Wednesday 31 August 2016

इशारो इशारो मे दिल लेनेवाले

"जवळ…. जवळ ये, पण सीमेचे भान असू दे 
रात्र असो, पण पहाटही वेगळी दिसू दे 
स्वरजुळणीतुनि एक गीत - तरी हवेच अंतर सात सुरांतून 
इतुके आलो जवळ जवळ की जवळपणाचे झाले बंधन"
मंगेश पाडगांवकरांच्या या ओळी आपल्या आजच्या गाण्याच्या मतितार्थाशी जवळीक साधतात. अर्थात, गाण्यातील कविता आणि या ओळी, इतपतच संदर्भ आहे. चित्रपटातील गाण्याबाबत एक बाब नक्कीच मांडावीशी वाटते,  गाण्याची चाल, पहिल्या मुखड्यातच मनात ठसली पाहिजे म्हणजे मग ते गाणे लक्षात राहण्यास मदत होते. अर्थात, चित्रपटातील संदर्भ, अभिनय, चित्रीकरण इत्यादी घटक मदतीला नेहमीच असतात तरीही गाणे म्हणून ऐकायला गेल्यास, मुखडा श्रवणीय असणे अत्यंत गरजेचे असते. "इशारो इशारो मे" या गाण्याबाबत हा अनुभव लगेच मिळतो. 
सुरवातीचा आलाप (च) आपल्याला गाण्याच्या स्वररचनेची पार्श्वभूमी तयार करून देतो आणि तिथेच गाणे पहाडी रागावर आहे, हे कळून चुकते. 
वास्तविक, कवितेत सुरवातीला "हाये" हा शब्द नाही परंतु आशा भोसले यांनी हा शब्द गाऊन, गाण्याची सुरवातच सुंदरपणे केली आहे. "हाये" या शब्दातून ऐकायला मिळणाऱ्या, आर्जव आणि मुग्ध भावना खरोखरच रमणीय आहेत. चित्रपट गाण्याच्या बाबतीत हा विशेष मांडण्यासारखा आहे. मुळात ३ ते ४ मिनिटांचा सगळा आविष्कार आणि त्यात(च) गायकी बसवायची आणि ती देखील शब्दांचा आशय जरादेखील न बिघडवता!! हे अजिबात सहज जमण्यासारखे नसते. गळा हुकमी तयार हवा पण त्यात सवयीचा रुक्षपणा बाजूला सारून उस्फूर्तता दर्शवायची!! 

"इशारो इशारो में दिल लेनेवाले
बता ये हुनर तुने सिखा कहां से 
निगाहो निगाहो में जादू चलाना 
मेरी जान सिखा है तुमने जहां से 

इथे "इशारो इशारो" या शब्दातून जाणवणारा आशय आणि त्याची अभिव्यक्ती, आशा भोसले ज्याप्रकारे दाखवून देतात, ते खास ऐकण्यासारखेच आहे. मघाशी मी, "मुग्ध" हा शब्द वापरला आणि तीच भावना, हे शब्द गाताना आपण ऐकू शकतो. पुढील ओळीत "हुनर" शब्द देखील याच धर्तीवर ऐकावा लागेल. इथे "हुनर" हाच शब्द योग्य आहे आणि तोच शब्द कविता आणि गाण्याची खुमारी वाढवतो. गाताना किंचित आवाजात कंप घ्यायचा पण इतका नव्हे, जेणेकरून शब्दातील मार्दव नाहीसे होईल. खरतर सगळे गाणेच अतिशय मार्दवतेने गुंफलेले आहे. सुरवातीच्या आलापीत गाण्याची लय स्पष्ट होते आणि तीच लय, शेवटपर्यंत कायम राखली आहे आणि त्यायोगे मार्दव देखील!!  
गाण्यात दीपचंदी ताल वापरला आहे, जो फारसा सुगम संगीतात वापरला जात नाही. एकतर १४ मात्रांचा ताल आहे आणि शक्यतो हा ताल ठुमरी किंवा गझल सारख्या उपशास्त्रीय संगीतासाठी वापरला जातो, जिथे लय अधिक दीर्घ असू शकते. परंतु या गाण्यात त्याचा वापर अतिशय खुबीदारपणे केलेला आहे. संगीतकार म्हणून ओ.पी.नैय्यर यांना निश्चित क्रेडिट द्यायलाच लागेल. 

मेरे दिल को तुम भा गये, मेरी क्या थी इसमें खता 
मुझे जिसने तडपा दिया, यही थी वो जालीम अदा 
ये रांझा की बातें, ये मजनू के किस्से 
अलग तो नहीं हैं मेरी दास्तां से 

प्रत्येक संगीतकाराची स्वतः:ची अशी खास शैली असते आणि त्यानुरूप त्याच्या बहुतेक रचना आपल्याला त्या शैलीचाच पडताळा देत असतात. काही संगीतकार आपल्याच शैलीचे गुलाम झाले आहेत की काय? असा प्रश्न पडण्याइतपत शैलीच्या आहारी गेलेले दिसतात. जितकी तुमची कारकीर्द लांबते, दीर्घ होते त्या हिशेबात तुमची शैली बनत जाते, क्वचित विकसित देखील होते. ओ.पी. नैय्यर यांची गाणी ऐकताना आपल्याला हा अनुभव वारंवार येतो. पहिला अंतरा ऐकताना याची जाणीव प्रकर्षाने होते. ओळ सुरु होण्याआधी किंचित हुंकार घ्यायचा किंवा तासच आलाप घ्यायचा आणि लगेच काही ठराविक शब्दांवर जोर देऊन, आपली शैली प्रस्थापित करायचा आग्रह दिसतो. कधी कधीतरी हरकती देखील समान वाटाव्यात, इतके साम्य ऐकायला मिळते. "मेरे दिल को तुम भा गये" ही ओळ, या दृष्टीने ऐकावी. पुढे, "मुझे जिसने तडपा दिया" ही ओळ गाताना, संगीतकाराच्या शैलीचे प्रच्छन्न दर्शन होते. 
इथे कुठलीही कमतरता दाखवण्याचा उद्देश नसून, स्वररचनेत आपली शैली कशी अनाहूतपणे असेल किंवा उद्मेखूनपणे असेल (या बाबत ठाम विधान करणे अशक्य) पण स्पष्टपणे दिसते, हेच दाखवून द्यायचे आहे. तसे बघितले तर या संगीतकाराने रूढार्थाने संगीत शिक्षण घेतले नव्हते पण याचा परिणाम असा झाला, रागाचा वापर करताना, रागालाच बाजूला सारणे त्यांना कधीही अवघड गेले नाही. या गाण्यात याचा पडताळा आपल्याला घेता येतो. पहाडी राग आहे पण रागाचे मूलभूत चलन आहे आणि पुढे चाल स्वतंत्रपणे विस्तारत जाते. चित्रपट संगीतासाठी रागदारी संगीताचा अभ्यास जरुरीचा आहे, हा निकष फार चुकीच्या पद्धतीने मांडला गेला आणि स्वीकृत केला गेला.  असे असले तरी मधुर सुरावटी किंवा चलने याबाबतीत हा संगीतकार नि:संशय सर्जनशील होता. याबाबत आणखी एक विधान करता येईल, कोणताही रचनाकार रचनाप्रक्रियेत कधीही एकांगी असूच शकत नाही. या विचाराच्या पार्श्वभूमीवर पुढील रचना ऐकणे मनोरंजक ठरेल. 

मोहब्बत जो करते हैं वो मोहब्बत जताते नहीं 
धडकने अपने दिल की कभी, किसी को सुनाते नहीं 
मजा क्या रहा जब के खुद कर दिया हो 
मोहब्बत का इजहार अपनी जुबां से 

आशा भोसले यांच्या गायकीबद्दल लिहायचे झाल्यास, कुणालाही हेवा वाटावा इतका चैतन्यपूर्ण, कंपविहीन असूनही भावपूर्ण, न घसरतात द्रुत लयीत फिरणारा, खालच्या आणि वरच्या तारतांवर सहज आविष्कारपूर्णतेने विहार करणारा आणि भरीव असूनही जनानी सौंदर्याने व लालित्याने युक्त असा आहे. सर्वात महत्वाचा भाग म्हणजे आवाजाचा पल्ला विस्तृत, तारता मर्यादा सहजपणे, वेगाने आणि अगदी गाण्याच्या आरंभी देखील घेणे, याबाबत तिच्याशी बरोबरी करणारा आवाज सापडणे जवळपास अशक्य आहे. 
या गाण्याच्या संदर्भात बोलायचे झाल्यास, "मोहब्बत जो करते हैं" ही ओळ घ्यायच्या अधिक किंचित "हुंकार" आहे आणि हा स्वर, त्या आधी पार्श्वभागी सतारीच्या स्वरांचा शेवट जिथे होतो, त्या स्वराशी जुळवून घेतलेला आहे. आणि हाच "हुंकार" पुढे गायल्या गेलेल्या ओळीला वेगळे परिमाण देतो. मघाशी मी जे लिहिले, गीताच्या आरंभी देखील, स्वरांत आवश्यक तितके "वजन" आणायचे कौशल्य, त्याची प्रचिती इथे घेता येते. 
"मजा क्या रहा जब के खुद कर दिया हो" ही ओळ जेंव्हा ऐकायला मिळते तेंव्हा. मी वरती शैलीचा जो उल्लेख केला आहे, त्याचे नेमके प्रत्यंतर ऐकायला मिळते.    

