Showing posts with label South Africa. Show all posts
Showing posts with label South Africa. Show all posts

Sunday, 13 August 2023

नॅशनल क्रुगर पार्क - भाग २

खरंतर संपूर्ण क्रुगर पार्क बघायचे असेल तर हाताशी निवांतपणा मनाचा निग्रह असणे जरुरीचे आहे. आम्ही सगळे नोकरी करणारे मित्र, तेंव्हा वार्षिक सुटीच्या हिशेबात आनंद घेणार. पहिल्या रात्री सुदैवाने आम्हाला लांबून का होईना "हिप्पो" सारखे अजस्त्र जनावर बघायला मिळाले. अर्थात जवळ कोण जाणार म्हणा? रात्री उशिराने हॉटेलमध्ये परतल्याने, सकाळी लवकर उठायचा प्रश्नच नव्हता. उठल्यानंतर ब्रेकफास्ट म्हणून टिपिकल पाश्चात्य डिशेस मिळाल्या. अर्थात एव्हाना अशा पदार्थांची सवय झाली होती तरी "कोल्ड मीट" खाण्याचे धाडस शेवटपर्यंत झाले नाही!! इथले लोकं अत्यंत आनंदाने आणि चवीने खातात. वास्तविक त्याला चव अशी फारशी नसते. मी १,२ वेळा खाण्याचा प्रयत्न केला होता पण घशाखाली अक्षरश: घास ढकलावा लागला! त्यामुळे आम्लेट पाव तसेच वेगवेगळी सॅलड्स, हाच आमच्यासारख्यांचा नाश्ता असायचा. हॉटेल पारंपरिक गोऱ्या लोकांसाठीचे (एकेकाळी तसेच होते) असल्याने आणि आजही तिथल्या मेन्यूत फारसा बदल नसल्याने, निवडीला फारसा वाव नव्हता. क्रुगर पार्कमध्ये जनावरांचे अरण्य वगळता, फारसे काही बघण्यासारखे नाही आणि दिवसाउजेडी जनावरे देखील आपल्या घरात विश्रांती घेत असतात. त्यामुळे आता अंगावर आलेल्या दिवसाचे काय करायचे? हा प्रश्नच पडला होता परंतु तिथल्या एका वेटरने, तिथे जनावरांच्या छायाचित्रांचे म्युझियम असल्याचे सांगतले अनिअमचा मोर्चा तिकडे वळवला. बऱ्याच व्हिजिटर्सनी, त्यांनी बघितलेल्या जनावरांचे नैसर्गिक अवस्थेतले फोटो ठेवले होते. अर्थात जनावरांचा देखणा जिवंतपणा फोटोमध्ये पकडणे तसे अवघडच असते म्हणा. सर्पांचे फोटो मात्र दिसले नाहीत. परंतु सिंह, वाघ,चित्ते, बिबळे यांचे फोटो बघायला मिळाले. अर्थात म्युझियम झाले तरी किती वेळ घालवणार!! शेवटी पुन्हा जनावरांच्या राज्यात हिंडायचे ठरवले आणि गाडी तिकडे वळवली. फार अपेक्षा नव्हती, त्यामुळे आरामात गाडी चालवत असताना, एकेठिकाणी माणसांचे घोळका दिसला. कसली गर्दी म्हणून गाडी जवळ नेली तर तिथे अवाढव्य आकाराचे सिंह विश्रांती घेत जमिनीवर पहुडला होता. त्याचे आकारमान स्पष्ट दिसत होते तसेच त्याची नजर देखील बघता येत होती. इतका राजस आणि राजबिंडा दिसत होता की डोळ्यांना भुरळ पडली. आमच्यापासून जवळपास ३०० ते ४०० मीटर्सवर तरी नक्कीच होता. आम्ही तर सोडाच तिथल्या तथाकथित धैर्यवान गोऱ्या लोकांचे देखील, सिंहाच्या जवळ जाऊन, बघण्याचे धैर्य झाले नव्हते. एक इच्छा अपुरी राहिली, सिंहाची गगनभेदी डरकाळी ऐकायला मिळाली नाही. असो, दुधाची तहान ताकावर का होईना पण भागवता आली. त्याची विख्यात आयाळ, पंजा आणि समजा तोंडात भक्ष पकडले तर सुटका होण्याची शक्यता निव्वळ अशक्य, हेच समजून घेतले. जवळपास अर्धा तास तरी त्याच्याकडे अनिमिष नेत्रांनी बघून घेतले. इथे प्रथमच एक सूचना स्पष्टपणे लिहिलेली असते, जनावरांना खायला काहीही देऊ नये आणि जर का दिलेत आणि अनावस्था प्रसंग ओढवला तर क्रुगर पार्क अजिबात जबाबदार नाही. आता इतके स्पष्ट लिहिल्यावर कुणीही काहीही खायला देण्याच्या फंदात पडत नव्हते. जरा वेळाने गाडी घोळक्यातून बाहेर काढली आणि इतरत्र फिरायला सुरवात केली. अर्थात इथे झेब्रे, हरणे प्रचंड प्रमाणात आढळतात आणि सगळे घोळक्याने एकत्र राहतात. कालच मन:पूत ही जनावरे बघितल्याने, आज परत तिचे जनावरे बघण्यात फारसा रस नव्हता. अर्थात धावणारे हरीण बघायला मात्र अतिशय देखणे असते. पुढे अशीच गाडी दामटत असताना, कालच्या हिशेबात आज, अचानक जरा जवळून धिप्पाड हत्तीचा कळप, आपल्या मस्तीत डौलदार चालीत हिंडताना बघायला मिळाला. या जनावराबाबत आम्हाला हॉटेलमध्येच सूचना मिळाली होती, त्यांना डिवचू किंवा चुचकारु नका, जर का हत्ती डिवचला गेला तर मात्र धडगत नसते. अर्थात इतके धिप्पाड जनावर, बघता क्षणीच छातीत धडकी भरते. एक वैशिष्ट्य मात्र बघता आले. कळपातील छोटे हत्ती हे नेहमी कळपाच्या आत असतात आणि त्यांना कळपातील मोठे हत्ती संरक्षण देत असतात. खरतर हरणे देखील वेगवेगळ्या रंगाची होती आणि आमचे तथाकथित ज्ञान इतकेच सीमित होते!! एव्हाना उन्हाची तलखी भाजायला लागली असल्याने, हॉटेलमधील गारवा अधिक सुखाचा, असे मानून हॉटेलमध्ये परतलो. अर्थात अशा उकाड्यात अति थंड बियर हा उतारा भलताच सुखाचा वाटला. संध्याकाळपर्यंत हॉटेलच्या पोर्चमध्ये बसून आत येणारे देखणे सौंदर्य न्याहाळणे, हाच उद्योग उरला होता. त्या रात्री २५ डिसेम्बरची पार्टी होती, आम्हाला जरा उशिरानेच समजले. अर्थात पार्टीचे देय होते. ते देणे चुकवले आणि रात्रीची वाट बघायला लागलो. गोऱ्या मुली वागायला सढळ असल्या तरी अंतर राखून वागत असतात. परिणामी त्यांच्या जवळ फारसे जाता येत नाही. अर्थात ओळख झाल्यावर प्रश्नच उद्भवत नाही. इथे तर सगळेच नवीन, म्हणजे कुणाची ओळख निघणे दुरापास्त. असे असले तरी आम्ही पार्टी एन्जॉय केली, कारण तिथे असलेला अवाढव्य केक आणि कॉकटेल्स!! शेवटी ११च्या सुमारास, बरेचजण पुन्हा अरण्यात जायला निघाले तशी आम्ही मित्रांनी पाय काढता घेतला. जनावरांच्या राज्यात जमेल तितके वावरायचे, हेच ध्येय ठेऊन, आम्ही इथे आलो होतो आणि तिसरी रात्र उंडारायला बाहेर पडलो. यावेळेस जरा वेगळा रस्ता पकडला आणि वातावरणातील बदल किंचित जाणवला,निदान आम्हा सगळ्यांना तरी त्यावेळी तसे भासले. कारण यावेळेस अनेक जिराफांच्या टोळ्या हिंडताना दिसल्या. जिराफ आम्ही कधीही जवळून बघितला नव्हता आणि त्यांच्या उंचीने आम्हा सगळयांची नजर दिपून गेली. वास्तविक जिराफ प्राणी शाकाहारी - शक्यतो झाडांची पाने, गवत इत्यादी त्यांचे अन्नतरी एकूणच अचाट उंची उगीचच माणसाला त्यांच्यापासून दूर ठेवते. एक बाब लक्षात आली, हे सगळे प्राणी सतत कळपात राहतात, संरक्षणाची सिद्धता म्हणून असेल. तसेच रात्रीच्या वेळी त्यांचे डोळे फारच चमकदार दिसतात. पार्कमध्ये जागोजागी तलाव तसेच पाणथळे बांधलेली आहेत जेणेकरून, विशेषतः रात्रीच्या वेळी जनावरांना तहाण भागवणे सहजप्राप्य होईल. अशाच एका तलावात, त्या रात्री अवाढव्य मगर बघितली. पाण्यामधील तिचे साम्राज्य कधीही उध्वस्त न होणारे परंतु पाण्याबाहेर मात्र मगर बरीचशी असहाय होते. जवळपास ४,५ फुटी लांब होती. काळीकभीन्न मगर पाण्यात असताना, अति हिंस्र असते. आमचे एक दुर्दैव, शिकार करतानाचे जनावर बघायला मिळाले नाही तसेच केलेल्या शिकारीचा फडशा पाडणारे जनावर बघायला मिळाले नाही. काही जणांना मिळाले असेलही पण त्यासाठी मोठा मुक्काम करणे गरजेचे असावे. दुसऱ्या दिवशी परतायचे असल्याने, झाले त्या दर्शनावर समाधान मानून हॉटेलचा रस्ता पकडला आणि दुसऱ्या दिवशीचा नाश्ता करून घराच्या वाटेवर निघालो.

Saturday, 6 May 2023

Standerton - Church

नोकरीसाठी गाव तसे छोटेखानी मिळाले तर वैय्यक्तिक मैत्री फार चटकन जुळून येतात तसेच राहायला बरेच सुरक्षित वाटते. परदेशी राहताना हा अनुभव फार थोड्या वेळा अनुभवायला मिळाला. Standerton इथल्या नोकरीच्या अनुभवाबद्दल पूर्वीच लिहिलेअसल्याने त्यात आता नवीन काही लिहिण्यासारखे नाही. गाव तेंव्हा तरी फार तर १०,०० ते १२,००० वस्तीचे होते. गावात जून,जुलै महिन्यात हाडे गारठवणारी थंडी तसेच गावात नोकरीच्या फारशा संधी उपलब्ध नसल्याने लोकवस्ती विरळ. अर्थात प्रचंड शहरात असणारी प्रचंड मॉल्स, वर्दळ आणि एकूणच अंगावर येणारे जीवन, असला प्रकार आढळत नसतो. एकूणच थंड, शांत जीवन. या गावात एक चर्च आहे, चॅपलपेक्षा आकाराने बरेच मोठे परंतु एकूणच चर्च म्हटल्यावर जो अवाढव्य आकार समोर येतो, त्यामानाने छोटेखानी. अर्थात गावात एकूणच लोकवस्ती विरळ म्हटल्यावर कशाला कोण, महाकाय चर्च बांधणार!! मी इथे राहायचे ठरवल्यावर, एके संध्याकाळी, शनिवारी चर्चकडे गाडी वळवली. चर्च संस्कृतीत बहुदा इतर धर्मियांना मुक्त प्रवेश असावा. अर्थात मी नास्तिक असल्याने, असल्या विषयांना माझ्याकडे स्थान नाही. संध्याकाळचे ५.३० वाजले होते आणि शनिवार असल्याने, चर्चमध्ये फारशी वर्दळ नव्हती. मला काही येशूकडे मागणे मागायचे नव्हते पण एकूणच चर्च विषयी मनात आकर्षण होते आणि त्यापोटीच मी आत शिरलो. वास्तविक मुंबईत मी गिरगावात राहणार माणूस, आणि गिरगावात पोर्तुगीज चर्च म्हणून वास्तू आहे पण तिथे एकूणच वाहनांची सतत असलेली वर्दळ असल्याने कधीही आत जाऊन बघावे, असे वाटलेच नाही. इथे निवांत संध्याकाळ पुढ्यात पसरली होती. आता शिरलो आणि चर्चचा अंतर्भाग प्रथमच नजरेत भरला. आता ख्रिश्चनांचे मांडीत म्हटल्यावर प्रवेशद्वाराच्या समोर आत मध्ये येशूची मूर्ती असणे क्रमप्राप्तच. मूर्तीच्या खाली पायऱ्यांवर अनेक आकाराच्या मेणबत्त्या लावलेल्या, त्याच्या पुढे लाकडाच्या आकाराचे बंदिस्त फर्निचर जसे कोर्टात न्यायाधीशाच्या पुढे असते. त्यानंतर मग भक्तांना बसण्यासाठी लाकडाच्या रांगा. तिथे शांतपणे भक्तांनी यायचे आणि येशूला आपली service अर्पण करायची. मी आता शिरलो तेंव्हा एक कुटुंब तिथे बसले होते. बहुदा त्यांची पूजा संपली असावी कारण लाकडाच्या रांगेत, खाली मान घालून बसले होते. अर्थात मी तसे अंतर राखून बसलो. मला कसलीच प्रार्थना माहीत नव्हती आणि जरी झाली असती तरी केली नसती. माझा उद्देश वेगळा होता. चर्चमधील शांतता अनुभवणे आणि एकूणच स्थापत्य बघून घेणे, इतकाच उद्देश होता. चर्चच्या भिंतींवर वेगवेगळी चित्रे रंगवली होती. मला त्या चित्रांचे मर्म जाणून घेण्यापेक्षा रंगसंगती मध्ये अधिक रस. एकतर जिथे हिंदू संस्कृतीबद्दल सखोल माहिती नाही तिथे परकीय धर्माबद्दल काय माहिती असणार. चर्चमधील शांतता मात्र अंगावर येते. जवळपास १५,२० मिनिटे झाली असतील पण अचानक एक वादक पाठीमागून कुठूनतरी आला आणि त्याने चर्चमधील पियानो वाजवायला घेतला. इथे माझे नाते जडले. वास्तविक पियानी वाद्य मला नवलाईचे नव्हते परंतु चर्चमधील धर्मसंगीत ऐकण्यात विशेष रस होता आणि ती इच्छा अचानक पूर्ण झाली. जवळपास २० मिनिटे वादन केले. वादक कदाचित फार मोठा वाकबगार नसेल देखील पण ते सूर मात्र कानात ठसले. आजही ती अनुभूती कायम आहे. फक्त पियानो वाजत होता आणि त्या स्वरांनी सगळे चर्च भरून गेले होते. स्वरांची अशी अनुभूती पुढे मला Andre Rui च्या कार्यक्रमात ऐकायला मिळाली. पाश्चत्य संगीताची आवड निर्माण होऊन बरीच वर्षे झाल्याने, सूर म्हणून फार अलौकिक वाटते नाही पण त्या वास्तुतील शांततेचा एक गडद परिणाम मात्र जाणवला. वादन संपले तशी तो वादक निघून गेला. चर्चचा पाद्री मात्र दिसला नाही. घरी परतलो, ते सूर डोक्यात घेऊनच. लगेच YouTube वर काही व्हिडीओज ऐकल्या आणि ते सूर मनात साठवून ठेवले. अर्थात तिथली शांतता मात्र मनात साठवून ठेवली होती. पुढे मी अनेक शनिवार संध्याकाळ तिथे जात असे, आता शिरण्याची गरज भासली नाही पण त्या अत्यंत स्वच्छ परिसराच्या पायऱ्यांवर निवांत बसण्यात खूप आनंद मिळायला लागला. चर्चमध्ये गर्दी होणार ती रविवारी सकाळी. मला खरंच विचार करावासा वाटतो, गाव अगदी छोटे आणि तिथले चर्च देखील टुमदार परंतु तिथली शांतता आणि स्वच्छता निव्वळ वाखाणली जावी. आपल्याकडे अपवाद स्वरूपात असे का घडत नाही? माझे लग्न झाले त्या पहिल्या दिवाळीला, रितीनुसार मी सासरी - राजापूर इथे गेलो होतो.आज या घटनेला ३६ वर्षे झाली असतील पण एका संध्याकाळी राजापूर इथल्या नदीकाठी गेलो होतो. तिथे एक छोटे देऊळ होते. तिथे मिणमिणता दिवा कुणीतरी लावला होता. परिसर स्वच्छ होता आणि आसमंतात सुंदर शांतता होती. मला तर तिथून हलूच नये, असे फार वाटत होते पण हळूहळू अंधार पसरायला लागला आणि नदी काळोखात हरवून गेली. आजही ते दृश्य माझ्या मनावर ठसलेले आहे आणि त्यावेळची आठवण, मला भारतापासून हजारो किलोमीटरवर राहताना मनात सारखी यायची. अर्थात असे वातावरण मुंबईसारख्या शहरात मिळणे जवळपास अशक्य आणि म्हणून त्याचे अप्रूप वाटले असणार. इथे देखील चर्चच्या मागील बाजूला Vaal नावाची नदी आहे. गावाप्रमाणे छोटीशीच आहे. पाण्याचा फारसा खळाळणारा आवाज येत नाही, एक मंद स्वरांत पाणी वाहत असते. पुढे मी साऊथ आफ्रिकेत बरीच चर्चेस बघितली पण असा अनुभव कधी मिळाला नाही कारण ती सगळी चर्चेस अवाढव्य शहरातली आणि म्हणून शहरी संस्कृती स्वीकारलेली.

