Thursday 19 June 2014

सुगम संगीत-तौलनिक विचार-भाग 4‏



मुळात संगीतकाराला, शास्त्रीय संगीत किती अवगत असावे, याबाबत जरी नेमके निकष अस्तित्वात नसले तरी देखील, त्या संगीताच्या आधारे तुमच्या चालींमध्ये बरेच वैविध्य आणता येते, हे मात्र मान्य व्हावे. सुगम संगीताला काही जण नाके मुरडतात, यात एक विचार आणखी प्रामुख्याने ऐकायला मिळतो व तो म्हणजे, सुगम संगीतात स्वर विस्तार आणि प्रयोग यांना फारसा वाव नसतो. आता, हे मत आपण जरा अधिक खोलात जाऊन तपासूया. एक गोष्ट प्रथमच मान्य करायला हवी व ती म्हणजे, रागदारी संगीतात, जितका प्रयोगांना वाव मिळतो, तितके स्वातंत्र्य सुगम संगीतात मिळणे अवघड असते आणि याचे मुख्य कारण, त्या माध्यमातच आहे, सुगम संगीत हे शब्दप्रधान संगीत असल्याने, शब्दांना प्रथम अग्रक्रम मिळणे, अवश्यमेव ठरते. त्यामुळे, कुठलीही चाल निर्माण करताना, शब्दातून जो आशय व्यक्त होत असतो, त्या आशयाला सुसंगत अशीच स्वर रचना करणे, हे एका प्रकारचे बंधनच स्वीकारावे लागते. हे या माध्यमाचेच अपुरेपण आहे. इथे, शास्त्रीय संगीताप्रमाणे स्वर विस्तार करणे शक्यच नसते.रागदारी संगीतात, शब्द हे नेहमीच खुंटीवर टांगून ठेवल्याप्रमाणे वागवावे लागतात. स्वर विस्ताराला एक जोड, इतपतच रागदारी संगीतात शब्दांना महत्व असते. अर्थात, बंदिशीतील भाव ओळखून राग विस्तार करणारे काही गायक आहेत, पण ती काही मुलभूत अट नव्हे.
आता असा विचार करू की, अगदी रागदारी संगीत जरी स्वर प्रधान असले तरी देखील शास्त्रीय संगीतात प्रयोगशीलता अशी किती आढळते? बहुतेक कलाकार,”बाबा वाक्यं प्रमाणम” हाच धोशा लावतात. आतापर्यंतचा इतिहास बघितला तर असेच दिसून येते की, प्रत्येक दशकात, एखादाच असा कलाकार निपजतो की, तो प्रस्थापित संगीताची वाट मोडून स्वत:ची वेगळी वाट धुंडाळतो. अन्यथा, मळलेल्या वाटेनेच जाणारे बहुसंख्य असतात!! असाच प्रकार, सुगम संगीतात देखील घडत असतो. मुळात, प्रयोगशीलता हीं उंबराच्या फुलाप्रमाणे दुर्मिळच असते. त्यातून, सुगम संगीताला मागणी प्रचंड असल्याकारणाने, प्रयोगशीलतेला फारसा वेळच उपलब्ध होत नाही, विशेषत: चित्रपटातील गाणी बांधताना असा प्रकार वारंवार घडताना दिसतो. आता, प्रयोगाचे एक सुंदर उदाहरण पाहूया.
लताचे,”रसिक बलमा” हे प्रसिद्ध गाणे बघूया. शुद्ध कल्याण रागातील अति आर्त चाल आहे. लताने नेहमीप्रमाणे अतिशय सुंदर गायले आहे. याच्या पहिल्या अंतऱ्यात, सुरवातीला, सतारीची सुंदर गत(ज्याला रागदारी संगीतात झाला म्हणतात, त्याप्रकारची) अति द्रुत लयीत सुरु होते आणि त्याच्या पार्श्वभागी अति ठाय लयीत सारंगीवर त्या सतारीच्या सुरांना अनुकूल अशी गत सुरु आहे. दोन्ही वाद्यांच्या लयीत फार फरक आहे पण एका क्षणी, दोन्ही वाद्यांची लय एकत्र येते आणि तिथे पुढील अंतऱ्यातून पुढील कडवे सुरु होते. सर्व साधारणपणे, लताच्या असामान्य गायकीच्या समोर, हीं ऑर्केस्ट्रायझेशन मधील करामत दुर्लक्षित केली जाते. खर तर, या वाद्यांच्या सुरावटीने हे गाणे फार उंचीवर जाते. दुर्दैवाने