिकांना भुलवण्यासाठी, रसिकांवर प्रभाव गाजवण्यासाठी आवाज वरच्या सुरांत लावला जातो किंवा जसे रफींनी काही गाण्यात "अति भावविवश" असा आवाज लावून, गाण्याची  रसहानी केली आहे. तसा प्रकार या गाण्यात जरादेखील आढळत नाही. याचे श्रेय जितके रफींचे आहे तितकेच संगीतकार म्हणून मदन मोहन यांना द्यायला लागेल.  या साठी आपण, वरील दुसरा अंतरा जरा बारकाईने ऐकायला हवा. "गैर को क्यूँ उसे बना बैठे" ही ओळ कवितेत प्रश्नार्थक आहे पण गाताना, रफींनी त्यातील ऋजुता सांभाळली आहे आणि ते ऐकणे हा सुंदर ऐकीव अनुभव आहे. 

गैर भी तो कोई हसीं होगा
दिल युं ही दे दिया नहीं होगा
देखकर कुछ तो चोट खा बैठे

हा शेवटचा अंतरा. आता लताबाईंच्या गायकीबद्दल खरे तर वेगळे काय लिहायचे हाच खरा प्रश्न आहे. एक मात्र नक्की, युगुलगायनात आपल्या बरोबरीचा गायक आणि त्याच्या गळ्याची मर्यादा जाणून घेऊन त्याप्रमाणे आपली गायकी सुसंगत ठेवायची, यात लताबाई केवळ अप्रतिम म्हणाव्या लागतील. या गाण्यात जेंव्हा प्रत्येक अंतरा संपत असताना, शेवटची ओळ रफी आणि लताबाई एकत्रितपणे गातात, तेंव्हा आपल्याला या वाक्याची प्रचिती घेता येईल. आपण गात असलेल्या रचनेची स्वरिक जाण आणि त्याबर सूर लावणे, यात लताबाई हातखंडा, असेच म्हणावे लागेल. 
संगीतकार म्हणून मदन मोहन यांचा या गाण्याबाबत विचार मांडायचा झाल्यास, हे गाणे त्यांनी नेहमीच्या पद्धतीने बांधलेले नसून, शब्दांची जातकुळी ओळखून, स्वररचना निर्माण केली आहे. चाल भावानुकूल तर नक्कीच आहे पण ते काही खास वैशिष्ट्य मानता येणार नाही कारण भावनाकुल स्वररचना करणे, हे तर बहुतांशी सगळेच प्रातिभ संगीतकार करताच असतात परंतु इथे संगीतकाराने, आपली नेहमीची शैली बाजूला सारून, मी वर म्हटल्याप्रमाणे सहज गुणगुणता येणारी तरीही गळ्याची परीक्षा पाहणारी अशी आगळीच स्वररचना तयार केली आहे. शैलीला बाजूला सारणे , हे सहज जमण्यासारखे नाही. चालीत गोडवा निर्माण करणे आणि तो गोडवा रचनेतून आपल्यापर्यंत पोहोचवणे, हेच या गाण्याचे खरे वैशिष्ट्य म्हणायला लागेल. 



Tuesday 14 November 2017

स्वररचना - एक गूढ प्रक्रिया - भाग १

सर्वसाधारणपणे आपण जेंव्हा एखादी ललित संगीतातील रचना ऐकतो तेंव्हा स्वाभाविकपणे त्यातील गायन आणि नंतर स्वररचना आपल्याला सर्वाधिक आकर्षित करते. खरतर ललित संगीताच्या स्वाभाविक घडणीत, गायन प्रकार शेवटच्या पायरीवर येतो तरीही रसिकांना, गायन अधिक भावते!! थोडा विचार केल्यास, गायन हा घटक, स्वररचनेनंतर अवतरतो!! जर का स्वररचना सुदृढ असेल तरच बव्हंशी गायनाचा असर अधिक गाढा होतो. आणखी थोड्या खोलात जाऊन विचार केल्यास, स्वररचना हाच ललित संगीताच्या आकृतीबंधाच्या गाभ्याशी जोडलेला असतो. या लेखात मला याच घटकाच्या सर्जनशीलतेविषयी चार शब्द लिहावेसे वाटतात.
स्वररचना = स्वर + रचना, अशी विभागणी आपल्याला करता येईल. याचाच वेगळा अर्थ, स्वरांची एकत्रित बांधणी करणे, ही क्रिया स्वररचना या संदर्भात मांडता येते.  स्वर हे संहतीत घटक म्हणून वावरतात. सुटे काढल्यास, त्या ध्वनीला स्वरत्व मिळत नाही.स्वर व्यक्तीभूत राहिले तर ते केवळ "नाद"च राहतात. परंतु परस्पर संबंधातून ते स्वरत्वास पोहोचतात.म्हणजे, सा म प ध हे चार स्वर चौकटीचे घटक म्हणून घेतले, तर पुढील विकास, विस्तार यांचा हे स्वर पाया म्हणून असतात. परंतु इथेच नवा निकष उद्भवतो, स्वरमयतेचा!! प्रत्येकवेळी जेंव्हा वरील स्वरसंहतीची पुनरावृत्ती केली जाईल,तेंव्हा सर्व स्वरबिंदू तादात्म्य पावू शकले तरच तिथे स्वरमयता उद्भवू शकते. म्हणजे, "सा म प ध" हि संदर्भचौकट निश्चित झाली म्हणजे तिथे यांचे अधिराज्य सुरु झाले. समजा पुनरावृत्तीत मुळचा "म" पुनारावृत्तीतील "म" पेक्षा खालचा असेल तर मूळ "म" ला तितके खाली यावेच लागेल,अन्यथा सगळा संगीत व्यापार विस्कळीत होईल. याचाच पुढील भाग, याच "सा म प ध" यामध्ये जर  "रे" हा नवीन असला, जुनी संहिता कितपत निर्णायक मानायची? याचे उत्तर, आपल्या मुल संहितेत सापडते. जुनी असो किंवा नवीन स्वरसंहिता असो, जिथे "संगीत" सिद्ध होण्याची शक्यता दिसली पाहिजे. अन्यथा सगळीच स्वरचौकट मोडून जाईल.इथे एक शंका नेहमी विचारली जाऊ शकते. गणिती पद्धतीने "सा" स्वराची कंपने नक्की झाली आहेत पण प्रत्येक अविष्कारात तीच कंपने ताडून पाहता शक्य नसते.मग, तो गायक बेसूर म्हणायचं का? इथेच याचे उत्तर मिळते. इथे त्या ठराविक नादबिंदूशी नाते जोडणे, असा प्रकार नसून, त्या ध्वनिभोवती एक गतिमान संबंध असतो, त्याच्याशी "स्पर्श" करणे, पुन्हा तिथून दूर जाणे, असा असतो. याचाच अर्थ, सप्तकमर्यादा असते त्याचप्रमाणे, स्वरमर्यादा देखील असते. 
जेंव्हा आपण स्वररचना म्हणून स्वतंत्र विचार करायला लागतो तेंव्हा त्यामागे स्वर आणि संहती, याचा देखील स्वतंत्रपणे विचार अत्यावश्यक ठरतो कारण स्वररचना या संकल्पनेचे हे पायाभूत घटक आहेत. वरील विवेचनाचा मुख्य उद्देश असा आहे,कुठलीही स्वररचना, रचनेच्या अंगाने बघायला गेल्यास, आपल्याला स्वर आणि स्वरसप्तक, यांना टाळून बघताच येणार नाही. मी इथे केवळ भारतीय ललित संगीताच्याच परिप्रेक्षात विचार करणार आहे.
जग जवळ येण्याच्या आजच्या काळात भारतीय संगीताचा विचार करताना, मनात पाश्चात्य संगीतपरंपरा आणि तिची वैशिष्ट्ये यांचा विचार हमखास मनात येतो. आपल्याकडे ललित संगीताच्या स्वररचनेची परंपरा नव्हती पण ती इथे रुजली याचे महत्वाचे कारण, पाश्चात्य संगीताशी जोडला गेलेला संबंध. विशेषतः: जेंव्हा आपण वाद्यवृंद स्वररचनेचा मागोवा घेत गेलो तर पाश्चात्य संगीताशी असलेले साहचर्य लगेच लक्षात येते. परंतु हा झाला नंतरचा भाग. मुळात "स्वररचना" ही संकल्पना मांडताना, हाती असलेल्या शब्दकळेला आशयबद्ध सुररचना तयार करणे अभिप्रेत असते. अर्थात काहीवेळा उलट प्रकार अस्तित्वात येऊ शकतो म्हणजे रचनाकाराच्या मनात एखादा आकृतिबंध तयार होतो आणि त्याला शब्द पुरवले जातात. परंतु वर म्हटल्याप्रमाणे "स्वर" हा घटक अत्यावश्यक असतो.
गमतीचा भाग म्हणजे इथे रचनाकाराच्या मनात उद्भवणारा स्वरबंध कसा उद्भवतो, याचा मागोवा घेणे निरातिशय जिकिरीचे ठरू शकते, किंबहुना याचे यथार्थ विश्लेषण अशक्यकोटीतील बाब ठरते, विशेषतः: आपल्यासारख्या, केवळ बाहेरून आस्वाद घेण्याच्या प्रक्रियेत तर अनंत अडथळे निर्माण होतात. तेंव्हा या प्रतिभेचे गारुड कायम अम्लानस्वरूपातच स्वीकारावे लागते. मग प्रश्न पुढे येतो, स्वररचनेचा, स्वररचना म्हणून कसा मागोवा घ्यायचा? केवळ स्वर आणि सप्तक याचाच विचार केला तर केवळ आराखडा, याशिवाय फारसे काही पदरात पडणार नाही.इथेच रागसंगीत आणि ललित संगीत यात फरक पडतो. स्वरांचे अपरिमित महत्व ध्यानात घेऊन देखील, ललित संगीतातील स्वररचनेचा अभ्यास करताना, शब्द हा घटक देखील तितकाच महत्वाचा ठरतो आणि त्याच्याशिवाय स्वररचनेचा स्वतंत्र विचार करणे अजिबात संभवत नाही.
बरेच रचनाकार, स्वररचना हा स्वतंत्र आविष्कार मानतात आणि त्यात बरेच तथ्य आहे. हाताशी कसलाच आसभास नसताना, मनात काही स्वराकृती येतात आणि त्या स्वराकृतीच्या साहाय्याने, हाती असलेल्या कवितेला तर्कशुद्ध न्याय देण्यात यशस्वी होतात. ललित संगीतात, नेहमीच कवितेतील आशय स्वरांच्याद्वारे अधिक अंतर्मुख करणे, अभिप्रेत असते आणि तीच प्राथमिक कसोटी जाते.  

Tuesday 5 September 2017

मागे वळून बघताना......