Saturday, 28 January 2023

साऊथ आफ्रिका - खाद्यसंस्कृती

१९९४ साली मी प्रथम साऊथ आफ्रिकेत पाऊल टाकले तेंव्हा इथे १६ वर्षे काढीन अशी सुतराम कल्पना नव्हती. साधारणपणे ४,५ वर्षे काढून पुन्हा भारतात परतायचे. इतपत अपेक्षा होती. परंतु डर्बन विमानतळाचे पहिलेच दर्शन (त्यावेळी भारतातून थेट डर्बन अशी विमान सेवा होती, पुढे जोहान्सबर्गला सेवा सुरु झाली) आश्चर्यचकित करणारे होते आणि ते चित्र बऱ्याचपैकी तसेच शेवटपर्यंत राहिले. पीटरमेरित्झबर्ग इथे सुरवातीला भारतीय वंशाच्या लोकांशी ओळखी झाल्या. अर्थात ऑफिसमध्ये देखील बव्हंशी भारतीय वंशाचेच लोक नोकरीसाठी होते. सुरवातीला अर्थातच भारतातून आलेल्या लोंकांशी ओळख होणे, वाढणे क्रमप्राप्तच होते. त्यामुळे खाण्यापिण्याच्या सवयी फारशा बदलण्याची संधी नव्हती परंतु पुढे भारतीय वंशातील लोकांशी मैत्री झाली आणि त्यांच्या घरी जाण्याचे प्रसंग आले. वास्तविक, माझा देह तोपर्यंत भारतीय मसाल्यांवर पोसलेला होता आणि तिथल्या प्रत्येक पदार्थाची चव घेताना, भारतीय पदार्थाची चव कशी आहे, अशा तुलनेतच खाऊन बघितली. अधून मधून बाहेर हॉटेलमध्ये जात असे आणि मुद्दामून गोऱ्या लोकांच्या हॉटेलमध्ये जात असे. तिथले फिश किंवा चिकन, सुरवातीला खाताना चवीचा प्रश्न यायचा परंतु अशा हॉटेलमध्ये जाताना, ऑफिसमधील मित्र सोबत असायचे आणि त्यामुळे त्यांच्यासमोर चवीबद्दल कसे बोलायचे? हा संकोच असायचा. गोऱ्या लोकांच्या हॉटेलात चिकन सारखे पदार्थ, बव्हंशी मीठ आणि काळी मिरपूड, इतपतच मसाले लावलेले असायचे. अर्थात प्रथम, प्रथम खाताना, ते चिकन पचवणे काहीसे जड गेले. मनात सारखा हाच विचार यायचा, मी यांच्या देशात आलो आहे, तेंव्हा यांच्या अन्नावर टीका कशी करायची? हाच प्रकार मासे खाण्याबाबत व्हायचा. पुढे जसे भारतीय वंशाच्या लोकांच्या घरी जायचे प्रसंग आले तेंव्हा काहीशी मिळतीजुळती चव चाखयला मिळाली. तरीही मालवणी, कोकणी चवीचा प्रश्नच नव्हता. शाकाहारी पदार्थ याच चालीवर बनवलेले असायचे. चिकन उकळत्या पाण्यातून काढायचे, त्याला मीठ, मिरपूड लावायची आणि "चिकन करी" बनवताना, थोडे तिखट, हा;हळद आणि त्यांचा म्हणून खास बनवलेला मसाला घालून ते चिकन, तेलावर (तेल देखील अत्यंत माफक) शिजवायचे. मालवणी चवीला सोकावलेल्या अनिलला, हे चिकन बेचव वाटले तर काय नवल. पुढे मीच स्वतंत्र राहायला लागलो आणि बाजारातून आपले भारतीय मसाले आणले (प्रत्येक शहरात आता इंडियन स्टोअर असते आणि तिथे अप्रतिम भारतीय मसाले, डाळी, तांदूळ,पोळ्यांचे पीठ आणि जवळपास सगळेच भारतीय पदार्थ मिळतात). आपली चव डोळ्यासमोर ठेऊन चिकन बनवले आणि तेंव्हा ३,४ वर्षे तृषावलेला जीव शांत झाला. एव्हाना, मला लोकल पदार्थांची सवय झाली होती. पुढे Standerton सारख्या गावात नोकरी करताना, माझ्या हाताखाली, बरेच गोरे कामाला होते तसेच आमच्या बृवरीचा जनरल मॅनेजर - डेव्हिस, गोरा होता, त्याच्याशी माझी नाळ जुळली. दुपारच्या जेवणाला आम्ही एकत्र जेवायला बसत होतो. अधून मधून तो मला एखादा पदार्थ देत असे. मी केलेली उसळ देखील त्याला पहिल्या घासात अवघड झाली, इतकी की पाणी पिताना सुद्धा त्याला ठसका लागला होता. आपला "गरम मसाला" त्याच्या घशाखाली काही उतरला नाही. त्यामुळे मीच त्याने दिलेले पदार्थ खात होतो. तोपर्यंत साऊथ आफ्रिकेत ९,१० वर्षे झाली होती तरीही मी पूर्णपणे "साऊथ आफ्रिकन" होऊ शकलो नाही आणि याचे मुख्य कारण, माझी दरवर्षी भारतात यायची सवय!! १६ वर्षे साऊथ आफ्रिकेत होतो परंतु प्रत्येक वर्षी मुंबईला यायचा परिपाठ मी ठेवला होता. यात आर्थिक प्रश्न होते परंतु घरच्यांची भेट त्यापेक्षा महत्वाची असायची. डेव्हिस कडे मात्र मला गोऱ्या लोकांची खाद्यसंस्कृती व्यवस्थित समजली. पुढे त्याच्या घरी ख्रिसमस साठी गेलो असताना, त्याच्याकडे नकळत का होईना पण "बीफ" खाल्ले, इथेच त्याचवेळेस "टर्की"चा आस्वाद घेतला. इथे "तिखट" खायचे म्हणजे "पेरीपेरी" मसाला वापरायचा. अर्थात आपल्या भारताच्या तुलनेत हे तिखट अत्यंत मचूळ म्हणायला हवे. एक गंमत, मी जेंव्हा Standerton इथे नोकरीसाठी आलो तेंव्हा सुरवातीला कंपनीने मला एका गोऱ्या मुलीच्या खाणावळीत राहायची आणि जेवायची सोय केली होती. मीजवळपास ३ आठवडे तिथे राहिलो आणि अर्थातच तिच्याशी माझी चांगली ओळख झाली. तेंव्हा ती एका गोऱ्या पुरुषासोबत Live I Relation मध्ये रहात होती. पुढे मी घर घेतले आणि ती जागा सोडून दिली. आता इतकी चांगली ओळख आहे म्हणून एका रविवारी सकाळी, त्या दोघांना मी घरी जेवायला बोलावले. दोघेही गोरे म्हणून, मी बिर्याणी करताना, मसाला जरा जपूनच वापरला होता. त्यातून रविवार दुपारचे जेवण म्हणून घरात जास्तीच्या बियर बाटल्या आणून ठेवल्या होत्या. अर्थात जर का बिर्याणी झेपली नाही तर मासे तळायचे बाजूला ठेवले होते. दोघेही घरी आले आणि मी बियर कॅन्स उघडले आणि चियर्स सुरु झाले. थोड्या वेळाने टेबलावर बिर्याणी आणून ठेवली आणि पहिल्याच घासाला, त्या मुलीचा जीव टांगणीला लागला!! डोळ्यांत पाणी आले. लगेच मी फिश तळायला घेतले आणि तिचे जीव भांड्यात पडला!! तेंव्हा पासून मी कानाला खडा लावला, घरी कुणाही गोऱ्या व्यक्तीला किंवा पुढे काळ्या लोकांशी ओळख झाली, तेंव्हा त्यांना देखील घरी बोलावले नाही. भेट बाहेर, एकतर त्यांच्या घरी किंवा हॉटेलमध्ये. एकदा काळ्या मित्राच्या घरी जायचा प्रसंग आला. आमंत्रण नाकारणे अशक्य होते. साऊथ आफ्रिकेत, घरी आल्यावर चहा, कॉफी विचारण्याऐवजी ड्रिंक्स विचारले जाते, विशेषतः शनिवार किंवा रविवार असेल तर अधिकच आग्रह केला जातो. म्हटले तर तिथे चिकन केले होते पण त्यांचे मसाले इतके "उग्र" असतात की ताटात घ्यायच्या आधीच वासाने नाक दरवळून गेले!! केवळ मित्राचा मान राखायचा म्हणून मी ते चिकन थोडेसे खाल्ले पण त्यांनी कुठला मसाला वापरला, हे विचारायचे धाडस मात्र झाले नाही. पुन्हा म्हणून काळ्या मित्रांच्या घरी जायचा प्रसंग आला नाही, मी आणू दिला नाही. आता या देशाची खाद्यसंस्कृती काय? असा जर प्रश्न उभा राहिला तर बहुतांशी अमेरिकन हॉटेलकडे बोट दाखवायला लागेल. शनिवार सकाळ, शनिवार तर, रविवार सकाळ, या वेळा बव्हंशी साऊथ आफ्रिकेने अशा हॉटेल्ससाठी राखून ठेवलेल्या असतात!! केवळ मॉलमधील हॉटेल्स नसून बाहेरील हॉटेल्स तुडुंब भरलेली असतात. ड्रिंक्स हा टेबल मॅनर्स म्हणून गणला जातो आणि मग त्यासोबत, फ्रेंच फ्राइज!! पुढे मग मेन कोर्स. हे सगळे करण्यात एकत्र दुपार होते किंवा रात्र पसरते. बीफ तर घासाघासाला लागते. बदल म्हणून कधी तरी पोर्क, हॅम्स किंवा फिश. गोरे काय किंवा काळे काय, यांच्या घरातील स्वयंपाक घरे चकाचक असतात, कारण घरी फारसे काही करायचे नसते. यांचे दुपारचे जेवण म्हणजे सॅन्डविच आणि ते देखील "कोल्ड मीट" आणि मेयोनीज बरोबर. इथले लोकं मेयोनीज प्रचंड प्रमाणात खातात. मग ते सॅन्डविचमध्ये असते किंवा सॅलडमध्ये असते. कधी कधी तर दोन पावाच्या मध्ये फक्त मेयोनीज घालून खातात. यांच्या आयुष्यातून पाव वगळला, तर हे लोकं कसे जगातील? हा प्रश्नच आहे, इतका पाव हा त्यांच्या आयुष्याचा अविभाज्य भाग आहे. अर्थात इथे असंख्य प्रकारचे पाव मिळतात. पाव आणि पेस्ट्रीज, याच्यावर हा देश अवलंबून आहे. पुढे मी देखील पावाला चटावलो होतो. विशेषतः गार्लिक बटर सह पावाचा रोल खाणे, हा आनंद असायचा. मॉलमधील "पिक एन पे" सारख्या अवाढव्य दुकानात गेलो की कुठला पाव घ्यायचा? या प्रश्नावर मती गुंग व्हायची. मग, मागील आठवड्यात कुठला घेतला होता, हे आठवून मग यावेळच्या पावाची निवड व्हायची. साऊथ आफ्रिकेत मी १६ वर्षे काढली खरी पण तिथल्या खाद्यसंस्कृतीपेक्षा मला तिथली मद्यसंस्कृती अधिक भावली!! विशेषतः "कॉकटेल्स" तर इतक्या विविध प्रकारची मिळतात की मन दि:ढमूढ व्हायचे!! केवळ कॉकटेल्स नव्हे तर निरनिराळ्या चवीच्या बियर्स तिथे मिळायच्या. आज भारतायेईन, १२ वर्षे व्हायला आली आणि ही संस्कृती मात्र मी फार "मिस" करतो.

Saturday, 31 December 2022

३१ डिसेंबर

पूर्वी आपल्याकडे ३१ डिसेंबर हा वेगळा दिवस म्हणून साजरा करायची पद्धत फारशी रुळलेली नव्हती परंतु हळूहळू आपल्याकडे पद्धत स्वीकारली गेली. आता तर खूपच सहजपणे स्वीकारली गेली आहे. मी जेंव्हा १९९४ साली साऊथ आफ्रिकेत गेलो तेंव्हा ३१ डिसेंबर साजरा करायचा असतो, हे मनात पक्के झाले होते. सुरवातीचे वर्ष, मी पीटरमेरित्झबर्ग इथे असताना, बव्हंशी आम्ही भारतीय एकत्र जमत असू आणि तिथे मग आपल्याच पद्धतीने ही रात्र साजरी करत असू. साऊथ आफ्रिकेत ख्रिसमस म्हणून त्या समाजाची दिवाळी. वर्षभर जी काही पुंजी साठवली असेल, ती वर्षाअखेरीस वापरायची. तेंव्हाच भरपूर खरेदी करायची, पार्ट्या करायच्या वगैरे कार्यक्रम करायचे. आम्ही भारतातले, महिना आधी येणारी दिवाळी साजरी करीत असू आणि नंतर ख्रिसमस. अर्थात नोकरीत जो काही *बोनस* मिळायचा, तो ख्रिसमसच्या दिवसात. आता, भारतीय एकत्र येणार म्हणजे ड्रिंक्स तर अत्यावश्यक असायचे पण खाण्याचे जिन्नस देखील शक्यतो भारतीयच असायचे. एकत्र साऊथ आफ्रिकेत डिसेंबर महिना म्हणजे कडाक्याचा उन्हाळा!! त्यामुळे दिवसा फारसे काही कार्यक्रम नसायचे परंतु संध्याकाळ उजाडली की मग एखादी व्हिस्कीची बाटली आणि बव्हंशी बियरचे टिन असायचे. बियर असण्याचे महत्वाचे कारण वातावरणातील उष्णता. खाण्याचे पदार्थ शक्यतो भारतीय पद्धतीचे चिकन किंवा मटण किंवा कधी तरी मासे असायचे. वास्तविक आम्ही सगळे इतर दिवशी देखील एकत्र जमत होतोच, त्यामुळे गप्पांमध्ये तोचतोचपणा जास्त असायचा. परंतु या सगळ्या साजरेपणात, ३१ डिसेंबर आहे तेंव्हा आपण नवीन वर्षाचे स्वागत करायला हवे, अशी जगभर रीत आहे, तेंव्हा ती रीत आपण देखील पाळली पाहिजे, असेच काहीसे असायचे. त्यातून आजूबाजूला गोरे तसेच काळे, त्यांच्या पद्धतीने ख्रिसमस साजरा करीत असायचे. मग आपण का मागे राहायचे? साऊथ आफ्रिकेत, साधारणपणे १५,१६ डिसेंबर पासून ते ७ जानेवारीपर्यंत, बहुतेक सगळ्या मॅन्युफॅक्चरिंग कंपनी Annual Shut Down & maintenance साठी बंद असतात. मी आणि आमचे मित्र हे ऑफिसमधील, तेंव्हा आम्ही सगळे बरेच दिवस मोकळेच असायचो. पुढे मला गोऱ्या लोकांच्यात वावरायची संधी मिळाली आणि गोरा समाज ख्रिसमस कसा साजरा करतात, हे फार जवळून बघायला मिळाले. विशेषतः मी जेंव्हा Standerton इथे आलो तेंव्हा ही संधी प्राप्त झाली. ऑफिसमध्ये गोऱ्या लोकांचे प्राबल्य होते त्यामुळे त्यांची संस्कृती अनुभवण्याची संधी मिळाली. मी इथे २ वर्षे होतो आणि दोन्ही वर्षी ख्रिसमस गोऱ्या कुटुंबात साजरा केला. माझा *जनरल मॅनेजर* गोरा होता - *डेव्हिस*. पूर्वी लष्करात होता, त्यामुळे शरीरयष्टी काटक, निळे डोळे आणि झपाझप चालायची सवय. वास्तविक त्याचे आणि माझे काम वेगळे होते पण तरीही अनेकवेळा एकत्रित काम करायची गरज पडायची आणि त्यातून माझी त्याच्याशी चांगली ओळख झाली. मी *एकटा* राहतो, याचे त्याला कौतुक वाटायचे. तसे गोरे लोकं बहुतेक करून अंतर राखून नाते निर्माण करतात. अति जवळीक, त्यांच्या स्वभावातच नसते. कामाच्या वेळेस, भरपूर काम करतील पण ऑफिसची वेळ संपली की तू कोण आणि मी कोण!! असा त्रयस्थ भाव ठेवतील. असे असूनही माझ्याशी त्याची जवळीक वाढली. पहिल्याच वर्षी त्याने मला ख्रिसमस निमित्त काय करणार आहेस? हा प्रश्न केला. मी काय करणार, घरीच बसून गाणी ऐकणार, पुस्तके वाचणार. त्यावेळी मला लिहायचा आजच्यासारखा *चसका* लागला नव्हता. तेंव्हा त्याने लगोलग, त्याच्या घरी यायचे निमंत्रण दिले. त्याच्या बायकोला - जेनीला मी ओळखत होतो. जेनी ४,५ वेळा ऑफिसमध्ये आलेली असताना, मी तिला भेटलो होतो. ,२ वेळा डेव्हिस *बृवरी* मध्ये कामाला गेला असताना, जेनी माझ्या समोर बसली आणि आमच्या गप्पा रंगल्या होत्या. त्यामुळे आमंत्रण स्वीकारताना फारसे *ओशाळे* वाटायचे काहीच कारण नव्हते. दोघेच इथे राहात होते पण ख्रिसमस निमित्ताने त्याच्या २ मुली आणि जावई येणार होते. परिणामी घरात उत्सवी हवा होती. मी ३१ तारखेला संध्याकाळी त्याच्या घरी पोहोचलो तर घराची सजावट चालली होती. कुठे फुगे लाव, कुठे निरनिराळ्या झिरमिळ्या लावणे चालू होते. जरी मी डेव्हिस आणि जेनीला ओळखत असलो तरी त्याच्या मुलींना आणि जावयांना प्रथमच भेटत होतो. घरात पूर्णपणे सणाचे वातावरण होते. मी आलो तशी डेव्हीसने माझी सगळ्यांना ओळख करून दिली. हस्तांदोलन वगैरे उपचार पार पडले. घरातून *टर्कीचा* सुंदर वास येत होता तर टेबलावर एका जावयाने *Royal Salute* सारखी अत्यंत महागडी स्कॉच उघडली. दुसऱ्या जावयाने *सुगंधी सिगार* शिलगावली आणि वातावरणात ख्रिसमस सुरु झाला. बाटली उघडली तशी काचेचे चषक भरले. खरी स्कॉच ही On The Rocks अशीच घ्यायची असते. या पूर्वी मी कधीच इतकी महागडी स्कॉच घेतली नव्हती. माझी मजल फार तर *Johnnie Walker* किंवा *Glenfidditch* इथपर्यंत गेली होती. इथे तर ग्लासात (पेग मेजरने ड्रिंक्स घ्यायचे असते, हे प्रथम समजले!!) ड्रिंक्स घेतले आणि फक्त बर्फाचे ३,४ तुकडे त्यात टाकायचे आणि एकमेकांच्या ग्लासांना, किणकिण आवाजात *चियर्स* करून कार्यक्रमाला सुरुवात करायची. ही स्कॉच फारच *मवाळ* निघाली पण काहीशी उत्तेजित करणारी. अर्थात इतरेजन कसे घेतात, हे बघूनच मी घ्यायला सुरु केले. पहिला ग्लास संपला आणि सिस्टीमवर खास ख्रिसमस साठीची गाणी गाणी लागली आणि त्या ३ जोडप्यांनी पाय थिरकवायला सुरु केले. मग तिथे जोडप्यांची अदलाबदल देखील झाली पण त्यात उस्फुर्तपणा जास्त होता. एकत्रितपणे नृत्याचा आनंद घेणे, इतपतच उद्दिष्ट होते. जवळपास अर्धा, पाऊण तास नृत्य चालू होते. तोपर्यंत मला पाश्चात्य नृत्याबद्दल काहीही माहीत नव्हते. मला अर्थात आग्रह झाला पण आपलीच लाज आपल्या हाताने कशी काढायची!! त्यांना देखील नवल वाटले. जेनी आत गेली आणि तिने जेवण तयार असल्याचे सांगितले. तोपर्यंत मी *टर्की* हा प्रकार खाल्लेला नव्हता. तसा मी मागेमागेच रहात होतो म्हणा. टर्कीसोबत चिकनचे २ पदार्थ आणि मुख्य म्हणजे रशियन सॅलड आणि बटाट्याचे सॅलड(बटाटे पीठ होईपर्यंत शिजवायचे, त्यात उकडलेली आणि कुस्करलेली अंडी,मेयॉनीज आणि बारीक मिरची टाकायची. काय अफलातून चव लागते) आले. टर्की भलतीच चवदार निघाली. जेवण झाल्यावर पुन्हा Irish Coffee आली. जेवणानंतर *आपोष्णी* म्हणून घेतात. अप्रतिम ड्रिंक्स असते. रात्र पूर्णपणे जगवायची असे ठरले आणि पुन्हा संगीताचा माहौल तयार झाला आणि मला आग्रहाचे आमंत्रण आले. एव्हाना, ड्रिंक्सचा थोडा अंमल झालाच होता तेंव्हा बिनधास्तपणे जेनीबरोबर नृत्य करायला सुरु केले. सुरवातीला पायाची तंगडतोड झाली पण लवकरच निदान पाय कसे हलवायचे, इतपत नृत्य समजले. रात्री उशिरापर्यंत हा सगळं कार्यक्रम चालू होता. Standerton आकाराने गिरगाव ते दादर इतपत(च) टुमदार गाव आहे त्यामुळे रात्रीबेरात्री फिरणे धोकादायक नव्हते. मी घराची वाट पकडली. पुढे प्रिटोरिया इथे नोकरीसाठी आलो आणि पार्ट्यांचे प्रमाण बरेच वाढले कारण कंपनीतील बहुतांशी स्टाफ हा गोरा होता. इथेच मला *Wendi* भेटली. तिच्याशी आजही माझा संपर्क आहे. तिच्याकडे एका ख्रिसमसला गेलो असताना, *Barbeque* पार्टीची फार जवळून ओळख झाली. निखाऱ्यावर सॉसेजीस भाजून घ्यायचे आणू उभ्यानेच खायचे. सुरवातीला ही *कसरत* वाटली पण पुढे लगोलग सरावलो. एका हातात ड्रिंक्सचा ग्लास आणि दुसऱ्या हातात, सॉसेजीस!! तुम्ही काहीही करू शकत नाही. अर्थात तोंडाने गप्पा मारणे चालूच असायचे. अशावेळी गोरा माणूस मोकळा होतो, प्रसंगी अति वाह्यात देखील होतो. पार्टीमध्ये बायका आहेत तेंव्हा जपून विनोद करावेत, ही आपली संस्कृती पण तिथे अशा वेळी तोंड सुटलेले चालते!! गंमत म्हणजे अशा वेळी ऑफिसचा विषय चुकून निघत नाही. नुकताच बघितलेला सिनेमा (मग तो पॉर्न देखील असू शकतो) किंवा कुणाची टवाळी करणे, हे सगळे चालू असते. नृत्य तर तोंड रिकामे झाले की सुरु असते. संपूर्ण रात्र मजेत काढायची असते. दुसऱ्या दिवशी सुटी असल्याने, मग दुसऱ्या दिवशी लवकर उठायची गरज नसते. आदल्या रात्रीचा ड्रिंक्सचा अंमल अंगावर ओसंडत असतो पण तरीही पार्टी एन्जॉय केलेली असते.

