Wednesday 18 June 2014

“पैस” – वैचारिक ललित निबंध!!



सर्वसाधारपणे निबंध म्हटले की त्याबरोबर वैचारिक भाग वाचनात येतो आणि एकादृष्टीने ते योग्य देखील आहे. तसे पहिले तर “वैचारिक” या शब्दालाच बरेचसे लोक दूर ठेऊ पाहतात. त्यातून, अशा प्रकारच्या लेखनात जडजम्बाल शब्द, सहज ध्यानात येणार नाही अशी वाक्यरचना आणि मुळात विषयाचे गांभीर्य, यामुळे अशा पुस्तकांच्या वाट्याला फारसे कुणी जात नाही. अशा पार्श्वभूमीवर, “पैस” हा कै.दुर्गा भागवतांचा निबंध संग्रह खरोखरच वाचनीय आहे. वास्तविक, या निबंधात आपण जी “बोली” भाषा म्हणतो, त्याचा संपूर्ण अभाव आहे पण त्यामुळे निबंधांना आवश्यक अशी गंभीरता लाभते आणि दुर्गाबाईंनी आपल्या अंगभूत शैलीने त्या निबंधांना लालित्यपूर्ण वळण दिले आहे. तसे आकाराने पुस्तक अतिशय छोटेखानी आहे पण त्यातील प्रत्येक निबंध हा वाचनीय तर झालाच आहे पण त्याचबरोबर त्या विषयाच्या संदर्भात आपल्याला वेगळे विचार करायला प्रवृत्त करतात.

“पैस” म्हणजे अवकाश आणि हा शब्द तसा नेहमीच्या वापरातला नाही. असे असूनदेखील, अशा प्रकारचे शब्द आपल्या वाचनात आल्याने,, आपले शब्द वैभव वाढते आणि ज्या विषयाच्या संदर्भात हा शब्द वापरलेला आहे, त्या विषयाची व्याप्ती देखील वाढवते. असे कितीतरी शब्द, हा निबंध संग्रह वाचताना, आपल्या वाचनात येतात. पहिलाच निबंध आहे “पैस”. नावावरूनच लक्षात येते की, ज्ञानेश्वरांवर आधारित लेख आहे. ते नेवाशे गाव, तेथील ज्ञानेश्वरांचे मंदिर, तिथला तो प्रसिद्ध खांब आणि त्या दर्शनाने झालेली अनुभूती, या सगळ्यांचे अतिशय सुरेख विवेचन वाचायला मिळते. मला जर काही अधिक भावले असेल तर, दुर्गाबाईंनी, ज्ञानेश्वर हा एक कवी , या दृष्टीने सगळा विचार केलेला आहे. लेखात कुठेही त्याच्यावर देवत्व लादलेले नाही. ज्ञानेश्वरी वाचनात, त्यांना चार शब्द सापडतात आणि त्या शब्दांच्या अनुरोधाने, ज्ञानेश्वरांची प्रतिभा किती उत्तुंग होती, हे दाखवून दिले आहे. “सहनसिद्धी”, “दु:खकालिंदी”, “कारुण्यबिंब” आणि “ज्ञानमित्र” असे ते ४ शब्द आहेत आणि या शब्दांच्या अनुरोधाने, त्यांनी जे विवेचन केले आहे, ते मुळातून वाचणे, हाच खरा आनंद आहे. बौद्धधर्माच्या साहचर्याने ज्ञानेश्वरांवर जो परिणाम घडला, तसेच नाथपंथाचा प्रभाव, याचा एकत्रित परिणाम अतिशय थोडक्यात मांडलेला आहे.
वास्तविक मी “नास्तिक”!! तरीही , “पंढरीचा विठोबा” हा निबंध मला खूप भावला. आता, इतक्या वर्षात पंढरपूर इथे जावेसे वाटले नाही(हे चूक की बरोबर हा वेगळा भाग!!) आणि आता तसे घडेल असे अजिबात वाटत नाही. असे असूनदेखील, तिथला विठोबा, त्याचे मंदिर आणि त्याच्या संदर्भात प्रचलित असलेली एक लोककथा!! हे सगळे फार विलोभनीय आहे. विठोबा मुळचा दक्षिणेतला पण तो पंढरपुरात का आला, याबद्दल अनेक प्रवाद आहेत. कुणी म्हणतात पुंडलीकामुळे तर धनगर जमातीत याचे कारण आहे, तो पदूबाईमुळे आला. आता याच संदर्भात लेखिकेने ती सगळी लोककथा थोडक्यात लिहिली आहे आणि त्यानिमित्ताने मानवी स्वभावाचे वेगळेच दर्शन आपल्याला घडते. वास्तविक लोककथा या नेहमीच विलक्षण असतात, त्यात थोडा वैचारिक भाव तर असतोच पण त्याचबरोबर भाबडेपणा देखील सुंदररीत्या गुंफलेला आढळतो. मुळात, माणसे ही कधीच एकरेषीय नसतात, त्याच्या स्वभावाला अनेक कंगोरे असतात, हाच विचार बऱ्याचशा लोककथांमध्ये वाचायला मिळतो. या लोक्काठेच्या निमित्ताने, तुकारामंचे अभंग कसे हीच कथा भावदर्शीपणे उलगडून दाखवतात, हे देखील अतिशय सुरेखपणे लिहिलेले आहे.
