Thursday 19 June 2014

सुगम संगीत – एक तौलनिक विचार – भाग १२



या लेखात आपण, काही गायक/गायिकांची उदाहरणे घेऊन, आधी मांडलेला मुद्दा अधिक स्पष्ट करूया. तीन ते चार मिनिटांचे गाणे, हीच मर्यादा असल्याने, गायकावर गाण्याची मर्यादा असते तसेच हाती असलेल्या शब्दांचे औचित्य सांभाळणे, अशी दुहेरी कसरत असते. आपण इथे काही प्रातिनिधिक गायकांची वैशिष्ट्ये आणि कमतरता याचाच विचार करणार आहोत. मागील लेखात मी मोहमद रफीच्या एक गाण्याचे उदाहरण देऊन, तो गायक कसा “गिमिक्स” च्या आहारी गेला होता, हे पहिले. पण, गायन आणि गायकी, या संदर्भात, रफीचा आवाज खरोखरच असामान्य होता. तिन्ही सप्तकात कुठेही अटकाव न होता, तो गाऊ शकत होता. अर्थात, पुरुषी आवाज असल्याने आणि शास्त्रीय संगीताचा पद्धतशीर अभ्यास केल्याने, सगळे स्वर स्पष्ट आणि गोलाईने येत असत. विशेषत: खर्जात रफीचा स्वर अधिक खुलत असे. इथे एक मुद्दा अधिक स्पष्ट करायला हवा. ध्वनीशास्त्रानुसार तुमचा आवाज जितका सहजतेने खर्जात लागेल, तितकाच सहज आणि परिणामकारक स्वर वरच्या पट्टीत लागू शकतो. बहुतेक गायक, हा विचार ध्यानात न घेता, एकदम वरच्या पट्टीत गायला घेतात आणि आपल्या गळ्याची नासाडी करून घेतात. लोकांना देखील, एखाद्या गायकाने वरच्या सप्तकात आवाज लावला की लगेच पसंतीची टाळी द्यायला आवडते. खरे तर, खर्जात आवाज लावणे अतिशय कठीण असते आणि त्यावर काबू मिळवला की वरचे सप्तक सहजसाध्य असते. त्यामुळेच बहुतेकांना, रफीने गायलेले,”ओ दुनियाके रखवाले” हे गाणे अधिक आवडते, आणि “मै अपने आपसे घबरा गया हुं” सारखे अप्रतिम गाणे फारसे खिजगणतीत नसते. सांगितिक दृष्टीकोनातून, दुसरे गाणे लयीला अतिशय अवघड आहे आणि म्हणूनच गायला कठीण आहे.पण या गाण्यात कानांना दिपवून टाकणारे सूर नाहीत, त्यामुळे लोकप्रियता मिळत नाही. नंतरच्या काळात, पाश्चात्य धुनेवर आधारित गाणी म्हणताना मात्र रफीचा आवाज तितकासा परिणामकारक वाटत नाही आणि याचे मूळ कारण असे असावे की, मुळात अशी गाणी गायची आवड नसावी आणि आता स्पर्धेत तर राहायचे असल्याने, अशी गाणी गाण्यावाचून तरणोपाय नाही, याच विचाराने ती गाणी गायलेली वाटतात. अर्थात, तिसरी मंझील या चित्रपटातील गाणी अपवाद!! रफीने काही मराठी गाणी गायली आहेत पण तरीही काही शब्दोच्चार सदोष वाटतात. गळ्याला पहिल्यापासून उर्दू आणि हिंदी भाषेचीच सवय झाल्याने, असे घडले असावे. रफीच्या गळ्याची खरी ताकद, रोशन, जयदेव या संगीतकारांनी नेमकी ओळखली होती.रोशनचे “मन रे तू काहे ना धीर धरे” किंवा “जिंदगीभर ना भूलेगी वो बरसात की रात” ही गाणी ऐकावीत. जयदेवचे “कभी खुद पे,कभी हालात पे रोना आया” हे गाणे देखील असेच रफीच्या गळ्याची ताकद दर्शवून देणारे गाणे आहे. खैय्यामच्या संगीत दिग्दर्शनाखाली गायलेले “लौट चलो, पांव पडू तोरे शाम” हे भजन देखील असेच अप्रतिम गायकीने नटलेले आहे.