Tuesday, 27 December 2022

परदेशी वास्तव्य - एक अनुभव

वास्तविक पहाता, मी एव्हाना साऊथ आफ्रिकेतील वास्तव्याबद्दल बरेच काही लिहिलेले आहे. अर्थात फार थोड्या अनुभवांना लेख स्वरूप मिळाले. काही अनुभव चुटकुल्याच्या स्वरूपाचे असल्याने, किती *वाढवून* लिहायचे? हा प्रश्न होता आणि त्यामुळे तात्कालिक अनुभव तसेच मनात राहिले. जे अनुभव निरंतर मनात रेंगाळत राहिले त्यांना लेखात परावर्तित केले. असे असून देखील आजही असेच वाटते, जितके लिहायला हवे होते, तितके लिहून झाले नाही. खरंतर परदेशी एकट्याने राहताना, प्रत्येक दिवस हा अनुभव असतो. संपूर्ण भिन्न संस्कृती,संपूर्ण वेगळ्या विचारांची माणसे आणि त्यांच्या सहवासात सतत राहायचे. हे कितीही नाकारले तरी अवघड तर असतेच. आपण कुणाशी काय बोलायचे? कसे बोलायचे? लोकं आपले बोलणे कसे स्वीकारतील? आपली भाषा त्यांना समजणे अशक्य तेंव्हा त्यांच्या बाजूने विचार करून वागायचे!! ही खरी तारेवरची कसरत असते. पहिल्यापासून आयुष्याला सुरवात करायची असते. पहिला प्रश्न असतो, जरी इंग्रजी भाषा असली तरी उच्चारात प्रचंड फरक पडतो आणि ते उच्चार जिभेवर बसवण्यात कित्येक दिवस, महिने निघून जातात. सुरवातीला माझी बोबडी वळलीच होती. मी इंग्रजीत बोललेले समोरच्या व्यक्तीच्या कळत नाही आणि समोरचा बोललेलं, अवाक्षर समजत नाही. सुरवातीला त्रेधातिरपीट व्हायची. आता ऑफिसमध्ये काम करायचे म्हटल्यावर इतरांशी जुळवून घेणे भागच असते. बरे असेही सांगता येत नाही, मला काही समजले नाही!! सगळेच अंधारात हात पाय मारण्यासारखे होते. अशाच वेळी शांत, स्थिर चित्त आवश्यक असते कारण भाषा समाजात नाही, हे परदेशात कबूल करणे,ही नामुष्कीच असते. विशेषतः गोऱ्या लोकांचे बोलणे (खरंतर पुटपुटणे) समजून घेणे, हे महा कर्मकठीण! इथेच तुमची पहिली कसोटी असते आणि मला ती वारंवार द्यायला लागली. जवळपास, ३,४ महिन्यांनी भाषेचा थोडाफार अंदाज यायला लागला आणि आत्मविश्वास वाढला. पुढची पायरी, ही कामाचे स्वरूप समजावून घेणे, भारतातील कामाची पद्धत आणि साऊथ आफ्रिकेतील कामाची पद्धत यात महदअंतर आहे. सकाळी ८ वाजता ऑफिस सुरु आणि संध्याकाळी ४.३० किंवा ५ पर्यंत संपणार. ऑफिसची वेळ झाली की तडक बाहेर पडायचे. भारतात, ऑफिसची वेळ ठराविक नाही म्हणजे ऑफिस सुरु वेळेवर होणार पण घरी जायची वेळ, कामाच्या स्वरूपावर अवलंबून. त्यामुळे कामाचा बोजा आपल्यालाच उचलायला लागतो. त्यातून आमच्यासारखे परदेशातून इथे नोकरीला आलेले म्हणजे इथल्या लोकल लोकांच्या मनात अढी बसलेली. त्यांच्यामते, आम्ही इथल्या लोकांच्या पोटावर पाय आणणारे. अर्थात,हे सत्कृतदृष्ट्या चुकीचे नसले तरी आता इथे नोकरी करायला आलो आहोत तेंव्हा हा विचार मनातून काढून टाकून, आपली उपयुक्तता सिद्ध करणे, हे पहिले आव्हान. त्यासाठी कामात मेहनत घेणे अत्यावश्यक. मी तेच केले आणि जवळपास २ महिन्यात कामाचा अंदाज पक्का केला. हे करताना, शनिवार, प्रसंगी रविवारी देखील कामाला यायला लागले. मी शनिवारी कामाला येतो, ही बाब लोकल लोकांच्या पचनी पडणे अशक्य. मग आडून टोमणे मारणे, चेष्टा (अगदी तोंडावर नसली तरी त्यांच्या ग्रुपमध्ये) करणे, इत्यादी प्रकार चालायचे. मला ते सगळे नजरेआड करणे भाग होते. जसजसा हळूहळू स्थिरावयाला लागलो तशी लोकल लोकं मित्रत्वाच्या नात्याने बोलायला लागले. इथे एक दरी कायम असते, त्यांच्या मनातील अढी काढणे जवळपास दुरापास्त असते तरी कंपनीच्या मॅनेजमेंटची मला साथ असल्याने, लोकल लोकं गुमान बसलेले असत. अशावेळी आपणच पुढाकार घेऊन, गप्पा मारणे आणि त्यांचा विश्वास संपादन करणे, आवश्यक असते. ऑफिस कामाबद्दल तर संवाद व्हायचाच परंतु दुपारच्या जेवणाच्या सुटीत काहीतरी विषय काढून मित्र संबंध प्रस्थापित करणे, हा उद्योग सुरु करायला लागला. तोपर्यंत माझ्यासारखे जे भारतातून आलेले होते, त्यांच्याशी जवळीक साधलेली असायची आणि आम्ही सगळे एकत्र वावरत असायचो. मी मॅनेजमेंटचा माणूस, हा समज तर कायम लोकल लोकांच्या मनात असायचा. ही तारेवरची कसरत करत, लोकल लोकांशी मित्रत्वाचे संबंध जुळवले,इतके की पुढे मी त्यांच्या घरापर्यंत जाऊन पोहोचलो. अर्थात ही लोकल माणसे म्हणजे मुलाचे भारतीय पण आताची त्यांची इथलीच ५ वी किंवा ६ वी पिढी! अशा लोकांची ओळख वाढवणे, त्यामानाने सोपे होते आणि मी तेच केले. कुठूनतरी भारतातच विषय काढायचा आणित्यांची मते जाणून घ्यायची किंवा त्यांच्या बोलण्यात काही कार्यक्रमांचे सूतोवाच व्हायचे आणि मग शनिवार/रविवारी त्यांच्यात जाऊन मिसळायचे. अनिल वाटतो तितका *अबोल* नाही याची खात्री पटवून द्यायची. घेणे, हा कार्यक्रम सामायिक आवडीचा आणि तिथे माझी नाळ जुळली. ड्रिंक्स साठी जमल्यावर मग जीभा मोकळ्या सुटायच्या आणि मग त्यांच्याशी जवळीक साधणे फार सोपे झाले. तोपर्यंत भाषिक उच्चारांची सवय झाली असल्याने, मग गप्पा, अगदी चव्हाट्यावरील गप्पा देखील खुलायला लागल्या. पुढे, पुढे तर लोकल भारतीय माझ्यासाठी घरून काही खायचे जिन्नस घेऊन यायला लागले आणि संध्याकाळी घरी जायची वेळ झाली की माझ्या ताब्यात तो डबा द्यायचे, बहुतांशी केक, मिल्क टार्ट सारखे तत्सम सुके पदार्थ असत आणि संध्याकाळी भूक लागली की ते खायला बरे वाटत असते. पुढे, शुक्रवार किंवा शनिवार रात्री त्यांच्या घरी जमल्यावर मग जेवणाचा बेत व्हायचा आणि जरी भारतीय चवीचे चिकन किंवा मटण नसले तरी त्याची वेगळी अशी चव होती आणि ती निश्चितच चविष्ट होती. मी भारतातला असून सहजपणे खात आहे, हे त्यांच्या घरातल्यांना खूप आवडायला लागले. पुढे मग त्यांच्यासोबत *नाईट क्लब* गाठला आणि बऱ्याच रात्री तिथे काढल्या!! जसे घरात मिसळायला लागलो तशी त्यांच्या घरातील कार्यक्रमांना माझी उपस्थिती अनिवार्य वाटावी, इतका आग्रह व्हायला लागला. काही लग्न समारंभांना जायला मिळाले तर साऊथ आफ्रिकेत मुलाला २१ वय पूर्ण झाले की फार मोठी पार्टी केली जाते. रात्रभर खाणे, पिणे आणि नृत्याचा दंगा चाललेला असतो. बहुतेक घरांच्या पुढे किंवा पाठीमागे प्रशस्त हिरवळ असते आणि त्या हिरवळीवर *पेंडॉल* टाकून, त्यात सगळी मौज, मजा चालते. इथेच मला पाश्चात्य संगीतावर *पाय* कसे टाकायचे, याचे प्राथमिक शिक्षण मिळाले आणि मुख्य म्हणजे इथला लोकल समाज कसा आहे,याचे फार जवळून दर्शन झाले. काहीवेळा तर घरातली भांडणे देखील माझ्यासमोर झाली. अर्थात मी मात्र प्रत्येक वेळी काहीसे *अंतर* ठेऊन वागत होतो. किती झाले तरी मी इथे *नोकरी* करायला आलो आहे, ही भावना कायम माझ्या मनात असायची. त्यामुळे लोकल भारतीयांना पुढे माझ्याशी कितीही जवळीक साधायचा प्रयत्न केला तरी मी मात्र अंतर ठेऊन असायचो. माझी तिथल्या ३ कुटुंबाशी खूपच जवळीक होती (हे पीटरमेरित्झबर्ग इथे होते). पुढे मी हे शहर सोडले तशी हळूहळू संपर्क कमी झाला पण कधी हा या शहरात येत असे तेंव्हा या कुटुंबाची भेट घेत असे. अशाच एका भेटीत, एका कुटुंबात घटस्फोट झाल्याचे समजले म्हणून त्या बाईला भेटायला गेलो. तिनेच आपल्या नवऱ्याला घराबाहेर काढले होते. तिच्याशी यावेळी मात्र खूप गप्पा मारल्या आणि तिने देखील हाताचे काहीही राखून न ठेवता माझ्याकडे मन मोकळे केले. ते करताना, पूर्वीच्या नवऱ्याने, वेगळे झाल्यावर आठवड्याभरात दुसऱ्या मुलीशी संबंध जोडल्याचे सांगितले. सांगताना तिच्या डोळ्यांत अश्रू होते. माझी तिच्याशी जवळपास ४,५ वर्षांची ओळख होती, अगदी सुंदर नाते जुळले होते पण अशा प्रसंगी मीच अवघडल्या सारखा झालो. काय समजूत काढणार? आज या प्रसंगाला २० वर्षांहून अधिक वर्षे झाली तरीही आजही तो प्रसंग माझ्या डोळ्यासमोर आहे. साऊथ आफ्रिकेची कौटुंबिक अवस्था ही अशीच आहे आणि हे मला पुढे फार ठळकपणे दिसून आले. नवरा/बायको हे नाते कितीही जवळचे असले तरी ते आपण भारतीय जसे जपतो, तसा प्रकार तिथे अजिबात नसतो. एक घाव, दोन तुकडे, असा प्रकार वारंवार बघायला मिळाला आणि लग्नसंस्थेला काहीही अर्थ उरलेला नसल्याचे, मत ठाम झाले. पुढे गोऱ्या समाजात मला ख्रिसमस एन्जॉय करण्याची संधी मिळाली. गोरा समाज, तुम्हाला नेहमी एका मर्यादेपर्यंत ठेवतो, त्याच्या घरात प्रवेश मिळवणे जवळपास अशक्य. Standerton इथल्या नोकरीत मला ती संधी मिळाली आणि गोऱ्या समाजाचे *अंतरंग* अनुभवायला मिळाले. अर्थात ख्रिसमस सणाबद्दल मी एका ब्लॉग मध्ये लिहिले असल्याने, त्याची पुनरावृत्ती इथे करत नाही. इथल्या गोऱ्या लोकांच्या संस्कृतीचा, इथे भारतीय तसेच काळ्या समाजावर फार दाट पडलेला आहे. मानवी संबंध हे पूर्णपणे Materialistic ठेवायचे, पैसे आहे तोपर्यंत संबंध, पैसे संपल्यावर, अंगावरील कपडे काढून टाकावेत आणि नागवे व्हावे, तसे नातेसंबंध संपवून टाकायचे. ना खेद, ना खंत. पुन्हा नव्या उत्साहाने आयुष्य सुरु करायचे, ही इथली नेहमीची पद्धत. सुरवातीला मला खूप आश्चर्य वाटायचे पण ही इथली संस्कृती आहे म्हटल्यावर, ना मी कुणाला समजावयाला गेलो ना कुणाशी बोलायला गेलो. कुणाशी बोलून कसलाच फरक पडणार नाही, याची खात्री असायची. परदेशी राहायला लागल्यावर माझ्यात खूप फरक पडला. ते साहजिकच आहे, साऊथ आफ्रिकेत उणीपुरी १६ वर्षे काढल्यावर फरक तर पडणारच. मुख्य म्हणजे मी बराच स्वावलंबी झालो. स्वतःच्या हाताने जेवण करायला शिकलो, शिकावेच लागले अन्यथा उपाशी जगण्याची वेळ येणार. जो अनिल मुंबईत असताना, साधे मिरच्या,कोथिंबीर आणत नसे, तोच अनिल तेंव्हा आठवड्याच्या आठवड्याचा घरातील भाज्यांचा हिशेब ठेवायला लागला आणि जेवण करायला लागला. पुढे पुढे तर मांसाहारी डिशेस देखील शिकला आणि मित्रांसाठी बनवायला लागला. भारतात असताना, केवळ मित्रांशीच संबंध राखणारा अनिल, पुढे अनोळखी व्यक्तींशी संबंध साधायला लागला. तितका आत्मविश्वास निश्चितपणे वाढला. मी तिथे एकटा रहात होतो तेंव्हा तब्येतीची काळजी घेणे, माझे मलाच बघायला लागायचे आणि ते देखील करायला शिकलो. दुसरा तरुणोपाय नव्हतो. एकूणच आयुष्यावर बराच परिणाम झाला. काही प्रत्यक्ष तर काही अनावधानाने लक्षात येतात. माझे तर आता ठाम मत आहे, व्यक्तित्व प्रगल्भ करायचे झाल्यास, माणसाने परदेशात निदानपक्षी ३,४ वर्षे सलग काढावीत. आपली आपल्यालाच वेगळी ओळख मिळते.

Thursday, 15 December 2022

रायन मिरांडा

रायन मिरांडा. नावावरून साऊथ आफ्रिकन वाटू शकतो परंतु प्रत्यक्षात मुंबईतील चेंबूर भागातील मूळचा रहिवासी. मुळातला रहिवासी म्हणण्याचे कारण रायन १९९२ साली साऊथ आफ्रिकेत आला आणि अजूनही त्या देशातच आहे. किंबहुना आता बहुदा कायमचा तिथला नागरिक व्हायचा विचार असणार. अर्थात कायद्यान्वये तो आता तिथला नागरिक कधीच झाला आहे म्हणा. निमगोरा वर्ण, ६ फुटाच्या उंची, दिसायला देखणा असल्याने त्याची दुसऱ्यावर छाप लगोलग पडते. वास्तविक मुंबईचा असून त्याची माझी ओळख तशी बऱ्याच उशिराने झाली पण नंतर मैत्री खूपच रंगली. एकतर तो बरेच वर्षे जोहान्सबर्ग इथेच नोकरी करत होता. प्रिला २००० या कंपनीत जोहान्सबर्ग इथे राहात होता आणि मी पीटरमेरित्झबर्ग इथे!! मी पीटरमेरित्झबर्ग सोडून डर्बन जवळ नोकरी शोधली तेंव्हा माझ्या कंपनीच्या गृप कंपनीत रायन होता. १९९९ च्या सुमारास मला या देशात ५ वर्षे झाली आणि मला Internal Affairs Department चा मेल आला. माझी ५ वर्षे होऊन गेली आहेत तेंव्हा आता Work Permit वाढवून मिळणार नाही!! तेंव्हा २ मार्ग आहेत. एकतर देश सोडायचा किंवा Permanant Residency साठी अप्लाय करायचे.माझ्या कंपनीने मला कायमचे नागरिकत्व स्वीकारण्याची परवानगी दिली आणि मी कागदी घोडे नाचवायला सुरवात केली. याचवेळी कंपनीने मला, जोहान्सबर्ग इथल्या रायनशी संपर्क करायला सांगितले. रायन तिथल्या वजनदार लोकांशी जवळून संपर्क ठेऊन होता, बहुदा आजही असेल. मला ४,५ महिन्यात नागरिकत्व मिळाल्याचे पत्र मिळाले. जोहान्सबर्ग इथे रायनने आपली ओळख वापरून मला त्या देशाचे ID Card मिळवीन दिले. आता मी साऊथ आफ्रिकेचा कायद्यान्वये नागरिक झालो होतो. तोपर्यंत तरी माझा रायनशी फोनवरूनच संपर्क होता. पुढे त्याची बदली पीटरमेरित्झबर्ग इथल्या प्लांट मध्ये झाली आणि रायन अधून मधून आमच्या ऑफिसमध्ये यायला लागला. अशा वेळी माझी त्याची ओळख झाली. डर्बन आणि पीटरमेरित्झबर्ग, या दोन शहरात फक्त ९० किमी यानंतर असल्याने, त्याला आमच्या ऑफिसमध्ये यायला काहीच अडचण होत नव्हती. २००१ च्या सुमारास माझ्या तब्येतीच्या कटकटी वाढायला लागल्या आणि मी भारतात परतलो. अर्थात आता मी साऊथ आफ्रिकेचा नागरिक असल्याने, मला या देशात यायला व्हिसाची गरज नव्हती. तिकीट काढायचे आणि साऊथ आफ्रिकेत पोहोचायचे,, असा साधा मामला होता. काही महिन्यांनी तब्येत बऱ्यापैकी सुधारली आणि मी पुन्हा या देशात यायचे ठरवले. एव्हाना, माझी पहिली कंपनी पुन्हा सुरु झाली होती आणि मला हरूनने पुन्हा बोलावले. या वेळी मात्र बाकीची ४ भावंडे एकत्र आणि हरून वेगळा, अशी कंपनीची मांडामांड झाली होती. हरूनने कॅपिटल सोप लिमिटेड आपल्याकडे ठेवली. अर्थात मी त्या कंपनीत आलो. आता मी आणि रायन खूपच जवळ रहायला आलो. त्यामुळे आमच्या गाठीभेटी वाढल्या, गप्पागोष्टी सुरु झाल्या. रायनची बायको, शांती देखील माझ्या चांगल्या ओळखीची झाली. ती देखिल मुंबईची असल्याने, ओळख वाढायला काहीच अडचण झाली नाही. रायनचे घर अतिशय प्रशस्त आहे. ४ बेडरूमचे घर आणि बॅकयार्ड मध्ये तर पोहोण्याच्या तलावापासून सगळ्या सुविधा आहेत. प्रचंड मोठी बाग आहे. अतिशय ऐषारामात रायन तिथे राहात आहे. घराच्या पुढे प्रशस्त हिरवळ आहे. घर तसे थोडे मुख्य रस्त्यापासून वरच्या अंगाला आहे. मला त्या घरात कधीही यायला,जायला मुभा होती. रायन प्रिला कंपनीत डायरेक्टर पदावर असल्याने,आर्थिक सुबत्ता आहे. त्याच वर्षी त्याच्या मुलीचा वाढदिवस (बहुदा ३,४ असावा, आता इतके आठवत नाही) आणि त्याने घरी जंगी पार्टी ठेवली होती. घरात ड्रिंक्स ओसंडून वहात होते, तर खाण्याचे पदार्थ भरपूर होते, रात्रभर नाच गाणी चालू होती, नुसता दंगा चालला होता. पहाटे मी घरी परतलो पण आजही मला ती पार्टी लख्खपणे आठवत आहे. त्या पार्टीनंतर मी त्याच्या घराचा जवळपास सदस्य असल्यासारखा, त्या घरात वावरू लागलो. त्या दोघांना बहुदा माझा स्वभाव आवडला असावा. पुढे मी अनेक ठिकाणी नोकरीच्या निमित्ताने राहायला गेलो पण रायनशी संबंध कायम होते - आजही आहेत. मी Standerton इथे नोकरीला होतो. वास्तविक इथून पीटरमेरित्झबर्ग जवळपास ५०० किमी लांब तरीही मी काही शुक्रवारी दुपारीच गाडी काढून, त्याच्याकडे वीकएंड साठी जात असायचो. मी एका बाजूला गावात राहतो आणि एकटा राहतो, याचे शांतीला बरेच कौतुक वाटायचे. २००९ साली मी पुन्हा भारतात येऊन स्थिरावयाचे प्रयत्न केले पण काही जमले नाही. तेंव्हा परत साऊथ आफ्रिकेत जायचे ठरवले तेंव्हा याच मित्राची प्रथम आठवण आली. मुंबईहून फोन करून विचारणा केली तेंव्हा त्याने नि:शंकपणे त्याच्या राहायला यायचा आग्रह केला. इतकेच नाही, मी डर्बन एयरपोर्ट पोहोचलो तेंव्हा मला न्यायला स्वतः आला होता. आता त्याचे घर राहायला मिळाल्याने, मी देखील आश्वस्त झालो.नव्यानेपुन्हा परदेशात जायचे तर राहायचे कुठे? हा प्रश्न सर्वात प्रथम असतो आणि रायनने त्या प्रश्नातून माझी सोडवणूक केली. त्याच वेळी मला जोहान्सबर्ग इथे नोकरी मिळाली आणि मी पुन्हा एकदा पीटरमेरित्झबर्ग सोडले. जरी मी जोहान्सबर्ग इथे आलो तरी माझा त्याच्याशी संपर्क कायम होता. परंतु यावेळेस, जोहान्सबर्ग इथे माझ्यावर जीवघेणा हल्ला झाला आणि मी मनाने डचमळलो. परत कायमचे मुंबईला जायचे ठरवले आणि मी मुंबईला आलो. अर्थात आजही माझा रायनशी WhatsApp वरून संपर्क आहे आणि आम्ही तिथे चेष्टामस्करी तर करतोच परंतु एकमेकांची काळजी देखील करतो. या मित्राने माझ्यासाठी साऊथ आफ्रिकेत बरेच काही केले. सगळे मी इथे लिहिणार नाही कारण तो सगळे मैत्रीच्या खातर केले. त्याची जाहीर वाच्यता करणे योग्य नाही.