या गोष्टीची कधीही फारशी दखल घेतली गेली नाही. हा, संगीतकाराच्या कुशलतेचा एक नमुना म्हणून उदाहरण घेतले. आणि अशा प्रकारचे प्रयोग सुगम संगीतात, वारंवार जरी नसले तरी, अधून मधून घडतच असतात. कधी कधी, दोन भिन्न रागातून एखादी नवीनच चाल जन्माला येते. इथे, मला श्रीनिवास खळे यांचे,”या चिमण्यानो परत फिरा” या असामान्य गीताची आठवण आली. या गाण्याची पाहिली ओळ “पुरिया धनाश्री” रागात आहे तर धृवपदाची दुसरी ओळ “मारवा” रागात आहे. तसे पहिले गेल्यास, शास्त्रदृष्ट्या “पुरिया धनाश्री” आणि “मारवा” हे दोन्ही राग एकाच कुटुंबातील आहेत. तरी देखील, स्वररचनेत फार फरक आहे. असे असून देखील, संगीतकाराने, अति कुशलतेने अति ठाय लयीत ह्या गाण्याची बांधणी केली आहे.
कधी कधी, संगीतकाराला एखाद्या लोकसंगीतातून चालीचा उगम मिळू शकतो. त्यात तसे काहीच चुकीचे नाही, तसे पाहता, लोकसंगीत हे त्या प्रदेशाच्या संस्कृतीतूनच जन्माला आलेले असते. त्यात एक प्रकारची झिंग अंतर्भूत असते. तसे पहिले गेल्यास, “लोकसंगीत” या संगीतावर कुणीही “हक्क” सांगू शकत नाही. त्यामुळे, संगीतकाराच्या मगदुराप्रमाणे, तो त्या लोकसंगीतातून चाल निर्माण करू शकतो. हिंदीतील एस.डी.बर्मन,सलील चौधरी यांच्या कितीतरी चाली या बंगाली लोकसंगीतावर आधारित असल्याचे आढळून येईल. सध्या मराठीत, अजय-अतुल हीं संगीतकार जोडी अशीच महाराष्ट्रातील लोकसंगीतातून वेगवेगळ्या धून शोधत असतात. यात कसलीही “चोरी” वगैरे प्रकार नसतो आणि त्या संगीतकाराच्या व्यासंगाविषयी शंका निर्माण करण्याचा प्रश्न नसतो. जरा आणखी वेगळ्या दृष्टीने विचार केला तर असे देखील आढळते की, कवीं/गीतकारसुद्धा, लोकसंगीतातील पारंपारिक रचनावर नवीन शब्दांचा साज चढवून, वेगळ्या प्रकारची कविता सादर करतात. खर लिहायचे झाल्यास, लोकसंगीताची भारतात फार पूर्वीपासून चालत आलेली परंपरा आहे. प्रत्येक राज्याची संस्कृती घेऊनच तिथले लोकसंगीत तयार झाले आहे. राजस्थानमधील रंग, उत्तर प्रदेश पेक्षा वेगळा आहे तर, महाराष्ट्राची परंपरा तामिळनाडूपेक्षा भिन्न आहे आणि त्यामुळेच तर संगीतात फार सुंदर रचना मिळत गेल्या. बंगालचे “बाउल” संगीत हा त्यातलाच अति सक्षम अविष्कार. जसे हिंदुस्थानी शास्त्रीय संगीत पूर्वापार चालत आले आहे त्याच धर्तीवर प्रादेशिक लोकसंगीत चालत आले आहे. आता याबाबत एक सुंदर उदाहरण बघूया. शास्त्रीय संगीतात “राग पिलू” अतिशय प्रसिद्धच आहे पण तोच राग राजस्थानी ढंगात वेगळेच रूप घेऊन येतो आणि त्या अंगाने, जयदेवसारखा व्यासंगी संगीतकार,”तू चंदा मै चांदनी” किंवा “मै आज पवन बन जाऊ”सारख्या अप्रतिम रचन सादर करतो ज्या राजस्थानी लोकसंगीताच्या अंगाने पिलू रागावर आधारित आहेत!! अशा प्रकारच्या रचना आणि प्रयोग सुगम संगीतात करायला बराच वाव असतो, पण दुर्दैवाने बहुतेकवेळा, अत्यंत सरधोपटपणे रचना करण्यातच बहुतेक संगीतकार धन्यता मानतात!! रिमिक्स हा जो हल्ली संगीत प्रकार हल्ली बोकाळला आहे, हा याचाच परिपाक दिसून येतो.

No comments:

Post a Comment