Wednesday 18 June 2014

महासत्तेचे स्वप्न!!




गेली कित्येक वर्षे भारत, “जागतिक महासत्ता” होण्याचे स्वप्न बघत आहे, त्यादृष्टीने प्रयत्न करीत आहे. या स्वप्नाला सुरवात झाली, १९९२ नंतर भारतात उदारीकरणाची प्रक्रिया सुरु झाली, तेंव्हापासून. त्यावेळेस, संपूर्ण आर्थिक डबघाईची परिस्थिती ओढवल्यावर, आपल्याकडे दुसरा कुठलाच पर्याय उपलब्ध नव्हता आणि दाती तृण धरून World Bank आणि IMF कडे याचना करावी लागली, हे सत्य नाकारता येणार नाहि. त्यानिमित्ताने देशातील सोन्याचा साठा गहाण ठेवावा लागला आणि मनात इच्छा नसताना देखील समाजवादी आर्थिक धोरणांना तिलांजली देणे, क्रमप्राप्त ठरले. त्यानुसार नवीन आर्थिक धोरण स्वीकारावे लागले, त्यामुळे चंगळवाद फोफावला, हे जरी खरे असले तरी त्यामुळेच आर्थिक अरिष्ट बऱ्याच स्वरुपात टाळले, हे देखील मान्यच करावे लागेल. भारतात, लोकसंख्या प्रचंड असल्याने आयतीच बाजारपेठ ,पाश्चात्य कंपन्यांनी नेमकी हेरून, आपले जाळे भारतात विस्तृत केले. त्यामुळे आपल्याला जागतिक महासत्तेची स्वप्ने पडायला सुरवात झाली आणि चीनबरोबर तुलना करायला सुरवात झाली!!
प्रश्न असा आहे, जागतिक महासत्ता बनणे, हेच सगळ्या रोगांवरील “औषध” आहे का? इतिहास आपल्याला हेच उत्तर दर्शवित आहे का? मागील शतकात, दुसऱ्या महायुद्धानंतर, जागतिक पटावर अमेरिका आणि सोविएत रशिया, हेच दोन देश आपली सत्ता गाजवू लागले. त्यानुसार “शीत” युद्धाचे पडघम जोरात वाजले आणि या दोन देशांच्या तालावर जागतिक राजकारणाची सूत्रे, आर्थिक धोरणे ठरू लागली आणि याच काळात, “युनो” अमेरिकेची “बटिक” झाली!! आज, जे ग्रंथ प्रसिद्ध झाले, त्यावरून असे नक्कीच अनुमान काढता येते, जर का, अमेरिका, रशिया आणि चीन, यांनी सुज्ञपणा दाखवला असता, तर शीतयुद्ध आणि त्या अनुषंगाने आलेली आर्थिक मंदी, वगैरे सगळ्या गोष्टी टाळता आल्या असत्या आणि त्यानुसार जागतिक राजकारणाला वेगळी दिशा मिळू शकली असती. परंतु, आपण “महासत्ता” आहोत, या भ्रमात सगळ्या योजना आखल्या गेल्या, सगळी धोरणे ठरविण्यात आली आणि एकूणच जगाचे स्वरूप अधिक धोकादायकअनाजे तिथेही झाले, ही वस्तुस्थिती नाकारणे अवघड आहे.
जेंव्हा,रशियात स्टालिन आणि नंतर ख्रुश्चेव यांनी, आपणच “मार्क्सवाद” अंमलात आणणार, या स्वप्नापायी आपल्याच लोकांची निरंकुश हत्या केली, त्याचवेळेस चीनमध्ये माओने, त्यांची री ओढत, स्वत:चे राज्य वसवले!! त्याच सुमारास, अमेरिकेत Meckorthy वाद बोकाळून, सगळ्यांनाच भ्रमिष्टावस्थेत आणले, ही देखील वस्तुस्थिती मान्यच करायला हवी. याचाच दुसरा अर्थ असा झाला, आपण महासत्ता आहोत, हे जाणून देखील तिथे सत्तेबरोबर शहाणपण येतेच, असे दिसून आले नाही. मार्क्सवादाला संधीच मिळाली नाही, असे सोविएत महासत्ता कोसळल्यावर काही महाभागांना साक्षात्कार झाला पण त्याआधी कसे सुचले नाही, हा प्रश्न कुणीच विचारला नाही.
चीनमध्ये जी प्रगती झाली, ती मार्क्सवादाचा अवलंब न करता,सरकारी भांडवलशाहीने झाली, म्हणजे तिथेही मार्क्सवादाला तिलांजली देणे, हा अग्रक्रम ठेवावा लागला.
महासत्ता झाल्यावर देखील, अमेरिकन समाजाचे अंतर्गत प्रश्न भयाण आहेत. काहीवेळा वाटते, रोमन साम्राज्याच्या शेवटच्या काळात जसा समाज भ्रष्ट आणि पोखरला होता, असे आपण वाचतो, त्याचीच पुनरावृत्ती होत आहे. समाज संपन्न आहे, कर्तबगारीला प्रचंड वाव आहे, तथापि ही कर्तबगारी झटापट श्रीमंत होण्यासाठी वापरली जाते. व्हिएतनाम युद्ध, याच विचारांचा परिपाक म्हणावा लागेल आणि त्याचबरोबर सोसावी लागणारी नामुष्की देखील!! जेफर्सन, लिंकन यांनी जेंव्हा मोठा विचार मांडला, तेंव्हा अमेरिका वैचारिक पुढारीपण करत होती. रूझवेल्टने “न्यू डील’ च्या निमित्ताने नवे धोरण अंमलात आणून जगापुढे पर्याय उभा केला होता. परंतु नंतरच्या काळात अशाच मोठ्या विचारांची वानवा निर्माण झाल्याने, समाजात प्रचंड सुबत्ता असूनदेखील अस्थिर समाज उघड्या डोळ्याने स्वीकारावा लागला.
याचाच अर्थ, केवळ महासत्ता होऊन देखील, सगळे प्रश्न सुटतात, असे नसून, बरेचवेळा त्याहून अधिक जटील प्रश्नांची गुंतावळ निर्माण होते. आधुनिक जगात तर त्यात आणखी विविध प्रश्नाची भर पडत आहे, नवीन सामाजिक अरिष्टे कोसळत आहेत. महासत्ता म्हणजे केवळ आर्थिक सत्ता, असे समजणे, हा वेडाचार ठरू शकतो, नव्हे इतिहासाने हे दाखवून दिले आहे. १९९२ नंतर भारतात “मोकळे” वातावरण निर्माण झाले, असे आपण म्हणायला लागलो आणि आपण बहुदा एका नवीन स्वप्नात परत एकदा मश्गुल झालो!! १९४७ साली, ब्रिटीश जोखडातून मुक्ती मिळाल्यावर, आपला समाज असाच स्वप्नामध्ये धुंद झाला होता, अगदी १९६२ साली, चीनने युद्ध करीपर्यंत!! त्यानंतर, आपले डोळे काहीप्रमाणात उघडले आणि आपण संरक्षणाकडे बारकाईने लक्ष द्यायला सुरवात केली.
आज, या स्वप्नाला २० वर्षे होऊन गेली आणि आज परिस्थिती काय आहे, कुठलाही सुज्ञ माणूस जाणून घेऊ शकेल. त्यामुळे, अजूनही आपण “महासत्ता” होण्याचे स्वप्न किती काळ बघत बसायचे? आणि मुख्य म्हणजे, केवळ “महासत्ता” बनणे, हेच सगळ्या रोगांवर “औषध” आहे का?

No comments:

Post a Comment