२०११ च्या फेब्रुवारीतील शेवटचा आठवडा होता. दक्षिण आफ्रिकेतील उन्हाळा चालू होता. वास्तविक या देशात एव्हाना १७ वर्षे काढली होती तरी या वर्षीचा उन्हाळा थोडा कडकच होता. माझ्या हेड ऑफिसमधून - बोटस्वाना मधून दोन कर्मचारी कंपनीच्या कामासाठी आठवडाभर आले होते, त्यामुळे काम संपवणे फारच जिकिरीचे झाले होते. ऑफिसमध्ये एयर कंडिशन असला तरी बाहेर उन्हाच्या झळा जाणवायच्या. इथे एक बरे असते, सतत ३,४ दिवस कडाक्याचा उन्हाळा झाला की लगेच पुढील दिवशी पावसाची सर ( पावसाची सर - धुंवाधार नव्हते!! तसा इथे धुंवाधार पाऊस नैमित्तिकच असतो) हमखास येते आणि हवेचे तापमान कमालीचे घसरते. दोन दिवसांपूर्वीच चांगला पाऊस पडून गेला होता त्यामुळे उन्हाची तलखी जाणवत नव्हती. 
सगळा आठवडा कामाच्या रगाड्याखाली गेला होता. सकाळी ८.०० वाजता काम सुरु व्हायचे व्हायचे ते सलग संध्याकाळचे कमीत कमी ६.०० तरी वाजायचे. त्यानंतर आलेल्या लोकांना हॉटेलवर सोडायचे आणि घरी परतायचे, असाच परिपाठ झाला होता. अर्थात या देशात आता १६ वर्षे काढल्याने, हे सगळे अंगवळणी पडले होते. कधीकधी याच लोकांना घेउन, एखाद्या हॉटेलमध्ये न्यावे लागायचे. अर्थात त्यांचे देखील बरोबर असायचे. जरी बोट्स्वानामधले असले तरी, त्यांना जोहान्सबर्ग नवीनच. आधीच शहराचा अवाढव्य आकार बघून छाती दडपली जायची, त्यात एकूणच कायदा आणि सुव्यस्थेवर प्रचंड प्रश्नचिन्ह उभे राहिलेले!! त्यामुळे रात्री बेरात्री फिरायचे कसे? हा बऱ्याच नवीन लोकांसमोर प्रश्न उभा असायचा आणि त्यात थोडेफार तथ्य नक्की होते. रोजचा पेपर वाचायला घेतला तरी या मताला पुष्टी मिळणाऱ्या बातम्या, अगदी पहिल्या पानावर वाचायला मिळायच्या!!
२७ फेब्रुवारी रोजी संध्याकाळी जवळपास, ७.०० वाजता कामे उरकली आणि घरी जायचे ठरवले. उद्या इथे आलेली मंडळी परतणार होती म्हणून, यावेळेस, मीच बाहेर जेवायचा प्रस्ताव मांडला आणि ऑफिसच्या जवळच असलेल्या एका मॉलमधील इटालियन हॉटेलमध्ये जायचे ठरले. त्यादिवशी दुपारीच किंचित सर कोसळल्याने, वातावरण काहीसे थंडगार होते. गेल्यावर, शिरस्त्याप्रमाणे ड्रिंक्स मागवले आणि जेवणाचा मेन्यू ठरवला. झालेल्या कामाबाबत थोडक्यात उजळणी केली आणि एक रिपोर्ट कसा सादर करायचा, याची रूपरेखा निश्चित केली. याबाबत एक अनुभव, सर्वसाधारण्पणे, ऑफिसमधील माणसे एकत्र आली, मग जरी पार्टी वगैरे असली तरी देखील ऑफीसचेच विषय बोलण्यात येत राहतात, मग तुमची इच्छा असो वा नसो, तुम्हाला त्यात भाग घ्यावाच लागतो. खरंतर माझ्या दृष्टीने हे सगळेच कंटाळवाणे पण अशा वेळी तुमच्या मताला, इच्छेला काहीही अर्थ नसतो. जगरहाटीच अशी आल्यावर तुमच्याकडे दुसरा पर्याय नसतो. अर्थात जेवताना, काही विनोद सांगण्याचा प्रयत्न होतो, आपल्याच ऑफिसमधील लोकांची टिंगल-टवाळी चालू असते, असलेली, नसलेली गॉसिपची लफडी चघळली जातात. एव्हाना माझा जीव उबून गेलेला होता पण हा देखील आपल्या कामाचाच भाग आहे, हे समजून घेऊन, मी त्यात टवाळकीत सामील झालो होतो. रात्री जवळपास, ११.०० वाजेपर्यंत चालू होती. दुसऱ्या दिवशी शुक्रवार असल्याने  आणि इथे शुक्रवारी एकूणच तसा कामाचा फारसा दबाव नसल्याने, ठीक होते.
शुक्रवार आला म्हणजे इथे सगळ्यांना वीकएंडचे वेध लागतात, दुपारचे जेवण झाले म्हणजे आपापसात गप्पांचे फड रंगतात किंवा फोनाफोनी सुरु होते. काही मोठ्या कंपन्यांमध्ये तर दर शुक्रवारी ऑफिसमध्येच चक्क बार्बेक्यू पार्टीज चालतात. मी काही वर्षांपूर्वी प्रिटोरिया इथे नोकरी करीत असताना,तिथल्या कंपनीत, महिन्यातील शेवटच्या शुक्रवारी ऑफिसमध्ये अशाच होणाऱ्या बार्बेक्यू पार्टीजचा आनंद मनमुराद उपभोगला होता. अशा पार्ट्या मात्र रंगवाव्यात त्या गोऱ्या माणसांनीच. अशा वेळी गोरा माणूस, निखळ मोकळा होतो, प्रसंगी ज्याला अश्लील विनोद म्हणावेत, असे विनोद, सहजपणे पार्ट्यांमध्ये सांगत असतो - मग आजूबाजूला मुली-बायका असल्या तरी!! रस्टनबर्ग इथल्या एका पार्टीचा किस्सा. इथला ख्रिसमस म्हणजे आपल्याकडील दिवाळी!! ख्रिसमस निमित्ताने, कंपनीने सन सिटीमध्ये डिनर पार्टी ठेवली होती. ऑफिस तसेच संबंधित बरीच माणसे जमली होती. आमचा फ्लोअर मॅनेजर आणि इतर बराच स्टाफ गोऱ्या समाजातील लोकांचा होता, अर्थात Annual Function म्हणून सगळेजण पार्टी ड्रेस घालून आले होते. रिवाजाप्रमाणे ड्रिंक्स सुरु झाली आणि एकेक मोकळे होत गेले. फ्लोअर मॅनेजर - जेरॉम पिण्यात अगदी सज्जड आणि बोलण्यात फटकळ पण मिस्कील देखील. माझ्याच डिपार्टमेंटला तान्या तसेच स्टेफनी, या गोऱ्या मुली आलेल्या होत्या. जशी पार्टी रंगायला लागली तशी जेरॉम "Oh Stephani, looking fucking gorgeous and sexy. Let's have one week date. We will enjoy lot!!" दोघे एकमेकांना जवळून ओळखत होते तरी आपल्या संस्कृतीचा विचार केला तर असे बोलणे असभ्यपणाचेच!! पण इतपत समंजस वृत्ती नक्कीच दाखवली जाते.आणि असे बोलणे चेष्टेवारी नेले जाते. अर्थात अश्लीलतेची मर्यादा राखूनच चेष्टा केली जाते. अन्यथा ऑफिसमध्ये गोरा माणूस चुकूनही वेळ वाया दवडत नाही. गोऱ्या लोकांच्या संस्कृतीवर टीका करणे सहज, सोपे आहे पण कामाच्या बाबतीत दाखवली जाणारी नि:स्पृहता निश्चितच वाखाणण्यासारखीच असते, अर्थात याला प्रतिवाद करणारी उदाहरणे सापडतात पण एकूण प्रमाण फारच दुर्मिळ असते.
दुसऱ्या दिवशी मी जरा उशिरानेच ऑफिसमध्ये गेलो, आलेल्या पाहुण्यांचे विमान दुपारचे होते, त्यामुळे तशी घाई करण्याची गरज नव्हती. आल्यावर, काल ठरलेल्या मुद्द्यांप्रमाणे एक रिपोर्ट तयार करून, सही शिक्क्यांसह पाहुण्यांकडे दिला. फ्लाईट दुपारी १.०० चे होते म्हणौन सकाळचा चहा घेतला आणि त्यांना विमानतळावर सोडायला, म्हणून गाडी काढली. ऑफिसपासून विमानतळ गाठणे म्हणजे जवळपास अर्धा तास ड्राइव्ह, जर का रस्ता मोकळा मिळाला तर. जोहान्सबर्ग शहरातील वाहतूक, हा दिवसेंगणिक त्रासदायक अनुभव होत चालला असल्याने, बरेचजण साधारणपणे अर्धा तास हाताशी राखूनच प्रवासाची सुरवात करतात. वाहतुकीचा प्रश्न आताशी डर्बन, प्रिटोरिया, केप टाऊन अशा शहरांतून देखील अनुभवावा लागतो. त्यातून जोहान्सबर्ग म्हणजे देशाची आर्थिक राजधानी!! त्यामुळे इथे रोजगाराच्या संधी भरपूर उपलब्ध, पर्यायाने गाड्यांची वर्दळ देखील भरपूर!! आज लख्ख ऊन पडले होते. डिपार्टमेंटमध्ये कामासंबंधी आवश्यक त्या सूचना  देऊन,आलेल्या पाहुण्यांना विमानतळावर पोहोचवण्यासाठी गाडी काढली. सुदैवाने रस्ता मोकळा मिळाला आणि गाडी दामटली. विमानतळावर पोहोचायला फरास वेळ लागला नाही आणि लगोलग पाहुण्यांना सोडून, परतीच्या मार्गाला लागलो.
परत येताना देखील रस्ता तसा फारसा वर्दळीचा नव्हता. आज जरा उन्हे आहेत म्हणून गाडीच्या काचा देखील खाली सरकवल्या होत्या. मध्येच एका सिग्नलला गाडी थांबवली. साधारणपणे सिग्नल एखाद मिनिटांपुरताच असतो कारण हा रस्ता काही महामार्ग नव्हता. अचानक एकदम माझ्या डोक्यावर कसला तरी प्रचंड आघात झाला आणि क्षणात मला कळले, माझ्यावर हल्ला झालेला आहे पण झालेला आघात इतका मोठा होता की मला हालचाल करायला कसलाच वाव नव्हता. मला कळत होते, हल्लेखोरांनी माझ्या खिशाला हात घातला होता पण मी संपूर्णपणे हतबल होतो. काही सेकंदाचा खेळ पण मला काहीसा उध्वस्त करणारा. हल्लेखोर पळून गेल्याचे समजले आणि मी गाडी कशीबशी बाजूला लावली आणि ऑफिसला फोन लावून, हल्ल्याची बातमी सांगितली. तत्क्षणी माझी शुद्ध हरपल्याचे जाणवले!! गाडीच्या स्टिअरिंगवर डोके ठेवले, इतपतच मला आजही आठवत आहे!!
साधारणपणे अर्ध्या तासाने मला जाग आल्याचे समजले. मी ऑफिसमध्ये आलो होतो. अगदी मनापासून कबूल करायचे झाल्यास,मनातून पूर्णपणे हादरून गेलो होतो. ऑफिसमध्ये आल्यावर, थोड्या वेळाने काहीसा सावरलो आणि खिसा खाली झाल्याचे समजले. लगेच बँकेत फोन लावला आणि सगळी कार्ड्स रद्द करून घेतली!! भारतातील IDBI बँकेचे कार्ड देखील घेऊन गेले होते!! लगोलग, मित्राच्या गाडीतून घरी परतलो, कपडे बदलायला घेतले, पायातील बूट काढला आणि अंगातून वेदनेची सळक निघाली. डाव्या पायाचा घोटा धप्प सुजला होता, इतका की जमिनीवर पाऊल ठेवणे अशक्य झाले होते . नंतर ध्यानात आले, डोक्यावर आघात होता क्षणी माझा डावा पाय प्रतिक्षिप्तपणे ब्रेक पॅडवर आपटला होता आणि पाय सुजला होता.
त्याक्षणी घरी कायमचे परतायचे ठरवले. दुसऱ्या दिवशी घरी हल्ल्याची बातमी सांगावीच लागली कारण भारतातील बँकेचे कार्ड रद्द करून घ्यायचे होते. १७ वर्षे ज्या देशात सुखनैव पद्धतीने काढली, त्याचा असा शेवट मनात ठेऊन, देश सोडायचे ठरवले आणि मे २०११ मध्ये मी मुंबईला कायमचा रहायला आलो. घरी बायको आणि मुलगा रहात असल्याने मला राहायचे कुठे?  हा प्रश्नच नव्हता. घरात शिरलो, तोच मुळी काहीसा लंगडत!! हे माझे लंगडणे, पुढे दोन महिने तरी चालूच होते. त्यामुळे बाहेर हिंडण्या-फिरण्यावर खूपच मर्यादा आल्या होत्या.  पण हाच काळ, मला मुंबईत स्थिरावयाला मदतीचा ठरला.  वास्तविक,मी दक्षिण आफ्रिकेला गेलो तेंव्हा पस्तिशी गाठली होती, म्हणजे अगदीच तरुण वगैरे अजिबात नव्हतो पण तरीही एखाद्या देशात सलग इतकी वर्षे काढल्यावर, तुमच्यात थोडेफार बदल होणे, क्रमप्राप्तच ठरते. सर्वात मोठा फरक पडला, हवामानातील प्रचंड फरक. दक्षिण  आफ्रिकेत, घाम गाळला तरच घाम येणार!! मुंबईत, पंख्यापासून जरा दूर राहिलात की लगेच घामाची धार!!  २००५ मधील गंमत. तेंव्हा मी एका आडगावात नोकरी करीत होतो. एप्रिल महिन्यात, तिथे ०, -१  इतके तपमान खाली उतरते आणि अशावेळी मी मुंबईत सुटीवर आलो होतो. त्यावेळी जाणवलेला झटका कायमचा मनात टाकलेला आहे. खरी गंमत पुढे आली. महिन्याभराची सुटी संपवून (मुंबईतील +३० तपमान उपभोगून)  जेंव्हा जून महिन्यात त्या गावात पोहोचलो ते -३, -४ तपमानात!! दोन्ही वेळा जुळवून घेणे अतिशय अवघड झाले.
अर्थात, यात नवल वाटण्याचे काहीच कारण नाही, कारण मुंबईची हवा ही वर्षानुवर्षे अशीच आहे पण आपण जेंव्हा परदेशी  राहणाऱ्या माणसाला हवा मानवत नाही म्हटल्यावर काहीशा कुचेष्टेने त्याच्याकडे बघतो, ते सर्वार्थाने चुकीचे आहे. हवामानातील फरक अंगीकारणे, खरोखरच अवघड असते. मी परत आलो, तो २०११ मधील मे महिना होता आणि तेंव्हा जोहान्सबर्ग हे ० ते -१ तपमानावर!! अर्थात मी सुखरूप घरी आलो, कुटुंबात परत मिसळलो, ही बाब आनंदाचीच होती. आल्यावर, सर्वात आधी आर्थिक कामे, driving license, Pan Card अशी कामे प्रामुख्याने मार्गी लावली. अगदी रेशन कार्डवर माझ्या नावाची नोंदणी देखील करून घेतली.