पुढील निबंध आहे, तो फार वेगळ्या विषयावरील. ज्या समाजाचे आपण एकतर अति कुचेष्टेने तरी करतो किंवा ओंगळ भावनेने करतो. “जोगवा” हे त्या लेखाचे शीर्षक. लेखिका मुंबईतून बसमधून हिंडताना, एकदम, अशा वस्तीतून बस हिंडता असताना पोहोचते. वास्तविक बसमधून या जोगवा व्यक्तींचे नृत्य बघताना, त्यांच्या मनात जे विचार येतात, त्याचेच शब्दरूप. वास्तविक आपल्यापैकी कुणीही अशा लोकांकडे कधीच फारसे लक्ष देत नाही, या वास्तवावर हा लेख बघावा. त्यांचे, त्या वेश्यावस्तीतील वावरणे, त्यांची विशिष्ट वेशभूषा आणि नृत्याच्या निमित्ताने होणारे हावभाव, नृत्याची पद्धत, या सगळ्या गोष्टी अगदी नेमकेपणे टिपलेल्या आहेत. त्यांच्यात, अर्थात तालवाद्य असते, एकाच्या डोक्यावर देवीचा कलश असतो आणि ती कलश नृत्य करताना डोक्यावरच सांभाळण्याची कसरत करीत असतो. लेख वाचताना, हेच आपल्याला वाटत असते की, आपल्या सौंदर्याच्या कल्पना, आपण किती ठाशीव आणि एकरेषीय बनवीत असतो. आपण आपलीच नजर आपणच घातलेल्या चष्म्यातून बघत असल्याने, सगळे सुसंगत वाटत असते पण त्यापलीकडे देखील सौंदर्याची व्याप्ती असते, हे आपल्या गावीही नसते. तसे बघितले तर सगळेच “पुरुष” पण कुठेतरी नियतीच्या फेऱ्यात अडकल्याने, असल्या अश्लील आणि ओंगळवाण्या परिस्थितीत राहावे लागल्याने, चेहऱ्यावर येणारा उत्तानपणा, मुजोरपणा याचे कुठेच त्या नृत्यात दर्शन होत नसते आणि त्यामुळे तेच नृत्य कामुक हावभावाचे प्रदर्शन न ठरत, त्या देवीची पूजा ठरते, याचेच लेखिकेला जे अप्रूप वाटते, त्या भावनेचा सगळा आलेख आहे.
“द्वारकेचा राणा” ह्या लेखात, लेखिकेच्या विचक्षण दृष्टीकोन दिसून येतो. सततच्या भ्रमंतीच्या ओढीपायी, द्वारका या गावातील, श्रीकृष्णाच्या मंदिरात पोहोचल्यावर, मनात आलेल्या विचारांचे प्रतिबिंब आहे. तसे मंदिर अगदी छोटेखानी, अशा शब्दात सुरवात करून, मंदिराचे साधे पण अनलंकृत सौंदर्य, त्याच्या आजूबाजूचे शिसारी आणणारे वातावरण, तिथला तो गलिच्छ बोल हे सगळे लिहिल्यावर, तिला एकदम मीरेची आठवण येते. इथे नीरा कशी पोहोचली असेल, या प्रश्नातून उठलेल्या विचारांतून पुढे त्या गोमती नदीकाठची वाळू, त्या नदीचा काठ,  आणि त्या दर्शनातून आठवलेला राणा!!हा सगळा भाग जरी बौद्धिक  दृष्टीने न पटण्यासारखा असला तरी भावानिक ओल कुठेतरी आपल्या मानला भिडते, हे निश्चित.
