Thursday 19 June 2014

साउथ आफ्रिका – भाग ६




जसे मी मागील लेखामध्ये  व्हाईट समाजाविषयी चांगल आणि वाईट, अशा दोन्ही गोष्टी मांडायचा प्रयत्न केला. तसाच प्रकार भारतीय वंशीय लोकांच्या बाबतीत लिहिला. अर्थात असे नव्हे की, या सामाजात अनेक वाईट गोष्टी आहेत. त्याचे थोडक्यात असे आहे की, इथला भारतीय समाज सतत वर्षानुवर्षे एका प्रचंड मानसिक कुचंबणेखाली वावरत असल्याने, त्यांची अशी अत्यंत स्वाभाविक प्रतिक्रिया घडत असते. मी जसा या लोकांच्या सान्निध्यात अधिक गेलो तशी त्यांची ती मानसिक प्रक्रिया अधिक डोळसपणे पाहता आली. अर्थात, हीं प्रक्रिया कुणाही माणसांच्या बाबतीत घडू शकते. आजही, इथल्या भारतीय समाजाला त्यांचे हक्काचे असे स्थान मिळू शकलेले नाही. इथले लोक, स्वत:ला साउथ आफ्रिकन मानतात आणि ते योग्य देखील आहे पण त्याच बरोबर, त्या राष्ट्रीयत्वाच्या अनुषंगाने येणाऱ्या अधिकारापासून मात्र हा समाज जरा वंचितच झालेला आहे. गोरे लोक, मागे मी म्हणालो त्याप्रमाणे, स्वत:च्या गोऱ्या कातडीची किंमत व्यवस्थितपणे वसूल करतात. आजही, जरा का फोनवर किंवा प्रत्यक्षात देखील, जर का गोरा मानून बोलायला लागला की, लगेच इथले बाकीचे लोक, आपला बोलण्याचा स्वर जरा खालचाच लावतात. गोऱ्या लोकांना प्रतिष्ठेच्या, भरपूर पगाराच्या नोकऱ्या सहज मिळतात. जर का त्यांना, आजच्या या स्वतंत्र समाजातदेखील तशीच उच्च वर्णीय वर्गाप्रमाणे सवलत आपणहून मिळत असेल तर कोण शहाणा ते नाकारील!! आजही, या समाजाची मानसिक प्रतिक्रिया आणि चलनवलन हे व्हाईट लोकांना सांभाळून, त्यांना महत्व देऊनच चाललेले असते. असे नव्हे की. गोरे लोक नेहमीच अत्यंत हुशार, कामात वाकबगार असतात, पण एकूणच त्यांची मानसिक ठेवणच अशी झालेली आहे की, त्यांना दुसऱ्यावर सतत हुकमत गाजविण्याची सवय जडलेली आहे. सुरवातीच्या काळात, मला देखील या सवयीशी जुळवून घ्यायला लागले.
पण, नंतर जसा मी इथे स्थिरावायला लागलो, तशी या गोऱ्या लोकांचे पाणी जोखायला सुरवात केली. आजही, जर का आंतरराष्ट्रीय ख्यातीच्या कंपन्या आणि त्यांचे Directors बघितले तरी याची कल्पना येऊ शकते. इथे देखील, मी गोरा माणूस भ्रष्टाचाराच्या विळख्यात अडकलेला पाहिलेला आहे. अर्थात, शेवटी “पैसा” हीं गोष्टच अशी आहे की ती कधीही कातडीचा रंग बघत नाही!!
काळे लोक तर भ्रष्टाचारात खूपच गुंतलेले आहेत. काळा समाज तर, वर्षानुवर्षे गुलामगिरीतच अडकलेला होता. एकतर, शिक्षणाच्या नावाने सगळीच वानवा. आजही, बहुसंख्य काळे लोक हे शिक्षण म्हटले की पाठ फिरवतात. इथे शिक्षण फार महाग आहे, हे कबूल पण मग, इतर समाजातील लोक शिकत आहेतच की. ते कसे आपले शिक्षण पुरे करतात? पण, बहुसंख्य काळ्याना “पैसा” हा हवा असतो पण त्या साठी आवश्यक ते कष्ट, मेहनत करायची इच्छा नसते. त्यामुळेच मग, इथली बरीचशी गुन्हेगारी हीं काळे लोकच करीत असतात. विशेषत: ड्रग्स, दरोडे, मारहाण, खून वगैरे गुन्ह्यात काळे लोक सापडतात. इथली