इथे भारतीय पद्धत आणि साऊथ आफ्रिकन पद्धत, यात खरा फरक लक्षात यायला लागला. रेशन कार्डवर नाव नोंदण्यासाठी अक्षरश: हेलपाटे घालावे लागले. पूर्वी जेंव्हा मी इथं राहात होतो तेंव्हा माझे नाव रेशन कार्डवर होते पण कालांतराने नोंदणी रद्द केली. त्या ऑफिसमध्ये माझ्या पासपोर्ट कॉपीज दिल्या, इतर सगळी कागदपत्रे दिली तरी नोंदणी  व्हायचे नाव नाही!! पहिल्याच भेटीत, काय कागदपत्रे सादर करायची? याबाबत कुणालाच काहीही माहिती नाही, प्रत्येक भेटीत नवीन काहीतरी आणायला लावायचे. एक, दोनदा तर त्या टेबलावरचा माणूस नाही म्हणून मला परत पाठवले!! आता एखाद दिवशी माणूस येऊ शकत नाही, हे समजून घेता येते पण जर का त्या टेबलावर माणूस नाही तर त्याचे काम दुसरा कुणी करेल, तर त्याबाबत नाव नाही!! मला तर फक्त कागदपत्रे सादर करायची होती, माणूस नाही पण हा माणूस कधी येणार? या प्रश्नावर काहीही उत्तर नाही!! मला लगेच एक तुलनात्मक प्रसंग आठवला. १९९९ मध्ये मला दक्षिण आफ्रिकेच्या पर्मनंट रेसिडेन्सीसाठी होम अफेयर्सच्या ऑफिसमध्ये जायचे होते. जाण्यापूर्वी कुठली कागदपत्रे लागतील, याबाबत स्वतंत्र इ-मेल मिळाल्याने, मनात कसलीच शंका नव्हती. ऑफिसमध्ये सकाळी ११. ०० वाजता गेलो आणि सगळ्या कामाची पूर्तता दुपारची जेवणाची सुट्टी होईपर्यंत पूर्ण झाली, यात माझी स्वतंत्र मुलाखत झाली, माझ्या कुटुंबातील इतर सदस्यांच्या कागदपत्रांची खातरजमा झाली आणि रँड १०,००००/- भरून, मी बाहेर देखील पडलो!! मला, एकूण कामाला ६ महिने लागतील, असे आश्वासन दिले!! साधारणपणे ६ महिन्यांनी मला मेल  आला, मला पर्मनंट रेसिडेन्सी मिळाली आहे, पीटरमेरिट्झबर्ग मधील कार्यालयातून कामाची पूर्तता करावी. त्या कार्यालयात मी एके दिवशी गेलो आणि लगोलग मला रेसिडेन्सीची सर्टिफिकेट्स मिळाली, माझ्या दोन्ही तळहाताचे शिक्के घेण्यात आले, कारण यथावकाश आयडी बुक मिळणार होते, जे मला साऊथ आफ्रिकेत काहीही व्यवहार करायला मुभा देत होते तसेच मला या देशाचा कायमच नागरिक व्हायला विनाशर्त परवानगी होती!!  या  पार्श्वभूमीवर, रेशन कार्डावरील रद्द केलेली नोंदणी आणि त्या कामातली दिरंगाई, डोळ्यात भरणारी होती.  त्यामानाने बँकेची कार्ड्स आणि ड्रायव्हींग लायसन्सची कामे झटक्यात झाली आणि मी आता भारतात कायमचा रहिवासी म्हणून जगायला मोकळा झालो.
खरतर दक्षिण आफ्रिका म्हणजे  आफ्रिका खंडातील युरोप असे सहज म्हणता येईल.  लांब,रुंद विना खड्ड्याचे रस्ते, थंड  हवामान, Infrastructure Development म्हणजे काय, याचा उत्तम नमुना म्हणून साऊथ आफ्रिकेकडे बघता येईल. रस्ते इतके अप्रतिम आहेत की, मी राहत्या कॉम्प्लेक्समध्ये देखील ४० च्या स्पीडने गाडी चालवू शकत होतो आणि पोटातले पाणी देखील हलणार नाही, याची  दक्षता,हे रस्ते कायम घ्यायचे!! जो प्रिटोरियमध्ये राहात असताना, बरेचवेळा मित्रांना भेटायला म्हणून पीटरमेरिट्झबर्ग किंवा डर्बन इथे जात असे. अंतर जवळपास ६०० कि,मी. होते पण मला कधीही ७ तासाहून अधिक वेळ लागला नाही!! तोच प्रकार इतर अनेक बाबतीत, मला इथे परत आयुष्य सुरु करताना खटकला!! प्रश्न पैशाचा नसून, एकूणच समाजात जी उदासीनता दिसते, त्याबाबतचा आहे. वास्तविक दक्षिण आफ्रिकेत गेली काही वर्षे कायदा,सुव्यवस्थेचा गंभीर प्रश्न उभा राहिला आहे, कालानुरूप भ्रष्टाचार देखील वाढीस लागला आहे पण तरीही काही अपवाद  वगळता,त्या देशाला कुणीही उठसूट नावे ठेवत नाही. त्यांचे आपल्या देशावर प्रचंड प्रेम आहे.
अगदी स्पष्ट बोलायचे झाल्यास, दक्षिण आफ्रिकेतील डेव्हलपमेंट जी झाली आहे, ती केवळ गोऱ्या लोकांच्या मेहनतीतून. अर्थात याला काळी आणि भयाण बाजू देखील निश्चितच आहे. वांशिक भेदाचा  भयाण आणि अस्वस्थ करणारा इतिहास याला साक्ष आहे. इथल्या बहुसंख्यांनी अपार भोगले आहे पण कदाचित म्हणूनच या लोकांचे आपल्या देशावर अपरंपार प्रेम आहे. मुंबईत परत  राहताना,आणखी एक वैगुण्य सतत जाणवत आहे. स्वच्छतेचा अभाव!! दक्षिण आफ्रिकेत गचाळ वस्त्या अजिबात नाहीत असे म्हणणे निखालस खोटे ठरेल परंतु राज्यकर्त्यांनी अशा वस्त्या खुंबीने दडवल्या आहेत, अंतरंगात शिरल्याशिवाय कळणार नाही. फरक आहे तो अफाट वाढलेल्या शहरांतील स्वच्छतेबाबत. आपले शहर, आपण राहतो ती  जागा, स्वच्छ ठेवण्याबाबत दक्षता आढळते. कुठेही "शहर स्वच्छ ठेवा" असल्या पाट्या नाहीत की टीव्हीवरून घोषणा नाहीत!!  मुंबईत आता तर जवळपास प्रत्येक स्टेशनच्या आसपास गलिच्छ झोपड्यांच्या वस्त्या दिसतात.
इथे केवळ टीकाच करण्याचा उद्देश नाही पण तुलना करताना, या बाबी आठवतातच. मुंबईत परतल्यावर एक मुद्दा विशेषत्वाने लक्षात आला मुंबईत केवळ मीच नव्हे तर माझी बायको देखील संध्याकाळी विनात्रास फिरू शकते. याच जोडीने विचार केल्यास, संध्याकाळी एकदा ऑफिसेस बंद झाली की जोहान्सबर्गच्या रस्त्यावरून हिंडण्यासारखा धोका दुसरा नाही.  हाच प्रकार इतर शहरांतून जवळपास असाच आढळतो. दुसरा विशेष जाणवला, आपण विकत घेतो, त्या मालाचा दर्जा!! कुठेही घासाघीस नाही, दर्जात तडजोड नाही. दुर्दैवाने मुंबईत देखील याबाबत अपवादस्वरूप मॉल्स वगळता, मालाच्या दर्जाबाबत खात्री देता येत नव्हती. सुदैवाने आता परिस्थिती बरीच सुधारली आहे, असे म्हणायला वाव आहे!!
मी २०११ साली परतलो, तो पावसाळी हंगाम सुरु होण्याच्या वेळी. नेहमीप्रमाणे मुंबईत पाणी तुंबणे, गाड्या रखडणे अव्याहतपणे चालूच होते. दक्षिण आफ्रिकेत भारताइतका पाऊस पडत नाही पण तरीही पाण्याचा वेळीच निचरा होणे, तसेच गाड्यांचा प्रवास अव्याहतपणे चालूच राहणे, याबाबत विशेष दक्षता घेतली जाते. गाड्या भयानक वेगाने धावत  असतात,त्यामुळे होणाऱ्या अपघातांचे प्रमाण लक्षणीय असते. अपघात झाल्यावर, वाहतूक बिघडू नये म्हणून जी व्यवस्था आहे, ती कौतुकास्पद आहे आणि याबाबत आपल्याकडे अजूनही अनास्था आहे. आपल्याकडे लोकसंख्येचा खरा प्रश्न आहे आणि त्यातूनच बरेचसे प्रश्न निर्माण झाले आहेत.
दक्षिण आफ्रिकेची लोकसंख्या जवळपास ५ ते ६ कोटी इतकीच आहे आणि भौगोलिक आकार बघायला गेल्यास, कन्याकुमारी पासून मध्यप्रदेश इतका विस्तारलेला आहे. अर्थात याचा फायदा या देशाला मिळतो. त्यातून हवामान थंड  असल्याने शक्यतो धुळीचा संसर्ग नसतो. एकदा असाच मुंबईत - गिरगावात निवांत हिंडत होतो. अचानक रस्त्यावरील वाहतूक थांबली. पुढे लक्षात आले,  रस्त्यावर गाईने रस्ता अडवला होता!!  आजही आपल्याकडे याबाबत कुणालाच काहीही क्षिती नसते!! जणू काही हे असेच चालणार आणि हे गृहीतच धरून चालायचे. मध्यंतरी मी राजस्थानला गेलो असता, जयपूर शहराला जोडणाऱ्या महामार्गावर निवांतपणे गाई हिंडत होत्या!! जणू काही या गाई म्हणजे  Road Traffic Officers!! दक्षिण आफ्रिकेत, फ्रीवे तर सोडाच पण अंतर्गत रस्त्यावर देखील माणसे,  रस्ता, आपल्या बापाचा असल्याप्रमाणे ओलांडत नाहीत. तसाच उद्मेखून मांडण्यासारखा मुद्दा म्हणजे सार्वजनिक शौचालये!! केवळ फ्रीवे वरील शौचालये नसून, शहराच्या अंतर्गत भागातील सार्वजनिक शौचालये लखलखीत असायची - एक मुद्दा, हे सगळे वर्णन २०११ पर्यंतचे आहे. आता एकूणच ६ वर्षे झाली आहेत, आज काय परिस्थिती आहे, याची कल्पना नाही!! मुंबईतील सार्वजनिक शौचालयांबाबत अपवादस्वरूप वगळता काही लिहिण्यासारखे नाही किंवा भरपूर लिहावे लागेल. तसाच प्रकार पिण्याच्या पाण्याबाबत आणि एकूणच पाणी पुरवठ्याबाबत म्हणावे लागेल. इतकी वर्षे राहिलो, अनेक शहरांत, गावात देखील नोकरीनिमित्ताने वास्तव्य केले. कुठेही २४ तास पाण्याचा पुरवठा असतो तसेच मी प्रसंगोत्पात बिस्लेरी पाण्याची बाटली विकत घेतली, अन्यथा नळाचे पाणी राजरोस पीत होतो. 
हाच प्रकार सार्वजनिक बससेवेबाबत आढळून येतो. एकतर या देशात सार्वजनिक बस सेवा बोकाळलेली नाही. शहरातील लोकांकडे स्वतःच्या गाड्या असतात परंतु काहीवेळा एका शहरातून दुसऱ्या शहरात जाण्यासाठी Greyhound, Inter City अशा बस सेवा उपलब्ध असतात. आपल्याकडील "शिवनेरी" बाबत  कितीही अभिमान बाळगला, तरी आपल्याला बरेच शिकायचे आहे.
आणखी एका अत्यंत महत्वाच्या विषयाला हात घालतो. ज्या स्थळांना आपण tourist spot समजतो, तिथला गलथानपणा डोळ्यांत भरणारा आहे.  डर्बन आणि केप टाऊन इथले समुद्रकिनारे म्हणजे आनंदनिधाने आहेत.स्वच्छता तर आहेच पण ज्या सोयीसुविधा मिळतात, त्यातून आपल्याला खूप शिकण्यासारखे आहे. मी मुंबईत जिथे राहतो, तिथून प्रसिद्ध मरीन लाईन्सचा किनारा केवळ पायी ५ मिनिटांवर आहे. मी पहाटे उठून तिथे Morning Walk साठी जायला सुरवात केली. इतका आलिशान परिसर पण,  विशेषत: रविवारी पहाटे, किनाऱ्यावर इतका कचरा पडलेला असतो की काहीही बोलायची सोय नाही. इतका सुरेख परिसर पण प्लास्टिक कप, प्लास्टिक बॅग्स वाऱ्यावर उधळत असतात!!  गंमतीचा भाग म्हणजे  आजूबाजूला कचरा टाकण्यासाठी कुंड्या असतात, पण त्याचा वापर केला जात नाही!! आपल्याला एक वाईट सवय लागलेली आहे, आपल्यासाठी जे काही करायचे आहे, ते सगळे सरकारने केले पाहिजे. आपण, स्वतः:हुन कसलीही जबाबदारी उचलायची नाही!! इतकी प्रचंड उदासीनता, निदान मला तरी दक्षिण आफ्रिकेत आढळली नाही.
आता इतकी वर्षे परदेशात घालवल्यामुळे काही त्रुटी आपल्या देशांतील जाणवल्या, आणि त्या त्रयस्थपणे मांडायचा प्रयत्न केला. अर्थात माझ्यावर जो जीवघेणा हल्ला झाला, त्याबाबत पूर्वीही आणि आजही अशीच भावना  आहे, समजा असा हल्ला मुंबईत झाला असता तर मी मुंबईला शिव्या दिल्या असत्या का? तेंव्हा त्या हल्ल्याची कडवट आठवण कायमची ठेऊन देखील, या देशाने मला खूप शिकवले. मुख्य म्हणजे जगाकडे निकोप दृष्टीने बघण्याचा नवा दृष्टिकोन दिला, सर्वात महत्वाचा फायदा म्हणजे पाश्चात्य संगीताची खास गोडी लावली. दक्षिण आफ्रिकेत सगळेच सुंदर आहे, असे म्हणणे म्हणजे माझ्याशीच प्रतारणा करण्यासारखे आहे. पण थोडा त्रयस्थ विचार केला तर जगातील कुठलाच देश "नंदनवन" म्हणून गणला जाणे अशक्य. प्रत्येक देशाचे स्वतः:चे असे जगड्व्याळ प्रश्न असतातच. जसे दक्षिण आफ्रिकेत, आर्थिक विषमता भयाण आहे. टीव्हीवर दिसणारी दक्षिण आफ्रिका आणि प्रत्यक्षातील दक्षिण आफ्रिका, यात फार फरक आहे. Standerton इथे नोकरी करताना, मला देशाच्या, खऱ्या अर्थाने अंतरंगात शिरण्याची संधी मिळाली आणि त्यानिमित्ताने इथल्या समाजाचे भीषण वास्तव समजून घेता आले!! तसेच हळूहळू का होईना पण लग्नसंस्था आणि कुटुंब व्यवस्था मोडकळीस यायला लागली आहे. या सगळ्यांचा, तिथल्या व्यक्तींवर झालेला अटळ परिणाम देखील बघायला मिळाला. तसेच समाजातील लैंगिक संबंध देखील जवळून बघता आले. मुंबईत देखील अशा अतर्क्य वास्तवाची लागण लागायला सुरवात झाली आहे पण अजून तरी प्रमाण तसे नगण्यच आहे.  मी मुंबईला परत तर येणारच होतो, ही भावना मुंबईबद्दलची कृतज्ञता भावना तर नक्कीच आहे.