मन्नाडे हा गायक खरच अतिशय दुर्दैवी म्हणायला हवा. आवाजाचा पोत आणि जात केवळ असामान्य अशीच म्हणावी लागेल. पण, काही शास्त्रीय रागावरील गाणी प्रसिध्द झाली आणि या गायकावर तशी(च) गाणी गाणारा, असे लेबल बसले!! सुगम संगीतात,शास्त्रीय संगीताचा किती आणि कसा नेमका उपयोग करून घ्यायचा, याचे उत्तम उदाहरण म्हणजे मन्नाडे आणि लता!! लताचा विचार आपण नंतर करूया. Voice Culture या संकल्पनेनुसार पहिले तर, पुरुष गायकात मन्नाडेच्या तोडीचा दुसरा गायक झाला नाही आणि हे विधान मी पूर्ण विचारांती करीत आहे. वास्तविक, या गायकाने सगळ्या प्रकारची गाणी गायली आहेत आणि त्या गाण्याच्या ढंग व्यवस्थित सांभाळून!! अगदी पाश्चात्य संगीतावरील “आओ ट्विस्ट करे” हे गाणे मुद्दामून ऐकावे. कुठेही शास्त्रोक्त स्वरांचा मागमूस देखील येत नाही!! तसेच, विषण्ण भावाचे ” ऐ मेरे प्यारे वतन” हे गाणे ऐकावे. दोन्ही गाणी पार वेगळ्या टोकाची आहेत पण, मन्नाडेने त्या गाण्यांना पूर्ण न्याय दिला आहे. अर्थात, “पुछो ना कैसे मैने रैन बितायी” या गाण्यातील मन्नाडे केवळ लाजवाब, हे खरेच आहे. अतिशय स्वच्छ, सुरेल आवाज,हे मन्नाडेच्या गळ्याचे खास वैशिष्ट्य. तिन्ही सप्तकात तितक्याच ताकदीने आवाज लावण्याची क्षमता.गाताना, शब्दांचे भान राखून गायल्या गेलेल्या ताना, हे आणखी एक वैशिष्ट्य.मुख्य म्हणजे, सुगम संगीतात, पूर्ण सप्तकाची तान जरुरीचे नसते, याचे भान राखून, घेतलेल्या हरकती-इथे लताच्या वैशिष्ट्याशी साम्य दिसून येते.
मुकेश हा तसा मर्यादित पल्ल्याचा गायक. विशेषत: अवघड चाल आली किंवा शास्त्रीय रागदारीवर आधारित गाणे आले की, या गायकाच्या मर्यादा उघड्या पडतात. जास्त करून ठाय लयीतील चाल, हेच याच्या गळ्याचे वैशिष्ट्य. आवाजात मर्यादित तत्वावर येणारा खर्ज असल्याने करून गाणी, या गळ्याला शोभून दिसली. शक्यतो तीन ते चार सुरांचीच हरकत आणि मुख्य म्हणजे शब्दाची योग्य जाण ठेऊन, केलेले उच्चार. त्यामुळे, गायन परिणामकारक व्हायचे. हॉटेलमधील काही गाणी गाण्याचा प्रयत्न केला पण, तो अखेर एक प्रयत्न, इतपतच जमले. वरच्या पट्टीत गायला लागले की आवाजाच्या मर्यादा स्पष्ट व्हायच्या. त्यामुळे,” आंसू भारी ये जीवन की रांहे” किंवा “झूम झूम के नाचो आज” सारख्या संथ लयीतील सरळ आणि सोप्या चाली मुकेशच्या गळ्याला शोभून गेल्या. त्यामुळे, मुकेशने हयातभर, शक्यतो आपल्या गळ्याला झेपतील अशाच प्रकारची गाणी गायली. गाणी गुणगुणायला सोपी असल्याने, अमर्याद लोकप्रियता मिळाली. परंतु, त्याच्याकडे ना रफिसारखा पहाडी थाट वा मन्नाडेप्रमाणे तयार गळा, तसेच किशोर कुमार प्रमाणे दैवदत्त देणगी नसल्याने, गायनावर आपोआपच मर्यादा पडल्या. राजकपूरसारख्या माणसाशी सूत जुळल्याने, सतत गाणी मिळत गेली आणि लोकप्रियतेत कधीच खंड पडला नाही.