माना के जान-ए-जहां लाखो में तुम एक हो 
हमारी निगाहो की भी कुछ तो मगर दाद दो 
बहारो को भी नाज जिस फुल पर था 
वही फुल हमने चुना गुलसिता से"  

रफी यांच्या गायनाबाबत देखील आपल्याला अशीच काही विधाने करता येतील. आवाजाचा पल्ला, भरीवपणा, मर्दानी जोमदारपणा, सुरेलपणा आणि लहान स्वरांशाचे सफाईदार गायन, ही खास वैशिष्ट्ये म्हणता येतील. "हमारी निगाहो की भी कुछ" ही ओळ गाताना आवाजातील जोमदारपणा आपल्या सहज लक्षात येईल आणि असे गाताना देखील, स्वरात कुठेही "कणखर"पणा येत नसून अत्यंत सुरेल गायन ऐकायला मिळते. ओळीच्या सुरवातीला घेतलेला सुरेलपणा, त्याच ताकदीने शेवटपर्यंत त्याच ताकदीने पेश करण्याचे कौशल्य खरोखरच वाखणणावे असेच आहे. बरेच गायक इथे घसरतात, हे इथे ध्यानात ठेवावे. 
एकंदरीत बघता, चैतन्याने भारलेले तरीही कुठेही विसविशीत न होणारे असे गाणे ऐकल्याचे समाधान आपल्याला इथे मिळते. अर्थात हा अनुभव संगीतकार म्हणून ओ.पी. नैय्यर तसेच गायक म्हणून रफी आणि आशा भोसले यांच्या एकत्रित कारागिरीकडे जात, हे नि:संशय. 
Attachments are

Thursday 25 August 2016

आरतीप्रभू

आरतीप्रभू उर्फ खानोलकर, यांच्या कवितेविषयी लिहायला सुरवात करण्यापूर्वी, मला त्यांच्या एकूणच साहित्यप्रकृतीवर प्रकाश टाकून पुढे, त्यांची ही प्रवृत्ती त्यांच्या साहित्यात कशी ठळकपणे दिसायला लागली, याचा अदमास घेता येईल. खरेतर कलाकाराच्या वैय्यक्तिक आयुष्याचा त्याच्या कलाकृतीशी संबंध असतोच असे नाही पण काहीप्रमाणात तरी वैय्यक्तिक आयुष्य त्यांच्या कलाकृतीत डोकावत राहते, हे मान्यच करायला हवे. माझा प्रयत्न, त्यांच्या वैय्यक्तिक आयुष्याचा ताळेबंद मांडण्याची नसून, सुरवातीपासून त्यांची जी विचारसरणी होती, त्या विचारसरणीचा प्रभाव आणि विस्तार कशाप्रकारे त्यांच्या कवितेत होत गेला, याचा मागोवा घेण्याकडे आहे. 
प्रतिभा आणि त्याच्या आविष्कार हा त्याच्या कलाकृतीतूनच बघावा. प्रतिभेचा प्रवास पडताळून बघणे जिथे प्रत्यक्ष कलाकाराला देखील अशक्य असते तेथे आपल्या सारख्या त्रयस्थाला तर अजिबात जमणारा नाही. कलाकृती प्रत्यक्ष समोर आल्यावर, त्या कलाकृतीच्या सत्यतेची, दर्जाची पारख करणे शक्य असते परंतु टी कलाकृती, कलाकाराच्या मनात कशी "जन्माला" आली, हे मजानुन घेणे जवळपास सर्वथैव अशक्य कोटीतील बाब ठरते. त्यादृष्टीने प्रतिभेचा शोध हा नेहमीच चकवा देणारा असतो आणि इथेच आपण "नियती" शरण व्हायला लागतो. अशावेळेस वाटते, "आत्मस्वातंत्र्य" म्हणजे काय? खरंच आपल्याला "आत्मस्वातंत्र्य" म्हणून काही मिळते का? जर तसे काही मिळत असेल तर मग "नियती" शरण या शब्दाला किती अर्थ आणि महत्व आहे? खानोलकरांच्या साहित्यात आणि पर्यायाने कवितेत मला वाटते हाच भाव सर्वत्र पसरलेला आढळतो. "आत्मस्वातंत्र्य" आणि "नियती",यांचा खानोलकरांच्या कवितेत किती प्रभाव आहे, हेआपण त्यांच्या कवितेतून बघण्याचा प्रयत्न करणार आहोत. परंतु याचाच परिणाम असा दिसतो, इथे सतत शोधाचा प्रयास चालू आहे पण त्या शोधातून आपल्याला काय मिळणार आहे, याबाबत अनभिज्ञता आणि जरी अदमास घेता आला तरी पुढील वाटचाल ही अंधारात ठेचकाळत वाट शोधण्याइतपत मर्यादित आणि ती देखील, धुक्यातून प्रवास केल्यासारखी.
वास्तविक खानोलकरांनी, "कादंबरी","नाटक", "कथा" इत्यादी साहित्य माध्यमांत लिखाण केले तरी या सगळ्यातून, त्यांच्यातील कवी सतत आपल्यापुढे येत असतो. कथेत देखील एखादी प्रतिमा खेळवत ठेऊन, कथेला अनेक अंगानी व्यामिश्र परीणाम घेऊन, वाचकाला खिळवून ठेवायचे, हाच उद्देश स्पष्ट दिसतो. त्यामुळे, आपण खानोलकरांना "कवी" याच अधिक ओळखतो. 
आरतीप्रभूंच्या कवितेतील अनुभव काहीवेळा विस्कळीत वाटतो याचे कारण, कवी बरेचवेळा एखाद्या सूत्राला धरून काहीतर, असे वाटत नाही. सुरवातीला एक सूत्र असते पण पुढे त्यात अनेक वेगवेगळ्या प्रतिमा अवतरतात आणि बरेचवेळा  वाचक काहीसा चक्रावून जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. पुष्कळदा जागृत मनाच्या राजरस्त्याने पुढे न सरकत संज्ञाप्रवाहाच्या भूमिगत प्रवाहाबरोबर ते पुढे सरकतात आणि मध्येच कवितेतील मूळ संकल्पना नजरेस आणून, वाचकांना बिचकवतात. पण हे सगळे करताना, अनुभवांच्या रचनेच्या मूळ तत्वांना ते डावलत नाहीत. कवितेतील सगळेच अनुभव बांधेसूद असतात. ते डावलतात ते अनुभवांच्या रचनेविषयीच्या संकेतांना. त्यामुळे, त्यांच्या अनुभवांची रचना जराशी अस्वाभाविक वाटली तरी तरी ती, त्या प्रत्यक्ष अनुभवांपुरती अधिक स्वाभाविक असते, असे आपल्याला म्हणता येईल. 

"चिरा लाल नि सिमेंट ढवळे 
त्यांतुन फुटते डहाळ हिरवी; 
कळसाआधी भिंत अनावर 
दचकून होते इथें ओणवी. 

घुमवयाचे गगन खोलवर 
तिथें चिमुटभर घुमते गाणें;
तुटते चिंधी जखमेवरची 
आणिक उरते संथ चिघळणे. 

चिरा लाल नि सिमेंट ढवळे
त्यांतून कैसे निघतील बगळे?
म्हणून माझ्या पायधुळीची 
गिरकी जाते कळसापरती..."
(गिरकी जाते कळसापरती - जोगवा) 