Sunday 25 June 2017

वेदनेचा सुरेल अविष्कार

आपल्याकडे‘यशस्वी’ म्हणून गणना करताना व्यावहारिक यश हाच एकमेव निकष वापरला जाऊन त्यानुसार गुणवत्ता ठरवली जाते. अर्थात, व्यावहारिक यशाकडे संपूर्ण कानाडोळा करणे तसे चूकही आहे; पण तोच एकमेव निकष मानणे तितकेसे योग्य नाही. परंतु हाच निकष आजवर सर्रास लावल्याने हिंदी चित्रपट क्षेत्रातील अनेक गुणवान संगीत दिग्दर्शकांवर अन्याय झालेला आहे. मदनमोहन हे त्यातील एक ठळक नाव.

मदनमोहन यांच्या सर्वंकष संगीताचा विचार करायचा झाल्यास, काही बाबी ठळकपणे नोंदवाव्या लागतील. मदनमोहन यांची प्रतिभा ‘गीतधर्मी’ होती. याचाच वेगळा अर्थ असा लावता येईल की शब्दांच्या अर्थाव्यतिरिक्त पण त्याच्या आधारे आशयाचे विविध तरंग निर्माण करण्याची ताकद, त्यांच्या संगीत रचनेतून प्रतीत होत होती. यामध्ये, कवितेतील आशयाबरोबर सांगीतिक रचनादेखील समांतर अस्तित्व दाखवत असते. तरीही दोन्ही घटकांचा अत्यंत सुनियोजित मेळ घातलेला असतो. यावरूनच, मदनमोहन यांच्या संगीतात गझलेला का महत्त्व आले, हे अधोरेखित व्हावे. गीतधर्मी संगीतकार हे नेहमीच लयबंधापेक्षा सुरावटीकडे आणि त्याच्या प्रवाही चलनाकडे अधिक झुकतात. लयबंधाच्या किंवा तालांच्या ठळक वापरातून जी गतिमानता प्रत्ययास येते, तिच्यापेक्षा स्वररंगातील सूक्ष्म भेद दाखवून आकारास येणारी गतिमानता, असे संगीतकार नेहमी पसंत करतात.

उदाहरणादाखल ‘नैना बरसे’ हे गाणे घेऊया. एक प्रणयगीत म्हणून ऐकताना, नेहमीच्या गझल रचनेचा वापर न करता संगीतकाराने गीताची पारंपरिक धाटणी अंगीकारली आहे; पण तरीही ‘मुखडा’ समोर ठेवत असल्याचा भास निर्माण करून एकदम सुरावटीत बुडी मारणारे चलन, तसेच एकामागोमाग येणार्‍या कडव्यांची पट्टी बदलून केलेले गायन पण तरीही नकळत मूळ पट्टीकडे येणे! पट्टीच्या कानसेनांचे लक्ष वेधून घेणारे आहे.’

दुसरा विशेष असा सांगता येईल, अशा संगीतकारांच्या गाण्याचे मुखडे गुणगुणत राहावे, असे असतात. तसेच द्रुतगती किंवा गुंतागुंतीच्या पण उत्स्फूर्त वाटणार्‍या संगीतात वाक्यांशासाठी चालीत मुबलक जागा सोडलेल्या असतात. त्यामुळे त्यांच्या गाण्यात ‘गायकी’ अंग फार ठळकपणे दिसून येते. मुळात मदनमोहन यांच्यावर उत्तर भारतीय पण लखनवी परंपरेचा प्रभाव असल्याने उपशास्त्रीय संगीताकडे ओढ असणे स्वाभाविक ठरते. गझलेचे वर्णन करताना, ‘भोगवादाचा मनोज्ञ आविष्कार’ या शब्दात केले जाते, आणि याचाच अप्रतिम आविष्कार मदनमोहन यांच्या संगीतात दिसून येतो. कुठलीही समृद्ध गझल काव्य म्हणून ध्यानात घेतली तर त्यात उत्कटता, अभावित सौंदर्यवादी धक्का देण्याची प्रवृत्ती आणि कुठल्याही भावनेचा ‘अर्क’ शोषून घेण्याची शोधक वृत्ती आढळते. त्यामुळे जेव्हा आपण मदनमोहन यांच्या रचना ऐकतो, तेव्हा यावरील गुणवैशिष्ट्यांचा आपल्याला नेहमीच प्रत्यय येतो.

जवळपास 30 वर्षांहून अधिक काळ चित्रपटसृष्टीत मोलाचे योगदान देऊनही ज्या थोड्या संगीतकारांना अजिबात व्यावसायिक यश प्राप्त झाले नाही, अशा अत्यंत दुर्दैवी संगीतकारांत मदनमोहन यांचा समावेश करावा लागतो. जरा बारकाईने बघितले तर कारकीर्दीच्या सुरुवातीला ‘हमारे बाद अब महफ़िल में’, किंवा ‘दुखियारे नैना’सारखी विलक्षण ताकदीची गाणी देणारा संगीतकार, अगदी आयुष्याच्या अखेरीस ‘बैया ना धरो’ किंवा ‘आज सोचा तो आंसू भर आये’ अशी त्याच तोलामोलाची गाणी देऊ शकला. हा माणूस किती प्रतिभावंत होता, याची ही चार गाणी साक्ष द्यायला पुरेशी आहेत. वास्तविक बघता, सांगीतिक रचनेच्या दृष्टिकोनातून वर निर्देशिलेल्या पहिल्या दोन गाण्यांच्या रचना आणि नंतरच्या दोन गाण्यांच्या रचना, यात तसा फारसा फरक नाही!! वेगळ्या शब्दांत मांडायचे झाल्यास, रचनेचा मूलभूत ‘ढाचा’ बराचसा मिळताजुळता आहे; पण फरक आहे तो वाद्यसंगीताचा आणि गायकीचा!

गझल गायकीत जो भोगवादाचा अर्क असतो, त्याचे नितांत रमणीय दर्शन मदनमोहन यांच्या रचनेतून दिसून येते. हाताशी आलेल्या काव्यातील दडलेला आशय तितक्याच समर्पक सुरांतून व्यक्त करण्याची अद्भुत ताकद, या संगीतकाराच्या रचनेतून वारंवार दिसून येते. याआधी उल्लेख केल्याप्रमाणे गाण्याची रचना करताना ‘धून’ अशी तयार करावी, की त्यातून प्रत्येक वेळी नवीन सांगीतिक वाक्यांश प्रत्ययाला यावेत आणि त्यामुळे, मूळ चालीचे सौंदर्य अधिक विस्तीर्ण व्हावे. मदनमोहन यांची गाणी नेहमी इथे इतरांपेक्षा वेगळी होतात. चित्रपटात जेव्हा केव्हा उठवळ प्रसंगाला साजेसे गाणे करायची वेळ आली, तेव्हा मदनमोहन यांनी केलेल्या रचना केवळ कर्तव्यभावनेने केलेल्या आणि बर्‍याच रुक्ष वाटतात!! आपली प्रवृत्ती अशा गाण्यांना साजेशी नाही, याची पुरती जाणीव मदनमोहन यांना होती आणि त्यामुळे अशी गाणी बांधताना, त्यातील जो उत्स्फूर्तपणा असतो, त्याचा मदनमोहन यांच्या ठायी लवलेश नसतो. कदाचित म्हणूनही या संगीतकाराच्या वाट्याला व्यावसायिक या संज्ञेत बसणारे फारसे चित्रपट आले नसावेत!!

अर्थात, प्रत्येक संगीतकाराची जशी बलस्थाने असतात, तसे तोकडेपणदेखील असते. तद्वत हॉटेलमधील नृत्यगीतांत वा त्या सदृश गाण्यांत, मदनमोहन अजिबात रमलेले दिसत नाहीत. त्याचबरोबर बलस्थाने विचारात घेता, गझलसदृश गाण्यांत मात्र मदनमोहन एकमेवाद्वितीय! अशा गाण्यांत त्यांच्या प्रतिभेच्या उत्तुंग आविष्काराचे दर्शन घडते. वास्तविक संगीताचे शास्त्रशुद्ध शिक्षण न घेतादेखील, ‘यमन’सारख्या चित्रपट संगीतात वारंवार वापरल्या जाणार्‍या रागात, ‘जारे बदरा बैरी जा’, ‘जिया ले गयो जी मोरा सांवरिया’सारख्या अवीट गोडीची ‘तर्ज’ तयार करणे, हे येर्‍यागबाळ्याचे काम नोहे! मदनमोहन यांच्या गाण्यात दुसरे खास वैशिष्ट्य दिसून येते, ते गाण्याच्या चालीसोबत रुणझुणणारा वाद्यमेळ. गायक/गायिकेने जिथे स्वर सोपवला आहे, तिथून वाद्यसंगीताच्या मदतीने तीच लय अधिक विस्तारित करत जायचे, हा या संगीतकाराचा अत्यंत मनोहारी खेळ!! बर्‍याच गाण्यांत हा खेळ आपल्याला अनुभवायला मिळतो. जसे, रस्मे उल्फत को निभाये, तुम जो मिल गये हो... इत्यादी अनेक गाण्यांतून माझ्या म्हणण्याचे वाचकांस प्रत्यंतर येऊ शकेल.

सुरुवातीला मी जे म्हटले, आपल्याकडे एखाद्या कलाकाराची बूज तो जिवंत असताना फारशी राखली जात नाही, आणि ती व्यक्ती गेल्यानंतर तिचे गोडवे गाण्याची मात्र अहमहमिका लागते!! मदनमोहन यांच्या बाबतीत नेमके असेच घडत आहे. म्हणूनच कदाचित, आजही या संगीतकाराचे नाव रसिक गौरवाने घेत असावेत!!

Tuesday 23 May 2017

छुपा लो यूं दिल में प्यार मेरा!!


खरंतर कथा नेहमीचीच - नायक आणि नायिका एकत्र भेटतात, काही भेटीनंतर प्रेम जमते. पुढे उच्च शिक्षणासाठी नायकाने गाव सोडणे आणि नायिकेची मानसिक कुचंबणा व पुढे फरफट होणे!! याची अखेर, नायिका कोठीवरील गायिका होणे आणि अचानक नायक गावात येणे आणि भेट होणे!! नायकाला पश्चात्ताप होणे आणि पुढे नायिकेच्या मुलीची काळजी घेणे!! अत्यंत सरधोपटपणे लिहिले आहे पण अशा प्रकारचे कथानक, हिंदी चित्रपटाला नवीन नाही. 
हिंदी चित्रपटात एकूणच प्रणयी प्रसंग बहुतांशी एकसाचीच असतात. त्यामुळे कथा कितीही सक्षम असली, अभिनेते कितीही नावाजलेले असले तरी प्रसंगात तोचतोचपणा बराच असतो, प्रसंगी बेचव देखील होतात. अर्थात, घाऊक उत्पादन झाले म्हणजे मग दर्जाच्या प्रतवारीत घसरण क्रमप्राप्तच होते. असे असले तरीही काही चित्रपट आणि काही प्रसंग मात्र आपल्या मनात कायमचे घर करून राहतात, त्यातील तजेला कायम ताजाच राहतो. १९६६ साली आलेल्या " ममता " चित्रपटाने घातलेली भुरळ, आजही मनावरून उतरत नाही.
पुढे कधीतरी वाचनात कविवर्य सुरेश भट यांच्या एका अजरामर कवितेतल्या या ओळी येतात. ही कविता जेंव्हा मी वाचली तेंव्हा मला कुठेतरी या ओळींशी नाते सांगणाऱ्या ओळींची आठवण यायला लागली. 

" मग माझा जीव तुझ्या वाटेवर वणवणेल !
अन माझी हाक तुझ्या अंतरात हुरहुरेल !