Wednesday, 14 December 2022

विनय

माझी साऊथ आफ्रिकेतील पहिली नोकरी ही *कॅपिटल ऑइल मिल्स* या कंपनीत होती. कंपनीचा मॅनेजिंग डायरेक्टर - हरून इसाक आणि (फोनवरून झालेली ओळख) अजय राव वगळता, कुणाशीही वैय्यक्तिक संबंध आलेला नव्हता. हरून तर मुंबईतच भेटलेला होता आणि त्यानेच माझी निवड केली होती. पहिल्याच दिवशी अजयशी गाठभेट झाली आणि अजय मुंबईतला निघाला, हे ऐकून मनाला बरे वाटले. त्याच्याच केबिन बसलो असताना, त्याने विनयला बोलावून घेतले आणि माझी ओळख करून दिली. तेंव्हा चुकूनही मनात आले नव्हते की या मुलाशी माझी दीर्घ काळ मैत्री टिकेल, अगदी आजही आमची मैत्री आहे. काहीसा स्थूल, डोळ्यांवर चष्मा, मुलायम केस आणि मंगलोर इथला आणि तिशी देखील उलटलेला नव्हता, इतपत तरुण होता ( पुढे ३,४ वर्षांनी त्याचे लग्न झाले) इतकीच प्राथमिक ओळख झाली. त्यावेळी त्याच्या अंगावर लाल रंगाचा टीशर्ट होता. अर्थात पहिल्या भेटीत काय गप्पा मारणार म्हणा. नंतर कळले, विनय माझ्याच सोबत ऑफिसमध्ये काम करीत आहे आणि मुख्य म्हणजे माझा शेजारी आहे. तेंव्हा विनय, जयराज (हा मुख्यतः प्लांट मध्ये होता.) सोबत घर शेअर करत होता तर माझ्या सोबत असाच एक मल्याळी मुलगा होता (आता त्याचे नाव विसरलो कारण तो ७,८ महिन्यात नोकरी सोडून गेला.) कॅपिटल ऑइल मिल्सचा पसारा तसा मोठा होता. खाद्य तेलाच्या (सनफ्लॉवर तेल) निर्मितीचा एक प्लांट होता आणि त्याच्या जोडीला दुसरा नवीन प्लांट उभारण्याचे काम सुरु झाले होते. त्याचा जोडीने कार्टन उत्पादन प्लांट आणि घरगुती आंघोळीच्या साबण निर्मितीचा प्लांट, असा सगळा पसारा होता. दुपारचा पोहोचलो होतो, त्यामुळे तशा गप्पा फारशा झाल्या नाहीत पण विनय ऑफिसमध्येच असतो हटल्यावर एकत्रितपणे रोज निघायचे, असे ठरले. कंपनीने आम्हाला राहायला जागा दिली होती पण त्या जागा म्हणजे दिव्यच होते. तिथे भारतातून आलेले सगळे राहात होते. दुसऱ्या दिवशी अजयने ऑफिसमध्ये बोलावून कामाची सर्वसाधारण कल्पना दिली. माझे सर्वात महत्वाचे काम म्हणजे तिथल्या अकाउंटिंग पॅकेजची माहिती करून घेणे. विनय प्रामुख्याने IT मधील अनुभवी होता पण अकाउंट्स मध्ये शिरकाव करून घेतला होता. माझ्या आधी ३,४ महिनेच तो इथे आला होता. माझ्या सोबत *नसीमा* म्हणून एक मुस्लिम युवती कामाला होती.ती इथे बरीच वर्षे असल्याने, पहिल्याच दिवशी तिच्याकडून कामाचे स्वरूप समजावून घेतले. नसीमा अतिशय हुशार आणि स्मार्ट होती. ही कंपनी मुस्लिम लोकांची आणि एकूण ५ सख्खी भावंडे, त्यांनी सुरु केली होती. अर्थात,भावंडांचे एकमेकांच्यात जराही पटत नव्हते, अगदी प्रसंगी वैमनस्य वाटावे, इतकी कुरघोडी चालायची. ऑफिस म्हटल्यावर राजकारण हे सोबत असतेच परंतु इथे प्रत्येक भावाचे एकमेकांशी फारसे पटत नव्हते. विशेषतः हरून आणि इतर भावंडे असे राजकारणाचे स्वरूप असायचे पण हरूनकडे ४९% कंपनीचे शेयर्स असल्याने, इतर भावंडे त्याचे गुमानपणे ऐकत असत. नसीमा ही युसूफच्या (हा एक डायरेक्टर होता) ओळखीने आलेली असल्याने, हरूनचे आणि तिचे फारसे सख्य नव्हते आणि हे नसीमाला माहीत होते पण तिने दोन दगडांवर उभे राहायची कला साधून घेतली होती. ऑफिसमध्ये बव्हंशी स्थानिक भारतीय कामाला होते त्यांच्यातील *अजीथ* (अजित नव्हे), *थीगेसन* या दोघांशी माझी मैत्री बरीच काळ राहिली. विनयला लिनेट म्हणून एक सहाय्यक होती. अर्थात ती देखणी असल्याने, ओळख वाढल्यावर तिच्यावरून आमची बरीच चेष्टामस्करी चालायची. बोलायला अतिशय मोकळा होता. लग्न झाले नसल्याने आणि मी सडाफटिंग असल्याने, आमची ओळख लवकरच घट्ट मैत्रीत झाली. भारतीय संस्कृतीप्रमाणे, मी, विनय आणि अजय रोज उशिरापर्यंत ऑफिसमध्ये बसत असू. अर्थात कामाचा रगाडा दणकून असायचा. सगळ्या सिस्टीम्स नव्याने सुरु करून रुळवून घ्यायच्या होत्या. विनय अर्थातच IT मध्ये माहीर होताच पण अकाउंट्स मध्ये देखील त्याने लगोलग प्राविण्य मिळवले. शुक्रवार रात्र किंवा शनिवार रात्र विनय,मी आणि जयराज एकत्र बसत असू. तिघेही सडाफटिंग असल्याने, काय करायचे? हा प्रश्नच नसायचा, कसे करायचे? हेच फक्त ठरवत असू. एखादी ड्रिंक्सची बाटली आणायची, हा मुख्य कार्यक्रम असायचा. आमचे ग्लासेस भरले की मात्र आमच्या जिभा मोकळ्या व्हायच्या. एकमेकांच्या खोड्या काढणे नित्याचे असायचे पण त्या अतिशय निखळपणे काढत असू, त्यात कुठेही वैय्यक्तिक हेवेदावे नसायचे. आता एकाच ऑफिसमध्ये काम करताना, कधीकधी मतभेद व्हायचे पण त्याचे पडसाद अशा प्रसंगी कधीही उमटले नाहीत आणि याचे श्रेय विनयकडे देखील तितकेच जाते. अजय कुटुंबासमवेत राहात होता. त्याची बायको चित्रा देखील आमच्याच कंपनीत R&D डिपार्टमेंट मध्ये कामाला होती. तिच्याशी तर आमची गट्टी म्हणावी इतकी ओळख झाली होती. अजय पुढे २००४ साली कॅनडा मध्ये गेला आणि आमच्या मैत्रीत खंड पडला. चित्रा तर आमच्यात बसून, आमच्या गप्पात देखील सामील व्हायची. कधी कधी मग चित्रा मला आणि विनयला घरी जेवायला बोलवायची. त्याच्याआधी, ती ऑफिसमध्ये यायची आणि आम्हाला आमंत्रण द्यायची. विनयची आणि चित्राची जवळीक जास्त होती त्यामुळे मग विनय तिला सांगायचा, आम्हाला जेवायला काय हवे. सुरवातीला मी थोडा बुजून होतो पण चित्रा माझ्याशी जेंव्हा मराठीत बोलायला लागली (अजय आणि चित्रा हे मूळचे चेंबूर इथले) तेंव्हा माझा धीर चेपला आणि मी मोकळा झालो. विनय आणि मी, मेहनतीत कधीही कमी पडलो नाही, इतके की बऱ्याचवेळा शनिवारी देखील संध्याकाळ होईपर्यंत, आम्ही तिघे ऑफिसमध्ये काम करत असू. अजयचे घर अगदी हक्काचे वाटावे असेच झालेले होते. शनिवार उशीर झाला की अजय घरी फोन करून आम्ही दोघे जेवायला घरी येत आहोत, असे कळवायचा. आम्ही दोघे नि:श्वास टाकायचो कारण घराचे जेवण मिळणार!! खरंतर *पीटरमेरित्झबर्ग* हे छोटेखानी शहर आहे आणि निरनिराळ्या टेकड्यांवर वसलेले आहे. त्यामुळे तिथे ऋतुमान थोडे टोकाचे आहे, म्हणजे थंडी जरी हाडे गोठवणारी नसली तरी अंगात *जॅकेट* घालणे जरुरीचे असायचे. मी जेंव्हा नवीन होतो, तेव्ह्न मला विनयने बरेच सांभाळून घेतले. ऑफिसमधील सहकारी कसे आहेत, त्यांचा स्वभाव कसा आहे, हे सगळे मोकळेपणाने आमच्या *बैठकीत* विनयने मला सांगितले असल्याने, मला देखील मोकळेपणाने ऑफिसमध्ये वावरता आले. पुढे ऑफिसमधील एक सहकारी *टोनी*, याच्याबरोबर ओळख वाढली आणि त्याने आम्हा दोघांना तिथल्या *नाईट क्लब* चे दर्शन घडवले. खरंतर आज विचार करता, आम्ही जेंव्हा केंव्हा तिथे जात होतो तेंव्हा आम्हला परकेपणाची जाणीव जास्त व्हायला लागली कारण तिथे गोरी माणसे त्यांच्यातच मश्गुल असायची, कृष्ण वर्णीय देखील त्यांच्यातच रममाण असायची आणि राहिले ते स्थानिक भारतीय!! स्थानिक भारतीय हे आम्ही आमच्या सोयीचे म्हणून म्हणत होतो पण संस्कृती बघितली तर *अमेरिकन* म्हणावेत असेच आहेत. त्यामुळे बरेचवेळा आम्ही दोघेच ग्लास हातात धरून इतरांचे नृत्य बघत असायचो. मग प्रश्न आला, पैसे खर्च करून, इथे ड्रिंक्स घ्यायचे असेल तर मग घरी बसून घेतलेले काय वाईट? निदान पैसे तरी वाचतील.नाईट क्लबमध्ये ड्रिंक्स महागडेच असते. आम्ही जवळपास ३ वर्षे एकत्र काम करत होतो. मध्यंतरी अजय नोकरी सोडून डर्बन इथे गेला आणि त्याच्या जागी *नोलन* म्हणून स्थानी भारतीय रुजू झाला. तो म्हणजे सगळ्याचा वरताण नमुना होता. आपण साहेब आहोत, याची त्याला प्रचंड गुर्मी होती आणि तशी गुर्मी तो अगदी डायरेक्टर असले तरी दाखवायचा. स्थानिक भारतीयांचा हा सगळ्यात मोठा प्रॉब्लेम म्हणजे त्यांना असणारा Superiority Complex*! विनय या सगळ्यांना पुरून उरायचा कारण आम्हाला हरुनचा असलेला पाठिंबा. एक मात्र नक्की, हरून कायम आमच्या पाठीशी उभा असायचा. अर्थात आधी विनयने आणि नंतर मी देखील त्याला आमचा इंगा दाखवल्यावर, आमच्याशी सूताप्रमाणे वागायला लागला. हळूहळू कॅपिटल ऑइल मिल, आर्थिक डबघाईला यायला लागली होती. कंपनी बंद पडणार हे जवळपास विधिलिखित होते आणि तशी विनयला अजयच्या कंपनीत संधी मिळाली आणि त्याने पीटरमेरित्झबर्ग कायमचे सोडले. विनय नाही म्हटल्यावर मला देखील ऑफिसमध्ये चुकल्या चुकल्यासारखे व्हायला लागले. सुदैवाने, मला Hammersdale इथे (डर्बन पासून २०,२५ किमी, लांब) नोकरी मिळाली. खरतर अजयनेच मला सांगितले आणि मला तिथे संधी मिळाली. नव्या नोकरीत रुजू झालो आणि जरी विनय आणि माझ्या रोजच्या रोज होणाऱ्या भेटी चुकल्या तरी फोनवरून संपर्क असायचा तसेच मी त्याच्याकडे शुक्रवारी किंवा शनिवारी रात्री राहायला जात असे. तेंव्हा तो देखील एकटाच होता. मी त्याला दुपारचा फोन करत असे आणि सरळ त्याचे घर गाठत असे. त्याच्याबरोबर मी डर्बन खूप उपभोगले. अर्थात डर्बन इथेच अजय रहात असल्याने, त्याच्या घरी जाणे, क्रमप्राप्तच होते. डर्बन इथल्या कंपनीत मात्र विनय पूर्णपणे रुळला आणि खूप मोठा झाला, इतका की त्या कंपनीचा *फायनान्स डायरेक्टर* होण्याइतकी मजल मारली. डर्बन इथल्या घरी मात्र मी खूप मजा केली, अगदी पुढे त्याने लग्न करून पल्लवीला तिथे आणले तरी मला त्याच्या घरी जायला कधीही वावगे वाटले नाही. पल्लवीशी देखील माझी सुंदर ओळख झाली. मी पुढे बऱ्याच नोकऱ्या बदलल्या पण विनय त्याच कंपनीत टिकून राहिला. पुढे त्याने डर्बन सोडले आणि जोहान्सबर्ग इथल्या कार्यालयात कामाला रुजू झाला आणि मी प्रिटोरिया इथे नोकरीला आलो. आता प्रिटोरिया आणि जोहान्सबर्ग ही *जुळी* शहरे म्हणावीत, इतकी चिकटलेली असल्याने, पुन्हा माझे विनयच्या घरी येणेजाणे सुरु झाले. त्याने तर मला स्पष्ट सांगितले होते, त्याच्या घरातील एक खोली म्हणजे अनिलची बेडरूम!! त्याचे तसे खूप प्रशस्त घर होते आणि मुख्य म्हणजे तो कुटुंबासमवेत रहात होता. मी त्याच्याकडे आलो की ड्रिंक्स वगैरे सोपस्कार तर व्हायचेच पण निरनिराळ्या गप्पा रात्री उशीरापर्यंत चालू असायच्या, मग त्या क्रिकेटवर असतील किंवा जुने सहकारी असतील. पल्लवी देखील मूकपणे आमच्या गप्पात सामील व्हायची. अर्थात पुढे एक दिवस असा आला, मला भारतात परतायचा निर्णय घ्यावा लागला आणि मी कायमचा भारतात परतलो. विनय देखील काही महिन्यांनी भारतात - मंगलोर इथे परतला. अर्थात आता प्रत्यक्ष गाठभेट तशी दुरापास्त झाली अ

Friday, 4 November 2022

टेबललॅन्ड - केप टाऊन

खरंतर केप टाऊन शहर, हाच निसर्गाचा उत्सव आहे. एकतर दक्षिण गोलार्धाचे अंतिम टोक म्हणून जगप्रसिद्ध आहे. केप ऑफ गुड होप बघताना, आपण पृथ्वीच्या एका टोकाला उभे आहोत, हि जाणीव कधीच विसरली जात नाही. त्यातून, केप ऑफ गुड होप, हे एक छोट्या डोंगरावर आहे. तिथून खाली उतरायला परवानगी नाही. तिथून खाली व्यवस्थित बघता येते. एका बाजूला अटलांटिक महासागर आणि दुसऱ्या बाजूला हिंदी महासागर, स्पष्टपणे ओळखता येतात. हिंदी महासागराचे काळसर पाणी तर अटलांटिक महागराचे निळसर पाणी बघता येते. आपण पृथ्वीच्या टोकाला आहोत आणि जिथे कुठे नजर जाते तिथे फक्त पाणी दिसते. जरा लांबवर बघितले तर खवळलेला समुद्र दिसतो. असे पाणी बघताना, मनात एक भाव सतत असतो, या पाण्याच्या पलीकडे नक्की काय असेल? अर्थात कुठेतरी लांबवर अंटार्क्टिक बेट आहे पण नजरेच्या कुठल्याच टप्प्यात ते दिसणे अशक्य आहे. त्यामुळे पाण्याचे साहचर्य, काहीवेळा भयावह वाटू शकते. मी ४ वेळा तरी या स्थळाला भेट दिली आहे. एकदा पार आत लांबवर, व्हेल मासा पोहत असल्याचे दिसले आणि जरी आम्ही मित्र सुरक्षित असलो तरी एकूणच त्याचे आकारमान निश्चितच भयप्रद असे होते. केप टाऊन शहर निसर्ग सौंदर्याने वेढलेले आहे. शहरात झाडी तर आहेच परंतु एकूणच हिरवळीचे प्रमाण भरपूर आहे. शहराच्या बाजूलाच वेगवेगळ्या वायनरीज असल्याचा परिणाम असणार पण हिरवळ भरपूर आढळते. एकत्र दक्षिण गोलार्धाच्या टोकाला हे शहर वसलेले असल्याने, जून,जुलै महिन्यात हाडे गारठवणारी थंडी अनुभवायला मिळते. अगदी अंगात जॅकेट वगैरे घातलेले असले तरी देखील चेहरा झाकून घ्यायला लागतो. विशेषतः दुपार कलायला लागली की काळोख पसरतो आणि थंडीचे साम्राज्य सुरु होते. शहरात काही अप्रतिम समुद्र किनारे आहेत आणि अर्थात आधुनिक सुखसोयी असल्याने, किनाऱ्यावर नुसते बसून राहणे, हा देखील आनंदोत्सव असतो. हातात बियरचा थंडगार ग्लास घ्यायचा आणि किनाऱ्यावर एखाद्या खुर्चीवर निवांतपणे बसून राहणे, हा अनिर्वचनीय अनुभव असतो. अर्थात असे समुद्र किनारे डर्बन शहराला लाभले आहेत, त्यामुळे समुद्र किनारे म्हणून काही नवल वाटत नाही परंतु सुखसोयी उपभोगणे, हा वेगळाच आनंद असतो. मी एकदा जून महिन्यात, मित्रांबरोबर या शहरात आलो असताना, मुद्दामून "सी पॉईंट" इथल्या किनाऱ्यावर संध्याकाळी, अक्षरशः वारा भणाणत असताना, मुद्दामून थंडगार बियर घेऊन, बसलो होतो. तापमान जवळपास ३ इतके उतरले होते आणि अक्षरश: दात वाजत होते तरीही मनाचा हिय्या करून तासभर, तिथे बसलो (बियर सेवन चालूच होते). असा अनुभव चुकूनही डर्बन इथे येत नाही. डर्बन इथले हवामान बरेचसे मुंबई सारखे असते, फक्त मुंबईत घामाच्या धारा सहन कराव्या लागतात तर डर्बनचे अतिशय ड्राय हवामान असते. अशाच एका फेरीत आम्ही मित्र इथल्या जगप्रसिद्ध "टेबललँड" या डोंगरावर जायचे ठरवले. खरंतर हा डोंगर, हीच या शहराची खरी ओळख आहे. महासागराच्या एका अंगाला पाचर मारून, हा डोंगर उभा आहे. डोंगराच्या पायथ्याशी तुम्ही गाडी ठेवायला लागते. या डोंगरावर ट्रेकिंग करायची परवानगी नाही! पायथ्याशीच केबल कार मिळते. केबल कार म्हणजे काचेची केबिन असते आणि विजेच्या केबल्सने ती डोंगराच्या पठारावर आणू सोडते आणि तुम्हाला वेळ तेंव्हा, तुम्ही याच केबल कारने खाली येऊ शकता. खालून वर जाताना, सगळे केप टाऊन शहर बघता येते. ते दृश्य विलोभनीय असते. ही काचेची केबिन, पूर्णपणे बंदिस्त असते आणि अर्थात सुरक्षित असते. अतिशय हळू वेगाने केबल कार वर चढत असल्याने, आपण सगळे शहर बघू शकतो. वर गेल्यावर मात्र निसर्गाचा खरा प्रताप अनुभवायला मिळतो. केबिन बंदिस्त असल्याने, बाहेरील वातावरणाचा "प्रसाद" अनुभवायला मिळत नाही. मी जेंव्हा प्रथमच आलो होतो तेंव्हा डिसेंबर महिना होता, म्हणजे कडाक्याचा उन्हाळा होता परंतु इथे या पठारावर पाऊल ठेवले आणि थंडीने अंग शहारून निघाले!! डोंगर माथ्यावर विस्तीर्ण असे पठार आहे. त्यामुळे तुम्ही भरपूर पायी हिंडू शकता. भर दुपारी, डोंगराच्या पायथ्याशी २५ तपमान असते आणि काही मिनिटांत तुम्हाला ५,६ तपमानात वावरावे लागते!! त्यातून, वारा नुसता सुसाटलेला असतो. अर्थात जून,जुलै महिन्यात, तिथे जायला बंदी असते कारण कडाक्याची थंडी!! आजूबाजूला सावलीला म्हणून झाड नाही. तसेच तिथे, इतर पर्यटन स्थळांवर निदान एखादे छोटेखानी रेस्टॉरंट असते पण इथे तसली एकही सुविधा नाही. निसर्गाचा चमत्कार अनुभवणे, हा आनंदाचा भाग असतो. डोळे उन्हाने दिपून जातात पण शरीर थंडीने काकडलेले असते!! तुम्ही फारतर अर्धा,पाऊण तास तिथे राहू शकता पण तेव्हड्या वेळात, तुम्ही आयुष्यभराचा अनुभव गाठीशी बांधून घेता. वास्तविक पाहता, हा नैसर्गिक चमत्कार आहे परंतु हाच डोंगर, या शहराची ओळख करायची, त्याचे व्यावसायिक पद्धतीने मार्केटिंग करायचे आणि एक जगप्रसिद्ध पर्यटन स्थळ म्हणून गणना करून घ्यायची, हे इथल्या सरकारचे खरे यश म्हणायला हवे.