नीट वाचले तर ही कविता म्हणजे सुंदर भावकविता आहे. मनाच्या संत्रस्थ अवस्थेचे चित्रण आहे. भावकवितेचे एक लक्षण म्हणून असे सांगता येईल, कवितेत मांडलेला विचार आणि त्याची अभिव्यक्ती, यासाठी कविताच असणे अपरिहार्य व्हावे. तिला दुसरे कुठलेही स्वरूप अशक्यच आहे, असाच प्रत्यय येतो. मागे मी म्हटले होते त्याप्रमाणे  ही शब्दांमधून. आशयाची व्याप्ती, सखोलता, तरलता हे तर सगळे खरंच असते पण ते गृहीत धरावे लागते कारण त्यांचीही जाणीव होते, ती अखेर शब्दांमधूनच!! एकदा आशय गृहीत धरल्यावर, कवीने पुढे काय, हे पडताळणे सर्वार्थाने महत्वाचे असते आणि इथे परीक्षा असते, ती भाषेशी, तिच्या घटकांशी आणि घडणीशी. 
आरतीप्रभू इथे, सुरवातीला गद्यमय शब्द वाटतील इतक्या रोकड्या प्रतिमांतून कवितेला आरंभ करतात. सिमेंट, चिरा सारख्या शब्दांतून सुरवात करून, "कळसाआधी भिंत अनावर, दचकून होते इथें ओणवी. "  इथे एकदम काहीसे धक्कातंत्र वापरून कवितेची "जमीन" तयार होते. 
पुढील ओळी खऱ्याअर्थाने कवितेचा आशय व्यक्त करतात आणि कवी म्हणून आपण किती खोलवर विचार करून शकतो ,याची अप्रतिम प्रचिती देतात. एक व्यथा, एक खंत मनाशी बाळगून आयुष्य पुढे चाललेले आहे आणि तो अनुभव देताना, "तुटते चिंधी जखमेवरची, आणिक उरते संथ चिघळणे." अशी असामान्य प्रतिमा वापरतात. वास्तविक, जखम होणे, रक्त गळणे हे आपल्या दैनंदिन आयुष्यात अनेक वेळा घडत असते परंतु खानोलकरांनी "नजर" अशा वेळी प्रगट होते आणि तीच कृती, आधीच्या ओळीच्या अनुभवाशी जोडून घेताना, सगळीच कविता फार वरच्या पातळीवर नेऊन ठेवली जाते.
खानोलकर आपल्या कवितांमधून असाच "अनपेक्षित" पणाचा धक्का वारंवार देतात आणि आपल्या सृजनशक्तीचा प्रत्यय घडवतात. त्यामुळे मला नेहमी असेच म्हणावेसे वाटते, आरतीप्रभूंची कविता, हे त्यांचीच असते, त्याच्यावर त्यांची खास "नाममुद्रा" असते, तिचा "तोंडवळा" वेगळा असतो. ती तथाकथित सामाजिक जाणीव, विद्रोह यांच्या पासून दूर आहे तसेच मानवी प्रगती आणि तिच्या समस्या वगैरेंशी दुरान्वये देखील संबंध ठेवत नाही. 

मुळात आरतीप्रभूंचे लेखन हे वाचकाला आरपार झपाटून टाकते, प्रसंगी हेलपाटून देखील टाकते. अनुभवाची खोली जितकी शक्य आहे, तितकी दाखवण्याचा असामान्य प्रयत्न सतत चाललेला असतो. हीच त्यांच्या अभिव्यक्तीची खासियत म्हणता येईल. इथे आपण, उत्तरोत्तर त्यांची प्रतिभा कशी विकसित होत गेली आणि तशी होताना, वाचकाला आपल्याबरोबर खेचून घेण्याची अद्भुत ताकद, या दोन प्रमुख मुद्द्यांचा विचार करावा लागेल. कवितेसारखे अत्यंत अल्पाक्षरी माध्यम हाताशी घेऊन, प्रतिमांच्या साहाय्याने आशयाची व्याप्ती जी दाखवली जाते आणि त्यामुळे एकूण कविताच कशी समृद्ध होत जाते, हे बघणे अधिक श्रेयस्कर ठरते. 

"कुणाच्या खांद्यावर कुणाचे ओझे?
कुठे उतरावे? कशासाठी तंबू ठोकून? 
कोण मेले कुणासाठी रक्त ओकून? 
या सगळ्याचा हिशेब ठेवायचा कुणी?
मनांतल्या मनात कुजून जगतात कुणी 
गुलाब राहतील तरीही ताजे. 
कुणाच्या खांद्यावर कुणाचे ओझे?

इथले सगळे दिवे विझून जातात,
अंधारांत वृक्ष गोठून झडत राहतात,
कुणी करतात प्रीत, कुणी करतात पूजा,
कुणी खोकत खोकत जीवनाशी पैजा 
मारून म्हणतात : आम्ही राजे!
कुणाच्या खांद्यावर कुणाचे ओझे?

अंत झाला अस्ताआधी, जन्म एक व्याधी,
वेदनांची गाणी म्हणजे पोकळ समाधी. 
कुणी देतो एक हळी, त्याचाच पडतो बळी,
हारासारखे हौतात्म्य त्याच्या येते गळी,
त्याचे त्याला माहित पंजे. 
कुणाच्या खांद्यावर कुणाचे ओझे?"
(कुणाच्या खांद्यावर - नक्षत्रांचे देणे) 
कवितेचा आशय अगदी स्पष्ट आहे, आयुष्यातील अत्यंत निराशावस्थेतील अभिव्यक्ती आहे, अगदी टोकाची वाटावी अशीच आहे आणि त्यासाठी, "दिवे विझून जाणे" किंवा "वृक्ष झडत जाणे" अशा अगदी वेगळ्या आपल्याला सहज समजून घेता येणाऱ्या प्रतिमा वापरल्या आहेत. अशा कवितांमधून कवीची खरी अभिव्यक्ती समजून घेता येते. कवितेतील प्रत्येक ओळ आपल्याला निराशेच्या एका वेगळ्या जाणिवेची प्रतीती देते आणि ती देताना वाचक काहीसा झपाटला जातो. या कवितेतून काही मूलभूत प्रश्नांना त्यांनी हात घातला आहे. नियती आणि आत्मस्वातंत्र्य ह्यांचे खरे स्वरूप काय? त्यांचे नाते काय? नियती म्हटले की तिच्यामागे काहीतरी "नियंत्रण" करणारी शक्ती परंतु स्वतः: मात्र त्यापासून मुक्त, स्वयंभू अशी शक्ती मानावी लागते पण तशी कुठली शक्ती जाणवते का? तर तसे काहीच नसते. आपण फक्त, आपले जीवन घडविता येण्याच्या अनेक शक्यतांचा शोध घेत असतो पण याचाच वेगळा अर्थ, अंशत: तरी आपण आत्मस्वातंत्र्य उपभोगत असतो!! तसे बघितले तर आत्मस्वातंत्र्य तरी आपल्याला कुठे संपूर्णपणे उपभोगता येते.  
"कुणी देतो एक हळी, त्याचाच पडतो बळी,
हारासारखे हौतात्म्य त्याच्या येते गळी,"
निदान या ओळी तरी आपल्याला याच बाबीचा निर्देश करतात. म्हणजे माणसाला स्वातंत्र्य कसले? तर आपला तुरुंग कुठला आहे, हे निवडण्याचा!! त्याशिवाय सुटका नाही. फार तर आपण त्या तुरुंगाच्या भिंती किती? त्याला खिडक्या किती? इतपतच प्रश्न विचारू शकतो. त्यापलीकडे आपण सगळेच हतबल असतो.  
इथे याच कवितेच्या संदर्भात आणखी काही ओळी आठवल्या, आरतीप्रभूंच्याच एका कवितेतील ओळी आहेत. 
"कशासाठी, कुणासाठी, कुठवर कुठवर;
रेटायचा ऐसा गाडा इमानाने जन्मभर". 
मी मघाशी तुरुंगाचा उल्लेख केला, तीच बाब या ओळीत अधिक खोलवर व्यक्त झाली आहे. जर का प्रत्येक आयुष्य हा अभेद्य तुरुंग असेल असे मानले तर मग, तिथे आत्मस्वातंत्र्याला कुठे जागा आहे? आरतीप्रभूंच्या "नक्षत्रांचे देणे" या संग्रहातील बहुतेक कविता, हीच जाणीव आपल्याला वेगवेगळ्या प्रतिमांच्या साहाय्याने दाखवत आहेत आणि त्या जाणीवा सहज समजून घेताना, आपण केवळ विस्मित होण्यापलीकडे काहीही करू शकत नाही. "जोगवा" नंतर "नक्षत्रांचे देणे" हा संग्रह परंतु आरतीप्रभूंच्या अभिव्यक्तीमध्ये कमालीचा बदल घडत गेला. कविता अधिक आत्मलक्षी, अंतर्मुख आणि वेदनेच्या अत्यंत नवीन जाणिवांनी भारून गेली. 
क्रमश: 
मघाशी मी एक विधान केले, आरतीप्रभूंच्या कवितेत वेदनेचे अनेक स्तर आढळतात!! या विधानामुळे एक गैरसमज होऊ शकतो, आरतीप्रभू यांनी फक्त वेदनेचीच कविता लिहिली. वास्तविक, "नक्षत्रांचे देणे" या संग्रहात, वाचताना भावनांचे अनेक कंगोरे आढळतात आणि तिथे मात्र आपण, दि:डमूढ होतो. अशीच एक, संपूर्ण वेगळ्या धर्तीवरील कविता वाचायला मिळते. 