          मग सुटेल मंद मंद
          वासंतिक पवन धुंद;
माझे आयुष्य तुझ्या अंगणात टपटपेल ! " 

सुरेश भटांची कविता ही बरेचवेळा गझल वृत्ताशी नाते सांगणारी असते, जरी कविता गझल वृत्तात नसली तरी!! शेवटच्या ओळीत नवीन, चमकदार कल्पना आणायची आणि वाचकाला काहीसे स्तिमित करायचे, हा त्यांच्या कवितेचा खास भाग मला भावतो. अर्थात प्रत्येक कविता असा खेळ यशस्वी होत नाही पण जिथे खेळ जमतो, तिथे मात्र वाचक काहीसा चक्रावून जातो. वरील ओळी वाचताना, मला याच्याशी नाते सांगणाऱ्या ओळी, "ममता" चित्रपटातील " छुपा लो यूं दिल में प्यार मेरा " या गाण्यातील कविता वाचताना सापडल्या. एक मुद्दा, कुठल्याही कलाकृतीची अशी समांतर तुलना करण्यात फारसे हशील नसते कारण त्यातून फारसे काही हाती लागत नाही, बरेचवेळा केवळ शब्दच्छल होतो. परंतु एका कलाकृतीवरून दुसऱ्या कलाकृतीची आठवण होणे, सहजशक्य असते. 
उर्दू साहित्यात मजरुह सुलतानपुरी यांचे नाव फार सन्मानाने घेतले जाते तसेच चित्रपटात गाणी लिहिणाऱ्या शायरांपैकी एक महत्वाचे नाव म्हणून नेहमी उल्लेख केला जातो. ममता चित्रपटातील सगळीच गाणी श्रवणीय आहेत आणि कविता म्हणून वाचताना, सुंदर वाचनानंद मिळतो. " छुपा लो यूं दिल में प्यार मेरा " हे गाणे चित्रपटात, नायकाच्या आयुष्यातील एका अत्यंत विकल संध्याकाळी, मानसिक दृष्ट्या कोलमडून गेल्यावर, झालेल्या उपरतीच्या क्षणाभोवती येते.
संगीतकार रोशन यांची बहुतांश गाणी अतिशय संथ, शांत प्रवृत्तीची असतात. त्याचा परिणाम, गाण्यातील मर्यादित स्तरावर वाजणारा वाद्यवृंद तसेच सगळे गायन देखील अतिशय संयत वृत्तीतून उमलत जातात.  वाद्यमेळ बहुदा,  सारंगी,बांसुरी, इत्यादी शक्यतो पारंपरिक भारतीय वाद्यांवर अधिक भर देत सजवलेला दिसतो. या गाण्याच्या संदर्भात विचार करता, प्रत्येक भाषिक वाक्यानंतर बांसुरी आपल्या छोट्या, खेचक व दर्दभरल्या सुरावटींच्या पाउलखुणा सोडीत गीताचा दरवळ वाढवते. चालीचे स्वरूप, बांसुरीस दिलेला वाव आणि तिचा स्वनरंग, यांमुळे बांसुरी संगीताचे नक्षीकामात रुपांतर होण्याचा धोका भरपूर होता परंतु संगीतकार म्हणून तो धोका त्यांनी टाळला!! वाद्याची निवड, हात राखून पण विचक्षण वापर अनोखी विशिष्ट वाद्ये, आणि तरीही आवाहक योजना, ही खास वैशिष्ट्ये म्हणता येतील.
या गाण्यात तर वाद्यांचा अतिशय मर्यादित स्तरावर वापर केलेला आहे, इतका की मानवी आवाज, हाच जणू काही वाद्य आहे असे वाटावे. गाण्याची सुरवात, थेट हेमंत कुमारांच्या स्वरांत होते. मुळातला धीरगंभीर आवाज, अत्यंत अशा प्रकारची शांत चाल, त्यामुळे गाण्याला सुरवातीलाच गहिरेपण लाभते. यमन रागात सुरावट बांधलेली आहे. मजरुह सुलतानपुरीचे शब्द देखील किती प्रत्ययकारी आहेत. 

" छुपा लो यूं दिल में प्यार मेरा
के जैसे मंदिर में लौ दिये की "

या दोन ओळींनंतर लताबाईंचा स्वर अवतरतो. सुरवातीची संथ आणि शांत चाल, प्रत्येक ओळींगणिक वरच्या सुरांत जाते पण शेवटची ओळ -  ' के जैसे मंदिर में लौ दिये की " गाताना, ज्या प्रकारे परत मूळ स्वरांशी येऊन मिळते, हा सगळं सांगीतिक वाक्यांश मुद्दामून परत, परत ऐकण्यासारखा आहे. शब्दांचे औचित्य सांभाळत चालीचे सौंदर्य कसे वाढवत न्यायाचे, याचा हा सुंदर वस्तुपाठ आहे.  

तुम अपने चरणों में रख लो मुझको 
तुम्हारे चरणों का फुल हैं मैं 
मैं सर झुकाये खडी हूं प्रीतम 
के जैसे मंदिर में लौ दिये की

आणखी एक वैशिष्ट्य सुरवातीलाच सांगितले पाहिजे, गाण्यात कुठेही रूढ असे तालवाद्य नसून, केवळ झांजेचा हलका आघात, हेच तालवाद्य म्हणून योजलेले आहे. मुळातली अत्यंत हळवी चाल, अशा तालवाद्याने अधिक खुलली आहे."  मैं सर झुकाये खडी हूं प्रीतम " ही ओळ दोन वेळा घेतली आहे, पहिल्यांदा किंचित वरच्या सुरांत घेतली आहे पण परत घेताना, मुखड्याच्या चालीशी जुळणारी घेतली आहे. शब्दातील आर्जव आणि मार्दव, सुरांच्या साहाय्याने कसे खुलवता येते, हा खरोखरच विलक्षण अनुभव आहे. रोशन यांच्या संगीताबाबत एक विलक्षण बाब ध्यानात येते, या संगीतकाराने आपल्या कारकिर्दीत युगुलगीते भरपूर बांधली आहेत आणि त्यांनी युगुलगीतांच्या बाबतीत आदिनमुना सादर केला आहे, हे म्हणावयास प्रत्यवाय नसावा. 
पहिला अंतरा सुरु होण्याआधीचा वाद्यमेळ (?) म्हणजे बासुरीची लकेर आहे. यमन रागाची स्पष्ट ओळख दाखवणारी ही लकेर आहे. रोशन नेहमीच हात राखून वाद्यांचा वापर करतात असे मी वरती विधान केले आहे आणि त्या विधानाच्या पुष्ठयर्थ इथली बांसुरी दाखवता येईल. अतिशय सुंदर अशी लयकारी आहे. 

ये सच है जीना था पाप तुम बिन 
ये पाप मैंने किया हैं अब तक
मगर है मन में छबी तुम्हारी 
के जैसे मंदिर में लौ दिये की

पहिला अंतरा जरा वेगळ्या सुरांवर सुरु केला आहे. हेमंत कुमारांचा आवाज किंचित वरच्या स्वरांवर आहे. कवितेच्या ओळी बघता, पुरुष गायकाने सुरवात करणे इष्ट ठरते. किंचित ढाला आवाज, थोडी बंगाली वळणाची गायकी परंतु शब्दफेक अतिशय प्रत्ययकारी. मुळातच हेमंत कुमार हे संगीतकार असल्याने, एखादे गाणे गाताना, शब्दांवरील वजनाचा अचूक अंदाज दिसतो तसेच हरकत किती आणि कुठे घ्यायची/ तोडायची, याचे सम्यक दर्शन घडते. मुखड्यात जसे " मैं सर झुकाये खडी हूं प्रीतम " ही ओळ दोनदा घेऊन, परत मूळ स्वरावलीकडे चाल परतली आहे, तोच प्रकार " मगर हैं मन में छबी तुम्हारी " गाताना केला आहे. ही ओळ गाताना, " छबी " शब्दावर किंचित जोर दिला आहे आणि त्या शब्दाचे महत्व दर्शवून दिले आहे.

दुसरा अंतरा सुरु करण्यापूर्वीची बांसुरीची धून तीच ठेवली आहे. मला तर काहीवेळा असेच वाटते, अशा प्रकारच्या गाण्यात वाद्यमेळाची गरज असते का?? केवळ गायकांना काही क्षणाची उसंत मिळावी, या हेतूनेच वाद्ये योजली असावीत!! गाण्याची सुरावट इतकी मोहक आणि गोड आहे की इथे आणखी कसलीच सांगीतिक कलाकुसर गरजेची नाही, अगदी हरकती घेतल्या तरी त्याचे अतिशय माफक प्रमाण आहे. याचे महत्वाचे कारण - शब्दकळा भरजरी आहे आणि त्या शब्दकळेला सुरांच्या भाराखाली दाबून टाकण्याची जरादेखील गरज नाही. सगळी स्वररचना, हा उस्फुर्त स्वराविष्कार आहे.

फिर आग बिरहा की मत लगाना 
के जलके मैं राख हो चुकी हूं 
ये राख माथे पे मैंने रख ली 
के जैसे मंदिर में लौ दिये की "

कुठलेही युगुलगीत बसवताना, शब्दानुरूप गायक/गायिकेला स्थान द्यायचे, हा अतिशय ढोबळ अंदाज या गाण्यात फार बारकाईने पाळला आहे. दुसरा अंतरा गाताना, " फिर आग बिरहा की मत लगाना, के जलके मैं राख हो चुकी हूं" या ओळी लताबाईंच्या आवाजात तर " ये राख माथे पे मैंने रख ली, के जैसे मंदिर में लौ दिये की " या ओळी हेमंत कुमारांच्या आवाजात  गावुन घेण्यात, संगीतकाराने शब्दांची बूज कशी राखावी, हे सुरेखरीत्या सिद्ध केले आहे.

एकंदरीने रोशन यांची रचनाप्रकृती दु:ख, अंतर्मुखता व खंत करण्याकडे झुकली आहे का? अर्थात, या विधानाला परस्पर शह देणाऱ्या रचना त्यांनी आपल्या कारकिर्दीत सादर केलेल्या दिसतात. लताबाईंच्या आवाजातील उंचावर पोहोचण्याच्या क्षमतेने मर्यादेपलीकडे मोहून न जाता, त्यांच्या आवाजातील मंद्र सप्तकातील किंवा मध्य सप्तकातील गायन कौशल्याचा वापर फार हुशारीने केला आहे आणि या गाण्यात देखील याच विशेषाचा आढळ होतो. या गाण्यात एकेक कडवे एकाच आवाजात जवळपास येते, दुसऱ्या आवाजाच्या कंठक्षेपाशिवाय. सांगीतदृष्ट्या लय आणि सुरावट यांची संगती राखूनही दोघेंही गायक जणू श्रोत्यांना थेट उद्देशून गातात, असेच वाटते. रोशन यांना बहुदा यमन रागाची विशेष आवड दिसत आणि हे त्यांनी, निरनिराळ्या प्रकृतीची गाणी या रागात बांधून आणि तरीही प्रत्येक चालीची स्वतंत्रता अबाधित ठेऊन, आपल्या सांगीतिक कौशल्याचा दाखला दिला आहे. वाद्यांचा स्वनरंग नेमकेपणाने ओळखून त्यानुसार गाण्यात त्यांचा वापर करण्याची कुशलता केवळ स्तिमित करणारी आहे.
आणखी काही खास वैशिष्ट्ये बघायची झाल्यास, त्यांची बहुतेक गाणी स्वरविस्तार योग्य आहेत, म्हणजे गाताना, तुम्हाला स्वरविस्तार करण्यास भरपूर वाव असतो, अर्थात गायकी अंगाच्या रचनेचे हेच महत्वाचे वैशिष्ट्य म्हणावे लागते. रोशन यांचे, एक संगीतकार म्हणून वैशिष्ट्य मांडायचे झाल्यास, गाण्यात सांगीतिक विस्तार शक्यता असताना देखील, त्यांनी स्वरांना "बांध" घालून, गाण्याची लय कायम ठेऊन, गायन आणि वाद्यांची पट्टी ही नेहमीच मंद्र किंवा शुद्ध सप्तकात ठेवली आहे. साठोत्तरी गाण्यात मात्र काही गाणी या तत्वांना फटकून बांधली गेली आहेत. याच पार्श्वभूमीवर विचार करता, या गाण्यातील भावनेच्या दृष्टीने बघता, भारतातील मोज़क्या " पवित्र " गाण्यांत या रचनेचा समावेश होतो आणि तसा समावेश सर्वार्थाने योग्य आहे. 
त्यांची बहुतांश गाणी ऐकताना, मला आरतीप्रभूंच्या दोन ओळी नेहमी आठवतात, 
"तुटते चिंधी जखमेवरची, आणिक उरते संथ चिघळणे" 




Saturday 20 May 2017

इन आँखो की मस्ती के

प्रसिद्ध कविवर्य कै. बा.भ. बोरकरांची " जपानी रमलाची रात्र " ही कविता, मराठीतील एक अद्वितीय कविता मानली जाते. भोगवादी शृंगारावरील मनोज्ञ चित्रण या कवितेत वाचायला मिळते.

" नखें लाखिया, दांत मोतिया, वैदूरयी नेत्र,
अवयव गमलें चपल चिवट कीं मयवनींचे वेत्र;
कात सोडिल्या नागिणींचे तें नवयौवन होतें,
विळख्याविळख्यातुनी आलापित ज्वालांची गीतें "

बोरकरांच्या एकूणच स्वभावधर्मानुसार सौंदर्यलोलुप वृत्तीतून लिहिली गेलेली ही कविता. म्हटले तर उद्दीपित करणारी तरीही संयत मांडणीतून शृंगारसम भावनेची ही कविता आहे. भावकवितेच्या नात्याशी फार जवळचा संबंध राखणारी ही कविता. ही कविता केंव्हाही वाचल्यानंतर मनात मनात एक प्रकारचे धूसर चित्र उभे रहाते. कुठल्याही कलेची अशा प्रकारे इतिश्री होणे, हे एका दृष्टीने यशस्वी होणेच होय.
पुढे १९८१ मध्ये, " उमराव जान " चित्रपट आला, आणि त्यातील " इन आँखो की मस्ती के" ही गझल ऐकली आणि तसेच आव्हानात्मक शृंगाराचे चित्र मनासमोर उभे राहिले. शहरयार या उर्दू भाषेतील प्रख्यात शायरने ही गझल लिहिली आहे. गझलबाबत फार मागे एक सुंदर सूत्रबद्ध वाक्य वाचल्याचे आठवत आहे. भोगवादाचा मनोज्ञ आविष्कार म्हणजे गझल. एखाद्या गझलेला मनपसंत दाद द्यावी तशी मला या वाक्याला दाद द्यावीशी वाटली.  मुळात गझलेचा आकृतिबंध हा अतिशय घट्ट विणीचा, एकसंध असला तरी देखील एका गझलेत ३,४ कविता असू शकतात ज्यांचा एकमेकांशी आशयाच्या दृष्टीने संबंध असेलच, असं नाही. खालील शब्दरचनेला, गझल हे वृत्त म्हणून वाचायला घेतले तर आपल्याला वरील विवेचनाची प्रचिती येईल. पहिला अंतरा आणि दुसरा अंतरा, यातील आशयात काहीही साधर्म्य नाही आणि तरीही हे दोन्ही अंतरे, स्वतंत्र कविता म्हणून आपण आस्वादू शकतो आणि गझल या वृत्ताची खरी खासियत आहे. एक प्रकारची तीव्र अकर्मण्यता किंवा अक्रियशीलता, काहीतरी मूल्यवान हरपले आहे याचे दाट दु:ख आणि संयमित शृंगार या आणि अशा भावतरंगांना गझल वृत्तात अंगभूत प्रतिसाद मिळत असतो. गझलचा सांगीतिक दृष्ट्या विचार केल्यास, मानसिक अथवा भावनिक आशयाबरोबर हातात हात घालून चालू शकेल असा सांगीत अवकाश निर्माण करा, अशा प्रकारची आवाहक मागणी असते.
संगीतकार खैय्याम यांच्या सांगीतिक कारकिर्दीतील अजरामर संगीत. चित्रपटात बहुतांशी गझला आहेत आणि बहुतेक सगळ्या लखनवी ढंगाच्या ठुमरीवर आधारित आहेत. प्रस्तुत रचना, भूप रागावर आहे. वास्तविक पहाता, भूप रागाचे, संस्कृत ग्रंथातील वर्णन हे मांगल्यमय असे दिले आहे. त्या वर्णनाशी ताडून बघता, अशी श्रुंगारमय रचना भूप रागात तशी अपवादानेच सापडते आणि अशी " तर्ज " शोधून काढल्याचे संपूर्ण श्रेय हे, संगीतकार खैय्याम यांचेच म्हणावे लागेल. रचनेत भूप रागाची सावली आहे पण थोडे बारकाईने बघितले तर रागाचा तिरोभाव दृष्टीस पडतो. खरतर नृत्यगीत असून देखील, या मुजरा नृत्यात एल आदबशीर शृंगारच अवतरलेला आहे आणि एकूणच गझलच्या मूळ प्रकृतीला नेमके साजेसेच असे झाले आहे. छेडण्याचा तसेच गजांनी ध्वनित होणाऱ्या वाद्यांचा या रचनेत आवाहक वापर आहे आणि असे आवाहनच गाण्याच्या प्रकृतीच्या नजरेतून बघितल्यास, गाण्याचा मूळ हेतू तडीस गेल्याचे समजून घेता येते.