कायदा आणि सुव्यस्था, जर का कुणी धोक्यात आणली असेल तर, ती प्रामुख्याने काळ्या लोकांनी. आज, जोहानसबर्ग सारख्या महाकाय शहरात, संध्याकाळी रस्त्यावरून पायी फिरायची सोय राहिलेली नाही. कोण, कधी आपला पाठलाग करील, आणि पैसे मागेल, याची अजिबात शाश्वती नाही. आणि जर का पैसे मिळाले नाहीत तर मग त्याच खून करायला देखील मागे-पुढे पाहत नाहीत!! शहराचा मध्यवर्ती भाग तर अति धोकादायक झालेला आहे. हीच परिस्थिती, केप टाऊन, डर्बन, प्रिटोरिया या शहरांची आहे. एकतर, मध्यवर्ती शहरात, बहुसंख्य काळ्या लोकांचीच वस्ती आहे किंवा कलर्ड लोकांची वस्ती आहे. कलर्ड समाज तर त्याही पुढे गेलेला आहे. कलर्ड समाजात तर, नितीमत्ता म्हणून काही शिल्लक आहे का, असा ठाम प्रश्न उभा राहतो!! मी बघितले बहुसंख्या कलर्ड समाजातील लोक, हे प्रचंड स्मोकर्स तरी आहेत किंवा ड्रगच्या अधीन झालेले आहेत!! ड्रिंक्सचा तर प्रश्नच उद्भवत नाही कारण ती तर इथली आचार संहिता आहे!! जोहानसबर्ग शहरातील, काही पंचतारांकित हॉटेल्स, लोकाश्रयाविना बंद पडली आहेत कारण संध्याकाळी शहरात जाणार कोण!! इथे, जवळपास रोज, पेपरमध्ये एक तरी बातमी अशी असते की जी, एकतर लैंगिक शोषणाला बळी पडलेली असते, किंवा अमानुष खून झालेला असतो किंवा प्रचंड भ्रष्टाचाराचे प्रकरण नुकतेच उघडकीस आलेले असते!! जोहानसबर्ग शहरात, मध्यवर्ती भागात, कितीतरी खास भेट देण्यासारख्या जागा आहेत पण मनाचा धीरच होत नाही. आपल्या पाठीमागून, कधी, कोण काळा, कलर्ड किंवा गोरा देखील आपल्या पाठीला रिव्होल्वर लावील, काही सांगता येत नाही. बरे नुसते पैसे मागितले तरी हरकत नाही, पण जर का त्याच्या मनाइतकी रक्कम मिळाली नाही तर, प्रचंड मारहाण किवा प्रत्यक्ष खुनदेखील अस्तित्वात येतो!! मध्यंतरी अशीच एक घटना, माझ्या माहितीत घडली. माझ्या एका मित्राने(इथे मी कुणाचेही नाव लिहित नाही, कारण उगाच जखमेवरची खपली उघडी पडायला नको!!) त्याच्या व्यवसायाच्या कामानिमित्त एका भारतीय माणसाला भारतातून बोलाविले होते. केवळ काही दिवसासाठीच!! त्याचे काम संपले त्या दिवशी संध्याकाळी, तो सहज फिरायला म्हणून बाहेर पडला आणि चार दिवसांनी, त्याचे मृत प्रेत, रस्त्यावर बेवारस पडलेले सापडले!! अजूनही, माझा मित्र, त्या कोर्ट-कचेरी यांच्या त्रांगड्यात अडकलेला आहे. हीं गोष्ट, मागील वर्षातील फेब्रुवारी महिन्यातील. पण, इथे असेच आहे. शहरात अति पैसा आहे, सगळ्या प्रकारच्या सुविधा  आहेत, भारतात काय आयुष्य जगू, अशा प्रकारचे विलासी जीवन जगण्याच्या भरपूर संधी आहेत पण, सगळे कसे कोंडवाड्यात अडकलेले!!
मी, आजही, जेंव्हा रात्री जेवण झाल्यावर, माझ्याच घराच्या कॉम्प्लेक्समध्ये फेऱ्या मारीत हिंडतो, तर कितीतरी लोकांना याचे नवलच वाटते!! इथे, अशी जेवणानंतर फेऱ्या मारायची पद्धतच नाही. अर्थात, इथल्या सामाजिक जीवनाविषयी आणखी बरेच लिहिता येईल, पण ते मी पुढील लेखासाठी राखून ठेवतो.

No comments:

Post a Comment