Wednesday, 14 April 2021

पीटरमेरिट्झबर्ग - स्मरण

वास्तविक या शहराबद्दल मी आधीच लेख लिहिले आहेत तरी आत्ता *आतून* काहीतरी सुचले. साऊथ आफ्रिकेतील १५ वर्षांच्या वास्तव्यात पहिली ३ वर्षे मी या शहरात घालवली. म्हणून असेल पण आजही माझ्या मनात या शहराबद्दल, मनात कुठेतरी ममत्व आहे. याच शहराने मला, या देशात कसे राहायचे, कसे वागायचे, याचे प्राथमिक धडे दिले. तसेच इथे आम्हा मित्रांचा जसा गृप जमला तसा मला इतर शहरांत वावरताना जमवता  नाही. एखाद्या गावाबद्दल तुमच्या मनात का ममत्व वाटते, याचे संयुक्तिक कारण सांगणे काही वेळा तर्कशास्त्राच्या पलीकडचे असते, हेच खरे. तसे गाव टुमदार आहे, जवळपास ७,८ टेकड्यांवर वसलेले आहे, गावात भारतीय वंशाची बरीच मोठी वस्ती आहे आणि तिथे हिंडताना, मला, माझ्या मुंबईचे कधीही विस्मरण झाले नाही. दुसरे असे या गावाने मला त्यांच्या ज्या सहजतेने सामावून घेतले तसे इतर शहरांच्या बाबतीत विरळा घडले. या देशातील माझा पहिलाच अनुभव असेल पण हे शहर मला आजही आपल्या पुण्यासारखे वाटते. इथे Raisethorpe नावाचे उपनगर आहे. तेंव्हा मी तिथल्या Mountain Rise या उपनगरात राहात होतो आणि Raisethorpe हा भाग अगदी जवळपास चिकटून होता आणि इथेच भारतीय वंशाचे लोक भरपूर राहतात. या भागात मी सुरवातीला कितीतरी वीकेंड्स मनमुरादपणे घालवले. इथेच मी नाईट क्लब म्हणजे काय, याचा अनुभव घेतला. या गावाने मला बऱ्याच गोष्टी शिकवल्या, मुळ्या या देशातील चालीरीतींचा रोकडा अनुभव दिला जो पुढे मला भरपूर उपयोगी पडला. जून,जुलै मधील हाडे गारठवणारी थंडी दाखवली आणि तितकीच डिसेंबर, जानेवारीमधील उहाची काहिली सहन करायला लावली. वास्तविक मी राहात होतो, तो भाग प्रामुख्याने गोऱ्या वस्तीचा होता आणि अर्थातच *गोरी* संस्कृती नव्याने शिकता आली. १९९४ मध्ये कायदा व्यवस्था तितकी मोडकळीस आली नव्हती आणि म्हणून मी बरेचवेळा एकटाच पायी हिंडत असे. पायी हिंडले की मग हळूहळू गावाचा स्वभाव तुम्हाला कळायला लागतो, त्या स्वभावाशी जुळवून घेता येते. अशा  कितीतरी रविवार संध्याकाळ मी, माझ्याशीच हितगुज करत, त्या गावाचे रस्ते पायी हिंडून, पिंजून काढले. रविवार संध्याकाळ कधीकधी अंगावर यायची आणि *एकटेपणा* भोवंडायला लागायचा. अशाच वेळी, एकट्याने बाहेर हिंडायला सुरवात केली म्हणजे मग मनावर साचलेले मळभ दूर व्हायला मदत व्हायची. त्यातून हवेत गारवा असेल तर बघायलाच नको. अंगात साधे जॅकेट घालायचे आणि नि:संकोच हिंडायला बाहेर पडायचे, असाच माझा रिवाज होता. वास्तविक या देशात *पायी हिंडणे* फारसे प्रचलित नाही पण तरीही आपण बिनदिक्कतपणे हिंडण्यात वेगळीच मौज असते. कुठ्लाही हेतू न बाळगता हिंडले म्हणजे फार मजा यायची, हे खरे. रस्त्यावर फारशी वर्दळ नाही, ओळखीचे भेटण्याची शक्यता कमीच अशा वेळी, स्वतःचा स्वतःशी मूक संवाद स्वतःला स्वतःची वेगळीच ओळख करून द्यायची. याच हिंडण्यात, माझे पाय *जमिनीवर* ठेऊन वागण्याची सवय जडली आणि ती आजतागायत टिकलेली आहे. सुरवातीच्या वेळी मी walkman कानाला लावून हिंडत असे पण नंतर लक्षात आले, आपला संवाद या हिंडण्यात होत नसून, गाणी ऐकण्यातच वेळ जात आहे!! मग Walkman घरात ठेऊन हिंडणे सुरु झाले. मी कोण आहे? मी इथे कशाला आलो आहे? हे प्रश्न तर नित्याचेच सोबतीला असायचे पण अशाच वेळी मनातली दडून बसलेली मुंबई बाहेर यायची आणि मुंबईत आता काय वातावरण असेल? मग पर्यायाने घराची आठवण यायची. सुरवातीला फार अवघड मनस्थिती व्हायची, कातर अवस्था व्हायची आणि एक, दोनदाच असे झाले असेल, परत मुंबईला यावे अशी प्रबळ इच्छा मनात आली होती. इथे माझे कोण आहे? जे सोबतीला आहेत, ते किती काळ माझ्या सोबत राहणार आहेत? असे विचार मनात घर करायला लागायचे. याचाच परिपाक असा व्हायचा, मन घट्ट व्हायचे आणि इथे जे काही करायचे ते स्वतःच्याच जीवावर करायचे, हाच विचार मनात ठाण मांडून बसायला लागला. कधीकधी वाटायचे आपण अधिक *कोषात* गुरफटत आहोत का? या विचाराने मात्र मनाचा तोल सावरायला मदत व्हायची. कधीकधी मात्र असल्या मनोव्यापाराने हतबुद्ध व्हायचे पण एक वाटायचे, हे जे विचार मनात येत आहेत, हे जरुरीचे आहेत कारण यातूनच आपल्या पुढील वाटचाल करायची आहे आणि तशी माझी झाली देखील. अशा काहीशा *एकांतिक* विचाराने, मी कुठेही गुरफटून घेतले नाही. कितीही मैत्री झाली तरी मनात हेच असायचे, ही जमलेली नाती सगळी तात्कालिक आहेत आणि या नात्यांचा याच दृष्टीने उपभोग घ्यायचा. आता मी परत येऊन आता १० वर्षे झाली आणि आता मनात साऊथ आफ्रिका फारशी राहिलेली नाही. तिथले संबंध काही अपवाद वगळता कुठलेच उरलेले नाहीत हे जरी सत्य असले तरी त्या परखड सत्यामागे जमलेल्या नात्यांनी विणलेला कोष त्यावेळी मला सांभाळून घेत होता हे नक्की. कधीकधी अशाच रिकाम्या संध्याकाळी, अचानक काळोखी दाटून यायची आणि मग बऱ्याच इंग्रजी चित्रपटातील कधी इंग्लंड तर कधी इतर कुठला देश, असे वातावरण आजूबाजूला तयार व्हायचे. एक आठवण तर आजही मनात लख्ख आहे. असाच संध्याकाळी बाहेर पडलो आणि अचानक काळोख अंगावर आला पण तेंव्हा असा अचानक होणारा वातावरण बदल काहीसा अंगवळणी पडला होता. आता असा अचानक काळोख दाटला आणि  मनात *शेरलॉक होम्स* आले. त्यांची आठवण आली आणि थोडे हसायलाच आले कारण त्या आधीच्या क्षणापुर्वी याची आठवण यावी, असे काही वाचले देखील नव्हते की प्रसंग घडला नव्हता. वातावरणात थोडे धुके देखील पसरले होते आणि त्याचा परिणाम बहुदा झाला असणार आणि मग ती संध्याकाळ शेरलॉक होम्सच्या स्मरणात चिरंतन झाली. या शहराने मला खूप काही दिले. काहीही न मागता दिले. टेकड्यांवर गाव वसलेले असल्याने रस्ता कधीच सपाटीवर नसायचा. त्यामुळे चालताना बरेच वेळा दमछाक व्हायची. मग कुठंतरी एखादा पेट्रोल पंप लागायचा आणि मग अनिल निमूटपणे तिथें एक कोक किंवा फॅन्टाचा टिन विकत घ्यायचा. त्या मनोहर गारव्यात हळूहळू कोकचे घुटके घेत रस्त्यावरून चालणे, हा अनिर्वचनीय अनुभव होता. नि:शब्द राहण्यात देखील मुट शाब्दिक सुसंवाद व्हायचा. आता नक्की काय संवाद चालायचा ते तितकेसे आठवत नाही.कधीकधी मनात  *मर्ढेकर* वस्तीला यायचे आणि *शिशिर ऋतूच्या पुनरागमें* सारखी ओळ ती संध्याकाळ सुगंधित करून टाकायची. कधीकधी तर - आता मन *निर्विचारी* ठेऊन हिंडायचे मनात यायचे आणि आपलेच तोकडेपण आपल्या समोर उभे राहायचे आणि हसायला यायचे. अशा वेळी मात्र मी *एकटा* हिंडत आहे, हेच बरे वाटायचे. आपण आपल्याला ओळखावे, यासाठी या संध्याकाळ मला अतिशय उपयोगी पडल्या आणि आपले पाय कायम जमिनीवर ठेवायला मदत झाली. खरंतर काही संध्याकाळी अवचित पडलेल्या वळवाच्या पावसाप्रमाणे चकित करून टाकायच्या आणि आपण कोण आहोत? हा प्रश्न अधिक अगम्य आणि गूढ करून टाकत. कधीकधी मनात येते, अशा प्रत्येक *संध्याकाळ* वर विस्ताराने लिहायला हवे पण आळशीपणा नांदतो आणि अनिल तिथेच हतबुद्ध होतो. 

Tuesday, 29 September 2020

साऊथ आफ्रिकेतील मूळ रहिवासी

तसे बघायला गेल्यास, साऊथ आफ्रिकेतील जे मूळ रहिवासी आहेत - प्रामुख्याने कृष्ण वर्णीय, ते "मूळ" स्वरूपात फक्त प्रदर्शनात बघायला मिळतात. सध्याचे कृष्ण वर्णीय हे जवळपास इतर आफ्रिकन देशांतील कृष्ण वर्णीयांचेच बांधव आहेत. डर्बन येथील "१००० island" हा भागात आदिवासी कृष्ण वर्णीय, त्यांच्या नैसर्गिक अवस्थेत रहात असतात अर्थात या १००० टेकड्यांपैकी सगळ्या टेकड्यांवर तुम्ही जाऊ शकत नाही, जसे अंदमान इथल्या काही बेटांवर जायला बंदी आहे तसेच इथे आहे परंतु आपल्याला जे बघायला मिळतात त्यात प्रदर्शनाचा भाग जास्त असतो. असो, तो मुद्दा थोडा वेगळा आहे. परंतु आजही या देशाच्या लोकसंख्येची वर्गवारी केल्यास, ६५% कर्षण वर्णीय, १५% गौर वर्णीय, १५% भारतीय आणि पाकिस्तानी तर कलर्ड वर्णाचे ५% असे प्रमाण सापडते. आता हे तर जागतिक सत्य आहे, इथे १९९२ पर्यंत वर्णवर्चस्व पद्धत होती आणि गोऱ्या लोकांनी अगदी ठरवून इथल्या बाकी लोकसंख्येचे मानसिक खच्चीकरण केले. यातूनच चळवळ उभी राहिली आणि नेल्सन मंडेलांचे नेतृत्व उदयास आले. साधारणपणे असे म्हणतायेईल १९८८ नंतर इथे सुधारणेचे वारे वाहू लागले परंतु याला अधिक जोर आला तो, नेल्सन मंडेलांची "रॉबिन आयलंड" इथल्या विक्राळ तुरुंगातून १९९२ साली सुटका झाल्यावर. अर्थात तोपर्यंत इथल्या कृष्ण वर्णीय आणि भारतीय वंशजांनी अपार भोगले. मी या देशात जुन १९९४ मध्ये गेलो आणि त्याच्या ३ महिने आधी मार्च १९९४ मध्ये इथे केंद्रीय निवडणूक झाल्या आणि लोकशाही पद्धतीने नेल्सन मंडेला निवडून आले. त्यामुळे जरी मला वर्णद्वेषाच्या प्रत्यक्ष झळा सोसाव्या लागल्या नसल्या तरी पुढे समाजाच्या अंतरंगात वावरायला लागल्यावर अनेक अनुभव समजायला लागले, काही वेळेस तर प्रत्यक्ष भोगायला लागले. आजच्या साऊथ आफ्रिकेत भयानक असुरक्षितता आहे, कायद्याची पायमल्ली वारंवार होत असते, भ्रष्टाचार आता आचार झाला आहे पण या बाबी आजच्या आहेत. सुरवातीला १९९४ मध्ये मी संध्याकाळी रस्त्यावरून पायी हिंडत होतो आणि पीटरमेरित्झबर्ग शहर नजरेखालून घालत होतो. एकटाच रहात असल्याने संध्याकाळी ऑफिस सुटल्यावर बराच निवांत वेळ मिळत असे. वास्तविक हे गाव तसे लहानखोर असल्याने इथे वैय्यक्तिक ओळखी लगेच झाल्या, अर्थात भारतीय वंशाच्या लोकांशी प्रथम ओळखी होणे क्रमप्राप्तच होते. त्यातूनच इथे या समाजाने वर्णद्वेषी राज्यपद्धतीत किती भोगले, अनन्वित अत्याचार सहन केले यांच्या कहाण्या समजल्या. या देशातील बिगर गौर वर्णियांनी फार भोगले. समाजातील साध्या सुविधा देखील अप्राप्य होत्या. अर्थात इथे कृष्ण वर्णीय अधिक भरडले गेले कारण त्यांना आपण भरडले जात आहोत याचीच जाणीव सुरवातीला नव्हती. आपले आयुष्य असेच नकारार्थी आहे आणि असेच जगायचे आहे, हाच संस्कार वर्षानुवर्षे त्यांच्या मनावर झाला. शहरातील उत्तम राहायच्या जागा या नेहमीच गौर वर्णियांना मिळणार, शैक्षणिक सुविधा आणि उच्च शिक्षण हे गौर वर्णियांनाच प्राप्त होणार. इतकेच कशाला, डर्बन इथले अप्रतिम सागर किनारे देखील गौर वर्णीयांचे निराळे, कृष्ण वर्णीयांचे निराळे आणि भारतीय वंशजांसाठीचे निराळे अशी विभागणी केली होती आणि तसे कायदे बनवले होते. उच्च पगाराच्या नोकऱ्या या खास गोऱ्या लोकांसाठी राखून ठेवलेल्या असायच्या आणि हलक्या दर्जाची कामे हि काळ्या लोकांनी करायची असे वर्षानुवर्षे चालू होते. खुद्द नेल्सन मंडेला उच्च शिक्षित बॅरिस्टर होते पण त्यांना संधींची वानवा होती आणि तिथे खरी ठिणगी पडली. साल १९५५ की १९५७ असावे पण त्या वर्षी मंडेलांना आपल्यावरील जुलमाची जाणीव झाली आणि चळवळ खऱ्याअर्थी लोकाश्रयी व्हायला लागली. परंतु सगळे स्थिरस्थावर व्हायला १९९२ साल उजाडावे लागले!! पीटरमेरित्झबर्ग शहरात आजही Raisethorpe हे उपनगर केवळ भारतीय लोकांचे आहे तर शहराबाहेरील गचाळ वस्ती ही प्रामुख्याने काळ्या लोकांचीच आहे. आजही शहरातील उत्तम व्यवस्था, सुरक्षित आणि कडेकोट बंदोबस्त वगैरे सुविधा या एकेकाळच्या गोऱ्या लोकांच्या वस्तीत सापडतात. अर्थात त्या जागेत आता कुणीही राहू शकते परंतु परिस्थिती अशी आहे,अशा वस्तीत घर घ्यायचे म्हणजे आर्थिक परिस्थिती चांगली हवी आणि काळे लोकं अजूनही त्याबाबतीत फार उदासीन आहेत, हे दुर्दैव. या बाबतीत एक स्वानुभव सांगतो. मी २००४ साली Standerton इथल्या गावात U.B.group (विजय मल्ल्या पुरस्कृत) मध्ये नोकरीला लागलो. Department Head या न्यायाने माझ्याकडे Stock Checking हे महत्वाचे काम होते आणि त्यानिमित्ताने साऊथ आफ्रिकेच्या अंतर्भागातील आमच्या बियर हॉल, वगैरे जागी जाऊन प्रत्यक्ष Stock तपासण्याचे काम करावे लागत असे. त्यानिमित्ताने या देशातील अंतर्भाग बघायला मिळाला. आजही इथे असंख्य काळे लोकं शेणमातीच्या घरात रहात असतात. मला नेहमी प्रश्न पडायचा - इथे जुन आणि जुलै महिन्यात -६ तापमान असताना अशा मोडकळीस आलेल्या घरात हे लोकं रहातात तरी कसे? रोजच्या खाण्याला मारामारी असते आणि घरात खाणारी तोंडे भरपूर!! बियर हॉलला भेट देणे म्हणजे दिव्य असायचे. सगळीकडे कुबट वास भरलेला असायचा, कुणीतरी काळा अति बियर पिऊन झिंगलेला असायचा, कुठंतरी जमिनीवर बियर सांडलेली असायची आणि अशा वातावरणात मला Beer Stock बघायला लागायचा. परंतु इथे काळ्या लोकांना या वातावरणाची इतकी सवय झालेली असते की त्याचे त्यांना काही वाटतच नाही. बरेचवेळा तिथून निघायला मला संध्याकाळ व्हायची आणि परतीच्या प्रवासात असताना, या शेणामातीच्या घरात कुठेतरी एखादी चिमणी पेटलेली असायची, इलेक्ट्रीसिटीचा पत्ताच नसायचा!! ही परिस्थिती २००४ सालची म्हणजे स्वातंत्र्य मिळून १० वर्षे झाली होती. याचा परिणाम असा झाला, शहरातील गुंडगिरीत काळ्या लोकांचा सहभाग भरपूर वाढला, भ्रष्टाचार वाढला. वास्तविक आता कायद्याने काळ्या लोकांना भरपूर सुविधा मिळत आहेत, काही काळे आता फार मोठ्या पदावर कार्यरत आहेत पण एकूणच प्रमाण तसे नगण्यच आहे. शहरातील गुंडगिरी याच काळ्या लोकांनी पोसली आहे. इथे आता तर गावात देखील सहजपणे ड्रग्ज मिळत आहेत, रिव्हॉल्वर तर भाजी विकत घ्यावी इतक्या सहजपणे मिळत आहेत. अमेरिकेत जे घडते त्याचेच प्रत्यंतर या देशात दिसत आहे. झाडावरून फळ तोडावे तसे जीव घेतात. आजही एकेकाळच्या गोऱ्या लोकांच्या हॉटेलमध्ये गेलात तर तुम्हाला तिरस्काराची किंवा दुर्लक्षित वागणूक सहन करायला लागते आणि जरा तुम्ही खडसावून वागायला लागलात तर उर्मट वागणूक मिळते. अर्थात याचे महत्वाचे कारण म्हणजे गोऱ्या कातडीला मिळणारे अपरंपार महत्व आणि हे गोऱ्या कातडीचे सगळे जाणून आहेत. इथे वर्णद्वेषी व्यवस्थेने इथल्या लोकांची मानसिक घडीच बिघडून टाकली आहे. आपल्यावर अन्याय झाला हे देखील त्यांना जाणवून दिले नव्हते. सगळ्या समाजाची बुद्धी भ्रष्ट करून टाकली होती. गोऱ्या लोकांनी या देशाला जवळपास लुटले असे म्हणता येईल पण हे तर जगभर त्यांनी केले आहे. भारतात काय वेगळे केले, इतर आफ्रिकन देश लुटून खंक केले आणि मग देश सोडून निघून गेले. आजही इथे शिक्षण अतिशय महाग आहे परंतु काळ्या लोकांना शिक्षण फी मध्ये भरपूर सवलती आहेत. परंतु फारच थोड्या लोकांनी याचा फायदा उठवला. बहुतेक काळे हे Easy Money मिळवण्याच्या मागे लागले. मुळात अंगपेराने दणकट शरीरयष्टी असल्याने, इथे गोऱ्या लोकांनी त्यांच्या कडून नेहमीच अंगमेहनतीची कामे करवून घेतली आणि ती देखील अत्यंत तुटपुंज्या पैशात!! आजही परिस्थिती अशी आहे, घरकामाला तुम्हाला गौरवर्णीय मुलगी किंवा स्त्री सापडणार नाही पण कृष्णवर्णीय मुली अत्यंत स्वस्तात घरकामाला मिळतात. त्या मुली देखील असाच विचार करतात, घरात अठराविश्वे दारिद्र्य आहे तेंव्हा जिथे पैसे मिळण्याची शक्यता जास्त, त्या घरकामात त्या गुंतून जातात. याचा परिणाम गुन्हेगारीत अतोनात झालेली वाढ. आज एकही आठवडा असा जात नाही जिथे त्या शहरात बलात्कार झाला नाही किंवा दरोडा पडला नाही किंवा मारहाण करून यमसदनास धाडले नाही. वृत्तपत्राच्या पहिल्या पानावर ठळकपणे अशा बातम्या वाचायला मिळतात!! आर्थिक असमानता या देशात भयानक आहे आणि या विपत्तीत प्रामुख्याने काळा समाज अडकलेला आहे. ज्यांच्याकडे पैसे आहे ते आलिशान आयुष्य जगत आहेत आणि बाकीच्यांकडे रोजच्या जेवणाची भ्रांत आहे आणि तरीही हे लोकं ड्रिंक्स घ्यायला नेहमी पुढे असतात!! इथे "माझे कुटुंब" या शब्दाला किंमत नाही तसेच लग्नसंस्था तर अशी हेलकावे घेत आहे की जहाजाला कुठे भोक पडले आहे आणि कुठे जहाजात पाणी शिरत आहे, हेच कळत नाही!! देशातील ४५% लोकसंख्या एड्सने ग्रस्त आहे!! आणि या व्याधीत प्रामुख्याने काळा समाज आहे. सोन्यासारखा देश आहे पण हळूहळू गर्तेत सापडून निकामी होत आहे.