आपल्या भारतीय संस्कृतीत यमुना नदीचे महत्व अपार आहे, हे निश्चित. गंगा नदी म्हणून मोठी  आणि पवित्र ( प्रत्यक्षात कशी असे हा भाग वेगळा!!) मानली जाते पण, यमुना नदीचे महत्व अधिक भावदर्शी आणि चित्रदर्शी आहे. तिथल्या लोककथा, लोकसंगीत, लोककविता ह्या आपल्या भावजीवनाच्या अत्यावश्यक भाग बनून गेल्या आहेत. लेखिका, मथुरेला साधी यात्रेकरू म्हणून गेल्या असताना, यमुनेचे विशाल पत्र बघून, ज्या भावना मनात उमटल्या, त्याचे अतिशय जिवंत शाब्दिक चित्रण म्हणजे “यमुना-कालिंदी”. लेखाच्या नावानुसार, ज्ञानेश्वरांचा उल्लेख आवश्यकच. त्यांनी ज्या प्रकारे यमुनेचे भावविभोर चित्र आपल्या काव्यात रेखाटले आहे, त्या उल्लेखानेच या लेखाला श्रीमंती लाभते. तो यमुनेचा घाट, घाटावरील वर्दळ, त्यानिमित्ताने निर्मिलेले अनेक संकेत आणि कथा, याची सुंदर सांगड या लेखाच्या निमित्ताने घातली आहे. तसेच, “नैनीच्या पुलावर” या लेखातून, नैनी-प्रयाग संगम, नर्मदा आणि गंगा या नद्यांचे एकत्रित येणे, त्यानिमित्ताने प्रचलित असलेले संकेत, धार्मिक विधी आणि त्यावरील भाविक श्रद्धा, याचे थोडक्यात आपण संपूर्ण दर्शन होते. नदी दिसली की अभावितपणे हात जोडले जाणे आणि त्या पात्राजवळ गाडी आली की, काहीतरी त्या नदीच्या पाण्यात “दान” म्हणून चार नाणी टाकणे!! लेखिकेने यापैकी काहीच केले नसल्याने, बाजूच्या अपरिचित प्रवासी बाईने आश्चर्य व्यक्त करणे, हा सगळा भाविकतेचा भाग सुरेख रीतीने मांडला आहे. त्याच निमित्ताने झालेले मानवी स्वभावाचे अभावित दर्शन, प्रवास करताना झालेल्या बोधी वृक्षाचे दर्शन ह्या सगळे उल्लेख अतिशय वाचनीय झाले आहेत. वास्तविक हे दोन्ही लेख वाचल्यावर, लेखाची लांबी अधिक दीर्घ झाली असती तरी चालले असते, अशी चुटपूट मानला लागते.
आपण, लहानपणापासून इतिहासात “राणी लक्ष्मीबाई’ हिच्या अनेक कथा वाचीत आलो आहोत. त्यानिमित्ताने, तिच्या स्वभावातील बेडरपणा, त्याकाळच्या इंग्रजांशी केलेला एकाकी सामना, ह्या सगळ्या गोष्टी जवळपास पाठ झालेल्या आहेत. वास्तविक, राणी लक्ष्मीबाई  ही इंदूरजवळची तरीही नाव साद्धर्म्यामुळे महाराष्ट्राला अधिक जवळची!! इंदूर म्हटले की इंदुरी साडी आलीच आणि त्याच आठवणीतून लेखाची सुरवात होते. इंदूरजवळचा महेश्वरी घाट आणि तिथले वातावरण!! वाचताना, आपण प्रत्यक्ष तिथे पोहोचलो आहोत असे वाटणे, ही लेखनाची किमया!! त्या घाटावरील वर्षानुवर्षे चालत आलेल्या प्रथा आणि त्याची जीवापाड चाललेली जपणूक!! तिथे लक्ष्मीबाईचे साधे, सरळ शुभ्र वस्त्रातील देखणे स्मारक आणि त्या स्माराकानाजीक्च, वर्षानुवर्षे चाललेले विधी, ह्याचे फार हृद्य वर्णन वाचायला मिळते. तो महेश्वरी घाट, त्याच्या प्रवाहात तरंगत असलेल्या नावा,काठावरचे महादेवाचे तसेच साधे मंदिर आणि त्या मंदिराच्या सान्निध्यात प्रचलित असलेली शुभ्र नागाची अनवट कथा, सगळे वाचताना आपण, त्या घाटावरच जाऊन पोहोचतो!! आपल्याला अजूनही. राणी लक्ष्मीबाई हिचे राजकारणी योद्धा हेच स्वरूप माहित आहे  पण या लेखाच्या निमित्ताने तिचे कुळ, ती राजकारणात कशी आली आणि नंतर प्रत्यक्ष नवरा अवलक्षणी निघाल्यावर, तिने राज्य राखण्यासाठी केलेले अथक प्रयत्न, हे सगळेच आपल्याला वाचताना नवीन वाटते. तसेच त्या काळातदेखील, तिने जो दानधर्म केला, त्याचा खर्च तिने, स्वत:च्या प्राप्तीतून केला होता, असे उल्लेख फारच चकित करतात. सर्वात विलोभनीय भाग म्हणजे तिथे चालत असलेले वाळूच्या लिंगाचे पूजन!! नर्मदातटावर शतकानुशतके चालत असलेली वेद्मंत्रासहित  पूजा, आणि त्यापुजेच्या सान्निध्यात राहिल्यावर मनात उमटणाऱ्या भावभावनांचे तरंग, सगळेच सुंदर लिहिले गेले आहे.