"सबंध घरांत गाणें सुरु आहे,
दिवे लागायला अजून थोडा वेळ आहे,
खिडक्यांच्या गजांतून आलेली उन्हें 
सरकताहेत गाण्यापाशी मंद मंद फिकी,
एक स्कर्टवाली मुलगी गिरकी घेत गेली 
कुठल्यातरी खोलीत : 
गाण्यानेच फेकली फुलांची ओंजळ. 
नागमोडी जिन्यांची बुडताहेत वळणे भरगच्च 
मंद्रात, दिवे लागण्याची सम येतेय जवळ,
जिन्यावरून जातोय कुणी वर वर धीरवान पुरुष,
टक टक टक टक संपत गेली बुटांची टपटप,
माडीवरच्या एका खिडकीत उजळला मंद दिवा,
त्याने धीमी शीळ घुमवली, पोशाख उतरला,
सिग्रेट शिलगावली. 
संबंध घरात गाणे सुरु आहे :
एकेका खोलीचे भान हरपतेय,
एकेका दाराचा अडसर गळतोय,
भिंती सगळ्याच होताहेत पारदर्शक,
तो उभा आहे थोड्या उंचीवर,
ती उभी आहे जागच्या जागी लपल्यासारखी,
त्याला ती दिसली भिंतीतून, 
तिला तो दिसला नाही,
तिला फक्त जाणवला माडीवरील दिव्याचा 
पायांवर सांडलेले गिटारीच्या स्वरासारखा 
थरारता कवडसा,
आणि त्याचा रुंद खांदा तिच्यासमोर आला,
तिने डोकी टेकली त्याच्या नग्न छातीवर :
ती गाणे ऐकतेय,
तो गाणे ऐकतोय :
एक संबंध गाणेच गाणे म्हणतेय
आणि एक संबंध गाणेच गाणें ऐकतेय." 

कविता थोडी दीर्घ स्वरूपाची आहे आणि मुक्तछंदात बांधली आहे. कवितेचा विषय अगदी उघड, उघड वेश्यावस्तीचा आहे.  जरी वेश्यावस्ती असली तरी तिथल्या गणिकेची कोठी आणि तिथला एक अनुभव, हाच खरा विषय आहे. आता गणिका आणि तिची कोठी म्हणजे तिथले गाणे, हे ओघानेच येते. वास्तविक, आता ही संस्कृती पार रसातळाला गेली आहे पण २५, ३० वर्षांपूर्वी, माडीवरील गाणे समाजमान्य असेच होते. आरतीप्रभू कवितेत अनुभव मांडताना थेट मांडतात, कुठेही अनावश्यक पाल्हाळ नसतो की अनावश्यक प्रतिमा नसते. त्यामुळे आशयाला एकप्रकारचे टोक येते. ज्यांना कोठीवरील गायन संस्कृती माहीत असेल त्यांना, "गाणे सुरु झाले" म्हणजे नक्की कसा परिसर असणार, काय वेळ असणार तसेच तिथे कसल्या प्रकारचे व्यवहार असणार या सगळ्यांची इत्थंभूत माहिती नक्कीच असणार आणि त्यामुळे इथे तशा तपशिलात आरतीप्रभू जराही जात नाहीत. "गाणे सुरु झाले" म्हणजे परिसर "मदिर" झालाच असणार आणि तिथले नेहमीचे "व्यवहार" सुरु झालेच असणार, हे गृहीत धरायलाच हवे.  
"गाण्यानेच फेकली फुलांची ओंजळ" या ओळीशी थोडे थबकायला होते. कोठीवरील गाणे खरे पण तरीही गाण्यातून व्यक्त झालेले आर्जव आणि "ओंजळीतून" जाणवणारी भावना, सगळेच आपल्यासमोर एक अमूर्त चित्र उभे करतात. ऐकायला येणाऱ्या स्वरांची सांगीतिक प्रत समजून घेता येते. शब्दांना स्वरांचे कोंदण लाभते. 
हळूहळू तिथल्या व्यवहाराला "जाग" यायला लागते आणि कविता आणखी तपशिलात जाते. कोडगेपणा, हा इथला स्थायीभाव तर असतोच पण त्या जोडीला थंड भावनाशून्यता देखील जाणवते - 
"ती उभी आहे जागच्या जागी लपल्यासारखी,
त्याला ती दिसली भिंतीतून, 
तिला तो दिसला नाही" 
प्रत्यक्ष व्यक्ती समोर असून देखील मनात त्याच्याबद्दल कशाप्रकारचे भाव ठेवायचे, जणू सावलीशी संवाद चाललेला आहे!! इथले सगळे व्यवहार किती कोडगेपणाने चालतात, याचा अत्यंत मोजक्या शब्दांतून मांडलेला आलेख!! 
आरतीप्रभूंनी हीच कल्पना, आणखी दुसऱ्या एका कवितेत इतकीच सुंदररीत्या मांडलेली आहे - 
"इथे भोळ्या कळ्यांनाही आसवांचा येतो वास, कसे कसे हासायाचे, आहे मला" या ओळीतून आपल्याला आणखी वेगळे काय जाणवते? 
आणि, नायिकेचे अस्तित्व देखील , "गिटारीच्या थरथरत्या स्वरांच्या" स्पंदनातून जाणवते. एका बाजूने सुंदर पण त्याचबरोबर दुसऱ्या बाजुने फार अस्वस्थ करणारे रूपक आहे. कविता गाण्याच्या सुरांच्या संगतीने सुरु होते पण बघता, बघता सगळी कविता, अतिशय दाट, गडद असा परिणाम घडवत राहते आणि हे शब्दांचे गारुड फार अद्भुत आहे. काव्य लिहायचे म्हणजे ते अनुभवांवर आधारावेच लागते. बाह्य सृष्टीचा आश्रय प्रतिभेला घ्यावाच लागतो. आरतीप्रभुंची अनुभूती घेण्याची शक्ती इतकी तीव्र आहे की, काहीं वेळा असे वाटते, खऱ्या अनुभवातून काव्यनिर्मिती करण्याऐवजी त्यांनी आपल्या प्रकृतीला अनुसरून आणि अनुरूप असेल निभाव कल्पनेने निर्माण केले आहेत. कवींच्या सृजनशक्तीने आपल्या एका अंगास दुसऱ्या अंगाचा विषय बनवून आपला स्वयंभूपणा आणि आपले स्वातंत्र्य अबाधित राखण्याचा प्रयत्न या वरील कवितेत स्पष्टपणे केलेला आढळतो. 
अशीच एक अप्रतिम कविता, "नक्षत्रांचे देणे" या संग्रहात आढळते. कवितेची सुरवात आणि शेवट, दोन्ही सत्कृतदर्शनी भिन्न वाटतात पण जरा बारकाईने वाचन केले तर त्यातील लय आपल्या मनाला कधी वेधून टाकते, याचा पत्ताच लागत नाही . फार विलक्षण चकवा देते. 

"शब्दाआधीची शांतता : त्यांत तूं,
शब्दानंतरची शांतता : त्यांतही तूं. 
पाखरं आली होती, उडालीसुद्धा,
पाखरं उडालेली पुन्हा आलींसुद्धा. 
एकेक मंत्र तुझा, मुग्ध पुन्हा तूं; 
एकेक पाशांत प्रशांत मी अन तूं. 
हें पात्रसुद्धा प्रतिबिंब लिंबकांत 
नाही दाखवीत, नुस्तेंच प्रवाहित. 
काय कुठे चाललोय, कुणाची कुणाला 
लाभलीय संगत? जरूर कुणाची कुणाला?
अशांत कोण? झालोत कां अनिकेत?
जीवनसूत्राची खेच : पाय कुठे पडावेत? 
भेटलीच आहेस नको त्या वळणावर;
भूतसुद्धा होईन म्हणतेस मरणानंतर सरणावर. 
सुंदर नसतो - असला तरी नको मृत्यू तुला; 
शब्दानंतरच्या शांततेत हवीस तूं मला. 
गाणाऱ्याने नुस्तें नये जाऊ गाऊन, 
जातांना गाणेंच संबंध जावे घेऊन. 
याहून काय सांगूं? हवा तर हात पुढे कर :
वाचीन शब्दहीन रेषा, डोळे मात्र बंद कर. " 