Monday, 20 July 2020

एक सुंदर अनुभव

१९९४ साली मी साउथ आफ्रिकेत - पीटरमेरीत्झबर्ग शहरात प्रथमच नोकरीसाठी गेलो. नाताळ राज्याचे राजधानीचे शहर (डर्बन नव्हे!!) असल्याने नोकरीधंद्यासाठी तसे गजबजलेले शहर. समुद्रसपाटीपासून २००० फुट उंचावर असल्याने हवा थंडगार. इथे मी Capital Oil Mills या कंपनीत कामाला लागलो होतो. नुकतीच सार्वत्रिक निवडणूक झाली होती आणि लोकशाही प्रक्रियेनुसार नेल्सन मंडेला अध्यक्ष म्हणून विराजमान झाले होते. असे असले तरी वातावरणात "गोऱ्यांचा" वचक दिसून येत होता. अगदी कुठल्याही हॉटेलमध्ये गेलो तरी तसा अनुभव यायचा.
आमची कंपनी, खाद्यान्न तेलाचे उत्पादन करीत असे आणि त्यावेळी एक रिफायनरी सुरु होती आणि दुसऱ्या रिफ़यनरीचे काम चालू होते. कंपनीचा व्याप तसा वाढत होता. Sunflower Oil, Margarine, Soap factory असे सगळे एकाच complex मध्ये होते. मी तसा त्यावेळी नवीन, त्यामुळे प्रत्येक अनुभव नवा!! तेलाच्या उत्पादनात आमची कंपनी देशातील अग्रगण्य कंपन्यांमधील एक मानली जात होती आणी त्यामुळे कंपनीचे नाव प्रसिद्ध होते.
ऑफिसमध्ये, माझ्याच बाजूला कंपनीचे R & D ऑफिस होते आणि तिथे, उत्पादित प्रत्येक batch तपासायला यायची आणि पुढे विक्रीसाठी बाहेर पडायची. मला वाटते, फेब्रुवारी महिना होता. एव्हाना, काम सुरु करून मला ७,८ महिने झाले होते आणि एकूणच work culture बाबत बऱ्यापैकी माहिती झाली होती.
त्या दिवशी सकाळी ९.०० वाजता माझा फोन वाजला. फोनवर एक बाई होती आणि आवाजावरून गोऱ्या वर्णाची बाई होती, हे लक्षात आले. ती प्रिटोरिया इथे राहणारे आणि तिने, आमच्या कंपनीच्या तेलाची बाटली खरेदी केली होती आणि त्यात तिला एक जंतू आढळला होता!! तिने, आदल्या दिवशीच ती बाटली कंपनीकडे पाठवून दिली होती आणि अधिकृत तक्रार करण्यासाठी, तिने कंपनीत फोन लावला होता.
दुर्दैवाने, त्यावेळी, कंपनीतील इतर वरिष्ठ अधिकारी नसल्याने, हा फोन माझ्याकडे आला. अर्थात, नियमानुसार, मी तिची तक्रार नोंदवून घेतली आणि जसा आमच्या कंपनीचा M.D. आला, तशी त्याला ही बातमी सांगितली. त्याने, जशी बातमी ऐकली तशी लगोलग, त्या बाईला फोन लावला आणि तिच्याशी अतिशय नम्रपणे बोलायला लागला. सुदैवाने तिने आणखी कुठे तक्रार केली नव्हती, हे समजल्यावर, ह्या माणसाने श्वास सोडला. लगेच तिचे विमानाचे तिकीट बुक केले (प्रिटोरिया ते पीटरमेरीत्झबर्ग अंतर सुमारे ७०० कि.मी.) आणि दुसऱ्या दिवशी ऑफिसमध्ये बोलावले. तिने कुठे तक्रार केली नसल्याबद्दल, खास अभिनंदन केले आणि तिला compensation म्हणून त्यावेळी Rand 500.00 दिले!! हा सगळा प्रकार मला तरी अति नवलाईचा होता. बाटलीत जंतू सापडणे, ही घटना जरी गंभीर असली तरी त्यासाठी इतके कासावीस होण्याची गरज नव्हती, हे माझे त्यावेळचे मत!!
परंतु हाच फरक भारत आणि साउथ आफ्रिका, या देशांत होता (आजही आहे). जर का त्या बाईने SABS (South African Bureau of Standard) मध्ये लेखी तक्रार केली असती तर आमच्या कंपनीवर तत्काळ बंदी येऊ शकली असती आणि ती देखील अनिश्चित काळासाठी!!
मला भारतातील अनुभव आठवले!!

Tuesday, 30 June 2020

नॅशनल क्रुगर पार्क - भाग १

एकूणच आफ्रिका खंड म्हटले की लगेच Wild Safari सगळ्यांच्या डोळ्यासमोर येते, विशेषतः केनयामधील नैरोबी शहराजवळील "मसाई मारा" तर जगप्रसिद्ध आहे. दुर्दैवाने मला काही तिकडे जाता आले नाही परंतु साऊथ आफ्रिकेच्या उत्तर सीमेला लागून असलेले नॅशनल क्रुगर पार्क मात्र बघता आले. एकूण १,२०० Sq.Km. इतका प्रचंड परिसर आहे. अर्थात या परिसरातील ७०० कि.मी. परिसर बोट्स्वाना देशात येतो तर उरलेला ५०० कि.मी. साऊथ आफ्रिकेत येतो. तुमच्याकडे जर का साऊथ आफ्रिकेचा अधिकृत व्हिसा असेल तर बोट्स्वाना इथे जाता येते. आता इतका विस्तीर्ण परिसर बघायला म्हणजे जवळपास कमीत कमी ७ दिवस/रात्र तर हवेतच, त्यातून सगळी जनावरे रात्री/मध्यरात्री बाहेर पडतात. हा सगळा परिसर स्वतःच्या जीवावर करायचा असतो. उद्या कुणी हिंस्र जनावराने हल्ला केल्यास, सरकार जबाबदार नसते. तुम्ही उघडी जीप नेऊ शकता किंवा तुमच्या नेहमीच्या वापरातली गाडी नेऊ शकता. तिथे भाड्याने गाड्या मिळण्याची सुविधा आहे पण त्यासाठी पैसे मोजायला लागतात. बहुतेकजण जंगलाच्या आधी एखाद्या जवळच्या हॉटेलमध्ये जागा आरक्षित करतात. अर्थात ६,७ दिवस इथे राहायला यायचे म्हणजे तितकी सुटी घ्यायला हवी आणि अशी सुटी फक्त ख्रिसमस मध्येच मिळू शकते. 
मी २००५ मध्ये रस्टनबर्ग(इथेच जगप्रसिद्ध सन सिटी आहे!!) इथे नोकरीसाठी आलो असताना प्रथम संधी साधली. एकतर या शहरापासून क्रुगर पार्क साधारणपणे १,००० कि.मी. दूर आहे. जोहान्सबर्ग इथून १५० कि.मी. कमी पडतात पण तेंव्हा जोहान्सबर्ग माझ्या दृष्टीक्षेपात नव्हते. इथे मी नोकरी करीत असताना काही भारतीय मित्र ओळखीचे झाले आणि आम्ही सामायिक गाडी काढून क्रुगर पार्कचा बेत आखला. डिसेंबरमध्ये हॉटेल मिळवायचे झाल्यास, कमीत कमी ३ महिने आधी जागा आरक्षित करावीच लागते. आयत्या वेळी जायचे ठरवल्यास, कुण्या कुटुंबात आसरा घेणे आवश्यक ठरते पण मग तुमच्या थोडी बंधने पडतात. इथे तर आम्ही तिघे मित्र सडाफटिंग म्हणजे मीच एकटा लग्न झालेला, बाकीचे तेंव्हा विशीच्या आसपास होते. हातात गाडी आहे तेंव्हा सामान कुठे,कसे ठेवायचे हा प्रश्नच नसतो. २४ डिसेम्बरला सकाळीच निघालो. मध्ये पीटर्सबर्ग शहर लागले आणि तिथे जेवण घेतले. डिसेंबर महिना म्हणजे कडाक्याचा उन्हाळा त्यामुळे अंगावर शॉर्ट आणि टी शर्ट घातले होते. साऊथ आफ्रिकेत एक पद्धत चांगली आहे. तुम्ही जर का क्लबमध्ये किंवा भपकेबाज समारंभात जात नसाल तर कुठेही शॉर्ट घातलेली चालते मग पंचतारांकित मॉल असले तरी काही फरक पडत नाही. मी तर सन सिटीसारख्या अतिशय महागड्या हॉटेलमध्ये सर्रास शॉर्ट घालून हिंडत असे. आता अशा कडाक्याच्या उन्हाळ्यात बियर पिणे हा अत्यावश्यक सोहळा असतो तरीही प्रमाणातच घ्यावी लागते अन्यथा पोलिसांनी, गाडी चालवताना पकडले तर सरळ तुरुंगात रवानगी!! साऊथ आफ्रिकेत Drunk n Drive अपघाताचे प्रमाण प्रचंड आहे. डिसेंबर आणि जानेवारी महिन्यातील एकही दिवस असा जात नाही ज्या दिवशी भीषण अपघात झाला नाही!! एकतर रस्ते अतिशय गुळगुळीत, त्यामुळे गाडी वेगाने चालवायचा मोह होतो त्यातून गाडी चालवणाऱ्याची अवस्था "आधीच मर्कट, त्यात मद्य प्याला" अशा प्रकारची!! 
असो, पिटर्सबर्ग वरून आम्ही थेट क्रुगर पार्क इथे पोहोचलो. पोहोचायला संध्याकाळ झाली होती. आम्ही हॉटेलमध्ये जागा आरक्षित केल्या असल्याने, सरळ जागेचा ताबा घेतला आणि श्रम विहार सुरु केला. हॉटेलच्या रिसेप्शनिस्टनेच आम्हाला कुठे आणि कसे जायचे याची संपूर्ण माहिती दिली. रात्र झाली तशी गाडी काढली. आता आम्ही माणसाच्या जगातून जनावरांच्या जगात शिरत होतो. सगळीकडे मिट्ट काळोख होतो आणि आम्हाला महत्वाची सूचना मिळाली होती, गाडीचे हेड लाईट्स शक्यतो झगझगीत ठेवू नयेत कारण समजा दिव्यांचा प्रकाश जनावरांच्या डोळ्यात शिरला तर जनावरे बिथरू शकतात. सुरवातीलाच आफ्रिकन झेब्रे घोळक्याने दिसले. चांगलेच दणकट वाटले. त्यांच्याकडे बघून असे मनात आले, या जनावरांना आता माणसांच्या काही सवयीची सवय झाली असावी कारण गाडीचा लाईट कितीही कमी ठेवला तरी अंधारात त्याचा प्रकाश चमकणारच. तसे बघायला गेल्यास झेब्रा हा प्राणी निरुपद्रवी त्यातून रात्रीची वेळ म्हणजे त्यांची, बाहेर फिरायला जायची वेळ!! जवळपास १०, १२ तरी असावीत. अर्थात आम्ही काही झेब्रे बघायला इथे आलो नसल्याने थोडा वेळ गाडी थांबवून पुढे निघालो.गाडी पुढे जात असताना अचानक लक्षात आले, तिथे एक पाणथळ होता आणि त्या पाणथळाकाठी झेब्र्यांचा घोळका पाणी प्यायला आला होता. 
पुढे जवळपास १० मिनिटे गाडी चालवली पण नावाला एक जनावर दृष्टीस पडले नाही!! इथे गाडीच्या वेगावर निश्चित मर्यादा होती त्यामुळे आजूबाजूचा परिसर व्यवस्थित न्याहाळता येत होता. अचानक जरा दूर अंतरावर हत्तींचा कळप दिसला. हत्ती शक्यतो घोळक्याने वावरतात असे वाचले होते, त्याचे प्रत्यंतर बघायला मिळाले. भारतातील हत्तींपेक्षा इथले हत्ती चांगलेच धिप्पाड, मजबूत दिसले. अर्थात गाडी तशी सुरक्षित अंतरावर ठेवली होती. घोळक्यात अनेक आकाराचे हत्ती होते आणि चाल अत्यंत संथ होती. काही हत्ती ठार काळे होते तर काही करडे असावेत असे वाटले कारण एव्हाना काळोख दाट पसरला होता. आमची गाडी जरी लांब असली तरी एकूण अवाढव्य आकारमान, काळजात धडकी भरवणारे होते. 
इथे एक नियम पाळायचा असतो, गाडी कुठंही प्रमाणाबाहेर थांबवायची नसते. जनावरांना  तितका इशारा पुरेसा ठरू शकतो. या जंगलात जागोजागी एकतर पाणथळ आहेत किंवा तलाव केले आहेत जेणेकरून जनावरांना पाणी पिणे सोयीचे होऊ शकते. आता आम्ही मोबाईलचे Flash Light सुरु केले होते. बराच वेळ गाडी फिरवली पण निराशा पदरी पडत होती. आम्हाला असेही सांगण्यात आले होते, तुम्हाला मनाचा बांध घालायलाच हवा, वाट बघायलाच हवी कारण हिंस्र जनावरे ही मध्यरात्रीनंतर बाहेर पडतात!! अर्थात तरीही बघायला मिळतीलच असे नाही. आम्हाला चित्ता शेवटपर्यंत बघायला मिळाला नाही. अगदी ४ रात्री आम्ही तिथे घालवून देखील. पुढे हरणांचा घोळका दिसला. लांबून प्रकाश दिसल्यावर उधळायला लागला. अर्थात उड्या मारणारे हरीण बघायला भलतेच देखणे असते. तशी ५,६ हरणे असतील. असे ऐकले आहे की हरणांच्यात देखील पोटजाती असतात पण त्यासाठी वर्षानुवर्षे घालवावी लागतात. इथे मी फक्त ६ दिवस आलेला तेंव्हा आणखी किती बारकाईने बघणार!! पुढे बराच वेळा गाडी चालवल्यावर अच्चनक एका मोठ्या तळ्यापाशी आलो आणि पाण्यात काहीतरी हालचाल दिसली. सुदैवाने तिथे आमच्यासह आणखी ३ गाड्या होत्या. जरावेळाने जनावराचे डोके आणि शिंग बाहेर आले आणि क्षणात पाणी उसळून महाकाय "हिप्पो" पाण्यातून बाहेर आला. मनाशी कल्पनाच नव्हती असले जनावर बघायला मिळेल. एव्हाना पहाट व्हायला लागली होती म्हणून आम्ही परत हॉटेलवर परतलो. 