गोव्याला गेल्यावर ख्रिस्ताचे दर्शन होणे क्रमप्राप्तच असते. आपण कितीही धर्मातीत असलो असे म्हटले तरीही आपल्या मनात कुठेतरी “देव” या संकल्पनेचे वास्तव्य असतेच. त्याला आपण, कधी नियती असे नाव देतो तर कधी नशिबाचा हवाला देतो. दुर्गाबाई ह्यांचे प्राथमिक शिक्षण हे ह्याच पार्श्वभूमीवर झाले असल्याने, गोव्यात, चर्चमध्ये प्रवेश करताना, शाळेची आठवण आणि त्या निमित्ताने म्हटलेय प्रार्थना आणि रीतीरिवाज, याची आठवण मनात येणे, क्रमप्राप्तच ठरते. त्यानिमित्ताने, ख्रिश्चन धर्माचे पालन, त्या धर्माच्या आज्ञा, काही प्रचलित रूढी आणि विचार, याचे सुसंगत दर्शन वाचताना होते. लेखाच्या निमित्ताने तिथल्या काही लोककथांच्या आठवणी देखील येतात. वास्तविक दुर्गाबाई ह्या बुद्धिवादाच्या पुरस्कर्त्या, पण तरीही ख्रिस्त दर्शनाने मनावर उमटलेले चित्र काही वेगळेच विचार मांडतात!! लहानपणापासून ख्रिस्ताचे झालेले संस्कार आणि पुढे कृष्णाचा भावलेला आविष्कार, यामध्ये झालेली मनाची तगमग!! या पार्श्वभूमीवर जेंव्हा त्या चर्चमध्ये शिरतात, तेंव्हा होणारे भावनिक  आंदोलन, या हिंदोळ्यातच आपण अडकतो. चर्चच्यानिमित्ताने घडलेला इतिहास थोडक्यात वर्णन केलेला आहे. चर्चमध्ये शिरताना झालेली भावस्थिती आणि बाहेर आल्यावर झालेली चौकस वृत्ती, वाचताना, आपणच थोडेसे विचारात पडतो आणि अंतर्मुख होता. जो इतिहास आहे, तो साम्राज्यशाहीचा पण  तरीही तठस्थ भूमिकेतून विचार करता मनात वेगळेच विचार घोंगावत राहतात. एक वैचारिक संघर्ष या निमित्ताने अनुभवायला मिळतो आणि आपण नास्तिक आहोत म्हणजेच योग्य मार्गावर आहोत का? हा प्रश्न जरूर आपल्या मनात येतो.
“डोंगरमाथ्यावर” हा लेख फारच वैचारिक आहे असे म्हणता येईल. शरदऋतूमधील सकाळची वेळ आणि डोंगरमाथ्यावर लेखिका!! अति उंचावर पोहोचल्यावर आपली मनस्थिती कशी सैरभैर होते, मन कसे चंचल आणि कष्टी होते,  आणि जे दृश्य आपण बघत असतो, तेच दृश्य आपल्याला कसे कोड्यात टाकते, हे खरोखरच अनुभवण्यासारखे आहे. आपण, निमित्ताने अनेकवेळा डोंगर चढून जातो, माथ्यावर थोडा वेळ विश्रांती घेतो पण, आपल्या मनात असे विचार कधी येतात का? सभोवतालचे निर्सग दृश्य आपल्यालाच कसे संमोहनात गुंतवून टाकतात, हे वाचण्यासारखे आहे. कान्हेरी डोंगराच्या शिखरावरील स्मशानस्थाने आणि ती देखील कशी तर, इथेच हिंदूंचा दहनसंस्कार, मुसलमान-ख्रिस्त यांच्या स्मारकांची बांधणी एकत्र!! बहुतेक गावात स्मशाने ही  गावाला बिलगून असतात पण इथे हे स्थान डोंगराच्या कपारीत!! या स्मशान सान्निध्याने मनाला आलेली विकलता, तिच्याच जवळ बांधलेल्या लेण्या आणि त्या लेण्यांच्याच निमित्ताने झालेले प्रचंड खोदकाम आणि शिल्पकला, सगळे वाचताना गुंगवून टाकते. तिथे दिसलेली ध्यानस्थ बौद्ध मूर्ती!! त्यानिमित्ताने प्रचलित असलेल्या काही लोककथा, हे सगळे इतके अप्रतिमपणे मांडलेले आहे की, जरी लेख थोडा दीर्घ असला तरी संपूर्ण वाचल्याशिवाय राहवत नाही.