" इन आँखो की मस्ती के, मस्ताने हजारो हैं  
इन आँखो से वाबस्ता अफसाने हजारो हैं

गाण्याची सुरवात, कुठल्याही वाद्याचे सूचन न होता, थेट होते. " इन आँखो की मस्ती के " ही गाऊन संपते आणि एक छोटासा आलाप घेतला जातो. भूप रागाची ओळख इथे होते. " सा रे ग प" या सुरांतून भूप नजरेसमोर येतो. आलापानांतर संपूर्ण ओळ गायली आहे. गाताना, एक बाब लगेच स्पष्ट होते, गायनातून निर्माण होणारे आव्हानात्मक आर्जव आणि सूचक शृंगाराची जाणीव. खरेतर सगळ्या रचनेतून हाच भाव दृग्गोचर होतो. संयत शृंगाराचा आदिनमुना संगीतकार खैय्याम आणि आशाबाई यांनी सादर केला आहे. गाण्यात कुठेही औषधाला देखील उठवलं वृत्ती प्रतीत होत नाही, बहुदा कारण असे असावे, संपूर्ण चित्रपट हा सरंजामी संस्कृती आणि विलासी वृत्तीवर आधारित असल्याने, तसे भाव निर्माण होण्याला फारसा वाव नव्हता. गायनात खानदानी वृत्ती दिसून येते. " इन आँखो की मस्ती के " गाताना " मस्ती " शब्द कसा गायला गेला आहे, हे ऐकण्यासारखेच आहे. " आँखो की मस्ती" यात एक खट्याळपणा दडलेला आहे आणि आवाहन देखील आहे. हे सगळे आशाबाईंनी सुरांतून फारच सुरेख दर्शविले आहे. आशाबाईंच्या गायनाला बरेचवेळा " शब्दभोगी " गायकी म्हणतात आणि तसे शब्दांचे अलौकिक " भोगणे " अशा गायकीतून प्रतीत होते. गझल रचनेत नेहमीच शेराच्या दुसऱ्या ओळीला कमालीचे महत्व असते. पहिल्या ओळीतून कल्पनेची मांडणी केली जाते आणि दुसऱ्या ओळीत त्या कल्पनेचा प्रभावी समारोप केलेला असतो. गझल गाताना देखील त्याच पद्धतीने दुसरी ओळ गायली जाणे अध्याहृत असते. दुसऱ्या ओळीत " वाबस्ता " हा उर्दू शब्द योजला आहे - याचा नेमका अर्थ - जोडलेले नाते किंवा नातेसंबंध. आता दोन्ही ओळींचा अर्थ आणि त्याची व्याप्ती ध्यानात येऊ शकते आणि संगीतकाराने, हाआशय स्वररचनेतून मांडलेला आहे.
इथेच सारंगीचे स्वर ओघळतात आणि चाल आपली मनाची पकड घेते. सारंगी वाद्याचे सवर्च असे असतात, वाजता क्षणीच तुमचे लक्ष वेधून घेतात. वास्तविक इथे सारंगीच्या जोडीने सतारीचे सूर देखील ऐकायला येतात पण इथे सतार झमझमत नसून सारंगीच्या सुरांना पूरक अशीच वाजली आहे आणि सतारीचे सूर संपत असताना परत सारंगीचे सूर ऐकायला येतात आणि त्याच सुरांत पहिला अंतरा सुरु होतो.

इक तुम ही नहीं तन्हा, उल्फत में मेरी रुसवा
इस शहर में तुम जैसे, दीवाने हजारो हैं
इन आँखो की मस्ती के

गझल वृत्ताचे जेंव्हा संगीतात रूपांतर होते, तेंव्हा बरेचवेळा मुखड्याची चाल आणि अंतऱ्याची चाल, यात फरक केला जातो. वेगळ्या शब्दात, अंतरा बांधताना स्वररचना वेगळ्या स्वरूपात बांधली जाते/जाऊ शकते. या मागे विचार असा  दिसतो, काव्य म्हणून प्रत्येक कडवे ही जर स्वतंत्र कविता असेल तर प्रत्येक अंतरा वेगळ्या सुरांत का गायला जाऊ नये? प्रश्नात तथ्य जरूर आहे पण हा भाग संपूर्णपणे संगीतकाराच्या अखत्यारीत येतो आणि त्याचा संगीताचा अभ्यास किती खोलवर आहे, त्यावर अवलंबून असते.  या रचनेतील अंतरा देखील वेगळ्या चालीत बांधलेला आहे. रचना भूप रागापासून दूर सरकल्याचे लक्षण. गंमत अशी आहे, " इस शहर में तुम जैसे, दिवाने हजारो हैं " ही ओळ परत मुखड्याकडे वाळवून घेतली आहे आणि भारतीय संगीत परंपरेनुसार समेची मात्रा अचूक घेतलेली आहे. गझल गाताना, त्यात स्वरोच्चारित ठसका आणि नखरा याचे अप्रतिम प्रमाण असते आणि तसा नखरा, आशाबाईंनी आपल्या गायनातून सादर केला आहे. वरती मी आशाबाईंची " भोगवादी " गायकी असे वर्णन केले आहे, त्याला पूरक असे गायन, हीच ओळ ऐकताना मिळते. " इस  शहर में " गाताना, " इस " शब्दावर नेमका जोर देऊन, त्या शब्दाचा अर्थ आणि त्याचे या ओळीतील वजन, सगळे एकत्रितपणे दर्शवून दिले आहे.   

इक सिर्फ हमी मय को, आँखो से पिलाते हैं
कहने को तो दुनिया में, मयखाने हजारो हैं
इन आँखो की मस्ती के

या अंतऱ्याच्या आधीच वाद्यमेळ जवळपास पाहिल्याप्रमाणेच आहे. सतार अतिशय मंद स्वरांत ठेवली आहे आणि त्यालाच जोडून सारंगी घेतली आहे. सारंगी या वाद्याचा गुणधर्म नेमका ओळखून, त्याला साजेशी अशीच स्वररचना इथे प्रदान केली आहे. कोठीवरील गाण्यात, सारंगी वाद्याने नेहमीच महत्वाची भूमिका घेतलेली आहे आणि परिणामी, गझल गायनात सारंगीचे स्थान जवळपास अढळ स्वरूपाचे झाले. मानसिक चलनवलनाच्या गुंतागुंतींशी सारंगी वाद्य फार परिणामकारक साम्य दाखवते. हा या वाद्याच्या स्वनरंगाचा अप्रतिम गुण आहे. ही रचना, शायरी म्हणून वाचताना, या अंतऱ्याच्या दोन ओळी लक्षणीयरीत्या प्रत्ययकारी ठरल्या आहेत. खरतर गझल म्हटली की बरेचवेळा उच्च दर्जाच्या उर्दू शब्दांची फवारणी वाचायला मिळते आणि त्यातच बहुतांशीवेळा आशय गुदमरून जाण्याची शक्यता असते. इथे मात्र तासाला प्रकार दिसत नाही. असे देखील असू  शकेल,प्रस्तुत रचना ही जरी गझल वृत्तात लिहिली असली तरी मुलत: चित्रपटासाठी लिहायची असल्याकारणाने, शक्यतो प्रचलित उर्दू मिश्रित हिंदी भाषेत लिहिली गेली असावी.

इस शम्म-ऐ-फरोजा को, आँधी से डरातें हो
इस शम्म-ऐ-फरोजा के, परवाने हजारो हैं
इन आँखो की मस्ती के

इथे " फरोजा " हा उर्दू/अरेबिक शब्द योजलेला आहे - अतिशय मौल्यवान रत्न अशा अर्थाने योजलेला आहे. उर्दू भाषेत आणखी एक खासियत आढळते, जसे इथे " शमीम-ऐ-फरोजा " शब्दरचना वाचायला मिळते. अशा प्रकारे संपूर्ण शब्द विघटित केल्याने, आशयाची अभिवृद्धी सहज आणि संपूर्णपणे ध्यानात येऊ शकते आणि गझल ही बहुतेकवेळा गायली जात असल्याने, लयीचा अंदाज आणि गायकी (एखादी हरकत किंवा मुरकी किंवा खटका घेण्यासाठी) साठी याचा सुरेख उपयोग केला जातो. अशा शब्दरचनेमुळे काव्याला सौंदर्य मिळते, हा मुद्दा आणखी वेगळाच!! आशाबाईंनी, संपूर्ण रचना गाताना,, अंतऱ्यातील पहिली ओळ गाताना दोन भागात गायली आहे आणि तसे  करताना,तिथे प्रत्येकवेळेस एखादी हरकत/आलाप घेऊन, केवळ गायकीचा दाखवली  नसून, त्या ओळीतील अर्थ नेमका दर्शविला आहे जसे इथे, " इस शम्म-ऐ-फरोजा " नंतर छोटासा आलाप घेतला आहे.
आशाबाईंना कोणालाही हेवा वाटावा असा लाभला आहे. चैतन्यपूर्ण, कंपविहीन असूनदेखील भावपूर्ण, कुठेही घसरू न देता द्रुत लयीत फिरणारा, खालच्या आणि वरच्या तारतांवर सहज आविष्कारपूर्ण विहार करणारा आणि भरीव असून जणांनी सौंदर्याने तसेच लालित्याने युक्त असा आहे. आपली ताकद लपवू शकणारा  आवाज, भावुक न होता सूचन करण्याची अफाट क्षमता व शब्दांच्या अर्थापलीकडे त्यांच्या आशयापर्यंत नेऊ शकणार लगाव - या आणि यासारख्या इतर गुणांचे भांडवल गझल गायनासाठी लागते आणि ते आशाबाईंकडे भरपूर आहे. यामुळे गाताना आवाजात अनेकवेळा अनपेक्षितरित्या उतार-चढाव दाखविता येणे सहजशक्य झाले आणि परिणामी ललित गायन अधिक समृद्ध, श्रीमंत झाले. नेहमी (जरूर  नसताना) निकष म्हणून चित्रपटसंगीताभोवतो तरंगणाऱ्या गोष्टीकडे वळायचे तर, शास्त्रोक्त संगीताबाबत मत मांडायचे  झाल्यास, रूढ आणि नियमबद्ध रूपापासून सरकून अर्थपूर्ण बदल घडवून रागात नवीन प्रयोग करण्यात यश मिळाले आहे नाही, हा प्रश्न विचारता येऊ शकतो. प्रस्तुत रचनेच्या संदर्भात विचार करायचा झाल्यास ,भूप रागाच्या तिरोभावातून स्वररचना उभी राहात असताना, त्या रचनेचे बंदिशीत किंवा ठुमरीत साच्यात गायन न  करता,गीतधर्मी गायन करीत, सुंदर गीत आपल्या समोर ठेवणे, हेच खरे त्यांच्या गायनाचे खरे यश म्हणायला हवे. mano
नैसर्गिक सौंदर्य आणि संवादी मनोभाव रचनाकाराने केरवा या तालातल्या डौलदार रचनेत आणला आहे. संयत गायन आणि मोजका वाद्यमेळ वापरून रचनासंबद्ध निश्चिततेने ही कामगिरी पेलणे सर्वांना जमते असे नाही. खैय्याम यांना ते जमले आहे याचा सहज प्रत्यय हेच त्यांचे यश मानता येईल.