आरतीप्रभूंची कविता वाचताना, मनावर नेहमी परिणाम होतो तो अत्यंत अनुरूप अशा शब्दांचा, शब्दांच्या योजनेचा, अभिव्यक्तीत घडणीचा, बांधणीचा, कविता नेहमी शब्दांच्याच आधाराने वाढते, किंबहुना तेच कवितेचे अस्तित्व असते. चांगल्या अभिव्यक्तीचा एक गुण नेहमी सांगितला जातो - तिचं स्वतंत्र अस्तित्व भासू नये, तेणे आशयांत पूर्ण विलीन व्हावे. ही कविता वाचताना, याचा प्रत्येक ओळीत आपल्याला असा अनुभव येतो.  साध्या निसर्गचित्रातून कवितेचा आरंभ होतो. परंतु वाचताना एकदम, "एकेक मंत्र तुझा, मुग्ध पुन्हा तूं; एकेक पाशांत प्रशांत मी अन तूं." ही ओळ वाचायला मिळते!! कविता वेगळ्याच वळणावर उभी राहते. दोन प्रेमीजीवांचा संवाद पण खरे तर हा स्वतः:शीच चाललेला मूक संवाद आहे पण हे नंतर जाणवते!! मनात चाललेल्या खळबळीतुन निर्माण झालेले प्रश्न आणि त्या त्या विचारलेल्या प्रश्नांतून मिळत असलेली उत्तरे, असे काहीसे स्वरूप या कवितेचे आहे. 
चांगल्या भावकवितेतील भावनाशयासंबंधी काहीं लिहिणे मुळातच फार कठीण असते कारण तिच्यातून जाणवणारा एखाद्या भाववृत्तीचा अनुभव हा संमिश्र असूनही संश्लेषणात्मक, तरल आणि विशिष्ट स्वरूपाचा असतो. आणि त्यामुळे गद्यात तो अनुभव नेमक्या शब्दांत मांडणे फारच अवघड होऊन बसते. एका बाजूने प्रेयसीशी संवादात्मक बोलणे पण दुसरीकडे पटकन मरणाची आठवण करून देणाऱ्या ओळी!! आरतीप्रभुंची प्रतिभा ही अशीच सतत एखाद्या लंबकाप्रमाणे हेलकावे घेत असते आणि आपल्याला फार चकवा देत असते. एकूणच या कवीला मृत्यूबद्दल विलक्षण आकर्षण असल्याचे बहुतेक कलाकृतींमधून आपल्याला अनुभवायला मिळते. 
कवितेचा शेवट किती अर्थपूर्ण केला आहे. सहवास तर संपण्यासाठीच असतो पण त्यावेळी जाणवणारा एकाकीपणा विषण्ण करणारा असतो आणि म्हणूनच "जातांना गाणेंच संबंध जावे घेऊन" अशी अपेक्षा व्यक्त केली जाते. नंतर येणारा रितेपण तरी निखळ असावे, हेच जणू यामधून सुचवायचे आहे. भावनाशयाचा स्थूलतेकडून सूक्ष्मतेकडे प्रवास कसा होतो आणि कविता एकूणच किती सघन होत जाते - 
"गाणाऱ्याने नुस्तें नये जाऊ गाऊन, 
जातांना गाणेंच संबंध जावे घेऊन. 
याहून काय सांगूं? हवा तर हात पुढे कर :
वाचीन शब्दहीन रेषा, डोळे मात्र बंद कर. "
समृद्ध भावनाशयाचे अप्रतिम उदाहरण!! कविता इथेच संपायला हवी, अशीच अपरिहार्यता या ओळी वाचून झाल्यावर आपल्या मनात येते. येथे भावानुभवाचे बाहेरून वर्णन करण्याचा प्रयत्न नसून, त्या अनुभवाचे संवेदनाशरीर साकार करून त्याच्या द्वारे तोच अनुभव पुन्हा निर्मिण्याचा सुंदर प्रयत्न आहे. या विशिष्ट भाववृत्ती एकत्रितपणे जाणवून देऊन, अस्तित्वात असलेल्या सर्व घटकांच्या सूक्ष्मतर छटा अति निकटतेने जाणवून देत आहेत. भावकविता अशीच असायला हवी, हे दर्शवून देणारी ही असामान्य कविता. 
नियतीच्या खेळाची जन्म आणि मृत्यू ही दोन टोके. या खेळाचे स्वरूप जाणून घेणे,हेच या कवीच्या सगळ्या कलाकृतीचे मूलभूत सूत्र आहे. त्यांच्या केवळ कवितेतून(च) नव्हे तर इतर गद्य लेखनातून याचाच आपल्याला पडताळा येतो. याच दोन संकल्पनेतून आपल्या सगळ्या साहित्याचा डोलारा मांडायचा आणि तो देखील अतिशय तरल, सूक्ष्मपणे मांडलेला दिसतो. मराठीत अशा प्रकारचे लेखन फारच तुरळक झाल्याचे आढळते. 

Friday 12 August 2016

इंदिरा संत

वाचता, वाचता एखादी कविता आपल्या वाचनात येते. सुरवातीला काही शब्द परिचित वाटतात आणि ते शब्द आपले लक्ष वेधून घेतात. काहीसे परिचित शब्द पण संपूर्ण ओळ वाचताना वेगळेच अर्थ ध्यानात येतात आणि डोळे टवकारून आपण कवितेकडे एकाग्र होण्याचा प्रयत्न करतो. कवितेचे हेच तर खरे बलस्थान. नेहमीच्या वापरातील शब्दांचे वेगळे अर्थ वाचकांना जाणवून द्यायचे. 
खरतर कविता, विशेषतः भावकविता कशी असावी? नेहमीच्या आयुष्यातील शब्दांतून आपल्याला त्याच शब्दांचा वेगळा अर्थ दर्शवून देणारी आणि तसा भाव व्यक्त होत असताना आपल्या जाणीवा  अधिक अंतर्मुख आणि श्रीमंत करणारी. कवितेची हीच पहिली अट असावी. 
शब्दांतील आशय, त्याचा घाट, रचना कौशल्य वगैरे बाबी या नंतरच्या आणि बऱ्याच प्रमाणात आपण गृहीत धरलेल्या असतात. वास्तविक कुठलेही लेखन हे प्राथमिक स्तरावर केवळ अनुभवांची मांडणी, इतपत मर्यादित असते आणि आपल्याला आलेला अनुभव, आपण आपल्या स्मृतीत जतन  करून ठेवतो, असंख्य अनुभव आपल्या पोतडीत जमा होत असतात परंतु एखादाच असा अनुभव असतो, तो आपल्याला लिहायला प्रवृत्त करतो. तसे बघितले तर प्रत्येक अनुभव हा केवळ "अनुभव" असतो, त्या क्षणाचे अनुभूतीत परावर्तन होत नाही तोपर्यंत त्याला शब्दांची झिलई प्राप्त होत नाही. आलेला अनुभव आणि त्या अनुभवाच्या नेमक्या भावनेशी जितके एकरूप होता येईल, तितके तुमचे लेखन अधिक सशक्त होत जाईल, हा आपल्या सगळ्यांचा सर्वसाधारण अनुभव असतो. 
अनुभवाशी एकरूप होऊन, पुढे स्मृतीत "जिवंत" ठेवलेल्या त्या क्षणाला अनुभूतीतील स्पर्श-रूप-रस-गंधांच्या संवेदना खऱ्या रूपात जाणवायला लागतात आणि असे होत असताना, जेंव्हा वर्तमानात जो अनुभव आपण प्रत्यक्ष घेतलेला असतो, तो अनुभव बाजूला सारून, हा दुसराच क्षण, भूतकाळातील क्षण त्याची जागा घेतो आणि मग भूतकाळ हाच आपला वर्तमानकाळ होतो आणि तिथेच तो अनुभव नव्या जाणिवांनी आपल्या कक्षेत यायला लागतो.
काळाची जाणीव हलकेच पुसून टाकणारी ही नवीन जाणीव आपल्याला निराळ्याच परिणामाची अनुभूती देते. खरे तर आपल्याला जो क्षण अनुभवता आलेला असतो, त्या क्षणाच्याच साऱ्या संवेदन विश्वाला जिवंत करणे, सक्षम लेखनाची पहिली पायरी म्हणायला हवी आणि ही पायरी गाठली की रसिक वाचक देखील त्या संवेदनविश्वाची खरी अनुभूती घेऊ शकतो. वेगळ्या शब्दात, भूतकाळाचा तो क्षण पुन्हा वर्तमानात आणताना, त्यावेळच्या संवेदनेसह लेखनातून प्रकट होणे. त्या क्षणाच्या जाणिवेतील मनाच्या जागृत, अर्धजागृत आणि सुप्त पातळ्यांवरील संज्ञाप्रवाह, त्याच पातळीवरील अनुभवांचेच शब्दरूप प्रकट करणे, हेच तर कवितेच्या अननुभूत आणि अर्धुकलेल्या वाटेचे खरे संचित मानावे. 
अनुभवाच्या पातळीवर आलेला कालावकाश तसाच्या तसा जागृत करून त्यातून जीवनाची नवीन अनुभूती देण्याचा सतत प्रयत्न करणे, एका बाजूला गतकालातील जमा झालेल्या सार्थ स्मृती (जो आपल्याला भावलेला क्षण आहे) आणि दुसऱ्या बाजूला अटळपणे अनंताकडे जाणारे हेतुशून्य भविष्य, या दोहोंतील कालाच्या पोकळीला शब्दांकित करणे, हे कविता या माध्यमाचे खरे सशक्त रूप. 
आणि या वाटेवर चाचपडत असताना, मला इंदिरा संतांची कविता वाचायला मिळाली. 

या दृष्टीने मला इंदिरा बाईंची "कुब्जा" ही कविता फार विलक्षण वाटते. वास्तविक, "कुब्जा" हे व्यक्तिमत्व पुराणकाळातील, काहीसे दुर्लक्षित झालेले, किंबहुना दोन, चार प्रसंग वगळता फारसे महत्व नसलेली व्यक्तिरेखा. असे असून देखील तिचा प्रभाव महाभारताच्या संपूर्ण कथेत जाणवतो. अर्थात ही किमया महाभारतकारांची!! 

"अजून नाही जागी राधा,
           अजून नाहीं जागें गोकुळ; 
  अशा यावेळी पैलतीरावर 
            आज घुमे का पावा मंजुळ;
  मावळतीवर चंद्र केशरी;
             पहाटवारा भवती भणभण;
  अर्ध्या पाण्यामध्ये उभी ती 
              तिथेच टाकुन आपुलें तनमन. 
  विश्वच अवघे ओठा लावून 
               कुब्जा प्याली तों मुरलीरव;
  डोळ्यांमधून थेंब सुखाचे  :
                हें माझ्यास्तव... हें माझ्यास्तव..."