Friday, 26 June 2020

एक सुन्न करणारा अनुभव

आपल्याकडे अजूनही खऱ्याअर्थाने हुकूमशाही, दमनशाही फारशी कुणीही अनुभवलेली नाही. अर्थात मी देखील अनुभवलेली नाही परंतु परदेशी राहताना, सलग २ वर्षे मला एक गुजराती शेजारी भेटला होता. सुरवातीला फारसा बोलायचं नाही - नाव मुद्दामून टाळत आहे. जवळपास घुम्याच होता. सकाळी ऑफिसला निघताना, नजरभेट व्हायची आणि काही दिवसांनी ओठांवर स्मित फुटायला लागले. वयाने माझ्याच इतका होता - बहुदा अजूनही तो साऊथ आफ्रिकेत राहात असावा. अंगाने शिडशिडीत, रंगाने उजळ, दिसायला टिपिकल गुजराती आणि अर्थात हिंदी, गुजराती भाषा अस्खलित बोलायचा. जवळपास महिनाभर आमची "नजरभेट" इतकाच संवाद - संवादाची पायरी पुढे सरकायचीच नाही.
एकदा, एका शुक्रवारी संध्याकाळी, मीच थोडा पुढाकार घेतला आणि त्याला घरी कॉफी घ्यायला बोलावले. लगेच तयार झाला. मला, सुरवातीला वाटले होते , हा भारतातूनच आला असणार आणि इथले टिपिकल युरोपियन वातावरण बघून काहीसा बुजला असणार!! परंतु पहिल्याच भेटीत त्याने, "मी युगांडातून निर्वासित म्हणून पळून आलो. तिथे मी १५ वर्षे बिझिनेस केला." इतपत सांगितले.
आता गुजराती आणि परदेशी इतकी वर्षे वास्तव्य, म्हटल्यावर इतपत सहजपणे गृहीत धरता येत होते. याचा प्रत्यक्ष अनुभव मी डर्बन इथे राहात असताना घेतलेला होता. स्थिरस्थावर झालेला गुजराती हा बव्हंशी बिझिनेस करायलाच नेहमी उद्युक्त होत असतो!! वास्तविक, माझा शेजारी,हा त्याच्या वडिलांच्या बिझिनेसमध्येच शिरला होता. त्याचे वडील १९७० मध्ये "कंपाला" या राजधानीच्या शहरात आले. आले त्यावेळी खिशात रोजच्या खर्चाला पुरतील इतकेच पैसे होते. आल्यावर तिथेच नोकरी पकडली, हळूहळू आपल्या कुटुंबाला कंपाला इथे आणले आणि स्थिरस्थावर व्हायला लागले. अर्थात, १९७५ मध्ये धंद्याच्या खाचाखोचा समजावून घेतल्या आणि स्वतंत्रपणे धंदा सुरु करायचे ठरविले. आत्तापर्यंतचा अनुभव हा कपड्यांच्या व्यवसायात घेतलेले असल्याने, त्यांनी त्याच व्यवसायात उडी घेतली.
इथे एक बाब समजून घेण्यासारखी आहे, पहिली नोकरी गुजराती माणसाकडे केली होती आणि जेंव्हा त्यांनी स्वतंत्र व्यवसाय सुरु करायचे ठरवले तेंव्हा देखील आजूबाजूच्या गुजराती व्यावसायिकांनीच मदत केली!!  सुदैवाने लगेच धंद्याला "बरकत" आली. अर्थात हे सगळे मला नंतरच्या भेटींत कळले. सुरवातीला "घुम्या" वाटणारा हा गुजराती, नंतर बराच मोकळा झाला, इतका की नंतर तो माझ्याबरोबर ड्रिंक्स घ्यायला लागला - जेवायला मात्र फक्त व्हेज!! असो,
पुढे ईडी अमीनची निर्दयी राजवट सुरु झाली. कुठेही कसलाच धरबंध नव्हता. त्यावेळी याचे वय होते २०!! नुकतीच वडिलांना धंद्यात मदत करायला सुरवात केली होती आणि व्यवसाय इतर देशांत फैलावत होता!! अशाच एका बैठकीत त्याने, अक्षरश: अंगावर शहारे आणणारे अनुभव सांगितले. अशीच एक दुर्दैवी सकाळ उगवली आणि घरात ईडी अमीनचे सैनिक घुसले!! कसली नोटीस नाही, कसले फर्मान नाही. दरवाजा ठोठावला आणि किंचित उघडलेल्या दारातून आता शिरले. हातात रायफल्स!! सकाळचे जवळपास ९ वाजले होते. त्यांना काय हवे आहे, हे विचारायच्या आधीच त्यांनी वडिलांना गोळ्या घातल्या!! तिथल्या तिथे वडील रक्ताच्या थारोळ्यात!! घरातले सगळेच गर्भगळीत. रडायची देखील सोया नाही. मुलाला, त्याच्या बेडरूममध्येच समजले, घरात सैनिक घुसले आहेत. मुलगा तसाच बेडरूमच्या खिडकीतून बाहेर पडला. पाठोपाठ बाईच्या आवाजाची किंकाळी ऐकायला मिळाली आणि घर संपल्यातच जमा झाल्याचे त्याला समजले. तसाच रस्त्यावर धावत सुटला. काय करायचे, कुठे जायचे? काही समजत नव्हते. इथून सुखरूप बाहेर पडणे, आताच विचार!!
थोडा वेळ एका दुकानापाशी थरथरत उभा राहिला. तितक्यात एका उघड्या जीपमध्ये आई आणि बहीण, यांना पहिले!! आपलीच आईला, आपलीच धाकटी बहीण पण आपण काहीही करू शकत नाही, अशी असहाय जाणीव झाली. आजतागायत कुठे आहेत, याचा पत्ता नाही. एका बैठकीत त्याने अत्यंत थंड सुरांत सांगितले - आता जर माझ्या समोर दोघी उभ्या राहिल्या तर मी ओळखणार देखील नाही!! आई, बहिणीला उचलून नेल्याचे बघितल्यावर त्याच हताश अवस्थेत मी ओळखीच्या गुजराती माणसाच्या घराचा दरवाजा ठोठावला.
कुणीही दरवाजा उघडायला तयार नव्हता - बरोबर आहे, बाहेर कोण आहे? हाच प्रश्न!! अखेरीस मी जोरात हाक मारली तशी किंचित दरवाजा उघडला गेला आणि मी अक्षरश: घरात घुसलो. घरात एकमेव म्हातारी आजी होती. दोनच दिवसांपूर्वी, यांच्या घरातील प्रसंग त्या घरात घडला होता. त्या बिचाऱ्या म्हातारीला तर काय करावे हेच सुचत नव्हते. मी अधिकच गर्भगळीत. तसाच घराच्या बाहेर पडलो कारण आता फक्त अस्तित्व हेच महत्वाचे. रस्त्यावर नुसता गोंधळ उडाला होता आणि कुणीच कुणाला विचारीत नव्हते. अवघी गुजराती वस्ती संपूर्णपणे उजाड झाली होती. चार दिवस रस्त्यावर झोपून काढले आणि लपतछपत अखेर
सरळ बँक गाठली आणि जेमतेम ५०० डॉलर्स हातात घेतले आणि सरळ कंपाला बंदर गाठले. तिथून नायजेरिया - लागोस बंदर गाठले. बंदरावरच निर्वासित असल्याचा दाखला दाखवला आणि लागोस मध्ये प्रवेश केला!! १९८२ मध्ये नायजेरिया देश संपन्नावस्थेत होता. नोकरी धंद्यांच्या भरपूर सुविधा होत्या. लागोस मध्ये सुदैवाने, एका सिंधी माणसाची दुरून अशी ओळख निघाली. कंपालातील व्यावसायिक संबंध इथे उपयोगी पडले.
त्यावेळी नायजेरिया खूपच प्रगत देश होता. वातावरण जरी युगांडासारखे असले तरी तेंव्हा राज्यव्यवस्था बरीच स्थिर होती. तिथे सलग १६ वर्षे काढली. हळूहळू नायजेरिया देखील मरणपंथाला लागला होता - अर्थात हा अनुभव मीच घेतलेला होता. मी देखील त्याला माझे १९९२/९३ मधील अनुभव सांगितले. लागोसला देखील त्याला दडपशाहीचा विदारक अनुभव आला परंतु  एव्हाना तो बराच अनुभवी झाला होता. शहाणपणाने त्याने आपले चंबूगबाळे आवरले आणि साऊथ आफ्रिकेचा रस्ता धरला.
या सगळ्या अस्थिरतेच्या धावपळीत त्याचे लग्न करायचे राहून गेले. त्याने लागोसचे विदारक अनुभव सांगितले पण मला त्यात काही नवल वाटले नाही कारण माझ्या २ वर्षांच्या कालावधीत मी देखील जवळपास असेच अनुभव घेतले होते. आता जरी साऊथ आफ्रिका त्याच  मार्गाला लागला असला तरी (ही घटना २००७ मधील) त्याच्या मते आता दुसरा कुठलाच मार्ग उपलब्ध नाही!!

Saturday, 15 February 2020

परकीय नागरिक प्रश्न

खरे पहाता परकीय नागरिक हा जागतिक प्रश्न झाला आहे आणि कुठलाच देश या प्रश्नापासून दूर राहिलेला नाही. परकीय नागरिक स्वीकारावेत असे म्हणताना मानवी दृष्टिकोन स्वीकारावा असे म्हणणे वारंवार मांडले जाते  परंतु मानवी दृष्टिकोन कुठल्या देशाने स्वीकारला आहे? या प्रश्नाचे उत्तर मिळत नाही. ज्या अमेरिकेने परकीय नागरिक ही संकल्पना घटनेद्वारे स्वीकारली त्या देशाला आता पश्चात्ताप करायची पाळी आली आहे आणि ही वस्तुस्थिती आहे. आज बाहेरून नागरिक येऊन स्वीकारणे हा प्रचंड मोठ्या व्याप्तीचा प्रश्न झाला आहे. अमेरिका, ऑस्ट्रेलिया,न्यूझीलंड,कॅनडा इत्यादी देशात अजूनतरी परकीय नागरिक स्वीकारण्याचे धोरण चालू आहे परंतु त्यांनीही आपले कायदे बरेच कडक केले आहेत आणि त्याची तितक्याच गंभीरपणे अंमलबजावणी चालू आहे. याचे महत्वाचे कारण असे दिसते, या धोरणाचा शेजारील राष्ट्रांनी किंवा गरीब राष्ट्रांनी अतोनात फायदा उठवला,कायद्यातील असंख्या पळवाटा शोधल्या, अनेक गैर मार्ग अवलंबले. विशेषतः आशिया आणि आफ्रिका खंडातील नागरिकांनी याचा भरपूर फायदा उपटला. 
आता काही स्वानुभव लिहितो. मी दक्षिण आफ्रिकेत जवळपास १७ वर्षे राहिलो आणि नोकरीच्या निमित्ताने Cape province वगळता बहुतेक सगळ्या राज्यांत नोकरी केली. जसे भारतात मुंबई शहराचे स्थान आहे तसेच दक्षिण अफरिकेत जोहान्सबर्ग शहराचे स्थान आहे. It is financial capital of South Africa. त्यामुळे नोकऱ्यांचे प्रमाण तसेच लोकसंख्या भरपूर. पगाराचे प्रमाण देखील बरेच वाढीव असते - अर्थात राहणीमान महाग असणे तद्नुषंगाने येते. स्थानिक लोकं देखील याच शहरात राहणे पसंत करतात. वास्तविक दक्षिण आफ्रिकेत बाहेरून माणसे बोलावणे ही रूढ पद्धत नाही, जसे इतर आफ्रिकन देशांत आहे. एकतर १९९४ पर्यंत हा देश वाळीत टाकलेला त्यामुळे विशेषतः भारतीय लोकांना या देशात सरळ मार्गे प्रवेश निषिद्धच होता. हळूहळू यात बदल होत गेला. २००० नंतर बऱ्याच भारतीय कंपन्यांनी तिथे आपली कार्यालये थाटली आणि त्यानिमित्ताने अनेक भारतीय दक्षिण आफ्रिकेत यायला लागले. अर्थात याच सुमारास तिथल्या सरकारने Black Empowerment कायदा पास केला आणि नोकऱ्यांत कृष्णवर्णीयांसाठी खास कोटा राखायला सुरवात झाली. याचा परिणाम असा झाला, दुसऱ्या देशांतून माणसे कशाला आणायची? हा प्रश्न चव्हाट्यावर आला आणि त्यावर अनेक बंधने आली. 
याचा परिणाम होणारच होता कारण दक्षिण आफ्रिका म्हणजे आफ्रिका खंडातील युरोप!! जवळपास वर्षभर थंड हवामान, पायाभूत सुविधांचे अप्रतिम जाळे देशभर पसरलेले आणि देशाची आर्थिक परिस्थिती इतर आफ्रिकन देशांपेक्षा निश्चितच उंचावलेली. जशी बंधने वाढली आणि जाचक व्हायला लागली तशी निरनिराळ्या वाटा शोधायला सुरवात झाली. जोहान्सबर्ग शहरातील "लोडियम" किंवा "अलेक्झांडर" ही उपनगरे या मुद्द्यातील फार लक्षणीय गावे आहेत. "अलेक्झांडर" गाव तर वेश्यागृहे, ड्रग्स इत्यादी गोष्टींसाठी प्रसिद्ध आहे आणि तिथे बव्हंशी लोकसंख्या ही "नायजेरियन" आहेत. शिक्षणाचं नावाखाली येतात आणि असले धंदे सुरु करतात. आज दक्षिण आफ्रिका देशाला ड्रग्सने विळखा घातला आहे. या देशातील नागरिकांनी इथे अवैध प्रवेश मिळवला आणि या देशाला भ्रष्टाचार शिकवला. याचा अर्थ पूर्वी भ्रष्टाचार नव्हता असे नव्हे परंतु त्याचे प्रमाण बरेच कमी होते. जोहान्सबर्ग शहर आता ड्रग्स, वेश्या व्यवसाय आणि प्रचंड असुरक्षितता यासाठीच प्रसिद्ध झाले आहे - पूर्वी असे नक्कीच नव्हते. 
"लोडियम" उपनगर तर संपूर्णपणे भारतीय/पाकिस्तानी नागरिकांनी व्यापलेले आहे. माझा इथे बराच संबंध आला. एकतर याच भागात मोठी Indian Stores आहेत त्यामुळे आठवड्याच्या खरेदीसाठी इथे येणे भाग पडायचे. त्यानिमित्ताने माझी बऱ्याच भारतीय लोकांशी ओळख झाली जे लोडियम  राहात होते. दोन ,तीन वेळा त्यांच्या घरी देखील गेलो. घर म्हणजे मुंबईच्या भाषेत 1BHK अशी छोटेखानी घरे. तेव्हड्या जागेत ५,६ जण राहायचे. बहुतेक सगळे विना परवाना या देशात घुसलेले!! बोट्स्वाना मधून दक्षिण आफ्रिकेत बरेच घुसखोर आले आहेत आणि यात निव्वळ भारतीय नसून पाकिस्तानी,नायजेरियन इत्यादी देशांतून आलेले आहेत. भारतीय आणि पाकिस्तानी लोकं Asylum basis वर प्रवेश मिळवतात आणि तसेच वर्षानुवर्षे राहात असतात. लोकल पोलिसांना याची संपूर्ण माहिती असते. दर रविवारी हे पोलीस या वस्तीवर धाड टाकतात आणि आठवड्याचे पैसे घेऊन जातात!! 
असे राहणारे बरेचसे अर्धशिक्षित असतात त्यामुळे कायदेशीर परवाना मिळाले जवळपास अशक्य असते. इथली माणसे मग किराणा मालाच्या दुकानात किंवा तिथल्या भारतीय/पाकिस्तानी हॉटेलमध्ये कामे मिळवतात - अगदी कपडे, भांडी धुणे असली कामे करतात. माझ्या माहितीत काही जण तर ७,८ वर्षे अशीच भणंगावस्थेत रहात आहेत. भारतात यायचे दोर कापलेले असतात त्यामुळे परत येणे अशक्य होऊन बसले असते. परत यायचे म्हणजे पासपोर्टवर deportation stamp बसणार!! काही भारतीय/पाकिस्तानी मुले तर वेश्यागृहात कामे करीत आहेत. 
आता प्रश्न असा पडतो, यांना असले अगतिक जिणे का जगावेसे वाटते? अर्थात यात एक मेख अशी आहे, समजा त्यांनी एखाद्या दक्षिण आफ्रिकन मुलीशी (बहुदा काळया मुलीशी ) विवाह केला तर त्यांना कायद्यान्वये रहाता येते पण असले लग्न कमीतकमी ३ वर्षे तरी टिकवावे लागते!! पण प्रत्येकाला असे "भाग्य" कसे लाभणार? आता परिस्थिती फार गंभीर आणि म्हणून खडतर झाली आहे. सरकारला याची जाणीव झाली आहे. परिणामी deportation चे प्रमाण वाढले आहे. "वसुधैव कुटुंबकम" वगैरे सुविचार पुस्तकातच साजिरे असतात. प्रत्यक्षात कुणालाही हा विचार मान्य नसतो.दक्षिण आफ्रिका देश म्हणजे आफ्रिका खंडातील युरोप!! त्यामुळे या देशाचे आकर्षण इतर देशातील नागरिकांना अतोनात आहे. इथले हवामान. इथल्या सुविधा, infrastructure, राहणीमान इत्यादी गोष्टीचे मोठे आकर्षण आहे. त्यातून युरोपपेक्षा इथे स्वस्ताई आहे. १९९४ पर्यंत हा देश भारताने वाळीत टाकलेला परंतु पुढे स्वीकृती मिळाल्यावर अवैध प्रवेश मिळवण्याकडे भर वाढला. वास्तविक दक्षिण आफ्रिकन पासपोर्टवर लंडनच्या हीथ्रो किंवा कुठल्याही विमानतळावर visa on arrival ( ६ महिन्यांपुरता ) मिळत असे परंतु पुढे इंग्लंडला समजले, इथे "बनावट" पासपोर्टवर बरेचजणांनी ब्रिटनमध्ये प्रवेश मिळवला आणि कधीच परतले नाहीत. आता ब्रिटनने ती सवलत बंद केली.  
आता तर दक्षिण आफ्रिकन सरकारने Work Permit Law अतिशय अवघड आणि किचकट करून टाकला आहे. एक उदाहरण देतो, मी तिथे एका भारतीय कंपनीत काम करीत होतो. त्यांचे मुख्य ऑफिस मुंबईमध्ये आणि त्यानुसार एकजण Inter Company Transfer तत्वावर या कंपनीत आला. इथे येताना तो Business Visa घेऊन आला परंतु शेवटपर्यंत त्याला Work Permit मिळाले नाही आणि अखेरीस ती व्यक्ती मुंबईत परतली!! 
परकीय नागरिकांचा प्रश्न आता जागतिक होऊन बसला आहे आणि आता तर प्रत्येक देश स्वतःपुरता विचार करीत आहे आणि तत्वतः त्यात काहीच चूक नाही. 