गुंजी सी हैं सारी फ़िझा

"लावण्याला असल्या असण्याच्या हक्कच ना;
प्रज्ञेतच फक्त तये उजळावे, आणि पुन्हा
जळताना, घडवावी प्रतिमा निस्तुल काळ्या
काळ्या पाषाणातून शब्दातून थिजलेल्या _____"

सुप्रसिद्ध कवी पु.शी. रेग्यांच्या या अजरामर ओळी. मराठीत रेग्यांच्या कवितेने, जीवनातल्या एका अत्यंत रसपूर्ण अशा भागाचं अत्यंत समरसतेने चित्रण केले, जे अपूर्व आहे. जीवनातील या आनंदाचा स्वीकार करताना मराठी मन बुजतं. म्हणूनच मुक्त आनंदाचा इतका मोकळा आविष्कार मराठी भाषेत क्वचित आढळतो. "स्त्री"ला आपले "स्त्रीत्व" जाणवून  देताना,पुरुषाच्या संयत नजरेतून आविष्कृत झालेली ही कविता, केवळ आणि केवळ निखळ सौंदर्याची अनन्यसाधारण निर्मिती अप्रतिम प्रतिमांच्या साहाय्याने उभी करते.
२००४ साली आलेल्या "क्यूँ...! हो गया ना" या चित्रपटातील " गुजी सी हैं सारी फ़िझा " हे गाणे ऐकताना, यातील कविता वाचताना, शायर जावेद अख्तर यांनी मांडलेल्या शब्दरचनेची आठवण, वरील कवितेच्या संदर्भात वारंवार येते. प्रणयी आविष्कार पण तरीही असली तरल, मोकळी भावना शायर जावेद अख्तर यांनी या गाण्यात सुरेख मांडली आहे. हिंदी चित्रपटात, प्रणयी प्रसंग तर पाचवीला पुजलेले असतात तेंव्हा एका दृष्टीने "थिजून चिवट" झालेल्या प्रसंगासाठी नवचैतन्याने भारलेली शब्दरचना करणे, खरोखरच अवघड असते. आधुनिक काळात, हिंदी चित्रपटातील गाण्यांसाठी आशयपूर्ण शब्दरचना करणाऱ्या कवींमध्ये जावेद अख्तर यांचे नाव आवर्जून घ्यावे लागेल. वडील, प्रसिद्ध शायर "जान निसार अख्तर" यांचा वारसा सहजपणे पुढे चालवला, असे सार्थपणे म्हणता येईल. मुळात शब्दरचना करताना, तिला भावकवितेच्या अंगाने मांडण्याचे अनोखे कसब या शायरकडे दिसते. आता याच कवितेच्या संदर्भात लिहायचे झाल्यास, कवितेतील भावनाशयाचा प्रवास हा स्थूलतेकडून सूक्ष्माकडे सुरु झाल्याचे जाणवेल. वास्तविक, नायिकेला हवा असणारा प्रणयाचा प्रतिसाद मिळत आहे आणि त्या क्षणी जाणवलेली भाववृत्ती,हेच या कवितेचे प्रमुख लक्षण आहे आणि हे लक्षण मांडताना, निसर्गातील प्रतिमा, प्रसंगी संगीत वाद्याचा प्रतिमा म्हणून केलेला वापर आणि एकूणच लयीच्या अंगाने केलेली शब्दरचना, ही शब्दरचनाच वाचताना, आपण घाटाच्या प्रेमात पडतो. इथेच कवीचे अर्धे यश सिद्ध होते. शब्दांकित केलेल्या प्रतिमेच्या जाणिवेतून स्फुरणारा अनुभव, तो अनुभव हीच इथे भाववृत्ती म्हणून प्रगट होते. येथे संवेदना ही कल्पनास्वरूपात जाणवलेली नाही; संवेदना हाच अनुभव आहे. तेच भाववृत्तीचे शरीर आहे.  येथे भावानुभवाचे बाहेरून वर्णन करण्याचा प्रयत्न नसून, त्या अनुभवाचे संवेदनशरीर साकार करून त्याच्या द्वारे तोच अनुभव पुन्हा निर्मिण्याचा प्रयत्न आहे.
आता गाण्याकडे वळायचे झाल्यास, गाण्याच्या सुरवातीलाच सरगम ऐकायला मिळते पण त्यामागे अतिशय मंद आवाजात, गिटारचे सूर आहेत. ही सरगमच अशा पद्धतीने घेतलेली आहे, ज्यायोगे गाण्याच्या चालीचा "आराखडा" आपल्या समोर उभा रहातो. संगीतकार म्हणून शंकर/एहसान/लॉय यांनी गाण्याचा मुखडाच अशा अनोख्या पद्धतीने सादर करून, गाण्याची चाल मनावर ठसवली आहे. सरगम देखील अतिशय खालच्या सुरांत, गुणगुणत्या नादात घेतली आहे. गायिका साधना सरगमने याबाबत निश्चित आपली गायकी प्रस्थापित केली आहे. नीट कान टवकारून ऐकले म्हणजे गायल्या गेलेल्या सरगमचे चलन ध्यानात येईल. खरंतर, संगीतकाराने हीच सरगम संपूर्ण गाण्यात वेळोवेळी गाऊन घेतली आहे आणि मुखड्याला जो नाद ठेवला आहे, तीच नादमयता कायम ठेवली आहे.  
"गुंजी सी हैं सारी फ़िझा, जैसे बजती हैं शहनाईया" ही ओळ याच सरगमच्या नादमयतेतून गायली गेली आहे. स्वरांचे घेतलेले "वजन" जरा बारकाईने ऐकल्यावर ध्यानात येईल. जावेद अख्तर यांनी लिहिलेले नादमय शब्द तितक्याच हळव्या (पण अर्थात ओलसर, भावविवश नव्हे!!) सुरांनी गायले गेले आहेत. परिणाम, आधीची सरगम नेमकी मनात बसते.  
गुंजी सी है सारी फिझा, जैसे बजती हैं शहनाईया
लहराती हैं, महेकी हवा, गुनगुनाती हैं तनहाईयाँ
सब गाते हैं सब मदहोश हैं, हम तुम क्यूँ खामोश हैं
साज-ए-दिल छेडो ना
चुप हो क्यूँ, गाओ ना,
आओ ना.... आओ ना... आओ ना...

हा मुखडाच विलक्षण सौंदर्यपूर्ण स्वरांनी बांधलेला आहे. कुठेही गायकी दाखवायची म्हणून दीर्घ हरकत किंवा तान घेतलेली नाही. पहिली ओळ जशी गायली गेली आहे, त्याच लयीत, सुरांत सगळा मुखडा गायला गेला आहे. " साज-ए-दिल छेडो ना " ही ओळ गाताना साधना सरगमने किंचित हलक्या सुरांत छोटीशी पण आल्हाददायक हरकत घेऊन, लय किंचित लांबवली आहे. त्यामुळे मुखडा एकसुरी न बनता,  थोडे वैविध्य येते. त्यातच पुढे "आओ ना" या शब्दांवर स्वरांची फिरत घेऊन, वारंवार उच्चारून, बांधणी पक्की केली आहे.
पहिला अंतरा सुरु होण्याआधीचा वाद्यमेळ तर फक्त सरगमनेच सजवला आहे. अर्थात इथे जी सरगम घेतली आहे, ती गाण्याच्या सुरवातीला घेतली आहे, त्याच्याशीच नाते सांगणारी आहे. आणि पार्श्वभागी गिटारचे मंद स्वर आणि Octopad या तालवाद्याचा तसाच काहीसा दबका ध्वनी.

तन मन में क्यूँ ऐसी बेहती हुयी
ठंडी सी इक आग हैं
सांसो में हैं कैसी ये रागिनी
धडकन में क्या राग हैं
ये हुवा क्या हमें, हमको समझाओ ना
सब गाते हैं.... खामोश हैं....
दिल में  जो बांते हैं
होटो पे लाओ ना.....
आओ ना.... आओ ना... आओ ना...

या अंतऱ्याची चाल तशीच ठेवली म्हणजे मुखड्याला जी चाल लावली आहे, त्याला समांतर अशीच चाल ठेवली आहे. पार्श्वभागी मात्र बासरीचे सूर आहेत आणि ते मात्र या अंतऱ्याच्या स्वररचनेस एक विलोभनीय अस्तर प्रदान करतात. ललित संगीतात अशा काही ""जागा" असतात, जिथे संगीतकाराला स्वतःचे कौशल्य दाखवण्याची संधी असते. त्यामध्ये पार्श्वभागी वाजणारा वाद्यमेळ, फार महत्वाची भूमिका बजावत असतो. बाकी सांगीतिक दृष्ट्या या अंतऱ्यात काही वेगळेपण आणलेले नाही. संगीतकाराचा असा विचार असण्याची शक्यता असावी, मुखडाच इतका गोड झालेला असताना,त्यात आणखी वेगळे प्रयोग कशाला करायचे?  या प्रश्नाचे उत्तर मी पुढील विवेचनातून मांडेन. परंतु सॅम पातळीवर स्वररचना ठेवल्याने, रसिकांना चाल लक्षात ठेवायला मदत होते.

इथला अंतरा संपल्यानंतरच वाद्यमेळ मात्र नीट लक्ष देऊन ऐकणे जरुरीचे आहे. वाद्यमेळाची सुरवातच बासरीच्या छोट्याशा हरकतीने होते आणि ती हरकत संपताक्षणीच पियानोचे सूर ऐकायला मिळतात. हे जे पियानोचे सूर आहेत, त्याचा संबंध गाण्यात दरवाळणाऱ्या सरगमशी जोडलेला आहे!! आणखी थोडे बारकाईने ऐकले तर पाश्चात्य बॉल डान्सच्या  संगीताची आठवण देणारे आहेत. गमतीचा भाग असा आहे, सुरवातीची सरगम भारतीय संगीताशी जुळणारी आहे पण त्याच सुरावटीचे आविष्करण पियानोवर घेताना संपूर्ण वेगळी धाटणी अंगिकारली आहे आणि संगीतकाराने आपल्या व्यासंगाचा नेमका पुरावा सादर केलेला आहे. ही स्वररचना फार गुंतागुंतीची आहे पण ऐकायला तितकीच मोहक आहे.

अब कोई दुरी, ना उलझन कोई
बस इक इकरार हैं
अब ना कहीं हम ना तुम हद कही
बस प्यार ही प्यार हैं
सून सको धडकने, इतनी पास आओ ना
सब गाते हैं.... खामोश हैं....
अब मेरे सपनो पे तुम ही तुम चाहो ना
आओ ना.... आओ ना... आओ ना...

इथे गायक म्हणून उदीत नारायण यांचा आवाज ऐकायला मिळतो. हा अंतरा देखील पहिल्या अंतऱ्याच्या चालीशी जुळवून घेतलेला आहे. गायक म्हणून विचार करताना, उदीत नारायण यांचा आवाज मोकळा आहे पण कधी, कधी दाक्षिणात्य लहेजा जाणवतो तरीही उर्दू उच्चार मात्र व्यवस्थित घेतलेले आहेत. आवाजाचा पल्ला तसा मर्यादित, शक्यतो मंद्र अथवा मध्य सप्तकात गळा अधिक खुलून येतो. हा अंतरा गाताना सुरवातीला वरचा स्वर लावला आहे पण एकूणच शक्यतो मध्य सप्तकात खुलणारा आवाज, असेच वर्णन योग्य ठरेल. गायनावर काहीवेळा मोहमद रफींचा पगडा जाणवतो. भरीवपणा, समान ताकदीची फेक व मर्यादित अर्थाने जोमदारपणा ही खास वैशिट्ये लक्षात येतात.
साधना सरगमचा आवाज मोकळा आहे, सरगम घेताना देखील आवाज स्थिर ठेवला आहे आणि प्रशिक्षित गायिका असल्याचे ध्यानात येते. गाताना भावुक न होता, भाव सूचन करण्याची  अप्रतिम क्षमता. आणि शब्दांच्या अर्थापलीकडे त्यांच्या आशयापर्यंत नेऊ शकणारा लगाव इत्यादी गुणविशेष या गाण्यातून कळून येतात. एकूणच भारतीय पठडीतील गाणी गाणे, स्वभावतः मानवणारे आहे. चित्रपट गीतांत अशा प्रकारची गाणी वारंवार  अशी गाणी गायला मिळत नाहीत. बहुदा म्हणनूच स्पर्धेत साधना सरगम यांचे नाव काहीसे मागे पडलेले दिसते.

आधुनिक काळात, शंकर/एहसान/लॉय हे संगीतकारांचे त्रिकुट खूपच प्रसिद्ध झाले आहे. यांमधील शंकर महादेवन, हे भारतीय संगीताचे पायाभूत प्रशिक्षण घेतलेले कलाकार  असून,बाकीचे दोघे, पाश्चात्य संगीताचे व्यासंगी असल्याने, यांच्या संगीतात बरीच विविधता ऐकायला मिळते. बरेच रचनाकार असे मानतात, मुखडा बांधणे खरे कौशल्याचे असते. एकदा मुखडा जमला पुढे सगळे बांधकाम असते.  या दृष्टीने विचार करता, या संगीतकार त्रयीने संगीत रचना करताना, अनेक मुखडे समोर आणल्याचे दृष्टोत्पत्तीस येते. आता याच रचनेचा स्वतंत्र विचार  केल्यास,भारतीय संगीताच्या  धाटणीवर आधारित स्वररचना आहे, हे तर उघड आहे पण तालाच्या मात्रा आणि वाद्यमेळ योजताना, त्यात आधुनिकता आणली आहे. अर्थात जरा बारकाईने ऐकले तर तालाचे योजन करताना, राहुल देव बर्मन यांच्या शैलीचा प्रभाव जाणवतो.
गुंजी सी हैं, गुनगुनाती हैं तनहाईया......
आओ ना.... आओ ना... आओ ना...

गाण्याचा शेवट करताना, मुखड्याचीच पुनरावृत्ती केलेली आहे, त्यामुळे संपूर्ण गाणे ध्यानात राहण्याऐवजी मुखडाच अधिक ध्यानात रहातो. आता हे स्वररचना म्हणून योग्य की अयोग्य? हा प्रश्न मनात उरतोच. परंतु वेधक मुखडा, अप्रतिम वाद्यमेळ आणि पाश्चात्य संगीताचा भरमसाट वावर होत असताना देखील, सरगमच्या साहाय्याने एका सुंदर गीताची बांधणी जी आपल्या मनात सतत तरळत राहते. यशस्वी गाण्यासाठी यापेक्षा वेगळ्या उपलब्धीची दुसरी कुठलीही गरज नसते/नसावी.