ही कविता वाचताना, आपल्याला एक गोष्ट स्पष्टपणे जाणवते, कवितेत वापरलेल्या प्रतिमा आणि त्या प्रतिमांमधून साधली गेलेली कविता. इंदिराबाईंच्या कवितेतील विचार आपल्याला स्वतंत्रपणे करायला लावणारी ही कविता. तसे बघितले विस्ताराच्या दृष्टीने या कवितेत प्रतिमाविश्व अतिशय मर्यादित आहे. त्या प्रतिमा, त्यांच्या स्थायीभावाच्या जाणिवेने मर्यादित केले आहे. सरत्या रात्रीची वेळ आणि त्यावेळी भणाणणारा वारा!! या वातावरणाच्या भोवती दिसणारा केशरी चंद्र, कवितेतील वातावरण निर्मिती, हा वेगळा शाब्दिक खेळ असतो. प्रतिमा मोजक्या शब्दात मांडावी आणि मांडताना त्यातील आशय अधिक विस्तारित व्हावा!! हेच इथे नेमकेपणा आपल्याला वाचायला मिळते. 
संवेदनानुभवातील उत्कटता हे त्या स्थायीभावातील अंगीभूत ताणांचे आणखी एक लक्षण. अनुभव संवेदनांतून जाणवल्याखेरीज तो अनुभव म्हणून प्रतीत होत नाही. पण त्यातही संवेदनाविश्व एका विशिष्ट उत्कटतेच्या पातळीवर गेल्याशिवाय ते संवेदनाविश्वही जाणवत नाही. त्या दृष्टीने, सपक, सामान्य पातळीवरील संवेदनाविश्व इंदिरा बाईंच्या कवितेत फारसे कधी आढळत नाही. या कवितेत, अर्थातच निसर्गरूपे आहेत पण ती सहजपणे डोळ्यासमोर दिसणारी नाहीत. आपल्या भाववृत्तीच्या स्पंदनांचे प्रतिबिंबच असे निर्माण केले जाते. अतिशय अरुप अशा भाववृत्तीने जाणवणाऱ्या निसर्गाचे रूप या कवितेत आढळते. 
कवितेत प्रतिमा आढळणे आणि त्यातून मूळ आशय वृद्धिंगत होत जाणे, हे भावकवितेचे व्यवच्छेदक लक्षण मानावेच लागेल. बरेचवेळा प्रश्न पडतो, वापरलेली प्रतिमा, मूळ भावनेचा आशय अधिक अंतर्मुख होऊन व्यक्त होते की मूळ भावनेला गुदमरवून टाकते? नाकापेक्षा मोती जड, हे तत्व इथे देखील लागू पडते. प्रतिमासंयोजन म्हणजे तरी काय? जीवनात अनेक अनुभव आपणांस येतात. त्यातील काही संवेदनाद्वारे स्वतः:ला आलेले, काही कल्पनेने जाणवलेले तर काही वैचारिक स्वरूपाचे असतात. काहीवेळा मिश्र अनुभव देखील येऊ शकतात. यातीलच कुठल्याही एकाच्या किंवा एकत्रित अनुभवांचा अर्कभूत परिणाम म्हणजे भाववृत्ती!! तिच्याशीच खऱ्याअर्थाने भावकवितेला नाते जोडता येते आणि ते नाते, प्रतिमांच्या द्वारे सखोल होत जाते. 
"कुब्जा" कवितेत, हेच नात्यांचे ताणेबाणे बघायला मिळतात. या कवितेत, इंदिरा बाईंच्या प्रतिमांना ताकद मिळते, ती संवेदनाविश्वाच्या भरीव आणि निकट अशा जाणिवेमुळे. कवितेच्या पहिल्या कडव्यात राधेचा उल्लेख आणि त्याबरोबर "गोकुळ" आणि "मंजुळ पावा" या प्रतिमा आपल्या मनात एक "जमीन" तयार करतात. पुराणकथेचा आधार घेतला तर कुब्जेने विषाचा प्याला घेऊन जीवन संपविले होते. या कृतीचे वर्णन करताना, 
"  विश्वच अवघे ओठा लावून 
               कुब्जा प्याली तों मुरलीरव;"
किती समर्पक शब्दयोजना आहे. कृष्णाचे नाव देखील कुठे घेतलेले नाही पण "मुरलीरव" या प्रतिमेतून कृष्ण तर उभा राहिलाच पण त्याच बरोबर, "विश्वच अवघे ओठा लावून" या कृतीने आपले अव्यक्त प्रेम व्यक्त केले आहे. बरे, तिची कृती "प्याला पिण्या" इतपत नसून, विष पिताना देखील डोळ्यातून सुख सांडत आहे आणि नुसते सांडत नसून ती भावना केवळ माझीच आहे, हे अधिक महत्वाचे आहे.इथे सगळी कविता कुब्जेची होते आणि सुरवातीची राधा पूर्णपणे लुप्त होते. शेवटच्या कडव्यात जो ताण आहे, तिचा प्रत्यय म्हणजेच भाववृत्तीची जाणीव. 
     
इंदिराबाईंच्या कवितेत निसर्ग आहे आणि त्याच्या प्रतिमा देखील आहेत पण त्या प्रतिमा येताना, शब्दाच्या पलीकडील अर्थ दाखवण्याची किमया करतात. परिणाम असा होतो, आशयाचा मनावर होणारा दृढ परिणाम आणि कवितेच्या बांधणीत येणारी सघनता. प्रतिमा वाचताना, आपले संवेदनाविश्व जागे होते आणि त्याबरोबर भाववृत्ती. बाईंच्या कवितेत याच एकात्मतेचे सूत्र आढळते. जो अनुभवाचा क्षण असतो, त्यातील भाववृत्तीच्या अंतर्गत ताणाच्या जाणिवेतूनच तिचा प्रत्यय द्यायचा आग्रह दिसतो. शब्द, शब्दांची विशिष्ट तऱ्हेने घडवलेली गुंफण यांच्यातील अनेक लय त्यांच्या कवितेत साकार होतात. एखादा संवेदनानुभव निकटतेने प्रतीत करायचा, त्यात रंग भरायचे आणि ज्या क्षणी तो अनुभव स्थिर होत आहे, तेंव्हाच त्याला किंचित धक्का द्यायचा. असे करताना, प्रतिमांची उलटापालट करायची, एका प्रतिमेचा परिणाम दुसऱ्या प्रतिमेने पुसून टाकायचा किंवा दोन्हींच्या मिश्रणाने तिसरीच प्रतिमा प्रत्यक्षात आणायची आणि या सगळ्या खेळातून भाववृत्तीचा क्षण साकार करायचा!!  कधी कधी एखाद्या प्रतिमेतच टाकलेल्या विरोधी प्रतिमेत भाववृत्ती तोलून घ्यायची आणि अशा संपन्नतेणे घडवलेल्या सौंदयात्मक घडणीतून संवेदनाविश्व आणि भाववृत्ती एकत्र जोडून घ्याची. मी मागे म्हटल्याप्रमाणे, आपल्या मर्यादित भावविश्वाचीच पण अतिशय सखोल आणि गहिरी जाणीव अशाप्रकारे करून द्यायची जेणेकरून इतर घटकांची जरुरी नाही. 
"कधी जीवन वाटे वाळवंट वैराण 
वा दावाग्नीने घेरीयलेले रान :
होऊन सहन ना हृदयातील काहूर 
मी निघू पाहते कुठे...कुठे तरी दूर." 
(कधी जीवन वाटे - शेला) 
इथे सुरवातीलाच आयुष्यातील विदग्ध अनुभवाची सांगड घातली गेली आहे आणि ती अनुभूती "वैराण वाळवंट","दावाग्नी" अशा प्रतिमांतून मांडली आहे. कवितेच्या सुरवातीला असा रखरखाट दाखवून कवितेची "जमीन" स्पष्ट केली. याच कवितेतील पुढील ओळी बघता, 
"थरथरती शेतें, रानपाखरें चिमणी
अन क्षणांत होतें स्तब्धचि वातावरणी.
संपूच नये ही रम्य गोजिरी वाट; 
संपूच नये हॅ गंधित हिरवे शेत." 
मघाशी मी ज्या "धक्कातंत्राचा" उल्लेख केला तो इथे बघायला मिळतो. सुरवातीची काळोखी अनुभूती, इथे किंचित हळवी, निसर्गप्रतिमा हाताशी  घेऊन,तो ताण हलका केला आहे. परंतु संपूर्ण कविता वाचली असता, याच प्रतिमेतून सुरवातीचा भाव किंवा भाववृत्तीचे सखोल दर्शन आपल्याला मिळते. भाववृत्तीतील अनुभवाचे घटक जेंव्हा एकमेकांशी संबद्ध होतात, तेंव्हा त्यांना अंत:केंद्रित करणारे जे सूत्र असते, ते त्या भाववृत्तीचे स्पंदन. या स्पंदनाचा लय म्हणजेच त्या भाववृत्तीचा लय. हा लयच कवितेला भावकविता बनवतो. अर्थात, कवितेतील नादलय ही वेगळी संकल्पना आहे. कविता वाचताना कानांवर आदळणारे शब्दांचे आघात, तो नादलय निर्माण करतात. चांगल्या काव्यात हे दोन्ही घटक एकत्रित झालेले दिसतात तरी मुळात ते दोन भिन्न घटक आहेत. 