“उनापारखी” हा लेख देखील असाच!! अजिंठा-वेरूळ इथल्या लेण्यांचा मनावरील चित्रात्मक संस्कार, हाच हेतू आहे. सुरवातीला, अजिंठा इथल्या चित्रांचा उल्लेख आणि त्या चित्रांचा मनावर झालेला परिणाम!! पुढे उन्हाच्या झळा सोसत कैलास लेणे येते!! लांबून झालेला साक्षात्कार आणि जवळ आल्यावर उमटलेले चित्र!! सगळेच कसे अप्रतिम आहे. खातर अजिंठ्यातील चित्रे आणि वेरूळ इथल्या लेणी, यासाठी घ्यावी लागलेली प्रचंड मेहनत, वाट्याला आलेली उपेक्षा!! सगळे वाचताना, आपणच आपल्या संस्कृतीचे संवर्धन करण्यास किती “नालायक” आहोत, हीच जाणीव आपल्या मनाला छळत असते. कैलास लेण्याच्या निमित्ताने तिथले शिल्पसौंदर्य, त्याची घडण, आणि त्या शिल्पाचा मनावर उमटणारा संस्कार!! हे सगळे वाचताना, परत आपल्या मनात एकच विचार येतो, आणि तो म्हणजे, आस्तिकता बिनबुडाची हे तर खरेच पण नास्तिकता स्वीकारून आपण कुठला वैचारिक टेंभा मिरवीत असतो?? ही चित्रे रंगविणारे आणि अशी असामान्य शिल्पे खोदणारे कलाकार, याची कुठलीच आठवण आपण जतन केली नाही. वास्तविक एक इंग्रजाने हा सांस्कृतिक ठेवा शोधून काढला आणि संवर्धन करायचे ठरविले, अन्यथा आताची आपली जी विमनस्कता बघितली तर, अजून किती वर्षे ह्या गोष्टी आपण टिकवून ठेवू, याचीच शंका मनात वारंवार येते. कैलास लेण्याचे विराट स्वरूप आणि त्याचा चित्रात्मक संस्कार मनात ठेउनच हा लेख संपतो.
शेवटचा लेख आहे,”बुद्ध प्रलोभन”!! जगातील काही अजरामर व्यक्ती घेतल्या तर त्यात बुद्धाचा समावेश नक्कीच करावा लागेल. त्याची सगळी विचारसरणी पटेलच असे नाही पण विचार वाचल्यावर, त्या दृष्टीने आपले मन आकृष्ट नक्कीच होते. ह्या लेखाच्या निमित्ताने, दुर्गाबाई यांनी, गौतम आणि त्या गौतमाचे बुद्धात झालेले परिवर्तन, याला सुंदर आलेख मांडलेला आहे. बुद्धाला अभिप्रेत असलेला शांतरस वैराग्यरसात कसा नेमकेपणाने आविष्कृत होतो, हे इथे वाचायला मिळते. अर्थात, गौतमाचे बुद्धात होत असतानाचे परिवर्तन लिहिताना, अनेक दृष्टांत कथा आणि लोककथा यांचा आधार घेतलेला आहे.
असा हा अप्रतिम वैचारिक निबंध संग्रह!! आपले नेहमीचेच शब्द पण लेखनात अशा प्रकाराने अवतरतात की, त्याच शब्दांचा वेगळाच अर्थ आपल्या ध्यानात येतो!! हेच दुर्गाबाईंचे कौशल्य!! मराठी भाषा किती समृध्द आहे, याचे रोकडे प्रत्यंतर देणारे पुस्तक. तसे आकाराने छोटेखानी आहे पण त्याची वैचारिक श्रीमंती फार वरच्या दर्जाची आहे.

No comments:

Post a Comment