तलत मेहमूद – लखनौच्या नबाबी थाटाप्रमाणे उर्दूवर प्रभुत्व, हे याच्या गायनाचे खास वैशिष्ट्य. गळा तसा मर्यादित पल्ल्याचा पण, संगीताचे रीतसर शिक्षण घेतल्याने, सुरांची पक्की ओळख दिसून येते. अतिशय हळवा आवाज आणि त्यामुळे स्वत:च्या गळ्याला जमतील आणि विशेषत: काव्य म्हणून ठराविक दर्जा असलेली गाणी त्याने नेहमी निवडली. त्यामुळेच गायनाच्या स्पर्धेत मागे पडला. गझल या गायनात विशेष प्राविण्य. तोपर्यंत बेगम अख्तर गझलचे खाजगी कार्यक्रम करायची. तेंव्हा तिची शैली टाळून, भावगीत अंगाने गझल गायन तलतने प्रचलित केले. मुकेशप्रमाणेच हळुवार चालीची गाणी याच्या वाटेला अधिक आली पण मुकेशपेक्षा आवाज अधिक खोलवर जात असल्याने आणि सूर कधीही तुटत नसल्याने, तलत हा मुकेशपेक्षा नेहमीच वरच्या पातळीवर राहिला. तलतचे दुसरे वैशिष्ट्य म्हणजे, चित्रपटातील गाणी गात असतानाच, अनेक गझला खाजगी अल्बम द्वारे गायला. सुरवातीला म्हटल्याप्रमाणे, लखनौचा असर असल्याने, शायरी ही नेहमीच ठराविक दर्जाची असणे, ही प्राथमिक अट राखली. त्यामुळे, त्याची गाणी ऐकताना, कवितेचा वेगळा आणि सुटा आनंद घेता येतो. चित्रपटातील “ऐ दिल मुझे ऐसी जगह ले चल” सारखी अजरामर रचना गायला तसेच “तस्वीर तेरी दिल मेरा बहेला न सकेगी” सारखी तशीच अप्रतिम खाजगी गझल देखील सुंदररीत्या गायला. उडत्या चालीची गाणी, हा आपला प्रांत नाही, हे त्याने वेळीच ओळखले आणि जसजसे १९६० नंतर पाश्चात्य संगीताचा प्रादुर्भाव वाढायला लागला, तशी तलत मागे पडणे, क्रमप्राप्तच होते आणि तसेच झाले.
सुधीर फडके – जरी फडके हे संगीतकार म्हणून प्रसिध्द होते तरीही गायक म्हणून त्यांचे स्थान निश्चितच मोठे होते. बऱ्याचवेळा त्यांच्यावर “ब्राह्मणी संगीतकार” आणि त्या अनुषंगाने “ब्राह्मणी गायक” असा आक्षेप घेतला गेला. पण,त्या आक्षेपांना काही अर्थ नाही. तसे पहिले गेल्यास, कुणीही संगीतकार किंवा गायक हा ज्या समाजात जन्म घेतो आणि मोठा होतो, त्या समाजाची वैशिष्ट्ये, त्याच्या कलाकृतीत आपसूकपणे उतरतातच. त्यातून कुणीही सुटलेला नाही. त्यामुळे,”ब्राह्मणी उच्चार” या टीकेला फारसा अर्थ नाही. सुधीर फडके मराठीत येईपर्यंत एकूणच सुगम संगीत हे प्रामुख्याने मराठी नाट्यसंगीतावर आधारित असायचे, अर्थात, मा. कृष्णराव अपवाद. पण, फडक्यांनी, सुगम संगीताचा नेमका बाज ओळखला आणि त्यानुसार रचना करायला आरंभ केला, विशेषत: चित्रपटातील गाण्यांच्या बाबतीत हा विशेष नक्कीच मानावा लागेल. शब्दांतील नेमका आशय ओळखून, प्रसंगी चालीला निराळे वळण देऊन गाणी गायला सुरवात केली. स्पष्ट उच्चार आणि सुरेल आवाज, भावगर्भ आवाज, हे फडक्यांचे खास वैशिष्ट्य. शास्त्रीय संगीताचा अंगभूत अभ्यास असल्याने, लयीच्या वेगवेगळ्या रचनांना आपलेसे केले.”दैवजात दु:खे भरता, दोष ना कुणाचा”, “चल सोडूनी हा गाव” ही गाणी खास फडक्यांची मुद्रा घेऊन आलेली गाणी आहेत.