इंदिराबाईचे काव्य स्वभावत:च सहज, आर्जवी आणि सोपे आहे. मुळात, भावकाव्य हे वैय्यक्तिक अनुभवांची अनुभूती शोधणारे काव्य असते. आधुनिक काव्यात एकूणच "गूढता" या भावच्छटेला अतिशय महत्व प्राप्त झाले आहे परंतु या छटेची छाया देखील या कवितेत आढळत नाही. नेहमीचे, वापरातले शब्द वाचायला मिळतात पण मजा इथेच असते, त्या शब्दांची रचना अशा प्रकारे केली जाते की, तोपर्यंत आपल्या मनात जी छटा दृश्यमान असते, तिचे स्वरूपच, ही कविता पालटून टाकते. 
एखादा वैय्यक्तिक अनुभव जेंव्हा काव्यरूप घेतो, त्यावेळी तो कवीच्या जाणिवेपासून मुक्त झाल्याखेरीज स्वतःचे रूप घेऊन, स्वत्वाने उभा राहू शकत नाही. वैय्यक्तिक अनुभवाशी असलेली "नाळ" तोडणे आवश्यक ठरते.एक इथे ध्यानात ठेवावे लागेल, कुठलेही काव्य, हे एका पातळीवरील संवाद असतो आणि या संवादाचे वाहन भाषेतूनच निर्माण होते आणि हा सामाजिक संकेत आहे. हाच मुद्दा पुढे आणायचा झाल्यास, बाईंच्या कवितेतील भावनाशय हा सर्वस्वी त्यांचाच आहे. 
"विचारांची घोडदौड 
      येई उडवीत धूळ,
तुडवीत टापांखाली 
      मन माझे भयाकूल. 

कधी भवसागरात 
      उठे भीषण भोवरा;
असहाय माझे मन 
      फिरे त्यात गरगरा. 

कधी होई अवचित 
      निराशेची वारामोड,
उन्मळल्या केळीपरी   
      मन घेई पुरा मोड. 

म्हणुनीच येतां रात्र 
      मन जाई घाबरून,
भयभीत सशापरी 
      बसे दडून लपून."
(संग्रह - मेंदी)

वरील कविता वाचताना, संत्रस्त मानसिक अवस्था आणि त्या अवस्थेचे चित्रण, आपल्याला सहज कळून घेता येते. भावकवितेत आशयाची बंदिश किती तऱ्हांनी करता यावी याला भावकविता या रुपाचेच बंधन असते!! काल अमी अवकाश यांच्या अगदी संकुचित अशा क्षेत्रात, अगदी थोड्या घटकांच्या व्दारे अभिव्यक्ती घडवावी लागते. म्हणूनच हे एक क्षितिज गाठल्यावर, त्यानंतरची प्रगती ही अधिकाधिक संमिश्र आणि तरल अशा जाणिवा, जाणवून देणे, हेच असू शकते. ज्या भावच्छटा शब्दांच्या किंचित स्पर्शाने देखील कोमेजतील, त्यांना त्याच शब्दांनी उमलविणे हीच कसोटी इथे असते. 
वरील कवितेत अनेक प्रतिमा वाचायला मिळतात पण त्या प्रतिमांची रचना बघण्यासारखी आहे. आशय एकच आहे, मनाची भयभीत अवस्था आणि त्यासाठी योजलेली प्रतीके, "टापाखाली भयभीत"," गरगरणारा भोवरा", "उन्मळलेली केळ" इत्यादी आहेत. या प्रतिकांमधून कवितेत, त्या क्षणाच्या मनाच्या अवस्थेचेच चित्रण केले आहे. संत्रस्त अवस्था खरेच पण त्यातही कमी-जास्त गडद रंग आढळतात आणि त्यातून सगळं परिणाम अधिक गडद होण्यात होतो. 
एकूणच इंदिराबाईंच्या कवितेत, करड्या-काळ्या रंगाचा प्रभाव जाणवण्याइतपत प्रभावी आहे. अनुभूतीच्या क्षणाच्याच स्पंदनातून भाववृत्तीचा प्रत्यय ह्या प्रवासाला इथे पूर्तता येते. पहिल्या काही ओळीत, एका खास क्षणाचे स्वतंत्र अस्तित्व दाखवले जाते. एकदा तो क्षण दाखवून झाल्यावर मग, त्या क्षणातून पुढे मनात येणाऱ्या भावनांचे पडसाद बघायला मिळतात. हे करताना, कुठेही आधी जो ताण निर्माण केला आहे, त्याची पकड कुठेही विसविशीत होत नसून, पुढील प्रतीकांच्या साहाय्याने त्या चित्राचे रंग अधिक गडद केले जातात आणि वाचकाचे लक्ष तिथेच संपूर्णपणे केंद्रित केले जाते. "उन्मळल्या केळीपरी" सारख्या निसर्गचित्रातून आधीचीच जाणीव अधिक भीषण, खोलवर केली जाते आणि इथे कविता "स्व" शी संवाद करायला लागते. 
तसे बघितले तर या कवितेतली जाणीव, इतर अनेक कवितांमधून आपल्याला मिळालेली असणार मग असे इथे काय वेगळे आहे ? पण, "फॉर्म" आणि "बॅकग्राउंड" यांच्या उलटंपालटीने, संथ चाललेल्या जीवनातील अनपेक्षित आघात नेमका शब्दांकित केला आहे. ही भावस्थिती अनुभवाच्या क्षणातील अंतर्गत ताणांच्या जाणिवेतून साकार झाला आहे.  

इंदिराबाईंच्या बाबतीत एक बाब स्पष्टपणे जाणवते आणि ती म्हणजे प्रत्येक काव्यसंग्रहाद्वारे त्यांची अभिव्यक्ती अधिक अंतर्मुख आणि खोल होत गेली आहे. 
"सहवास" पासून ते "गर्भरेशीम" पर्यंतचा प्रवास न्याहाळताना, आपले प्रतिमाविश्व तसेच काय ठेऊन आणि मर्यादित ठेऊन देखील, त्यांनी अभिव्यक्तीचा 
फार मोठा पट मांडला आहे आणि तो कुणालाही स्तिमित करण्यासारखाच आहे. त्यांच्या कवितेत कधीही आक्रस्ताळेपणा किंवा सामाजिक 
बांधिलकी वगैरे कुठल्याच विचारसरणीचा "ढोल" वाजवलेला नाही. बघायला मिळते, ती अत्यंत संयमित तसेच व्यक्तिगत अनुभवाची संपन्न 
अनुभूती. 
प्रत्येक कलावंताच्या कलाकृतीतून जाणवणाऱ्या त्याच्या व्यक्तिमत्वाचा त्याच्या व्यावहारिक व्यक्तिमत्वाशी काही ना काहीतरी संबंध असतो. 
कारण या दोहोंतूनच त्याचे संपूर्ण व्यक्तिमत्व आकाराला येत असते. अर्थात, कलेच्या आस्वादाच्या प्रक्रियेत मात्र, वैय्यक्तिक स्तर मागे ठेऊन,
आपल्याला कलेचा आस्वाद घेणे गरजेचे असते. एकतर, या दोन्ही पातळ्यांचा स्वभावत: शोध घेणे असफल ठरते. कारण तिथे कलाव्यवहार 
मागे पडतो आणि मानसशास्त्र आणावे लागते. तेंव्हा कलाव्यवहार मानसशास्त्राच्या आधाराने बघायला घेणे, ही अत्यंत निसरडी पायरी ठरू 
शकते. 
बाईंची कविता वाचताना काही ठराविक मुद्दे आकाराला येतात. बाईंचे व्यक्तिमत्व मूलतः आत्मनिष्ठ, आत्मकेंद्रित आहे आणि याचा परिणाम,
त्यांच्या कवितेतील याचा विचारांना सुसंगत असतात. बाईंचा कलाप्रवास न्याहाळताना, प्रत्येक नवीन काव्यसंग्रहातून, विकसित होत गेलेली 
त्यांची आत्मनिष्ठता अवलोकणे, खरोखरच अभ्यासपूर्ण आहे. वर आपण त्यांच्या सुरवातीच्या काळातील काही कविता इथे चर्चेला घेतल्या 
होत्या. त्या कविता आणि नंतरच्या काळात आलेला "गर्भरेशीम" या काव्यसंग्रहात जाणिवा, याचा मागोवा विलक्षण आहे आणि या 
संग्रहातील प्रतिमादर्शन आणखी विस्मयचकित करून टाकते. 

"जागृत देवस्थान, पर्वणीचा दिवस. 
प्रवेश द्वारांतून न चालतांच आंत गेले. 
पादत्राण सुरक्षाकडे चपला ठेवून मुक्त झालें. 
पूजा सांभाळीत पुढें चाललें. 