Tuesday, 21 January 2020

स्टीफन डेवीस

रस्टनबर्ग इथे नोकरी करताना, अचानक U.B.group (विजय मल्ल्या पुरस्कृत) मध्ये नोकरी मिळण्याची संधी मिळाली. इतका मोठा ग्रुप म्हटल्यावर नाही म्हणायचे काहीच कारण नव्हते, फक्त बृवरीमध्ये नोकरी होती आणि बृवरी होती, Standerton या गावात. जोहान्सबर्ग पासून पश्चिमेला २०० किलोमीटर आत. अर्थात, साउथ आफ्रिकेत गावे देखील तशी सुस्थितीत असतात, त्यामुळे तसे टेन्शन नव्हते. एका शनिवारी, रस्टनबर्ग मधील मित्राने तिथे सोडण्याचे कबूल केले असल्याने, कसे जायचे, हा प्रश्न नव्हता. कंपनीने, माझ्या घराची सोय होईपर्यंत तिथल्या एका खासगी हॉटेलमध्ये राहण्याची सोय केली होती. तिथे, "राम नायडू" वगळता, कुणाही माणसाशी फोनवर देखील बोललो नव्हतो (राम बरोबर देखील फोनवर बोलणे) तेंव्हा ओळखीचे कुणी असण्याचा प्रश्नच नव्हता.
रामची दुसऱ्या बृवरीत बदली झाल्याने, त्याच्या जागेवर माझी नेमणूक झाली होती. सोमवारी, तिथल्या ऑफिसमध्ये गेलो आणि सगळ्यांशी ओळख-पाळख करून घेण्यात गेला आणि इथेच मला स्टीफन भेटला. तो बृवरीचा General Manager तर मी, Finance G.M. अशी व्यवस्था होती. गाव अगदी छोटेखानी आहे, ना तिथे कुठला भव्य दिव्य मॉल की कुठला क्लब!! गावात ४,५ पब्स, गोल्फ क्लब आणि एक छोटेसे शॉपिंग सेंटर इतपतच पसारा आहे.
पहिल्या दिवशी स्टीफनशी अत्यंत जुजबी आणि औपचारिक ओळख झाली. इथे मला खऱ्याअर्थी गोऱ्या माणसाबरोबर काम करावे लागले. इतकी वर्षे बरीच गोरी माणसे संपर्कात आली पण ती सगळी तात्पुरत्या कामानिमित्ताने. त्यामुळे, या माणसांशी "नाळ" जुळली नव्हती. एकतर, गोरी माणसे, काम वगळता, फारसे संबंध तुमच्याशी ठेवत नाहीत आणि इथे देखील आपल्याला असाच अनुभव येणार, अशी मनाशी खुणगाठ बांधून कामाला सुरवात केली. वास्तविक, माझ्या हाताखाली देखील ४ गोरी(च) माणसे होती पण कितीही झाले तरी मी त्यांचा "बॉस" असल्याने, तसे जवळकीचे नाते निर्माण होणे, तसे अवघडच होते. (अर्थात पुढे सगळे व्यवस्थित झाले, तो वेगळा भाग!!)
वास्तविक माझे आणि स्टीफनच्या कामाचे स्वरूप भिन्न होते तरी देखील, काही नवीन खरेदी, काही रिपेरिंगची कामे आणि सर्वात महत्वाचे "रेव्हेन्यू कलेक्शन" याबाबत आमच्या भेटीगाठी सारख्या होत राहिल्या. आत्तापर्यंत, साउथ आफ्रिकेत नोकरी करताना, कंपनीने मला गाडी दिली असल्याने, मला गाडी विकत घेण्याचा प्रश्नच उद्भवला नव्हता परंतु इथे तशी पद्धत नव्हती आणि अर्थात माझे तसे "contract" असल्याने, गाडी विकत घेण्याचा प्रश्न उभा राहिला. गावात तर मी नवखा, त्यामुळे लगेच स्टीफनशी विषय काढला. त्याने लगेच, त्याच्या जावयाला फोन लावला - जावई जगप्रसिद्ध AVIS कंपनीत फार मोठ्या पदावर होता. आता, सासऱ्याकडून मागणी आल्याने, त्याने मला गाडी मिळवून देण्यासाठी बरीच मदत केली आणि या निमित्ताने, माझे स्टीफनशी ओळख आणखी घट्ट झाली. त्याला तसे नवल वाटायचे, मी इथे "एकटा" कसा राहतो? अर्थात, त्यालाच कशाला, इतकी वर्षे तिथे राहून, इतरांना देखील हाच प्रश्न पडायचा.
खरतर स्टीफननेच, मला घर शोधायला मदत केली. गाव तसे लहान - अगदी आकारमानाने देखील. जवळपास १५ ते २० हजार इतकीच लोकवस्ती आणि बव्हंशी सगळे गोरे. थंडीच्या दिवसात अत्यंत कडाक्याची थंडी, म्हणजे -४,-५ इतके तापमान जाणार!! त्यामुळे गावात फारसे उद्योगधंदे नाहीत. आमची बृवरी आणि जगप्रसिद्ध नेसले कंपनीचा कारखाना. इतक्याच मोठ्या कंपन्या.
एकदा, त्याची बायको - जेनी ऑफिसमध्ये आली आणि स्टीफनने माझी ओळख करून दिली. त्याला साजेशी अशीच बायको आहे. स्टीफन, मुळचा लष्करातील. त्यामुळे हाडपेर मजबूत. गोरा वर्ण, साधारण साडे पाच फुट उंची, निळे डोळे, डोळ्यांवर चंदेरी काडीचा चष्मा, अंगकाठी अत्यंत काटक आणि झपझप चालण्याची लकब आणि हसतमुख चेहरा, त्यामुळे समोरच्यावर लगेच छाप पडायची. सर्वात महत्वाचे म्हणजे, निर्णय लगोलग घेऊन, कामाचा फडशा पडायची वृत्ती. आम्ही, दोन वर्षे एकत्र होतो पण, ऑफिसवेळेत, त्याने माझ्याशी कधीही वायफळ गप्पा मारल्या नाहीत. ऑफिसमध्ये फक्त कामासंबंधी बोलणे आणि नंतर मात्र मित्रासारखे वागणे. हाच अनुभव मला पुढेदेखील वारंवार, गोऱ्या माणसांबाबत आला.
कामानिमित्ताने, आमच्या ऑफिसमध्ये अनेकवेळा हेड ऑफिसमधून काही वरिष्ठ अधिकारी यायचे, कधी ऑडीटर यायचे आणि त्यानिमित्ताने, आम्हाला त्यांना बाहेर जेवायला न्यायला लागत असे. अशा कार्यक्रमात, स्टीफन खुलत असे. गोरा माणूस तरी देखील इतके नर्म विनोद, प्रसंगी स्वत:ची चेष्टा करणार, कधी तरी त्याचे लष्करातील अनुभव सागणार. त्यांमुळे अशा पार्ट्या फार रंगतदार व्हायच्या. २००५ च्या ख्रिसमसला त्याने मला घरी बोलावले होते. व्हाईट लोकांच्या घरी त्यापूर्वी अगदी तुरळक गेल्याच्या आठवणी होत्या. इथे मात्र, हा समाज ख्रिसमस कसा साजरा करतात, याचा मन:पूत आनंद घेतला. इथे केवळ, ड्रिंक्स किंवा खाणे इतपतच मर्यादित समारंभ नसतो. घरात, अनेक खेळ खेळले जातात, नृत्ये केली जातात, विनोदी बोलणे तर अखंड चालू असते. केवळ नातेवाईकच जमतात असे नसून, इतर मित्र मंडळी एकत्र जमतात आणि एकूणच उत्सवी पद्धतीने ख्रिसमस साजरा केला जातो. त्या रात्री, स्टीफनने मला त्याच्या घरीच राहायचा आग्रह केला आणि मी तो मानला. तसे, या गावात सुरक्षिततेचा इतका गंभीर प्रश्न नव्हता, जितका मोठ्या शहरांत आहे. पण, तरीही अनिल एकट्याने इतक्या रात्री गाडी कशी चालवणार, म्हणून त्याने राहण्याचा आग्रह केला.
पुढे, त्याने मला, त्याच आग्रहापोटी, तिथल्या गोल्फ क्लबचे सभासदत्व घ्यायला लावले. गावात मनोरंजनाची तशी वानवा होती. आणि हा क्लब तर सगळ्या व्हाईट लोकांनी भरलेला. आलिशान क्लब संस्कृती म्हणजे काय, याचा साक्षात अनुभव घेता आला. कितीतरी रविवार सकाळ, मी इथे खेळण्यात घालवल्या. सुरवातीला, मला गोल्फ खेळातील ओ की ठो माहित नव्हते पण तिथे देखील स्टीफनने त्याची ओळख वापरून, माझ्याकडून, प्राथमिक धडे अक्षरश: घोटवून घेतले. इथेच, "बॉल डान्स" प्रकार अतिशय जवळून अनुभवता आला आणि आपल्याला वाटते तितके सहज हे नृत्य नसून, त्याचे देखील सुसंगत शास्त्र आहे, हे समजून घेता आले.
दुपारचे जेवण, आम्ही बहुतेकवेळा एकत्रच घेत असू. मला, आपल्या रीतीरिवाजानुसार संपूर्ण जेवणाची सवय तर हा माणूस, केवळ एखाद, दुसरे sandwich!! तरी देखील, हा माणूस काहीवेळा माझा डबा "शेयर" करीत असे, अगदी हक्काने!! पुढे, मला, कंपनीच्या अनेक डेपोज भेटी करण्याची जरुरी असायची आणि हे डेपोज, अत्यंत अंतर्गत भागात आणि अधिक करून, काळ्या लोकांच्या वस्तीत होते. सुरवातीला, आम्ही दोघे एकत्र जात असू. अशा भेटीतून, खरेतर मला साउथ आफ्रिकेचे अंतरंग समजून घेता आले.
दिवसेंदिवस कंपनीचा खर्च आणि उत्पन्न, यातील दरी वाढत असल्याने, आम्हा दोघांच्या ध्यानात, या बृवरीचे भवितव्य कळत होते. त्यानिमित्ताने, ऑफिस वेळ संपल्यावर, आम्ही दोघेच ऑफिसमध्ये बसून विचार करीत बसायला लागलो आणि उशीर झाला की मला बळजबरीने गाडीत बसवून, त्याच्या घरी जेवायला घेऊन जात असे. मला तर फार नवल वाटायचे कारण, इतर व्हाईट माणसे आणि हा, यात, बराच फरक होता. गोरे लोकं कितीही जवळचे झाले तरी, त्यांच्या घरात शक्यतो प्रवेश द्यायला नाखूष असतात. त्याबाबतीत स्टीफन अपवाद. २००७ मध्ये, बृवरी बंद पडणार, हे जवळपास नक्की झाले. मी पुढे प्रिटोरिया इथे महिंद्र कंपनीत नोकरी शोधली तर, स्टीफन त्यावेळेस, टांझानिया इथे नोकरीला गेला. अर्थात, ज्याला साउथ आफ्रिकेची सवय लागली आहे, त्याला इतर आफ्रिकन देशात स्वास्थ्य मिळणे, तसे दुरापास्त!! तसेच झाले, त्याने, परत याच कंपनीत प्रवेश मिळवला पण, डर्बन इथल्या बृवरी मध्ये. पुढे, मी, माझी गाडी विकली आणि दुसरी घेतली पण तिथे देखील स्टीफन मदतीला आला, परत त्याच्या जावयाला या कामी जुंपले.
तो डर्बन इथे आणि मी प्रिटोरिया इथे, त्यामुळे गाठीभेटी दुर्मिळ. फोनवरून संभाषण, इतपतच संपर्क. आता तर मी कायमचा भारतात आलो पण, तरीही अजून जे थोडे गोरे लोकं माझ्या संपर्कात आहेत, त्यात स्टीफन अग्रभागी!!

Wendi Farrell

मी साधारणपणे २००६ मध्ये प्रिटोरिया इथल्या महिंद्र साऊथ आफ्रिका या कंपनीत लागलो. १९९८ ते २००१ मी डर्बन सारख्या मोठ्या शहरात राहिलो होतो. त्यानंतर या शहरात राहायला आलो. एकूणच फिरायला जायचे तर शेजारील जोहान्सबर्ग शहर गाठायचे आणि परतायचे, असा परिपाठ असायचा पण आता या शहरात नोकरी मिळाली आणि सर्वात प्रथम घर शोधणे, या विषयाला महत्व देणे आवश्यक होते. त्याआधी मी Standerton इथे रहात होतो आणि तिथून निघताना, माझ्या जोहान्सबर्ग इथे राहणाऱ्या मित्राकडे घरातले सगळे सामान ठेऊन, भारतात सुटी घालवायला आलो. अर्थात काही दिवस घरी (मुंबईमधील) घालवल्यावर सरळ प्रिटोरिया गाठले. सुदैवाने लगेच मला ऑफिसजवळील Eco Park या कॉम्प्लेक्समध्ये घर मिळाले आणि लगेच मित्राकडून सगळे सामान आणून स्थिरस्थावर व्हायला लागलो. ऑफिसमध्ये, तेंव्हा विजय देसाई, महेंद्र भामरे, हेतल शाह आणि विजय नाक्रा ही कंपनीच्याच हेड ऑफिसमधून इथे ट्रान्स्फर झाली होती आणि त्यांच्याशी लगेच ओळख होणे साहजिकच होते. याच ऑफिसमध्ये मला वेन्डी भेटली, आमचा C.E.O. विजय नाक्राची वैय्यक्तिक सहाय्यक म्हणून कामाला होती - आता ती दुसऱ्या कंपनीत काम करते. काहीसा उंच शेलाटी बांधा, सडपातळ देहयष्टी, निळसर डोळे, सोनेरी केस, उजव्या गालाच्या खाली छोटासा तीळ आणि सर्वात महत्वाचे सहजपणे फुलणारे हास्य. पहिल्याच दिवशी माझ्या टेबलाशी येऊन, माझी ओळख करून घेतली. अर्थात तो पर्यंत पूर्वीच्या कंपनीतून गोऱ्या व्यक्तीशी संपर्क होणे, ओळख वाढणे इत्यादी बाबी अंगवळणी पडल्या होत्या. या ऑफिसमध्ये वरील ४ व्यक्ती आणि अस्मादिक सोडल्यास सगळे काम करणारे गौर वर्णीय होते. इतक्या घाऊक स्वरूपावर गोऱ्या व्यक्तींशी काम यापूर्वी कधीही केले नव्हते.
मी राहात होतो तो प्रसिद्ध "सेंच्युरियन" उपनगरीय भाग - जिथे क्रिकेटचे जगप्रसिद्ध स्टेडियम आहे, माझा कॉम्प्लेक्स देखील अतिशय देखणा, अवाढव्य असा होता. एकूण सगळेच मनासारखे घडले होते. ऑफिसमध्ये बहुसंख्य गोरे असल्याने त्यांचीच संस्कृती ऑफिसमध्ये होती - स्पष्ट बोलायचे झाल्यास, कामाच्या वेळात शक्यतो गप्पा टाळणे, काम करताना संपूर्णपणे मन लावून काम करणे इत्यादी. वास्तविक कामाच्या दृष्टीने माझा आणि वेन्डीचा फारसा संबंध नव्हता पण तरीही तिने मला पहिल्याच भेटीत घर शोधायला मदत केली आणि पेपरमधील जाहिरात दाखवून तिथल्या बाईचा फोन नंबर देऊन, संपर्क साधायला सांगितले आणि हे सगळे अतिशय साधेपणाने. कुठेही मी अनिलचे काम करून देत आहे, असला फालतू आविर्भाव नव्हता. कुठेही औषधापुरता देखील औपचारिकपणा नव्हता.
मला घर मिळाले आणि मी तिथे राहायला गेलो. वेन्डीला तसे सांगितले आणि तिने काहीही कारण नसताना, माझ्याशी हात मिळवून अभिनंदन केले. मला देखील जरा बरे वाटले. एकतर गोऱ्या व्यक्ती आपणहून स्वतः:हुन दुसऱ्याशी बोलायला, संबंध वाढवायला तयार नसतात. आज मी साऊथ आफ्रिका सोडून ९ वर्षे झाली पण आजही आम्ही एकमेकांच्या संपर्कात आहोत. ऑफिसवेळेत गप्पा मारण्याचा प्रश्नच नव्हता पण तरीही Good Morning Anil किंवा ऑफिस सोडून जाताना, Good Evening Anil, असे व्हायचेच. आमची मैत्री खरी व्हायला लागली ती शुक्रवार दुपारच्या काळात. शुक्रवार दुपार आली म्हणजे हळूहळू ऑफिसमधील ताणतणावाचे क्षण कमी व्हायला लागतात, वीक एन्ड कुठं नि कसा साजरा करायचा, या बद्दल बोलणी व्हायला लागतात. मी एकटाच रहात असल्याने, माझी चेष्टा होणे क्रमप्राप्तच होते, विशेषतः: आता कुठल्या मुलीबरोबर "डेटिंग" आहे? असला प्रश्न देखील ती विचारायची. पुढे ओळख वाढल्यावर आम्ही आमच्या कुटुंबाची माहिती एकमेकांना दिली, फोटो दिले. बरेचवेळा ती माझ्या टेबलाशी यायची आणि काहीतरी विषय काढून बोलायची. मी एकटा रहात आहे, याचे तिला थोडे कौतुकच होते, विशेषतः: जेवण बनवणे घर सांभाळणे सगळे एकट्याने करतो याचे तिला नवलच वाटायचे. ती नेहमी मला, आज जेवणात काय आहे? असला प्रश्न विचारायची आणि विचारताना स्वराला स्निग्धता असायची. वास्तविक आपले मसाले त्यांच्या पचनी पडायचे नाही त्यामुळे खाणे एकमेकांना देण्याचा प्रश्नच नव्हता. बरेचवेळा आमच्या ऑफिसमध्ये दर महिन्याला, शेवटच्या शुक्रवारी बियर पार्टी असायची, तेंव्हा वेन्डी माझ्याशी बरेच खुलून बोलायची. पार्टी म्हणजे सगळाच मोकळेपणा असायचा, विषयाचे कसलेही बंधन नसायचे तरीही स्वाभाविक मर्यादा या पाळल्याच जायच्या. मी बियर घ्यायचो तर वेन्डी वाईन किंवा तत्सम ड्रिंक घ्यायची. पार्टी तशी उशिरापर्यंत चालायची तरीही शेवटपर्यंत वेन्डी तिथे हजर असायची.
तिथे कामाला असताना, मला ५० वर्षे पूर्ण झाली. वास्तविक मला काही फार मोठा समारंभ असा करायचा नव्हता. ऑफिसमधील आम्ही ४ भारतीय माझ्या घरी येणार होते, त्यानिमित्ताने घरी थोडे ड्रिंक्स, मी चिकन बिर्याणी बनवली होती, ती एन्जॉय करायची असेच पार्टीचे स्वरूप होते पण वेन्डीने माझा वाढदिवस कंपनीच्या मेलवर टाकला आणि सगळीकडून अभिनंदन सुरु झाले. थोड्या वेळाने वेन्डीच माझ्या टेबलाशी आली आणि अभिनंदन म्हणून मिठी मारली. त्यात कुठेही वखवखणे नव्हते की आणखी कुठलीही वासना नव्हती. आपला एक भारतीय मित्र, आज पन्नाशी गाठत आहे, याचा निखळ आनंद व्यक्त होत होता. वेन्डी कामात मात्र वाघ होती तसेच कामात अचूक होती. तिने केलेल्या कामात, निदान मी तरी कधीही चूक झालेली बघितली नाही.
कामाच्या संदर्भात देखील आमचे बोलणे व्हायचे, वास्तविक तिचे काम आणि माझे काम हे संपूर्णपणे वेगळे होते.
त्याच काळात एकदा मी भारतात सुटीवर आलो होतो. ऑफिसमधील दोन मैत्रिणींनी मला भारतातून येताना, "गुरु शर्ट" आणायला सांगितले होते. आता मुद्दामून सांगितले आहे म्हणून मी जरा चांगल्यातले शर्ट्स घेतले आणि परतल्यावर त्यांना दिले, त्यांनी लगोलग मला पैसे दिले. हा गोऱ्या लोकांचा व्यवहार असतो. वास्तविक मला काही फार खर्चिक असे नव्हते पण आपण दुसऱ्याकडून का म्हणून फुकट घ्यायचे? ही वृत्ती. आता वेन्डीने काही मला सांगितले नव्हते म्हणून मी काही तिच्यासाठी आणले नव्हते पण त्यावरून वेन्डीने माझी भरपूर चेष्टा केली. मी तुझी मैत्रीण तेंव्हा मी सांगायला कशाला पाहिजे? तूच स्वतः:हुन आणायला हवे होते!! असे तिचे म्हणणे आणि तसे बघितले तर त्यात काही फार चूक नव्हते. एका क्षणी तर मलाच माझी चूक कळली आणि मी ते मान्य केले. अर्थात त्यावरही वेन्डीने बराच खवचटपणा केला.
२००८ मध्ये आमच्या कंपनीने देशातील सगळ्या एजंट्सची वार्षिक मीटिंग ठरवली होती. अर्थात मॅनेजिंग सेक्रेटरी म्हणून वेन्डीला भरपूर काम होते आणि तसे तिने नेमकेपणाने केले. दोन दिवसांची मीटिंग होती आणि आदल्या दिवशी संध्याकाळी, दिवसभराचे सोपस्कार संपल्यावर डिनर पार्टी होती. त्यावेळेस मात्र मी आणि वेन्डी एका कोपऱ्यात ड्रिंक्स घेऊन शांतपणे बसून गप्पा मारीत होतो. पार्टी निमित्ताने तिने लाल जर्द रंगाचा गाऊन घातला होता. पांढऱ्या वर्णावर लाल गाऊन फारच खुलून दिसत होता आणि मला तिची चेष्टा करायची संधी मिळाली आणि मी ती भरपूर साधली.एकूणच आमच्यात कसलेही गैरसमज होतील असले काहीही नव्हते पण तरीही मैत्रीच्या मर्यादा आम्ही दोघेही पूर्णपणे सांभाळीत होतो. मनापासून मैत्री करावी पण मैत्री या नात्यांच्या सगळ्या मर्यादा ओळखाव्यात, हे मला वेन्डीकडून शिकता आले. निव्वळ निखळ मैत्री, त्यात कुठेही वखवख नव्हती आणि आता तर आम्ही दोन टोकाला रहात असताना केवळ अशक्य!! कंपनीचा व्यवहार त्यावेळी घसरत चालला होता, विजय देसाईला परत भारतात पाठवले गेले, महेंद्रची देखील वर्णी लागली होती. आम्हा सगळ्यांनाच आमचे भवितव्य दिसायला लागले होते. वास्तविक या कंपनीत मी रमलो होतो पण असे घडायचे नव्हते. मी कंपनी सोडायचा निर्णय घेतला आणि वेन्डीला सांगितला. तिला तितकासा आवडला नव्हता पण त्याला इलाज नव्हता - पुढे काही महिन्याने तिने देखील कंपनी सोडली.
आम्ही नंतर वेगवेगळ्या कंपनीत कामाला लागलो तरीही एकमेकांशी संपर्क राखून होतो. अर्थात बरेचवेळा फोनवरून बोलत असायचो. कंपनी सोडायचा एक दिवस आधी ती माझ्या टेबलाशी आली. मी टेबल आवरत होतो. तिला बहुदा कुठेतरी खट्टू वाटत असावे कारण तिची नजर तरी तेच सांगत होती. काहीशा रुद्ध स्वरांत तिनी माझा हात हातात घेतला, किंचित दाबला आणि आम्ही बहुदा शेवटचे असे, मिठीत शिरलो. किंचित क्षण असतील पण त्या मार्दवतेने मला देखील काहीसे भारावल्यासारखे झाले. कुठला अनिल आणि कुठली वेन्डी!! आता परत कधी भेटणार, याची सुतराम शक्यता नव्हती तरीही काहीसा लळा लागला होता. आता रोजच्या रोज भेटणे अशक्य.
पुढे मी कायमचा भारतात परतायचा निर्णय घेतला आणि तिला तसे फोनवरून कळवले. खरतर तिला खूपच आनंद झाला होता कारण आता मी माझ्या कुटुंबात जाणार होतो. मैत्रीच्या मर्यादा न सांगता आखून घेऊन तरीही सजग मैत्री कशी करावी, याचे सुंदर उदाहरण तिने मला घालून दिले. आजही आम्ही फेसबुकवरून संपर्कात आहोत आणि एकमेकांच्या  वाढदिवसाला आवर्जूनपणे फोन करून शुभेच्छा देतो. मैत्री नात्यात यापेक्षा आणखी काय वेगळे साधायचे असते?