अरुण दाते – प्रामुख्याने खाजगी भावगीत गायक म्हणून खास नाव झाले. इंदोर इथे सुरवातीचे वास्तव्य असल्याने, सुरवातीला उर्दू गझल गाणे ओघानेच आले. सुरवातीच्या काळातील काही गझला ऐकल्या तर, त्यांच्यावरील तलत मेहमूदचा प्रभाव लगेच जाणवतो. पण, मराठीत, श्रीनिवास खळे यांनी संगीतबद्ध केलेले “शुक्रतारा मंदवारा” हे गाणे बाहेर आले आणि मराठीत अरुण दाते स्थिरावले. सुरवातीच्या काळात, कुमार गंधर्वांची तालीम मिळाली असल्याने, कुठलेही अवघड लयीचे गाणे सहज पेलू शकतात.  “पहिलीच भेट झाली” सा रखे लयीला अवघड आणि अतिशय हळुवार चालीचे गाणे मुद्दामून ऐकावे. तसेच यशवंत देवांचे “डोळ्यात सांजवेळी आणू नकोस पाणी” सारखी आर्त चाल, तितक्याच आर्तपणे गायली आहे. वरच्या पट्टीतदेखील न पिचता आवाज सहज जातो. तरीदेखील रागदारीवर आधारित चाल कितपत झेपेल, याबाबत शंका वाटते. इथे मी, रागदारीवर असा शब्दप्रयोग केला तो याच अर्थाने की, सरळ, सरळ एखाद्या बंदिशीवर आधारित तशाच ताना, मूर्च्छना असलेली चाल. अन्यथा, सुगम संगीतातील कुठल्याही गाण्याची मुळे ही रागदारी संगीतात सापडतातच.
 किशोर कुमार – एक दैवदत्त देणगी मिळालेला अफलातून गायक. खरतर, सुगम संगीतात, किशोर कुमार आणि आशा भोसले हे असे दोनच गायक आहेत की ज्यांना चांगल्या अर्थाने, “शब्दभोगी गायक” असे म्हणता येईल. वास्तविक शास्त्रीय संगीताचा अजिबात अभ्यास न केलेला पण तरीही कितीही अवघड वळणाची चाल असली तरीही गळ्यावर लीलया पेलणारा गायक. भारतात आजतागायत “योडलिंग” करत गाणारा एकमेव गायक. अतिशय खुला नी मोकळा आवाज. त्यामुळे, परिभाषेत लिहायचे झाल्यास, तिन्ही सप्तकात सहजपणे विहार करणारा गळा!!किशोर कुमारने संगीताचा अभ्यास केलेला नसल्याने, आपल्याकडे फार विचित्र प्रघात पडला गेला आणि तो म्हणजे, गाणे गाण्यासाठी संगीताच्या रियाझाची अजिबात जरुरी नाही!! याच विचाराने, कितीतरी गायकांनी आपली पोळी भाजून घेतली आहे. “वो शाम कुच्छ अजीब थी” सारखी अप्रतिम गाणे, मी याला शब्दभोगी गायक का म्हणतो, यासाठी ऐकावे. सुरात गाणारे कितीतरी भेटतात, शब्द गाताना त्यातील नेमका अर्थ जाणून घेऊन, अगदी अचूक वजनासकट उच्चार करण्याचे या गायकाचे कसब खरोखरच वाखाणण्यासारखे आहे, जणू गाताना त्या शब्दाचा अर्थ किशोरने आपल्या अंगी मुरवून घेतलेला आहे.सुरवातीला सैगलच्या शैलीत गायला सुरवात केली पण लवकरच स्वत:च्या आवाजाची ओळख पटली आणि नंतर त्याने मागे वळून पहिलेच नाही, ते अखेरपर्यंत.
आताच्या काळात, सुरेश वाडकर, हरिहरन हे गायक असे आहेत की त्यांच्याबद्दल खास उद्मेखूनपणे लिहिणे जरुरीचे आहे. दोघेही शास्त्रोक्त संगीताचा पुरेपूर अभ्यास केलेला गायक असल्याने, कुठल्याही प्रकारची गाणी त्यांच्या गळ्याला शोभून दिसतात, विशेषत: हरिहरनचा आवाज तर खास आहे. मन्नाडे या गायकाचा वारसा सांगणारे हे दोन गायक आहेत, इतके म्हटले तरी यांची थोरवी कळावी. अर्थात,इथे “वारसा” हा शब्द वापरला तरी दोघांचीही शैली वेगवेगळी आहे.
इथे मी इतिहास सांगत नसल्याने, सगळ्याच गायकांबद्दल लिहिणे शक्य नाही. प्रातिनिधिक स्वरुपात खास गायनाची वैशिष्ट्ये विशद करण्यासाठी, मी वरील गायकांबद्दल लिहिले आहे. पुढील लेखात गायीकांबद्दल लिहून, मी ही मालिका संपविणार आहे.

No comments:

Post a Comment