'मामी, घड्याळ सांभाळा. 
काकू, पर्स सांभाळा. चेन सांभाळा.' 
फिरणाऱ्या पोलिसांचे फिरते घोष ऐकले 
सगळें छातीशी घट्ट धरले; पुरती बद्ध होऊन 
भयाच्या गळाभर पाण्यांतून पुढें 
सरकत चाललें. 

गाभाऱ्यासमोर लांबलचक कट्टा. त्यावर 
चौके खोललेले बँकेतल्यासारखे. पोस्टासारखे. 
ईथे फुलें-दुर्वा. इथें तांदूळ-प्रसाद. इथें पैसे. 
इथें कापूर-उदबत्ती. इथें... इथें... 

चौक्याचौक्यांतून हजेरी नोंदवताना मधेंच 
डोळे दिपले. 
विदयुद्दीपांची रोषणाई. चांदीसोन्याचा झगमगाट. 
हिऱ्यामाणकांचा लखलखाट.... 
दिपलेले डोळे किलकिले झाले तेंव्हा मी 
बाहेर आले होतें.... 

दर्शन घडले होतें की नव्हतें?
हात जोडले होते की नव्हतें?
मनात कांहीच नव्हतें 
मुकेंमुकेच चालूं लागावें वाटत होतें."

मुद्दामून सगळी कविता इथे लिहिली आहे. कवितेतील आशय स्पष्ट आहे. सध्याचा देवळांचा जो बडिवार 
चाललेला आहे, त्याची अत्यंत निराश अनुभूती. कवितेची सुरवात किती संथ लयीत चालली आहे. कुठलातरी 
सणासुदीचा दिवस असताना,देवाचे दर्शन घेण्याचा मनसुबा. साधी प्रवृत्ती आणि त्यातून देवळाच्या आवारात 
चाललेल्या हालचाली. सगळीकडे गोंगाट आहे, हे दर्शविण्यासाठी,
'मामी, घड्याळ सांभाळा. 
काकू, पर्स सांभाळा. चेन सांभाळा.' 
फिरणाऱ्या पोलिसांचे फिरते घोष ऐकले. 
या ओळींतूनच सगळा परिसर उभा राहिला आणि मनाची द्विधावस्था मांडली गेली. पुढील ओळींतून 
देवळातील भयानक गर्दीचे वर्णन, बरेचसे रोखठोक, तसे बघितले सगळी कविता एका रेषेत जात आहे. 
एक विविक्षित अनुभव असेच म्हणता येईल पण खरी गंमत येते, कवितेच्या शेवटाला. 
 "मनात कांहीच नव्हतें 
मुकेंमुकेच चालूं लागावें वाटत होतें" 
दर्शनासाठी आलो पण अखेर सगळे मन रितेच राहिले आणि त्या निराशेपोटी स्वतः:शीच संवाद साधत 
अस्वस्थ मनाने चालत राहावे. याचसाठी सगळं अट्टाहास केलं आहोत का? असा प्रश्न आपल्या देखील 
मनात उभा राहतो. 
"गर्भरेशीम" संग्रहातील कविता बरीचशी वेगळी आहे, अर्थात आधीच्या कविता संग्रहाच्या संदर्भात. बहुतेक 
कवितांमध्ये, इतर संग्रहात जशा प्रतिमा आढळतात, तसा सढळ वापर दिसत नसून, कविता अनुभवाला थेट 
भिडत आहे. किंबहुना, बहुतेक कविता स्वानुभवाचीअनुभूती देणाऱ्या आहेत पण तरीही रचनेच्या दृष्टीने 
फार वेगळ्या आहेत. ईथे काहीजण कारण नसताना, "सामाजिक" जाणिवेची कविता वगैरे लेबले लावतील, 
पण त्याला फारसा अर्थ नाही कारण हा अनुभव फार वैय्यक्तिक स्तरावरील आहे. 

इंदिराबाईंच्या कवितेचा आतापर्यंत थोडक्यात धांडोळा घेण्याचा प्रयत्न केला. त्यांच्या प्रतिमाविश्वाचा 
मार्ग काढण्याचे धाडस केले. मी "धाडस"  मुद्दामून वापरला आहे कारण कुठल्याही कलाकाराच्या 
विचारांचा (त्यात प्रतिमाविश्व अंतर्भूत होते) गाभा शोधणे, मुळातच फार कठीण असते. आपण 
फारतर अदमास घेऊ शकतो, तर्क लढवू शकतो. त्यापलीकडील शोध हा नेहमीच अर्धुकल्या 
अवस्थेत, ठेचकाळत न्याहाळावा लागतो. 
असे म्हणतात, आयुष्यातील सगळी दु:खे, आनंद पचवावी लागतात, मग त्यात दुसऱ्याची 
दु:खे देखील सखोलतेने पचवावी लागतात. तेंव्हाच कुठे, कधीतरी मनात लिखाणाचे "बीज" 
रुजायला लागते. इथेच प्रत्येकाचे संवेदनाविश्व वेगळे होत जाते आणि तदनुषंगाने निर्मिती 
देखील. काव्यनिर्मितीच्या बाबतीत हीच जाणीव अधिक अंतर्मुख व्हावी लागते. त्यामुळे बाईंची 
कविता वाचताना, एक अनुभव येतो की इंदिराबाई प्रतीक म्हणून पाहायला लागल्या म्हणजे 
मग त्या प्रतिमा आपल्याला रायाला लागतात आणि एखाद्या प्रतिमेच्या अनेकवार होणाऱ्या 
संपन्न अशा जाणिवेतून आपल्या स्मृतीत ती प्रतिमा राहते, एक प्रतीक म्हणून. 
त्यादृष्टीने बघायला गेल्यास, संवेदनांचा प्रवास हा भावनेकडे आणि भावनेशयाचा प्रवास 
स्थूलतेकडून सूक्ष्मतेकडे सुरु असतो. प्रतिमा ही इथे कवितेत अवतरते. बाईंनी शब्दांकित 
केलेल्या प्रतिमेच्या जाणिवेतून स्फुरणारा जो अनुभव, तोच अनुभव हीच त्यांची खरी 
त्यांची भाववृत्ती. असे आपल्याला म्हणता येईल. इथे संवेदना हाच अनुभव आहे आणि ते 
भाववृत्तीचे शरीर आहे. या विशिष्ट भाववृत्तीतील एकाच वेळी अस्तित्वात असलेल्या सर्व 
घटकांच्या सूक्ष्मतर छटा जाणून घेणे, म्हणजेच बाईंच्या कवितेचा आस्वाद घेणे होय. 
अखेर कवितेतील जाणीव म्हणजे तरी  काय?ज्या संवेदना आपल्याला होतात, त्याचे
भाववृत्तीत परावर्तन होतानाचा प्रवास!!
आपण कितीही म्हटले तरी हा सगळं प्रवास घडतो, तो अखेर शब्दांच्याच आधारे. त्यांच्या 
कवितेत नेहमी भाववृत्तीच्या क्षणातील अंतर्गत ताणाच्या जाणिवेतूनच प्रत्यय देण्याचा प्रयत्न 
सतत चाललेला दिसतो. शब्द, शब्दांची विशिष्ट पद्धतीने घडवलेली गुंफण, यांच्यातून अनेक 
लय साकार होतात. एखादा संवेदनानुभव निकटतेने प्रतीत करायचा, त्यात रंग भरायचे 
आमी ज्यावेळी तो स्वतः:च्या अस्तित्वाने स्थिर झाला असे वाटत असते, त्याचवेळी 
धक्का देऊन. तो किंचित हलवायचा आणि ही स्थिरता, अस्थिरतेच्या पार्श्वभूमीवर प्रगट 
करायची - जसे आपण वरील कवितेत (देवस्थान - गर्भरेशीम), कवितेच्या शेवटी अनुभवले.

एखादी मंद लयीतली प्रतिमा निर्माण करायची, तिच्यावर जाणीव हेलकावे घेऊ लागली की 
लगेच तिच्या जोडीला अत्यंत अनपेक्षित द्रुतलय टाकायचा आणि त्या बदलाच्या धक्क्यातून 
परिणाम साधायचा!! कधी कधी, प्रतिमांची जागाच बदलून टाकायची आणि त्याच्या 
मिश्रणातून तिसरीच प्रतिमा उभी करायची आणि या सगळ्या घालमेलीतून भाववृत्तीचा क्षण 
साकार करायचा. 
यात एक विफलता बेहमी जाणवते. जे पकडायचा प्रयत्न त्यांनी आयुष्यभर केला, त्याची इतिश्री 
ही कधीच प्राप्त होणार नव्हती. स्वानुभवातून जाणवलेल्या संवेदनाविश्वाचा अवकाश इतका 
प्रचंड आहे की तो अशा प्रतिमेच्या चिमटीत कधीच सापडू शकणार नसतो. प्रश्न असतो, आपण 
त्यादृष्टीने किती अर्थपूर्ण प्रयत्न करतो? या धडपडीला इतकाच अर्थ प्राप्त होत असतो आणि 
मला वाटते, इथे ही धडपड बऱ्याच अंशी अर्थपूर्ण झाली.