बडी धीरे जली

"संधिप्रकाशांतुनी जाणारा संधिप्रकाशापरी:
संदिग्धाच्या सन्निध लागे चाहूल ही शेंदरी;
पक्षी परतल्यानंतर आलें वळण हवेस हिवाळी,
दिवे गारव्यापारी जाहले शोकगीतांच्या ओळी;"
फार पूर्वी सुप्रसिद्ध कवी आरतीप्रभूंच्या या ओळी वाचताना वातावरणातील विदग्धता, शांतता आणि आत्ममग्नता प्रत्ययाला आली होती. मुळातच आरतीप्रभुंची कविता ही कुठल्याही विषयाच्या गाभ्याशी जाऊन आरपार प्रत्यय देणारी, त्यात इथे संध्याकाळची वेळ असल्याने, भावना अधिक टोकदार झालेली. 
नंतर पुढे, इश्किया चित्रपटातील, पहाटेच्या वातावरणातील "बडी धीरे जली" हे  ऐकताना या ओळी वारंवार मनात येत राहिल्या. वास्तविक, गाण्याची वेळ पहाटेची आहे आणि कवितेत तर संध्याकाळचा उल्लेख स्पष्ट आहे पण तरीही मनात याच ओळी यायचे कारण, बहुदा त्यावेळी जाणवणारी अंतर्मुख विदग्धता, हेच असणार.   
झमझमणाऱ्या तंबोऱ्याच्या तारांच्या झणत्काराने गाण्याला सुरवात होते आणि त्या सुरांतूनच ललत रागाची खूण आपल्या मनाला पटते. त्याच सुरांत, गायिका रेखा भारद्वाज यांनी आलाप घेतला आहे. जरा बारकाईने ऐकले तर या आलापावर सुप्रसिद्ध ख्याल गायिका किशोरी आमोणकरांच्या गायकीचा प्रभाव दिसतो.विशेषतः सुरवातीला घेतलेला "एकार" आणि लगेच खालच्या  सुरांत व्यक्त झालेला "कोमल धैवत" किशोरी आमोणकरांची  पुसटशी आठवण करून देतो. अर्थात, हा प्रभाव सुरवातीच्या काही सुरांपुरताच आहे. पुढील गायन मात्र स्वतंत्र अभिव्यक्तीने व्यक्त होते. रेखा भारद्वाज या प्रशिक्षित गायिका असल्याचे लगेच समजते. खऱ्या गायकाची ओळख होण्यासाठी काही सुरांचीच गरज असते आणि त्या सुरांतूनच, तो कलाकार आपली ओळख दाखवून देत असतो. हा आलापच इतका सुरेल, स्वच्छ आहे की पुढील रचना कशाप्रकारे वळणे घेत जाणार आहे, याची चुणूक दाखवतो. " रे ग नि रे ग म" या स्वरावलीत खरे तर चालीचा चेहरा लपलेला आहे. तंबोऱ्याचे स्वर या आलापीला भरीव साथ देत आहेत. जिथे गायिका "म" स्वर घेते तिथेच संगीतकार विशाल भारद्वाज यांनी समेची मात्रा ठेवली आहे. तशी मात्रा घेताना, पार्श्वभागी हलक्या सुरांत, गिटारचे स्वर घेतले आहेत आणि पारंपरिक तालवाद्य न घेता पाश्चात्य Octapad वाद्यावर समेची मात्रा घेतली आहे. तबल्यापेक्षा काहीसा दबका पण ड्रमपेक्षा अधिक उठावदार वाद्य. सकाळच्या मंद, शांत वातावरणातील रचनेला हलक्या आघाती तालवाद्याने साथ करणे, एकूणच सुसंगत होते. या सुसंगतेतच आपल्याला "बडी धीरे जली रैना" ही धीरगंभीर सुरांतली ओळ ऐकायला मिळते. तालाच्या मात्रा समजून घेतल्या तर केरवा ताल, संगीतकाराने योजल्याचे कळून घेता येते. पुढे "धुआ धुआ नैना" ओळ घेताना, वरील तालवाद्यासहित काहीशा दबक्या आवाजात ड्रम या तालवाद्याच्या मात्रा ऐकायला मिळतात. संगीतकाराचे कौशल्य हेच आहे, वास्तविक ही तालवाद्ये बरेचवेळा घणाघाती आवाजात सादर केली जातात पण इथे गाण्याचा मूड बघूनच ताल वाद्ये खालच्या सुरांत ठेवली आहेत. परिणाम गाण्यातील गंभीर भाव अधिक खोलवर जाणवावा. तालाची योजना करताना, संगीतकार विशाल भारद्वाजने एक मात्रा गिटारवर, पुढील मात्रा ड्रम आणि Octapad वाद्यावर घेतलेल्या आहेत - हा राहुल देव बर्मन शैलीचा प्रभाव!! जरी ललत रागाच्या सुरांचा आधार घेतला असला तरी रचनेची "घडण" बांधताना, संगीतकाराने रचनेचे गीत कसे होईल, याकडे लक्ष दिले आहे. बरेचवेळा असे घडते, रागाच्या चौकटीत स्वररचना तयार करताना फक्त रागाचे नियम पाळून, त्यानुसार गीताची रचना केली जाते. यामध्ये संगीतकाराचा रागदारी संगीताचा जरूर तो व्यासंग दिसतो पण त्याची खरंच जरुरी असते का? हा प्रश्न इथे उपस्थित करावासा वाटतो. 
रागाची चौकट आधाराला घेऊन, त्यात स्वतः:ची भर टाकून, प्रसंगी रागालाच बाजूला सारून, गीताची बांधणी करणे, हा व्यासंगीवृत्तीचा एक निकष जरूर मानला जावा.

रातोंसे होले होले, खाली है किनारी 
अखियों ने तागा तागा, भोर उतारी
खारी अखियों से, धुआ जाये ना
बडी धीरे जली रैना
धुआ धुआ नैना

शब्दरचना वाचताना, एखादे लोकगीत वाचत आहोत असाच भास होतो. चित्रपट गीताच्या संदर्भात विचार करताना, एक बाब अवश्य पाळावी लागते - पडद्यावर जे पात्र गाणे सादर करीत आहे, जो प्रसंग आहे, या सगळ्याची जाण ठेऊनच पद्यरचना करावी लागते. त्यामुळे बरेचवेळा जरी कवी प्रतिभावान असला तरी त्याला, आपल्या प्रतिभेला काहीशी मुरड घालून, सरळ, साध्या परंतु अर्थवाही शब्दातून व्यक्त होणे, आवश्यक ठरते. कवी गुलजार यांनी, इथे हाच विचार केलेला आढळतो. चित्रपटाची कथा सगळी उत्तर प्रदेश/बिहार भागातली असल्याने, तिथल्या बोली भाषेचा अवलंब करणे योग्यच ठरते. चित्रपटाची कथा ही गावरान भागातली, काहीशा दहशतवादी संस्काराची असल्याने, गीताचे शब्द त्याच संस्कृतीचे असणे क्रमप्राप्तच ठरते. "खारी अखियों से, धुआ जाये ना" ही ओळ किंवा "रातोंसे होले होले, खाली है किनारी" ही ओळ तिथल्या अंतर्भागातल्या बोली भाषेची ओळख करून देते. अर्थात असे   देखील,गुलजार कुठेही शब्दकळेतील कवितेचा प्रमाणित दर्जा खालावू देत नाहीत आणि हे यश स्पृहणीय असेच म्हटले पाहिजे. 
पहिला अंतरा सुरु होण्यापूर्वीचा वाद्यमेळ बांधताना, संगीतकाराने "मोहन वीणा" या नावाने प्रसिद्ध असलेल्या गिटारच्या सुरावटीचा सुरेख उपयोग करून घेतलेला आहे. रागदारी संगीतातील हरकती, संगीतकाराने इथे योजल्या आहेत, जेणेकरून गाण्याची एकसंधता भरीव होईल पण तसे करताना एकसुरीपणा टाळलेला आहे. खरतर ही रचना बंदिशींकडे सहज झुकू शकली असती परंतु संगीतकाराने तो मोह टाळलेला आहे. मी हे वाक्य मुद्दामून लिहिले आहे कारण, मुखडा संपवताना, "धुआ धुआ नैना" गाताना, "नैना" शब्दावरील घेतलेली हरकत, सहजपणे अवघड करता आली असती किंवा दीर्घ तानेत परावर्तित करता आली असती पण संगीतकार आणि गायिका, दोघांनीही तो मोह टाळला आहे आणि गीताचे "गीतत्व" राखले आहे. 

पलको के सपनों की, अग्नी उठाये
हमने तो अखियों के, अलने जलाये
दर्द ने कभी लोरिया सुनाई तो
दर्द ने कभी निंद से जगाया रे
बैरी अखियों से ना जाये धुआ जाये ना
बडी धीरे जली रैना
धुआ धुआ नैना

हा अंतरा अगदी वेगळ्या सुरावर सुरु केला आहे. चाल ललत रागावरच आहे पण स्वरांची "उठावण" वेगळी केली आहे, जेणेकरून स्वररचनेत वैविध्य येईल. हाताशी प्रशिक्षित गायिका असल्यावर, संगीतकाराला देखील काही नवीन जागा सुचू शकतात, नवे स्वरबंध जाणवतात आणि त्यायोगे गाण्याची सौंदर्यावृद्धी होऊ शकते. पहिल्या अंतऱ्यापेक्षा किंचित वेगळा सूर लावलेला आहे पण जर का शब्द बघितले तर त्यामागील विचार समजून घेता येतो. " पलको के सपनों की, अग्नी उठाये" ही ओळ जरा नीट, बारकाईने वाचली तर वेगळ्या सुरावटीची गरज का? या प्रश्नाचे उत्तर मिळते. तसे गाताना "अग्नी" असे न घेता "अगनी" असा काहीशा गावरान ढंगाने घेतल्याने, गायनाची खुमारी आणखी वाढते. " दर्द ने कभी लोरिया सुनाई तो, दर्द ने कभी निंद से जगाया रे" शब्दांमधून सहजपणे विरोधाभास कसा सुरेख दाखवला आहे. एका बाजूने "लोरिया सुनाई" तर लगेच पुढील ओळीत "निंद से जगाया" असा खेळ गुलजार नेहमीच आपल्या शब्दरचनेत करीत असतात. बरेचवेळा आपल्या मनावर सुरांचीच मोहिनी इतकी प्रचंड असते की गाण्यातील शब्दांबद्दल आपण वेगळी जाणीव ठेवावी, हेच बहुतांशी विसरले जाते!!  

जलते चिरागो में, नींद ना आये
फुंकोसे हमने सब तारे बुझाये
जाने क्या खोली, रात की पिटारी से
सुजी अखियों से, ना जाये धुआ जाये ना,
बडी धीरे जली रैना
धुआ धुआ नैना

हा शेवटचा अंतरा आणि त्या आधीचा वाद्यमेळ, यात तसा फारसा फरक नाही. तीच मोहन वीणा आणि त्यावर तशाच प्रकारचे स्वर छेडले आहेत. किंबहुना, "जलते चिरागो में, नींद ना आये" ही ओळ देखील आधीच्या अंतऱ्याच्या स्वररचनेशी साद्ध्यर्म्य दाखवते. फरक ठेवला आहे तो शब्दोच्चारात. अर्थात, कुठल्याही गाण्यात कुठल्या शब्दावर किती "वजन" द्यायचे आणि कुठला शब्द "मोकळा" ठेवायचा, हे स्वातंत्र्य संगीतकार घेतच असतो. या गोष्टींचा गाण्याच्या परिणामकारकतेवर फार फरक घडवून आणत असतो. 
गाण्याचा शेवट घेताना मात्र, एखादी बंदिश संपवावी त्याप्रमाणे "बडी धीरे जली रैना, धुआ धुआ नैना" या ओळी आळवून संपविल्या आहेत. याचा परिणाम, सगळीच रचना आपल्या मनात रेंगाळत रहाते. गाण्याची लय पहिल्यापासून कायम मध्य सप्तकात, क्वचित मंद्र सप्तकात ठेवली असल्याने, ऐकताना आपल्याला प्रत्येक सूर "अवलोकिता" येतो आणि त्याचा योग्य तो आनंद देखील घेता येतो. 

संगीतकार म्हणून विशाल भारद्वाज यांचा विचार करायचा झाल्यास, काही रचनांवर राहुल देव बर्मन यांचा ठसा उमटलेला दिसतो. असे असू देखील, त्यांनी स्वतःची ओळख निर्माण केली आहे आणि आधुनिक चित्रपट संगीतात, आधुनिकतेकडे लक्ष ठेवत असताना देखील परत, परत परंपरेकडे वळून बघण्याची सवय दिसून येते. अर्थात, ही शैली देखील राहुल देव बर्मन त्यांच्यासारखीच आहे. अर्थात, गाण्याचा मुखडा बांधणे, स्वरविस्तार करणे आणि आपण चित्रपट गीत तयार करीत आहोत, ही जाणीव सतत जागृत ठेवणे, इत्यादी बाबींकडे त्यांचे वेगळेपण दिसून येते. लोकसंगीताचा बाज उचलताना, त्याचा तोंडवळा कायम ठेऊन, त्यात स्वतःची भर टाकण्याचे कौशल्य वाखाणण्यासारखेच आहे. तसेच निरनिराळ्या वाद्यांमधून निरनिराळे स्वनरंग पैदा करण्याचे कौशल्य निश्चितच कौतुकास्पद आहे. कारकिर्दीची सुरवात जरी एका संगीतकाराच्या प्रभावाखाली झाली असली तरी तो प्रभाव संपूर्णपणे पासून, स्वतःची नव्याने ओळख रुजवावी, यातच या संगीतकाराचे मोठेपण दृष्टीस पडते.